Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेणुकामाता मंदिरातील गुरूमंत्र जपाची सांगता

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यातील बीड बायपास जवळील रेणुकामाता मंदिरात २५ तारखेपासून सुरू झालेल्या गुरूमंत्र जपाची रविवारी सांगता झाली.

२५ ते २७ डिसेंबर या तीन दिवसांत १ कोटी गुरूमंत्र जपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राज्याच्या विविध भागातून आलेल्या शिष्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळी ६ ते रात्री ११पर्यंत मंदिरात जप म्हटले. अप्पा महाराज, अंबरीश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अनिरुद्ध महाराजांच्या नियोजनात रविवारी १ कोटी गुरूमंत्राचे ‌उद्दिष्ट पूर्ण केले. आरती व महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैजापूर तालुक्यात शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने जाळून घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बळ्हेगाव येथे घडली. अनिल माधव सूर्यवंशी (वय ४०), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर स्टेट बँक अॉफ इंडिया, सोसायटी व खासगी असे जवळपास दीड लाख रुपयांचे कर्ज होते.

यंदा दुष्काळामुळे त्यांच्या दोन एकर कोरडवाहू शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे हे कर्ज कसे फेडावे याची त्यांना चिंता होती. त्यातच मुलीचे लग्नही करायचे होते. या चिंतेतून त्यांनी २१ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता घरात अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले.

या घटनेत ते १०० टक्के भाजले गेले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई-वडिल असा परिवार आहे. याप्रकरणी शिवूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खंबाळा शिवारात चोरी

तालुक्यातील खंबाळा शिवारातील घर फोडून चोरांनी पाच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही चोरी नारायण त्रिंबक त्रिभुवन यांच्या शेतवस्तीवरील घरी झाली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्त ट्रक पळवण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
जप्त केलेला वाळूचा ट्रक पैठण तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी वाळूचे दोन ट्रक तहसीलच्या आवारातून पळवून नेले होते. विशेष म्हणजे, त्या ट्रकचा व ट्रकचोरांचा कोणताही शोध लागलेला नाही.

महसूल प्रशासनाने २१ डिसेंबर रोजी अवैध वाळू वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक (एमएच २० डी ई ०९८९) पकडला होता. ट्रकच्या वाहकाने ट्रक सोडून पळ काढल्यावर हा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला होता. काही अज्ञात इसमांना २५ डिसेंबरच्या रात्री वाळू टाकून देऊन ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण तहसील कार्यालयाचे गेट बंद असल्याने ट्रक घेऊन जाता आला नाही. विशेष म्हणजे, जप्त केल्याच्या चार दिवसानंतरही महसूल विभागाने या ट्रकचा पंचनामा, ट्रक व ट्रकमालकावर कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती उघड झाली आहे.

यापूर्वी, तहसीलदार संजय पवार यांच्या बदलीची वार्ता येताच ५ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी वाळूचोरी प्रकरणी जप्त केलेले दोन ट्रक एमएच २० ए टी ९९२५ व एमएच २० बीटी ३८६६ तहसील आवारातून पळवून नेले आहेत. तहसीलदार पवार यांनी पोलिसांना पत्र देऊन कारवाईचे आदेश दिले होते. मात्र दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अद्याप ते ट्रक व चोरट्यांच्या शोध लागलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांना सल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने 'जय किसान जय जवान' सप्ताहाअंतर्गत आडूळ (ता. पैठण) येथे शुक्रवारी (२५ डिसेंबर) 'किसान गोष्टी' कार्यक्रम घेण्यात आला. मोसंबी फळबाग आणि भाजीपाला लागवडीची पाहणी करून शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आणि दिवंगत चरणसिंग चौधरी यांच्या जयंतीनिमित्त २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत 'जय किसान जय विज्ञान' सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, कृषी संलग्न क्षेत्रातील तांत्रिक माहिती, नवीन कृषी यांत्रिकी साधने आणि तंत्रज्ञानविषयक प्रदर्शन, शेतकरी मेळावे असे विविध कार्यक्रम सुरू आहेत. याअंतर्गत आडूळ येथे 'किसान गोष्टी' कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, तंत्र अधिकारी रंगनाथ सोनटक्के व संजय पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोसंबी फळबागा व भाजीपाला लागवडीची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

किड रोग व्यवस्थापन व लागवड नियोजनाची माहिती देण्यात आली. 'बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी शेतीत हायटेक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय पर्याय नाही. या तंत्रज्ञानाची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन अवलंब करावा. शेतीतील तोटा कमी करून जास्तीच्या फायद्यासाठी निश्चित उपयोग होईल' असे पाटील म्हणाले. यावेळी मनोज वाघ, भाऊराव नलावडे, सुनील वाघ, गणेश शेठ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक अनादर सहा महिने कारावास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धनादेश अनादरप्रकरणी शहरातील आरोपी रेखा उत्तमराव जाधव हिला सहा महिने साध्या कारावासाची; तसेच दीड लाख रुपये दंडाची व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. जी. उपाध्ये यांनी ठोठावली.
याप्रकरणी संतोष सुधाकरराव पांडे (३२, रा. विद्यानगर, ता. सेलू, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी व आरोपीचा पती उत्तराव जाधव हे फिर्याद देण्याअगोदर पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. आरोपी रेखा व तिचा पती उत्तमराव जाधव (रा. रमानगर, क्रांतिचौक, औरंगाबाद) यांनी त्यांच्या सजावटीच्या वस्तुंच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी फिर्यादीला गळ घातली. त्यानुसार फिर्यादीने दोघांच्या व्यवसायामध्ये एक लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक केली. एका वर्षानंतर फिर्यादी हा त्यांच्या व्यवसायातून बाहेर पडला. त्यावेळी आरोपी रेखाने फिर्यादीला एक लाख २० हजारांची रक्कम वापस करण्याची ग्वाही दिली.
२० जून २००४ रोजी रेखा हिने ३७३४५६ क्रमांकाचा एक लाख २० हजार रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा धनादेश फिर्यादीला दिला. फिर्यादीने २१ जून २००४ रोजी धनादेश वटण्यासाठी बँकेत टाकला, मात्र आरोपीच्या खात्यामध्ये रक्कम नसल्याने धनादेश न वटला वापस आला. त्यानंतर १५ दिवसांत रक्कम देण्याची कायदेशीर नोटीस ८ जुलै २००४ रोजी दिली. १० जुलै रोजी आरोपीला नोटीस प्राप्त झाली, मात्र आरोपीने दिलेल्या मुदतीत रक्कम वापस केली नाही. त्याविरुद्ध फिर्यादीने तक्रार दिली. संबंधित केस सेलू कोर्टातून औरंगाबाद कोर्टात वर्ग करण्यात आली. खटल्यावेळी, आरोपीला दोषी ठरवण्यात आले, मात्र वारंवार पुकारा करुनही आरोपी महिला कोर्टात उपस्थित झाली नाही. सुनावणीवेळी आरोपीने रक्कम वापस करण्याचे मान्य केले व रक्कम वापस करण्यासाठी आरोपीला पुरेशी संधीही देण्यात आली; परंतु आरोपीने रक्कम वापस केली नसल्याचे मत नोंदवत, कोर्टाने आरोपीला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली; तसेच आदेशापासून एका महिन्याच्या आता एक लाख ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अजून एक महिना कारावासाची शिक्षा कोर्टाने सुनावली. फिर्यादीच्या वतीने अॅड. ज्योती पत्की यांनी, आरोपीच्या वतीने अॅड. पी. एम. बेद्रे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिली बायको असूनही दुसऱ्या महिलेवर डोळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहिली पत्नी हयात असताना शहरातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्यास क्रांतिचौक पोलिसांनी नेवासा येथून अटक केली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राहणाऱ्या एका महिलेशी ओळख असलेल्या विश्वास जावळे (३५, रा. मानस हिवरा) याची पत्नी हयात आहे.

त्याने महिलेसोबतच्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध जुळवले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. त्याचप्रमाणे तिचे अश्लिल फोटो व्हॉटसअॅपवर पाठवल्याले. परंतु, लग्नास नकार दिल्याने या महिलेने १६ आॅक्टोबर रोजी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणूक आणि अत्याचार झाल्याची तक्रार दिली.

पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने विश्वास जावळे याला शनिवारी नेवासा येथून अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिव्हर फेल्युअर’च्या २०० रुग्णांना संजीवनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यकृत निकामी झालेल्या; परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे 'लिव्हर ट्रान्सप्लान्ट' होणे शक्य नसलेल्या २००पेक्षा जास्त रुग्णांना 'रिजनरेशन थेरपी'द्वारे संजीवनी मिळाली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या व दिल्लीत असलेल्या 'आयएलबीएस' या सरकारी संस्थेमध्ये संशोधनांती ही उपचार पद्धती शोधली आहे. या थेरपीद्वारे यकृत निकामी झालेल्यांचे जगणे सुसह्य होत आहे.

संस्थेमध्ये निम्म्यापेक्षा कमी खर्चात यकृत प्रत्यारोपण केले जात असून, गेल्या वर्षांत संस्थेमध्ये सुमारे १०० प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या. आतापर्यंत दोन वर्षांच्या बालकापासून विविध वयाच्या ५० मुलांवर याच संस्थेमध्ये यकृत प्रत्यारोपण झाले आहे, मात्र देशामध्ये यकृत प्रत्यारोपणाचे प्रमाण केवळ एक टक्काच असल्याची खंत 'आयएलबीएस'चे संचालक पद्भूषण डॉ. शिव सरीन यांनी रविवारी (२७ डिसेंबर) व्यक्त केली.

यकृतविकार तज्ज्ञांच्या शहरात झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलिअरी सायन्सेस' (आयएलबीएस) ही कावीळ व यकृतविकारांविषयी सर्वांगीण संशोधन करणारी आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने ही संस्था चावली जाते. या संस्थेचे संचालक डॉ. शिव सरीन यांच्यानुसार, देशात दर वर्षी दोन लाख रुग्णांवर यकृत प्रत्यारोपण होण्याची आवश्यकता असताना, केवळ दोन हजार रुग्णांवर प्रत्यारोपण होतेे. रक्तगट जुळणाऱ्या 'लिव्हर डोनर'चा ६० टक्क्यांपर्यंतचा यकृताचा भाग काढून त्याचे यकृत निकामी झालेल्या रुग्णावर प्रत्यारोपण केले जाते. आश्चर्यकारक बाब म्हणजे 'डोनर'च्या शरीरातून काढलेला ४० टक्के यकृताचा भाग महिनाभरात पुन्हा निसर्गतः विकसित (रिजनरेशन) होतो आणि प्रत्यारोपित (रेसिपियन्ट) रुग्णाचा ४० टक्के यकृताचा भागही विकसित होतो, मात्र तरीसुद्धा 'डोनर'ची संख्या नगण्य आहे. एकीकडे 'डोनर' नाही व दुसरीकडे 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट'चे प्रमाणही अत्यल्प असल्याने यकृत प्रत्यारोपण एक टक्क्यावरच आहे. त्यासाठीच 'आयएलबीएस'ने संशोधन करून 'रिजनरेशन थेरपी' आणली. यामध्ये 'बोनमॅरो स्टिम्युलेशन'द्वारे पूर्णपणे निकामी झालेले यकृत काही प्रमाणात व काही टक्क्यांपर्यंत कार्यरत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रत्यारोपण होऊ न शकणाऱ्या रुग्णांचे जीवन सुसह्य होते व आयुर्मान वाढते, असेही डॉ. सरीन म्हणाले.



'आयएलबीएस'मध्ये महिन्यात प्रत्यारोपण

खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपणासाठी २५ ते ३५ लाख रुपये खर्च येतो; परंतु 'आयएलबीएस'मध्ये साडेअकरा लाखांमध्येही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होते आणि महिन्याभरात रुग्णाचा नंबर लागू शकतो. डोनर हा १८ ते ५० या वयोगटातला हवा. तसेच हृदयरोग, मधुमेह, थायरॉइड, फॅटी लिव्हर, मद्यपान करणारे यकृत दान करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

यकृत दानासाठी अधिकाधिक 'डोनर'नी पुढे येणे; तसेच देशामध्ये 'कॅडेव्हर ट्रान्सप्लान्ट'चे प्रमाण वाढणे खूप आवश्यक आहे. यकृताच्या प्रत्यारोपणानंतर संबंधित 'रेसिपियन्ट' व 'डोनर' दीर्घायुषी राहू शकतात. ​ - डॉ. शिव सरीन, संचालक, आयएलबीएस, दिल्ली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरस्वती भुवन अॅल्युमनी असोसिएशनची स्थापना

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'सरस्वती भुवन अॅल्युमनी असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. असोसिएशनच्या कार्यालयाचे उद‍‍््घाटन ९ जानेवारी रोजी स. भु. शिक्षण संस्थेच्या परिसरात होणार आहे,' अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 'ऋणानुबंध' या नावाने ही संघटना ओळखली जाणार आहे.
पत्रकार परिषदेला स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, सचिव अॅड. दिनेश वकील, असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. सध्या स. भु. शिक्षण संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. गुरुजणांचे ऋण फेडावे या उद्देशाने स.भु.च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन 'ऋणानुबंध'ची स्थापना केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक केंद्रबिंदू ठेऊन ही असोसिएशन कार्यरत असेल. कंपनी अॅक्टच्या कलम आठनुसार या असोसिएशनची स्थापना झाली आहे. शैक्षणिक दर्जा उंचवावा, माजी विद्यार्थ्यांशी चर्चा, मोबाइल सायन्स प्रयोगशाळा, डिजिटल ग्रंथालय, संशोधन आणि विकास केंद्र, उद्योजक घडविण्यासाठी विकास कार्यक्रम हे संघटनेचे मुख्य उद्द‌िष्ट असणार आहे. या संघटनेची वेबसाइटही कार्यरत आहे. www.sbesalumni.org या वेबसाइटवर जाऊन संघटनेचे सदस्य होता येईल. संघटनेची टीम अशीः राम भोगले, डॉ. सुनील देशपांडे, डॉ. नंदकुमार उकडगावकर, उमेश दाशरथे, प्रशांत देशपांडे, प्रसाद कोकिळ, सुहास वैद्य, आल्हाद देशमुख आणि प्रमोद माने. वेबसाइटवर नोंदणीकरण्यासाठी लवकरच गेटवे तयार करण्यात येईल, अशी माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली. या संघटनेवर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. श्रीरंग देशपांडे हे काम करणार आहेत. या माजी विद्यार्थी संघटनेच्या संस्थेतर्फे मी स्वागत करतो. संस्थेच्या घटनेत बदल करण्याचा मानस आहे. या संस्थेवर संघटनेच्या एक प्रतिनिधीची नियामक मंडळावर नेमणूक करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील, असे स.भु.चे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांनी सांगितले. या संघटनेला एक छोटे कार्यालय स.भु. प रिसरात देण्यात आले आहे. शताब्दी वर्षात श्री सरस्वती भुवन प्रशाला, शारदा मंदिर कन्या प्रशाला या शाळांच्या इमारतीचे आयुष्य कमी झाले आहे. या दोन्ही वास्तूची निर्मिती करण्याची मोठी योजना सस्थेची आहे, असे बोरीकर म्हणाले. नवीन योजनेत या संघटनेला स्वतंत्र कार्यालय देण्याचा विचार आहे. विद्यमान केंद्रसरकारने स्किल डेव्हलपमेंट शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले आहेत. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीमध्ये संस्थेची चार एकर जागा आहे. या जागेवर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. स. भु. शिक्षण संस्थेच्या एकच माजी विद्यार्थ्यां संघटना असेल तर अधिक सोयीचे होईल. स. भु. परिसरात १५०० आसन व्यवस्थेचे सभागृह बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे, असे बोरीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन घरफोड्या; एक लाख लंपास

0
0

औरंगाबाद : घरफोडीच्या दोन घटनांत चोरट्यांनी १ लाख ४ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. एन ११ व सातारा परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी सिडको व सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शाम प्रल्हाद बारसकर (रा. गजानननगर, एन ११) हे रहिवासी रविवारी सकाळी नोकरीला गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा भाचा घराला कुलूप लावून कपडे आणण्यासाठी बाहेर गेला. या दरम्यान चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील रोख रक्कम, सोन्याची नथ, चांदीच्या वस्तू, दोन मोबाइल असा ७२ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची दुसरी घटना शुक्रवारी सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी येथे घडली. वामन विश्वनाथ केंद्रे हा तरुण घराला कुलूप लावून बाहेरगावी गेला होता. चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने व मोबाइल असा ३१ हजार सातशे रुपयांचा ऐवज लंपास नेला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम फोडण्याचा डाव फसला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आकाशवाणी चौकाजवळील शात्रीनगरमधील एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांमुळे सोमवारी पहाटे उधळला गेला. पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांपैकी दोघांना पकडले आहे. ते भांडूप येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस कंट्रोल रुमच्या मोबाइल व्हॅन दोनचे पथक सोमवारी पहाटे अडीच वाजता आकाशवाणी चौकाजवळील शास्त्रीनगरमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी एसबीएच बँकेच्या एटीएमजवळ त्यांना पाच संशयित दिसले. पथकातील भगवान शिलोटे, बीडकर, जाधव, पगारे व‌ शिंदे यांनी तत्काळ धाव घेतली तेव्हा ते संशयित एटीएमच्या इमारतीवर पळाले. त्यांच्यापैकी बंटा राजेश चौधरी (वय २६ रा. सोनपूर, भांडूप) याला जागेवर पकडण्यात आले. ही माहिती कंट्रोलरुमला दिल्यानंतर बंदोबस्तावरील इतर पथकांनी शात्रीनगरमध्ये धाव घेतली. पीसीआर मोबाइल दहाचे कर्मचारी दिनेश बन, संजय नंद, इरफान खान, जिन्सी पोलिस ठाण्याचे पीएसआय तायडे यांनी इमारतीला घेराव घालून दरोडेखोरांचा शोध सुरू केला. एटीएम असलेल्या इमारतीमागे दुसऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तीन दरोडेखोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर उड्या पळून गेले. पोलिसांनी बॅटरीच्या उजेडात शोध घेऊन पाण्याच्या टाकीमागे लपलेला दुसरा दरोडेखोर भोला रोहित चमार (वय २१ रा. श्रीरामपाडा, भांडूप) याला जेरबंद केले.
या दोघांच्या ताब्यातून लोखंडी मोठे कटर, सहा हजार रुपयांची चिल्लर नाणी, विविध कंपन्याची सिगारेटची पाकिटे व मोबाइल जप्त करण्यात आले. पोलिसतर्फे रात्री गस्त घालताना शहरातील ज्वेलर्सची मोठी दुकाने, बँक व एटीएमच्या सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे एटीएमची पाहणी करताना हा प्रकार लक्षात आला. पळून गेलेल्या तिघांचा पोलिसांनी सकाळपर्यंत शोध घेतला. या टोळीविरुद्ध दरोड्याच्या तयारीत असल्याप्रकरणी भगवान शिलोटे यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी एका महिन्यापासून शहागंजमध्ये वास्तव्यास आहे. ते रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झोपत असत. त्यांच्याजवळ सापडलेली चिल्लर व सिगारेटच्या पाकिटावरून त्यांनी दुकान फोडल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या टोळीची माहिती मुंबई व ठाणे पोलिसांकडून मागवण्यात
आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षानंतर भाजपची कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्ह्याच्या इतिहासात तब्बल पंधरा वर्षानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणे आणि कार्यपद्धतीची माहिती देणारी कार्यशाळा घेण्यात आली. यामुळे भाजपमध्ये चैतन्य पसरले असून येत्या काळात गाव पातळीवर समिती स्थापन करण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

यापूर्वीच्‍ जालना जिल्ह्यात मोबाइलवर मिस कॉल देऊन दोन लाख पंच्याहत्तर हजार प्राथमिक सदस्य झाले आहेत. यानंतर अशा प्रकारच्या सदस्यांची नोंद करणाऱ्या दर शंभर सदस्यांच्या पाठीशी एक सक्रिय सदस्य नोंदणी केली आहे. आता गाव पातळीवर समिती स्थापन करण्याचे काम सुरू आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या पंधरवडय़ात तालुका समिती आणि त्यानंतर जिल्हा समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खासदार दानवेंनी दिला कानमंत्र

भोकरदनच्या पंचायत समितीचा मी सभापती झालो, या बातमीवर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. सभापतींची गाडी म्हणजे काय तर त्यावेळेस एक हिरवी जीप होती. ती घेऊन जालन्यात जेइएस कॉलेजमध्ये गेलो तरी कुणाला खरे वाटत नव्हते. कुणाची तरी आणली असशील तु ही जीप, असे सगळे म्हणायचे. एकूण काय तर सत्ता आपल्या जीवनात जवळपास देखील येणार नाही असाच सगळ्यांचा समज होता. मात्र बघता-बघता सगळे काही बदलले आहे. कामात सातत्य असले पाहिजे. पक्ष संघटना कधीच कुणासाठीही थांबत नसती, काम करायचे की नाही हे तुम्ही ठरवा. तुमची जागा नवा कार्यकर्ता नक्की घेणार म्हणून पक्षाचे काम थांबवू नका, काहीतरी सारखे करत जा असा कानमंत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी दिला.

घनसावंगी, अंबड आणि बदनापूर तालुक्यातील भाजपाच्या सक्रिय सभासदांसाठी आयोजित पं. दिनदयाळ उपाध्याय महाअभियानांतर्गंत विशेष प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते.

यावेळी खासदार दानवे म्हणाले, 'एककाळ असा होता की, आपल्याला कुणी दारात उभे करत नव्हते. जुन्या जालन्यात अॅड. तात्या महाजन, न. कृ. देशमुख वकीलसाहेब, भा. गं. देशपांडे तर नव्या जालन्यात व्यंकटेश गोरंट्याल ही मोजकीच आपली घरे होती. प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे जालन्यात अक्षरशः सायकलवर फिरत होते. पण कोणालाही कसलीच अपेक्षा नव्हती. एक ध्येय आणि धोरणानुसार काम करत राहिले. त्याचा आज हा चांगला परिणाम दिसत आहे.'

पक्षाची कार्यपद्धती याविषयी पैठणच्या रेखा कुलकर्णी यांनी विषय मांडला. भाजपाचा इतिहास सांगितला महाराष्ट्र प्रदेश प्रशिक्षण प्रमुख प्रवीण घुगे यांनी सांगितला. यावेळी जेष्ठ नेते दिलीप तौर, डॉ. भागवत कराड, विभागीय संघटन मंत्री भाऊराव देशमुख, प्रशिक्षण प्रमुख सिद्धीविनायक मुळे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

...म्हणून हिरवेगार वातावरण

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी खस्ता खाल्ल्या, अपमान सहन करून पदरमोड केली. ते सगळे वणवण भटकले म्हणून आता हे सगळे हिरवेगार वातावरण आपण भोगत आहोत. हेच खरे सत्य आहे, ते समजून घ्या, असे खासदार दानवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा गांजा विक्रेत्यांची पोलिसांची चौकशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. चित्रा डकरे यांच्या खूनाला चार आठवडे उलटत आले तरी पोलिसांना गुन्हेगारांना पकडता आलेले नाही. याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी सोमवारी शहरातील दहा गांजा विक्रेत्यांची गुन्हेशाखेत चौकशी केली. यापूर्वी देशी दारूचे गुत्ते चालवणाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली आहे.
डॉ. डकरे यांचा सिडको एन ९ भागात २ डिसेंबर रोजी गळा चिरून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी शहरातील सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू केली आहे. पण मारेकऱ्याचा माग काढण्यात अपयश येत असल्याने शहरात गांजा विकणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या नशेखोरांमध्ये गुन्हेगारांचेच प्रमाण जास्त आहे. दहा गांजा विक्रेत्यांना गुन्हेशाखेत आणून खूनासंदर्भात काही धागेदोरे हाती लागतात का याची चाचपणी करण्यात आली. ही चौकशी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केली. दोन आठवड्यांपूर्वी सिडको-हडको परिसरातील देशी दारूच्या अड्डाचालकाना बोलावून चोकशी केली होती. या खूनाची माहिती देणाऱ्यास पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार राहुल मोटेंना दोन दिवस कोठडी

0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांनी चारा छावणीच्या मागणीसाठभ्‍ रास्ता रोको आंदोलन केले. याप्रकरणी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मोटे यांनी जामीन न घेतल्याने त्यांच्यासह पाच जणांना दोन दिवस न्यायलयीन कोठडी‌‌‌त ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

भुम तालुक्यातील जनावरांच्या चारा छावणी प्रस्ताव मंजूर चारा छावण्या मंजूर होत नसल्याने सोमवारी राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांनी जामीन मंजूर करून घेतला नसल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. राहुल मोटे यांना उस्मानाबाद जिल्हा कारागृहात आणले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
येथील श्रद्धा कॉलनीतील एक बंद घर फोडून चोरांनी अडीच लाख रुपये रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचे ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ ते ८च्या दरम्यान घडली.
वाळूज येथील श्रद्धा कॉलनीतील रहिवासी संतोष वसंतआप्पा वडाळे मेहुण्याकरिता मुलगी पाहण्यासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ते रविवारी रात्री १० च्या सुमाराला घरी परत आले तेव्हा घराचा दरवाजा उघडा व लाइट लागलेले दिसले. शंका आल्याने त्यांनी तत्काळ घरात धाव घेऊन पाहणी केली तेव्हा चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडले होते. पाहणी केल्यानंतर कपाटातील अडीच लाख रुपये, सोन्याचे अडीच ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, ६ ग्रॅमची अंगठी, अडीच तोळ्याचे ब्रेसलेट, कॅमेरा असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचे ऐवजी लंपास केल्याचे लक्षात आले.
या घटनेची माहिती तत्काळ वाळूज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थाळी धाव घेऊन पाहणी केली, तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करून नमुने घेतले. या घरफोडीची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
तरुणाची आत्महत्या
वाळूज गावातील एका सार्वजनिक विहिरीत एका २४ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचे सोमवारी दुपारी एक वाजता उघडकीस आले. विजय प्रभाकर शेकुकर (रा. साठेनगर), असे त्याचे नाव आहे. तो सोमवारी सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता बाहेर पडला होता, दुपारी जेवणासाठी परत न आल्याने शोध घेण्यात आला. त्यावेळी भंगार वेचणारा शाम दर्गालाल गौर याने विजय सर्वाजनिक विहिरीजवळील लिंबाच्या झाडाखाली झोपल्याची माहिती दिली. तेथे शोधल्यानंतर विहिरीत मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी गावकर्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मोटरसायकल चोरी
महाराणा प्रताप चौकातील एका हॉटेलसमोरून रविवारी रात्री आठ वाजता मोटारसायकलची (एमएच २०, बीएस १३४६) चोरीस गेली. विश्वास नथू पवार (रा. नंदकानन हाउसिंग सोसायटी सिडको वाळूज महानगर) हे मित्राला भेटण्यासाठी महाराणा प्रताप चौकातील एका हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमधून एक तासाने बाहेर आल्यानंतर मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडल्याने दोन बालकांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

विहिरीत कुत्र्याचे पिल्लू पडल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांना जीव गमवावा लागला. या घटनेत कुत्र्याचे पिल्लू वचले हे विशेष होय. ही घटना रविवारी सकाळी भोकर तालुक्यातील धानोरा येथे घडली.

आकाश शिवाजी कुरुकवाड (वय १५) सुरज शिवाजी कुरुकवाड ( वय १३) अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत. भोकर-तामसा रस्त्यावरील धानोरा या गावी शिवाजी कुरुकवाड आणि त्यांचा भाऊ सकाळी शेतात कामानिमित्त गेले होते. या दरम्यान, गावातून एक कुत्र्याचे पिल्लू सुद्धा त्याच्या शेतात आले होते. शेतीलगत असलेल्या ज्ञानेश्वर शेंडगे यांच्या शेतातील विहिरीजवळ ते पिल्लू खेळताना त्या विहिरीत पडले. यावेळी आकाश कुरुकवाड व त्याचा लहान भाऊ सुरज कुरुकवाड दोघे शेतात आले होते. कुत्र्याचे पिल्लू विहिरीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने दोघेही भाऊ त्या पिल्लास जीवदान देण्यासाठी शेतात कामावर असलेल्या वडिलाकडे आले. विहिरीत कुत्र्याचे पिल्लू पडले त्यास वर काढण्यासाठी आम्हाला दोरी द्या असा आग्रह धरला. तत्काळ वडिलांनी चिमुकल्यांना दोरी दिली. दोघा भावांनी दोरी पाण्यात टाकून आत असलेल्या पिल्ल्यास बाहेर काढले. त्यानंतर विहिरीबाहेर येताना एकाच तोल जाऊन विहिरीत पडल्याने भावाचा जीव वाचविण्यासाठी दुसऱ्याने विहिरीत उडी घेतली. पण दोघानाही जीव वाचविता आला नाही. त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. विहिरी बाहेर कुत्र्याचे पिल्लू थांबलेले दिसले. मुले का आली नाहीत याची शंका वडिलास व त्याच्या भावास आल्याने दोघेही विहिरीजवळ येऊन डोकावून पाहिल्यावर दोन्ही मुले व‌िहिरीत पडल्याचे निर्दशनास आले. ही बातमी सर्वत्र पसरताच अनेकांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. दोन्ही मयत भावांवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.​

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणावर ब्लेडने प्राणघातक हल्ला

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भावासोबत राहू नको असे म्हणत पितापुत्रांनी तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार केले. मिसारवाडी येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिद्धार्थ यशवंत वाघमारे (वय २० रा. साईनगर, मिसारवाडी) हा तरूण त्याच्या मित्रासोबत शेकोटीवर शेकत होता. यावेळी त्या ठिकाणी सचिन भगवान तांबे व भगवान तांबे (रा. मिसारवाडी) हे दोघे आले. सचिनचा भाऊ देखील यावेळी सिद्धार्थसोबत होता. सचिनने सिद्धार्थला तुला भावासोबत राहू नको, असे सांगितले होते असा जाब विचारत लाथा घातल्या. पाकिटातून ब्लेड काढून त्याच्या मानेवर उजव्या बाजुला वार करीत गंभीर जखमी केले. भगवान तांबे याने देखील शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. सिद्धार्थने सिडको पोलिस ठाणे गाठून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रियदर्शनी’च्या अवसायकावर कारवाई करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

तोंडार (ता. उदगीर) येथील प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अवसायक म्हणून लातूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा निबंधक घोलकर काम पाहत होते. त्यांच्या कार्यकाळात राज्य सहकारी बँकेकडे तारण असलेली कारखान्याची साखर परस्पर विकल्याप्रकरणी कारवाई करा अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रदीप मोरे यांनी केली आहे.

याप्रकरणी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना अॅड. मोरे यांनी निवेदन दिले आहे. घोलकर हे अवसायक म्हणून कार्यरत असताना कारखान्याची अंदाजे सहा हजार ९५८ किंवा सात हजार २०० क्विंटल साखर ही कारखान्याच्या गोडावून क्रमांक एकमध्ये वेगवेगळी ठेवली होती. ही साखर राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात होती. सदरील माहिती ही बँक स्थायी तपासणी अधिकारी यांनी सह व्यवस्थापक पे ऑफीस नांदेड यांना ३० जानेवारी २०१३ रोजी दिली होती.

त्यानंतर सहा सप्टेंबर २०१४ मध्ये स्विपिंग साखर विक्री टेंडरच्या जाहिराती पुणे नांदेड येथील वर्तमानपत्रात देण्यात आल्या. त्या जाहिरातीमध्ये पाचशे ते सातशे क्विंटल साखर विक्री करणे बाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु सहा मे २०१४ ते ८ जून २०१४ पर्यंत यातील बहुतांश साखर अवसायकांनी बेकायदेशीर विक्री केली होती. ज्या वाहनातून त्याची विक्री झाली आहे. त्याचा सर्व तपशील वाहन क्रमांकासह निवेदनाला जोडण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. घोलकर यांनी अवसायक पदाचा गैरवापर करून अंदाजे सहा हजार क्विंटल साखर बेकायदेशीररित्या परस्पर विकून राज्य सहकारी बँकेची आणि शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप या निवेदनात केला आहे.

निवेदनासोबत बँक स्थायी तपासणीस अधिकाऱ्यांचे ३० जानेवारी २०१३ चे पत्र तसेच बेकायदेशीर साखर विक्री केलेल्या वाहनाचा तपशील जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे १७ डिसेंबर २०१५ रोजी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वसमतचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सदरील प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून प्राधिकृत अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे उत्तरही दिले आहे.

दरम्यान, विशेष लेखा परिक्षक वर्ग एक यांनी केलेल्या तपासणीचा अहवाल ही अॅड. मोरे यांना सहकार खात्याने दिलेला आहे. त्या अहवालात स्पष्टपणे सरकारचे नुकसान झाल्याचे म्हटले असून त्यास राज्य सहकारी बँक मुंबई पे ऑफीस नांदेडचे बँक स्थायी तपासणी अधिकारी व सेक्युरिटायझेशन कायद्यातंर्गत साखरेचा ताबा घेणारे प्राधिकृत अधिकारी यांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामाजिक प्रश्न वैज्ञानिक दृष्टीने पहा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपला देश आज पाणी टंचाई, कचरा निमूर्लन अशा विविध समस्यांनी वेढलेला आहे. त्या सोडविण्यासाठी तरूण संशोधक, शास्त्रज्ञांनी पुढे यावे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून देशासह, जगभारतील प्रश्न सोडविता आले पाहिजेत, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात फिजिक्स विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत देशभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
'फंक्शनल मटेरियल्स अँड मायक्रोवेव्हज'विषयावर ही परिषद आहे. तीन दिवसांच्या परिषदेला विद्यापीठाच्या नाट्यगृहात आजपासून सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. डी. के. असवाल, डॉ. डी. के. कांजीलाल, प्रा. एस. सी. गडकरी, प्रा. मोहम्मद मेहंदी चेहिमी, प्रा. मोरीगा तोशिहिरो यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. असवाल म्हणाले, 'आपला देश वेगाने प्रगती करत असला तरी सामाजिक समस्याही मोठ्या प्रमाणात आहेत. तरुण संशोधक ही देशाची संपत्ती आहे. त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी पुढे यायला हवे. अन्न सुरक्षा, दळणवळण, दर्जेदार रस्ते, पाणी टंचाई अशा विषयांवर उपाय आपण शोधायलाच हवे. भारताचा समावेश जगातील पहिल्या पाच देशांमध्ये होत आहे. अशावेळी भारतातील वैज्ञानिक, तरुण संशोधक यांनी आपली भूमिका लक्षात घेत योगदान द्यायला हवे. फिजिक्समध्ये संशोधन गावपातळीपर्यंत पोहचावे.' प्रा. मोराकामी यांचे बीजभाषण झाले. त्यांनी फिजिक्समधील नवीन तंत्रज्ञान समाजाला उपयुक्त कसे आहे, त्यातील बदल हे मांडले. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचेही यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट, विभागप्रमुख डॉ. रामफल शर्मा यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या मक्रणपूरमध्ये जयभीम दिनाचे आयोजन

0
0

औरंगाबाद : ७७ वा जयभीम दिन व मक्रणपूर परिषद स्मरणदिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान व जयभीम मित्र मंडळातर्फे बुधवारी (३० डिसेंबर) सकाळी साडेदहा वाजता कन्नड तालुक्यातील मक्रणपूर डांगरा (नर्सरी) येथे धम्मोपदेश व ऐतिहासिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश मोरे यांनी कळविली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील पहिली दलित परिषद ३० डिसेंबर १९३८ मध्ये मक्रणपूर येथे झाली. बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांमधून आंबेडकरी चळवळीचे बीज मराठवाड्यात पहिल्यांदा पेरले गेले. मक्रणपूर परिषदेने मराठवाड्यातील दलित, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि स्त्रिया यांच्या संघर्ष करण्याची उर्मी जागृत होती. याच परिषदेत पहिल्यांदा 'जय भीम' नारा दिला गेला. या निमित्ताने परिषदेचे तत्कालीन संयोजक व धैर्यवान कार्यकर्त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी व युवकांना इतिहासाची माहिती होण्याबरोबरच धम्मशिस्त व सामाजिक विधायकता दृढ होण्यासाठी धम्मोपदेश, इतिहास स्मरण व विचार मंथनाचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांचा धम्मोपदेश होईल. भन्ते उपगुप्त महाथेरो, भन्ते ज्ञानरक्षीत, डी. आर. शेळके हे विचार मांडतील. यानंतर प्रतापसिंग बोदडे, राहुल अन्वीकर, नागसेनदादा सावदेकर, कुणाल वराळे यांचा बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीचे उर्वरित फ्रिज हस्तगत

0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
ट्रकमधून फ्रिजचोरी प्रकरणीतील उर्वरित फ्रिज पोलिसांनी संशयित चोरट्यांकडून जप्त केले आहेत. तसेच पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली पिकअप व्हॅन ताब्यात घेतली आहे.
एमआयडीसीत थांबलेल्या एका ट्रकमधून ४ फ्रिज वळदगाव येथील ५ चोरट्यांनी २४ डिसेंबर रोजी पिकअप व्हॅनमधून चोरून नेले. कृष्णा अशोक दराडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी ५ संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून एक फ्रिज ताब्यात घेण्यात आला. उर्वरित ३ फ्रिज वळदगाव येथील पिकअप व्हॅनचालक राहुल देवीदास घोडके याच्या घरात सापडले. या गुन्ह्यात वापरलेली पिकअप व्हॅन (एमएच २० डी इ ४४१९) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यास भेट दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे, पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस उपनिरीक्षक महेश टाक, पोलिस हवालदार वसंत शेळके आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images