Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सातबारा ऑफलाइन; तहसीलदारांना नोटीस

$
0
0



औरंगाबाद : सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे काम रखडल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महिन्याअखेरपर्यंत ऑनलाइन सातबाऱ्याचे काम पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.
२००३ मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २००९ मध्ये एनआयसीकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. मार्च २०१४ पासून ऑनलाइन सातबाऱ्याचे काम सर्व तालुक्यांमध्ये रेंगाळले आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहाराचे हस्तलिखित सातबारे करून द्यावे लागले. यामध्येही अनेक घोळ झाले. जुन्या सातबाऱ्याच्या आधारे जमिनीची एका पेक्षा अधिक वेळेस खरेदी विक्री झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने सातबारा ऑनलाइन करण्याचे काम पुन्हा हाती घेतले आहे. फुलंब्री, खुलताबाद आणि कन्नड या तीन तालुक्यांत प्रायोगिक तत्वावर संगणकीकृत सातबारा देण्याचे काम करण्यात आले. मात्र, या तालुक्यातही मोठ्या प्रमाणवर नोंदी घेण्याचे कामे रखडले आहे. औरंगाबाद, पैठण, वैजापूर,
गंगापूर, सोयगाव, सिल्लोड या सहा तालुक्यातील ऑनलाइन सातबाऱ्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्यांना सातबारा घेण्यासाठी तलाठ्याकडे चकरा माराव्या लागतात.
सॉफ्टवेअरच नाही : तलाठी संघाने सातबारा ऑनलाइन करण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जात नाही. मंडळाच्या विविध ठिकाणी ब्रॉडबॅण्डची सुविधा नाही. त्यामुळे ऑनलाइन सातबारा करण्यासाठी अडचणी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलाठी, मंडळ अधिकारी ऑफिसला २ एकर जमीन

$
0
0


औरंगाबाद : तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी करमाड येथे दोन एकर गायरान जमीन देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी घेतला आहे. प्रशासनाने जमीन प्रदान करण्याचे आदेश काढले आहेत.
औरंगाबाद - जालना रोडवरील करमाड येथे डीएमआयसी प्रकल्प होणार असल्यामुळे या गावांचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. गावातील नागरिकांना सोयीसुविधा आणि जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर त्यांच्या नोंदी घेण्यासाठी धावपळ होऊ नये यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालय एकच इमारतीत व्हावे म्हणून ग्रामपंचायत ठरावाद्वारे गायरान जमीन देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. या गायरान जमिनीची रेडिरेकनर दराने १ कोटी ३४ लाख ५५ हजार एव्हडी असून बाजारभावानुसार जमिनीची किंमत ५ कोटी आहे. जिल्हा प्रशासनाने उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय, नगररचना या कार्यालयांचा अभिप्राय घेऊन दोन एकर गायरान जमीन देण्याबाबत आदेश काढले आहेत. या कामासाठी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सहकार्य केल्याचे मंडळ अधिकारी सतीश तुपे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गिरिजा’तून पाणीउपसा; भरारी पथकाचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी अवैधरित्या पाणी उपसा सुरू आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी स्थापन केलेले भरारी पथक कागदावरच राहिले असून रात्रीतून मोटारसायकल व बैलगाडीवर डिझेल पंप बसवून पिकांसाठी पाणी उपसा केला जात आहे.
तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले आहे. सध्या नगर पालिकेने खुलताबाद शहरात पाणीकपात केली असून आधी चार दिवसाआड येणारे पाणी आता पाच दिवसाआड येत आहे. तालुक्यातील भडजी, ममनापूर, गोळेगाव येथील ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. विरमगाव, आखतवाडा तांडा, जाफरवाडी, कौटगाव भिलवस्ती, धामणगाव व धामणगाव तांडा येथे विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून खुलताबादकरांना पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागत असून खाजगी टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांच्या बैठकीकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
येथील पंचायत समिती सभागृहात गुरुवारी आयोजित इंदिरा आवास योजनेतील घरकुल बांधकाम आढावा बैठकीकडे १६ ग्रामसेवक, दोन कनिष्ठ अभियंता, चार सहाय्यक अभियंत्यांनी पाठ फिरवली. यामुळ गरिबांसाठीच्या योजनांबद्दलची प्रशासनातील अनास्था समोर आली आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी डॉ. रामप्रसाद लाहोटी यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची उपस्थिती होती. इंदिरा आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा घरकुल योजना, रमाई आवास योजनेची कामे गतिने पूर्ण करण्याच्या सूचना बेदमुथा यांनी दिल्या. या कामात हयगय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या आढावा बैठकीस गैरहजर राहणारे ग्रामसेवक, दोन कनिष्ठ अभियंता चार सहायक अभियंत्यांना २४ तासाच्या आत खुलासा सादर करावा, अन्यथा निलंबन करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनासमोर मार्चअखेरपर्यंत घरकुल योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तालुक्यात ही योजना रखडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी असूनही रस्ता होईना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
काम मंजूर झाले, ९० लाखाचा निधी मिळाला, कंत्राटदार नेमला, तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते कामाचे उद‍्घाटनही झाले, मात्र, अद्याप रस्त्याचे भोग संपलेले नाहीत. तालुक्यातील शिरोडी बुद्रुक ते ताजनापूर या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील खडीमुळे नागरिकांना मनःस्ताप होत आहे. हे काम दोन वर्षांपासून अर्धवट टाकण्यात आले आहे.
तत्कालीन आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रयत्नाने हा रस्ता नाबार्ड या योजनेतून मंजूर झाला आहे. रस्त्यासाठी ९० लाख रुपयांचा निधी मिळाला असून, कामाला मंजुरी मिळाल्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याच्या कामाचे टेंडर मनीषा कन्स्ट्रक्शनसा देण्यात आले आहे, परंतु या कंत्राटदाराने हे काम पूर्ण केलेले नाही. सध्या रस्त्यावर पूर्ण खडी अंथरून ठेवलेली आहे. रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्यांची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. परिणामी शिरोडी बुद्रुक येथील नागरिकांनी खडी अंथरलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
शिरोडी बुद्रुक ते ताजनापूर हे तीन किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी वाहनांना १० मिनिटांचा वेळ पुरेसा आहे. पण रस्ता खराब असल्याने किमान पाऊण तास जातो. रस्त्यावर दररोज पाच ते सहा वाहने पंक्चर होतात, त्यामुळे वाहन ढकलावे लागते.

संपूर्ण रस्त्यावर खडी उघडी पडल्याने टायरमध्ये अनकुचीदार दगड घुसून पंक्चर होते. संबंधितांनी लक्ष घालून हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा.
- आजिनाथ भागवत, नागरिक
या रस्त्याचे काम सुरू करण्याबद्दल संबंधित एजन्सीला नोटीस बजावलेली आहे. त्याबद्दल पाठपुरावा करण्यात येत आहे. वरिष्ठ कार्यालयालाही कळविले आहे.
- अशोक ससाणे, उपअभियंता, पीडब्लूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीआरसी’चा खर्च परस्पर मंजुरीच्या झेडपीत हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे स्कॅनिंग करण्यासाठी आलेल्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्यासाठी केलेल्या खर्चाच्या मंजुरीचे त्रांगडे वाढत चालले आहे. सर्वसाधारण सभेने हा खर्चाचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी करत मंजुरीस स्थगिती दिली होती. मात्र आर्थिक ताळेबंद जुळविण्यासाठी प्रशासनाच्या परस्पर मंजुरीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
२०१३ चा लेखा परीक्षण अहवाल आणि ऑडिट पॅराच्या तपासणीसाठी पंचायत राज समितीचा ऑक्टोबर महिन्यात दौरा झाला. समिती सदस्यांसाठी निवास, भोजन आणि वाहन व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा परिषदेची होती. त्यानुसार प्रशासनाने नियोजन करून व्यवस्था केली. या खर्चास मान्यता देण्यासाठी डिसेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेसमोर १५ लाखांचा खर्चाचा प्रस्ताव मांडण्यात आला. शिवसेना सदस्य दीपक राजपूत यांनी यास आक्षेप नोंदविला. खर्चाबाबत आमचा आक्षेप नाही मात्र तो खर्च कसा केला गेला याची सविस्तर माहिती सभागृहात सादर करावी, तोपर्यंत आम्ही खर्चास मान्यता देत नाही, असा प्रस्ताव मांडला. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यासह सर्व सदस्यांनी त्यास पाठिंबा दिला होता. सभा संपेपर्यंत प्रशासन खर्चाचा सविस्तर अहवाल सादर करू शकले नाही. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. आर्थिक ताळेबंद सादर करण्यासाठी सध्या सर्वच विभागांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात पीआरसीच्या खर्चाच्या मंजुरीचा विषयही चर्चेला आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी यासंदर्भातील संचिका तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाणार होती. या हालचालींची माहिती मिळताच सदस्यांनी अध्यक्षांकडे धाव घेऊन खर्चाचा सविस्तर अहवाल आल्याशिवाय स्वाक्षरी करू नये, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीच्या मुलांचा तरुणावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मुलांनी एका तरुणावर ब्लेडने प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार सूड उगवण्यातून मंगळवारी रात्री ११ वाजता खोकडपुरा येथे घडला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका वकिलाला पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून सिटीचौक पोलिसांनी गफारखान व सत्तारखान या दोन भावांना सोमवारी अटक केली आहे. याप्रकरणातील फिर्यादीसोबत ओळख असलेला फेरोज हसन खान (रा. खोकडपुरा) हा मंगळवारी रात्री खोकडपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून जात होता. तेव्हा शकुर सत्तारखान, कासीम सत्तारखान व एका व्यक्तीने त्याला अडवले. तुमच्यामुळे माझे वडील दोन दिवसांपासून अटकेत आहेत, असे म्हणत मारहाण केली. कासीमखान याने ब्लेडने फेरोजच्या पोटावर वार केले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ते पसार झाले. क्रांतिचौक पोलिस ठाणे गाठत फेरोजने याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देश महासत्ता असा कसा होईल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'सामाजिक व आर्थिक विषमता, शिक्षण, पायाभूत सुविधांपासून देश वंचित आहे. तरीही देश महासत्ता करण्याची स्वप्न पाहिली जात आहेत. परंतु, देशाला महासत्ता करायाचे असेल तर, समाजात आर्थिक समावेशकता असावी लागेल,' असे परखड मत तरुणांनी मांडले आहेत.
भानुदास चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मराठवाड्याचा युवा वक्ता आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी गुरुवारी पार पडली. या अंतिम फेरीत २४ तरूण वक्त्यांनी अनेक मुद्दे मांडून आपल्या समाजव्यवस्थेचा पट मांडला. दिलेल्या विषयांपैकी विजेत्या तिन्ही स्पर्धकांनी 'शंभरात नव्वद परेशान, फिर भी मेरा भारत महान' या विषय निवडला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हेमंत टकले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी पारितोषिक वितरण केले. आमदार राजेश टोपे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर आयोजक आमदार सतीश चव्हाण होते.
या स्पर्धेत मिलिंद महाविद्यालयाच्या प्रफुल्लकुमार ढवळे हा प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला. अंतिम विजेत्यांमध्ये अरुण घायगुडे (महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर) दुसरा व जितेंद्र पवार (देवगिरी महाविद्यालय) हा तिसरा विजेता ठरला. प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, १८ हजार व २१ हजार रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. आमदार राजेश टोपे, खासदार सुळे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार टकले यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. सुधीर भोंगळे, सुशील कुलकर्णी व प्रा. डॉ. वृंदा देशपांडे परीक्षक होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ वर्षांनंतर शिक्षिकांना लाभ

$
0
0

म. टा . विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
बीड जिल्हयातील उर्दू शाळेच्या दोन शिक्षिकांना आठ वर्षांच्या संघर्षानंतर सेवेचे लाभ मिळतील. दहा आठवड्यात लाभ देण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. संस्थाचालक व मुख्याध्यापकाने फायदे देण्यास टाळटाळ केल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निकालात स्पष्ट करण्यात आले आहे.
याचिकाकर्त्या अजमेरी आणि परवीन बेगम या मोरेवाडी येथील डॉ. इक्बाल प्राथमिक शाळेवर कार्यरत असताना संस्थाचालक व मुख्याध्यापकांशी त्यांचा स्वाक्षरीवरून वाद झाला. त्यानंतर दोघींनाही हजेरी रजिस्ट्ररवर सह्या करण्यास मजाव करण्यात आला. तसेच पगारही दिला नाही. त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात दाद मागितली.
कोर्टाने संस्थेला याचिकाकर्त्यांची रक्कम हायकोर्टात जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली व स्थगिती मिळविली. दरम्यान संस्थाचालक व याचिकाकर्त्यांत तडजोड झाली. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी मार्च २००७ ते २०१० या काळात दोन्ही शिक्षिका सेवेत कार्यरत होत्या,असा अहवाल दिला, पण सुनावणीला बोलाविले नाही म्हणून संस्थेने हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध सुमोटो अवमान याचिका दाखल करून नोटीस बजावली.
संस्थाचालकाने तडजोडपत्राची अंमलबजावणी केली नाही. तीन वर्षातील वेतन, सेवाज्येष्ठता, सलग सेवेआधारे पगार निश्चिती, फरकाची रक्कम देणे, सेवापुस्तिका तयार करणे या बाबींची पूर्तता झाली नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सुनावणीअंती न्या. संभाजी शिंदे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने दहा आठवड्यात सेवेचे लाभ देण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांच्यावतीने प्रदीप देशमुख यांनी बाजू मांडली. जिल्हा परिषदेतर्फे पी. पी. दामा, शाासनातर्फे एस. के. तांबे, मुख्याध्यापकातर्फे व्ही. आर. सोनवलकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट न घातल्याने १६ दुचाकीस्वारांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस आयुक्तांनी फेब्रुवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असले तरी आरटीओ कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. आरटीओने गेल्या ६ दिवसांत हेल्मेट न घालणारे १६ दुचाकीस्वार व सिटबेल्ट न बांधणाऱ्या ७ चारचाकी चालकांविरुद्ध कारवाई करून दंड ठोठावला.
सुरक्षित वाहतुकीसाठी राज्यात हेल्मेट घालणे व सिटबेल्ट बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयानुसार आरटीओ कार्यालयाने आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या कार्यालयातर्फे शहरातील विविध चौकात तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेत ६ दिवसांत १६ दुचाकीस्वारांना हेल्मेट न घातल्याबद्दल प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात आला. सिटबेल्ट न बांधलेल्या ७ कारचालकांनाही दंड ठोठावण्यात आला. या कारवाईतून आरटीओने ३२०० रुपये दंड वसूल केला. याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४ वाहनांवर कारवाई करून ४००० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई येत्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार आहे, अशी माहिती आरटीओतून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिन खरेदीचा खोळंबा उद्यानाच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
टँकरसोबतच पीटर इंजिन (पाण्याची मोटार) खरेदी करणे गरजेचे होते, एवढ्या क्षुल्लक कारणावरून सिडकोच्या वाळूज महानगरमधील उद्याने वाळून जात आहेत. सध्या थेट टँकरव्दारे पाइपमधून आठवड्यातून एक दिवस पाणी दिले जात आहे. इंजिन खरेदीचा प्रस्ताव अडगळीत टाकण्यात आल्याने उद्यानांची दुरावस्था होत आहे.
सिडको वाळूज महानगरमधील उद्यानांमध्ये गर्द सावली देणारी व औषधी वृक्षांची नुकतीच लागवड करण्यात आली आहे. नागरिकांच्या मागणीवरून उद्यानांकडे लक्ष पुरवण्याचे ठरवण्यात आल्यानंतर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक उद्यानात ठिबक संच बसवण्यात आले. मात्र बोअर आटल्यामुळे ठिबक सिंचनाची कायमस्वरुपी योजना कुचकामी ठरली. यासाठी प्रत्येक उद्यानात ५ हजार लिटर क्षमतेच्या सिमेंटच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत.
बोअरचे पाणी आटल्यामुळे झाडे जगविण्यासाठी टँकरव्दारे या टाक्यांमध्ये पाणी टाकण्याचा निणर्य सिडको प्रशासनाने घेतला. या करिता १० हजार लिटर क्षमतेचे टँकर खरेदी करण्यात आला. या टँकरमधून आणलेले पाणी उद्यानातील सिमेंट टाकीत, कसे टाकणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा टँकरचे पाणी उचलण्यासाठी पीटर इंजिन खरेदीचा प्रस्ताव पुढे आला. परंतु, टँकर खरेदी करतांनाच इंजिन खरेदी करणे आवश्यक असल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव अडगळीत टाकण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. परिणामी टँकरमधून थेट एका लहान पाइपद्वारे झाडांना पाणी देण्यात येत आहे. सर्व झाडांना पाणी देण्याचे काम असल्याने एका उद्यानाची दुसरी फेरी आठ दिवसानंतर येते. म्हणजेच झाडांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने उद्याने सुकत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोगेश्वरी ग्रामपंचायतीतर्फे महिलांना पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जागेश्वरी ग्रुपग्रामपंचायतीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. हा पुरस्कार पंचक्रोशीतील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या महिलांना देण्यात येतो.
जोगेश्वरी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रवीण दुबिले होते. कार्यक्रामचे उद‍्घाटन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुवर्णा देगलूरकर यांनी केले. प्रमुखपाहुणे म्हणून डॉ. ज्ञानेश्वर निळ, उपसरपंच मंगलाबाई निळ यांची उपस्थिती होती. जोगेश्वरी व परिसराताली गावांमध्ये महिलांचे प्रश्न हातळणाऱ्या शांता कुलकर्णी, विमलबाई सोनवणे, सुनंदाबाई जोशी, सुनिता सरदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासोबतच ग्रामपंचायतच्या महिला सदस्य सुमन काजळे, पंडिता पनाड, वनिता नरवडे, लक्ष्मीबाई कर्डीले, अनिता सरोदे, लक्ष्मीबाई चव्हाण, सोनू लोहकरे, छाया बोंबले, करुणाबाई सोनकांबळे यांना राजकीय कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अस्तित्व @ अंश डॉट कॉम’ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कामगार कल्याण नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत औरंगाबाद केंद्रातून हिंगोली येथील कामगार कल्याण केंद्राच्या 'अस्तित्व @ अंश डॉट कॉम' या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. दुसरे पारितोषिक सिडको कामगार कल्याण केंद्राच्या 'अलगद' या नाटकाला मिळाले. उत्कृट अभिनयासाठी अमर सोनवणे आणि आदिती देशपांडे यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे २८ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान या नाट्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ललित कला भवन येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. सतीश बडवे, प्रशांत नायक, मंडळ सदस्य मतीन अहमद, सुशील कुलकर्णी, परीक्षक सुनील सेवेकर, सीमा मोघे, धनंजय शेंडे, भालचंद्र जगदाळे, विजय अहिरे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत बजाजनगर कामगार कल्याण केंद्राचे 'नाटक थोडे थोडे पण तिन्ही वेडे' या नाटकाला तिसरे बक्षिस मिळाले. उत्कृष्ट नाटय लेखनाचा पुरस्कार गिनिपिग चे लेखक मिलिंद चन्ने यांना मिळाला. अलगद मधील भूमिकेसाठी अमर सोनवणे व 'अस्तित्व @ अंश डॉट कॉम' मधील भूमिकेसाठी प्राची देशपांडे यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

उत्कृष्ट नाटक
प्रथम - अस्तित्व @ अंश डॉट कॉम
द्वितीय- अलगद
तृतीय - थोडे थोडे पण तिन्ही वेडे

सर्वोकृष्ट अभिनय पुरूष
प्रथम - अमर सोनवणे - अलगद
द्वितीय - निलेश फड - थोडे थोडे पण तिन्ही वेडे
तृतीय - शिवाजी मिस्त्री - स्टेलमेट

सर्वोकृष्ट अभिनय महिला
प्रथम - आदिती देशपांडे - 'अस्तित्व @ अंश डॉट कॉम'
द्वितीय - प्रियंका उबाळे - पारू
तृतीय - ज्योत्सना पुजारी - स्टेलमेट

उत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम - स्वाती देशपांडे - 'अस्तित्व @ अंश डॉट कॉम'
द्वितीय - अमर सोनवणे - अलगद
तृतीय - अशोक शिवणगी - स्टेलमेट

उत्कृष्ट नेपथ्य

प्रथम - विजय ठोंबरे - देखणी बायको दुसऱ्याची
द्वितीय - राहुल बोर्डे - पारू
तृतीय - रमेश पतंगे - 'अस्तित्व @ अंश डॉट कॉम'

उत्कृष्ट पार्श्वसंगीत
प्रथम - शेखर तुंबडे - पारू
द्वितीय - प्रीतम चव्हाण - अलगद
तृतीय - आदित्य पाढे - गिनिपिग

उत्कृष्ट प्रकाश योजना
प्रथम - धनंजय दाणे
द्वितीय - नारायण त्यारे
तृतीय - संतोष गारोळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन्नई-मुंबईसह स्थानिक डॉक्टरांची शर्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राम सुधाकर मगर या तरुणाच्या विविध अवयव प्रत्यारोपणासाठी चेन्नई व मुंबई येथील डॉक्टरांच्या खास टीमसह औरंगाबादेतील युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल व सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अत्यल्प वेळेत शर्थ लढविली. बाहेरच्या डॉक्टरांची दाखल झाल्यानंतर शुक्रवारी (१५ जानेवारी) पहाटे अवयव काढण्याची रामवर शस्त्रक्रिया झाली आणि लागलीच विविध रुग्णवाहिकेतून व खास सोल्युशनमधून तिन्ही अवयव नेण्यात आले. त्यानंतरच्या अवघ्या चार तासात हृदय प्रत्यारोपणाची व १२ तासांत यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे.
१२ जानेवारी रोजी राम मगर याचा अपघात झाला. त्यानंतर त्याला मेहकर येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथून त्याला औरंगाबादेत नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्याला १३ जानेवारी रोजी पहाटे एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही वेळानंतर तेथे तो ब्रेन डेड झाला. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी रामच्या नातेवाईकांना परिस्थिती समजावून सांगितली आणि अवयव दानाबाबत सुचविले. त्याची आई, काका, मामा, भाऊ यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. एमआयटी हॉस्पिटलमध्ये अवयव दानासाठी आवश्यक असलेल्या ऑपरेशन थिएटर नाही. त्यामुळे त्याला १४ जानेवारी रोजी सकाळी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून सर्व यंत्रणा वेगाने हालल्या. हॉस्पिटलने मुंबई झेडटीसीसीशी संपर्क साधला. तेथे गरजू रुग्णांपर्यंत किडनी, यकृत आणि ह्रदय पोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र व तमिळनाडू सरकारच्या समन्वयातून चेन्नई येथील रुग्णासाठी ह्रदय देण्याचा निर्णय झाला. मुंबईतील दोन रुग्णांना अनुक्रमे यकृत व मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. एक मूत्रपिंड औरंगाबादेतील धूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला देण्यात येणार आहे.
रामचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह आहे. एबी पॉझिटिव्ह रक्तगट युनिव्हर्सल अॅक्सेप्टर आहे, मात्र तो अन्य रक्तगटांशी मॅच होऊ शकत नाही.
त्यामुळे एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णांनाच रामचे अवयव प्रत्यारोपित करणे शक्य आहे. त्यामुळे अशा रुग्ण शोध घेऊन अवयव दानाचा निर्णय घेतला. अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर तमिळनाडू व मुंबई येथील डॉक्टरांची टीम सिग्मा हॉस्टिलमध्ये रात्री दाखल झाली. सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी पहाटे अवयव काढण्याची शस्त्रक्रिया करून अवयव एअर अॅब्युलन्समधून पाठविण्याचे नियोजन करण्यात आले.
एअर अॅब्युलन्समधून विविध अवयव नेण्यासाठी ६ ते ८ लाखांचा खर्च येऊ शकतो आणि तो अवयव घेणाऱ्या रुग्णाला भरावा लागतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय ह्रदय प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो आणि त्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो. यकृत प्रत्यारोपणासाठी सुमारे २५ ते ३० लाखांचा खर्च करावा लागतो. ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात अवघड शस्त्रक्रिया मानली जाते. त्यासाठी दहा ते बारा तासांचा अवधी लागू शकतो. किडनी प्रत्यारोपणासाठी सुमारे दीड ते दोन लाखांचा खर्च येतो. त्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ लागतो.

अवयव दान करण्याबाबत आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगितले. न्यूरोसर्जन डॉ. अन्शूल बगाडिया यांनी अवयव दानासाठी प्रोत्साहित केले.
- डॉ. आनंद निकाळजे, वैद्यकीय संचालक, एमआयटी हॉस्पिटल.

रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठ्या मनाने अवयव दानाचा निर्णय घेतला. आमच्या हॉस्पिटलमध्ये अवयव काढण्याची सर्व सुविधा असल्याने ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आमच्या हॉस्पिटलमधील ब्रेड डेथ कमिटीने संबंधित रुग्ण ब्रेन डेड झाल्याचा निष्कर्ष काढला.
- डॉ. अजय रोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयव पाठवण्यासाठी विमानतळावर हायअलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिग्मा हॉस्पिटलमधून एका ब्रेन डेड रुग्णाचे अवयव घेऊन जाण्यासाठी दोन एअर अॅम्बुलन्स औरंगाबाद विमानतळावर तयार ठेवण्यात आल्या. तीन जणांना जीवदान मिळणार असल्याने विमातळावरील कर्मचारी जवळपास १८ तास दक्ष होते. आपल्यामुळे कोणालातरी जीवदान मिळत आहे, याचे समाधान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.
मराठवाड्यातून पहिल्यांदाच अवयव प्रत्यारोपणासाठी हृदय, यकृत, मूत्रपिंड घेऊन जाण्यासाठी चेन्नई व मुंबई येथून एअर अॅम्ब्युलन्स गुरुवारी दुपारी १२.३० वाजता येणार असल्याची सूचना विमानतळ प्राधिकरणाला मिळाली होती. त्यानुसार सर्व पद्धतीची काळजी घेण्याबद्दल आढावा घेऊन टर्मिनल टॉवर कर्मचारी, सीआयएसएफ आदी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पण हे विमान दुपारी तीननंतर येणार असल्याची माहिती आली. पण तोपर्यंत विमानतळावरील कर्मचारी दक्ष होते. दरम्यान, मुंबई व चेन्नई येथील डॉक्टरांची टीम घेऊन येणारी दोन विमाने गुरुवारी मध्यरात्री एक वाजता येणार असल्याची माहिती सिग्मा हॉस्पिटलकडून विमानतळ प्राधिकरणाला देण्यात आली. पुन्हा या माहितीप्रमाणे विमानतळ प्राधिकरणाने सर्व तयारी केली.
ऑपरेशननंतर सिग्मा हॉस्पिटलमधून अवयव घेऊन येणारी अॅम्बुलन्स मध्यरात्री कोणत्याही वेळेस आल्यास ती थेट धावपट्टीवर जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली. दोन एअर अॅम्ब्युलन्स येणार असल्याने विमानतळ प्राधिकरण व्यवस्थापक अलोक वार्ष्णेय यांच्यासह ५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना 'स्टॅण्ड बाय पोजिशन'वर थांबविण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने दोन्ही विमाने, नियमित चार क्रमांकच्या अप्रोनवर आणण्याचा निर्णय घेतला. दोन्ही विमाने दोन अप्रोनवर लावल्यानंतर त्याची माहिती सिग्मा हॉस्पिटलला माहिती दिली जावी. त्यानुसार ही अॅम्बुलन्स जुन्या विमानतळाच्या बाजुला असलेल्या व्हीआयपी गेटमधून विमानतळात प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले. विमानतळावर अॅम्बुलन्स आल्यानंतर एक मिनिटांत सुरक्षा तपासणी करून ती धावपट्टीवर पाठवण्याचेही नियोजन करण्यात आले. ही एअर अॅम्बुलन्स पहाटे पाच वाजता निघणार असल्याने कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. विमातळावर एटीएस, सीआयएसएफ, सीईएम, एटीएम, इलेक्ट्रिकल विभागाचे कर्मचारी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्तेसाठी गुलामांची फौज निर्माण झाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सत्तेसाठी गुलामी, लाचारी पत्करणाऱ्यांची मोठी फौज तयार झाली आहे, असा आरोप प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले यांनी केला. हे समाजासाठी घातक असून समाजाने या लोकांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (डेमोक्रॅटिक) मौलाना अबुल कलाम संशोधन केंद्र येथे बुधवारी 'महाराष्ट्रातील ओबीसी आणि फुले आंबेडकरी चळवळ व शैक्षणिक क्षेत्रातील खासगीकरणामुळे दलित बहुजनासमोरील आव्हाने,' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रा. डॉ. इंगोले बोलत होते. नगरसेवक कैलास गायकवाड, रमेश जायभाय, प्रा. दासु वाघमारे, सुनील इंगळे, बुद्धप्रिय कबीर, प्रा. प्रकाश मोगले, विलास सूर्यवंशी, दिलीप ढवळे, अण्णासाहेब खंडागळे, स. सो. खंडाळकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतमजूर, भूमीहिन, सुशिक्षित बेरोजगार यांना कोणत्याही प्रकाराची मदत शासनाने केली नाही, असा आरोप केला. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच परिक्षा फी माफ करण्यात आली नसून याविरोधात संघर्ष यात्रा काढणार असल्याचा इशारा दिला. रवींद्र गाकवाड, के. व्ही. गायकवाड, मनीष अग्रवाल, सचिन गंगावणे, गौतम गणराज, विजय पट्टेकर, देविदास खरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार जीव वाचविण्याची धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाचे अवयव मृत्यूनंतर चार जणांना देऊन प्राण वाचविण्याचे ऐतिहासिक प्रयत्न औरंगाबाद शहरातून प्रथमच करण्यात आले. त्यासाठी शाहनूरमियां दर्गा परिसरातील सिग्मा हॉस्पिटलपासून चिकलठाणा विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. हॉस्पिटल, विमानतळ प्राधिकरण आणि पोलिस यांच्या अथक प्रयत्नांमुळे किडनी, ह्रदय आणि लिव्हर चेन्नई व मुंबई येथे प्रत्यारोपणासाठी शुक्रवारी (१५ जानेवारी) पहाटे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले.

मालेगाव-मेहकरदरम्यान चांडस येथे दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मेहकरला आणि तेथून औरंगाबादच्या एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; परंतु हॉस्पिटल गाठेपर्यंत तो 'ब्रेन डेड' झाला. आपला राम राहिला नसला तरी त्याच्या अवयवांच्या रुपाने त्याला जिवंत ठेवण्याचा आणि म्हणूनच अवयव दानाचा धाडसी निर्णय तरूणाची आई, भाऊ, काका, मामांनी घेतला. तात्काळ औरंगाबादेतील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये तरुणाला दाखल करण्यात आले. लगेचच महाराष्ट्रासह तमिळनाडूच्या यंत्रणा हलल्या. पुढच्या २४ तासांत या तरुणाचे हृदय चेन्नईच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये, यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, एक किडनी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये, तर एक किडनी औरंगाबादच्या धूत हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचा निर्णय झाला.

या अवयवांच्या प्रवासासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटल ते चिकलठाणा विमानतळापर्यंत खास 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला होता. त्यासाठी गुरुवारी (१४ जानेवारी) दुपारपासूनच पोलिस यंत्रणा, विमानतळ यंत्रणा सज्ज होती. अॅम्ब्युलन्स चिकलठाण विमानतळापर्यंत नेण्यासाठी संपूर्ण वाहतूक रोखण्याची तयारी झाली होती. दोन चार्टर विमाने विमानतळावर तयार ठेवण्यात आली होती. एक चेन्नईकडे तर, दुसरे मुंबईला पाठविण्याची तयारी झाली.

देऊळगाव मही (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील राम सुधाकर मगर (२४) हा कृषी पदवीधर तरुण १२ जानेवारीला अकोल्याहून गावाकडे दुचाकीवरून येत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. लोकांनी त्याला मेहकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये व नंतर तेथून औरंगाबादच्या एमआयटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र येथे दाखल केल्यानंतर काही वेळेतच रामला 'ब्रेन डेड' (वैद्यकीयदृष्ट्या मृत) ठरविण्यात आले. डॉक्टरांनी देहदान करण्याचे आवाहन करताच रामच्या समस्त नातेवाईकांनी आपल्या कोवळ्या जिवाला दुसऱ्या जिवांच्या रुपातून बघण्याचा डोळस निर्णय घेतला आणि ते मोठ्या मनाने अवयवदानासाठी तयार झाले. अवयव दानासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करून हॉस्पिटलने 'मुंबई झेडटीसीसी'शी संपर्क (अवयव दानाचा निर्णय, नियंत्रण करणारी शासनमान्य संस्था) साधला. सुदैवाने झेडटीसीसीने तात्काळ अवयवांच्या प्रतीक्षेतील गरजू रुग्णांचा शोध घेतला आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारने तमीळनाडू सरकारशी समन्वय साधून चेन्नईच्या 'फोर्टिस'मध्ये हृदय प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. मुंबईत व औरंगाबादेत किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला आणि त्यासाठी २४ तास शासकीय यंत्रणा अखंडपणे काम करीत होत्या. पहाटे शस्त्रक्रिया करून अवयव पाठविण्याचे नियोजन करण्यात आले.


असा आहे २४ तासांतील ऐतिहासिक घटनाक्रम

- देऊळगाव मही येथील राम सुधाकर मगर (२४) हा तरुण १२ जानेवारीला दुचाकीवरून गावाकडे येत असताना चांडस येथे अपघात.
- अपघानंतर रामला मेहकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर औरंगाबादमध्ये हलविण्याचा डॉक्टरांचा सल्ला.
- मेहकरहून औरंगाबादेतील एमआयटी हॉस्पिटलमध्ये १३ जानेवारी रोजी पहाटे केले दाखल.
- राम हा 'ब्रेन डेड' झाल्याचे लक्षात येताच सर्व नातेवाईकांनी विविध अवयव दान करण्याची इच्छा डॉक्टरांना बोलून दाखविली.
- रामची आई, सख्खा भाऊ, काका, मामा यांनी एकत्र बसून रामचे हृदय, दोन मूत्रपिंड, यकृत देण्याचा निर्णय घेतला.
- विविध अवयव काढण्याची सुविधा 'एमआयटी'मध्ये नसल्याने रामला १४ जानेवारीला युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये हलवले.
- 'सिग्मा'ने तातडीने 'मुंबई झेडटीसीसी'शी संपर्क साधला आणि 'झेडटीसीसी'ने रामच्या 'एबी पॉझिटिव्ह' रक्तगटाशी जुळणाऱ्या व अवयवांच्या प्रतिक्षेतील रुग्णांची चाचपणी केली.
- प्रतिक्षेनुसार मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर यकृत व जसलोक हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर मूत्रपिंड, तर चेन्नईतील फोर्टिस चेन्नई हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर हृदय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय झाला.
- त्याशिवाय औरंगाबादेतील धूत हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा निर्णय होऊन पोलिस व विमानतळ यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली.
- 'मुंबई झेडटीसीसी'च्या परवानगीनंतर आणि मुंबई-चेन्नईच्या डॉक्टरांची टीम दाखल झाल्यानंतर 'सिग्मा'मध्ये १५ जानेवारीला पहाटे राम प्रहारात अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू.
- दीड तासात अवयव काढण्याची शस्त्रक्रिया होऊन खास तयार करण्यात आलेल्या 'ग्रीन कॉरडॉर'द्वारे सिग्मा हॉस्पिटल ते चिकलठाणा विमानतळापर्यंत रुग्णवाहिकेद्वारे अवयव नेण्यात आले आले. तयारीत असलेल्या दोन विमानांनी तिन्ही अवयव नेण्यात आले व तरुणाच्या अवयव दानाने चार जिवांना जीवनदान मिळाले.

ही औरंगाबादच्या इतिहासातील मोठी घटना आहे. 'ब्रेन-डेड' रुग्णाच्या शोकाकुल नातेवाईकांनी त्याचे चार अवयव दान करण्याची तयारी दर्शविली, हीच मोठी बाब आहे. याला धैर्य लागते. ते धैर्य त्यांच्या नातेवाईकांनी दाखव‌िले आहे. त्यामुळेच चार जणांचे जीव वाचू शकतील. सिग्मा हॉस्प‌िटलमधील सर्व सुविधा त्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिल्या.
- डॉ. उन्मेष टाकळकर, व्यवस्थापकीय संचालक, सिग्मा हॉस्प‌िटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद विमानतळाचा विस्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळाचे विस्तारीकरण गरजेचे असून, भूसंपादनासाठी लागणारा दोनशे कोटींचा निधी औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पात विकसित करण्यात येत असलेल्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, डीएमआयसीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद येथील विमानतळाची धावपट्टी लहान असल्यामुळे मोठी विमाने उतरण्यास अडचणी येतात. ही धावपट्टी वाढविण्यासाठी १८० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी २०० कोटी रुपये आवश्यक आहेत. औद्योगिक विकास महामंडळाने ही रक्कम राज्य शासनान द्यावी. त्यातून विमानतळाच्या विस्ताराचे काम केले जाईल. विमानतळ विस्तारामुळे शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीच्या विकासास मोठ्या प्रमाणावर साह्यभूत होणार आहे; तसेच औरंगबादच्या पर्यटन विकासातही वाढ होणार आहे.

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यातील शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहतीस देशातील पहिली स्मार्ट वसाहत करण्यासाठी तातडीने कामे सुरू करावीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शेंद्रा बिडकिन औद्योगिक वसाहत
दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोरमध्ये राज्यातील चार औद्योगिक क्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. त्यातील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहत हा पहिला टप्पा आहे.

६०० कोटी मिळाले
शेंद्रा बिडकीन प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १५०० कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले असून, त्यापैकी ६०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. एकूण ४ हजार हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये शेंद्रा येथे ८५७ हेक्टर व बिडकिन येथे ३२०० हेक्टर जमिनीचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुयायांच्या उत्साहाला उधाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २२वा नामविस्तारदिन उत्साहात साजरा झाला. विद्यापीठ गेट परिसरात गुरुवारी आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. या दिनानिमित्त राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या.

प्रचंड संघर्ष व राज्यव्यापी चळवळीचे अधिष्ठान लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तारदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ गेट परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची गर्दी झाली होती. परिसरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले; तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी अभिवादन केले. मिलिंद वसतिगृह ते विद्यापीठ गेट रस्त्याने विविध दुकाने थाटण्यात आली होती. सीडी, प्रतिमा, पुस्तके आणि पुजेच्या साहित्याची दुकानांमध्ये गर्दी झाली होती. प्रचंड गर्दी असूनही नागरिकांनी शिस्तीत अभिवादन केले.

या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, सायंकाळी चारनंतर अधिक गर्दी उसळली. ही गर्दी रात्री दहापर्यंत वाढत राहिली. प्रबोधन चळवळीतील गीतांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. नामविस्तार दिनानिमित्त राजकीय नेत्यांनी सभा घेतल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार ः शेडनेटमध्ये फुलविले नंदनवन

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
कधी कधी गावात राहणेही अवघड होते. व्यवसायासाठी गाव सोडून पाहिले, पण यश आले नाही. परतल्यानंतर शेती करताना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची उर्मी होती. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर जगन्नाथ गंगाराम तायडे यांनी नंदनवन फुलवले आहे. शेती तर उत्तम पिकतेच, पण शेडनेट उभारून बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रात घवघवीत यश मिळवित कृषिभूषण, देशातील सर्वोत्कृष्ट शेतकरी असे बहुमान मिळवून चार देशांना भेटी देऊन शेतीचे स्वप्न सत्यात उतरविल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.

औरंगाबाद तालुक्यातील पूर्वेकडचा भाग हा तुलनेत बऱ्यापैकी पाण्याचा. करमाड, लाडसावंगी परिसरातील काही भागात मात्र जानेवारी, फेब्रुवारीनंतर पाणी संपून जाते. त्यामुळे खरिपाच्या शेतीवर बहुतांश शेतकऱ्यांचा भर. याच गावाच्या रांगेत असलेले औरंगपूर. जगन्नाथ गंगाराम तायडे हे तेथील रहिवासी. घरी पारंपरिक शेती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न जेमतेम. लहानपण अत्यंत हलाखीत गेले. आई-वडिलांचे संस्कार आयुष्याची शिदोरी म्हणून कामाला आले. जगन्नाथरावांनी खूप शिकावे अशी वडिलांची इच्छा होती, पण कौटुंबिक अडचणींमुळे शक्य झाले नाही. लग्नानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी टेलरिंग शिकण्याचा निर्णय घेतला आणि गाव सोडले. नगर जिल्ह्यात जाऊन प्रशिक्षण घेतले. तिथे अल्पभूधारक शेतकरी पाहून त्यांना आश्चर्य वाटे. कारण तायडेंकडे त्यांच्यापेक्षा जास्त शेती होती. तरीही ते शेतीऐवजी व्यवसायाकडे वळले होते. तेथील शेतीपद्धत पाहून जगन्नाथरावांनीही पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर लागवड करून शेतीची सुरुवात केली, पण त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचा हे त्यांच्या मनाते होते. त्यात काही वर्षे गेली. आजुबाजुच्या शेतकऱ्यांसमवेत चर्चेत बियाणे कंपन्यांच्या प्लॉट प्रयोगाची माहिती मिळाली. नवीन प्रयोग करण्यावर त्यांचा भर होता, पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हते. एका शेतीमार्गदर्शन कार्यक्रमात मागेल त्याला शेततळे योजनेची माहिती त्यांना झाली. शेततळे करण्यासाठी त्यांनी सरकारी कार्यालयात चकरा मारणे सुरू केले. लालफितीच्या कारभारात हालचाली होत नाहीत हे पाहून त्यांनी पदरमोड करून तळे उभारण्यास सुरवात केली. २०० फूट रूंद आणि ३३० फूट लांब, ३५ फूट खोल तळे खोदले. उसनवारी करून तळ्यात चांगल्या दर्जाचे प्लास्टिक आणून टाकले. यामुळे उन्हाळ्यात हमखास पाणी उपलब्ध झाले. गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे, पण तायडेंच्या शेतात मे महिन्यातही मुबलक पाणी उपलब्ध झाले. शेततळे उभारल्यानंतर बागायती शेतीचा उगम झाला. डाळिंब, मोसंबीच्या बागा तायडेंनी मेहनतपूर्वक विकसित केल्या. दरम्यान, एका बियाणे कंपनीने त्यांच्या शेतात प्लॉट केला. तिथे शेड नेट हाउस ही संकल्पना पहिल्यांदा जगन्नाथरावांनी पाहिली. ट्रायलवर असलेल्या प्लॉटमधून ते बरेच काही शिकले. लाकडाच्या आधारावर उभारलेली नेट उन्हाळ्यातील अवकाळी पाऊस आणि वादळात मोडून पडले. त्यातून तायडे खचले नाहीत. नव्या उमेदीने त्यांनी शेड उभारले. पुन्हा असाच अनुभव आला. शेतात काम करताना त्यांच्या मोठ्या मुलाने नेटला आधार देण्यासाठी लोखंडी पोलचा वापर केला. मग तायडेंच्या मनात विचार आला की, आपण जर लोखंडी अँगल आणि पोलचा वापर करून नेट शेड उभारण्याचा निर्णय घेतला. २० गुंठ्याचे पहिले शेड उभारताना त्यांनी सगळ्या तांत्रिक बाबी समजून घेतल्या. शेडच्या वर टाकावयाचे नेट कसे असावे, बाजूचे नेट कसे असावे याचे कटाक्षाने पालन केले आणि टोमॅटोचे बियाणे विकसित करणे सुरू केले. बियाणे बनविल्यानंतर त्याचे मार्केट असणेही आवश्यक आहे. एका बियाणे कंपनीने तायडेंना मदत केली बियाणे उत्पादन व्यवसाय तेजीत सुरू झाला. पहिल्या शेडनेटचे यश पाहून त्यांनी २० गुंठ्याचा दुसरे नेट उभारले. तिथे मिरचीचे बियाणे बनविणे सुरू केले. ठिबकसिंचन, मल्चिंग, सेंद्रीय खताचा वापर केल्याचा फायदा त्यांना दिसू लागला. पाहत पाहता तायडेंच्या नाविन्यपूर्ण शेतीची माहिती आजुबाजुला, सरकारच्या कृषी खात्याला झाली आणि शेती पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. तोपर्यंत तायडेंनी तिसरे शेडनेट उभे केले. चार एकरवर अँगल उभे करून ठेवले आहेत. पुढे जर यात आणखी वाढ करायची तर त्याचे प्लॅनिंग आधीच करून ठेवले आहे. सध्या या शेडनेटमध्ये टोमॅटो आणि मिरचीचे बियाणे उत्पादन केले जाते. तयार झालेल्या बियाणांचे वर्गीकरण; तसेच बियाणे निर्मितीसाठी त्यांनी शेतातच घर बांधले. कुटुंबातील सर्व मोठ्या व्यक्ती शेतीत राबतात. दरम्यान, जगन्नाथ तायडे यांना २०१३मध्ये राज्य सरकारने कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१२मध्ये गांधीनगरमध्ये प्रगतीशील शेतकरी म्हणून तायडेंचा गौरव झाला. नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात यशस्वी झालेल्या देशातील पहिल्या पाच शेतकऱ्यांमध्ये तायडेंचा समावेश झाला.

पारंपारिक शेती करताना काहीतरी नवीन करण्याबाबत शेतकऱ्यांनी निश्चितपणे विचार केला पाहिजे. पाणी आणि शेती हे समीकरण नेहमीच जुळेल असे नाही. त्यामुळे पाण्याच्या वापराचे नियोजन, वॉटर बँक याचा विचार काळाची गरज आहे, असे तायडे सांगतात. घराजवळ पाण्याचे नियोजन करताना छोटे शेततळे त्यांनी उभारले आहे. घर तसेच जवळून जाणाऱ्या ओढ्याचे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी या तळ्यात जमा करण्यात आले आहे. पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीची जोड देऊन जगन्नाथरावांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या शेतीला पाहून अनेकांनी गटशेती सुरू केली. ठिबक सिंचनाचा योग्य वापर शेतकऱ्यांचा उत्साह वाढवतो. संधी प्रत्येकाला येते पण त्याचे सोने कसे करून घ्यायचे हे तुम्ही ठरविले पाहिजे असा संदेश जगन्नाथराव देतात. नाविन्यपूर्ण प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने जगन्नाथरावांची परदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. आजवर ते जर्मनी, हॉलंड, फ्रांस आणि स्पेनला जाऊन आले आहेत. आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्याने नियोजनबद्ध शेती करून स्वतःचा विकास करावा, अशी इच्छा जगन्नाथराव तायडे व्यक्त करतात.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images