Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘एमफार्मसी’च्या निकालाचा गोंधळ संपेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एमफार्मसीचा गोंधळ कायम आहे. काही विद्यार्थ्यांचे निकाल लागला तर, काहींचा निकाल तोंडीपरीक्षेतच अडकला आहे. पात्र मार्गदर्शक शिक्षक नसल्याने कॉलेजांना परवानगी नाकारण्यात आली. प्रशासन आणि कॉलेज यांच्या कारभारात विद्यार्थ्यांची मात्र नाहक फरफट होत आहे.

औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले तर, अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांची तोंडीपरीक्षाच घेतली नाही. त्यामुळे त्यांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात आले आहे. अंतिम वर्षात विद्यार्थ्यांना शोधप्रबंध (डेझरटेशन) सादर करावे लागते. त्यानंतर त्यांची तोंडीपरीक्षा घेतली जाते. त्यासाठी कॉलेजमध्ये पात्र शिक्षकांची आवश्यक असते. अनेक ठिकाणी पात्र शिक्षक नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. बीड जिल्ह्यातील एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शोधप्रबंधच सादर केले नसल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. एकूण परीक्षार्थींपैकी अर्ध्याहून विद्यार्थ्यांचा निकाल ऑगस्ट २०१४मध्येच जाहीर करण्यात आला. उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल नवीन वर्ष उजाडले तरी रखडलेलाच आहे. विद्यापीठ प्रशासन आणि कॉलेज यांच्यातील समन्वयचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

संघटनांचाही हस्तक्षेप
विद्यापीठातंर्गत एमफार्म अभ्यासक्रमाचे कॉलेजांची संख्या सात आहे, परंतु कॉलेजांमधील अंतर्गत वादामुळेही हा प्रश्न सुटत नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे.

विद्यापीठ, डीटीईची चूक
व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण विभागातर्फे राबविली जाते. त्यात एमफार्मसी अभ्यासक्रमाचाही समावेश आहे. अशा कॉलेजांना सर्व शिक्षकांच्या जागा भरलेल्या आहेत, पायाभूत सुविधा आहेत याबबत विद्यापीठाकडून 'ना हारकत प्रमाणपत्र' घेऊन ते तंत्रशिक्षण विभागाला सादर करावे लागते. विद्यापीठ खातरजमा न करता अनेकदा प्रमाणपत्र देते आणि तंत्रशिक्षण विभागही सत्यता न पडताळता प्रक्रियेत सहभागी करून घेते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्रेकरांच्या आयुक्तपदाचा ठराव बारगळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या आयुक्तपदी सुनील केंद्रेकर यांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत हवेतच विरला. कार्यक्षमपणे काम करणाऱ्या केंद्रेकरांचे अभिनंदन करण्याच्या ठरावावरही फारशी चर्चा झाली नाही.

सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्पाचा मुद्या उपस्थित केला. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीने मंजूर केलेले बजेट कपात केले जाणार आहे का, विकास कामे होणार नाहीत का, असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यावर आयुक्त केंद्रेकर यांनी खुलासा करताना, बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. आयुक्तांना तो अधिकार नाही. मंजूर झालेल्या बजेटनुसारच कामे होतील, पण त्याची सांगड मालमत्ता कर वसुलीशी घातली जाईल, असे स्पष्ट केले.

नगरसेवकांनी पहिल्या टप्प्यात त्यांच्या वॉर्डातील १५ ते २० लाख रुपयांची कामे सुचवावीत. ती प्राधान्याने केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर भाजपचे गटनेते भगवान घडमोडे यांनी केंद्रेकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ते म्हणाले, 'केंद्रेकरांची नियुक्ती प्रभारी आयुक्त म्हणून असताना देखील ते पूर्णवेळ आयुक्त असल्यासारखे काम करीत आहेत. त्यांच्यामुळे पालिकेच्या कामकाजाला शिस्त लागली आहे. कामांनाही गती आली आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेने केंद्रेकर यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करावा.' या ठरावाला नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य, सीताराम सुरे यांनी अनुमोदन दिले. नगरसेवक राजू शिंदे यांनीही केंद्रेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि हा ठराव मंजूर करताना केंद्रेकर यांची पालिकेच्या आयुक्तपदी कायमस्वरुपी नियुक्ती करावी, असाही ठराव घ्यावा आणि तो शासनाकडे पाठवावा, असे मत मांडले. सर्वसाधारण सभा एखाद्या आयुक्ताला परत पाठवण्याचा ठराव घेऊ शकते तर, एखाद्या आयुक्तांना कायम स्वरुपी नियुक्त करण्याचा ठरावही घेऊ शकते हे दाखवून द्या, असे शिंदे म्हणाले. त्यांच्या प्रस्तावाला सभागृहातील नगरसेवकांनी बाक वाजवून अनुमोदन दिले, पण त्यावर निर्णय होऊ शकला नाही. महापौरांनी प्रस्ताव मंजूर केला किंवा नामंजूर केला, असा कोणताही निर्णय दिला नाही.

महापौर-केंद्रेकरांच्या कानगोष्टी
पालिकेचे आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर यांना कायमस्वरुपी नियुक्त करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने घ्यावा, असा प्रस्ताव राजू शिंदे यांनी मांडल्यावर केंद्रेकर यांनी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याशी डायसवरच चर्चा केली. त्यांच्यात झालेल्या कानगोष्टीमुळे महापौरांनी तो ठराव बारगळल्याचे बोलले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदाराला अधिकाऱ्यांचे अभय; अपूर्णावस्थेतच लोकार्पण

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याला गेल्या तीन वर्षांपासून ग्रहण लागले आहे. रस्ता नकाशानुसार तयार करण्यात न आल्यामुळे २३ कोटी रुपये खर्चूनही धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या डांबरीकरणाचे काम रखडले आहे आणि रेल्वे स्टेशनलगत त्याची रुंदीही कमी झाली आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी खुला करण्यात आलेला हा 'बाळासाहेब ठाकरे महामार्ग' शहरवासीयांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत चालला आहे. आधी रस्त्याच्या दुभाजकामध्ये जागोजागी अंतर (गॅप) ठेवण्यात आले होते. त्यातून ये-जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तेथे गतिरोधके बसविण्यात आली. एसएससी बोर्ड, इंजिनिअरिंग कॉलेज, चेलिपुरा हायस्कूल, बन्सीलालनगर या ठिकाणी ही गतिरोधके आहेत. पुढे अपघात टाळण्यासाठी हे सर्व गॅप बंद करण्यात आले. एसएससी बोर्डपासून जालना रोडला जोडणारा रस्तादेखील दुभाजक बांधून बंद करण्यात आला. मात्र, या सर्व ठिकाणी आधी बांधलेले गतिरोधक आजही तसेच आहेत. उस्मानपुरा चौकात गतिरोधकाची गरज आहे, परंतु गतिरोधक कोठे हवे, कोठे नको याची काळजी महापालिका अधिकाऱ्यांनी कधीच केली नाही. त्यामुळे या चौकात दररोज अपघात होत आहेत. गतिरोधकाअभावी क्रांतिचौकाकडून भरधाव वेगाने येणारी वाहने, संत एकनाथ रंगमंदिराकडून येणाऱ्या वाहनांवर वारंवार धडकत आहेत. एसएससी बोर्डसमोरचा गॅप बंद करण्यात आल्यामुळे बोर्डापासून पीर बाजारपर्यंतचा सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता निकामी झाला आहे. पीर बाजार, प्रतापनगर भागातील संपूर्ण वाहतूक आता क्रांतिचौकमार्गे किंवा पदमपुरामार्गे अदालतरोड अशी केली जात आहे.

रुंदीकरणाचा खेळखंडोबा
क्रांतिचौकपासून रेल्वे स्टेशनपर्यंतच्या या अडीच ​किमी रस्त्याची रुंदी जागोजागी कमी-जास्त झाली आहे. रस्ता ज्या कंत्राटदाराने तयार केला, त्याच्या मालकीच्या 'मॅनॉर' हॉटेलचा ८ फूट भाग रस्त्यामध्ये आला होता. या अतिक्रमणावर तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी मार्किंगही केले होते, परंतु त्यांची बदली झाल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. आजही ही इमारत रस्त्यावर उभी आहे, परंतु अतिक्रमित भाग वाचविण्यासाठी हॉटेलच्या विरुद्ध दिशेने असलेल्या राणी लक्ष्मीबाई उद्यानावर हातोडा मारण्यात आला. रस्त्याची उद्यानालगतची संपूर्ण बाजू अधू झाली आहे. क्रांतिचौक ते उस्मानपुरादरम्यान भूसंपादन न झाल्यामुळे डांबरी रस्ता अर्धवट झाला आहे. नकाशानुसार डांबरी भाग साडेतीन मीटरचा हवा, परंतु सध्या तो दीड ते दोन मीटर एवढाच रूंद आहे. एसएससी बोर्ड, इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, चेलिपुरा हायस्कूल या इमारतींनी जागा देऊ केली, परंतु ती ताब्यात घेण्याची, भूसंपादन करण्याची तत्परतादेखील पालिकेने दाखविली नाही. त्यामुळे तेथेही रस्ता अरूंद झाला आहे.

विजेच्या खांबांचा अडथळा
रस्त्यालगतचे विजेचे खांब आणि फायर ब्रिगेडसमोरची डीपी, रस्ता खुला करून एक वर्ष उलटले तरी हटविण्यात आलेली नाही. खांब आणि डीपी हटविण्याचे पैसे महापालिकेने भरले, पण अधिकाऱ्यांनी पाठपुरावा न केल्यामुळे वीज मंडळाने कोणतीही हालचाल केलेली नाही. रेल्वे स्टेशनलगत रस्त्यासाठी रेल्वेच्या जागेचे भूसंपादन करणे गरजेचे आहे. बाजारभावाप्रमाणे किंमत देऊन जागा घेण्याची अट रेल्वे खात्याने घातली आहे. त्यामुळे महापालिकेने त्या ठिकाणी रस्ताच केलेला नाही.

पादचाऱ्यांचे हाल
एकूण १२० फूट रुंद असलेल्या या रस्त्यावर फुटपाथ नाहीत की झेब्रा क्रॉसिंगही नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो. अडीच किलोमीटरच्या अंतरात अनेक ठिकाणी फुटपाथची तरतूदही केलेली नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दुभाजकात वृक्षारोपण प्रस्तावित होते, परंतु कंत्राटदाराने त्यात चक्क बांधकामाचा 'राडारोडा' भरण्याचे काम सुरू केले आहे. दगड, विटा, वाळूच्या या ढिगाऱ्यात झाडे कशी जगणार हा प्रश्नच आहे. दुभाजकातील दिवेदेखील बंद असल्यामुळे हा रस्ता अंधारात बुडून जातो. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व त्याला कंत्राटदाराची जोड मिळाल्याने हा महत्त्वाकांक्षी रस्ता धोकादायक ठरत चालला आहे.

ठाकरे महामार्गाबद्दल आज बैठक
क्रांतिचौक ते रेल्वे स्टेशन या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्गाबद्दल शुक्रवारी विशेष बैठक होणार आहे. महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत सिडको कार्यालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे. ठाकरे महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे नगरसेवक विकास जैन, गजानन बारवाल आणि नंदकुमार घोडेले यांनी महापौर व आयुक्तांचे लक्ष वेधले. या रस्त्यावरची अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही ही कामे केली जात नाहीत, असे जैन म्हणाले. '२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुखांची जयंती आहे. तोपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करा,' असे घोडेले म्हणाले. अपूर्ण असलेल्या कामांबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, 'कंत्राटदाराला पेमेंट न केल्यामुळे कामे अपूर्ण आहेत.' चर्चेचा एकूणच नूर लक्षात घेऊन केंद्रेकर यांनी या रस्त्याबद्दल उद्या शुक्रवारी सकाळी बैठक घेण्याचे जाहीर केले. या बैठकीला नगरसेवक, अधिकाऱ्यांनी यावे, कंत्राटदारालाही बोलवावे असे निर्देश त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी साक्षीदाराला अमानुष छळले

$
0
0

थर्टीफर्स्ट खुनप्रकरणी तरुणीचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पोलिसांनी अमानुष छळले. निर्वस्त्र करून मारहाण केली. अश्लील शिवीगाळ केली,' असा आरोप थर्टीफर्स्टच्या रात्री मारहाणीत मृत्यू पावलेल्या महेबूब गौरी खुनप्रकरणातील साक्षीदार तरुणीने केला आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री ही तरुणी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मिर्झा लॉजमध्ये थांबणार होती. त्याच ठिकाणी महेबूबला मारहाण झाली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

देवगिरी कॉलनी येथील महेबूब गौरी या १७ वर्षाच्या तरुणाचा थर्टीफर्स्टच्या रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी चौकशी केली असता हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. महेबूब हा त्याचे मित्र प्रशांत म्हस्के, प्रमोद निर्मळ तसेच त्याची मैत्रीण व इतर तीन तरुणींसह नववर्ष साजरा करण्यासाठी बीड बायपास भागातील हॉटेल आदित्य येथे गेला होता. पोलिसांनी यापैकी तीन तरुणींना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यापैकी सीमा (वय २१, नाव बदललेले आहे) ही तरुणी सिडको एन ५ मध्ये हॉस्टेलमध्ये राहते. तिच्यासोबत त्या रात्री असलेल्या आशासह (वय २६, नाव बदललेले) एका तरुणीला चौकशीसाठी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर आपला अमानुष छळ झाल्याचा आरोप सीमाने केला आहे. दोन दिवस या दोघींना महिला गृहात ठेवले. त्यानंतर पोलिस आयुक्तालयात त्यांचा इनकॅमेरा जबाब घेतला. बुधवारी या दोघींना सोडण्यात आले. त्यानंतर सीमाने पालकांसोबत जाऊन पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांच्याकडे या छळाची कैफीयत मांडली. उपायुक्त आटोळे यांनी तत्काळ दखल घेत सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्याकडे ही चौकशी सोपवली. बुधवारी रात्री सीमाची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्टीकरण पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार सध्या कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी असून आल्यानंतर याबाबत चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोघींना निर्वस्त्र केले

सहायक महिला पोलिस‌ निरीक्षक, प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षक व पीएसआय यांनी काठीने हातावर व पाठीवर बेदम मारहाण केली. दोघींना निर्वस्त्र करत मारहाण केली. प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाने इतर पुरूष कर्मचाऱ्यांसमोर वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली. पीएसआयने आशाच्या आईकडून ३५ हजार रुपये घेतले, असे गंभीर आरोप सीमाने केले आहेत. क्रांतिचौकातील दोन महिला अधिकारी व एका पीएसआयवर कारवाईची मागणी केली आहे.

तरुणीची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, तिचा कोणत्याही प्रकारे अमानुष छळ करण्यात आलेला नाही. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

- खुशालचंद बाहेती; सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुमार देशमुख स्मृतीप्रीत्यर्थ रविवारी रंगकर्मींचा सत्कार

$
0
0

औरंगाबाद : प्रसिद्ध रंगकर्मी व नाट्यलेखक प्रा. कुमार देशमुख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रविवारी (१० जानेवारी) प्रसिद्ध नाट्यलेखक धनंजय सरदेशपांडे व प्रसिद्ध नाट्यकलावंत प्रकाश वैद्य यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने 'भक्षक' ही एकांकिका सादर होणार आहे. निराला बाजार परिसरातील तापडिया नाट्य मंदिरात सायंकाळी सायंकाळी सातला हा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी मूळचे मराठवाड्यातील व बेंगळुरूस्थित प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व रंगकर्मी डॉ. राम देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील रंगकर्मी, नाट्यरसिक व 'नाट्यरंग' संस्थेचे कलावंत उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. दत्ता भगत

$
0
0

औरंगाबाद : ३७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाटककार व समीक्षक प्रा. दत्ता भगत यांची निवड करण्यात आली आहे. येत्या १२ व १३ मार्चला जालन्यात हे संमेलन होणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कोषाध्यक्ष प्रा. भास्कर बडे, कार्यवाह डॉ. दादा गोरे आणि 'मसाप'च्या जालना शाखेचे अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर उपस्थित होते. 'कोठारी एज्युकेशन हब' संस्था हे संमेलन भरवत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनयकुमार कोठारी आहेत. मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रथमच एक नाटककार भूषवणार आहे. 'अश्मक', 'खेळीया', 'वाटा पळवाटा' ही प्रा. भगत यांची गाजलेली नाटके आहेत. तर 'आवर्त आणि इतर एकांकिका', 'जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका' हे एकांकिकासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'समकालीन साहित्य आणि समीक्षा', 'निळी वाटचाल', 'दलित साहित्य - वाड्मयीन प्रवाह' हे समीक्षाग्रंथ गाजले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख म्हणूनही प्रा. भगत यांनी काम केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते उपाध्यक्ष होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत मोबाइल टॉवरप्रकरणी कंपनीवरही कारवाई

$
0
0

घरमालकही जबाबदार!



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अनधिकृत मोबाइल टॉवरप्रकरणी आता कंपनीबरोबरच संबंधित घरमालकाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करा. ज्या इमारतींवर टॉवर उभारले आहेत त्या इमारतींना व्यावसायिक दराने मालमत्ताकराची आकारणी करा,' असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील मोबाइल कंपन्यांच्या टॉवर संदर्भात नगरसेविका शेख समिना शेख इलियास यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर पालिकेच्या सभेत चर्चा झाली.

शहरात एकूण किती मोबाइल टॉवर आहेत, त्यापैकी अधिकृत आणि अनधिकृत टॉवर किती आहेत याची माहिती त्यांनी विचारली होती. महापौरांच्या आदेशानंतर नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी यांनी त्याचा खुलासा केला. ते म्हणाले, 'शहरात ३९१ टॉवर आहेत. त्यापैकी ७३ टॉवरला परवानगी दिली आहे. उर्वरित सर्व टॉवर अनधिकृत आहेत. शासनाच्या आदेशानुसार अनधिकृत टॉवर स्थलांतरित करण्यासाठी संबंधीत कंपनींना एक वर्षाचा अवधी दिला आहे. एक वर्षात कंपनीने त्यांचे टॉवर स्थलांतरित केले नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शासनाचे आदेश येऊन दोन महिने

झाले आहेत'.

शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटलच्या इमारतींवर मोबाइल कंपन्यांचे टॉवर लावण्यास परवानगी आहे का, असा प्रश्न नगरसेवक नितीन चित्ते, शिल्पाराणी वाडकर, रेश्मा कुरैशी यांनी विचारला. तेव्हा शाळा, रुग्णालयांच्या इमारतीवर मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभारण्यास परवानगी नाही, असा खुलासा डी. पी. कुलकर्णी यांनी केला. वाडकर यांनी ज्योतीनगरातील एका शाळेवर मोबाइल कंपनीचे टॉवर आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

शाळा, हॉस्पिटलवरील 'ते' टॉवर हटविणार

रेश्मा कुरैशी यांनी काही हॉस्पिटलचे फोटो सादर केले. त्या फोटोमध्ये हॉस्पिटलवर मोबाइल कंपन्यांचे टॉवर असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे ज्योतीनगरातील शाळेच्या इमारतीवरील आणि कुरैशी यांना ज्या हॉस्पिटलचा फोटो सादर केला आहे, त्या हॉस्पिटलन्याच्या इमारतीवरील मोबाइल कंपनीचे टॉवर हटविण्याची कारवाई तत्काळ करा, असे आदेश महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादची सानी स्कूल चेस चॅम्पियन

$
0
0

म. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर

औरंगाबादच्या सानी देशपांडेसह महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख, मृदूल डेहनकर, संकल्प गुप्ता, देव शहा यांनी उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विविध गटातील विजेतेपद पटकावले.

नैवेद्यम इस्टोरिया येथे झालेल्या स्पर्धेत नऊ फेऱ्यानंतर सात वर्षांखालील मुलींच्या गटात औरंगाबादच्या सानी देशपांडेने ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. याच गटात मुलांमध्ये इलमपारथीने तर, ९ वर्षांखालील मुलांच्या गटात देव शहाने विजेतेपद पटकावले. ९ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राचा देव शहा ८ गुणांसह विजयी ठरला. या गटात ​थ्रिश कार्तिक व राहील मलिक यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. ९ वर्षांखालील मुलींच्या गटात सविथा बी. हिने ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. तर रत्नप्रिया के. आणि प्रथिव्या गुप्ताने ८ व ७ गुणांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. ११ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूरची वुमन फिडे मास्टर दिव्या देशमुख हिने मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. याच गटात भाग्यश्री पाटील व विजया सुभाषरीने द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. या विभागात मुलांच्या गटात गुकेश डी. याने

विजेतेपद पटकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रजासत्ताक दिनापासून दिवसाआड पाणी!

$
0
0

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांचा शब्द; पैठणपासून गळती रोखणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादकरांसाठी एक गुडन्यूज. प्रजासत्ताक दिनापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने तसा दावा केल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत दिली. गेल्या पाच वर्षांपासून शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी समांतर जलवाहिनीचा विषय मांडला. कंपनीने अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे नगरसेवक व नागरिक त्रस्त आहेत, याकडे नगरसेवकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. यासंदर्भात नगरसेवकांना माहिती देताना आयुक्त केंद्रेकर म्हणाले, 'जायकवाडी ते नत्रक्षवाडीदरम्यान टाकण्यात येत असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या कामाकडे अधिक लक्ष देण्याचे मी कंपनीला सांगितले आहे. त्याचा अर्थ अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम बंद करा, असा होत नाही, पण काही अधिकाऱ्यांनी तसा अर्थ घेतला आणि काम बंद केले. ही बाब लक्षात आल्यावर मी पुन्हा पालिकेच्या व कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गरजेनुसार अंतर्गत जलवाहिन्या तुम्हाला टाकाव्याच लागतील, असे बजावले आहे. त्यामुळे आता कंपनीच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे.'



१९९७-९८पर्यंत शहरात दररोज पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर साठवणुकीच्या अडचणीची सबब देऊन एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

जायकवाडी धरणातून अपेक्षेपेक्षा फारच कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ लागल्यामुळे तत्कालीन महापौर अनिता घोडेले व आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सप्टेबर २०११मध्ये दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तिसऱ्या दिवशी पाणी येऊ लागले.

शनिवारी मेगा शट-डाउन

शनिवारी (९ जानेवारी) औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने मेगा शट-डाउनचा निर्णय घेतला आहे. शट-डाउनच्या काळात जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान असलेल्या ७०० आणि १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. गळत्या बंद केल्या जाणार आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर १५ ते २० एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी वाढण्याची शक्यता असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. एवढे पाणी वाढल्यावर २० ते २५ दिवसांनंतर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे, अशी ग्वाही कंपनीतर्फे देण्यात आली आहे, असे केंद्रेकर यांनी सांगितले. मेगा शट-डाउनच्या काळातील कामे यशस्वीपणे पूर्ण झाल्यास शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी मिळणे शक्य होणार आहे.

१५० ते १५५ एमएलडी पाण्याचा दररोज जायकवाडीतून उपसा

१३० ते १३५ एमएलडी शहरापर्यंत दररोज पोचणारे पाणी

१ लाख १० हजार शहरातील अंदाजित नळकनेक्शन

३१ टाक्यांमधून पाणीपुरवठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरमध्ये ४८७ विंधन विहिरींचे अधिग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधून ३२१ गावांमध्ये ४८७ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यासोबतच ६६ गावे व २३ वाड्या अशा एकूण ८९ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
डिसेंबर अखेरचे हे पाणी टंचाईचे दृष्य आहे. त्यामुळे येत्या काळात उन्हाळा किती भयाण असेल, याची कल्पना करवत नाही. पाणीटंचाईच्या झळा दिवाळीपासून जाणवायला लागल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १२८ ठिकाणच्या नागरिकांनी १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या ३७७ गावे व ४४ वाड्या अशा एकूण ३२१ ठिकाणी ४८७ विंधन विहिरींचे पाणी पुरवण्यात येत आहे. याशिवाय जिल्हाभरातून आणखीन ७१८ विहिरींचे प्रस्ताव दाखल करण्यात येऊन यास संबंधित ग्रामपंचायती मंजुरी देण्याबाबत आग्रह धरीत आहेत.
सध्या लातूर जिल्ह्यात ४८७ विहिरींची अधिग्रहणे ८९ टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. गत तीन वर्षांपासून पाऊस अत्यल्प झाल्याने यावर्षी पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाच्यावतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक आठवडयाला गावपातळीवरचा टंचाईविषयक अहवाल मागविण्यात येऊन तो पुढे जिल्हास्तरावर कारवाईसाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किराणा दुकानदारावर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी २५ हजार रुपये लुटण्यासाठी एका किराणादुकानदारावर प्राणघातक हल्ला चढविला. बीड बायबास रोडवर गुरुवारी रात्री ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याने आरोपींचा प्रतिकार केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले.

दीपक हुकुमचंद कासलीवाल ( वय ४५, रा. चिंतामणी रेसीडेन्सी, गोकुळनगर, बीड बायपास) असे फिर्यादीचे नाव असून त्यांचे पाचोड येथे किराणा दुकान आहे. ते दररोज पाचोड येथे ये-जा करतात. गुरुवारी रात्री सातच्या सुमारास कासलीवाल हे गुलमंडी येथे गेले होते. तेथून दुचाकीने (एमएच-२०-सीक्यू-५४९०) ते घराकडे जात होते. यावेळी त्यांच्याजवळील बँगमध्ये २५ हजारांची रोकड होती. बायपास रोडवरील बांबू हॉटेलजवळून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी फिर्यादीकडील २५ हजार रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कासलीवाल त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

यात फिर्यादी कासलीवाल गंभीर जखमी झाले असून त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपी पसार झाले. तर जखमी कासलीवाल यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु आरोपीचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलिस मुकुंदवाडी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार दरोडेखोरास घातल्या बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिसांच्या ताब्यातून हातकडीसह पोबारा केलेला दरोडेखोर सतीश नागो चव्हाण याच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पैठण तालुक्यातील दादेगाव परिसरातील एका ऊसाच्या शेतात तो दडून बसला होता. गेल्या तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, रात्री उशिरा त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सतीश नागो चव्हाण (वय २८ रा. उमापूर ता. गेवराई, बीड) या आरोपीवर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. बुधवारी त्याची गेवराई कोर्टात तारीख असल्याने मुख्यालयातील शिंदे व राऊत हे पोलिस कर्मचारी त्याला हर्सूल कारागृहातून गेवराई येथे घेऊन गेले होते. तेथून परतल्यावर सायंकाळी पाच वाजता बसने ते सिडको बसस्टँडबाहेर आल्यानंतर चव्हाण याने पोलिसाच्या हाताला झटका दिला व तो जळगाव रोडच्या दिशेने पळाला.

असा जाळ्यात सापडला : आरोपी चव्हाण हातकडीसह पसार झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनाही मिळाली होती. दोन महिन्यांपूर्वी एका लूट प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास जेरबंदही केले होते. सतीश चव्हाण हा बीड जिल्ह्यातील उमापूर येथील रहिवासी तर त्याची सासूरवाडी पैठण तालुक्यातील दादेगाव असल्याची माहिती चौकशीत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. चव्हाण पसार झाल्यानंतर याच दोन ठिकाणी येण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले होते. दादेगाव परिसरात तो आल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली, त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांच्या मार्गदर्शनाखासी सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, दिलीप मगरे, अनिल गायकवाड आणि भुषण देसाई या कर्मचाऱ्यांनी दादेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी सापळा रचत चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, सिडको बसस्टॅण्ड येथून पसार झाल्यानंतर पायी दादेगावपर्यंत पोहोचलो व शेतात दडून बसला होतो, अशी माहिती चव्हाणने पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीतही कॅरिबॅगला बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथीन पिशव्यांवर महापालिका हद्दीत बंदी घातल्यानंतर छावणी हद्दीतही छावणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा पलिचा यांनी बंदीचे आदेश दिले असून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथीन ग्राहकांना देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार आहे.

छावणीच्या हद्दीत दुकानदारांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्याबाबत छावणी प्रशासनाच्या वतीने दवंडी देण्यात आली आहे. महापालिकेने कडक पाऊले उचलल्यामुळे छावणीतही बंदी केली आहे. जर दुकानदार अंमलबजावणी करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीतील आयएसओ ठरले मृगजळ

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कामात वक्तशीरपणा, कार्यालयाची अंर्तबाह्य स्वच्छता, फायलींचा त्वरित निपटारा या निकषावर औरंगाबाद जिल्हा परिषदेने सहा वर्षांपूर्वी आयएसओ प्रमाणपत्र मिळविले. पण आता यापैकी अनेक गोष्टी केवळ कागदावर उरल्या आहेत. अस्वच्छता, बेशिस्त, फायलींचे साचलेले गठ्ठे पाहिल्यानंतर आयएसओ मृगजळ ठरले आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेने २००८ पासून आयएसओ प्रमाणपत्र तसेच मानांकन मिळविण्यासाठी कामकाज सुरू केले. त्यात निकषानुसार आणखी करण्यात आली. गतीमान प्रशासन करण्यावर भर दिला गेला. गुणवत्ता धोरण आखताना त्याची उद्दिष्टे काय आहेत त्याचे पालन होते की नाही यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. २०१० मध्ये झेडपीला आयएसओ ९००१ - २००८ मानांकन

प्रमाणपत्र मिळाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर गवागवा झाला आज सहा वर्षांनंतर त्यातील अनेक गोष्टी बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत.

स्वच्छतागृहांचे तीनतेरा : झेडपीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरती वाट लागली आहे. पुरुषांच्या स्वच्छतागृहामध्ये स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेचा कर्मचारी नाही. पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतागृह दुरुस्त केले गेले. पण ते तात्पुरते. याठिकाणी कायमस्वरुपी पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. महिला स्वच्छतागृहाच्या बाबतीत तर अक्षम्य दुर्लक्ष आहे. गेल्या वर्षभरापासून या स्वच्छतागृहात पाणी नाही. प्रशासनाकडे कित्येक वेळा तक्रार करूनही त्याचा उपयोग झालेला नाही.

तक्रार नोंदवह्या गायब आणि बेशिस्त पार्किंग : प्रत्येक विभागामध्ये तक्रार नोंदवही असणे आवश्यक आहे. सद्य परिस्थितीत बहुतांश विभागातील तक्रार नोंदवह्या गायब झालेल्या आहेत. त्यामुळे तक्रारींचा आढावा कसा घेतला जात असेल ? हा प्रश्न आहे. पार्किंगच्या बाबतीतही जिल्हा परिषदेत सारे आलबेल आहे. दुचाकी व चारचाकी पार्किंग सोयीच्या ठिकाणी केली जाते. त्यासाठी कुठलाच नियम नाही. शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, समाजकल्याण, पंचायत विभागातील कर्मचारी आपापल्या विभागासमोरील मोकळ्या जागेत गाड्या लावतात. या विभागात येणारे लोकही तिथेच गाड्या लावत असल्याने गैरसोय होते. नेतेमंडळींच्या चारचाकी तर कायमच रस्ता अडवून उभ्या असतात.

फायलींचे गठ्ठेच गठ्ठे

'आयएसओ'नुसार ग्राहक संतुष्टीकरण हा सर्वात प्रमाण मुद्दा आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात आलेल्या कामाचा निपटारा योग्य पद्धतीने वेळेच्या आत होणे अपेक्षित आहे. मात्र किरकोळ त्रुटी, एखाद्या कागदपत्राची पूर्तता झालेली नसल्यास गरजवंताला महिनोनमहिने चकरा माराव्या लागतात. इ फायलिंग ही संकल्पना फायलीतच गुंडाळली गेली आहे. अनेक विभागांमध्ये फायलींचे गठ्ठे धूळ खात पडून आहेत. काही महिन्यांपूर्वी गतीमान प्रशासन उपक्रमांतर्गत या फायलींचा निपटारा करण्याची सूचना प्रशासनाने दिली होती पण ती निवडक विभागांनीच पाळल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चालक झोपल्याची संधी साधत ट्रकमधील ३७ लाख रुपये किमंतीचा विदेशी दारुचा साठा लंपास करणाऱ्या गुजरातमधील एका टोळीतील चार आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून व्हॅट ६९ विदेशी दारुचा साडे दहा लाख रुपये किमंतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

गंगापूर तालुक्यातील कोकण अॅग्रो कंपनीमधून ३७.७१,८११ रुपये किमंतीची विदेशी दारू जयपूर येथे पोहचविण्याचे काम ट्रकचालक राजेशकुमार राजपूत (रा. खडचुंगी, जि. हिस्सार हरयाणा) याला मिळाले होते. त्यानुसार २४ ऑक्टोबर २०१५ रोजी त्याने दारुचे ७०० बॉक्स ट्रकमध्ये (एच. आर. १९ ई १४८९) लोड केले व जयपूरच्या दिशेने रवाना झाला. रात्र झाल्याने कन्नड येथील पाणपोई फाट्यावरील शिवशक्ती ढाब्याजवळ राजपूत झोपण्यासाठी थांबला होता. पहाटे अडीच ते चारच्या दरम्यान या ट्रकमधून अज्ञात चोरांनी महागड्या विदेशी दारुचे ३३७ बॉक्स दुसऱ्या ट्रकमध्ये टाकून पळवून नेले. चालक पहाटे उठल्यानंतर त्याच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे याच मार्गावर तीन महिन्यांपूर्वी लाखो रुपयांच्या प्लास्टिक ग्रॅन्युअल्सच्या पिशव्या याच पद्धतीने लुटण्यात आल्या होत्या. शिवाय येथे डिझेल चोरीच्या घटनाही घडल्या होत्या.

या चोरीमागे गुजरात राज्यातील सुलेमान कठडी टोळाचा हात असल्याची माहिती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत अहमदनगर परिसरातून इलियास हुसेन मुल्ला, इम्रान अब्दुल सत्तार इब्राहिम पठाण, जुनैद सुलेमान सुकी व तौफिक रफीकभाई इम्राहिम पटेल (सर्व रा. ग्रोधा, गुजरात) या चौघांच्या मुसक्या आवळल्या.

चौकशीत त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने कन्नड भागात विदेशी दारुचा साठा चोरल्याचे कबुली दिली. तो माल नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुँआ येथील एका व्यक्तीस विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत खरेदीदाराच्या घराची झडती घेतली. त्यात सुमारे साडे दहा लाख रुपये किंमतीचा दारुचा साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे, पोलिस उपनिरीक्षक दीपक सरोदे, पी. डी. भारती आदींनी ही कामगिरी केली.

म्होरक्यासह सहा आरोपींचा शोध सुरू

या टोळीचा म्होरक्या व खरेदीदारासह सहा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी दीपक सरोदे यांनी सांगितले. तसेच या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नदीजोड’ने शेतकरी सक्षम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'नदीजोड प्रकल्प ही शेतकऱ्यांना सक्षम करणारी योजना आहे, पण योजनेबद्दल विनाकारण काहूर माजवले जात आहे. या योजनेत पाणी वापर संस्थांनी सहभागी व्हावे,' असे आवाहन केंद्रीय जलसंधारणमंत्री उमा भारती यांनी केले. पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप शनिवारी भारती यांच्या हस्ते वाल्मीच्या सभागृहात झाला. तेव्हा त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष जी. एस. झा, केंद्रीय जलसंधारण विभागाचे विशेष सचिव अमरजित सिंह, राष्ट्रीय निर्देशक निखिलेश झा, जलसंधारण विभागाचे राज्याचे सचिव एस. एम. उपासे, वाल्मीचे महासंचालक एच. के. गोसावी यांची विशेष उपस्थिती होती.
उमा भारती म्हणाल्या, 'नदी जोड प्रकल्पासाठी गुजरातचा केंद्र सरकारवर दबाव असल्याचा अपप्रचार केला जात आहे, पण ती वस्तूस्थिती नाही. नद्यांचे पाणी वाया जाऊ नये म्हणून ही योजना आखण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्प म्हणजे सुधारणावादी विचारांचे द्योतक आहे. हा प्रकल्प शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी हिताचा प्रकल्प आहे. त्यामुळे त्याला बळकटी देण्याचे काम अभियंत्यांनी केले पाहिजे. मी मंत्री झाले नसते, तर शेतीत काम करणे मला आवडले असते. कारण मी शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतीच्या क्षेत्रात विविध प्रयोग करण्यात महाराष्टाचा हात कुणीही धरू शकत नाही. शेतीच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. इथल्या शेतीचे काम सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. पाणी वापर संस्थांनी आता सक्षम झाले पाहिजे. शेती व पाण्यासंबंधीचे छोटेछोटे प्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले पाहिजेत. जलक्रांती अभियानात सहभागी झाले पाहिजे. या अभियानाचे सामाजिक क्रांतीमध्ये रुपांतर झाले पाहिजे,' अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा. शरद भोगले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशांतर्गत दहशतवादी अधिक घातक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'देशातंर्गत असलेले दहशतवादी अधिक घातक आहेत. त्यांच्या मदतीनेच पाकिस्तानमधील अतिरेकी बॉंबस्फोट घडवितात. त्यामुळे देशातंर्गत दहशतवाद्यांचा बीमोड केंद्र सरकारने केला नाही, तर अतिरेकी हल्ले पुन्हा होतील,' अशी भीती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. पक्षाच्या विभागीय मेळाव्यानिमित्त शनिवारी शहरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, 'पठाणकोटवर अतिरेक्यांनी हल्ला केला. स्थानिक दहशतवाद्यांच्या सहकार्याशिवाय असा हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे परदेशी अतिरेक्यांना मदत करणाऱ्या देशांतर्गत दहशवाद्यांचा बीमोड होणे आवश्यक आहे. मराठवाडा सातत्याने दुष्काळाचा सामना करत आहे. मात्र, असे असतानाही त्याकडे सरकार लक्ष देण्यास तयार नाही. सरकारने दुष्काळाचा साधा आढावा घेतलेला नाही किंवा उपाययोजनाचा आराखडा तयार केला नाही. दुष्काळामुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे स्थानिक पालकमंत्री वगळता एकाही मंत्र्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला नाही. राष्ट्रीय स्वंयस्वक संघाने औरंगाबाद व पुणे येथे घेतलेल्या महासंगमावर प्रचंड पैशांची उधळपट्टी केली. हेच पैसे जलसंधारणासाठी उपयोगात आणले असते तर निश्चितच फायदा झाला असता,' असा टोला त्यांनी मारला. अविनाश डोळस, डॉ. वाल्मीक सरवदे, अॅड. बी. एच. गायकवाड, अमित भुईगळ, रामभाऊ पेरकर आदी उपस्थित होते.

पुढाऱ्यांच्या नादाने मराठा समाजाचे वाटोळे
संघाने हिंदूत्व घरोघरी पोहचविण्याच्या हेतूने उधळपट्टी केली. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शरद पवाराच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पैशांची उधळपट्टी केली. त्यावरून त्यांना शेतकऱ्यांची किती आस्था आहे हे लक्षात येते. मराठा समाज पुढाऱ्यांच्या नादी लागून आपले वाटोळे करुन घेत आहे. पुढारी गर्भश्रीमंत झाले तर जनता मात्र उपाशी आहे,' असे टीकास्त्र आंबेडकरांनी सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगोपनात मुलगा-मुलगी भेद नको!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मुलगा-मुलगी समान याचा नारा देऊन जमणार नाही. दोघांना वाढविताना आई-वडिलांनीच सर्वप्रथम बदल करायला हवा. हा विचार रुजला गेला तरच भेदाभेदाच्या भ‌िंतीला तडा जाईल,' असे आवाहन किरण बेदी यांनी केले. 'हमे सजग नागरिक बनना है, नवराष्ट्र निर्माण करना है' या विषयावर त्या बोलत होत्या. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दीपर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमांना शनिवारी सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर होते. व्यासपीठावर सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, सहचिटणीस व श्री स. भु. शताब्दी समारोह समितीचे संयोजक डॉ. श्रीरंग देशपांडे उप‌स्थित होते. संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थी व पालकांनी सभुचे मैदान खचाखच भरले होते. बेदी यांनी आपल्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली. 'भारतातली ९० मुले केवळ पाच वर्षे शिक्षण घेतात. तर चीनमधली ९५ मुले १२ वर्षे शिक्षण घेतात. याचाच अर्थ भारतात शालेय गळती आहे. हे थांबवायचे असेल तर एक सोपा मार्ग आहे. प्रत्येक पुढच्या वर्गातल्या मुलाने मागच्या विद्यार्थ्याला शिकवायला हवे. तुमच्या परिसरातल्या, जवळच्या खेड्यातल्या मुलांना शिकवा. स्वतःच खर्च कमी करा, पण ‌हे काम नक्की करा. आपण केवळ अधिकारांवर बोलतो. मात्र, कर्तव्ये अगोदर समजून घ्या. समजदार व्हा, कर्मी बना, महिला असो की पुरुष एकमेकांचे रक्षक बना, आधुनिक व्हा व सेवक बना. शिक्षण अर्थात दान. चांगल्या विचारांचे दान, नीतीमत्तेचे दान. अन्यायासमोर न झुकता काम करा. धैर्यशीलता व समजूतदारपणा हीच ‌नागरी संस्कृती आहे. मुलींनीही स्वतःला स्वावलंबी करणे अतिशय गरजेचे आहे. हुंडा देऊ नका. शिक्षणाने समाज बदलला असता तर हुंडाबळी, जातपात, भेदभाव नाहीसा झाला असता. एक जबाबदार नागरिक म्हणून व्यक्तिमत्व घडवा.'यावेळी उमेश दाशरथी, शीतल पहाडे, मुरलीधरन, पी. एम. चोरडिया व राज बिंद्रा यांचा सत्कार करण्यात आला. मनिषा हजारे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार खोतकर समर्थकांची घुसखोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,खुलताबाद
शनी अमावस्येनिमित्त श्री. भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शनिवारी मोठी गर्दी झाली होती. भद्रा मारुती मंदिरात महिलांना झटपट दर्शन घेता यावे म्हणून करण्यात आलेल्या व्यवस्थेचा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या सोबत आलेल्या समर्थकांनी घुसखोरी केल्याने तासनतास रांगेत उभे असलेल्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
जालना येथील शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शनी अमावस्येनिमित्त दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्री. भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी महिलांसाठी असलेल्या रांगेतील प्रवेशद्वारातून प्रवेश मिळवून दर्शन घेतले. याप्रसंगी सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळही केली. रांगेत उभे न राहता झटपट दर्शन घेण्यासाठी ५० रुपयांत स्पेशल दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली असलीतरी पुरुष महिलांच्या रांगेत घुसखोरी करू लागले आहेत. त्यामुळे महिला भाविकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. ५० रुपये देऊन स्पेशल दर्शनाची पावती चेक करून प्रवेश देणाऱ्या सुरक्षारक्षकांशी भाविकांचे खटके उडू लागले आहेत. झटपट दर्शनासाठी ५० रुपयांत दर्शनाची सुविधा सुरू झाल्यामुळे भाविकांच्या लांबलचक रांगा दिसू लागल्या आहेत. स्पेशल दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना तसेच महिलांसाठी असे स्वतंत्र व्यवस्था असतांना देखील, महिलांच्या रांगेत पुरुष भाविक घुसखोरी करत असल्याचे दिसू येत आहे. या पुरुषांना हटकण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि भाविक यांच्यात वादविवाद होऊन यापूर्वी अनेक भाविकांवर भादंवी कलम ३५३ शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. विशेष म्हणजे स्पेशल दर्शनासाठी असलेल्या प्रवेशद्वारावर व्हीव्हीआयपीसोबत येणारे लोक विनाकारण वाद घालतात. प्रत्येक भाविकांशी भांडणच करायचे का ? असा सवाल स्वंयसेवकांपुढे उपस्थित होत आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या सोबत आलेल्या समर्थकांच्या घुसखोरीबद्दल रांगेत उभे असलेल्या भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...मोपे साई ने रंग डाला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मोपे साई ने रंग डाला' हे भजन शंकर विधाते यांनी राग मुलतानीतमधून सादर करत उपस्थितांना भक्तीरसात चिंब केले. योगीराज संगीत अकादमी व श्री शंकरबाबा भक्तमंडळ यांच्या वतीने आयोजित डॉ. गुलाम रसूल संगीत महोत्सवास शनिवारी सुरुवात झाली. यावेळी शंकर विधाते, डॉ. पराग चौधरी यांच्या सादरीकरणाने रसिकांचे कान तृप्त झाले.
महोत्सवात गायनाबरोबर यंदाही भार्गव देशमुख यांनी रसिकांना तबला वादनाने मंत्रमुग्ध केले. अकादमीच्या संचालक मीनाक्षी चौधरी यांनी ' पुरियाधनाश्री' हा राग व 'आई तू निर्गुण निराकार गं' हे गीत सादर केले. डॉ. गुलाम रसूल यांच्याविषयी आपली निष्ठा गायनातून सादर करत डॉ. पराग चौधरी यांनी राग जोगकंस मधील 'सुघरवावर पायो' ही बंदिश सादर केली. त्यातून रसिकांना शास्त्रीय संगीतातील स्वरशक्तीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पं. कलापिनी कोमकली यांनी रागाने कार्यक्रमात बहार आणली.
प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते उदघाटन झाले. डॉ. श्रीराम चौधरी अध्यक्षस्थानी होते. अरविंद मुळे, विनायक देवळाणकर, नायबराव देशमुख, समाधान जाधव, प्रसाद टेकाळे, ए. जी. वाडेकर, डी. आर. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. पंडित विनायक पांडे, योगेश हरबक तसेच गजानन केचे यांनी संवादिनीवर तर प्रशांत गाजरे, सागर पटोकार यांनी तबल्यावर साथ दिली. गेल्या पाच वर्षांत पराग चौधरी आणि मीनाक्षी चौधरी यांना गायलेल्या रागांचे संकलन करून तयार केलेल्या 'अलवार स्पर्श' या ध्वनीफितीचे प्रकाशन पं. कलापिनी कोमकली यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमातील तीन भाग्यवान विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. प्रकाश मुधळवाडकर, शुभांगी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images