Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ट्रकखाली चिरडून तरुण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
बाजार समिती कार्यालयासमोर एका ट्रकखाली चिरडून एक ३० वर्षांचा तरूण जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडला. अतुल अशोक हजारे (रा. नारळा पैठण), असे या तरुणाचे नाव आहे. ते बाजार समिती कार्यालयासमोरून रस्ता ओलांडत असताना एम. एच. ०९ एच एच ४७२७ क्रमांकाच्या ट्रकने चिरडले. या अपघातात अतुल यांच्या डोक्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला व पोटावरून ट्रकचे मागील टायर गेले. घटनास्थळावरुन ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. पोलिसांनी वायरलेसवरून माहिती दिल्यानंतर वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फशीं ट्रक पकडण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे, पोलिस अकुंश बागल, विठ्ठल डोके यांनी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. हा अपघात एवढा भीषण होता की, ठार झालेल्या तरुणाचे अवयव रस्त्यावर पसरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जग जिंका, गर‌िबांना मदत करामनपा आयुक्त केंद्रेकरांचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आयटीसारख्या उद्योगात २५ वर्षांपूर्वी औरंगाबादेत केलेली यशस्वी सुरुवात आज तुम्हाला सातासमुद्रापार घेऊन गेली आहे. ही यशस्वी वाटचाल अशीच पुढे सुरू ठेवा, जग जिंका पण सोबत सामाजिक कर्तव्य म्हणून गरीब घटकांनाही मदत करा,' असे आवाहन महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले.
एक्स्पर्ट ग्लोबल सोल्यूशन्स या आयटी क्षेत्रातील कंपनीस २५ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रेकर बोलत होते. ऋचा ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे प्रमुख उमेश दाशरथी यांची प्रमुख उपस्थिती होती. एक्स्पर्टचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत देशपांडे, संचालक मुकुंद कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, नितीन नळगीरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दाशरथी म्हणाले, की हा ग्रुप प्रयोगशील आहे. १९९० मध्ये आयटी क्षेत्रात उडी घेणे मोठी गोष्ट होती. त्यातही औरंगाबादमध्ये आयटी उद्योगाला फारसा वाव नव्हता. पण एक्स्पर्टची टीम यशस्वी ठरली. कुठल्याही व्यवसायात सतत प्रयोग करत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन कल्पना सूचतात. भविष्यात ग्रुपची वाटचाल यशस्वी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशांत देशपांडे यांनी २५ वर्षांचा इतिहास सांगताना सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळेच इथवर पोचल्याचे सांगितले. कंपनीतील अधिकारी श्याम पांडे यांनी अनुभवकथन केले. ३५० कर्मचारी औरंगाबाद, पुणे, अमेरिका, जर्मनी येथे एक्स्पर्ट कंपनी पोचल्याचे सांगितले. सुरवातीला चारही संचालकांच्या पालकांना व्यासपीठावर बोलावून त्यांना सन्मानित केले. प्रशांत देशपांडे यांच्या आई मंदाकिनी देशपांडे यांनी मानपत्र वाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

....तुझे गीत गाण्यासाठी!

$
0
0




नुसत्या वाङ्यप्रतिष्ठेवरच कवितेचे शिखर उंच-उंच होत जात नसते. कवितेला जनाधार हवा असतो. कवितेच्या सोबत समाज आणि संस्कृती ही असावीच लागते. या पद्धतीचे अहोभाग्य कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या तळहातांवर नक्की लिहिलेले आहे. आमच्या समीक्षेने त्यांच्यावर टीकेचा टक्का मारून बघितला. कविता लेखनाच्या त्यांच्या सातत्यशीलतेवरही खूप बोलून-भांडून झाले; पण या खऱ्या कवीने त्याची कधी पर्वा केली नाही किंवा उत्तर देण्यात आपली प्रतिभा कधी खुली होऊ दिली नाही. रसिकांच्या आणि वाचकांच्याही लक्षावधी जनतेचा सागर पाडगावकरांच्या कवितेकडे सतत लोहचुंबकाप्रमाणे खेचला गेला तो कायमच.
'धारानृत्य', 'जिप्सी'पासून म्हणजे १९५० पासून कवितेसोबतच पक्की गाठ बांधून उत्साहाने प्रवास करणाऱ्या या ज्येष्ठ कवीने 'शब्द', 'क्षणिका' या अलीकडच्या कवितासंग्रहांपर्यंत आपला 'प्रतिभाप्रवास' सुंदर, हार्दिक, मनोवेधीच ठेवला. माणसांचा ध्यास बाळगणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकरांनी माणसांच्या भावनांचीच शब्दयात्रा कवितेच्या दरबारात भरविली. अनुप्रास अथवा यमक यांचा गंध व बाज या थोर कवीला फार सूक्ष्म ठाऊक होता. वरवर हा शब्दांचा खेळ वाटायचा. वरवर ही शब्दक्रीडाच वाटायची; पण त्याच शब्दमैफलीमधून या प्रतिभावंतानं मानवी मन वाहतं ठेवलं. मानवी संवेदनांची साखरमिठी रसिकांना घडविली. कविता आणि गाणं यात त्यांनी लक्ष्मणरेषा ओढून ठेवली नाही कधी.
लोकांचं जीवन सुंदर करणारे हे कवी. जगताना-वागताना कवित्वाचा गौरवास्पद बाणा आणि कणाही या कविवर्यानं नरम, मुलायम होऊ दिला नाही. आपल्या वैभवास्पद कवीपणाच्या बहारदार अस्तित्वाची प्रभा, पाडगावकरांनी आयुष्यभर तेजाची व जनपसंदच सांभाळलेली आहे. समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी चिंतनाची भूमी उलगडून दाखविताना वैयक्तिक प्रेमजीवन आणि निसर्गप्रेमातून अनुभवास येणारे भावजीवन हेच पाडगावकरांच्या प्रतिभेचे प्रामुख्याने चिंतन विषय आहेत, अशी बाजू समोर ठेवलेली आहे. ती अर्थातच, समुचित अशीच म्हणायला हवी. पाडगावकरांइतकी दांडगी लोकप्रियता कमी कवींच्या पदरांत पडलेली दिसते. लोकप्रियता हा शब्द मान-सन्मानाचं माप लावताना पुष्कळदा कमी लेखला जातो. त्याच्या खास काही कसोट्या मात्र सांगितल्या जात नाहीत. सोपं-सरळ लिहिणाऱ्यांना कवी न मानण्याचाही एक आडमुठेपणा साहित्यात बिनकामाचा धुमसत ठेवला जातो. यात काही तथ्य नाही. 'सलाम' या संग्रहासाठी भारत सरकारनं साहित्य अकादमी देऊन पाडगावकरांना गौरविलं आहे. समीक्षा ही गोष्ट का विसरत असावी? 'सलाम', 'वात्रटिका', 'उदासबोध' हे त्यांचे कवितासंग्रह व्यवस्था, समाजांतील विरुपांचं रेखन करतात, जे की अप्रतिम, कुलीन आणि अत्यंत महत्त्वपूर्णच आहे. सामाजिक-राजकीय व्यवस्थेतल्या ढोंगाला टरकावणारा शब्द या कवीनं कवितेमधून आयुधासारखा वापरलेला आहे. संयमी व सभ्य विद्रोहाचा हा बाज पुनः एकदा समजून घ्यावा, अशा स्वरूपाचा नक्कीच आहे. निसर्गालाच पहिली प्रेरणा मानणारा आणि समाजातील लोक हेच माझ्या कवितेचे गोकूळ मानणारा हा प्रतिभावंत सूर आणि शब्दांपासून कधीही ढळलेला नाही. लिंबोणीच्या झाडामागे (ललित), युगात्मा, संहिता यांसारखी अप्रतिम संपादनं आणि शर्मिष्ठा (नाट्यकाव्य) या पद्धतीची वेगळी सर्जकता पाडगावकरांनी सिद्ध केली आणि आपल्या प्रतिमेचा खानदानी असणारा कंद वाचकप्रत्ययास आणून दिला आहे. या अनवट प्रतिभेचा हिशेब मात्र समीक्षेने किंवा ठराविक वाचकांनी कधी केला नाही, असं का? मतांची गणितं माडणाऱ्या आणि विवेचनांचे कप्पे करत चर्चा ताणत ठेवणाऱ्या चिंतकांनीही त्याअर्थी मंगेश पाडगावकरांच्या काव्यदौलतीवर जरूर तर अन्यायच केलेला आढळून येतो. असो. एका घरात दहा माणसं एका स्वभावाची नसतात. अन्न व संस्कार समान असूनही हाच अन्याय कवितेला लावला पाहिजे. कोणाचीच समग्र कविता अप्रतिम अशा पठडीतली अजिबात नसते. धारानृत्य ते क्षणिका असे मिळून पाडगावकरांनी जवळपास चाळीस एक काव्यसंग्रह वाचक हाती सोपविलेले आहेत. बबलगम, वेडं कोकरू, आता खेळ नाचा, झुले बाई झुला, सुट्टी एके सुट्टी हे त्यांचं लहान मुलांसाठीचं लेखन तर अप्रतीम अशा पठडीतलं आहे. लेकरांसाठी शब्द कसा लिहावा, याचा आरसा म्हणून पाडगांवकरांच्या बालगीतांचा विचार करता येणार आहे. जिप्सी, सलाम, गझल, तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, छोरी, मीरा, वात्रटिका, उदासबोध या त्यांच्या सर्वच कवितासंग्रहांनी विक्रमी आवृत्या आणि विक्रीसेवेचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत, ही घ्टना मामुली समजावी अशा श्रेणीची म्हणता यायची नाही. प्रकाशक हल्ली कवितासंग्रहाला हात लावत नाहीत, आणि कवी आपली पुस्तकं हिंडून वाटतात किंवा 'भेट' शब्द लिहून लोकार्पण करतात, अशी स्थिती आढळताना दिसून येते, अशा एका ठिचकारण्याच्या वातावरणात लक्षावधी रसिकांची यात्रा पाडगावकरांवर अर्धशतकापासून प्रेम करत आलेली आहे. म्हणून त्यांची प्रतिमा जनपसंद जरूर आहे. कविपणाचं अवघं वैभव जे या कवीला लाभलं, ते इतर दुसऱ्याला नाही, हेही ध्यानी घेतलं पाहिजे.
माणसाला जगण्यासाठी चटणीभाकरच फक्ती हवी. असं ठामपणानं म्हणता येत नाही. ती एक मूळ गरज आहेच, पण त्याशिवाय, सूर, ताल, नाद, लय, हास्य, आनंद, सकारात्मकता याच्याशिवाय पण माणूस जगू शकत नाही. जनमानस हे मूळात बहुकोनी, अहुआयामी अर्थात विविध गुणधर्मी अशा स्वरूपाचं असतं. पाडगावकारांच्या प्रातिभ‌िक लेखनीचा धर्म हा असा जनध्यासाशी संलग्न होणारा आहे. त्यांच्या गीत आणि गझलांवर कारागिरी म्हणून आणि कृत्रिम म्हणून तीव्र तिखट आलोचना झाली, पण हिरव्यागार काळजाच्या या दिलेर कवीनं त्याची कधी एक पर्वा केली नाही. भय ठेवले नाही. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी किंवा अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती किंवा श्रावणात घननिळा बरसला, शब्दांवाचून कळले सारे, भेट तुझी-माझी स्मरते यांसारखी प्रगल्भ आशयाची गाणी त्यांनी पुष्कळ लिहून ठेवली आहेत. सहज अशी शब्दकळा, मूळातून गेयता, संगीताशी एकरूप होणाऱ्या ओळी आणि जनमनांतील भाव पारखणारी कविप्रतिभाः ह्या एकसंध प्रीतीचा भाव, निसर्गाचा वेध, नात्यांची उकल, भावसौंदर्याचा आविष्कार, मानवी संवेदना आणि शब्द-विचार-तत्वः ह्या दिशा आणि मार्गांनी कवितेची-गीतांची पालखी घेऊन चालणारा हा कवी आहे. गीतांना शब्द देताना भडक, आवाजी, रखरखीत व बोचकणारा भाव पाडगावकरांनी गाण्यात येऊ दिला नाही. त्यामुळं र‌सिकांची श्रेणी पद्धत करून त्यांचं गाण ऐकण्याची गरज नाही. डोंगररांगापासून ते महानगरपर्यंत बसलेल्या कोणत्याही माणसाला त्यांचं गाणं मनोवेधी वाटायला वेळ लागत नाही. मन व कान उघडा असला की पाडगावकर शब्दांतून जनतेचे कवी होऊन जातातच. यावर्षी 'मौज' दिवाळी अंकात 'नवीन' असं शीर्षक असलेली पाडगांवकराची कविता आहे. ताजी छापलेली ही त्यांची शेवटची कविता. त्यात ते लिहितात,
'निःशब्द तीर्थयात्रा ही
भवतीची सगळी सृष्टी
अन पाहू लागली माझी
मज पुन्हा नव्याने दृष्टी!'
.... आणि आता या थोर कवीची ही तीर्थयात्रा रसिकजनांसाठी याक्षणी निःशब्द झाली आहे.
- डॉ. केशव सखाराम देशमुख,
(स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यीपीठ, नांदेड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६ वाळू साठ्यांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नसतानाही शहरात वाळूचे बेकायदा साठे करून ठेवले होते. महसूल विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने महसूलच्या बुधवारी दिवसभरात १६ ठिकाणी छापे टाकून सुमारे पावणेदोनशे ब्रास वाळू जप्त केली, अशी माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली.

महसूल विभागाच्या दोन पथकांनी बुधवारी सकाळी १०पासून कारवाईला सुरुवात केली. पथकांनी शहरासह परिसरातील साठ्यांवरही कारवाई केली. हर्सूल टी पॉइंट, पुंडलिकनगर रोड, शिवाजीनगर, देवळाई चौक, पंचवटी चौक, पडेगाव, एमजीएम, हडको आदी १६ ठिकाणी छापे टाकून वाळूचे साठे जप्त केले. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमध्ये दोन्ही पथकांनी सुमारे पावणेदोनशे ब्रास वाळू जप्त केली असून, या वाळूची बाजारात सुमारे ८ लाख रुपये आहे. जप्त करण्यात आलेली वाळू तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली आहे. शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत, मात्र दुसरीकडे वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात आलेला नाही. शहरातील जाधववाडी, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, पडेगाव या भागात अधिक बांधकाम सुरू अाहेत. या परिसरात चोरट्या पद्धतीने वाळू शहरात आणून विक्री करण्यात येत होती.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यांची परवानगी, रॉयल्टी भरल्याच्या पावत्या नसल्याचे आढळले. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी रस्त्यावर अवैध वाळू साठविणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही कारवाई कारवाई सुरू करण्यात आली.

२ पथकांची कारवाई
तहसीलदार रमेश मुंडलोड, नायब तहसीलदार मीना वराडे यांच्या नेतृत्वाखाली २ पथक तयार करण्यात आली. या पथकांमध्ये ८ तलाठी, ४ मंडळ अधिकारी, ६ पोलिस, जेसीबी आणि ३ ट्रक यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तिकडचा तो पल्ला गाठतसे।

$
0
0



'ज्यां ची हृदये झाडांची, त्यांनाच फक्त फुले येतात'. पाडगावकरांचा हा संदेश व सही मी १९७७ साली दहावीत अकोल्याला असताना घेतला. तेथून पुढे माझे आयुष्य पाडगावकरांच्या कवितांनी भारावून गेले. याआधी त्यांच्या कविता क्रमिक पुस्तकांतून शिकल्या होत्या. काही गाणी रेडिओवर ऐकून माहिती होती, पण अकोल्याला त्यांची झालेली प्रत्यक्ष भेट आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. यापूर्वी कविता संग्रह कधी ग्रंथालयातून आणून वाचले नव्हते, ते सुरू झाले. कालांतराने पुढे माझ्या आयुष्यात पाडगावकर प्रत्यक्षात येतील, असे कधी वाटले नव्हते. नंतर मी अमेरिकेला गेलो व स्थायिक झालो. तेथील वास्तव्यात आपण संस्कृतीला मुकतोय असे वाटत असे आणि मग एक दिवस मोठा निर्णय घेतला व भारतात कायमचा परतलो. औरंगाबादला स्थायिक झालो.
एक दिवस डोंबिवलीचे विद्याधर रिसबूड माझ्या घरी आले व मंगेश पाडगावकरांचा कार्यक्रम औरंगाबादला करायचा आहे, त्यासाठी काय करू शकतो याची चर्चा केली. त्या कार्यक्रमाच्या वेळी पाडगावकर माझ्या घरी पहिल्यांदा आले व राहिले. त्याचवेळी पाडगावकरांचा कोजागरीनिमित्त माझ्या घरी कार्यक्रम करायचा असे ठरविले. त्यानुसार २००९ मध्ये पाडगावकर दुसऱ्यांदा घरी आले. हा कार्यक्रम दिवाळीसारखा साजरा करायचा बेत होता. आमच्या घरच्या हिरवळीवर आयोजित केलेली मैफल पावसाच्या शिडकाव्यामुळे घरातील बैठकीत झाली. सर्वांचे अत्तर व मोगऱ्याचे गजरे देऊन स्वागत केले. डॉ. यु. म. पठाण, रा. रं. बोराडे, पं. नाथराव नेरळकर व इतर रसिकांच्या उपस्थितितील या मैफलीची सुरुवात 'यांचं असं का होतं कळत नाही...' या कवितेने झाली. रिसबुडांनी घेतलेली मुलाखत व कविता वाचन उत्तरोत्तर रंगत गेले. 'सांगा कसं जगायचं, श्रावणात घन निळा बरसला...' हे घामाच्या धारात लोकलमध्ये लिहिलेले गाणे, 'गाय जवळ घेते अन वासरू लुचू लागते,' शुक्रतारा व शेवटी सलाम या कवितांनी आम्ही सारे न्हाऊन निघालो. त्यांचे कवितेवरले प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वयाची ऐंशी पार केल्यानंतरही काव्यवाचनातील उत्साह, ताजेपणा पाहता साहित्यिक श्रीमंती काय असते याची प्रचिती मिळाली. एकीकडे कोसळणाऱ्या जलधारा व दुसरीकडे कवितेच्या चांदण्याची आल्हाददायी पखरण. कोजागरीची ती रात्र चांदणे शिंपून गेली. कार्यक्रम संपल्यावर उत्तररात्री रंगलेली मैफल तर मी कधीच विसरू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गप्पांमध्ये माझ्यावर कविता केली. माझा व्यवसाय अमेरिकेतील बांधकाम करणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचे आहे. त्यावर ते म्हणाले...

'...म्हणे देतो
इथुनिया सल्ला।
तिकडचा तो पल्ला गाठतसे।
सल्ला देताना जमिनीवर
असावे पाय।
नशिबी अपाय असू नये।।

या नंतरही ते एकदा दुसऱ्या कार्यक्रमास आले असता परत एकदा आमच्या घरी मुक्काम केला होता. असा त्यांचा सहवास लाभणे, हे आमचे मी भाग्य समजतो. एखाद्या देवाने घरी येऊन आम्हाला प्रसाद दिला, यापेक्षा मी जास्त काय सांगू. आज पाडगावकर आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. ते त्यांच्या अजरामर कलाकृतींनी आपल्यासोबत असतीलच, तरी पण...आज आमच्या देहातील चैतन्याचा, भावस्पर्शाचा, तरल भावनांचा देव निघून गेला आहे. शब्दच संपले, काय लिहिणार...?
- संजीव शेलार,
(उद्योजक, संगीत अभ्यासक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कमाफीत दुजाभाव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळग्रस्त भागातील कायम विनाअनुदानित कॉलेजांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी शासन दरबारी परीक्षा शुल्कमाफीसाठी पात्र नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या निधीचा लेखाजोखा घेतला जात आहे. त्यात या कॉलेजांचा समावेशच करण्यात आलेला नाही. शासन आणि प्रशासनाच्या स्तरावरून अशा प्रकारचा दुजाभाव दुष्काळातग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षाच पाहणारा ठरतो आहे.

शासनाने दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली. त्याला तीन महिने उलटले तरी प्रशासकीय पातळीवर या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अशा प्रकारची शुल्कमाफी देण्यातही दुजाभाव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाला आकडेवारी सादर करण्यासाठी उच्चशिक्षण विभागातर्फे विविध कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची संख्या आणि शुल्काची रक्कम ही माहिती शिक्षण विभागाने मागविली आहे. त्यात फक्त अनुदानित कॉलेजांचाच समावेश करण्यात आला आहे. विनाअनुदानित कॉलेजांना शिक्षण विभागाने माहिती सादर करण्याबाबत पत्र पाठविलेले नाही. अनुदानित कॉलेजांनीही माहिती पाठविण्याबाबत उदासिनता दाखविलेली आहे.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात दुजाभाव केल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. शासनाने या संदर्भात कोणतेही आदेश दिले नसल्याचे उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकारी सांगत आहेत. यामुळे नवा गोंधळ निर्माण झाला आहे. दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पिके हातची गेल्याळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड आहे. अशावेळी हा दुजाभाव विद्यार्थ्यांच्या दुःखावर मीठ चोळणारा ठरतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवाना विभाग वठणीवर!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
किरकोळ त्रुटी दूर न करता महिनोनमहिने बांधकाम परवान्याच्या फायली पालिकेच्या बांधकाम परवाना विभागात पडून राहत होत्या. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या विभागाकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. त्याचा चांगला परिणाम झाला असून, दीड महिन्यांत शिल्लक फायलींची संख्या १० टक्के उरली आहे.
महापालिका हद्दीत कुठलेही बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवाना विभागातून परवानगी घेणे आवश्यक असते. या विभागातून फाइल वेळेवर कधीच क्लिअर होत नसल्याची सर्वसामान्य नागरिकांची ओरड होती. किंबहुना अनेकांना त्याचा अनुभव आला होता. केंद्रेकर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नगर रचना विभागाकडे लक्ष केंद्रित केले होते. पहिल्या दिवशी आढावा घेतला असता तब्बल ३५०० फायली परवान्यासाठी तुंबल्याचे समोर आले होते. किरकोळ त्रुटी, आवश्यक कागदपत्रे नसणे या कारणावरून या फायली थांबवून बांधकाम परवाना दिला गेला नव्हता.
केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात लक्ष देऊन तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते. केंद्रेकरांच्या सूचनेनंतर नगररचना विभाग कामाला लागला. किरकोळ कारणे दाखवून थांबविलेल्या फायली तत्काळ मार्गी लावण्यात आल्या. विशेष म्हणजे बांधकाम परवान्यातून पालिका प्रशासनास महसूलही मिळतो, पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या विभागाबाबत शहरवासीयांमध्ये नाराजी पसरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक उपक्रमांतून नववर्षाचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नववर्षाच्या स्वागताला अवघे जग सजलेले आहे. नववर्षात स्वागताची सर्वाधिक उत्सुकता तरुणाईला आहे. अनेकांनी आपल्या ग्रुपसोबत सेलिब्रेशन करायचा प्लॅन केला तर, काहींनी आपल्या मित्रांसोबत पार्टीचा बेत आखलाय. काहींनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत करण्याचा मानसही व्यक्त केला आहे.

नववर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन काहीशा हटक्या पद्धतीने साजरे करण्याचा तरुणाईचा प्रयत्न असतो. हॉटेल, गार्डन आणि मित्रांना गिफ्ट देत स्वागताचा बेत आखला जातो. कॉलेजांमध्ये बुधवारी दिवसभर स्वागताच्या नियोजनाच्या चर्चा रंगत होत्या. गुरुवारी हॉटेल, गार्डन आणि मॉलमध्ये गर्दी असेल. गिफ्ट खरेदीसह ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यातही तरुणाईचा उत्साह असतो.

नवीन वर्ष साजरे करूच, परंतु सामाजिक भानही जपण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमच्या ग्रुपने परिसरातील गोरगरीब मुलांना खाऊ देण्याचे ठरविले आहे. त्यांनाही नववर्षाच्या स्वागतात सहभागी करून घेेऊ.
- ऐश्वर्या सालकटे

नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्याचा प्रत्येकाचा मानस असतोच. आता सामाजिक उपक्रमातून साजरा करू.
- सूरज वागोली

नवीन वर्षाचे स्वागत गरजवंतांना पुस्तके देण्याचे आम्ही ठरविलेले आहे. मित्रांचेही प्लॅन विचारत घेतले जात आहेत. पुस्तक वाटपाबरोबर अन्य सामाजिक उपक्रमाबाबतही आम्ही विचार करीत आहोत.
- किरण पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅरिबॅग जप्ती मोहीम तीव्र

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका कार्यक्षेत्रात कॅरिबॅग बंदीची मोहीम पालिका प्रशासन प्रभावीपणे राबवित आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी प्लास्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. शहानूरमियां दर्गा चौकातील फळांच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली.
वॉर्ड ई कार्यक्षेत्रात बुधवारी पालिकेच्या पथकाने तपासणी केली. त्यात कासम दादाभाई ठेकिया, (एक किलो प्लास्टिक), संतलाल मुरलीधर अग्रवाल (दोन किलो १९ ग्रॅम), सुमेशसिंग राजपुरोहित (तीन किलो), कारभारी लोहकरे (साडेतीन किलो), वहाब कुरेशी (२०० ग्रॅम), नरेंद्र शेट्टी (६८ किलो) यांच्याकडे प्लास्टिक आढळून आले. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अन्य एका पथकाने बुधवारी शहानूरमियां दर्गा चौक येथे कारवाई केली. शेख शरीफ हे फळविक्री करताना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगमध्ये ग्राहकांना फळे देत होते. त्यांना कॅरिबॅग मागितली असता मालक अजीमभाई बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.
तपासणी पथकातील स्वच्छता निरीक्षक खांदेवाले, अशोक साबळे यांनी तपासणी केली असता दोन बंडल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. या विक्रेत्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. वॉर्ड ब अंतर्गत शेख शाहरुख शेख मकसूद (५०० ग्रॅम), शेख इरफान शेख सलीम (४०० ग्रॅम), राजू घागरे (एक किलो), सुनील जाधव (६०० ग्रॅम), प्रकाश पाटील (५ किलो), बालाजी हॉट चिप्स (५०० ग्रॅम), जुनेद कुरेशी (४०० ग्रॅम), आनंद स्वीट सेंटर (६०० ग्रॅम), गुरुकृपा स्वीट सेंटर (९०० ग्रॅम), शीतल बीअर शॉपी (१०.६०० ग्रॅम) प्लास्टिक कॅरिबॅग बाळगल्याबद्दल कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ बिल्डरांवर होणार कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कराची वसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आग्रही असलेल्या आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या बिल्डरांची यादी नगर रचना विभागाकडून मागविली आहे. अशा बिल्डरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
केंद्रेकरांनी पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक घर, व्यावसायिक प्रतिष्ठान यांच्याकडून नियमानुसार करवसुली झाली पाहिजे. ज्या मालमत्ता नोंद झालेल्या नाहीत, अशांच्या नोंदी करा, जिथे चुकीचा कर लादला गेला आहे तिथे पुन्हा तपासणी करून संबंधिताला न्याय द्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फिरून मालमत्ता कराची वसुली मोहीम तपासली पाहिजे असे आदेश केंद्रेकरांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी कामाला लागले आहेत. शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडीच तास चाललेल्या बैठकीत केंद्रेकरांनी १०० टक्के वसुलीवर भर दिला होता. गेल्या वर्षी १५३ कोटींची वसुली झाली होती. मात्र, आजही अनेक मालमत्तांची पालिकेकडे नोंद नाही. त्यामुळे ते करापासून वंचित राहिले आहेत. अशा इमारती शोधण्याचे आदेश केंद्रेकरांनी दिले आहेत. दरम्यान यंदा ज्या पद्धतीने वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार २५० कोटीपर्यंत मालमत्ता कर वसुली होण्याची चिन्हे आहेत. अनेक बिल्डरांकडून भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तांना कर लागलेला नाही. पालिकेचा बुडणारा महसूल मिळविण्यासाठी केंद्रेकरांनी अशा फायली त्यांच्याकडे मागविल्या आहेत. वर्षानुवर्षे भोगवटा प्रमाणपत्र न घेणाऱ्या बिल्डरांविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

$
0
0

औरंगाबाद : वसतिगृहातील प्रलंबित प्रवेश प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा, शैक्षणिक साहित्यासह मूलभूत सुविधा पुरवा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या झेंड्याखाली आदिवासी विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.

अर्ज करूनही सुमारे ३५० मुले आणि ९४ मुलींना आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश देण्यात आलेला नाही, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी सोमवारपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. पाच विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, त्यापैकी एकाची प्रकृती खालवल्याने त्याला मंगळवारी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया योग्यरितीने हाताळण्यात आली नाही, असा आरोप करत आंदोलकांनी दोषी गृहप्रमुख, सहकारी गृहपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

अधिकाऱ्यांनी बुधवारी आंदोलकांशी चर्चा केली, मात्र यात ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष आदिनाथ टिपरे यांनी व्यक्त केला. सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना तत्काळ वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा, आदिवासी मुलांसाठी एक हजार व मुलींसाठी ५०० क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्यात यावे, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याचे वाळवंट होईल : डॉ. चव्हाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सततच्या दुष्काळामुळे मराठवाडा होरपळतो आहे. निसर्गाचा कोप असतानाही मराठवाड्यासाठीच्या पाणी वाटपातही न्याय मिळालेला नाही. असे असताना जलसंवर्धनाचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास मराठवाड्याचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असे मत सेंट्रल फॉर रुरल वेल्फेअरचे डॉ. सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जलफेरभरणावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे होते. व्यासपीठावर डॉ. माधव कोटस्थाने, एस. ए. रेणापुरे, डॉ. नारायण बोराडे, के. के. मराठे, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. सुहास मोराळे, रासेयोचे समनव्यक डॉ. राजेश करपे यांची उपस्थिती होती. डॉ. चव्हाण म्हणाले,'डॉ. राजेंद्रसिंह यांचा पॅटर्न वापरून जल संवर्धनाचे काम मराठवाड्यात व्हायला हवे.' कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले,'नैसर्गिक वरदान लाभलेल्या विद्यापीठ परिसरात पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यात येईल. स्वयंसेवी संस्था, सीएमआयएच्या माध्यमातून विहीर फेरभरण, तलाव निर्मिती, वृक्ष संवर्धन आदी उपक्रम राबविण्यात येतील. यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यापीठास सहकार्य करावे.'

प्रास्ताविकता डॉ. करपे यांनी ३२ हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्यात येईल, असे सांगितले. विद्यापीठात जलफेरभरण अभियान राबविण्यात येणार आह. त्याच्या तयारीसाठी स्वयंसेवी संस्था व राष्ट्रीय सेवा योजना गट समन्वयक, कार्यक्रमाधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. पुरुषोत्तम देशमुख सूत्रसंचालकन केले. डॉ. विकास देशमुख यांनी आभार मानले. यावेळी डॉ. टी. आर. पाटील, डॉ. गनी पटेल, डॉ. संदीप पाटील, डॉ. उषा माने, डॉ. शरद गावंडे, डॉ. हंसराज जाधव आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहिष्णुतेचा सवाल अन् वैचारिक दिवाळखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी आम्ही आयुष्यभर हातामध्ये लेखणी धरली, आमच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला, आमची मात्र गोळ्या घालून हत्या झाली. दादरीत दंगल घडते, अनेक साहित्यिक पुस्कार परत करता, खाण्या-पिण्यावर बंदी येते. यानंतरही पंतप्रधान शब्द व्यक्त करत नाहीत ही कोणती सहिष्णुता, असा सवाल तरुण वक्त्यांनी केला. त्यालाही तेवढेच जोरदार प्रत्युत्तर देत विचारांचा विरोध विचारांनीच व्हायला हवा, पुरस्कार परत करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी म्हणावी लागेल, असे मतही याच तरुणाईने मांडले. निमित्त होते देवगिरी महाविद्यालयातील वादविवाद स्पर्धेचे.

देवगिरी महाविद्यालयात आयोजित विनायकराव पाटील स्मृतीसमारोहात राज्यस्तरीय स्पर्धेत बुधवार गाजला तो वादविवाद स्पर्धेने. 'असहिष्णुतेचा विषाणू भारतीय नागरिकांच्या मनात घर करते आहे की नाही' या विषयावर मांडणी करताना तरुणाईने आपली परखड मते मांडली. साहित्यिक पुरस्कार परत करतात आणि केवळ आपली पत्नीच्या भावना मांडण्यासाठी गेलेल्या अमीर खानवर आगपाखड केली जाते. विचारांच्या मुळांशी न जाता अशाप्रकारचा विरोधी ही देखील एक प्रकारची असहिष्णुताच आहे, असे मत स्पर्धकांनी मांडले. दादरीचा प्रकार घडतो, पुरस्कारांची वापसी होते, खाण्या-पिण्यावर बंदी येते आणि यानंतरही आपले पंतप्रधान 'स्मार्ट इंडिया, सेफ इंडिया, क्निल इंडिया'चे नारे देतात हे पटण्यासारखे आहे का? असा सवालही स्पर्धकांनी उपस्थित केला.

देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत देशात अहिष्णुता केव्हा नव्हती, असे मांडत असहिष्णुतेबाबत केवळ वावड्या उठविल्या जात अाहेत. पुरस्कार परत करणे म्हणजे एक प्रकारे बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल, असे प्रत्युत्तर विद्यार्थ्यांनी दिले. स्पर्धेत राज्यभरातील विविध कॉलेजांमधील चाळीस संघांनी यात सहभाग नोंदविला. आपल्या बाजू मांडताना स्पर्धकांनी विविध उदाहरणे, जुने संदर्भ देत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यालय उघडताच शिक्षण आयुक्त दारात!

$
0
0

औरंगाबाद : कामकाज सुरू होण्याची वेळ आणि चक्क शिक्षण आयुक्त ऑफिसच्या भेटीला... त्यामुळे कशी भंबेरी उडते याचा अनुभव शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची बुधवारी घेतला. आयुक्तांनी कामकाजाचा आढावा घेतला, ते कार्यालयात असेपर्यंत कर्मचारी आपआपल्या टेबलावर हजर, आयुक्तांनी काढता पाय घेतला आणि कर्मचाऱ्यांनी जागा सोडली.

शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २३ जुनला औरंगाबाद शहरातील विविध शिक्षण विभागांच्या कार्यालयांना भेटी देत झाडाझडती घेतली. अस्वच्छता, फाइलींचे ढिगारे, प्रलंबित कामे, संगणीकरणाच्या युगात फाइल अस्ताव्यस्त पडलेल्या पाहून नाराजी व्यक्त केली होती. यानंतरही त्यांनी अचानक भेट दिली. आज पुन्हा त्यांनी सकाळीच उपसंचालक कार्यालयाला भेट दिली. २३ डिसेंबर रोजी त्यांच्या भेटीचे नियोजन होते, पण त्यावेळी ते आलेच नव्हते. आयुक्तांच्या भेटीची पूर्वकल्पना नसल्याने अधिकारी, कर्मचारी थोडावेळ भांबावले. उपस्थित नसलेल्यांना सूचना गेल्या. ते तातडीने कार्यालयात आले. शिक्षणाधिकाऱ्यांनीही थोड्यावेळाने उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. आयुक्तांनी उपसंचालकांच्या कार्यालयात बैठक घेत विभागातील कामांचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणात घोषणांचेच ‘धडे’

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com

शिक्षण क्षेत्रात हे वर्ष फक्त घोषणांचे ठरले. देशपातळीवर कॉलेजांची नवीन रँकिंग पद्धती, शाळांसाठीची 'सरल' प्रणाली, केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरती, कॉलेजांची तपासणी या घोषणांमुळे चलबिचल झाली. रखडलेले विधी विद्यापीठ, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, विद्यापीठातील बारकोड उत्तरपत्रिकांच्या खरेदीतील अनियमितता, रेंगाळलेला 'पेट'चा प्रश्न, संस्थाचालकांचे आंदोलन, दोन वर्षांचे झालेले बीएड यामुळे शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबद्दल शासनाने जुलैमध्ये घोषणा केली. त्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाला मंजुरी देऊन ओझ्याबद्दल निकष ठरवून देत शाळांना सूचना करण्यात आल्या, परंतु ही घोषणाही कागदापुरतीच ठरली आहे. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी झालेले नाही. 'सरल' प्रणालीत विद्यार्थ्यांना आधारकार्डसोबत जोडण्यात येत असून, शिक्षकांची माहिती ऑनलाइन भरण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट होणार आहे. यावर्षी वंचित व दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेशाचा गोंधळ यंदा कोर्टात पोहचला. त्यानंतरही शासनाच्या उपाययोजना तोडक्या पडल्या. यंदापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा निर्णय घेण्यात आला, परंतु ठरवलेले वेळापत्रक कोलमडले. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या कमतरतेमुळे शाळा व्यवस्थापनांना कसरत करावी लागली. सरत्या वर्षात शासनाने पूर्वप्रथमिक, प्राथमिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने सुसूत्रता आली आहे. शिक्षण विभागाने ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. त्यावर सामाजिक संस्थांचा आक्षेप आल्याने ही मोहीम यावर्षी बासनात गुंडाळली गेली. राज्यात यंदा सलग पाचव्या वर्षी शिक्षक भरतीची प्रक्रिया झाली नाही.

देशभरातील विद्यापीठे व कॉलेजांना रँकिंग देण्याचा निर्णय केंद्रस्तरावर घेण्यात आला. वर्षाच्या सरत्या शेवटी घेण्यात आलेला हा निर्णय उच्चशिक्षणासाठी समाधानकारक असल्याचे बोलले जाते. देशभरातील कॉलेजांमध्ये गुणवत्तेवर स्पर्धा होणार आहे. राज्यात तंत्रशास्त्र विद्यापीठाची घोषणा व मंजुरीला दोन वर्षे उलटूनही स्थापनेचे घोंगडे भिजत पडलले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला वर्षभरात प्रशासनाला पूर्णवेळ एकही अधिकारी नेमता आलेला नाही.

शैक्षणिक संस्थांमध्ये भरती शासनस्तरावरून केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर करून वाहवा मिळविली. लाखो डीटीएड, बीएड, नेट-सेटधारकांना दिलासा देणाऱ्या या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. सर्व अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमधील भौतिक सुविधांची तपासणी यावर्षीही करण्यात आली. पण हा अहवाल प्रशासकीय कार्यालयांपुरताच मर्यादित राहिला आहे.

दहावीची फेरपरीक्षा

दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी निकालानंतर लगेच महिनाभरात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार दहावीची परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये पेरपरीक्षा घेण्यात आली.

'एसपीए'ची कागदावरच

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसाठी औरंगाबादला पूरक वातावरण व नागरिकांची मागणी असताना शासनाला नागपूर प्रेम आठवले. त्या बदल्यात औरंगाबादला स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरची (एसपीए) घोषणा मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर २०१४ मध्ये हिवाळी अधिवेशनात केली. परंतु या संस्थेची वर्षभरात कोणतीच प्रक्रिया झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवी ऊर्जा देणारे वर्ष

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

वाळूज महानगरामधील विविध विकास कामे, हज हाऊस, वंदे मातरम् सभागृहाच्या कामाला मिळालेली गती, जालना येथे एक हजार हेक्टरवर नवीन शहर उभारणी प्रक्रियेला मिळालेली गती या वर्षभरातील जमेच्या बाजू आहेत. परंतु, झालरक्षेत्र विकास यावर्षीही मार्गी लागला नाही.

औरंगाबाद शहराच्या वाटचालीत सिडकोची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सिडकोने नवीन औरंगाबाद हे शहर वसवल्यामुळे आजवर घरांचा प्रश्न तीव्र झाला नव्हता. भविष्याचा अंदाज घेऊन सिडकोने सुमारे २० वर्षांपूर्वी वाळूज महानगराची सुरुवात केली, परंतु नंतरच्या काळात त्याकडे दुर्लक्ष केल्याने तेथे अद्यापही सुसज्ज शहर वसलेले नाही, परंतु गेल्या वर्षभरात वाळूज महानगरमधील तिन्ही नगरांमध्ये एक एक पाऊल पुढे पडत आहे. पायाभूत सुविधांसोबतच नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण मिळाले याकरिता यावर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या पुढाकाराने 'क्लिन अँड ग्रीन वाळूज महानगर' यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकसहभागातून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, उद्यान विकास आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्रेकर प्रत्येक कामाचा आढावा घेत असल्याने सकारात्मक परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वाळूज महानगरमध्ये यावर्षी रस्त्यांचे डांबरीकरण, पथदिवे लावणे ही कामे करण्यात आली. घनकचरा निर्मूलनाकरिता घंटागाडी, ओला-सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प हे उपक्रम राबवले आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणारे खत उद्यानात वापरले जाते. वाळूज प्रकल्पाचा मंजूर विकास आराखडा सुधारित करण्यात आला आहे. वाळूज महानगर ३ चे भूसंपादन पोटहिस्से निश्चित करून केले जाणार असून शेतकरी व जमीनधारकांच्या सहमतीने हा प्रकल्प आकारास येणार आहे.

जालना येथे एक हजार हेक्टरवर नवीन शहर उभारणी प्रकल्पाला सिडकोच्या मंडळाने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नवीन परतूर शहर वसवण्यासाठी सध्या सर्वेक्षण केले जात आहे.

अनाधिकृत बांधकामांवर कारवाई

औरंगाबादलगतच्या बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, पिसादेवी, गोपाळपूर, कृष्णापूर, तुळजापूर यासह २८ महसुली गावांचे झालरक्षेत्र विकसित करण्यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या क्षेत्रात कोणतेही विकास काम करण्यासाठी सिडकोची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. पण अनेक विकसकांनी सिडकोला धुडकावून लावले आहे. परवानगी न घेता केलेली अनधिकृत बांधकामे, रेखांकन करणाऱ्या विकसकांविरुद्ध सिडकोने यावर्षी धडक कारवाई केली. सिडकोकडून ५ विकसकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, अनेक बांधकाम, रेखाकंने काढून टाकण्यात आली. सिडकोच्या स्वतःच्या जागांवर झालेली अतिक्रमणे काढण्यात आली. यातून सुमारे ६० कोटी रुपयांची मालमत्तांना सरंक्षण मिळाले आहे.

स्मारक उभारणीची जबाबदारी

किलेअर्क येथील नियोजित हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह उभारण्याची जबाबदारी शासनाने सिडकोवर टाकली आहे. वंदे मातरम् सभागृहासाठी अंदाजे २४ कोटी रुपये तर, हज हाऊससाठी २९ कोटी ८८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याची जबाबदारी शासनाने सोपवली आहे. सल्लागर नेमणे, आराखडा तयार करणे आदी कामे सध्या करण्यात येत आहेत.

झालरक्षेत्र प्रलंबित

औरंगाबाद शहरालगत निर्माण करण्यात आलेल्या झालरक्षेत्रातील गावांचा विकास आराखडा सिडकोने शासनाकडे गेल्यावर्षीच सादर केला आहे. या प्रारूप आराखड्याला राज्य शासनाने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे झालरक्षेत्रातील विकास खोळंबला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी वाढवला लौकिक

$
0
0

पृथा वीर

मावळत्या वर्षात मराठवाड्यातील युवती व महिलांनी आपापल्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ११३ पैकी ५७ वॉर्डाच्या नगरसेवक महिला आहेत. नेतृत्व परिवर्तनाची नांदीच ठरले.

व्हॉलीबॉलपटू व क्रीडा प्रशिक्षक मनीषा वाघमारे यांनी सात खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याची मोहीम यंदापासून सुरू केली. मुलींचे शिक्षण व संकल्पनेचा प्रचार करण्याकरता त्यांनी रशियात असलेले युरोप खंडातील १८ हजार ७०० फुट उंचीवरचे सर्वांत उंच शिखर माउंट एलब्रस सर केले. राज्यातील फक्त दोन गिर्यारोहकांपैकी मनीषा या एक होत्या. यानंतर आफ्रिका खंडातील टांझनिया व केनिया यांच्या सीमेवरील १८ हजार ९२० फूट उंचीचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या त्या एकमेव गिर्यारोहक ठरल्या. मुसळधार पाऊस सुरू असताना त्यांनी बारा दिवसांची मोहीम अवघ्या सहा दिवसांत फत्ते केली.

अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण करणाऱ्या मसणजोगी समाजातील नांदेड येथील कल्पना कोळी यांनी समाजाला दखल घेण्यास भाग पाडले. मसणजोगी समाजातील त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांतूनही पहिली डॉक्टर होण्याचा मान

त्यांना मिळाला.

औरंगाबाद जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी व भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीच्या प्राचार्य अशी दोन पदे सांभाळणाऱ्या सीमा बानो नजीर पटेल यांनी प्रशासकीय सेवेत नवी ओळख मिळवली. त्या वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व या पदावरील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या.

संपूर्ण महाराष्ट्रात वफ्फच्या मालमत्ता असून औरंगाबादमध्ये राज्याचे मुख्य कार्यालय आहे. एका महिलेला या पदावर काम करणे आव्हानात्मक असले तरी दिशादर्शक नक्कीच ठरू शकते.

साहित्य विश्वाची दखल

वैविध्यपूर्ण लिखाणाने साहित्य क्षेत्रात रेखा बैजल यांनी वेगळी ओळख निर्माण केली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या दुसऱ्या मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या बैजल यांनी यंदाही आपल्या लिखाणाने लक्ष वेधले. नुकतीच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नव्या २७ सदस्यांमध्ये रेखा बैजल यांचीही निवड झाली आहे.

नवेली देशमुख हिने 'मिस दिवा २०१५' स्पर्धेत 'रनर अप' तृतीय विजेतेपदाचा मान पटकावला. स्पर्धेच्या ६४ वर्षांच्या इतिहासात औरंगाबादचे प्रतिनिधित्व करणारी ही पहिलीच स्पर्धक. या 'स्मॉल टाउन गर्ल'ने देशाला औरंगाबादची ओळख करून दिलीच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन विभागामुळे प्रतिमा मलीन

$
0
0

Makrand.Kulkarni@timesgroup.com

राज्यातील जिल्हा परिषदांच्या तुलनेत औरंगाबाद झेडपीत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. त्याचा केंद्रबिंदू सिंचन विभाग असल्याचे पंचायत राज समितीच्या दौऱ्यानंतर समितीने जाहीर केले. सत्ताधारी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्याविरोधात सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येऊन जाहीर नाराजी व्यक्त केली. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी कारभाऱ्यांची मानसिकता अजूनही दुसरीकडेच असल्याचे विदारक चित्र जिल्हा परिषदेत वर्षभर दिसून आले.

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातील गैरप्रकारांची मालिका २०१५ मध्येही सुरूच होती. गेली दोन वर्षे नियमबाह्य पद्धतीने कोल्हापुरी बंधारे, लघुपाटबंधारेची कामे वाटली गेली. त्याला प्रशासनाची मान्यता नव्हती, की वित्त विभागाचा हिरवा कंदिल. तब्बल १५ कोटींची ही कामे होती. झेडपीने नेमलेल्या समितीच्या अहवालात हे नमूद केले गेले. हा अहवाल सर्वसाधारण सभेने फेटाळला तरी त्यातील तथ्य नाकारून चालणार नाही. हा बोध घेऊन चालू वर्षात एकही नवीन प्रस्ताव मंजूर केला गेला नाही. जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी भीषण दुष्काळ पडला आहे. अशा परिस्थितीत सिंचनाची कामे हाती घेऊन नियोजन झाले असते तर, त्याचा पुढच्या पावसाळ्यात निश्चितपणे फायदा झाला असता.

समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही विभागांचे बजेट कमी करू नये, असे राज्य सरकारचे आदेश आहेत. संबंधित विभागांकडून प्रस्ताव मागविले गेले. पण आपापल्या पक्षाचे प्रस्ताव जास्तीत जास्त संख्येने यावेत असा आग्रह धरला गेल्याने वर्षभर एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. प्रशासनानेही यात बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे लाभार्थी मात्र वंचित राहिले. दीड वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील. त्यापूर्वी मतदार राजा खूष करण्यासाठी सदस्यांची धडपड सुरू झाली आहे. ती कितपत यशस्वी होते हे काळच सांगणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरात फारशी समाधानकारक कामगिरी केली नसली तरी कुठे अव्यवस्था झाल्याचे उदाहरण नाही. वर्षाच्या सुरवातीला सीइओ डॉ. अभिजित चौधरी यांनी जवळपास ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक वेतनवाढ मुख्यालयी राहत नसल्याच्या कारणावरून रोखली होती. पण त्यानंतर काहीच कारवाई झालेली नाही. विभागाच्या दृष्टीने एक भूषणावह बाब म्हणजे फुलंब्री तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांना यंदा आयएसओ मानांकन मिळाले.

शिक्षण विभागात गुरुजींचे छोटे मोठे प्रश्न यंदाही प्रलंबित राहिले. शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत प्रशासनाने त्यांचे प्रशासकीय काम काढून घेतले होते. कालांतराने त्यांची बदली झाली. त्यांच्याजागी अद्याप कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी शासनाने धाडलेला नाही. एम. के. देशमुख यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. देशमुखांना दीर्घ अनुभव असल्याने त्यांनी प्रशासकीय घडी बसविली. त्यानंतर राज्य सरकारच्या रचनावादी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू केली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध बंड

अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्याविरोधात सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येऊन बंड पुकारले होते. शिवसेनेचे सदस्य सुरवातीला आक्रमक होते पण नंतर विरोध मावळला. महिला सदस्यांनी मात्र वर्षभरात दोन वेळा आंदोलन केले. एकदा मार्चच्या सर्वसाधारण सभेत महिला सदस्यांना बोलू दिले जात नाही, त्यांचे प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत यावरून सर्वपक्षीय महिला सदस्य एकत्र आल्या होत्या. २२ डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेपूर्वी शिवसेनेच्या महिला सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॉफीमधून गुंगीचे औषध देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना जयसिंगपुरा भागात घडली. या प्रकरणी अभिषेक पांडे विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी अभिषेक सुभाष पांडे (रा. जयसिंगपुरा) याचे किराणा सामानाचे दुकान आहे. इंदोर येथील ३९ वर्षांची महिला जयसिंगपुरा परिसरात राहते. अभिषेक या महिलेच्या घरी किराणा मालाचे पैसे आणण्याच्या निमित्ताने ५ जून २०१५ रोजी गेला होता. त्याने महिलेला कॉफी करायला सांगितली. कॉफी आणल्यानंतर तिला पाणी आणण्यासाठी परत पाठवत कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळले. कॉफी पिल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करत व्हिडिओ क्लीप तयार केली. तो ही क्लीप फेसबुक व व्हॉटस अॅपवर टाकण्याची धमकी देत असे. हा प्रकार पतीला सांगू अशी धमकी देत त्याने महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकाराला कंटाळलेल्या महिलेने मंगळवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून अभिषेक विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांनो सावधान; गाठ पोलिसांशी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
थर्टी फर्स्टसाठी पार्टीचे आयोजन केले असेल, तर आत्ताच सांभाळून राहा. मद्यधुंद होऊन गाडी चालवली, कुणाशी हुज्जत घातली, रस्त्यावर राडा केला, तर तुमची गाठ पडेल थेट पोलिसांशी. याचा परिणाम म्हणून थेट तुरुंगात रवानगी होऊ शकते. तळीरामांना काबूत आणण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गस्त वाढण्यात आली असून फिरत्या पथकासह जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अघटित घटना होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील पोलिस दक्ष झाले आहेत. जल्लोष साजरा करताना अनेक महाभागांच्या पाटर्या पहाटेपर्यंत सुरू असतात. मद्यप्राशन करून वेगवान वाहन चालविणे, दारूच्या नशेत हाणामाऱ्या करणे असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा विरोधी पथक, दहशतवाद विरोधी सेल, विशेष पथकासह स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी खास लक्ष ठेवणार आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र ३१ डिसेंबरच्या रात्री दारूड्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरसह जवळपास सहाशेहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अती मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले.
विनापरवाना पार्ट्या आणि बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा विशेष पथके तैनात केली आहेत, अशी माहिती विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली. मागणी जास्त असल्याने या काळात अवैध दारूसह बनावट दारूची तस्करी होऊ शकते, ही बाब लक्षात घेत विभागाने जिल्ह्यात करडी नजर ठेवली असून त्यासाठी सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. भरारी पथकासह या विशेष पथकाची गस्त वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
---
परमिट रुम पहाटेपर्यंत खुले
---
थर्टी फर्स्टनिमित्त बिअर बार व परमिट रूम पहाटे पाचपर्यंत खुली राहणार आहेत. वाइन शॉप, बिअर शॉप तसेच कंट्री लिकर्सच्या दुकानांचे शटर रात्री एक वाजता बंद होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images