Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘नगररचनाचे अस्तित्व स्वतंत्र कसे?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत नगररचना विभागाचे स्वतंत्र अस्तित्व कसे काय, असा सवाल ओमप्रकाश बकोरिया यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच अधिकाऱ्यांना विचारला. या विभागाच्या कारभाराकडे विशेष लक्ष देण्याचे त्यांनी सूचित केले.

ओमप्रकाश बकोरिया यांनी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी दहा ते पंधरा मिनिटे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; नगररचना विभागाबद्दल त्यांनी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नगररचना विभागाचे प्रमुख कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा सहाय्यक संचालक या विभागाचे प्रमुख असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्याशिवाय या विभागाचे दुसरे कुणीही प्रमुख नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. इतर महापालिकांत नगररचना विभाग शहर अभियंत्यांच्या नियंत्रणात असतो. या महापालिकेत या विभागाचे अस्तित्व स्वतंत्र कसे काय, असा प्रश्न त्यांनी केला.

या विभागाच्या कारभाराकडे लक्ष द्यावे लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले. उपायुक्त अय्युब खान यांना त्यांनी मालमत्ता कर वसुलीबद्दल माहिती विचारली. आतापर्यंत ४० टक्के वसुली झाल्याचे अय्युब खान यांनी सांगितल्यावर बकोरिया अवाक् झाले. वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. आता यापुढे तुमच्या विभागाशी माझा रोजचा संबंध येईल, असे त्यांनी अय्युब खान यांना सांगून टाकले.

सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना बकोरिया म्हणाले, 'आपल्या सर्वांना मिळून टीम म्हणून काम करायचे आहे. नुसतेच काम करायचे आहे असे नाही तर, भरपूर काम करायचे आहे. त्यासाठी तयार रहा.'

खासगी गाडीचा वापर
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ओमप्रकाश बकोरिया कुटुंबीयांना आणण्यासाठी दुपारी अडीचच्या सुमारास पुण्याला रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास पुण्याहून एका ट्रकमध्ये त्यांच्या घरचे सामान आले. आयुक्तांच्या शासकीय बंगल्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सामान उतरवून घेण्यात आले. पुण्याहून बकोरिया यांना औरंगाबादला आणण्यासाठी पालिका आयुक्तांची इनोव्हा गाडी काल रात्रीच पालिका प्रशासनाने पुण्याला पाठवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; इनोव्हा गाडीऐवजी बकोरिया खासगी गाडीतून औरंगाबादेत आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सचिनने रस्त्यासाठी दिले ४० लाख

$
0
0

अतुल कुलकर्णी, बीड

खासदारांना सर्वसामान्य नागरिकाने पत्र पाठविले आणि त्यांनी त्याची लगेचच दखल घेतली. कामासाठी पैसेही दिले, असा अनुभव दुर्लभ, पण बीड जिल्ह्यातील एका नागरिकाला असा अनुभव आला. मागणी मान्य करणारे खासदार आहेत विक्रमवीर सचिन तेंडुलकर. त्यांनी बालाघाटाच्या कुशीत वसलेले डोंगर पिंपळा ते कुरणवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी ४० लाख रुपये दिले आहेत. सचिनच्या खासदार निधीतून ही दोन गावे आता जोडली जाणार आहेत.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील रहिवासी बाबा जोशी यांनी विक्रमवीर सचिन तेंडुलकरपर्यंत आपल्या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची व्यथा पोचवली. १५ ऑगस्ट २०१४ रोजी एक साधे पत्र जोशी यांनी राज्यसभेचे खासदार असलेल्या सचिन तेंडुलकर यांना पाठवले. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षंानंतरही डोंगरपिंपळा आणि कुरणवाडी या गावांना जोडणारा पक्का रस्ता नसल्याचे त्यांनी पत्रातून सचिनला कळवले होते. हा रस्ता आपल्या खासदार निधीतून करण्याची विनंती त्यांनी या पत्रातून जोशी यांनी केली होती. दुर्गम भागातील लोकांची अडचण लक्षात घेऊन सचिनने त्यांची मागणी मान्य केली.

बाबा जोशी यांनाही पाठवलेल्या पत्राला प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. पत्र पाठविल्याचा त्यांना विसरही पडला होता, मात्र आठ महिन्यांनंतर अचानक खासदार सचिन तेंडुलकर यांचे स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांचा बाबा जोशी यांना फोन आला. त्यांनी संपर्क करून या गावच्या रस्त्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर काही दिवसांनी खासदार सचिन तेंडुलकर यांनी रस्त्याचे काम खासदार निधीतून करण्यास मंजुरी दिली आहे. तेंडुलकर यांनी रस्त्याच्या कामाला निधी देण्याची तयारी दर्शविल्याचा निरोप स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांनी जोशी यांना दिला. त्यावर थोडा वेळ जोशी यांचा ही विश्वास बसला नाही, मात्र या रस्त्याच्या कामासाठी सचिनने निधी उपलब्ध करून दिल्याचे पत्रच काही दिवसांनंतर प्राप्त झाल्याचे बाबा जोशी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. सचिनने निधी पाठवून त्याचे काम केले आहे. आता हा रस्ता चांगल्या दर्जाचा करणे ही जबाबदारी आहे. त्याच्या या कृतीने मोठा आनंद आणि एक रस्त्याची अडचण दूर होणार असल्याचे समाधान झाले, अशी प्रतिक्रिया जोशी यांनी दिली.

दुष्काळी भागलाही मदत मिळण्याची शक्यता

लिटल मास्टरने बीडच्या दुष्काळाची दखल घेतली आहे. सचिन तेंडुलकर यांचे स्वीय सहाय्यक कन्हान यांनी गेल्या आठवड्यात बीडमध्ये पाठवले होते. कन्हान यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुके म्हणून ओळख असलेल्या आष्टी आणि पाटोदा तालुक्याला भेट दिली. त्यामुळे आगामी काळात या भागाला ही सचिन मदतीचा हात या रस्त्याला निधी दिल्याप्रमाणे देऊ शकतो.

खासदार सचिन तेंडुलकर यांचा खासदार निधी मंजुरी पत्र अंबाजोगाई विभागातील रस्ता कामासाठी उपलब्ध झाले आहे. त्यावर पुढील कार्यालयीन कार्यवाही सुरू आहे.
- एन. टी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरेश बेदमुथा सक्तीच्या रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद सदस्यांनी नियमानुसार सांगितलेली कामे जाणीवपूर्वक टाळली जातात. गेल्या वर्षभरापासून सिंचन, बांधकाम, समाजकल्याण विभागातील विविध कामे नियमावर बोट ठेऊन थांबविली जातात. याच पद्धतीची दुसरी कामे मात्र मंजूर केली. अतिरिक्त सीईओ बेदमुथा यांचा विकास कामांबाबत उद्देश योग्य नाही. त्यामुळे त्यांना रक्तीच्या रजेवर पाठवा, त्यांच्याकडून कार्यभार काढून घ्या, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी सर्वसाधारण सभा झाली. अनुपालन वाचन सुरू असतानाच ई-निविदांचा विषय आला आणि सदस्य प्रशासनावर तुटून पडले. दीपकसिंह राजपूत, रामदास पालोदकर, डॉ. सुनील शिंदे, मनाजी मिसाळ, पुष्पा जाधव, प्रभाकर काळे, शैलेश क्षीरसागर, संतोष माने या सदस्यांनी थेट हल्ला चढवित अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. ई टेंडरिंगमध्ये अनेक कामे अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कितीतरी टक्के कमी रकमेने भरले जातात. त्यातून दर्जा टिकतो काय, असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला. सक्षम असलेल्या ग्रामपंचायतींना डांबरीकरण करण्यास परवानगी द्यावी, असा सरकारचा अध्यादेश असताना सदस्यांचे प्रस्ताव डावलले गेले, मात्र काही गावांत डांबरीकरणास परवानगी दिली गेली. सदस्यांनी हे सोदाहरण सभागृहाच्या निदर्शनास आणले. त्यावरून एकच गोंधळ उडाला.

अतिरिक्त सीइओ टार्गेट होत असताना सीईओ डॉ. अभिजित चौधरी, कॅफो उत्तम जाधव आणि अन्य अधिकारी हताश झाले होते. बेदमुथा यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवल्यानंतर प्रशासनाकडून भूमिका मांडावी, अशी मागणी पालोदकर, माने यांनी केली. कुणी बोलणार नसेल तर आमचा प्रस्ताव मांडतो, असे म्हटल्यानंतर बेदमुथा यांनी 'मी स्वतः जाऊन मार्गदर्शन आणतो,' असे म्हटल्यावर राजपूत म्हणाले, की सगळ्या गोष्टींवर जर शासनाकडून मार्गदर्शन मागविता तर तुम्ही कशाला आहात,'

असा सवाल उपस्थित केला. रामदास पालोदकर यांनी मात्र बेदमुथांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका करताना अतिरिक्त सीईओंना शासनाच्या सेवेत परत पाठवा, असा प्रस्ताव मांडला. सुनील शिंदे यांनी त्यांना अनुमोदन दिले. त्यावर डेप्युटी सीईओ छायादेवी शिसोदे यांनी नियमानुसार असा ठराव करता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर पालोदकर यांनी ' सक्तीच्या रजेवर पाठवा आणि त्यांचा कार्यभार काढून घ्या,' असा ठराव मांडला. त्यानंतर अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सदस्यांची बाजू घेतली.

आमचा निर्णय झालाय...
सीईओ चौधरी यांनी निवेदन केले. त्यात बेदमुथा यांच्या पुढाकाराने कोणत्या विभागांची कोणती कामे झाली हे सांगणे सुरू केल्यानंतर सुनील शिंदे यांनी मध्येच अडवून आमचा निर्णय झालेला असल्याचे सांगून विषयावर पडदा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरे शिवाजी महाराज विद्यार्थ्यांनी समजून घ्यावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. त्यामुळे आजच्या तरूण पिढींनी खरे शिवाजी महाराज समजून घेणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी येथे व्यक्त केले.

आर. आर. पाटील फाउंडेशनच्यावतीने शिवछत्रपती जन्मोत्सव व आर. आर. पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त देवगिरी महाविद्यालयात शुक्रवारी आमदार आव्हाड यांचे शिवचरित्र, शिवरायांचा राजकारण विषयक दृष्टिकोन याविषावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी नगरसेवक अभिजीत देशमुख, उपप्राचार्य अशोक तेजनकर, संयोजक अमोल कर्डिले आदींची उपस्थिती होती. आमदार आव्हाड म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी राजकारण केले की नाही, हे मला माहित नाही, मात्र त्यांनी उत्तमरित्या समाजकारण केले. शिवाजी महाराजांनी कधीच जात-पात-धर्म पाहिली नाही. जातीय

व्यव्यस्थेला त्यांच्या राज्यात कधीच थारा नव्हता. त्यामुळेच त्यांच्या सैन्यात विविध जातीधर्माचे मावळे होते. शेतकऱ्यांप्रती शिवाजी महाराजांना आत्मियता होती. वेळप्रसंगी त्यांनी अनेकवेळा शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी रिकामी करून शेतकऱ्यांना धीर देण्याचे कार्य केले.'

स्त्रियांविषयी देखील शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन अत्यंत आदरपूर्वक असा होता, मात्र आम्हाला फक्त अफजल खान व शिवाजी महाराज यांच्याबद्दलच सांगितले जाते. समाजात अनेकांनी त्याला पटेल तसे शिवाजी महाराज लोकांना सांगितले. त्यामुळे पूर्ण शिवाजी आम्ही समजूनच घेतला नाही. खरे तर विद्यार्थ्यांनी भावनिक होऊन चालणार नाही. प्रत्येकांनी शिवाजी महाराजांचे कार्य लक्षात घेऊन वाटचाल करा, असा सल्लाही आव्हाड यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समस्या मांडण्यास व्यासपीठ मिळाले’

$
0
0

औरंगाबाद : दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप'च्या रुपाने प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले आहे, अशा भावना 'मटा'चे 'सिटीझन रिपोर्टर' झालेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या.

या उपक्रमात गेल्या आठवड्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नरसिंग पारिपेल्ली, विनोद वट्टमवार, महेश चोपडे पाटील, लक्ष्मीकांत दंडगव्हाळ, शेखर जगताप यांचा प्रातिनिधिक स्वरुपात गैरव करण्यात आला. 'सभोवतीच्या प्रश्नांबाबत मनामध्ये खदखद असते. ती मांडण्यासाठी आतापर्यंत कोणतेही व्यासपीठ नव्हते.

मटा सिटीझन रिपोर्टरच्या माध्यमातून प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. या माध्यमातून शहरातील समस्या, सर्वसामान्यांना होत असलेला त्रास संबंधित यंत्रणांपर्यंत पोचविणे शक्य होत आहे. त्याचा नक्कीच परिणाम होतो,' अशी प्रतिक्रिया 'सिटीझन रिपोर्टर'नी व्यक्त केली. 'शहरासाठी आम्हाला काहीतरी करायला मिळत आहे, याचा आनंद वाटतो. आमच्याप्रमाणे अन्य नागरिकांनी या अॅपच्या माध्यमातून शहरातील समस्या 'मटा'कडे मांडाव्यात. त्यातून औरंगाबादकरांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल,' अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आपणही बनू शकता सिटीझन रिपोर्टर
वाचकहो, MT Citizen Reporter हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. या अॅपवरून 'मटा'कडे समस्या, प्रश्न, बातम्या, फोटो पाठवण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, तुम्हाला 'दिसणाऱ्या' बातम्या, सार्वजनिक हिताची छायाचित्रे मांडू शकता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या व्यासपीठावर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : मलई पावची लज्जत निराळी

$
0
0

Abdulwajad.Shailk@timesgroup.com
शहरात जुन्या हॉटेलपैकी श्री नागेश्वर उपाहारगृह. सुमारे ४० वर्षांपूर्वी हे एकमेव सुरू झाले. या हॉटेलमध्ये आजही पारंपरिक खाद्यपदार्थांची विक्री केले जाते. येथील मलई पाव हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. मलई किंवा दुधावरची साय काढण्यासाठी म्हशीचे पाणी न मिसळलेले दूध वापरले जाते. पॉकिट बंद किंवा अन्य दुधापेक्षा या दुधावर येणारी साय ही घट्ट असते. दररोज दहा लिटर दुधाची साय तयार केली जाते. दुधाला मोठ्या पातेल्यात गरम केले जाते. दूध थंड झाल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवले जाते. त्यामुळे दुधावरची साय सुद्धा अधिक घट्ट होते. ती एका एका भांड्यात काढली जाते. ही मलई ग्राहकांना सर्व्ह केली जाते. दुधावरची साय जशी काढण्यात येते तशीच ती ग्राहकांना सर्व्ह केली जाते. या मलईमध्ये काहीही मिक्स केले जात नाही. यामुळे काहीजण फक्त मलई खाण्यासाठी तर, काही जण मलाई पाव खाण्यासाठी येत असतात. काही जण मलई पावसोबत साखरही घेतात.

श्री नागेश्वर उपहार गृह हॉटेल चालविण्यासाठी घेतल्यानंतर काही खाद्यपदार्थ बदलण्याचा निर्णय घेतला होता, मात्र दररोज येणारे ग्राहक मलई पावची मागणी करीत हा पदार्थ तसाच ठेवण्यात आला आहे. एका पातेल्यात साठविलेली मलाई एक किंवा दोन दिवस वापरण्यात येते. त्यानंतर मलईपासून शुद्ध तूप तयार केले जातो, अशी माहिती हॉटेलचे ओमप्रकाश शर्मा यांनी दिली.

या हॉटेलमध्ये मलई पाव सोबतच, मिसळपावही प्रसिद्ध आहे. मिसळ तयार करण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे, मात्र श्री नागेश्वर उपाहारगृहात मिळणाऱ्या मिसळची चव जुन्या औरंगाबादकरांनी अनेक वेळ चखली आहे. अन्य हॉटेलपेक्षा या ठिकाणी मिळणाऱ्या मिसळची चव वेगळीच आहे. मिसळच्या मटकीचा रस्सा तयार करण्याची प्रक्रिया सकाळीच सुरू होते. गरम तेलात गरम मसाले, अालं-लसूण पेस्ट टाकली जाते. त्यात मिरची, मीठ, मटकी टाकली दाते.

मटकी आणि मसाले मिक्स केल्यानंतर त्यात पाणी टाकण्यात येते. मिसळ देताना, छोटी शेव, बडी शेव, भजे मिक्स केले जातात. त्यात मटकीचा रस्सा टाकून ग्राहकांना दिला जातो. नागेश्वर उपाहारगृहातील मिसळची चव वेगळी वाटते.

अशी जपली परंपरा
राजस्थानहून जुन्या औरंगाबाद शहरात आलेले बोलता रामजी शर्मा यांनी हे हॉटेल सुरू केले होते. जुन्या औरंगाबादमध्ये खडकेश्वर मंदिरात येणारे भाविक सकाळचा नाश्ता या हॉटेलमध्ये करीत असत. बोलता रामजी शर्मा यांच्यानंतर त्यांचा मुलगा निरंजन प्रसाद शर्मा यांनीही हे हॉटेल चालविण्यास सुरवात केली. निरंजन शर्मा यांच्यानंतर सुमारे पाच वर्षांपूर्वी हे हॉटेल त्यांचा मेव्हणे ओमप्रकाश शर्मा आणि भाचा सुनील शर्मा यांनी चालविण्यास घेतले आहे. सुनील शर्मा यांनीही काही वर्षे आपल्या मामासोबत या हॉटेलमध्ये काम केले. यामुळे ४० वर्षांपासून मलाई पाव आणि मिसळ पावचा स्वाद तसाच कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत अवयवदानाचा श्रीगणेशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वांत पहिल्यांदा 'ब्रेन डेड' रुग्णाचे अवयवदान होण्याचा बहुमान शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) पटकाविला आहे. अवघ्या दीड महिन्यात शहरातून चार 'ब्रेन डेड' तरुणांकडून तब्बल १७ अवयवांचे दान झाले आणि चौथ्या 'ब्रेन डेड' तरुणाचे आतापर्यंतचे सर्वाधिक सहा अवयवांचे दान घाटीतून झाले आहे, हे विशेष. त्यासाठी घाटीच्या विविध विभागांच्या तब्बल २५पेक्षा जास्त डॉक्टरांनी दिवस-रात्र २४ तास अखंड मेहनत घेऊन आणि आपले कौशल्य पणाला लावून घाटीमध्येही अवयवदान होऊ शकते, हे सिद्ध करून दाखविले.

वैजापूरच्या २७ वर्षीय 'ब्रेन डेड' तरुण गणेश शंकर घोडके यांना २४ फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) शल्यचिकित्सासास्त्र विभागाच्या वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र शर्थीचे उपचार करुनही गणेश हे गुरुवारी सकाळी वैद्यकीयदृष्ट्या (ब्रेन डेड) मृत झाले आणि नातेवाईकांपुढे अवयवदानाचा पर्याय ठेवण्यात आला होता. गणेश यांचे भाऊ, मेहुणा व इतरांनी गणेशच्या अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि घाटीचे सर्व विभाग आणि सर्व यंत्रणा तातडीने हालल्या. घाटीच्या 'ब्रेन डेड' समितीने गणेश यांची तपासणी करण्याची तयारी सुरू केली. 'ब्रेन डेड कमिटी'चे अध्यक्ष व भूलशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुहास जेवळीकर, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेश हरबडे, भूलशास्त्र विभागाच्या डॉ. गायत्री तडवळकर, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. जिरवणकर, घाटीचे मानद मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर, मेंदूशल्यचिकित्सक डॉ. जीवन राजपूत यांनी गुरुवारी दुपारी दोन आणि रात्री आठ अशा दोन वेळी गणेश यांची तपासणी करून त्यांना 'ब्रेन डेड' घोषित केले. त्यानंतर 'झेडटीसीसी'चे प्रभारी अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी तातडीने देशभरातून विविध अवयवांचा शोध सुरू केला. संबंधित गणेश यांचा रक्तगट 'बी' असल्याने याच रक्तगटाच्या हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आदीं अवयवांचा शोध सुरू करण्यात आला. गुरुवारी रात्रभर शोध घेऊन चेन्नईच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हृदय, पुण्याच्या रुबी हॉलमध्ये यकृत पाठविण्याचा निर्णय 'झेडटीसीसी'ने विविध देश व राज्य पातळीवरील समितीच्या समन्वयातून घेतला; तसेच कमलनयन बजाज रुग्णालय व सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा निर्णय झाला.

ओटी नंबर ३मध्ये लगबग
गणेश यांना 'ब्रेन डेड' घोषित करण्यात आल्यानंतर त्यांचे सर्व अवयव सुव्यवस्थित ठेवण्यासाठी घाटीच्या सर्व विभागांच्या सर्व डॉक्टरांनी अक्षरशः शर्थ लढवली. ज्या शस्त्रक्रियागृहामध्ये ही शस्त्रक्रिया होणार होती, त्या ओटी क्रमांक तीनमध्ये दिवस-रात्र धावपळ सुरू होती. कधी नव्हे एवढी कमालीची उत्सुकता आणि धावपळ ओटी क्रमांक तीनमध्ये सुरू होती. अवयव ओटीमधून घेऊन जाताना सर्व सुरक्षा रक्षकांचे आणि पोलिसांचे जाळे ओटी ते रुग्णवाहिकेपर्यंत आणि पुन्हा घाटीच्या कमानीपर्यंत नियुक्त करण्यात आले होते. पोलिसांनी नियंत्रणासाठी ठिकठिकाणी पोलिस नेमले होते. शिट्ट्या वाजवत सर्व येणाऱ्या-जाणाऱ्यांना रोखण्यात आले होते आणि रुग्णवाहिकेपर्यंत आणि तिथून 'ग्रीन कॉरिडॉर'द्वारे अवयव नेण्यात आले.

डॉक्टरांच्या टीमचे उत्तम ट्युनिंग
यानिमित्ताने घाटीच्या सर्व विभागांच्या सर्व डॉक्टरांचा उत्तम समन्वय, उत्तम संवाद आणि एकत्रित प्रयत्न दिसून आले. सर्व टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानेच अवयवदान होत असल्याचे मनमोकळे कौतुक खासगी डॉक्टरांकडून होत होते, हे विशेष. या अवयवदानासाठी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेश हरबडे, 'सीव्हीटीएस'च्या भूलशास्त्र विभागाचे डॉ. उल्हास मिसाळ, भूलशास्त्र विभागाचे सर्व डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. ज्योती कुलकर्णी, डॉ. सुचेता जोशी, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. गजानन सुरवाडे, डॉ. कैलास चिंतणे, नेत्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वैशाली उने, न्यायवैद्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास झिने, जीवरसायनशास्त्र विभागाचे डॉ. थोरात, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित दामले, सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्योती बजाज, डॉ. विनायक नाणेकर, खासगी चिकित्सक डॉ. पर्सी जिल्ला, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पुंगळे, डॉ. संजय वाकुडकर आदींसह निवासी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आदींनी शर्थ लढवून अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली आणि दुपारी पावणेदोनपर्यंत सगळे अवयव पाठवण्यात आले.

शिक्षकासह महिलेवर प्रत्यारोपण
कमलनय बजाज रुग्णालयामध्ये एका ५० वर्षांच्या शहरातील शिक्षकावर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाले. हा शिक्षक मागच्या तीन वर्षांपासून डायलिसिसवर होता. तर, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये बीड येथील एका ४५ वर्षांच्या महिलेवर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाल्याचे समजले. त्याचवेळी चेन्नईमध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर हृदयाचे प्रत्यारोपण झाल्याचेही सांगण्यात आले.

अवयवदान चार रक्तगटांचे
एकूण चार रक्तगट असतात आणि शहरामध्ये चार 'ब्रेन डेड' रुग्णांकडून झालेले अयवयदान हे चार वेगवेगळ्या रक्तगटांचे होते, हेही विशेष. पहिले अवयवदान झालेल्या 'ब्रेन डेड' तरुणाचा रक्तगट हा 'एबी' होता आणि याच रक्तगटाच्या विविध रुग्णांवर विविध अवयवांचे रोपण झाले. दुसरे अवयवदान झालेल्या 'ब्रेन डेड' तरुणाचा रक्तगट 'ए' होता, तिसरे अवयवदान झालेल्या 'ब्रेन डेड' तरुमाचा रक्तगट हा 'ओ', तर शुक्रवारी झालेल्या 'ब्रेन डेड' तरुणाचा रक्तगट हा 'बी' होता; म्हणजेच अवयवदानामध्येही नैसर्गिक न्याय होता, असे निरीक्षणही मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी यांनी यानिमित्ताने नोंदविले.

के. के. ग्रुपकडून मदत
'ब्रेन डेड' गणेश यांच्या उपचारांसाठी, तपासण्यांसाठी तसेच मृत्यूनंतर गणेश घोडके यांचे पार्थीव रुग्णावाहिकेतून वैजापूरला घेऊन जाण्यासाठी के. के. ग्रुपने चार हजार रुपयांची मदत केली. ग्रुपचे अकिल अहमद, किशोर वाघमारे, काझी यारे आदींनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

गणेश करत होता सुतारकाम...
ब्रेन डेड' गणेश घोडके हे अत्यंत मनमिळावू होते. ते दहावीपर्यंत शिकले होते आणि सुतारकाम करत होते. त्यांचा मोठा भाऊ नंदू हेदेखील सुतार काम करतात तर, त्यांचा अजून एक भाऊ मजुरी करतो. गणेश यांची आई इंदूबाई यांच्यासह सर्वांनी अवयनदानाचा निर्णय घेतला.

सर्व टीमच्या सहकार्यामुळेच हे अवयवदान होऊ शकले. महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पहिल्यांदाच घाटीमध्ये हे अवयवदान झाले, हे विशेष उल्लेखनीय आहे.
- डॉ. सुहास जेवळीकर,
वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा बंदोबस्त; यशस्वी नियोजन

$
0
0

औरंगाबाद : घाटी हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत दहा मिनिटांत अवयव घेऊन जाणारी अॅम्बुलंस पोचविण्यचे आव्हान पोलिसांसमोर होते. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शकील शेख यांच्याकडे पायलट कारची महत्त्वाची जबाबदारी होती. या मार्गावर चौकामध्ये शहर व सिडको विभागाचे मिळून २० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या पायलट कारमध्ये एपीआय शेख शकील, खुशाल पाटील, बिरजू घुसिंगे यांच्यासह चालक श्याम पवारचा समावेश होता. चालक पवार यांनी पावणेआठ मिनिटांत अॅम्बुलंस विमानतळावर पो‌चविली.

दिवसा वाहतुकीच्या वेळेस ग्रीन कॅरिडॉरची जबाबदारी पार पाडणे आव्हानात्मक होते. अॅम्बुलंसच्या पुढे पायलट कार म्हणून आमची मोठी जबाबदारी होती. ती वेळेच्या आत पार पाडण्यात आम्हाला यश आले. या उपक्रमात आमचा सहभाग झाल्याबद्दल समाधान वाटले.
- शेख शकील, सहायक
पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टूल टेक एक्स्पो तीन मार्चपासून

$
0
0

औरंगाबाद: चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए), औरंगाबाद इंडस्ट्रिअल सप्लायर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने मराठवाडा ऑटोक्लस्टरच्यावतीने आयोजित मराठवाडा टूल टेक एक्स्पो २०१६चे उद्घाटन तीन मार्च रोज करण्यात येणार आहे. औरंगाबादमधील हे पहिलेच टूल टेक प्रदर्शन ठरणार आहे, अशी माहिती सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, आयसाचे अध्यक्ष सतीश लोणीकर यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

मेटल कटिंग टूल्स, टूलिंग सिस्टिम, टूल डिझाईन सॉफ्टवेइअर आणि मशीन अॅक्सेसरिज आदी उत्पादनांत अलिकडे झालेले बदल, अद्ययावत प्रगती याविषयी मराठवड्यातील उद्योगांना माहिती व्हावी, संबंधित उद्योगांनी आपल्या उत्पादनामध्ये सुधारणा करता यावी हे या अतिशय केंद्रित आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आयोजनामागील उद्दिष्ट आहे. टूल उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावरील आघाडीचा ब्रँड केनामेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. सी. राव, कटिंग टूल्स आणि टूलिंग सिस्टिमचे देशातील आघाडीचे वापरकर्ते बजाज ऑटो लिमिटेडचे उत्पादन व व्यवसाय उपाध्यक्ष एम. डी. नार्वेकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. वॉल्टर टूल्स इंडिया लिमिटेडचे ब्रजेश कुमार आणि मुटुटोयो साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एन. बजाज यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. तीन दिवसांच्या टूल टेक एक्सपोमध्ये, कटिंग टूल्समधील सध्याचा कल, अद्ययावत मशीन प्रक्रिया, न्यू टूल कोटिंग टेक्नॉलॉजी, टूल व्यवस्थापन प्रणाली, पर्यावरणपूरक ड्राय कटिंग, अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग अँड इन्सपेक्शन टेक्निक्स या विषयांवर या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. हे प्रदर्शन तीन ते पाच मार्च २०१६ या कालावधीत वाळूज येथील ऑटोक्लस्टरमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. अतिशय केंद्रित आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आयोजनाला औरंगाबादमधील उद्योग, शिक्षण संस्था; तसेच पर्यवेक्षक, मध्यम स्तरावरील व्यव्स्थापक आणि विद्यार्थी यांच्याकडून प्रशंसा मिळते आहे, असे गर्दे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेबाबत १० हजार तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औंरगाबाद व जालना जिल्ह्यांत टोल फ्री क्रमांकावर जानेवारी महिन्यांत तब्बल १० हजार ५१५ वीज ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी वीज पुरवठ्याबाबत असल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रामध्ये १८००२००३४३५ व १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रंमाक २४ तास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वीज गेल्यास किंवा विजेच्या काही तक्रारी असल्यास, टोल फ्री क्रमांकवर संपर्क करून आपल्या तक्रारी नोंदविता येऊ शकते. केंद्रीय ग्राहक तक्रार केंद्र स्थापन करण्यात आले असल्यामुळे, स्थानिक तक्रार निवारण केंद्रे कायम स्वरुपी बंद करण्यात आलेले आहे. या तक्रार केंद्रावर जानेवारी महिन्यात औरंगाबाद शहरातून ५ हजार २१७ वीज ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीणमधून ४ हजार ११२ वीज ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या. जालना जिल्ह्यातून १ हजार १८६ वीज ग्राहकांनी वीज सेवेबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत.

केंद्रीय विभागाला तक्रार मिळाल्यानंतर संबंधित विभाग किंवा भागातील इंजिनीअर आणि संबंधित लाइनमनला ही तक्रार फॉरवर्ड करण्यात येते. तक्रारीचा निपटारा संबंधित लाइनमनने करणे आवश्यक आहे. नागरिकांनी टोल फ्री क्रंमाकांवर तक्रारी नोंदवाव्यात. ही सेवा २४ तास सुरू आहे, असे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी सांगितले.

अशी आहे योजना
वीज ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोदविण्यासाठी ग्राहक क्रंमाक देणे आवश्यक आहे. ग्राहकांनी जास्तीत जास्त दोन मोबाइल क्रमांक किंवा एक दूरध्वनी क्रंमाक कॉल सेंटरमध्ये रजिस्टर करावा. त्यानंतर या रजिस्टर्ड क्रमांकावरून केलेल्या तक्रारीसाठी प्रत्येक वेळी ग्राहक क्रंमाक सांगण्याची गरज भासणार नाही. मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांक कॉल सेंटरमध्ये रजिस्टर करण्याची खास सोय करण्यात आली आहे. या योजनेत वीज ग्राहकांसाठी इंटरॅटिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टिमद्वारे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत संपर्क साधण्याची सोय उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेआठ मिनिटांत हृदय घाटीतून एअरपोर्टवर

$
0
0

औरंगाबाद : अॅम्ब्युलन्स वायुवेगाने औरंगाबाद विमानतळावर शिरल्या. व्हीआयपी गेटने त्यांची विमानतळावर एन्ट्री झाली. यासोबत आलेले डॉक्टर हे एअर टर्मिनलमध्ये आले. काही मिनिटांच सुरक्षेसंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून काही मिनिटांतच डॉक्टरांना विमानाजवळ पाठविले. आणि अवघ्या पाच मिनिटांतच विमान चेन्नईकडे झेपावले.

शहरातील चौथ्या आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पहिल्या अवयवदानाची शुक्रवारी प्रक्रिया पार पडली. ह्रदय नेण्यासाठी जॉय जेट कंपनीची एअर अॅम्ब्युलन्स औरंगाबाद विमानतळावर पावणेअकरा वाजता लँड झाली. त्यानंतर घाटीत अवयवदानासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले. एका अॅम्ब्युलन्समधून ह्रदय औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर अवयव नेण्यासाठी ग्रीन कॅरिडॉअर करण्यात आला. चौकाचौकांत वाहतूक शाखेचे पोलिस तैनात करण्यात आले होते. अॅम्ब्युलन्स जाईपर्यंत एका बाजुचे सिंग्नल बंद केले होते.

घाटीतून अवयव घेऊन येणारी अॅम्ब्युलन्स औरंगाबाद विमानतळावर पावणेआठ मिनिटांत पोहोचली. तिला व्हीआयपी गेट क्रमांक एकमधून विमानाजवळच थांबविण्यात आले होते. अवयव घेऊन जाणाऱ्या चेन्नईच्या डॉक्टरांना विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारातून ‌प्रवेश देण्यात आला. सुरक्षेच्या सर्व चाचण्या केल्यानंतर ते एअर अॅम्ब्युलन्सजवळ पोहोचले. एअर अॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टरसह अवयव ठेवल्यानंतर दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी चेन्नईकडे झेपावले.

आज सकाळी पाऊणेनऊ वाजता जॉय जेट एअर अॅम्ब्युलन्सने लँडिंगची परवानगी मागितली. मेडिकल इमर्जन्सी असल्याने काही क्षणातच औरंगाबाद विमानतळ उघडण्यात आले होते. हे विमान व्यवस्थित लँड करून टेक ऑफ करेपर्यंत शंभर कर्मचारी विमानतळावर तैनात होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.अलोक वार्ष्णेय, विमानतळ प्राधिकरण संचालक, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे बारावीच्या परीक्षेकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

दुष्काळाचे दशावतार बीड जिल्ह्यात दिसू लागले आहेत. या दुष्काळाचा फटका अबालवृद्धांसह वेगवेगळ्या घटकांना बसत आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीही या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. त्यांनाही उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावत आहे. त्याचा परिणाम बारावीच्या परीक्षेत दिसून आला. बारावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या गैरहजरीचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेपेक्षा उसतोडीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीच्या परीक्षांच्या तुलनेत यावर्षी गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे.

बीड हा उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. घरातील कर्ती मंडळी उसतोडीला गेल्यावर ज्येष्ठ नागरिक आणि शाळेच जाणारे विद्यार्थी गावात थांबत असत. गावी राहून विद्यार्थी शिक्षण पूर्ण करायचे, मात्र गेला पावसाळा कोरडा गेला. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. दुष्काळी स्थिती असल्याने शाळा-कॉलेजांतील विद्यार्थीही कामासाठी आई-वडिलांसोबत उसाच्या फडात तोडणीसाठी गेले आहेत. जगण्याच्या संघर्षात शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ बीड जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांवर आली आहे.

सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. बोर्डाच्या या परीक्षेत एकट्या बीड जिल्ह्यातील तब्बल दीड हजार विद्यार्थी गैरहजर आहेत. यापूर्वी मुले दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरहजर राहत होती, मात्र हे प्रमाण खूप कमी होते. यावर्षी हे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील केवळ शंभर मुले गैरहजर होते. दुष्काळामुळे यावर्षी तब्बल साडेतेराशे विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली आहे.

बीड जिल्ह्यातील लाखो उसतोड कामगार हे दर वर्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतर करतात. उसतोडणीचे काम करतात. गेल्या काही वर्षांपासून सलग दुष्काळ असल्याने उसतोड मजुरांना शाळा, महाविद्यालयातील मुलांना हातात कोयता द्यावा लागला आहे.

दुष्काळामुळे संख्या वाढली

यावर्षी दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणापेक्षा पोटाच्या प्रश्नाला जास्त प्राधान्य दिले. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षेत गैरहजर आहेत, असे शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर काम करणारे दीपक नागरगोजे यांनी सांगितले.

परीक्षेला गैरहजेरी

नाव नोंदणी केलेले विद्यार्थी - ३५ हजार २४

उपस्थित विद्यार्थी - ३३ हजार ६६४

गैरहजर विद्यार्थी - १ हजार ३६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळयाचे राजकारण करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
आगामी जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पत संपलेल्या सेना-भाजपाच्या पुढाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या जागेचे राजकारण सुरू केले आहे. नियोजित पुतळ्याच्या जागेचे नारळ मी कधीही फोडले नाही. बसवेश्वरांचा पुतळा झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. लिंगायत समाजाला काँग्रेस विचारधारेपासून दूर करण्याचा डाव सेना-भाजपाने आखला आहे. पुतळ्याचे राजकारण सत्ताधारी पक्षाच्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी करू नये असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. सत्ता जाताच काँग्रेसला सोडून भाजप-सेनामध्ये गेलेल्या पुढाऱ्यांची सामाजिक पत संपली आहे. आगामी जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुतळ्याचे राजकारण करण्याचा उद्योग सुरू केला आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागी कै. शंकररावजी चव्हाण यांचा पुतळा बसविणार असे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. आरोप करणाऱ्या आमदारांनी हे सिद्ध करून दाखवावे असे आवाहनही खासदार चव्हाण यांनी केले.
ज्यांनी आयुष्यभर शंकरराव चव्हाण यांच्या नावांवर सत्तेची पदे उपभोगली. तीच मंडळी आता त्यांना बदनाम करण्याचा उद्योग करीत आहेत. लिंगायत समाज व पुतळा कृती समितीच्या पदाधिकारऱ्यांची बैठक घेवून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पुतळा बसविण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्यातील सेना-भाजपाच्या सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांची मुस्कटदाबी सुरू केली आहे. जिल्ह्यात विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात शासकीय यंत्रणा ढुंकूनही पाहत नाही. सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच सर्व शासकीय यंत्रणा राबत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेस आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार वसंतराव चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, माजी आमदार हणमंतराव पाटील-बेटमोगरेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, संजय बेळगे, स्वप्नील चव्हाण, नगरसेवक विजय येवनकर आदिंची उपस्थिती होती.

काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी १५ दिवसांत
आज नांदेड शहराची जंबो कांग्रेस कार्यकारिणी शहर अध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांनी जाहीर केल्यावर राज्याची कार्यकारिणी कधी तयार होणार असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारला असता ते म्हणाले, केवळ १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टँकर भरण्यासाठी अखंडीत वीज द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्ह्यात दुष्काळ असून शेतीच्या विजेची मागणी घटलेली आहे. उपलब्ध पाण्याचा वापर पिण्यासाठीच होत असून टँकर भरण्यासाठी विजेची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी समितीच्या सर्व सदस्यांनी केली. त्यावर अधीक्षक अभियंता बी. ए. वासनिक यांनी यावर धोरणात्मक निर्णय आवश्यक असून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिल्यास मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
केंद्र सरकारतर्फे प्रस्तावित केलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक विद्युत विकास योजनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी महावितरणतर्फे शनिवारी लातूर जिल्हा विद्युत समितीची आढावा बैठक खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीला समिती अध्यक्ष तथा खासदार डॉ. सुनील गायकवाड, उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा कव्हेकर, आमदार त्रिंबक भिसे, आमदार विनायकराव पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, समिती सचिव तथा अधीक्षक अभियंता बी. ए. वासनिक यांच्यासह महावितरणचे जिल्ह्यातील कार्यकारी अभियंते ए. जी. साखरे, सुरेश फेरे, एन. सी. बिट्रा, जी. जे. नळगीरकर यांच्यासह उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
केंद्र शासनाने ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणा बळकट करण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना तर शहरी भागातील विजेचे जाळे बळकटीकरणासाठी एकात्मिक विद्युत विकास योजना अशा दोन योजना जाहिर करण्यात आलेल्या आहेत. दोन्ही योजना दोन टप्प्यांत राबविल्या जाणार आहेत. योजनेसाठी जिल्हा पातळीवरील विद्युत समितीने आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवायचा आहे. त्यासाठीच ही बैठक घेण्यात आली. दिनदयाल ग्रामज्योती योजनेच्या पहिल्या टप्प्यांत कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून या योजनेत जिल्हयात नविन उपकेंद्रे होतील. उपकेंद्राची क्षमता वाढ व उपकेंद्राचे विस्तारीकरण केले जाईल. तसेच दारिद्रय रेषेतील १६ हजार २८७ लाभार्थ्यांना नाममात्र रुपयांत वीज जोडणी मिळेल. फिडर सेपरेशन अंतर्गत सिंगल फेज फिडरचे गावठाण फिडरमध्ये रुपांतर केले जाणार असून यामुळे फिडरची लांबी कमी होईल. त्यावरील हानी नियंत्रित होऊन भारनियमन कमी होण्यास मदत होईल.
आदर्श सांसद ग्राम योजनेतील अनसरवाडा (ता. निलंगा) या गावातील विद्युत यंत्रणा बळकटीकरणासाठी लाखांची तरतूदही करण्यात आली आहे.
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचा पहिला टप्पा कोटींचा असणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा व निलंगा शहराचा समावेश होतो.

भूमीगत वीज वाहिन्यांची तरतूद
भूमीगत वीज वाहिन्यांची तरतूद या योजनेत केली असून लातूर शहरातील किलोमीटर तर औसा शहरातील किलोमीटर लांबीच्या वाहिन्या भूमीगत होणार आहेत. वितरण रोहित्रांची क्षमता वाढविणे त्याचे विस्तारीरकरण करणे आदी तरतुदींसह एकूणच शहरातील विजेचे जाळे भविष्यातील वाढती मागणी ध्यानात घेऊन मजबूत केले जाणार आहे. समितीच्या सुचनांसह आराखडा मंजुरीसाठी पाठविण्याचे बैठकीत ठरले. त्यानंतरच निविदा काढण्यात येतील. यापुढे प्रत्येक तिमाहीला बैठक घेण्याचाही निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावे आयएसओ करण्यासाठी पुढाकार घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गावकऱ्यांच्या एकीने, विकासात्मक भावनेमुळे जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायती आयएसओ झाल्या. दुष्काळाने त्रस्त असलेल्या मराठवाड्याने राज्यात आदर्श घालून दिला आहे. नागरिकांना आता विकास हवा आहे. तुम्ही गाव आयएसओ केले आता पंचक्रोशीतील गावांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे केले.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायती आयएसओ झाल्या. त्यांना प्रमाणपत्र वितरण तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण मुंडे यांच्या हस्ते झाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, छायादेवी शिसोदे, संजय कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुंडे म्हणाल्या, 'ग्रामसेवकांना मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे बक्षीस आहे. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तिंचा नेहमी सन्मान होत असतो. १११ ग्रामपंचायती आयएसओ झाल्या. झेडपी प्रशासनाने या सभागृहात कार्यक्रम ठेवला. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याचे मला अधिकाऱ्यांनी सांगितले. झालेली गर्दी यावरून असे निदर्शनास येते की विकास करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. लोकांना विकासात सहभागी व्हायचे आहे. परिणामी योजना यशस्वी होतील, यात शंका नाही.'
जलयुक्त शिवार योजनेतून कामे केली. पुढचे दोन वर्षे चांगला पाऊस झाला तर ३४ टक्के गावे दुष्काळमुक्त होतील. तिसऱ्या वर्षीही चांगला पाऊस झाला तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल. योजना प्रभावीणे राबविण्यासाठी काहीतरी नियम करावे लागतात. नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे आवश्यक असते. त्यातून चांगले निर्णय घेतले जातात. कारण निर्णयातूनच निर्मिती होते. आवश्यकतेनुसार नियम वाकविण्यासही आम्ही मागे पुढे पाहत नाहीत, पण लोकहित साधले गेले पाहिजे. तुमच्याकडे चांगले काम होते. आमच्याकडे जलयुक्त शिवार योजनेतून एका कामाचे बिल उचलले गेले. प्रत्यक्षात काम मात्र झालेच नाही, असे त्यांनी नमूद केले. बागडे यांनीही मार्गदर्शन केले. सोळंके यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे आयएसओची यशोगाथा सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांचा अपूर्व उत्साह

$
0
0

औरंगाबाद : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उत्साहात ग्रंथदिंडी काढली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून शनिवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांसह दिंडी निघाली. लेझीम पथक व ध्वज पथकाने आकर्षक सादरीकरणातून नागरिकांची लक्ष वेधले. समर्थनगर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन करून दिंडी निघाली. या दिंडीचे उदघाटन कवी विलास फुटाणे यांनी केले. यावेळी मनसेचे नेते सुभाष पाटील, जयकुमार जाधव, बिपीन नाईक आणि सतनामसिंग गुलाटी यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिंडीत शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय खेळ सादर केले. मराठी कवितेच्या ओळी व घोषवाक्य असलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. क्रांतिचौकात दिंडीचा समारोप करण्यात आला. या उपक्रमासाठी मनविसेचे जिल्हा सचिव संदीप कुलकर्णी, प्रवीण मोहिते, चेतन पाटील, रियाज पटेल, निखिल ताकवाले, विजय लाळे, विजय बरसमवार, किशोर पांडे, शुभम नवले, रितेश येरकड, शुभम रगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठी माणसावर वर्षानुवर्षे गारूड असलेल्या कवितांच्या उत्कट सादरीकरणाचा 'आनंद सुधा बरसे' कार्यक्रम विशेष रंगला. जुन्या व नवीन पिढीतील नामवंत कवींच्या कवितांची मुक्त उधळण झाली. तर, नवोदित कवी आणि विद्यार्थ्यांचा 'आठवण' हा गझल व कवितांचा कार्यक्रमही लक्षवेधी ठरला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त 'आनंद सुधा बरसे' हा मराठी कविता अभिवाचन झाले. हा कार्यक्रम मराठी शनिवारी गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात घेण्यात आला. या कार्यक्रमात सीमा मोघे, सुधीर मोघे, हर्षवर्धन दीक्षित, अश्विनी दाशरथे व रेवा जोशी यांनी उत्तमोत्तम कविता सादर केल्या. कवी सुरेश भट लिखित 'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी' या गौरवगीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. बालकलाकार रेवा जोशी हिने 'एटू लोकांचा देश' कविता सादर करून दाद मिळवली.

बहिणाबाई चौधरी, बा. भ. बोरकर, मुकुंदराज, कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सौमित्र, दासू वैद्य, संदीप खरे या नामवंत कवितांच्या प्रसिद्ध कविता सादर करण्यात आल्या. वाचिक अभिनय व आवाजाचे वेगळेपण जपत सर्वांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. दरम्यान, या कार्यक्रमाला स. भु. शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव, प्राचार्य जे. एस. खैरनार आणि प्रा. ऋषिकेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कविता ऐकण्यासाठी विद्यार्थी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'आठवण' या कार्यक्रमात शेखर भाकरे, अमोल पवार, नितीन गायकवाड, शुभम टाके या विद्यार्थ्यांनी कविता व गझल सादरीकरण केले. वाद्यवृंदासह सादर झालेला हा नवीन प्रयोग विशेष रंगला. विशेषतः शेखर भाकरे याच्या गायकीला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. नवनवीन कवितांचे बहारदार सादरीकरण 'आठवण'चे वेगळेपण ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्ती बसस्थानकात मराठी दिनाचा कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एस. टी. महामंडळातर्फे राज्यभर कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक बसस्थानकावर व बसमध्ये दिनाचे महत्त्व सांगणारे फलक लावण्यात आले. येथील मध्यवर्ती बसस्थानकात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

एस. टी. महामंडळातर्फे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, प्रादेशिक व्यवस्थापक अनंत मुंडिवाले, विभाग नियंत्रक रा. ना. पाटील, आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे, सहायक वाहतूक अधीक्षक विजय बोरसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.खासदार खैरे यांनी उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दैनंदिन व्यवहारात मराठीचा जास्तीत जास्त वापर करा, असा सल्ला त्यांनी दिला. कामगार अधिकारी गवारे यांनी सूत्रसंचालन केले. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या सूचनेनुसार राज्यभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांत पुन्हा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महापालिकेला एप्रिलअखेरपर्यंत प्रस्ताव पुन्हा पाठवावा लागणार आहे. प्रस्ताव पाठवल्यानंतर येत्या ऑगस्टअखेरपर्यंत या अभियानातील ४० शहरांची नावे केंद्र सरकारकडून जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे प्रस्ताव तयार करून दाखल करण्यासाठी फक्त दोन महिन्यांचा कालावधी आहे.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियानासाठी देशातील ९८ शहरांची निवड केली आहे. त्यातील पहिल्या २० शहरांची घोषणा जानेवारीमध्ये करण्यात आली. या २० शहरांत औरंगाबादची निवड झाली नाही. पहिल्या वर्षी २०, दुसऱ्या वर्षी ४० व तिसऱ्या वर्षी उर्वरित शहरांची निवड केंद्र सरकारतर्फे केली जाणार आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादची निवड व्हावी यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे. दुसऱ्या टप्प्यात निवड होण्यासाठी पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवावा लागेल, असे केंद्र सरकारच्या यंत्रणेकडून पालिकेला कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू केले जाणार आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटीसाठीच्या पहिल्या प्रस्तावात ग्रीनफिल्ड विकसित करण्याचा उल्लेख केला होता. ग्रीनफिल्डचा उल्लेख केलेल्या शहरांचे प्रस्ताव पहिल्या टप्प्यात नाकारण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रस्ताव तयार करताना रेट्रोफिटिंग या पर्यायाचा विचार पालिका प्रशासन करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय कम्युनिटी डेव्हलपमेंटचा प्रकल्प प्रस्तावात समाविष्ट करण्याची तयारी करण्यात येत आहे. प्रस्ताव सादर केल्यानंतर येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील ४० शहरांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यात निवडल्या जाणाऱ्या ४० शहरांपैकी २३ शहरे फास्ट ट्रॅक साठी निवडण्यात येणार आहेत. या फास्ट ट्रॅक शहरात औरंगाबादचा समावेश व्हावा यासाठी प्रशासकीय व राजकीयस्तरावर लॉबिंग करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनापासून काम केले; करीत राहणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आतापर्यंत मनापासून काम केले आणि यापुढेही अशाच प्रकारे काम करीत राहणार आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी शनिवारी केले.
स्वातंत्र्यसेनानी जैस्वाल यांनी ९१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमात त्यांच्या कार्यावर आधारीत 'एक व्रतस्थ योद्धा' या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले, माजीमंत्री रोहिदास पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, माजीमंत्री राजेंद्र दर्डा, गौरव समितीचे अध्यक्ष मानसिंह पवार यांची विशेष उपस्थिती होती. जैस्वाल यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील कामगिरीनंतर राजकारणाऐवजी सामाजकारणावर लक्ष केंद्रित केले. येथील सुत गिरणीच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अनेकवर्ष संचालक होते. जसवंतपुरा येथील श्रीराम मंदिराची उभारणी व मंदिराची जागा वाचवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. या व अन्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला त्यांनी दोनच वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, 'आतापर्यंत माझ्यावर मोठ्या विश्वासाने कामे सोपवण्यात आली. ती कामे मी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. यापुढेही जी कामे माझ्यावर सोपवली जातील ती मनापासून करण्याचा प्रयत्न करेल.' कार्यक्रमांच्या अध्यक्षांसह इतरांची भाषणातून त्यांचा गौरव केला. पाच सुहासिनींनी ९१ दिव्यांनी लक्ष्मीनारायण जैस्वाल यांचे औक्षण केले. विवेक जैस्वाल यांनी कुटुंबीयांतर्फे मनोगत व्यक्त केले. मानसिंह पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रणिती शहा यांनी वंदेमातरम या राष्ट्रगीतावर नृत्य सादर केले. मानपत्राचे वाचन प्रा. अजित दळवी यांनी केले तर, सूत्रसंचालन प्रा. अनुया दळवी यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांनी गौरव समारंभानिमित्त मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वृद्धाश्रमासाठी प्रत्येकी २५ हजार, उदयपुर येथील एका सेवाभावी संस्थेला ३१ हजार रुपयांची देणगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images