Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘ग्रीनफिल्ड’ची साइट बदलण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रीनफिल्ड प्रकल्पाची चिकलठाण्याजवळील साइट बदलण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत येण्याची शक्यता आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्यात चिकलठाणा येथील ग्रीनफिल्ड विकसित करण्याचे नमूद केले आहे, परंतु या भागातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. सुमारे ९८ शेतकऱ्यांनी ग्रीनफिल्डच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे चिकलठाण्याऐवजी नक्षत्रवाडी येथे ग्रीनफिल्ड करण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव सर्वसाधारणसभेत येण्याची शक्यता सूत्रांनी दिली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात बोलविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अनिश्चित

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबादः मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर मित्रपक्षाला विधान परिषदेच्या दोन जागा देण्यास अडचण असल्याने भाजपसमोर संकट उभे राहिले आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याची शक्यता पक्षातून वर्तविण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात निर्णय घेणार असून, अॅडजेस्टमेंटची चिन्हे दिसत नसल्याने आणि शिवसेनेने एक मंत्रिपद अधिकचे मागितल्याने भाजपची अडचण आणखी वाढली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला नजिकचा मुहूर्त मिळणे कठीण झाले आहे. मार्चनंतरच विस्तार शक्य होणार आहे.

सत्तेवर येऊन सव्वा वर्ष उलटून गेल्यानंतर आता भाजपने मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे ठरविले होते. प्राथमिक तडजोडीनुसार भाजपच्या वाट्याला पाच, शिवसेना दोन, आरपीआय (ए), राजू शेट्टी गट आणि महादेव जानकर गटाला प्रत्येकी एकेक अशा दहा जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. नागपूर अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याचा भाजपचा प्रयत्न होता, पण तांत्रिक अडचणीमुळे विस्ताराला ग्रहण लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; भाजपच्या वाट्याला आलेल्या पाच जागांमधून विभागनिहाय मंत्रिपदे देणे निश्चित झाले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन तेथे एक, मराठवाडा, खान्देश व विदर्भ प्रत्येकी एकेक मंत्रिपद निश्चित झाले होते, मात्र मुंबई विदर्भातून कोटा वाढवून देण्याचा दबाव वाढला होता. दुसरीकडे शिवसेनेने दोनऐवजी तीन मंत्रिपदे मागितली. एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे सेनेला हवी आहेत. त्यामुळे भाजपचे गणित चुकण्यास सुरवात झाली. मित्रपक्षांना कबूल केल्याप्रमाणे तीन मंत्रिपदे देणे आवश्यक आहे. आरपीआय (ए) आणि राजू शेट्टी गटाचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात घेतल्यानंतर त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देणे आवश्यक आहे. विधान परिषदेतील जागा जून महिन्यात रिक्त होणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार करून मित्रपक्षांना स्थान दिले असते तर सहा महिन्यांत त्यांना कुठेही सामावून घेता येणे शक्य नव्हते. हा धोका पत्करायचा नाही म्हणून भाजपने तूर्तास विस्ताराच्या चर्चेस पूर्णविराम दिला आहे. जूनमध्ये जागा रिक्त झाल्यानंतर भाजपच्या कोट्यातून दोन जणांना विधान परिषदेची संधी दिली जाऊ शकते. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अन्यथा मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार करून तीन महिन्यांनंतर विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते. अॅडजेस्टमेंटच्या गणितामुळे भाजपची कोंडी झाली आहे.

निष्ठावंतांची अडचण

भाजपसमोर मित्रपक्षाला न्याय देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र अडचण होणार आहे. वर्षानुवर्षे पक्षाचे काम केले. आता सत्ता आल्यानंतर विधानपरिषदेची संधी मिळू शकते, अशी आशा निर्माण झाली होती. पण मित्रपक्षांना कोटा दिल्यानंतर निष्ठावंतांना कुठे सामावून घ्यायचे? अशी अडचण पक्षासमोर येणार आहे.

शिवसेनेकडून दुर्लक्ष?

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेनेला चांगले यश मिळाले. मंत्रिमंडळात समावेश होताना शिवसेनेकडून मराठवाड्याला प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. आता विस्ताराच्या चर्चेतही मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सेनेकडून मराठवाड्याची उपेक्षा होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. महायुतीतील सर्व मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात लवकरच घोषणा करतील. - शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भारतीय जनता पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी दिवे खरेदीत ग्राहकांना वैताग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज बचतीसाठी वीज ग्राहकांनी एलईडी दिव्यांचे वाटप सध्या सुरू आहे. काही वाटप केंद्र रविवारी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. टीव्ही सेंटर येथे एलईडी दिवे वाटपाचे काम रविवारीही सुरू होते, मात्र पन्नालालनगर केंद्रावर रविवारी या दिव्यांचे वाटप बंद ठेवण्यात आले होते. यामुळे तेथे आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.

औरंगाबाद शहरात टीव्ही सेंटर येथे महावितरण कार्यालयतर्फे एलईडी वाटपाचा केंद्र सुरू करण्यात आले. तेथे गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे. रविवारीही हे केंद्र सुरू होते. एलईटी बल्ब १०० रुपयांना देण्यात येत आहे. त्यापैकी दहा रुपये ग्राहकाने केंद्रावर द्यावेत. उर्वरित रक्कम वीज बिलात समाविष्ट करण्यात येणार आहे, मात्र या केंद्रावर इंटरनेट बंद असल्याचे सांगून संपूर्ण रक्कम घेण्यात येत होती. त्यामुळे काही ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर रकमेचे चार समान हप्त्यात विभाजन करून एलईडी दिवे देण्यात आले.

रविवारी सुट्टी असल्याचे कारण दाखवून पन्नालालनगर येथील केंद्रावर एलईडी दिव्यांची विक्री बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे तेथे आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागले.

सेंटर वाढविण्याची मागणी

पन्नालालनगर मध्ये आलेल्या काही नागरिकांनी 'मटा'शी बोलताना सांगितले की, सुट्टीचे कारण दाखवून एलईडी दिव्यांची विक्री बंद ठेवण्यात आली आहे. रविवारी सुट्टी असलेल्या ग्राहकांनी कोणत्या दिवशी एलईडी दिवे खरेदी करावेत, असा प्रश्न आहे. महावितरणने विक्री केंद्रांची संख्या वाढवावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान २०० उत्तरपत्रिका तपासा

$
0
0

पॉलिटेक्निकच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना निर्देश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पॉलिटेक्निकल परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी राहत असल्याच्या विद्यार्थ्यांकडून अनेकदा तक्रारी केल्या जात आहेत. राज्य तंत्रशिक्षण मंडळानेही याला दुजोरा देत ज्येष्ठ प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी वेळ द्यावा, अशा सूचना केल्या आहेत. ज्येष्ठ प्राध्यापकाने किमान २०० उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे निर्देशही दिले आहेत.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या परीक्षांमधील उत्तरपत्रिका तपासणीत अनेक त्रुटी राहिल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा असते. याबाबत अनेक तक्रारीही करण्यात येतात, परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. उत्तरपत्रिका तपासणीत सिनिअर प्राध्यापकांचा सहभाग कमी असल्याने हे प्रकार घडतात, असेही बोलले जाते. याचबाबतीत राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्राध्यापकांसाठी उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात काढलेल्या पत्रात तपासणीत त्रुटी राहत असल्याचे सांगितले आहे. तपासणीतील त्रुटी दूर करण्यासाठी ज्येष्ठ प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणींचे काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हिवाळी परीक्षेपासून शासकीय व अनुदानित तंत्रनिकेतनमधील प्रत्येक ज्येष्ठ प्राध्यापकाने किमान २०० उत्तरपत्रिका तपासल्याच पाहिजेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्राचार्यांनीही तात्काळ दखल घ्यावी, अशाही स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. मंडळाचे अधिकारी आणि पॉलिटेक्निक कॉलेजांच्या प्राचार्यांची सप्टेंबरमध्ये बैठक झाली. त्यातही प्राचार्यांनी समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांसमोर मांडला होता.

गोपनीय अहवालातही होणार नोंद

उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात सहभाग घेणार नाहीत, अशा प्राध्यापकांच्या वार्षिक मूल्यमापन अहवाल व गोपनीय अहवालात तशा प्रकारची नोंद करण्यात येणार असल्याचेही मंडळाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवनऊर्जेचे पंखे थांबले

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेत दहा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला पवनउर्जा प्रकल्प गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. त्याची जबाबदारी स्वीकारण्यास प्रशासन तयार नाही. ही यंत्रणा नेमकी कोणी दुरुस्ती करावी, हे देखील माहिती नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयांच्या आवारात, इमारतींवर वाऱ्याच्या सहाय्याने वीजनिर्मिती करणारे प्रकल्प 'मेडा'ने बसविले होते. जिल्हा परिषद आवारात दोन पंखे बसविण्यात आले. या प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या प्रकल्प उभारणीसाठी जिल्हा परिषदेने ३० लाखांचे कर्जही घेतले होते. त्याची पूर्ण परतफेड अद्याप झालेली नाही.

या प्रकल्पातून बांधकाम विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या दालनात वीजपुरवठा होतो. महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर इन्व्हर्टर ऐवजी पवनउर्जेतून तयार झालेली वीज वापरण्यात येत होती. 'मेडा'चा प्रकल्प संपल्यानंतरही जिल्हा परिषदेत हा प्रकल्प सुरू होता. सुरवातीला कृषी विभागाच्या अखत्यारित देखभाल दुरुस्ती होती. नंतर ती बांधकाम विभागाकडे देण्यात आली, असे अधिकारी खासगीत सांगतात. अधिकृतरीत्या मात्र कुणालाच काही माहिती नाही. त्यामुळे प्रशासनातच मोठा संभ्रम आहे. पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत दोन महिन्यांपूर्वी उशिरापर्यंत कामकाज चालत होते. एका दिवशी ओव्हरलोड झाल्यामुळे हा पवनउर्जा प्रकल्प बंद पडला. बॅटरी नादुरुस्त झाली. ती बदलायची कुणी या वाद असून, त्याकडे प्रशासनाने लक्षच दिलेले नाही.

पवनउर्जा प्रकल्पाची नेमकी जबाबदारी आहे?, असा सवाल उपस्थित केला असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) छायादेवी शिसोदे, कृषी विकास अधिकारी सीताराम कोलते, बांधकाम विभागाचे अभियंता साळवे यांनी त्यांच्या विभागाकडे जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले. काही कर्मचाऱ्यांनी कृषी आणि बांधकाम विभागाकडे जबाबदारी असल्याचे सांगितले. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.

पवनउर्जा प्रकल्प नेमका कुणाच्या अखत्यारित आहे. त्याची सद्यस्थिती काय आहे, या संदर्भात नेमकी माहिती नाही. पूर्ण माहिती घेऊन सांगता येईल.

- डॉ. अभिजित चौधरी, सीईओ, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवगाव फाट्यावर काँग्रेसचा ‘रास्ता रोको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी देवगाव जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या उज्वला सोनवणे व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोडवरील देवगाव फाटा येथे सोमवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनामुळे रहदारी अर्धा तास ठप्प झाली होती.

रास्ता रोको आंदोलनापूर्वी काँग्रेसतर्फे देवगावमधून फाट्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासमोर सोनवणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गणेश शिंदे यांनी भाषण केले. किमान आता तरी युती शासनाने लक्ष घालून रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, असा आरोप करून रस्त्यांची कामे न झाल्यास यापुढे लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

आंदोलकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. देवगावचे उपसरपंच अनीस कुरेशी, माजी उपसरपंच संदीप गोरे, प्रदीप दिवेकर, ज्ञानेश्वर बोडखे, राजेंद्र वाळुंजे, सुभाष रावते, उमाकांत कुलकर्णी, गणेश सोनवणे, सीमा दिवेकर, रागिणी दिवेकर आदींचा सहभाग होता.

मोर्चेकरुंचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ए. एस. तागडे यांनी स्वीकारले. देवगाव पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक राजश्री आढे, लालासाहेब कांबळे, के. के. गवळी यांनी बंदोबस्त ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ लाखांच्या मोहाने गमावले ४६ हजार

$
0
0

वैजापूर : 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून तालुक्यातील मनूर येथील एका तरुणाला ४६ हजार रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिऊर पोलिसात राजन मल्होत्रा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात मनूर येथील गोकुळ दौंगे याला राजन मल्होत्रा नामक व्यक्तिने तुम्हाला 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात 'चेहरा पहचानो' या स्पर्धेत चारचाकीचे बक्षिस लागल्याचे फोनवरून कळवले. बक्षिसाची रक्कम १२ लाख ८० हजार रुपये हवे असल्यास राजेशकुमार याच्या नावे दिलेल्या खात्यावर बँक अॉफ इंडियामध्ये रक्कम भरण्यास सांगितले. बक्षिसाचा मोह न आवरल्याने गोकुळ याने चापानेर येथील बँकेच्या शाखेत ४६,३१५ रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या खात्यावर बक्षिसाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे गोकुळ याने शिऊर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून राजन मल्होत्रा याच्याविरुद्ध फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी द्यावे या मागणीसाठी सोमवारी पैठण व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रह्मगव्हाण येथील पंपहाउस बंद पाडले. जिल्हाधिकारी चर्चा करेपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी सायंकाळी अटक केली. त्यांना बिडकीन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

जायकवाडी धरणातून शेतकऱ्यांना पाणीउपसा करण्याची परवानगी द्यावी अन्यथा १४ डिसेंबरला ब्रह्मगव्हाण येथील पंपहाउस बंद पाडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र १३ डिसेंबरपर्यंत शासनातर्फे या मागणीची दखलच घेतली गेली नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान अन्नदाता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पैठण, गंगापूर येथील शेतकरी ब्रह्मगव्हाण येथील वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाउसमध्ये घुसले. त्यांनी पंपहाउस बंद करून जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांना आंदोलनात किती शेतकरी सहभागी होतील याचा अंदाज नव्हता. त्यामुळे येथे बंदोबस्तावर मोजकेचे पोलिस होते. परंतु, अंदाजापेक्षा जास्त शेतकरी आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पोलिस बंदोबस्त वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आंदोलनकर्त्या अर्ध्या शेतकऱ्यांना पंपहाउसबाहेर काढण्यात आले. परंतु, निम्मे शेतकरी आत होते. दरम्यान, दिवसभर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलनमागे घेण्याची विनंती केली. मात्र, जिल्हाधिकारी स्वतः आंदोलनस्थळी येऊन चर्चा करून ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत पंपहाउस बाहेर येणार नाही, पंपहाउस सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. आंदोलनात कृष्णा पाटील डोणगावकर, बद्रीबापू बोंबले, शिवाजी रोडे, विष्णू बोडखे, बद्री पाचोडे यांच्यासह शेकडो शेतकरी सामील झाले होते.

नगर जिल्ह्यातील शेतकरी जायकवाडी धरणातून बेकायदा पाणीउपसा करत आहेत. उद्योगाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना धरणातून पाणीउपसा करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

- जयाजीराव सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष, अन्नदाता शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाणेगावात घरफोडी; दोन बाइकची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

घाणेगाव येथून दोन मोटारसायकल चोरी व एक घरफोडी झाली आहे. या घरफोडीत ४ ग्रॅमची सोन्याची पोत व मुलाच्या पायातील वाळे चोरीस गेले आहेत. या घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या.

एमआयडीसीला लागून असलेल्या घाणेगाव येथील रहिवासी रावसाहेब नारायण दंवडे व भारत ढेपले यांनी त्यांच्या पल्सर मोटारसायकली नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर लावल्या होत्या; सोमवारी सकाळी उठल्यानंतर त्या गायब झाल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. दरम्यान रविवारी रात्री फकीरचंद सूर्यभान गायके यांच्या घरात चोरी झाले.

विजेचे वेळापत्रक बदलल्यामुळे त्यांनी दोन रात्री शेतीत पाणी सोडले होते. त्यामुळे रविवारी रात्री ते गाढ झोपी गेले. त्यांचे कुटुंबीयही झोपले होते. चोरांनी जिन्याला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या सुनेच्या गळ्यातील सोन्याची पोत, लहान मुलाच्या पायातील चांदीचे वाळे, दोन मोबाइल, असा ऐवजी चोरून नेला. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठेनगरातील गादी घर आगीत खाक

$
0
0

वाळूज : साठेनगर येथील गादी घराला सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

साठेनगरमधील गादी घरातून दुपारी अचानक धूर निघत असल्याचे शेजारच्या नागरिकांच्या लक्षात आले. काही समजण्याच्या आत दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडले. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी ती विझवण्यासाठी धाव घेतली. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार आघाडीमुळे सेना, भाजपला डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

दोन दशकांपासून वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेली शिवसेना व शिवसेना सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांसाठी यावेळची निवडणूक अस्तित्वाची आहे. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते, कामगार संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जनस्वराज्य कामागार परिवर्तन आघाडीने या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढवली आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील बहुसंख कामगार बजाजनगरमध्ये राहतात. या बजाजनगराचा समावेश वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीमध्ये आहे. त्यामुळे येथील राजकीय सत्ता हाती ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. येत्या १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात उतरत आहेत. यापूर्वी ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी दोन दशके प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला अपयश आलेले आहे.

येथील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास ठेवलेला आहे. मात्र गटबाजीमुळे शिवसेनेत वाद झावे आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया शेकडो शिवसैनिकांसह विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपमध्ये दाखल झाले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चोरडिया यांना वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकीत यश दाखवावे लागणार आहे. दुसरीकडे आमदार संजय शिरसाठ यांच्यासमोर दोन दशकांपासूनची सत्ता राखण्याचे आव्हान आहे.

दरम्यान, भाजप व शिवसेनेने विद्यमान सरपंच उपसरपंचांसह सदस्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सदस्य म्हणून वावरणाऱ्यांची नाराजी वाढली आहे. ही नाराजी दूर करण्याचा दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहे. पण ते कोणाचे काम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही काँग्रेस, मनसे या पक्षांनी उमेदवार दिल्याने मतविभाजन अटळ आहे. या परिस्थितीत जनस्वराज्य कामगार परिर्वतन आघाडीच्या अस्तित्वामुळे शिवेसना व भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडसाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे. सर्व्हिस रोडला अडथळा ठरणाऱ्या पंढरपूर येथील तिरंगा चौकातील मालमत्ता पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सिडकोने सोमवारी १० मालमत्ता भुईसपाट केल्या.

सिडको वाळूज महानगर विकास आराखड्यात औरंगाबाद-अहमदनगर महामार्गालगत सर्व्हिस रोड दाखवण्यात आला आहे. मात्र आराखड्यास दोन दशके लोटूनही सर्व्हिस रोड तयार करण्यात आलेला नाही. यादरम्यान सर्व्हिस रोडलगत व रोडवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी सिडकोने नोटीस बजाविली होती. त्यावर काही मालमत्ताधारकांनी कोर्टात धाव घेतल्याने मोहीम थंडावली होती. त्यावर सिडकोने अपील केल्यानंतर कोर्टाचा निकाल सिडकोच्या बाजुने लागला आहे. त्यानंतर सिडकोने मालमत्ताधारकांना नोटीस बजाविल्या.

प्रत्यक्षात सोमवारपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. ही मोहीम सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, सिडको प्रशासक हनुमंत अरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे. मालमत्ता अधिकारी शशिकांत वाईकर, अतिक्रमण हटवा अधिकारी जी. आर. साटोटे, कर्मचारी सुधीर खैरे, भीमराव सोनवणे, कोमलसिंग जाधव, साधना सुरडकर, हरि गायकवाड आदींचा मोहिमेत सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाचे वाढते कार्य प्रशंसनीय : डॉ. राजेंद्रसिंह परदेशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाढते कार्यविस्ता‌रीकरण उत्तम आहे. सामाजिक अडीअडचणी पाहून संघ नेहमीच कार्यतत्परता दाखवतो. मुळात हीच संघाची ओळख आहे. हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे,' असे गौरवोद्गार डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांनी काढले. रविवारी विद्यानगरातील हनुमान मंदिरासमोर संघाचे 'चंद्रगुप्तनगर - महासंगम' उत्साहात झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर दे‌वगिरी प्रांतसह कार्यवाह हरीश कुलकर्णी, नगर सहसंघचालक देवानंद कोटगिरे, नगर संघचालक डॉ. एन. डी.कुलकर्णी उपस्थित होते.

संघाच्या दृष्टीने गजानन महराज मंदिर - ते पुंडलिकनगर, पुंडलिकनगर ते जयभवानीनगर, जयभवानीनगर ते सिडको, सिडको ते जालना रोड, जालना रोड ते विद्यानगर व गजानन महाराजमंदिरपर्यंतच्या भागाला 'चंद्रगुप्तनगर' संबोधण्यात येते. या परिसरातील स्वयंसेवकांसाठी आणि नागरिकांसाठी या महासंगमचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. परेदशी म्हणाले, 'संघाचे कार्य विस्तारत आहे. कामाचा व्याप वाढत आहे. यातून संघ नागरिकांपर्यंत अधिकाधिकपणे उघडरित्या पोहचत आहे. संघाचे जे कार्य सध्या सुरू आहे, ते अत्यंत वाखाणण्याजोगे आहे.' हरीश कुलकर्णी म्हणाले, 'वारंवार देशात होत असलेल्या आक्रमणाची चिंता आहे. हे प्रशस्त आहे का? हे विचार करण्याची वेळ आता आली आहे. मुघलांच्या आक्रमणापासून ते आताची विविध आक्रमणे आपण पचवली. लोकांना आता संघाच्या कार्याची व स्वयंसेवी संघटनेचे काम जाणून घेण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.' कार्यक्रमात नगर सहकार्यवाह अॅड. संदीपान मोरमपल्ले यांनी सांघिक गीत गायले. डॉ. सतीश मसलेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नगर कार्यवाह लक्ष्मण लांडगेवाड यांनी प्रस्तावना केली. सतीश पाठक यांनी वैयक्तिक गीत गायले. अॅड. अमित देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

मेघालय प्रकल्प गीत

महासंगम कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे चेन्नई पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यात आले. यासाठी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संघाच्या संपूर्ण गणवेशात २०० स्वयंसेवक तर ३०० नागरिकांची उपस्थिती होती.

पूरग्रस्तांसाठी निधी संकलन

ईशान्य भारतातील मुलांसाठी असलेल्या 'मेघालय' वस्तीगृहाचे भूमीपूजन सिडको एन २ येथे करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. संघ म्हणजे काय, शाखा म्हणजे काय, याचे सादरीकरण महासंगममध्ये करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारचाकी ड्रायव्हिंग परीक्षा प्रशिक्षकाविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चारचाकी वाहन परवान्यासाठी घेतली जाणारी परीक्षा, आता प्रशिक्षणार्थीला एकट्याला द्यावी लागेल. त्यांच्यासोबत प्रशिक्षकाला बसू दिले जाणार नाही. तसे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सोमवारी दिले.

चारचाकी वाहन परवाना देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत यापूर्वी प्रशिक्षणार्थी उमेदवाराच्या शेजारी प्रशिक्षक बसलेला असायचा. आरटीओ सर्जेराव शेळके यांनी सोमवारी या परीक्षेदरम्यान पाहणी केली. तेव्हा त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. उमेदवार चारचाकी वाहन शिकल्यानंतरच पक्क्या परवान्यासाठी परीक्षा देतो. मग त्याच्या शेजारी प्रशिक्षक कशाला, असे म्हणत त्यांनी उमेदवारांची प्रशिक्षकाविना परीक्षा घ्यावी, असे आदेश दिले. त्यामुळे आजच्या अनेक परीक्षार्थी उमेदवारांनी चारचाकी वाहन परवाना मिळविण्यासाठी एकट्याने परीक्षा दिली. सहाय्यक मोटार वाहन अधिकारी किरण मोरे यांनीही आदेशाचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी वाहन चाचणी परीक्षेची पाहणी केली. या नव्या आदेशामुळे आज अनेक उमदेवारांनी आम्हाला एकट्याने वाहन चालविणे शक्य नाही म्हणत, परीक्षा दिलीच नाही. त्यांनी पुढची तारीख मागून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांनी आंदोलनात यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर जलवाहिनीच्या माध्यमाने सिटी वॉटर युटीलिटी कंपनीच्या ताब्यात पाणीपुरवठा देण्याचा प्रकार भविष्यासाठी घातक आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात व्यवसाय होता कामा नये, ते पाणी हे 'ना नफा ना तोटा' या तत्वावर मिळाले पाहिजे. यासाठीच्या आंदोलनाचा भाग म्हणून वकिलांनी सहभागी व्हावे,' असे आवाहन प्रा. विजय दिवाण यांनी सोमवारी केले.

समांतर जलवाहिनीच्या विरोधात प्रा. विजय दिवाण यांनी सुरू केलेल्या जनजागृतीचा भाग म्हणून जिल्हा कोर्टात जिल्हा वकील संघ व लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोशिएशनच्या वतीने ही सभा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितेश ललवाणी, सचिव मधुकर आहेर, अंकुश जाधव, मनोहर टाकसाळ, अॅड. बी. एच. गायकवाड, सुलभा परदेशी, सुभाष लोमटे, अॅड. डॉ. सी. एस. टेंभुर्णीकर, यतीन ठोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी प्रा. दिवाण यांनी समांतर जलवाहिनीविषयी संपूर्ण माहिती दिली. 'समांतर जलवाहिनीचे काम सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे दिल्यापासून आजपर्यंत कुठलाही करार पाळला गेला नाही. कंपनीने पहिला टप्पा पूर्ण केल्याचा दावा केला असला तरीही १२ फुटांचे २५ पाइप अंथरुन ठेवलेले आहेत. त्यालाच पहिला टप्पा, असे सांगून दिशाभूल केली जात आहे. देशभरात कुठेही पाण्याचा व्यापार होत नाही, तो प्रकार औरंगाबादेत सुरू आहे. नागरिकांना 'ना नफा ना तोटा' या तत्वावर पाणी उपलब्ध करुन दिले पाहिजे. खासगीकरणाला विरोध करून ही योजना हाणून पाडली पाहिजे, म्हणूनच जनजागृती सुरू केली आहे. हा लढा जनआंदोलनात बदलण्यासाठी वकिलांनी सहभाग व्हावे,' असे आवाहनही त्यांनी केले. सचिन थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सुनील काळे यांनी आभार मानले. या वेळी अभय टाकसाळ, सुरेश देशमुख, सतीश चव्हाण, सचिन गंडले, राकेश कुलकर्णी, सुरेश सोनवणे, हरबक पाटील, अशोक ठाकरे, एकनाथ रोडगे पाटील यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांच्या समितीकडे आक्षेप

माहितीच्या अधिकारातून मिळवलेली सर्व कागदपत्रे मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशी समितीला देऊन आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याशिवाय हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात पूर्वीच्या दोन याचिकांसोबत ही योजना रद्द करण्याच्या विनंतीसाठी याचिका दाखल केल्याचेही प्रा. दिवाण यांनी यानिमित्ताने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोट्यवधींच्या गायरान जमीन नोंदींकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना कोट्यवधींच्या गायरान जमिनींकडे प्रशासनाच्याच थंड कारभारामुळे डोळेझाक होत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही सध्याच्या नोंदींचा आकडा उपलब्ध नाही.

शासनाच्या या जमिनींवर ग्रामपंचायती तसेच तलाठ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, ग्रामपंचायतींनाच हाताशी धरून या जमिनीचा गेल्या अनेक वर्षांपासून वापर सुरू आहे तर शहर परिसरात असलेल्या या जमिनीवर भू‌माफियांचा डोळा आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे या जमिनींवर ले आउट करून प्लॉट सर्वसामान्यांना विकून फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. शासनाने गायरान व सरकारी जमिनी वि‌शिष्ट प्रयोजनासाठी राखीव आहेत. या जमिनी सुरक्षित ठेवण्याची जबाबादारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. तलाठ्यांनी गावनमुना तयार करून तहसील कार्यालयाला द्यावा, अशा केवळ सूचनाच देण्यात येतात. प्रत्यक्षात जमिनींचे रेकॉर्ड मात्र तयार होत नाही. झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे शहर परिसरातील ग्रामपंचायतींमध्ये अतिक्रमणांच्या तक्रारी पुढे येत आहेत. या अतिक्रमणामुळे गुरांचे चराई क्षेत्र कमी होत आहे. गावागावात काही जणांनी अनेक पिढ्यांपासून शेतीशेजारील गायरान जमीन व गावठाणाजवळच्या शासनाच्या जमिनीवर घर बांधणे, अंगण वाढवणे या प्रकारे अतिक्रमण केले आहे.

अतिक्रमणाचे आकडे जैसे थे

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गायरान जमिनींबाबतचे जुनेच रेकॉर्ड कायम असून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालयांमध्येही याप्रकारच्या नोंदीची अपडेट नाही. १९९१ च्या शासन निर्णयाच्या परिशिष्टात दर्शविण्यात आलेल्या जमिनींपैकी औरंगाबाद जिल्ह्यात ४ हजार ३५८ व्यक्तींनी ४५५९.९२ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यापैकी ३ हजार ५२८ व्यक्तीनी ३३१६.२३ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण शासनाकडून नियमित करून घेतले आहे. उर्वरित १२४३.६९ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा दावा करण्यात आलेली प्रकरणे नाकारण्यात आली आहेत. ही जमीन ८३० नागरिकांच्या ताब्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडितेचा ‘इन कॅमेरा’ जबाब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडी प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीचा सोमवारी सकाळी कोर्टापुढे इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात आला. अटकेतील टोळीने अद्याप या प्रकरणी चुप्पी साधली आहे. त्यांनी विक्री केलेल्या इतर तरुणींच्या पोलिस संपर्कात असून लवकरच त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

मिसारवाडी प्रकरणातील पीडित अल्पवयीन तरुणीची सुटका होऊन सोमवारी पंधरा दिवस उलटले आहेत. याप्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या मुलीची तिच्या मानलेल्या मावशीने व मामाने विक्री केल्याचे निष्पन्न झाले असून सहा जणांची टोळी मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटकेत आहे. या टोळीने पाच तरुणीची अशाप्रकारे विक्री केल्याची कबुली दिली आहे. सोमवारी पीडित मुलीचा कोर्टापुढे जबाब घेण्यात आला. तपास अधिकारी राजकुमार पाडवी यांनी या मुलीला कोर्टापुढे हजर केले. तिची आई यावेळी तिच्यासोबत होती. या टोळीने लग्नाच्या नावाखाली विक्री केलेल्या पाच तरुणींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. या तरुणींशी संपर्क साधण्यात येत असून लवकरच त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

पुन्हा शहरात येणार नाही

पीडित मुलगी व तिच्या आईला पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी तिच्या आईशी संवाद साधला. आपल्या मुलीचे मोठे नुकसान झाले असून यापुढे औरंगाबादला पाय ठेवणार नसल्याचे संतापजनक उद्गार पीडित मुलीच्या आईने काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी सीईओंवर कारवाई नाही

$
0
0

औरंगाबाद : छावणीच्या सीईओ पूजा पलिचा यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र गेल्या महिन्यात उपाध्यक्ष किशोर कच्छवाह आणि नगरसेवकांनी संरक्षणमंत्री मनोरहर पर्रीकर यांना दिले होते.

यानंतर सीईओंवर कारवाई होईल, असे संकेत मिळत होते, परंतु आपल्यावर कोणतीही कारवाई किंवा काहीही पत्र मिळालेच नसल्याचे स्वत: पूजा पलिचा यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. दरम्यान, उपाध्यक्ष आणि नगरसेवक संरक्षणत्र्यांना भेटले नसून कार्यालयीन अधिकारी व रस्ते वाहतूक-सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांना भेटून आले होते. छावणीत विकास कामे होत राहतील आणि नगरसेवकांच्या विविध मागण्याही पूर्ण केल्या जातील, असे पूजा पलिचा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंड, सुपेकर, राडीकर यांना दिलासा

$
0
0

दोषारोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश

अनुकंपा भरती घोटाळा

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

एस. टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील बोगस अनुकंपा भरतीप्रकरणात अधिकारी मिलिंद बंड, संजय सुपेकर व सुरेश राडीकर यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला. तिघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करू नये, असे निर्देश न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. के. जाधव यांनी सोमवारी दिले.

औरंगाबाद विभागात १९९८ ते २००५ या नऊ वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नंदकुमार कोल्हारकर समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीतून २२ सप्टेंबर रोजी आठ जणांची बोगस भरती झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आणि त्यांची फेरतपासणी करण्यात आली. यात वरिष्ठांनी आठ कर्मचाऱ्यांची बोगस नावांनी भरती केल्याची माहिती समोर आली. नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये घेण्यात आल्याची कबुली खुद्द निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिली. या प्रकरणी विभाग नियंत्रक कार्यालयातर्फे फेरतपासणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयातर्फे पोलिस कारवाईचे आदेश देण्यात आले होते. विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे आठ गुन्हे दाखल करण्यात आले. अनुकंपा भरती घोटाळा प्रकरणी निवृत्त व कार्यरत १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रामकृष्ण शेकुजी चव्हाण (रा. किनगाव, ता. फुलंब्री), सय्यद अब्दुल रहीम सय्यद अजिज (निवृत्त लिपिक, रा. एसटी कॉलनी, कटकट गेट), गणेश धोंडोपंत गुरव (निवृत्त पर्यवेक्षक, उस्मानाबाद), बाजीराव बी. वानखेडे (बीड), लक्ष्मण दौलतराव भारती (निवृत्त विभागीय नियंत्रक, रा. धुळे), गजाजन आसाराम गायकवाड (निवृत्त लिपिक, रा.गणोरी), चिंतामणी रामभाऊ साबळे (निवृत्त रा. उस्मानाबाद), सुनील डॅनिअल आहोळे (निवृत्त रा.अहमदनगर), सुरेश राडीकर, सुरेश शामराव खैरे (निवृत्त बोरिवली प.), संजय वामनराव सुपेकर यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल करण्याची आले आहेत.

याप्रकरणी सध्याचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मिलिंद बंड,तत्कालीन विभाग नियंत्रक सुरेश सुपेकर व विभागीय कर्मचारी अधिकारी सुरेश राडीकर यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता. तिघांनी गुन्हा रद्द करावा अशी विनंती औरंगाबाद खंडपीठात करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे .

या प्रकरणाशी संबंध नसून अनुकंपा नियुक्तीनंतर कार्यरत असल्याची तसेच आस्थापना विभागाशी काहीच संबंध नसल्याचे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले. सुनावणीअंती कोर्टाने शासनाला नोटीस बजावली व याचिकाकर्त्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल करू नये, असे निर्देश दिले. या प्रकरणात याचिकाकर्त्याची बाजू अभयसिंह भोसले यांनी मांडली. या याचिकेची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थाप मारून महिलेचे सात हजार उकळले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीला फोन लावल्याचा बहाणा करीत भामट्याने महिलेकडून सात हजार रुपये उकळले. वाळूच्या ट्रकमध्ये डिझेल टाकण्यासाठी पैसे लागत असल्याची थाप त्याने मारली.
पडेगाव येथे हा प्रकार रविवारी घडला असून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षनाथ वायभासे (रा. नंदनवन कॉलनी) यांचे पडेगाव भुजबळ नगर येथे घराचे बांधकाम सुरू आहे. रविवारी दुपारी चार वाजता उषा वायभासे या घरी असताना एक तरुण त्यांच्याकडे आला. त्याने आपण वाळूचा पुरवठा करीत असल्याचे सांगत ट्रक आला आहे, मात्र त्यामध्ये डिझेल नाही, डिझेल टाकण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी उषाबाईंना केली. त्यांनी मी पतीला फोन लावून विचारते असे सांगितल्यानंतर या भामट्याने त्यांच्याकडून फोन घेत मी लावतो, असे सांगत कानाला लावून बोलण्याचे नाटक केले. हा प्रकार उषाबाईना खरा वाटल्याने त्यांनी या तरुणाला सात हजार रुपये दिल्यानंतर तो पसार झाला. वायभासे घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images