जुन्या भांडणाच्या वादातून सिल्लेखाना येथे दोन गटांत मंगळवारी रात्री साडेबारा वाजता तुंबळ हाणामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दाखल करून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
सिल्लेखान्यात तुंबळ हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे गस्तीवरील उपनिरीक्षक सय्यद सिद्दिकी, जमादार मंगेश अभंग, गायकवाड, डेडवाल यांनी तेथे धाव घेतली. यावेळी पोलिसांवर आरोपींनी दगडफेक केली. यामध्ये जमादार अभंग यांच्या बरगडीत दगडाचा फटका लागला, त्यांना मुका मार बसला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या अकरा आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये दोन्ही गटातील गुन्हे दाखल झालेल्या ११ जणांना अटक केली. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक नितेश इंद्रोले, शेख रहीम, मनमोहन कोलमी, विशाल पाटील व भवर यांनी केली.
वसीम कुरेशी याचा रात्री साडेबारा वाजता घराबाहेर मोठा आवाज आला. मोबीन, मोठा भाऊ सादिक, वडील शाकेर व आई अंजुम बानो घराबाहेर धावले. तेव्हा वसीमला हारूण अब्दुल रहेमान कुरेशी मारहाण करत असल्याचे दिसले. दारूसाठी शंभर रुपये न दिल्याने मारहाण करून वसीमच्या शिखातून दोन हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार मोबीन शाकेर कुरेशी याने दिली आहे. हारूण, नाजीम, फराजीम, तौजीम व ताकिर खालीद कुरेशी यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. त्यावरून पाच जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हारूण अब्दुल कुरेशी याने दुसऱ्या गटातर्फे तक्रार दिली आहे. शाकेर कुरेशी, सादीक, मोबीन, वसीम व अंजुम बानो यांनी जुन्या वादातून मारहाण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट