Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कुलसचिवपदाचा फैसला आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वर्षभरापासून रिक्त असलेल्या कुलसचिवपदाचा फैसला शुक्रवारी होणार आहे. या पदासाठी १२ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेले आहे. सुरुवातीला लेखी परीक्षा, मुलाखत असे टप्पे असणार आहेत.

विद्यापीठाचे तत्कालिन कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांची शिक्षण संचालकपदी निवड झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. वर्षभरापासून प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या या पदासाठी शुक्रवार (२२ जानेवारी) रोजी निवडीची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या १२ उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. प्रारंभी सकाळी नऊ वाजता लेखी परीक्षा होणार आहे. यानंतर दहापासून मुलाखतीचा टप्पा सुरू होणार आहे. बारा उमेदवारांमध्ये डॉ. अशोक काकडे, डॉ. धनंजय माने, डॉ. दिलीप चव्हाण, दिनेश कांबळे, इश्वरसिंह मंझा, डॉ. मिलिंद उबाळे, डॉ. पंढरीनाथ रोकडे, डॉ. पोपट बारहाते, डॉ. प्रदीप जबदे, डॉ. शंकर अंभोरे, सुरेंद्र बहिरराव, डॉ. वाल्मिक सरवदे यांचा समावेश आहे.

निवड होणार की, प्रक्रिया रेंगाळणार
कुलसचिवपदासाठी अर्ज केलेल्यापैकी १२ उमेदवार पात्र ठरले. यात कोणाची कुलसचिवपदावर वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लेखी परीक्षा, संघटनांचा आक्षेप यामुळे वर्षभरापासून हे पद चर्चेत आहे. सध्या डॉ. महेंद्र शिरसाट हे प्रभारी कुलसचिव म्हणून काम पाहतायेत. वर्षभरात डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. गणेश मंझा, डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनीही हे पद सांभाळले. या प्रक्रियेत निवड होणार की प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागणार हे शुक्रवारी स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयसीएआय फाउंडेशनचा यावर्षी विक्रमी निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इन्स्ट‌िट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस् ऑफ इंडियाने (कोलकाता) डिसेंबर २०१६मध्ये घेतलेल्या फाउंडेशन परीक्षेत औरंगाबाद शाखेतून तब्बल ४१ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. आजपर्यंतच्या इतिहासात निकालाचे हे प्रमाण सर्वाधिक आहे.

औरंगाबाद शाखेतून अनुक्रमे प्रेरणा भाले, सर्वेश कुलकर्णी आणि सोपान गव्हाड हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. उर्वरित यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विशाल अंभोरे, अभिषेक धात्रक, शिवानी जैस्वाल, शिवांगिनी जावळे, अश्विनी जोशी, विशाखा जोशी, गोविंद कदम, सुदर्शन कटारिया, अंकिता मिस्त्री, कल्याणी पाठक, शुभम वासकर, रोहित भगुंडे, आश्विन चौधरी यांचा समावेश आहे. या निमित्ताने आयोजित एका मार्गदर्शन शिबिर व कौतुक सोहळ्यात प्रशिक्षण समितीचे अध्यक्ष सीएमए पराग राणे, सीएमए प्रवीण मोहनी आणि सीएमए सुनील मणियार यांनी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन केले. यासंबंधी अधिक माहितीसाठी संस्थेच्या जवाहर कॉलनी येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामांना टर्गेट करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. त्याचबरोबर सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पाणीपट्टी व मालमत्ता कर आकारणीही तातडीने सुरू केली जाणार आहे.

सातारा-देवळाई नगर पालिका बरखास्त केल्याची अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी काढली. अधिसूचनेची अधिकृत प्रत गुरुवारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली. पालिका बरखास्त झाल्यामुळे सातारा-देवळाईचा समावेश आपोआपच औरंगाबाद महापालिकेत झाला आहे. त्यामुळे या भागातील कामांच्या नियोजनाला महापालिकेने तातडीने सुरुवात केली. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सातारा-देवळाई परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातर्फे यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. ३८० बांधकामांना नोटीस बजावून ५९ बांधकामे त्यावेळी पाडण्यात आली होती. उर्वरित बांधकामांवर कारवाई करण्यात आली नव्हती. हा परिसर ताब्यात घेतल्यावर महापालिकेचे प्रशासन अनधिकृत बांधकामे पाडण्याला प्राधान्य देणार असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. या कामाचे नियोजन येत्या काही दिवसांत महापालिकेत केले जाणार आहे.

सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पाणीपट्टी, मालमत्ता कर आकारणीचे काम महापालिकेतर्फे तातडीने सुरू केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या संपूर्ण परिसराला सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापुढेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा केला जाईल. पाण्याचे पैसे महापालिका जिल्हाधिकारी कार्यालायत जमा करेल, असे केंद्रेकर यांनी सूचित केले.

सातारा परिसरातील नगर पालिकेचे कार्यालय ताब्यात घेणे, तेथील कर्मचारी समावून घेणे, सातारा-देवळाई पालिकेचा पैसा महापालिकेने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला होता. तो पैसा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेणे, घनकचरा व्यवस्थापन आदी कामे येत्या दोन-तीन दिवसांत केली जाणार आहेत.

महापालिका आज घेणार ताबा
सातारा-देवळाई नगर पालिका कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे शुक्रवारी सकाळी दहा वाजता नगर पालिकेच्या कार्यालयात जाणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच अधिकाऱ्यांची चौकशी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील टीडीआर घोटाळा प्रकरणात (ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राइटस्) आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने पाच अधिकाऱ्यांची आता विभागीय चौकशी केली जाणार आहे. या पाचही अधिकाऱ्यांना दोषारोप पत्र बजावण्यात आले आहेत. 'मटा'ने हा घोटाळा चव्हाट्यावर आणला होता.
नगरसेवक नितीन चित्ते, राज वानखेडे, कैलास गायकवाड यांनी वेळोवेळी टीडीआर घोटाळ्याचे प्रकरण सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीत मांडले. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या घोटाळ्याची गंभीरपणे दखल घेऊन त्याची चौकशी सुरू केली. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके, शाखा अभियंता आर. एम. वाघमारे, निवृत्त कर्मचारी शेख वसीम, फईम सिद्दिकी यांना या घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली. नोटीसचे उत्तर समाधानकारक न आल्यामुळे या सर्वांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय कामकाजात विभागीय चौकशी ही सर्वोच्च चौकशी मानली जाते. या चौकशीनंतर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. विभागीय चौकशीसाठी पाचही अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे दोषारोप पत्र तयार करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी पाचही अधिकाऱ्यांना दोषारोप पत्र देण्यात आले. दोषारोप पत्रांना उत्तर देण्यासाठी या अधिकाऱ्यांना दहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात विभागीय चौकशी कोणत्या अधिकाऱ्यामार्फत करायची याचा निर्णय पालिकेचे प्रशासन घेणार आहे. चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमून निर्धारित वेळेत चौकशीचे काम पूर्ण केले जाणार आहे.

नगररचना विभागात सीसीटीव्ही बसवा
'टीडीआर घोटाळा प्रकरणात विभागीय चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे, पण आयुक्तांनी अद्याप त्याबद्दल लेखी आदेश काढलेले नाहीत. कोणत्या अधिकाऱ्यामार्फत किती दिवसात विभागीय चौकशी करणार हे त्यामुळे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. चौकशीचे लेखी आदेश का काढले जात नाहीत, आयुक्तांवर कुणाचा दबाव आहे का, असे प्रश्न यामुळे निर्माण होतात. आयुक्तांनी नगररचना विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत. टीडीआर घोटाळ्याशी संबंधित असलेले निवृत्त कर्मचारी या विभागात येऊन कपाटातल्या फाइल ताब्यात घेतात. त्याच्या झेरॉक्स काढतात, अनेक बिल्डर्स व त्यांच्या दलालांचा या विभागात मुक्त वावर असतो. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे या सर्वांवर वचक बसेल,' अशी मागणी नगरसेवक नितीन चित्ते यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा कोर्टात हजर रहावे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनश्रेणीप्रकरणी उत्तर दाखल न केल्याने मुख्य सचिवांना शपथपत्र दाखल करा, अन्यथा व्यक्तिश: हजर राहण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले.

महाराष्ट्र पब्लिक स्कुलच्या शिक्षिका छाया बळीराम धवे व स्वामी विवेकानंद अॅकॅडमीमधील शिक्षक अनिल काळे यांनी याचिका दाखल केली होती. खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना वेतनश्रेणीनुसार पगार व इतर अनुषंगिक फायदे मिळावेत यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने याप्रकरणी शिक्षण संचालकांना सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. अनुदानित शाळेतील शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांना वेतनश्रेणीप्रमाणे पगार, लाभ मिळाण्यास पात्र असल्याचे शिक्षण संचालकांनी मान्य केले. तरीही शिक्षकांना पगार मिळाला नाही. त्यामुळे खासगी शाळांमधील शिक्षकांनी पुन्हा याचिका दाखल केली. वेळोवेळी झालेल्या सुनावणीत पगारातील तफावत दूर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले, पण त्यावर दीड वर्षानंतरही अंमलबजावणी करण्यात आली नाही.

दरम्यान, शिक्षण संचालकांनी शपथपत्र दाखल करून बाजू मांडली, पण कोर्टाने शिक्षण संचालकांचे शपथपत्र पुरेसे नसल्याचा निर्वाळा दिला व मुख्य सचिवांना २८ आॅक्टोबर २०१५ रोजी नोटीस बजावली. तरीही मुख्य सचिवांकडून उत्तर दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे हायकोर्टाने मुख्य सचिवांना शपथपत्र दाखल करा, अन्यथा स्वत: हजर राहण्याचा आदेश दिला.

याचिकाकर्त्यातर्फे बालाजी सगर किल्लारीकर यांनी बाजू मांडली. त्यांना केदार अनमोले यांनी सहकार्य केले. शासनाची बाजू सुभाष तांबे यांनी तर, संस्थेतर्फे श्रीकांत अदवंत हे बाजू मांडत आहेत. या प्रकरणाची सुनावणी ११ फेब्रुवारी रोजी होईल.

शपथपत्रात विरोधाभास
अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील काम करणाऱ्या शिक्षकांची वर्गवारी एकच आहे. त्यांचे वेतन समान असले पाहिजे. असा निर्णय नागपूर खंडपीठाने घेतला होता. पण या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास शैक्षणिक संस्थांनी नकार दिला. शेड्युल सी बदलण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. तत्कालीन शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी शेड्युल बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तात्काळ ते लागू करण्यात येईल असे शपथपत्र दाखल केले, मात्र शिक्षण उपसचिव रमेश पवार यांनी वित्त विभागाने अडचणी निर्माण केल्यामुळे समान वेतन देऊ शकत नाही असे शपथपत्र दाखल केले. या दोन्ही शपथपत्रात विरोधाभास असल्याने मुख्य सचिवांना नोटीस काढण्याल आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रशियाचे विद्यार्थी विद्यापीठ भेटीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारत रशिया यांच्यातील संबंध नव्याने प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिसेंबरमधील रशिया भेटीनंतर सुरुवात झाली. त्याअंतर्गत रशियाचे विद्यार्थी, प्राध्यापकही पुढे आले आहेत. रशियातील मॉस्को विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दौऱ्यावर आले आहे. हिंदी भाषेतून हे शिष्टमंडळ संवाद साधते आहे, हे विशेष. रशियात विविध विद्यापीठांमध्ये हिंदी, मराठी भाषेचे धडे दिले जातात हा मैत्रीचा एक धागा आहे, असे प्रा. इंदिरा गॅझिईव्हा सांगतात.

भारत आणि रशियातील मैत्रीपूर्ण संबंधाची जगभरात चर्चा असायची, आता ही चर्चा काहीशी मागे पडली होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर हा गॅप दूर होतो आहे, असे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले. 'रशियन स्टेट युनिर्व्हसिटी ऑफ ह्युमॅनटिज'च्या हिंदी विभागातील १४ विद्यार्थी व दोन प्राध्यापक विद्यापीठाच्या दौऱ्यावर आले आहे. त्यांनी आज हिंदी, राज्यशास्त्र, इतिहास अशा विविध विभागांना भेटी दिल्या. तेथील विद्यार्थी, प्राध्यापकांशी विविध विषयांवर चर्चा केली. चार दिवसांच्या दौऱ्याच्या अभ्यास दौऱ्यावर हे विद्यार्थी शिष्टमंडळ आले आहे. विद्यापीठातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही देशांमधील शिक्षण, संशोधन क्षेत्रात संबंध दृढ होणे गरजेचे असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. रशिया विद्यापीठात हिंदी विषय शिकविणाऱ्या प्रा. इंदिरा गॅझिईव्हा, प्रा. अलेक्झांडर स्टॉलायरोव्ह हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यांनी हिंदीतून उपस्थितांशी संवाद साधला.

रशियात इंदिरा हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आमच्या देशाला भेट दिली होती. त्यानंतर हे नाव रशियातील लोकप्रिय झाले असून, अनेकांनी आपल्या मुलीचे नाव इंदिरा ठेवले आहे. आता हे मैत्रीचे पर्व नव्याने सुरू झाले आहे. याचा आनंद आहे.
- प्रा. इंदिरा गॅझिईव्हा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमटीडीसी’त पुन्हा ‘बँड, बाजा, बारात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्न व समारंभासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे राज्यभरातील रिसॉर्ट वापरण्यास हरित लवादाची मनाई असूनही औरंगाबाद 'एमटीडीसी'ने लवादाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार गुरुवारी (२१ जानेवारी) उघडकीस आला. दरम्यान, लॉन्स वापरण्यास परवानगी असल्याचा दावा कंत्राटदार विशाल इंगळे यांनी केला.

'वेडिंग टुरिझम'च्या नावाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात शासकीय जागेचा गैरवापर करण्याचा प्रकार सुरू आहे. ध्वनी प्रदूषणासाठी जबाबदार धरत राष्ट्रीय हरित लवादाने औरंगाबाद 'एमटीडीसी'ला पाच लाख रुपये भरण्याचे आदेश दिले होते; तसेच रिसेप्शन, लग्न सोहळा आणि इतर समारंभासाठी रिसॉर्टची जागा वापरण्यास मनाई केली आहे. मागील आठवड्यात लवादाने हा आदेश दिला; मात्र, कंत्राटदार इंगळे यांनी आदेश झुगारून एमटीडीसीच्या रिसॉर्ट परिसरातील लॉन्सवर मांडव उभारून लग्न सोहळ्याला परवानगी दिली. रिसॉर्टच्या लॉनवर गुरुवारी लग्नासाठीची भोजन व्यवस्था करण्यात आली. 'एमटीडीसी'च्या प्रवेशद्वारावर बँडपथक, घोडा आणि इतर वऱ्हाडी यांची लगबग सुरू होती. विशेष म्हणजे कंत्राटदार इंगळे यांनी समारंभाचे नियोजन केले. पगारिया कॉलनी परिसरात ध्वनी प्रदूषण वाढल्यामुळे तक्रारदार विवेक ढाकणे यांनी लवादाकडे दाद मागितली होती. त्यानुसार लवादाचे न्या. व्ही. आर. किनगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांनी 'एमटीडीसी'ला पाच लाख रुपये औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे चार महिन्यांत भरण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर 'वेडिंग टुरिझम' ही संकल्पना प्रथमच ऐकल्याचे सांगत आश्चर्य व्यक्त केले होते. कंत्राटदार आणि एमटीडीसीचे अधिकारी यांच्या हितसंबंधामुळे मागील नऊ वर्षांपासून शासकीय जागेचा गैरवापर सुरू आहे.

'वेडिंग टुरिझम' नाहीच
पर्यटनवाढीसाठी उदासीन अधिकाऱ्यांना 'वेडिंग टुरिझम'मध्ये प्रचंड स्वारस्य आहे. तक्रारदार विवेक ढाकणे यांनी मुंबईत पर्यटन मंत्रालयाकडे माहितीच्या अधिकारात 'वेडिंग टुरिझम'बाबत विचारणा केली होती. यात एमटीडीसी 'वेडिंग टुरिझम' अशी संकल्पना राबवत नसल्याचे उघड झाले. शिवाय कंत्राटदाराला लॉन बेकायदा दिल्याचा ठपकाही लवादाने ठेवला आहे. या प्रकारामुळे मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता बळावली आहे.

हरित लवादाने ध्वनी प्रदूषणाला बंदी घातल्यानंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये लग्न सोहळा होतो. फक्त वऱ्हाडी 'एमटीडीसी'च्या रिसॉर्टमध्ये थांबतात. जेवणाची व्यवस्था लॉनवर केली असून, त्याला परवानगी आहे.
- विशाल इंगळे, कंत्राटदार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ मदत निधी प्रस्तावामागेही राजकीय हेतू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अतिवृष्टी असो की दुष्काळ निधीची मागणी करून प्रस्ताव मंजूर करताना केवळ चार तालुक्यांचाच विचार केला जातो. जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आहे. परंतु, वैजापूर, पैठण, कन्नड तालुक्यांचा विचार का केला जात नाही? राजकीय हेतू ठेवून सदस्यांना खूष करण्यासाठी विशिष्ट तालुक्यांतच दुष्काळ व अतिवृष्टीचे प्रस्ताव मंजूर केले जातात, असा आरोप शिवसेना सदस्य दीपकसिंह राजपूत यांनी केला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी झाली. अध्यक्ष श्रीराम महाजन, सभापती सरला मनगटे, शीला चव्हाण, संतोष जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सदस्य दीपकसिंह राजपूत, अलका पळसकर, अनिल चोरडिया, ज्ञानेश्वर मोठे, मनोहर गवई, मोरे, रामदास पालोदकर आदी उपस्थित होते. ही सभा गेल्या बैठकीच्या अनुपालनातील मुद्द्यांवरच गाजली. दुष्काळी प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचे जे नियोजनातही चार तालुक्यांचाच समावेश आहे. हे ऐकल्यानंतर दीपकसिंह राजपूत यांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे प्रस्तावाची विचारणा केली.
आर. आर. पवार यांनी सांगितले, की सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती कळवून पूल व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडे २ कोटी ५१ लाख रुपयांची मागणी २० नोव्हेंबर २०१५ रोजी करण्यात आली. त्यात औरंगाबाद एक कोटी ३२ लाख, फुलंब्री ४० लाख, सिल्लोड ५५ लाख, गंगापूर २४ लाखांची मागणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एक पुरवणी प्रस्ताव पाठविला. त्यात औरंगाबाद तालुक्यासाठी ४६, सिल्लोडसाठी ५१ असा ९७ लाखांचा प्रस्ताव पाठविला गेला.
तो आधार घेऊन राजपूत म्हणाले, की दुष्काळी निधीवाटपातही याच चार तालुक्यांचा विचार केला गेला. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठीही तेच तालुके असा दुजाभाव का ? प्रस्ताव पाठविताना प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनीही काळजी घेतली पाहिजे. जिथे गंभीर परिस्थिती आहे, पाण्याचे टँकर सुरू आहेत अशा गावांना आधी मदत दिली पाहिजे. दोन्ही फायदे कसे काय घेता ? असा सवाल उपस्थित केला. सावरासावर करत अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी अजून नियोजन सुरू आहे. तुमच्या तालुक्यांचाही समावेश करू, असे सांगितले. त्यावर राजपूत यांनी नाराजी व्यक्त केली. मी माझ्या तालुक्याबद्दल नाही तर दुष्काळी भागाबद्दल बोलतोय. जोवर दुष्काळी भागांना निधी दिला जात नाही. तोवर कुठल्याही प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊ नये, अशी मागणी राजपूत यांनी केली. याशिवाय बोगस शाळा, बोगस डॉक्टर यासह अन्य विषयांवर चर्चा झाली.

चार तालुक्यानांच प्राधान्य
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला. यामध्ये औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यातील प्रस्ताव पाठविले गेले. दुष्काळी कामामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचे जे नियोजन केले गेले त्यातही याच चार तालुक्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजपूत यांची सरबत्ती; झेडपी प्रशासन निरुत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत यांनी शुक्रवारची स्थायी समिती सभा एकहाती गाजवली. तुफान बॅटिंग करत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. इतकेच नव्हे तर पदाधिकाऱ्यांनाही शांत बसावे लागले. राजपूत तासभर बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोरच अधिकाऱ्यांची चिरफाड झाली. अखेरीस चौधरींनी अधिकाऱ्यांना सात दिवसांत पेंडिंग कामे पूर्ण करून माझ्याकडे अहवाल द्या, अशी तंबी दिली.
राजपूत यांनी दोन वर्षांतील बैठकांच्या इतिवृत्तांमधून काही नोंदी, वर्तमानपत्रांची कात्रणे सोबत आणली होती. दुष्काळी निधीवरून अध्यक्ष आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निरुत्तर केल्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाकडे मोर्चा वळविला. प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्याकडे बोगस शाळांसंदर्भातील प्रश्न विचारला. जून महिन्यातील सभेत तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदन दिले होते. जिल्ह्यातील बोगस शाळांवर कारवाई केल्याचे सांगून देशमुख यांनी आकडेवारी सादर केली. पण राजपूत यांनी वूडरिच शाळेचा मुद्दा उपस्थित केला. देशमुख यांनी शांतपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पण राजपूत यांनी नियमांचा आधार घेऊन प्रत्येक उत्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोघांमधील शाब्दिक चकमक बराच वेळ चालली.
त्या दरम्यान राजपुतांनी प्रशासनाकडे मोर्चा वळविला. 'वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांची दखल कशी घेतली जाते ?' असे विचारल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले,'सीइओंनी दररोज कात्रणे काढून ती संबंधित विभागप्रमुखांकडे पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कामाचा निपटारा केल्यावर लक्ष दिले जाते.' असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना बोगस डॉक्टरांचा आकडा मात्र सांगता आला नाही. समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे यांना दलितवस्ती सुधार योजनेवरून राजपुतांनी कोंडीत पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाई निवारणातीलदिरंगाई महागात पडणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

जिल्ह्यात पाणी व चारा टंचाईची गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे टंचाई निवारणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. तसेच, पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात १५ शेततळी घेऊन जिल्ह्यात दहा हजार शेततळ्यांच्या निर्मितीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शुक्रवारी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज आढावा बैठक घेतली, या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत डॉ. दांगट म्हणाले, 'सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य देऊन निधी वेळेत खर्च करा. कामाचा दर्जा सुधारण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीने काम करणे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना वेळेत काम उपलब्ध करून द्या. मागेल त्याला शेत तळे देण्याचे नियोजन करून या कामास प्राधान्य देणे आवश्यक आहे. सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी पर्यायी स्रोत शोधून त्याचे योग्य नियोजन करावे. पाण्याच्या टँकरची जीपीएस प्रणाली तपासूनच त्यांना पैसे द्यावेत. जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. कार्यालयातील केलेल्या कामाची तपासणी करून कार्यालयातील दप्तर योग्य पद्धतीने वर्गीकृत करणे गरजेचे आहे.'
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आढावा बैठकीत डॉ. दांगट म्हणाले, 'पाणी टंचाई, चारा टंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रोजगार हमीची कामे सुरू करून मागेल त्याला काम देण्याची प्रक्रिया राबवावी. मागेल त्याला काम देण्यासाठी आणि पाणी व चारा टंचाई निवारणासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी एकत्रितपणे नियोजन करावे. गावातील शाळा, दवाखाने आणि स्मशानभूमीचे रस्ते प्राधान्याने करावेत.'
जलयुक्त शिवारची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करावीत. तसेच नवीन गावांची निवड व नवीन कामांना सुरूवातही येत्या मार्चपूर्वी करावी असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’साठी २९० कोटींचा प्रस्ताव

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

जलयुक्त शिवार योजनेच्या विशेष अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडे २९० कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा निधी राज्य शासनाकडून अतिरिक्त मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि सरकारच्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्याचा आपण विशेष प्रयत्न करत आहोत, अशी माहिती जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, 'जालना जिल्ह्यातील खरीप हंगामातील दुष्काळी अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील १२३ कोटी ८० लाख रुपये राज्य सरकारकडून मिळाले असून, रब्बी हंगामातील पीक विमा संरक्षण योजनेचे ६३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सरकारने शेतकऱ्याला हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेळेवर मदतीचा हात पुढे करण्यात आपल्याला यश मिळाले आहे. संपूर्ण राज्यात रब्बी हंगामातील पीक विमा योजनेचे २११ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात जालना जिल्हय़ातील शेतकऱ्यांचा ६३ कोटी रुपयांचा विक्रमी हिस्सा आहे, गतवर्षी दुष्काळी अनुदान २९० कोटी, पीकविमा १९० कोटी, ठिबक सिंचनासाठी अनुदान ६५ कोटी, जवाहर रोजगार हमी योजनेच्या विहीर अनुदान २१ कोटी हे शंभर टक्के वाटप करण्यात आले. या कामाचा मागोवा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आपण ४७ बैठका घेतल्या, शेतकऱ्याचे अनुदान वाटप करण्यात कामचुकारपणा करणारे भोकरदन आणि जाफराबाद या दोन तहसिलदारांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली दोन तलाठी निलंबित केले, संपूर्ण मराठवाड्यात या कामात जालना जिल्हा अव्वल एक नंबर स्थानावर आहे, याचे आपणास विषेश समाधान झाले आहे.'
या आर्थिक वर्षासाठी १८३ कोटी ३३ लाख रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी ३३ कोटी ३३ लाख रुपये, नाविन्यपूर्ण योजना सहा कोटी ७५ लाख, जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबविण्यासाठी ६२ कोटी चार लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. या सर्व निधीचा विनियोग योग्य पद्धतीने मुदतीच्या आत करण्यात येईल, या बाबतीत सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे. मार्च अखेरीस ज्या विभागात निधीचा विनियोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले, तर त्या विभाग प्रमुख अधिकारी जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे,आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, पालक सचिव संजय चाहते, जिल्हाधिकारी रंगानायक उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.

कारभारावर नाराजी
जालना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या कारभारावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी गंभीर नाराजी व्यक्त केली. 'जिल्हा नियोजन समितीने ६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. जानेवारी संपत आला, तरी त्यांच्या कामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले नाहीत. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामाला ११ कोटी २३ लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र आतापर्यंत फक्त चार कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यांचे उत्पन्न केवळ १८ कोटी रुपये हे अत्यंत तुटपुंजे आहे ते वाढवले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कारभाराला वळण लावावे लागणार आहे,' असे ते म्हणाले.

टोपे यांची टीका
जालना जिल्हा प्रशासन अतिशय ढेपाळलेले आहे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील जिल्हा बैठकीत या मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे, याकडे माजी पालकमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष वेधले. याशिवाय, अधिकारी जिल्ह्यात जलयुक्त शिवार कार्यक्रमाचा बँड वाजवत आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यात २५ गावे निवडली गेली. प्रत्यक्ष दोन चार गावात किरकोळच कामे झालेली आहेत, असा आरोप त्यांनी केला. कापूस उत्पादक शेतकरी दुष्काळी अनुदानातून वगळले आहेत या विरोधात रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहोत असे ते म्हणाले.

नगर पंचायतींसाठी विशेष बैठक
जालना जिल्ह्यातील शाळा खोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील अंबड, भोकरदन नगर परिषद आणि बदनापूर, मंठा, घनसावंगी आणि जाफराबाद या नगर पंचायतीचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.

नाविन्यपूर्ण योजनेसाठी प्रयत्न
जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेत सहा कोटी ७५ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी शासनाच्या मालकीच्या सहा पोकलेन मशिन खरेदी केल्या आहेत. यावर्षीसुद्धा पोकलॅन मशिन खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासाठी लोकसहभागातून या मशिनद्वारे करण्यात येणाऱ्या कामांकरिता डिझेलसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आली असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन केंद्रीय मंत्र्यांच्याहकालपट्टीची मागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्याप्रकरणी शुक्रवारी शहरातील विविध संघटना व राजकीय पक्षांतर्फे निषेध सभा घेण्यात आली. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून काढून त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित या निषेध सभेला विविध संघटनेचे कार्यकर्ते, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. रोहित वेमुला यांच्या कुटुंबाला दहा कोटी रुपयांची मदत करा, वेमुला याच्या साथीदारावरील खटले मागे घ्या आदी मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सुधीर शेट्टी यांना देण्यात आले.
या आंदोलनात भिकाजी आठवले, सोमनाथ भारतवाले, गणेश पवार, गौरव आठवले, रावसाहेब अडसूळ, राजेंद्र उगले, गौतम बनकर, नंदकिशोर मगरे, कपिल पहीलवान, सुनील अडसूळ, सुमित मगरे, शांतवन घोडके, कल्याण भूकिले, शेषराव निकाळजे, बाबासाहेब गायकवाड, ताराचंद दाभाडे, कल्याण मगरे, सुरेश घोडके, सिद्धार्थ मगरे, रवींद्र काळे, सिद्धार्थ वाहुळे, कृष्णा निवारे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू तस्करांची २४ वाहने जप्त

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पैठण
पोलिसांनी चोरटी वाळूवाहतूक करणारे १४ ट्रॅक्टर व वाळूचोरांच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या व १४ जणांना अटक केली. नदीपात्रात वाळूतस्करांनी मांडलेल्या उच्छादाबद्दल 'मटा' मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी हा कारवाई केली. पोलिसांनी ३० लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
गेल्या एक महिन्यांपासून तालुक्यातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू आहे. नदीपात्रात मशीनच्या साह्याने ३० ते ३५ फूट खोल खड्डे खोदून वाळू उपसा करत आहेत. यामुळे गोदाकाठच्या गावामधील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खाली जात असून आगामी उन्हाळ्यात या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नदीपात्रातील वाळू चोरी रोखावी यासाठी मायगाव वाघाडीच्या सरपंच लताबाई घटे व वडवलीचे ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले होते. यासंबंधीची बातमी २० जानेवारीच्या 'मटा' मध्ये प्रसिद्ध झाली. याची उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चनसिंग यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी स्वतः पथकाचे नेतृत्व केले. या पथकात बिडकीनचे पोलिस उपनिरीक्षक बी. जी. डुल्लत, पोलिस कर्मचारी एफ. डी. पठाण, आर. जे. पंडित व एस. बी. भालेराव यांचा समावेश होता. या पथकाने २१ जानेवारीला पहाटे चार वाजता पाटेगाव पूल ते आयटीआय कॉलेज या भागात धाड मारत चोरीची वाळू वाहतूक करणारे १४ ट्रॅक्टर, लोकेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या १० मोटारसायकल जप्त करून १४ जणांना अटक केली. या कारवाईत ३० लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती बच्चनसिंग यांनी दिली.

गुप्तता पाळून कारवाई
वाळू चोरांवरील छापे मारण्याच्या कारवाईबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चनसिंग यांनी गुप्तता पाळली होती. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी व बिडकीनच्या सहायक पोलिस निरीक्षकाला ऐनवेळेवर माहिती देण्यात आली. पैठण पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई झाल्यानंतर माहिती देण्यात आली. यामुळे पैठण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणोरीतील विद्यार्थिनीखाजकुरीमुळे हैराण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेत आठवी व नववीच्या विद्यार्थिनींच्या बाकावर खोडसाळपणे खाजकुरी टाकली जात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेत धाव घेऊन मुख्याध्यापकांकडे शुक्रवारी तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना हा प्रकार बंद करण्याची तंबी दिली आहे.
गणोरी येथे जिल्हा परिषद शाळेतील आठवी व नववीच्या वर्गातील मुलींच्या बाकांवर तीन दिवसांपासून खाजकुरी टाकली जात आहे. यामुळे बाकाबर बसताच विद्यार्थिनींच्या अंगाला खाज सुटत आहे. वर्गशिक्षकांनी बाक व खोल्या धुवून काढल्या. परंतु, हा प्रकार दररोज घडत असल्याने पालकांनी शुक्रवारी शाळेत धाव घेऊन शिक्षकांना जाब विचारला. याच वर्गात एका बाजुला मुलेही बसतात मात्र, त्यांच्या अंगाला खाज येत नसल्याचे उघड झाले.
'हा प्रकार काही खोडसाळ विद्यार्थी करत असावेत. विद्यार्थ्यांवर नजर ठेऊन त्यांच्या पालकांना कळविणार आहोत. संशयावरून एखाद्या विद्यार्थ्याला जबाबदार धरल्यास त्यांचे पालक आम्हालाच जाब विचारतील,' असे मुख्याध्यापिका गौसिया बेगम यांनी सांगितले.
दरम्यान, काही पालकांनी या प्रकाराची फुलंब्री पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संदीप साळुंके, दिनेश पुसे व इतर पोलिसांनी शाळेत येऊन चौकशी केली. आठवी व नववीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना तंबी दिली. हा खोडसाळपणा करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये गरजूंसाठी ‘द्रौपदीची थाळी’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दुष्काळामुळे रोजगाराच्या शोेधामध्ये शहराकडे येणाऱ्यांबरोबरच, रुग्णांवरील उपचारांसाठी शहरांमध्ये काही काळ राहावे लागणाऱ्या नागरिकांच्या पोटाचा प्रश्न मिटविण्यासाठी उस्मानाबादमधील काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. 'अन्नपूर्णा ग्रुप'च्या माध्यमातून या तरुणांकडून अशा नागरिकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले असून, दररोज त्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे.
गाव सोडून शहरामध्ये आल्यानंतर निवारा आणि दोन वेळच्या जेवणाची सर्वांत पहिल्यांदा भ्रांत असते. दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये स्थलांतराचे प्रमाण वाढत असताना, ही गोष्ट प्रकर्षाने समोर येते. यातच, वैद्यकीय उपचारांसाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती रुग्णालयांमध्ये दाखल असेल, तर कुटुंबातील किमान एखाद-दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याबरोबर राहावेच लागते. त्यामुळे त्यांच्यासाठीही जेवणासाठी गावाकडून डब्याची वाट पाहावी लागते. अशा सर्वांसाठी 'अन्नपूर्णा ग्रुप'कडून अन्नछत्राची कल्पना पुढे आली. उस्मानाबाद शहरातील मारवाडी गल्ली व सावरकर चौकामध्ये हा उपक्रम राहविण्यात येतो. अतुल अजमेरा, राजकुमार अजमेरा, जितेंद्र खेडेरिया, अमर चांडक, मनोज कोचेटा, कमलाकर मस्के, कुणाल गांधी, शकील पठाण व त्यांच्या अन्य सहकारी मित्रांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. दररोजच्या जेवणामध्ये भाजी, चटणी, वरण-भात व भाकरी किंवा चपाती अशा स्वरुपांत भोजन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सध्या या अन्नछत्रातून दररोज १२५ व्यक्तींना भोजन देण्यात येते. रुग्णालयातील गरजू पेशंटना डबा पोहोचविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय आणि स्त्री रुग्णालयामध्ये ही सेवा पुरविण्यात येते. विशेष म्हणजे या उपक्रमाची माहिती गरजूंपर्यंत पोहोचावी, यासाठीही या तरुणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर, अन्नछत्राला हातभार लावण्यासाठी समाजातील मान्यवर पुढे येऊ लागले आहेत. काही जणांकडून वाढदिवसाबरोबर अन्य कारणास्तव येथे भोजन करणाऱ्यांना मिठाईचे वाटपही केले जाते.
'अन्नपूर्णा ग्रुप'च्या २५ ते ३० वयोगटांतील या युवकांनी अन्नपूर्णा छत्र उभारून 'जगा आणि जगू द्या'चा नाराच दिला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक जणांनी व्यक्त केली आहे. खासदार रवींद्र गायकवाडसह शहरातील मान्यवरांनी या अन्नछत्रास भेट देऊन समाजसेवा करणाऱ्या युवकाचे खास कौतुक केले. शिवाय सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निकृष्ट अन्नामुळे विद्यार्थी रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक एकमध्ये शिळे व निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठात 'रस्ता रोको' आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी करपलेल्या जाड पोळ्या, विटलेली भाजी घेऊन कुलगुरुंच्या निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

गेल्या काही दिवसांपासून वसतिगृहामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न देण्यात येत होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. यापूर्वी एक मोठे आंदोलनही केले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शुक्रवारी सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना विटलेली भाजी, शिळ्या व करपलेल्या पोळ्या व शिळा भात वाढण्यात आला. विद्यार्थी संतप्त झाले. वाढलेली भाजी, पोळ्या घेऊन ७० ते ८० विद्यार्थी रस्त्यावर आले आणि विद्यापीठ प्रशासनाविरोधात ‌घोषणाबाजी करत त्यांनी 'रस्ता रोको' केला. काही वेळेतच आंदोलनकांनी संख्या वाढल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले आणि रस्त्यावरून विद्यार्थ्यांना हटविण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. 'आम्हाला चांगले अन्न द्या,' अशी मागणी करत त्यांनी तुफान घोषणाबाजी केली.

‌वसतिगृह क्रमांक एकमध्ये सुरू असलेल्या मेसमधून विद्यापीठातील इतर वसतिगृहांतही भोजन पुरविले जाते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मेसमध्ये शिळ्या पोळ्या, विटलेली भाजी आणि उरलेला भात दुसऱ्या दिवशी वाढण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला. आंदोलन तीव्र होत असल्याचे ‌निर्शनास आल्यानंतर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सय्यद अझरुद्दीन, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. किशन धाबे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. दररोज एक प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांसोबत जेवणा करायला येणार असल्याचे सांगितले. दररोज एका प्राध्यापकालाही मेसमध्ये जेवायला लावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

दुष्काळामुळे विद्यार्थ्यांपुढे प्रश्न
विद्यापीठामध्ये बहुतांश विद्यार्थी मराठवाड्यातील विविध भागांतून शिक्षणासाठी आलेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मेसमधून मोफत अन्न देण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडे मेसमध्येच जेवण केल्याशिवाय पर्याय नाही. निकृष्ट अन्न खाल्ल्यामुळे विद्यार्थी अनेकदा आजारी पडतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कर दुपटीने वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई परिसराचा औरंगाबाद महापालिकेत समावेश झाल्यामुळे या परिसरातील मालमत्ता कर दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढीव मालमत्ता करामुळे महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे दहा कोटी रुपयांची वाढ होईल, असे मानले जात आहे.
सातारा-देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेने या परिसरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार सातारा-देवळाई परिसरात मालमत्ता २७ हजार ५६६ आहेत. यापैकी १२२१ मालमत्ता व्यावसायिक स्वरुपाच्या आहेत. उर्वरित मालमत्ता निवासी आहेत. परिसराचा एकूण विस्तार लक्षात घेता निवासी व व्यावसायिक मालमत्तांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता महापालिकेतर्फे वर्तवली जात आहे. त्यामुळे या भागातील मालमत्तांच्या फेरमूल्यांकनासाठी विशेष पथक नियुक्त करण्याचे नियोजन पालिकेच्या करमूल्य निर्धारण व संकलक विभागातर्फे केले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात फेरमूल्यांकनाचे काम सुरू होईल, असे सांगितले जाते.

सातारा-देवळाई परिसरातील नागरिक सध्या घरपट्टी, दिवाबत्तीकर व साफसफाई कर भरतात. ९०० ते १५०० रुपयांदरम्यान कर आकारणी करण्यात आलेली आहे. महापालिकेतील समावेशानंतर सामान्य कर, शिक्षण कर, रोहयो कर, जलनिःसारण कर, साफसफाई कर, वृक्षकर असे विविध कर नागरिकांना भरावे लागणार आहेत. यासर्व करांमध्ये सामान्य कराचे प्रमाण जास्त असते. सामान्य कर ३० टक्के आकारला जातो. त्याखालोखाल सहा टक्के शिक्षण कर वसूल केला जातो. निवासी वापरासाठीच्या मालमत्तांसाठी सामान्य कर ३० टक्के तर, व्यावसायिक मालमत्तांसाठी हाच कर ४५ टक्के आहे.

सध्या सातारा देवळाई भागात सामान्य कराची आकारणी होत नाही. महापालिकेतील समावेशामुळे सामान्य कराचा मोठा बोजा या भागातील नागरिकांवर पडणार आहे. सामान्य कर नेट रेटेबल व्हॅल्यूच्या प्रमाणात निश्चित केला जातो. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या कर आकारणीमुळे सातारा-देवळाईवासीयांच्या करामध्ये दुप्पटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिसूचनेच्या तारखेपासून कर आकारणी
महाराष्ट्र शासनाने सातारा-देवळाई नगर पालिका बरखास्त करण्यात आल्याची अधिसूचना १८ जानेवारी २०१६ रोजी काढली. त्या तारखेपासून या भागात महापालिकेच्या निकषानुसार मालमत्ता कराची आकारणी केली जाणार आहे. अधिसूचनेच्या तारखेपासून नवीन कर आकारणी केली जाणार असली तरी करांची थकबाकी महापालिकाच वसूल करेल. थकबाकी जुन्या दराने वसूल केली जाईल, अशी माहिती करमूल्य निर्धारक व संकलक अय्युब खान यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमटीडीसी’त लग्न सोहळे बंद!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट परिसरात लग्न सोहळ्याला परवानगी नसूनही कंत्राटारांनी नियम धाब्यावर बसवले आहेत. औरंगाबाद कार्यालय परिसरात गुरुवारी झालेल्या लग्न सोहळ्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आपण बाहेरगावी असून रूजू झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करणार असून यानंतर लग्न सोहळ्यांसाठी परवानगी मिळणार नाही असे 'एमटीडीसी'चे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व कंत्राटदार विशाल इंगळे यांच्यात दहा वर्षांसाठी करार झाला आहे. या करारानुसार 'एमटीडीसी'च्या रिसॉर्टमधील रूम भाड्याने देणे आणि केटरिंग सेवा पुरवणे अपेक्षित आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून इंगळे यांनी मागील आठ वर्षांपासून रिसॉर्ट परिसरातील लॉन लग्नासाठी भाड्याने देण्याचा प्रकार सुरू केला. या प्रकारामुळे पर्यटकांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. शिवाय पगारिया कॉलनीतील रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास झाला. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्यात आली होती. त्यानुसार मागील आठवड्यात ध्वनी प्रदूषणासाठी जबाबदार धरत लवादाने 'एमटीडीसी'ला पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला. तसेच लग्न सोहळ्यांसाठी शासकीय जागेचा वापर करू नये असे आदेशात म्हटले. या आदेशानंतरही कंत्राटदार विशाल इंगळे यांनी लॉन लग्नासाठी भाड्याने दिली. हा प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघड केल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली. हा प्रकार पर्यटन मंत्रालयापर्यंत पोहचला आहे. दरम्यान, 'एमटीडीसी'चे उपव्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब शिंदे विदेश दौऱ्यावर आहेत. मात्र, या प्रकारणाची चौकशी करणार असून पुढील काळात लग्न सोहळ्यांसाठी परवानगी देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारवाईची प्रतीक्षा
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाची पायमल्ली करून कंत्राटदार विशाल इंगळे यांनी लॉनचा गैरवापर केला. हा लवादाचा अवमान ठरला आहे. ध्वनी प्रदूषण व इतर नियमांसाठी लवादाचे आदेश महत्त्वपूर्ण आहेत. इंगळे यांनी आदेशाला जुमानले नसल्यामुळे या प्रकरणात संबंधित तक्रारदार दाद मागणार आहेत. त्यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात बांधकामासाठी हवी सिडकोची ‘एनओसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई पालिकेचा परिसर महापालिकेत समाविष्ट झाला असला तरी, तेथे बांधकाम परवनागीसाठी सिडकोचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. त्याचबरोबर या भागाच्या विकासासाठी झालर आराखडा लागू करण्यात येणार आहे.

महापालिकेत समावेशानंतर सातारा-देवळाईतील बांधकाम परवाने कसे मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले की, सातारा-देवळाई भागात बांधकाम परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाऊ शकेल. हा परिसर सिडकोच्या झालर क्षेत्र विकास आराखड्याचा भाग आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे बांधकाम परवानगी मिळणार असली तरी, नागरिकांना बांधकामासाठीचे सिडकोकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' घ्यावे लागणार आहे. झालर क्षेत्राचा विकास आराखडा या परिसरासाठी बंधनकारक असेल.

अतिरिक्त आयुक्त पवार म्हणाले, 'या परिसरात रस्ते, वीज, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, खुल्या जागांचा विकास, उद्यानांची व्यवस्था या सामाजिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यांच्या नियोजनासाठी पुढील आठवड्यात महापौर त्र्यंबक तुपे व आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे नियोजन आहे. पाणीपुरवठ्याची व्यवस्था सध्यातरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातूनच केली जात आहे. त्यासाठी येणारा खर्च महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करेल. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीची वाट न पाहता सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत सातारा-देवळाई परिसरात आवश्यक ती कामे तात्काळ सुरू करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे साफसफाईसह आरोग्य सेवेची कामे तात्काळ सुरू केली जातील.'

सातारा परिसरात जिल्हा परिषदेची शाळा आहे. ती कायम ठेवून तेथे महापालिकेची एक शाळा नव्याने सुरू करता येणे शक्य आहे का, याचाही विचार केला जाणार आहे. या परिसरात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आयोग्य केंद्र आहे. नवी इमारत उपलब्ध होईपर्यंत तेथे महापालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. रस्ते विकास हा या भागातील महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी शासनाकडे विशेष अनुदानाची मागणी करावी लागणार आहे. सातारा येथील खंडोबाच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे हे काम तात्काळ सुरू होऊ शकते. या संदर्भात महापौर व आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वतंत्र वॉर्ड कार्यालय
सातारा - देवळाई भागासाठी स्वतंत्र वॉर्ड कार्यालय सुरू केले जाणार आहे. सध्या ज्या इमारतीत नगरपालिकेचे कार्यालय आहे त्याच इमारतीत वॉर्ड कार्यालय सुरू केले जाईल. सध्या 'फ' वॉर्ड कार्यालयामार्फत या वॉर्ड कार्यालयाचा कारभार पाह‌िला जातो. स्वतंत्र वॉर्ड कार्यालय सुरू केल्यावर तेथे वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंता, अतिक्रमण हटाव विभाग यासह करआकारणी व कर वसुली विभाग सुरू केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर झेडटीसीसीला मिळाला अध्यक्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रभारी का असेना 'झेडटीसीसी'ला अध्यक्ष मिळाले असून, समितीला मंजुरी मिळाल्यानंतर साडेचार वर्षांनंतर समितीचे कामकाम सुरू होत आहेत. ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी यांना अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी 'डीएमईआर'कडून पत्र प्राप्त झाले. पत्रानुसार त्यांची समितीच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झाल्याचे 'डीएमईआर'ने स्पष्ट केले. ही समिती स्थापन व्हावी, यासाठी 'मटा'ने पाठपुरावा केला आहे.
'ब्रेन डेड' व्यक्तीच्या अवयवदानासाठी, गरजुंची अधिकृत प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी, प्रत्यारोपण होणाऱ्या रुग्णालयांशी समन्वयासाठी, प्रतीक्षा यादीनुसार अवयवदानासाठी आणि प्रक्रियेवर नियंत्रण-नियमनासाठी 'झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी' आवश्यक आहे. या शासनमान्य; परंतु अशासकीय समितीला मराठवाडा विभागासाठी २०१२मध्ये मान्यता मिळाली. डॉ. व्ही. जी. काळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती; परंतु त्यानंतरही समिती कार्यरत झाली नाही. दोन वर्षांपूर्वी अवयवदान दिनानिमित्त 'मटा' कार्यालयात झालेल्या मूत्रपिंडविकारतज्ज्ञ व वैद्यकतज्ज्ञांच्या उपस्थितीत घाटीचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी सर्वांसमक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांचे नाव 'झेडटीसीसी'च्या अध्यक्षपदी जाहीर केले व तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला. त्यानंतर 'डीएमइआर'चे अतिरिक्त सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनीही 'मटा'ला दिलेल्या भेटीतही कुलकर्णींचे नाव घोषित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images