Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘आ बैल मुझे मार; असे दिवसाआड नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एक दिवसआड पाणीपुरवठा म्हणजे आ बैल मुझे मार ठरू नये. यासाठी योग्य नियोजन करा,' अशा सूचना देत महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी 'समांतर'ला चिमटा काढला.

महापौर त्र्यंबक तुपे यांनी एक दिवसआड पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेचे अधिकारी व समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी ही सूचना केली. कंपनीने शनिवारी मेगा शटडाउन घेऊन जलवाहिनी दुरुस्तीची विविध कामे केली. या कामांचा आढवा तुपे यांनी घेतला. मेगा शटडाउनच्या काळात छोटीमोठी ५७ कामे केल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी पैठण ते नक्षत्रवाडी दरम्यान २० कामे करण्यात आली. या कामांमुळे जायकवाडीहून शहरात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होणार आहे. पाण्यात वाढ झाल्यामुळे औरंगाबादला एक दिवसआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे महापौर म्हणाले. वॉर्डावॉर्डांमध्ये अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्याची नगरसेवकांकडून मागणी होत आहे, परंतु कंपनीने ही कामे बंद केली आहेत. आठ दिवसात ही कामे सुरू करा आणि अंतर्गत जलवाहिनी टाका,' असे आदेश तुपे यांनी दिले.

काम असमाधानकारक
शहरात १५०० किलोमीटर अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे टार्गेट आहे, पण आतापर्यंत फक्त ३० किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. कामाची ही गती असमाधानकारक आहे. गतीने काम करण्याची गरज आहे, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहराची स्मार्ट कात; डेपोवर ९० टन कचरा घटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वॉर्डातला कचरा वॉर्डातच जिरवण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नारेगाव डेपोवर जाणारा तब्बल ९० टन कचरा कमी झाला आहे. कचरा वाहक वाहनांच्या ३५ फेऱ्याही कमी झाल्यात. पालिकेच्या इतिहासात घनकचरा व्यवस्थापनात प्रथमच असा सकारात्मक बदल झाला आहे.

ओला - सुका कचरा वेगवेगळा करून ओला कचरा वॉर्डातच जिरवून त्याचे खत करणाऱ्यावर पालिकेने भर दिला आहे. सुका कचऱ्यावरही वॉर्डातच प्रक्रिया करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या पुढाकाराने घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख शिवाजी झनझन यांनी या कामासाठी पालिकेची फौज कामाला लावली. कचरामुक्त वॉर्ड ही संकल्पना राबवण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यासाठी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. ओला - सुका कचऱ्याचे घरातच विघटन करून हा कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी काही वॉर्डांची निवड केली आणि या वॉर्डांमध्ये यशस्वीपणे कचरा विघटनाचा प्रयोग सुरू झाला. त्याचा परिणाम म्हणून वॉर्डावॉर्डातून नारेगाव येथील कचरा डेपोवर नेल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात कपात झाल्याचे झनझन यांनी सांगितले. नव्वद टन कचरा नारेगाव येथील कचरा डेपोवर नेला जात नाही. हा कचरा वॉर्डांमध्येच जिरवला जातो. या प्रकारामुळे कचराडेपोवर जाणाऱ्या वाहनांच्या खेपा ३५ नी कमी झाल्या आहेत. त्यामुळे इंधनाचा खर्चही वाचल्याचा दावा झनझन यांनी केला.

वेगवेगळ्या कचराकुंड्या ठेवा
उद्या मंगळवारपासून शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने, हॉटेलचालकांनी, मंगलकार्यालयांच्या मालकांनी त्यांच्या प्रतिष्ठानात ओला आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या कुंड्या ठेवणे बंधनकारक केले जाणार आहे. याची याची तपासणी मंगळवारपासून केली जाणार आहे. ज्या ठिकाणी वेगवेगळ्या कचरा कुंड्या आढळणार नाहीत, त्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सुरक्षेपासून मनपा दूरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे रस्ते अपघातामुळे रोज एक जीव जात आहे. मात्र, दुसरीकडे हे अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने केलेल्या सूचना महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने बासनात गुंडाळल्या आहेत.

‌यंदा रस्ता सुरक्षा सप्ताह नियोजनापूर्वी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडूने सूचना द्याव्यात असे आदेश राज्य शासनाने दिले होते. या प्रमाणे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा जिल्ह‌ाधिकारी निधी पांडेय यांनी विविध विभागांना सूचना केल्या. यात महापा‌लिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, हायवे पोलिस तसेच ग्रामीण पोलिसांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात वाहतूक सुरक्षेसाठी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. 'आरटीए' कमिटीने महापालिकेला शहरातील सिग्नल दुरुस्त करणे, उघडलेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, लेन पट्टे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे, तसेच साइन बोर्ड लावण्याचेही आदेश दिले. शहरातील पार्किंग समस्या सोड‌विण्यासाठी शहर आणि निवासी इमारतीचे सर्वेक्षण करून, पार्किंग समस्या सोडविण्याची सूचना केली. मात्र, महापालिकेने वाहतूक सुरक्षेसाठी नेमलेल्या आरटीए कमिटीच्या साऱ्या सूचना बासनात गुंडाळून रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू केला आहे. शहरातील जालना रोडवरील काही चौकांमधील ‌सिग्नल बंद आहेत. व्हीआयपी रोड, गारखेडाकडे जाणारा गजानन महाराज मंदिर रस्ता, महर्षी दयानंद सरस्वती चौक ते शहानूर मियॉ दर्गा चौकापर्यंतचे सिग्नल बंद आहेत. एकाही मार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारलेले नाहीत. महापालिकेच्या या अजब कारभारामुळे वाहतूक सुधारणा होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे हात वर
जिल्हा सुरक्षा समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या सूचनांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांना विचारले असता त्यांनी जिल्हा क्षेत्र संभाळणाऱ्या कार्यकारी अभियंता गाडेकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. गाडेकर यांना विचारणा केली असता 'मी बैठकीला उपस्थित नव्हते. मला काही माहिती नाही. माहिती घेऊन सांगते,' अशी प्रतिक्रिया मिळाली.

घाट रस्त्यावर अपघात फलक लावून पोलिस हेल्पलाइनची माहिती दयावी अशा सूचना मिळाल्या आहेत. फलक लावण्याबाबत सार्वजनिक विभागाला पत्र दिले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निर्जन रस्त्यांवर नियमित पेट्रोलिंग वाढवली ाहे.

- यशवंत जाधव, पोलिस निरीक्षक, ग्रामीण वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचे सर्वपक्षीय बेरजेचे राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
शेतकरी, उद्योजक व्यापारी यांच्यासोबत संवाद, जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वपक्षीय बेरजेचे राजकारण करून मुख्यमंत्री निवांतपणे मुंबईला परतले. दुष्काळी परिस्थिती आणि उद्योंगावरील संकट अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यांकडे सर्वांचे मोठे लक्ष होते.
पैठणहून दुपारी एक वाजेच्या सुमारास ते जवखेडा बु. या गावी आले. खासदार रावसाहेब दानवे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर जालन्यातील कलश सीड्स या बियाणे उद्योगाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केले. येथील शेतकरी पीक प्रदर्शन त्यांनी बघितले. जिनोमेक्स लॅबचे उद्घाटन केले. जालन्यातील उद्योजकांसोबत संवाद साधला. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी जाऊन आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील विकास कामांचा आढावा घेतला.
यानंतर मुख्यमंत्र्यांचा राजकीय बेरजेचे विशेष संपर्क अभियान सुरू झाले. पहिल्यांदा ते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी गेले. मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत टोपे परिवाराने यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी टोपेंच्या घरी हुरडा दही आणि शेंगदाण्याची चटणी अगदी मनापासून खाल्ली. आमदार राजेश टोपे यांचा सोमवारी वाढदिवस होता आणि याच मुहुर्तावर मुख्यमंत्र्यांनी त्यांनाशुभेच्छा दिल्या.
त्यानंतर मुख्यमंत्री भाग्यनगर भागातील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि जनसंघाचे जेष्ठ नेते स्वर्गिय वसंतराव सेलगांवकर यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे खंदे समर्थक एस. एन. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी ते गेले.
मुख्यमंत्र्यांच्या या बेरजेच्या राजकीय संपर्क अभियानाचा समारोप शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी चहा घेऊन त्यांनी केला. अन त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा औरंगाबादला रवाना झाला. वास्तविक मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सायंकाळी पाच वाजता संपणार होता आणि ते हेलीकॉप्टरने थेट मुंबईला जाणार होते. मात्र, शेतकरी उद्योजक मेळावा आणि विकास आढावा झाल्यावर त्यांनी हेलिकॉप्टरने जाणे रद्द करून या सर्व भेटी गाठी घेतल्या. त्यानंतर रात्री आठच्या विमानाने ते मुंबईला गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरेसा निधी देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी चार महिने महत्त्वपूर्ण असून या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान व जलसंधारणाची विविध कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावीत. या कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही या अभियानासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियांनांतर्गत जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारणाच्या कामांसंदर्भातील, टंचाई उपाययोजना, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना यासंदर्भातील आढावा बैठक झाली. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, नगरपरिषदेच्या अध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार राजेश टोपे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर तसेच संबंधित विभाग व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या 'माय जालना' या अन्ड्रॉइड अॅपचे तसेच जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मागेल त्याला शेततळे देण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी नियोजनबद्ध् कार्यक्रम आखावा,या संदर्भात व्यापक प्रचार- प्रसिद्धी करून शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून घ्यावेत. भूजल सर्वेक्षण विभागाने शेततळयासाठी योग्य जागेची निवड शेतकऱ्यांना करून द्यावी. शेतकऱ्यांचे ट्रॉन्सफॉर्मर जिल्ह्यातच ट्रॉन्सफॉर्मर भवनात त्वरीत दुरूस्ती करून देण्यात यावी. शेतकऱ्यांना वीज जोडणी त्वरीत देण्यात यावी. मार्च २०१६ पर्यंत पेडपेंडींगची प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत. वाढत्या शहरांसाठी नियोजनबद्ध आराखडे तयार करण्यावर भर देण्यात येत असून जालन्यासाठी सिडकोचा नवीन जालना प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.'
जालना जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी लक्ष घालावे. रस्त्यांच्या कामासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात असून नरेगाअंतर्गत मजूरांना कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात रेशीम उत्पादन मोठया प्रमाणावर होत असून राज्याबाहेरही रेशीम विक्री होत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी नवीन जालना प्रकल्प याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रकल्पासाठी पर्यावरण निकष पालनाचा तसेच नगर नियोजनासंबंधी अनुषंगीक बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे, सिडको वसाहतीसाठी घाणेवाडी जलाशयातून पाणी घेण्यासाठी योजना आखल्या जाणे संयुक्त आहे. घाणेवाडीमध्ये गाळ काढण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे, असे केंद्रेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक निर्णयाची सहकार विभागाला प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
मनमानी, बेकायदा कारभारामुळे राज्यातील सहकारी बँकांना दिवाळखोरीत आणणाऱ्या संचालकांना तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संचालक मंडळ बरखास्त झालेल्या संबंधित माजी संचालकांना यापुढे दहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणारा धाडसी निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तरी हा आदेश केवळ राज्य सहकारी बँकेपुरताच मर्यादित आहे की ते संचालक इतर बँकेवर संचालक असतील तर त्या बँकांनाही लागू होणार याविषयी सहकार खाते अद्यापही अनभिज्ञच आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून राज्य सहकारी बँकेवर आतापर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे हे संचालक राहिले आहेत. राज्य शासनाने बँक अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर कारवाई होणार हे अटळ आहे. मात्र, कारवाई अंतर्गत गुंतलेले संचालक म्हणून काम करीत असतील त्यांना हा अध्यादेश लागू होणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
यासाठी जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात अद्याप शासनाकडून स्पष्ट आदेश नाहीत असे सांगितले. सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुचविलेल्या उपायानुसार सहकारी बँकासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करून भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीमुळे बरखास्त झालेल्या संबंधित माजी संचालकांना त्या बँकांच्या व्यवहारापासून दूर ठेवण्याचा हा निर्णय आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ (क) आणि (अ) मध्ये (३ अ) चे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सहकारी बँकेच्या संचालकास मंडळाच्या दोन कालावधीसाठी संचालकपद धारण करण्यास अपात्र ठरविण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, विभागीय निबंधकांकडून यासाठीच्या कोणत्याही सूचना अथवा आदेश अद्याप जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे राज्य शिखर बँकेत संचालकांवर जर कारवाई होणार असेल तर तेच संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे सहकार खाते यासंदर्भाने काय परिपत्रक काढते याकडे राजकीय नेते मंडळींचे लक्ष लागून राहीले आहे.

सहकार कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कलमानुसार सहकारी बँकेच्या संचालकांना त्या बँकेवर अथवा अन्य कोणत्याही बँकेवर संचालक मंडळाच्या दोन कालावधीसाठी संचालक पद धारण करण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद केली आहे. मात्र, या संदर्भातील स्पष्ट सूचना विभागीय उपनिबंधक अथवा शासनाकडून प्राप्त झालेल्या नाहीत.
शिवाजी पी. बडे,
जिल्हा उपनिबंधक, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमायतनगर, वाशी नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व

$
0
0

टीम मटा औरंगाबाद
मराठवाड्यातील पहिल्यांदाच झालेल्या हिमायतनगर व वाशी नगरपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व प्रास्थापित केले आहे. दोन्ही नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
हिमायतनगरमध्ये काँग्रेसची बाजी
म. टा. प्रतिनिधी, नांदेड
हिमायतनगर नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून, काँग्रेसने निर्विवाद वचस्व मिळविताना १० जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेला ४, राष्ट्रवादी २ तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेसचे समदखान, ज्ञानेश्वर शिंदे, शिवसेनेचे बाळू आण्णा, भाजपचे गुंडेवार या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या खेळीला यश मिळाले असून, निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. माजी आमदार माधवराव पाटील- जवळगावकर यांचे परिश्रम फलदायी ठरले. काँग्रेसचे म.जावेद अ.गन्नी, वार्ड अ.अखिल अ.हमीद, सालेहा बेगम आहाद, पंचफुलाबाई लोने, लक्ष्मीबाई भवरे, राबिया बेगम मुस्तफा खान, सविता पाटील, नूरजहॉँ बेगम युसुफ खान, खान शमीम बानो, सुरेखा सातव यांनी विजय प्राप्त केला आहे. शिवसेनेचे विनायक मेंडके, कुणाल राठोड रामराव, अनुसया डाके, राम ठाकरे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर मुधोळकर, हिनाबी सरदार खान पठाण हे विजयी ठरले.
समद खान पराभूत
वार्ड क्रमांक १६ मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य व नगराध्यक्ष पदाचे दावेदार समद खान हाजी जलाल खान यांना २३५ मिळाली तर अपक्ष उमेदवार अ.गुफरान अ.हमीद यांना ३२५ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत समद खान यांचा ९० मतांनी पराभव करून अपक्ष उमेदवार अ.गुफरान यांनी विजय मिळविला.

वाशी पंचायतीवर काँग्रेसचा झेंडा
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
वाशी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर या निवडणुकीत सेनेचा बार फुसका ठरला आहे. वाशी नगरपंचायतीवर भगवा फडकणर असा गवगवा करणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
वाशी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सदस्य निवडीसाठीचे मतदान १० जानेवारी रोजी पार पडले. ११ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. या नगरपंचायतीच्या १५ जागांपैकी १२ जागांवर प्रशांत चेडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने घवघवीत यश प्राप्त केले आहे. वाशी नगरपंचायतीवर विजयी झेंडा फडकाविण्याचा पहिला मान काँग्रेसला मिळाला आहे.
या निवडणुकीत १७ पैकी १२ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत, तर सुरेश कवडे यांच्या परिवर्तनवादी आघाडीला ४ जागा मिळाल्या. शिवसेनेला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात सीड क्लस्टर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना हे महाराष्ट्राचे सीड बास्केट आहे. या बियाणे उद्योगाला चालना देण्यासाठी जालन्यात सीड क्लस्टर उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. कलश सीड्‌स बेजो शीतल या बियाणे उद्योगातर्फे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

जालना जिल्ह्यात सीड क्लस्टर निर्माण करण्यासाठी राज्य सरकार ५० टक्के रक्कम देईल. उर्वरित रक्कम खाजगी गुंतवणूकीतून उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतीमध्ये पायाभूत गुंतवणूक करण्याची गरज आहे. पीककर्ज आणि अनुदानामुळे शेतकरी कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कापूस ते कापड आणि पुढे फॅशन डिझायनर असा एकत्रित एकाच छताखाली उद्योग सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबाजावणीतून शेतीला शाश्वत पाणी मिळत आहे, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पाणी, वीज आणि बाजारपेठ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मेहनत करत आहेत, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले.

कलश सीड्‌सचे संचालक सुरेश अग्रवाल यांनी प्रास्तविक केले. शिवकुमार बैजल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार अर्जून खोतकर, माजीमंत्री राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी रंगनायक उपस्थित होते.


मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात केली, त्यावेळी समोर बसलेल्या चार तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी आशा घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने बाजूला नेले. त्याचबरोबर डाव्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी कर्जमाफीसाठी कार्यक्रमात घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पळशीच्या अश्फाक शाहची सुवर्णझेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पळशीच्या अश्फाक शाह या कुस्तीपटूने नवा इतिहास घडवला. तब्बल २८ वर्षांनंतर औरंगाबादच्या कुस्तीपटूला सुवर्णपदक जिंकण्याची किमया करण्यात यश आले. मॅटची सुविधा नसतानाही त्याने सुवर्णपदक जिंकले याचा पळशीकरांना मोठा अभिमान वाटत आहे.

औरंगाबादपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पळशी हे गाव अश्फाक शाहची कर्मभूमी. पळशीला कुस्तीची चांगली परंपरा लाभलेली आहे. अश्फाकचे मामा नासेह उस्ताद हे गावातील मातब्बर कुस्तीपटू म्हणून परिचीत. मामाची कुस्ती आखाड्यातील डावपेच पाहून अश्फाकलाही लहानपणी कुस्तीची आवड निर्माण झाली. वयाच्या दहा वर्षांपासून तो आखाड्यात कुस्तीचे डावपेच शिकू लागला.

नागपूर येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ७० किलो वजन गटात अश्फाक शाहने सुवर्णपदक जिंकले. सातारा, अहमदनगर, पुणे, कोल्हापूरच्या मातब्बर मल्लांना पराभूत करून त्याने अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत सोलापूरच्या विकास बनकरचा ५-३ असा पराभव करून अश्फाकने सुवर्णपदक पटाकाविले. अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अश्फाकला तीन फेऱ्यांपर्यंत मजल मारण्यात यश आले होते. दुसेऱ्याच प्रयत्नात त्याने सुवर्णपदक जिंकून आपल्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.


दरमहा पंधरा हजारांचा खुराक

अश्फाकचे वडिल हमीद शाह हे शेती करतात. पळशी गावातच त्यांची अवघी एक एकर शेती आहे. कोरडवाहू शेती असल्याने कुस्तीचा खर्च कसा भागवायचा हा पेच त्यांना भेडसावतच असतो. कुस्तीपटूसाठी बदाम, काजू, दूध, फळे हा आवश्यक आहार दैनंदिन घ्यावाच लागतो. दरमहा हा खर्च १५ हजार रुपयांच्या घरात जातो. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असूनही मुलाची आवड पाहून त्याचे वडिल शेतात मेहनत करुन खर्च भागवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुमंत्र ः संडे हॉलिडे नव्हे, व्यसनमुक्ती-डे!

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
भाषा विषय म्हटलं की विद्यार्थी अनेकदा नाक मुरडतात, परंतु शिक्षक तल्लीन होऊन शिकवणारा असेल, विद्यार्थ्यांमध्ये रममाण होणारा असेल तर बातच निराळी. औरंगाबादच्या सुधाकरराव नाईक हायस्कूलचे विजय राठोड हे असेच शिक्षक. स्वतःला विसरून मुलांमध्ये रमणारे. कविता असेल किंवा एखादा उतारा शिकवायचा असेल तर मुलांच्याच बोलीभाषेतील शब्दांचा वापर अधिक करण्यावर कटाक्ष. थेट कृतीला वाव देण्यासाठी नाचायचे असेल तर प्रसंगी नाचणारा, गाणे गात विषयाचे ज्ञान पोचविणारा शिक्षक. मुलांमध्ये अधिक रममाण होणारा हा गुण 'शाळेतील सानेगुरुजी' अशी उपाधी त्यांना देऊन गेला. सहकारी शिक्षक, विद्यार्थीही याच नावाने त्यांना ओळखतात. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सुटीच्या दिवशी ते व्यसनमुक्तीसाठी काम करतात.

शालेय स्तरावर भाषा विषयाला प्रचंड महत्त्व आहे. हे विषय शिकविणे सोपी गोष्ट नसते. तुम्हालाही त्या भाषेबद्दल ओढ, बारकावे माहित असणे आवश्यक आहेत. मुलांमध्ये रमत-गमत हा विषय शिकविला गेला तर ते धडे कायम स्मरणात राहतात. त्यासाठी शिक्षक कशी मेहनत घेतात यावर सर्वकाही अवंलबून असते. विजय राठोड यांनी मात्र पारंपरिक वाटेपेक्षा बोलीभाषेवर भर दिला आहे. बोलीभाषेतील शब्द आपल्या शिकविण्यात समाविष्ट करत विषयाचे ज्ञान देण्याचा त्यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांना भावतो. इयत्ता ५वी ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी विषय ते शिकवितात. विषयात पूर्णपणे रममाण होत थेट कृतीला वाव देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वयंअध्ययनवर भर देत मुलांचा अधिकाधिक सहभाग घेऊन त्यांना त्यांच्याच भाषेत विषयाचे ज्ञान देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शुद्धलेखनाचा तास असेल, विद्यार्थ्यांना काही लिहायचे असेल तर, विद्यार्थ्याने काय लिहिले हे मुलेच तपासतात. एकमेकांच्या वह्या मुलांनी तपासल्या तर त्यांना चुका लवकर लक्षात येतात, स्वतःची चूक मुलगा लगेच दुरूस्त करण्यासाठी प्रयत्न करतो आणि पुन्हा ती चूक टाळण्याचा प्रयत्न करतो, असे ते सांगतात. विद्यार्थ्यांच्या आजुबाजुला रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी उदाहरणात सांगितल्या तर, ते लवकर आत्मसात करतात, हे ओळखून तशा प्रकारचीच उदाहरणे त्यांच्या अध्यापनात असतात. ‌हिंदी बोलताना विद्यार्थ्यांना चुकण्याची भीती असते. अशावेळी बोलीभाषेतील शब्द जसे की प्राणी, भाज्यांची नावे मुलांनाच लिहायला ते सांगतात. कठिण शब्दाचे पर्याय उदाहरणातून मांडले की विद्यार्थ्यांना कठिण शब्द कधी सोपा झाला हेही समजत नाही. २०००पासून ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीला संस्थेच्या वाटूर फाटा येथील शाळेत कार्यरत असलेले हे राठोड औरंगाबादच्या शाळेत २००९मध्ये आले. पहिल्या दिवसापासून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आपलेसे केले. कोणत्याही उपक्रमात राठोड सर नसतात असे होत नाही. पुंडलिकनगर परिसरातील ही शाळा, शाळेतील येणारा विद्यार्थी हा मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्गातला. छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या कुटुंबातील बहुसंख्य मुले. त्यांना कायम प्रोत्साहन देत त्यांच्या मदतीला धाऊन जाण्याचा राठोड यांचा प्रयत्न असतो. परिपाठात विद्यार्थ्याने कविता चांगली गायली, उतारा चांगला म्हटला तर त्याला बक्षिसी देण्यासाठी राठोड सरांचा हात खिशात जाणारच! प्रश्न दहा-वीस रुपयांचा नसतो, परंतु मुलांना त्यामुळे प्रेरणा मिळते. आपणही चांगलो गाऊ शकतो, वाचू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो, असे राठोड सांगतात. शिक्षणासह व्यसनमुक्तीसाठीही ‌विजय राठोड यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाची तळमळ बाळगणाऱ्या राठोड यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दारूचे व्यसन सोडविले. मूळ जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगावचे असलेले राठोड सुटीच्या दिवशी आपल्या गावाच्या परिसरात व्याख्याने देत व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करतात.

व्यसनमुक्तीवर २ हजार म्हणी
आपल्या अध्यापनावर कोणताही परिणाम होऊ न देता, व्यसनमुक्तीसाठी झटणारे विजय राठोड सुटीच्या दिवशी या कामाला वाहून घेतात. व्यसनमुक्तीसाठी शासकीय स्तरावर खूप प्रयत्न झाले. कायदेही आहेत, परंतु पाहिजे तसा परिणाम झाला नाही. आपल्या गावातील दारू पिणाऱ्यांची स्थिती पाहिली आणि यासाठीही आपण काही करावे म्हणून २०१२पासून हे काम सुरू केले. त्यासाठी ते आयुर्वेदिक उपचारांचाही आधार घेतात. दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले हे पाहिले की मन हेलावते. अशावेळी आपल्या बोलण्यातून कोणाची दारू सुटली तर हे समाधान जगण्याचे बळ देणारे आहे, असे ते सांगतात. 'व्यसनमुक्त समाज घडवूया, आनंददायी जीवन जगूया' अशा तब्बल २ हजार म्हणी त्यांनी व्यसनमुक्तीवर बनविल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचे कामकाज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कामगारांनी सोमवारापासून (११ जानेवारी) कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज बंद पडले. शैक्षणिक विभाग व प्रशासकीय इमारतीत असलेल्या १२३ विभागांच्या कामकाजावर आंदोलनाचा परिणाम झाला.

रोजंदारी कामगारांना विद्यापीठ सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून हे कर्मचारी करत आहेत. याबाबत विद्यापीठ ठोस निर्णय घेत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी आज कामबंद आंदोलन सुरू केले. सहा महिन्यांत कामगारांनी तीन वेळा आंदोलन केले. अनेक कर्मचारी दहा-बारा वर्षांपासून रोजंदारी पद्धतीवर काम करत आहेत. प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्यामुळे कामगारांमध्ये संताप आहे. विद्यापीठातील अनेक विभागांचा कारभार रोजंदारी कामगारांवर अवलंबून आहे. त्यामुळे कामबंद आंदोलन विद्यापीठाचे कामकाज बंद करणारे ठरले. सकाळी दहापासून हे कर्मचारी मुख्य इमारतीसमोर काम बंद करून साखळी उपोषणाला बसले. आम्हाला न्याय द्या, आमच्या कुटुंबाचा विचार करा, नोकरीत समावून घ्या, अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या.

आंदोलनात सर्वच कामगार सहभागी झाल्याने विद्यापीठातील विभागांमध्ये सामसूम होती. विशेषतः परीक्षा विभागातील कामकाजावर याचा सर्वाधिक परिणाम झाला.

विद्यापीठ पेचात
कामगार कंत्राटदाराने नेमले असल्याने त्याच्याशी विद्यापीठाचा संबंध नसल्याचा पवित्रा प्रशासनाने पूर्वी घेतला होता. कामगारांच्या रेट्यासमोर काय करायचे, असा पेच विद्यापीठासमोर आहे. कामगारांचा पीएफचाही प्रश्न प्रलंबित आहे.

समिती घोषणेपुरतीच
विद्यापीठाने ७ ऑक्टोबर रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत समिती स्थापन केली. समितीमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव बी. डी. देशमुख आणि विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. एम. डी. सिरसाठ यांचा समोवश आहे. समितीचा निर्णयही केवळ घोषणेपुरताच ठरल्यानेही कामगारांमध्ये संताप व्यक्त होतो आहे.

प्रशासन म्हणते, तोडगा निघेल
प्रशासनाची या प्रश्नावर मॅरेथॉन बैठक पार पडली. त्यावेळी कामकाजावर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्यात आला. मागण्यांवर चर्चा करण्यात आली. काही मागण्या शासनस्तरावरील आहेत. विद्यापीठस्तरावरील मागण्यांबाबत दोन दिवसांत तोडगा काढण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांचे सर्वेक्षण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेसाठी अडथळा ठरत असलेल्या नाल्यांवरच्या अतिक्रमणांचे आठ दिवसांत सर्वेक्षण करा आणि त्यावरील कारवाईचा अहवाल आयुक्तांना सादर करा, असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्वेक्षणासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे भूमिगत गटार योजनेच्या कामाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणांमुळे अनेक नाले अरुंद झाले असून, त्यातून गटार योजनेचे पाइप टाकणे अशक्य झाले आहे. नाल्यांमधून पाइप न टाकल्यास भूमिगत गटार योजनेच्या कामाला काहीच अर्थ राहणार नसल्यामुळे महापौरांनी यासंदर्भात सोमवारी विशेष बैठक घेतली. नाल्यांवरच्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याचे काम तातडीने सुरू करा. हे काम आठ दिवसांत संपवा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या सर्वेक्षणासाठी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमणांची यादी तयार करून ती यादी आयुक्तांना सादर करा, आयुक्त त्यावर निर्णय घेतील, असे महापौरांनी स्पष्ट केले. आयुक्तपदी सुनील केंद्रेकर असेपर्यंत ही अतिक्रमणे पडतील, त्यामुळे सर्वेक्षणाचे काम वेगाने झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

भूमिगत गटार योजनेअंतर्गत आवश्यक असलेल्या भागात ड्रेनेज लाइन टाका. नाल्याचे पाणी घरात शिरते, अशा भागाला प्राधान्य द्या. या योजनेचा १२० कोटी रुपयांचा निधी कपात झाल्याचे कारण सांगून अत्यावश्यक कामांकडे दुर्लक्ष करू नका, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली.

४० टक्के काम पूर्ण
भूमिगत गटार योजनेंतर्गत मुख्य ड्रेनेज लाइन टाकण्याचे ४० काम टक्के पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. जुलै २०१७पर्यंत संपूर्ण काम करण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने कामाची गती वाढवण्याचे आदेश महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यात २३ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सततची नापिकी, दुष्काळामुळे शेतकरी कंटाळला आहे. त्यामुळे मराठवाड्यात यंदाही आत्महत्यांचे लोण पसरण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

पेरणीवर हजारो रुपये खर्च करून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. खरीप पूर्णपणे वाया गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बीकडून मोठी आशा होती. मात्र, परतीच्या पावसाने गुंगारा दिल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून परिस्थितीत फारसा बदल न झाल्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आत्महत्यांचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सावकारी पाश, बँकांचा तगादा सहन न करू शकलेल्या या शेतकऱ्यांनी जीवनयात्राच संपवून टाकल्याचे चित्र मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दिसत आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात १ ते ८ ‌जानेवारी या कालावधीमध्ये २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा सरकार दरबारी नोंद करण्यात आला आहे. यातील एकाही प्रकरणात अद्याप चौकशी न झाल्यामुळे सर्व प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

जिल्हानिहाय आत्महत्या
औरंगाबाद : ३
जालना : ६
परभणी : १
हिंगोली : ०
नांदेड : ३
बीड : २
लातूर : २
उस्मानाबाद : ६
एकूण : २३


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन नियमांची प्रगती किती?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सिंचन नियम तयार करण्यासाठी दाखल जनहित याचिकेत नियमाविषयी प्रगती अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे व संबंधित अधिकाऱ्याला हजर राहण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी दिले.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ या मूळ कायद्यात नियमांचा अभाव आहे. गेल्या ३८ वर्षांपासून नियमांअभावी पाणीटंचाईचे नियोजन, पाणी वाटपाचे निकष ठरू शकलेले नाहीत. आतातरी नियमांची चौकट घालावी यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्या. बोर्डे व न्या. चिमा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या कायद्यानुसार नद्या लाभक्षेत्राचा, अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत अधिसूचना काढणे अपेक्षित आहे. हा कायदा जल व्यवस्थापनाची घडी बसवण्यासाठी आवश्यक आहे. लाभधारकांच्या दृष्टीने चांगल्या तरतुदी यात आहेत. पाणी टंचाईच्या काळात कशा प्रकारे नियोजन केले जावे यासंबंधी शासनास अधिकार दिले आहेत. परिस्थितीनुसार कोणते पीक घ्यावे यासंबंधी शासन बंधन घालू शकते. पाणी चोरी व कालवे फोडण्याला आळा घालण्याविषयी सरकारला अधिकार मिळतील. तर लाभ धारकाला पाण्याचा हक्क न मिळाल्यास नुकसान भरपाई मिळू शकेल. मात्र, गेल्या ३८ वर्षांपासून नियमांना बगल देण्यात आली आहे. त्यामुळे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

गेल्या वर्षी २० मार्च रोजी शासनाने यासंबंधी शपथपत्र सादर केले. कायद्याच्या कलम ११४ नुसार नियम तयार करणे बंधनकारक आहे तरी ते करण्यात आले नाही, याकडे याचिकाकर्त्याने लक्ष वेधले. सुनाणीअंती न्यायालयाने शासनाला प्रगती अहवाल सादर करण्याचा व अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले. याचिकेत राज्यशासन, कडा व सिचन विभागाच्या प्रधान सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होईल. याचिकाकर्त्यातर्फे प्रकाश परांजपे तर शासनातर्फे श्रीहरी दंडे हे काम पाहत आहेत.

मूळ कायद्यानुसार नियम तयार करा
मूळ कायदाच अंमलात आलेला नसताना तो अंमलात असल्याचे गृहित धरून इतर ९ कायदे तयार करण्यात आले. यातील आठ कायद्यात नियमावली तयार करण्यात आली नसल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याआधारे कोर्टात प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. आता मूळ कायद्यानुसार नियम तयार करावे, नियम का तयार झाले नाहीत याची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी अशी विनंती याचिकेत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा दिनानिमित्त आज मिरवणूक, युवा दौड

$
0
0

औरंगाबाद : राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मंगळवारी (१२ जानेवारी) शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे मिरवणूक, राष्ट्रप्रेरक युवा संस्थेतर्फे युवा दौड तर, नेहरू युवा केंद्रतर्फे युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारीरामकृष्ण मिशन आश्रमातर्फे मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता सिग्मा हॉस्पिटलपासून ही मिरणवूक निघणार आहे. या मिरवणुकीत सजीव देखाव्यांचा समावेश असेल. मिरवणूक सूत गिरणी चौक, गजानन महाराज मंदिर, रोपळेकर हास्पिटलमार्गे सिग्मा हॉस्पिटलच्या मैदानावर येऊन विसर्जित होणार आहे. नेहरू युवा केंद्रतर्फे १२ ते १९ जानेवारीदरम्यान युवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात वाळूज परिसरात मॅरेथॉन, चित्रप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रप्रेरक युवा संस्थेतर्फे मंगळवारी युवा दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता क्रांती चौकातून दौड सुरू होणार आहे. पैठण गेट, निराला बाजारमार्गे विवेकानंद कॉलेजच्या मैदानावर दौडची सांगता होणार आहे. विविध कॉलेजांचे विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थचे सचिव राहुल जैस्वाल, अजय देवकत्ते, अनुप असोपा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकरे महामार्गावरील डीपी स्थलांतर सुरू

$
0
0

औरंगाबाद ः 'क्रांतिचौक ते रेल्वेस्टेशन' या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्गावरील विजेचे खांब आणि डीपी हटविण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. सोमवारी वेदांत चौकातील डीपी हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.

ठाकरे महामार्गाच्या संदर्भात शुक्रवारी सिडको कार्यालयात आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत अधिकारी, नगरसेवक व कंत्राटदाराची बैठक झाली होती. सोमवारपासून या रस्त्याचे काम वेगाने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रस्त्यात बाधित होणारे वीजेचे खांब आणि डीपी हटविण्याच्या कामाला प्राधान्य द्या आणि ते हटवा असे आदेश केंद्रेकर यांनी दिले होते. यासाठी नगरसेवक विकास जैन, गजानन बारवाल यांनी आयुक्तांकडे मागणी केली होती. विजेचे खांब व डीपीमुळे रस्त्याच्या कामात अडथळे येत आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. सोमवारपासून डीपी व खांब स्थलांतराचे काम सुरू झाले. त्यासाठी वेदांतनगर, बन्सीलालनगर भागातील वीज पुरवठा सहा तास बंद होता.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांमुळे मोबाइल चोर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्याच्या खोलीतून मोबाइल लंपास करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी सकाळी नारळीबाग येथे हा प्रकार घडला. अमोल विठ्ठल जायभाये (वय २२ रा. रिसोड, जि. वाशिम) हा विद्यार्थी सध्या नारळीबाग येथे डांगे यांच्या घरात खोली करून राहतो. रविवारी सकाळी सव्वा सहा वाजता त्याच्या खोलीमध्ये विशाल बंडू धुळे (रा. पिंपळगाव, सेलू, जि. परभणी) हा शिरला.

विशाल पवार येथे राहतो का, अशी थाप मारीत अमोलला बोलण्यात गुंतविले. तसेच हातचलाखीने तेथील दोन मोबाइल लंपास केले. अमोलच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी इतर नागरिकांच्या मदतीने संशयित आरोपी विशालला पकडण्यात आले. सिटीचौक पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दुचाकीचोर गुन्हेशाखेच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगर येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना गुन्हेशाखेने गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून दीड वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. संजयकुमार राधेशाम चौधरी (रा. एन २, सिडको) यांची दुचाकी ११ जुलै २०१४ रोजी पुंडलिकनगर येथील पटियाला बँकेसमोरून चोरी झाली होती. या प्रकरणी त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद केली होती. शनिवारी गुन्हे शाखेचे पथक सातारा परिसरात फिरत असताना त्यांना खबऱ्याने ही दुचाकी एका संशयित आरोपीकडे असल्याची माहिती दिली होती. या माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपी विश्वास उर्फ बंडू बाबुराव भरते (वय ५० रा. अर्थनगरी, सातारा) व त्याचा साथीदार नितीन जयद्रथ वाघमारे (वय २९ रा. जयभवानीनगर) यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी या गुन्ह्याची कबुली देत ही दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली. आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुंडलिकनगर पोलिस चौकीकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकाने फोडून साठ हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एन चार भागात चोरट्यांनी शटर उचकटवून ६० हजारांचा ऐवज लंपास केला. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यामध्ये केटरर्स व दवाखान्याचे शटर उचकटवून या चोऱ्या करण्यात आल्या. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत जगदीश उपाध्याय (रा. एन ४) यांचे कामगार चौकातील चाटे हाऊसच्या बाजूला असलेल्या केसी कॉम्पलेक्समध्ये यशश्री केटरर्स आहे. शनिवारी केटरिंगचे दुकान बंद करून उपाध्याय घरी गेले होते. रविवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले. त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता कपाट फोडल्याचे आढळले. चोरट्यांनी कपाटातून ४९,५०० रुपयांची रक्कम लांबविली. तसेच चोरट्यांनी जवळच असलेल्या इंदू गंगा आर्केड येथील पहिल्या मजल्यावर असलेल्या ज्ञानेश बळवंत दिवाण यांचे दत्तकृपा नेत्रालय देखील फोडले. त्यांच्या दुकानाचे शटर उचकटवून गल्ल्यातील रोख दहा हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. दोन गटांत हाणामारी

जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता बनेवाडी येथे घडला. या प्रकरणी परस्पर विरोधात तक्रार दिल्याने क्रांतिचौक पोलिस ठाण्यात सोळा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. कार्तिक स्वरुपचंद राजपूत (वय १८) याने दिलेल्या तक्रारीमध्ये, कार्तिकच्या बहिणीला इंगळे ‌कुटुंबीयांनी शिवीगाळ केली होती. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी कार्तिक व त्याचे भाऊजी दीपक राजूभाऊ राजपूत गेले होते. यावेळी त्यांना आरोपी राहुल इंगळे, रमेश, राजू, विश्वनाथ, रुपेश, आकाश, रवी व ‌कार्तिक इंगळे यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात दुसऱ्या गटाच्या वतीने रमेश इंगळे यानी तक्रार दिली आहे. यामध्ये जुन्या वादातून रमेश, रविंद्र, आकाश, भिमाबाई व राहुल इंगळे यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी सचिन बिरवाल, कार्तिक भुजा, राजू, बबलू, नारायण ढोबाळ, पप्पू भुजा व दीपक राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाडेकरू महिलेला मारहाण

घर खाली करण्याच्या कारणावरून घरमालकाने भावाच्या मदतीने भाडेकरू महिलेला मारहाण केली. शनिवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार जयभवानीनगरात घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध मंगळसूत्र पळवुले व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयभवानीनगर येथील गल्ली क्रमांक एक येथे लता विक्रमराव शिनगारे (वय ४०) ही महिला कुटुंबासहित सोपान रघुनाथ मुंढे यांच्या घरात किरायाने राहते. शनिवारी रात्री साडेआठ वाजता शिनगारे यांच्या घरात घरमालक सोपान मुंढे व त्याचा भाऊ जबरदस्तीने शिरले. या दोघांनी शिनगारे यांना व मुलांना मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांना घराबाहेर हाकलून त्यांच्या घराला कुलूप लावले. या भांडणात त्यांच्या गळ्यातील चार हजार रुपयाचे मंगळसूत्र देखील हिसकावण्यात आले.

व्यापाऱ्यास लुबाडले

म्हशीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून व्यापाऱ्याचे २२,३५० हजार रुपये मारहाण करून लुबाडण्यात आले. शुक्रवारी रात्री दहा वाजता मोंढा रोडवर हा प्रकार घडला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमद हुसेन मोहमद इस्माईल (वय ४२ रा. गणेश कॉलनी) हे व्यापारी शुक्रवारी मोंढा रोडवरून दुचाकीवर जात होते. यावेळी डॉ. झाकेर हुसेन शाळेसमोर त्यांना नवाज पठाण, बाबर पठाण व ताहेर पठाण या तिघांनी अडविले. म्हशीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून त्यांनी या मोहमद हुसेन यांना शिवीगाळ करीत जखमी केले. तसेच ताहेर पठाणने त्यांच्या पँटच्या खिशातील २२,३५० रुपये जबरदस्तीने काढून घेत तिघांनी पलायन केले. हुसेन यांच्या या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोक्यात दगड टाकून खून करणाऱ्याला जन्मठेप, दंड

$
0
0

औरंगाबाद : जुन्या भांडणावरून डोक्यात दगड टाकून खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी सोमवारी (११ जानेवारी) ठोठावला.

याप्रकरणी मुक्तार करीम कुरेशी (४८, रा. समतानगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. ५ मे २०१३ रोजी रात्री सहा ते सात मित्र पार्टी करण्यासाठी हारूण कुरेशी यांच्या बांधकाम साईटवर जमले होते. या वेळी पार्टी सुरू असताना फिर्यादीचा मुलगा मुजफ्फर मुक्तार कुरेशी व आरोपी अजिम शहा उर्फ अज्जू आमीर शहा (२८, रा. समतानगर, औरंगाबाद) यांच्यामध्ये मोबाइल चोरीवरून बाचाबाची झाली आणि मृत मुजफ्फर मुक्तार कुरेशी याने आरोपी अजिमला मारहाण केली. त्यावेळी मित्रांनी त्यांचे भांडण सोडविले. त्यानंतर रात्री आरोपी अजिम व मृत मुजफ्फर हे तीन मित्रांसह तिथेच झोपले, तर त्यांच्यासोबतचे दोन मित्र घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सहाला आरोपी अजिम क्रांतिचौक पोलिस ठाण्यामध्ये गेला व त्याने तिथे जाऊन ठाणे अंमलदारासमक्ष सांगितले की, 'मी रात्रीच्या भांडणावरून मुजफ्फर कुरेशी याच्या डोक्यात दगड टाकून त्याला मारले आणि त्याचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पडलेला आहे.' त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी मृतदेह आढळला. या प्रकरणी मृत मुजफ्फर याचे वडील मुक्तार करीम कुरेशी यांनी फिर्याद दिली व त्यावरून भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी ए. पी. सोनवणे यांनी तपास केला व श्री. सोनटक्के यांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

तिघांची साक्ष महत्त्वपूर्ण

सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी १२ साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध केला. या प्रकरणी शेख नजीर, फेरोज पठाण व शेख आमीर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपीला जन्मठेप तसेच दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images