Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शुल्क भरल्याचे आता पालकांना एसएमएस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीई कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजेनेत सुसूत्रता आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपायाबाबत विचार करते आहे. योजनेंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे शुल्क न मिळाल्याने अनेक शाळा विद्यार्थ्यांना त्रास देतात किंवा शुल्कासाठी तगादा लावतात. त्यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांचे शुल्क शाळेला दिल्याची माहिती आता पालकांना एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

आरटीई कायद्यानुसार दुर्बल गट व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया ऑलनइान आहे. असे असतानाही प्रक्रियेत शाळांची मनमानी पालकांना अनेकदा त्रासदायक ठरते. यंदा तर एंट्री पॉइंटवरून पुरता या प्रक्रियेचा गोंधळ उडाला. याबाबत शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पालकांमध्येही संभ्रमाची स्थिती राहिली. योजनेतील शुल्क शासनाकडून मिळाले नसल्याने शाळा व्यवस्थापनांनी आंदोलनेही केली. अनेकदा योजनेतील शुल्क न मिळाल्याने शाळा विद्यार्थ्याच्या पालकाकडे पैशासाठी तगादा लावतात. वर्गाबाहेर उभा करणे किंवा परीक्षेला बसू न देणे अादी प्रकारही समोर आले आहेत. शुल्काच्या तक्रारीबाबत पालकांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे दरवर्षी येतात. यावर उपाय म्हणून शिक्षण विभाग २५ टक्के मोफत योजनेतील शुल्काची रक्कम शाळेला मिळाली की त्याचा एसएमएस पालकांनाही करणार आहे. त्यामुळे पालकांचा त्रास वाचेल, पालक आणि शाळांमध्ये शुल्कावरून वाद उद्भवणार नाहीत. अशा उपायांवर शिक्षण विभाग विचार करत असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून हे बदल होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार औरंगाबदला आले होते. त्यावेळी त्यांनी या बदलाचे संकेत दिले.

एंट्री पॉइंटकडे पालकांचे लक्ष
अनेक शाळा प्रवेशाची प्रक्रिया फेबुवारीमध्येच सुरू करतात. त्यानंतर शिक्षण विभागाचे निर्देश येतात. त्यात यंदा प्रवेशाचा एंट्री पॉइंट असेल याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे. योजनेत पूर्व प्राथमिक किंवा पहिलीपासून प्रवेशाचा टप्पा असेल. याबाबत शासनाने वर्षाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करावे, अशी मागणी पुढे येत आहे.

आरटीई प्रवेशात शासनाने बदल करत पालकांना प्रक्रिया सोपी, सुलभ वाटेल, असे प्रयत्न करायलाच हवेत. प्रवेशाचा स्तर कोणता आहे, हे वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर केले, प्रक्रियेबाबत माहिती पालकांना दिली तर अडचणी निर्माण होणार नाहीत.
- राहुल तायडे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळांना नाताळची आठ दिवस सुटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ख्रिश्चन धर्मियांसाठी आनंदोत्सवाचा सण असणारा नाताळानिमित्त शाळांना आठ दिवसांच्या सुट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीही आनंदात आहे.

नाताळाच्या सणासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविल्यानंतर शाळांना सुट्याचे वेध लागले होते. वेळापत्रकानुसार शाळांना आठ दिवसांच्या सुट्या असणार आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये हे सुट्यांचे वेळापत्रक आहे. नाताळाच्या सुट्यांमुळे विद्यार्थ्यांनी धम्माल करण्याचे बेतही आखलेले आहेत. आठ दिवसांच्या सुट्यांमुळे विद्यार्थी, पालकांनी पर्यटनाचे, नातलगांकडे, आजोळी जाण्याचे बेत आखत त्याचे वेळापत्रकही आखले आहे. औरंगाबाद शहरातील सीबीएसई पॅटर्नच्याही अनेक शाळांनी नाताळसणा निमित्त विशेष सुट्या दिल्या आहेत. राज्य मंडळांच्या शाळांनांही चार दिवसांची सुटी आली आहे. नाताळाच्या आठ दिवसांच्या सुटीनंतर सीबीएसई, आसीएसई शाळा थेट नवीन वर्षात सुरू होणार आहेत. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांना ३ जानेवारीपर्यंत सुट्या असून, ४ जानेवारीला शाळा सुरू होणार असल्याचे शाळा व्यस्थापकांनी सांगितले.
राज्य मंडळाच्या शाळांनाही चार दिवस सुटी
राज्य मंडळाच्या शाळांनाही सणांमुळे चार दिवसांची सुटी लागून आलेली आहे. यात ईद ए मिलादुन्नबी, नाताळ सणाची सुटी यासह शनिवारची शिक्षण विभागाने सुटी दिलेली आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही चार दिवसांची सुटी आली आहे

राज्य मंडळाच्या शाळांना सलग चार दिवस सुट्या आलेल्या आहेत. आपण अशा वेगळ्या सुट्या देत नाहीत. सीबीएसई बोर्डाला त्या सुट्या लागू असतात.
- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुके असलो तरी; अंगात भारी कर्तबगारी!

0
0


Vijay.Deulgavonkar
@timesgroup.group.com
सर्वात विश्वासू प्राणी म्हणून श्वानाचा उल्लेख होतो. पोलिस तपासाचे बरेच काम श्वानपथक हलके करते. सध्या पोलिस दलात ११ श्वान असून त्यांनी वर्षात विविध घटनांमध्ये १७३ वेळा तपासाची भूमिका बजावली. दोन महत्त्वाच्या खुनाचा छडाही लावला. श्वान पथकात श्वानाची तीन भागात विभागणी होते. पहिल्या विभागात वासावरून गुन्हेगार शोधून काढणारे श्वान, दुसऱ्या विभागात बाँब किंवा स्फोटके शोधणारे श्वान, तर तिसऱ्या विभागात अंमली पदार्थ शोधणारे श्वान असतात. अडीच महिन्याचे असताना श्वानाचा या पथकात सहभाग होतो. दहा वर्षांपर्यंत त्याच्याकडून कामगिरी करवून घेतली जाते. त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होते.
श्वानाची क्षमता वास हुंगून त्या आधारे गुन्हेगाराचा माग काढण्यावरून ओळखली जाते. या कामासाठी लॅब्रडॉर, डॉबरमन तसेच अल्सेशियन जातीच्या श्वानांना मागणी आहे. शहर पोलिस दलात सध्या लॅब तसेच डॉबरमनचा समावेश आहे. शहर पोलिस दलाच्या श्वानपथकात सध्या ११ श्वान आहेत. यापैकी ८ श्वान हे बाँबशोधक व ना‌शक पथकाकडे असून ३ श्वान छावणी येथील कार्यालयात आहे. यामध्ये लुसी व नयना या दोन लॅबचा तसेच हिरा या डॉबरमनचा समावेश आहे. यामध्ये लुसीला नऊ वर्षे झाली असून नयनाला चार तर हिराला श्वान पथकात समावेश होऊन दीड वर्ष झाले आहे. नयनाने दोन वर्षांपूर्वी पुण्याला झालेल्या कर्तव्य मेळाव्यात राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचे पदक पटकावले आहे. श्वानांना विशेष डॉग फूड देण्यात येते. पंधरा किलोची ही बॅग सहा हजार सहाशे वीस रुपयाला येते. सकाळी अडीचशे ग्रॅम व सायंकाळी अडीचशे ग्रॅम अशा पध्दतीने हा आहार देण्यात येतो. पूर्वी त्यांना मटन, दूध, ब्रेड, पालेभाज्या असा आहार होता. यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता देखील आतापेक्षा उत्तम होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. श्वान पथकात सध्या पीएसआय श्रीनिवास अंदुरे प्रमुख असून त्यांच्या हाताखाली जमादार डी. जी. लेंभे, एम. एम. तनपुरे, एस. के. गोरे, बी. एल. हरणे, तसेच पोलिस नाईक ए. टी. खाकरे, एस. के. ‌महेर हँडलर म्हणून काम पाहत आहेत.
---
लुसी, नयना, हिरावर मदार
---
- जुलै महिन्यात वाळूज एमआयडीसीमध्ये ५ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून खून झाला. यात नयनाने नालीत पडलेल्या बालिकेच्या मृतदेहाचा वास घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत माग काढून त्यांच्या शेजारी असलेल्या जोडप्यावर संशय व्यक्त करत आरोपी पकडून दिले.
- जुलै महिन्यातच वाळूज पोलिस ठाणे हद्दीतील रहिमपूर शिवारात ज्ञानेश्वर गंडे यांच्या घरावर दरोडा पडला. हिराने लोखंडी सळईच्या वासावरून तीनशे मीटरवर पडलेला दरोड्यातील ऐवज तसेच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुख्यात दरोडेखोर महेश काळेचे घर दाखवले.
- फेब्रुवारी महिन्यात चिकलठाणा येथे रामा आहेर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. लुसीने मृतदेहाचा वास घेतल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर असलेले त्याचे घर शोधून काढले. या घरात रामाने त्याच्या दोन चिमुकल्याचा खून करून नंतर स्वतःला संपवले होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पचनविकार तज्ज्ञांची उद्यापासून परिषद

0
0


औरंगाबाद : मराठवाडा गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने शनिवार व रविवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे पचनविकार व यकृतविकार तज्ज्ञांची १३ वी वार्षिक राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये देशभरातील ४० प्रख्यात तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्र होणार आहेत. यामध्ये पद्मश्री डॉ. अमित मायदेव, डॉ. नागेश्वर रेड्डी, डॉ. शिवसरीन, डॉ. अमरापूरकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेमध्ये राज्यातील विविध भागातील ३०० डॉक्टर सहभागी होतील. परिषदेमध्ये मुख्यत्वे पचनसंस्था, लिव्हरविकार, एंडोस्कोपीद्वारे निदान व उपचार या विषयांमधील घडामोडींची चर्चा होणार आहेत, अशी माहिती डॉ. रमेश सातारकर, डॉ. अनिरुद्ध गोपनपल्लीकर, डॉ. संदीप काळोखे व डॉ. सतीश कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी

0
0

औरंगाबाद : सुलीभंजन येथे श्री दत्तात्रयाचे व खुलताबाद येथे पैराहन-ए-मुबारक चे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांमुळे गुरुवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत नगरनाका ते खुलताबादपर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी होती. त्यातच ख्रिसमसच्या सुट्यांमुळे पर्यटकांच्या वाहनांची भर त्यात पडली. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या गर्दीमुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे सुद्धा कठीण झाले. मिळालेल्या माहितीनुसार दौलताबाद घाटात वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांनी कसाबखेडा मार्गे प्रवास केला. दौलताबाद येथील सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. गर्दी होणार असल्याचा अंदाज असूनही वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतेही नियोजन केले नव्हते. याचा फटका वाहनधारकांना बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्राच्या एक मजल्याच्या प्रवासाला महिना!

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत कुठलाही चमत्कार घडू शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण गुरुवारी जेव्हा समोर आले, तेव्हा सारेच अवाक झाले. मालमत्ता जाहीर न केलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिले. त्यांचे ते पत्र पालिकेच्याच लेखा विभागाला तब्बल एक महिन्याने मिळाले. यावरून पालिका प्रशासन किती गतिमान आहे याची प्रचिती आली. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दरवर्षी डिसेंबर अखेरीस त्यांच्या मालमत्तेचे विवरण जाहीर करावे, असे बंधन शासनाने घातले आहे. मालमत्तेसंबंधीची मार्च अखेर पर्यंतची स्थिती या विवरणामध्ये असणे गरजेचे असते.
जे अधिकारी किंवा कर्मचारी हे विवरण सादर करणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. महापालिकेने या संदर्भात सर्व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ४ स्मरणपत्र दिले. अंतिम स्मरणपत्र ५ ऑक्टोबर २०१५ रोजी दिले. त्यानंतर तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी लेखा विभागाच्या नावे एक आदेश काढला. त्यात म्हटले की, 'वर्ग १ ते वर्ग ३ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्रथम नियुक्तीच्या वेळच्या मालमत्तांचे विवरण दर्शवणाऱ्या स्थितीचा तपशील बंद पाकिटात ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत सादर करावा. जे अधिकारी किंवा कर्मचारी दिलेल्या मुदतीत हे विवरण सादर करणार नाहीत, त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) १९७९ च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. मात्र, अद्यापही बहुतांश अधिकारी - कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तांचे विवरण अद्याप सादर केले नाही. त्यामुळे या सर्वांचे नोव्हेंबर २०१५ महिन्याचे वेतन पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात यावे.'
हे आदेशवजा पत्र पालिकेच्या लेखा विभागाला नोव्हेंबर महिना संपल्यावर मिळाले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा पगार थांबण्यात आला नाही. आता डिसेंबर महिन्याचा पगार थांबवण्यात येईल, असे लेखा विभागाने स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप २८ अधिकारी, २९० कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तांचे विवरण सादर केलेले नाही. या सर्वांचे पगार आता थांबवले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक समाजाचा महत्त्वाचा घटक : धारूरकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लेखक हे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, असे प्रतिपादन उद्योजक दिलीप धारूरकर यांनी केले. चंद्रकांत नवले लिखित 'सहप्रवासी' या कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला व्यासपीठावर शिक्षण विभागाचे सहसंचालक सुनील चौहान, हास्यकवी डॉ. विष्णू सुरासे यांची प्रमुख उपस्थिती होती. कथासंग्रहावर भाष्य करताना डॉ. सुरासे म्हणाले की, सहप्रवासी या कथासंग्रहातून चंद्रकांत नवले यांनी विचारक्रांतीची बीजे रुजविण्याचे कार्य केले आहे. नवले यांनी फक्त पुस्तके वाचली नाही तर, गोरगरिब लेकरांचे चेहरे त्यांनी वाचले. लेखकाने लेखक होण्याच्या आगोदर एक चांगला माणूस होणे गरजेचे आहे. सहप्रवासी हेच या कथासंग्रहाचे नायक आहेत. या कथा काळजाला भिडणाऱ्या आहेत.

चौहान म्हणाले, 'नवले यांचे लेखन समाजाला नवी दिशा देणारे आहे. त्यांनी गोरगरीबांचे विद्यार्थी घडविले. सहप्रवासी हे माणसांच्या भावनांचा अविष्कार आहेत.'

सुमन नवले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुंडलिक कोलते यांनी सूत्रसंचालन केले. विवेक नवले यांनी आभार मानले. प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटीसच्या उत्तरासाठी ‘समांतर’कडे एक दिवस

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या टर्मिनेशनच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे आता एका दिवसाचा वेळ राहिला आहे. या उत्तराच्या आधारे आयुक्त सोमवारी कोर्टात शपथपत्र दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.
करारानुसार ठरवून देण्यात आलेल्या कामांच्या टप्प्याचे पालन न करता, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने समांतर जलवाहिनीच्या कामात दिरंगाई केली आहे. कंपनीने या कामात फारच कमी आर्थिक गुंतवणूक केली. त्यामुळे पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कंपनीला ११ डिसेंबर रोजी टर्मिनेशनची नोटीस पाठवली. पंधरा दिवसांत या नोटीसचे उत्तर द्या, असे त्यांनी कंपनीला कळवले. नोटीसमध्ये दिलेल्या वेळेनुसार कंपनीला त्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी उद्याचा एक दिवस शिल्लक राहीला आहे. समांतर जलवाहिनीच्या संदर्भात कोर्टात तीन याचिका दाखल झाल्या असून या याचिकांच्या अनुशंगाने पालिका आयुक्तांना कोर्टात सोमवारी शपथपत्र सादर करावे लागेल. कंपनीने दिलेल्या नोटीसच्या उत्तराच्या आधारे आयुक्तांचे शपथपत्र तयार केले जाणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोवाड्याने दुमदुमले जयपूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलांना सन्मानाची वागणूक द्या, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण कथन करणारा पोवाडा उदयपूर (राजस्थान) येथील शिल्पग्राम महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण कलाविष्कार ठरला. औरंगाबाद येथील लोककलावंत शाहीर प्रवीण जाधव यांनी मर्दानी पोवाडा सादर करून रसिकांची दाद मिळवली. या महोत्सवाचा गुरुवारी (२४ डिसेंबर) चौथा दिवस होता.

सांस्कृतिक कार्य मंत्रालय, पश्चिम सांस्कृतिक केंद्र व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने उदयपूर येथे २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत शिल्पग्राम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण झाले. लावणी, पोवाडा, छक्कड, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, भारूड या लोककलांना राजस्थानातील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले. सांस्कृतिक कार्य संचालक अजय अंबेकर यांनी मार्गदर्शन केले.

लोककला महोत्सवात औरंगाबाद येथील युवा शाहीर प्रवीण जाधव याने शिवरायांवरील पोवाडा सादर केला. गरीब मुलीवर अत्याचार करणाऱ्या रांझा येथील पाटलाला शिक्षा करणाऱ्या छत्रपती शिवारायांचा संदेश या पोवाड्यातून देण्यात आला. या पोवाड्याला रसिकांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रवीण व विवेक ताम्हणकर यांनी 'विंचू चावला' भारूड सादर केले. शाहीर निशांत शेख यांनी अण्णाभाऊ साठे यांची छक्कड गायली आणि विजया पालव यांनी लावणी सादर केली. या महोत्सवाचा रविवारी समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूम‌िपूजन कार्यक्रमभाजपकडून हायजॅक

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्ते कामाच्या भूम‌िपूजनाचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हायजॅक केला आहे. हा कार्यक्रम म्हणजे पक्षाचा अजेंडा आहे, अशा अविर्भावात भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. या कार्यक्रमात अन्य पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मुद्दाम डावलले जात आहे, अशी भावनाही लोकप्रतिनिधींमधून व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या, शुक्रवारी तब्बल १५ हजार ७०४ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. दुपारी चार वाजता चिकलठाणा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेच त्याच्यावर नियंत्रण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सरकारचा आहे की भाजपचा असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम चिकलठाणा येथे होणार आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याला जोडणारा चिकलठाणा परिसर आहे. त्यामुळे या दोन्हीही जिल्ह्यातील आमदारांना या कार्यक्रमात सामावून घ्यायला हवे होते, पण भाजपच्याच आमदारांना या कार्यक्रमात स्थान देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. ज्या कामांचे टेंडर झालेले नाही, वर्कऑर्डर निघाली नाही, त्या रस्त्यांच्या कामांचा इतका गवगवा कशासाठी, असा प्रश्नही विचारला जात आहे.
दीड हजार किमीचे महामार्ग
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले रस्त्यांचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वर्षभरात शहराचा कायापालट होईल, असे बोलले जात आहे. या कामासाठी १५,५०६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून तब्बल दीड हजार किलोमीटरचे महामार्ग चकचकीत होतील. त्यात नगरनाका ते चिकलठाणा रस्त्यासह औरंगाबाद-पैठण, सिल्लोड, वैजापूर, वेरूळ रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येईल. या कामाचा शुभारंभ उद्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. या सर्व कामांतून मुद्दामहून डावलल्याचा आरोप आता शिवसेनेकडून सुरू आहे.
---
रस्ते कामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींची विचारपूस देखील करण्यात आली नाही. हा कार्यक्रम म्हणजे भाजप आपला अजेंडा राबवत आहे की काय असे वाटण्यासारखा आहे. सत्ता लोकप्रतिनिधी चालवतात. त्यामुळे त्यांच्यात पक्षपात करणे योग्य नाही. या कार्यक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना, आमदारांना सामावून घ्यायला हवे होते, तसे झालेले दिसत नाही.
- संजय शिरसाट, आमदार, शिवसेना
---
अन्य कुणीही नाराज होण्याचे कारण नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वतःहून जाहिराती दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे नाव असणे स्वाभाविक आहे.
- शिरीष बोराळकर, प्रवक्ते, भाजप





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने रविवारी वॉकेथॉन

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने येत्या रविवारी, २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्ष उजाडायला अवघे ५ दिवस शिल्लक असताना वॉकेथॉनच्या माध्यमातून निरोगी आरोग्यासाठी दररोज काही मिनिटे का होईना चालण्याचा संदेश देण्यात येत आहे. या वॉकेथॉनमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींसह उद्योजक, डॉक्टर, वकील, व्यापारी वर्गातील मान्यवरांचा सहभाग असणार आहे. नियमित वॉकिंग करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, हा या वॉकेथॉन उपक्रमाचा उद्देश असून जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
वॉकेथॉनचा मार्ग
---
वॉकेथॉन उस्मानपुरा येथील महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयापासून क्रांतिचौक, दूध डेअरी सिग्नल, रोकडिया हनुमान कॉलनी, शिवाजी हायस्कूल, खोकडपुरा, सिल्लेखाना चौक, नूतन कॉलनी, क्रांतिचौक मार्गे पुन्हा महाराष्ट्र टाइम्स कार्यालयात पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८९ प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

एकात्मिक राज्य जल आराखडा अस्तित्वात नसतानाही २००७ ते २०१३ या काळात राज्यात मंजुरी देण्यात आलेल्या ५६०० कोटी रुपयांच्या १८९ सिंचन प्रकल्पांमध्ये गंभीर अनियमितता असल्याचे आढळल्याने त्यांची चौकशी करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी गुरुवारी दिला.

'या सिंचन प्रकल्पांना जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कायद्यानुसार मान्यता दिलेली नाही. अनेक प्रकल्पांबाबत गंभीर अनियमितता आहेत. त्यामुळे या प्रकल्पांची चौकशी झाली पाहिजे,' असे कोर्टाने म्हटले आहे. १८९पैकी ४८ प्रकल्पांची कामे सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे; पण ही कामे सुरूच झाली नाहीत. भूसंपादन व अन्य बाबींमुळे ही कामे खोळंबलेली आहेत. काही प्रकल्पांत कंत्राटदारास रक्कमही देण्यात आली आहे. कोर्टाने अकोला जिल्ह्यातील कांचनपूर प्रकल्पाचे उदाहरण दिले आहे. मागास भागाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी निर्देश दिलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. यावर राज्य सरकारने उत्तर दाखल करावे, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. या याचिकेची सुनावणी ११ फेब्रुवारीला होणार आहे.

'वाल्मी' येथील सेवानिवृत्त सहयोगी प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी ही जनहित याचिका केली आहे. २००५च्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमामध्ये (मजनिप्रा) जल सुशासनासाठी विविध चांगल्या तरतुदी आहेत. मात्र, कायदा झाल्यापासून आजपर्यंत, म्हणजेच नऊ वर्षांपासून या तरतुदींची अंमलबजावणी झालेली नाही. या तरतुदींची कालबद्ध कार्यक्रमानुसार अंमलबजावणी व्हावी; तसेच आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी का झाली नाही, याचा सरकारने खुलासा करावा आणि झालेल्या अक्षम्य विलंबासाठी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी विनंती जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. राज्य सरकारने या सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. यावर लेखा परीक्षण अहवालात आक्षेप घेतला होता. जल आराखडा अस्तित्वात येईपर्यंत सरकारने नव्या धरणांना परवानगी देऊ नये, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने जुलैमध्ये दिले होते. या १८९ प्रकल्पाबाबत राज्य सरकारने सुस्पष्ट भूमिका मांडावी, असे निर्देशही कोर्टाने दिले होते. या आदेशानुसार सरकारने १८९ प्रकल्पाच्या सद्यस्थिती अहवाल कोर्टात सादर केला. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सरकारची आणि ज्येष्ठ वकील प्रवीण शहा यांनी पुरंदरे यांची बाजू मांडली.

किती निधी खर्च केला?
राज्यपालांच्या निर्देशांनुसार किती निधी देण्यात आला, याची विभागनिहाय माहिती राज्य सरकारने कोर्टात सादर करावी. त्याचबरोबर यापैकी किती निधी सिंचन प्रकल्पांवर खर्च करण्यात आला, हेही सादर करावे, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चळवळ साहित्यात जिवंत झाली!’

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'चळवळीत राहून चळवळीपेक्षा वेगळा राहिलो. वयोपरत्वे नाना चळवळींमधील विविधांगी पात्रांचा परिचय आयुष्यात झाला. सामाजिक जाणिवा अधिक संवेदनशील होत गेल्या आणि तेच माझ्या साहित्यात उतरले,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या साक्षात कार्यक्रमात गवस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, संयोजन समितीचे रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती. गवस म्हणाले, 'मी लहानपणी चिंगी नावाची कविता सहावीत असताना लिहली. दहावीपर्यंत मुंग्या, मुंगूस, चिंगी यांच्याशी दोस्ती असायची. याच वयात शालेय शिक्षकांनी आयोजित भित्तीपत्र‌िकेत पहिल्यांदा कविता प्रकाशित झाली. मग राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. पुढे अंधश्रध्दा निर्मूलन समितीत डॉ. दाभोळकर आणि श्याम मानव यांच्यासोबत त्या चळवळीशी संबंध आला. मग वाङमय प्रांतात रमलो. मात्र, त्या आधी गडहिंग्लज या माझ्या कोल्हापूरजवळील गावात व कोल्हापुरात असताना जोगीण, देवदासी यांच्या चळवळी फार जवळून पाहिल्या. ते पाहताना तृतीयपंथीयांच्या विविध समस्या अनुभवल्या. त्या चळवळीत असताना खूप सारे जीवाभावाचे मित्रही कमावले. हेच सारे माझ्या साहित्यात कळत-नकळत आले. सामाजिक प्रश्न, त्यातून निर्माण होत असलेल्या संवेदना, भावभावना याच वाङमयातून उतरवल्या. हे उतरवत असताना वाङमयीन पर्यावरणापासून जसा दूर राहिलो, तसा विविध चळवळींमध्ये राहून जरा वेगळे राहता आले, हीच माझ्यासाठी खूप मोठी बाब ठरली. आजही खूप लिहायचे आहे, बोलायचे आहे. सर्वकाही सुरू असून समाज खूप काही शिकवून जातो आणि यापेक्षा अधिक काही साक्षातमध्ये बोलायचे असे वाटत नाही,'असे सांगून गवस यांनी अचानक आपले मनोगत थांबवले. रामचंद्र काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामाजिक पर्यावरणाचा मी बायप्रोडक्ट’

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'औरंगाबादच्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाचा मी बायप्रोडक्ट आहे. औरंगाबादनेच मला घडविले. शहराच्या 'कल्चर'नेच माझा 'ईक्यू' वाढवला आणि माझी आई व प्रशांत दळवी हेच माझे 'मॅनेजमेंट गुरू' आहेत. आईमुळेच झालेल्या हमदापूर ते औरंगाबाद, तर प्रशांतमुळे झालेल्या औरंगाबाद ते मुंबई या दोन स्थलांतरांनी टर्निंग पॉइंट मिळाला. यशाचा कुठलाही फॉर्म्युला नव्हता; पण पॅशन होती, आत्मविश्वास होता, चुकण्याची-धडपडण्याची-शिकलेले मोडून काढण्याची 'जिगिषा' होती आणि एकट्याच्या नव्हे तर सामूहिक क्रिएटिव्हीच्या जोरावरच २७ वर्षे पूर्णवेळ थिअटर करतो आहे,' असा 'कबुलीजबाब' दिला प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी.
'औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन'च्या वतीने गुरुवारी देवगिरी महाविद्यालयात आयोजित 'रेयर-शेयर' कार्यक्रमात त्यांनी अनुभव कथन केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनीच 'कबुलीजबाब' असा शब्द वापरला आणि स्वतःचे घडणे स्वतःच्या नजनेतून आणि स्वतःच्या शैलीत ते मांडत गेले... 'परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील हमदापूर हे मूळ गाव. एकत्र व मोठे कुटुंब. दारिद्र्यासह असंख्य अडचणींचा डोंगर. आई-वडिलांचे जेमतेम प्राथमिक शिक्षण; पण मुलांना शिकवूनच अडचणींचा डोंगर फोडता येईल, या दूरदृष्टीतून वडिलांपेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबादला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कुटुंबाचेही मन वळविले आणि १९६६ मध्ये आई-वडील व काकाने औरंगाबाद गाठले. मोलमजुरी करून गुलमंडी, दिवाणदेवडी, नगारखाना गल्ली अशा अनेक ठिकाणी राहात असतानाच मला दिवाणदेवडीच्या शाळेत घातले. आईच्या प्रयत्नांमुळेच वडिलांना गुजराती विद्यामंदिरमध्ये शिपायाची नोकरी मिळाली आणि पहिलीपासून 'गुजराती'मध्ये शिक्षण सुरू झाले. भिडस्तपणा, अबोल होतो, पण शाळेच्या शिक्षकांनी लिहून दिलेले भाषण २०० मुलांसमोर म्हणायला लावले आणि आत्मविश्वासाची मिणमिणती ज्योत पेटली. शिक्षकांमुळेच घडत गेलो आणि वकृत्व, वादविवाद, नाटक आदी कलांमध्ये रस व गती निर्माण झाली. दहावीनंतर 'पॉलिटेक्निक'हून नोकरी करावी, अशी सर्वांची अपेक्षा होती; पण माझ्या जिव्हाळ्याच्या विषयांपासून दूर जाईल, अशी माझी धारणा होती. इतर मित्रांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला म्हणून मी देखील घेतला आणि तिथेच प्रशांत दळवी भेटला आणि तो 'टर्निंग पॉइंट' ठरला. प्रशांतमुळे विचारांची बैठक तयार होत गेली आणि दुसऱ्या संस्थेत नाटक करण्यापेक्षा पडू-धडू पण आपल्या विचाराचे नाटक करू, या विचारातून 'जिगिषा' संस्थेचा जन्म झाला. अनेक नाटके केली, नव्याने लिहिली, बक्षिसे मिळत गेली, लोकप्रियता मिळत गेली. त्याचवेळी संपूर्ण 'जिगिषा' ग्रुपने मुंबईला स्थलांतर करण्याचा विचार प्रशांतने मांडला आणि आईच्या पाठींब्यामुळे मुंबईला गेलो. घरची वाईट आर्थिक स्थिती व आईला कॅन्सर असताना, आईमुळेच मुंबईला जाऊन सिद्ध करता आले आणि 'जिगिषा'च्या सामूहिक प्रयत्नांतूनच नाट्य-चित्रपटांत यशस्वी होऊ शकलो,' असेही कुलकर्णी म्हणाले. या वेळी प्रा. अजित दळवी, सतीश कागलीवाल, प्राचार्य उल्हास शिऊरकर, डॉ. सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती.
---
टीव्हीने अभिरूची घालवली
---
मागच्या २०-२५ वर्षांत साहित्याने वाढवलेली अभिरूची टीव्हीने घालवली. त्यामुळे टीव्हीमध्ये रमलो नाही. खरे म्हणजे केवळ पैसा मिळवणे हा कधीच उद्देश नव्हता आणि म्हणूनच विचारांना पटतील अशीच नाटके-चित्रपट केले. ६६ नाटके केली; पण तेवढीच नाटके नाकारली, ती विचारांना पटली नाही म्हणूनच,' असेही चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रा. रं. बोराडे यांना जीवनगौरव जाहीर

0
0

औरंगाबाद ः सोलापूर येथील मनोरमा फाउंडेशन संचलित, मनोरमा साहित्य मंडळाच्या वतीने दिला जाणारा मनोरमा राज्यस्तरीय साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. रविवार, २७ डिसेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी साहित्यिक विश्वास पाटील यांना 'लस्ट फॉर लालबाग' या कादंबरीसाठी मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमाला साहित्यिक प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. ता. भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीड बायपासला प्रतीक्षा उड्डाणपुलांची

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराची दुसरी लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड बायपास रस्त्यावर आता उड्डाणपुलांची प्रतीक्षा आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सातारा, देवळाईवासीय मेटाकुटीस आले आहेत. लहान-मोठ्या अपघातांमुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यातून या रस्त्याला सोडवण्यासाठी रुंदीकरणासह रस्त्यावर उड्डाणपुलांची गरज निर्माण झाली आहे.

जड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळविण्यासाठी बीड बायपासची रचना करण्यात आली होती. आता हा रस्ता शहराचाच भाग झाला आहे. औरंगाबाद शहराची लाइफ लाइन म्हणून जालना रस्त्याची ओळख आहे. या रस्त्यावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. वाळूज औद्योगिक वसाहत व शेंद्रा औद्योगिक वसाहत यांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. नव्याने येऊ घातलेला डीएमआयसी प्रकल्प व ड्रायपोर्ट यांसाठीही हाच रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. बीडबायपास रस्त्यावरील एमआयटी कॉलेजचा चौक, रेणुका माता मंदिराचा चौक आणि देवळाई चौक हे तिन्ही चौक धोकादायक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी बीड बायपासवर किमान दोन उड्डाणपुलांची गरज आहे. कमलनयन बजाज हॉस्पिटल ते एमआयटी कॉलेज चौक आणि रेणुकामाता मंदिर ते देवळाई चौक यादरम्यान उड्डाणपूल असावेत, अशी मागणी होत आहे. हे उड्डाणपूल झाल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटेल आणि अपघातांवरही नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.

१२ वर्षांत ६४ बळी
महानुभव चौक ते देवळाई चौक या ५ किलोमीटरच्या अंतरात बीड बायपास रस्त्यावर १२ वर्षांत अपघातात ६४ जणांचे बळी घेतले आहेत. एमआयटी चौक सर्वात जास्त धोकादायक असून, तेथे ११ जणांना जीव गमवावा लागला. त्याखालोखाल देवळाई चौकात ६ जणांना जीव गमवावा लागला. रेणुका माता कमानीसमोर आतापर्यंत ४ जणांचे प्राण गेले आहेत.

बायपास रोड सहा पदरी व्हावा, अशी आमची मागणी आहे. ड्रायपोर्ट झाल्यावर या रस्त्यावरची वाहतूक वाढणार आहे. रस्ता सहा पदरी करण्यासाठी शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यावर रस्त्यावर उड्डाणपुल किती असतील, हे स्पष्ट होईल.
- अतुल सावे, आमदार पूर्व

बीड बायपास रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही खूप आहे. त्यामुळे हा रस्ता रूंद करून उड्डाणपुलांचे बांधकाम केले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. यासाठी मी सतत पाठपुरावाही करीत आहे.
- संजय शिरसाट, आमदार पश्चिम

बीड बायपास हा राष्ट्रीय महामार्ग नाही. त्यामुळे या रस्त्याला केंद्र सरकारचा निधी मिळणे शक्य नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रुंदीकरण व उड्डाणपुलांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला तर, पाठपुरावा करून तो मंजूर करण्यास मी पुढाकार घेईन.
- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘...श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चा जयघोष, विविध ठिकाणी पारायणे, महाआरती आणि कीर्तनासह महाप्रसादने गुरुवारी दत्त जयंती पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील दत्त मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी दत्तजन्म कीर्तन व पाळणा घालून प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर व घरोघरी सहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीगुरूचरित्र पारायणाची सांगता झाली.
श्री पावन दत्त मंदिर, सिडको एन-६, संभाजी कॉलनी येथे दत्त जयंतीनिमित्त सकाळी ११ वा. मिरवणूक व रात्री ८ ते १० यावेळेत हभप राजाराम महाराज फड यांचे दत्तात्रय जन्मोत्सव हरिकीर्तन झाले. गाणगापूरच्या धर्तीवर सिडको एन-७ येथील जागृत दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री. दत्त मंदिर संस्थानतर्फे राष्ट्रीय कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर यांचे कीर्तन झाले. यानंतर दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यात पाळणा व आरती म्हणण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही झाली. रात्री ९ वाजता पालखी काढण्यात आली. या महोत्सवाची सांगता २६ रोजी दुपारी १२.३० वाजता भंडाऱ्याने होणार आहे. श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, बेगमपुरातर्फे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा पटेल वाड्यात झाला. दत्तमंदिर देवस्थान, एन-१२, स्वामी विवेकानंदनगर, हडको येथे सायंकाळी ६ वाजता दत्तजन्माचा कार्यक्रम झाला. हडको परिसरातील विविध नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. श्री सद‍्गुरूसामाजिक प्रतिष्ठान दत्त मंदिर, एन-११ बी सेक्टर येथील दत्त मंदिरात दुपारी १२ वाजता श्रीची पालखी मिरवणूक, सायंकाळी ४.३० वाजता हभप श्री गणेश महाराज रामदासी यांचे दत्तजन्म कीर्तन झाले. नाथ मंदिर, औरंगपुरा येथे सायंकाळी दत्त जयंती सोहळा व नंतर हभप कृष्णा महाराज आरगडे यांचे कीर्तन झाले. समर्थनगरचे नगरसेवक ऋषिकेश खैरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी रिक्षा सेनेतर्फे राजू गरड यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी शाखाप्रमुख पंकज जोशी, भाजप शहर उपाध्यक्ष भूपेश पाटील, सुधीर जाधव, अक्षय कुंटे, रवी गरड, गणेश गनोरे, नारायण महोरे, संजय जाधव, प्रभाकर डोरगे, संजय राउतराय आदी उपस्थित होते. विद्यानगर येथील दत्त मंदिर येथे दत्तजयंती निमित्ताने शिवसेना शहरप्रमुख राजू वैद्य, नगरसेवक ऋषिकेश खैरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी दत्त मंदिर मंडळातर्फे सुधीर हंप्रस यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी नारायणराव कुलकर्णी, प्रदीप देशपांडे,नवनाथ अघाव, संतोष केंद्रे, रामलिंग माने, संतोष शर्मा, राजू ताठे, ओमजी आग्रवाल, राजू चव्हाण, दत्ता निंबाळकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडा टाकण्यापूर्वीच अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
सिडको वाळूज महानगरच्या साउथ सिटी परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी दरोड्याची तयारीत असलेल्या ५ जणांना दरोडा टाकण्याच्या साहित्यासह एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री पोलिस उपनिरिक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सिडकोच्या साऊथ सिटीमधील गोलवाडी टेकडी परिसरात काही अज्ञात व्यक्ती व्यक्ती लपून बसले असून त्यांचा दरोड्याचा कट शिजत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पाटील यांनी सहा पोलिसांसह सापळा रचून संशयित बसलेल्या ठिकाणापर्यंत पायी जाऊन छापा मारला मारला.
पोलिसांना पाहताच अंधारात पळून जाण्याच प्रयत्न करणाऱ्या रवींद्र ऊर्फ विकी पोपट जाधव (वय २४, रा. सलामपुरेनगर पंढरपूर), विजय शिपप्रसाद शुक्ला, राजू भानुदास पोळ (वय २२, रा. फुलेनगर पंढरपूर), शिशू शंभू मिश्रा (वय २३, रा. सलामपुरेनगर, मूळ गाव विजवणी जि. नवाद बिहार), दीपक प्रल्हाद तुपे (रा. फुलेनगर) यांना पकडले. त्यांच्याजवळून तलवार, गुप्ती, धरदार चाकू, लोखंडी कोयता, मिरची पूड, आदी साहित्य जप्त करण्यात आले. या पाच जणांना कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक रामेश्वर थोरात, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वसंत शेळके, पोलिस नाईक बी. यू. बोडखे व बी. पी. जगताप, पोलिस शिपाई वाय. व्ही. कुलकर्णी,ए. एस. तुपे, ए. बी. पवार आदींनी पार पाडली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी खर्चात तुरीचे भरघोस उत्पादन

0
0

म. टा. प्रतिनिधी,खुलताबाद

एखादा शासकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर शहरात दुमदार घर खरेदी करून सुखाचे आयुष्य जगतो. मात्र सेवानिवृत्त तहसीलदार मुलचंद पवार हे त्याला अपवाद ठरले. त्यांनी तालुक्यातील वडगाव येथील मुरबाड जमिनीवीर शेती करण्याचा निर्णय घेतला व विशिष्ट पद्धतीने कमी खर्चाची शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी चांगले उदाहरण घालून दिले आहे.

मुलचंद पवार यांची तालुक्यातील वडगाव येथे वडिलोपार्जित १० एकर कोरडवाहू जमीन आहे. परंतु, शासकीय सेवेत असताना त्याचे शेतीकडे लक्ष नव्हते. निवृत्त झाल्यानंतर पत्नी अनुसया पवार यांच्यासह त्यांनी शेतीत लक्ष घातले आहे. मुलगा प्राध्यापक, मुलगी व जावई महसूल खात्यात नोकरीत आहेत. परंपरागत शेतीमधून उत्पादनाची हमी नसल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेतीला सुरुवात केली. दीड एकर शेत जमीन खरेदी करून वडिलोपार्जित दहा एकरमध्ये भर टाकली. या अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीचे सपाटीकरण केले. शेजारच्या पाझर तलावातून पेरणीपूर्वी गाळ काढून शेतात टाकला. बी. एस. एम. आर. ७११ जातीच्या तुरीची लागवड केली. दुष्काळातही पाण्याचे नियोजन करून तुरीचे एकरी १० ते १२ क्विंटल एवढे उत्पादन घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासोबत रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय पद्धतीने शेती केली. शेती खर्चात बचत केल्याने त्यांचा फायदाच झाला आहे. ट्रायकोड्रामाचा वापर करून त्यांनी मर रोगाला अटकाव केला. त्यामुळे त्यांच्या शेतातील तुरीच्या पिकात मर रोग झालेले एकही झाड आढळले नाही. उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे, मंडळ कृषी अधिकारी विजय निकम, कृषी सहायक प्रिया देशमुख, रणजित गायकवाड यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच तूर पिकाचे भरघोस उत्पादन घेता आल्याचे पवार यांनी सांगितले.

शेतकरी शेतात प्रामाणिकपणे राबतो. परंतु परंपरागत शेतीमध्ये आवश्यकतेनुसार उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय खर्चिक होत आहे. पारंपारिक शेतीऐवजी कमी खर्चाची नियोजनपूर्वक शेती केल्यास फायदेशीर ठरू शकते.

- मुलचंद पवार, सेवानिवृत्त तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांसविक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

शहरातील खान गल्ली भागातील एका घरावर छापा मारून पोलिसांनी जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या तिघांना गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन जनावरे, जनावरांचे मांस व कातडी जप्त करण्यात आली.

शासनाची बंदी असतानाही मांसविक्रीसाठी जनावरे कापली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी हर्ष पोतदार, फौजदार संजय खिल्लारे, पोलिस शिपाई नंदकुमार नरोटे, रवींद्र काळे, सचिन सोनार, तलाठी जितेंद्र चापानेरकर यांच्या पथकाने खान गल्लीतील एका घरावर छापा मारला. त्यावेळी जनावरांचे मांस व कापण्यासाठी बांधून ठेवलेली जनावरे आढळून आली. याप्रकरणी पंचनामा करून रवींद्र काळे यांनी तक्रार दिली. त्यानुसार हुसेन खॉ मुराद खॉ कुरेशी, इब्राहीम खॉ हुसेन खॉ कुरशी, अनिस खॉ हुसेन खॉ कुरेशी या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही जनावरे प्रशांत बोथरा यांच्या गोशाळे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images