Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘युद्ध नव्हे तर, संवादातून शांतता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अलिकडच्या काळात अनेक देशातील संबंध ताणतणावाचे झाले आहेत. युद्धाच्या माध्यमातून नव्हे तर, परस्पर संवादाच्या माध्यमातूनच जागतिक शांतता प्रस्थापित होऊ शकते, असा सूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्दता परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त विद्यार्थी कल्याण विभाग रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे ही परिषदेचे आयोजन करण्यात आले. सिफार्ट सभागृहात झालेल्या परिषदेत व्यासपीठावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्षांचे प्रतिनिधी शशी वरवंडकर, डॉ. दीपक पोफळे, एच. के. कार्ला, दिलीप गोडसे, राजेंद्र वाघचौरे, चंद्रकांत चौधरी, समन्वयक मिलिंद देशपांडे, डॉ. सुहास मोराळे यांच्यासह विविध देशातील प्रतिनिधी उपस्थित होती. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, शैक्षणिक व वैचारिक देवाणघेवाण या माध्यमातून विश्वकल्याण होऊ शकते. शशी वरवंडकर म्हणाले, आज सर्वजण शांततेची भाषा बोलतात आणि दुसरीकडे शस्त्रांची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर करतात, अशी दुहेरी भूमिका घेऊन जगतात. भारताने नेहमीच जागतिक शांततेसाठी पुढाकार घेतला असून युद्ध नको बुद्ध हवा, हा संदेश साऱ्या विश्वास आम्ही दिला आहे, असे ब्रिगेडियर एच. के. कार्ला म्हणाले.
मिलिंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर, आभार डॉ. सुहास मोराळे यांनी मानले. परिषदेत 'रोल ऑफ एज्युकेशन इन पीस', 'क्रियेटिंग पिस इन सार्क कंट्रीज' अशा विषयावर मंथन झाले. यात आभा चौधरी, प्रा. सतीश जयराम, अॅड. मैनुद्दीन जहांगीर, रोहिणी काचोळे, हेमंत लांडगे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘असा वनराईचा शृंगार’ चे प्रकाशन

$
0
0

औरंगाबाद : गीतकार प्रा. ना. तु. पोघे यांच्या प्रेम आणि निसर्गावरील सुमधूर गीतांचा आविष्कार असलेल्या 'असा वनराईचा शृंगार' या सीडीचे प्रकाशन बुधवारी पंडित नाथराव नेरळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर होते. संगीतकार पंडीत विश्वनाथ ओक, गायिका माधुरी ओक, कवी प्रा. दासू वैद्य, आकाशवाणी केंद्राचे संचालक सिद्धार्थ मेश्राम, स. भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, श्रीकांत मुळे, चित्रा देशपांडे, मोहन फुले आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पंडित नेरळकर यांनी गीतकार पोघे यांना अशाच सुरेख व नवनवीन रचना करत जा, अशा शुभेच्छा दिल्या. कवी गीतकार पोघे यांनी आपल्या गीतातून भावनाचा आविष्कार अंत्यत प्रभावीपणे व्यक्त केला आहे, ही गाणी लोकांच्या ओठावर यावीत, अशी अपेक्षा कवी वैद्य यांनी व्यक्त केली. या सीडीमध्ये 'असा नवराईचा श्रृंगार', 'वाऱ्यावर चांदव्याचे झाड', 'गळ्यात गाळून हार करांचे' यासह एकूण २४ गीतांचा समावेश आहे. ही गीते पंडित विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध केली असून राजश्री, माधुरी, तृष्णा, अमित, इंद्रनील, पार्थ व अर्णव ओक यांनी या गीतांचा स्वरसाज चढविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा साहित्य संमेलनाध्यक्षपदी दासू वैद्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बुलडाण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय बालकुमार युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी प्रा. दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. येत्या १२ व १३ मार्च रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे. बुलडाण्यातील साहित्य रसिकांच्या उपस्थितीत डॉ. गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दासू वैद्य यांची संमेलनाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. स्वागताध्यक्षपदी बुलडाण्यातील प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष अरूणा कुल्ली यांची निवड करण्यात आली तर संयोजकपदी नरेंद्र लांजेवार यांची निवड करण्यात आली. दोन दिवसीय बालकुमार युवा साहित्य संमेलनात राज्यातील दीडशेहून अधिक लेखक, साहित्यिक सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनात बालकुमार आणि युवकांसाठी कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, अभिरूप न्यायालय, रिंगण नाट्य, प्रगट मुलाखत असे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात सर्वोत्तम एकांकिका महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात २६ व २७ फेब्रुवारी रोजी 'सर्वोत्तम एकांकिका महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या सहा एकांकिका या महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत.
वर्षभरात राज्यभरातमध्ये झालेल्या विविध एकांकिका स्पर्धांमध्ये ज्या एकांकिकांनी अनेक ठिकाणी आपल्या उत्कृष्टतेची मोहोर उमटवली अशा सर्वोत्तम एकांकिकांचा महोत्सव राज्य शासनातर्फे ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला आणि नागपूर या सहा ठिकाणी आयोजित केला आहे. औरंगाबादमध्ये हा महोत्सव विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये २६, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेमध्ये होणार आहे. महोत्सव पूर्णतः निःशुल्क असून प्रवेशिका विद्यापीठाचे नाट्यगृह व तापडिया रंगमंदिर येथे २५ व २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उपलब्ध असतील, असे या महोत्सवाचे येथील संयोजक रमाकांत भालेराव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : प्रकाशमय वाटचाल

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
रंगीत, सुवासिक फुलवाती तयार करणाऱ्या आणि सात गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देणाऱ्या स्वाती जोशी मुळाच्या नाशिक जिल्ह्यातील बोलढाण येथील रहिवासी. मेडिकल स्टोअर्स व शेती हा त्यांच्या वडीलांचा व्यवसाय. आई घराची जबाबदारी सांभाळतच अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करत असे. पालक स्वाध्याय परिवारांशी संबंधित असल्याने तेच संस्कार स्वाती यांच्यावर लहानपणापासूनच झाले. आई, वडील आणि त्यांची दोन लहान भांवडे अशा कुंटुबांत त्यांना लहानपणापासूनच अभ्यासासह खेळासह काही तरी कौशल्यपूर्ण काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यासाठी पालकांचे नेहमीचे प्रोत्साहन मिळत गेले.

पालकांनी मुलगा व मुलगी यात कधी भेदभाव केला नाही तर हे करू नको, ते करू नकोस, असे कधीही म्हटले नाही. त्यामुळेच खो-खो, विटी दांडूपासून ते क्रिकेटपर्यंत सर्व मैदानी खेळाचा आनंद घेण्याची संधी स्वाती यांना मिळाली. बारावीपर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी नाशिकचे एचपीटी कॉलेज गाठले. अभ्यासात हुशार असलेल्या स्वाती यांना सुंदर हस्तक्षराची देणगी लाभली आहे.

त्याच बळावर शिक्षण सुरू असतानाच त्यांना १९८६-८मध्ये पहिले काम मिळाले ते साहित्यिक प्रा. योगेश्वर अंभ्यकर यांचे लेखनिक म्हणून. एक वहीचे लिखाण केल्यावर त्यांना पन्नास रुपये मिळत असत. महिन्याभरात दोनशे ते अडीचशे रुपये त्यांना सहज मिळत. कमवा व शिका या उपक्रमामुळे यांच्या आत्मविश्वास आणखी वाढला.

एमए मराठी झाल्यानंतर १९९१मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील जीवन जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती हे मुंबईतील एका बड्या कंपनीत नोकरीस होते. काही महिने सासरी अर्थात वैजापूर येथे राहिल्यानंतर स्वाती पतीसमवेत मुंबईत राहण्यास गेल्या. घरातील सर्व जबाबदारी यासह वाचन छंद जोपासूनही स्वाती यांच्याकडे बराच मोकळा वेळ असायचा. या वेळात काही तरी व्यवसाय, गृहोद्योग करावा, असा विचार मनात आला. त्यावेळी त्यांना एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीची संधी मिळाली. याचदरम्यान त्यांना मुलगी झाली. सासू-सासरेही काहीकाळ मुंबईत राहण्यास आले. घरकाम, मुलीचे संगोपन आदी कामांत पतीसह सासू, सासरे यांची मोलाची साथ मिळाली आणि त्यामुळे पुढील साडेतीन वर्षे त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले.

सर्व काही सुरळीत सुरू असतानाच त्याच पती जीवन जोशी यांनी नोकरी सोडून उद्योग क्षेत्रात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला व १९९७मध्ये वैजापूर गाठले. स्वाती यांनीही त्यास पाठिंबा देत मोलाची साथ दिली. वैजापूर तालुक्यात त्यांच्या उद्योगाचा विस्तार झाल्यानंतर त्यांनी १९९८मध्ये औरंगाबाद गाठले.

यादरम्यान जोशी दाम्पत्यास दुसरी मुलगी झाली. तिच्या पाठीवर मुलाचा जन्म झाला. घरकाम, मुलांचे शिक्षण, संगोपनाबरोबर स्वाती या पतीच्या उद्योग-व्यवसायात मदत करू लागल्या. मुलगा थोडा मोठा झाल्यानंर स्वाती यांनी २००४मध्ये लोणचे, विविध प्रकारचे पापड घरात तयार करण्याचा छोटाखानी गृहोद्योग सुरू केला. दर्जेदार उत्पादनामुळे या पदार्थाना मागणी वाढली. हे काम सुरू असतानाच एका खासगी शाळेत काहीकाळ मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली, पण या कामात त्या फार काळ रमल्या नाहीत. मुलांच्या संगोपन, त्यांचा अभ्यास घेणे आदी प्रश्न होते. त्यामुळे त्यांनी योग्य संधीची प्रतिक्षा केली.

लोणचे, पापड निर्मितीपेक्षा काही तरी वेगळा व्यवसाय करण्यासाठी त्यांची शोध मोहीम सुरू होती. याच काळात त्यांना एका नातेवाइकाने देवासमोर लावण्यासाठी लागणाऱ्या वाती गिफ्ट म्हणून दिल्या. शहरात वातींना मोठी मागणी असल्याचे लक्षात येताच स्वाती यांनी हा व्यवसाय करण्याचे ठरवले. पारंपारिक वाती तयार न करता ग्राहकांना आर्कषित करण्यासाठी वेगळे उत्पादन कसे देता येईल, यांचा त्यांनी अभ्यास केला. सुरुवात म्हणून अवघ्या पाचशे रुपयांच्या भाग भांडवलावर त्यांनी शुद्ध तुपापासून फुलवाती तयार केल्या. नातेवाईक, ओळखीच्या लोकांना भेट म्हणून त्यांनी फुलवाती दिल्या आणि त्याला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे हा उद्योग चांगला चालू शकले, असा विश्वास निर्माण झाला. मेण, कोणत्याही प्रकाराचे पेट्रोलियम पदार्थाचा वापर न करता २००७मध्ये तुपापासून फुलवात तयार करण्याचा उद्योग सुरू केला.

२००७मध्ये संक्रातीच्या मुहूर्तावर त्यांना महिला ऑडर मिळाली. उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरले आणि काही दिवसांतच स्वातीज् गृहोद्योग निर्मित फुलवातींना परिसरातून मागणी वाढली. त्यातून परिसरातील महिलांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते गेले तसा आत्मविश्वासही वाढत गेला. फुलवाती तयार करण्यासाठी त्यांनी खास साचा तयार करून घेतला. गायीचे तूप आणि वनस्पती तुपापासून तयार केलेल्या फुलवातींसह त्यांनी रंगीत, सुवासिक फुलवातीही तयार केल्या.

माउथ पब्लिसिटीमुळे केवळ ओळखीच्या लोकांकडनच नव्हे तर दुकाने, मॉल, पुजेचे साहित्य विक्री करणारे दुकानदार, ठोक विक्रेते यांच्याकडूनही काही दिवसांतच या फुलवातींना मागणी वाढली.

कच्चा माल आणणे, फुलवातींची निर्मिती आणि विक्री या सर्व जबाबदारी स्वाती एकट्या सांभाळतात. अर्थात पती जीवन यांच्यासह मुले आणि भावाचीही मोठी मदत होते. त्यांच्या मदतीमुळे व्यवसाय वाढीस मदत झाल्याचे त्या मानतात. त्यांनी या व्यवसायातून सात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नियोजन, मार्केटचा अभ्यास, तत्पर सेवा आणि दर्जेदार उत्पादन याच जोरावर यश मिळत गेल्याचे त्या मानतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय सुरावटीत ‘ऋतुरंग’ची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शास्त्रीय नृत्य व शास्त्रीय गायन यांचा अपूर्व मेळ साधलेल्या कलाग्राम ऋतुरंग महोत्सवाचा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप झाला. कलाग्राम परिसरात मंगळवारी कार्यक्रम झाला. केतकी नेवपूरकर व अजय शेंडगे यांचे नृत्य व अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन रंगले.
तालबद्ध पदन्यास, लयबद्ध देहबोली आणि मुद्राभिनयाने कलावंतांनी शास्त्रीय नृत्य रंगवले. ऋतुरंग महोत्सवात शेवटच्या दिवशी अजय शेंडगे व राखी शिंदे यांनी ओडिसी नृत्य सादर केले. गुरू केलूरचण महापात्रा यांची रचना नृत्यातून फुलवली. तसेच 'गीत गोविदम्‌ काव्यम्‌'मधील दशावतार सादर झाले. परशुराम, श्रीराम, वामनासह दहा अवताराचे दर्शन नृत्यातून घडविले. केतकी नेवपूरकर आणि ध्यास परफॉर्मिंग आर्ट्सच्या शिष्यांनी भरतनाट्यम सादर केले. 'गणेश वंदना' व 'पुष्पांजली' उत्तम सादर झाली. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शंकराच्या नेतृत्वात झालेल्या युद्धाचे अप्रतिम वर्णन असलेले 'अभिनयपद' सादर करण्यात आले. 'तीन अवर्तनम्‌' हा मृदंगाच्या गतिमान बोलावरील शुद्ध पदन्यास सादर झाला. स्त्रीशक्ती व सामजिक विषयावर भाष्य करणाऱ्याने सांगता झाली. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाने समारोप झाला. 'विलंबित रूपक' तालातील 'एरी आले भज जाग' बंदिश त्यांनी गायली. त्यानंतर 'बसंत' रागातील 'फगवा ब्रिज देखन को चल री' ही तीन तालातील बंदिश सादर केली. शास्त्रीय गायनाचे उत्कट सादरीकरण रसिकांना विशेष भावले. या महोत्सवाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऋतुरंग महोत्सवानिमित्त चार दिवस कलाग्राममध्ये हस्तकलांचे प्रदर्शन भरवण्यात आले. घरगुती वस्तू, खाद्य पदार्थ, औषधी, घोंगड्या, चपला, आभूषणे, चित्र, शिल्प अशा विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळा अभयारण्य मराठवाड्याचे वरदान

$
0
0

एस. पी. जयकर
गौताळा अभयारण्यातील साधारणतः २१ हजार हेक्टर क्षेत्र हे जैवविविधता, पर्यावरणपूरक, विविध वनस्पती, निरनिराळे तृणभक्षी व मांसभक्षी प्राणी, नैसर्गिक, भूआकृतिक, प्राणिशास्त्राच्या दृष्टीने अगदी परिपूर्ण व विविधतेने नटलेले, उंच-उंच डोंगर व खोल दऱ्या अशा विस्तीर्ण प्रदेशाचे हे क्षेत्र अभयारण्य घोषित करण्यास योग्य आहे, असे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारला वाटले, त्यावेळेस म्हणजे २५ फेब्रुवारी १९८६ रोजी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यातील काही क्षेत्र मिळून गौताळा औट्रम घाट अभयारण्य घोषित केले. आज अभयारण्य तीस वर्षांमध्ये विविध वृक्ष, फुले, वेली व विविध प्राणी यांनी नटलेले आहे.
अगदी घोषित झाल्यापासून दहा ते अकरा वर्षे परंपरागत पद्धतीने अभयारण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. फक्त अभयारण्य घोषित केले. एवढा सोपस्कार करून शासनाने व्यवस्थापनाकरिता अभयारण्य औरंगाबाद वन विभागाच्या ताब्यात दिले. अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये पितळखोरा लेणी, पाटणादेवी मंदिर, महादेव मंदिर, सीतान्हाणी, गौतम ऋषी मंदिर हे पुरातत्त्व विभागाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची ठिकाणे आहेत. अंतुरचा किल्लाही प्रसिद्ध आहे. गौताळा अभयारण्य हे अजिंठा व सातमाळाच्या पर्वतरांगांमध्ये पसरलेले असून तेथील उंची समुद्रसपाटीपासून ९४३ मीटरएवढी आहे. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानुसार जानेवारी १९९७ मध्ये अभयारण्य वन्यजीव विभागास हस्तांतर करण्यात आले आणि येथूनच गौताळा अभयारण्याच्या व्यवस्थापनाकरिता स्वतंत्र विभाग मिळाला व त्याच्या भरभराटीस सुरूवात झाली.
गौताळा अभयारण्याचा प्रथम व्यवस्थापन आराखडा २००३-२००४मध्ये तयार करण्यात आला. त्यामध्ये गौताळा अभयारण्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे वन्य प्राणी म्हणजे बिबट्या, रानडुक्कर, नीलगाय, हरिण, तरस, कोल्हे, लांडगे इत्यादींचे संरक्षण व विकासांवर भर देण्यात आला. अभयारण्यामध्ये अस्तित्वात असलेली जैवविविधता विशेषतः बिबट्या व त्याच्या भक्ष्यांचे संवर्धन करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. मर्यादित स्वरुपामध्ये वन पर्यटनास चालना देण्यात आली व त्याचबरोबर पुरातत्त्वीय महत्त्व लाभलेले ठिकाण, मंदिर, लेणी यांचासुद्धा विकास करण्यात आला.
वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्याकरिता महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा अधिवास होय. या व्यवस्थापन आराखड्याचे दहा वर्षांच्या कालावधीमध्ये अधिवास विकासावर जास्त भर देण्यात आला. मर्यादित स्वरुपाचे उपलब्ध नैसर्गिक पाणीसाठे व त्यामधील पाणी असण्याचा कालावधी लक्षात घेऊन कृत्रिम पाणवठे तयार करण्यावर जास्त भर देण्यात आला. त्याचबरोबर मृदा व जलसंधारणाकरिता सिमेंट नालाबांध, माती बंधारे, लूज बोल्डर स्ट्रक्चर, गॅबियन पद्धतीचे बंधारे घेण्यात आले. यामुळे वन्य प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला व त्यामुळे नैसर्गिक झाडोरा निर्माण होण्यास मदत झाली.
गौताळा अभयारण्य हे मराठवाड्यातील एकमेव मोठे अभयारण्य आहे. सहाजिकच त्याचे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. पर्यटकांचा अभयारण्यामध्ये सतत ओघ सुरू असतो. अभयारण्याच्या सुरुवातीस प्रवेशद्वाराजवळ अभयारण्याचा नकाशा असून त्यामधील प्रेक्षणीय स्थळे, धबधबे, मंदिर इत्यादींची माहिती दिली आहे. हिवरखेडा येथेच पर्यटकांना माहिती देण्याकरिता निसर्ग निर्वचन केंद्र तयार करण्यात आले आहे आणि अगदी तशाच प्रकरचे निर्वचन केंद्र पुरणवाडी येथे तयार करण्यात आले आहे, जे २०१५ मध्ये पर्यटकांकरिता खुले करण्यात आले. हिवरखेडा येथील निसर्ग निर्वचन केंद्रात लिखित स्वरुपाची माहिती असून पुरणवाडी येथील केंद्रामध्ये मोठमोठे पोस्टर्स व वन्य प्राण्यांची प्रतिकृती याद्वारे माहिती देण्यात आली आहे.
असे असले तरी अभयारण्याचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले अतिक्रमण. अंदाजे ४०० ते ५०० हेक्टर क्षेत्रावर ज्ञात असलेले अतिक्रमण आहे. वन हक्क कायदा २००५ पासून अंमलात आल्यापासून स्थानिक लोकांचा अतिक्रमण करण्याकडे कल वाढला आहे. तसेच वनाचे हद्दी स्पष्ट व कायम नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणाबरोबर तेवढ्याच महत्त्वाचा व फार परिणाम करणारा घटक म्हणजे अवैध चराई. स्थानिक लोकांचे पाळीव प्राणी अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चराई करतात. त्यामुळे एक तर तृणभक्षक वन्य प्राण्यांचे खाद्य कमी होते व दुसरे म्हणजे चराईमुळे जमिनीची धूप होऊन नैसर्गिक पुनरुत्पादन थांबते. अद्यापही स्थानिक लोकांमध्ये स्टॉल फीडिंगची संकल्पना रुजली नाही. अभयारण्यास उन्हाळ्यामध्ये वारंवार आग हे अभयारण्यासाठी घातक कारण आहे. दहा वर्षांपूर्वी लागणारी आगीची वारंवारता व व्याप्ती आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली. अभयारण्यामध्ये आवश्यक मोक्याच्या ठिकाणी बांधलेले निरीक्षण मनोरे, चेक पोस्ट, नैसर्गिक पाऊलवाटा यामुळे आग लवकर नियंत्रणात आणता येते. गौताळा अभयारण्याच्या विकासामध्ये महत्त्वाचा अडथळा म्हणजे अभयारण्यातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग. गौताळा अभयारण्यातून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ व कन्नड ते सिल्लोड, कन्नड ते नागद हे रस्ते जात आहेत. या रस्त्यांवरील २४ तास होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हलचाली व अधिवासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. भरधाव वाहनांमुळे वन्य प्राण्यांचे अपघात होतात. अभयारण्याच्या विकासाच्या दृष्टीने स्थानिक लोकांचे योगदानही महत्त्वाचे आहे. लगतचे शेतकरी उन्हाळ्यात शेतातील राब जाळताना काळजी घेत नाही. वाऱ्यामुळे नजिकच्या शेतांतील आग वनाला लागून मोठ्या प्रमाणात वन्यजीव, झाडे, गवताचे नुकसान होते. अभयारण्याच्या लगतच्या गावांमध्ये परिस्थितीकीय विकास समिती स्थापन करण्यात यत आहे. जेणेकरून अशावेळी ग्रामस्थांचे सहकार्य लाभेल आणि ग्रामस्थांनीसुद्धा अशावेळेस स्वतःहून सहकार्य करणे गरजेचे आहे. एखाद्या गावामध्ये चोरी करताना चोर पकडला तर संपूर्ण गाव त्याच्यामागे लागते व त्याला पकडून दिल्या जाते. परंतु त्यांचेच अभयारण्य असून त्याच अभयारण्यातून त्यांच्या काही प्रमाणात गरजा पूर्ण होतात. एखादे झाड तोडत असताना त्याला कोणीही हटकत नाही. मला त्याच्याशी काय देणे-घेणे, ही भावना दिसून येते. ही सत्य; परंतु विदारक परिस्थिती आहे.
वन जमिनीवरील अतिक्रमणांची संख्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जर जमीनच राहिली नाही तर वन्य प्राणी, त्यांचे अधिवास, पर्यटन काहीच राहणार नाही. वन हक्क कायद्यामुळे अप्रत्यक्षपणे अतिक्रमण करण्यास चालना मिळत आहे. गौताळ्यात पर्यटनास मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग करून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो. त्याच्या आधारावर त्यांचे सहकार्य घेतले जाऊ शकते. सध्याचे स्थितीमध्ये अभयारण्याचे व्यवस्थापन चांगल्या रितीने सुरू आहे असे दिसते. वन्य प्राण्यांच्या प्राथमिक गरजा पुरविण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर चांगले काम सुरू आहे. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले व वन कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम केले तर, गौताळा अभयारण्य ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर येणारा दिवस दूर नाही, एवढे निश्चित!
(लेखक निवृत्त सहायक वन संरक्षक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणे, गोल्फ क्लब क्रीडांगण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुधारित शहर विकास आराखड्यात क्रीडांगणांच्या आरक्षणांचे प्रमाण कायम राखण्यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी चमत्कार घडवला आहे. मिटमिटा परिसरातील एमजीएमच्या गोल्फ क्बलवर चक्क क्रीडांगणाचे आरक्षण टाकले आहे. या चमत्कारामुळे नकाशात क्रीडांगण तर दिसते, पण हा परिसर सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार का, असा प्रश्न आहे.
औरंगाबादचा सुधारित शहर विकास आराखडा पाच सेक्टरमध्ये तयार करण्यात आला. पहिल्यासेक्टर मध्ये मिटमिटा, पडेगाव, भावसिंगपुरा, रावरसपुरा, पहाडसिंगपुरा हा परिसर येतो. प्रत्येक सेक्टरमध्ये एक हजार लोकसंख्येसाठी ०.४० हेक्टर क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित असावे, असा हा निकष आहे. पहिल्या सेक्टरमध्ये २०२६ पर्यंतची लोकसंख्या १ लाख ६० हजार गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार क्रीडांगणासाठी चाळीस जागा आरक्षित करायला हव्यात. त्यासाठी ६४ हेक्टर क्षेत्राची गरज आहे. उपसंचालकांनी सुधारित विकास आराखडा तयार केला. त्या आराखड्यात पहिल्या सेक्टरमध्ये क्रीडांगणासाठी ४० साइटस् ठेवल्या व त्यांचे क्षेत्र ६८.२६ हेक्टर ठेवले. पदाधिकाऱ्यांनी या आराखड्यात 'सुधारणा' करताना क्रीडांगणाच्या साइटस् ४० वरून ३२ केल्या आणि क्षेत्रफळ मात्र ८३.९९ हेक्टर ठेवले. पदाधिकाऱ्यांनी आरक्षण क्रमांक ७४ चे २३.६६ हेक्टर क्षेत्र क्रीडांगणासाठी गृहित धरले आहे. ८३.९९ हेक्टरमधून २३.६६ हेक्टर वजा केल्यास ६०.३३ हेक्टर उरतात. एमजीएमच्या गोल्फ क्लबचे क्षेत्रफळ २३ हेक्टर आहे. हे क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित ठेवण्याच्या जागांच्या क्षेत्रफळात मिसळून क्रीडांगणांचे क्षेत्रफळ निकषापेक्षा जास्त म्हणजे ८३.९९ हेक्टर दाखवण्यात आले आहे. हे आरक्षण असेच कायम राहिले तर, सर्वसामान्यांना या महागड्या गोल्फ क्लबच्या जागेचा वापर क्रीडांगण म्हणून करता येईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसस्थानक परिसरात ३२ हजाराला लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाहेरगावच्या दोन प्रवाशांना वेगवेगळ्या घटनेत गुन्हेगारांचा फटका बसला. पुण्याच्या प्रवाशाचे ३२ हजार रुपये मारहाण करून लुबाडण्यात आले तर, नेवासा येथील एका प्रवाशाचे पाकिट लंपास करण्यात आले, त्यात दहा हजार रुपये होते. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवराज सोपान ढेरंगे (वय ३५ रा. थेरगाव, चिंचवड, पुणे) हे सोमवारी रात्री अकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले होते. पुण्याला जायचे असल्याने पादचारी पुलाखाली ते खासगी बसची चौकशी करण्यासाठी उभे होते, तेव्हा चार अनोळखी तरुणांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, रोख रक्कम, कानातील बाळी आदी ३२ हजार रुपायांचा ऐवज लुबाडला. दुसऱ्या घटनेत देवीदास पद्माकर गोरे (वय ३२, रा. रामडोह ता. नेवासा) यांचे दहा हजार रुपये असलेले पाकीट मारण्यात आले. ते मंगळवारी सायंकाळी बाबा पेट्रोलपंप येथून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणाऱ्या रिक्षात बसले. या प्रवासात ही पाकिटमारी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य अभियंत्याच्या घरी सापडले घबाड

$
0
0

औरंगाबाद ः जलसंपदा विभागाचा निवृत्त मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी यांच्या सहकारनगर येथील घरझडतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लाखोचे घबाड सापडले. पोलिसांनी घरातून ३५ तोळे सोने, बँकेच्या लॉकरमधून २७ तोळे सोने, साडेसातशे ग्रॅम चांदी, रोख ८२ हजार रुपये जप्त केले. चंद्रपूर येथील घोडाझरी कालवा सिंचन घोटाळा प्रकरणी सूर्यवंशी यांच्यासह सात जणांवर नागपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोपान रामराव सूर्यवंशी यांचा सहकारनगर प्लॉट क्रमांक २१ येथे 'सूर्यवंशी' नावाने मोठा बंगला आहे. नागपूर येथे गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या औरंगाबाद येथील घराची झडती घेण्याचे आदेश औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून घरझडती घेण्यात आली. उपअधीक्षक सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक विकास पाटील, संग्रामसिंह राजपूत व पथकाने ही घरझडती घेतली. यामध्ये घरातून ३५ तोळे सोने, ८२ हजाराची रोख व पाच ते सहा महत्त्वाच्या फाइल, कागदपत्रे हाती लागली. बँक लॉकरच्या चाव्या सापडल्या होत्या, पोलिसांनी बुधवारी महाराष्ट्र बँकेच्या लॉकरची झडती घेतली. त्यात २७ तोळे सोने व ७५० ग्रॅम चांदीचे दागिने सापडल्याची माहिती उपअधीक्षक सुरेश यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३६ लाख भरण्याचे ‘प्रोझोन’ला आदेश

$
0
0

म. टा .विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
एम्पायर (प्रोझोन) मॉलने वाढीव मालमत्ता करापोटी पन्नास टक्के रक्कम (३६लाख ) भरावी व उर्वरित रकमेसाठी महापालिकेने सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी बुधवारी दिले.
एम्पायर (प्रोझोन) मॉलला महापालिकेने ७२ लाख ६२ हजार रुपयांच्या फरकाच्या रकमेची डिमांड नोटीस बजावली आहे. मॉल सुरु झाला, त्यावेळी महापालिकेसबोत रस्ते व अन्य पायाभूत सुविधेच्या संदर्भात करार झाला होता. यावर मॉलने पाच कोटी रुपयांचा खर्च केलाला आहे. तो खर्च २०१५ पर्यंतच्या करापोटी वळता करण्याचे करारात नमूद आहे. याशिवाय मॉलने २०१५-१६ साठी ६२ लाख रुपये महापालिकेकडे भरलेले आहेत. मात्र, महापालिकेने ८ जानेवारी रोजी ७२ लाख ६२ हजार रुपये फरकाची रक्कम म्हणून डिमांड नोटीस पाठवल्याने मॉलतर्फे खंडपीठात आव्हान देण्यात आले. महापालिकेने बजावलेले नोटीस रद्द करावी, अशी विनंती याचिकेत केली आहे. मॉलने रक्कम भरली आहे, मात्र त्यांना पुनर्मुल्यांकन करून कराच्या फरकाची रक्कम मागितली आहे. यासाठी म्हणणे मांडण्यासाठी मॉलला पंधरा दिवसाची मुदत दिली होती. त्यांनी मुदतीत म्हणणे मांडले नाही, असा युक्तिवाद पालिकेचे वकील अतुल कराड यांनी केला. सुनावणीनंतर मॉलने पन्नास टक्के रक्कम भरावी व उर्वरित रकमेसाठी महापालिकेने सुनावणी घेऊन एक महिन्यात निर्णय घ्यावा, असे आदेश खंडपीठाने दिला. मॉलतर्फे रामेश्वर तोतला यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रेकरच हवे; लाक्षणिक उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुनील केंद्रेकर यांना महापालिका आयुक्तपदी कायम ठेवावे या मागणीसाठी नागरी विकास कृती समितीतर्फे बुधवारी क्रांतिचौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 'केंद्रेकर लाओ, औरंगाबाद बचाओ' अशी भूमिका घेतली आहे.
पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांची बदली झाल्यानंतर शासनाने सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. तीन महिन्यांच्या कार्यकाळात केंद्रेकर यांनी महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामांना आळा घातला. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प, भूमिगत गटार योजनेचा प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांवर नियंत्रण मिळवले. एलईडी दिव्यांचे टेंडर रद्द करण्याची प्रक्रिया करून महापालिकेचे सुमारे ८० कोटी रुपये वाचवण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी विविध योजनांची आखणी केली. या कामांमुळे केंद्रेकर किमान तीन वर्ष आयुक्त असावेत, अशी मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली. परंतु, शासनाने पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची महापालिका आयुक्तपदी बदली केली. त्यामुळे केंद्रेकर यांनाच पालिका आयुक्तपदी कायम ठेवा, या मागणीसाठी नागरी विकास कृती समितीतर्फे श्रीकांत उमरीकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी क्रांतिचौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख, सचिव सारंग टाकळकर, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचे विश्वस्त प्रा. शरद अदवंत, मोहन फुले, श्याम देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह अन्य नागरिकांनी भेट देऊन समर्थन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका महिन्यात बसणार चार चौकांत रणगाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील चौकांच्या सुशोभीकरणासाठी छावणी परिषदेने पुढाकार घेतला असून, महापालिकेच्या सहकार्याने पाच प्रमुख चौकांत रणगाडे बसवण्याची तयारी दाखवली आहे. महापालिकेने चार रणगाड्यांसाठी चौक निश्चित केले आहेत. आवश्यक ते बांधकाम करून तेथे रणगाडे बसवले जाणार आहेत.
चौकांच्या सुशोभीकरणासाठी छावणी परिषदेने रणगाडे द्यावेत, यासाठी महापालिकेचे तत्कालिन आयुक्त प्रकाश महाजन यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन पाच रणगाडे देण्याची तयारी छावणी परिषदेने दाखवली. दरम्यानच्या काळात महाजन यांची बदली झाली. सुनील केंद्रेकर यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांनी चौकांच्या सुशोभीकरणात अधिक रस घेतला. खासगी संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून चौकांच्या सुशोभीकरणाची मोहीम त्यांनी हाती घेतली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. छावणी परिषदेकडून मिळाणाऱ्या रणगाड्यांसाठी त्यांच्या सूचनेनुसार चौकदेखील निश्चित करण्यात आले. चार चौकांत रणगाडे बसवण्यासाठी आवश्यक ते बांधकाम करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिडको कॅनॉट, विमानतळासमोरचा चौक, विभागीय आयुक्त कार्यालयासमोरचा चौक व उस्मानपुरा चौक या चौकात रणगाडे ठेवले जाणार आहेत. पाचव्या रणगाड्यासाठी एक चौकाची निवड अद्याप झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाचणीकडे शाळांचा ‘कल’ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कलचाचणी घेण्यात शाळांची उदासीन असल्याचे समोर आले आहे. कलचाचणी घेण्याची मुदत २५ फेब्रुवारी रोजी संपत आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत विभागातील केवळ ३२ टक्केच विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात यश आले आहे. त्यामुळे कलचाचणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

दहावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने यावर्षीपासून राज्यात कलचाचणीचा उपक्रम घेण्यात येत आहे. ८ ते २५ फेब्रुवारीपर्यंत शाळांना कलचाचणी घेणे बंधनकारक करण्यात आली होती. शाळांनी मात्र ही चाचणी घेण्याकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. कलचाचणीची तयारी दोन महिन्यांपासून सुरू होती. शाळांचे संगणक सर्वेक्षण करण्यात आले.

संगणक सुविधा नसलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी जवळ असलेल्या शाळेत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतरही शिक्षण विभागाच्या या उपक्रमाला शाळांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सोमवारी सायंकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार औरंगाबाद विभागात ३२ टक्केच विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

यंदा विभागातून १ लाख ७२ हजार विद्यार्थी दहावी परीक्षा देत आहेत. आकडेवारीनुसार त्यापैकी केवळ ५५१३२ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली आहे.

कलचाचणीतून विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मेडिकल, कॉमर्स, फाइन आर्ट अशा पाच क्षेत्रांबाबतचा कल कळणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या आवडीनुसार करिअरचे क्षेत्र निवडण्यास मदत होणार आहे.

ऑफलाइनचीही संख्या जेमतेम
शाळांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने कलचाचणी घेण्याची मुभा होती. यात संगणक नसल्याने अनेक शाळांनी ऑफलाइन पद्धतीने चाचणी घेतल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात विभागात केवळ ६ हजार ७१९ विद्यार्थ्यांचीच ऑफलाइन कलचाचणी घेण्यात आली. सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली.

कलचाचणी देणारे विद्यार्थी
जिल्हा......ऑफलाइन......ऑनलाइन
औरंगाबाद....१९१५...........१८९२४
बीड.............१६२६...........१२९५५
परभणी........९७४.............८८७९
हिंगोली........१०८८...........३३२
जालना.........१११६..........७३२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलालाने फोडल्या ऑफिसच्या काचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालयामध्ये मंगळवारी सायंकाळी एका मद्यपी दलालाने कार्यालयाच्या काचा फोडल्याची घटना घडली.
सायंकाळी सह दुय्यम निबंधक वर्ग २, औरंगाबाद क्रमांक २ व ५ येथे रजिस्ट्री नोंदणीचे कामकाज सुरू असताना नरेश साळुंके या दलालाने कार्यालयामध्ये गोंधळ घातला. कार्यालयाच्या मुख्य दरवाजाची काचा फोडल्या व स्वतःवर वार करून घेतला आणि सह दुय्यम निबंधक जे. एम. शेरकर यांना मारहाण व शिवीगाळ केली.
या घटनेनंतर बुधवारी नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नरेश साळुकेला अटक होत नाही, तोपर्यंत दस्त नोंदणीचे कामकाज बंद ठेवले. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदनही दिले. सोळुंके हा मुद्रांक कार्यालय येथे खासगी मोटारसायकलची पार्किंगचे काम पाहत होता, मात्र काही दिवसांपूर्वी पार्किंगच्या कामाहून त्याला काढण्यात आले होते. त्यानंरत नरेश हा त्याच कार्यालयात दलाल म्हणून काम करू लागला. मंगळवारी सायंकाळी शेरकर हे सहकाऱ्यांसह कार्यालयात काम करत असताना तो तेथे मद्य प्राशन करून आला व त्याने कार्यालयाच्या मुख्य दरवाजाची काच फोडली. शेरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी गोंधल घातला. याप्ररकणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सायंकाळी सोळुंकेला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी भाषा दिनानिमित्त निबंध स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माय मराठीला ज्ञानपीठ सन्मान मिळवून देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी) 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने 'बाळगा मराठीचा अभिमान' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस मराठी भाषादिन म्हणून साजरा केला जातो. शालेय गटासाठी ठेवण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत ७ वी ते ९ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. मयूरबन कॉलनीतील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात (प्रियदर्शनी, इंदिरानगर) २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता या निबंध स्पर्धेला सुरुवात होईल. मयूरबन कॉलनी (वार्ड क्र. ११०) येथील नगरसेविका स्मिताताई घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी ९८२२६३०५५५ या क्रमांकावर
संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून झाला पाणी सोडण्याच्या निर्णयाला विलंब!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाण्याचे गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना अशा विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर त्यावर जिल्हा प्रशासनाने आठ दिवस काहीही केले नाही. आठ दिवसानंतरही जिल्ह्यांकडून पाण्याच्या मागणीबाबत सविस्तर अहवालच विभागीय आयुक्त कार्यालयाला न मिळाल्यामुळे पाणी सोडण्याच्या निर्णयाला विलंब झाल्याचे मानले जात आहे.

जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे उपयुक्त पाण्याच्या वापरासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांनी आठ दिवसांपूर्वी औरंगाबाद, जालना, परभणीचे जिल्हाधिकारी; तसेच इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तीन दिवसांत पाण्याची मागणीसंदर्भात सविस्तर अहवाल मागवला होता. जायकवाडी धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या महापालिका, नगर पालिका, ग्रामपंचायतींना जून महिन्यापर्यंत किती पाण्याची आवश्यकता आहे, उपलब्ध पाणीसाठ्याचे बारकाईने नियोजन कसे करता येईल, पाण्याचे स्त्रोत किती, याबाबत माहिती मागवण्यात आली होती, मात्र जिल्ह्यांकडून सविस्तर माहितीच मिळाली नसल्यामुळे पाण्याच्या निर्णयाला विलंब झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; जिल्हा परिषदेने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांकडे पाण्याची मागणीच केली नाही. परभणी जिल्ह्याने २५ दशलक्ष घनमीटर, औरंगाबाद जिल्ह्याने १५ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज असल्याचे सांगितले, मात्र त्याचा वापर कसा करणार, याबाबत तपशील पाठवली नसल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला.

मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पाण्याच्या नियोजनाबाबत 'अॅक्शन प्लान'तयार करण्यासाठी बैठक घेण्यात आली, मात्र सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखडा रद्द करा; सचिवांना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुठलाही कायदेशीर आधार न घेता, सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात न घेता औरंगाबाद महापालिका क्षेत्रासाठी सादर केलेला प्रारूप सुधारित विकास आराखडा रद्द करावा, क्षेत्राचे नव्याने सर्वेक्षण करावे, चुकीच्या पद्धतीने आराखडा प्रसिद्ध करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर करावी व या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमावी, अशी मागणी औरंगाबाद विकास आराखडा विरोधी नागरी कृती समितीने केली.

समिती सदस्यांनी मंगळवारी मुंबईत नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांची भेट घेतली. शिष्टमंडळात अॅड. सय्यद अक्रम, राजेंद्र दाते पाटील, राजेश मुंडे, राजकुमार जाधव, मोहमंद शोएब यांचा समावेश होता. समितीच्या पुढाकाराने आराखड्याबाबत नागरिकांना काही आक्षेप असतील ते नोंदविण्यासाठी जागृती उपक्रम राबविला होता. चार दिवसांत ६०० हून जास्त आक्षेप जमा झाले. समितीने करीर यांच्याशी चर्चा करताना हे आक्षेप तसेच समितीने जमा केलेली कागदपत्रे, जुने व नवीन नकाशे सोबत नेले होते. सुधारित प्रारूपमधील चुका निदर्शनास आणून देऊन अक्रम यांनी ४०० हून अधिक पानांचा तक्रार अर्ज सादर केला. राजेंद्र दाते पाटील यांनी नकाशाच्या आधारे करीर यांना विविध चुका निदर्शनास आणून दिल्या. बेकायदेशीरपणे २५९ आरक्षणे वगळण्यात येऊन ५४९ एवढीच आरक्षणे दाखविली गेली. कायद्यात अपेक्षित अनेक बाबींचा बारकाईने व गांभीर्याने विचार न केल्यामुळे शहराच्या भविष्यकालीन विकासासाठी हा प्रारूप आराखडा अडचण ठरणारा आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळाने डॉ. करीर यांना जुन्या व नवीन दहा नकाशांच्या आधारे बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरू दिसले..', 'माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल....', 'निघालो घेऊन दत्ताची पालखी' अशा एक ना अनेक गाण्यांनी श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. स्वरभक्ती ऑर्केस्ट्राचे सतीश भोसले आणि पंडित गिरीष गोसवी यांच्या बुधवारी गायनाचा कार्यक्रम झाला.

सतीश भोसले आणि डॉ. धनश्री सरदेशपांडे यांच्या संचाने गायनाला सुरुवात केली. 'शेगावीचे गजानन स्वामी माझे', 'स्वामी गजानना हो शेगावीचा', 'स्वामी गजानन देई झुणका भाकरी', 'सूर निरागस हो', 'पालखी निघाली भक्तीसंगे गजानन', 'गणगणात बोते म्हणून लावा अंगारा' अशा १०-१२ गाण्यांची सतीश भोसले आणि डॉ. धनश्री सरदेशपांडे यांनी रसिकांना खिळवून ठेवले. यानंतर मंचाचा ताबा पंडित गिरीष गोसवी यांनी घेतला. त्यांनी सहा गाणी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी 'उभा चंद्रभागे तिरी', 'सौभाग्यदा लक्ष्मीबारम्मा', 'मै केही समजाऊ सब जग अंब', 'कमल मुख समभज' ही गाणी सादर केली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तबल्यावर जीवन कुलकर्णी, जगदीश व्यवहारे, बासरीवर गिरीश काळे, संवादिनीवर रामभाऊ घोडके, स‌िंथेसायझरवर मिलिंद डोलारे यांनी साथसंगत केली. 'गुरू परब्रह्म स्वामी गजानन' या भैरवीनेस समारोप करण्यात आला. विशाखा रुपल यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कपांटात प्रयोगशाळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनेक शाळा, कॉलेजांमध्ये प्रयोगशाळांची अवस्था दयनीय आहे. त्याठिकाणी आवश्यक साधनसामग्री नसल्याने प्रात्यक्षिके कागदवरच केली जातात. मोहटादेवी प्राथमिक शाळेत अवघ्या दोन कपाटांत प्रयोगशाळा असल्याचे मंडळाच्या अध्यक्षांना आढळले. त्यावरून शाळेला नोटीस बजाविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही शाळा शिक्षक संघटनेच्या नेत्याशी संबंधित आहे. दहावी, बारावी परीक्षा केंद्र देण्यावरून संघटना आणि विभागीय मंडळ अध्यक्ष यांच्यात काही दिवसांपूर्वी 'तू तू मै मै' झाली होती. तेव्हापासून संघटनांच्या नेत्यांशी संबंधित शाळा मंडळाच्या रडावर अाल्याची चर्चा आहे.

दहावी, बारावीला प्रात्यक्षिकांचे गुण भरभरून देण्यात येतात. अनेक शाळा, ज्युनिअर कॉलेजांतील प्रयोगशाळांत आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत. मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी म्हारोळा फाटा येथील मोहटादेवी माध्यमिक शाळेला भेट देत पाहणी केली. तेथील प्रयोगशाळेत आवश्यक ते साहित्य नसल्याचा ठपका मंडळाच्या अध्यक्षांनी ठेवला आहे. दोन कपाटांतच प्रयोगशाळा असल्याचे मंडळ अध्यक्षांना आढळले. या शाळेला कारणेदाखवा नोटीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाच्या अध्यक्षांनी बुधवारी भेट दिलेली शाळेचे मुख्याध्यापक काँग्रेस शिक्षक आघाडीचे राज्यध्यक्ष मनोज पाटील हे आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील विविध संघटनांच्या नेत्यांनी मंडळ अध्यक्षांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आयुक्तांकडे तक्रार केली होती. संघटना आणि अध्यक्षांचा हा वाद राज्यभर चर्चेत होता. दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान शाळेला भेट देणे, हा दबावतंत्राचाही भाग असल्याची चर्चा आहे.

शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी प्रयोगशाळा दोनच कपाटात होती. प्रयोगशाळा अपुरी असल्याने आणि प्रात्यक्षिकांचे पुरेसे साहित्य नसल्याने शाळेला कारणेदाखवा नोटीस दिली आहे.
- सुखदेव डेरे, विभागीय अध्यक्ष, शिक्षण मंडळ

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्या गैरकारभाराविरोधात आम्ही आयुक्तांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे त्यांनी हे प्रकार सुरू केले आहेत. तक्रारी मागे घ्या, मग तुमच्यावर कारवाई करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
- मनोज पाटील, मुख्याध्यापक, मोहटादेवी माध्यमिक विद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images