Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निधी असताना रस्त्यांची कामे का थांबली?

$
0
0


औरंगाबाद : 'शासनाचा निधी उपलब्ध असताना रस्त्यांची कामे का थंडावली,' असा जाब आमदार अतुल सावे यांनी शनिवारी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना विचारला. 'रस्त्यांची कामे गतीने आणि दर्जेदार व्हावीत,' अशा सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील रस्त्यांसाठी आमदार अतुल सावे यांनी शासनाकडून २५ कोटींचा निधी महापालिकेला मिळवून दिला. या निधीतून चार रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. ही कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याची दखल घेऊन आमदार सावे यांनी सायंकाळी आयुक्त बकोरिया यांची भेट घेतली. या संदर्भात 'मटा'ला माहिती देताना ते म्हणाले, 'विकास कामांसाठी, रस्त्यांसाठी पैसे नाही असे म्हणून महापालिकेचे प्रशासन वर्षानुवर्षे विकास कामे करीत नाही. महाराष्ट्र शासनाने महापालिकेला रस्त्याच्या कामांसाठी सुमारे २५ कोटींचा निधी दिला. हे पैसे पालिकेकडे तयार आहेत. तरीही रस्त्यांची कामे का थंडावली, हे विचारण्यासाठी महापालिकेत आलो होतो. आयुक्तांशी याबाबत चर्चा झाली. रस्त्यांची कामे थंडावल्याचे त्यांनी मान्य केले. पुढील आठवड्यात रस्त्यांच्या कामांची संयुक्त पाहणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. शासनाच्या निधीतून महावीर चौक ते क्रांतिचौक या रस्त्याचे काम करण्यात येणार होते, पण आता या रस्त्याचे काम करण्यात येणार नाही, त्यामुळे त्याच्या ऐवजी कैलासनगरच्या रस्त्याचे काम करा. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर जालना रस्त्याला पर्यायी रस्ता तयार होईल,' अशी सूचना आयुक्तांना केल्याचेही सावे यांनी सांगितले. दरम्यान आयुक्त बकोरिया यांनी स्थायी समितीची बैठक अर्धवट सोडून खासदार चंद्रकांत खैरे यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट नोटा आल्या; आम्ही नाही पाहिल्या!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सहाय्यक व्यवस्थापकडून दोन कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या अमरप्रीत शाखेत आणखी एक चमत्कार उघड झाला. बँकेत १० हजारांच्या बनावट नोटा भरून दोन भामट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी शुक्रवारी रात्री क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑगस्ट ते डिसेंबर २०१५ या काळात हा प्रकार घडला. एसबीआयच्या अमरप्रीत शाखेत ग्राहक म्हणून आलेल्या एका व्यक्तीने २५ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर दरम्यान ७ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा जमा केल्या. यात एक हजार रुपये किंमतीची एक, पाचशेच्या २, तर शंभर रुपयांच्या १३ नोटा बनावट असल्याचे समोर आले. दुसऱ्या घटनेत आरोपीने २ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा बँकेत जमा केल्याचे उघड झाले आहे. यात एक हजार रुपयांची एक, तर १०० रुपयांच्या १७ बनावट नोटा आहेत. अमरप्रीत शाखेतून जुन्या व खराब झालेल्या नोटा एक ते दोन वर्षांच्या दरम्यान जमा करून त्या नंतर नागपूर येथे भारतीय रिझर्व्ह बँकेत पाठविल्या जातात. नोटाची त्या ठिकाणी सत्यता पडताळून करून नष्ट करण्यात येतात. नष्ट केलेल्या नोटाच्या किंमतीची नवीन करन्सी व्यवहारात आणली जाते. दरम्यान, अमरप्रीत शाखेतून गेलेल्या नोटा नागपूर शाखेत तपासल्या असता त्यापैकी सुमारे १० हजार रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे समोर आले. आरबीआयने याबाबत माहिती दिल्यानंतर येथील बँकेचे उप व्यवस्थापक प्रल्हाद मगरे यांनी क्रांतिचौक पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलिस नाईक बबनराव राठोड करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा वॉर्डांना पुन्हा तीन दिवसांनी पाणी

$
0
0


औरंगाबाद : औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहरातील अकरा वॉर्डांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात होता. जायकवाडी धरणातील पाणीपातळी मृतसाठ्यापर्यंत पोचल्यामुळे कंपनीने या अकरा वॉर्डांसाठी एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द केला आहे. या वॉर्डांना पूर्वीप्रमाणेच म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होईल.
'दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द' हे वृत्त 'मटा'ने १५ मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तावर कंपनीने शनिवारी परिपत्रक काढून शिक्कामोर्तब केले आहे. कंपनीने परिपत्रकात म्हटले आहे की, एक फेब्रुवारी पासून ११ वॉर्डांमध्ये एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु जायकवाडी धरणातून एक मार्चपासून पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे धरणातील पाणी मृतसाठ्याच्या खाली आले आहे. या वॉर्डांना २० मार्चपासून पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे दोन दिवसआड म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, शनिवारी शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

....इनामी जमिनीचा तिढा सुटेना!

$
0
0


Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
औरंगाबाद : ग्रामदैवतांची सेवा करणारा समाज म्हणून गुरव समाजाची फार पूर्वीपासून ओळख आहे. बारा बलुतेदारांमध्ये हा समाज गणला जाई. बलुतेदारी बंद झाली. मात्र, गावकीची पद्धत अद्याप रुढ आहे. गावकीच्या रुढी, परंपरा, रितीरिवाज हा समाज अद्यापही पाळतो. गुरव समाज हा अल्पसंख्य समाज आहे. आहार, संस्कृती, संस्कार आदी कारणांवरून पडलेल्या पोटजातीत विभागलेला हा समाज विखुरलेला आहे. गाव तिथे मंदिर आणि मंदिर तिथे गुरव पुजारी असे समीकरण बनलेले आहे.
एकेकाळी गावातील सर्वांशी सतत संपर्क असलेला समाज म्हणून गुरव समाजाची ओळख. प्रामुख्याने ग्रामीण भागात गुरव समाजाची उपजीविका मंदिरातील दक्षिणा, बलुतं, शिधा वा इतर मोबदला यावर होते. देवस्थान व्यवस्थापन व पुजारी उपजीविका यासाठी काही ठिकाणच्या देवस्थानांना सरकारी जमिनी इनाम देण्यात आल्या आहेत. गुरव समाजासमोर इनामी जमिनीचा मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे. अनेक देवस्थानाच्या इनामी जमिनी या अन्य लोकांना कसण्याकरिता दिलेल्या आहेत. त्याचे उत्पन्न मंदिराला अथवा पुजाऱ्याला मिळत नाही. तसेच मंदिरातील दक्षिणा, देणग्याही पुजाऱ्याला मिळू नयेत म्हणून देवस्थानात ट्रस्ट स्थापन करून देणग्या, दक्षिणा या ट्रस्टकडे जमा केल्या जातात. गुरव समाजाचा हा हक्कही अशा पद्धतीने हिरावण्यात आला आहे, अशी खंत औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळाचे सचिव रामनाथ कापसे यांनी व्यक्त केली. गावात बेल वाटणे, पत्रावळी तयार करणे, देवदेवतांची पूजा करणे या परंपरेला घसरण आल्यानंतर अनेकांनी शहराकडे धाव घेतली. शिक्षणाकडे कल वाढला. शिक्षणामुळे गुरव समाजातील युवा पिढीची दिशा बदलत असली तरी आजही ग्रामीण भागातच हा समाज मोठ्या संख्येने राहात आहे. ओबीसी प्रवर्गात असलेल्या गुरव समाजाला आरक्षणाचा फारसा लाभ झालेला नाही. पूर्वी ग्रामीण भागात शिक्षणाच्या फारशा सुविधा नव्हत्या. गावातील शाळेत जेवढे शिकायला मिळाले तेवढेच शिक्षण घेतले जात होते. शिक्षणाचे महत्त्व समजल्याने गुरव समाजातील ज्येष्ठांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केले. पूर्वी चौथी ते दहावीपर्यंत शिक्षण होत होते. आता उच्च शिक्षण घेण्याकडे कल वाढला आहे. चांगल्या शिक्षणामुळे नोकरी अथवा व्यवसायात या समाजातील युवा पिढीने शिरकाव केला आहे. मुलांबरोबरच मुलींनीही या लक्षणीय झेप घेतली आहे. वैद्यकीय, इंजिनीअर क्षेत्रातही गुरव समाजातील मुले-मुली आता दिसू लागली आहेत, असे सचिव कापसे यांनी सांगितले.
वधू-वर परिचय मेळावा
गुरव समाज राज्यभर विखरुलेला आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हा समाज प्राध्यानाने दिसून येतो. औरंगाबाद जिल्ह्यातही हा समाज संख्येने बऱ्यापैकी आहे. समाजातील शिक्षित होत असलेल्या युवा पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यातील एक आव्हान म्हणजे योग्य जोडीदार मिळण्याचे. त्यासाठी वधू-वर परिचय मेळावा घेण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत १७ मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यातून अनेकांना सुयोग्य जोडीदारही मिळाले आहेत. शिक्षणामुळे मुला-मुलींच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला अनुरुप जोडीदारच हवा असतो, असे कापसे यांनी सांगितले.
विविध उपक्रमांचे आयोजन
सामूहिक विवाह, मुंजी सोहळे यांसह विविध उपक्रम घेतले जातात. समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप, दसरा, दिवाळी स्नेहमिलन, रक्तदान शिबिर, महिलांसाठी आरोग्य शिबिर, कर्तबगार महिलांचा सत्कार असे विविध कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. मात्र, समाजाला एकत्रित कार्यक्रम घेण्याकरिता समाजाचे स्वतःचे एकही सांस्कृतिक सभागृह नाही. गुरव समाज हा विखुरलेला असल्याने या समाजाचे प्राधान्य दिले जात नाही. समाजाला एकत्र करणे अवघड असले तरी संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात आणि त्यात समाजातील सर्वांचा मोठा सहभाग असतो असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्हा गुरव समाज मंडळ कार्यकारिणी - अध्यक्ष स. सो. खंडाळकर, उपाध्यक्ष रोहिणी शेवाळे, सचिन रामनाथ कापसे, सहसचिव सुवर्णा मुंगीकर, कोषाध्यक्ष दामोधर पाटील पवार. सदस्य - पुंडलिक सोनवणे, विष्णू बचाटे, सुधीर छत्रपती, कृष्णा दांडगे, सुभाष सोने, रविकांत साळुंके.
महिला मंडळ कार्यकारिणी - अध्यक्ष मंगल काळे, उपाध्यक्ष कविता कापसे, संगीता खंडाळकर, सचिव मीना साळुंके, सहसचिव संगीता राजूरकर, कोषाध्यक्ष वनिता सोनवणे, सहकोषाध्यक्ष सुवर्णा सुरडकर. सदस्य - क्षमा गोरक्ष, स्वाती छत्रपती, सरला मुंगीकर, कांता बचाटे, मीना मुंगीकर, उज्ज्वला क्षीरसागर, नीलिमा पुजारी, कमल ढोले, सुवर्णा धानोरकर, कविता एरंडे, मंगल डांगे, सीमा दांडगे, सीमा शेवाळे.
युवक मंडळ कार्यकारिणी - अध्यक्ष सुशील ढोले, उपाध्यक्ष आनंद बोरुळकर, सचिव कृष्णा गजभार, सहसचिव योगेश बचाटे, कोषाध्यक्ष प्रशांत दांडगे. सदस्य - नागेश मुंगीकर, वैभव भंडारे, प्रदीप कापसे, संदीप गजभार, सुनील दांडगे, प्रवीण पवार, प्रदीप गुरव, नीलेश बचाटे, नेताजी बचाटे, जिज्ञेस खंडाळकर, कुलदीप गुरव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन’चा भूलभुलय्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योगांची भरभराट व्हावी म्हणून 'मेक इन महाराष्ट्र'चा टेंभा राज्य सरकारकडून मिरविला जात आहे. 'इज ऑफ डुइंग बिझनेस'च्या नावाखाली उद्योगांना मदतीचे धोरण स्वीकारल्याचेही जाहीर केले गेले. प्रत्यक्षात मात्र, औद्योगिक सुविधांपासून वाळूज परिसरातील तब्बल ८०० उद्योजक वंचित आहेत. सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी या उद्योगांना हव्या असलेला 'इंडस्ट्रिअल एनए'चा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारचा उद्योगांबाबत भुलभुलैया आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

चिकलठाणा, रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहतींमधील जागा संपल्यानंतर वाळूज, पंढरपूर परिसरात एमआयडीसीने मोठी वसाहत उभारली. कालांतराने ही जागाही संपल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात छोटे-मोठे उद्योग उभे केले गेले. गेल्या काही वर्षांत याची संख्या ८०० पर्यंत पोचली आहे. पण उद्योगांना कायदेशीर दर्जा प्राप्त न झाल्याने या उद्योगांची कायम फरफट आहे. करोडी, साजापूर आणि लगतच्या परिसराचा विकास करण्यासाठी सिडकोला संस्था म्हणून नेमण्यात आले. त्यामुळे या परिसरात कुठल्याही औद्योगिक वास्तू उभ्या केल्या किंवा करावयाच्या झाल्यास सिडकोचे 'ना हरकत प्रमाणपत्र' हवे असते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे इंडस्ट्रिअल एनएची मागणी केली जाते. नगरविकास खात्याकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' घेऊन ती प्रशासनाकडे जमा केल्यानंतर 'इंडस्ट्रिअल एनए' मिळते.

एमआयडीसीकडे जागा उपलब्ध नसल्याने उद्योजकांनी करोडी, साजापूर तसेच लगतच्या परिसरात प्लॉट घेऊन उद्योग उभारले. कधी ना कधी तरी या प्रश्नी सरकार सकारात्मक पाऊल उचलेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. या प्रश्नी उद्योजकांनी सिडको, एमआयडीसी, जिल्हा प्रशासन,नगरविकास या चार खात्यांना पत्रव्यवहार करून मदतीची अपेक्षा केली. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या प्रश्नी लक्ष घातले गेले नाही. दरम्यान, २८ ऑक्टोबर २०१४ रोजी सिडकोचे संजय भाटिया आणि एमआयडीसीचे सीर्इओ भूषण गगराणी यांनी नगरविकास खात्याचे उच्चाधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहिले. त्यानुसार सिडकोकडून ना हरकतीसंदर्भात कुठलीच अडचण नाही. शिवाय एमआयडीसीही अनुकूल असल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, यावर नगरविकास खात्याकडून शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे. मुंबईतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फाइल मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडून मंजुरीसाठी मंत्र्यांकडे पाठविली गेली आहे. सहा महिने झाले, तरी त्याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने उद्योजकांची मात्र अडचण झाली आहे. उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करून देण्याचा सरकारचा दावा यामुळे फोल ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाला दोन दिवसानंतर जाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन करून त्या अवैधरित्या तपासण्याच्या तपासणीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने स्वतंत्र शोधपथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक या गैरप्रकारात सामील असलेल्या शिक्षण संस्था, शिक्षक, मुख्याध्यापक व इतरांचा शोध घेणार आहे. गैरप्रकार उघडकीस आल्याच्या दोन दिवस उलटल्यानंतर मंडळाला जाग आली आहे.
उत्तरपत्रिका पुनर्लेखन घोटाळ्यात काही कस्टोडिअन, मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाचालकांचाही हात असल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर मंडळाचे राज्यअध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी विभागीय अध्यक्ष, शिक्षण सहसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्या घेतलेल्या बैठकीत शोधपथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तरपत्रिकांचे यूआयडी नंबर मिळाल्यानंतर हे पथक सोमवारपासून संबंधित शाळा, तेथील शिक्षक, प्रकरणातील दोषींचा शोध घेणार आहेत. रॅकेटमध्ये उत्तरपत्रिकांवरील बारकोडचे एक पान कायम ठेवून पुनर्लेखन केलेल्या उत्तरपत्रिका जोडल्या जात असल्याचा संशय आहे. उत्तरपत्रिकांची पाने शिलाई करून जोडलेली असतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी सापडलेल्या उत्तरपत्रिका उसवलेल्या अवस्थेत होत्या. त्यामुळे या दृष्टीनेही तपास केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक कविता दिनः काळजाची बोली बोलते कविता

$
0
0

काळजाची बोली तेव्हा बोलते कविता!
Tushar.Bodkhe @timesgroup.com
औरंगाबाद : जागतिक सर्वेक्षणानुसार दररोज जगातील एक बोलीभाषा नामशेष होत आहे. हजारो बोलीभाषांची समृद्ध परंपरा असलेल्या भारतातही वेगळी परिस्थिती नाही. प्राचीन बंजारा भाषेची समृद्धी सांगणारा 'पिढी घडायेरे वाते' हा प्रा. वीरा राठोड यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. मूळ बंजारा कविता व तिचा मराठी अनुवाद असा संमिश्र प्रयोग करणारा हा पहिलाच मराठी कवितासंग्रह आहे.
भटक्या-विमुक्तांची कविता मांडणारे नव्या पिढीचे कवी प्रा. वीरा राठोड यांचा 'पिढी घडायेरे वाते' हा कवितासंग्रह लक्षवेधी ठरला आहे. बंजारा संस्कृतीला वाचकांसमोर आणताना बंजारा बोलीचाच वापर केला आहे. अस्सल शब्दकळा या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कविता लेखनात वेगवेगळे प्रयोग सुरू असताना मराठी कवितेत प्रा. राठोड प्रयोगशीलता जपत आहेत. या कवितासंग्रहात ३४ कविता असून मराठी अनुवाद विनायक पवार यांनी केला आहे. बंजारा लोकसंस्कृती अनुवादातून पवार यांनी अचूकतेने मांडली आहे. मूळ बंजारा कवितांचा संग्रह प्रकाशित करावा अशी प्रा. राठोड यांची संकल्पना होती; पण, मराठी वाचकांना बंजारा कविता समजणार नाही. त्यामुळे बंजारा व मराठी कविता असा प्रयोग करण्याचा सल्ला ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी दिला होता. 'भुजंग मेश्राम यांच्या 'उलगुलान' कवितासंग्रहात गोर बोलीतील कविता वाचल्या होत्या. तेव्हापासून गोरबंजारा बोलीत कविता लेखन सुरू केले. निसर्गवादी गोरबंजारा जमातीत जन्मल्याने लमाण बंजारा संस्कृतीचे सारे बारकावे अनुभवता आले. यातूनच कवितासंग्रह आकाराला आला' असे प्रा. वीरा राठोड यांनी सांगितले. गोर बंजारा जमातीत गाण्यांना महत्त्व असून गाण्यांना जगण्याचा आधार मानतात. गीते गाणाऱ्या 'गावण्या'ला ते ईश्वराचा दूत मानतात. समाजाला योग्य दिशा दाखवण्याची 'गावण्या'कडून अपेक्षा असते. गोरबंजारा संस्कृतीत कवीला महत्त्व आहे. हाच धागा पकडून प्रा. राठोड यांनी कवितेची मांडणी केली आहे. मराठी अनुवादातही उत्तम लय साधली आहे.

सासरेन बेटी जावं जना मळं याडी
सुनी सुनी लागे लाग चिरेबंदी माडी
छाती फाटं जना पाणी आखीमायी आवं
ढावलेमं रोतू रोतू याडी गीद गावं
कळजेरो भेद जना खोलचं कविता
कळजेरी बोली वेन बोलचं कविता
(सासराशी लेक जाय तेव्हा रडे याडी, सुनी सुनी झाली माझी चिरेबंदी माडी, छाती फाटे जेव्हा पाणी डोळ्यांतून दाटे, सुखामध्ये दुःखामध्ये याडी गीत गाते, काळजाचा भेद तेव्हा खोलते कविता, काळजाची बोली तेव्हा बोलते कविता)
अशा उत्तम अनुवादातून कवितासंग्रह वाचकांच्या भेटीला आला आहे. भाषातज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी यांनी कवितांचे कौतुक केले आहे. भारतातील भटक्या-विमुक्तांच्या प्रदीर्घ संघर्षातील एक निश्चित महत्त्वाची ही कृती गोरबंजारा भाषेत आहे. राठोड यांचे भारतीय विविधतेच्या प्रत्येक अभिलाषीने अभिनंदन केले पाहिजे, असे देवी यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथील 'चिन्मय प्रकाशना'ने कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. बंजारा कवितांच्या अनुवादात मूळ बंजारा शब्दांचाही उत्तम उपयोग केला आहे. याडी, छोरी, सेवा, पायी, लेंगी, लडी, हवेली, धुंड अशा अनेक शब्दांना कवितेत स्थान आहे. मूळ संस्कृतीची परिणामकारकता थेट वाचकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. बंजारा शब्द वापरल्यामुळे कविता वाचताना वेगळा आनंद मिळतो.

जगभरातील बोलीभाषा नामशेष होत असताना भाषिक प्रेमापोटी बंजारा बोलीभाषेतून लिहीत आहे. प्रत्येक भाषेचे सामर्थ्य वेगवेगळे आहे. लहान-मोठ्या भाषांचे साहित्य आल्यास आपला भाषिक ठेवा अधिक समृद्ध होईल.
- डॉ. वीरा राठोड, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संविधानाचा आधार सजग नागरिक असावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सजग नागरिक हा संविधानाचा आधार असायला हवा, आपले हक्क मिळविताना कर्तव्याची जाणीवही असायला हवी, असे प्रतिपादन हमीद दाभोळकर यांनी रविवारी केले. महाराष्ट्रात संस्कृती, धर्म, वैचारिकता याची मोठी परंपरा राहिली आहे. पण प्रबोधनकार, संत गाडगे महाराज यांच्यानंतर धर्मचिकित्सेची परंपरा खंडित झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सरस्वती भुवन संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात बापू-सुधाताई काळदाते प्रतिष्ठानतर्फे आयोजित संविधान परिचय अभ्यासक्रमात ते बोलत होते. 'अंधश्रद्धा निर्मूलन विवेकवाद आणि राज्यघटना' विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, विज्ञानाचा दुरुपयोग करून शोषण केले जाते. दिशाहीन केले जाते;अशांविरोधात काम करणे हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुख्य उद्देश आहे. जादू-टोणा विरोधी कायद्याची काय गरज, असे बोलले जायचे. मात्र, हा कायदा किती आवश्यक आहे, हे या कायद्यानंतर अडीचशेहून अधिक भोंदूबाबांना पकडल्यानंतर समोर आले. वैद्याानिक दृष्टीकोनातून प्रचार, प्रसार होणे गरजेचे आहे. आपली भारतीय राज्यघटना खूप चांगली आहे. त्यातील नियम प्रभावी पणे राबविण्याची गरज आहे. संविधान ही नियमांची चौकट असून स्वातंत्र, समता, बंधुता, धर्म निरपेक्षता या सर्वमूल्यांचा यात विचार होतो. प्रारंभी सकाळच्या सत्रात एम. पी. लॉ कॉलेजच्या डॉ. भागश्री गोडबोले यांचे 'भारतीय न्यायव्यवस्था-वैशिष्टे आणि संविधान सरंक्षक म्हणून भूमिका' विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या न्यायाची विशिष्ट व्याख्या करता येत नाही. न्याय व्यवस्थेसमोर येणारे खटले, तेव्हाची परिस्थिती, घडलेली घटना, राज्यघटना, कायद्यातील नियम यांना अनुसरून न्याय दिला जातो. यावेळी सुभाष लोमटे, भाऊ शिंदे, अण्‍णासाहेब खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवगिरी कॉलेजला नॅकतर्फे ‘अ’ श्रेणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिलच्या (नॅक) तृतीय मूल्यांकनात देवगिरी कॉलेजला 'अ' दर्जा मिळाला आहे. नॅकच्या एक्झीक्युटीव्ही कमिटीमध्ये या श्रेणीवर शिक्कामोर्तब झाले. तृतीय मूल्यांकनात कॉलेजने ३.७५ सरासरी गुणसंपादन केले आहेत. अशाप्रकारे तृतीय मूल्यांकनात एवढे गुण मिळवित 'अ' दर्जा मिळविणारे हे पहिले कॉलेज ठरल्याचे संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नॅक समितीच्या पिअर टीमने २२ ते २४ फेब्रुवारी असे तीन दिवस कॉलेजला भेट दिली. कॉलेजने स्वयंमूल्यमापन अहवाल पाठविल्यानंतर समितीने भेट देत पाहणी केली. तीन दिवसांच्या भेटीत सर्व विभाग, ग्रंथालय, वसतिगृह, प्रयोगशाळा तेथील संशोधन, विविध उपक्रमांची माहिती घेतली घेतली. संशोधन, प्रकल्प यासह विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक आणि भौतिक सोयीसुविधांची पाहणी केली. त्यानंतर परिषदेच्या एक्झीक्युटीव्ह कमिटीत 'अ' श्रेणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी परिषदेच्या संकेतस्थळावरही हे जाहिर करण्यात आले. उच्चतम दर्जा मिळाल्याने कॉलेजमध्ये पेढे वाटून आनंद साजरा केला गेला. अध्यापन पद्धतीसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले संशोधन, पेंटेन्ट, प्लेसमेंट सेल, प्रशिक्षण शिबिर, पाणी नियोजन, शेतकऱ्यांसाठी पुरविलेल्या कंन्सलटन्सी, दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये दोनशे विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची करण्यात आलेली व्यवस्था, अशा उपक्रमांचे नॅकने कौतुक केले. अशाप्रकारे तृतीय मूल्यांकनात एवढे गुण मिळविणारे हे पहिले कॉलेज ठरल्याचा दावाही कॉलेजकडून करण्यात आला. पत्रकार परिषदेत संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह प्राचार्य डॉ. एम.एल. जाधव, उपप्राचार्य, प्राध्यापकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देखणे’ भारूडाचे रसिकांवर गारूड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐसा वासुदेव बोलतो बोल, विंचू चावला, दार उघड बये आता दार उघड, सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहील तुला, शकुन सांगाया आले यमाई माझे नाव, अशा संत एकनाथांच्या जोरदार भारुडांचे सादरीकरण करत डॉ. रामचंद्र देखणे व कलावंतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
समर्थनगर महिला मंडळ आणि संत साहित्य शिक्षण व शिक्षण संतसाहित्य व संशोधन प्रतिष्ठानतर्फे रविवारी लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या बहुरूपी भजनी भारुडाचा कार्यक्रम झाला. सुरूवातीला देणगीदार नगरसेवक ऋषिकेश खैरे, देवगिरी बँकेच्या अध्यक्षा डॉ. मंजू कुलकर्णी, मालती करंदीकर, मृणालिनी घाणेकर, डॉ. संजीव सावजी, श्रीकांत काशीकर, डॉ. अर्चना मोहगावकर, डॉ. शैलजा देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांनी यावेळी समयोचित मनोगत व्यक्त केले. देणगीदारांचा सत्कारही करण्यात आला. उद्‍घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शैलजा देव यांनी केले तर, आभार अर्चना मोहगावकर यांनी मानले.
रामचंद्र देखणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रारंभी दिंडी काढून सर्व वातावरण विठ्ठलमय करून टाकले. टाळ-मृदंगाच्या तालात, हातात भगव्या पताका, चोपदार, भालदार अशा भावपूर्ण वातावरणात प्रेक्षकांमधून दिंडी व्यासपीठावर गेली. या ठिकाणी वारकऱ्यांचे पावली नृत्य सादर करताना फुगडी सादर केली. देखणे यांनी दिंडी व वारीचे महत्त्व पटवून देतानाच जनाबार्इंच्या ओव्या सादर केल्या. यांनतर वासुदेव हे भारूड सादर केले. कडक लक्ष्मीचे भारूड सादर करताना त्यांनी केलेल्या वेशभूषेचे सर्वांचे लक्ष वेधले तर, या भारुडातच आयोजकांना कोरड्याचे फटकेही त्यांनी दिले. या पाठोपाठ त्यांनी जोगवा हे भारूड सादर केला तर, त्यांच्यासह कलाकारांनी विविध भारूड सादर करत विनोदाची पेरणी केली. यासह गोंधळी, पिंगळा, बैरागी, वाघ्या मुरळी, जोशी, भूत, पोतराज आदी भारुडे सादर करत कार्यक्रमाचा रंगत वाढवित नेला. हे करतानाच विनोदासह कडक शब्दात फिरकी घेत त्यांनी प्रबोधन केले. अभंग, भैरवीने समारोप करत शेवटी पसायदान घेऊन शेवट केला. रसिकांची यावेळी उत्स्फूर्त दाद मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज कपूर स्वप्नांच्या दुनियेचा राजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'निळ्या डोळ्यांतील स्वप्न व ओठांवरील करूण हास्य राज कपूरच्या अभिनयाचे बलस्थान होते. अभिनय करीत असताना त्याने दिग्दर्शन व निर्मितीला प्राधान्य दिले. प्रत्येक चित्रपटात रसिकांना साद घालणारा हा स्वप्नांच्या दुनियेचा राजा होता' असे प्रतिपादन चित्रपट अभ्यासक अरूण पुराणिक यांनी केले. राज कपूर चित्रपट सप्ताह समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी पर्वानिमित्त राज कपूर चित्रपट सप्ताह घेण्यात आला. या उपक्रमाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. या कार्यक्रमाला चित्रपट अभ्यासक अरूण पुराणिक, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, सिनेपत्रकार अशोक उजळंबकर व प्राचार्य डॉ. जगदीश खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुराणिक म्हणाले, 'आमची पिढी राज-देव-दिलीप यांचे चित्रपट पाहून मोठी झाली. राज यांच्या अभिनयावर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता. यश मिळवण्यासाठी तळागाळातून सुरुवात करावी हा वडील पृथ्वीराज कपूर यांचा सल्ला राज यांनी प्रमाण मानला. चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना सर्व बारकावे आत्मसात केले. 'दिल की रानी' चित्रपटात गायनाचा प्रयत्नही केला. मात्र, अभिनेता म्हणूनच यश मिळाले. पहिल्यांदाच नायकाची संधी मिळालेला 'नीलकमल' चित्रपट सपाटून आपटला होता. पण, राज यांनी परिश्रमाने यश मिळवले. हा दिग्दर्शक स्वप्नांच्या दुनियेचा राजा होता. आरके फिल्म्सचे बोधचिन्ह संगीत व शृंगाराचे द्योतक आहे'. दरम्यान, स. भु. शिक्षण संस्था लवकरच फिल्म क्लब स्थापन करणार असून रसिकांना दर महिन्याला दोन दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळेल असे प्राचार्य खैरनार यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय मोहड यांनी केले. राज कपूर चित्रपट सप्ताहाचा समारोप 'मेरा नाम जोकर' या चित्रपटाने झाला. श्रवणीय गाणी, भव्य सादरीकरण आणि उत्कट अभिनयाने सजलेला 'जोकर' रसिकांसाठी वेगळी पर्वणी ठरली. जुन्या पिढीतील प्रेक्षकांनी 'जोकर' पाहण्यासाठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्वीकर यांनी माणसे जोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'सतत कार्यप्रवण राहून भास्करराव आर्वीकर यांनी संस्था उभारणीचे काम केले. आयुष्यभर माणसे जोडणे हेच ध्येय बाळगलेल्या आर्वीकर यांना चौकटीत बंदिस्त करणे कठीण आहे' असे प्रतिपादन जीवन देसाई यांनी केले. आर्वीकर यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
जीवन विकास ग्रंथालयाचे अध्यक्ष भा. बा. कुलकर्णी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी अभिष्टचिंतन सोहळा झाला. कलश मंगल कार्यालयातील कार्यक्रमाला ना. वि. देशपांडे, अंबादासराव जोशी व जीवन देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आर्वीकर लिखित 'ज्ञेय', 'साठवण', 'आठव आपल्यांचा' या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. देसाई म्हणाले, 'आर्वीकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे कोणतीही तुला करणे अशक्य आहे. शांत बसणे हा त्यांचा स्वभाव नाही. सतत कार्यप्रवण असलेल्या आर्वीकर यांचे काम सर्व मित्रांसाठी प्रेरक आहे'. तर ना. वि. देशपांडे व अंबादासराव जोशी यांनीही आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमासाठी विशाल आर्वीकर, भाग्यश्री आर्वीकर, वृषाली कुलकर्णी व वृंदा अंबेकर यांनी परिश्रम घेतले. आर्वीकर यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आर्वीकर यांची ग्रंथतुला करण्यात आली. बिडकीन परिसरात आर्वीकर यांनी अधिक काळ सेवा केली. त्यामुळे या ग्रंथतुलेतील पुस्तके बिडकीन परिसरातील बारा गावातील शाळांना भेट दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन टू वनः वेरूळ लेणीतील चित्र जतनाचे रहस्य

$
0
0

वेरूळ लेणीतील दीड हजार वर्षांपूर्वीची चित्रं दीर्घकाळ जतन होण्याचे रहस्य उलगडले आहे. आर्द्रता शोषून घेणाऱ्या व जीवाणूंचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या गांजा वनस्पतीच्या तंतूचा चित्रात वापर करण्यात आला आहे. या जुन्या स्थापत्यशैलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. मिलिंद सरदेसाई यांनी संशोधनातून प्रकाश टाकला. यानिमित्त प्रा. सरदेसाई यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी मनमोकळा संवाद साधला.

Tushar.Bodkhe@timesgroup.com
- वेरूळ लेणीतील चित्रांचे संशोधन कसे करण्यात आले?
- केंद्रीय पुरातत्व विभागाचा हा प्रकल्प होता. वेरूळ येथील बारा क्रमांकाच्या लेणीतील चित्रांवर संशोधन करण्यात आले. पुरातत्व विभागाचे (रसायने) अधीक्षक डॉ. मॅनेजर सिंह यांच्या सहकार्याने चित्रांचा उलगडा करण्यात आला. वनस्पतीशास्त्र विभागात वर्गीकरण व नामकरणाचे काम होते. चित्रांच्या जतनात महत्त्वाच्या ठरलेल्या वनस्पतींचे संशोधन करायचे होते. लेणीतील पेटिंग १५०० ते १६०० वर्षांपूर्वीची आहेत. चित्राचा अगदी छोटासा तुकडा उपलब्ध झाला. चित्रात मातीमिश्रित गवत वापरल्याचे दिसत होते, पण गवत नसून वनस्पती असल्याचा उलगडा काही दिवसानंतर झाला. संशोधनात तुकड्यातील माती पूर्ण बाजुला केल्यानंतर पानाचे बारीक तुकडे, पाकळ्यांचा काही भाग दिसत होता. चित्राच्या लेपात फूल होते, पण स्त्रीकेसर किंवा पुंकेसर दिसत नव्हते. त्यामुळे वनस्पतीचा शोध लावणे आव्हानात्मक होते.

- चित्रातील लेपात वापरलेल्या वनस्पतीचा उलगडा कसा झाला?
- अजिंठा लेणीत तूस, ताग या वनस्पतीचे तंतू वापरल्याचे संदर्भ सापडतात. वेरूळ लेणीच्या चित्रांचे संशोधन करीत असताना चीनचे माझे मित्र प्रोफेसर चेन सेंग ली यांची महत्त्वाची मदत झाली. चीनमध्ये थडगी खूप असून ली यांनी एक थडगे उकलून संशोधन केले होते. थडग्यात एका बंद मडक्यात गांजा भरलेला होता. या संशोधनाचे नऊ-दहा पेपर ली यांनी मला पाठवले. या अभ्यासपूर्ण संशोधनाचा खूप फायदा झाला. इंग्लंडमध्ये ५०० वर्षांपूर्वी चिरेबंदी इमारती टिकवण्यासाठी भेगांमध्ये गांजाचा वापर करण्यात आला. कारण इमारतीत माणसांच्या श्वासोच्छवासातून भेगा विस्तारत असल्याचे आढळले होते. आर्द्रता शोषून घेत असल्यामुळे गांजाचा वापर करण्यात आला. अमेरिका - कॅनडा देशातही 'हिमक्रीट' बांधकाम तंत्रज्ञान आहे. गांजाचे खोड, पानाचे तुकडे व सिमेंट वापरून बांधकाम करतात. त्यामुळे बांधकामात वाळू कमी लागते. तसेच गांजाचे प्रमाण १० ते २० टक्के असते. विदेशात किमान ५०० वर्षांपूर्वीपासून गांजाचा वापर होत असल्याचे लक्षात आले. हा धागा पकडून लेणीच्या चित्रातही गांजा वापरल्याचे सिद्ध केले.

- संशोधनात कोणत्या महत्त्वाच्या नोंदी आढळल्या?
- चित्रातील वनस्पतीचे तुकडे अभ्यासण्यासाठी दिल्लीच्या एका मित्राला गांजाच्या वनस्पतीचे तुकडे पाठवण्यास सांगितले. चित्रातील तंतू व नवीन तंतू यात साधर्म्य आढळले. उत्तर भारतात गांजाची सर्रास लागवड करतात. गांजा फक्त नशेसाठी वापरतात असा महाराष्ट्रात समज आहे; मात्र, गांजाचे तंतू काढून त्याचा इतरत्र वापर केला जातो. गांजाची नर व मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. नशेसाठी मादी झाडाचा वापर करतात. चित्रातील तंतू सुस्थितीत असून त्यात अडकलेले किडेसुद्धा टिकून आहेत. निसर्ग नियमानुसार गांजा व किड्याचे खत होणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. किड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यात गांजा महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय जिवाणूंचा परिणामही रोखतो. उष्णतेला अवरोध करण्याची त्याची क्षमता असते. आर्द्रता रोखण्यासाठी लेणीत गांजाच्या तंतुचा उत्तम वापर करण्यात आला आहे.

- प्राचीन स्थापत्यशैलीचा वापर पुढील काळात कमी झाला असावा का?
- विदेशात पाचशे वर्षांपासून गांजाचा वापर झाल्याचे अभ्यासात लक्षात आले; मात्र दीड हजार वर्षांपूर्वी लेणीत गांजा वापरण्यात आला होता. कदाचित, त्या काळात महाराष्ट्रात गांजा लागवड केली जात असावी. कुशल कारागिरांनी लेणी घडवली. बारा क्रमांकाची लेणी तीन मजली असून, तिचा उपयोग निवारागृहांसारखा केला जात असावा. कारण भिंतीवर अनेक ठिकाणी चित्र, झोपण्याची जागा, इतर सुविधा आहेत. काही चित्रे अपूर्ण आहेत. चित्रं दीर्घकाळ टिकवण्यासाठी गांजाच्या तंतुचा वापर करण्यात आला. आर्द्रता शोषून घेणे हा गुणधर्म महत्त्वाचा असल्याने गांजा उपयुक्त ठरला. मधल्या काळात स्थापत्यशैली नामशेष झाली का हा संशोधनाचा विषय आहे. कारण भारतातील स्थापत्यशैली इतर देशात दिसते; मात्र, भारतात कालांतराने ही शैली दिसली नाही.

- हा शोधनिबंध कुठे सादर करण्यात आला?
- बेंगलुरू येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस' या संस्थेत १० मार्च रोजी शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला. केंद्रीय पुरातत्व विभागही शोधनिबंध सादर करणार आहे. या संशोधनाने जुन्या स्थापत्यशैलीवर निश्चित प्रकाश पडला. नैसर्गिक साधनसंपत्ती बांधकामात वापरण्याचे तंत्रज्ञान नवीन काळातील सिव्हिल इंजिनिअरने समजून घेतले तर भरीव काम होईल. लेणीचे उत्तम जतन करण्यासाठी गांजाचा वापर करण्यात आला. हा वापर भारतीय स्थापत्यशैलीचे वेगळेपण सिद्ध करणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनकॅमेरा तपासणीत १०० उत्तरपत्रिका संशयित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालन्यातील उत्तरपत्रिका घोटाळ्याच्या चौकशीने आता वेग धरला असून, 'इन कॅमेरा' झालेल्या तपासणीत ७५० पैकी १०० उत्तरपत्रिका संशयित असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरातील संस्कार निवासी वसतिगृहात अवैधपणे बारावीच्या उत्तरपत्रिका आणून, लहान मुलांकडून त्याचे पुनर्लेखन करणाऱ्या रॅकेटचा जालन्यामध्ये पदार्फाश झाला होता. या प्रकरणी वसतिगृह मालकासह दोन जणांना अटक करण्यात आलेली असून, दोघेही पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची इनकॅमेरा पाहणी करण्यात आली. पहिल्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत फक्त ७५० उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी १०० उत्तरपत्रिका संशयित आढळून आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. या १०० संशयित उत्तरपत्रिका तपासासाठी पोलिसांकडे ठेवण्यात येतील, तर उर्वरित उत्तरपत्रिका बोर्डाकडे पाठविण्यात येतील. बोर्डात या उत्तरपत्रिकांची पुनतपासणी करून मगच त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. इनकॅमेरा पाहणीकरीता तांत्रिक आणि तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडलाचे सहाय्यक अधीक्षक बनसोडे आणि शिंदे यांना जालन्यात पाचारण करण्यात आले होते. तालुका जालना पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत ही 'इन कॅमेरा' तपासणी पार पडली. या वेळी पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्यक निरीक्षक संजय चौधरी, विष्णू चव्हाण, देशमुख यांचाही या प्रक्रियेत सहभाग होता. ही प्रक्रिया अजून दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. तपासणीमधे उत्तरपत्रिकेवरील यूआयडी क्रमांक आणि बारकोडवरून सदर उत्तरपत्रिका कोणत्या महाविद्यालयाच्या आहेत याचा उलगडा होणार आहे. त्यानतर पोलिसांना तपासाची योग्य दिशा कळून तपासाला गती मिळणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी भगीरथ देशमुख यांनी दिली. दरम्यान, या रॅकेटमध्ये उत्तरपत्रिकांची अवैध ने-आण करण्यासाठी आरोपींकडून मारुती कारचा वापर केला जात होता. पोलिसांनी रविवारी दुपारी सदर कार जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानात चार अंशांनी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारी (२० मार्च) शहरात ३७.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर काही प्रमाणात उन्हाचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता तापमान पुन्हा एकदा ३५ अंशापेक्षा अधिक झाले आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात होत आहे. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक जाणवू लागतात. सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा कडाका कायम राहत आहे. रविवारची सुटी आणि कडक उन्हामुळे शहरातील प्रमुख रस्‍त्यांवर शुकशुकाट होता; सुटीच्या दिवशी बाजारामध्ये गर्दी असते. मात्र सायंकाळी सहा वाजेनंतर बाजारामध्ये नागरिकांची गर्दी सुरू झाली. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, रुमाल, छत्री तसेच स्कार्फचा वापर करत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात उन्हाचा पारा ३६ ते ३७ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरासाठी येणारा आठवडाही उष्ण राहणार आहे. आठवडाभर ढगाळ वातावरण असले तरी तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून रिक्षा तीन दिवस बंद

$
0
0

औरंगाबाद : पोलिस आणि आरटीओ विभागाकडून रिक्षा चालकांविरोधात सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात, रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीतर्फे सोमवारपासून (२० मार्च) तीन दिवस रिक्षा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत.

औरंगाबाद शहरात सुमारे १३ हजार रिक्षांतून रोज सुमारे ७० ते ७५ हजार नागरिक प्रवास करतात. पोलिसांनी उड्डाणपुलाखालून रिक्षा वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. याशिवाय रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. रिक्षांवर आरटीओ आणि पोलिसांनी १५ मार्चपासून कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईत रिक्षा चालकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप रिक्षा चालक संघटनेने केला आहे. किरकोळ कारणांवरून रिक्षा चालकांवर कारवाई केली जात आहे. त्याच्या विरोधात आणि रिक्षा चालकांसाठी सुविधा द्याव्यात, सिटर रिक्षा सुरू ठेवाव्यात आदी मागण्यांसाठी औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीने २१ मार्चपासून आंदोलन सुरू करण्याचे जाहीर केले आहे. सोमवारी (२१ मार्च) पैठण गेट येथून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी ‘वॉर रूम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्यातील प्राणी प्रश्न गंभीर होत असून, लातूरमध्ये पाणीसाठ्यांच्या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन, राज्य सरकारने लातूरसह उस्मानाबाद, परभणी आणि बीड या चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये 'वॉर रूम' सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन २४ तास मदतीला उपलब्ध राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यामध्ये या चार जिल्ह्यांतील पाणीटंचाई तीव्र झाली असून, लातूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. लातूर शहरातील टंचाई सर्वांत भीषण पातळीला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जारी केला आहे. जनतेसाठी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पिण्याचे पाणी, जनावराचा चारा वेळीच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यातही पाण्याच्या प्रश्नावर जनतेच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी या 'वॉर रूम'ची मदत होणार आहे, असे या आदेशामध्ये म्हटले आहे. तसेच, या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

जमावबंदी लागू

दरम्यान, लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आता महापालिकेच्या साथीला महसूल विभागानेही कंबर कसली आहे. महापालिकेच्या मदतीसाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गरज पडली तर पाणीपुरवठा सुरळीत आणि समन्यायी पद्धतीने होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची ही अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिला आहे. पाणीसाठ्याच्या ठिकाणी जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कमलाकर फड, प्रकाश खपले आणि डॉ. प्रताप काळे या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराचे दोन विभाग करून त्याची जबाबदारी कमलाकर फड आणि प्रकाश खपले यांच्याकडे देण्यात आली आहे.

नौकेतून गस्त

सध्या आर्वी, डोंगरगाव, आणि माळकोंजी येथून टँकरद्वारे पाणी आणले जात असून, त्याच्या शुद्धीकरणानंतर त्याचे वितरण केले जात आहे. सरकारने मंजूर केलेल्या विंधन विहिरी खोदून घेणे, त्याचे पाणी तपासून घेणे, साई, नागझरी, मांजरा धरणात चर खोदण्याची कामे सुरू आहेत. त्याचा आढावा घेण्याचेही काम हे अधिकारी करणार आहेत. पाणीपुरवठा कामासाठी जास्तीचे मनुष्यबळही सरकारच्यावतीने महापालिकेला देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले. डोंगरगाव बॅरेजमध्ये रात्रीच्या गस्तीसाठी छोट्या बोटींचा वापर करावा आणि तातडीने बोट सुरू करण्याची सूचना दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा राज्याची श्रीहरी अणेंची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

मराठवाडा आणि विदर्भाचे दु:ख सारखेच असून, मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाल्याने विदर्भाच्या राज्यनिर्मितीबरोबर मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हावी, असे स्पष्ट मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी जालना येथे व्यक्त केले.

मराठवाडा राज्य निर्मितीसाठी स्थापन झालेल्या मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्षाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना आणे यांच्या हस्ते साडी चोळीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात अणे बोलत होते. ते म्हणाले, 'राज्य निर्मितीचा निर्णय राज्याच्या नव्हे, तर केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नये. राज्य निर्मितीसाठी केंद्र सरकारवरच दबाव आणावा लागेल. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील जनतेने व्यापक लढा उभारावा.'

येथील आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाबा उगले यांनी केले. त्यांनीही वेगळ्या मराठवाडा राज्याच्या मागणीचा पुनर्रुच्चार केला.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी आणे वेगळ्या मराठवाडा-विदर्भ मागणीचे समर्थक आहेत. याआधीही विदर्भ राज्याच्या वक्तव्यावरून ते वादात सापडले होते आणि त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जालन्यातील कार्यक्रमामध्ये संयुक्त महाराष्ट्र समर्थकांकडून त्यांना काळे झेंडे दाखवून कार्यक्रम उधळून लावण्याची शक्यता होती. कार्यक्रम परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुळे-लहानेंसह ७ अर्ज फेटाळले

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या १० जुलै २०१३ रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यकारिणीस मुंबई धर्मादाय आयुक्तांनी हिरवी झेंडी दाखवत आमदार सतीश चव्हाणांच्या बदल अर्जास मंजुरी दिली. या आदेशाला आव्हान देणारा माजी अध्यक्ष विठ्ठल लहाने व सचिव मधुकरराव मुळे यांचा अर्ज न्यायाधीस जे. एन. राजे यांनी फेटाळला.
१० जुलै २०१३ रोजीच्या सभेत १७९ पैकी १०२ सभासदांनी अध्यक्षपदी प्रकाश सोळंके, सचिवपदी आमदार सतीश चव्हाण तर उपाध्यक्षपदी शेख अहेमद शेख चाँद, मानसिंग पवार यांची बिनविरोध झाली होती. निवडणुकीनंतरचा बदल अर्ज धर्मादाय उपायुक्त औरंगाबाद यांनी फेटाळला होता. याविरोधात मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. आयुक्तांनी औरंगाबाद धर्मादाय उपायुक्तांचा निर्णय खारीज करत नवीन कार्यकारिणीची निवड वैध ठरवली आहे. यामुळे नवीन कार्यकारिणीचा पूर्णपणे कामकाज पाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाविरुद्ध विठ्ठलराव लहाने, मधुकरराव मुळे , माजी उपाध्यक्ष पद्माकरराव मुळे ,सचिन मुळे, माजी कोषाध्यक्ष विश्वनाथराव तुपे यांच्यासह ७ अपील जिल्हा कोर्टात करण्यात आले होते. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. कार्यकारी मंडळाविरुद्ध कामकाज करण्यास मनाई मागितली होती, पण कोर्टाने सातही अर्ज फेटाळले. माजी कार्यकारी मंडळातर्फे विलास धोर्डे-पाटील, दिनेश वकील, प्रमोद पाटणी यांनी तर नवनिर्वाचित मंडळातर्फे के. यू. निकम, नंदकुमार खंदारे, श्रीकांत अदवंत, दिलीप चौधरी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...सायकल मिळाली; हॉस्टेलपासून शाळा जवळ झाली!

$
0
0


औरंगाबाद ः महिन्याकाठी दोनशे रुपये गोळाकरून वंचितांना मदतीचा हात देणाऱ्या मैत्र मांदियाळीच्या कार्याचा विस्तार झाला आहे. शहर आणि देश-परदेशातून जोडलेल्या दात्यांकडून समाजकार्याचा अखंड झरा सुरू आहे. रविवारी हेमलकसा येथून औरंगाबादमध्ये शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना मैत्र मांदियाळीकडून सायकलचे वाटप करण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा हॉस्टेल ते शाळा हा दूरचा प्रवास आता सुकर झाला आहे.
हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पातील ५ मुली व ४ मुले औरंगाबादमध्ये शिकण्यास आली आहेत. दुर्गम भागातून आलेले हे विद्यार्थी विविध खेळात पारंगत आहेत. त्यांची विद्यापीठ परिसरातील 'साई'क्रीडा केंद्रात निवड झाली आहे. वर्षभरापासून हे विद्यार्थी विद्यापीठातील साई क्रीडा केंद्राच्या हॉस्टेलमध्ये राहतात. मात्र, त्यांची शाळा भावसिंगपुऱ्यात आहे. रोजचे हे अंतर ते पायी जा-ये करायचे. त्याचा त्यांच्या खेळाच्या सरावावर परिणाम व्हायचा. त्यामुळे मैत्र मांदियाळीने या मुलांना सायकल वाटप करण्याचा निर्धार केला. त्यासाठी जुन्या सायकल देण्याचे आवाहन केले. त्यासाठी ५० ते ६० जणांनी तयारी दर्शवली. मात्र, नंतर नवीन सायकल घेऊन देण्याचा निर्धार करण्यात आला. रविवारी या मुलांना त्यांच्या आवडीनुसार सायकली घेऊन देण्यात आल्या. यासाठी मैत्र मांदियाळीच्या आवाहनाला औरंगाबादमधील आयकर अधिकारी वैभव ढेरे, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हरकर, राजीव रत्नाळीकर मुंबईचे श्री चव्हाण, पुण्याचे समीर खडकीकर आदींनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे, अमोल पाटील, सारिका गायकवाड, संदीप चव्हाण, राजू डोंगरे, मयुरी जाधव, अशोक गीते, अभिषेक भालेराव, निवृत्ती रुद्राक्ष, ज्ञानेश्वर सातपुते, संदीप मोहरीर, गणेश साळवे यांनी परिश्रम घेतले.
मूठभर धान्य, वही-पेन
मैत्र मांदियाळीने वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मूठभर धान्य, वही-पेन असा नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत धान्य, वही-पेन ही मदत स्वीकारली जात आहे. या स्वरुपातली मदत ज्या विद्यार्थ्यांची खडतर परिस्थिती आहे, त्यांना पोहचवली जाते. या उपक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे अजय किंगरे यांनी सांगितले.
व्हॉटस् अॅपद्वारे केले आवाहन
'मैत्र मांदियाळी'ला हेमलकसातली काही मुले औरंगाबादला शिकतात. त्यांना शाळा ते हॉस्टेल हे अंतर पायी जावे लागते. त्यामुळे खेळाच्या सरावास वेळ मिळत नाही हे समजले, तेव्हा दात्यांना त्यांनी व्हॉटस् अॅप ग्रुपमधून आवाहन केले. 'मैत्र मांदियाळी'च्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर २५० सदस्य आहेत. त्यांनी या आवाहानाला भरभरून प्रतिसाद दिला. फेसबुकवर मैत्र मांदियाळीच्या ग्रुपलाही तुम्ही भेट देऊ शकता. https://m.facebook.com/maitra mandiyali jalna.
-
'मैत्र मांदियाळी'ने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून या मुलांना सायकल देण्याचे आवाहन केले होते. आम्हाला दात्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. काहींची सायकलस्वरुपात आलेली मदत वापस करावी लागली. एक दिवस मुलांसोबत घालवला. त्यांच्या आवडीनुसार सायकल घेऊन दिल्या.
- अजय किंगरे, मैत्र मांदियाळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images