Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डॉ. डकरेंच्या खुनाचे गूढ उकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात गाजलेल्या डॉ. चित्रा दिनेश डकरे यांच्या खुनप्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना जवळपास तीन महिन्यांनंतर यश आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन भुरट्या चोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एक जण पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असून दुसरा अल्पवयीन आहे.
पोलिसांनी पकडलेल्या दोघांपैकी एक अमोल नारायण घुगे (वय १९, रा. शिवनेरी कॉलनी, एन-९, हडको), हा असून त्याचे वडील पोलिसनाईक आहेत. तो बारावीचा विद्यार्थी असून, दुसरा अल्पवयीन अकरावीत शिकतो. या दोघांना पकडण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. दिवाळीनंतर मुलीला भेटण्यासाठी आलेल्या डॉ. चित्रा दिनेश डकरे (वय ६०) यांचा २ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास हडको, एन-९ मधील विमल ज्योती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या मजल्यावर गळा चिरून खून झाला होता. या खुनाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.
विमलज्योती सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये डॉ. नीलेश आस्वार हे पत्नी स्नेहल व सात वर्षांचा मुलगा उत्कर्ष यांच्यासह राहतात. डॉ. स्नेहल यांचे वडील दिनेश सूर्यभान डकरे व आई डॉ. चित्रा डकरे (रा. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती) २३ नोव्हेंबर रोजी मुलीकडे दिवाळीनिमित्त आल्या होत्या. डॉ. नीलेश हे सासरे दिनेश डकरे यांना घेऊन २ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता एन ७ परिसरात प्लॉट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर सव्वादहाच्या सुमारास डॉ. स्नेहल हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांचा मुलगा उत्कर्ष सकाळी साडेसात वाजता शाळेमध्ये गेला होता. घरात चित्राबाई एकट्याच होत्या. त्यामुळे घरात कोणीही नसताना एकट्या असलेल्या चित्रा यांचा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली होती.
अमोल घुगे व त्याचा मित्र विमलज्योती सोसायटीमध्ये चोरी करण्यासाठी घुसले होते. डॉ. नीलेश आस्वार यांच्या घरात प्रवेश करणापूर्वी त्यांनी शेजारी एस. के. गोरे, डॉ. संजय सूर्यवंशी आणि व्यापारी रवींद्र निकुंभ यांच्या फ्लॅटच्या कड्या बाहेरून लावल्या. डॉ. नीलेश यांच्या फ्लॅटचे दार उघडे असल्याने दोघे लगेच आत शिरले. त्यांनी बैठकीच्या खोलीत दिवाणावर बसलेल्या डॉ. चित्रा यांचे तोंड दाबून हात-पाय दोरीने बांधायला सुरुवात केली. परंतू, त्यांनी आरडाओरड करून आणि प्रतिकार करण्यास सुरुवात केली. अमोलने त्यांचे तोंड दाबून हात पाठीमागे नायलॉनच्या दोरीने बांधले. या झटापटीत संशयितांनी तीनवेळा डॉ. चित्रा यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात डॉ. चित्रा यांचा मृत्यू झाला, अशी माहिती तपासात समोर येत आहे. त्यानंतर भेदरलेल्या संशयित आरोपी गॅलरीतून उडी मारून पळून गेले.
या घटनेचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सर्व बाजुने तपास करूनही गुन्ह्यामागील कारण व आरोपी सापडत नव्हते. सिडको पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगार व इतर संशयितांची चौकशी करूनही सुगावा लागत नसल्याने हे प्रकरणी श्रृती भागवत खुनप्रकरणाप्रमाणेच उकल न होत राहणार का, अशी शंका शहरातील नागरिकांना येत होती. पण भुरट्या चोरांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले. अमोल घुगे व त्याचा अकरावीतील मित्राने हा खून केल्याचे तपासात पुढे आहे. काही दिवस पाळत ठेवल्यानंतर खात्री झाली व त्यानंतर त्यांना गुरुवारी रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमारयांनी दिली. यावेळी पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आदी उपस्थित होते. दरम्यान, अमोल घुगे आणि विधीसंघर्ष बालकास शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. घुगे यास ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले. तर, विधीसंघर्ष बालकाची रवानगी बाल न्यायालयात करण्याचे आदेश दिले आहेत.
गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकाला एक लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत आवारे, नसीम खान, शिवाजी झिने, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कवितेने माझे अभाव भरून काढले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'अभावग्रस्त जीवन जगत असताना कवितेनेच मला सावरले. कवितेने आमचे आयुष्य प्रभावी करीत सर्व अभाव भरून काढले. माझ्या कवितेचे मूळ स्थान असलेल्या औरंगाबाद शहरात होणारा गौरव खूप महत्त्वाचा वाटतो' असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेचा 'लीला धनपलवार काव्यपुरस्कार' स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने कविता दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज विशेष काव्य पुरस्कार व लीला धनपलवार काव्यपुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षीचा धनपलवार पुरस्कार ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांना ज्येष्ठ समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी प्रदान केला. यावेळी 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सगर व कवी श्रीधर नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर भालेराव म्हणाले, ग्रामीण भागातून आल्यानंतर औरंगाबाद शहरात माझ्यातील प्रतिभा फुलली. डॉ. सुधीर रसाळ, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. एस. एस. भोसले, प्रा. चंद्रदेव कवडे यांच्यासारख्या ज्येष्ठांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातूनच कवितेची वाट सापडली. कवितेने आमचे आयुष्य प्रभावी केले व सर्व अभाव भरून काढले. डॉ. पानतावणे यांनी भालेराव व मलिका अमर शेख यांच्या कवितेवर भाष्य केले.

कविता ही एक सांस्कृतिक घटना असते. भालेराव यांची कविता कृषीसंस्कृती व लोकसंस्कृतीची कविता आहे. मराठीत वर्णनात्मक कविता विपुल आहे; मात्र, इंद्रजित यांच्या कवितेने माणूस आणि मानवी संवेदनांचे उलगडून दाखवलेल नाते अत्यंत मोलाचे आहे.

लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडवणारा हा कवी आहे. या कार्यक्रमाला उदय धनपलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्काराने भावूक
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ कवयित्री मलिका अमर शेख या पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या नाही. 'माझे वडील अमर शेख आणि कवी कुसुमाग्रज यांच्या काव्याचे बोट धरून माझी कविता मोठी झाली. या प्रेरणेतूनच मागील ५० वर्षांपासून कविता लिहीत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने कुसुमाग्रज यांच्या नावाचा पुरस्कार देऊन माझा सन्मान केल्याचा खूप आनंद वाटतो' असे शेख यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील दुसरे हार्ट फेल्युअर क्लिनिक शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्रातील दुसरे, तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील पहिलेच 'हार्ट फेल्युअर क्लिनिक' शहरातील 'युनायटेड सिग्मा हॉस्पिटल'मध्ये सुरू झाले. या क्लिनिकचे उद्घाटन शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) झाले. या क्लिनिकच्या माध्यमातून हृदय निकामी झालेल्या रुग्णांवर विविध प्रकारचे उपचार, हृदय प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णांचा शोध घेतला जाणार असून, पुढच्या टप्प्यात त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहेत.
'हार्ट फेल्युअर क्लिनिक'च्या उद्घाटनप्रसंगी 'मटा'चे निवासी संपादक धनंजय लांबे, 'युनायटेड सिग्मा'चे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. आनंद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे, हृदयरोगतज्ज्ञ शिरीष देशमुख, डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजकुमार घुमरे, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. दिलीप देशमुख, डॉ. मनिषा टाकळकर, ओमप्रकाश केला आदींची उपस्थिती होती. या क्लिनिकची माहिती देताना डॉ. देवधर म्हणाले, शहरामध्ये 'ब्रेन डेड' रुग्णांचे अवयवदान उशिरा का होईना सुरू झाले असून, केवळ दीड महिन्यात चार 'ब्रेन डेड' तरुणांकडून हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे असे तब्बल १७ अवयवांचे दान झाले आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शहरामध्ये नियमितपणे होत असल्यामुळे 'ब्रेन डेड' तरुणांकडून दान करण्यात आलेले सर्व ८ मूत्रपिंडांचे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण झाले. मात्र हृदय व यकृताचे प्रत्यारोपण होत नसल्यामुळे आणि त्यासाठीची आवश्यक परवानगी अद्याप शहरातील कुठल्याही शहराला मिळाली नसल्याने हृदय व यकृत देशातील विविध रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले आहे. आता पुढच्या टप्प्यात शहरामध्ये हृदय व यकृताचे प्रत्यारोपण होणे गरजेचे आहे. त्याचाच भाग म्हणून 'हार्ट फेल्युअर क्लिनिक' सुरू करण्यात येत आहे. या क्लिनिकमध्ये कुठल्याच उपचारांना दाद न देणाऱ्या आणि हृदय प्रत्यारोपणाशिवाय गत्यंतर नसलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपण होण्यासाठी प्रयत्न केले जातील. यानिमित्ताने हृदय प्रत्यारोपणाची गरज असणारे रुग्ण शहरात, मराठवाड्यात, उत्तर व मध्य महाराष्ट्रात किती आहेत, याचाही आपसुकच अंदाज येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ज्यांचा हृदयाचा आजार कधीही बरा होणारा नाही, ज्यांच्यावर कुठलेच औषधोपचार परिणामी ठरत नाहीत आणि ज्यांच्यावर हृदय प्रत्यारोपण शक्य आहे, ज्यांचे वय ५५ पेक्षा कमी वय आहे, ज्यांना इतर कुठलाही गंभीर आजार नाही अशांवर हृदय प्रत्यारोपण होऊ शकते. 'झेडटीसीसी'ने तयार केलेल्या प्रतीक्षा यादीनुसार प्रत्यारोपण होऊ शकते. एकाच रक्तगटाचे अनेक गरजू रुग्ण असल्यास, सर्वांत तातडीची गरज आहे, अशा रुग्णावर 'झेडटीसीसी' व संबंधित रुग्णालयाच्या निर्णयानुसार अवयवरोपण केले जाते. जेथे अवयव काढण्याची शस्त्रक्रिया होणार आहे, त्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णावर प्रत्यारोपणासाठी प्राधान्य दिले जाते. त्यानंतर त्या शहरातील रुग्णाला, त्यानंतर राज्य व देशातील रुग्ण असा प्राधान्य असताे. या क्रमानुसार विविध अवयवांचा शोध घेतला जातो, असे डॉ. देवधर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झकेरिया कॅम्पस होणार विद्यापीठ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख असलेल्या डॉ. रफिक झकेरिया कॅम्पसला २०२०पर्यंत अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याचे ध्येय आहे, अशी माहिती मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्ष पद्मश्री फातमा रफिक झकेरिया यांनी दिली. आयएचएमच्या १९ व्या पदवीदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी हॉटेल मॅनेजमेंट व कलीनरी आर्टसच्या १११ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आले.
आयएचएमचा दीक्षांत समारोह हॉटेल विवांताच्या (ताज) सभागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला. व्यासपीठावर फातमा झकेरिया यांच्यासह ताजग्रुपचे एचआर ग्लोबल हेड डॉ. पी. व्ही. रमणमूर्ती, हडर्सफिल्डचे विद्यापीठातील अधिष्ठाता प्रो. ख्रिस कौटन, प्रो. कोलिन बॅमफर्ड, डॉ. डेरेक कॅमरोन, डॉ. ए. जी. खान, डॉ. मकदूम फारुकी, प्राचार्य डॉ. सतीश जयराम, साहिल नाथीनी, फरात जमाल, चिन्मय शर्मा यांची उपस्थिती होती.
'संस्थेचे २०२०पर्यंत विद्यापीठात रुपांतर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांशी करार, संशोधन व अभ्यासक्रमाचे आदान-प्रदान केले जाईल,' असे फातम झकेरिया म्हणाल्या. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ७४ तर कलीनरी ऑर्टस् मध्ये ३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. रुषाद कविना हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, आनंद अय्यंगार यांनी आभार मानले. विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर पदवी मिळवल्याचा आनंद जाणवत होता. मुख्य कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यावेळी पारितोषिक वितरण झाले. हॉटेल मॅनेजमेंट शाखेत डॉ. रफिक झकेरिया ट्रॉफीसह सर्वाधिक पारितोषिक रौनक भंडारीने मिळवले. कलीनरी आर्टस् मधील डॉ. रफिक झकेरिया पारितोषिक रुबिन मॉरेसने मिळवले. हुसेन जरवाला, आदित्य पै, अधिराज राठोड, किर्ती माणिकताला यांनाही गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थशास्त्र परीक्षेत २० कॉपीबहाद्दरांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेत शनिवारी (२७ फेब्रुवारी) अर्थशास्राच्या परीक्षेत कॉपी करताना २० विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. ही कारवाई एकाच भरारी पथकाकडून पाचोड आणि विहामांडवा येथील केंद्रावर केली. याच पथकाने शुक्रवारी २१ विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती.
कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या नावे शिक्षण मंडळाने भरारी पथके स्थापन केली असली तरी बारावी परीक्षेत अनेक केंद्रावर सर्रास कॉप्या होत आहोत. एकाच पथकाने शनिवारी औरंगाबादपासून जवळ असलेल्या १९ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. वैजापूर येथील परीक्षा केंद्राला मंडळाच्या अध्यक्षांनी भेट तेव्हा कॉपी करताना एक विद्यार्थी सापडला. १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली असून आजपर्यंत १५० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकच पथक कार्यक्षम ठरल्याचे दिसते. त्या पथकाने १०१ विद्यार्थ्यावर कारवाई केली. या पथकाने शुक्रवारी बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा, शिवणी, तेलगाव, वडवणी येथील चार केंद्रांना भेटी दिल्या. तेथे २१ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. एकाच पथकाकडून कॉपी बहाद्दरांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे, त्याचवेळी इतर पथकांचे काय, याबाबत मंडळाचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पौष्टिक डबा’ मार्गदर्शनाला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लहान मुलांच्या डब्याचे नियोजन करताना गृहिणींची धांदल उडते, परंतु आपल्या मुलाला नेमके काय आवडते हे समजून घेतल्यास या अडचणी नाहीशा होऊ शकतात, असा सूर 'मुलांचा पौष्टिक डबा' मार्गदर्शन कार्यक्रमातून निघाला.
सिडको एन- ३ येथील विघ्नहर्ता गणपती मंदिराच्या सभागृहात 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने 'मुलांचा पौष्टिक डबा' या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामांकित दूरचित्रवाणी मालिका 'विकेंड मेजवानी'च्या राज्यस्तरीय विजेत्या डॉ. प्रज्ञा तल्हार व निरामय डायट काउंसिलिंग व रिसर्च सेंटरच्या आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शहराच्या कानाकोपऱ्यातून गृहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी डॉ. तल्हार यांनी उपस्थित गृहिणींशी संवाद साधताना मुलांना त्यांच्या आवडी-निवडीचे पदार्थ द्यावे, असे आवर्जून नमूद केले. सकाळी लहान मुलांना उठविण्यापासून त्यांना आंघोळ घालणे, शाळेसाठी तयार करणे, त्यातच मिस्टरांचा डबा, त्याचदरम्यान मुलाचा डबा तयार करताना आपल्या मुलाला कशाची भाजी आवडते, कशी केल्यास ती आवडेल, याचा साधा विचार केला जात नाही. परिणामी डबा न संपविता तो शाळेतून परत आल्यावर होणारी चिडचिड सगळीकडे पाहायला मिळते. वास्तविक मुलाला विचारून, त्याला आवडतो तसा डबा दिल्यास तो पूर्ण संपवेल, असे डॉ. तल्हार यांनी सांगितले. वैद्य अॅकॅडमी (सहप्रायोजक), ब्युटी वर्ल्ड (गिफ्ट पार्टनर) व फाउंडेशन्स केजी स्कूलने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

मुलांच्या डब्यात पौष्टिक पदार्थ असावे असे प्रत्येक गृहिणीला वाटते. परंतु मुलांच्या वाढीसह त्याच्या आवडी-निवडीकडे देखील लक्ष दिले जाणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपला मुलगा फारच नाजूक आहे, काहीच खात नाही, असे म्हणत बसण्यापेक्षा मातांनी त्याला जसे आवडणारे पदार्थ दिल्यास तो आवडीने संपवू शकतो.
- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजमन : कक्कय्या ढोर समाज व्यवसायातून शिक्षणाकडे

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com
कक्कय्या ढोर समाज एकेकाळी कारखानदारी करीत असे. विजेचा उपयोग सुरू झाला आणि त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली. त्यानंतर शिक्षणाची कास धरलेल्या या समाजातील युवा पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. आरक्षणाचा फारसा फायदा या समाजातील युवा पिढीला होत नाही. अखिल कक्कय्या ढोर समाज विकास मंचच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कक्कय्या-ढोर समाज हा बसवेश्वर पंथातील आहे. शिवभक्त असलेला हा समाज पूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होता. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्यानिमित्ताने आता या समाजातील नव्या पिढीने शहरात आपला जम बसवला आहे. जनावरांची कातडी रंगवणे हा कक्कय्या ढोर समाजाचा पारपंरिक व्यवसाय होता. पूर्वीच्या काळात जनावरांची कातडी रंगवणे हा मोठा व्यवसाय मानला जात असे. मेलेल्या जनावरे, खाटकांकडून जनावरांची कातडी मिळवून कक्कय्या ढोर समाज हा व्यवसाय करीत असे. जनावरांची कातडी रंगवणे ही प्रक्रिया मोठी किचकट होती. २१ दिवसांच्या प्रक्रियेनंतर कातडी रंगवायला सुरुवात होत असे. या कामांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा मोठा वाटा असे. बाभळीची साल, शेंगा, हिरडा, बेहडा या वृक्षांची पाने, साल यांचा वापर यासाठी केला जात असे. ही कामे प्रामुख्याने महिला करीत असे. त्यामुळे या व्यवसायात पुरुषांइतकाच महिलांचीही भूमिका मोठी होती.

प्रामुख्याने ग्रामीण भागात पूर्वीच्या काळात वीज जवळपास नव्हतीच. त्या काळात मोट आणि पखालीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. मोटेचा वापर शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी करत असे. त्यामुळे मोटेला नेहमी मागणी असायची. पखालीचा उपयोग पाणी वाहून नेण्यासाठी होत होता. हेल्ल्याच्या मदतीने पखालीतून पाणी आणण्यात येत होते. पखाली तयार करताना अचूकपणा असणे गरजेचे होते. पाणी पुरवठ्याचे पखाली हे एकमेव साधन होते. एका पखालीतून दोनशे लिटर पाणी नेता येत असे. मोट आणि पखालीचा वापर नियमित होत होता. पाणी उपसण्याचे दुसरे कोणतेच साधन नव्हते. त्यामुळे या व्यवसायाला खूप महत्त्व होते. काळ बदलला. ग्रामीण भागात वीज पोहचली. पिण्याच्या पाण्याकरिता नळ योजना सुरू झाली. त्यामुळे मोटऐवजी विद्युत मोटारीचा वापर शेतीसाठी वाढला. याचा मोठा फटका कक्कय्या ढोर समाजाच्या या पारंपारिक व्यवसायाला बसला.

एकेकाळी कक्कय्या ढोर समाजाच्या घराशेजारीच कातडी रंगवण्याचा कारखाना असे. पहिल्यापासूनच हा समाज व्यवसायभिमुख असल्याने आर्थिक बाबतीत संपन्नता होती. ग्रामीण भागात वीजेचा वापर सुरू झाल्याने त्यांच्या व्यवसायाला घरघर लागली. त्यांचा आर्थिक ढाचा बिघडला. कारखानदारी बंद पडण्यास सुरुवात झाली.

काळाच्या बदलानूसार या समाजाने आधुनिकता स्वीकारली नाही. त्यामुळे अन्य व्यवसाय, नोकरीकडे या समाजातील युवा पिढीला वळावे लागले. याशिवाय दुसरा पर्यायच युवा पिढीसमोर नव्हता. एकेकाळी कारखानदार असलेल्या या समाजाला नोकरी व अन्य व्यवसाय करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. कारखानदारी बंद झाल्याने या समाजाच्या प्रगतीची दिशाच बदलली, अशी खंत अखिल कक्कय्या ढोर समाज विकास मंचचे सचिव मारुती बोधणे यांनी व्यक्त केली.

अखिल कक्कय्या-ढोर समाज विकास मंच
अध्यक्ष राजकुमार सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष धोंडिबा जाधव, उपाध्यक्ष श्रीकिशन इंगोले, सचिव मारुती बोधणे, सहसचिव सुगंधराव फुलपगार, कोषाध्यक्ष मारुती पाटेकर, सहकोषाध्यक्ष प्रभु फुलवरे. सदस्य - राम खरटमल, शंकर शिंदे, डॉ. गोविंद नरवणे, ताराचंद कावळे, पंकज पाटेकर, नितीन पोळ, संतोष कावळे, दिगंबर पोळ, विक्रम भाळशंकर, प्रदीप साबणे, श्याम पोळ, नागनाथ त्रिमुखे, जयश्री जाधव, रंजना शिंदे, विधी सल्लागार अॅड. संगीता पोळ.

आरक्षणाचा फारसा फायदा नाही
कक्कय्या ढोर समाजाचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात आहे, परंतु या प्रवर्गातील अन्य समाजाने शिक्षणात मोठी प्रगती केल्यामुळे कक्कय्या ढोर समाजातील युवा पिढीला या आरक्षणाचा फारसा फायदा होत नाही, अशी खंत बोधणे यांनी व्यक्त केली. त्यामुळे अनुसूचित जमातीत या समाजाचा समावेश करावा, अशी आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात या समाजाची संख्या जवळपास चाळीस हजारांच्या आसपास आहे. पूर्वीच्या काळात विविध ठिकाणी समाजाचे मठ असत. त्याच ठिकाणी भेटी-गाठी व्हायच्या. शहरातही समाजाचे स्वतःचे सभागृह असावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. शिक्षणाकरिता वसतिगृह उभारले तर त्याचा मोठा फायदा युवा पिढीला होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

शिक्षणाची कास
कक्कय्या ढोर समाज हा पहिल्यापासून कारखानदारी करीत असल्याने घरातील सर्वच जण व्यवसायाला हातभार लावायचे. त्यामुळे गावातील शाळेत जेवढे शिक्षण मिळेल, तेवढेच शिक्षण मुलांचे व्हायचे. शिक्षणाकडे फारसा ओढा नव्हता, परंतु पारपंरिक व्यवसायाला घरघर लागल्यानंतर या समाजातील युवा पिढीने शिक्षणाची कास धरली. १९८० नंतर प्रामुख्याने पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर भर दिला. शिक्षणानिमित्त त्यांनी गाव सोडून शहराची वाट धरली. शिक्षणामुळे आता या समाजातील युवा पिढी शासकीय नोकरी, खासगी नोकरी, व्यवसायात दिसत आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षणही फारसे नव्हतेच, परंतु आता मुलींनीही शिक्षणात आघाडी घेतली आहे. १९९०नंतर मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले. पूर्वीच्या काळात शिक्षणाकडे ओढा नव्हता; तसेच कारखानदारी महिलांचा मोठा वाटा असे. त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण होते. काळ बदलला. शिक्षणाकडे ओढा वाढल्याने बालविवाह पद्धत आता संपुष्टात आली असल्याचे सचिव मारुती बोधणे यांनी आवर्जुन सांगितले. पूर्वीच्या काळात दळणवळणाची फारसी साधने नव्हती. आठवडी बाजाराच्यानिमित्ताने समाजातील मंडळी एकत्र भेटत. त्याच ठिकाणी विवाहाच्या गोष्टींची चर्चा होत होती. शिक्षणामुळे आता मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पालकांचा दृष्टिकोन बदलल्यामुळे आता हुंडा पद्धतही कमी झाली आहे. पूर्वी हा समाज प्रामुख्याने ग्रामीण भागातच राहात असे, परंतु आता शिक्षण, नोकरीनिमित्ताने हा समाज शहरीभागातही मोठ्या प्रमाणावर आहे, असे बोधणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्यांनी केला मराठीचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या औचित्याने मयूरबन कॉलनीतील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पन्नासपेक्षा जास्त मुला-मुलींनी यामध्ये सहभाग नोंदवत 'लाभले अम्हास भाग्य शिकतो मराठी'चा प्रत्यय दिला.
माय मराठीला ज्ञानपीठ सन्मान मिळवून देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने 'बाळगा मराठीचा अभिमान' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय गटासाठी ठेवण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत ७वी ते ९वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात (प्रियदर्शनी, इंदिरानगर) घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेवेळी मयूरबन कॉलनी (वार्ड क्रमांक ११०) येथील नगरसेविका स्मिता घोगरे, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार, सुरेखा महाजन, चैनसिंह जारवाल, शशिकांत उबाळे, रश्मी होनमुटे, विद्युलता गोरे, स्वाती कुलकर्णी, सुमन कुऱ्हाडे, तेजस्विनी देसले यांची उपस्थिती होती. जोरदार पूर्वतयारी
'मराठी भाषा दिनी' आपल्या शाळेत महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे माहिती होताच विद्यार्थी अभ्यासाला लागले. केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुला-मुलींनी आठ दिवस आपल्या दैनंदिन अभ्यासासह ग्रंथालयातील पुस्तकांचा अभ्यास केला. विविध ग्रंथ, पुस्तकातून मराठी दिनाची माहिती घेतली

मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. विशेषतः महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करीत आहे. मराठी असल्याचा अभिमान जागविण्यासाठी हे सकारात्मक मानावे लागेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारेच नव्हे तर, सामान्य कुटुंबातील पाल्य महापालिकेच्या शाळेत शिकत आहे. मराठी दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुढाकार घेऊन निबंध स्पर्धा घेतली हा आगळावेगळा स्तुत्य प्रयत्न आहे.
- स्मिता घोगरे, नगरसेविका, मयूरबन कॉलनी

मराठी भाषेचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'बाळगा मराठीचा अभिमान' या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन मुलांमध्ये मराठीविषयीचे प्रेम वृद्धिंगत करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे मुले आठ दिवसांपासून याची तयारी करीत होते.
- संजीव सोनार, मुख्याध्यापक, केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिकासिंगचा कार्यक्रम आज

$
0
0


औरंगाबाद : पोलिस कल्याण निधीसाठी रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पॉपस्टार मिकासिंग यांच्यासह अनेक नामवंत गायक, कलाकार यांचा कलाअविष्कार सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून फायर ऑडिटसह सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. हा कार्यक्रम शहानूरमिया दर्गा जवळील जबिंदा लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाला सुमारे तीस हजार रसिक उपस्थित राहतील, असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. पोलिस व त्यांच्या कुंटुबीयांसाठी पोलिस कल्याम निधीमार्फत योजना राबविल्या जातात. हास्य कलाकार नवीन प्रभाकर, सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांचा नृत्य कलावंताचा कार्यक्रम सादर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडला गारपिटीचा तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनधी, नांदेड
नांदेड व लातूर जिल्ह्यांतील काही भागात शनिवारी सायंकाळी विजांच्या गडगडटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाबरोबर किनवट व पुसद भागात गारपीट झाली. या पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. चाकूर तालुक्यातील अलगरवाडी येथे वीज पडल्याने म्हैस दगावली.

गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात उष्णतेत वाढ झाली होती. शनिवारी वादळी वाऱ्यासह नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. किनवट व पुसद भागात गारपीट झाली. यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहोर गळून पडला आहे. संत्रा, मोसंबी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा नंबर १, २, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणी, सरसम बुद्रुकसह हिमायतनगर पळसपूर, डोल्हारी, कारला, सवना, टेंभी, खडकी बा., वडगाव, जीरोणा, पवना, एकघरी या ग्रामीण भागात रिमझिम पाऊस झाला.

त्यामुळे कापून ठेवलेला हरभरा, करडी, उभा गहू आडवा झाला. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

बीडमध्ये अवकाळी
बीड ः बीड जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. शनिवारी दिवसभर कडक ऊन पडले होते, मात्र दुपारनंतर आभाळ भरून आले. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

लातूर जिल्ह्यात पाऊस
लातूर ः लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील उदगीर, चाकूर, निलंगा, जळकोट तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ‌चाकूर तालुक्यातील अलगरवाडी येथे वीज पडल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला. लातूर परिसरात अर्धातास पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर पुन्हा वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
बीड बायपासवर देवळाई चौकात रविवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी वाहतुकीची कोंडी झाली. पूर्व, पश्चिम अशा दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच शिवाजीनगर रेल्वेगेट व देवळाईकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहने अडकून पडली. पोलिस आल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास तब्बत दोन तास लागले. येथे ३१ जानेवारी रोजी अशीच वाहतूक कोंडी झाली होती.
या रस्त्यावर दररोज सकाळी व सायंकाळी, तसेच रविवारी लग्नतिथी असेल तर, वाहन घेऊन जाणे डोकेदुखी ठरत आहे. देवळाई चौकात रविवारी दुपारी १२ ते २ पर्यंत, दोन तास वाहतूक कोंडी झाली. बीड बायपासवर मधुबन हॉटेलपर्यंत, तसेच रेणुकामाता कमानीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. याच वेळेत दुपारी १२.३० वाजता नरसापूर एक्स्प्रेस, १.२० वाजता संचखंड एक्स्प्रेस, १.३० वाजता तपोवन एक्स्प्रेस, तसेच १.४५ वाजता हैदराबाद पॅसेंजरची वेळ असल्यामुळे शिवाजीनगर येथील रेल्वेगेट वारंवार बंद होत होते. लग्नाच्या वराती, पार्किंग, अवजड वाहनांची वाहतूक यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. रविवारी तर रुग्णवाहिकाही या गर्दीत अडकून पडल्या होत्या. नागरिकांनी सातारा पोलिस ठाण्याला फोन केल्यावर पोलिस तेथे घटनास्थळी आले व वाहतूक सुरळीत केली.
बीड बायपासवर सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यावर पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाय काढला जात नाही. या भागातील नागरिकांना यामुळे अनेक वर्षांपासून मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
देवळाई चौकात वाहतूक पोलिस असतात. परंतु रविवारी दुपारी ते नसल्यामुळे वारंवार ही समस्या उद्भवत आहे. वाहनधारकही शिस्तीत वाहन चालवत नाही. प्रत्येकालाच घाई असल्यामुळे त्यात आणखी भर पडते. बीड बायपास ते शिवाजीनगर रेल्वे गेटपर्यंत दुभाजक असणे गरजेचे असल्याचे आकाश बिराजदार यांनी सांगितले. देवळाई चौकात सिग्नल बसवल्यास फरक पडेल, असे अप्पासाहेब शिंदे म्हणाले. पुलाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी बाळासाहेब गायकवाड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चार महिने शेतकऱ्यांची कसोटी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मागील चार वर्षांचा शेतीचा आलेख घसरता आहे. सततच्या आवर्षणामुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण बिघडले आहे. शेतकऱ्यांच्या मनात उमेद जागवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ नेहमी तत्पर राहील' असे प्रतिपादन डॉ. बी. बी. भोसले यांनी केले. राजेवाडी (ता. बदनापूर) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रीय कृषी विकास योजना, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, कृषी विभाग आणि मोसंबी संशोधन केंद्राच्या वतीने शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) राजेवाडीला शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला विस्तार शिक्षणचे संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. धृतराज, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. एल. तांभाळे, मोसंबी संशोधन केंद्रप्रमुख डॉ. एम. बी. पाटील, तहसीलदार बालाजी क्षीरसागर, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. अवर्षणप्रवण स्थितीत मोसंबी व इतर फळपिकांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, 'दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशेची भावना आहे. पुढील चार महिने कसोटीचे असून या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. 'उमेद'सारख्या उपक्रमातून विद्यापीठ नवीन प्रेरणा देत आहे. शेतकऱ्यांशी असलेली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विद्यापीठ नेहमी तत्पर राहील.' यावेळी गटशेती, समूहशेतीवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. 'जलयुक्त शिवार' योजनेच्या माध्यमातून जास्त कामे मार्गी लावण्याबाबत नियोजन केले जाईल असे तज्ज्ञांनी सांगितले. मोसंबी फळपिकावरील रोग व नियंत्रण विषयावर डॉ. डी. एन. धृतराज यांनी मार्गदर्शन केले. 'रोग आल्यानंतर प्रभावी नियंत्रण करता येत नाही; मात्र, रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतलेली दक्षता हीच मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची खरी गुरूकिल्ली आहे' असे धृतराज म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. बी. पवार यांनी आणि सूत्रसंचालन विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लव्ह जिहाद इस्लामलाच अमान्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'लव्ह जिहाद'च्या नावाने सोशल मीडियामधून पोस्ट फिरत असून, त्यामुळे मुस्लिम व हिंदूमध्ये तेढ निर्माण होत आहे. या लव्ह जिहाद प्रकरणाचा निषेध करत असून, हा जिहाद इस्लाम धर्मालाच मान्य नाही, असे चुकीचे काम करत असलेल्यांना मुस्लिम धर्म स्वीकारत नाही. त्यामुळे 'इन्साफ लाओ, देश बचाओ, हिंदू मुस्लिम नफरत मिटाओ' हे अभियान सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती अल इन्साफ पब्लिक फाउंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती सलिम यमनी चाऊस यांनी शनिवारी पत्रकरांशी बोलताना दिली.
गेल्या तीन वर्षांपासून हे फाउंडेशन राज्यभर समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी काम करत आहे. लव्ह जिहादसारख्या घटनांचा हे फाउंडेशन विरोध करत आहे. इतर धर्मांतील मुला-मुलींशी लग्न करण्यास इस्लाम धर्म मान्यता देत नाही, असे त्यांनी सांगितले. लव्ह जिहादच्या नावाखाली देशात वाद निर्माण केला जात आहे. त्यास विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले.
लव्ह जिहाद हा धर्माविरोधी आहे. त्यामुळे लव्ह जिहादचे पत्र काढणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. काही घटनांमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. चुकीचे संदेश दिले जात आहेत. समाजातील लोक अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण न होता प्रेम निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील असल्याचे चाऊस यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांच्या कार्यक्रमांकडे पदाधिकाऱ्यांनी पाठ

$
0
0

औरंगाबाद : जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतींना आयएसओ प्रमाणपत्र वितरित करण्याचा कार्यक्रम शनिवारी झाली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाकडे जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी मात्र पाठ फिरविली. प्रशासन विश्वासात घेत नसल्याच्या कारणावरून पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.
संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाची प्रशासनाने पंधरा दिवसांपासून तयारी केली होती. कार्यक्रमाची तारीख, स्थळ, वेळ ठरविताना पाहुण्यांसह सर्वांच्या वेळा विचारात घेऊनच आजचा दिवस निश्चित केला होता. दुपारी तीन वाजता कार्यक्रम होणार होता. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर अधिकारी विरुद्ध सदस्य व पदाधिकारी अशी सरळ सरळ फळी झाल्याचे चित्र दिसून आले. सूत्रांनी सांगितले, की शनिवारी सकाळी पदाधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली तेव्हा दुपारच्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले होते. पण ऐनवेळी एकही पदाधिकारी कार्यक्रमासाठी आला नाही. आम्हाला विश्वासात न घेता कार्यक्रम आयोजित केला गेला, असा आक्षेप पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती विनोद तांबे, संतोष जाधव, शीला चव्हाण, सरला मनगटे यांच्यापैकी कुणीही कार्यक्रमास हजर नसल्याची सभागृहात चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितांच्या सरीत रसिक चिंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे बजाजनगर येथील हायटेक महाविद्यालयात अक्षरलेणं प्रस्तूत 'आनंद सुधा बरसे' या मराठी कविता अभिवाचनाच्या कार्यक्रमाला उपस्थितांची दाद मिळाली.
या कार्यक्रमात कवी सुधीर मोघे, सीमा मोघे, हर्षवर्धन दीक्षित, अश्विनी दाशरथे, रेवा जोशी यांनी कवितांचे अभिवाचन केले. सुरेश भट यांच्या 'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी' या मराठी गौरवगीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कवी लक्ष्मीकांत तांबोळी लिखित 'मराठवाडा गौरवगीत' सीमा मोघे व अश्विनी दाशरथे यांनी सादर केले. बालकलाकार रेवा जोशी हिने विं.दा. करंदीकर यांची 'एटू लोकांचा देश' ही बालकविता सादर केली. तसेच कार्यक्रमात बहिणाबाई, बा.भ. बोरकर, मुकुंदराज, कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सौमित्र, दासू वैद्य, संदीप खरे आदी नामवंत कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमास गेणू शिंदे, गोविंद दळवी, प्रतिष्ठानचे नीलेश राऊत, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव, राहूल तायडे, फिरोज पठाण आदींची प्रमुख होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश घुले यांनी केले तर, सूत्रसंचलन श्रीराम पोतदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिजित खारतोडे, स्वप्निल नवसरे, ईश्वर उमाळे, अविनाश सोनटक्के, सागर अहिरे, महेश आग्रे, कुशल पाटणी, युनूस नदाफ, अक्षय जाधव, स्वप्निल साळवे, अक्षय गोरे यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेततळ्यांना मोठ्या मागणीची अपेक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
दुष्काळी परिस्थितीत पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची योजना जाहीर केली आहे. वैजापूर तालुक्याला पुढील आर्थिक वर्षासाठी ६०० शेततळ्यांचे उद्द‌िष्ट देण्यात आले आहे. मात्र, फक्त तीन दिवसात तब्बल पाच हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करू शकतात, असा अंदाज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला आहे.
किमान दीड एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. ही जमीन शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. जेणे करून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. शेततळे घेण्यासाठी शेतकऱ्याकडून विहित नमुन्यातील अर्ज तथा संमंती प्राप्त होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी त्यांची मागणी ऑनलाइन प्रणालीद्वारे करावयाची आहे. लाभार्थ्यांनी अर्ज डाउनलोड करून यामधील प्रपत्र २ मध्ये नमून केलेली माहिती जमा करावी, तसेच मूळ अर्ज भरून लाभार्थींनी स्वतःच्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावीत. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी ११ वाजेपासून 'आपले सरकार' वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरणे सुरू होणार आहे. यावेळी अर्जातील माहिती ऑनलाइन भरून अर्जात नमूद केलेली जोडपत्राची स्कॅनकॉपी अपलोड करावी लागणार आहे. हे अर्ज महा-ईसेवा केंद्र अथवा सायबर कॅफेतून भरता येणार आहेत. अर्जासाठी २० रुपये सेवा शुल्क व सेवाकर लागू राहणार आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे प्रत्यक्ष मोजमाप करून अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. कृषी विभागाने वैजापूर तालुक्यात घेतलेल्या अंदाजानुसार पाच हजारांपेक्षा अधिक शेतकरी ऑनलाइन मागणी करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस प्रवाशांना अधिवेशनाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मान्यताप्राप्त एस. टी. कामगार संघटनेच्या नागपूर येथील अधिवेशनाचा फटका प्रवाशांना बसला आहे. औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील आगारांतील कर्मचारी अधिवेशनाला गेल्यामुळे एसटी बसच्या अंदाजे सात ते आठ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.
नागपूर येथे एस. टी. कामगार संघटनेचे अधिवेशन रविवारी आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात मुख्यमंत्री देव‌ेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी औरंगाबाद, कन्नड, गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव आणि सिडको बसस्थानकातून अनेक कर्मचारी गेले आहेत. अनेक कर्मचारी अधिवेशनाला गेल्यामुळे सोमवार सकाळपासून बसचे वेळापत्रक राखण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागली. कामावर असलेल्या अनेक वाहक आणि चालकांना डबल ड्यूटी देण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सिल्लोड, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. शहर बसच्या फेऱ्या रद्द करून वाहक आणि चालकांना विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर शहरांत पाठवण्यात आले. एसटीच्या वेळापत्रकाप्रमाणे बस चालविण्यासाठी अन्य संघटनेच्या वाहक चालकांची मदतही प्रशासनाने घेतली होती.
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रशासनाने सकाळी डबल ड्यूटी लावून वेळ मारून नेली. मात्र, दुपार आणि संध्याकाळ, रातराणी व मुक्कामी बसचे वेळापत्रक राखण्यासाठी कसरक करावी लागली. त्याचा फटका ग्रामीण भागात जाणाऱ्या बसला बसला. औरंगाबाद विभागात दररोज चार ते पाच हजार किलोमिटरच्या फेऱ्या रद्द होतात; अधिवेशनामुळे रविवारी सात ते आठ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेक कर्मचाऱ्यांनी रविवारी लग्नतिथी असल्याने सुटीचा अर्ज दिला होता. पण कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे सुटीवरील कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात आले.
अधिवेशनासाठी गेलेले कर्मचारी सोमवारी दुपारपर्यंत परतणार आहे. यामुळे सोमवारी ग्रामीण भागातील बस फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका बारावीच्या परीक्षार्थींना बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आगारातून पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी अधिवेशनाला गेल्याची माहिती मिळाली आहे. एकाच वेळी पाचशे चालक-वाहनक अधिवेशनाला जाण्याचा फटका प्रवासी वाहतुकीला बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिका सिंगची धमाल अन‍् दीपालीचे ठुमके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'दमा दम मस्त कलंदर अलिदा पहला नंबर' हे गाणे गात मिका सिंगने स्टेवर दणक्यात आगमन करताच सारा माहौल बदलून गेला. शिट्या, टाळ्या अन् ठेका धरून औरंगाबादकरांनी नाचायलाच सुरुवात केली. निमित्त होते 'लाइव्ह इन कॉन्सर्ट मिका सिंग फॉर पोलिस वेल्फेअर फंड-२०१६' या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाला तब्बल ५० हजाराहून अधिक रसिकांनी हजेरी लावली.
बीड बायपासवरील जबिंदा लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात मिका सिंगने एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. त्यामुळे त्याच्या चाहत्याच्या आनंदाला भरते आहे. हा 'विकएण्ड' औरंगाबादकरांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. पहिल्या गाण्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या मिका स‌िंगने 'खाली पिली खाली पिली रोकने का नही....मैं तेरे अगलबगल हू, तू मेरे अगलबगल है....', 'एबीसीडी पढली बहुत, एबीसीडी पढली बहुत, अब करनी तुझसे गंदी बात, गंदी गंदी बात....', 'ले गई दिल मेरा चुलबुली, ले गई दिल मेरा चुलबुली, खलीवली खलीवली, खलीवली..', 'देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार, छा रहा कैसा ए मजा रे, देखो देखो मैं तो गया रे, दिल भी गया रे..', 'दुनिया चले पिछाडी तो मैं चलू अगाडी, चिंता ता चिता चिता चिंता ता ता....', 'है 'सेलिब्रेशन नाचो दना दन, आज की पार्टी मेरी तरफसे....सब को बोलो मेरी तरफसे...' ही एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी सादर केली. 'के मैंनु प्यार ना मिले, तो मर जावाऽऽऽऽ' यासह दोन पंजाबी गितांनीही रसिकांना मोहिनी घातली. एमटीव्ही वरील विजेता साहील सोळंकी, गिता-मिता यांनीही त्यांचा परफॉर्मन्स सादर करत रसिकांना रिझवले.
सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद हिने 'आता वाजले की बारा' या लावणीसह दोन लावण्यांवर नृत्य सादर केले. तिच्या नृत्याने बेभान झालेल्या रसिकांनी ठेका धरून नाचालया सुरुवात केली. शिवाय मिमिक्री आर्टिस्ट नवीन प्रभाकरने पोटभरून हसवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…अन् जिंकली २४ तासांची मॅराथॉन

$
0
0

Nikhil.Nirakhi @timesgroup.com
'इव्हन इलनेस बिकम्स वेलनेस, इफ आय इज रिप्लेस्ड बाय वी' हे शब्द आम्ही आमच्या एकत्रित व अखंड प्रयत्नांनी यथार्थ ठरवले आहेत. सरकारी मानसिकता, अनेक गैरसोयी, साहित्याची अनुपलब्धता, हेवे-दावे, इगो यावर मात करून उत्तम समन्वय, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि अत्युच्च वैद्यकीय कौशल्य पणाला लावून महाराष्ट्रातील सर्व १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या इतिसाहात पहिल्यांदाच घाटी हॉस्पिटलमध्ये अवयवदान यशस्वी करुन दाखवले. एकूणच घाटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी व्यक्त केले.

पहिले अवयवदान कसे-कसे घडत गेले?
२५ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घरी निघण्याच्या तयारीत होतो. त्याचवेळी 'सर्जरी' विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव व सहयोगी प्रा. डॉ. सुरेश हरबडे आले आणि एका 'ब्रेन डेड' तरुणाच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली असून, आपल्याला त्याचे अवयवदान करायचेच आहे, असे त्यांनी सांगताच मी उडालो. अवयवदान करायचे म्हटल्याबरोबर असंख्य प्रश्नांची यादी क्षणार्धात डोळ्यासमोरून तरळली आणि हे कसे काय शक्य होईल, असा प्रतिप्रश्न त्यांना केला. आपण करू शकतो आणि करायलाच पाहिजे, असे दोघांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितल्यानंतर आम्ही सगळ्यांनी अवयवदान यशस्वी करण्याचा निर्धार केला आणि त्याचक्षणी कामाला लागलो. त्यासाठी 'झेडटीसीसी'चे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांना तातडीने कळविणे आवश्यक होते; पण त्यांना काही केल्या फोनच लागत नव्हता. शेवटी कसा तरी फोन लागला आणि त्यांनी डझनभर तपासण्या सांगितल्या. त्यानंतर बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी विभागामध्ये तातडीने तपासण्या करण्याच्या सूचना केल्या; पण तपासण्यांसाठी अमुक 'किट' नाही, तमुक साहित्य नाही, अशी उत्तरे मिळू लागली. मात्र काहीही करून आपल्याला या तपासण्या पूर्ण करायच्याच, वेळ पडली तर खासगीतून तपासण्या करू, असे सूचवल्यानंतर सकारात्मक मानसिकता तयार होत गेली. पुन्हा दुसऱ्याच क्षणी घाटीत 'बेड साईड टू-डी इको' नाही आणि ब्रेन डेड पेशंटच्या तपासणीसाठी टू-डी इको आवश्यक असतो, असे सांगण्यात आले. त्यासाठी डॉ. पर्सी जिल्ला यांनी फोन करताच, डॉ. पर्सी घाटीत दाखल झाले. ब्रेन डेड पेशंट मेन्टेन करणे अत्यंत अवघड बाब आणि त्यासाठी भूलतज्ज्ञांची टीम कामाला लागली. २५ फेब्रुवारीला दोनदा तपासणी करून संबंधित रुग्णाला ब्रेन डेड घोषित केले आणि त्यानंतर संबंधित रुग्णाला मेन्टेन करण्यासाठी डॉ. जाधव, डॉ. हरबडे, डॉ. उल्हास मिसाळ, प्रमोद अपसिंगेकर आदींची टीम अहोरात्र ओटीमध्ये ठाण मांडून होती. त्याचवेळी ज्या रुग्णालयात प्रत्यारोपण होणार होते, त्या चेन्नई, पुणे व औरंगाबादच्या दोन्ही हॉस्पिटलशी समन्वय साधून त्यांना पाहिजे तो रिपोर्ट देणे, माहिती देणे यासाठी डॉ. कैलास चिंतणे हे जवळजवळ २४ तास ड्युटी करत होते. दुसऱ्या दिवशी 'धूत'मध्ये यकृताचा बायोप्सीचा रिपोर्ट ओके आल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, रुग्णाचे नातेवाईक ताटकळले होते, आदल्या दिवशीपासून उपाशी होते, म्हणून कॅन्टीनमध्ये त्यांना जबरदस्ती नाष्टा करायला लावला. सगळे अवयव गेल्यानंतर पंचनामा होऊन शवविच्छेदन करणे आवश्यक होते्, पण पंचनामा होत नव्हता आणि त्यामुळे नातेवाईकांचा संयम ढासळत होता. त्यासाठी पोलिसांशी वारंवार संपर्क साधला. त्याचवेळी रुग्णवाहिकेतून मृतदेह नेण्यासाठी के. के. ग्रुपला आवाहन केल्यानंतर ग्रुपने क्षणार्धात मदत केली. मृतदेह पाठवल्यानंतरच मोकळा श्वास घेतला आणि २४ तासांची मॅराथॉन जिंकल्याचे समाधान मिळाले.

उपकरणांच्या खरेदी झाली आहे का?
मागच्या वर्षी उपकरणांची खरेदी प्रक्रिया उशिरा सुरू झाली आणि ही प्रक्रिया वेळेत न झाल्याने ८-९ कोटींचा निधी परत गेला. ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण सचिव मेधा गाडगीळ यांनी मे-जूनपासूनच तयारी सुरू केली होती. त्याचवेळी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी खरेदी विभागाशी सातत्याने समन्वय साधलाच; शिवाय सर्व विभागप्रमुखांनाही 'परचेस कमिटी'शी संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे 'डीपीसी'चा जवळजवळ १०० टक्के निधी खर्च झाला आणि साडेसहा कोटींची उपकरणे घाटीला यंदा मिळणार आहे.

रिईंबर्समेंट'मध्ये बदल झाला?
सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिईंबर्समेंटच्या फाईलची वरिष्ठता यादी प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आली. 'सिनिअरिटी ऑफ द फाईल'चे तत्व काटेकोरपणे पाळून पारदर्शकता आणण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूणच तक्रारी नगण्य झाल्या आहेत.

वाहतूक शिस्तीची स्थिती काय?
संपूर्ण घाटी परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यात नक्कीच यश आले आहे. घाटी परिसरामध्ये 'पार्किंग झोन', 'नो पार्किंग झोन' ठरविण्यात येऊन, आज 'नो पार्किंग झोन'मध्ये वाहन लावल्यास ते वाहन पोलिस घेऊन जातात, हे सर्वांना पुरते उमजले आहे.

घाटीतील इमारतींचे नूतनीकरणा कधी होणार?
घाटीतील सर्व जुन्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा जास्त वर्षे लोटली आहेत. त्यामुळे नूतनीकरण व विस्तारीकरण आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, अस्थिव्यंग, भूलशास्त्र विभागांसाठी स्वतंत्र 'जी प्लस थ्री' इमारत नियोजित आहे. 'सीव्हीटीएस'समोर ही इमारत उभी राहणार आहे आणि 'स्काय वॉक'द्वारे सर्जिकल इमारतीला जोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व वॉर्डांचे टॉयलेट-बाथरुम, ओटी व सर्व प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार २६ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच घाटीतील पोलिस चौकीचे काम झाले असून 'डीएमईआर'कडून परवानगी मिळाल्यानंतर ती सुरू होणार आहे. त्यामुळे बेगमपुरा ठाण्यात जाऊन तक्रार करण्याची गरज राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीच्या घरात घुसून विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका सतरा वर्षांच्या विद्या‌र्थिनीचा पाठलाग करून एक तरूण तिच्या घरात घुसला. एवढेच नव्हे तर, विदेशी चलन 'डॉलर' दाखवून अश्लिल हावभाव करत तिचा विनयभंग केला. या तरुणाला विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी चोप देऊन सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले.
सिटीचौक भागातील एक विद्यार्थिनी सिडको परिसरातील एका कोचिंग क्लासमध्ये ट्युशनसाठी जाते. ती शुक्रवारी रात्री ट्युशन संपल्यानंतर दुचाकीवरून घरी येत होती. त्यावेळी मोहमद शफीक शेख अब्दुल हमीद (रा. मंजूरपुरा) याने तिचा पाठलाग केला. ही तरुणी घराजवळ आल्यानंतर दुचाकी थांबवून घरात जाताना मोहमद शफीक याने तिला अडवले व तिच्या हातात दोन‌ डॉलर देत विनयभंग केला. तरुणीने आरडाओरड करताच तिचे नातेवाईक धावत आले. त्यांनी शफिकला चोप देऊन सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images