Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबादच्या सिंहांचे इंदूरमध्ये पालनपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयासाठी मिळालेल्या सिंहांचे सध्या इंदूरमध्ये पालनपोषण सुरू आहे. या सिंहांना ठेवण्यासाठी महापालिकेकडे सक्षम पिंजरा नाही. त्यामुळे सध्या त्यांना औरंगाबादला आणले जात नाही.

महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात पांढरे, पिवळे वाघ आहेत. मात्र, सिंहाची कमतरता आहे. सिंह असेल तर प्राणिसंग्रहालयाची शान वाढेल असे मानून महापालिकेने सेंट्रल झू ऑथॅरिटीशी संपर्क साधला. प्राणिसंग्रहालयासाठी सिंहाची जोडी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. झू ऑथॅरिटीने ही विनंती मान्य करून सिंहाची जोडी देण्याची तयारी दाखवली. इंदूरच्या प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यांपूर्वी जन्मलेले दोन छावे महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाला देण्याचे ठरले, परंतु त्यापूर्वी या दोन छाव्यांना ठेवण्यासाठी सक्षम पिंजरा तयार करा, अशी सूचना पालिका प्रशासनाला करण्यात आली. जोपर्यंत सक्षम पिंजरा तयार होत नाही, तोपर्यत हे छावे मिळणार नाहीत, असेही बजावण्यात आले. सक्षम पिंजऱ्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन छाव्यांचे पालनपोषण सध्या इंदूरच्या प्राणिसंग्रहालयात केले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिल्लोडच्या कन्याशाळेला अस्वच्छतेचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे कौतुक करून तिचे सामर्थ्थ जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आजही महिलांकरिता पुरेशा सुविधा निर्माण करून दिल्या जात नाहीत. किमान शाळेमधून तरी महिलांच्या सन्मानाचे संस्कार होण्याची अपेक्षा आहे. पण सिल्लोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर आणि शाळेची अवस्था सुजाण नागरिकाचे मन खिन् करणारी आहे.

पंचायत समिती व नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेत मुख्याध्यापक वगळता सर्व कर्मचारी महिला आहेत. या शाळेच्या आवारातच एक केंद्रीय शाळा व माध्यमिक प्रशाला आहे. या तिन्ही शाळांचा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. परंतु, शाळेच्या क्रीडांगणाचा वापर परिसरातील नागरिक शौचालयासाठी करतात. मद्यपान, गांजा ओढणाऱ्यांचा शाळेला विळखा आहे. टवाळखोरांचा विद्यार्थिनींना त्रास होतो. त्यांना जरब बसवण्यासाठी मुख्याध्यापकांपासून गावातील जाणत्या मंडळींनी अद्यापही पावले उचलली नाहीत. यामुळे परिसरातील दुर्गधीमुळे नाक दाबूनच शिकवावे लागते, असे शिक्षिकांनी सांगितले.

स्वच्छता पुस्तकातच
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले जातात. किमान शालेय पोषण आहार देताना, दिल्यानंतर व विद्यार्थ्यांनी स्वच्छ ठिकाणी बसून तो खावा याकडे मुख्याध्यापक व संबंधितांचे लक्ष असणे गरजेचे आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना अत्यंत अस्वच्छ ठिकाणी बसवून शालेय पोषण आहार दिला जातो.

जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाण करू नये यासाठी नगरपालिकेतर्फे वेळोवेळी नागरिकांचे प्रबोधन केले जाते. तरीही नागरिक जुमानत नाहीत. याला आळा घालण्यासाठी शाळेने कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमावा.
- अशोक कायंदे, मुख्याधिकारी

या घाणीच्या संदर्भात शाळेने पोलिस स्टेशनला पत्र दिले होते. परंतु, त्याचाही काही उपयोग झाला नाही. नागरिकांनी आपला परिसर समजून स्वच्छता राखावी.
- डी. के. फुसे, केंद्रप्रमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकष डावलून सिमेंट रस्त्याचे काम दामटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिमेंट रस्ता करताना त्यासाठी निश्चित केलेले निकष धाब्यावर बसवून सिडकोतील कामगार चौक ते महालक्ष्मी चौकाचे काम करण्यात येत आहे. नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आयुक्त सुनील केंद्रेकर पालिकेतून जाताच पुन्हा एकदा बनवेगिरीला सुरवात झाली आहे.

शहरातील रस्त्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नव्हती. महापालिका निवडणुकीच्या वेळी आमदार अतुल सावे यांनी सरकारकडे मागणी करून रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी २५ कोटींचा निधी आणला होता. पालिकेच्या यंत्रणेकडून ही कामे होणार होती. या निधीतून पाच रस्ते निवडले गेले. त्यापैकी सिडको एन दोन कामगार ते महालक्ष्मी चौक असा दीड किलोमीटरचा रस्ताही निवडण्यात आला. सिमेंटीकरण करताना त्यात वापरले जाणारे काँक्रिट कोणत्या दर्जाचे असावे, ते तपासण्यासाठीचे मशीन साइटवर आणून ते तपासले गेले पाहिजे, असा दंडक आहे. सिमेंट काँक्रिटचे थर अंथरल्यानंतर त्यावर विशिष्ट कालावधीपर्यंत क्यूरिंग करणे क्रमप्राप्त आहे, पण या रस्त्याबाबत सगळे निकष डावलले गेल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी महापालिकेने थर्ट पार्टी कमिटी केली आहे. या कमिटीने रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनाही सुमार दर्जा दिसून आला. संबंधित कंत्राटदाराला याविषयी सूचना केली असता मशीन तूर्तास खराब असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यानंतर काम थांबविण्याऐवजी पूर्ण केले गेले. त्यामुळे काँक्रिटचा दर्जा राखला गेला की नाही याबाबत

शंका आहे. आयुक्त केंद्रेकर यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करून कंत्राटदारांना अक्षरशः धारेवर धरले होते. ते पालिकेतून जाताच बनवेगिरी सुरू झाल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीबाबत वसाहतींमध्ये जनजागरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये असंख्य चुका झाल्या आहेत. नागरिकांनी आपापल्या भागातील आक्षेपांची नोंदणी पालिकेकडे केली आहे. काँग्रेसने याबाबत स्वतंत्र अभियान राबविले होते. त्याचा पुढचा भाग म्हणून आता औरंगाबाद विकास आराखडा विरोधी नागरी कृती समितीच्या वतीने वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेत आहेत. याप्रश्नी जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शहराचा सुधारित विकास आराखड्याचे प्रारूप पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केले होते. त्यात अनेक वसाहतींमधून पालिकेविरोधात असंतोष उफाळून आला होता. मंदिर, मशीद, बौद्धविहारांच्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले होते. अनेक रस्ते छोटे करून नको त्या ठिकाणाहून रूंद रस्त्यांचा प्रस्ताव या आराखड्यात मांडला आहे. नागरिकांना आक्षेप नोंदविण्यासाठीच्या मुदत कालावधीतच शहर काँग्रेसने गांधीभवनात स्वतंत्र मोहीम राबविली. त्याठिकाणी नवे व जुने नकाशे उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनी तिथे जवळपास हजाराहून अधिक आक्षेप नोंदविले. याठिकाणी काँग्रेस शहराध्यक्ष अक्रम यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद विकास आराखडा विकास विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. त्याचा पुढचा टप्पा रविवारपासून सुरू करण्यात आला आहे. अॅड. सय्यद अक्रम, राजेश मुंडे, राजेंद्र दाते पाटील यांनी वेगवेगळ्या वसाहतींमध्ये जाऊन डीपीबाबत नागरिकांची मते जाणून घेतली. शहरातील सर्व वसाहतींमध्ये जाऊन जास्तीत जास्त संख्येने आक्षेप नोंदविण्याबाबत जनजागरण करणार असल्याचे अक्रम यांनी सांगितले.

रविवारी बीड बायपास रोड येथे पाहणी केली. चुकीच्या पद्धतीने केलेल्या सुधारित विकास आराखड्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार आहे, त्यासाठी तयार रहा, असे आवाहन समितीने नागरिकांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीची भीती पळाली दूर

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
जगाची भाषा म्हणून ओळख असलेला इंग्रजी विषय शालेयस्तरावर शिकविणे सोपे नाही. त्यात आठवीपर्यंत नापास न करण्याची अट. त्यामुळे नववीला आलेल्या विद्यार्थ्याला अनेकदा हा विषय शिकणे कठीण वाटते, परंतु हा विषय विद्यार्थ्याला सोपा वाटावा म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून विषय शिकविण्यास कलावती चव्हाण हायस्कूलच्या संध्या काळकर यांनी सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीविषयीची भीती दूर झाली. त्यांनी राबविलेल्या 'मोटिव्हेशन फॉर रुरल इंग्लिश टिचर अँड स्टुडंट' प्रकल्पाची राज्यभर दखल घेतली गेली. ब्रिटिश काउंन्सिलमार्फत इंग्रजी शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात मेंटॉर, मास्टर ट्रेनर म्हणून त्या शिक्षकांनाही ट्रेनिंग देतात.


जगाची भाषा म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते. या भाषेत पारंगत होण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान कसे मिळते यावरही त्याचे यश अवलंबून असते. हा विषय शिकविताना, शिक्षकाचाही कस लागतो. त्यात आठवीपर्यंत सगळ्यांना पास करण्यात येते. त्यामुळे नववीला आलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड वाटू लागते. विशेषतः काही मराठी शाळांमधील, ग्रामीण भागातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांबाबत हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे विषय सोपा करून शिकविणे हे आव्हान शिकक्षासमोर असते. कलावती चव्हाण हायस्कूलच्या संध्या काळकर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून शिकवण्याच्या पद्धतीत बदल केले. त्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवितात. कृतीयुक्त शिक्षणावर भर देणाऱ्या काळकर मॅडम विद्यार्थ्यांमध्ये लवकरच आवडीच्या शिक्षक बनल्या. लहान मुलाला आपण भाषा कशी शिकवतो, त्याच पद्धतीने माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देतात.

त्यांचा 'मोटिव्हेशन फॉर रुरल इंग्लिश टिचर अँड स्टुडंट' हा प्रयोग इंग्रजी शिकविण्यासाठीचा उत्तम ठरला. राज्यपातळीवरही हा प्रयोग नावाजला गेला. विद्यार्थ्याची वाचन क्षमता वाढविण्यासाठी मोठ्याने वाचन करणे, ग्रुप रिडिंग, शब्दांचा संग्रह वाढविण्यासाठी संभाषण, शब्द लिहिण्याची स्पर्धा आदींवर त्यांचा भर असतो. भाषांतरासाठी रोज इंग्रजीच्या दहा ओळींचा अनुवाद करून घेतला जातो.

या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, याबाबत त्या सांगतात, नववीच्या वर्गात ४७ विद्यार्थी इंग्रजीबाबत अतिशय कच्चे होते. नियमित वर्गातही त्यांची उपस्थिती कमी असायची. त्यांना इंग्रजीचे शिकविणे हे आव्हान होते. त्यांना सुरुवातीपासून म्हणजे 'एबीसीडी'पासून शिकविण्याची सुरुवात केली. अनेकांची चार रेघी वही घेण्याची सुद्धा ऐपत नव्हती. सिंगल लाइनच्या वहिला चार लाइन तयार करून दिल्यानंतर अभ्यासाची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला स्मॉल 'एबीसीडी'नंतर एक अक्षरी शब्दाची सुरुवात झाली. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा अक्षरी शब्द लिहून घेण्याची तयारी करून घेतली गेली. त्यानंतर वाचनाला सुरुवात झाली. सुरुवातीला मुली वाचान करायच्या. त्यानंतर मुलांनी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला वाचताना विद्यार्थी एखाद्या शब्दाला अडखळायचे. त्यावेळी ते आपल्याच मित्राला विचारत असत. यानंतर वर्गात ग्रुप तयार केले. ग्रुपचा प्रमुख नेमून त्याला काही विद्यार्थी जोडलेले असत. एकमेकांमध्ये इंग्रजी शब्द बोलण्याची स्पर्धा, संभाषण, छोटी-छोटी वाक्य लिहून आणण्याचा होमवर्क असायचा. एखादा विषय शिकवायचा असेल तर त्याचे चित्र, पोस्टर, छोटी-छोटी वाक्य हे विद्यार्थ्याला तयार करून आणायला सांगण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांची वाचन, लिखाण क्षमता वाढण्यात झालाच. त्यांच्यांतील संवाद वाढला आणि आत्मविश्वासही वाढत गेला. शब्दसंग्रह वाढला, वाचनाची सवय जडली. त्याचा परिणाम असा झाला की ४७ पैकी ४५ विद्यार्थी हे इंग्रजी विषयात चांगल्या गुणांना उत्तीर्ण झाले.

आजही हा प्रयोग त्या सातत्याने करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजीचा तास हा अवघड वाटत नाही. या प्रयोगामुळे विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास, स्टुंडट लिडरशिपही समोर येण्यास मदत होते. या प्रक्रियेत इंग्रजी विषयाच्या शाळेतील स्वाती खोसे, मनिषा महाजन या शिक्षिकाही मदत करतात, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. त्यानुसार शिक्षकाने शिकविले पाहिजे. वर्गात विद्यार्थी बौद्धिक आणि शारीरिक गुंतलेले असलेले की ते अभ्यास करताना थकत नाहीत, असेही त्या म्हणतात. शिक्षकाने विद्यार्थांची क्षमता विचारात घेऊन शिक्षण पद्धती ठरविली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असते. त्यांची क्षमता वेगळी असते. प्रत्येकाला वेगळी ट्रिटमेंट देता आली पाहिजे. आपल्या वर्गात कच्ची मुले आहेत, मी काय करू, असे शिक्षकाने बोलणेच मुळात चुकीचे आहे, असे त्या सांगतात. विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्याला शिकविण्याची कला शिक्षकाकडे असेल तर कोणताही विषय अवघड ठरत नाही, असेही त्यांचे मत आहे.

शिक्षकांनाही इंग्रजीचे धडे
९वी व १०वीला इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना नवीन अध्यापन पद्धती व आधुनिक शैक्षणिक प्रणालीची उपयोजना आपल्या दैनंदिन अध्यापनात कशी करावी, याचे धडेही त्या देतात. ब्रिटिश काउंन्सिकलच्या उपक्रमात त्या मेंटॉर, मास्टर ट्रेनर आहेत. त्याअंतर्गत त्या इंग्रजीच्या शिक्षकांनाही शिकवितात. अध्ययन, अध्यापनात झालेल्या मूलभूत बदलांकडे नव्या नजरेने पाहणे गरजेचे आहे. त्यात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले तर, आपल्या विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळेल, असे त्यांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनाई आदेश मोडून ‘बँड बाजा बारात’ जोरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहराचा पदभार घेतल्यानंतर अनेक घोषणा केल्या होत्या. वर्ष संपत आले तरी त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्याचे दिसून येत नाही. मुख्य रस्त्यावर डीजेच्या तालावर नाचत वराती काढणे सुरू आहे. घाटी प्रशासनाच्या अडचणीही कायम आहेत. त्याचबरोबर जालना रोडवरील वाहतुकीला शिस्त लागलेली नाही.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १४ मे २०१५ रोजी मंगल कार्यालय व डीजे चालकांची बैठक घेतली होती. हरित लवादाच्या निर्णयानुसार त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर वरात काढण्यास मनाई आदेश जारी केले होते. त्याचबरोबर मंगल कार्यालयाबाहेर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडचण होते. त्यामुळे मंगल कार्यालय चालकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या होत्या. या आदेशाचे काही दिवस पालन केल्यानंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' झाली.

आयुक्तांनी ११ जून २०१५ रोजी घाटी हॉस्पिटलला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या तपासाबाबत विशेष पथक स्थापन करणार असल्याचे घोषित केले होते. त्याचबरोबर दलालांवर अंकुश ठेवून चांगले काम करणाऱ्यांना ओळखपत्र, घाटी हॉस्पिटलकडून मकई गेटकडे जाणारा मधला मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करणार, एकच प्रवेशद्वार ठेवणार असल्याचे घोषित केले होते, मात्र या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही.

सिग्नलचा प्रस्ताव कागदावरच

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहानूरमिया दर्गा रोड, योगीराज हंसतीर्थ चौक, गोदावरी टी पॉइंट (बीड बायपास), रोपळेकर हॉस्पिटल चौक, सेव्हन हिल्स ब्रिज, चिश्तिया चौक, जवाहरनगर चौक (गजानन मंदिर ते सूत गिरणी रोड), देवळाई चौक, क्रांतिचौक, हर्सूल रोडवर दोन ठिकाणी सिग्नल बसवण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते, मात्र क्रांतिचौक वगळता अद्याप उर्वरित ठिकाणी सिग्नलची उभारणी झालेली नाही.

बेशिस्त वाहतूक कायम

आयुक्तांनी सुरुवातीलाच जालना रोडवरील बेशिस्त वाहतुकीला चाप बसण्यात येईल, असे जाहीर केले होते, मात्र अद्यापही जालना रोडवरील बेशिस्त वाहतुकीत सुधारणा झालेली नाही.

डीजे लावणाऱ्या वरातींना बंदी घालण्याबाबत आदेश देण्यात आले होते. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस ठाण्यांमार्फत करण्यात येते. आदेशाचे उल्लंघन होत असल्यास त्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

- अमितेशकुमार, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन मंजुरीचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
हैदराबाद मुक्ती संग्रामातील चार भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. ए. एम. बदर यांनी दिले आहेत.
हैदराबाद मुक्तीसंग्रमात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना राज्य शासनाने सन्मान पेन्शन योजना लागू केली. राज्यशासनाने १९९५ मध्ये त्यात सुधारणा केली. त्यानुसार सावरगाव (ता. हदगाव) येथील राजाबाई पांडोजी क्षीरसागर यांच्या पतीने १९९० मध्ये राज्य शासनाकडे अर्ज केला. पुरभाजी रामजी टुले, गंगाधर तुकारामपंत देशमुख यांनी १९९०-९१ मध्ये अर्ज केला. त्याचप्रमाणे नांदेड येथील खंडासिंग सुजानसिंग कामठेकर यांनी २००१ मध्ये सन्मान पेन्शन मिळावी म्हणून अर्ज केला. शासनाने अटींची पूर्तता केली नसल्याचे कारण दाखवून २०१३ मध्ये चारही स्वातंत्र्यसैनिकांचे अर्ज रद्द केले. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
शासनाने अर्ज नामंजूर केल्यावर खंडपीठाने हे प्रकरण पुन्हा राज्य शासनाकडे सुनावणीसाठी पाठवले होते. अर्जदारांनी पुरावा म्हणून जी कागदपत्र सादर केली, तसेच जिल्हा गौरव समितीने अर्जदाराची केलेली शिफारस कशी काय योग्य नाही, याबाबत शासनाने स्पष्ट अभिप्राय दिलेले नव्हते. म्हणून शासनाने पुन्हा हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे अंतिम निर्णयासाठी पाठवले होते. मुख्यमंत्र्यांनी अर्जदारांनी अटींची पूर्तता केली नाही म्हणून अर्ज रद्द केले. खंडपीठाने यापूर्वीच्या निर्णयात जी कारणे दाखवून प्रकरणावर निर्णय घेण्यास सांगितले होते, ते विचारात घेतले नाही. मुख्यमंत्री उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष असले तरीही पेन्शन योजनेच्या उद्दिष्टाला बाधा येण्यासारखा निर्णय घेता येत नाही. त्याचप्रमाणे शासनाने प्रत्येक जिल्ह्यात स्वातंत्र्य सैनिकांची जिल्हा गौरव समिती नेमली आहे. अर्ज करणाऱ्यांनी त्या काळात चळवळीत सहभाग घेतला किंवा नाही याची खात्री व सत्यता पडताळणे हे त्या समितीचे कार्य आहे. अशा समितीने शिफारस केल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे अर्ज नामंजूर करण्याचा अधिकार शासनाला पोहचत नाही, असा युक्तिवाद विलास पानपट्टे यांनी केला. स्वातंत्र्यसैनिकांनी त्याकाळी केलेल्या कामाबाबात शासनाने वस्तूस्थिती नाकारलेली नाही. त्यामुळे याचिकेतील मुद्दे ग्राह्य धरून खंडपीठाने पेन्शनसाठी चार स्वातंत्र्यसैनिकांना पात्र ठरवले. शासनातर्फे भूषण कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहित्र मि‍ळवण्यासाठी शेतकऱ्यांची फरफट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील हतनूर शिवारात फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अतिउच्च दाबामुळे गट नंबर ४८९ मधील रोहित्र जळाले आहे. त्यामुळे सुमारे बारा दिवसांपासून परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याअभावी फरफट होत आहे. गुराढोरांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परंतु, महावितरणकडून रोहित्र बदलून देण्यास उशीर केला जात आहे.
या शिवारात २००५ पासून बसवण्यात आलेले रोहित्र सुस्थितीत काम करत होते. परंतु, २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात रोहित्र अचानक मोठा आवाज होवून जळाले. त्यातील ऑइलची गळती होऊन निकामी झाले. याबाबत महावितरणच्या संबधित विभागाला कळवून रोहित्र कन्नड येथील उपविभागाकडे जमा करण्यात आले. याबाबत वारंवार विचारणा करूनही दाद मिळाली नाहीत स्थानिक गावकऱ्यांनी मंगळवारी महावितरणचे सहायक अभियंता आर. व्ही. दहिवाल यांच्याकडे विचारणा केली. रोहित्र शिल्लक नसल्याने आणखी दोन ते तीन दिवस लागतील, असे दहिवाल यांनी सांगितल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उन्हाळा असल्यामुळे या रोहित्रावरील १४ ते १५ कृषिपंप केवळ अर्धा ते एका तास चालत आहेत. परंतु, वीज नसल्याने कुटुंबासह गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबरोबरच चार ते पाच दिवसापासून कांदा, कांदा बिजोत्पादन पिके पाण्याअभावी सुकत आहेत. दरम्यान, भाजप जिल्हा सरचिटणीस संजय खंबायते यांनी रोहित्रासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणला केले आहे. या रोहित्रावरील विजेवर चालणाऱ्या कृषीपंपाच्या माध्यमातून वस्तीवरील माणसे व गुरांच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सद्यस्थितीतील विहिरीत जेमतेम पाणी असूनही त्याचा उपयोग घेता येत नाही. विजेचा भार नसताना रोहित्रासाठी फरफटच होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तामिळी राजप्पांचे मराठी भाषा प्रेम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तामीळनाडू येथून आलेल्या एका वृत्तपत्रविक्रेत्याने 'माय मराठी' वर प्रेम सिद्ध केले आहे. पैठण येथील या विक्रेत्याने नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व वृत्तपत्रे व पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देऊन एक आदर्श घालून दिला आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त अनेक उपक्रम, कार्यक्रम होतात. परंतु, वाचन संस्कृतीला हातभार लावणारे उपक्रम क्वचितच होतात. त्यातच परभाषिक व्यक्तीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पाऊल उचलणे नक्कीच अभिनंदनीय आहे. पैठण येथील बसस्थानकावरील वृत्तपत्रविक्रेते ए. राजप्पा हे तामीळ आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेनुसार यावर्षी एस. टी. महामंडळाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. त्यानिमित्त पैठण आगारातही कार्यक्रम घेण्यात आले. परंतु, या उपक्रमात २७ फेब्रुवारी रोजी ग्राहकांना वृत्तपत्रांवर १० टक्के, साप्ताहिके व पुस्तकांवर १५ टक्के सवलत देऊन ए. राजप्पा यांनी सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांनी बसस्थानकावरील स्टॉलवर मराठी भाषेच्या गौरवार्थ फलक उभारला होता. या दिवशी राजप्पा यांनी ग्राहकांना सुमारे साडेतीन हजार रुपयांची सवलत दिली. त्यांच्या उपक्रमाची अनेक प्रवाशांनी आस्थेने चौकशी केली. ए. राजप्पा यांच्या कुटुंबाने मराठी चांगलीच आत्मसात केली आहे. त्यांचे कुटुंब मराठी भाषेचाच वापर करते. शिवाय राजप्पा यांनी वृत्तपत्रविक्री व्यवसायातून पैठणमधील ३५ मराठी तरुणांना रोजगार दिला आहे. 'मराठी भाषेने मला रोजगार दिला. त्यामुळे मराठी वाचन संस्कृतीला हातभार लावणे माझे भाग्य समजतो,' अशी प्रतिक्रिया राजप्पा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर, तुम्हीच अभियंत्यांना शिकवा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'महापालिकेत अभियंत्यांची मोठी फळी आहे, पण सर्वांचे काम पीएमसीवर अवलंबून असते. त्यांना नवीन तंत्रज्ञानाची फारशी माहिती नाही. त्यामुळे गरज पडली तर या अभियंत्यांना शिकवा,' अशी विनंती महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. आडवाणी यांना केली.
शहरात महापालिका फंडातून रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे सुरू आहेत. त्यासाठी पालिका सुमारे ६० कोटी खर्च करणार आहे. पुणे येथील जे. पी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाने पाच रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगच्या कामासाठी सुमारे २५ कोटी दिले आहेत. त्यातून ४ रस्त्यांची कामे सध्या केली जात आहेत. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बकोरिया यांनी या सर्व कामांची पाहणी केली. आज रस्त्याच्या कामाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांची बैठक घेतली. त्यात रस्त्यांच्या कामाचे थर्डपार्टी इन्सपेक्शन करणारे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. आडवाणी, सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. प्रणेश मुरनाळ, प्रा. उमेश कहाळेकर यांच्यासह शहर अभियंता सखाराम पानझडे, सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बकोरिया यांनी रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल अधिक आग्रह धरला. 'महापालिकेत शहर अभियंत्यांपासून शाखा अभियंत्यांपर्यंत अभियंत्यांची मोठी फळी आहे, पण या सर्वांचे काम पीएमसीवर अवलंबून सुरू आहे. रस्त्यांच्या कामासाठीच्या नवीन तंत्रज्ञानाची फारशी माहिती या अभियंत्यांना नाही. त्यामुळे गरज पडली तर त्यांना ट्रेनिंग द्या,' अशी विनंती बकोरिया यांनी प्राचार्य डॉ. पी. एस. आडवाणी यांना केली. 'रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी प्राध्यापकांची वेळोवेळी मदत लागेल. त्यांनी ती करावी. आपण सगळे मिळून शहराला खड्डेमुक्त करू,' असे बकोरिया म्हणाले. प्राचार्य आडवाणी यांनी बकोरिया यांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
रस्ता बिघडला तर कारवाई
रस्त्यांच्या कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. आतापर्यंत जे झाले ते झाले. यानंतर रस्त्याचे प्रत्येक काम काटेकोरपणे तपासले जाईल. दर्जामध्ये थोडीजरी तफावत आढळली किंवा शंका आली तर कंत्राटदार व अधिकारी यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करू,'अशी कानउघाडणी बकोरिया यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरोदिया कंरडकावर औरंगाबादचे नाव

$
0
0

फिरोदिया कंरडकावर औरंगाबादचे नाव
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुणे येथील फिरोदिया करंडक स्पर्धा औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गाजवली. एकांकिका स्पर्धा, पपेट शो कला प्रकारात विद्यार्थिनींनी पारितोषिके पटकावली. राज्यभरातील १५ संघात अंतिम फेरीसाठी ही चुरशीची स्पर्धा झाली.

राज्यातील प्रतिष्ठेची 'फिरोदिया करंडक स्पर्धा' अत्यंत चुरशीची ठरली. राज्यातील ५० महाविद्यालयांच्या संघांनी प्राथमिक फेरीत सादरीकरण केले. यातील २८ संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम फेरीत १५ संघात चुरशीची स्पर्धा रंगली. या स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. 'पपेट शो' प्रकारात अमृता कुलकर्णी व स्नेहल निकम यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. अनुष्का सरकटे अभिनय पारितोषिकाची मानकरी ठरली. 'धुवाँ' एकांकिकेत अनुष्काने 'चौधरायन'ची भूमिका खुबीने सादर करीत स्पर्धा गाजवली. या एकांकिकेचे दिग्दर्शन संजय मोरे यांनी केले. यानिमित्त औरंगाबाद शहराने स्पर्धेच्या ४२ वर्षात प्रथमच अभिनयाचे पारितोषिक पटकावले. बालगंधर्व रंगमंदिरातील झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण केले. या यशाबद्दल प्राचार्य पी. एस. अडवाणी, ए. एस. भालचंद्र, यु. के. कव्हळेकर, शिरीष तांबे व सांस्कृतिक सचिव श्रीहरी चिंचखेडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधिमंडळ अधिवेशनात टीडीआर घोटाळा गाजणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील टीडीआर (ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइटस्) घोटाळा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजणार आहे. हा घोटाळा 'मटा' ने उघडकीस आणला. 'मटा'मधील याच बातम्यांच्या आधारे आमदार सुभाष झांबड यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारला आहे.
पालिकेच्या नगररचना विभागाने नारेगाव येथील बारा मीटरच्या रस्त्यासाठी २४ मीटरचा टीडीआर दिला. या संबंधीचे वृत्त 'मटा' ने ९ डिसेंबरच्या अंकात प्रसिध्द केले. त्यानंतर फाजलपुरा आणि अल्तमश कॉलनी येथील टीडीआरचे प्रकरण देखील 'मटा' ने उघडकीस आणले. याची दखल घेऊन पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके यांच्यासह पाच जणांना कारणेदाखवा नोटीस बजावली. नोटीसचे उत्तर समाधानकारक नसल्यामुळे या पाचही जणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले. त्यांच्या आदेशामुळे नगररचना विभागातील पाच अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करणे पालिका प्रशासनाला क्रमप्राप्त झाले, पण त्यात वेळ काढण्यासाठी पालिका प्रशासनाने नगररचना विभागाच्या संचालकांना पत्र पाठवून विभागीय चौकशीसाठी सक्षम अधिकारी देण्याची मागणी केली. या चौकशीसाठी एक महिन्यापासून संचालकांनी अधिकारी दिला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष झांबड यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी तारांकित प्रश्न विचारला आहे.
किती प्रकरणांत घोटाळा?
पालिकेतील टीडीआर घोटाळ्यात किती अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केली, टीडीआरच्या किती प्रकरणात घोटाळा झाला, असे विविध उपप्रश्नही आमदार सुभाष झांबड यांनी विचारले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील पुलाचे काम सुरू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सातारा
तीन महिन्‍यांपासून निधीअभावी रखडलेल्‍या पुलाच्‍या कामाला पुन्हा एकदा मंगळवारपासून सुरूवात झाली. याआधी वेगवेगळ्या कारणाने पुलाचे काम दोन वेळेस बंद पडले होते. त्यामुळे गावकरी, तांड्यावरील रहिवाशी, बटालियनचे कर्मचारी व कॉलेजच्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती.
या पुलाच्‍या कामाला मंजुरी मिळाल्‍यानंतरही कामाला लवकर सुरूवात झाली नाही. त्यानंतर कॉलम उभारणीपर्यंत काम झाल्‍यानंतर निधी नसल्‍यामुळे मागील तीन महिन्‍यांपासून काम बंद पडले होते. वाहतुकीसाठी बाजूने तात्‍पुरता कच्‍चा रस्ता तयार करण्‍यात आलेला आहे. परंतु, सांडपाण्‍याची पाइपलाइन फुटल्‍यामुळे त्यावर पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने वाहनचालक घसरून पडत होते. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम तसेच गावात जाण्‍यासाठी रस्ता करण्‍याची मागणी सोमिनाथ शिराणे, विठ्ठल नरोडे, गंगाधर पारखे यांनी केली आहे. पुलाचे काम कोणताही अडथळा न येता पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अभियंता वृषाली गाडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजाराला कंटाळून वृद्धेने जाळून घेतले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
बीड बायपास मिरजवेगावनगरी येथे मुलीकडे राहणाऱ्या एका ६९ वर्षांच्‍या वृद्ध महिलेने आजाराला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी जागतिक महिला दिनी घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्‍यात नोंद करण्‍यात आली आहे.
वर्षा वसंत जोशी (वय ६९, रा. मिरजगावेनगरी, म्हस्के पेट्रोलपंपाच्‍या मागे, बीड बायपास) या दीड वर्षापासून बँकेत अधिकारी असलेली मुलगी अक्षता अभय मुळे यांच्‍याकडे राहत होत्या. त्यांची दुसरी मुलगी मुंबईला राहते. त्या शुगर, बीपी व किडनीच्‍या आजाराने त्रस्त होत्या, असे पोलिसांनी सांगितले. अक्षता मुळे या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दहावीतील मुलीला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गेल्या होत्या. या काळात घरात कोणी नसल्याची संधी साधून वर्षा जोशी यांनी बाथरूममध्‍ये जाऊन जाळून घेतले. त्यांना घाटी रुग्‍णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्‍यात नोंद करण्‍यात आली असून, पुढील तपास पोहेकाँ सुभाष भोसले हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्दयी खून व पाशवी बलात्कार

$
0
0

निर्दयी खून व पाशवी बलात्कार

औरंगाबाद - शहरात गाजलेल्या मानसी देशपांडे खून खटल्यातील मुख्य आरोपी जावेद खान ऊर्फ टिंगऱ्या याला बलात्कार, खून या खटल्यात दोषी ठरवून हायकोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्दयी व पाशवी बलात्काराची ही पार्श्वभूमी.

अहिंसानगरातील पूर्वा अपार्टमेंटमध्ये ११ जून २००९ रोजी मानसी शंकर देशपांडे (वय २१) या महाविद्यालयीन तरुणीचा रात्रीच्यावेळी निर्घृण खून झाला होता. बलात्कार करून तिच्या शरीरावर खिळे ठोकले, तसेच मोबाइलच्या वायरने गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद शहरात मोठी खळबळ उडाली होती. ती आपल्या घरात एकटीच झोपलेली असताना चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या जावेदखान याने मोबाइल चार्जिंगच्या वायरने तिचे हात बांधले, ओढणीने पाय बांधले. घरातील मोबाइल, सोन्याची अंगठी व रोख ४५० रुपये आदींची चोरी केली. त्यानंतर मानसीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या डोक्यात स्क्रूड्रायव्हर घालून आणि शरीरावर २१ वार करून तिचा निर्घृण खून केला होता.

या घटनेतील आरोपीला तातडीने पकडावे, या मागणीसाठी महिला संघटनांसह विविध संस्था, राजकीय पक्षांनी निषेध मोर्चेही काढले होते. यासंदर्भात शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात मानसीचा भाऊ अनिकेतने फिर्याद दिल्यानंतर पोलिस निरीक्षक सोपान बोरसे यांनी गुन्हा नोंदविला. श्वानपथक, तसेच ठसे तज्ज्ञांची तपासासाठी मदत घेण्यात आली. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यासाठी विशेष तपासपथक स्थापन करण्यात आले. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी तपासात मदत केली होती. सायबर सेलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या तपासात मानसीचा चोरीला गेलेला मोबाइल हॉटेल व्यवसायिक प्रदीप चंडालिया यांच्याकडे सापडला. त्याने तो टिंगऱ्याने दिल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरी, बलात्कार आणि खून त्यानेच केल्याचा शोध लावला होता. पोलिस निरीक्षक सोपान बोरसे यांनी २२ जून २००९ रोजी प्रदीप चंडालिया, राम बोडखे, आणि जावेदखान ऊर्फ टिंगऱ्या या आरोपींना अटक केली होती. बलात्कार करून मोबाइलच्या वायरने मानसीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी तपासाअंती जावेद खान याच्यावर जिल्हा कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सरकार पक्षातर्फे ३३ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यातील सहाजणांनी साक्ष फिरविली होती. या प्रकरणात मानसीच्या घरातून मोबाइल व सीमकार्डची चोरीही झाली होती. ते विकत घेणारे प्रदीप चंडालिया व राम संभाजी बोडखे यांच्यावर आरोपीला मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. पाठक यांच्यासमोर झाली होती. त्यांनी जावेद यास बलात्कार, खून व पुरावा नष्ट करणे या प्रकरणात दोषी ठरवून कलम ३०२ अन्वये जन्मठेप, दरोडा व अन्य गुन्ह्यांत एक वर्ष सक्तमजुरी व सात वर्षे, तसेच बलात्कारप्रकरणी १० वर्षे कैदेची शिक्षा सुनावली होती.

या निर्णयाच्या विरोधात आरोपी व राज्य शासनाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या याचिकेची सुनावणी न्या. ए. व्ही. निरगुडे व न्या. इंदिरा जैन यांच्यासमोर पूर्ण झाली असून निकाल २२ जानेवारी रोजी राखीव ठेवण्यात आला होता. टिंगऱ्याला देण्यात आलेली ही शिक्षा अपूर्ण आहे, त्याला फाशीची शिक्षाच हवी होती. किमान त्याला पूर्ण कालावधीची जन्मठेपेची शिक्षा तरी व्हायला हवी होती, या कारणावरुन राज्य सरकारच्या वतीने खंडपीठात या शिक्षेला आव्हान देण्यात आले. मानसी देशपांडे हिच्यावर अत्त्याचार करून झालेला खून ही अति दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. अत्याचार करणाऱ्यास जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हा संदेश समाजात गेला पाहिजे म्हणून फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील सुनील सोनपावले यांनी हायकोर्टात केला. हायकोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले.

------------

चौकट

0 राम बोडखे, प्रदीप चंडालिया यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड

0 ११ जून २००९ रोजी मानसीचा खून झाल्याचे उघड

0 मानसीच्या अंगावर आढळल्या २१ जखमा

0 मानसीवर बलात्कार करून खून झाल्याचा आला होता वैद्यकीय अहवाल

0 फ्लॅटमधून मोबाइल, कपडे, अंगठीची चोरी

0 सप्टेंबर २०१० मध्ये कोर्टात दोषारोपत्र दाखल

0 सरकार पक्षाने ३३ साक्षीदार तपासले त्यापैकी ६ फितूर

0 २४ जानेवारी २०१२ रोजी सेशन कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

0 हायकोर्टात सरकार व आरोपीतर्फे अपील

0 ४ वर्ष हायकोर्टात सुनावणी

0 २२ जानेवारी २०१६ रोजी सुनावणी पूर्ण. निकाल राखीव

0 ८ मार्च रोजी हायकोर्टाचा निकाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेचा डांबर प्रकल्प ३५ ऐवजी ५ टनांचा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'डांबर प्रकल्प ३५ वरून ५ टनांवर आणण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. यामुळे खर्चात कपात होईल आणि रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यकतेनुसार डांबर मिळेल,' अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी 'मटा'ला दिली.
पॅचवर्क आणि छोट्या रस्त्यांचे डांबरीकरणासाठी पालिकेचा स्वतःचा डांबर प्रकल्प असावा, अशी कल्पना तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मांडली. त्यांच्या कल्पनेतील डांबर प्रकल्प ३५ ते ४० टनांचा असल्याचे अधिकारी आता सांगतात. त्यासाठी ३ कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. सर्वसाधारण सभेतही या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर पालिकेच्या अभियंत्यांनी विविध ठिकाणच्या प्रकल्पांची पाहणी केली. ३५ ते ४० टनांचा प्रकल्प शहराच्या दृष्टीने खूप मोठा
असेल. त्यामुळे प्रदूषण देखील जास्त होईल, असे अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकल्पाऐवजी ५ टनाचा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयापर्यंत पालिका प्रशासन आले.
नक्षत्रवाडीत प्रकल्प
पालिकेत रस्त्याचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराकडे पाच टनांचा डांबर प्रकल्प आहे. तो वापरात नाही. तो कंत्राटदार हा डांबर प्रकल्प दुरुस्त करून पालिकेला विनामोबदला देण्यास तयार आहे. त्यामुळे त्याचा प्लांट घेण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. नक्षत्रवाडी भागात एसटीपीच्या शेजारी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. येथून रोज आवश्यकतेनुसार डांबर तयार करून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणवाडी येथून महिलेचे मंगळसूत्र पळवले

$
0
0

कोकणवाडी येथून महिलेचे मंगळसूत्र पळवले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संध्याकाळी पतीसोबत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या विवाहितेचे ३९ हजाराचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवले. रविवारी रात्री साडेदहा वाजता कोकणवाडी परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्मला राजू रेड्डी (वय ३० रा. पद्मपुरा) ही म‌हिला रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर पतीसोबत फिरायला बाहेर पडली होती. कोकणवाडी येथील अहिल्याबाई होळकर चौकातील पुतळ्यामागे हे जोडपे फिरत होते. यावेळी समोरून एक दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला. या दुचाकीस्वाराने निर्मला रेड्डीच्या गळ्यात असलेले ३९ हजारांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावत पसार झाला. रेड्डी दांपत्याने आरडाओरड करेपर्यंत हा चोरटा पसार झाला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वर्षे चालला खटला

$
0
0

सहा वर्षे चालला खटला
अटक केलेल्या पोलिसांनी व्यक्त केले समाधान
vijay.deulgaonkar.timesgroup.com

औरंगाबाद - मानसी देशपांडे बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी टिंगऱ्याला तत्कालीन पीएसआय नीता मिसाळ, पोलिस कर्मचारी सिद्धार्थ थोरात व नावेदखान या पथकाने अटक केली होती. २२ जून २००९ रोजी अंधाऱ्या रात्री तापडिया नाट्य मंदिराजवळच्या गल्लीत या तिघांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. या तिघांनीही टिंगऱ्याला कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'मारेकरी टिंगऱ्याला ठोठावलेली फाशीची शिक्षा ही माझ्यासाठी कोर्टाने महिला दिनी दिलेली अमूल्य भेटच आहे', असे नीता मिसाळ यांनी म्हटले आहे.

१२ जून २००९ रोजी अहिंसानगर येथे मानसी देशपांडे या घरात एकट्या असलेल्या तरुणीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खळबळजनक प्रकारानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी पोलिस ठाणे तसेच गुन्हेशाखेची वेगवेगळी पथके सक्रीय केली होती. यापैकीच एक क्रांतिचौक पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पीएसआय नीता मिसाळ व सिद्धार्थ थोरात, नावेदखान यांचे होते. या तिघांनी टिंगऱ्याची संपूर्ण माहिती गोळा केली होती. त्याच्या नेहमीच्या ठिकाणी त्यांची नजर होती. मात्र, ‌तो हाती येत नव्हता. २२ जून २००९ रोजी पावसाळ्या रात्री टिंगऱ्याचा शोध सुरू होता. यावेळी एका खबऱ्याने पथकाला फोन केला. पैठणगेट, सन्मीत्र कॉलनी मार्गे निराला बाजारकडे टिंगऱ्या येत असल्याची पक्की खबर मिळाली. वेळ अत्यंत कमी होता. या गुन्हेगाराला पकडण्यासाठी इतर कुमक येईपर्यंत आरोपी पसार होण्याची शक्यता होती. या पथकाजवळ दोन दुचाकी होत्या. त्यांनी तापडिया नाट्य मंदिराच्या गल्लीमध्ये सापळा रचला. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. अंधारात टिंगऱ्या लपत छपत येत होता. सर्व्हिस रिवॉल्व्हर सोबत असलेल्या पीएसआय नीता मिसाळ समोरून आल्या तर ‌थोरात व नावेदखान यांनी पाठीमागून चाल केली. काही कळायच्या आतच अंधारामध्ये टिंगऱ्याच्या कंबरेत हात घालून थोरातने त्याला विळखा घातला तर क्षणाचाही वेळ न दवडता नावेदखानने त्याला हातकडी घातली. थोडीशी झटापट झाली. सिद्धार्थ थोरातला टिंगऱ्या ओळखत होता. त्याने 'क्या साब क्या किया' असे विचारले. त्यावर 'खामोश बैठ घरफोडीमे उठाया है' असे त्याला सांगण्यात आले. त्याच्यावर घरफोडीचे सात गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला हे खरे वाटली. त्याला नेण्यासाठी मोठे वाहन नव्हते. दुचाकीवर नेणे शक्य नव्हते. एका रिक्षाला थांबवण्यात आले. टिंगऱ्याला रिक्षात कोंबवण्यात आले. हातकडी रिक्षाच्या वरच्या बाजूला असलेल्या रॉडमध्ये कुलुपबंद करण्यात आली. उपायुक्तांचा फोन बंद लागत असल्याने पीएसआय मिसाळ यांनी आयुक्त बिष्णोई यांना ही माहि‌ती दिली. बिष्णोई यांनी याची गंभीर दखल घेत काही मिनीटातच मोठा फौजफाटा निराला बाजार येथे पाठवला व दहा दिवसांपासून पोलिसांच्या नाकीनऊ आणणाऱ्या टिंगऱ्याला बंदोबस्तात सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात हलवण्यात आले.

....

चौकट

सायबर तपासामुळे लागला सुगावा

या खून प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी तांत्रिक बाजूंचा तपास केला होता. अशा प्रकारच्या गुन्ह्यातील हा पहिलाच तपास होता. मानसीच्या घरातून चोरलेला मोबाइल टिंगऱ्याने पंचम बियर बारचा चालक प्रदीप चंडालिया व राम बोडखे यांना विकला होता. त्यांना अटक केल्यानंतर टिंगऱ्याचा माग लागला होता. गौतम पातारे यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले होते.

कोट

जागतिक महिला दिनी कोर्टाने सुनावलेल्या जावेदखानच्या फाशीचा निर्णय एेकून समाधान वाटले. त्याच्या खऱ्या कृत्याचे फळ त्याला मिळाले. महिला दिनी कोर्टाने दिलेला हा निर्णय माझ्यासाठी अमूल्य भेट आहे.

नीता मिसाळ - सहायक पोलिस निरीक्षक (सध्या पुणे क्राईम ब्रँचला कार्यरत आहेत.)

जावेदखानला कोर्टाने फाशीचा दिलेला निर्णय स्तुत्य आहे. आम्ही याबाबत कोर्टात मागणी केली होती. अशा निर्णयामुळे असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीला वचक बसेल. तसेच कोर्टाच्या निर्णयाबाबत जनमताचा विश्वास आणखी दृढ होईल.

अॅड. राजेंद्र मुगदिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातव्यवस्था राखण्यासाठी स्त्रियांवर परंपरांची बंधने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'जागतिकीकरणानंतर अन्य उपभोग्य वस्तूंप्रमाणे स्त्रीच्या देहाचेही वस्तूकरण करण्यात आले. आज तर तिला सरोगसीच्या माध्यमातून विकले जात आहे, स्त्री देहाचे वस्तूकरण थांबविणे हेच आपल्यासमोर आव्हान आहे,' असे स्त्री चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.
जागतिक म‌हिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, उपायुक्त वसंत परदेशी, राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, नलिनी चोपडे, डॉ. सुहास मोराळे, प्रा. निर्मला जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
'भारतीय स्त्री मुक्ती संघर्षः इतिहास आणि आव्हाने' विषयावर प्रा. परदेशी यांचे व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या, वस्त्रोद्योग क्षेत्रातील महिलांनी सन १९९० मध्ये ८ मार्च रोजी मोठे आंदोलन केले. या ऐतिहासिक दिनापासून हा दिन साजरा करण्यात यतो. पूर्वीपासूनच स्त्रीयांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती भारतात होत्या. सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. नंतर शाहू महाराजांनी करवीर संस्थानात कायदा करून स्त्रीयांना संरक्षण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी स्त्रियांना सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा याचे समान वाटप व्हावे, या हेतूने हिंदू कोड बील मांडले. अलीकडच्या काळात बेटी बचाव-बेटी पढाव अशा पोकळ घोषणा दिल्या जातात. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इतिहासाची वस्तूनिष्ठपणे फेरमांडणी करणे गरजेच आहे, असेही त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. चोपडे आपल्या भाषणात म्हणाले, वंशाचा दिवा मुलगाच असतो ही धारणा चुकीची असून विविध क्षेत्रात मुलींनी भरारी घेत कुटूंबाचे नाव मोठे केले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन डॉ. बीना सेंगर यांनी केले तर, आभार प्रा. निर्मला जाधव यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचे अपहरण; तिघांचा बलात्कार

$
0
0

विवाहितेचे अपहरण; तिघांचा बलात्कार

आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका विवाहित महिलेचे सोमवारी रात्री आठ वाजता अपहरण करून तिला वडगाव कोल्हाटी येथे नेऊन तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी पहाटे पाच वाजता या महिलेला पुन्हा कार्तिकी हॉटेलच्या चौकात आणून सोडण्यात आले. तिने क्रांतिचौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली.

या म‌हिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २२ वर्षाची ही विवाहिता जटवाडा परिसरात आई व दोन भावांसोबत राहते. ती सध्या पतीपासून विभक्त राहत असून, एका महिला वकिलाकडे मदतनीस म्हणून कामाला आहे. पाच दिवसांपूर्वी या महिलेच्या मोबाइल क्रमांकावर दीपक (रा. बजाजनगर) नावाच्या तरुणाने फोन केला होता. दीपकने भेटण्याची मागणी केली, मात्र, या महिलेने ओळखत नसल्यासे सांगत नकार दिला होता. यानंतर दीपकचे सातत्याने फोन येत होते. नकार दिल्यास तो शिवीगाळ करीत होता. सोमवारी सायंकाळी महिलेच्या मोबाइलवर दीपकचे सतत फोन आले. यावेळी तिने वैतागून कोण आहे, काय बोलायचे ते समोर येऊन बोल असे सांगितले. यावेळी दीपकने तिला कार्तिकी हॉटेलच्या चौकात भेटण्यासाठी बोलावले. रात्री आठच्या सुमारास महिला कार्तिकी हॉटेलच्या चौकात उभी होती. यावेळी लाल रंगाच्या दुचाकीवर एक तरुण तेथे आला. त्याने आपली ओळख दीपक असल्याचे सांगि‌तले. त्याच्यासोबत आणखी दोनजण होते. हे आपले मित्र असल्याचे दीपकने तिला सांगितले. त्याने तिला सोबत चलण्याची मागणी केली. महिलेने नकार दिला असता तिला ठार मारण्याची धमकी तिघांनी दिली. यानंतर दीपकने तिला त्याच्या दुचाकीवर बसवून बाबा पेट्रोलपंप, बजाजनगरमार्गे वडगाव कोल्हाटी येथील एका खोलीत नेले. तिथे मारहाण करीत तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा उल्लेख तिने तक्रारीत केला आहे. पहाटे पाच वाजता तिला दीपकने पुन्हा कार्तिकी हॉटेलच्या चौकात आणून सोडले व केस केल्यास जिवंत जाळण्याची धमकी देत पसार झाला. या घटनेनंतर महिलेने क्रांतिचौक पोलिस ठाणे गाठून तिने ही आपबीती कथन केली. हा प्रकार कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी दीपक व इतर दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images