Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘विलासरावांंच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी मुख्यमंत्री डॉ. विलासराव देशमुख यांच्यानावाने अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी मागणी एनएसयूआयने केली. शंभर एकर जागा द्यावी, त्यावर केंद्र उभारून तेथे विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

एनएसयूआयच्या शिष्टमंडळाने गुरुवार (१० मार्च) रोजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली. मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले विलासराव देशमुख यांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक समस्या सोडविण्याचे काम केले. युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या विलासराव यांच्या नावाने शंभर एकर जागेवर अध्यासन केंद्र उभारण्यात यावे. केंद्रातून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही भेट घेतली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सागर सोळुंके, निलेश अंबेवाडीकर, विजय कांबळे, सूरज निकम, शिवदत्त मिसाळ, अजय नन्नवरे, सोनू पाईकडे, शुभम बनकर, महमूद हसनी, संतोष जाधव, अगस्त वर्मा यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माझं शिवार : नियोजनातून संपन्नतेकडे

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
कन्नड तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती तीन भागांत विभागली आहे. त्यात सोयगावला लागून असलेल्या भागात तुलनेत पाणी बऱ्यापैकी उपलब्ध असते. याच भागातील हस्ता गावातील योगेश सोमनाथ नीळ हे तरुण शेतकरी. घरी एकूण नऊ एकर शेती, पण सहा एकर कायम कोरडवाहू. विश्वासाच्या पाण्याची शेती तीन एकर. वडील शेतीत तर मोठे भाऊ प्राध्यापक. गावालगतच शेत असल्याने त्यावर लक्ष ठेवण्याचा फायदा नीळ यांना झाला.

एक विहिरीच्या जोरावर रबीची पिके काढण्याचे नेहमीच आव्हान होते. तीन वर्षांपूर्वी सरकारी अनुदानाची मदत घेऊन ठिबक सिंचन केले. कपाशी, मका ही पिके घेतली. एक एकरात कापसाची लागवड केली होती. १६ क्विंटल कापूस निघाला. नियोजनातून वेगळा प्रयोग राबविला तर त्याचा फायदा योगेश नीळ यांना दिसून आले. त्यावरून दुसऱ्या वर्षी मल्चिंग करून गावरान मिरचीची लागवड केली. मिरचीचे पीक तीन महिन्यांत येते शिवाय एक रोपाला तीन बहार घेऊ शकतो. नीळ यांनी लावलेल्या मिरचीने चांगले उत्पन्न दिले. तिसऱ्या वर्षी कृषी खात्याकडून अनुदान घेऊन आणि लुपीन कंपनीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दहा गुंठ्याचे ग्रीन हाउस उभारले.

एरव्ही वेगळा प्रयोग करण्याचे धारिष्ट्य कुणी दाखवित नाही. शेतीमध्ये प्रयोग करताना केवळ पीक, फळे किंवा भाज्यांची लागवड केली जाते. योगेश नीळ यांनी वेगळा विचार या ग्रीन हाउसमध्ये गुलाबाची लागवड केली. जून २०१४मध्ये पुण्याहून एक्स्पोर्ट क्वालिटीची ७२०० रोपे आणली. बेड पद्धतीने त्याची लागवड केली. गुलाबाची शेती करताना फार दक्षता बाळगावी लागते. ठिबक सिंचन करताना रोपट्यांनी वरच्या बाजूनेही पाणी उपलब्ध करून दिले. विहिरीत पाणी होते. गुलाबाला दिवसाकाठी १५ मिनिटे पाणी द्यावे लागते. चार महिन्यांत फुले येणे सुरू झाले. पाणी, खत आणि निगा योग्य राखली गेल्याने चॉकलेटी गुलाबाची टपोरी फुले पाहता पाहता अख्ख्या ग्रीन हाउसमध्ये लगडली. गेल्या महिन्यांत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने औरंगाबादच्या बाजारपेठेत योगेश यांनी २० हजार गुलाबाची फुले विक्रीसाठी दिली. गुलाबाचा एक बहार सर्वसाधारणपणे ४५ दिवसांत येतो आणि चार वर्षे फुले येतात. गुलाबाची लागवड केल्यानंतर पहिल्यांदा छाटणी केली त्यानंतर निगा राखणे, पाणीनियोजन याचे वेळापत्रक पाळणे आवश्यक असल्याचे योगेश यांनी सांगितले.

तीन एकर शेतीत दहा गुंठे गुलाब, १५ गुंठे काकडी, २० गुंठे टरबूज, एक एकरात कापूस आणि पाऊण एकरात गहू आहे. भविष्यात ग्रीन हाऊस वाढवून त्यात आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

बियाणांची निर्मिती
ग्रीन हाउस, ठिबक सिंचन, मल्चिंगच्या मदतीने विविध पिके आणि फळभाज्या घेणारे योगेश नीळ बियाणांच्या निर्मितीतही आहेत. दहा, दहा गुंठ्याच्या दोन प्लॉटमध्ये प्रत्येकी कांदा आणि टोमॅटोचे बियाणे बनविले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीचा निकाल लांबणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल यंदा लांबण्याची शक्यता आहे. बहिष्कार आंदोलनामुळे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे मंडळाकडे परत पाठविण्यात येत असून, गुरुवारपर्यंत उत्तरपत्रिकांचे ६० गठ्ठे मंडळाच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. मंडळात उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व्यवस्थित, संरक्षणात ठेवण्याकडे मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक गठ्ठे अस्ताव्यस्त, फाटलेल्या अवस्थेत कार्यालयात होती.

राज्यातील विनाअनुदानित उच्चमाध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. ऐन परीक्षांच्या काळात शिक्षकांचे हे आंदोलन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचे ठरण्याची शक्यता आहे. शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीला नकार देत असल्याने अनेक उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावरील उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत मंडळाच्या कार्यालयाकडे येत आहेत. त्यात बारावीच्या उत्तरपत्रिकांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीसाठी पुन्हा नव्याने शिक्षक शोधण्याची वेळ मंडळावर आली आहे. दररोज आलेल्या गठ्ठ्यांची विषयनिहाय विभागणी करायची, पुन्हा तपासणीसाठी त्या त्या विषयाचे तपासणीस शिक्षक शोधायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे हा कार्यक्रमही मंडळात सुरू आहे. गुरुवारपर्यंत उत्तरपत्रिकांचे साठ गठ्ठे मंडळांकडे जमा करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसावर केला हेल्मेटने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूक शाखेच्या कॉन्सटेबलवर दुचाकीस्वाराने हेल्मेट डोक्यात मारून हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता दिल्ली गेट परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी जावेद अजिज पटेल याला अटक करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेचे पीएसआय प्रमोद इंगळे, कॉन्सटेबल नारायण पायघन, विजय पिंपळे, खडसन हे चौघे दिल्लीगेट परिसरात हेल्मेट सक्ती मोहीम राबवत होते. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत होते. यावेळी नारायण पायघन यांनी जावेद अजिज पटेल (रा. अबरार कॉलनी, बीड बायपास रोड) या दुचाकीस्वाराला अडवले. त्याने हेल्मेट डोक्यात न घालता दुचाकीच्या मागे बांधले होते. यावर पायघन यांनी त्याला पावती घ्यावी लागेल, असे ‌सांगि‌तले. या गोष्टीचा राग आल्याने जावेदने पावती घेण्यास नकार देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याला समजावून सांगताना त्याने अचानक हेल्मेट काढून पाठीमागून पायघन यांच्या डोक्यात मारले. पायघन यांच्या डोक्याला मुका मार लागला.

इतर पोलिसांनी दुचाकीस्वार जावेदला ताब्यात घेत सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या विरुद्ध पायघनच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरकडून दोघींची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहिल्या पत्नीशी फारकत घेत त्याने दुसरा विवाह केला. यानंतर अवघ्या सहा दिवसांत पत्नीला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवत पुन्हा पहिल्या पत्नीशी विवाह केला. घरी परतल्यानंतर दुसऱ्या पत्नीला हा प्रकार समजला. तिने तडक सिडको पोलिस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला. आरतीनगर मिसारवाडी भागात हा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपी डॉ. ज्ञानेश्वर रामनाथ चौधरीला (रा. आरतीनगर) अटक करण्यात आली असून शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डॉ. चौधरी याचा २०१० मध्ये एका विवाह झाला होता. लग्नानंतर या दांपत्याला एक मुलगा झाला. मात्र, कौटुंबिक कलहामुळे आपसात त्यांनी फारकत घेण्यासाठी दावा दाखल केला. कोर्टाने १५ ऑक्टोबर २०१५ रोजी त्यांचा घटस्फोट मंजूर केला. यानंतर चौधरी याने एका तरुणीशी ओळख वाढवली. तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत त्याने स्वतःचे घर तिच्या नावावर केले. तसेच तिच्या वडिलांकडून दोन लाख रुपये लग्नासाठी घेतले.

१७ फेब्रुवारी २०१६ रोजी त्याने एका घरगुती कार्यक्रमात तिच्यासोबत विवाह केला. त्यापूर्वी त्याने गोड बोलून तिच्या नावावर केलेले घर पुन्हा स्वतःच्या नावावर करून घेतले.

लग्नानंतर दोन ते तीन दिवसांतच त्याने पत्नीला धुळ्याला शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये पाठवले. यानंतर सहा दिवसांनी त्याने २३ फेब्रुवारी रोजी पहिल्या पत्नीसोबत आर्य समाज पद्धतीने विवाह केला. दरम्यान, कॉलेजला सुटी असल्याने त्याची दुसरी पत्नी सोमवारी घरी आली. घरी आल्यानंतर तिला हा प्रकार समजला.

तिने पतीला या प्रकरणी जाब विचारल्यानंतर त्याने तिला घरातून हाकलले. त्याच्या दुसऱ्या पत्नीने सरळ पोलिस ठाणे गाठून आरोपी डॉ. ज्ञानेश्वर चौधरीविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी डॉ. चौधरीला अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाईत १७ एप्रिलला मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा, देवळाईतील पोटनिवडणुकीसाठी येत्या १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशी, १८ एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

सातारा, देवळाई परिसरासाठी दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. देवळाई वॉर्ड (क्रमांक ११४) खुल्या प्रवर्गासाठी आहे. सातारा वॉर्ड (क्रमांक ११५) अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पालिकेचे आयुक्त २२ मार्च रोजी पोटनिवडणुकीची घोषणा करतील. २२ मार्च ते २८ मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येतील. २९ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३० मार्च रोजी त्यांची छाननी केल्यावर लगेच उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ एप्रिल आहे. १७ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असून, सोमवारी (१८ एप्रिल) मतमोजणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस, विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठात बाचाबाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
संशोधक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करणाऱ्या मार्गदर्शकाला बडतर्फ करून फौजदारी दाखल करा, या मागणीसाठी कुलगुरूंना भेटण्यास आलेल्या संशोधक विद्यार्थी आणि पोलिसांत शुक्रवारी बाचाबाची झाली.

शुक्रवारी संशोधक विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे सदस्य आणि पदाधिकारी कुलगुरूंच्या भेटीसाठी आले होते, मात्र भेट देण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुल कुलगुरूंनी पोलिसांना बोलावले व यानंतर पोलिस आणि संशोशक विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. दुपारी साडेचार ते पाच ही वेळ विद्यार्थी भेटीसाठी देण्यात आली आहे. किमान दोन मिनिटे कुलगुरुंनी आमच्याशी बोलायला हवे. यावरच संघटना आणि विद्यार्थी अडून बसले होते. विद्यापीठात संशोधक विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक, पीएचडीचे बाजारीकरणाच्या प्रकरणानंतरही प्रशासन काहीच करत नाही. यामुळे पुराव्यासह सम्यक विद्यार्थी संघटना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, स्वाभिमानी मुप्टा यांसह संशोधक विद्यार्थी दुपारी चारच्या सुमारास कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र 'आपण मिटिंगमध्ये वस्त आहोत भेटू शकत नाही,' अशी माहिती आपल्या स्वीय सहायकांमार्फत देत कुलगुरुंनी भेट नाकारली होती. या प्रकारामुळे विद्यार्थी चिडले व त्यांनी घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : मराठमोळी महाराष्ट्रीय थाळी

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com
शहरातील अनेक हॉटेलांमध्ये राजस्थानी, गुजराथी थाळी उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनेक हॉटेलांत महाराष्ट्रीय पदार्थ मिळतात, मात्र महाराष्ट्रीय थाळी काही मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यातही सकाळी आणि सायंकाळी वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या भाज्या मात्र फार ठिकाणी मिळत नसतील. बन्सीलाल नगर भागातील रोहित धूत यांचे महाराष्ट्रीय भोजनालयात सकाळी आणि सायंकाळी वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. मराठमोळी चव असलेल्या या थाळीची चव सर्वसामान्य नोकरदारांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वांना महाराष्ट्रीय थाळीची चव आवडली आहे.

हॉटेल व्हिट्स चौकातून बन्सीलालनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला महाराष्ट्रीय भोजनालय आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी रोहित धूत या तरुणाने हे भोजनालय सुरू केले. रोहितचे वडील मोहनलाल धूत आणि त्यांची आई रत्नमाला यांनी सुमन पोळी भाजी केंद्र सुरू केले. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अखेर रोहित धूत यांनी महाराष्ट्रीय भोजनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी महाराष्ट्रीय भोजनालयाच्या महाराष्ट्रीय थाळीत बटाटे, पनीर आणि ‌शिमला बेसन या तीन भाज्या होत्या तर, दुपारनंतर येणाऱ्या ग्राहकांना वटाण्याची भाजी, स्पेशल पिठले, गोबी मटर या भाज्या देण्यात आल्या. रोज सकाळच्या आणि दुपारच्या सत्रांत वेगवेगळा मेनू हे या भोजनालयाचे वैशिष्ट्य बनले आहे.

'महाराष्ट्रीय थाळी'तील खाद्यपदार्थ तयार करण्याचे काम सकाळी सातपासून सुरू होते. त्यात तीन प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. काळा मसाला, रेड ग्रेव्ही आणि सुकी भाजी यांचा त्यात समावेश असतो. भोजनालयात दररोज ताजी भाजी आणली जाते. काळ्या मसाल्याची भाजी तयार करण्यासाठी पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा, बाजरी, काजूकनी मगज आदी परतून घेतले जाते. त्यानंतर त्याचे मिक्सरमधून पेस्ट तयार केले जाते. नंतर टमोटो टाकून क्रश केले जातात. हे पदार्थ शिजवून त्यात काळा मसाला टाकला जातो. तयार केलेला काळा रस्स भाजीसाठी वापरला जातो. तांबडा रस्ता तयार करताना कांदा, टोमॅटो परतून त्यात काजू मगज टाकले जाते. हे मिश्रण शिजवून घेतले जाते. त्यात गरम मसाला टाकला जातो. त्यात आवश्यकतेनुसार मीठ, तिखट टाकले जाते. मेनूप्रमाणे हा रस्ता भाजीसाठी वापरला जातो. मराठमोळ्या भाज्यांबरोबर शेंगदाणे, जवस, कारळं आदींच्या चटण्याही थाळीत सर्व्ह केल्या जातात.

महाराष्ट्रीय थाळीमध्ये गाजर, मुळा, कांदा यांच्या सॅलडचा समावेश आहे. तीन भाज्यांबरोबर चटणी, एक गोड पदार्थ, ताक यांचाही थाळीत समावेश आहे. भातासाठीही खास तांदूळ वापरला जातो. पुरणपोळी हे या भोजनालयाचे वैशिष्ट्य, असल्याचे धूत यांनी सांगितले.

बन्सीलालनगर परिसरात अनेक खासगी कार्यालये आहेत. तेथील कर्मचारी, त्याचबरोबर कॉलेजातील विद्यार्थीही येथे नियमितपणे येतात. रविवारी स्पेशल दाळबाटी, गट्ट्याची भाजी, काळ्या मसाल्यात केलेली वांग्याची भाजी, चुरमा, पुरणपोळी आदी पदार्थ उपलब्ध असतात.

आई-वडील मेस चालवत होते. त्यांनी पुढे पोळी-भाजी केंद्र सुरू केले. घरात लहानपणापासून हा व्यवसाय आहे. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी भोजनालय सुरू केले. भोजनालय आणि पोळी-भाजी केंद्र येथील भाज्या एकसारख्या नसाव्यात, याची काळजी घेतली जाते, असे रोहित धूत सांगतात. नोकरदार, विद्यार्थी यांना थाळी परवडेल आणि दर्जाही राखला जाईल, याकडे लक्ष दिले जाते. बन्सीलालनगर भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. ते नियमितपणे येथे येतात. त्यांच्या ग्रुपचे कार्यक्रम, वाढदिवसही येथे साजरे केले जातात. काही परदेशी पर्यटकांनीही येथे मराठमोळ्या भोजनाची चव चाखली आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोठ्या रस्त्यांवरील खड्डे आता जेट प्रेशरने बुजविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मोठ्या रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी यापुढे तात्पुरती मलमपट्टी न करता हॉट मिक्स असलेल्या जेट प्रेशर मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनचे प्रात्यक्षिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले.

या मशीनच्या सहाय्याने जिथे खड्डा आहे त्यावर जाऊन हवेचा जोरदार दाब देऊन खड्डा साफ केला जातो. त्यातील धूळ काढल्यानंतर प्रेशरने डांबर सोडले जाते. त्यावर हॉटमिक्स पद्धतीने मटेरिअल ओतून सफाईदारपणे खड्डा बुजविला जातो. या यंत्रणेद्वारे एवढे प्रेशर निर्माण केले जाते की खड्ड्यातील मटेरिअल आपसूकच एकसंध होऊन जाते. खडी, डांबर उखडू नये, यासाठी त्यावरून रोलर फिरविले की खड्डा बुजतो. प्रमुख राज्य महामार्ग, रहदारीचे रस्ते याच्या डागडुजीच्या वेळेस अनेक अडचणी येतात. प्रसंगी ट्रॅफिक थांबवून खड्डे बुजविले जातात.

आता या मशीनचा वापर केला तर कामातही दर्जा टिकेल आणि ट्रॅफिकला अडथळा निर्माण होणार असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. मशीनचे प्रात्यक्षिक वाळूज लिंक रोडवर दाखविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंदे करणाऱ्यांना बसणार चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुप्रतिक्षित रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. त्याचे बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना चाप बसणार असल्याचे अध्यक्ष सुनील पाटील आणि उपाध्यक्ष रवी वट्टमवार यांनी सांगितले.

यासंदर्भात सुनील पाटील म्हणाले, 'या विधेयकाचे आम्ही स्वागतच केले आहे. आपल्या औरंगाबादमध्ये अवैध बांधकाम करणारे अनेक ‌बिल्डर आहेत. त्यांना चाप बसेल यात काही शंका नाही. याशिवाय आम्ही क्रेडाईचे सदस्य नेहमीच ग्राहकांच्या हिताकडे लक्ष देतो. क्रेडाईच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीने सरकारशी चर्चा केली आहे. त्यानंतर हे विधेयक आणले आहे.'

रवी वट्टमवार म्हणाले,'शहराजवळ सातारा परिसरात ३५०हून अधिक अवैध घरे, टाउनशिप बांधण्यात आल्या. त्यांच्यापैकी अनेक बांधकामे अवैध आहेत. ते बिल्डर क्रेडाई संस्थेचे सदस्य नाहीत. आता अशा बिल्डरांना चाप बसेल यात काही शंका नाही. सोबतच शहरातल्या हजारो ग्राहकांना दिलासा मिळेल.' बिल्डरांच्या मनमानीला आणि फसवणुकीला आळा घालणाऱ्या या विधेयकाचा बारीक अभ्यास करून शहरातील बिल्डरांनी यापुढे काम करण्याचे आवश्यक आहे. या विधेयकामुळे आता ग्राहकास बिल्डरला नियोजित वास्तुबाबत सर्व काही विचारणा करण्याचे अधिकार आहेत. या विधेयकानुसार निवासी; तसेच व्यावसायिक बांधकामाची खरेदी-विक्री चटईक्षेत्र निर्देशांकानुसारच करावी लागणार असल्यामुळे फसवणुकीला आपोआप आळा बसेल, असे पाटील आणि वट्टमवार यांनी स्पष्ट केले.

याशिवाय विधेयकानुसार गृहबांधणी किंवा व्यावसायिक बांधकामासाठी ग्राहकाकडून घेतलेल्या रकमेपैकी ७० टक्के रक्कम बिल्डरला स्वतंत्र, एस्क्रो खात्यात जमा करणे अनिवार्य झाले आहे असेही त्यांनी सांगितले. या विधेयकामुळे बांधकाम व्यवसायात पारदर्शता येणार आहे. बिल्डर आणि ग्राहकांचेही उत्तरदायित्व निश्चित होणार असल्याने बिल्डर आणि ग्राहकांमध्ये होणारे वाद नक्कीच कमी होतील. याशिवाय बिल्डरांना त्यांच्या प्रकल्पाची इत्थंभूत माहिती प्राधिकरणाजवळ तसेच स्वत:च्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावी लागेल. यातून खरी पारदर्शकता येईल, असे वट्टमवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणी ‘रेड झोन’मध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेले प्राणी आता 'रेड झोन'मध्ये आले आहेत. प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेल्या वाघांचे पोट खपाटीला लागले आहे. नीलगाय आणि सांबरांना त्वचारोगाची लागण झाल्याची चिन्हे असून, सर्पालयातील सापांची रयाच गेली आहे. या मुक्या वन्यप्राण्यांची योग्य निगा राखली जाते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील 'आमटेज् अॅनिमल अर्क'मधून १७ फेब्रुवारी रोजी राजा आणि रेणू ही बिबट्याची जोडी सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आली. रेणू ४ मार्च रोजी आजारी पडली. तिच्या आजाराचे निदान प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे किंवा इतर डॉक्टरांनाही करता आले नाही. ७ मार्चला रेणूने तीन पिलांना जन्म दिला. ९ मार्चला ही तिन्ही पिले दगावली. रेणूचे आजारपण, पिलांचे निधन यामुळे प्राणिसंग्रहालयातील एकूणच प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न चर्चेत झाला आहे. त्यांच्या देखभालीविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

पिवळे आणि पांढरे वाघ प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण आहेत. प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी येणारे नागरिक जास्तीत जास्त वेळ वाघांना पाहण्यासाठी घालवतात. या वाघांची अवस्था आता वाईट झाली आहे. त्यांचे पोट खपाटीला गेले आहे. पोटात अन्न नसल्यामुळे पिंजऱ्यातच सैरभैर फिरणारे व डरकाळी फोडणारे वाघ नागरिकांना पहावे लागत आहेत. वाघांना दररोज रात्री खाण्यासाठी बीफ दिले जाते. मंगळवारी मात्र त्यांना उपवास घडविला जातो. वाघांची सध्याची प्रकृती लक्षात घेता आठवड्यातील किती दिवस ते उपाशी राहतात याची कल्पना येऊ शकते. पिवळ्या वाघांच्या खंदकासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी सळयादेखील अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे वाघ केव्हा खंदकात पडेल याचा नेम राहिलेला नाही.

प्राणिसंग्रहालयात सांबर आणि नीलगाई मोठ्या संख्येने आहेत. कावळे आणि अन्य पक्षी त्यांच्या पाठीवर बसतात आणि चोच मारून त्यांना जखमा करतात. या जखमांमुळे निलगाय व सांबरांना त्वचारोग जडला आहे. त्यांच्या आंगावर जागोजागी पक्ष्यांनी चोच मारल्याचे व्रण आहेत. काही नीलगाईंची त्वचाही झडू लागली आहे. पक्ष्यांपासून त्यांचे संरक्षण करण्याची कोणतीही योजना व्यवस्थापनाने अद्याप हाती घेतली नाही. नीलगाई व सांबराच्या पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यात गढूळ व दूषित पाणी साचलेले आहे. तेच त्यांना प्यावे लागते. नीलगाय आणि सांबरासारखीच हरीण व काळविटांची अवस्था आहे. हिरव्या चाऱ्याऐवजी अनेकवेळा त्यांच्या समोर कडबा टाकला जातो. हरीण, काळविटांसाठी कडबा पैष्टिक नसल्याचे सांगितले जाते.

सर्पालयातील सापांची अवस्थादेखील बिकट झाली आहे. त्यांना आता वाढत्या उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. उष्णतेपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी पाण्यात भिजवलेल्या गोण्या दरवर्षी सापांच्या पिंजऱ्यात टाकण्यात येतात. पाणी शिंपडून पिंजऱ्याचा परिसर थंडगार केला जातो. यंदा अजून प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पिंजऱ्यातील पाण्याच्या टोपल्याखाली, झाडाच्या कुंडीत, एखाद्या कोपऱ्यातील गारवा हुडकून साप व नाग बसलेले आढळून येतात. निस्तेज झालेल्या सापांना निकषानुसार अन्न दिले जाते का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मगरींच्या हौदात घाण पाणी
प्राणिसंग्रहालयात एका मोठ्या हौदात दोन मगरी ठेवण्यात आल्या आहेत. या मगरींनी काही दिवसांपूर्वी सहा पिलांना जन्म दिला. त्यापूर्वी चार पिलांना त्यांनी जन्म दिला होता. ही पिले आणि त्या दोन मोठ्या मगरींना एकाच हौदात ठेवण्यात आले आहे. मगरींसाठीच्या हौदात पाणी भरपूर असले पाहिजे, पण या हौदात फारच कमी पाणी उरले आहे. जे पाणी आहे तेही दूषित. हिरव्यागार पाण्यात मगरी आणि त्यांच्या पिलांना ठेवण्यात आले आहे. हौदातील पाणी दर आठ दिवसांना बदलले गेले पाहिजे, पण महिनोनमहिने पाणी बदलण्यात आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांच्या हाती हक्काचे माध्यम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवसा जळणारे पथदिवे, रस्त्यातील खड्डे अशा अनेकानेक नागरी समस्या मांडण्यासाठी 'मटा'ने हक्काचे माध्यम दिल्याचा आनंद वाटतो, असे मत 'मटा सिटिझन रिपोर्टर' यांनी मांडले. सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांची मांडणी करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'मटा सिटीझन रिपोर्टर अॅप' हे प्रभावी माध्यम सुरू केले आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा सिटिझन रिपोर्टर अॅप' उपक्रमात गेल्या आठवड्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रवींद्र तायडे, शेखर शिंगणे व अतुल जोशी यांचा शुक्रवारी (११ मार्च) महाराष्ट्र टाइम्स कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. या आठवड्यात तायडे 'बेस्ट सिटिझन रिपोर्टर' ठरले. सामाजिक जाणिवेतून 'मटा अॅप' सुरू केले. प्रत्येकाला नागरी समस्यांना तोंड द्यावे लागते. पंधरा लाख लोकसंख्येच्या शहरात समस्यांवर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'ने जाणीव जपल्याचे समाधान आहे' असे तायडे यांनी सांगितले. 'मटा सिटीझन रिपोर्टर'द्वारे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ आहे. शहरातील समस्या, सर्वसामान्यांची गैरसोय संबंधित यंत्रणेपर्यंत पोचविणे अॅपमुळे शक्य झाले. या समस्यांवर तोडगा काढणे हा उपाय आहे' असे जोशी म्हणाले. समाजोपयोगी काम करण्यासाठी प्रत्येकाला संधी उपलब्ध झाली आहे. शहरासाठी योग्य काम केल्याचा आनंद वाटतो. आमच्याप्रमाणे इतर नागरिकांनी अॅपच्या माध्यमातून शहरातील समस्या 'मटा'कडे मांडाव्यात. औरंगाबादकरांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

आपणही बनू शकता सिटिझन रिपोर्टर
वाचकहो, MT Citizen Reporter हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. या अॅपवरून 'मटा'कडे समस्या, प्रश्न, बातम्या, फोटो पाठवण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, तुम्हाला 'दिसणाऱ्या' बातम्या, सार्वजनिक हिताची छायाचित्रे मांडू शकता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या व्यासपीठावर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता करात वाढ?

$
0
0

मालमत्ता करात वाढ?

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता करात सरासरी २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने तयार केला असून मंगळवारी (१५ मार्च) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कराची सुमारे २०० कोटी रुपये थकबाकी असताना त्याच्या वसुलीकडे लक्ष न देता प्रशासनाने कर वाढीचा प्रस्ताव ठेवल्यामुळे नगरसेवक त्याला मान्यता देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रस्ताव दरवर्षी २० फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीने व सर्वसाधारण सभेने मंजूर करणे गरजेचे असते. यंदा हा प्रस्ताव निर्धारित मुदतीत मंजूर झाला नाही किंवा फेटाळण्यातही आला नाही. पालिका प्रशासनाने १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कर वाढीचा प्रस्ताव ठेवला होता, पण स्थायी समितीने यावर काहीही निर्णय न घेता तो सर्वसाधारण सभेपुढे ढकलला. सर्वसाधारण सभेने या संदर्भात निर्णय घ्यावा, असे सभापती दिलीप थोरात यांनी स्पष्ट केले. महापौर त्र्यंबक तुपे यांनी १५ मार्च रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. त्यात महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे.

मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव सादर करताना तो सिद्ध शिघ्र गणकानुसार (नेट रेटेबल व्हॅल्यू) सादर करण्यात आला आहे. त्यात सामान्य कर, साफसफाई कर आदी करांना हात लावण्यात आला नाही. २०१६ या वर्षासाठी शासनाने एनआरव्हीचे दर अद्याप जाहीर केले नाहीत. त्यामुळे २०१५ या वर्षाचे एनआरव्हीचे दर गृहीत धरून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कर योग्य मूल्य निश्चित करण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. प्रस्तावात अ, ब, क आणि ड असे चार झोन तयार करून प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळ्या बांधकामासाठी कर योग्य मूल्य काय असेल ते प्रस्तावाच्या रुपात सादर करण्यात आले आहे.

निवासी वापरासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात आर.सी.सी. छताच्या बांधकामासाठी अ झोन मध्ये ११ रुपये, ब झोन मध्ये १० रुपये, क झोन मध्ये ९ रुपये, तर ड झोन मध्ये ८ रुपये कर योग्य मूल्य निश्चित करण्यात आले होते. त्यात २०१६ - २०१७ या आर्थिक वर्षासाठी वाढ सूचविण्यात आली आहे. आर.सी.सी. छताच्या बांधकामासाठी अ झोन मध्ये १३.७५ रुपये प्रती चौरस मीटर, ब झोन मध्ये १२.५० रुपये, क झोन साठी ११.२५ रुपये, ड झोनसाठी १० रुपये असा कर निश्चित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. निवासेतर वापरासाठीच्या इमारतींसाठी (सेमी कमर्शियल) देखील मोठी वाढ सूचविण्यात आली आहे. २०१५ - १६ या आर्थिक वर्षात निवासेतर वापरासाठीच्या आर.सी.सी. इमारतीसाठी अ झोनमध्ये २२ रुपये प्रती चौरस मीटर, ब झोनसाठी २० रुपये, क झोनसाठी १८ रुपये तर ड झोनसाठी १७ रुपये प्रति चौरस मीटर दर आकारण्यात येत होता. २०१६ - १७ या आर्थिक वर्षासाठी त्यात वाढ सूचविण्यात आली आहे. अ झोनसाठी २७.५० रुपये प्रती चौरस मीटर, ब झोनसाठी २५ रुपये, क झोन साठी २२.५० रुपये, ड झोनसाठी १७.५० रुपये शुल्क आकारणीची शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे. व्यावसायिक इमारती, शिक्षण संस्थांच्या इमारती यांचाही समावेश करण्यात आला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोंगे कुटुंबाने केला देहदान-नेत्रदानाचा संकल्प

$
0
0

रोंगे कुटुंबाने केला देहदान-नेत्रदानाचा संकल्प


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील गारखेडा भागातील रोंगे परिवारातील सगळ्याच सदस्यांनी नेत्रदान-देहदानाचा संकल्प केला असून, कुटुंबातील आजी-आजोबांनीच ही परंपरा सुरू केली आहे. विशेष म्हणजे कर्मकांड-कुलाचार असलेल्या कुटुंबामधून ही देहदान-नेत्रदानाची परंपरा सुरू झाली आणि दृष्ट‌िहीनांना दृष्टी मिळावी व वैद्यकीय विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त अभ्यास करता यावा, या व्यापक हेतुनेच ही परंपरा पुढे जात आहे.

मुळात शिक्षणाविषयी आस्था असल्यामुळे आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रात्यक्षिकांसाठी देहदानाचे असलेले महत्व पटल्यामुळे रोंगे कुटुंबातील (कै.) बाळकृष्ण रोंगे व त्यांच्या पत्नी (कै.) विमल रोंगे यांनी देहदान-नेत्रदानाचा संकल्प केला व त्याची संपूर्ण कुटुंबियांना कल्पनाही दिली. तसेच २००४ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) नेत्रदान-देहदानाचा प्रत्यक्ष

अर्जही भरला.

दरम्यान, बाळकृष्ण रोंगे यांचे २००६ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान-देहदान करण्यात आले, तर त्यांच्या पत्नी विमल रोंगे यांचे २८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाल्यानंतर त्यांनीही नेत्रदान-देहदान केले. एवढेच नव्हे तर बाळकृष्ण व विमल रोंगे यांची मुले संजय व संदीप, सूना संगीता व मधुरा यांनीही देहदान-नेत्रदानाचा संकल्प केला असून, त्याचा अर्जदेखील घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागात सादर केला आहे.
बाळकृष्ण व विमल रोंगे यांच्या निधनानंतर त्यांच्या चौदाव्याचे जेवण शहरातील मातृश्री वृद्धाश्रमातील सर्व ११२ वृद्धांना देण्यात आले. तसेच वर्षश्राद्धाला कर्मकांड करण्यापेक्षा दर वर्षश्राद्धाला मातोश्री वृद्धाश्रमाकडे एक ठराविक रकमेची देणगी देण्यात येत आहे. आता पुढील वर्षश्राद्धाला एचआयव्ही-एड्सबाधित मुलांसाठी देणगी देण्याचा विचार असल्याचे संगीता रोंगे यांनी 'मटा'ला सांगितले. आमच्या कुटुंबाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून, त्याची सुरुवात आमच्या सासू-सासऱ्यांनीच केली आहे आणि आम्ही ती पुढे नेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरडवाहू शेतीला सिंचनाचे वरदान

$
0
0

कोरडवाहू शेतीला सिंचनाचे वरदान


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून शाश्वत शेती विकास करण्याचा कोरडवाहू अभियानाचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वेगवेगळी कामे पुढील वर्षी काम पूर्ण होणार आहेत. यंदा ४० लाख रूपये निधीतून सिमेंट नाला बांध, शेततळे तयार करण्यात आले. या मुबलक पाण्यातून गावांमध्ये रब्बीचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे.

राज्यातील कोरडवाहू भागाचा विकास करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी कोरडवाहू अभियान सुरू करण्यात आले. या प्रकल्पाचे मुख्य कार्यालय औरंगाबाद शहरात स्थापन करण्यात आले होते. सध्या विभागनिहाय कार्यालये सुरू झाली असून कोरडवाहू भागात शाश्वत शेती उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १३ गावांमध्ये अभियानांतर्गत कामे केली जात आहेत. सिमेंट नाला बांध, साखळी बंधारे, शेततळे, अस्तरीकरण ही प्रमुख कामे झाली आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा सिल्लोड, सोयगाव, कन्नड तालुक्यात विशेष फायदा झाला आहे. सिमेंट नाल्यामुळे पाणी अडवले गेले असून परिसरात पाणीपातळी वाढली आहे. या पाण्याचा उपयोग शेतकरी रब्बीच्या पिकांसाठी करीत आहेत. कोरडवाहू भागात रब्बी पिकांचे क्षेत्र लक्षणीय वाढले असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा झाला आहे. या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी 'संरक्षित सिंचन' संकल्पना राबवली जात आहे. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी पाइप, इलेक्ट्रिकल मोटर, डिझेल इंजिन दिले आहे. तसेच शेतकरी गटांना ट्रॅक्टर व संलग्न कृषी अवजारांसाठी ४० टक्के अनुदान उपलब्ध आहे. या सवलतींचा शेतकरी फायदा घेत असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कोरडवाहू अभियान मोलाचे ठरले आहे. या अभियानात यावर्षी ३० ते ४० लाख रुपयांचा विकास कार्यक्रम घेण्यात आला. कोरडवाहू अभियान एका गावात तीन वर्षे राबवण्यात येते. पुढील वर्ष शेवटचे असल्याने अधिक कामासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
पारंपरिक शेती पद्धतीत सुधारणा केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावणार आहे. शेडनेट, पॅक हाऊस, दाल मिल, कॅरेट्स, शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वाहन सुविधा अशा सवलती आहेत. अंजनडोह (ता. औरंगाबाद), दहीगाव (ता. कन्नड) या गावांमध्ये शेडनेटची कामे झाली आहेत. यावर्षीपासून शेतकऱ्यांना शेडनेटचा उपयोग होणार आहे. राज्यातील ७९ गावांमध्ये कोरडवाहू अभियानाची कामे सुरू आहेत.

कोरडवाहू अभियानांतर्गत वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गटांना चांगला फायदा झाला आहे. संरक्षित सिंचनाद्वारे शेतीत सकारात्मक बदल दिसत आहेत. कोरडवाहू भागात शाश्वत उत्पादन व पाण्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी अभियान उपयुक्त ठरले आहे.

- प्रकाश उगले, उपविभागीय कृषी अधिकारी


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल चोरांचा सुळसुळाट

$
0
0

मोबाइल चोरांचा सुळसुळाट

विविध घटनांत सात मोबाइल लंपास, एकजण अटकेत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात मोबाइल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. विविध भागांतून चोरट्यांनी सात मोबाइल लंपास केले आहे. यापैकी एका मोबाइल चोराला नागरिकांनी पकडून उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मोबाइल चोरी संदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दशमेशनगर येथील डॉक्टर संध्या मल्लीकार्जून कोराळे (वय ६३) या गुरुवारी सकाळी एमजीएम स्विमींग पूल येथे पोहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांचा मोबाइल कारमध्ये ठेवला होता. चोरट्यांनी कारच्या उघड्या खिडकीतून हा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत विजय तुकाराम सैंदाणे (वय २०, रा. भारतमातानगर, हडको) याचा मोबाइल चोरट्यांनी बसमधून पळवला. बुधवारी सकाळी हडको एन-१२ ते ज्युबलीपार्कच्या दरम्यान हा प्रकार घडला. तसेच पानदरिबा रोड येथील चिराग मेडिकल या दुकानातून दुकान मालकाचा मोबाइल चोरट्यांनी पळवला. मंगळवारी सकाळी दुपारी साडेबारा वाजता हा प्रकार घडला. या दोन्ही घटनात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अन्य एका घटनेत तस्लीम रशीद शेख (वय ३१, रा. न्यू शांतीनिकेतन कॉलनी, जवाहरकॉलनी) यांचा मोबाइल उघड्या घरातून चोरट्यांनी लांबवला. मंगळवारी पहाटे पाच ते आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची पाचवी घटना गुरुवारी पहाटे दोन वाजता पद्मपुरा भागात घडली. अमित रमेश बन्सवाल हा ओट्यावर झोपलेला असताना चोरट्यांनी त्याचा मोबाइल लंपास केला. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक जण ताब्यात, एक जण पसार

मोबाइल चोरीच्या इतर दोन घटनांपैकी एका घटनेत आरोपीला नागरिकांनी पकडले असून दुसऱ्या घटनेत मोबाइल चोर हाताला झट‌का देत पसार झाला आहे. उस्मानपुरा येथील अबरार आलम शेख अब्दुल सईद (वय २३, मूळ रा. यावल) हा गुरुवारी सकाळी रूमचा दरवाजा बंद करून आंघोळीला गेला होता. यावेळी सुभान जिलानी सय्यद (वय १८, रा. फुलेनगर) या मोबाइल चोराने रूममध्ये प्रवेश करून अबरारचा मोबाइल पळवला. मात्र, त्याला अबरारच्या मित्रांनी तात्काळ पकडून उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. तर दुसऱ्या घटनेत समर्थनगर, सुंदर लॉज येथे अविनाश शिवाजी गोणे या तरुणाच्या रुममध्ये शिरून एका अनोळखी व्यक्तीने मोबाइल व पाकीट लांबवले. त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्याने हाताला झटका देत पलायन केले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसा लोककलांचा

$
0
0

सिटी स्कॅन - सांस्कृतिक

वारसा लोककलांचा

इंट्रो - 'इव्हेंट' व चित्रपटांच्या गर्दीत काही लोककला बाजारू स्वरूपात समोर आल्या. चार-दोन लोककलांचेच सतत सादरीकरण झाल्याने त्यांचे अप्रूप संपले. या परिस्थितीत देशभरातील दुर्मीळ लोककला एका व्यासपीठावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न 'ऋतुरंग महोत्सवा'ने केला.

----------------------

tushar.bodkhe@timesgroup.com

गावोगावी धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमात सादर होणारा 'इव्हेंट' नावाचा प्रकार खूपच साचेबद्ध झाला आहे. अनेकदा फिल्मी कार्यक्रमांची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न अगदी तालुकास्तरावरही दिसतो. वकुब नसलेले कलाकार रसिकांचे डोळे दीपवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतात. चार-दोन विनोदी कलाकारांचे कोटीबाज संवाद, लावणी नावाचे अॅटम साँग, बॉलीवूड डान्स आणि कसरती असा हा जामानिमा असतो. संयोजकांच्या बजेटवर कार्यक्रमाचा दर्जा अवलंबून असतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, स्नेहसंमेलन व स्थानिक महोत्सवात 'इव्हेंट'ची रेलचेल वाढली आहे. या 'इव्हेंट'चा तोटा सांस्कृतिक क्षेत्राला सहन करावा लागला. लोककलांचे अत्यंत सवंग सादरीकरण हा तो सर्वात मोठा तोटा आहे. लावणी कशी नसावी याचे उदाहरण म्हणजे 'इव्हेंट'मधील सादरीकरण. गोंधळ, भारूड, पोवाडा अशा लोककलांवर 'इव्हेंट'चे मुखवटे चढवून वाट्टेल तसे सादरीकरण वाढले. या सर्वांचा फटका अस्सल लोककला व लोककलावंतांना बसला आहे. शहरी वळणाचे कलाकार लोककला फिल्मी ढंगाने सादर करून नवा पायंडा पाडत आहेत. या भाऊगर्दीत अस्सल लोककलेचा विसर पडला असून चित्रपट व इव्हेंटमधील लोककला प्रमाण ठरली आहे. भारतीय संस्कृतीचे अस्सल दर्शन लोककलेत घडते. प्रत्येक राज्यात त्याचा प्रत्यय येतो. महाराष्ट्राच्या विविध भागातही लोककलांचे वेगळेपण आहे. कोकण, विदर्भ, प. महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा विभागाचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. मात्र, लोककलांना व्यासपीठ नसल्याने त्यांची जादू काहीशी कमी झाली आहे. आदिवासी बांधव सण-उत्सवात पारंपरिक नृत्य सादर करतात. या नृत्याची सर्व रसिकांना ओळख करून देण्याचा प्रयत्न सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक करीत नाहीत. इव्हेंट व नृत्य महोत्सवात केवळ ठराविक लोककला आणि शास्त्रीय नृत्याला पसंती असते. त्यामुळे मराठमोळ्या लोककलांची परवड आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात 'ऋतुरंग महोत्सवा'ने लोककलांना हक्काचे व्यासपीठ दिले. रोटरी क्लब औरंगाबाद आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा महोत्सव भरवला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातील दर्जेदार लोककला महोत्सवात सादर झाल्या. प्रत्येक कलाकार आपल्या कलेशी प्रामाणिक असल्याने महोत्सवात अस्सल लोककलेचे दर्शन घडले. विशेषतः पारंपरिक वाद्यांचाच खुबीने वापर करीत कलाकारांनी महोत्सव रंगवला. कोकणातील 'जाखडी' नृत्य मराठवाड्यातील रसिकांनी प्रथमच अनुभवले. छत्तीसगढचे 'पंथी' नृत्य, आंध्र प्रदेशचे 'गरगलू', मध्य प्रदेशचे कर्मा, महाराष्ट्राचे दांडपट्टा, सोंगी मुखवटे अशा नृत्यांनी सर्वांना चकीत केले. मांदर, झांज, झुमका, घुंगरू या वाद्यांनी सादरीकरण सुश्राव्य केले. महोत्सवासाठी जवळपास दोनशे कलाकार शहरात आले होते. इतर राज्यातील लोककला अनुभवत प्रत्येक कलाकाराने नृत्यात जीव ओतला. शहरी रसिकांना अशी अस्सल व थरारक लोककला अनुभवण्याची दुर्मीळ संधी मिळाली. लावणी नृत्याचे अति सादरीकरणाने अतोनात नुकसान झाले. एखाद्या लोककलेचा कंटाळा येणे हा सततच्या सवंग सादरीकरणाचा परिणाम असतो. टीव्ही, चित्रपट, नाटक, लावणी शो, इव्हेंट, गॅदरींग, महोत्सव अशा प्रत्येक ठिकाणी लावणी असतेच. इतर लोककलांच्या तुलनेत लावणीला सर्वाधिक सादरीकरणाची बाधा झाली आहे. अर्थात, लावणीत अस्सलपणा किती उरला व सादरीकरण किती निखळ असते हा संशोधनाचा विषय आहे. कालौघात विस्मरणात जाणाऱ्या लोककलांना 'ऋतुरंग महोत्सवा'ने उजाळा दिला. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून शेकडो मैल दूर असलेल्या लोककलावंतांना सादरीकरणाची संधी दिली. महोत्सवाचे चार दिवस लोककलांमुळेच रसिकांसाठी अविस्मरणीय ठरले. या महोत्सवात मागील वर्षी उथळ लावण्या सादर झाल्या होत्या. सुदैवाने, यंदा उत्तमोत्तम लोककलांना व्यासपीठ देण्यात आले. पुढील वर्षीही संयोजकांना दुर्गम भागातील लोककलांची आठवण होईल अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको उड्डाणपुलाच्या लांबीची पोकळ चर्चा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) जालना रस्त्यावर वसंतराव नाईक चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या लांबीचा विषय वर्ष उलटून गेले तरी, नुसताच चर्चेत राहिला आहे. राज्यकर्त्यांच्या चालढकलीमुळे पुलाचे बांधकाम काही काळ संथगतीने सुरू होते. आता कामाने वेग घेतलेला असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लांबी वाढविण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.

एमएसआरडीसीकडून शहर एकात्मिक विकास योजनेंतर्गत जालना रस्त्यावर पाच उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार सेव्हन हिल्स, क्रांतिचौक उड्डाणपूल पूर्वी उभे राहिले. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी महावीर चौक, मोंढा नाका आणि वसंतराव नाईक चौक (सिडको बसस्टँड) हे तीन उड्डाणपूल मंजूर झाले. मोंढा नाका पूल उभा राहून वाहतुकीसाठी खुला झाला. सिडको चौकातील पुलाला मात्र सुरवातीपासून अडचणींने ग्रासले आहे. पूर्व पश्चिम असा एक किलोमीटर लांबीचा पूल मंजूर झाला. त्यासाठी ५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पश्चिमेकडील बाजूने हा पूल हॉटेल रामगिरीसमोर संपणार आहे, मात्र तेथून पुढे ३०० मीटरवर अग्रसेन चौक आहे. या पुलाची लांबी त्यापुढे वाढवली तर एक सिग्नल कमी लागेल आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने एमएसआरडीसीकडे एप्रिल २०१४मध्ये पाठविला होता. वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रस्ताव सोयीस्कर असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईला यासंदर्भात माहिती कळविली आणि तेथून उड्डाणपुलाच्या लांबीचा विषय सुरू झाला. पश्चिम बाजूने पुलाची लांबी वाढू शकते, या आशेवर उड्डाणपुलाचे काम पूर्वबाजूने सुरू झाले. पाहता पाहता अर्धा पूल उभा राहिला. या कालावधीत लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या. नवीन सरकारकडेही यासंदर्भातील प्रस्ताव भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केला, पण अतिरिक्त ३५० मीटरच्या पुलासाठी ३५ कोटी रुपये आणायचे कोठून? असा प्रश्न सरकारसमोर होता. एप्रिल २०१५ मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यानंतर युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आणि त्यांनी पुलाच्या कामाची पाहणी करून पुलाची लांबी वाढविण्यास एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार असल्याचे जाहीर केले होते. अर्थ खाते भाजपकडे असल्याने कुठलीच हालचाल झाली नाही. ३१ मे २०१६ पूर्वी पूल उभा करायचा असल्याने संभ्रम निर्माण झाला, पण या प्रस्तावाची लेखी फाइल कुठेच तयार झाली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने पश्चिम बाजूचे काम चार महिन्यांपूर्वी सुरू केले. आज पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

लांबी वाढविणे व्यवहार्य आहे का?

लांबी वाढविण्याच्या चर्चेमुळे पुलाचे काम संथगतीने सुरू होते. आता त्याने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, सिडको उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासंदर्भात व्यवहार्यता प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवाजी अंडरग्राउंड’च्या टेम्पोला अपघात, एक ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या मराठी नाटकाच्या टेम्पोला आज पहाटे झालेल्या अपघातात 'बॅक स्टेज' कलाकार आनंद मोघे यांचा मृत्यू झाला आहे. नाटकात यमाची भूमिका करणारा प्रवीण डाळींबकरचा हात फ्रॅक्चर झालाय.

'शिवाजी अंडरग्राउंड...' नाटकाचा प्रयोग नांदेडला होता. बरेच कलाकार ट्रेननेच नांदेडला निघाले, तर दोघं-तिघं जण टेम्पोतून पोहोचणार होते. या प्रवासादरम्यान, पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचा टेम्पो माजलगाव-गेवराई रस्त्यावरील कालव्यात पडला. या अपघातात आनंद मोघे जागीच ठार झाले, तर प्रवीण डाळींबकर आणि टेम्पोचा चालक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांचे अधिकारी ऐकतच नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
राज्य सरकारचा प्रशासनावर वचकच नाही शिवाय मंत्री व पालक मंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाही, अशा पद्धतीने सध्या राज्याचा कारभार सुरू आहे. परिणामी, विद्यमान शासन व प्रशासन हे दुष्काळाविषयी संवेदनशील नाही. सध्या शासनाकडून योजनाच्या घोषणा केल्या जात आहे. योजनाचा सुकाळ आहे. परंतु, अंमलबजावणीकामी ठणठणाट आहे. पुरेशा निधीअभावी शासनाचे महत्त्वकांक्षी व दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे उपक्रम रखडलेले आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उस्मानाबादेत पत्रकार परिषदेत केला. यावेळी काँग्रेसनेते ब्रिजलाल मोदाणी हे उपस्थित होते.
उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आदेशानंतरही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासन व शासन हतबल ठरले आहे. शेवटी पालकमंत्र्यांच्या हट्टापायी या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचे सोंग शासनाने केले आहे. बदली आदेश जारी करून पंधरवडा लोटला. परंतु, हे अधिकारी महाशय अद्यापही उस्मानाबादेत ठाण मांडून आहे. जलयुक्त शिवाराच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पीक विमा रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे तुळजापूर शाखेचे शाखाधिकारी मगर यांना निलंबित करण्यात आले. हा प्रकार चोर सोडून सन्याशाला फाशी असा असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, येथील कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. खातेधारकांच्या खात्यातून प्रतिमहिना दहा रुपये कपात, निराधारांच्या पगारातून प्रतिमहिना शंभर रुपये कपात, पीक विम्यातून कर्जवसुली हा उद्योग या बँकेत आता नित्याचाच बनला आहे. या बँकेचा कारभार सहकार कायदा, आरबीआयच्या नियम व शिफारशीनुसार नव्हे तर बँकेच्या संचालक मंडळाच्या व कार्यकारी संचालकाच्या इशाऱ्यानुसार चालतो. बँकेला आर्थिक बळकटी आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा घालण्याचा उद्योग या बँकेत सुरू आहे. सेव्हिंग खातेधारकांच्या खात्यातून प्रतिमहिना ४७ लाखांची लूट झाली आहे. अशा प्रकारचे अनेक गैरव्यवहार सुरू आहेत. या संदर्भाम जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिंबधक यांच्याकडे अनेकदा तक्रारी नोंदविण्यात आल्या. मात्र, केवळ चौकशीचे नाटक यापलीकडे कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेची दिशाभूल करणारी कारवाई
या बँकेतील ११० शाखेतून चालणारा सावळा-गोंधळ या बँकेच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या आदेशानुसारच चालतो. शिवाय या बँकेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण केले जाते. मात्र, या लेखापरीक्षणात त्यांना कुठेही गैरव्यवहार आढळून येत नाही. यासर्व गोष्टी एकमेकांच्या संगनमतानेच चालतात. त्यामुळे तुळजापूर शाखेच्या शाखाधिकाऱ्यांवर केलेली ही कारवाई ही जनतेची दिशाभूल करणारी असल्याचे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images