Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘एमटीडीसी’वर कारवाईचा बडगा शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाऐवजी थंड हवेच्या किंवा निसर्गरम्य ठिकाणी लग्न करण्याचा ट्रेंड ओळखून 'एमटीडीसी'नेही 'वेडिंग डेस्टिनेशन'मध्ये उडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन न करण्याची जबाबदारी 'एमटीडीसी'वर टाकली आहे. या संदर्भात कायदेशीर बेजबाबदारपणासाठी महामंडळाला मोठ्या दंडात्मक कारवाईला तसेच लवादाचा अवमान केल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागेल, असे मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

'वेडिंग टुरिझम'मधून पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाच्या रिसॉर्टला राष्ट्रीय हरित लवादाने काही दिवसांपूर्वीच कायद्याचा बडगा दाखविला. औरंगाबाद येथील महामंडाळाच्या रिसॉर्टमध्ये होणारे लग्नसमारंभ, डीजे, बँड व ऑर्केस्ट्राच्या ध्वनीप्रदूषणाची दखल घेत लवादाने महामंडळाला पाच लाखांचा दंड ठोठावला. एवढेच नव्हे तर महामंडळाने वेडिंग टुरिझम थांबवावे, असा सल्लाही लवादाने महामंडळाला दिला आहे. या संदर्भात विवेक ढाकणे यांनी अॅड. सरोदे यांच्यामार्फत लवादाकडे तक्रार नोंदविली होती. इतरांपेक्षा आपला विवाह सोहळा हटके असला पाहिजे, या मानसिकेततून निसर्गरम्य ठिकाणी लग्न करणाऱ्यांची संख्या वाढत असून, महाबळेश्वर, पाचगणी, गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना 'वेडिंग टुरिझम डेस्टिनेशन' अशी ओळख मिळाली आहे. या प्रवाहात एमटीडीसी सहभागी झाले असून, राज्याच्या कानाकोपऱ्यात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांना लग्न सोहळ्यांसाठी आकर्षित करण्यासंदर्भात महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. महामंडळाने नुकत्याच काढलेल्या निविदेमध्येही या संदर्भात ट्रॅव्हल एजंटांना वेडिंग डेस्टिनेशनसंदर्भात आवाहन केले आहे. त्यामुळे ताडोबा अभयारण्य, चिखलदरा, महाबळेश्वर, पाचगणी, गणपतीसह कोकण किनाऱ्यांवरील महामंडळाचे प्रशस्त व निसर्गरम्य ठिकाणी असलेले रिसॉर्ट आता पैसे कमावण्याची व्यावसायिक ठिकाणे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठोस नियोजन नाहीच
महामंडळाची बहुतांश रिसॉर्ट निसर्ग संपत्तीने समृद्ध असलेल्या ठिकाणी असल्याने अशा कार्यक्रमाद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण व कचरा व्यवस्थापनाबद्दल मात्र महामंडळाने अद्याप कोणतीही नियमावली प्रसिद्ध केली नाही. लग्न समारंभाच्या वेळी होणारा गोंधळ व शांतता अनुभवण्यासाठी आलेले पर्यटक या दोघांचे नियोजन कसे करणार, याबद्दल ठोस नियोजन नसताना महामंडळ 'वेडिंग टुरिझम' सुरू करणार असल्यास या संदर्भातील कायदेशीर बेजबाबदारपणाला महामंडळास सोमोरे जावे लागेल, असेही अॅड. सरोदे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोजगार मेळाव्यास युवकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नामांकित कंपनीत नोकरी मिळेल या आशेपोटी शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी गुरुवारी वसंतराव नाईक कॉलेजमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यासाठी गर्दी केली. मेळाव्याला पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्याही लक्षणीय होती. दरम्यान, उपस्थितांपैकी ३८७ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.

जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत अाहे. त्याचा प्रत्यय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित या रोजगार मेळाव्यात आला. ऑपरेटर, ट्रेनी, कस्टमर सर्व्हिस असोसिएट, सुरक्षारक्षक यांसह विविध ७१० जागा भरण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इंटलनेट ग्लोबल, आयटीएम, वोक््हार्ट कंपनी, इसीम स्प्रीसन्स सिस्टिम, नवभारत फर्टिलायझर्स, एनआरबी कंपनी, धूत ट्रान्समिशन, युरको फोर्बस्, जी फोरएस सेक्युअर सोल्युशन आदी कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक रवींद्र बाळापुरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. वसंतराव कॉलेजचे प्राचार्य मिलिंद उबाळे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे उपसंचालक सुनील सैदाने, सहायक संचालक विजय रिसे, वि. का. भुसारे आदी उपस्थित होते.

दरम्यान, दहावी, बारावीपासून ते डिप्लोमा ऑटोमोबाइल, प्रोडक्शन, आयटीआय, बी फार्म, इंजिनीअरिंग आदी शाखांच्या विद्यार्थ्यांनी मेळाव्याला गर्दी केली होती. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाची प्रसिद्धी करण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत व्यवसायिक संस्था (व्हीटीपी) यांचेही स्टॉल मेळाव्यात उभारण्यात आले होते. उपस्थितांना अभियान व कोर्ससची माहिती देण्याच आली.

८०५ मुलाखती
कंपन्याच्या प्रतिनिधींनी संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेत त्यांची निवड केली. सायकांळी उशिरापर्यंत मुलाखती सत्र सुरू होते. दिवसअखेर ८०५ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, त्यापैकी ३८७ जणांची विविध कंपन्यांत प्राथमिक निवड झाली, अशी माहिती सैंदाणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ आरामदायी हिरकणी दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी विभागाच्या मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवारी सायंकाळी पाच नव्या आरामदायी हिरकणी दाखल झाल्या. त्यामुळे आगामी काळात पुणे आणि नागपूरचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

निमआराम बससेवा अधिक चांगली करण्यासाठी निमआराम बसमध्ये मागेपुढे होणारे सिट बसविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. यानुसार चिकलठाणा कार्यशाळेत एसटी बस तयार करण्यात आल्या आहेत. या बसचे वाटप राज्यातील विविध आगारांना करण्यात येत आहे. यातंर्गत औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकाला ५ नव्या गाड्या मिळाल्या. या गाड्या नागपूर आणि पुणे प्रवासादरम्यान वापरल्या जात आहेत.

नागपूरला गुरुवारी रात्री दोन बस सोडण्यात आला. पुण्यासाठी शुक्रवारी सकाळी तीन बस सोडण्यात आल्या, अशी माहिती आगार व्यवस्थापक सि. के. सोळसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त पदांबाबत पालिकेस फटकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विधिमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने (व्हीजेएनटी) शुक्रवारी महापालिकेस भेट दिली. वसुली, रिक्त पदांच्या भरतीसाठी व्हीजेएनटी प्रवर्गाचा न केलेला विचार यासंदर्भात समितीने प्रशासनास फटकारले. यासंदर्भातील अहवाल विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सुधाकर कोहळे, संतोष टारफे, हरिसिंग राठोड, महादेव जानकर, तुषार राठोड या आमदारांनी महापालिकेत भेट दिली. आयुक्त सुनील केंद्रेकर, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अयुब खान यांनी समितीचे स्वागत केले. समितीने आढावा घेताना पालिकेतील आकृतीबंध तपासला. व्हीजेएनटी प्रवर्गाची ४१ पदे रिक्त आहेत, ती भरण्याबाबत पालिकेचे धोरण काय असे विचारण्यात आले. रिक्त पदांचा आढावा घेतल्यानंतर पदोन्नतीच्या बाबतीत व्हीजेएनटी प्रवर्गाचे निकष पाळले गेले की नाही, यासंदर्भात समितीने माहिती घेतली. उपायुक्त पदाच्या आरक्षणात एक पद व्हीजेएनटीसाठी होते, ते का भरले गेले नाही? या प्रश्नावर मात्र पालिकेचे अधिकारी निरूत्तर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेचे ३०० कोटींचे करवसुलीचे उद्दिष्ट आहे. आजवर ७० कोटीच वसुली झाली, याबाबत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रजासत्ताक दिनापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने केली होती. तांत्रिक अडचणीचे कारण सांगून दिवसाआड पाण्याची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. या अडचणी सोडवित कंपनीने आता सोमवारपासून (एक फेब्रुवारी) शहरातील चार भागांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबादचा पाणीपुरवठा गेल्या कित्येक वर्षांपासून दोन दिवसांआड होत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने जायकवाडीत जेमतेम पाणीसाठा आहे. औरंगाबादचा पाणीपुरवठा समांतरकडे हस्तांतरित करण्यात आला. दीड वर्ष उलटूनही कंपनीकडून अपेक्षित प्रगती झाली नव्हती. दरम्यान, प्रशासन, राजकीय नेत्यांनी समांतरच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी समांतरला नोटीस दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या. एका बाजूने जलवाहिनीचे काम सुरू केले. नवीन वर्षाच्या सुरवातीस युटिलिटी कंपनीने प्रजासत्ताक दिनापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले होते.

पथदर्शी प्रकल्प म्हणून पुंडलिकनगर भागात हा प्रयोग प्रजासत्ताक दिनापासून राबविण्यात येणार होता. त्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे हा प्रयोग पुढे ढकलल्याचे कंपनीने जाहीर केले होते, मात्र दोन दिवसांतच कंपनीने नव्याने वेळापत्रक जाहीर करून एक फेब्रुवारीपासून पुंडलिकनगर, सिडको एन-एक, एन-पाच आणि एन-सहा या वसाहतींना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ७० ते ८० टक्के भागांत २५ फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी रात्री कंपनीने महापौर त्रिंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात आणि सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांच्यासमोर सादरीकरण केले होते. कोणत्या पद्धतीने पाणीपुरवठा दिवसाआड केला जाईल, हे सांगितले होते. या प्रस्तावाला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवून आधी संपूर्ण शहरात सध्याच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करा, अशी सूचना केली होती. त्यानंतर आज लगेचच कंपनीने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे

वेळापत्रक जाहीर केले. पथदर्शी प्रकल्प म्हणून हे चार भाग निवडण्यात आले आहेत. एक फेब्रुवारी २०१६पासून पुंडलिक नगर, एन-एक, एन-पाच आणि एन-सहा या भागांच्या दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी या भागांची विभागणी दोन गटांत करण्यात आली आहे.

फेब्रुवारीअखेर ८०% शहरात दिवसाआड पाणी

पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला तर, प्रत्येक आठवड्या टप्प्याटप्प्याने शहराच्या ७० ते ८० टक्के भागात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. वितरण व्यवस्थेतील विशेष जोडण्यांचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले तर, २५ फेब्रुवारीपासून ८० टक्के भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद-जालना मेट्रोसाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
औरंगाबादला डीएमआयसी आणि जालन्यात ड्रायपोर्ट आणले. आता औरंगाबाद जालना विकास प्राधिकरण स्थापन करून या संपूर्ण भागाचा सर्वांगिण विकास करण्याची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलेली आहे. भविष्यात औरंगाबाद-जालना मेट्रो रेल्वे उभारण्याचा विशेष आग्रह धरणार असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यात व्यक्त केले.
सलग दुसऱ्यांदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्याच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात ते शनिवारी बोलत होते. औरंगाबाद आणि जालन्याचा पूर्ण कायापालट करण्यासाठी कटीबद्ध आहोत. येत्या दहा वर्षात औरंगाबाद जालना हे एकच शहर होणार आहे. त्याचा भरवसा बसत नाही, एका वर्षात १७ हजार हजार कोटी रुपयांची ३४०० किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत. यातील बहुतेक राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहेत.
राजकारणात लोकांना जोडणे आपल्याला महत्वाचे वाटते, यातूनच माणूस मोठा होतो. पैसा कमावून लखपती होण्यापेक्षा लोक जमवून लोकपती होण्याचा आपण प्रयत्न केला. ३५ वर्ष संघर्ष केला. आमदार-खासदार म्हणून निवडून यायचो पण सत्तेत बसलेली मंडळी आमचे काही ऐकत नव्हती. मात्र, आता केंद्रात आणि राज्यात मंडळी सत्तेत आहेत, ही सर्व ताकद जालनेकरांनीच आपणास दिली आहे. घार आकाशात उंच उडते. मात्र, तिचे चित्त पिलांपाशीच असते. माझे संपूर्ण लक्ष जालन्यात केंद्रीत आहे असेही खासदार दानवे म्हणाले.
विकासाच्या मुद्यावर आम्ही सगळे एक आहोत कोणताही निर्णय घेताना एकत्र येऊन विचारविनिमय करून सगळे काही आम्ही ठरवतो या नेमक्या शब्दात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले. जिल्ह्याच्या राजकारणात गेली ३० वर्ष एकत्र येऊन काम करत आहोत. एखाद्या वार्डाचा नगरसेवक कोण असावा, यापासून ते सगळे अगदीच एकमताने ठरते असे लोणीकर यांनी सांगितले.
खासदार दानवे यांच्या चळवळीतील सातत्याने राज्यात नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. या सगळ्या घडामोडीमध्ये सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी मोठा राजकीय संघर्ष केला आहे. एकमुखाने प्रदेशाध्यक्ष होण्याचा बहुमान त्यामुळेच त्यांना मिळाला आहे. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, असे लोणीकर म्हणाले.
कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जालन्यात स्टील उद्योग वीज दरवाढीचा बळी जातो आहे, सरकारला आपण हे सांगितले पाहिजे, असे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले.
खासदार दानवे यांचा ३५ वर्षांपूर्वी जो स्वभाव होता तोच आजही कायम आहे. लप्पाटुप्पी करणारे, गुंडागर्दी करणारे यांना त्यांच्या जवळपास अजिबात थारा मिळत नाही. स्व. गोपीनाथरावांनी जशी महाराष्ट्रातील अठरापगड जातीची मोट बांधून राजकारण केले. खासदार दानवे यांनी करावे आणि भाजप सेनेमध्ये मैत्रीचा संपूर्ण समन्वय निर्माण करावा, अशी अपेक्षा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी व्यक्त केली.
जालना ते राजूर या रस्त्यावर तीन आमदार असताना विनाकारण खासदार रावसाहेब दानवे यांना त्या रस्त्याच्या समस्येवर जवाबदार धरले जायचे तरी सुद्धा त्यांनी या रस्त्याचे काम सुरू केले आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे म्हणाले.
जालन्याचा आपला काही संबंधच नाही. मात्र, खासदार दानवे यांनी चिरंजीव संतोष दानवे इतकेच लक्ष ते आपल्याकडे देतात, असे आमदार नारायण कुचे यांनी बोलताना स्पष्ट केले.
जेष्ठ उद्योजक अर्जुन गेही रिपाइंचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. मोतीबाग ते मामा चौक या भागात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जेष्ठ नेते दिलीप तौर, गोपाळराव बोराडे, शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, राजेश जोशी, अतुल वझरकर, चंद्रशेखर मोहरील, मस्के पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस प्रशासनाने दक्ष रहावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना शहरात नुकत्याच झालेल्या चोरीच्या घटना व ग्रामीण भागात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार या बाबी गंभीर आहेत. चोरीच्या घटनांमध्ये रक्कम जरी जास्त चोरीस गेलेली नसली तरी या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना भविष्यात होणार नाहीत व अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहण्याच्या कानपिचक्या पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलिस विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतल्या.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक गेडाम, उपपोलिस अधीक्षक वसावे, उपविभागीय अधिकारी चिंचकर यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री लोणीकर म्हणाले, 'जिल्ह्यात अवैध दारु विक्री, अवैध वाहतुक, जुगार, अवैधरित्या वाळु वाहतूक, हल्ल्यांची प्रकरणे आदी बाबी होत असल्याच्या नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. या बाबी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगत रात्रीच्या वेळी शहरांमध्ये पोलिस गस्त वाढवावी.'
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची जरी असली तरी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य केल्यास अशा घटना रोखण्यास नक्कीच प्रतिबंध घालता येईल. पोलिस विभागाने काम चोखपणे व जबाबदारीने व प्रामाणिकपणाने पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात हद्दपार व गुन्हेगार असलेल्या व्यक्ती शेजारच्या जिल्ह्यात वास्तव्यास जाऊन राहत असल्याच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी या गुन्हेगारांना जालना जिल्ह्याबरोबर शेजारील जिल्ह्यातूनही हद्दपार करता येईल का ? या संदर्भात माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणच्या पोलिस चौक्या उभारणीचे काम प्रलंबित आहे. अशा ठिकाणची माहिती घेऊन हा प्रश्नही तातडीने निकाली काढण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर यांनी जिल्ह्यातील सन डिसेंबर २०१५ अखेर नोंदविण्यात आलेल्या व उघडकीस आणलेल्या विविध गुन्हयांची माहिती देतांना खुनाच्या ४० प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे उघड करण्यात आले. खुनाचा प्रयत्न ७२ पैकी ७२ उघडकीस, बलात्कार ४७ पैकी ४७, दरोडा ११ पैकी ११, जबरी चोरी ६६ पैकी ४८, घरफोडी १८९ पैकी ९२, सर्वचोऱ्या ५७६ पैकी २५९, दंगली २१६ पैकी २१६, दुखापत ५९५ पैकी ५९२, इरत भादवी १३५२ पैकी १२५४, मुंबई जुगार कायदा ३५० पैकी ३५०, मुंबई दारुबंदी कायदा ११२० पैकी ११२०, इतर ७६३ पैकी ७५७ असे एकूण पाच हजार ३९७ प्रकरणापैकी चार हजार ८५४ गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पॉवर पाँईटच्या माध्यमातून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
राज्य सरकारच्या निर्णयानुसार ज्या गावाची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे, अशा टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची योजना लागू केली आहे. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे.
शासननिर्णानुसार राज्यातील २०१५-१६ च्या खरीप हंगामात नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या विद्यापीठ परिक्षेत्रातील चारही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी घोषीत केलेल्या १४ हजार ७०८ गावांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहिर केलेली आहे. या परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी केलेल्या उपाय योजनामध्ये महाविद्यालीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे जाहीर केलेले आहे. या १४ हजार ७०८ गावे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत्रात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेली आहे.
टंचाईग्रस्त गावातील परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीस पात्र असलेल्या उन्हाळी २०१६ च्या परीक्षेसाठी पदवी व पदव्युत्तर (व्यवसायिक व अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या) विद्यार्थ्यांकडून संलग्नित महाविद्यालयाच्या प्रार्चायांनी परीक्षा शुल्क न घेता त्यांचे आवेदनपत्रे स्वीकारावीत, असे परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रेनडेड रुग्णाचे हृदय मुंबईला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवयवदान करून तीन जणांना जीवदान दिल्याची घटना औरंगाबादेत पंधरा दिवसांपूर्वी घडली. या प्रक्रियेची पुनरावृत्ती सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये झाली. योगायोग म्हणजे यावेळीही ब्रेनडेड रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातीलच होता. ‌ब्रेनडेड रुग्णाचे हृदय मुंबईत, यकृत पुण्यात तर किडनी औरंगाबादमध्ये प्रत्यारोपित करण्यात आली.
सावखेड तेजन (ता.सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील सुनील माधव बुधवंत (वय ३९) हे जालना जिल्ह्यातील पाष्ट्या येथील जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना मेंदूचा विकार झाल्याचे स्पष्ट झाले. मेंदूची रक्तवाहिनी फुटल्याने २२ जानेवारी रोजी त्यांना एमआयटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. डॉ. अंशुल बगडिया, डॉ. आनंद निकाळजे यांनी रुग्णाला तपासल्यानंतर ब्रेनडेड झाल्याचे निदान केले. शुक्रवारी रात्री हा प्रकार लक्षातच आला. त्यांनी झेडटीसीसी समितीला कळविले. इकडे बुधवंत यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी प्रकृतीची माहिती त्यांच्या पत्नी, आई द्वारकाबाई, भाऊ गजानन, चुलत सासरे केशव मुंडे, मेहुणे गणेश मुंडे यांना दिली. पेशंट ब्रेनडेड झाला आहे. त्यांचे अवयवदान केल्यास चार रुग्णांना जीवदान मिळेल, असे सांगितले. नातेवाईकांनी चर्चा करून अवयवदानास संमती दिली. झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना माहिती दिली गेली. नियमानुसार तपासणी करून अवयवांची गरज असलेली यादी तपासून निर्णय घेण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शनिवारी सकाळी सुनील बुधवंत यांच्या शरीरातून हृदय काढण्यासाठी मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. विजय शेट्टी, डॉ. संदीप सिन्हा, डॉ. संदीपकुमार जाधव यांचे पथक औरंगाबादेत दाखल झाले होते. यकृत (लिव्हर) घेण्यासाठी पुण्याच्या रूबीचे डॉ. बोकील, डॉ. महेश यांचे पथक धूतमध्ये आले. तीन तासांत हे सर्व अवयव काढून मुंबई, पुणे व बजाज हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोप‌ित करण्यात आले.
ग्रीन कॉरिडॉर
पोलिस आणि प्रशासनाच्या सहाय्याने ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिला होता. हृदय विमानाने तर यकृत अँब्युलन्सने पुण्याला नेण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक १०० पोलिस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले, असे धूत हॉस्पिटलचे सीइओ डॉ. विजय बोरगावकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे शिवारातील हुरडा पार्टी गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, भूम तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे रब्बी मालदांडी ज्वारीचे कोठार म्हणून सर्वदूर परिचित आहे. हा परिसर मोठ्या प्रमाणावर मालदांडी ज्वारीसाठी नावाजला जातो. मात्र, सततच्या दुष्काळामुळे व नापिकीमुळे शिवाय यंदाही पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बीचे शिवार सध्या कोमजले आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीसचा भागातील सर्वांना हुरडा पार्टीचे वेध लागतात. थंडीच्या दिवसात शिवारात आगरी (आखटी) पाडून त्यात मोठ्या मोठ्या हिरव्या कच्च्या, कुचकुची, गुळभेंडी जातीच्या ज्वारीच्या कणसाच्या काड्या शेकोटीत भाजून खाण्यात एक वेगळी गंमत असायची. मात्र, यंदाही पावसाअभावी ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर फेल गेल्याने या हुरडा पार्ट्या दूर्मिळ झाल्या आहेत.ज्वारीची कणसे शिवारात मान डोलायला लागली की, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे गावात निरोप यायचे. मात्र, सद्या ही चर्चाच घडत नाही.
गणपतीच्या उत्सवादरम्यान पेरण्या आटोपल्या जायच्या. ऐन हिवाळ्यात ज्वारीचा हुरडा तयार व्हायचा. ग्रामीण भागात शहरातील मोठ्या मान्यवरांचे फोन यायचे. हुरडा पार्टीचे नियोजन कसे आहे. मात्र, शेतकयांचा हा रानमेवा यावेळी रूसलेला आहे. एक चवदार, गोड पौष्टिक व बालवर्धक पदार्थ म्हणून हुरडा प्रसिद्ध आहे.
शेतात हुरडा आला की, शेतीमध्ये माणसांचा वावर वाढायचा. सुट्टीच्या दिवशी तर हमखास बेत व्हायचा. मित्र मंडळी, नातलग, पाहुण्यांचा गोतावळा सर्वजण एकत्र जमायचे. शेतात आगरी पडली की टपोरी कणसे काढली जायची आणि लालभडक विस्तवांवर ती भाजायची. भाजलेली कणसे हातावर चोळून त्यातील गोंड बाजूला काढून हुरड्यावर ताव मारला जायचा. हुरडा खात असताना प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे शेंगा व खोबरा चटणी, मिरी व लसूण चटणी, खारे शेंगदाणे, फरसाण, गुळ-मीठ, वांगी, बोर, हरभरा (डहाळा) अशी लज्जतदार पदार्थांची रेलचेल होती.
त्याच बरोबरीने शिवारात फिरून कुठे शेंदाडे सापडते का? कुठे वाळूक व दोडका असा रानमेवा शोधला जायचा. परंतु, दुष्काळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवारात सर्वत्र बाटुकच पहायला मिळत आहे. चालू वर्षी जिल्ह्यात हुरडा द‌ुर्मिळ बनला आहे. ज्यांच्याकडे हुरड्याची कणसे दिसतात त्यांचेकडे हुरड्यासाठी गळ घालण्यात येत आहे.
उस्मानाबाद शहरातील महावीर कोठारी, सुभाष गांधी, नानासाहेब पाटील यांच्याकडे सुमारे पंधरा दिवस हुरडा पार्टीचे मोठे आयोजन असायचे. बारामती, फलटण, म्हसवड, सोलापूर, बीड, हैद्राबाद येथून आप्तेष्ठ मंडळी व मित्र कंपनी बहुसंख्येने हुरड्यासाठी यायची. हुरडापार्टी बरोबरच मनोरंजाचे खेळ ही व्हायचे. मात्र, यंदा हा सर्व आनंद दुष्काळाने हिरावून घेतला आहे.

इंदौर हुरडाची रेलचेल
काही मंडळींनी शेतात इंदौर हुरडा आयात करून हुरडा पार्टीचा आनंद लुटलाच. परंतु, अशा पार्टीचे आयोजन सद्यस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना पेलणारे नाही. इंदौर हुरडा हा सध्या मोठ्या बाजारपेठेतून सुमारे २५० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे हुरर्ड्याची गोडी चाखणारी मंडळी असा महागडा हुरडा घरी आणून तलफ भागावित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात सव्वालाख उद्योजक घडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'केंद्र सरकारने ६ जानेवारी रोजी स्टँडअप इंडिया योजना दलित उद्योजक घडविण्यासाठी जाहीर केली आहे. या योजनेद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांमधून केवळ कर्ज न देता, त्यांना प्रशिक्षण, व्यवसाय वृद्धी याबाबत शिक्षण दिले जाईल. यातून देशातील सव्वालाख तर राज्यात १० हजार दलित उद्योजक घडतील,' अशी माहिती दलित इंडस्ट्रिज चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)चे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी पत्रकारांना दिली.
कांबळे यांनी शनिवारी उद्योग क्षेत्रातील नवीन बदल, धोरण, राज्याचे आगामी काळात जाहीर होणारे उद्योग धोरण यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होणार आहे. त्यानिमित्त केंद्राने खास ही योजना जाहीर केली आहे. देशात २७ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यांच्या सव्वालाख शाखा आहेत. त्यातील १० हजार शाखा आपल्या राज्यात आहेत. या बँकांच्या प्रत्येक शाखेतून दोन दलित उद्योजकांना कर्ज दिले जाईल. हे कर्ज दिल्यानंतर त्यांची परतफेड आवश्यक आहे. उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या व्यवस्थापकांना जबाबदारी सोपविण्यात येईल. विशेष म्हणजे याचे प्रशिक्षण बँकांच्या व्यवस्थापकाना दिले जाईल. या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी डिक्कीने सहकार्य केले आहे. पूर्वीच्या सरकारनेही डिक्कीच्या योजनांचा समावेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टँडअप इंडियाचे धोरण ठरवितानाही डिक्कीची मदत घेतली होती. दलित उद्योजकांच्या उत्पादनापैकी ४ टक्के उत्पादन केंद्र सरकार खरेदी करणार आहे. तसा दंडक नियमाद्वारे केंद्राने घालून दिला आहे. राज्यातील त्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्याचे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार आहे. त्यातही आम्ही सूचना दिल्या आहेत,' असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
'राज्यातील उद्योगाबाबतचे पुरवणी धोरण जाहीर होताना यापुढे भूखंड वाटपात दलित उद्योजकांना राखीव भूखंड ठेवले जाणार आहेत. स्टँड अप योजनेंतर्गत कर्ज घेताना मागणीच्या २५ टक्के रक्कम संबंधित उद्योजकांना भरावी लागेल. ही कोलॅटरल सिक्युरिटी असेल. मात्र, अनेकांकडे ही रक्कमही जमा होणे शक्य नाही, त्यावर उपाय म्हणून १५ टक्के रक्कम राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने द्यावी, असा प्रस्ताव डिक्कीने दिला. त्यासही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे,' असे कांबळे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठांनी बोजडपणा सोडावा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'नवनव्या धोरणांमुळे आर्थिक सुधारणा वेगात होत आहेत. तरुण नोकरीच्या तर उद्योजक व्यवसायाच्या संधी शोधत आहेत. अशावेळी विद्यापीठांनी बोजड न होता
स्वतःत बदल करावेत. देशाची संपत्ती व्हावे. विद्यार्थ्यांमधून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी काय करता येईलत्यासाठी झपाटून कामाला लागावे,' असे आवाहन डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वाणिज्य विषयाच्या २७ व्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.
वाणिज्यशास्त्र विभाग व राज्य वाणिज्य असोसिएशनतर्फे 'उद्योजकता आणि आर्थिक विकासातील बदलते प्रवाह' विषयावर दोन दिवशीय परिषदेला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उद्योजक प्रशांत देशपांडे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, टी. ए. शिवरे, बबन तायवडे, प्रा. पुरुषोत्तम राव, प्रा. वाल्मिक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कांबळे म्हणाले, 'उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यात विद्यापीठे, महाविद्यालये कमी पडत आहेत. बदलत्या काळानुरूप विद्यापीठांनी तत्काळ अभ्यासक्रमांमध्ये बदल करावेत. अर्थव्यवस्था अत्यंत झपाट्याने पुढे जाते आहे. अशावेळी शिक्षण देणाऱ्या या महत्त्वाच्या संस्थांना मागे राहून चालणार नाही. विद्यापीठांनी देशाची संपत्ती व्हावे.' प्रशांत देशपांडे म्हणाले, 'गरीब अधिक गरीब होणे श्रीमंत अधिक श्रीमंत होणे हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. देशात छोटे व मध्यम उद्योग वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकाधिक रोजगार निर्मिती शक्य आहे.' अध्यक्षीय समारोपात डॉ. सांगळे यांनी वाणिज्य परिषदेच्या प्रगतीचा आढावा घेतला. परिषदेत शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर यांचे 'शेतकरी आत्महत्या समस्या व उपाय' या विषयावर बीजभाषण झाले. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. अझरुद्दीन यांनी आभार मानले. परिषदेचा उद्या समारोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...‘पालखी’ विकासाकडे चालली!

$
0
0



Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
भोई समाजाच्या देशभरात ३२ जाती-पोटजाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात २५ जाती, पोटजाती आढळून येतात. झिंगा भोई, परदेशी भोई, राज भोई, भोई, कहार, गोंडिया कहार, धुरिया कहार, किरात, मछुआ, मांझी, जातिया, कवट, ढिवर, धीवर, धीमर, पालेवार, मछंद्र, नावाडी, मल्हार, मल्हाव, बोई, गाढव भोई, खाडी भोई, खारे भोई, ढेवरा अशा भोई समाजाच्या जाती आणि पोटजाती. भोई समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन म्हणजे दाळवा, फुटाणे, बत्तासे, शेवचिवडा बनवणे व विकणे. नदीकाठी खरबूज, टरबूजांचे पीक घेऊन त्यांची विक्री करणे. थोड्या प्रमाणात रोजंदारीचे काम करणे हे आहे. पुरातन काळात भोई समाजाला पालखी उचलणारे म्हणत. आजही भोई समाजाला पालखी उचलण्याचा मान सर्वप्रथम मिळतो. काळाच्या ओघात जुन्या परंपरा मोडीत निघाल्या. आज सर्व जण स्पर्धेच्या युगात आले आहेत. मात्र, भोई समाज विकासापासून वंचित राहिलेला दिसतो. बदलत्या काळानुसार भोई समाज आपले पारंपरिक व्यवसाय बदलून स्वतःची प्रगती करू शकलेला नाही. भोई समाजाच्या पारंपरिक व्यवसायात अन्य समाजातील लोकांनी शिरकाव केल्यामुळे तसेच आधुनिक साधनांचा उपयोग करू लागल्यामुळे भोई समाज आजही हलाखीचे जीवन जगताना दिसून येतो.
भोई समाजाला विकासाच्या वाटेवर आणण्याकरिता अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे पदाधिकारी राज्या-राज्यात जाऊन तेथील भोई समाजाचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहेत. भोई समाज देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गात समाविष्ट आहे. काही राज्यांत भोई समाज अनुसूचित जातीत, तर काही राज्यात अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्रात भोई समाजाला भटक्या जातीमध्ये स्थान देण्यात आले आहे. हा समाज महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या योजनेत 'ओबीसी'मध्ये सामील आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ भोई समाजाला अद्यापही झालेला नाही. भोई समाजाला महाराष्ट्रात एस. टी. प्रवर्गात स्थान देण्यात यावे, ही प्रमुख मागणी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेने केंद्राकडे केलेली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सरचिटणीस गजानन साटोटे व राज्य सह कोषाध्यक्ष अॅड. शंकर वानखेडे यांनी दिली.
भोई समाजाला 'भाई' या नावाने देखील ओखळले जाते. पारंपरिक व्यवसायात अडकून राहिलेल्या या समाजात शिक्षणाचे महत्त्व अद्यापही पोहचलेले नाही, असे चित्र दिसून येते. समाजातील फारच कमी लोक हे उच्च शिक्षण घेताना दिसून येतात. भोई समाजातील महिलांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्याविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. भोई समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ शिक्षणच नव्हे तर राजकीय व सामाजिक कुशल नेतृत्त्वाची गरज आहे, असे गजानन साटोटे व शंकर वानखेडे यांनी सांगितले.
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची राज्य कार्यकारिणी अशी : अध्यक्ष तुकाराम वानखेडे (औरंगाबाद), उपाध्यक्ष रमेश इंगळे (मुंबई), शांताराम आडणे (परभणी), सरचिटणीस योगेश श्रीनाथ (बुलढाणा), सहसचिव ज्ञानेश्वर लांडगे (माजलगाव), कार्याध्यक्ष गणेश वानखेडे (औरंगाबाद), चंद्रकांत डुब्बा (औरंगाबाद), सहकार्याध्यक्ष दादाराव आळणे (सिल्लोड), कोषाध्यक्ष एन. एन. गंदलवाड (औरंगाबाद), सहकोषाध्यक्ष अॅड. शंकर वानखेडे (औरंगाबाद). सल्लागार - बापूराव तमखाने.
युवा शहर कार्यकारिणीः अध्यक्ष मयूर करवंदे, सचिव दिनेश आळणे.
महिला कार्यकारिणीः अध्यक्ष शांताबाई बनसोडे, सचिव मंजुषा श्रीनाथ, कार्याध्यक्ष मनीषा भुईर.
---
भोई समाजाच्या पारंपरिक व्यवसायात अन्य समाजातील लोक आल्यामुळे समाजाच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे. शिक्षणाबरोबरच आधुनिक पद्धतीचा अवलंब व्यवसायात करण्याची नितांत गरजेचा आहे. दुकाने थाटण्यासाठी योग्य जागा मिळणेही तेवढेच
गरजेचे आहे.
- अॅड. शंकर वानखेडे, राज्य सहकोषाध्यक्ष, अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था
---
भोई समाजातील युवकांना व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी तसेच लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मंडळाची आवश्यकता आहे. मासेमारी, खरबूज, टरबूज वाडीसाठी जागा मिळणे गरजेचे आहे. शहराच्या ठिकाणी युवकांना शिक्षण घेण्याकरिता वसतिगृह उभारणे ही काळाजी गरज बनली आहे.- गजानन साटोटे, राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था










मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मट सक्ती उद्यापासून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जनजागृती मोहिमेनंतर आता सोमवारपासून शहरात हेल्मट सक्ती कडक लागू करू, असा निर्धार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बोलून दाखविला. पोलिसांना शनिवारपासूनच हेल्मट सक्ती लागू झाली असून, ग्रामीण भागातही सोमवारपासून हेल्मेट सक्ती लागू करू, अशी माहिती पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
बेशिस्त, नाठाळ वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिस चांगलेच सरसावलेत. सुरक्षित वाहतुकीसाठी २०१५ मध्ये शहर पोलिसांनी नवीन ४३ आदेश काढले. वर्षभरात १ लाख ६४ हजार वाहनचालकांवर कारवाई केली. यात २ कोटी ५८ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या कांही दिवसांपासून दंडाच्या पावत्या घरपोच देण्यात येत आहेत. या काळात हेल्मेट सक्तीसाठी जनजागरण सुरू करण्यात आले. गेल्या काही दिवसांत झालेल्या अनेक अपघातात हेल्मेट नसल्यामुळे शहरातील युवकांचे मृत्यू झाले. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला. अनेक शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या कॅँपसमध्ये हेल्मट सक्ती केली. आता सोमवारपासून हेल्मेट नाही घातल्यास दंड आकारण्यात येणार आहे, असे अमितेशकुमार म्हणाले.
खरेदीसाठी लागल्या रांगा
सोमवारपासून हेल्मेट सक्ती होणार म्हणून शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, रोपळेकर चौक, सिडको येथील दुकानांत हेल्मेट खरेदी करण्यासाठी शहरवासियांनी तोबा गर्दी केली होती. या दुकानांत पाय ठेवायलाही जागा नव्हती. आवडीचे हेल्मेट, आकार तर सोडाच असेल ते हेल्मेट घ्या अन्यथा बाहेर व्हा, अशा सूचना देण्यात येत होत्या. दुपारपर्यंत हेल्मेटचा स्टॉक बऱ्यापैकी संपला होता.
मेडिकल सर्टिफिकेट चालणार नाही
'हेल्मेट घालणे टाळण्यासाठी अनेकजण मेडिकल सर्टिफिकेट पोलिसांना दाखवू शकतात. मात्र, कायद्यात कुठेही मेडिकल सर्टिफिकेट असेल तर हेल्मेट घालू नये याचा उल्लेख नाही. डॉक्टरांनीही असे प्रमाणपत्र देऊ नये. हेल्मेट सक्तीतून कोणीही सुटणार नाही,' असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.
१०० पोलिसांवर कारवाई
पोलिस कर्मचाऱ्यांना शनिवारपासूनच हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. दिवसभरात हेल्मेट न घालणाऱ्या १०० पोलिसांवर कारवाई करण्यात आली. तर काहींना घरपोच पावत्या दिल्या जाणार आहेत. ज्या नागरिकांनी हेल्मेट घातले नव्हते, अशा दुचाकीस्वारांना आयुक्तालयात प्रवेश देण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ्यात पाण्याचे हाल नको

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील काही भागात सोमवारपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कार्यक्रम औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने शुक्रवारी जाहीर केला. त्याचा आढावा घेण्यासाठी पालिका प्रशासन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये आढावा बैठक घेतली. त्यात अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. आयुक्त सुनील केंद्रेकर, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह पालिकेचे अधिकारी तसेच कंपनीचे अधिकारी असे ३० जण उपस्थित होते.
कंपनीकडून सध्या होणारे काम आणि भविष्यातील कामाचा आढावा घेण्यात आला. ही बैठक तब्बल सहा तास आणि दोन टप्प्यात झाली. पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रकल्पाची गती, प्रकल्प लक्ष्य, वर्तमान स्थिती आणि सुधारणा अशा १५ पेक्षा अधिक मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. याआधी झालेल्या बैठकीमध्ये पालिकेकडून पाणीपुरवठ्यासंदर्भात त्रुटी उपस्थित केल्या होत्या. दूषित पाणीसमस्या, गळती थांबविणे तसेच अनधिकृत नळ नियमित करण्यासंदर्भात सूचना केली होती. त्याची बहुतांश अंमलबजावणी झाल्याचा दावा कंपनीने केला. पथदर्शी म्हणून एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि तो यशस्वी करण्यासाठी कंपनीने तयारी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या भेडसावणार आहे. कंपनीने जास्तीत जास्त भागांना एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा, असे आयुक्त केंद्रेकरांनी सूचित केले. पानझडे यांनी २००० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या कामाची माहिती घेतली. नवीन जलकुंभ बांधण्याचे नियोजनही यावेळी तपासण्यात आले. सोशल मीडियाचा वापर करून लोकांच्या समस्या आणि अभिप्राय तसेच सूचना जाणून त्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे पानझडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0



औरंगाबाद : हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. शेख सोहेल शेख रमजान असे मृत तरुणाचे नाव आहे. जिन्सी परिसरातील नवाबपुऱ्यात राहणारा सोहेल दुपारी मित्रांसह हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यास पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. खोलगट भागात पोहचताच तो बुडाला. त्याच्या मित्रांनी पोलिस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. पोलिस पोहचण्यापूर्वीच नागरिकांच्या मदतीने सोहेलला पाण्याबाहेर काढत घाटीत नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. सोहेल रोजंदारीवर फर्निचरचे काम करायचा. त्याची आई वारलेली असून वडील मानसिक दृष्ट्या आजारी आहेत. त्याचा मोठा भाऊ ही रोजंदारीवर काम करतो, अशी माहिती हर्सूल पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडी बाजाराला दुष्काळाच्या झळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने आठवडी बाजारावर परिणाम झाला आहे. कन्नड येथील आठवडी बाजारातील ग्राहकी किमान २५ टक्के कमी झाली आहे.
ग्रामीण भागातील अर्थकारणाचे आठवडी बाजार हे मुख्य साधन आहे. आठवडी बाजाराच्या निमित्ताने पंचक्रोशीतील नागरिक त्या गावात येतात. आठवडी बाजाराच्या दिवशी मोठी आर्थिक उलाढाल होते. अनेक जण आठवडी बाजाराच्या दिवसाचा खरेदीसाठी वाट पहात असतात. पण गेल्या तीन आठवड्यांपासून आठवडी बाजारातील ग्राहक कमी होत असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सतत तीन वर्षांपासून एेनकेन प्रकारे दुष्काळाशी सामना करत असलेल्या बळीराजासह सर्वसामान्य जनतेला दुष्काळाच्या चक्रातून जावे लागत आहे. बाजारात भाजीपालाची आवक असतानासुद्धा ग्राहकी अभावी माल परत घेऊन जाण्याची वेळ विक्रेत्यांवर येत आहे, असे भाजीपाला उत्पादक व विक्रेते गोविंद गायके यांनी सांगितले. बाजारात स्वस्तातील भाजीपाल्याला उठाव असून महाग भाजीकडे ग्राहकाकडे पाठ फिरवली आहे. राजू झाल्टे या बटाटा व कांदा घाऊक विक्रेत्यांच्या माहितीनुसार २५ ते ३० टक्के ग्राहकी कमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाआधी एचआयव्ही चाचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड तालुक्यातील हतनूर, टापरगाव व जैतापूर येथील ग्रामपंचायतींनी गावांतील जोडप्यांनी लग्नाआधी एचआयव्ही चाचणी करावी, असा ठराव घेतला आहे. ग्रामीण नागरिकांनी भावी पिढीच्या आरोग्यासाठी घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी असल्याचे मानले जात आहे.
एडस् या आजाराबद्दल सर्वांना माहिती झाली असली तरी, एचआयव्हीबाधितांना स्वीकारण्याची मानसिकता अद्यापही नाही. शिवाय हा आजार दुर्धर व पुढील पिढीत संक्रमित होणार असल्यामुळे लग्नाआधी जोडप्यांनी एचआयव्ही चाचणी करावी, असा मतप्रवाह आरोग्य क्षेत्रात आहे, परंतु शहरांमध्येही ही बाब अद्याप स्वीकारली जात नाही. या पार्शभूमीवर हतनूर, टापरगाव व जैतापूर येथील २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत एचआयव्ही चाचणीबद्दलचा ठरावच संमत करण्यात आला.
सुखी संसाराचा गाडा निर्विघ्नपणे हाकण्यासाठी एड्स सारख्या भयंकर आजारापासून दूर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे जन्म कुंडलीच्या पाहण्याआधी एचआयव्ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे, याकरिता असे डॉ. अमित पवार व मंगेश ढोबळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तिन्ही गावचे नागरिक, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांना संपर्क करून याचे महत्त्व पटवून दिले. हतनूर येथील राजू कदम यांनी ग्रामसभेत हा प्रस्ताव मांडला, त्याला योगेश बिडवे यांनी अनुमोदन दिले. या विषयावर सांगोपांग चर्चा घडवून आल्यानंतर हा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. टापरगाव व जैतापूर येथे याच पद्धतीने ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे झालेल्या चर्चेत यापुढे गावात होणाऱ्या विवाहपूर्व बोलणीत हा विषय समाविष्ट करण्याचा मानस गावकऱ्यांनी व्यक्त केला. या चाचण्या शासकीय रुग्णालयात मोफत करून मिळत आहेत. चाचणी करून घेण्यात कसलीही अडचण येत नाही; चाचणी प्रमाणपत्र असल्याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये विवाहाची नोंद घेऊ नये, असा सूर चर्चेत व्यक्त झाला.
लग्नाआधी जोडप्यांची एचआयव्ही चाचणी करण्याचा ठराव घेणाऱ्या तिन्ही गावच्या सरपंच महिला आहेत. हतनूरच्या सरपंच मंगलबाई काळे, टापरगावच्या सरपंच रुपाली खडेकर व जैतापूरच्या सरपंच आशाबाई झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत हे ठराव मंजूर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडा या मागणीसाठी औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्नदाता शेतकरी संघटना व गोदाकाठच्या गावातील जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना पैठण पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आधी पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. या गावकऱ्यांनी मागणीसाटी शिवाजी चौकात मुक्काम ठोकला आहे. जलसंपदा मंत्र्यांकडून आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
शासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून अन्नदाता शेतकरी संघटना व गोदाकाठच्या गावकऱ्यांनी मंगळवारी शहरात आंदोलन सुरू केले आहे. सुमारे दोन हजार गावकऱ्यांनी सकाळी शिवाजी चौकापर्यंत मोर्चा काढला. तेथून मोर्चेकरी औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी जायकवाडीकडे जात असताना, शिवाजी चौकात मोर्चेकऱ्यांना पैठण पोलिसांनी रोखून अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना ठाण्यात नेण्यात आले. तेथे आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू करून घोषणाबाजी केली. दरम्यान, नायब तहसीलदार नामदेव देसटवाड यांनी आंदोलकांची भेट घेवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आम्हाला बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी घेतला. संध्याकाळपर्यंत आंदोलकांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. या आंदोलनात संत एकनाथ कारखान्याचे माजी चेअरमन अप्पासाहेब पाटील, किशोर दसपुते, अप्पासाहेब गरदे, जीवन चौधरी, मकबूल पठाण, गंगाधर खरात, शिवाजी गिर्गे, विष्णू मुंदडा, प्रदीप औटे यांच्यासह पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले.

सुप्रीम कोर्टाचे कारण सांगत हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. आम्ही शेतीसाठी नाही तर, पिण्यासाठी पाणी मागत आहोत. जसे शहरी भागात पिण्यासाठी पाणी लागते तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची गरज आहे. मानवतेच्या दृष्टीने विचार करून शासनाने दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडावे.
- जयाजीराव सूर्यवंशी, शेतकरी नेते

पाण्यावाचून मरण्यापेक्षा आम्ही पाणी मिळावे या मागणीसाठी मरायला तयार आहोत. कारण उन्हाळा सुरू व्हायच्या अगोदर आतापासूनच आम्हाला पाण्यासाठी दररोज तरसावे लागत आहे.
- किशोर दसपुते, शेतकरी, नायगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सातत्याने पराभव होत असून यापुढे हे खपवून घेणार नाही, असे बजावले.
खासदार रावसाहेब दानवे यांच्या नुकत्याच झालेल्या सत्कार समारंभाच्या व्यासपीठावर भाजपचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना दानवे यांनी सिल्लोडबद्दल चिंता व्यक्त केली. 'येथील मतदार चांगले आहेत. निवडणुकीत ते भाजपला साथ देतात मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये एकी नाही. ते एकमेकांचे पाय ओढण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाचा पराभव होत आहे. त्यामुळे आपआपसातील मतभेद विसरून कामाला लागावे,' अशा सूचना देऊन त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची जाहीर सभेत कानउघडणी केली.
'विधानसभा निवडणुकीच्या वेळी येथून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या डजनभर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दगाफटका होतो. यापुढे एकदिलाने काम करावे, गटबाजी चालणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. 'पुढच्या काळात पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बैठक घ्या, रणनिती ठरवा; त्या बैठकांना मी उपस्थित राहिल,' असे आश्वासनही खासदार दानवे यांनी दिले.
पदाधिकाऱ्यांमधील कुरघोडीमुळे सातत्याने विधानसभा मतदार संघात भाजपचा पराभव होत आहे. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 'निवडणुकीवेळी काही पुढारी मतदार संघात कामाला लागतात व निवडणूक संपली की लुप्त होतात. आता फक्त लढायचे नसून जिंकायचे,' असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी यावेळी व्यथा मांडली. 'साहेब मला तुमचे स्वागत करायचे होते. पण मी व्यासपीठावर तुमचे स्वागत करू शकलो नाही. व्यासपीठावर गर्दी असल्यामुळे मला पुढे येता आले नाही,' अशी तक्रार त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images