Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

छावणीत हजार घरांचे अतिक्रमण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद छावणी परिसरात सुमारे एक हजार घरांचे आणि दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांत सातही नगरसेवकांचाही समावेश असून, आता छावणी परिषद याबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

छावणी युवा विकास मंचचे अध्यक्ष मयंक पांडे यांनी सांगितले की, औरंगाबाद छावणी बोर्डाच्या स्थापनेला सुमारे साठ वर्षे झाली आहेत. या काळात छावणीची लोकसंख्याही तिपटीने वाढली. दुकान, घर, हॉस्पिटल, रेस्तराँ, हॉटेल्स अशी विविध अतिक्रमणे वाढली असून, त्यांची संख्या आता हजारापर्यंत पोहचली आहे. गेल्या २५ वर्षांत सत्तेत असलेल्यांचीच अतिक्रमणे अधिक असून, त्यांना विविध ठिकाणी बांधकामांच्या परवानग्याही देण्यात आल्या. आज छावणीत सात नगरसेवक अाहेत. त्यांच्या अतिक्रमणांना अभय देण्यात आले आहे.

अतिक्रमणात सर्वाधिक अतिक्रमणे वॉर्ड १ आणि ४मध्ये आहेत. ५ आणि ६ नंबरच्या वॉर्डांतील पेन्शनपुरा आणि गड्डीगुडम येथेही अतिक्रमण अधिक असून, त्यांनाही छावणी परिषदेने अभय दिले आहे. शांतीपुरा, गवळीपुरा या भागातील अतिक्रमणांमध्ये घरांची अतिक्रमणांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. कर्णपुरा वॉर्ड नंबर ७मध्ये नगरसेवकांच्याच शेतीवरील अतिक्रमण असल्याचे मयंक पांडे यांनी सांगितले.

एक एफएसआय असताना तीन मजली इमारती

छावणीत रहिवाशांना एक एफएसआय देण्यात आला आहे. याअंतर्गत तीन-चार मजली इमारती बांधण्याची परवानगी नाही. असे असताना हे बेकायदा बांधकामे करण्यात आली असून, उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांच्यासह सातही नगरसेवक यात सामील असल्याचा दावा मयंक पांडे यांनी केला.

छावणी मंच, नगरसेवकांचे परस्परांवर आरोप
२००७ मध्ये छावणीत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. यानंतर ही मोहीम राबवण्यातच आली नाही. यामुळे अतिक्रमण वाढले आहे. छावणी युवा मंच आणि छावणी परिषदेसह नगरसेवकांचे आपसातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. अतिक्रमणच्या नावाखाली येथे चिखलफेक सुरू आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. युवामंच आणि नगरसेवक एकमेकांवर आरोप करत असून, त्यामुळे छावणीचे वातावरण बिघडत आहे.

आमची अतिक्रमणे नाहीत हॉटेल्स व दुकानांची अतिक्रमणे आम्ही स्वत:हून काढली आहेत. छावणी परिषदेला आम्ही तसे कळवलेही आहे. घरांचे अतिक्रमणे नाहीत. मंचाचे पदाधिकारी आमच्याविरोधात बोलताय, पण त्यांचे स्वत:चे अतिक्रमण मोठे आहे. त्याविषयी ते का बोलत नाहीत.

- किशोर कच्छवाह, उपाध्यक्ष छावणी परिषद

छावणीतील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबविणार असून, कोणालाही अभय दिले जाणार नाही. याकामी गरज पडल्यास पोलिस आयुक्तांची मदतही घेतली जाईल. या कारवाईदरम्यान वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येईल.

- पूजा पलिचा, सीईओ छावणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौका-चौकांत वाहतूक कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या क्रांतिचौक - रेल्वे स्टेशन रस्त्याच्या व्यथा तीन वर्षे उलटून गेली तरी संपलेल्या नाहीत. रस्ता रुंदीकरण, दुभाजक करून पूर्णपणे तयार झालेल्या रस्त्यावरील अडथळे मात्र अजून हटलेले नाहीत. वाहतुकीच्या सोयीसाठी दुभाजक बंद करण्यात आले, पण नको त्या ठिकाणी गतीरोधक अजूनही ठेवण्यात आलेले आहेत. शिवाय प्रमुख चौकांमध्ये सिग्नल नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर उस्मानपुऱ्याचा चौक आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा चौक मोठा झाला आहे. महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाळूजकडे जाणारी जडवाहतूक या रस्त्यावरून महिनाभरापासून वळविण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. क्रांतिचौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने सुसाट वेगाने धावतात. त्याचवेळी उलट दिशेकडून येणारी वाहनेही वेगात येतात. चौकात सिग्नल, वाहतूक पोलिस दोन्ही नसल्याने पुढे जाण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. अगदी सकाळी नऊपासून या चौकात वाहतुकीची कोंडी होते. अशीच परिस्थिती पद्मपुरा चौकात असते. देवगिरी कॉलेजकडून; तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आणि कोकणवाडी अशा तीन रस्त्यांवरून येणारी वाहने त्यात क्रांतिचौक, रेल्वे स्टेशन मार्गावरील वाहतुकीची या चौकात कोंडी होते. या चौकातील सिग्नलही गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचारीही नाहीत. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.

या रस्त्यावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चेलीपुरा हायस्कूल आणि पद्मपुरा चौक, बन्सीलाल नगर या चार ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले होते. या भागातील गर्दी पाहून त्यावेळी गतिरोधकाचा निर्णय झाला, पण आता या रस्त्यावरील सर्व दुभाजक बंद करण्यात आले. उस्मानपुरा चौकातून थेट पदमपुरा चौकापर्यंत सलग दुभाजक आहेत. त्यामुळे वाहनधारक वेगाने जातात. पण रस्त्यातील गतिरोधक न हटविल्याने अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. नियोजन करताना आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल करणे आवश्यक आहे, पण तूर्तास तरी नको त्या ठिकाणी गतिरोधक आणि चौकाचौकात वाहतूक कोंडी असे चित्र क्रांतिचौक - रेल्वे स्टेशन रस्त्यावर दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपी निवेदिता कुलकर्णीची घरझडती

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

३५ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपी निवेदिता कुलकर्णीच्या पुणे येथील फ्लॅटची आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी घरझडती घेतली. यामध्ये आरबीआयचा लोगो असलेले मुद्रांक, चेकबुक, लोगो व डायरी पोलिसांनी जप्त केली.

रिझर्व्ह बँकेच्या एनआरआय रिलीज फंडात रक्कम गुंतवण्याचे आमिष दाखवत व्यवसायिकाला ३५ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीचे सूत्रधार निवेदिता कुलकर्णी व विश्वनाथ अवचट यांना आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली असून आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. रविवारी निवेदिता कुलकर्णी यांच्या पुण्यातील अंबल ओढा परिसरातील अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळील ११३ क्रमांकाच्या फ्लॅटची पोलिसांनी झडती घेतली. यामध्ये पोलिसांना रिझर्व्ह बँकेचा लोगो असलेले मुद्रांक, चेकबुक व डायरी हस्तगत करण्यात आली. पीएसआय सुभाष खंडागळे व पथकाने ही कारवाई केली.

डायरीत नावे व रकमांचा उल्लेख

पोलिसांनी निवेदिता कुलकर्णी यांच्या घरातून जप्त केलेल्या डायरीमध्ये अनेक महत्त्त्वपूर्ण नोंदी आहेत. काही जणांची नावे देखील पोलिसांना आढळली आहेत. ३ कोटी रुपयांपासून ते २० लाखापर्यंतच्या रक्कमांच्या नोंदी यामध्ये आहेत. या टोळीचे १८ दलाल असून त्यांच्यामार्फत ही टोळी गंडा घालत असल्याची माहिती उघड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकराचा ६५ हजारांचा अपहार

0
0

औरंगाबाद : संगणकाच्या नोंदीमध्ये फेरफार करीत नोकराने ६५ हजारांचा अपहार केल्याचा प्रकार समर्थनगर येथील मित्तल ऑप्टिकल येथे घडला. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश राधेशाम मित्तल (वय ३७ रा. औरंगपुरा) यांचे समर्थनगर येथे मित्तल ऑप्टिकल हे चष्म्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे अनिल विठ्ठलराव सरकटे (रा. समगा ता. हिंगोली, सध्या रा. नारळीबाग) हा नोकर कामाला आहे. अनिलकडे संगणकावर नोंदी करण्याचे काम आहे. गेल्या दीड वर्षापासून अनिलने हिशेबच्या नोंदी करताना त्यामध्ये फेरफार करीत होता. यामध्ये त्याने ६५ हजारांचा अपहार केला. नुकताच हा प्रकार मित्तल यांच्या निदर्शनास आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनिलविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजारांच्या खंडणीची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रो हाउसमध्ये दुसरा भाडेकरू ठेवण्यासाठी भाडेकरूने चक्क घरमालकाला दहा हजारांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी दिली नसल्याने तलवार घेऊन घरमालकाला धमकावण्यात आले. शनिवारी सकाळी रामनगर बसस्टॉपवर हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद बसवानी गोकाक (वय ३० रा. विठ्ठलनगर, एन २, सिडको) या तरुणाचे शेंद्रा येथील प्रसन्नापार्क येथे रो हाऊस आहे. या रो हाऊसमध्ये गोकुळ भाऊसाहेब वाघ हा तरुण भाडेकरू म्हणून राहतो. या ठिकाणी दुसऱ्या भाडेकरुंना वाघ राहू देत नव्हता. हा प्रकार आनंदने गोकुळच्या वडिलांना सांगितला होता. या कारणावरून गोकुळने आनंदला शिवीगाळ केली; तसेच भाडेकरू ठेवण्यासाठी दहा हजाराच्या खंडणीची मागणी केली. ही खंडणी दिली नसल्याने गोकुळने आनंदला शनिवारी फोन करून रामनगरच्या रिक्षा स्टँडवर बोलावले. या ठिकाणी शिवीगाळ करीत त्याने काळ्या पिशवीतून तलवार काढत आनंदला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आनंदने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. आरोपी गोकुळ वाघ विरुद्ध पोलिस ठाण्यात खंडणी व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन हजार लुबाडले

दुचाकीस्वाराला अडवून ट्रिपलसीट आलेल्या तरुणांनी तीन हजार रुपये पळविले. रात्री दहा वाजता शिवाजीनगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप नामदेव खाडे (वय ३३ रा. लक्ष्मीनगर, शिवाजीनगर) हा तरुण रात्री क्लासेसचे काम संपवून घरी जात होता. यावेळी पाठीमागून दुचाकी (क्रमांक एमएच २० बीयु १६६०) वर तीन तरुण आले. या तरुणांनी खाडेच्या दुचाकीसमोर त्यांची दुचाकी आडवी लावली. खाली उतरल्यानंतर त्यांनी खाडेला मारहाण करण्यास सुरूवात केली; तसेच दोन आरोपींनी त्याच्या कमरेला मिठी मारून एका आरोपीने शर्टाच्या खिशात ठेवलेले तीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. खाडे यांना शिवीगाळ करीत पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिष दाखवून शोषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षांच्या तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गारखेडा काबरानगर भागात घडला. मुलीच्या कुंटुबीयांनी लग्नाची मागणी केल्यानंतर मुलीवर अॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तिघांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे.

काबरानगर भागात १७ वर्षांची तरुणी आपल्या तीन बहिणी व आईसोबत राहते. हे कुटुंब धुणीभांडी करून उदरनिर्वाह चालविते. या तरुणीच्या घराशेजारी सचिन रामकिसन वाहूळ (वय २७) हा तरुण दोन भाऊ व आईसोबत राहतो. गेल्या सहा महिन्यापासून लग्नाचे आमिष दाखवित सचिनने या तरुणीचे लैंगिक शोषण केले होते. त्याच्या कुटुंबीयांनी देखील त्याला या कामी मदत केली होती. दोन दिवसांपूर्वी या तरुणीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने सचिनला लग्न कधी करणार, या विषयी विचारणा केली होती. यावेळी सचिनने लग्नास नकार देत तिच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली होती.

शनिवारी या प्रकरणी तरुणीच्या आईने जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून आरोपी सचिन, गंगाराम रामकिसन वाहूळ, नाना रामकिसन वाहूळ व त्यांची आई मिनीबाई वाहूळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपी सचिन, गंगाराम व नानाला अटक केली आहे. पीएसआय एम.बी. लाडय या प्रकरणी तपास करीत आहेत.

हल्ल्यापूर्वी अटक

आरोपी सचिन हा एका कंपनीत कंत्राटी कामगार असून विवाहित आहे. त्याच्या पत्नीने यापूर्वी त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीचे कुटुंब पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर वाहूळ कुटुंबाने त्यांच्यावर हल्ला चढवण्याची योजना आखली होती. मात्र, पोलिसांनी त्यापूर्वीच त्यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ वॉर्डांचे काय होणार?

0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com

औरंगाबादः सातारा-देवळाई परिसराचा कारभार नगर पालिकेकडे आला आहे. महापालिका की नगर पालिका या गोंधळात साताऱ्यातील सोयीसुविधांकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. नागरी समस्यांनी त्रासलेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यातच आता वॉर्ड रचना बदलेला का, त्या २५ वॉर्डांचे काय होणारस असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे.

महापालिकेने आपल्याकडील सातारा-वेदळाई परिसराचा कारभार पुन्हा नगर पालिकेला दिला आहे. काही महिने महापालिका आता नगर पालिका यामुळे फुटबॉलसारखी अवस्था झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नव्या बदलानंतर पुढे काय, असा प्रश्न तेथील नागरिकांसमोर उभा आहे. बदल झाले तरी सुविधांकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होते आहे. महापालिकेने आपल्या कार्यकाळात येथील सुविधांकडे पुरते दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील नागरी समस्यांचे चित्र बदलले नाही. वेगाने वाढणाऱ्या या परिसरात रचनात्मक पायाभूत सुविधांची बोंब आहे. यासह नवीन प्रश्नही येथे उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे, त्या वॉर्डाचे काय होणार. दोन ग्रामपंचायतींची एकत्र करत नगर पालिका घोषित करण्यात आली. सातारा- देवळाई नगर पालिकेत २५ वॉर्डांची रचना करण्यात आली होती. त्याचे आरक्षणही जाहीर करण्यात आले होते. आता ही रचना तशीच राहणार की वॉर्ड रचना बदलेल, त्याचे आरक्षण कसे असेल, सुनावणीनंतर लगेच निवडणुकीची तारीख घोषित होतील का, असे प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.

नागरिकांची फरफटच

महापालिकेने सातारा-देवळाई आपल्याकडे असताना आपले कार्यलय थाटले होते. या कार्यालयातून आरोग्य साफसफाई आणि पाणीपुरवठा अशा सुविधांवर लक्ष देण्याबाबत सांगण्यात आले, परंतु या सुविधांबाबत नागरिकांची फरफटच झाली. आता नगर पालिका प्रशासनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’, ‘भूमिगत’साठी निधी उभारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्पन्नवाढीला भरपूर वाव आहे, मात्र याकडे महापालिकेचे लक्षच नाही. महापालिकेने यापुढे स्वत निधी उभा करून समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेचे कामे पूर्ण करावे, असा सल्ला पालकमंत्री रामदास कदम यांनी दिला.

विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पालकमंत्री कदम आज प्रथमच औरंगाबादेत आले. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्राकडून पुढील टप्प्यातील निधी मिळणार नसल्यामुळे समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजना अडचणीत आल्या आहेत. या योजनांची कामे पुढे सुरू ठेवण्यासाठी महापालिकेलाच निधी उभारावा लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार पालिकेला या योजनांसाठी मदत करणार का, यावर पालकमंत्री म्हणाले की, महापालिकेत मालमत्ता कराची वसुली फक्त १८ टक्के आहे. शहरातील जवळपास ६०-६५ टक्के मालमत्तांना अद्याप करच लावला नाही. महापालिकेने करवसुलीवर लक्ष केंद्रित केले तर त्यातून दरवर्षी ५०० ते ६०० कोटी रुपये मिळू शकतील. पालिकेच्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहेत. त्यांचा योग्यरितीने वापर केल्यास मोठा महसूल मिळू शकतो, परंतु त्याकडे कोणी लक्षच देत नाही. योग्य नियोजन झाले तर महापालिकेला कुणासमोरही हात पसरण्याची गरज नाही.

'समांतर'च्या कलाकारावर लक्ष

समांतर जलवाहिनी प्रकल्प हा महापालिकेचा महत्त्वकांक्षी आहे, परंतु त्याचा कराराच चुकीच्या पद्धतीने केला आहे. त्यात खोडा घालणारे दोन कलाकार होते. एकाला मी काही दिवसांपूर्वीच बाजूला केले आहे. आता एक कलाकार बाकी असून, त्याच्यावर माझे बारीक लक्ष असल्याचेही पालकमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता सांगितले.

२ महिन्यांत डीपीसीचे कामे

जिल्हा नियोजन समितीमधून डिसेंबरअखेर ९० कोटी ५५ लाखांचा निधी विविध योजनांवर खर्च झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी ३ महिने शिल्लक असून, या कालावधीत १५२ कोटी खर्च करण्याचे आव्हान आहे. यासंदर्भात दोन दिवसांत मुंबईला बैठक होईल. १५ दिवसांत निविदा आणि मार्चअखेरपर्यंत सर्व कामे होतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणचक्कीच्या हौदात माशांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगप्रसिद्ध पाणचक्कीच्या हौदातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून माशांचा मृत्यू होत आहे. पाणचक्कीच्या हौदात रविवारी सकाळी पाच ते दहा किलो मासे मृतावस्थेत आढळले.

औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक पाणचक्की पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. रविवार च्या सुटीमुळे पर्यटकांची गर्दी होती. पर्यटकांना मोठ्या हौदाच्या बाजुला अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या प्राचीन हौदात मासे मरून पडल्याचे दिसून आले.

पाणचक्की परिसराची देखभाल करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या आणि लहान हौदाचीही स्वच्छता करण्यात आलेली नाही. मोठ्या हौदात आलेले अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी बाजुला दोन छोटे हौद तयार करण्यात आले आहे. या छोट्या हौदात मृत्युमुखी पडलेले मासे तरंगत होते. या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसीमबानो पटेल यांनी पाणचक्कीच्या हौदांची पाहणी केली. त्यांनी या प्रकाराची चौकशी करून हौद स्वच्छ करण्याचे आदेश वक्फ अधिकाऱ्यांना ‌दिले. या ‌हौदातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नैर्सगिक स्त्रोत बंद

पाणचक्कीच्या हौदात नहरीने पाणी पुरवठा केला जातो. नहरीवरील अतिक्रमणे आणि पाण्यासाठी नहर फोडल्याने पाणचक्कीकडे येणारे पाणी बंद झाले आहे. पावसाळ्यातच पाणचक्कीकडे येणारा पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत सुरू असते. पावसाळ्यानंतर उर्वरित आठ महिने मोटरच्या माध्यमातून पाणी पाणचक्कीत मुख्य भिंतीवरून खाली सोडण्यात येते. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत बंद असल्याने उन्हाळ्यात मुख्य हौद रिकामा होतो.

हौदातील पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. छोट्या हौदात पाणी साचून राहिल्याने माशांचा मृत्यू झाला असावा. या प्रकाराची चौकशी केली जाईल. गरज पडल्यास मोठ्या हौदातही टँकरद्वारे पाणी टाकले जाईल. स्वच्छता मोहीम राबविण्याचेही निर्देश दिले आहेत.

- नसीमबानो पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोतेवारचा ताबा ओडिशा पोलिसांकडे

0
0

'डिस्चार्ज' मिळाल्यानंतर उमरगा कोर्टाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये उस्मानाबाद पोलिसांनी अटक केलेल्या 'समृद्ध जीवन'चे सर्वेसर्वा महेश मोतेवारचा ताबा ओडिशा पोलिसांकडे देण्यात आला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयातून 'डिस्चार्ज' मिळाल्यानंतर, उमरगा कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली होती. त्यानंतर त्याचा ताबा ओडिशा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

मुरूम येथील एका डेअरीच्या व्यवहारामध्ये मोतेवारनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असून, त्याला उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली होती. तीन दिवसांची पोलिस कोठडी संपत असतानाच, छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला सोलापूर आणि त्यानंतर पुण्याच्या सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्याची शनिवारी रुग्णालयातून सुटका करण्यात आली आणि त्यानंतर उमरगा कोर्टाने त्याला

१२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ओडिसा पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्यामुळे, तपासासाठी सातत्याने पोलिसांकडून चौकशीसाठी ताबा मागण्यात येत होता. त्यानुसार, उमरगा कोर्टाने ओडिशा पोलिसांकडे ताबा दिला आहे. ओडिसा पोलिसांनी चौकशीसाठी त्याला रविवारी सकाळी ओडिशाला नेले आहे.

दरम्यान, या प्रकरणात तब्येतीच्या कारणावरून मोतेवार याच्यासाठी उस्मानाबादऐवजी सोलापूर आणि पुण्यामध्ये उपचाराची शिफारस करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते शिवाजी गवळी पंगुडवाले यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार पाठविली आहे. त्यात उस्मानाबाद व सोलापूर येथील डॉक्टरनी मोतेवाराबद्दल खोटे रिपोर्ट दिल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. चीटफंडमधील फसवणूक प्रकरणात ओडिशा पोलिस मोतेवारची चौकशी करणार असून, अशाच प्रकरणात ग्वाल्हेर पोलिसही त्याच्या मागावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांची माहिती आता ऑनलाइन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॉलेजमधील पायाभूत सुविधा, वसतिगृहातील सोयीसुविधा, सभागृह, लेडिज कॉमन रूम अशी माहिती आता ऑनलाइन पाहता येणार आहे. कॉलेजमधील उपलब्ध सोयीसुविधांची माहिती वेबसाइटवर जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंत पालकांना तेथे कोणत्या सोयीसुविधा आहेत, याची कल्पना नसते. सुविधांवरून अनेकवेळा वादही होतात. आता कॉलेजांना आपल्या सोयीसुविधांची संपूर्ण माहिती वेबसाइटवर जाहीर करावी लागणार आहे. संचालकांनी याबाबबत सर्व विद्यापीठांना पत्र पाठविले आहे. कॉलेजांना आपल्या सोयीसुविधांची इत्यंभूत माहिती आपल्या वेबसाइटवर जाहीर करावी, अशा सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातील पत्रामध्ये म्हटले आहे की, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी दर्जेदार शिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे उच्चशिक्षणाचा गुणवत्मक दर्जा उंचावणे आवश्यक असून, गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी कॉलेजातील सोयीसुविधा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कॉलेजांनी सोयीसुविधांची माहिती वेबसाइटवर जाहीर करावी.

तपासणी गुलदस्त्यात
उच्चशिक्षण विभागाने राज्यातील कॉलेजांमध्ये तपासणी मोहीम राबविली. दोन वर्षांत दोनदा कॉलेजांची तपासणी करण्यात आली. कॉलेजांच्या तपासणीचा अहवालही शासन दरबारी धुळखात पडून आहे. कॉलेजांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थी संख्या, शिक्षकांची संख्या अशा प्रकारे माहिती तपासण्यात आली. कॉलेजांच्या झाडाझडतीचा हा अहवालावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

ही असेल माहिती..
इमारत, वर्गखोल्या, ग्रंथालयातील सुविधा, ग्रंथालयातील पुस्तकांचा तपशील, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, जिम्नॅशियम, प्रयोगशाळा व संगणक कक्षातील साहित्य लेडीज कॉमन रूम, वसतिगृहांची उपलब्धता व वसतिगृहातील सोईसुविधा, कँटीन, सभागृह व व्याख्यानकक्ष याबाबत माहिती वेबसाइटवर जाहीर करावी लागणार आहे. जानेवारीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात ही माहिती विद्यार्थी, पालकांना पाहता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांचा खुलासा

0
0


औरंगाबाद : टीडीआर घोटाळा प्रकरणी महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बजावलेल्या नोटीसला पाच अधिकाऱ्यांनी दोन उत्तर दिले आहे. या खुलाशांचा अभ्यास केला जात असून गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
टीडीआर घोटाळा 'मटा' ने उघडकीस आणला. नारेगाव येथे १२ मीटर रस्त्याच्या जागेसाठी २४ मीटरचा टीडीआर देण्यात आला. ज्या जागेसाठी नगररचना विभागाने २४ मीटरचा टीडीआर दिला, ती जागा पालिकेच्या ताब्यातच नाही. त्या जागेच्या मोजणी नकाशाबद्दल देखील संभ्रम आहे. त्याशिवाय फाजलपुरा येथील भूखंड बँकेकडे तारण असताना व बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र नसताना देखील टीडीआर दिला आहे. अल्तमश कॉलनी भागातही जागा ताब्यात न घेताच टीडीआरची खैरात वाटली आहे. या प्रकरणात नितीन चित्ते, राज वानखेडे, कैलास गायकवाड यांनी सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत आवाज उठवला होता.

उत्तरासाठी टाळाटाळ
आयुक्त केंद्रेकर यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके, कनिष्ठ अभियंता आर. एम. वाघमारे यांच्यासह अन्य दोन जणांना कारणेदाखवा नोटीस बजावल्या. अन्य दोघेजण पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. यासर्वांना आठ दिवसात नोटीसला उत्तर देण्याचे कळविण्यात आले होते, पण त्यांनी फाइल मिळत नसल्याचे कारण पुढे करून उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७० कोटींच्या कामांना कात्री

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कर वसुलीत पिछाडीवर असलेल्या महापालिकेतील १७० कोटी रुपयांची कामे रद्द करण्याचे संकेत पालिका आयुक्तांनी दिले आहेत. प्रशासनाने सादर केलेले बजेटच ग्राह्य धरले जाणार असून त्यानुसारच शहरात विकासाची कामे केली जातील, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य शासनाने स्थानिक संस्थाकर (एलबीटी) रद्द केला. महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून महिन्याला सुमारे १७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. एलबीटी रद्द झाल्यामुळे शासनाकडून दर महिन्याला पालिकेला साडेअकरा कोटी रुपयांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे सुमारे सहा कोटींचे नुकसान एलबीटीच्या माध्यमातून पालिकेला सहन करावे लागत आहे. मालमत्ता कराची वसुलीही प्रभावीपणे होत नाही. १५६ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दीष्ट असताना आतापर्यंत फक्त ४० कोटी रुपयांची वसुली झाली. या सर्वांचा परिणाम विकास कामांवर होणार आहे, ही बाब लक्षात घेऊन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रशासनाने तयार केलेले बजेटच ग्राह्य धरण्याचे ठरविले आहे. पालिका प्रशासनाने स्थायी समितीला ७९५ कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यात २०० कोटी रुपयांच्या लेखानुदानाचा समावेश होता, म्हणजे पालिकेचे प्रत्यक्ष बजेट ५९५ कोटी रुपयांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बजेटच्या आधारेच येत्या काळात काम करण्याचे संकेत केंद्रकर यांनी दिले आहेत. त्यामुळे स्थायी समितीने वाढवलेले १३० कोटी रुपये व सर्वसाधारण सभेने वाढवलेले ४० कोटी रुपये बजेटमधून कपात केले जाणार आहेत.

खर्चाचा तपशील द्या
बजेटच्या अनुशंगाने ३१ डिसेंबरपर्यंत किती खर्च झाला, याचा तपशील सर्व विभागप्रमुखांना तत्काळ सादर करावा असे आदेशही केंद्रेकरांनी दिले आहेत. त्याच प्रमाणे मार्च अखेरपर्यंत किती खर्च अपेक्षित आहे, याचा तपशील देण्याच्या सूचना त्यांना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. उत्पन्न आणि अपेक्षित खर्च याची सांगड घालून येत्या काळात काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुमंत्र ः सांकेतिक भाषेतून प्रभावी अध्यापन

0
0

Ashish.choudhri@timesgroup.com
शाळेला जायला धड रस्ता नाही. पावसाळ्यात तर पायपीटच. अशा खडतर वस्तीवरील शाळेतील पहिली, दुसरीचे विद्यार्थी मात्र मोठ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लाजवतील अशा प्रकारे शतकीपासून हजार, लाख, कोटी आणि अब्ज या संख्या ओळखतात. संख्याओळख असो की जोडशब्द, वाक्य. मुलांची नावे असोत की गणितातील बेरीज वजाबाकी. क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थी उत्तरे देतात. त्यासाठी त्यांना घोकंपट्टी करावी लागत नाही, की अभ्यासात रटाळपणा नाही. त्यांना हे शक्य झाले आहे ते विजय गायकवाड या शिक्षकामुळे. या गुरुजींनी स्वतःची सांकेतिक भाषा तयार केली आणि त्याच भाषेतून ते अध्यापनाचे धडे देतात. वैजापूरपासून चार किलामीटर अंतरावर असलेल्या हिंगेवस्ती येथील जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा. शिक्षकाचा हा वेगळा मार्ग 'हिंगेवस्ती पॅटर्न' अशी ओळख निर्माण करतो आहे.

हे संगणकीय युग म्हणून ओळखले जाते. अशा या युगात शिक्षणाच्या नवनव्या पद्धतीही येत आहेत. पारंपरिक पद्धत आणि घोकंपट्टी शिक्षणावर विद्यार्थीही नाराज असतात. त्यांना ते कंटाळवाणे वाटते. अनेक शाळांमध्ये पुस्तकांची घोकंपट्टी करत अभ्यासक्रम पूर्ण केला जाताना दिसतो, परंतु ही हिंगेवस्तीची प्राथमिक शाळा यापेक्षा वेगळी ठरली ती या शिक्षकाच्या प्रयत्नामुळे. विजय गायकवाड या शिक्षकाने स्वतःची सांकेतिक भाषा विकसित केली आहे. हे गुरुजी मराठी, गणित किंवा इंग्रजी विषय असो, याच सांकेतिक भाषेतून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देतात. ही भाषा विद्यार्थ्यांच्या एवढी अंगवळणी पडलेली आहे की, त्यांना प्रत्येक विषय सोपा वाटायला लागतो. मुळाक्षरे, बाराखडीला गायकवाड यांनी हावभाव निश्चित करत एक सांकेतिक खूण दिलेली आहे. उदा. 'अ' असेल तर कपाळावर आडवी रेघ, 'ब' असेल तर बोटांना तसा आकार देणे. अशा प्रकारे 'क', 'ख', 'ग', 'घ' अशा प्रत्येक अक्षराला सांकेतिक खूण दिली आहे. याच सांकेतिक भाषेतून गुरुजी मुलांना अक्षरांची ओळख करून देतात. हावभावातून शिकायला मिळते आणि ते आनंददायी ठरल्याने मुलांचाही शाळेकडचा कल वाढला. या शाळेत दररोज शाळेत शंभर टक्के उपस्थिती असते. शिकण्यापेक्षा आपण खेळत शिकतोय अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. गीतातील हावभाव ओळखून मुले ५ व ६ अंकी संख्या चटकन् ओळखतात. दसलाख, कोटी, अब्जच्या वरील आकडे मोजताना अनेकांची भंबेरी उडते, परंतु या शाळेतील दुसरी, तिसरीचे विद्यार्थी १ लाख ७६ हजार कोटींचा भष्टाचार झाल्याची बातमी वर्तमानपत्रात क्षणार्धात वाचतात. ही सारी गुरुजींच्या सांकेतिक भाषेची किमया आहे. कोणी पाहुणे आले तर त्यांचे स्वागत गुरुजींच्या सांकेतिक भाषेनेच होते. गुरुजी ती भाषा मांडतात आणि विद्यार्थी पाहुण्यांचे नाव सांगतात. त्यांनी दिलेले शब्द असो की संख्या. विद्यार्थी गुरुजींच्या याच भाषेतून ओळखतात.

गुरुजी कृती करतात आणि शब्द, संख्या विद्यार्थी मांडतात. अशा गमती जमतीतून विद्यार्थ्यांना शब्द, पाढे, इंग्रजी वाक्ये शिकविली जातात. इंग्रजी ग्रामर यासह कॅट, मॅट, लुकिंग, स्लीपिंग असे शब्दही विद्यार्थी यातूनच शिकतात. पटसंख्या ओळखणे, पाढे, कवितांच्या माध्यमातून अंकगणित ओळखणे, दिशांवरून अंकगणित ओळखणे हाच विद्यार्थ्यांचा अभ्यास बनला आहे. जोडशब्द, वाक्य ओळखणे, वाक्य तयार करणे हे सोपे झाले आहे.

घोकंपट्टीपेक्षा यातच मुले रमतात आणि त्यातूनच त्यांना ज्ञान मिळते. अभ्यासाची गोडी कायम त्यांच्या मनामध्ये राहते, त्यांचे लक्ष केंद्रीत राहते. त्यांची एकाग्रता वाढण्यासही मदत होते, असे गायकवाड गुरुजी सांगतात. वस्तीशाळा असल्याने सुरुवातीला विद्यार्थी संख्या कमी होती. २२ ते २५ विद्यार्थी होते. उपस्थितीही कमी असायची. आज अशी परिस्थिती आहे की उपस्थिती शंभर टक्के आहेच, पण विद्यार्थी संख्या वाढते आहे. ३३ विद्यार्थी शाळेत आहेत. गुरुजींच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे वस्तीतील कुटुंबांसह परिसरातील नाईकवस्ती, फकिराबादवाडी, नागिनपिंपळगाव येथील पालकही आपल्या मुलाला या शाळेत प्रवेशासाठी विचारणा करतात, परंतु शाळेकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडचणी निर्माण येतात. शाळेतून बाहेर गेलेले विद्यार्थी आज माध्यमिक शाळांमध्ये चांगल्या प्रकारे शिकतात. त्यांना आत्मसात करणे अतिशय सोपे झाल्याचेही गायकवाड अभिमानाने सांगतात. विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान ज्यात राज्यातील जिल्हे अशा पद्धतीने तोंडपाठ झाले आहेत. साधुसंतांची नावेही याच पद्धतीतून लक्षात राहतात.

गावकऱ्यांचेही पाठबळ
शाळेला गावकऱ्यांचे चांगले पाठबळ आहे. इमारतीसाठी शिक्षणप्रेमी कचरू पाटील कोल्हे यांनी आपली ४ गुंठे जमीन दान दिली आहे. इमारत किंवा इतर साहित्यासाठी शाळेला गावकऱ्यांसह इतर दानशूरांनीही आर्थिक स्वारुपाची मदत केली आहे. यातून शाळेचा परिसर, झाडांच्या कुंड्या, संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली. विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटावे यासाठी प्रत्येक वृक्षाला विद्यार्थ्याचे नाव देण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघाचेही कायम लक्ष असते. त्यामुळेच शाळेला आयएसओचा दर्जाही मिळाला. वस्तीवरील रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी शाळा आकर्षणाचे केंद्र आहे.

प्रेरणा अशी मिळाली...
हिंगेवस्तीवर २००९ ला शिक्षक म्हणून रुजू झालो तेव्हा शाळेत दोन मुले पूर्णतः मूकबधीर (दिव्यांग) होती. त्यांना शिकविण्याचे आव्हान समोर होते. यातून मार्ग काढण्यासाठी सांकेतिक भाषेची कल्पना सुचली. १९९७ला बाहेगावला होतो तेव्हा आमच्या कुलकर्णी सरांकडून याचे धडे मला घेता आले. आघूरला बदली झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यासह इतर उपक्रमांमुळे या पद्धतीकडे फारसे लक्ष गेले नाही. येथे आल्यानंतरही या मुलांकडे पाहिले आणि तयारी सुरू केली आणि ही भाषा विकसित केली. पाहता पाहता विद्यार्थ्यांनी ही भाषाही आत्मसात केली आणि आता पहिला किंवा बालवाडीला आलेला विद्यार्थी लगेचच ही सांकेतिक भाषा आत्मसात करतो. सगळ्यांसोबत त्याला वर्गात शिकविले की त्याला ताबडतोब ही भाषा जमते. ग्रामीण भागात या भाषेला भोप्याची भाषा म्हणतात. याच ग्रामीण भाषेतून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सोपा वाटावा, रटाळ वाटू नये यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरल्याचे लक्षात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गुलाम रसूलमहोत्सव शनिवारी

0
0



औरंगाबाद : योगीराज संगीत अकादमी व श्री शंकरबाबा भक्त मंडळातर्फे औरंगाबाद येथे शनिवारी, ९ जानेवारी रोजी डॉ. गुलाम रसूल (परभणी) शास्त्रीय संगीत महोत्सव २०१६चे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. यंदा विदुषी पंडिता कलापिनी कोमकली, देवास (पं. कुमार गंधर्व यांची मुलगी) या प्रमुख कलाकार आहेत. शंकर विधाते (गायन) भार्गव देशमुख (तबला वादन), पंडिता मीनाक्षी चौधरी व पंडित डॉ. पराग चौधरी (गायन) आदी मान्यवरांना ऐकण्याची संधी मिळेल. विनामूल्य असलेला हा महोत्सव तापडिया नाट्य मंदिरात दुपारी साडेतीन ते रात्री दहापर्यंत रंगेल. महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीच्या संचालिका मीनाक्षी चौधरी व श्री शंकरबाबा मंडळाचे समन्वयक डी. आर. कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समांतर’ची चौकशी समिती उद्या शहरात

0
0


औरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कामाची चौकशी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य बुधवारी (६ जानेवारी) शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे अधिकारी व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. दोन महिन्यापूर्वी या समितीने औरंगाबादेत येऊन समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाबद्दल प्राथमिक माहिती घेतली. पालिकेचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांशीही त्यांनी समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाबद्दल चर्चा करून मत जाणून घेतले. त्यानंतर या समितीचे सदस्य बुधवारी पुन्हा येणार आहेत. समितीमध्ये संतोषकुमार यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार खैरे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यास नेत्यांची हजेरी

0
0


औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध पक्षाचे नेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

खासदार खैरे यांच्या मुलीचा विवाहसोहळा बायपास रोडवरील गुरुलॉन्स येथे मंगळवारी सायंकाळी मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. शिवसेना नेते उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, अनंत गिते, रवींद्र वायकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार गजानन किर्तीकर, विनायक राऊत, संजय जाधव, आनंद आडसूळ, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, आमदार अतुल सावे, अर्जून खोतकर, माजीमंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांसह धार्मिक, सामाजिक, उद्योग आदी क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. खासदार खैरे यांच्यासह आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले आदीं पाहुण्याचे स्वागत करत होते.

गडकरींचे मौन
ज्येष्ठ सिनेअभिनेत्री आशा पारेख यांच्या पद्मभूषण पुरस्काराची मागणी केली होती, असे विधान केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. गडकरी यांचा दावा पारेख यांनी फेटाळला होता. याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता गडकरी यांनी मौन साधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाच्या व्यवहारातून हॉटेलमालकाचे अपहरण

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैशाचा व्यवहार व हॉटेलच्या ‌थकित बिलाच्या वादातून हॉटेलमालकाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी बुढीलाइन भागात घडली. या प्रकरणी चौघाविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असिमोद्दीन फइमोद्दीन काजी (रा. रोजेबाग, गीतानगर) यांचे बुढीलाइन भागात हॉटेल आहे. ४ सप्टेंबर २०१२ रोजी काजी यांनी मुजाहीद हुसैन, कैसर सय्यद, साबेर सय्यद व इम्रान यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या रकमेचे व्याज व मुद्दल त्यांनी २०१४मध्ये परत करून व्यवहार पूर्ण केला. दरम्यान या तीन वर्षांत आरोपीचे नातेवाईक व मित्रमंडळी यांनी काजी यांच्या हॉटेलमध्ये जेवण केले होते. याचे अडीच लाखांचे बिल झाले होते. काजी यांना आरोपींनी बिलापोटी झालेले अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. याबाबत काजी यांनी मागणी केली असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला; तसेच हॉटेलमध्ये येऊन काजी, त्यांचे भागीदार परवेज आलम अन्सारी व अजमतउल्ला अन्सारी यांना
शिव्या दिल्या. काजी यांना अज्ञात ठिकाणी कारमध्ये कोंबून नेत मारहाण केली. 'तू हॉटेल कसे चालवतो,' असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी काजी यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी पोलिसांनी हेल्मेट वापरावे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'पोलिस, पोलिस मित्रांनी अगोदर हेल्मेट वापराची सुरुवात करावी. त्यानंतरच शहरवासियांना हेल्मेट वापरा असे सांगण्याचा नैतिक अधिकार मिळेल,' असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले. पोलिस स्थापना दिनानिमित्त सोमवारी पोलिस मित्रांचा सत्कार सोहळा तापडिया नाट्य मंदिर येथे पार पडला. या वेळी ते बोलत होते.
पोलिसांच्या सहकार्याकरिता शहरात पोलिस मित्र संकल्पना राबवण्यात आली आहे. यामध्ये १५ पोलिस ठाण्याचे १५०० पोलिस मित्र तयार करण्यात आले आहेत. पोलिस स्थापना दिनानिमित्त विविध पोलिस ठाण्याच्या १२५ पोलिस मित्रांचा सत्कार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, सुखदेव चौगुले, रविकांत बुवा आदींची उपस्थिती होती. पोलिस मित्रांना मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. 'येत्या वर्षात हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करू. हेल्मेट वापराची सुरुवात पोलिस, चार्ली पथकातील जवानांनी करावी. पोलिस मित्रांनी देखील हेल्मेटचा वापर केल्यास जनजागृती होईल. प्रत्येक पोलिस मित्राने आपल्या प्रमाणे प्रत्येकी पाच पोलिस मित्र वाढवल्यास वर्षाअखेरीस पोलिस मित्रांची संख्या ७ ते ८हजार होऊ शकते,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध पोलिस ठाण्याचे निरीक्षक व अधिकारी उपस्थित होते. पोलिस मित्रांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र वाटप या करण्यात आले. यावेळी पठाणकोट येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
गुन्हेगारांची हकालपट्टी
पूर्वी पोलिस मित्रांच्या यादीमध्ये अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. विविध राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार पोलिस मित्र म्हणून दिमाखाने मिरवत होते. पोलिस ठाण्यात पोलिस मित्रांच्या नावाखाली सेटलमेंट करण्यासाठी यांचा वावर नेहमी दिसून येत होता. या गुन्हेगारी स्वरुपाच्या तथाकथित पोलिस मित्रांची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हकालपट्टी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात सीताफळ पूरक पीक

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मराठवाड्यातील कोरडे हवामान आणि पाण्याची उपलब्धता पाहता सीताफळ पूरक पीक आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धती बदलून सीताफळ लागवडीकडे वळावे. मराठवाड्यात फळबागांचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकार पुरेपूर मदत करीत आहे. प्रक्रिया उद्योगांसाठी १० लाख रुपये अनुदान आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्र प्रणाली स्वीकारून शेती करावी,' असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले. राज्यस्तरीय सीताफळ परिषदेत ते बोलत होते.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, अखिल भारतीय सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ पुणे आणि एमजीएम कृषी विकास केंद्राच्या वतीने सोमवारी रुक्मिणी सभागृहात तेरावी राज्यस्तरीय सीताफळ परिषद झाली. या परिषदेला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कृषी आयुक्त विकास देशमुख, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, आमदार अतुल सावे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, उद्योजक बी. एस. खोसे, बालाजी शिंदे, सीताफळ संघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे, विजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषी आयुक्त देशमुख म्हणाले, 'सरकार अनुदान देत असून शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी. कमी पाण्यात व खडकाळ जमिनीत येणारे सीताफळ पीक मराठवाड्यासाठी उपयुक्त आहे. पारंपरिक पिकांपेक्षा फळबागांचे शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील. राज्यात सहाशे शेतकरी कंपन्या व एक लाख शेतकरी गट स्थापन करणार आहे. प्रक्रिया उद्योगांसाठीही दहा लाख रुपये अनुदान आहे'.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. 'आपल्या डोक्यावर पडेल तेवढेच पाणी आपले असते. त्यामुळे पाणी साठवून पीक घेण्याचा प्रयत्न करा. आष्टी या डोंगराळ तालुक्यात दुग्धव्यवसायामुळे शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा केल्यास परिस्थितीत सुधारणा होईल. सीताफळासारख्या दुर्लक्षित पिकाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सीताफळाचा निश्चित आधार मिळेल,' असे बागडे म्हणाले. पुरंदर व सासवड भागात सीताफळ पीक फायदेशीर ठरले. 'बाहेरच्या वाणापेक्षा स्थानिक वाणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. मंत्र, तंत्र, यंत्र, कौशल्य व व्यवस्थापन या पंचसूत्रीचा वापर करून सीताफळ लागवड करा,' असे आवाहन विजय कोलते यांनी केले. उद्योजक भारत मोतिंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर किरण जगताप यांनी आभाळ मानले. या परिषदेला राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images