Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तलावात सापडलेला मृतदेह प्राध्यापकाचा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करमाड परिसरात रविवारी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह शिवाजी अर्जून खरात (वय ३१, रा. राजगुरुनगर, बीड बायपास) या प्राध्यापकाचा असल्याचे उघड झाले आहे. व्यावसायिक वादातून मारेकऱ्यांनी हा खून केल्याचे समजते.
खरात हे वाळूज परिसरातील महाविद्यालयात म्हणून कार्यरत होते. ते मित्रांसोबत भागिदारीमध्ये शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, व्यवसायातून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. खरात बदनामी करतो, असा मित्रांना संशय आला. त्यातूनच त्यांनी त्यांचा खून केला असावा, अशी शक्यता आहे. १९ मार्च रोजी मित्र असलेल्या तीन संशयित आरोपींनी खरात यांना दुचाकीवर बसवून करमाड परिसरातील निर्मनुष्य भागात नेले. त्यांच्यापैकी एकाने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला. मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अर्धवट जळाला. त्यामुळे त्यांनी पुरावा नष्ट करायचा म्हणून एका पोत्यात मृतदेह टाकायचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह पोत्यात जात नव्हता. त्यामुळे दोन्ही हात आणि पाय कापून मृतदेह आडगाव मोहालीतील तलावात फेकल्याचे समोर आले आहे.
गोव्यातून तिघे ताब्यात
ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तीन संशयितांना शुक्रवारी गोव्याहून ताब्यात घेतले आहे. मध्यरात्रीपर्यंत हे पथक औरंगाबादला पोहोचणार आहे. खून का, कशासाठी केला हे चौकशीतूनच समोर येईल, असे म्हणत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यकृत-स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रिया सवलतीत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यकृत-स्वादुपिंडाचे विविध क्लिष्ट उपचार, शस्त्रक्रियेसाठी आता मुंबई-पुणे-हैदराबादला जाण्याची गरज राहणार नाही. त्यासाठी शहराचे भूमिपुत्र व हैदराबादस्थित यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. चेतन महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या जूनपासून विविध प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया मुंबईच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी शुल्कामध्ये करणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
एका वैद्यकीय परिषदेनिमित्त डॉ. महाजन शहरात आले असता, त्यांनी 'मटा'शी संवाद साधला. ते म्हणाले, 'सद्यस्थितीत यकृत (लिव्हर) व स्वादुपिंडाचे (पॅन्क्रियाज) आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. देशातील तब्बल २५ ते ३० टक्के व्यक्तींमध्ये यकृताशी संबंधित विविध प्रकारचे आजार दिसून येत आहेत. मद्यपानासह कावीळ ब व कावीळ क, यकृताचा कर्करोग, 'फॅटी लिव्हर'ची समस्या, मधुमेह व इतर कारणांमुळे यकृताचे विविध आजार वाढत आहेत. स्वादुपिंडाशी संबंधित विकारही वाढत आहेत. मद्यपान करणाऱ्या पाच व्यक्तींमागे एकाला तरी 'पॅन्क्रियाटायटिस' हा विकार दिसून येतो. मात्र, तात्पुरती औषधे घेऊन हा आजार दाबण्याची प्रवृत्ती आहे. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. विषाणूंचा संसर्ग, पित्ताशयात खडे ही देखील स्वादुपिंडाच्या विकारांची कारणे आहेत. त्यासाठी दुर्बिणीद्वारे विविधांगी उपचार-शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या १५ ते २० प्रोसिजर-शस्त्रक्रिया शहरामध्ये जूनपासून करण्यात येतील.
'बलून' टाकून घटते स्थूलता
'अतिस्थूल व १०० किलोंपेक्षा जास्त वजन असलेल्यांसाठी 'बॅरिअॅट्रिक सर्जरी' केली जाते. मात्र, ९० किलोंच्या आसपास वजन असणाऱ्यांसाठी दुर्बिणीद्वारे पोटामध्ये सलाईनने भरलेला विशिष्ट 'बलून' टाकला जातो आणि त्यामुळे भूक कमी होऊन संबंधित व्यक्तीचा आहार घटतो व ३ महिन्यांत १० ते १२ किलोंपर्यंत वजन कमी होऊ शकते. अर्थात, 'बेरिअॅट्रिक सर्जरी' असो की 'बलून सर्जरी', योग्य पथ्य पाळले नाही, तर पुन्हा वजन वाढण्यास वेळ लागत नाही,' असेही डॉ. महाजन यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्या मांडण्याची ‘मटा’च्या ‘अॅप’मुळे संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मटा सिटिझन अॅप'मुळे समस्या मांडण्यासाठी सशक्त माध्यम उपलब्ध झाले आहे. शहरातील विविध प्रश्न मांडण्याची संधी 'मटा'च्या 'अॅप'मुळे मिळाली, असे मत 'मटा सिटिझन रिपोर्टर' यांनी मांडले. 'सिटीझन रिपोर्टर अॅप' हे व्यासपीठ नागरिकांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा सिटिझन रिपोर्टर अॅप' उपक्रमात गेल्या आठवड्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शांतिलाल चौंडिये, रतन राऊत यांचा शुक्रवारी (२५ मार्च) महाराष्ट्र टाइम्स कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. या आठवड्यात चौंडिये 'बेस्ट सिटिझन रिपोर्टर' ठरले. वृत्तपत्रातून समस्या मांडण्याचे स्वप्न होते. 'सिटिझन रिपोर्टर अॅप'च्या माध्यमातून हे स्वप्न साकार झाले, असे त्यांनी सांगितले.

शहरात असंख्य नागरी समस्या आहेत. त्या सर्व मांडल्या जात नाहीत. या समस्या संबंधित यंत्रणेसमोर मांडण्याची संधी 'मटा'च्या अॅपमुळे उपलब्ध झाली आहे. नागरिकांना 'अॅप'च्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले आहे, असे राऊत यांनी सांगितले.

आपणही बनू शकता सिटिझन रिपोर्टर
वाचकहो, MT Citizen Reporter हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. त्यानंतर अॅपमधील तपशील पूर्णपणे भरा. हा तपशील प्रसंगी मटाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर तुम्ही फोटो, टेक्स्ट किंवा व्हिडीओ स्वरूपात आपले म्हणणे मांडू शकता. फोटो आणि त्याखाली टेक्स्ट हा पर्याय त्यातल्या त्यात सर्वोत्तम. फोटो आणि त्यासोबतच टेक्स्ट पाठवताना त्याची कॅटेगरी सिलेक्ट करा. समस्याप्रधान फोटो असल्यास सिव्ह‌िक इश्यू अशी कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तो फोटो पाठवा. बरेचदा अॅप तुम्हाला तुमचे लोकेशन विचारू शकेल. त्यावेळी 'औरंगाबाद' असे टाइप करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : फ्लेव्हर्ड पाणीपुरी

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com
पाणीपुरी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट गाडे येतात. काचेच्या चौकोनात ठेवलेल्या पुऱ्या सोबत दोन भांड्यात अंबट-गोड आणि तिखट पाणी. एका भांड्यात उकडलेले बटाटे, बारीक कांदा, भिजविलेले हरभरे यांचे मिश्रण. पुरी फोडून मिश्रण त्यात भरले जाते. त्यानंतर पुऱ्या पाण्याच्या दोन्ही भांड्यात बुडविल्या जातात आणि प्लेटमध्ये ठेवल्या जातात. पाणीपुरीची चव ठरलेली. एका पाण्यात चिंचेचा अंबटपणा अाणि साखरेचा गोडवा. पुदिना, कोथिंबीर असलेले मसालेदार तिखट चव असलेले दुसरे पाणी. ही चव सर्वांच्याच ओळखीची आहे.

औरंगपुऱ्यातील दत्त मंदिरासमोर आणि उस्मानपुरा सर्कल येथे क्रांतिचौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारस्वत बँकेसमोर रमेश गुर्जर यांच्या गाड्यावरील पाणीपुरी मात्र 'हटके' आहे. रमेशच्या गाड्यावर चक्क पाच फ्लेवरमधील पाणीपुरी मिळते. त्यात जिरे, लसूण, पुदिना, हाजमा आणि रेग्युलर यांचा समावेश आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी त्यांनी पाणीपुरीचा गाडा औरंगपुऱ्या सुरू केला.

पाणीपुरीसाठी 'जार'मध्ये मिळणारे शुद्ध पाणी वापरले जाते. सकाळी आठ ते दहा यावेळेत ते पाणी तयार करतात. पाणीपुरीच्या मसाल्यात जिऱ्याची पूड विशिष्ट प्रमाणात मिसळले जाते. लसूण फ्लेवरसाठी मसाल्यात लसणाची पेस्ट मिसळतात. त्याचबरोबर हिरव्या पुदिन्याची पेस्ट वापरून पुदिना फ्लेवर तयार केला जातो. हाजमा फ्लेवरसाठी हाजमोला मसाला वापरतात. या सर्वांचे प्रमाण ठरलेले असते. त्यात बदल झाल्यास पाण्याची चव बदलले, असे त्यांनी सांगितले.

रवा, मैदा यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या पुऱ्या वापरल्या जातात. पुरीमध्ये उकडलेले बटाटे, भिजवलेले हरभरे यांचे मिश्रण भरले जाते. फ्लेव्हर्ड पाणी पाच बरण्यांमध्ये ठेवलेले असते. ग्राहकांना पाणीपुरी सर्व्ह करताना पाण्यात पुरी हाताने बुडविली जात नाही. प्रत्येक बरणीत एक पळी आहे. तिला एक छित्र पाडलेले आहे. बरणीतून पाणी घेऊन पळी पुरीवर धरली जाते. पळीतील पाणी पुरीत पडते. पाचही फ्लेव्हरची पाणीपुरी खाणारे खवय्ये आहेत. त्याचबरोबर एकाच विशिष्ट चवीची ऑर्डर देणारेही आहेत, असे ते सांगतात. स्वच्छता आणि पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारे 'जार'मधील शुद्ध पाणी हे वैशिष्ट्य खवय्यांना आकर्षित करते. पाणीपुरी खाल्यानंतर एक वेगळीच चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळते. जिरे, पुदिना, लसूण या फ्लेवरचे पाणी तिखट चवीकडे झुकणारे आहे. हाजमा फ्लेवरच्या पाण्याला जरासा गोडवा आहे.

रमेश गुर्जर राजस्थानमधील रहिवासी. ते वर्ष-दीडवर्षापूर्वी अहमदाबादमध्ये मित्राकडे गेले होते. गुजरातमध्ये फ्लेव्हर्ड पाणीपुरी प्रसिद्ध आहे. तेथे ते पाणीपुरी तयार करण्याचे शिकले. त्यांचे काका औरंगाबादमध्ये आहेत. त्यांची येथे आइस्क्रिमची गाडी आहे. सहा-सात महिन्यांपूर्वी ते आणि त्यांचा काकाकडे येथे आले. त्यांनी येथे फ्लेव्हर्ड पाणीपुरी सुरू करण्याचे सुचविले. त्यानुसार औरंगपुऱ्यात त्यांनी स्टॉल सुरू केला. ग्राहकांचा प्रतिसाद विचारात घेऊन महिनाभरापूर्वी उस्मानपुऱ्यातही स्टॉल सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा एक्स्प्रेस पनवेलपर्यंत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अजिंठा एक्स्प्रेस रेल्वे पनवेलपर्यंत, तर जालना नगरसोल डेमूचे मनमाडपर्यंत विस्तारीकरण होईल. या रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यासही दक्षिण मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविला आहे. अधिकृतरित्या लवकरच या दोन्ही रेल्वेचा विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लासूर येथील नमो हायवे अँड रेल्वे पॅसेंजर ऑर्गनाइझेशनचे गौतम नहाटा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सिकंदराबाद ते मनमाड चालणाऱ्या अजिंठा एक्सप्रेस रेल्वेचा कोच सोळा तास मनमाड येथे उभा ठेवण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य वाहतूक अधिकाऱ्यांना दिली होती. याबाबत मध्य रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेला पत्र पाठवून, या रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली होती. या पत्राला दक्षिण मध्य रेल्वेने केराची टोपली दाखविली. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने बातमी प्रकाशित केली होती. रेल्वे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता औरंगाबाद स्टेशनच्या पाहणीसाठी आले होते. त्यांनाही याबाबतच
विचारणा झाली. या पाहणी दरम्यान नांदेड रेल्वे उपभोक्ता समितीचे नंदकुमार घोडेले, मंगेश कपोते यांनी अजिंठा एक्स्प्रेस आणि नगरसोल डेमोच्या विस्तारीकरणाचा मुद्दा गुप्ता यांच्यासमोर ठेवला होता. या बैठकीत गुप्ता यांनी या रेल्वेच्या विस्तारीकरणाचा निर्णय लवकर घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. गुप्ता यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे २२ मार्च २०१६ रोजी दक्षिण मध्य रेल्वेने अजिंठा एक्स्प्रेस पनवेलपर्यंत नेण्याचा तसेच जालना नगरसोल डेमू मनमाडपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर केला आहे. आगामी काही दिवसांत अजिंठा एक्स्प्रेसचे पनवेलपर्यंत विस्तारीकरण करून ती मनमाडपर्यंत कशी आणणार याचे नियोजन करा, अशा सूचना मध्य रेल्वेला करण्यात आल्या आहेत. याशिवाय जालना नगरसोलच्या दोन फेऱ्या सुरू करण्याची मा‌गणी प्रस्तावात देण्यात आली आहे.
-
दक्षिण मध्य रेल्वेने अजिंठा एक्स्प्रेसबाबत आपला प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर केला आहे. मध्य रेल्वेकडून अद्याप उत्तर आलेले नाही. मात्र, लवकरच या प्रस्तावावर निर्णय होईल. - अखिलेश सिन्हा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड
-
अजिंठा एक्स्प्रेस, जालना नगरसोल डेमोच्या विस्तारीकरणासाठी आम्ही प्रयत्न करित होतो. 'महाराष्ट्र टाइम्स'मुळे हा विषय चर्चिला गेला. प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेने मध्य रेल्वेला पाठवला आहे. यामुळे लवकर हा निर्णय होईल.- गौतम नहाटा, नमो हायवे, रेल्वे ऑर्गनाइझेशन, लासूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शाळांची झाडाझडती सुरू

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मान्यता घेतलेल्या जागेवर शाळा नसणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतामध्ये गडबड अशा अनेक तक्रारींची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात १०० शाळांची तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीचा अहवाल पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य आदी सहा गटांतील १००० प्राथमिक शाळा आहेत. यापैकी अनेक शाळांच्या बाबतीत जिल्हा परिषद प्रशासनाने सातत्याने तक्रारी येत असतात. अगदी डोनेशनपासून पायाभूत सुविधांचा अभाव, भौतिक सुविधांचा समावेश होता. नियमाप्रमाणे दरवर्षी शाळांची वार्षिक तपासणी करणे बंधनकारक आहे. आलेल्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने गेल्या आठवड्यात शाळा तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यात संचमान्या, वैयक्तिक मान्यता, भौतिक सुविधा याचे ऑडिट केले जाणार आहे. शहरातील शाळा तपासण्यासाठी दोन उपशिक्षणाधिकारी व तीन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना प्रत्येकी दहा तर पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांना ५० अशा एकूण १०० शाळा तपासण्यात येत आहेत. प्रत्येक टीमकडून कसून तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले.

शाळेने ज्या जागेसाठी मान्यता घेतली असेल तिथे जर शाळा सुरू नसेल तर अशा शाळांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळल्यास शाळांविरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिल्याने गैरप्रकार करणाऱ्या शाळांना आपोआप चाप बसणार आहे.

दुसरा टप्पा जूनपासून
पहिल्या टप्प्यातील शाळा तपासणी पुढील आठवड्यात संपेल. त्यानंतर सादर होणाऱ्या अहवालावरून दोषी शाळांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाईल. उर्वरित शाळांची तपासणी उन्हाळी सुट्या संपल्यानंतर उर्वरित शाळांची झाडाझडती होणार आहे. जूनमध्ये प्रवेशासाठी सर्वच शाळांमध्ये चढाओढ असते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून होणाऱ्या मोहिमेचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजण पूजनाने नाथषष्ठी यात्रा सुरू

$
0
0



पैठण : तुकाराम बिजेच्या महुर्तावर शुक्रवारी संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील रांजणाची नाथ वंशजांच्या हस्ते विधिवत पूजन करून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली.
नाथषष्ठी यात्रेचा मुख्य महोत्सव २९ ते ३१ मार्चदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी तुकाराम बिजेला संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रांजणाची नाथवंशजांच्या हस्ते विधिवत पूजन करून नाथ षष्ठी यात्रा महोत्सवाला सुरुवात करण्यात येते. यावर्षी दुपारी एक वाजता नाथांच्या वाड्यात मोठ्या प्रमाणत वारकरी, शहरातील नागरिकांच्या व नाथ वंशजांच्या हस्ते रांजणाचे मंत्रोच्चाराच्या जयघोषात पूजन केले. त्यानंतर रांजण भरणे सुरू केले. या विधीने नाथषष्ठी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. संत एकनाथांच्या काळापासून त्यांच्या वाड्यात आजही सुस्थितीत असलेल्या या रांजणाबद्दल आख्यायिका आहे. 'ईश्वराने नाथांच्या घरी बारा वर्षे श्रीखंडीच्या रुपाने गोदावरीतून याच ऐतिहासिक रांजणात पाणी भरून संत एकनाथांची सेवा केली केली. एकवीस फूट खोल व नऊ फूट रुंद संपूर्ण दगडी बाधकाम असलेला नाथांच्या वाड्यातील हा रांजण आजही सुस्थितीत आहे.
...असाही विश्वास
नाथवंशज व वारकऱ्यांना आजही विश्वास आहे की, नाथषष्ठी यात्रा महोत्सवाच्या काळात जोपर्यंत स्वतः परमेश्वर सामान्यांच्या रुपात येऊन रांजणात गोदावरी नदीतून पाणी टाकत नाही, तो पर्यंत हा रांजण भरत नाही. रांजण भरायला तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. तसेच ज्या व्यक्तीच्या हस्ते भरतो, त्याचा नाथ वंशजांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातपंपांच्या घशाला कोरड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
पंचायत समिती कार्यालयाकडे नोंद असलेल्या तालुक्यातील १७० हातपंप पूर्णतः बंद आहेत. परिणामी पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.
उन्हाचा चटका वाढल्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तालुक्यातील ९२ गावांपैकी १० गावांत १६ टँकरने व २५ गावांत २९ विह‌िरी अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती विभागात तालुक्यातील ५०० हातपंपांची नोंद आहे. या शिवाय नोंद न झालेले सुमारे २५० हातपंप असल्याचा अंदाज आहे. दुरुस्ती विभागाकडे २०१४ पर्यंत ३५ ग्रामपंचायतीमधील हातपंपाचे करार झाले आहेत. नोंदणी असलेल्या हातपंपापैकी ३३० पंप सुरू असून १७० हातपंप पूर्णतः बंद आहेत. गेल्या काही आठवड्यात १५ हातपंप दुरुस्त करण्यात आले. हातपंप दुरुस्तीचे काम मंद गतीने सुरू असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार आहे. दरम्यान, अनेक ठिकाणचे हातपंप नादुरस्त असल्याचे पंचायत समितीमधी तंत्रज्ञ विजय मुळे यांनी सांगितले. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे हातपंप दुरुस्त करत असल्याचा दावा त्यांनी केला. अनेक गावातील हातपंप अजूनही दुरुस्ती न झाल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. शिवाय अनेक ठिकाणच्या हातपंपांची वेळेत दुरुस्ती न झाल्याने त्याची तुटफूट झाली आहे. काही हातपंपाचे दांडे गायब झाले असून, काहींना पाइपची लांबी कमी पडत आहे. काही हापपंपात चेन नसल्याचे सांगण्यात आले. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही तीव्र झाला आहे. हातपंपांची त्वरित दुरुस्ती झाल्यास किमान आधार मिळले, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
-
गावात सहा हातपंप असून त्यापैकी एकच सुरू आहे. दोन हातपंप नादुरुस्त असून तीन दुर्लक्षामुळे इतिहास जमा झाले. दोन हातपंप दुरुस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पडून आहे.
- सोनाली डकले, ग्रामपंयाचत सदस्य, पेंडगाव
-
ममुराबाद ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात १० हातपंप आहेत. त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे. पंचायत समितीकडून हालचाल होत नसल्याने ग्रामपंचायतीने तीन व स्वखर्चाने सहा हातपंप दुरुस्त केले.
- कृष्णा गावंडे, सरपंच, जानेफळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भारत माते’ला विरोध करणारे देशविरोधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'भारत माता की जय' म्हणणार नाही, असे म्हणणारे देशविरोधी आहेत. त्यांना येथे राहणाऱ्याचा अधिकारच नाही, असे मत जय श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार राजासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले. 'भारत माता की जय' केवळ घोषणा नाही तर गर्जना आहे. तो असंख्य स्वातंत्र्ययोद्ध्यांचा स्वातंत्र्याच्या लढाईतील स्फूर्ती-मंत्र आहे, असेही त्यांनी नमूद केले. एमआयएम पक्षाचा उदय देशाचे तुकडे पाडण्यासाठी झाला असून, ओवेसी यांना मुस्लिमांशी देणे घेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आमदार ठाकूर शुक्रवारी शहरात आले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेते ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, अनिल मकरिये, संजू रिडलॉन आदी उपस्थित होते. नवीन पिढीत देश, धर्माप्रती भावना कमी होत आहे. त्यांच्यात ही भावना जागृत करण्याचा संकल्प घेतला असून, देशभरातील हिंदु संघटित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

'एमआयए'चे खासदार असदुद्दिन ओवेसी हे मुस्लिमांच्या मतांवर निवडून आले, मात्र ते मुस्लिम समाजापेक्षा स्वतःच्या कुटुंबाच्या उत्कर्ष करून घेत आहेत. हैदराबादेत त्यांचा कोट्यवधी रुपयांचा बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. कैन्हय्याकुमार हा गद्दार आहे. हैदराबादेत त्याचे कार्यकर्त्यांनी चप्पल मारून स्वागत केले, अशा शब्दांत त्यांनी कैन्हय्याकुमार वर टिका केली.

गो हत्या करणारे कत्तलखाने उद्धवस्त करा
औरंगाबाद ः 'गो मातेचे आम्ही कर्जदार आहोत. हे कर्ज फेडण्यासाठी गो हत्या करणारे कत्तलखाने उद्धवस्त करा. देशात गद्दाराची संख्या वाढत असून संरक्षणासाठी, धर्म रक्षणासाठी हिंदूनी भगव्या ध्वजाखाली एकत्र यावे. ओवेसीसाठी आपण एकटेच सक्षम आहोत,' असे विधान जय श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार राजासिंह ठाकूर यांनी शुक्रवारी केले. हिंदू जनजागृती समितीतर्फे शुक्रवारी गारखेडा परिसरातील कडा कार्यालय मैदान येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सनातन संस्थेच्या स्वाती खाड्ये, नंदकुमार जाधव, सुनील घनवट उपस्थित होते. ठाकूर म्हणाले, 'देशात गद्दारांची संख्या वाढत आहे. हिंदू तरुणांनी राष्ट्र हिताचा विचार करावा. संघटित होऊन धर्मांधांनी सुरू केलेल्या लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद रोखावे. घराघरात छत्रपती शिवराय, शहीद भगतसिंग जन्माला यावेत. भगव्या ध्वजाखाली हिंदूनी एकत्र यावे,' असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपीयर मशीन खरेदीत गैरप्रकाराचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना कॉपीयर मशीन देण्याची योजना यंदा राबविण्यात येत आहे. ६४ लाखांच्या या योजनेत खरेदीप्रक्रियेतच गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे, मात्र प्रशासनाने ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबविल्याचा दावा केला आहे.

समाजकल्याण खात्याने जिल्ह्यातील लाभार्थी निवडून त्यांना कॉपीयर मशीन देण्याची योजना जाहीर केली होती. त्यासाठी जानेवारी २०१६मध्ये ई-टेंडरिंग पद्धतीचा अवलंब केला गेला. त्यासाठी काही निविदा प्राप्त झाल्या. त्यावेळी मशीनसाठी जे तांत्रिक विवरण दिले गेले. त्यानुसार रिको इंडिया लिमिटेडचे अधिकृत वितरण नॅशनल टेली लिंकसने निविदा दाखल केली होती.

प्रक्रिया राबवून पुढचा टप्पा गाठला गेला. दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठी ते तांत्रिक विवरण दिले गेले त्यात काही त्रुटी असल्याने प्रशासनाने शुद्धीपत्रक काढून बदल सुचविले. इथूनच वादाला सुरवात झाली. एका विशिष्ट बनावटीच्या मशीनसाठी हे तांत्रिक विवरण बदलण्यात आल्याचा आरोप पहिल्या पुरवठादाराने केला. हे शुद्धीपत्रक नेटवर लोड करण्यात आले पण ते आढळले नसल्याचा दावाही या पुरवठादाराने केला. आमचे दर जर सर्वात कमी असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार आम्ही पुढचा टप्पा गाठला, पण नंतर शुद्धीपत्रकात नमूद असल्याप्रमाणे तांत्रिक विवरण नसल्याचे कारण सांगण्यात आले. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरही दिले गेले नाही, असा आरोप करण्यात आला.

जिल्हा परिषद प्रशासनाने एका विशिष्ट कंपनीला मदत होईल अशा प्रकारे तांत्रिक विवरणात बदल करून गंभीर नियमितता केली असून आधी मागविलेले 'फायनान्शिअ बिड' उघडल्यानंतर निविदा रद्द केल्यास सर्व प्रक्रिया नव्याने राबविणे आवश्यक होते. यासंदर्भात कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशची मागणी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात आवश्यक ती काळजी घेतली असून ,प्रक्रिया पारदर्शी राबविली असल्याचे प्रशासनातर्फे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी धरणात फ्लोटिंग पंप सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून सध्या पाणी उपसा सुरू करण्यात आले आहे. उपशाचे प्रमाण कायर रहावे म्हणून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने या धरणात फ्लोटिंग पंप बसविले आहेत. महापालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या हस्ते हे पंप सुरू करण्यात आले.

फ्लोटिंग पंपांचा वापर करून मृत जलसाठ्यातून पाणी उपसले जाणार आहे. त्यानंतर ते पाइपच्या सहाय्याने पंपहाउसमध्ये टाकण्यात येते. फ्लोटिंग पंपांच्या सहाय्याने पाणी उपसले जात असल्यामुळे पंपहाउसच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपशाचे प्रमाण कमी होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. सध्या धरणातून १५६ एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी उपसले जाते. फ्लोटिंग पंप कार्यान्वित केल्यावर तेवढेच पाणी उपसले जाईल. सध्या सहा फ्लोटिंग पंप सुरू करण्यात आले आहेत. त्यांची क्षमता प्रत्येकी ७५ हॉर्स पॉवर एवढी आहे. पंप कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी कंपनीचे देखभाल दुरुस्तीप्रमुख रमेश सोनकांबळे, बल्क विभागप्रमुख महेश देशपांडे, महापालिकेचे उपअभियंता यू. जी. शिरसाट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी सरींनी गारवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहर आणि परिसरात शुक्रवारी (२५ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. या अवकाळी सरींमुळे असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांना दिलासा मिळाला.

शहरात सकाळपासूनच दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. शहरातील तापमान ३९.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. दिवसभर उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. शुक्रवारी सायंकाळी शहर व परिसरात साडेसातच्या सुमारास मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हडको, सिडको, गजानन नगर, जयभवानीनगर, गारखेडा परिसर, सातारा परिसर, शाहनूरवाडी, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, सातारा, वाळूजसह जुन्या शहरातील काही भागामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळे काही भागांतील वीज पुरवठा विस्कळित झाला होता. खुलताबाद परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध सावकाराविरोधात विशेष प्राधिकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
अवैध सावकाराच्या विरोधातील तक्रारीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत चालली आहे. त्यामुळे येत्या काळात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्‍थापना करण्यासंदर्भात शासनस्तरावर विचार सुरू असल्याची माहिती, राज्याचे सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील चारा छावणीची सुरुवात पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, 'उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. त्यासंदर्भातील चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबाबादार व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्यात येईल. त्यासोबतच येत्या काळात जिल्हा बँकेला काही प्रमाणात राज्य सरकारकडून मदत म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.'
शेतकऱ्यांच्या अनुदानातून उस्मानाबाद जिल्हा बँक कर्जाची रक्कम कपात करून घेत असल्याच्या तक्रार प्राप्त झाल्या असून यासंदर्भात अनुदानातून रक्कम कपात करू नये अशा सूचना बँकेला देण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काटी येथील चारा छावणीची सुरुवात पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यासोबतच काटी येथे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अॅड. मिलींद पाटील, अनिल काळे, सत्यवान सुरवसे यांच्यासह पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस प्रमुख अभिषेक त्रिमुखे, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सहकार मंत्री पाटील यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी उस बागायतदार शेतकऱ्यांच्‍या व्यथा मांडल्या. यावेळी पाटील यांनी उस बागायतदार शेतकऱ्यांच्‍या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.

छावणीची जाचक अट शिथिल करणार
चारा छावणी सुरू करण्यासाठी छावणीत ५०० जनावरे आवश्यक असावीत अशास्वरूपाची अट राज्य सरकारकडून घालण्यात आली आहे. ही जाचक अट शिथिल करून येत्या काळात २५० जनावरे असलेल्या ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यास परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून विचार सुरू असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सहकार मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत चार कामगार भाजले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील व्हॅराक पॉरीमल प्राव्हेट लिमिटेड कंपनीत शनिवार पहाटे पाचच्या सुमारास केमिकलमुळे आग लागली. यामध्ये चार कामगार भाजले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एमआयडीसी वाळूज येथील एम-सेक्टर प्लॉट नंबर १६५ ते १६५ मध्ये असलेल्या व्हॅराक पॉरीमल प्रा. लि. कंपनीतील बोल्ड लाईनवर स्प्रे काम करत असताना शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला. त्यात या लाईनवर काम करणारे चार कामगार भाजल्याने जखमी झाले.
मुक्ताराम किसन धनाड ( वय ३५ रा. संभाजी कॉलनी गणपती मंदीर समोर सिडको एन-सहा औरंगाबाद), धारमसींग रावत (वय ३२), दिनेश कांबळे ( वय १८ ), अमोल भालेराव ( वय १९ सर्वजण रा. जोगेश्वरी ता. गंगापूर) हे जखमी झाले. त्यात मुक्ताराम धनाड हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाळूज औद्योगिक परिसरात सर्व उद्योजक व कामगारांनी मिळून काही दिवसांपूर्वीच सुरक्षा पंधरवाडा साजरा केला होता. या घटनेला काही दिवस झालेले असतांना हा प्रकार घडल्याने कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवचैतन्य सोहळा दिमाखात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात शनिवारी तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाहनफेरी, मिरवणूक, देखावे आणि घोषवाक्यांनी परिसर
दुमदुमून गेला. सकाळी अकराच्या सुमारास क्रांतिचौकातून वाहन फेरीला सुरुवात झाली. शिवरायांचा पुतळा परिसर पुष्पमाळांनी व फुलांनी सजवण्यात आला होता. विद्युतरोषणाई करण्यात आली होती. पालकमंत्री रामदास कदम यांनी वाहनफेरीचा शुभारंभ केला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर त्र्यंबक तुपे, महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख राजू वैद्य, संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, बंडू ओक, माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वाहनफेरीचे नेतृत्व रामदास कदम यांनी केले. क्रांतिचौकातून निघालेली वाहनफेरी मोंढानाका, सिडको बसस्टँड चौक, जळगाव रस्ता, टीव्ही सेंटर चौक मार्गे शहरात आली. वाहन फेरीमध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांही सहभागी झाल्या. सायंकाळी पाचच्या सुमारास संस्थान गणपतीपासून मिरवणूक काढण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे, शहरप्रमुख राजू वैद्य, भाजप शहराध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, माजी महापौर डॉ. अतुल सावे, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थान गणपतीपासून सुरू झालेली मिरवणूक शहागंज, सराफा, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट मार्गे क्रांतिचौकात आली. राष्ट्र क्रांतीसंघाची सुमारे दहा वाहने मिरवणुकीत सहभागी झाली होती. प्रत्येक वाहनावर वैशिष्ट्यपूर्ण घोषवाक्य लिहिलेली पोस्टर्स लावण्यात आली होती. त्यात पाणीटंचाई, पाण्याची बचत, संयुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्यांची आत्महत्या, राष्ट्रीय एकात्मता आदी विषयांचा समावेश होता. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी व्यासपीठ उभे करून मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लक्षवेधी देखावे
मिरवणुकीत सजीव देखाव्यांचे आकर्षण होते. शिवसेनेच्या महिला आघाडीने सोन्याचा नांगर चालवणारे शिवबा हा सजीव देखावा तयार केला होता. त्याशिवाय शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचाही सजीव देखावा लक्ष वेधणारा ठरला. नगरसेविका स्मिता घोगरे यांच्यावतीने शिवरायांना तुळजाभवानी तलवार भेट देत असल्याचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोशल मी‌डियावर व्यक्त होताना भान बाळगा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'सोशल मीडिया वर्तमानकाळातील प्रभावी माध्यम असले तरी ते दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर करताना तारतम्य, विवेक महत्त्वाचा आहे. आपण काय संदेश पाठवतो याचे भान आणि परिणामांची जाणीव आपल्याला असावी,' असा सूर शिवा सोशल मीडिया कार्यकर्ता प्रबोधन शिबिरातील सहभागी मान्यवरांनी शनिवारी काढला.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक धनंजय लांबे, अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार, शिवा सोशल मीडियाचे प्रमुख नारायण कंकनवाडी, तंत्रज्ञ डॉ. वाय. बी. सोनटक्के, ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथअप्पा वाडकर, देवगिरीचे उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, धन्यकुमार शिवणकर, उमाकांत शेटे, मनिष पंधाडे, रुपेश होनराव, नंदकुमार गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी अभय कल्लावार म्हणाले, 'सोशल मीडियाबाबतची साक्षरता येणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेत हे शिबिर घेण्यात आले आणि अशाप्रकारचे शिबिर घेणारी ही पहिली संघटना आहे. वीरशैव समाजातील स्वाभिमान जागविण्याचे काम ‌शिवा संघटनेने केले. संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन या त्रिसूत्रीवर संघटनेची वाटचाल सुरू आहे. ही वाटचाल समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल.' प्रा. धोंडे यावेळी म्हणाले, 'वर्तमान काळातील महत्त्वाचे माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. जगाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन स्वीकारत आपला कार्यकर्ता जगाच्या सोबत चालला पाहिजे, या हेतूने शिबिराचे आयोजन केले आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर, अॅप्सचा कसा वापर करायचा, त्यांच्या तांत्रिकबाबी याबाबत दोनशेजणांना प्रशिक्षण देण्यात येईल. व्हॉट्स अॅप, फेसबुकच्या माध्यमातून दोन लाख समाजबांधवांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जो संदेश देतो आहोत, त्याचे परिणाम काय होतील याची जाणीव आपल्याला असायला हवी. सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांवर चिखलफेक होणार नाही, अंधश्रद्धा पसरेल असे काही होता कामा नये. त्यावर अष्टप्रधान मंडळाचे नियंत्रण असेल,' असे ते म्हणाले. नारायण कंकनवाडी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी गायक प्रा. सोमनाथ किडिले यांनी गीते सादर केली. रुपेश होनराव यांनी सूत्रसंचालन केले. दोन दिवसांच्या शिबिरात विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...शिंपी तितुका मेळवावा!

$
0
0


Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
औरंगाबाद: मेरू शिंपी समाज मूळचा आंध्र प्रदेशातला. राजे-महाराजांच्या काळात हा समाज महाराष्ट्रात आला आणि नंतर येथेच स्थायिक झाला. राजे-महाराज, सरदारांचे कपडे शिवण्याचे काम करीत असल्याने शिंपी समाजाला मानाचे स्थान होते. शिवणकाम व्यवसायात अन्य समाजातील व्यावसायिक आल्यानंतर शिंपी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाची पिछेहाट सुरू झाली. एकेकाळी आर्थिक संपन्न असलेला हा समाज आज आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे. तसेच हा समाज विखुरलेला असल्याने समाजाला एकत्र आणणे हेच प्रमुख आव्हान मेरू शिंपी समाज संघटनेसमोर आहे.
शिंपी समाज हा मूळचा क्षत्रिय समाज. काही क्षत्रिय समाजाने आपल्या लढाऊ वृत्तीचा त्याग केला आणि कपडे शिवण्याचा व्यवसाय स्वीकारला. तेव्हापासून आजतागायत कपडे शिवणे हाच या समाजाचा व्यवसाय आहे. पूर्वजांच्या व्यवसायामुळे हा समाज शिंपी म्हणूनच ओळखला जातो. शिंपी समाजात भावसार शिंपी, अहिर शिंपी, कोकणी शिंपी आणि नामदेव शिंपी असे भेद होते. या पोटजातीत रोटीबेटी व्यवहार व्यर्ज होता. मात्र, आता हे पोटभेद फारच कमी झाले आहेत. शिंपी समाजाची वस्ती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आढळते. मराठवाड्यातही शिंपी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. तो या भागात मेरू शिंपी नावाने ओळखला जातो. हा मेरू शिंपी समाज आंध्र प्रदेशातून राजे-महाराज्यांच्या काळात महाराष्ट्रात आला आणि नंतर येथेच स्थायिक झाला. मेरू शिंपी समाजाने महाराष्ट्रालाच आपले मानले आणि येथील भाषा, संस्कार स्वीकारले.
आज शिंपी समाज सर्वत्र विखुरलेला आहे. वस्त्र, उद्योगाची मुख्य सूत्रे दुसऱ्या समाजाच्या हातात आहेत. हा बदल प्रामुख्याने इंग्रजी राजवटीनंतर झाला. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व पेशवाईच्या काळात राजे, सरदार आणि इतर धनिकवर्गाशी या समाजाचे चांगले संबंध होते. त्यांचे कपडे शिवणे हा मुख्य व्यवसाय होता. त्याकाळी शिंपी समाज हा आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होता. आपत्तीच्या काळात कर्ज देण्यातही या समाजाचा मोठा वाटा होता. काळ बदलत गेला आणि शिंपी समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत सापडला. रेडिमेड कपड्यांचा काळ सुरू झाला आणि शिंपी समाजाच्या व्यवसायाची घसरण सुरू झाली. अन्य समाजातील व्यावसायिकही या क्षेत्रात उतरले. या स्पर्धेत शिंपी समाजाचा टिकाव लागू शकला नाही. त्यामुळे एकेकाळी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या समाजासमोर आर्थिक पेच निर्माण झाला. शिंपी व्यवसायात प्रामुख्याने पुरुषांची मक्तेदारी असली तरी महिलाही यात हिरारीने सहभाग घेतात. हाताने शिवण, टिपण काम परंपरेने महिला करतात. मेरू शिंपी समाजात महिलेलाही बरोबरीचा मान देण्याची प्रथा आहे. शिवणकाम व्यवसायाला चांगले दिवस न राहिल्याने या समाजातील ज्येष्ठांनी आपल्या युवा पिढीला शिक्षणासाठी प्रेरित केले. पूर्वी मुला-मुलींचा शिक्षणाकडे फारसा कल नव्हता. आजच्या काळात शिक्षण क्षेत्रातही या समाजातील युवा पिढी अग्रेसर होत आहे. शिक्षण क्षेत्रातील ही प्रगती शहरी भागातच दिसून येते. आजही ग्रामीण भागात हा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, असे मेरू शिंपी समाज संघटनेचे अध्यक्ष अनंत रापतवार यांनी सांगितले. युवा पिढीचा कल शिक्षणाकडे अधिक वाढल्याने त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विवाह जुळवण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून होते. औरंगाबादेत येत्या काही महिन्यात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा मानस असल्याचे रापतवार यांनी सांगितले. गारखेडा परिसरात मेरू शिंपी समाजाचे एक सभागृह असून ते अर्धवट स्थितीत आहे. या सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यात सुविधा निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मेरू शिंपी समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात आहे. आत्तापर्यंत कोणताही फायदा समाजाला झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
हेल्पलाइन
मेरू शिंपी समाज संघटनेची दर महिन्याला दुसऱ्या रविवारी बैठक घेण्यात येते. समाजातील गरजूंना वेळेवर मदत करण्याच्यादृष्टीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून अडचणीच्या काळात मदत केली जाते. तसेच एसएमएस सेवाही संघटनेच्या माध्यमातून राबवली जाते, असे रापतवार यांनी सांगितले.
मेरू शिंपी समाजाची औरंगाबाद कार्यकारिणीः अध्यक्ष अनंत रापतवार, उपाध्यक्ष सुभाष पोलकम, सुभाष पल्लेवार, सचिव विजय दरबस्तवार, सहसचिव सचिन तुगींनवार, अरविंद दरबस्तवार, कोषाध्यक्ष विजय पेंडलवाड. सदस्य - विद्यासागर संगेवार, अनिल संगेवार, सुधाकर यन्नावार, गोविंद रामगिरवार, रत्नाकर रापतवार,
गंगाधर टोफरवार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी व्हावी:रामदास कदम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'शिवजयंती दोन तारखांना साजरी होणे चुकीचे आहे. आता राज्यात युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे यापुढे शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी झाली पाहिजे, असा प्रस्ताव आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणार आहोत,' अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवजयंतीच्या निमित्ताने रामदास कदम शहरात आले होते. शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या वाहनफेरीचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. ते म्हणाले, 'शिवजयंतीची एकच तारीख आणि तीही फाल्गुन कृष्ण तृतियाच असली पाहिजे. या संदर्भात पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडावा व मंत्रिमंडळानेही त्याबद्दल निर्णय घ्यावा. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. औरंगाबाद विमानतळाला राजे संभाजी भोसले विमानतळ असे नाव देण्याचा ठराव महापालिकेत झाला आहे. त्याचीही अंमलबजावणी शासनस्तरावर झाली पाहिजे.' खैरेंच्या विधानांचा सदर्भ देत पत्रकारांनी रामदास कदम यांना विचारले असता ते म्हणाले, 'शिवजयंती तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल. शिवजयंती देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी केली जाते, असे असताना त्यावेळच्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शिवजयंतीची तारीख ठरवताना शिवसेनेला विश्वासात घेतले असते, तर योग्य मार्ग निघाला असता.' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कार्यक्रमाच्या निमित्याने अमेरिकेत बोलावून त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना होती असे हेडलीने त्याच्या जबानीत सांगितले. या बद्दल कदम म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते. ते देशद्रोह्यांच्या विरोधात होते. त्यावेळी पाकिस्तान फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच घाबरत होता. पाकिस्तानने बाळासाहेब ठाकरे यांना अमेरिकेत नेऊन मारण्याचा डाव आखला होता. हे आता हेडलीच्या जबानीतून स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या त्या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो.'
८५ क्विंटल मका लावणार
कदम म्हणाले, 'जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर होणार आहे ही बाब लक्षात घेऊन विविध जलाशयांच्या बॅकवॉटर पट्ट्यात सुमारे ११०० हेक्टर क्षेत्रात ८५ क्विंटल मक्याची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी ३९ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मक्यामुळे जनावरांना हिरवा चारा मिळेल व पुढच्या दोन महिन्याचा प्रश्न संपेल. मुख्यमंत्र्यांनी मका लागवड योजनेची स्तुती केली असून, मराठवाड्यातील सर्व पालकमंत्र्यांनी या योजनेचे अनुकरण करावे अशी सूचना केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी सावे नको; जलील हवे!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'घाटीच्या अभ्यागत समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक आमदार असावा असा निकष आहे. तो पाळला जावा,' म्हणत पालकमंत्री रामदास कदम यांनी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची पाठराखण केली आणि आमदार अतुल सावे यांच्या निवडीला विरोध केला. 'या प्रकरणी लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून तक्रार करणार आहोत,' अशी भूमिका कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मांडली.
घाटीच्या अभ्यागत समितीच्या अध्यक्षपदी भाजप आमदार अतुल सावे यांची निवड केली आहे, परंतु निवडीसाठी स्थानिक आमदारांच्या नियुक्तीचा निकष आहे. त्यात सावे बाहेरचे आहेत, असे म्हणत कदम यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर आमदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता ते या पदासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी घाटी रुग्णालयाच्या अभ्यागत समितीवर प्रथम खासदार चंद्रकांत खैरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती रद्द करून अतुल सावे यांची नियुक्ती करण्यात आलीे. या संदर्भात पालकमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'अभ्यागत समितीचा अध्यक्ष हा स्थानिक आमदार असला पाहिजे. खैरे यांना अध्यक्षकरून आमच्याकडून अनावधानाने चूक झाली. खैरे तर देशभरातील प्रमुख सहा समितींचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा काही प्रश्न नाही. घाटीच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष म्हणून स्थानिक आमदारांना का नियुक्त करण्यात आले नाही, याबद्दल विनोद तावडे यांची भेट घेऊन आपण प्रश्न विचारणार आहोत. राज्यातील इतर जिल्ह्यांना एक न्याय आणि औरंगाबाद जिल्ह्याला वेगळा न्याय कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.' पत्रकार परिषदेला अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ आदी उपस्थित होते.
अन् सावे ठरले बाहेरचे!
भाजप आमदार अतुल सावे हे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे औरंगाबाद मध्य मतदार संघातून निवडून आले आहेत. घाटी रुग्णालयाच्या बाबतीत ते स्थानिक आमदार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमरीतुमरीचे वादळ घोंगावले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी गेल्या आठवड्यात जालना येथे स्वतंत्र मराठवाड्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्याचे राज्यभर पडसाद उमटले. या विषयावर भूमिका मांडण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शहर समितीने शनिवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीसाठी विविध पक्ष, संघटना, विचारसरणींचा पुरस्कार करणारे प्रतिनिधी उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने भूमिका मांडलेल्यांना स्वतंत्र मराठवाड्याच्या बाजूने असणाऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविला. तीन तासांच्या बैठकीत अनेकवेळा वादाचे प्रसंग उद्भवले.
स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात बैठक झाली. प्राचार्य शरद अदवंत अध्यक्षस्थानी होते. समीर राजूरकर यांनी भूमिका मांडली. संयोजक सारंग टाकळकर यांनी बैठकीची स्पष्ट केली. उपस्थितांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात समोर येऊन स्वतंत्र मराठवाडा या विषयावर भूमिका मांडावी असे आवाहन करण्यात आले. प्रा. विजय दिवाण म्हणाले, 'नागपूर करारानुसार विदर्भ व मराठवाडा महाराष्ट्रात आले. वैधानिक विकास मंडळांची स्थापना करून अनुशेष दूर करण्याची पावले उचलली. मंडळाच्या शिफारशींना वेळोवेळी केराची टोपली दाखविली गेली. त्यावेळी स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांनी आवाज का उठविला नाही ? स्वतंत्र राज्य झाले तर गल्लीबोळातील नेत्यांचे फावेल. मुळात आपली संघर्षाची तयारी झाली नाही, त्याग नाही, मराठवाड्याची परिस्थिती सध्या बिकट आहे. दुष्काळामुळे स्थलांतर वाढले आहे, हाताला काम नाही, पिण्याला पाणी नाही. यावर संघटित होऊन उपाय शोधले पाहिजे. वेगळ्या राज्याचे पिल्लू सोडले आहे. हा राष्ट्रद्रोह आहे. '
प्रदीप पुरंदरे म्हणाले, 'विदर्भाचे राज्य होऊ घातले आहे. हे समीकरण मराठवाड्यासाठी घातक आहे. उद्या मुंबई वेगळी झाली तर आपल्याला महसूल मिळणार नाही. पाण्यामुळे ग्रामीण भागात सत्तास्थाने निर्माण झाली. आज राज्यपालांचेही सरकार ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. ज्या आधारे लढायचे ती व्यवस्था कमकुवत आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेले स्त्रोत पाहता परिस्थिती फार वाईट नाही. पाणी आहे. सुशासन, योग्य प्रशासन व्यवस्था राबविल्यास पाणीप्रश्न सुटू शकेल. नवीन राज्य झाले तर त्याचे अनेक पैलू समोर येतील. सबब दोन्ही बाजूंचा विचार झाला पाहिजे. राष्ट्रद्रोह मान्य नाही. मात्र, या विषयावर अभ्यासगट निर्माण झाला पाहिजे.'
निशिकांत भालेराव म्हणाले, 'श्रीहरी अणेंना धन्यवाद. त्यांच्यामुळे हा विषय सुरू झाला. प्रदीप देशमुख मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करावी, ही लाजिरवाणी बाब आहे. त्यांनी द्रोह केला आहे. प्रदीप देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे.'
सुभाष लोमटे म्हणाले, 'मराठवाडा जनता विकास परिषदेची सुरुवात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी केली. त्यांची भूमिका संयुक्त महाराष्ट्राची होती. प्रदीप देशमुख आधीपासून स्वतंत्र मराठवाड्याची भूमिका मांडत आहेत. तरी सुद्धा ते कसे काय अध्यक्ष झाले ? हे कोडे आहे. कुठल्यातरी लाटेवरती आपला प्रश्न खुंटला आहे. छोट्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे हे तपासले पाहिजे. जनता विकास परिषदेचा अध्यक्ष वेगळ्या भूमिकेचा कसा ? दोन्ही बाजूंनी राजकारण होत आहे.'
मिर्झा अब्दुल कय्यूम नक्वी म्हणाले, 'मराठवाड्याने चार मुख्यमंत्री देऊनही काहीच विकास झाला नाही. स्वतंत्र मराठवाड्यासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे. विकासासाठी एकत्र आले पाहिजे.' जगदीश भावठाणकर यांनी आंध्रप्रदेशच्या विभाजनाचा दाखला देऊन भूमिका स्पष्ट केली. 'एकत्र येऊन भांडून ओनरशीप विकसित केली पाहिजे,' असे ते म्हणाले. ताराबाई लड्डा, अॅड. लक्ष्मण पाटील, ओमप्रकाश वर्मा, प्रवीण जाधव, कैलास तवार, भीमसेन कांबळे, एन. एम. दराडे,प्रा. चंद्रकांत भराट, प्रमोद माने आदींनी भूमिका मांडली. सारंग टाकळकर यांनी परिषदेच्या शहर समितीची भूमिका अखेरीस मांडली.
आम्हाला बोलू देणार की नाही ?
बैठकीमध्ये मुद्दे मांडणे सुरू झाल्यनंतर काही वक्त्यांच्या भाषणानंतर एकजण उभे राहिले आणि तुम्ही फक्त समाजवादी मंडळींनाच बोलू देणार आहात काय ? आम्हाला बोलू देणार की नाही असा सवाल उपस्थित केला. त्यावर संयोजकांनी सर्वांना भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल. इथे कोणत्याही पक्षाला तसेच विशिष्ट विचारसरणीला विरोध वा समर्थन नाही, आमची भूमिका मराठवाडा विकासाची असल्याचे स्पष्ट केले. बैठकीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह काही पदाधिकारी आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images