Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नियम डावलून अनधिकृत बांधकामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निश्चित 'एफएसआय'पेक्षा जास्तीचे बांधकाम, नाले बुजवून प्लॉटचे मार्किंग अन् सातारा टेकडी व गायरान जमिनीवरील अवैध बांधकाम महापालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाला. मात्र, अवैध बांधकामांवर कारवाई होणार का, हा पेच कायम आहे.

सातारा-देवळाईचा समावेश महापालिकेत होणार की नगर पालिका स्थापन होणार हा प्रश्न प्रलंबित होता. नवीन बांधकामांना परवानगी मिळत नव्हती. परिणामी, सातारा-देवळाईत बांधकामांचा वेग कमी असला तरी बांधकामे थांबलेली नाहीत. शहर वाढत असल्याने 'एनए ४५' आणि '४७ (ब)' प्लॉटची सर्रास विक्री सुरू आहे. 'एनए-४४' प्लॉट कमी असल्यामुळे अवैध बांधकामांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत देवळाई व सातारा परिसरात शेकडो अवैध बांधकामे आहेत. शासकीय नियमानुसार निश्चित 'एफएसआय'पेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले आहे. सहाशे स्क्वेअर फूट प्लॉटवर तीन मजली इमारती उभ्या आहेत. सातारा परिसरातील नाले मातीची भर टाकून वळवले असून या जागा वादग्रस्त ठरल्या आहेत. नाल्याची अर्धी जागा आणि शेजारची अर्धी जागा असा स्वतंत्र प्लॉट बनवून विक्री झाली आहे. सध्या या प्लॉटवर इमारती उभ्या आहेत. खंडोबा मंदिर परिसरातील नवीन बांधकामांचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे सातारा टेकडीला मागील काही महिन्यात अनधिकृत बांधकामांचा वेढा पडला आहे. नवीन बांधकामे टेकडीच्या वरील दिशेने सुरू आहेत. त्यामुळे काही वर्षांत अनधिकृत बांधकामे टेकडी पूर्णपणे गिळंकृत करण्याची शक्यता आहे. या बांधकामांवर कारवाई झाली नसल्याने बिल्डर व झोपडपट्टीधारकांनी दोन्ही बाजूंनी अतिक्रमण केले आहे.

सातारा टेकडीच्या समोरील बाजूस अपार्टमेंट आहेत. तर मागील बाजूस झोपडपट्टी वसली आहे. नवीन बांधकामांचा वेग कायम असून मनपाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिल्डर, जमीनधारक व रिअल इस्टेट एजंट यांची मोठी साखळी आहे. राजकीय हस्तक्षेपाने कारवाई थांबवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. सातारा-देवळाई महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे नागरिक समाधानी असले तरी कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

'नियमित' करण्याची आशा
कमी जागेत अधिक बांधकाम करण्यासाठी रहिवासी आघाडीवर आहेत. आतापर्यंत कारवाई झाली नसून पुढील काळात बांधकाम नियमित होईल असे बिल्डर व एजंट सांगतात. या प्रकारामुळे नियमापेक्षा अधिक बांधकाम करण्यात आले. शिवाय सातारा-देवळाईत दोन वर्षांत अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. महापालिका प्रशासनाला अनधिकृत बांधकामांचा आढावा घेतल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन वॉर्डांची निवडणूक ए‌प्रिलच्या मध्यात

$
0
0

म. टा प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई परिसराचा औरंगाबाद महापालिकेत समावेश झाल्यामुळे या परिसराच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; एप्रिल महिन्याच्या मध्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने या परिसरात दोनच वॉर्डांची रचना केली आहे, त्यामुळे दोन वॉर्डांसाठीच निवडणूक होईल, मात्र त्यांचे आरक्षण बदलू शकते असे मानले जात आहे.

या परिसराचा महापालिकेतील समावेशाची चर्चा गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीपासून सुरू होती. महापालिका निवडणुकीनंतर राज्य निवडणूक आयोगाने सातारा-देवळाई परिसरात दोन वॉर्डांची रचना केली. ५२ हजार ९१६ एवढी लोकसंख्या दोन वॉर्डांमध्ये विभागण्यात आली आहे. त्यांची आरक्षणाची सोडतही त्यावेळी काढण्यात आली होती. देवळाईचा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी तर, साताराचा वॉर्ड एनटी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला.

वॉर्डांच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर काही महिने उलटून गेले आहेत. प्रशासकीय फेरबदल देखील मोठ्या प्रमाणात झाले आहेत. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेला सातारा-देवळाईचा परिसर महापालिकेतून काढून टाकण्यात आला. त्यानंतर १८ जानेवारी रोजी पुन्हा एक अधिसूचना काढून शासनाने सातारा-देवळाई नगरपालिका बरखास्त केली. त्यामुळे या परिसराचा समावेश आपोआपच महापालिकेत झाला. त्यामुळे आता सातारा-देवळाईच्या दोन वॉर्डांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे मानले जात आहे. नियमानुसार सहा महिन्यांत या दोन वॉर्डांची निवडणूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे जून किंवा जुलैमध्ये निवडणूक होऊ शकते, पण या काळात शाळा सुरू होतात आणि पावसाळाही असतो. त्यामुळे एप्रिलच्या मध्यात या दोन वॉर्डांची निवडणूक होईल, असे मानले जात आहे. वॉर्डांची रचना कायम ठेवत आरक्षणाची सोडत नव्याने काढली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीविना जखमी दीड तास पडून

$
0
0


म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोणतीही घटना घडली व पोलिसांना तत्काळ फोन केला तर अवघ्या काही मिन‌िटात मदतीसाठी पोलिस धावून येतील अशा बढाया पोलिसांकडून मारल्या जातात, मात्र या पोकळ वल्गनाच असल्याचे शुक्रवारी दुपारी नूतनकॉलनी येथील एका घटनेवरून उघड झाले. दुचाकीच्या अपघातात जखमी झालेली व्यक्ती मदतीअभावी दीड तास पडून होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रांतिचौक पोलिस ठाण्याला तसेच नियंत्रण कक्षाला कॉल करून देखील मदतीसाठी पोलिस आलेच नाहीत.
शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिल्लेखान्याकडून एक दुचाकीस्वार क्रांतिचौककडे जात होता. त्याची बॅग हँडलला अडकल्याने टेलिफोन भवनसमोर तो दुचाकी घसरून पडला. या अपघातात गालाला मार लागल्याने तो जखमी होऊन त्याची शुद्ध हरपली. हा प्रकार पाहताच नागरिकांनी गर्दी केली. मात्र, त्याच्या मदतीसाठी कोणी पुढे सरसावले नाही. तेथून जात असलेल्या अक्षय रापतवार व गणेश मानकापे या तरुणांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी जखमी व्यक्तीला बाजूला घेतले. त्याच्या मोबाइलवरून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अक्षयने सव्वा चार वाजेच्या सुमारास क्रांतिचौक पोलिस ठाणे येथील दूरध्वनी क्रमांक २२४०५५२ वर संपर्क साधून ही माहिती दिली. समोरील कर्मचाऱ्याने अक्षयची माहिती नोंदवून घेत लवकर गाडी पाठवतो म्हणून सांगितले.
बराच वेळ उलटूनही पोलिसांचे वाहन आले नसल्याने गणेश मानकापे याने तब्बल ४५ मिन‌िटांनी पाच वाजता नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर संपर्क साधून माहिती देत मदत मागितली. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी देखील लगेच मदतीसाठी वाहन पाठवतो म्हणून सांगितले. मात्र, मदतीसाठी पोलिस आलेच नाही. एव्हाना जखमी पडलेल्या नागरिकाला शुद्ध आली होती. रापतवार व मानकापे यांनी त्याला पाणी व चहा पाजल्यानंतर त्याला तरतरी आली. उस्मानपुरा परिसरात घर असल्याची माहिती त्याने दिली व दुचाकी घेऊन तो स्वतःच निघून गेला, मात्र या घटनेत पोलिसांच्या अवघ्या काही मिन‌िटात प्रतिसाद देण्याची ही अजब प्रचिती समोर आली.
---
जखमी नागरिक पाहिल्यानंतर जवळच असलेल्या क्रांतिचौक पोलिस ठाण्याला फोन करून माहिती कळवली. मात्र, एक ते दीड तास वाट पाहूनही पोलिसांची मदत पोहोचली नाही. शेवटपर्यंत त्याच्यासोबत थांबणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही तेथे थांबलो.
- अक्षय रापतवार
---
पोलिसांकडून काही मदत हवी असल्यास नियंत्रणकक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते. जखमीला त्वरित वैद्यकीय मदत मिळावी म्हणून नियंत्रण कक्षाला देखील फोन केला. मात्र, त्यांनी देखील ही बाब गांर्भियाने घेतली नसल्याचे दिसून आले.
- गणेश मानकापे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय जमिनीवर प्लॉटिंग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय जमिनीची प्लॉटिंग करून विक्री केल्याचा प्रकार पडेगावमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर २००९ ते मे २०१२ या काळात भूमाफियांनी हे उद्योग केले.
पडेगाव येथील गट क्रमांक ७१ येथे पाच वर्षांपूर्वी शेख चांद शेख अकबर (रा. मिसारवाडी) याने हप्त्यावर प्लॉट घेतला होता. सय्यद रशीदोद्दीन सोहेल कादरी, (रा. हिमायतबाग), शेख मुनीर शेख महेबूब (रा. समतानगर) तसेच मुनीरचा मुलगा व भाच्यासोबत त्याचा व्यवहार झाला होता. या आरोपींनी त्याच्याकडून हप्त्याचे पैसे घेतल्यानंतरही त्याला प्लॉट दिला नव्हता. हा प्रकार समजल्यानंतर शेख चांदने चौकशी केली असता त्याचा प्लॉट परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले. ही जमीन शासकीय व हस्तांतरित होणारी नाही. हे माहित असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अनाधिकृत प्लॉट पाडून त्याची विक्री करण्यात आली आहे. ही फसवणूक झाल्याप्रकरणी शेख चांदच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध फसवणूक, अपहार व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडेगावातील जमिनीच्या प्लॉटिंग प्र्रकरणाने पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे. अशी प्रकरणे इतर भागात आहेत का याचाही तपास केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे

$
0
0

सातारा : सातारा-देवळाई नगर पालिकेचा कारभार शुक्रवारी (२२ जानेवारी) महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थ‌ितीत महापालिकेकडे हस्तांतरित झाला आहे. वॉर्ड 'फ'चे वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग यांच्याकडेच पुन्हा प्रभारी पदभार दिला आहे.

यावेळी महापौर तुपे म्हणाले की, पाणीपुरवठा व साफसफाई ही कामे सुरू करण्यात येतील. या भागातील पथदिव्यांचा प्रश्नही गंभीर अाहे. तांत्र‌िक अडचणीमुळे ते काम झाले नव्हते. त्यासंदर्भातील निविदाही काढण्यात आली आहे. आता लगेचच पथदिवे बसविण्यास सुरुवात होईल. महापालिकेचे आरोग्य केंद्र सुरूच आहे. या भागात २० खाटांचे एक हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याची राहिलेली कामेही लगेचच मार्गी लावण्यात येतील. साताऱ्याचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. शहराची प्रभाग रचना बदलण्यात आली आहे. त्यानुसार ९ प्रभाग करण्यात आलेले आहे. सातारा, देवळाई प्रभागातही कांचनवाडी, नक्षत्रवाडी, राहुलनगर, सादातनगरचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात पोटनिवडणूक झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतरच साताऱ्याला कायमस्वरुपी वॉर्ड अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.

यावेळी राजू वैद्य, गजानन बारवाल, सिद्धांत शिरसाट, राजेद्र राठोड, रमेश बाहुले, उपायुक्त रवींद्र निकम, अस्थापना अधिकारी, भालचंद्र पैठणे, प्रशासक रमेश मुनलोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कायंदे आदींची उपस्थ‌िती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिप्र कार्यकारिणीच्या वैधतेवर शिक्कामोर्तब

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीच्या वैधतेवर मुंबईच्या उपधर्मादाय आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर झालेल्या बदलाची नोंद घेण्यात येणार आहे. या निर्णयाने मशिप्रच्या नवीन कार्यकारिणीला मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक १० जुलै २०१३ रोजी घेण्यात आली होती. मंडळाच्या सर्वसाधारण सभेत १०२ सभासदांनी बहुमताने कार्यकारिणी निवडली. त्यात प्रकाश सोळंके यांची अध्यक्षपदी तर शेख अहमद शेख चांद, मानसिंग पवार यांची उपाध्यक्षपदी आणि आमदार सतीश चव्हाण यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती. या निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकारिणी बदलाची नोंद घेण्याबाबतचा मंडळाचा अर्ज औरंगाबाद उपधर्मादाय आयुक्त यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. १६ जून २०१५ रोजी मंडळाचा अर्ज फेटाळण्यात आला. या निर्णयाला सरचिटणीस सतीश चव्हाण व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या उपधर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. या अपिलावर २१ जानेवारी १६ रोजी अंतिम सुनावणी झाली. धर्मादाय आयुक्तांनी सरचिटणीस व पदाधिकाऱ्यांचे अपिल मंजूर करताना औरंगाबाद उपधर्मादाय आयुक्तांचा आदेश रद्दबातल ठरवला. तसेच मंडळाच्या सर्वसाधारण सभेने बहुमताने निवडलेल्या कार्यकारिणीची निवड वैध ठरवली. या निर्णयामुळे मंडळाच्या शैक्षणिक विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. मंडळाची बाजू अॅड. नंदकुमार खंदारे, अॅड. दिलीप चौधरी, अॅड. निकम यांनी मांडली.
विविध उपक्रमांची अंमलबजावणी
या निर्णयाबद्दल प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मंडळाचे सरचिटणीस व आमदार सतीश चव्हाण म्हणाले, 'न्यायालयात प्रकरण असल्याने अनेक शैक्षणिक उपक्रमांचे काम थांबलेले होते. आता विविध उपक्रमांच्या कामांना वेग येईल. संस्थेच्या परिसरात असलेल्या विविध कॉलेजमधून सुमारे १८ हजार विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. त्यात मुलींचीही संख्याही लक्षणीय आहे. मुलींसाठी नवीन ११ मजली वस्तीगृह उभारण्यात येईल. क्लासरूमची संख्या कमी पडत असल्याने नव्याने इमारत उभारण्यात येणार आहे. हर्सूल येथे उर्दू माध्यमातून महिलांसाठी एक कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. तसेच लोहारा येथे कला, वाणिज्य कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे. ही दोन्ही कॉलेजेस येत्या जूनपासून सुरू होतील,'असे चव्हाण यांनी सांगितले. या प्रसंगी उपाध्यक्ष शेख अहमद शेख चांद, डॉ. अविनाश येळीकर, मोहन सावंत, त्र्यंबक पाथ्रीकर, अभिजित आवरगावकर, विश्वास पाटील, प्रकाश भांडवलदार, प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : पापडरोल, शेवभाजीची चव ‌न्यारी

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणापूर्वी पापड खाण्याची पद्धत आहे, पण पापडाची भाजी केली तर? जरा वेगळे वाटेल, पण मोंढा नाका परिसरातील साईप्रसाद हॉटेलमधील पापडाच्या रोलची भाजी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तेथील मसालेदार शेवभाजीसाठीही प्रसिद्ध आहे. स्वच्छता, चांगली सेवा आणि दर्जा यांवर भर देणाऱ्या साईप्रसाद हॉटेलमधील पापडरोल आणि शेवभाजी खवय्यांच्या पसंतीस उतरली आहे.

मोंढा नाका परिसरातील साईप्रसाद हॉटेल काही वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. प्रत्येक टेबलावर हिरव्या मिरचीचा ठेचा, लोणचं आणि तेल ठेवलेले असते. लसणाचा ठेचा ग्राहकांच्या आवडीचा आहे. येथे येणारे ग्राहक शेवभाजी आणि पापडरोलला प्राधान्य देतात.

'साई प्रसाद'चे संचालक सुनील इंगळे-पाटील यांनी १५ वर्षांपूर्वी हॉटेल सुरू केले. हे हॉटेल मोढा नाका परिसरात मुख्य रस्त्यापासून थोडेसे आत आहे. पापड रोलबाबत त्यांनी सांगितले, बाजारात चांगल्या कंपनीचे किंवा स्थानिक, पण चांगल्या क्वालिटीचे पापड वापरले जातात. रोल तयार करण्यासाठी पापड काही सेकंद पाण्यात भिजवून बाहेर काढले जातात. पाण्यातून काढलेल्या पापडाचे रोल तयार करून त्यात किसलेले पनीर व मसाला भरला जातो. प‌नीर, मसाला भरलेले पापड रोल तळले जातात.

तळलेले रोल खास करीमध्ये (ग्रेव्ही) टाकले जातात. भाजीसाठी ग्रेव्ही कांदा-टोमॅटोमध्ये तयार केली जाते. त्यात काजू, मगध, तिळ, खोबरे, शेंगदाणे हे भाजून पेस्ट तयार केली जाते. आलं-लसुणाच्या फोडणीत कांदा-टोमॅटोची प्युरी टाकली जाते. त्यात मिरची, मीठ, दगडफूल, दालचिनी, लवंग, विलायची पावडर, गरम मसाला आदी टाकून ग्रेव्ही तयार केली जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी-जास्त केले जाते. या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये पापडाचे तळलेले रोल सोडण्यात येतात. या भाजीत पापड, पनीर मसाला आणि ग्रेव्ही यांचा एकत्रित स्वाद आहे. खास मराठवाडी तडक्याची भाजी खवय्यांच्या पसंतीला उतरली आहे.

पापडरोल प्रमाणेच शेवभाजीही प्रसिद्ध आहे. या भाजीत 'शेव'चा स्वाद कायम ठेवण्यासाठी खास ग्रेव्ही तयार करण्यात येतो. ग्रेव्हीसाठी टोमॅटो-कांद्याची प्युरी, अालं, लसूण यांच्या फोडणीसह काळा मसाल्याचा वापर करण्यात येतो. चटकदार ग्रेव्हीत शेव टाकली जाते.

या दोन्ही भाज्यांसाठी स्थानिक पातळीवर तयार केलेल्या उत्पादनांचा वापर केला जातो. मराठवाड्यात मसालेदार पदार्थांना मागणी असते. ही चव पापडरोल, शेवभाजीत जपली आहे. विद्यार्थी, नोकरदारांची या भाज्यांना मागणी आहे. अनेक जण या भाज्यांचा स्वाद चाखण्यासाठी सहकुटुंब येतात. शेवभाजी, पापडरोलबरोबर 'साईप्रसाद'मधील खिचडीही चवदार आहे. खिचडी आणि लोणी या डीशलाही ग्राहकांची मागणी आहे. १५ वर्षांपूर्वी हॉटेल सुरू करताना येथील पदार्थांची चव आजही कायम असल्याचे सुनील इंगळे सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स.भु. शताब्दी पर्वात गुरुवारी ग्रंथ महोत्सव

$
0
0


औरंगाबाद ः श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी पर्वानिमित्त मराठी प्रकाशक परिषद, पुणे यांच्या सहकार्याने औरंगाबाद ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स. भु. महाविद्यालयाच्या मैदानावर २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत या महोत्सवात राज्यभरातील प्रकाशक सहभागी होणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन २८ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर करणार आहेत. सायंकाळी सात वाजता वि. दा. सावरकर यांच्या गीतांवर आधारित 'शूरा मी वंदिले' कार्यक्रम होईल. शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत नवलेखक कार्यशाळा होईल. कार्यशाळेचे उदघाटन साहित्यिक रा. रं. बोराडे करणार आहेत. समारोप समारोपाला डॉ. गंगाधर पानतवाणे उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता उर्दू-हिंदी कविसंमेलनात मंगलेश डबराल (दिल्ली), देवीप्रसाद मिश्र (दिल्ली), रंजित वर्मा (दिल्ली), सलीम मोईनोद्दीन (परभणी) व दासू देशपांडे (परभणी) सहभागी होतील. रविवारी सायंकाळी पाच वाजता ग्रंथ महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे व डॉ. सुधीर रसाळ उपस्थित असतील. पत्रकार परिषदेला स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, प्रकाशक श्रीकांत उमरीकर, प्रकाशक परिषदेचे अरूण जाखडे, अरविंद पाटकर, उपाध्यक्ष कुंडलिक अतकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू तस्करांची २४ वाहने जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पोलिसांनी चोरटी वाळूवाहतूक करणारे १४ ट्रॅक्टर व वाळूचोरांच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या व १४ जणांना अटक केली. नदीपात्रात वाळूतस्करांनी मांडलेल्या उच्छादाबद्दल 'मटा' मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलिसांनी हा कारवाई केली. पोलिसांनी ३० लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

गेल्या एक महिन्यांपासून तालुक्यातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू आहे. नदीपात्रात मशीनच्या साह्याने ३० ते ३५ फूट खोल खड्डे खोदून वाळू उपसा करत आहेत. यामुळे गोदाकाठच्या गावामधील भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खाली जात असून आगामी उन्हाळ्यात या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नदीपात्रातील वाळू चोरी रोखावी यासाठी मायगाव वाघाडीच्या सरपंच लताबाई घटे व वडवलीचे ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले होते. यासंबंधीची बातमी २० जानेवारीच्या 'मटा' मध्ये प्रसिद्ध झाली. याची उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चनसिंग यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी स्वतः पथकाचे नेतृत्व केले. या पथकात बिडकीनचे पोलिस उपनिरीक्षक बी. जी. डुल्लत, पोलिस कर्मचारी एफ. डी. पठाण, आर. जे. पंडित व एस. बी. भालेराव यांचा समावेश होता. या पथकाने २१ जानेवारीला पहाटे चार वाजता पाटेगाव पूल ते आयटीआय कॉलेज या भागात धाड मारत चोरीची वाळू वाहतूक करणारे १४ ट्रॅक्टर, लोकेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या १० मोटारसायकल जप्त करून १४ जणांना अटक केली. या कारवाईत ३० लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती बच्चनसिंग यांनी दिली.

गुप्तता पाळून कारवाई

वाळू चोरांवरील छापे मारण्याच्या कारवाईबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी बच्चनसिंग यांनी गुप्तता पाळली होती. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी व बिडकीनच्या सहायक पोलिस निरीक्षकाला ऐनवेळेवर माहिती देण्यात आली. पैठण पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई झाल्यानंतर माहिती देण्यात आली. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’साठी २९० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जलयुक्त शिवार योजनेच्या विशेष अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडे २९० कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा निधी राज्य शासनाकडून अतिरिक्त मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि सरकारच्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्याचा आपण विशेष प्रयत्न करत आहोत, अशी माहिती जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, 'जालना जिल्ह्यातील खरीप हंगामातील दुष्काळी अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील १२३ कोटी ८० लाख रुपये राज्य सरकारकडून मिळाले असून, रब्बी हंगामातील पीक विमा संरक्षण योजनेचे ६३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सरकारने शेतकऱ्याला हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेळेवर मदतीचा हात पुढे करण्यात आपल्याला यश मिळाले आहे. संपूर्ण राज्यात रब्बी हंगामातील पीक विमा योजनेचे २११ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात जालना जिल्हय़ातील शेतकऱ्यांचा ६३ कोटी रुपयांचा विक्रमी हिस्सा आहे, गतवर्षी दुष्काळी अनुदान २९० कोटी, पीकविमा १९० कोटी, ठिबक सिंचनासाठी अनुदान ६५ कोटी, जवाहर रोजगार हमी योजनेच्या विहीर अनुदान २१ कोटी हे शंभर टक्के वाटप करण्यात आले. या कामाचा मागोवा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आपण ४७ बैठका घेतल्या, शेतकऱ्याचे अनुदान वाटप करण्यात कामचुकारपणा करणारे भोकरदन आणि जाफराबाद या दोन तहसिलदारांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली दोन तलाठी निलंबित केले, संपूर्ण मराठवाड्यात या कामात जालना जिल्हा अव्वल एक नंबर स्थानावर आहे, याचे आपणास विषेश समाधान झाले आहे.'

या आर्थिक वर्षासाठी १८३ कोटी ३३ लाख रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी ३३ कोटी ३३ लाख रुपये, नाविन्यपूर्ण योजना सहा कोटी ७५ लाख, जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबविण्यासाठी ६२ कोटी चार लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे. या सर्व निधीचा विनियोग योग्य पद्धतीने मुदतीच्या आत करण्यात येईल, या बाबतीत सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे, असे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.

कारभारावर नाराजी

जालना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या कारभारावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी गंभीर नाराजी व्यक्त केली. 'जिल्हा नियोजन समितीने ६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. जानेवारी संपत आला, तरी त्यांच्या कामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले नाहीत. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामाला ११ कोटी २३ लाख रुपये मंजूर केले आहेत. मात्र आतापर्यंत फक्त चार कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यांचे उत्पन्न केवळ १८ कोटी रुपये हे अत्यंत तुटपुंजे आहे ते वाढवले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या कारभाराला वळण लावावे लागणार आहे,' असे ते म्हणाले.

टोपे यांची टीका

जालना जिल्हा प्रशासन अतिशय ढेपाळलेले आहे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील जिल्हा बैठकीत या मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे, याकडे माजी पालकमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष वेधले. याशिवाय, अधिकारी जिल्ह्यात जलयुक्त शिवार कार्यक्रमाचा बँड वाजवत आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यात २५ गावे निवडली गेली. प्रत्यक्ष दोन चार गावात किरकोळच कामे झालेली आहेत, असा आरोप त्यांनी केला. कापूस उत्पादक शेतकरी दुष्काळी अनुदानातून वगळले आहेत या विरोधात रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहोत असे ते म्हणाले.

पंचायतींसाठी बैठक

जालना जिल्ह्यातील शाळा खोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील अंबड, भोकरदन नगर परिषद आणि बदनापूर, मंठा, घनसावंगी आणि जाफराबाद या नगर पंचायतीचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.

'नाविन्यपूर्णे'साठी प्रयत्न

जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेत सहा कोटी ७५ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी शासनाच्या मालकीच्या सहा पोकलेन मशिन खरेदी केल्या आहेत. यावर्षीसुद्धा पोकलॅन मशिन खरेदी करण्यात येणार आहे. या मशिनद्वारे करण्यात येणाऱ्या कामांकरिता डिझेलसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आली असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत ‘अन्नपूर्णे’ची थाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दुष्काळामुळे रोजगाराच्या शोेधामध्ये शहराकडे येणाऱ्यांबरोबरच, रुग्णांवरील उपचारांसाठी शहरांमध्ये काही काळ राहावे लागणाऱ्या नागरिकांच्या पोटाचा प्रश्न मिटविण्यासाठी उस्मानाबादमधील काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. 'अन्नपूर्णा ग्रुप'च्या माध्यमातून या तरुणांकडून अशा नागरिकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले असून, दररोज त्यांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे.

गाव सोडून शहरामध्ये आल्यानंतर निवारा आणि दोन वेळच्या जेवणाची सर्वांत पहिल्यांदा भ्रांत असते. दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये स्थलांतराचे प्रमाण वाढत असताना, ही गोष्ट प्रकर्षाने समोर येते. यातच, वैद्यकीय उपचारांसाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती रुग्णालयांमध्ये दाखल असेल, तर कुटुंबातील किमान एखाद-दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याबरोबर राहावेच लागते. त्यामुळे त्यांच्यासाठीही जेवणासाठी गावाकडून डब्याची वाट पाहावी लागते. अशा सर्वांसाठी 'अन्नपूर्णा ग्रुप'कडून अन्नछत्राची कल्पना पुढे आली. उस्मानाबाद शहरातील मारवाडी गल्ली व सावरकर चौकामध्ये हा उपक्रम राहविण्यात येतो. अतुल अजमेरा, राजकुमार अजमेरा, जितेंद्र खेडेरिया, अमर चांडक, मनोज कोचेटा, कमलाकर मस्के, कुणाल गांधी, शकील पठाण व त्यांच्या अन्य सहकारी मित्रांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. दररोजच्या जेवणामध्ये भाजी, चटणी, वरण-भात व भाकरी किंवा चपाती अशा स्वरुपांत भोजन देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सध्या या अन्नछत्रातून दररोज १२५ व्यक्तींना भोजन देण्यात येते. रुग्णालयातील गरजू पेशंटना डबा पोहोचविण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय आणि स्त्री रुग्णालयामध्ये ही सेवा पुरविण्यात येते.

विशेष म्हणजे या उपक्रमाची माहिती गरजूंपर्यंत पोहोचावी, यासाठीही या तरुणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर, अन्नछत्राला हातभार लावण्यासाठी समाजातील मान्यवर पुढे येऊ लागले आहेत. काही जणांकडून वाढदिवसाबरोबर अन्य कारणास्तव येथे भोजन करणाऱ्यांना मिठाईचे वाटपही केले जाते.

'अन्नपूर्णा ग्रुप'च्या २५ ते ३० वयोगटांतील या युवकांनी अन्नपूर्णा छत्र उभारून 'जगा आणि जगू द्या'चा नाराच दिला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक जणांनी व्यक्त केली आहे. खासदार रवींद्र गायकवाडसह शहरातील मान्यवरांनी या अन्नछत्रास भेट देऊन समाजसेवा करणाऱ्या युवकाचे खास कौतुक केले. शिवाय सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण हक्क शाळांच्या भिंतीवरच

$
0
0

मराठवाड्यातील बालकामगारांत १५-२० टक्के वाढ

yamini.sapre@timesgroup.com

लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद

'प्रत्येक मूल शाळेत जाईल, एकही मूल घरी राहणार नाही...' मराठवाड्यातील बहुतांश शाळांच्या भिंतीवर टांगलेली शिक्षण हक्क कायद्याची ही टॅगलाइन शिक्षण हक्काची जाणीव करून देते. मात्र, ही जाणीव भिंतीवरच. मराठवाड्यात दुष्काळाच्या भीषण संकटात ऊस, वीटभट्टी, बांधकाम, चहाच्या टपऱ्या, हॉटेल, घरकाम... अशा सगळीकडे चिमुकले हात राबू लागले आहेत. बालकामगारीचे प्रमाण आधीच्या तुलनेत यंदा १५ ते २० टक्क्यांनी अधिक असल्याचे सामाजिक संस्थांच्या पाहणीत आढळले आहे.

ऊसतोडीचे अधिकाधिक काम आपल्याच घरात यावे, यासाठी अख्खे घरच तोडणीला जाते. उसाच्या ट्रॅक्टरवर बसून मुलांसह कुटुंबाचा तांडा निघतो. ज्वारी, हरभरा, करडई या पिकांनी दुष्काळात काहीसा तग धरल्याने या शेतातही लहानगे दिसतात. ११ ते १२व्या वर्षांपासून भर दुपारच्या टळटळीत उन्हात वीटभट्ट्यांवर विटांचे आकार देण्याचे, माती मळण्याचे काम मुले करत आहेत. शाळा दूर ठेवत अधिकाधिक मिळकत हाती पडावी, यासाठी मुलांना राबवले जात असल्याचे इथे सर्रास दिसले. बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसतोडीसाठी, तर लातूरमधून बांधकाम, खाणकाम आणि वीटभट्ट्यांवरील कामासाठी मुले स्थलांतरित होत आहेत.

बालहक्क संरक्षण समित्या कुठे आहेत?

मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी गावापासून ते शहरांच्या पातळीवर समित्या नियुक्त करण्याचे सरकारी आदेश आहेत. मात्र, बऱ्याच गावात अशा समित्याच नाहीत आणि असल्या तरी त्या फक्त कागदोपत्रीच!
............

स्थलांतराच्या प्रश्नावर एका राज्यस्तरीय धोरणाची आवश्यकता आहे. स्थलांतर, शाळा सुटणे या प्रश्नांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होत आहे.
- कुमार ​निलेंदू, क्राय

नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका मुलांना बसतोय. त्यावर नियोजनाची चोख अंमलबजावणी व्हायला हवी. प्रश्नांपासून दूर जाण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन तोडगा काढायला हवा.- विकास सावंत, युनिसेफ

बालकामगार, बालव्यापार या समस्यांवर गृहखाते काम करत आहे. हा प्रश्न खरोखर गंभीर असून सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. सरकारच्या विविध विभागांनी यावर एकत्र येऊन काम करावे लागणार आहे.
- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरला दररोज १२ एमएलडी पाणी देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
टंचाईच्या काळात लातूर शहराला विविध माध्यमातून दररोज दहा ते बारा एलएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी दिल असल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली.
लातूरच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी प्रधान सचिव राजेश कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कोणते कोणते पर्याय असू शकतात, सरकार त्यासाठी कशी मदत करू शकते, महापालिकेची तयारी काय आहे? आपत्कालीन आणि कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेसाठी काय करावे लागणार आहे, त्यासाठी शासनाची मदत किती अपेक्षीत आहे, याची चर्चा झाली असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
सध्या निम्न तेरणा धरणामधील पाणी बेलकुंडपर्यंत आणून तेथून टँकरमार्फत लातूर शहराला पुरविण्यासाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करून दररोज चार एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लातूरची पाण्याची गरज लक्षात घेता दोन चार दिवसातच या योजनेला मंजुरी देण्याचे आश्वासन राजेशकुमार यांनी दिले आहे.
येत्या जूनपर्यंत लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मांजरा नदीवरील साई बंधाऱ्याच्यावरील बाजुस नदी पात्रात चर खोदून या माध्यमातुन दररोज २.५ ते तीन एमएलडी पाणी घेण्यात येणार आहे. साई गावालगतच्या पुलाच्यावरील बाजुस दुसरा चर प्रस्तावित असून यातूनही दोन ते २.५ एमएलडी पाणी मिळवले जाईल. साई बंधाऱ्यांच्यावरील बाजुस असणाऱ्या साई हेडवर्क परिसरातून पाच विंधन विहिरी घेऊन एक एमएलडी पाणी मिळवण्यात येईल. आर्वी वॉटर ट्रिटमेंट प्लांट परिसरातील पाच विंधन विहिरी घेण्याचे सर्वेक्षण सुरू असून ०.५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. लातूर शहरातील साई नाका ते अहिल्यादेवी होळकर पुतळा आणि नांदेड रिंगरोड परिसरात पाच विंधन विहिरी घेण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. या माध्यमातून एक एमएलडी पाणी उपलब्ध होऊ शकेल. महापूर गावच्या दक्षीणेला मांजरा नदी पात्रालगतही पाच विंधन विहिरी प्रस्तावीत असून या माध्यमातून लातूर शहरात टँकरमार्फत दररोज आठ ते नऊ आणि निम्न तेरणा, बेलकुंड योजनेतून चार असे एकुण दहा ते बारा एमएलडी पाणी लातूरकरांसाठी देण्याचे आश्वासन प्रधान सचिवानी दिल असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर शहराचे भविष्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे हे काम नगरोत्थान योजनेतून ५५ कोटी रुपये खर्चुन पूर्ण करण्यासाठी शासनाची मंजुरी घेतली जाईल. उजनी धरणातून लातूर शहरात थेट पाणी देण्यात यावे किंवा उजनी धरणातील पाणी धनेगाव धरणात सोडून आवश्यकतेनुसार लातूर शहरात पुरवावे या दोन्ही योजनेचे सर्वेक्षण येत्या १५ दिवसातच केले जाईल. त्यानंतर या योजनेसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद कशी करावयाची याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अश्वासन ही राजेशकुमार यांनी दिले असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.


तातडीने प्रस्ताव पाठवा
दरम्यान, महापौर अख्तर शेख आणि शैलेश पाटील-चाकुरकर यांनी दिल्लीत केंद्रिय नगरविकास मंत्री व्यकंय्या नायडू यांची शनिवारी सांयकाळी उजनीच्या पाण्यासाठी भेट घेतली. या भेटी विषयी माहिती देताना शैलेश पाटील म्हणाले, 'व्यकंय्या नायडु यांच्याशी चांगली चर्चा झाली. मुख्यमंत्र्याशी ते स्वता: बोलणारा आहेत. शिवराज पाटील-चाकुरकर यांना मी शब्द दिला असल्यामुळे तुमची योजना मंजूर करून देईल. हा निधी अमृत, नागरी पुनरोथ्यान आणि जपानचे सहकार्य घेऊन देण्याचे अश्वासन दिले. मुंबईत तातडीने प्रस्ताव पाठवा असेही नायड यांनी सांगितल्याचे महापौर अख्तर शेख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इसिसच्या विरोधात मशिदीमध्ये तरुणांचे प्रबोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
गेल्या अनेक वर्षांपासून मदतश्यामध्ये दहशतवाद, बंदुकीचे शिक्षण दिले जाते, अशी सर्रास चर्चा आहे. मशिदीतील एकूण व्यवहारावर संशय व्यक्त करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावे, असे सकारात्मक प्रयत्न जालना, औरंगाबाद पाठोपाठ आता उस्मानाबादमध्येही सुरू झाले आहेत. नमाज अदा करण्यापूर्वी इसिसच्या दुष्कृत्यांचा निषेध करणारी प्रवचने मशीद आणि मदरशातून सुरू झाली आहेत. या प्रभावाखाली येणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि मुल्लाव मौलवींनी सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम दहशतवादाला चोख उत्तर देणारा आहे.
पाकिस्तानमधील विद्यापीठात अतिरेक्यांनी धर्माच्या नावावर थेट विद्यार्थ्यांच्या डोळ्यात गोळ्या घातल्या. त्यामुळे हवालदिल झालेल्या उस्मानाबादसह मराठवाड्यातील मुस्लीम धर्मगुरूंनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आता मशीद व मदरस्यामधून सकारात्मक चळवळ सुरू केली आहे. इसिस आणि दहशतवादी संघटनांच्या अमानवी कृतीच्या विरोधात लग्न समारंभापासून मदरशापर्यंत आता प्रवचने झडू लागली आहेत. महमह पैगंबरांनी इस्लामच्या माध्यमातून दिलेली शिकवण देशप्रेमाचे धडे देते. त्यामुळे अशा गैरमार्गाचे समर्थन इस्लाम कधीच करणार नाही, असा संदेश देण्यासाठी उस्मानाबादेतील मुल्ला, मौल्लवी तसेच मुस्लीम धर्मप्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते आता पुढे सरसावले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर धर्माचा अमानवी बुरखा पांघरून काही मूलतत्त्ववादी संघटना धुमाकूळ घालत आहेत. आंतररराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निषेधाचा पवित्रा घेण्यात आला आहे. केवळ निषेध नोंदवून चालणार नाही, तर अशा वाईट कृतीच्या प्रभावाखाली येणाऱ्या तरुणांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी सामाजिक चळवळ रुजविणे गरजेचे आहे, हे ध्यानात घेऊन उस्मानाबाद शहरातून सामाजिक बांधिलकीचे भान घेऊन मुस्लीम समाजातील कार्यकर्ते व धर्मगुरू आता पुढे झेपावले आहेत.
मदरशामध्ये मुलांना शिक्षण देणारे मौलाना महमद जाकीर अलोखान विद्यार्थ्यांना इस्लामची खरी शिकवर कशी शांतताप्रिय आहे, याबाबत मोठ्या तळमळीने दाखले देत आहेत. अंगावर बॉम्ब बांधून किंवा डोळ्यात गोळ्या घालून निरपराध लोकांचा जीव घेणे हे इस्लामला कधीच मान्य होणार नसल्याचे ते मोठ्या तडफेने विद्यार्थ्यांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पाकिस्तानमधील दुर्दैवी घटना घडल्यानंतर मशिदीमधील मुल्ला मौलवींना नमाज अदा करण्यापूर्वी या विषयावर चर्चा घडावी, असे वाटते आणि मुस्लीमांवर अत्याचार होत आहे. या विचाराने इसिसच्या प्रभावीखाली आलेल्या तरुणांना उजव्या विचारांच्या संघटनांपासून दूर करण्यासाठी उस्मानाबादेत सुरू झालेला हा प्रयत्न निश्चित समाजहिताचा ठरणारा आहे.
काही विखारी संघटनांकडून मुस्लिमविरोधी चित्रफिती सोशल मिडियावर मोठ्या गतीने फिरविल्या जात आहेत. त्यामुळे मुस्लीम तरुण संतप्त आहेत. अशावेळी सरकारवर विश्वास ठेवा, हा देश आपला आहे, असा संदेश देण्याचे मोलाचे काम मौलांना रिझवी मोहमद करीत आहेत.


काही तरुणांना इसिसच्या मायाजाळाचे आकर्षण आहे. हे आकर्षण अज्ञानातून आणि काहीतरी धाडस करण्याच्या वृत्तीतून निर्माण होते. मात्र, असा प्रभाव घेतलेल्या अनेकांना या अविचारी मार्गापासून रोखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
खालील सय्यद, नगरसेवक, उस्मानाबाद

दहशतवादी संघटना कोणतीही असो ती इस्लामच्या विरोधातच असते. इस्लाम दहशतवादाला कधीच मान्यता देत नाही.
मसुद शेख , सामाजिक कार्यकर्ते, उस्मानाबाद

शेजाऱ्यांवर प्रेम करा. मग ती कुठल्याही जातीचा असो. हेच खरे इस्लामचे तत्त्व आहे, याकडे मौलाना रिझवी यांनी हे सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
सामाजिक भान लक्षात घेऊन मुस्लिम समाजातील मान्यवरांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम व त्यासाठीची मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे.
अभिषेक त्रिमुखे, जिल्हा पोलिस प्रमुख, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एजंटांकडून चंदन

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com

औरंगाबादः प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या फक्त एजंटांची चलती दिसते. वाहन परवाना काढणे, गाडी ट्रान्सफर असो की अन्य काम. शासकीय दरांपेक्षा तिप्पट ते चौपट पैसे वसूल करून एजंट ग्राहकांना हजारो रुपयांचे चंदन लावत आहेत.

शुक्रवारपासून गंगापूर ये‌थील सुरेश (नाव बदलले आहे) आरटीओ ऑफिसमध्ये फेऱ्या मारत आहेत. फिटनेस प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांच्या चारचाकी वाहनाची नोंदणी रखडली आहे. गाडीचे काम करण्यासाठी त्यांनी एजंट नेमला. त्याने या कामासाठी त्यांच्यांकडून एक हजार रुपये घेतले. मात्र, तरीही त्यांचे काम अजून झालेच नाही. पक्का वाहन परवाना, वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र यासाठी एजंटचे रेटकार्ड ठरलेले आहे. ते शासकीय दरापेक्षा दुप्पट, तिप्पट असते. हे पैसे देऊनही ग्राहकांना पुन्हा रांगेत उभे राहून काम करण्याची पाळी येते.

खासगी कर्मचारी

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात अनेक जागा रिक्त आहेत. वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत कर्मचारी वर्गाची संख्या वाढविण्यात आली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. काही लिपिकांनी स्वतःच्या मदतीसाठी खासगी कर्मचारी नियुक्त केले आहेत. ट्रान्सपोर्ट, नॉन ट्रान्सपोर्ट तसेच अकाऊंट विभागातही असे खासगी कर्मचारी आढळतात. सोबतच निवृत्त कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात येते.

का लागतो एजंट?

कोणती कागदपत्रे हवी याची माहिती मिळत नाही.

वाहन पासिंग फॉर्म कसा भरावा, याचे मार्गदर्शन नाही.

खिडकीवर गर्दी असल्याने ग्राहकांना नीट माहिती मिळत नाही.

लवकर कामासाठी ग्राहक एजंटांना प्रतिनिधी म्हणून नेमतात.

ज्यांच्याकडे दहा गाड्या आहेत त्यांना एजंटला तीनशे रुपये देणे नगण्य असते. यामुळेच लोक एजंटकडे काम देतात. ज्यांना शासकीय खर्चात काम करून घ्यायचे आहे, अशांनी कायदा समजून घ्यावा.- अनिल थोरात, राज्य अध्यक्ष, वाहन चालक-मालक प्रतिनिधी

आरटीओ विभागाकडे साधे फॉर्म नाहीत. संबंधित फॉर्म झेरॉक्सच्या दुकानातून विकत घ्यावे लागतात. एजंटांचे दर एकच असावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चित ग्राहकांना चांगली सेवा देऊ.

- दीपक संभेराव, प्रतिनिधी, वाहन चालक-मालक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुंडलिकनगरात मंगळवारपासून एक दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगरात २६ जानेवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने कळविले आहे. सध्या शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले सुरू आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पुंडलिकनगरची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला टप्प्याटप्प्याने शहराच्या ८० टक्के भागात एक दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

महापालिकेच्या २१ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. याचाच संदर्भ देत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलीटी कंपनीने २२ जानेवारी रोजी महापौरांना पत्र दिले. एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यासाठी पुंडलिकनगरचा परिसर पायलट झोन म्हणून कंपनीने निवडला आहे. पुंडलिकनगर परिसरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर प्रत्येक आठवड्याला टप्प्याटप्प्याने शहराच्या सुमारे ८० टक्के भागात एकदिवसआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यापूर्वी वितरण व्यवस्थेमध्ये काही विशेष जोडण्या करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे, जोडणीसाठीचे साहित्य उपलब्ध होण्यास वेळ लागला तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहराच्या ८० टक्के भागात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे कंपनीतर्फे महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीचे काउंटडाऊन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी अभियानात पहिल्या टप्प्यात निवडल्या जाणाऱ्या वीस शहरांबद्दलचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. या शहरांची घोषणा २६ जानेवारी रोजी होण्याची शक्यता असून, त्यात औरंगाबादच्या समावेश होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात औरंगाबादचा समावेश झाला आहे. सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार औरंगाबाद महापालिकेने पीएमसीची नियुक्ती करून स्मार्ट सिटी संदर्भातला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या अहवालाचे सादरीकरण नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या समोर करण्यात आले. सादरीकरणानंतर औरंगाबादची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली. औरंगाबाद महापालिकेचा स्मार्ट सिटी बद्दलचा बॉल आता केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याच्या कोर्टात आहे. स्मार्ट सिटी अभियानासाठी देशभरातून केंद्र सरकारने ९८ शहरांची निवड केली. त्यापैकी हैदराबाद वगळता सर्व शहरांनी केंद्र सरकारकडे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत प्रस्ताव सादर केले. केरळ मध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे या राज्यातील शहरांना प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतचा वेळ वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे या राज्यातील ९ शहरांनी ३१ डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले. त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकार किंवा त्या त्या शहरांच्या महापालिकांना अद्याप काहीच कळविले नाही. केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या समोर देखील प्रस्तावांचे सादरीकरण करण्यासाठी बोलावण्यात आले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानातील पहिल्या वीस शहरांची घोषणा २६ जानेवारी रोजी होणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे.

औरंगाबाद महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतर्गत चिकलठाणा परिसरात ग्रीन फिल्ड विकसित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्या भागातील शेतकऱ्यांशी चर्चा करून महापालिकेने प्रस्ताव मंजूर केला. चिकलठाण्याशिवाय नक्षत्रवाडी परिसरात देखील महापालिका स्वतः ग्रीन फिल्ड विकसीत करेल अशी तयारी दाखवण्यात आली. ग्रीन फिल्डच्या अंतर्गत सुमारे २५० एकर क्षेत्रात नवीन शहर वसवले जाणार आहे. त्याशिवाय पॅनसिटी या उपक्रमात सांडपाण्याचा फेरवापर आणि ऊर्जा बचतीचे दिवे बसवण्याचा उपक्रम घेण्याचे महापालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकार स्वीकारणार का, याची उत्सुकता आहे.

माहिती नाही

स्मार्ट सिटी अभियानासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण केंद्र सरकारच्या दरबारात होणार आहे की नाही याची कल्पना महापालिका किंवा पीएमसीच्या अधिकाऱ्यांना अद्याप नाही. केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा इ - मेल आलेला नाही असे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबीयांना मोफत आरोग्य सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना महात्मा गांधी मिशन (एमजीएम) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे आजीवन मोफत आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली. या उपक्रमामुळे शेतकरी कुटुंबीयांच्या दुःखावर फुंकर बसणार आहे.

कदम म्हणाले, की प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी रोजी) सकाळी अकरा वाजता या उपक्रमाची सुरवात होईल. याप्रसंगी नाम फाऊंडेशनचे सर्वेसर्वा पद्मश्री नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, विश्वस्त शुभा महाजन तसेच एमजीएमचे उपाध्यक्ष पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, उपाधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी उपस्थित राहतील.

मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संस्था, संघटना तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करण्यात आली. सामाजिक भान म्हणून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी 'एमजीएम'ने पुढाकार घेतला आणि आरोग्य कार्ड बनविले आहे. या कार्डाला कुठलीही मुदत नसेल. कुटुंबीयांना एमजीएम रुग्णालयातील आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण विभागात आजीवन निशुल्क सेवा पुरविली जाईल. शिवाय, 'एमजीएम'मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना येत्या शैक्षणिक वर्षापासून काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक, संगणकशास्त्र, डी.एड., नर्सिंग, आर्किटेक्ट या महाविद्यालयांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रजासत्ताकदिनी विविध कार्यक्रम

'एमजीएम'मधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला नाना पाटेकर प्रमुख पाहुणे आहेत. त्यानंतर एमजीएम आर्ट गॅलरी आणि सुपर स्पेशालिटी बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. बाह्य रुग्ण विभागाच्या अतिविशेष सुविधा विभागातील उपलब्ध सोयी सुविधा, हृदयविकार आणि हृदय उपर्माग विकारांवरील उपचार, मेंदू आणि मणक्यांच्या विकारावरील शस्त्रक्रिया आदी उपचार करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’ संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड सिरिया'चा (आयएस) संशयित असल्याच्या संशयावरून वैजापूरच्या शाहबाजपुऱ्यातून २४ वर्षीय तरुणास ताब्यात घेण्यात आले. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) आणि औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी ही कारवाई केली. इम्रान खान मुअज्जम खान पठाण (वय २४) असे त्याचे नाव असून, तो कम्प्युटर दुरुस्तीचे काम करतो.

येवला रोडवरील नांमका विश्रामगृहात कसून चौकशी केल्यानंतर त्याला दुपारी वैजापूर कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड सुनावली. पठाणकोट हल्ल्यानंतर सावध झालेल्या तपास यंत्रणांनी, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील दहशतवादी नेटवर्कचा बिमोड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुप्तचर यंत्रणा, एनआयए, एटीएस व विविध राज्यातील पोलिसांनी संयुक्तपणे फत्ते केलेल्या या मोहिमेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांतून १३ संशयितांना जेरबंद करण्यात यश आले. ही कारवाई सुरू असतानाच

वैजापूर शहरातही 'आयएस'शी संबंधित एक संशयित असल्याची माहिती 'एनआयए'मार्फत येथील एटीएसला मिळाली. त्याआधारे पथकाने संशयितावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून करडी पाळत ठेवली होती. खात्री पटताच 'एनआयए' व 'एटीएस'च्या पथकाने शनिवारी सकाळी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.

वैजापूरच्या बडी मस्जिद परिसरातील शाहबाजपुरासह बसस्थानक आदी भागात 'एनआयए'चे पोलिस उपअधीक्षक नीरज रॉय, एटीएसचे पोलिस अधीक्षक नीकेश पाटील, पोलिस निरीक्षक राजेंद्र गौर आणि यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला. संशयित हा भावाच्या घरात असल्याची खात्री होताच सकाळी साडेदहाला पथकाने घरावर छापा टाकून इम्रानला जेरबंद केले. त्याच्याकडून तीन मोबाईल, दोन लॅपटॉप आणि ४९ हजार रुपये हस्तगत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

घरात त्याची दीड तास चौकशी करण्यात आली. पंचनाम्यानंतर इम्रानला शहरातील येवला रोडवरील एनएमसी विश्रामगृहावर नेऊन त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्या अटकेची माहिती पसरताच वैजापूर शहराला छावणीचे रूप आले होते. तो 'आयएस'चा तिसऱ्या क्रमांकाचा कमांडर असावा, अशी चर्चा आहे.

ट्रान्झिट रिमांड

इम्रानची चौकशी केल्यानंतर त्याचे ठसे घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी त्याला न्यायाधीश डी. जे. इंदाईत यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्यास ट्रान्झिट रिमांड दिला. त्यानंतर चोख बंदोबस्तात त्यास वैजापूरहून चिकलठाणा विमानतळावर नेण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या विमानाने त्यास दिल्लीला नेण्यात आले.

वैजापुरातून शनिवारी अटक करण्यात आलेल्या इम्रानचे वडील पाटबंधारे विभागात नोकरीला होते. आता ते हयात नाहीत. घरात त्याच्यासह दोन भाऊ असून, तो धाकटा आहे. मोठा भाऊ नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागात नोकरीला असून दुसरा भाऊ वैजापुरातील एका उर्दू शाळेत शिक्षक आहे. त्याला चार बहिणी आहेत, अशी माहिती वैजापुरातून देण्यात आली. वैजापुरातच इम्रानचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर औरंगाबादेत बारावीपर्यंत शिक्षण घेऊन त्याने मुक्त विद्यापीठातून बीसीएचे शिक्षण पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात गुंड ज्ञानेश्वर यादव स्थानबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकुंदवाडी पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील कुख्यात गुंड ज्ञानेश्वर मनोहर यादव (वय २३ रा. गल्ली क्रमांक १४, जयभवानीनगर) याला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्याखाली एका वर्षासाठी स्थानबद्ध केले. यादव याच्यावर मुकुंदवाडी व सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात घातक शस्त्राचा वापर करून दुखापत करणे, मुलीचे अपहरण करणे, बलात्कार, वाहनांची जाळपोळ करणे, दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. त्याला शनिवारी अटक करण्यात आली असून हर्सूल कारागृहात रवाना करण्यात आले. ‌ही कारवाई पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, राहुल श्रीरामे, एसीपी खुशालचंद बाहेती यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images