Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ट्रीप उशिरा आल्याने पालकांचा पारा चढला

$
0
0

औरंगाबाद ः सेंट झेव्हिअर्स शाळेतील सहावीच्या मुलांना घेऊन गेलेली ट्रीपची बस दिलेल्या वेळेच्या तब्बल तीन तास उशिरा आली. पाल्यांना सहलीसाठी घेऊन गेलेली बस वेळेत न आल्याने पालक संतापले.

सिडको एन-१मध्ये असलेल्या सेंट झेव्हिअर्स शाळेची गुरुवारी (४ फेब्रुवारी) रोजी सहल दौलताबाद येथे गेली होती. सहावीच्या अ, ब आणि क तुकडीचे विद्यार्थी सहलीला गेले होते. वेगवेगळ्या तुकडीसाठी स्वतंत्र बस होती. सकाळी गेलेली सहल सायंकाळी ५ वाजता शाळेत परत येणार होती. त्यावेळी पालक शाळेत जमा झाले, परंतु सहलीच्या बस वेळेत आल्या नाहीत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली. शाळेतील प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याने पालक संतापले. ब आणि क तुकडीच्या बस आल्या, परंतु अ तुकडीचे विद्यार्थी असलेली बस आठच्या सुमारास आली. त्यानंतर पालकांचा जीव

भांड्यात पडला. उशीर झाल्याने संतापलेल्या पालकांनी वाहनचालक, संबंधित शिक्षकांना जाब विचारला. बस बंद पडल्याने उशीर झाल्याचे पालकांना संबंधित शाळेकडून सांगण्यात आले. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापक पी. टी. जॉन्सन यांनी सांगितले की, घडलेल्या प्रकारात शाळेचा दोष नाही. वाहतूक कोंडी आणि बस बिघडल्याने उशीर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२६ लाख लिटरची टाकी वापराविना पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांच्या शिवाजीनगर वॉर्डामध्ये खूप गंभीर समस्या नसल्या तरी रस्ते, पाणी, विजेच्या सर्वसामान्य समस्या या वॉर्डामध्येही हमखास दिसतात. अनेक अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली असून, अनेक गल्ली-बोळांमध्ये अजूनही पक्के रस्तेच तयार नसल्याचेही स्पष्टपणे दिसून येते. काही ठिकाणी पाइप फुटले आहेत तर, सुमारे दशकापूर्वी बांधण्यात आलेली २६ लाख लिटर क्षमतेची पाण्याची मोठी टाकी चक्क वापराविना पडून आहे. त्याचवेळी उड्डाणपुल किंवा पर्यायी सोय नसल्याने शिवाजीनगर रेल्वेगेटजवळ रोजच हजारो नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे.

शिवाजीनगरमध्ये मुख्य रस्त्यांची सर्वसाधारण अवस्था फारशी खराब नाही, मात्र बहुतेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यातही काही अंतर्गत रस्त्यांची तर अगदी चाळणी झाली आहे. त्यामुळे एकीकडे धुळीचे लोट असतात तर, दुसरीकडे खराब रस्त्यांमुळे खडखडत-धडधडत जावे लागले. वर्षानुवर्षे हा त्रास कायम असल्याने रहिवासी वैतागून गेले आहेत. त्यातच नाथप्रांगणाकडे डावीकडून जात असताना, सुरुवातीलाच पाण्याचे नळ फुटले आहेत. त्यामुळे दर तिसऱ्या दिवशी चक्क टँकरभर पाणी वाया जाते. पाणी साचून या भागामध्ये चिखल होतो आणि त्यामुळे दुचाकी स्लिप होऊन नेहमीच अपघात होत आहेत. विशेष म्हणेज वाया जाणाऱ्या पाण्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. साधी दुरुस्तीदेखील केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नाथप्रांगणाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. रोजच्या रोज कचरा उचलला जात नाही आणि बऱ्याचवेळा घाण व कचरा दिसून येतो. नागरिकांच्या मते वॉर्डामध्ये अनेक ठिकाणी पालिकेकडून साफसफाई होत नाही.

साफसफाई झाली तरी वरवर होते. त्यामुळे स्वच्छ व चकाचक वॉर्डाचे स्वप्न कधी साध्य होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो. शिवाजीनगर रेल्वेगेटपासून थोड्या दूर अंतरावर २६ लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी किमान दशकापासून बांधून सज्ज आहे. लाखोंचा खर्च करून टाकी उभारण्यात आली खरी; परंतु त्याचा अद्याप वापरच सुरू झालेला नाही. या टाकीचा वापर सुरू झाल्यास संपूर्ण शिवाजीनगरला पाणी पुरवठा करणे सहज शक्य आहे, मात्र सद्यस्थितीत या टाकीच्या आसपास राहणाऱ्या अनेक वस्त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. रेल्वेगेटजवळ दिवसातून अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. यामध्ये दुचाकीस्वारांना नाहक त्रास भोगावा लागतो. याच वॉर्डात दोन दारुची दुकाने आहेत आणि त्याचाही नागरिकांना खूप त्रास होतो. अर्थात, अनेक ठिकाणी रस्त्यांची, पाईपलाईनची कामे सुरू झाल्याचे सकारात्मक चित्रदेखील नक्कीच आहे.

भारतनगरचा परिसर वगळता बहुतेक सर्व ठिकाणी पाणी मिळते. पाण्याच्या टाकीचा वापर सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी अलीकडे दिले आहे. त्यामुळे ही टाकी वापरात येणार आहे. शिवाजीनगर रेल्वेगेटजवळ भुयारी मार्ग तयार होणार आहे आणि त्यामुळे सगळा प्रश्न मिटेल. दोन-तीन महिन्यात काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. वॉर्डात दोन दारुची दुकाने आहेत. दारुमुक्त वॉर्डासाठी दोन हजार नागरिकांच्या सह्या घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर निवडणूक होऊन दारुमुक्त वॉर्डाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीत चार रस्त्यांची कामे सुरू आहेत. ड्रेनेजलाईनचे कामही सुरू आहे. पाण्याची पाइल लाइनची ६० टक्के कामे झाली आहेत.
- राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता

नाथप्रांगणकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या परिसरातील कचऱ्याची नियमित साफसफाई होत नाही. त्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. त्यातच झाडे नसल्याने हा परिसर रखरखीत झाला आहे.
- वसुधा वेलदे

नाथप्रांगणकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक पाइप फुटले आहेत आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी किमान दीड टँकर पाणी वाया जाते. पाणी साचते आणि चिखल होऊन अनेक अपघात होतात. तसेच खड्डेमय रस्त्याची समस्या वाढत आहे. याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
- विजय आसरानी

परिसराची साफसफाई होत नाही. परिसरातील दिवे कधी लागतात, तर कधी लागत नाही. कधी रात्री बंद, दिवसा सुरू असतात. २६ लाख लिटर पाण्याची टाकी कार्यरत झाली तर प्रत्येक वस्तीला पुरेसे पाणी मिळू शकेल.
- प्रदीप साळुंके

काही भागात पुरेसे पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्यांचाही प्रश्न गंभीर आहे. पाण्याची टाकी वापरात आणली तर संपूर्ण शिवाजीनगरला उपयोग होऊ शकेल. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- राजू परिहार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगचा निकाल वेळेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत जाहीर केले, असे अपवादानेच घडते. त्यात इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमाला तर ४५ दिवसांची कालमर्यादाच पाळली जात नाही. यंदा इंजिनीअरिंग परीक्षा मात्र याला अपवाद ठरली आहे. १४ दिवसांत प्रथम आणि अंतिम वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आणि निकाल जाहीर झाले. इतर वर्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आगामी सत्रापासून लांबणारे वेळापत्रकातील गॅपही कमी केला जाणार आहे.

इंजिनीअरिंगचे लांबणारे निकाल, रिड्रेसल प्रकरणांचा गोधळ यामुळे कायम विद्यार्थ्यांची फरफट होते. या सत्राने मात्र विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना तर सत्र सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी निकाल कळाला. या सत्रातील इंजिनीअरिंगच्या विविध वर्षाच्या परीक्षा १ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान झाल्या. यात प्रथम व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. द्वितीय आणि तृतीय वर्षातील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे. प्रथम आणि अंतिम वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया तर १४ दिवसांत पूर्ण करण्यात आली. यामुळे कधी नव्हे ते निकाल ४५ दिवसांच्या आत लागणार आहे. निकालाने दिलेला धक्का विद्यार्थ्यांसाठीही आश्चर्यकारक ठरला आहे.

या सत्रातील निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर होत आहेत. यामुळे मे-जूनच्या सत्रामध्येही याचा परिणाम दिसेल. सगळ्यांनी सहकार्य केले, निकाल वेळेत जाहीर होण्यास मदत व्हावी यासाठी शैक्षणिक सत्र आठ दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आणि उत्तरपत्रिकांची तपासणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली.
- प्रकाश तौर, समन्वयक, सेंट्रल अॅसेसमेंट सिस्टिम, विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिवेशनाची गरज काय?

$
0
0

खंडपीठाचा शिक्षक संघटनांना सवाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद खंडपीठाने विशेष नैमित्तिक रजा रद्द केल्याने शिक्षक संघटनांना दणका बसला आहे. २००८मध्ये औरंगाबाद खंडपीठाने अधिवेशनाची विशेष रजा किरकोळ रजा म्हणून संबोधण्यात येईल, असे एका याचिकेच्या निर्णयात स्पष्ट केले होते. अशा अधिवेशनाची गरज काय, असा सवाल कोर्टाने केला आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय त्रैवार्षिक अधिवेशन नवी मुंबईच्या पटनी मैदानात सुरू झाले आहे. या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकसेवक यांना सहा दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. चार ते स‌हा फेब्रुवारीदरम्यान हे अधिवेशन होणार असून, त्यासाठी एक ते सहा दिवसांची कमाल रजा या अधिवेशनासाठी मंजूर करण्यात आली आहे. या शासनाच्या २९ जानेवारीच्या निर्णयास पैठण तालुक्यातील पिंपळवाडीचे शिक्षक ज्ञानेश्वर अर्जूनराव कपटी यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्यास याचिकेत दुरुस्ती करण्यास कोर्टाने मान्यता दिली. शिक्षकांच्या अशा अधिवेशनास बंदी घालण्याची विनंती याचिकेत केली जाणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे संदीप सोनटक्के, अभिषेक देशपांडे यांनी बाजू मांडली. राज्य सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे हे काम पाहत आहेत. पुढील सुनावणी ११ फेब्रुवारीला होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याची रुंदी ४२ मीटरने घटवली!

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
औरंगाबाद ः वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेऊन देशभरात रस्त्यांची रुंदी वाढविण्याचे नियोजन केले जात असताना औरंगाबादेत मात्र ६० फुटी रस्त्याची रुंदी चक्क १८ फुटांपर्यंत कमी करण्याची करामत नगररचना खात्याने केली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्यानेही त्याला मंजुरी दिल्यामुळे ही रुंदी नेमकी कोणासाठी घटविण्यात आली, अशी चर्चा सुरू झाली आहे. सुधारित विकास आराखड्यात अशा अनेक करामती उघड होण्याची शक्यता आहे.

इटखेडा गट क्रमांक ६६ , ६७ मध्ये नाथ उद्योग समूहासह अन्य काही खासगी संस्था व व्यक्तींचे ले-आउट आहेत. या ले - आउटला परवानगी देताना महापालिकेने तो रस्ता ६० मीटर रुंदीचा गृहित धरला होता. आता नवीन विकास आराखड्यात रस्त्याची रुंदी घटवण्यात आल्यामुळे ले-आउट आणि रुंदी घटवण्यात आलेला रस्ता यात सुमारे एक लाख १८ हजार चौरस फूट मोकळी जागा शिल्लक राहिली आहे. या जागेवर डोळा ठेवून सुधारित विकास आराखड्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या चौकात येणाऱ्या तीन रस्त्यांची रुंदी सुधारित आराखड्यातही ६० फूट कायम ठेवण्यात आली आहे.

शहराचा सुधार‌ित आराखडा तयार करताना नगररचना विभागाने अनेक घोटाळे केले असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. १९९१मध्ये तयार करण्यात आलेल्या आराखड्यात इटखेडा येथील गट क्रमांक ६६, ६७मध्ये पैठण रोड ते गोलवाडी असा रस्ता ६० मीटर रुंदीचा दाखवण्यात आला. या रस्त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले. असे असताना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २००६-०७मध्ये एमआरटीपी कायद्यातील (१९६६) कलम ३७ नुसार या रस्त्याची रुंदी ६० मीटरवरून १८ मीटर करण्याचा निर्णय घेतला आणि तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला. दरम्यान, सुधारित विकास आराखड्याचे काम सुरू झाले आणि नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी ३० ऑक्टोबर २०१५ रोजी तो पालिकेच्या आयुक्तांना सादर केला. शासनाकडे सात वर्षे पडून असलेल्या प्रस्तावाला नोव्हेंबर २०१५मध्ये अचानक मंजुरी देण्यात आली.

शासनाची मंजुरी मिळण्यापूर्वी विकास आराखड्यातील रस्त्याची रुंदी कशी कमी करण्यात आली, हा साक्षात्कार कुणाला आणि कसा झाला, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

अचानक मंजुरी कशी?
सर्वसाधारण सभेने रस्त्याची रुंदी तब्बल ४२ मीटरने कमी करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे २००६-०७ मध्ये पाठवला. तो सात वर्षे शासन दरबारी पडून राहिला. सुधारित विकास आराखडा ऑक्टोबर २०१५मध्ये दाखल झाल्यावर नोव्हेंबरमध्ये शासनाने रस्त्याची रुंदी कमी करण्यास मंजूरी कशी दिली, शासनाच्या मंजुरीपूर्वीच सुधारित विकास आराखड्याच्या नकाशात रस्त्याची रुंदी कमी कशी करण्यात आली, कोणी केली, हा निर्णय कोणाच्या फायद्यासाठी घेण्यात आला, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांसविक्री दुकाने हटवली; चौघांना अटक

$
0
0



औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या जवळची मांसविक्रीची दुकाने महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी हटवली. दुकानील मांस जप्त करून चौघांना अटक केली.
रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ उघड्यावर होत असलेल्या मांसविक्रीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे वृत्त 'मटा' ने शुक्रवारच्याच अंकात प्रसिध्द केले होते. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवरून बीडबायपास रस्त्याकडे जाताना रस्त्याच्या दोन्हीही बाजूने उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांची दुकाने थाटलेली होती. रेल्वे येताना क्रॉसिंगचे गेट बंद केले जाते आणि रेल्वे जाईपर्यंत गेट उघडले जात नाही, त्यामुळे वाहनचालाकंना किमान दहा मिनिटे या ठिकाणी उभे रहावे लागते. रस्त्याच्या दोन्हीही बाजूने असणाऱ्या मांसविक्रीच्या दुकानात सर्रास उघड्यावर जनावरांची कत्तल करून त्याची विक्री केली जाते. उभ्या असलेल्या वाहनचालकांच्या समोर हा किळसवाणा प्रकार घडतो. या बद्दल 'मटा' ने वृत्त प्रसिध्द केल्यावर शिवाजीनगर वॉर्डाचे नगरसेवक व महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी पशूसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना त्या दुकानदारांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डॉ. नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे पथक आले आणि त्या पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुरू असलेली मांस विक्रीची दुकाने बंद केली. दुकानांमधील मांस जप्त केले व चार जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. तीनजण घटनास्थळावरून पळून गेले.
दुकाने पुन्हा थाटली
उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेच्या पथकाने सायंकाळी ५.३० च्या सुमारास कारवाई करून दुकाने बंद पाडली आणि पालिकेचे पथक निघून गेले. पथक गेल्यावर रात्री ८ च्या सुमारास ही दुकाने पुन्हा थाटण्यात आली. या संदर्भात शिवाजीनगर भागातील नागरिकांनी 'मटा'शी संपर्क साधून माहिती दिली. पालिकेच्या पथकाची कारवाई दिखाऊ होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवला पाहिजे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. पंडित
दिनदयाल उपाध्याय सेवा प्रतिष्ठान नांदेडतर्फे आयोजित बिलोली तालुक्यातील पाचपिंपळी येथे 'सेंद्रिय शेती प्रमाणिकरण योजना, प्रबोधन व उपलब्धता' या विषयावरील कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बागडे हे बोलत होते.
पाचपिंपळी येथील प्रा. माधवराव गोपछडे यांच्या शिवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, भारतीय किसान संघाचे दादा लाड, राम पाटील रातोळीकर, प्रा. माधव गोपछडे, धनाजी देशमुख, डॉ. अजित गोपछडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, उपविभागीय कृषी अधिकारी एम. टी. गोंडेस्वार,
गटविकास अधिकारी देशमुख, उपसरपंच लक्ष्मण कोत्तापल्ले, विठ्ठलराव उपासे, श्रावण भिंलवडे, बालाजी बच्चेवार, हानगीराव गोपछडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बागडे म्हणाले, 'मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बिकट परिस्थितीतून जाताना पुढे सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. दुष्काळी परिस्थितीत अशा अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार नेहमी
मदत करत आहे. गतवर्षात शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतही देऊ केली आहे. पाऊस नसल्यामुळे अन्न धान्य पिकले नाही. त्यामुळे शेतकरी उपाशी राहू नये यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, मजूरांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून कमीतकमी दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांसाठी कमी दरात खतही उपलब्ध करून दिले आहे. लिंबोळी कोटींगयुक्त खत पुरवठाही केला जाणार आहे. ज्यामुळे २० ते २५ टक्के युरिया खत पिकासाठी कमी लागणार आहे. लिंबोळीचे खत हे पिकांसाठी चांगले असून त्यामुळे पिक चांगले राहते व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. दुष्काळ, गरिबी, टंचाईचे ओझ कमी करायचे असेल तर शेती पिकली पाहिजे.'
निसर्ग आता असंतूलीत झाला असून पावसाची हमी राहिली नाही. वर्षाकाठीचा
पावसाचा प्रत्येक थेंब हा वाचवता आला पाहिजे, असे सांगून विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, 'शेतकऱ्यांनी आपल्या विहिरी शेताच्या उतारावरच केल्या पाहिजे. विहिरीजवळ पाच ते दहा फूट अंतरावर खड्डा खोदून पावसाचा प्रत्येक थेंब त्यात झिरवला पाहिजे. पावसाचे झिरपलेले पाणी हे विहिरीत उतरते, त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. दुष्काळ परिस्थितीत विहिरीचे पाणी पिकांसाठी उपयोगात आणता येते. यातून शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन चांगले मिळू शकते. मनरेगातून विहीर पूनर्भरणाच्या कामासाठी सरकार निधी उपलब्ध करून देते याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. या कामांसाठी ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांनी मागणी करावी. या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनातून आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. वर्षाचे पिक चांगले हातात पडले तर शेतकरी सुखी राहील.'
सुरुवातीला माता सरस्वती व पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरस्वती प्रतिष्ठान आयोजित ठक्करवाड फॉर्महाऊस येथील गौशाळेचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. तळणी परिसरातील नाला सरळीकरणाच्या कामाची बागडे यांनी पाहणी केली. कार्यशाळेस कोल्हे बोरगाव, पाचपिंपळी, तळणी, लोहगाव, गागलेगाव, तोरणा, कुंभरगाव, दुगाव, हरनाळा, मुस्तापूर व परिसरातील शेतकरी, नागरीक आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन मुकुंद उपासे यांनी केली. ग्रामपंचायत सदस्य नागोराव अंबेराव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरडवाहू फळबागांचा शेतकऱ्यांना विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असूनही शेतकरी अधिक पाणी लागणाऱ्या फळपिकांची लागवड करीत आहेत. या तुलनेत दुष्काळात टिकणारी व अधिक उत्पन्नाच्या फळपिकांची लागवड ठप्प आहे. बिबा, कवठ, सीताफळ, जांभूळ, रामफळ या फळबागांच्या लागवडीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे; मात्र, शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने कोरडवाहू फळपिकांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
मागील तीन वर्षांपासून मराठवाड्यात जेमतेम पाऊस झाला. परिणामी, शेततळे, विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. पिकांच्या सिंचनासाठी पाणी नसल्याने बिकट परिस्थिती आहे. विशेषतः मोसंबी व डाळिंबाच्या फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणी टंचाई असूनही उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत कमी पाण्याच्या फळबागांकडे शेतकऱ्यांना वळण्यासाठी परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून औरंगाबाद येथील हिमायतबाग फळबाग संशोधन केंद्रात विशेष संशोधन करण्यात आले. हिमायतबागेत दोन एकर कवठ व दोन एकरवर बिबा लागवड करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसाठी रोपवाटिकेत जांभूळ, कवठ, बिबा, सीताफळ, रामफळ या फळांची रोपे उपलब्ध असतात; मात्र शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने कोरडवाहू फळबागांचे क्षेत्र वाढवण्यात अपयश येत आहे. हलकी, मुरमाड, मध्यम प्रतीची, डोंगर उताराची जमीन आणि माळरानावरही या फळझाडांची लागवड शक्य असते. उष्ण व कोरड्या हवामानात दर्जेदार फळांचे उत्पादन निघते. डोंगराळ भागातील बिब्याच्या एका फळझाडापासून ४० ते ५० किलो बी, ३५ ते ४० किलो फुले आणि १० ते १५ किलोग्रॅम गोडंबी निघते. सुकामेव्यात गोडंबीला विशेष मागणी असते. शेतकऱ्याला प्रतिएकर ६० हजार रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न बिबा फळपिकातून मिळते. तसेच बिब्याच्या तेलाचा आयुर्वेदिक वापर होतो. कवठाला दक्षिण भारतात विशेष मागणी आहे. लोणची, चटणी आणि औषधीसाठी कवठ वापरतात. या फळपिकापासूनही एकरी ५० हजार रूपये उत्त्पन मिळते. हिमायतबाग फळ संशोधन केंद्राने कवठाची 'एलोरा' जात संशोधित केली आहे. चिंच, जांभूळ, सीताफळ व रामफळ ही कोरड्या हवामानात येणारी फळपिके शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना अधिक पाणी लागणाऱ्या फळपिकांपासून फारसा फायदा नाही; मात्र, कोरड्या हवामानातील फळपिके अधिक उत्पन्न देऊ शकतील असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले.

निर्यातक्षम फळ
कोरडवाहू फळबागांना अत्यल्प खर्च असल्यामुळे मोजकेच शेतकरी लागवड करीत आहेत. विशेषतः जांभूळ पिकाला प्राधान्य देत आहेत. या फळबागांमध्ये अधिक जमीन गुंतवण्यापेक्षा बांधावर व नापीक जमिनीत फळझाडांची लागवड करणे सहजशक्य आहे. तसेच चांगल्या जमिनीत फळबागेत आंतरपीक घेता येते. अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार जांभळाचे उत्पादन काढून निर्यात केली आहे. इतर भागातील शेतकऱ्यांनीही कोरडवाहू फळबागांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोसंबी, डाळिंब या फळबागांपेक्षा कोरडवाहू जमिनीत येणारी फळपिके मराठवाड्यात फायदेशीर ठरू शकतील असा कृषीतज्ज्ञांचा दावा आहे.

मोसंबी व डाळिंब फळबाग लागवड प्रत्येक भागात शक्य नाही. शेतकऱ्यांनी चिंच, जांभूळ, कवठ, बिबा, सीताफळ, रामफळ या फळबागांना प्राधान्य दिले पाहिजे. या फळबागा कोरडवाहू शेतीसाठी वरदान आहेत. शेतकऱ्यांनी मानसिकता बदलल्यास कोरडवाहू फळबागातून चांगले उत्पन्न मिळेल.

- डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हिमायतबाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी कर्मचाऱ्यांचे मंगळवारी आंदोलन

$
0
0

औरंगाबादः रिक्त पदे तात्काळ भरा, यासह पेन्शन, महागाई भत्त्याचा प्रश्न आदी प्रश्‍नांबाबत सरकारच्या वेळकाढू धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी मंगळवारी राज्यातील सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत असून शासनासोबत चर्चा झाली. पण, शासनाने निर्णय घेतला नाही. जुलै २०१५ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ६ टक्‍के महागाई भत्ता देण्याची मागणी आता मान्य केली. पण, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्तपदे तत्काळ भरा, निवृत्तीचे वय ६० करावे, कंत्राटी, नैमित्तिक कर्मचारी, परिचारिकांना सेवेत कायम करावे, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर मोका कायद्याखाली कारवाई करावी, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी या मागण्यांवर निर्णय घेतले जात नाहीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण, विभागीय उपाध्यक्ष सतीश तुपे, जिल्हाध्यक्ष देविदास जरारे, सरचिटणीस एन. एस. कांबळे, कोषाध्यक्ष वैजिनाथ विघोतेकर, काशिनाथ बिरकलवाड, अशोक दराडे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लोधे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पे अँड पार्क’च्या नावाखाली होणारी लूट थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
शहरात 'पे अॅँड पार्क'च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात येत आहे. ही वसूली तत्काळ थांबवण्यात यावी आणि लातूरकरांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. नागेशकुमार माने, संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. लातूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावाखाली लातूर महानगर पालिकेने 'पे अँड पार्क'ची जबाबदारी काही खासगी संस्थांना दिली आहे. हे करत असताना लातूर महानगरपालिकेस स्वताच्या काही जबाबदारीचा विसर पडलेला दिसत आहे. लातूर पालिकेच्यावतीने शहरात पार्किंग व्यवस्थेसाठी कुठेही वाहनतळ उभारण्यात आलेले नाही. शहरातील पार्किंगचा झोन, नो पार्किंगच्या झोनची जाहिरात करण्यात आलेली नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर, चौकाचौकात पार्किंग बाबत पिवळी पट्टे, पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसींग, दिशादर्शक पट्टे त्याचबरोबर पार्किंग, नोपार्किंग दर सुची, नियम दर्शविणारे सुचना फलक कुठेही लावण्यात आलेले नाहीत. शहराचा पार्किंग प्लॅन अद्याप जाहीर झालेला नाही. त्याही पुढे जाऊन ज्या खासगी संस्थांना 'पे अॅँड पार्किंग'ची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडे पालिका प्रमाणित ओळखपत्र दिसून येत नाही. सदर संस्था व त्यांनी नियुक्त केलेले कर्मचारी लातूरकर वाहनधारकांशी दादागिरीचा अवलंब करीत आहेत. ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क, दंड वसूल करीत असल्याचा व महिन्याचा 'पे अॅँड पार्क' पास नावाखाली चारचाकी वाहन चालकांची लूट करीत आहेत, अशा अनेक तक्रारी नागरीकांकडून येत आहेत. सदर संस्था व त्यांनी नियुक्त केलेले कर्मचारी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिस प्रशासनामार्फत तपासणे आवश्यक आहे.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता चाळक, अभय साळुंके, महानगरप्रमुख रवी सुडे, नामदेव चाळक, अ‍ॅड. अभय खानापुरे, गोरोबा गाडेकर, विष्णूपंत साठे, सुनील बसपुरे, त्रिंबक स्वामी, प्रल्हाद पाटील, रमेश माळी, कालीदास मेटे, दिनेश बोरा, प्रकाश हैबतपुरे, सुरज झुंजे, दीपक प्रयाग, शंकर रांजणकर, महेश साळुंके, संतोष पाटील, खंडू जगताप, सुधीर केंद्रे, तानाजी करपुरे, कालीदास मेटे, अनिल शिंदे, सदाशिव गव्हाणे, प्रकाश संदीकर, कृष्णा चेबळे, मारुती सावंत, बंटी बिसेन, राकेश डोंगरे, राहूल मातोळकर, रवी पिचारे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

अन्यथा जनआंदोलन करणार
लातूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. मात्र, या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांना हाताशी धरुन 'पे अँड पार्क'च्या निमित्ताने लातूर शहरात चालू असणारी दादागिरी आणि लूट तत्काळ थांबवण्यात यावी. अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

$
0
0

अकरा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील ११ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून शुक्रवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश विभागीय आयुक्तालयास प्राप्त झाले. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी स्वाती कारले, पांडुरंग कुलकर्णी, विश्वंभर गावंडे यांचा बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.
नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारीपदी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे. जालन्याच्या उपजिल्हाधिकारी शोभा ठाकूर यांची बदली औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारीपदी झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांची बदली नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक म्हणून औरंगाबादेतील रजिस्ट्री कार्यालयात झाली आहे. त्यांच्या जागेवर लातूरचे विश्‍वंभर गावंडे रुजू होतील. औरंगाबादच्या पुनर्वसन उपजिल्हाधिकारी स्वाती कारले यांची बदली ठाणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) नोंदणी अधिकारीपदी तर, अंबाजोगईचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांची बदली मुंबई येथे एसआरए नोंदणी अधिकारीपदी झाली आहे. उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांची बदली पैठणच्या मराठवाडा प्रबोधिनीत, नांदेडच्या सुप्रिया करमरकर यांची बदली पुणे येथे नोंदणी उपमहानिरीक्षकपदी, प्रवीण फुलारी यांची बदली अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारीपदी, तर हिंगोलीचे संतोष देशमुख यांची बदली ठाणे एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायब तहसीलदारांचे अर्थमंत्र्यांना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग दोन अधिकारी पदाचा दर्जा देण्यात आला, मात्र त्यादर्जानूसार वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही. ही वेतनश्रेणी त्वरित देण्यात यावी, अशी मागणी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले.
नियोजन आढाव बैठकीसाठी बुधवारी मंत्री मुनगंटीवार शहरात आले होते. त्याप्रसंगी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय राऊत, डी. एम. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. नायब तहसीलदारांना १३ नोव्हेंबर १९९८ च्या शासन निर्णयाप्रमाणे राजपत्रित वर्ग दोन अधिकारीपदाचा दर्जा दिला गेला. त्यावेळी नायब तहसीलदार ५ हजार ५०० हे वेतनश्रेणीत होते तर, इतर समकक्ष अधिकारी ६ हजार ५०० या वेतनश्रेणीत होते. सहाव्या वेतन आयोगातही राजपत्रित वर्ग दोन मधील इतर समकक्ष अधिकारी यांना ४ हजार ६०० ग्रेड वेतन देण्यात आले, नायब तहसीलदारांना ४ हजार ३०० ग्रेड वेतन देय करण्यात आले. यासंदर्भात संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. तसेच हकीम समितीसमोर साक्ष देवून ४ हजार ६०० ग्रेड वेतन देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सरकारने ग्रेड वेतन देण्यास टाळाटाळ केली. पूर्वलक्षी प्रभावाने प्रलंबित ग्रेड वेतनाची मागणी प्रशासकीय बाब समजून तत्काळ निकाली काढावी, अशी मागणी मंत्र्यांकडे केली आहे. यावेळी तहसीलदार विजय राऊत, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे, नरेंद्र कुलकर्णी, महसूल कर्मचारी संघटनेचे महेंद्र गिरमे, अरविंद धोंगडे, संतोष अनर्थे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅप इंडियाचे मुंबईत प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादेतील प्लास्टिक, केमिकल तसेच पेपर उद्योजकांना परदेशात निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे. कॅप इंडियाच्या वतीने शुक्रवारी स्थानिक उद्योजकांसाठी झालेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. मार्च महिन्यात मुंबईत तीन दिवसाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
देशभरातील प्लास्टिक, पेपर तसेच केमिकल उद्योगांना व्यवसायाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने वाणिज्य मंत्रालयाच्या सहकार्याने कॅप इंडिया ही संस्था कार्यरत आहेत. चार कौन्सिलचे एकत्रिकरण करून ही संस्था देशभरात विविध उपक्रम राबवित असते. या संस्थेच्या वतीने २० ते २२ मार्च दरम्यान मुंबईतील गोरेगाव येथे एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यात महाराष्ट्रातील प्लास्टिक, केमिकल तसेच पेपर उद्योगांचा सहभाग असणार आहे. देशविदेशात व्यवसायाच्या संधी, नवीन आव्हाने तसेच भविष्यातील योजनांची साधकबाधक चर्चा, मार्गदर्शन या प्रदर्शनातून होणार आहे.
प्लास्टिक्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे कार्यकारी संचालक आर.पी. कल्याणपूर, सहायक संचालक मुकेश बिश्त, कार्यकारी अनघा बर्वे, वरिष्ठ एक्जिकेटिव्ह अलका लोपेस यांच्यासह एमएसएमईचे उपसंचालक अशोक कुमार यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. मुंबईतील प्रदर्शनात परदेशातून १२५ खरेदीदार सहभागी होणार आहेत. ज्यामुळे राज्यातील उद्योजकांना परदेशात व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, असे कल्याणपूर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा दाखल आरटीओत टाळाटाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जबाबदारी नसताना फिटनेस प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात परिवहन आयुक्तांनी आरटीओ विभागाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाप्रमाणे संबंधित मोटार वाहन निरीक्षकांवर शुक्रवारीही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली.
औरंगाबाद आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक संजय संख्ये यांना डिसेंबरमध्ये फ्लाईंग स्क्वॉडचे काम देण्यात आले होते. गाड्यांचे फिटनेस तपासणी करण्याची जबाबदारी नसतानाही त्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात फिटेनस प्रमाणपत्र देण्याचा धडाकाच लावला. फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी वाहनाची ब्रेक तपासणी तसेच अन्य आवश्यक बाबी तपासण्यीच गरज असते. परंतु, संख्ये यांनी फक्त कागदपत्रांच्या आधारे फिटनेस प्रमाणपत्र दिल्याची माहिती उघड झाली. याप्रकरणी आरटीओमार्फथ चौकशी करून मुंबई येथे मुख्य परिवहन आयुक्तांना अहवाल पाठविण्यात आला.
या अहवालानंतर अखेर गुरुवारी मुख्य परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी संख्ये याला निलंबित करण्याचे आदेश दि. या आदेशासोबत संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे बजावण्यात आले आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सहाय्यक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्याकडे दिली. संबंधित अधिकाऱ्यांने गुन्हा दाखल केला नाही तर, त्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचीही सूचना देण्यात आली आहे. परंतु, परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतरही २४ तास उलटले आहेत. त्यानंतरही पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
संख्ये यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आलेले आहेत. या आदेशाप्रमाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, ज्या एजंटांनी संख्ये यांच्याकडून काम करून घेतले आहेत. त्या एजंटांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यामुळे आरटीओ एजंटामध्ये दहशत पसरलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हप्ता देण्यास नकार; २६ हजार लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हप्ता देण्यास नकार दिल्याने हॉटेलचालकाची सोनसाखळी व रोख हजार रुपये लुबाडण्यात आले. गुरूवारी दुपारी दोन वाजता आझाद कॉलेज जवळील नॅशनल कॉलनी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महमद उमर महमद याकुब शेख (वय ३० रा. कमन मंजिल, नॅशनल कॉलनी) याचे घराजवळ हॉटेल आहे. गुरूवारी दुपारी दोन वाजता उमर हॉटेलवर बसलेला होता. यावेळी संयशित आरोपी शोएब व त्याचे तीन साथीदार हॉटेलमध्ये आले. या चौघांनी उमरला हप्ता मागितला. उमरने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करीत गल्ल्यातील हजार रुपये व गळ्यातील पंचवीस हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून घेतली. या प्रकरणी उमरने दिलेल्या तक्रारीवरून शोएब व तीन आरोपीविरुद्ध जबरीचोरी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्वेलर्सचे दुकान फोडून ८२ हजाराचा माल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाण्यातील माऊली ज्वेलर्स शॉपी फोडून चोरट्यांनी ८२ हजाराचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रमेशचंद्र बागडे (वय ३६ रा. चिश्तिया कॉलनी) यांचे चिकलठाण्यात माऊली ज्वेलर्स हे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता बागडे दुकान बंद करून घरी गेले होते. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले. यावेळी त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आढळून आले. हा प्रकार त्यांनी पोलिसांना कळवला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने तसेच रोख साडेसहा हजार रुपये, असा ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमध्येच मिळणार सॅनेटरी नॅपकिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
येथील हायटेक इंजिनीअरिंग कॉलेजच्या व्यवस्थापनाने वसतिगृह व कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवले आहे. या मशीनमधून फक्त पाच रुपयांत एक नॅपकिन मिळणार आहे. यामुळे विद्यार्थिनींची मोठी सोय झाली आहे.
कॉलेजमधील विद्यार्थिनींना आतापर्यंत मेडिकल स्टोअरमधून सॅनेटरी नॅपकिन खरेदी करावे लागत होते. विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींची रात्री-रात्री गैरसोय होत होती. याचा विचार करून कॉलेज व्यवस्थापनाने कॉलेज व वसतिगृहात व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. व्यवस्थापनातर्फे कॉलेजमध्ये एक व वसतिगृहात तीन मशीन बसवल्या आहेत. या मशीनमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक नॅपकिन मिळते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींनी चिंता करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले. कॉलेजतर्फे बसवण्यात आलेल्या या मशीनचे पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा देगलूकर, डॉ. कोंडकर, सामाजिक कार्यकर्त्या मीरा पाटील, मीना राठोड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रा. एम. डी. कडू, प्रा. प्रियका बोरनारे, ए. डी. डिग्गीकर, एस. एन. सांगवीकर, पी. पी. चिंतावार आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीची १२ वर्षांपासून प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
पडेगाव ते भावसिंगपुरा हा तीन किलोमिटरच्या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाची नागरिकांना १२ वर्षांपासून प्रतिक्षा आहे. हा रस्ता उत्तम दर्जाच्या केल्यास हा रस्ता नगरनाका मार्गावर होणारा वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
पडेगाव येथील हनुमान मंदिर ते भावसिंगपुरा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, महापालिकेचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. या भागातील नगरसेवक दर पाच वर्षांनी रस्ता तयार करण्याचे आश्वासन देतात. मात्र, गेल्या १२ वर्षात एकाही नगरसेवकाने आश्वासन पाळलेले नाही. निवडणुकीनंतर या रस्त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. नगरसेवक व लोकप्रतिनिधी जबाबदारी पार पाडत नसतील तर, राजीनामा द्यावा, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. या रस्त्याचा प्रश्न सभागृहातही मांडत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
या भागात रस्त्याने नियमित ये जा करणारांची संख्या सुमारे सात हजार आहे. या रस्त्यावर निसर्ग आहिंसानगर, कासंबरी दर्गाह परिसर, राजधानीनगर, गणेशनगर, भावसिंगपुरा, पेठेनगर, ग्लोरिया पार्क, पडेगाव येथील नागरिक अवलंबून आहेत.
या रस्त्याची १९९८ मध्ये रुख्मिणबाई लोखंडे नगरसेवक असताना डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर कुठलीच कामे करण्यात आली नाही, असे अनिस पठाण यांनी सांगितले. 'नगरसेवक सुभाष शेजवळ यांना विचारले असता माझे कोणीही ऐकत नाही; मी सभापती असूनही कामे होत नाही मी काय करू,असे उत्तर देतात. नगरसेवकच असे म्हणत असतील तर, नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी,' असा प्रश्न रफिक खान यांनी उपस्थित केला.

शेकडो लोकांची रहदारी असलेल्या या तीन किलोमिटरच्या रस्त्यावरून महिलांना प्रसुतीसाठी नेतानाही मोठा त्रास होतो. वृद्धांना नीट पायी चालता येत नाही. एक वृद्ध रस्त्यावरील खड्ड्यामुळे गुरुवारी पाय मुडपून पडले, त्यांच्या गुडघ्याचे हाड मोडले आहे. याला जबाबदार असणारे अधिकारी व मनपा आयुक्तांवर गुन्हे दाखल करावेत.
-किरण लोखंडे, नागरिक

आरोग्य विभागाचे शासकीय मुलींचे वसतिगृह, मनपाचे स्लाटर हाउस, पॉवर हाउस, गोळीबार मैदान आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. तरीही रस्ता दुरुस्ती होत नसेल तर, लोकशाही मार्गाने आंदोलन करू.
चंद्रकांत बनकर, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थानिक वर्तुळातील आंतरराष्ट्रीय महोत्सव

$
0
0

tushar.bodkhe@timesgroup.com
ग्लोबल सिनेमा, इंडियन सिनेमा आणि मराठी सिनेमा अशा तीन गटात वैविध्यपूर्ण चित्रपट दाखवून तिसरा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपला. सतत तीन वर्षे महोत्सव भरल्यामुळे जाणकार रसिकांचा आनंद निश्चितच वाढला; मात्र, महोत्सवाला आंतरराष्ट्रीय दर्जाची किनार लाभली नाही. औरंगाबाद शहराचे सांस्कृतिक वातावरण पूर्णतः भिन्न आहे. पणजी, मुंबई, पुणे या शहरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. या शहरातील महोत्सव खरेच 'आंतरराष्ट्रीय' दर्जाचे असतात. किंबहूना महोत्सवांचा उच्च दर्जा राखला गेला आहे. पुणे शहरात मागील पाच-सात वर्षात फिल्म फेस्टिव्हलची 'क्रेझ' वाढताच महाराष्ट्रातील इतर शहरातही महोत्सव भरवले जात आहेत. गावोगावी व गल्लीबोळात 'इंटरनॅशनल' शॉर्टफिल्म फेस्टिव्हल भरतात. सामान्य पातळी व सुमार दर्जाच्या शॉर्टफिल्मलाही अशा फेस्टिव्हलमध्ये पुरस्काराची बाहुली मिळते. बाहुलीचा गाजावाजा नंतर चार-दोन वर्षे होतो. याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पीक उगवण्याची भीती अधिक आहे. केवळ महोत्सव भरवण्याची घाई असल्यामुळे त्यांचा दर्जा तपासण्याकडे नेहमी दुर्लक्ष होते. या गोष्टीची प्रचिती औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमधील सिनेमे व नियोजन पाहिल्यानंतर येते. तीन दिवस तीस चित्रपट पाहण्यासाठी मोजक्याच प्रेक्षकांची उपस्थिती होती. केवळ शनिवार, रविवारी मराठी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी झाली. एरवी मराठी चित्रपट कधीही पाहता येईल. पण, ऑस्ट्रिया, मेक्सिको, नॉर्वे, पोलंड, इटली या देशातील चित्रपट पाहण्याची संधी दुर्मिळ असते. विशेषतः हॉलीवूडमधील अॅक्शन चित्रपट भारतात सहजतेने प्रदर्शित होतात व वेगळे कथामूल्य असलेले चित्रपट प्रदर्शित होत नाही. चांगल्या चित्रपटांची भारतीय जाणकार प्रेक्षकालाही माहिती नसते. अशा चित्रपटांचा महोत्सवात आनंद घेणे प्रेक्षकांची प्राथमिकता हवी. या महोत्सवात नेमके उलटे चित्र दिसले. लोकप्रिय व प्रेक्षकानुनय करणारे चित्रपट पाहण्यासाठीच प्रेक्षकांची झुंबड उडाली. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असून फेस्टिव्हल संयोजकांना पुढील वर्षी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अभिरूचीसंपन्न चित्रपटांचा आस्वाद घेणारा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग घडवण्यासाठी चित्रपट समीक्षक व अभ्यासकांची कार्यशाळा घ्यावी लागेल. औरंगाबाद शहराची पंधरा लाख लोकसंख्या पाहता चित्रपट महोत्सवाला किमान चार-पाच हजार प्रेक्षक येणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने ही संख्या अजूनतरी पाचशेच्या पुढे सरकली नाही. चित्रपट माध्यमाची भाषा व त्यांची हाताळणी समजावून 'चित्रपट साक्षर' प्रेक्षक तयार करणे क्रमप्राप्त आहे. पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये विदेशी चित्रपट पाहिल्यानंतर कलाकार व दिग्दर्शकांशी संवाद साधण्याची प्रेक्षकांना संधी असते. चाकोरीबाह्य मराठी चित्रपटांचे कलाकार व दिग्दर्शकही महोत्सवाला उपस्थित असतात. औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलला दुय्यम मानले गेल्यामुळे विदेशी आणि मराठी असे कोणतेच कलाकार नसतात. यंदा 'रंगा पतंगा' चित्रपट प्रदर्शनाला अभिनेता मकरंद अनासपुरे, संदीप पाठक व दिग्दर्शक प्रसाद नामजोशी उपस्थित होते. एवढाच काय तो अपवाद. अन्यथा, महोत्सवाला कुणीच उपस्थित नसते. पुण्यातील संयोजन टीमचा स्थानिक प्रेक्षक व जाणकारांशी सुसंवाद नसतो. एखादा सांस्कृतिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता असते. ही दरी कायम राहिल्यास महोत्सव व्यापक करण्याला मर्यादा येतील. पुणे फिल्म फेस्टिव्हलला दर्जाचे परिमाण मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, समीक्षक समर नखाते यांनी औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हला गांभीर्याने घेतले पाहिजे. केवळ पहिल्या दिवशी सेलिब्रिटीसोबत येऊन पटेल यांनी काढता पाय घेतला. महोत्सवाच्या पुढील दिवसांच्या 'फिडबॅक'शिवाय ते परतले. महोत्सवातील चित्रपट निवडीचे नेमके निकष प्रेक्षकांना माहिती नाहीत. कारण इतर फिल्म फेस्टिव्हल गाजवणाऱ्या फिल्म्स औरंगाबादमध्ये नव्हत्या. काही जुन्या व साधारण दर्जाच्या फिल्म्स दाखवून आंतरराष्ट्रीय महोत्सव भासवण्याचा संयोजकांचा खटाटोप दिसला. 'आक्रंदन', 'अनुराग', 'भो भो' असे मराठी चित्रपट दाखवण्याचे प्रयोजनही कळले नाही. औरंगाबादच्या प्रेक्षकांना अद्याप प्रदर्शित न झालेले चित्रपट दाखवून खूप वेगळा उपक्रम राबवत असल्याची संयोजकांची समजूत असावी; मात्र साधारण दर्जाच्या मराठी चित्रपटांबाबत प्रेक्षक फारसे उत्सुक नसतात. पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये परीक्षकांच्या मतानुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार प्रदान केले जातात. या माध्यातून संबंधित फेस्टिव्हलचा दर्जा आणखी उंचावतो. औरंगाबाद शहरातही पुरस्काराचा पायंडा पडला पाहिजे. सध्या मराठवाड्यातील तरूण दिग्दर्शक मोठ्या संख्येने शॉर्टफिल्म निर्मिती करतात. बहुतेक शॉर्टफिल्म निव्वळ हौसेचा मामला असला तरी काही शॉर्टफिल्म दर्जेदार असतात. या निवडक शॉर्टफिल्म्स दाखवून भावी दिग्दर्शक घडवण्याची जबाबदारी फिल्म फेस्टिव्हलने घेतली पाहिजे. तरच महोत्सव यशस्वी ठरला असे म्हणता येईल. पुढील वर्षी सात दिवस फेस्टिव्हल घेऊ अशी घोषणा संयोजकांनी केली आहे. ही घोषणा प्रत्यक्षात येवो आणि महोत्सवातील त्रुटी दूर होतील अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्या रद्द करण्यासाठी धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्राथमिक शिक्षक संघाच्या वार्षिक अधिवेशनासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ८००हून अधिक शिक्षक जाण्याचे निश्चित झाले होते, मात्र अधिवेशनासाठी ऑन ड्यूटी रजा देण्याच्या सरकारच्या निर्णयास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर शुक्रवारी अनेक शिक्षक शाळेवर परतले. काही शिक्षकांकडून सुट्या रद्द करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

राज्य सरकारकडून मान्यताप्राप्त शिक्षक संघटनांच्या वार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना ऑन ड्यूटी सुटी दिली जाते. प्राथमिक शिक्षक संघाच्या मुंबईतील अधिवेशनासाठी सरकारने ऑन ड्यूटी सुटी दिली. त्यासाठी जिल्हाभरातून ८०० शिक्षक जाण्याची अपेक्षा होती. औरंगाबाद तालुक्यातून १६५, फुलंब्री १०९ , गंगापूर तालुक्यातून २०० शिक्षकांची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून मिळाली. याशिवाय उर्वरित सहा तालुक्यांतील अंदाजे आकडा गृहित धरला तर ८००हून अधिक शिक्षकांना अधिवेशनासाठी विशेष नैमित्तिक रजा घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशनासाठी तात्पुरत्या स्वरुपात काही शिक्षकांनी सदस्यत्व स्वीकारले होते. चार ते सहा फेब्रुवारीच्या अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणावर रजा टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी जवळपास दोन हजार शिक्षकांनी रजा टाकली असल्याचे बोलले जात आहे. अधिवेशनासाठी सर्व खासगी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिक्षण सेवकांना राज्य सरकारने प्रवासाच्या दिवसासहित सहा दिवसांची विशेष

नैमित्तिक रजा मंजूर केली, याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही रजा किरकोळ रजा म्हणून ग्राह्य धरावी, असे आदेश दिल्यानंतर अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षक

शाळेवर परतण्यास सुरवात झाली. जे शिक्षक दोन दिवस सुटीवर होते त्यांनी आपल्या सुटीच्या काळातील किरकोळ रजा दाखवून पुन्हा शाळेत येणे पसंत केले तर, काही शिक्षक पर्यटनावर गेल्यामुळे त्यांची अडचण निर्माण झाली आहे. झेडपीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; सुटीवर गेलेले अनेक शिक्षक शुक्रवारी शाळेवर परतले. नेमका आकडा समोर आला नाही, मात्र ही संख्या मोठी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिक्षकांच्या याद्या मागविल्या
दरम्यान, आर. एस. मोगल यांनी शिक्षकांनी रजा घेतल्या याच्या याद्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे मागविल्या आहेत. त्याचा अहवाल येत्या सोमवारी प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर या शिक्षकांच्या रजांचे वर्गीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images