Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शुल्करचनेसाठी कमिटी; विद्यापरिषदेत निर्णय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विविध अभ्यासक्रमांसाठी कॉलेज आणि‌ विद्यापीठ स्तरावर शुल्क आकारणीत समानता यावी या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी विद्यापीठात झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठ व विविध कॉलेजांमध्ये अभ्यासक्रमांच्या शुल्करचेनेत समानता नाही. अनेक कॉलेजांनी शुल्कवाढ करण्याची मागणी केली होती. यावर अखेर समिती स्थापन करत शुल्करचना निश्चित करण्याबाबत एकमत झाले. विद्यापीठ विभागांसाठी स्वतंत्र तर कॉलेजांसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. बीबीए, बीसीए, बीएस्सी आयटीसारख्या अभ्यासक्रमांची वाढविलेले शुल्क जुन्यापद्धतीने आकरण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. एमसीए पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पहिल्या सत्रातील एलिमेंट ऑफ इंटरनॅशनल वेब डिझाइन पेपर-१ ऑनलाइन घेण्यात येणार होता. मात्र, या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.
दोन वर्षाचे बीएड, एमएड
एनसीटीई शैक्षणिक वर्ष २०१५-१६ वर्षापासून बीएड, एमएड अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचा केला. याला अखेर विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने मान्यता दिली. बदलेल्या अभ्यासक्रमाला वर्ष पूर्ण होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, त्यानंतर परिषदेत हा विषय आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


११५ कोऱ्या उत्तरपत्रिका, १६ बनावट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. पोलिसांनी मारलेल्या धाडीत ११५च कोऱ्या उत्तरपत्रिका, तर १६ बनावट उत्तरपत्रिका सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. नेमके सत्य काय, याबाबत पोलिस आणि मंडळ प्रशासनातही ताळमेळ नाही.
जालन्यातील संस्कार निवासी वसतिगृहात बारावीच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन, तपासणी करून अदलाबदली करण्यात येत असल्याचे रॅकेट उघड झाले आहे. घटनास्थळी नेमक्या किती कोऱ्या उत्तरपत्रिका मिळाल्या याची नेमकी माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यूआयडीची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, पुढील प्रक्रिया रखडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरपत्रिका तपासणीसाठी मंडळाचे जे कर्मचारी गेले होते, त्यांनी २ हजार ८०० उत्तरपत्रिका तपासल्या. यात ११५च कोऱ्या उत्तरपत्रिका आढळल्याचे बोलले जात आहे. यासह १६ बनावट उत्तरपत्रिका आहेत. आक्षेपार्ह उत्तरपत्रिकांची संख्या साडेचारशे आहे. त्यात मंडळाने शनिवारी पोलिसांना पत्र पाठवित आम्हाला उत्तरपत्रिकांची अपडेट द्या, अशी मागणी केली आहे.
साठ लाखांची उलाढाल
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रॅकेटमधील सहभागी आरोपी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एका विषयात पास होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये घ्यायचे. पोलिसांनी मारलेल्या धाडीमध्ये सापडलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या २ हजार ८०० एवढी आहे. त्यातील ४५० उत्तरपत्रिका आक्षेपार्ह आढळल्या आहेत. याचा हिशेब मांडला तर साठलाखांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार झाला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फारोळ्यात टॅँकर भरणा केंद्र पाडले बंद

$
0
0


पैठण/औरंगाबाद : पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी आक्रमक होत शनिवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरील टॅँकर भरणा केंद्र बंद पाडले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे निर्धारित वेळेपेक्षा फारोळा टॅँकर भरणा केंद्र कमी वेळ सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे अनेक गावांना टॅँकरच्या खेपा मंजूर असूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले.
सध्या तालुक्यातील १२४ गावांना १४७ टँकरच्या साहाय्याने २९२ खेपा पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू आहे. मुधलवाडी टँकर भरणा केंद्रावरून ७९ गावांना १०१ टँकरच्या १९७ खेपा व महापालिकेच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरून ४४ गावांना ४५ टँकरच्या ९४ खेपा पूर्ण करून पाणीपुरवठा करण्यात येतो. टँकर भरणा केंद्रावर एक टँकर भरण्यास जवळपास २० मिनिटे लागतात. अशा प्रकारे फारोळा टँकर भरणा केंद्रावरून ९४ टँकर भरण्यासाठी साधारणतः २० तास लागतात. मात्र, कंपनीचे कर्मचारी फारोळा टँकर भरणा केंद्र केवळ १२ तास सुरू ठेवतात. परिणामी, टँकरच्या खेपा मंजूर असतानाही केवळ फारोळा टँकर भरणा केंद्र पुरेसा वेळ सुरू राहत नसल्याने तालुक्यातील ४४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे सोमपुरी, नांदलगाव, पांगरा, कारकीन, फारोळा, चितेगाव, पैठण खेडा, रांजणगाव खुरी, जांभळी, बन्नीतांडा, नरसिंग तांडा या गावातील गावकऱ्यांनी शनिवारी दुपारी फारोळा टँकर भरणा केंद्रावर पोहचून प्रचंड घोषणाबाजी करत हे भरणा केंद्र बंद पाडले. जवळपास दोन तास घोषणाबाजी आणि आंदोलन सुरू होते. यावेळी गावकऱ्यांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी एकही अधिकारी केंद्रावर उपस्थित नव्हता.
-
फारोळा पंचक्रोशीतील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा म्हणून फारोळा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान व्यवस्था करून दिली आहे. याच दरम्यान त्यांनी टँकर भरून नेणे अपेक्षित आहे, पण कंपनीनेच टँकर भरून द्यावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. वास्तविक पाहता त्यांना परस्पर टँकर भरून नेण्याची व्यवस्था कंपनीने करून दिली आहे. ग्रामस्थांनी टँकर भरणा केंद्र बंद पाडले असले तरी त्याचा औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर काही परिणाम होणार नाही.
-राहुल मोतीयळे, जनसंपर्क अधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारीपणामुळे तिघांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

परंडा तालुक्यातील दुधी येथील एकाच कुटूंबातील तीन जणांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. घारगाव शिवरातील एका विहिरीत शेतकऱ्यासह पत्नी व नऊ महिन्याच्या मुलीचे मृतदेह आढळून आले. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी तिघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले.

जयहिंद महादेव लिमकर (वय ३५) कल्पना जयहिंद लिमकर (वय २५) राधा महादेव लिमकर (वय ९, सर्वजण रा. दुधी, ता. परंडा) असे मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत.

शनिवारी सकाळी एका शेळ्या राखणाऱ्याला राजुरी शिवारातील घारगाव येथील शेतकरी विक्रम माळी यांच्या शेतातील विहिरीत तीन जणांचे मृतदेह आढळले. त्याने या प्रकाराची माहिती शेतकरी माळी यांनी दिली. माळी यांनी हा प्रकार पोलिसांना कळवले. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील मृतदेह क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. दुधी येथील जयहिंद लिमकर यांनी पत्नी व नऊ महिन्याच्या मुलीसह आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

प्राथमिक अंदाजानुसार तीन जणांनी रोगर पिऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी औषधाची बाटली व सायकल सापडली आहे.
दरम्यान, जयहिंद लिमकर व त्यांच्या तीन भावात मिळून साडे तीन एकर शेती आहे. गेल्या चार वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे घरातील कर्ता असलेला जयहिंद हैराण झाला होता. त्यासोबतच खासगी सावकाराकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. जयहिंद व त्याची पत्नी कल्पना मिळेल ते मोलमजुरीचे काम करून कुटूंबाचा गाडा चालवित होते. यातून काही मार्ग निघत नसल्याने नैराश्याच्या भावनेतून जयह‌िंदने पत्नी व मुलीसह शनिवारी पहाटे आत्महत्या केली, असे त्याचे नातेवाईकांचे म्हणने आहे.
यावेळी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी टिपरे, पोलिस निरीक्षक डंबाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एम. साबळे, कर्मचारी चौधरी, जगताप यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात दोन टक्के पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
दुष्काळाच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाळयात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटीला जिल्ह्यात केवळ पावणे दोन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढचे दोन महिने काढायचे कसे हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. येत्या काळात टँकरच्या संख्येत वाढ होणार आहे.
बीड जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलीमीटर आहे. यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. बीड जिल्ह्यात केवळ ३३० मिलीमीटर म्हणजेच ४९ टक्के पाऊस झाला. पावसाळ्याच्या चार महिन्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात टंचाईचे संकट जाणवणार आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे बिंदुसरा, मांजरा यासारखे अनेक सिंचन तलाव पावसाळ्यानंतरच कोरडे पडले आहेत. जिल्ह्यात एकूण मोठे दोन, मध्यम १६ आणि लघू १२४ असे एकूण १४२ सिंचन प्रकल्प आहेत. त्या सर्व सिंचन प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ८८३.१३ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. बीड जिल्ह्यातील तलावात केवळ पावणे दोन टक्के म्हणजेच १५ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. त्यामुळे बीड शहराला आठ दिवसातून, अंबाजोगाई शहरात वीस दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.
ग्रामीण भागात तर पाणी पातळी खलवल्याने पाणी आणायचे कोठून हा प्रश्न प्रशासनास सतावतो आहे.उन्हाळयाची सुरुवात झाल्याने आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एप्रिल, मे आणि निम्मा जून महिना संपेपर्यंत टंचाई तीव्र होऊन टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. या काळात तब्बल आठशे टँकर व त्याच्या प्रत्येकी तीन फेऱ्या अशा एकूण २४०० दररोज फेऱ्या करून टंचाई निवारण करावी लागणार आहे.

प्रशासनाला करावी लागतेय कसरत
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे संकट आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागाचे नियोजन करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागत आहे. पाणी असलेल्या वि‌हिर व बोअरर्च पूनर्भरण करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. अत्यल्प पाणी साठा शिल्लक असल्याने येणारा काळ सत्वपरीक्षा पाहणारा आहे.
.......................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
किरकोळ वादातून खडी क्रशरवर काम करणाऱ्या पतीने पट्ट्याने गळा आवळून पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने परिसरात असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बीड येथील नाळवंडी गावाजवळ सोमवारी घडली. विशेष म्हणजे हे जोडपे परराज्यातील आहे.
बीड शहरापासून जवळ असलेल्या नाळवंडी नाका परिसरात असलेल्या राजकमल स्टोन क्रशर मध्ये गेल्या दोन वर्षांपासून मध्य प्रदेशातील मजूर कामावर होते. मध्य प्रदेशातील झाबुवा येथील कानू भुरिया (वय २५ )अनिता कानू भुरिया (वय २० ) हे जोडपे मजूर म्हणून कामा करत होते. या जोडप्यात गेल्या काही दिवसांपासून छोट्या-मोठ्या कारणावरून वाद होत होते. रविवारी रात्री या जोडप्यात वाद झाला. त्यावरून पती कानू भुरिया याने पत्नी अनिता भुरिया हिचा चामड्याच्या पट्ट्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर कानूने खडी क्रशर केंद्राजवळ असलेल्या लिंबाच्या झाडला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.
सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर मजुरांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण, गंगापू, वैजापूर तालुक्यांत गंभीर टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अधून मधून अवकाळी पावसाचा शिडकावा होत असला तरी, जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यात पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत ४३४ गावांमधील तब्बल ८ लाख ७३ हजार नागरिकांची तहान टँकरने भागवली जात आहे.
जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, सततच्या दुष्काळामुळे होरपळलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मार्चमध्ये जिल्ह्यातील ८ लाख ७३ हजार नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ४३४ गावे व ११ वाड्यांना ५७२ टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात १४१, वैजापूर १४२ तर, गंगापूर तालुक्यात सर्वाधिक १५५ टँकर सुरू आहेत. सोयगाव वगळता इतर सर्व तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
प्रशासनाकडून ३९७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात २८, फुलंब्री २९, पैठण ४, गंगापूर ९१, वैजापूर ११५, खुलताबाद २०, कन्नड ४७, सिल्लोड ५६, सोयगाव तालुक्यात ७ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तालुकानिहाय टँकर पुढीलप्रमाणेः औरंगाबाद ५५, फुलंब्री २०, पैठण १४१, गंगापूर १५५, वैजापूर १२, खुलताबाद १२, कन्नड १६, सिल्लोड २९, सोयगाव २.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी मिरवणुकीने नाथषष्ठी उत्सव सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाथषष्ठी निमित्त औरंगपुरा येथील नाथ मंदिरातून मंगळवारी पादुकांची पालखी काढण्यात आली. नाथांच्या पादुकांचा दुपारी १२ ते २ महाभिषेकही करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष बापुराव वाळके यांनी सपत्निक अभिषेक केला. दुपारी २ ते ५ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी ४ ते ८ हभप उमेश दासरथे (आळंदी) यांचे कीर्तन झाले. गुरुवारी कालाष्टमीला काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होणार आहे.
नाथषष्ठीचा उत्सव हा शहरातील महत्वाचा उत्सव आहे. यानिमित्त मंगळवारी औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, सिटीचौक, सराफा, संस्थान गणपती मार्गे जाऊन पालखी संत एकनाथ मंदिरात आली. पालखीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. पालखीचे ठिकठिकाणी पुष्ववृष्टी करून स्वागत करण्यात आले. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी, सडा घालून गृहिणींनी पालखींचे औक्षण केले. बुधवारी बीड येथील हभप डोंगरे महाराज आणि गुरुवारी हभप अनिल पाटील महाराज (बार्शी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. हे कीर्तन संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत होईल, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष वाळके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताराः नाल्‍याच्‍या दुर्गंधीने नागरिक त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
बीड बायपासजवळील ज्ञानेश्‍वरनगर, पांडुरंगनगर ही सर्वसामान्‍य नागरिकांची (वॉर्ड क्र. ११४) साधारण १५ वर्षांपूर्वीची वसाहत आहे. येथे तीनशेच्‍या आसपास घरे असून, खासगी व सरकारी नोकरदार मोठ्या प्रमाणात राहतात. ज्ञानेश्‍वरनगरच्‍या बाजूने जाणारा नाला तुंबल्‍यामुळे नाग‌रिकांना दुर्गधी व डासांचा सामना करावा लागत आहे. याही भागात पाण्‍याची समस्‍या गंभीर असून, मागील ६ वर्षांपासून जानेवारीनंतर बोअरचे पाणी आटत असल्‍यामुळे खासगी टँकरच्‍या पाण्‍यावरच अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यात ते दर वाढवत असल्‍यामुळे परवडत नाही. ग्रामपंचायत असताना नळयोजना झालेली आहे. परंतु, त्याद्वारे पाणी मात्र मिळत नाही.
नगराच्‍या मधून जाणारा सिमेटचा रस्ता झाला आहे. परंतु अंतर्गत रस्ते झालेले नाही. पावसाळ्यात अशा रस्त्यांवरून चालणे व गाडी चालवणे म्हणजे कसरतच करावी लागते. मागील तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्‍यामुळे फारसा त्रास झालेला नाही. उन्हाळ्यात ग्रामपंचायत, नगरपालिका असताना नियमित येणारे पाण्‍याचे टँकर महिनाभरापासून बंद झाले असून, पैसे देऊनही पाणी मिळत नाही. कचरा गाडीही बंद झाली असून, आधीच तुंबलेल्‍या नाल्‍याच्‍या शेजारी कचरा टाकत असल्‍यामुळे उकिरडा झाला आहे. आसपाच्‍या मोकळ्या जागेतही मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असतो. ड्रेनेजलाइनही अर्धवट झाली असून, चेंबरचे ढापे फुटण्‍याचे प्रकार नेहमीच होतात. ‌पथदिवेही कित्‍येक महिन्‍यांपासून बंदच आहेत. त्यामुळे चोरीच्‍या घटनांत वाढ झाली आहे. पोलिसांची नियमित गस्त झाल्‍यास त्याला आळा बसू शकतो. शहर बस सुरू झाल्‍यास विद्यार्थी, महिला व ज्येष्‍ठ नाग‌रिकांची सोय होईल.

पाण्‍याची गंभीर समस्‍या आहे. ग्रामपंचायत असताना नळयोजना झालेली आहे. परंतु, त्याला पाणी येत नाही. टँकरने पाणीपुरवठा झाला पाहिजे.
-सविता उंदरे

कचऱ्याची गाडी या भागात येतच नाही. त्यामुळे नाल्‍याच्‍या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात. तो उडून पुन्हा दारात येतो.
-द्वारका डकले

येथे असलेला ओपन स्‍पेस विकसित केल्‍यास मुलांना खेळण्‍याची जागा होईल. तसेच ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी बाकडे बसवावेत.
-आशा सनान्से

अंतर्गत रस्तेही चांगले करणे गरजेचे आहे. शिवाय मागील कित्‍येक महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत.
-कौसल्‍या साबळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात ४; देवळाईत १८ उमेदवार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका पोटनिवडणुकीच्या रिंगणात साताऱ्यातून ४ तर देवळाईतून १८ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. सातारा अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी, तर देवळाईचा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी सुटला आहे.
शिवसेनेने सातारा वॉर्डातून पल्लवी गायकवाड व देवळाई वॉर्डातून हरिभाऊ हिवाळे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन उमेदवारांसह सेनेने सातारा येथील खंडोबा मंदिरापासून मिरवणूक काढली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, गणेश चोपडे, सिद्धांत शिरसाट, राजेंद्र राठोड, जिल्हा परिषद सदस्य योगीता बाहुले, रमेश बाहुले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसने सातारा वॉर्डातून सायली जमादार यांना, तर देवळाईतून राजू नरवडे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्हीही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जितेंद्र देहाडे उपस्थित होते. भाजप तर्फे देवळाईतून अप्पासाहेब हिवाळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा वॉर्डातून मात्र भाजपने उमेदवार निश्चित केला नाही. राजश्री पल्लेवाड व सुरेखा बावस्कर या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. कुणाची उमेदवारी कायम ठेवायची याचा निर्णय बुधवारी छाननीच्या वेळी घेतला जाणार आहे. या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना तनवाणी यांच्यासह विनायक हिवाळे, नगरसेवक रामेश्वर भादवे, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारांची वॉर्ड निहाय नावे
देवळाई वॉर्ड क्रमांक ११४ - नामदेव बाजड (अपक्ष), हरी हिवाळे (शिवसेना), अप्पासाहेब हिवाळे (भाजप), शिवाजी हिवाळे (शिवसेना), शेख असलम हबीब (अपक्ष), मीनाक्षी देशपांडे ( काँग्रेस व अपक्ष), हरिभाऊ राठोड (अपक्ष), मृणालिनी लाटकर (काँग्रेस), कैलास पाटील (अपक्ष), इद्रीस शेख (अपक्ष), रवींद्र बनकर (अपक्ष), पार्वती मुंदडा (अपक्ष), राजू नरवडे (काँग्रेस), राजेंद्र कानडे (भाजप), पठाण अय्यूब जब्बारखाँ (भाजप), हेमा पाटील (काँग्रेस), शेख जियाउल्लाह शेख अकबर (अपक्ष). सातारा वॉर्ड क्रमांक ११५ - पल्लवी गायकवाड (शिवसेना), राजश्री पल्लेवाड (भाजप), सायली जमादार (काँग्रेस), सुरेखा बावस्कर (भाजप).
काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल
सातारा व देवळाई वॉर्डाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. वॉर्ड क्रमांक ११४ मधून राजू नरवडे तर वॉर्ड क्रमांक ११५ सायली जमादार यांना उमेदवारी देण्यात आली. आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, डॉ. जितेंद्र देहाडे, करीम पटेल, फेरोज पटेल, राजेश मुंडे, रोहन पवार, यशवंत कदम, राजेंद्र दाते पाटील , उस्मान पटेल, सरोज मसलगे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी देवळाईतच
सातारा-देवळाई महापालिका पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. देवळाई या खुल्या वॉर्डातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर नामदेव बाजड-पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे म्हणाले, 'मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आम्ही काँग्रेससमेवत आघाडी करण्यास उत्सुक होतो. मात्र, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्रपणेच निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. दोनऐवजी एकाच वॉर्डावर लक्ष्य केंद्रीत करून विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या बेरंग भिंतींची सफाई कामगारांकडून रंगरंगोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कसलाही गाजावाजा नाही. त्यांनी फक्त समाजसेवेचा वसा घेतला आणि महापालिकेच्या कित्येक बेरंग, पोपडे उडालेल्या भिंतीवर रंग पेरले. कम्युनिटी सेंटर, अग्निशमन कार्यालय आणि पालिकेच्या इतर कार्यालयाच्या भिंती रंगविण्यासाठी सफाई कामगारांनी घेतलेला पुढाकार बोलघेवड्या राजकारण्यांनाही लाजविणारा आहे.
पालिकेच्या ब वॉर्डांतर्गतच्या स्वच्छता निरीक्षकांकडे गुलमोहर कॉलनी, आविष्कार कॉलनी, एन सहा, कॅनॉट प्लेस, एन वन सिडको या परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी आहे. रवी किरण कुलकर्णी येथे स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. १७ सफाई कर्मचाऱ्यांसह बचत गटाच्या ८८ कर्मचाऱ्यांकडून या भागात साफसफाईची कामे केले जातात. यात बचत गटाच्या ३१ महिला, ५७ पुरुष आहेत. पंचशील महिला बचतगट, आदर्श, श्रद्धा आणि तक्षशील महिला बचतगटांना हे काम मिळाले आहे. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हे कर्मचारी सकाळी साडेपाच वाजता रस्त्यावर उतरतात. त्यांना पालिकेच्या अनेक कार्यालयाच्या भिंती बेरंग, पिचकाऱ्या मारलेल्या दिसल्या.
यामुळे कार्यालयाची 'शोभा' होते, हे त्यांना खटकले. तेव्हा एकाने उत्स्फूर्तपणे आपण या भिंती का रंगवू नयेत, असा प्रस्ताव मांडला. अवघ्या पाच दिवसांत त्यांनी कृती कार्यक्रम हाती घेतला. नगरसेवक शिवाजी दांडगे, स्वच्छता निरीक्षक कुलकर्णींसह अन्य अधिकाऱ्यांची परवानगी घेत कामास सुरुवात केली. चार ते पाच हजार रुपये वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी कुणी पन्नास तर कुणी शंभर रुपये अशी ऐपतीप्रमाणे वर्गणी जमा केली. त्यातून रंगरंगोटीचे साहित्य खरेदी केले. घामाच्या मेहनतीतून एन पाच सिडको येथील कम्युनिटी सेंटर, सेव्हन हिल येथील अग्निशमन दलाचे कार्यालय, एन येथील पाण्याची टाकी, एन वन पोलिस चौकी येथील पाणपोई या ठिकाणच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी केली. मनोज त्रिभुवन, सिद्धार्थ साळवे यांनी रंगरंगोटीचे काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच महिन्यांत २४४ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात यंदाही आत्महत्यांचा आकडा वेगाने वाढत आहे. सततची नापिकी व पावसाअभावी बिघडलेले अर्थचक्र व कर्जबाजारीपणा यामुळे मेटाकुटीस आलेल्या २४४ शेतकऱ्यांनी गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत जीवन संपवले.
गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यंदाही रब्बी हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. गेल्या अडीच महिन्यात झालेल्या २४४ आत्महत्यांपैकी समितीने ८८ प्रकरणांना पात्र, तर ५६ आत्महत्यांना अपात्र ठरवले असून १०० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रकार सर्वाधिक आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४१ तर, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी १५ प्रकरणांची नोंद सरकारी दप्तरात आहे. पेरणीवर हजारो रुपये खर्च करून खरीप व रब्बीचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून मोठी आशा होती, मात्र परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीचा पिकांवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळेही शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली आहे. यंदा उन्हाळा लांबला तर, आत्महत्यांच्या आकड्यात गेल्यावर्षीप्रमाणेच मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारी ते मार्च यादरम्यान पात्र असलेल्या सर्व ८८ प्रकरणांमध्ये मृतांच्या वारसांना मदत देण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या काही प्रकरणांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समितीला मिळाला नाही तर, काही शेतकऱ्यांच्या नावावर पीककर्ज नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. १ जानेवारी ते ७ मार्च २०१६ या कालावधीमधील जिल्हानिहाय आत्महत्या पुढीलप्रमाणेः औरंगाबाद ३८, जालना ३१, परभणी २२, हिंगोली १५, नांदेड ३४, बीड ४१, लातूर ३३, उस्मानाबाद ३०.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर म्हणाले, आधी कामाचे तास ठरवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतीच बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात आली आहे. मात्र ही प्रणाली लागू करण्याआधी कामाचे तास निश्चित करा, रात्रपाळी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफ द्या, आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरा, अशी भूमिका घेत, आमच्या अविरत सेवेचेही मूल्यमापन करून निर्णय घ्यावा, अशी भावना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट 'अ' संघटनेच्या (मॅग्मो) वतीने करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्यामुळेच मागील काही वर्षात अर्भक माता मृत्यूदर, जननदर हे बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. तसेच सर्पदंश, अपघात, स्वाईनफ्लू, बर्डफ्लू, इबोलासह न्यायवैद्यक प्रकरणे व इतर आपत्कालिन उपचारही अधिकारी-कर्मचारी जिवाची पर्वा न करता करतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आठ तासांपेक्षा अधिक तास काम करत असताना त्याचेही मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे. अपुरे मनुष्यबळ, रस्ते नसलेल्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी काम करताना कामाची, जेवणाची, झोपण्याची कुठलीही वेळ निश्चित नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे एक किंवा दोन, तर ग्रामीण रुग्णालयांचे तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काम चालते. किमान पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना अन्य कर्मचाऱ्याचीही वानवाच आहे. त्यामुळेच आमच्यावर २४ तास काम करण्याची वेळ येते. या कारणांमुळेच अनेक डॉक्टर, विशेषज्ञ आरोग्य खात्यामध्ये काम करण्यास इच्छुक नाहीत, असेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन आरोग्य उपसंचालक डॉ. आर. टी. चव्हाण व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांना देण्यात आले.
या वेळी संघटनेचे शहर अध्यक्ष डॉ. संदीपान काळे, शहर सचिव डॉ. महेश लड्डा, डॉ. प्रसन्ना भाले, डॉ. धीरज पाटील, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. रूपा हंबेकर, डॉ. दिलीप डांगे, डॉ. अनिता त्रिभुवन, डॉ. सोनखेडकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट नसेल तर निम्मी भरपाई

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मोटारसायकल चालकाने ट्रिपल सीट बसून हेल्मेट न घालता गाडी चालविली. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या नुकसानभरपाई मधील ५० टक्केच रक्कम मिळण्यास पात्र आहे, असा निकाल मोटार अपघात दावे प्राधिकरणाचे अध्यक्ष रा. वि. देशमुख यांनी दिला आहे.
मोटार वाहन अपघातामध्ये अर्जदार शामधन मेहताब ताटू यांना कायमस्वरुपी अपंगत्व आल्यामुळे १ लाख ५० हजार नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. २७ एप्रिल २०११ रोजी सकाळी ११.३० वाजता अर्जदार हे त्यांच्या मोटारसायकलवर मागे बसून सिल्लोडहून भोकरदनकडे जात होते. चत्तरसिंह महेर हे ती मोटारसायकल चालवित होते. ते शहा शाळेजवळ पोहोचताच टेम्पो समोरून चुकीच्या बाजूने भरधाव वेगात आला. त्याने मोटारसायकलला जोराची ठोस दिली. या अपघातात अर्जदार शामधन हे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व उजव्या हाताला जखम झाली. त्यांना तत्काळ सिल्लोडच्या सुमन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.अपघातापूर्वी अर्जदार मजुरी करत होते. त्यांना दरमहा ४ ते ५ हजार रुपये इतके उत्पन्न मिळत होते. या अपघातामुळे आलेल्या कायमस्वरुपी अपंगत्वामुळे त्यांना मजुरीचे काम करता येत नाही. त्यामुळे त्यांनी मोटार अपघात दावे प्राधिकरणात नुकसानीचा अर्ज दाखल केला. टेम्पोचालक सय्यद फिरोज सय्यद सत्तार, मालक प्रकाश निजमे व श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीविरोधात दावा दाखल केला. चालक व मालकांनी लेखी जबाब सादर केला नाही. हा अपघात टेम्पोचालक याच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणाने झालेला नाही. या अपघाताला मोटारसायकल चालक जबाबदार आहेत. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, म्हणून विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही, असा युक्तिवाद विमा कंपनीचे वकील विनायक उपाध्ये यांनी केला. हा अपघात टेम्पोचालक यांच्या हलगर्जीमुळे व निष्काळजीपणामुळे झालेला आहे, असे सर्व पुराव्यावरून सिद्ध होते. अपघातात झालेल्या जखमांमुळे ७ टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आलेले आहे. अर्जदाराचे मासिक उत्त्पन्न ४५०० रुपये धरण्यात आले. त्यांचे वार्षिक उत्त्पन्न ५४ हजार एवढे येते. त्यांच्या भविष्यातील उत्पन्नाची रक्कम ८ लाख १० हजार इतकी येते. अर्जदाराला ७ टक्के अपंगत्व आल्यामुळे ८ लाख १० हजार रकमेपैकी ७ टक्के म्हणजेच ५६ हजार ७०० रुपये इतकी भरपाई मिळावयास हवी. अर्जदाराच्या हॉस्पिटलचे बिल १५ हजार ८०० रुपये झाले. दु:ख व वेदना यासाठी १० हजार, आहार व वाहतूक खर्च यासाठी ५ हजार मिळावयास हवे आहेत. अशा प्रकारे अर्जदार ८७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळण्यास पात्र आहेत, असा युक्तिवाद अर्जदाराचे वकील वजीर पटेल यांनी केला.
निष्काळजीपणा भोवला
अर्जदार हे मोटारसायकलवर ट्रिपल सीट जात होते. तिघेही हेल्मेट न घालता प्रवास करीत होते. त्यामुळे त्यांचा ५० टक्के सहाय्यक निष्काळजीपणा धरण्यात यावा, असा युक्तिवाद विनायक उपाध्ये यांनी केला. या प्रकरणात अर्जदाराच्या डोक्याला मार लागला आहे. अर्जदाराने हेल्मेट घातले असते तर त्यांच्या डोक्याला मार लागला नसता. यात अर्जदाराचा ५० टक्के सहाय्यक निष्काळजीपणा धरण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदाराला नुकसान भरपाईच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ४३ हजार ७५९ रुपये इतकी नुकसानभरपाईस पात्र आहे. ही रक्कम मालक, चालक व विमा कंपनी यांनी द्यावी. या रकमेवर ९ टक्के व्याजदराने देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णकार फेडरेशने ‘सचखंड’ रोखली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारने सोने खरेदी-विक्रीवर लावलेल्या विक्रीकराविरोधात जिल्हा सुवर्णकार फेडरेशने मंगळवारी सचखंड एक्स्प्रेस रोखून रेल रोको आंदोलन केले. जवळपास पाचशे सुवर्णकार आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाची दखल न घेतल्यास सुवर्णकार मंत्री, लोकप्रतिनिधींना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. सुवर्णकारांचे आंदोलन गेल्या २८ दिवसांपासून सुरू आहे. जिल्ह्यातील कन्नड, लासूर, वाळूज; तसेच विविध भागातील सुवर्णकारांनी मंगळवारी रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीसमोर आंदोलनाला सुरुवात केली. रोल बॅक रोल बॅक एक्साइस डयुटी रोल बॅक, हमारी सबसे बडी भूल - कमल का फूल, नवस बोला देवाला अक्कल येऊ दया सरकारला अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी १० मिनिटे सचखंड एक्स्प्रेस रोखून धरली. रेल्वे रूळावरून या आंदोलकांना बाजूला करण्यात आले. मात्र, काही आंदोलक आक्रमक होत थेट रेल्वे रूळावर झोपले. त्यांच्याविरोधात रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजक व्हा... : रोजंदारी कामगार ते पाच कंपन्यांचा मालक

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgrop.com
भगवान राऊत यांच्या घरी अठराविश्व दारिद्र्य. वडील सारंगधर शेतकरी व सुतार काम करायचे. आई प्रयागबाई या गृहिणी. त्यांचे मूळ गाव शेवगाव तालुक्यातील घेवरी चांदगाव. येथील जमीन जायकवाडी धरणात गेली. सुतार कामातली मिळकतही जेमतेम. त्यामुळे १९६२-६३ मध्ये राऊत नेवासा तालुक्यातील बर्हिगाव येथे मामा गणपत मोरे यांच्याकडे स्थ‌ायिक झाले. तेथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर १९८३ मध्ये औरंगाबाद गाठले. १९८३ ते १९९४ पर्यंत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत चिकलठाण्यात स्वागत इंजिनीअरिंगमध्ये काम केले. पाच रुपये रोजंदारीने काम करताना आधी वयाची अट आडवी आली. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना पे रोलवर घेतले. ‌लेथ मशीन चालवण्यापासून ते अगदी हेल्परची सगळी कामे केली. मामांच्या ओळखीने ही नोकरी मिळालेली. अर्जुन गायके आणि छबूराव आगलावे यांचे हे स्वगत इंजीनिअरिंग युनिट होते. ते येथे रोज १८ ते २२ तास लेथ मशीनवर आपले हात झिजवायचे आणि डोळ्यात होते उद्योजक होण्याचे स्वप्न. स्वगतमध्ये लेथ मशीन कशी चालवायची, कसा उपयोग करायचा, डाय, डायनेट व इतर मोठमोठ्या कंपन्यांच्या मशिनरीला लागणारे स्पेअरपार्टस कसे करायचे हे त्यांनी शिकून घेतले. नोकरी करता-करता पैसा शिल्लक टाकला.

मार्गदर्शक माणसे, हितचिंतक भेटत गेले. तब्बल बारा वर्षांनी १९९२ मध्ये भगवान त्यांनी ६५ हजार रुपयांची लेथ मशीन घेतली. दहा हजार रुपये रोख आणि बाकीचे पैसे हफ्त्याने देत उद्योग सुरू केला. त्यानंतर फक्त दोन वर्षे नोकरी व व्यवसाय असे बरोबरीने काम सुरू ठेवले. चिकलठाण्यात भाड्याच्या तत्वावर जागा घेतली. लेथ मशीन बसवले आणि काम सुरू झाले. तब्बल चार महिन्यांत काम वाढले. दुसरे मशीन घ्यावी लागली. खूप ऑर्डर सुरू झाल्या. गरवारे, फोर्ब्सपासून मोठ्या कंपन्यांनी विचारणा सुरू केली. नोकरीतील ओळखीचा फायदा करत त्यांनी व्यवसाय वाढवण्यावर भर दिला. नंतर नोकरी सोडली. भाऊ दादासाहेब राऊत व विष्णू राऊत यांना या व्यवसायात घेतले. दोघे भाऊही कमी शिकलेले. मात्र, कम्प्युटरपासून ते लेथ मशीनसह ३६ प्रकारचे मशीन हाताळण्यात राऊत बंधू तरबेज झाले.

१९९४ मध्ये ऑटोमोगल कंपनीने मोठे काम दिले. ते राऊतांचे उद्योजक म्हणून पहिले काम. महिन्याला ७ हजार ते ८ हजार गिअर बॉक्स बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट ‌दिले गेले. यानंतर जागा आणि माणसे अपुरी पडायला लागली. मग चिकलठाण्यात जागा घेतली. येथे विजय इंजिनीअरिंग सुरू केले. यानंतर शेंद्रयात २०१० ला जागा घेऊन विजय इंजिनीअरिंग युनिट दोन सुरू केले. या दरम्यान, अजय इंज‌िनीअरिंग नावाने दुसरे युनिटही सुरू केले. डाय, डायनेट, मेटल, मेटलकॅप, एएचएच, स्टॅम्प आयर्न, कॅप, असे छोटेछोटे पार्टस मोठमोठ्या मशिनरींना लागणाऱ्या पार्टची निर्मिती करणे सुरू झाले. १२०० चौरस फुटांचे शेड विकत घेतले. यानंतर कंपन्यांचा व्याप वाढला. नंतर आईच्या नावाने प्रयाग इंजिनीअरिंग सुरू केले व मागे वळून पाहिलेच नाही. अजय, विजय नावाने दोन युनिट, प्रयाग नावाने चौथे युनिट सुरू करत फोर्ब्ससह नामांकित ५ कंपन्यांचे व्हेंडरशीप मिळवण्यात राऊत बंधुंना यश आले. यानंतर फोर्ब्सने काम वाढवले. १९९८ सालापासून मिळायला लागलेल्या ऑर्डर आजही कायम आहेत. कामातील अचूकपणा, जिद्द, ऑर्डर पूर्ण करण्याची हातोटी यातून उद्योगाला चालना मिळत गेली. संधीचे सोने करण्याची नेहमीची आवड व संस्कार कामी आले. यानंतर राऊत यांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. १९९८ सालानंतर तिसरे, चौथे युनिट झाले. त्यानंतर कोणार्क इंडस्ट्री सुरू केली. यात हेमंत गोरे हे त्यांचे पार्टनर आहेत.

पाचवे युनिट आयटीचे
राऊत यांनी आता इन्फोटेक नावाने पाचवे युनिट आयटी पार्कात मुकुंद मांगूळकर यांच्यासोबत सुरू केले आहे. भगवान यांच्या उच्चशिक्षित व पीएचडी झालेल्या मित्रपरिवाराचा त्यांना खूप फायदा झाला. यात माजी सीपी संजयकुमार, सेल्स टॅक्स कमिशनर डी. एम. मुगळीकर, सी. के. शिंदे, के. बी. गवळे, गरवारेचे अनिल भालेराव, मामा रणमले, उद्योजक सी. के. चौधरी, दिनेश मालानी, गरवारेचे मॅनेजर, यू. व्ही. पांचाळ, मामा आगलावे यांचा समावेश होतो. भगवान राऊतांच्या दृष्टीने हे सगळे त्यांचे गॉडफादर. विशेष म्हणजे राऊतांच्या कंपनीत हर्सूल जेलमध्ये शिक्षा भोगलेले आरोपी देखील काम करतात.

९० जणांना रोजगार
एक कामगार म्हणून प्रवास सुरू केला. आज राऊत यांच्या पाच कंपन्यांत ५६ मशीन आहेत. ९० कामगार काम करतात. वार्षिक पाच कोटींहून अधिकची उलाढाल होते. माझे भाऊ माझे दोन हात आणि हृदय आहेत. त्यांच्या साथीने मी आज उद्योजक होऊ शकलो, हे ते आवर्जून सांगतात. कमी शिकलेल्या व पन्नाशीकडे झुकलेल्या या यशस्वी माणसाला आजही कम्प्यूटर, लॅपटॉप आणि मॉडिफाइड मशीनवर काम करताना पाहून कोणीही थक्क होतो. टेक्नासॅव्ही होताना अनेक महिलांनाही त्यांनी कंपनीत रोजगार दिला. मोठमोठ्या मशीन त्या महिला सहज हाताळतात. वेळोवेळी बँकांनी दिलेली साथ, कंपन्यांच्या ऑर्डर पूर्ण करताना २२-२२ तास काम करण्याची तयारी, या जोरावार आयटी विभागातही काम करण्याची त्यांची तयारी आहे. या कंपन्या आता अधिक मॉडिफाइड करून अधिकाधिक उलाढाल वाढवण्याची त्यांची मनिषा आहे.

राऊतांचा यशाचा फॉर्म्युला
अखंड मेहनत, धोका पत्करने आणि सदोदित संघर्ष हे राऊतांचे गुण. ते म्हणतात, 'तुम्हाला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे, त्या क्षेत्राच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचे ज्ञान मिळवा. किमान २-३ वर्षे नोकरी करून अनुभवी व्हा आणि त्यानंतरच उद्योजक होण्यासाठी झोकून द्या. आधुनिक मशिनरी, टेक्नॉलॉजीचा वापर, कुशल मनुष्यबळ विकसित करणे यावर भविष्यात भर देणार आहे. कुठल्याही कामाची लाज न बाळगता काम करण्याची तयारी ठेवली, त्यामुळेच हे यश मिळाले. कोणीही उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकत नाही. त्यासाठी 'स्पार्क' असावा लागतो. अर्थात त्यासाठी सर्व काही करण्याची-सोसण्याची तयारी असावी लागते. आधी बुलवर्क आणि मेहनत करत नंतर स्मार्टवर्क केल्यास यशस्वी होता येते.' त्यांचे हे विचार समोरच्यामध्ये स्फुरण चढवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपनीय शाखा रिकामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उत्तरपत्रिका फेरलेखन घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. रॅकेटमध्ये मंडळातील गोपनीय शाखेतील काही लिपिकही सहभागी असल्याचे समोर आले आहे. विभागात सात कर्मचारी काम करतात. त्यापैकी सोमवारी चौघांना आणि मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली. यामुळे आता हा विभाग रिकामा झाला आहे.

परीक्षा संपल्यानंतर या गोपनीय शाखेचे काम सुरू होते. उत्तरपत्रिका तपासणीसाठी संबंधित शाळा, ज्युनिअर कॉलेजांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याकडून विषयनिहाय शिक्षकांचे पॅनल फॉर्म मंडळ मागविले जातात. फॉर्म आल्यानंतर त्यातील शिक्षकांची निवड केली जाते. जिल्हा बदल करून त्यांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात येतात. उत्तरपत्रिका फेरलेखन प्रकरणातील आरोपींना मंडळातील हे कर्मचारी मदत करीत होते, असा आरोप आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसही चक्रावले
रॅकेट उघडकीस आल्यानंतर उत्तरपत्रिकांवरील 'यूआयडी' तपासणीसाठी मंडळाने अशोक नंदला जालन्याला पाठविले होते. त्याच अशोक नंदचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने पोलिसही मंडळाच्या कारभाराबाबत चक्रावले आहेत. पोलिसांनी ही बाब मंडळ अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी चौघे रडावर?
उत्तरपत्रिका फेरलेखन मंडळात रोज नवी माहिती समोर येत आहे. मंगळवारी मंडळातील आणखी दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आणखी चार जण पोलिसांच्या रडारवर असल्याचे कळते. पोलिसांनी अटक केलेले तीन जण यंदाच या विभागात बदलून आल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पूर्वी या विभागात कोण होते, यापूर्वी असा प्रकार घडला का, याबाबतही पोलिस चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यातूनच आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

चौघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी शिक्षण मंडळातील योगेश पालेपवाड, दीपक शिंदे, अशोक नंद, आर. व्ही. गायकवाड यांना मंगळवारी कोर्टात हजर केले. त्यांना कोर्टाने १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चे काम करारानुसार नाही

$
0
0

औरंगाबाद ः समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने करारात ठरलेल्या माइलस्टोननुसार काम केलेले नाही, असा स्पष्ट उल्लेख संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तात करण्यात आला आहे. या बैठकीचे इतिवृत्त महापालिकेला प्राप्त झाले. त्याआधारे महापालिका औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला नोटीस बजावणार आहे.

'समांतर'च्या चौकशीसाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची मुंबईत २१ मार्च रोजी बैठक झाली. या चर्चेच्या आधारे इतिवृत्त तयार करण्यात आले असून ते पालिकेला पाठवण्यात आले आहे. इतिवृत्तात चार मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. पालिकेने कंपनीशी केलेल्या करारानुसार 'समांतर'चे काम करण्यासाठी जे माइलस्टोन ठरवून दिले होते त्या नुसार कंपनीने अद्याप काम केलेले नाही, असे इतिवृत्तात स्पष्ट केले आहे. कंपनीने फायनान्शियल क्लोजरचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारी रक्कम कंपनी कशी उभारणार, हे स्पष्ट होत नाही. कंपनीने प्राधान्यक्रमानुसार पाणी परिणाम वाढवणारी उपांगे प्रथम हाती घेणे आवश्यक होते. मात्र, तसे काम करण्यात आले नाही, असे इतिवृत्तात नमूद केले आहे.

नोटीस तयार करण्याचे काम सुरू
'समांतर'चे काम करणाऱ्या कंपनीला १५ दिवासांच्या कालावधीची नोटीस द्या, असे संतोषकुमार समितीने पालिकेला कळवले आहे. त्यानुसार नोटीस तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. संतोषकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील इतिवृत्तात असलेले मुद्दे व महापालिकेने कंपनीबरोबर केलेल्या करारातील मुद्दे, अटी व माइलस्टोन यांची सांगड घालून नोटीसचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारी कंपनीला महापालिकेतर्फे नोटीस बजावली जाईल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याची राष्ट्रीय ‘पायवाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्त्री शिक्षणावर प्रभावी भाष्य करणारा 'पायवाट' हा मराठी लघुपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. या शैक्षणिक लघुपटात परतूर येथील आनंद विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी तांगडे मुख्य भूमिकेत झळकली आहे. मराठवाड्यातील बालकलाकाराचे राष्ट्रीय स्तरावरील यश कलाप्रांतासाठी प्रेरक ठरले आहे.

६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मिथुन चौधरी दिग्दर्शित 'पायवाट' सर्वोत्कृष्ट शैक्षणिक लघुपट ठरला आहे. खेड्यातील 'मायडी' नावाच्या मुलीच्या शैक्षणिक भावविश्वावर या चौदा मिनिटांच्या लघुपटात प्रभावी भाष्य आहे. भारतीय समाजात अजूनही शिक्षणाबाबत मुला-मुलीत भेदभाव दिसतो. मुलीचे शिक्षण दुय्यम असल्याची भावना समाजात कायम आहे. या मानसिकतेवर लघुपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. घरातील सगळी कामे करून शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या 'मायडी'ची कथा परीक्षकांना विशेष भावली. 'मायडी'च्या भूमिकेतील वैष्णवी तांगडे परतूर (जि. जालना) येथील आनंद विद्यालयाची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. सध्या 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' नाटकात तिची भूमिका आहे. या नाटकातील काम पाहूनच मिथुन यांनी तिला लघुपटात संधी दिली. मात्र, त्यापूर्वी कॅमेऱ्यासमोर ऑडिशन घेतली. ऑडिशनमध्ये हजरजबाबीपणा आणि उत्तम अभिनय करीत तिने बाजी मारली. दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या मांदियाळीत मराठवाड्यातील कलाकारांची संख्या वाढत आहे. यंदा वैष्णवीने ही परंपरा कायम राखली आहे.

कला क्षेत्रात काम करण्यासाठी वडील संभाजी तांगडे यांचे मार्गदर्शन आहे. राज्यभर नाट्य प्रयोग करून वैष्णवीने रसिकांची दाद मिळवली आहे. 'पायवाट' लघुपटामुळे तिच्या कलागुणांना अधिक संधी मिळाली आहे.

'क्षितीज'ची उत्सुकता
'पायवाट' लघुपटाचे दिग्दर्शक मिथुन चौधरी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'आटपाट' ग्रुपचे सदस्य आहेत. ग्रामीण भागातील कथानक मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. 'पायवाट' लघुपटानंतर वैष्णवी 'क्षितीज' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने ऊसतोड मजुराच्या मुलीची भूमिका केली असून अभिनेता उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत आहे.

मी नाटकात काम करीत आहे, पण कॅमेऱ्यासमोर काम केले नव्हते. लघुपटात दिग्दर्शकांच्या सूचनेनुसार काम केले. 'पायवाट'मध्ये काम करताना आनंद वाटला.
- वैष्णवी तांगडे, बालकलाकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई निवारणासाठी वेगवेगळे प्रयत्न होत आहेत. बीड जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी दुष्काळी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने २४ तास वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. बुधवारी या कक्षाची स्थापणा करण्यात आली. बीड सोबतच उस्मानाबाद, लातूर व परभणी येथ्ज्ञील जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातील मराठवाडा विभागात असलेली दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. जनतेसाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, हाताला काम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून दुष्काळ सुसह्य होईल, याची काळजी घेत आहे. टंचाई उपाययोजना राबविताना प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यात सुसंवाद असणे अपेक्षित आहे. याचा विचार करून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास सहाय्य करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा तसचे मग्रारोहयो अंतर्गत कामाची मागणी अथवा टंचाई विषयक समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षास १८०००२३३२६०४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२४४२-२२२६०४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images