Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रक्रिया उद्योगाअभावी शेतकऱ्यांचे हाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतात कृषी उत्पादनांवर प्रकिया केली जात नाही. साठवण क्षमता नाही. यामुळेच भारतीय शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. अन्य देशांत प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जात आहे. ब्रँडेड वस्तू उत्पादनात परदेशी शेतकरी आपला माल पाठवित आहेत. भारतीय शेतकऱ्यांनीही अशा उद्योगांसाठी माल उत्पादन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉ. भगवान साखळे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजीवन शिक्षण विस्तार विभागातर्फे तरुण शेतकऱ्यांसाठी गुरुवारी (४ जानेवारी) कार्यशाळा घेण्यात आली. केमिकल टेक्नॉलॉजी विभागात 'फळ व भाजीपाला प्र्रक्रिया उद्योग' या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रविण वत्ते, संचालक डॉ. किशन धाबे, विषयतज्ज्ञ डॉ. भगवान साखळे, डॉ. गणेश पांढरे, संयोजक डॉ. संजय मून, माजी अधिसभा सदस्य राजेंद्र देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. साखळे यांनी 'अन्न प्रक्रिया उद्योगाची सद्यस्थिती' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'जगात सर्वात जास्त अन्न धान्याचे उत्पादन चीनमध्ये होते. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगात सर्वाधिक प्रक्रिया उद्योग मलेशिया, अमेरिकेत आहेत. इस्त्राइलमध्येही ५० टक्के फळे, भाजीपाला यावर प्रक्रिया केली जाते. भारतात मात्र केवळ तीन टक्केच प्रमाण आहे. त्यामुळे भाजीपाला, फळांची मोठी नासाडी होते. उत्पादन जास्त झाल्यास साठवण क्षमता नसल्याने मातीमोल भावाने फळे, भाजीपाला विकण्याची वेळ येते. शासनानेही आता प्रक्रिया उद्योगाकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदर्शन, पथनाट्यद्वारे जनजागृती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मौखिक आरोग्य सप्ताहानिमित्त शुक्रवारी (५ फेब्रुवारी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रदर्शन भरविण्यात आले होते तर, दंत महाविद्यालय व क्रांतीचौकात पथनाट्य सादर करण्यात आले.

प्रारंभी प्रदर्शनाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विविध प्रतिकृती व पोस्टरद्वारे मौखिक आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. क्रांतिचौकातील पथनाट्यावेळी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, कार्यकर्ते सागर वाडकर, पोलिस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्त शिल्पाराणी वाडकर यांनी तंबाखुचे दुष्परिणाम सांगणारी स्वरचित कविता सादर केली. या वेळी सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगदीशचंद्र वठार यांनीही मार्गदर्शन केले तर, डॉ. संध्या नाईक, डॉ. हर्षल बाफना, परिचारिका श्रीमती श्रोत्रे, परमेश्वर नारायणकर, सुनिल निकाळजे आदींनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. डॉ. माया इंदूरकर, डॉ. प्रज्ञा बनसोडे, डॉ. अरुण खळीकर, डॉ. मंदाकिनी मंडाले, डॉ. राजन महिंद्रा, डॉ. सीमा पाठक, डॉ. माधुरी वावधने, डॉ. शिरीष खेडगीकर, डॉ. जयश्री पगारे, डॉ. अविनाश कोळपकर, डॉ. जयंत राजगुरू, डॉ. राजू गायकवाड आदींची उपस्थिती होती. सप्ताहामध्ये शनिवारी (६ फेब्रुवारी) मौजे आडगाव (ता. कन्नड), बुधवारी वेरुळ, तर गुरुवारी कन्नड येथे दंत तपासणी व मुख कर्करोग तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

रविवारी क्रांतीचौकातून दंत महाविद्यालयापर्यंत मॅरेथॉन स्पर्धा होईल. सोमवारी (८ फेब्रुवारी) बीड बायपास परिसरातील स्वामी समर्थ बालकाश्रम, तर, मंगळवारी (९ फेब्रुवारी) गोपाळपूर येथील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांची मुख आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

करंजगावला वर्षभर आरोग्य सेवा
भारतीय दंत परिषदेनुसार शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाकडून करंजगाव (ता. वैजापूर) दत्तक घेण्यात आले असून, या गावामध्ये वर्षभर आठवड्यातून तीनदा सर्व प्रकारच्या मोफत मौखिक आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. यामध्ये दात काढणे, बसवणे, चांदी भरणे आदी सेवा देण्यात येतील, असे डॉ. डांगे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळसुले यांच्या तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेशकार, कायदे, रेले प्रकारचे उत्कंठावर्धक तबलावादन करीत पं. रामदास पळसुले यांनी औरंगाबादकर रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवले. उपासना मंचच्या वतीने तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी सायंकाळी गीता व्यास यांचे शास्त्रीय गायन व पं. पळसुले यांचे तबला वादन रंगले. या बहारदार संगीत मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली.

उपासना मंच यांच्या वतीने दर महिन्यात शास्त्रीय संगीत सभा आयोजित करण्यात येते. या मैफलीत प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे वादन रंगले. पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य असलेले पळसुले एकल तबलावादनासाठी प्रसिद्ध आहेत. 'ताल तीनताल' वादनाने पं. पळसुले यांनी मैफलीला सुरुवात केली. तबला वादनातील प्रभूत्व त्यांनी सिद्ध केले. द्रुत व मध्यम लयीतील वादन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. कायदे, पेशकार, रेले यांच्या पारंपरिक वादनातूनही त्यांनी दाद मिळवली. संवादिनीवर अभिषेक शिनकर यांनी साथसंगत केली. दरम्यान, पहिल्या सत्रात गीता व्यास यांचे शास्त्रीय गायन रंगले. 'राग पुरिया धनाश्री' सादर करून गीता यांनी दाद मिळवली. त्यानंतर 'वनरा मोरा आयो' ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. 'अबीर गुलाल उधळीत रंग' या अभंगाने गायनाची सांगता केली. तबल्यावर सुजीत नेवपूरकर व संवादिनीवर गजानन केचे यांनी साथसंगत केली. यावेळी प्रसाद कोकीळ व संजीव शेलार यांनी कलाकारांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८९० कोटींची अतिरिक्त मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा विभागाअंतर्गत येणाऱ्या आठ जिल्ह्यातील नियोजन समितीने मंजूर केलेल्या पुढील वर्षीच्या आर्थिक विकास आराखड्याव्यतिरिक्त एकूण ८९० कोटी ८२ लाखांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी किती निधी शासन मंजूर करते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रपुरस्कृत योजनांसाठी ३७९ कोटी ५२ लाखांचा निधी राखून ठेवला आहे, अशी सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी २०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यास पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मंजुरी देण्यात आलेली आहे. शासनाच्या सूचनांनुसार आर्थिक मर्यादेनुसार आठ जिल्ह्यांचा आराखडा १२४२ कोटी ९७ लाखांचा झालेला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याचा आढावा घेतला गेला.

यात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त आठ जिल्ह्यांनी मिळून ८९० कोटी ८२ लाखांची मागणी केली आहे. यापैकी किती अतिरिक्त निधी पदरात पडतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्र पुरस्कृत योजनांसाठी ३७९ कोटी ५२ लाखांचा निधी राखून ठेवलेला आहे. हा निधी जिल्हानिहाय पुढीलप्रमाणे; औरंगाबाद ४९ कोटी ३१ लाख रुपये, जालना ४६ कोटी ४ लाख, बीड ५७ कोटी ५५ लाख, परभणी ४० कोटी ३८ लाख, उस्मानाबाद ३८ कोटी ४९ लाख, लातूर ७२ कोटी ५० लाख, हिंगोली २२ कोटी ६८ लाख, नांदेड ५२ कोटी ५७ लाख रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : लज्जतदार पराठे

0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com
पराठे ही उत्तर भारतीय डीश. पराठे म्हटले की दिल्लीतील 'पराठेवाली गली' डोळ्यासमोर येते. महाराष्ट्रातही पराठे आवडीने खाल्ले जातात. अनेक रेस्टॉरंटमध्ये पराठे मिळतात, पण खास पराठ्यांचे हॉटेल तसे कमी आहेत. बीड बायपासवर विष्णू पेरे यांचे गुरुकृपा पराठा हाउस हे खास पराठ्यांचे हॉटेल. आठ प्रकारचे लज्जतदार पराठे येथे उपलब्ध आहेत. खास पराठ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी असते...

बीड बायपास रोडवर एमआयटी कॉलेजच्या पश्चिमेकडील कॉम्प्लेक्समध्ये गुरुकृपा पराठा हाउस आहे. शहरालगत असलेल्या पाटोदा येथील विष्णू विठ्ठलराव पेरे यांनी सुमारे दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी या हॉटेलची सुरुवात केली. अन्य भाज्या येथे मिळत असल्या तरी पराठे ही या हॉटेलची खास ओळख. पराठ्यांच्या या हॉटेलबद्दल पेरे सांगतात, त्यांच्या एका शीख मित्राने वाळूज येथे सुमारे २५ वर्षांपूर्वी पराठा हाउस सुरू केले. मित्राच्या दुकानावर मी बसत असे. त्यामुळे पराठ्यांमध्ये इंटरेस्ट वाढला. त्यातून प्रेरणा घेत बीड बायपासला हे हॉटेल सुरू केले.

गुरुकृपा पराठा हाउसमध्ये आलू, मेथी, कांदा, कोथिंबीर, गोबी, मिक्स, पनीर, मुळा हे पराठे मिळतात. पहाटे पाचपासून पेरे यांच्या घरी पराठ्यांचे सारण तयार करण्याचे काम सुरू होते. पराठ्यांचे सारण ते घरी तयार करतात.

आलू पराठ्यासाठी बटाटे चांगले शिजवून घेतले जातात. शिजवलेले बटाटे बारीक खिसले जातात. त्यात कांदा, कोथिंबीर, मीठ, तिखट, आलं-लसूण टाकून हे मिश्रण परतून घेतले जाते. हे सारण पराठ्यासाठी वापरले जाते. पनीर पराठ्यासाठी पनीर बारीक खिसून घेतात. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण आदी टाकले जाते. हे सारण परतून घेतले जाते. पराठ्यांसाठी वापरले जाणारे पनीर विष्णू पेरे घरीच तयार करतात. रोज ताजे पनीर वापरले जाते. त्याचबरोबर पराठ्यांसाठी रोज ताजी भाजी आणली जाते.

कांदा पराठ्यात कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतला जातो. त्यात चवीनुसार मीठ, तिखट टाकून सारण परतले जाते. मिक्स पराठ्यासाठी फुलकोबी आणि पत्ताकोबी बारीक चिरून शिजवून घेतली जाते. त्यात कांदा, कोथिंबीर बारीक चिरून टाकतात. मीठ, तिखट टाकून हे मिश्रण परतून घेतले जाते.

पराठा ताटाच्या आकाराचा असतो. त्याच्यासोबत दही, बटर आणि खास ठेचा देण्यात येतो. ठेचा करण्यासाठी मिरची, लसूण आणि पुदिना यांचा वापर करण्यात येतो. पराठ्यांत भाज्यांची चव स्पष्टपणे जाणवते. हेच या पराठ्यांचे वैशिष्ट आहे.

पराठ्यांच्या सारणात गरम मसाला टाकला जात नाही. गरम मसाला वापरल्यास सारणाला त्याची चव येते. त्यामुळे भाज्यांची चव येत नाही. त्यामुळे सारणात गरम मसाला वापरला जात नाही. कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. त्याचबरोबर परिसरातील अनेक नागरिक नियमितपणे पार्सल घेऊन जातात. कमी पैशात पोट भरते, म्हणून खवय्ये पराठ्याला पसंती देतात, असे पेरे सांगतात. पराठ्यांशिवाय चना, मटकी, पनीर, बैंगन, शेव, शेवगा या भाज्याही येथे उपलब्ध आहेत. या सर्व भाज्या काळ्या मसाल्यात तयार केल्या जातात. हा मसाला पेरे घरीच पारंपरिक पद्धतीने तयार करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाम नदीची केली नाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करताना नदी, नाल्यांचे अस्तित्वच नाकारण्यात आले आहे. आराखडा तयार करणाऱ्या यंत्रणेने चक्क खाम नदीची नाली करून टाकल्याचे नकाशावरून स्पष्ट होते. या नदीच्या पात्राची रुंदी तब्बल ९० मीटरने कमी करण्यात आली आहे.

सुधारित विकास आराखडा तयार करताना झालेल्या अनेक गडबडी उघड होऊ लागल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहून त्यावर आक्षेप न घेतल्यास या चुका पुढील २० वर्षांसाठी शहरवासीयांना सहन कराव्या लागणार आहेत. विकास आराखडा तयार करताना नदी, नाले यांच्या हद्दी पाळल्या जातात. नदी-नाले या सरकारी मालमत्ता असतात. शहराची ओळख म्हणून नदी-नाले कायम रहावेत, अशी अपेक्षा असते, परंतु तयार करण्यात आलेल्या सुधारित विकास आराखड्यात या खुणाच मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले आहे. औरंगाबाद शहराची ओळख असलेल्या खाम नदीच्या पात्राची रुंदीच सुधारित विकास आराखड्यात कमी करण्यात आली आहे. औरंगाबाद शहराच्या १९९१च्या विकास आराखड्यात खाम नदीचे गट क्रमांक १९, २०, २१, २२मधून जाणारे पात्र १३० मीटरचे दाखविण्यात आले आहे. २०१५च्या सुधारीत विकास आराखड्यात या गटक्रमांकामधून वाहणाऱ्या नदीचे पात्र फक्त ४० मीटर दाखवण्यात आले आहे. याच भागात काही ठिकाणी नदीने नालीचे रूप घेतल्याचे दिसून येते. 'मटा' प्रतिनिधीने खाम नदीच्या पात्राची पाहणी केली असता चाऊस कॉलनीच्या परिसरात नदीचे पात्र फारच अरूंद झाल्याचे दिसून आले. चाऊस कॉलनीपासून पाऊण किलोमीटर अंतरावर मात्र नदीचे पात्र पुरेसे रूंद अाहे.

नक्षत्रवाडी येथे एका भूखंडावर मातोश्री वृद्धाश्रमाचे बांधकाम करण्यात आले आहे. तो प्लॉट उद्यानासाठी आरक्षित असल्याची नोंद १९९१च्या विकास आराखड्याच्या नकाशात आहे. सुधारित विकास आराखड्यात तोच प्लॉट उद्यानासाठी आरक्षित असल्याचे नमूद केले आहे. नकाशात 'गार्डन' या शब्दाखाली 'मातोश्री आश्रम' असा उल्लेख करण्यात आला आहे. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर आश्रमाचे बांधकाम कसे काय, असा प्रश्न या निमित्याने समोर आला आहे. आश्रमाचे बांधकाम असताना सुधारित विकास आराखडा तयार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यानाचे आरक्षण का हटवले नाही, असा प्रश्न आहे.

पात्राची रुंदी घटली कशी?
हिमायत बागेच्या मागील बाजुला चाऊस कॉलनीच्या परिसरात खाम नदीच्या पात्राची रुंदी तब्बल ९० मीटरने कमी करण्यात आली आहे. तेथे वसाहती उभारल्या आहेत. नदी, नाल्यांच्या पात्रांचे रक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. नदी पात्राची रुंदी कमी करून बांधकामे सुरू असताना महापालिकेने काय केले, असा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीच्या पात्राची रुंदी कमी झाली. सुधारित आराखडा तयार करताना १९९१च्या आराखड्याला समोर ठेऊन नदीपात्राच्या रुंदीचा विचार करण्यात आला नाही, हे नव्या नकाशावरून स्पष्ट होते. महापालिकेचे दुर्लक्ष कायम राहिल्यास खाम नदीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मातोश्री वृद्धाश्रमाची जागा १९९१च्या विकास आराखड्यात उद्यानासाठी आरक्षित होती, पण त्यानंतर १९९८-९९मध्ये महाराष्ट्र शासनाने उद्यानाचे आरक्षण रद्द करून तो प्लॉट निवासी वापरासाठी (येलो झोन) उपलब्ध करून दिला. त्यानंतर मातोश्री वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी रितसर परवानगी घेण्यात आली. त्यानुसार तेथे वृद्धश्रमाचे बांधकाम करण्यात आले आहे. सुधारित विकास आराखड्यात मातोश्री वृद्धाश्रमाची जागा उद्यानासाठीच्या आरक्षित असल्याचे नमूद केले असेल तर, ते चुकीचे आहे.
- पद्मा तापडिया, संचालिका, मातोश्री वृद्धाश्रम.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला, ज्येष्ठ नागरिकांना १५ फेब्रुवारीनंतर सक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात १ तारखेपासून हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले, मात्र त्यातून महिला व जेष्ठ नागरिकांना सध्या वगळण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीनंतर महिला व जेष्ठ नागरीकांना देखील हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अ‌मितेशकुमार यांनी 'मटा'शी बोलताना दिली. सहा महिन्यांनंतर मोहिमेचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जानेवारी महिन्यापासून हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला होता. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी सुरुवातीला पोलिसांची हेल्मेटविषयीची जनजागृती मनावर घेतली नव्हती. अनेकांनी हेल्मेट खरेदी केले नव्हते.

गेल्या सोमवारपासून ही मोहीम सुरू झाल्यानंतर हेल्मेटखरेदीसाठी गर्दी वाढली. यामुळे हेल्मेटचा तुटवडा निर्माण झाला. सर्वच दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले होते, मात्र या तुटवड्यामुळे अनेक महिलांना, जेष्ठ नागरिकांना हेल्मेट उपलब्ध झाले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन सुरुवातीचे पाच दिवस महिला व जेष्ठ नागरीकांना सूट दिली होती, मात्र अद्यापही हेल्मेटचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे महिला व जेष्ठ नागरीकांना हेल्मेट वापरण्यात आणखी दहा दिवस सूट देण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीनंतर त्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

ही मोहीम काही दिवसांनंतर सौम्य होणार नाही. दुचाकीस्वारांना हेल्मेटची सवय लागेपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे. सहा महिन्यांतर या मोहिमेचा आढावा घेण्यात येईल. शहरातील खड्ड्यामुळे देखील दुचाकीचे अपघात घडू शकतात. असे अपघात टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्तात बांधकाम परवान्यासाठी खटाटोप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा-देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश झाल्याचा फायदा घेत स्वस्तात बांधकाम परवानगी मिळविण्याचा खटाटोप भारती विद्यापीठाकडून केला जात आहे. सिडको प्रशासनाने बांधकाम परवानगीसाठी सक्ती करू नये व महापालिकेकडून परवानगी मिळाविण्यात सहकार्य करावे, यासाठी विद्यापीठाच्या यंत्रणेकडून सिडको प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

माजीमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या मालकीच्या भारती विद्यापीठासाठी सातारा परिसरात काही वर्षांपूर्वी जागा घेतली. दरम्यानच्या काळात सातारा-देवळाई परिसराचा समावेश झालर पट्ट्यात झाला. त्याचा विकास आराखडा सिडकोने तयार केला आहे. त्याला शासनाने अंतिम मंजुरी दिलेली नाही. आराखड्याला शासनाची मंजुरी नसली तरी सातारा-देवळाई परिसरात बांधकाम करण्यासाठी संबंधितांना सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे व बांधकामासाठी सिडकोने निश्चित केलेले शुल्क भरणे बंधनकारक आहे. सिडकोचे शुल्क महापालिकेच्या शुल्कापेक्षा जास्त आहे.

शासनाने सातारा-देवळा परिसराचा समावेश औरंगाबाद महापालिकेत केला असला तरी बांधकाम परवानगीसाठी सिडकोचे अधिकार कायम आहेत. सिडकोकडूनच संबंधितांना बांधकाम परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. सातारा-देवळाईचा समावेश महापालिकेत झाल्यामुळे भारती विद्यापीठ्याच्या बांधकामासाठी महापालिकेने बांधकाम परवानगी द्यावी आणि त्यात सिडको प्रशासनाने कोणत्याही प्रकारची आडकाठी आणू नये यासाठी विद्यापीठ्या यंत्रणेकडून सिडको प्रशासनावर दबाव आणला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; सिडकोच्या काही अधिकाऱ्यांना या विद्यापीठ्या यंत्रणेतील काही व्यक्तींनी फोन करून सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राची व बांधकाम परवानगीची सक्ती करू नका. असे सांगितले, पण अधिकाऱ्यांनी त्याला दाद लागू दिली नाही. सिडकोकडून आवश्यक त्या परवानग्या घ्याव्याच लागतील, असे विद्यापीठाच्या यंत्रणेतील 'त्या' व्यक्तीला बजावण्यात आले आहे.

बांधकाम परवाना शुल्क
- महापालिकेतर्फे आकारले जाणारे बांधकाम परवानगीसाठीचे शुल्क ः
रेडिरेकनर दराच्या २ टक्के
- सिडकोतर्फे आकारले जाणारे बांधकाम परवानगी शुल्क ः
अ ः प्लॉट एरिया शुल्क २४० रुपये प्रतिचौरस मीटर
ब ः बिल्टअप एरियासाठीचे शुल्क ७० रुपये प्रतिचौरस मीटर

भारती विद्यापीठाच्या बांधकामासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. महापालिकेने १२ लाख रुपये भरून देखील घेतले आहेत. सिडकोने १ कोटी ८५ लाख रुपये मागितले होते. आता सातारा-देवळाईचा परिसर महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे सिडकोकडे पैसे भरण्याचा विषयच येत नाही. बांधकाम परवानगी देण्याबद्दल काही तांत्रिक अडचण असती तर महापालिकेने पैसेच भरून घेतले नसते.
- यशवंत कदम, स्थानिक प्रतिनिधी, भारती विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मच्छिमारांना नुकसानभरपाई द्या

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळामुळे राज्यात पाणी टंचाई संकट भीषण झाले आहे. मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे भोई समाजाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत शनिवारी आयुक्तालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. या आंदोलनात पारंपरिक मासेमारीचे जाळे घेत मोठ्या संख्येने भोई बांधव
सहभागी झाले.
क्रांतिचौकातून हा मोर्चा निघाला. पैठणगेट, सिटीचौक, शहागंजमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. विविध मागण्या, घोषणांनी परिसर दणाणला. भोई व तत्सम जातीस अनुसूचित जमातींच्या सवलती मिळाव्यात, यासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करावी, सध्या दुष्काळामुळे पाणी टचांई आहे. तलाव, नदीत पुरेसे पाणी नाही. त्यामुळे मच्छिमारांना उपजिविकेचे साधन उपलब्ध नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. हे लक्षात घेत राज्य, केंद्राने मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी, पडीक जमीन कसण्यासाठी मिळाव्यात, फिश मार्केटमध्ये मच्छिमारांसाठी गाळे राखून ठेवावे अशा विविध सतरा मागण्या करण्यात आल्या आहे.
यावेळी अध्यक्ष उत्तम घुमे, महासचिव गजानन साटोटे, योगेश श्रीनाथ, तुकाराम वानखेडे, एन. एन. गंधलवाड, रमेश मोरे, विनोद नेमाडे, किशोर गंगतीरे, गणेश वानखेडे, सुरेश मांडवे, माधव श्रीनाथ, साहेबराव किळवदे, शांता बनसोडे, मंजुषा श्रीनाथ, रुक्मिणी नेमाडे, सुमन वाल्डे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतार समाजाला राजाश्रय हवा

0
0



बारा बलुतेदारांमध्ये सुतार समाज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. राज्यातील प्रत्येक गावा-गावांत सुतार समाजाचे आस्तित्त्व आहे. सुतार समाज म्हटले की, लाकडाचे काम करणारे कारागीर आपल्या नजरेसमोर येतात. शहरीकरणाचा सर्वाधिक फटका सुतार समाजाला बसला. घर बांधकाम असो की अन्य फर्निचर कामे असो यात काळानुसार मोठे बदल झाले आणि सुतार समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला. लाकडी कामाच्या व्यवसायाला ग्रहण लागल्याने प्रामुख्याने सुतार समाजाने शहराकडे धाव घेतली. आजच्या 'समाजमन'मध्ये पांचाळ सुतार समाजाची ही संघर्षमय वाटचाल.
Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
सुतार समाजात पांचाळ सुतार, आहेर सुतार, लिंगायत सुतार अशा काही पोटजाती आहेत. सुतार समाजाचा प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गात समावेश आहे. औरंगाबादमध्ये ३० हजारांपेक्षा अधिक संख्येने पांचाळ सुतार समाज वास्तव करून आहे. नारेगाव, जाधववाडी, चिकलठाणा, रामनगर-मुकुंदवाडी, चौधरीनगर, पुंडलिकनगर, गारखेडा, जयभवानीनगर, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी, हडको, सिडको, हर्सूल, बेगमपुरा, शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर अशा विविध भागात सुतार समाजांची ३०-४० कुटुंब वास्तव करून आहेत. फर्निचर तयार करणे, सुतार काम हा सुतार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. मात्र, पूर्वीच्या तुलनेत लाकडी कामे कमी होत गेली. तसा हा समाज अन्य व्यवसायाकडे वळला. लोखंडी अवजार निर्मितीत या समाजाने हातखंडा मिळविला. सिमेंटच्या चौकडी बनवणे, अॅल्युमिनियमच्या खिडक्या तयार करणे अशी कामे करण्याकडे या समाजातील कारागिरांचा कल वाढला.
पारंपरिक व्यवसायाचा वारसा पुढे चालवण्यास समाजातील युवा पिढीचा फारसा कल दिसून येत नाही. खासगी नोकरी वा अन्य व्यवसाय युवा पिढीला खुणावताना दिसतो आहे. सद्यस्थितीत टेलरिंग व बांधकाम क्षेत्रात युवा पिढी अधिक काम करताना दिसत आहे. सुतार समाजातील युवक-युवतींचे उच्च शिक्षणाचे अल्प प्रमाणाचे मुख्य कारण आर्थिक परिस्थितीशी निगडित आहे. मुलींची दहावीपर्यंत मोफत शिक्षणाची सोय असल्याने दहावीपर्यंत सहज शिक्षण घेतात, परंतु बारावी आणि उच्च शिक्षण घेण्याकडे मुलींचा कल फारसा दिसून येत नाही. अन्य समाजाप्रमाणेच मुला-मुलींचे लग्न जुळवणे हा प्रश्नही तेवढाच तीव्रतेने भेडसावत असतो. विश्वकर्मा सुतार समाज महासंघातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात ४०० ते ५०० वधू-वरांचा सहभाग असतो. त्यातून अनेकांचे विवाह जुळले आहेत, अशी माहिती महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष विलास चंदने यांनी दिली.
सिडकोतील विश्वकर्मा मंदिर हेच समाजाचे एकमेव प्रेरणास्थान आहे. महासंघातर्फे दरवर्षी विश्वकर्मा जयंती जल्लोषात साजरी करण्यात येते. नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण अन्य समाजाप्रमाणेच साजरे केले जातात. पारंपरिक व्यवसाय कलेचे महत्त्व कमी झाल्यामुळे अन्य व्यवसायाबरोबरच खासगी नोकरी मिळवण्याकडे कल अधिक आहे. शहरात शिक्षणाच्यानिमित्ताने येणाऱ्या युवक-युवतींसाठी समाजाचे असे स्वतंत्र वसतीगृह नाही. सांस्कृतिक सभागृह देखील नाही. स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन केले जाते. मात्र, महासंघाच्या प्रयत्नांना एक मर्यादा आहे. राजकीय क्षेत्रात सुतार समाजाला फारसे प्राधान्य तसेच प्रतिनिधीत्व दिले जात नाही. राजाश्रय नसल्याने सुतार समाजाची प्रगती खुंटलेली आहे अशी खंत विलास चंदने यांनी व्यक्त केली.
अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघः अध्यक्ष मोहन बोर्डे, कार्यकारी अध्यक्ष विलास चंदने, सचिव अर्जून पांचाळ, कोषाध्यक्ष वसंतराव राजगुरु, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, उत्तमराव सोनवणे, संघटक किरण सालपे, वैभव सालपे, शहराध्यक्ष रंगनाथराव धनवट, सहसचिव दगडू भाग्यवंत, रंगनाथ सोनवणे. सदस्य योगेश चौकडे, मोहन सोनवणे, पांडुरंग सिरसाट, देविदास सोनवणे, शिवाजी गायकवाड.
नारेगाव विभाग प्रमुखः अप्पाराव पवार, सहसचिव सुभाष सांगुळे.
जिल्हा महिला महासंघः अध्यक्ष रामकुंवर सालपे, सचिव मंदाकिनी चौकडे, संघटक आशा घनवट, सहसंघटक मंगल सोनवणे, कलावती पगार.
जिल्हा युवा महासंघः अध्यक्ष सतीश वानखेडे, कार्यकारी अध्यक्ष मनोज बोर्डे, सचिव स्वप्नील चंदने, उपाध्यक्ष अॅड. विजय धनवट, उन्मेश सुतार, योगेश सालपे, विशाल सालपे, सहसचिव आशिष जाधव, अशोक सांगुळे. संघटक योगेश हिरे, कृष्ण पांचाळ, कृष्ण सिरसाट, पप्पू सिरसाट. सदस्य विनोद वाघचौरे, देविदास शिंदे, प्रवीण सिरसाट, शुभम चंदने.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात असहिष्णुतेपेक्षा बिकट स्थिती

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'असहिष्णुता असेल तर सहिष्णुतेचे पाठ देता येईल, पण नफ्याचा धरबंद नसलेला पाठलाग सुरू आहे. सध्या देशात असहिष्णुतेपेक्षा जास्त काही घडत आहे. या बिकट परिस्थितीत मध्यमवर्गाने निर्भयतेने बोलण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी यांनी केले. 'अँटी एस्टॅब्लिशमेंट फोरम'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप, दादरी प्रकरण, पानसरे-कलबुर्गी यांच्या हत्येनंतर लेखक व कलावंतांनी 'पुरस्कार वापसी' अभियान सुरू केले. या अभियानातील प्रमुख साहित्यिक डॉ. गणेश देवी, गणेश विसपुते व अब्बास रेहमान यांच्या सत्काराचे आयोजन अँटी एस्टॅब्लिशमेंट फोरमने केले होते. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर डॉ. गणेश देवी, गणेश विसपुते, अब्बास रेहमान, प्रा. विजय दिवाण, सुबोध मोरे, प्रा. देवेंद्र इंगळे व सुरेखा देवी उपस्थित होते. यावेळी देवी म्हणाले, 'गुजरात विकासाच्या नावाखाली मीडिया हाऊसला काम मिळाले. देशभर गुजरात विकासाचे होर्डिंग्ज झळकले. प्रत्यक्षात गुजरातमध्ये ८० लाख आदिवासींसाठी एकही विद्यापीठ नाही. भटक्या-विमुक्तांना शैक्षणिक सवलत नाही. केवळ वापी, सूरत, अहमदाबाद, भरूच व आनंद एवढीच गुजरात विकासाची केंद्रे आहेत. 'विकास मार्ग', 'प्रगती मार्ग' असे नाव असलेल्या रस्त्यात भरपूर खड्डे आहेत. गुजरात विकासाची भ्रामक प्रतिमा उघड करणाऱ्यांना थंड करण्यात आले. भीती व धाक दाखवून असत्य प्रतिमा सत्य करण्याचा खटाटोप सुरू आहे. 'असहिष्णुता' या एका शब्दाने देशाच्या पूर्ण परिस्थितीचे आकलन होत नाही. लेखकावर हल्ला झाल्यानंतर पंधरा दिवस टीव्ही व वृत्तपत्रात चर्चा चालते; पण मूळ आर्थिक प्रश्नांकडे जनतेचे दुर्लक्ष करण्याचा हा हेतू असू शकतो. सध्या भयभीत मध्यमवर्गाला बोलते करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे'. तर उर्दू कवी अब्बास रेहमान यांनी केंद्र सरकारवर सडेतोड टीका केली. 'देशात फॅसिझम येताना प्रथम लेखक, कवी व कलावंतांना चाहूल लागते. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन यांना लक्ष्य करीत सर्वधर्मसमभावाचे उद्यान उध्वस्त करण्यात येत आहे. पूर्वीच्या राज्य सरकारचा पुरस्कार या सरकारला कशासाठी परत करता अशी चर्चा घडवून आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न झाला, पण सरकार कुणाचेच नसते. विशिष्ट विचार कुणी जनतेवर लादत असेल तर आम्ही निधड्या छातीने सामोरे जाऊ,' असे रेहमान म्हणाले. 'पुरस्कार वापसीच्या साध्या क्रियेवर हिंसक प्रतिक्रिया उमटणे चिंताजनक आहे. संसदेतील साधू-साध्वी बेताल वक्तव्य करीत आहेत. पुस्तकांवर बंदी लादली जात असल्याने पुरस्कार परत केले,' असे गणेश विसपुते यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक अॅड. संघपाल भारसाखळे यांनी केले तर सूत्रसंचालन बुद्धप्रिय कबीर यांनी केले.
एप्रिलमध्ये सभा
'देशातील टोकाच्या परिस्थितीत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रश्नावंर औरंगाबादमध्ये मोठी सभा घेणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल. राज्याचे लक्ष वेधणारी सभा घेऊन जनतेला निर्भय करू असे,' डॉ. गणेश देवी यांनी जाहीर केले. 'साहित्य अकादमी, ललित कला अकादमी, नॅशनल बुक ऑफ ट्रस्ट, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, आयआयटी अशा प्रमुख संस्थात सुमार दर्जाचे लोक बसल्याने या संस्थांचे भवितव्य काय राहील असा सवाल देवी यांनी केला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या समांतर जलवाहिनी विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत राज्य शासनाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सोमवारी या याचिकांवर सुनावणी झाली.
खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समिती तर्फे प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून योजनेचे स्वरुप, समांतर करार आणि त्याची अंमलबजावणी यांच्या वैधतेविषयी आक्षेप घेतला आहे. समांतर योजना राबविणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर वसुलीबाबत ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये अथवा जबरदस्तीची कृती करू नये, नळ कापले जाऊ नयेत, जादा व्याजदर आकारू नये अशी बंधने घातली आहेत. ही बंधने उठवावी अशी विनंती कंपनीचे जेष्ठ वकील प्रवीण शहा यांनी केली. कोर्टाने कोणतेही बंधने घातली नाहीत. कंपनीतर्फेच ही हमी घेण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य शासनाने आजपर्यंत शपथपत्र दाखल केले नाही. शपथपत्र दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी द्यावा, अशी विनंती सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी केली. येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी दिले. दिवाण यांच्यातर्फे उदय बोपशेट्टी, राजेंद्र दाते पाटील यांच्यातर्फे अनिल गोळेगावकर, विजय शिरसाट यांचे वकील प्रदीप देशमुख, पालिकेतर्फे नंदकुमार खंदारे आणि राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरसिंग गिरासे हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी २२ फेब्रुवारीला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतवस्तीवर दरोडा; महिला गंभीर जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील तिडी शिवारात एका शेतवस्तीवर दरोडा टाकून महिलेला जबर मारहाण केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक विभाग व श्वानपथकाने घटनास्थळी तपासणी केली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या द्वारकाबाई भागिनाथ डुकरे (वय ५५) यांना उपचारासाठी शिर्डी येथे पाठवण्यात आले आहे.
तिडी सवंदगाव रस्त्यावर तिडीपासून एक किलोमिटर अंतरावरील डुकरे वस्तीवरील एका खोलीत मुले व दुसऱ्या खोलीत द्वारकाबाई व त्यांची नात झोपले होते. रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमाराा २० ते २५ वर्षे वयोगटातील तिघांनी मुले झोपलेली खोलीला बाहेरून कडी लावली. त्यानंतर दुसऱ्या खोलीचा कडीकोयंडा उघडून द्वारकाबाई यांच्या डोक्यात काठीने जबर वार केला. लाथाबुक्क्याने मारहाण करून त्यांच्या गळयातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला व तेथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी हर्ष पोद्दार, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाशकुमार पाटील, नंदकुमार नरोटे, दीपक सुरवसे, संतोष पवार, विजय खोकड यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाने तिडीपासून तीन किलोमिटरपर्यंत माग काढला मात्र, दरोडेखोरांचा छडा लागला नाही. दरम्यान, याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परीक्षा

0
0

कन्नड: जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ९ वी वर्गाच्या रिक्त ७ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले असून प्रवेश चाचणी परीक्षा २४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता होणारआहे. ही परीक्षा जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळांतील इयता ८ वीचे विद्यार्थी देऊ शकतात. १ मे २००० ते ३० एप्रिल २००४ या कालावधीमधील जन्मतारीख असलेले विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत. माहितीपत्रक व प्रवेशअर्ज प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय यांच्याकडे विनामूल्य उपलब्ध असून ते २९ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. नवोदय विद्यालयाच्या समितीच्या www.nvshq.org या वेबसाइटवरही अर्ज उपलब्ध आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य जे. एस. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा घाटात वाहतूक कोंडी

0
0

फर्दापूर : डाळीचा ट्रक उलटल्याने अजिंठा घाटात सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रकचालक व क्लिनरला उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
विजयवाडा येथून उडीद डाळ घेऊन जळगाव येथे जाणारा ट्रक (ए पी २६, ४२४८) अजिंठा घाटातील वळणावर सायंकाली साडेपाचच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. ऐन घाटातच ट्रक उलटल्याने वाहतूक थांबली. ट्रकचालक नागिया परमअप्पा व क्लिनर श्रीकांत कृष्णा (दोघेही रा. हैदराबाद) जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फर्दापूरचे पोलिस निरीक्षक निमीष मेहेत्रे, उपनिरीक्षक निलेश घोरपडे, ए. व्ही. चव्हाण, सुनील भिवसने, संदीप सुसर यांनी ट्रकला बाजुला केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोंडी कायम होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सारोळ्याचा होणार कायापालट

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराजवळील प्रसिद्ध सारोळा हिल स्टेशनच्या विकासकामांसाठी वन विभागाला ५८ लाख १८ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. 'इको टुरिझम'अंतर्गत वेगवेगळी कामे करण्यासाठी निधी दिला जाणार आहे. तब्बल ६३७ हेक्टर क्षेत्र असलेल्या सारोळ्याला पुरेशा निधीमुळे झळाळी मिळेल.
घनदाट वनक्षेत्र, वन्यप्राण्यांचा मुक्त संचार, जलसाठे व थंड हवेसाठी प्रसिद्ध सारोळा वनक्षेत्राचा कायापालट होणार आहे. या पर्यटनस्थळी पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वन विभागाने वारंवार निधीची मागणी केली होती. पुरेसा निधी नसल्यामुळे महत्त्वाची कामे रखडली होती. राज्यातील इतर पर्यटनस्थळांसाठी एकूण दोन कोटी ५८ लाख रुपये निधी मिळणार आहे. हा निधी मिळाल्यानंतर सारोळ्यातील कामांसाठी ई-टेंडर काढले जाणार आहे. सलग समतल चर, फेन्सिंग, नवीन वृक्षारोपण, जलसंधारण, गेस्ट हाऊस नूतनीकरण ही प्रमुख कामे केली जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत वन विभागाने अवैध वृक्षतोडीला अटकाव केला आहे. त्यामुळे वनक्षेत्राचे संरक्षण करण्यात यश आले. नवीन वृक्षारोपण करून वनक्षेत्र अधिक दाट करण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यटकांसाठी पुरेशा सुविधा दिल्या जाणार आहेत. शास्त्रीयदृष्ट्या व्यापक काम करून पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे. दरम्यान, सारोळ्याच्या ६३७ हेक्टर क्षेत्रासाठी वन कर्मचारी कमी आहेत. वनमजूरांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील शेकडो पर्यटक म्हैसमाळनंतर थंड हवेच्या ठिकाणासाठी सारोळ्याची निवड करतात. त्यामुळे या पर्यटनस्थळाचा पुरेसा विकास करण्यात येणार आहे. 'जंगल सुस्थितीत ठेवून पर्यटकांसाठी सुविधा देण्यात येतील. यावर्षी सारोळ्यात भरपूर पाऊस पडल्यामुळे पाणी भरपूर आहे. पाणीसाठा कायम ठेवण्यासाठी नियोजन करण्यात येईल. पुरेशा सुविधा पुरवून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे,' असे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर म्हणाले.








मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ शेतकरी कंपन्या स्थापन

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
शेतकऱ्यांच्या मालाची थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आठ खासगी कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी कसाबखेडा येथील कृषी प्रतिष्ठान प्रोड्युसर कंपनी व सुलतानपूर येथील स्वरूप शेतकरी प्रोड्युसर कंपनी यांना खते, बी बियाणे विक्रीचा परवाना मिळाला आहे.
राज्य शासनाच्या योजनेनुसार शेतकऱ्यांना कृषी उत्पादनावर आधारित खासगी कंपन्या स्थापन करण्यास प्रोत्साह देण्यात येत आहे. या योजनेत तालुक्यात आठ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्या शेतमालाचे ग्रेडिंग व पॅकिंग करून थेट बाजारपेठेत उतरणार आहेत. प्रत्येक कंपनीचे २०० ते ५०० शेतकरी सभासद होत असून त्यांच्याकडून भागभांडवल जमा केले जात आहे. सध्या या कंपन्यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाची निवड करण्यात आली आहे. शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी, कंपन्यांचे व्यवस्थापन व व्यवसाय आराखडे तयार करण्यासाठी रविवारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात आमदार प्रशांत बंब, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजीनाथ हांगे, आत्माचे तालुका समन्वयक प्रदीप देशपांडे व कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कसाबखेडा, पळसवाडी, विरमगाव, भांडेगाव, ताजनापूर येथील शेअर्स खरेदी केलेल्या सभासदांना मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात गटाच्या कंपन्या उभारण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कंपन्यानी बाजार व व्यवसायभिमुख पिके घ्यावीत, यासाठी नियोजन केले आहे.
'शेतकरी कंपनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. बियाणे निर्मिती, खते, बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, तसेच बटाटाची शेती करून चिप्स, वेफर्स तयार करणारे प्रक्रिया उद्योग सुरू करणार आहोत,' असे गणेश अधाने यांनी सांगितले. ते विरमगाव येथील लांबेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्यप्रवर्तक आहेत.

अशी करता येते कंपनी
कंपनी स्थापन करण्यासाठी १५ ते २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी कायदा १९५६ अन्वये शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करावी. शेतमाल थेट विकला जावा, शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग उभारावेत हा यामागचा उद्देश आहे. या कंपन्यांना नाबार्डतर्फे अर्थसहाय्य करण्यात येते. शिवाय राष्ट्रीयकृत, जिल्हा बँकांकडूनही कर्ज मिळू शकते. शेतकरी कंपन्याना कृषी सेवा केंद्र सुरू करता येते, खासगी कंपन्यांसोबत करार करून शेतीमाल विक्री करता येतो. यातून शेतकऱ्यांचा लाभ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रेकर औरंगाबादमध्येच हवेत

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवघ्या दोन महिन्यांत पुढाकार घेऊन विविध कामे करून औरंगाबादकरांसाठी आशेचा किरण दाखविलेल्या आयुक्त सुनील केंद्रेकर यांची बदली होण्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. औरंगाबादेतील विकासकामांना चालना मिळाली असून ही पूर्ण होईपर्यंत केंद्रेकरांची बदली करू, अशी मागणी शहरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात विविध संस्था, संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे लेखी निवेदन पाठवून केंद्रेकरांची बदली करू नये, अशी मागणी केली आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) चे अध्यक्ष आशिष गर्दे, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ)चे बालाजी शिंदे, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अजय शहा, औरंगाबाद इंडस्ट्रिअल सप्लायर्स असोसिएशन (आयसा) सतीश लोणीकर, वाळूज इंडस्ट्रिज असोसिएशनचे ए. के. सेनगुप्ता, मराठवाडा विकास परिषदेचे प्राचार्य शरद अदवंत, तारा बसोले, हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे वीर सफाया, क्रेडाईचे विकास चौधरी, खैरनार, सी. पी. त्रिपाठी, नताशा झरीन, अतुल बनगीनवार, प्रसाद कोकिळ, राम मार्लापल्ले, सारंग टाकळकर, प्रा. अभय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवर तसेच सामान्य नागरिकांची हीच भावना असल्याचे सी. पी. त्रिपाठी यांनी सांगितले. नताशा झरीन यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात केंद्रेकरांच्या भूमिकेचे समर्थन करत हा प्रकल्प यशस्वी होत असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसमोर उपोषणांचा सोमवार

0
0

औरंगाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक, आरोग्य तसेच महिला व बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. एकाच वेळी तीन उपोषणे पाहावयास मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या पाच वर्षांपासून आंतर जिल्हा बदली प्रक्रिया न राबविल्याच्या निषेधार्थ कृती समितीच्या सदस्यांनी कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषदेतील बाबूंच्या कामचुकारपणआमुळे शिक्षकांना पाच वर्षांपासून त्रास होत आहे. तीन वेळा उपोषण करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. बिंदूनामावलीच्या कामाला विलंब लावण्यात आला. या कालावधीत दोन सीईओ बदलले, तीन शिक्षणाधिकारी येऊन गेले पण शिक्षकांच्या बदल्यांबाबत काहीच धोरण स्वीकारले नाही, असे उपोषणार्थींनी सांगितले. २०११ पासून थांबवलेल्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करून आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना नेमणुका देण्यात याव्यात, १९९४ पासून अपूर्ण असलेली बिंदूनामावली पूर्ण करावी, बदलीपात्र शिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार करून प्रसिद्ध करावी आदी मागण्या कृती समितीने केल्या आहेत. राज्य कार्याध्यक्ष किशोर पवार, सहसचिव विजयकुमार लिंबोरे, अध्यक्ष सचिन साळुंके, भास्कर आढाव, बाबासाहेब रासकर, सचिन अन्नदाते, शिव संगेकर, भागचंद बढे यांच्यासह शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपोषणात सहभागी झाले आहेत.
पात्र असूनही हक्कापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षक एम. एच. विटोरे, ज्योती बनकर यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ज्येष्ठाच्या सूचीप्रमाणे, सेवेत रुजू झालेली दिनाकं, सेवा प्रवेशोतर, परीक्षा पास झालेल्याचे वर्ष, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग यात पात्र असूनही प्रशासनाने न्यायापासून वंचित ठेवले आहे. वरिष्ठ पर्यवेक्षिका असून कनिष्ठ पर्यवेक्षिकांच्या हाताखाली काम करण्यास भाग पडत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही त्यावर विचार झालेला नाही. न्याय मिळावा यासाठी श्रीमती विटोरे, श्रीमती बनकर यांनी उपोषण सुरू केले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे होत नाही, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने उपोषण लाक्षणिक उपोषण सुरू केले. दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करावे, जीपीएफचा सहाव्या वेतनाचा पाचवाच हप्ता जमा करण्यात यावा व जीपीएफ पासबुक अद्ययावत करण्यात यावे, अंशदान स्लीप देण्यात यावी व जीपीएफ नुसार पुस्तिका देण्यात यावी, सर्व संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ लिपिक नाहीत त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी,ज्या आरोग्य कर्मचाऱ्याचे घरभाडे बंद करण्यात आले आहे ते पूर्ववत सुरू करावे, आरोग्य सेविकेची वसुली ती बंद करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. उपोषणात प्रशांत बागुल, अविनाश दांडगे, रमेश साळवे, शेख शहामीर, अशोक मुकुटमल, शंकर घायवट, देविदास पोकळे, जयकुमार राठोड, अर्चना शिंदे, सुवर्णमाला वाघमारे, प्रमिला पवार, इंदिरा कोकणी, मंगला जयस्वाल, मंगल शिंदे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर चोर पळाला दुचाकी सोडून

0
0

वाळूज : गॅस सिलिंडर चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरटा सोमवारी पोलिसांच्या हातून निसटला. त्याने दुपारी बजाजनगरातील बस्वेश्वर चौकातून एक सिलेंडर चोरी केले. पोलिसांनी दुचाकी व सिलेंडर ताब्यात घेतले आहे.
बजाजनगरमध्ये काही दिवसांपासून गॅस सिलिंडर चोरी वाढली आहे. गेल्या आठवड्यात जयभवानी चौकात दुचाकी उभी करून शेजारच्या सोसायटीतून दिवसाढवळ्या गॅस सिलिंडर चोरले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हे चित्रिकरण मिळवले. पण ते अस्पष्ट असल्याने उपयोग झाला नाही. दरम्यान, सोमवारी दुपारी बजाजनगरमधील बीएसएनएल गोदामाशेजारील रहिवासी श्रीकृष्ण नारायण नाचणे यांच्या घरातून गॅस सिलिंडर चोरीची घटना दुपारी १२ वाजता उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. यावरून तपासणी सुरू केल्यानंतर एक संशयित दुचाकीस्वार सापडला. पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता तो दुचाकी सोडून पळून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images