Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हक्काचे घर पुन्हा महागणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हजारो शहरवासीयांच्या स्वप्नातल्या हक्काचे घर यंदाही पुन्हा जवळपास ६ ते ८ टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ करा, अशी सूचना शासनदरबारी पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सततचा दुष्काळ, रिअल इस्टेटमधील मंदी यामुळे ही दरवाढ करू नये, अशी मागणी होती. मात्र, आम आदमीच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली जाण्याची शक्यता आहे.
दरवर्षी रेडी रेकनरचे दर १ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येत होते. मात्र, मुद्रांक शुल्कात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच आयकराच्या परिगणणेसाठी १ एप्रिल ते ३१ मार्च हा कालावधी विचारात घेण्यात येतो. त्यामुळे यावर्षीपासून हे दर १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. आतापर्यंत या दरात प्रत्येक वर्षी दहा ते पंधरा टक्के वाढ होत असे. राज्य सरकारला शुल्क वा कराच्या माध्यमातून ज्या काही महत्त्वाच्या विभागाकडून महसूल मिळतो त्यात नोंदणी व मुद्रांक विभाग महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे रेडी रेकनरच्या दरात वाढ करू नये अशी मागणी आहे. दुष्काळाचा फटका महसुली उत्पन्नाला बसला आहे. मात्र, तरीही या दरामध्ये माफक सुधारणा होण्याचे संकेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले होते. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या किमतीत कमी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये रेडी रेकनरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. यावर्षी स्थावर व्यवसाय क्षेत्रात असलेली मंदी, नोंदवलेले खरेदी-विक्री व्यवहार, दुष्काळामुळे वसुलीचा टक्का याबाबींचा विचार करून यंदा ही वाढ करण्यात येणार आहे.
काय आहे प्रस्तावात?
गेल्यावर्षी रेडी रेकनरच्या दरात महापालिका क्षेत्रात ११ टक्के वाढ, तर सातारा- देवळाई भागामध्ये १० ते २५ टक्के, ग्रामीण भागामध्ये ही वाढ १० टक्के होती. मात्र, दुष्काळामुळे खरेदी विक्रीचे व्यवहाराच कमी झाले असून महापालिका हद्दीत ही वाढ ६ ते ८ टक्के तर ग्रामीण भागात ४ ते ५ टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव विभागीय नगररचना विभागाने शासनाकडे पाठवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फलाटावरील ‘त्या’ कारची जप्ती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सगळे नियम धाब्यावर बसवत चक्क रेल्वे स्टेशन फलाटावर कार दामटणाऱ्या उद्दाम चालकाची गाडी अखेर बुधवारी दुपारी जप्त करण्यात आली. रेल्वे कोर्टाने चालक कृष्णा ढगेची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
रेल्वे स्टेशनवर १९ मार्च रोजी रात्री ९.३०च्या सुमारास जुन्या इमारतीमधून एक होंडा सिटी कार (एम. एच. २१ व्ही ७१२१) रिव्हर्स करून क्रमांक एकच्या फलाटावर आणण्यात आली. ही चूक कळताच चालक कृष्णा ढगेने कार फलाटावरून बाहेर नेली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी २० मार्च रोजी ढगेला (रा. शिवाजीनगर) अटक केले. त्याला कोर्टात जामीन मिळाला. रेल्वेच्या सुरक्षा विभागातही या प्रकरणी ढगेवर गुन्हा दाखल झाला होता. या विभागाने 'आरटीओ'कडून कार क्रमांकाच्या आधारे कार मालकाचा पत्ता शोधून काढला. त्या कार मालकाला घटनेच्या तीव्रतेच्या जाणीव करून देऊन समज दिली. ढगेला रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात कारसह येण्याचे आदेश दिले. बुधवारी दुपारी ढगे कार घेऊन हजर झाला. तेव्हा रेल्वे सुरक्षा विभागाने त्याला ताब्यात घेऊन त्याचा जबाब नोंदविला. ढगेने आपली चूक कबूल केली. त्याच्यावर रेल्वे कायदा १५४ अंतर्गत गुन्हा दाखल करून रेल्वे कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला १५ दिवसांची न्यायलयीन कोठडी ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिभेर’ची औरंगाबादमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेफ्रिजरेशन क्षेत्रात जगात प्रसिद्ध असलेली जर्मनीतील लिभेर अप्लायन्सेस कंपनीचा प्रकल्प लवकरच औरंगाबादेत सुरू होणार आहे. गेल्या वर्षी कंपनीच्या वतीने शेंद्रा एमआयडीसीमध्ये जागेची पाहणी केली होती. महाराष्ट्र टाइम्सने सर्वप्रथम यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.
जर्मनीतील सर्वात जुनी अप्लायन्सेसची कंपनी असलेली लिभेर जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखली जाते. जगातील प्रत्येक खंडात ५० पेक्षा अधिक देशात लिभेर ग्रुपच्या १३० हून अधिक कंपन्या असून ४२ हजार कर्मचारी आहे. २०१५ मध्ये लिभेरने ९.२ अब्ज युरोज असे एकत्रित टर्नओव्हरचे यश संपादन केले आहे. लिभेर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही स्वायत्त कंपनी असून लिभेर - हौसगरेटे या कंपनीची ती उपकंपनी आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया या प्रकल्पात भाग घेऊन कंपनीचा प्लांट भारतात उभारण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीचे संचालक डिटलेफ वाल्थर यांनी कळविले आहे. भारतीय बाजाराला अनुरूप आणि सभोवतालच्या प्रदेशास उपयुक्त असा दर्जेदार उपकरणांची निर्मिती औरंगाबादेतील शेंद्रा औद्योगिक पार्कमधील मध्यवर्तिक ठिकाणी करण्यात येईल. कंपनीला सुविधा पुरविताना ३५ हजार चौरसमीटर जागेत प्लांट उभारला जाईल. याठिकाणी पाच लाख कूलिंग अप्लायन्सेसची निर्मिती केली जाईल. ज्याची विक्री भारत आणि शेजारच्या राष्ट्रांमध्ये होईल. भारतीय धोरणाचा एक भाग म्हणून लिभेरच्या पहिल्या मोने ब्रँड शोरूम मुंबईत असणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० कोटींची गुंतवणूक औरंगाबादेतील प्लांटमध्ये केली जाईल, असे कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे याठिकाणी १००० हून अधिक रोजगार संधी उपलब्ध असतील. लिभेर कंपनीचे शिष्टमंडळ काही महिन्यांपूर्वी औरंगाबादेत स्थळपाहणीसाठी आले होते. यासंदर्भात 'मटा'मध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणाला ‘नगररचना’चे अधिकारीच जबाबदार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'पार्किंगच्या जागा, अतिक्रमणांची जबाबदारी तुमचीच आहे. ती टाळता येणार नाही. पार्किंगच्या जागा गिळंकृत झाल्यास, अतिक्रमणांची प्रकरणे उघडकीस आल्यास नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल,' असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बुधवारी दिला.
बकोरिया यांनी बुधवारी त्यांच्या दालनात नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक ते दीड तास ही बैठक चालली. नगररचना विभागात कोणता अधिकारी व कर्मचारी किती वर्षांपासून काम करीत आहे, याची माहिती त्यांनी सुरुवातीला जाणून घेतली. या विभागातील बहुतेक अधिकारी, कर्मचारी दहा ते बारा वर्षांपासून त्याच त्या टेबलवर कायम आहेत. विभागात वर्ग चारचे नऊ कर्मचारी आहेत. ते पंधरा वर्षांपासून ते याच विभागात आहेत. पाच ट्रेसर दीड ते दोन दशकांपासून याच विभागात काम करीत असल्याचे यावेळी आयुक्तांच्या लक्षात आले. नगररचना विभागाचे काम केवळ बांधकाम परवानगी देऊन पूर्ण होत नाही. दिलेल्या बांधकाम परवानगीनुसार बांधकाम केले जात आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी देखील याच विभागाची आहे, असे बकोरिया यांनी बजावले. मात्र, एका अधिकाऱ्याने हे काम अतिक्रमण हटाव विभागातर्फे केले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे बकोरिया संतापले. अतिक्रमण हटाव विभागात तांत्रिक अधिकारी नसतात. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकता येत नाही. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनीच बांधकामे योग्य प्रकारे होतात की नाही हे पाहिले पाहिजे. पार्किंगच्या जागांचा वापर पार्किंगच्या जागांसाठीच केला जात आहे का, हे पाहण्याची जबाबदारी देखील नगररचना विभागाचीच आहे. ती टाळता येणार नाही, म्हणत त्यांनी सर्वांना धारेवर धरले.
कामाची गती वाढवा
नगररचना विभागात वर्ग एक ते वर्ग तीनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पंधरा जणांचा स्टाफ आहे. एवढा स्टाफ असताना वर्षभरात फक्त १,२०० बांधकाम परवानग्या या विभागातर्फे देण्यात आल्या. या बद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. कामाची गती वाढली पाहिजे, जास्तीत जास्त बांधकाम परवानग्या दिल्या पाहिजेत, असे मत त्यांनी नोंदवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बजेटमध्ये साताऱ्याला ठेंगा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या ८७८ कोटी २४ लाख रुपयांच्या बजेटमध्ये सातारा - देवळाईला ठेंगा दाखवण्यात आला आहे. या परिसरासाठी बजेटमध्ये तरतूद नसल्यामुळे नगरसेवक निवडून आले तरी, त्यांच्या वॉर्डात येत्या वर्षात विकास कामे होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.
सातारा - देवळाई परिसराचा समावेश शासनाने महापालिकेत केला. त्यामुळे या भागात पोटनिवडणूक लागली आहे. निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्याने तेथील मतदार प्रभावीत होतील असा कोणताही निर्णय महापालिका प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना घेता येणार नाही. निवडणूक आचारसंहिता लागल्यावर मार्च अखेरमुळे पालिकेच्या स्थायी समितीने बजेटला मंजुरी दिली. स्थायी समितीला प्रशासनाने १६ मार्च रोजी ७७७ कोटी ५२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून स्थायी समितीने त्यात शंभर कोटी रुपयांची वाढ करून ८७८ कोटी २४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात विकास कामांसाठी २६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यात शंभर कोटी रुपये स्पिल ओव्हरच्या कामासाठी, तर १६० कोटी रुपये नवीन विकास कामांसाठी ठेवण्यात आले आहेत. ही रक्कम विविध वॉर्डांमध्ये वितरित केली जाणार आहे. महापालिकेत सध्या ११३ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांच्या वॉर्डात हा निधी वितरित केला जाणार आहे. सातारा - देवळाईच्या निवडणुकीनंतर दोन वॉर्डांचे नगरसेवक नव्याने पालिकेत येणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांची संख्या ११५ होणार आहे. नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या वॉर्डांसाठी काय तरतूद असेल याचा उल्लेख बजेटमध्ये प्रशासनाने व स्थायी समितीने केलेला नाही. त्यामुळे या नगरसेवकांना किमान एक वर्षतरी आर्थिक तरतुदीची वाट पहावी लागेल. महापालिकेत निवडून आलेल्या ११३ नगरसेवकांचे पहिले वर्ष कोरडेच गेले होते. वर्षभरात त्यांच्या वॉर्डात एकही काम झाले नाही. त्याचीच पुनरावृत्ती सातारा - देवळाईमध्ये होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आचारसंहितेमुळे अर्थसंकल्पात सातारा - देवळाईसाठी स्वतंत्र तरतूद करता आली नाही. मात्र, शहरातील विकास कामांसाठी जी तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे, त्यातून भविष्यात सातारा-देवळाईमधील विकास कामे करणे शक्य होणार आहे. या संदर्भात निवडणूक झाल्यावर निर्णय घेता येईल.
- दिलीप थोरात, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगमकडे रिझर्व्ह बँकेचे बनावट ओळखपत्र

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिझर्व्ह बँकेच्या एनआरआय फंडातून रक्कम देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या टोळीचा सूत्रधार अशोक जंगमकडे असलेले ओळखपत्र बनावट आहे. रिझर्व्ह बँकेने तसे आर्थिक गुन्हेशाखेला पत्राद्वारे कळवले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये जंगम व टोळीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा दाखल झाला आहे.
शहरातील व्यावसायिक अभिजित कुलकर्णी यांना रिझर्व्ह बँकेच्या एनआरआय फंडात गुंतवणूक करायला लावून ३५ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हेशाखेने पुण्यावरून मातंगी एंटरप्रायजेसच्या निवेदिता कुलकर्णी व विश्वनाथ अवचट यांना अटक केली. यानंतर या टोळीचा मास्टरमाइंड अशोक शिवराम जंगम (रा. धारावी) याला ७ जानेवारी २०१६ रोजी मुंबई येथे अटक करण्यात आली. जंगमकडे यावेळी रिझर्व्ह बँकेचे आयकार्ड सापडले होते. हँडलिंग ऑफिसर अशी या आयकार्डवर पोस्ट होती. त्याबाबत शंका आल्याने आर्थिक गुन्हेशाखेने ८ फेब्रुवारी २०१६ रोजी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून याबाबत माहिती मागविली. या संदर्भात मुंबईच्या रिझर्व्ह बँकेच्या शाखेतून उपमहाप्रबंधक आर. सतीश यांच्या सहीने नुकतेच एक पत्र आर्थिक गुन्हेशाखेला प्राप्त झाले. या पत्रामध्ये अशोक जंगमने तयार केलेले आयकार्ड बनावट असून अशा प्रकारचे कोणतेही आयकार्ड रिझर्व्ह बँकेने दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुभाष खंडागळे, प्रकाश काळे, विलास कुलकर्णी, महेश उगले, दादासाहेब झारगड याप्रकरणी तपास करीत आहेत.
आरबीआयचे कार्ड स्मार्ट
रिझर्व्ह बँकेचे आयकार्ड हे साध्या स्वरुपातील नसून स्मार्ट कार्डच्या स्वरुपात असते, असे रिझर्व्ह बॅँकेने पाठिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे अशोक जंगम याने बनावट दस्तावेज तयार केल्याच्या गुन्ह्याला बळकटी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणिसंग्रहालयाच्या संवर्धनासाठी समिती

$
0
0

गवताचे पीक घेणार, बांबूंची लागवड करणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

प्राणिसंग्रहालयाच्या संवर्धनासाठी महापालिकेने पक्षी आणि प्राणि मित्रांची समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक बुधवारी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत झाली. प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात गवताचे पीक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे बांबूची लागवड करण्याचेही ठरविण्यात आले.

रेणू या बिबट्याच्या तीन पिल्लांच्या मृत्यूनंतर प्राणिसंग्रहालयाचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यातच प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना आयुक्तांनी निलंबीत केले. त्यामुळे आता प्राणिसंग्रहालयाच्या कामाकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे, त्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यावर देण्यात आली आहे. पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी पक्षी व प्राणी मित्रांची बैठक झाली. यावेळी डॉ. किशोर पाठक, डॉ. एस.ए. काद्री, डॉ. मोहम्मद जाकीर, प्रल्हाद गिरी, स्मीता गिरी, कर्नल समीर राऊत, दिलीप यार्दी यांच्यासह उद्यान अधिक्षक विजय पाटील, वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे उपस्थित होते. या बैठकीतील माहिती रमेश पवार यांनी दिली. ते म्हणाले, 'प्राणिसंग्रहालयाच्या संवर्धनासाठी प्राणी-पक्षी मित्रांचा चांगला ग्रुप तयार झाला आहे. बैठकीत चांगली चर्चा झाली. प्राणिसंग्रहालयात असलेल्या हरीण व काळविटांना ताजे, लुसलुसीत गवत हवे असते. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच गवताची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवातही करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत गवत उगवलेले दिसून येईल. हत्तींसाठी बांबूच्या झाडांचा पाला दिला जावा, असे संकेत आहेत. त्यामुळे बांबूची लागवड करण्याचेही ठरविण्यात आले. प्राण्यांच्या हालचालीवरून त्यांच्या वर्तनाचा अंदाज यावा यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याशिवाय काही नवीन उपक्रम हाती घेण्याचा निर्णय केला जाणार आहे, त्याची घोषणा गुरुवारी आयुक्तांच्या सोबत होणाऱ्या बैठकीच्या नंतर केली जाईल, असे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांच्या बेबंदशाहीला लगाम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औैरंगाबाद
शहरातील उड्डाणपुलांखालून सुरू असलेल्या रिक्षाचालकांच्या दादागिरीला बुधवारपासून वेसन घालण्यात आली. १५ मार्चपासून पोलिस आयुक्तांनी ‌उड्डाणपुलांखालून रिक्षांची वाहतूक करण्यास मनाई केली होती. मात्र, हे आदेश धाब्यावर बसवत, पोलिसांना हुलकावणी देत पुलाखालून रिक्षाचालकांची मनमानी वाहतूक सुरू होती. बुधवारच्या अंकात 'मटा'ने हे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत बुधवारीच वाहतूक शाखेने उड्डाणपुलाच्या अलीकडे कर्मचाऱ्यांची नेमणूक करत या बेबंदशाहीला लगाम घातला.
शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण वाढत होते. यामध्ये अदालत रोड व जालना रोडवर रिक्षाचालकांची होणारी टप्पा वाहतूक कारणीभूत होती. तसेच उड्डाणपूल असतानाही पुलाखालून रिक्षांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी होत होती. क्रां‌तिचौक, मोंढानाका व सेव्हनहिल उड्डाणपुलाच्या खाली हे चित्र नेहमी दिसून येत होते. या प्रकरणी बुधवारच्या अंकात 'मटा'ने सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल वाहतूक शाखेच्या वतीने तातडीने घेण्यात आली. क्रांतिचौक उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. खालून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना मनाई करीत त्यांना सक्तीने पुलावरून वाहतूक करण्यास भाग पाडण्यात येत होते. सेव्हनहिल उड्डाणपुलाच्या सुरुवातीला वाहतूक शाखेने लोखंडी बॅरिकेटस लावत रिक्षाचालकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सबंधित ठिकाणी वाहतूक कर्मचारी नसल्याची संधी साधून रिक्षाचालकांची पुलाखालून चोरटी वाहतूक सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकाऱ्यांचा चालक म्हणून गंडवले!

$
0
0


औरंगाबादःजिल्हाधिकाऱ्यांचा चालक असल्याची थाप मारून कापड व्यापाऱ्याला भामट्याने ६० हजारांना बुधवारी दुपारी गंडा घातला. सुनील कांतीलाल मुथीयान (रा. समर्थनगर) असे कापड व्यापाऱ्याचे नाव आहे.

मुथीयान यांचे साजन सारिज सेंटर नावाचे दुकान आहे. सकाळी दहाच्या सुमारास मुथीयान हे दुकान उघडताना भामटा आला. त्याने जिल्हाधिकाऱ्यांना गोरगरिबांसाठी ६५ हजारांच्या साड्या खरेदी करायच्या आहेत. त्यांच्या गाडीचा चालक सलीम असल्याचे सांगितले. मुथियान यांनी भामट्याला दुपारी साडेबाराच्या सुमारास साड्या पसंत करण्यासाठी बोलावले. यावेळी भामट्याने त्यांना मॅडमना दीड हजाराची एक साडी तसेच पाचशे रुपये सोबत द्यायचे आहेत, अशी थाप मारली. याचदरम्यान भामट्याने त्यांना ६० हजार रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत नेले. तेथे गेल्यानंतर भामट्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यकाच्या केबिनसमोर नेले. तेथे भामट्याने मॅडम येईपर्यंत ६० हजार रुपये द्या. तसेच स्वीय साहाय्यक मॅडमला तुमच्या हातातील सोन्याची अंगठी पसंत पडलेली आहे. त्यांना अंगठी दाखवून येतो म्हणत ६० हजार आणि सोन्याची अंगठी घेत धूम ठोकली. त्यानंतर वाट पाहून थकलेल्या मुथीयान यांनी सिटीचौक पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मुथीयान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वाया घालवल्यास ५०० रुपये दंड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी परिषदेच्या हद्दीत पाणी वाया घालवल्यास यापुढे १०० ते ५०० रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. छावणी परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीला छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्र‌िग‌ेडिअर अनुराग वीज सीईओ पूजा पलिचा, कर्नल के. बी महाडिक, ए. के. पांडे, उपाध्यक्ष किशोर कच्छवाह, सात नगरसेवक, अभियंता आणि वंदना केणेकर यांची यावेळी उपस्थिती होती. बैठकीत दुष्काळ, पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान, पाण्याचे टॅँकर या विषयावर चर्चा झाली. पाणी वाया घालवल्याचे पहिल्यांदा निदर्शनास आल्यास १०० रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा तीच व्यक्ती पाणी वाया घालविताना आढळल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. छावणी परिषदेत भारत स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्षां‍च्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबवली जाईल. गुरुवारच्या भाजीबाजाराचे लिलावाचे कंत्राट बाबाभाई हसनुद्दीन शेख यांना ६० लाख ५० हजारांना देण्यात आले. छावणी परिसरातील कर्णपुरा आणि पेन्शनपुरा या भागातील पार्किंगचा लिलाव करण्याचा निर्णय झाला. करवसुली, पाणीपट्टी आणि घरपट्टी या विषयी झालेली वाढ व त्या अनुषंगाने येणारे उत्पन्न यावर चर्चा झाली. सध्या कोणतीही करवाढ होणार नाही. घाण, कचरा आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी छावणीतील प्रत्येक घराकडून रोज एक रुपये, चहा टपरीवाल्यांकडून पाच रुपये, किराणाचालकांकडून पाच रुपये, प्रत्येक हॉटेल व दुकानदारांकडून रोज १० रुपये वसूल करण्याचे ठरले. याचा कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहीमेस फायदा होणार असल्याने, या वसुलीला कोणीही विरोध केला नाही.
पाणीपट्टी वाढली
दुष्काळ, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि गेल्या अनेक वर्षांपासून न झालेली वाढ अशी तीन कारणे देऊन पाणीपट्टीत वाढ करण्यात आली. पूर्वी घर, दुकानदार, व्यावसायिक, उद्योयोजक यां‍च्याकडून वार्षिक १ हजार ७२८ रुपये वसूल केले जायचे. आता घर व विविध दुकानदार व्यावसायिकांना पाणीपट्टीचे वेगवेगळे दर आकारण्याचा निर्णय झाला. रहिवासी क्षेत्रासाठी २ हजार रुपये वार्षिक आणि हॉटेल व रेस्टॉरंटकडून ३ हजार, तर दुकानदार व इतर व्यावसायिकांकडून २ हजार ५०० रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारण्यात येईल.
उपाध्यक्षनिवडीसाठी पुन्हा जीबी
उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी अध्यक्ष अनुराग वीज यांच्याकडे राजीनामा सोपवला. पुन्हा उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी लवकरच विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात येईल. छावणी नियमानुसार पुन्हा उपाध्यक्ष निवड सात नगरसेवकांमधूनच केली जाईल, असे या बैठकीत ठरले.
-
पाणीपट्टी वाढ अपरिहार्य होती. वाढलेली पाणीपट्टी फार नसली तरी सर्वांना मान्य आहे. पूर्वीची आकारणी सरसकट होती. आता वेगवेगळी आकारणी राहील.
- पूजा पलिचा, सीईओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतात आग लागून दोन लाखांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
औरंगाबाद तालुक्यातील कनकोरा येथील एका शेतकऱ्यात शेतात शॉटसर्किटमुळे मंगळवारी दुपारी आग लागुन सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कनकोरा शिवारातील गट नंबर गोविंदराव कडूबा दराडे यांचे शेत आहे. शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारा लोंबकळल्या आहेत. जोराच्या वाऱ्यामुळे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता घर्षण होऊन ठिणग्या पडल्या व जनवारासाठी साठवलेल्या चाऱ्याने पेट घेतला. चाऱ्याजवळ ठेवलेला मका, शेती औजारे, शेणखत या आगीत जळून खाक झाले. गावकऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, अन्यथा ही आग इतर शेतांमध्ये पसरली असती. या घटनेत जीवितहानी झाली नाही. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात गोविंदराव दराडे यांच्या फिर्यादीवरून नोंद घेऊन हेडकॉन्स्टेबल वाल्मिक राऊत पुढील तपास करत आहेत. या शेतकऱ्यास आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मन महिलेला वारकरी संप्रदायाची गोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

हिरवी साडी, कपाळावर ठसठशित कुंकु, गळ्यात तुळशीची माळ घातलेली एक परेदशी पाहुणी नाथषष्ठी यात्रेत आलेल्या राज्यातील भाविक व वारऱ्यांचे आकर्षण ठरली आहे. वारकरी संप्रदायाचे आकर्षण असलेल्या जर्मनी येथील या महिलेचे नाव सिलिया वेग्नट, असे आहे. त्या पाच वर्षांपासून यात्रेत नियमित येतात. त्यांना हरिपाठ, काकड आरती तोंडपाठ आहे.

नाथ पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लागलेल्या लांब रांगांमध्ये उभ्या राहिलेल्या सिलिया वेग्नट या सर्वांच्या उत्सूकतेचा विषय ठरल्या आहेत. मूळ जर्मनी येथील असलेल्या या महिला सध्या चेन्नई येथे वास्तव्यात आहेत. वारकरी संप्रदायासोबत कधीही संबंध आलेला नसताना त्यांना आकर्षण कसे निर्माण झाले, याबद्दल अनेकांना उत्सूकता आहे. सिलिया वेग्नट यांचा विवाह चेन्नई येथील नृत्य शिक्षक अरंदू घोष यांच्या सोबत झाला आहे. त्यामुळे त्या चेन्नईत स्थायिक झाल्या. हिंदू धर्माचे आकर्षण असल्याने त्या सुरुवातीपासून मंदिरात जात असत. मंदिरात त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे नाव एकले. इंटरनेटवर विठ्ठलाची माहिती वाचल्यानंतर त्या वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाल्या. त्यांनी इंग्रजीमध्ये उपल्ध असलेल्या संप्रदायाच्या वाड्मयाचे अभ्यास सुरू केला असून एकदा पंढरपूरची वारी केली आहे.

नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांची पाच वर्षांपूर्वी चेन्नई येथे भेट झाली. त्यांनी संत एकनाथाचे साहित्य वाचायला दिले व नाथषष्ठी यात्रेला येण्याचे निमंत्रण दिले. नाथांचे साहित्य वाचल्यानंतर त्या पाच वर्षांपासून नाथषष्ठी यात्रेत न चुकता येतात. या काळात त्यांचा नाथवंशजांच्या घरी मुक्काम असतो. त्यांना नाथ समाधीचे थेट दर्शन घेणे शक्य आहे, मात्र या सामान्य वारकऱ्यांसोबत रांगेत थांबून त्या दर्शन घेतात.

जर्मनी व भारत यातील फरकाबद्दल विचारणा केली असता, सिलिया वेग्नट यांनी जर्मनीच्या तुलनेत भारत खूप मागस असल्याचे सांगितले. जर्मनीमधील राहणीमान भारताच्या तुलनेत खूप उच्च आहे. मात्र, भारतातील उत्सव, सण साजरा करण्याची परंपरा व विविध धर्मांतील नागरिकांमधील सौहार्दाची भावना, जर्मनीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळनिवारणासाठी उद्योजक घेणार पुढाकार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ आहे. सरकारी यंत्रणा याचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करत असते, पण त्यातून सर्वच ठिकाणी दिलासा मिळणे अवघड आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी दुष्काळनिवारणासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. सर्व संघटना एकत्रित येऊन यासाठी निधी उभारणार आहेत. यातून ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने कामे होती घेतली जाणार आहेत.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील मान डिझेल कंपनीमध्ये परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक संघटनांची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध कंपन्यांचे ६० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. बागडे यांनी जिल्ह्यात सातत्याने पडणारा दुष्काळ त्याचा ग्रामीण भागावर झालेला परिणाम यासंदर्भात माहिती दिली. सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना सर्व घटकांपर्यंत पोचत नाहीत. उद्योजकांनी जर पुढाकार घेतला तर पहिल्या टप्प्यात पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. पिण्याच्या पाण्याची कमतरता, शेतीच्या पाण्याची कमतरता यासाठी जलयुक्त शिवार या योजनेतून काम केले जात आहे, परंतु ते अपुरे आहेत. त्यासाठी उदयोग क्षेत्राने पुढे यावे, असे आवाहन बागडेंनी केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उद्योगांनी मदतीची तयारी दर्शविली. काही उद्योगांनी स्वबळावर संपूर्ण गाव दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. लघु व मध्यम उद्योजक तसेच उपस्थित संघटनांनी एकत्रितपणे निधी उभारून संघटितपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात लवकरच एकत्रित निधी संकलनाची पद्धती तयार करण्यात येणार आहे. बैठकीसाठी राम भोगले, एन.के.गुप्ता, सी. पी. त्रिपाठी, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. बैठक आयोजित करण्यासाठी औदयोगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे ए. बी. कांबळे, व्ही.बी. घोगरे आणि मार्गचे अमित दगडे यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक नहरींचे पुन्हा सर्वेक्षण करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराला पाणी पुरवठा करणारी प्राचीन 'नहर-ए-अंबरी'चे संवर्धन करण्यासाठी तत्काळ सर्वेक्षण करून नियोजन खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी केली आहे. दिल्ली गेट व हर्सूल परिसरात शनिवारी सकाळी नहरींची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी ही सूचना केली.
औरंगाबादला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी मलिक अंबरने चारशे वर्षांपूर्वी नहर-ए-अंबरीची निर्मिती केली. या भुयारी पाणीपुरवठा योजनेतून अजूनही पाण्याचा ओघ सुरू आहे. अतिक्रमण आणि संवर्धन नसल्याने नहरींची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, इतिहास अभ्यासक डॉ. रमजान शेख, शहर अभियंता सखाराम पानझडे, आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी नहरींची पाहणी केली. मौलाना आझाद कॉलेजसमोरील नहरीचे शेवटचे केंद्र 'गोमुख' आहे. या ठिकाणासह नहरींच्या शंभर मॅनहोलपैकी मोजके मॅनहोल तपासण्यात आले. हर्सूल कारागृहाच्या मागील वस्तीत मॅनहोलमधून पाणी चोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले. सावंगी तलावाजवळील तीन मॅनहोल पाहिल्यानंतर सविस्तर चर्चा करण्यात आली. १९३१ मध्ये झालेल्या नहरींच्या सर्वेक्षणाचा नकाशा डॉ. शेख यांनी आयुक्तांना दाखवला. गोमुखाजवळ १९३२ मध्ये तत्कालीन निजाम सरकाने उर्दू शिलालेख लावला होता. या शिलालेखाचे भाषांतर शेख यांनी सांगितले. नहरींचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व आणि शहराची पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती यावर सविस्तर चर्चा झाली. नहरींचे संवर्धन करण्याचा निर्णय आयुक्त उमाकांत दांगट यांनी घेतला. त्यानुसार लवकरच नहरीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर नियोजन खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. गोमुख येथे पर्यटनस्थळ विकसित करणे आणि सावंगी तलावाचे 'जलयुक्त शिवार योजने'अंतर्गत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे अध्यक्ष मिर्झा सलीम बेग, द्वारकादास पाथ्रीकर, सय्यद मुख्तार कादरी, परवेझ आलम कादरी, महेमूद खान, मिर्झा इक्बाल बेग, मोहम्मद सलीम, हामेद सिद्दीकी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये ‘डिजिटल क्लासरूम’

$
0
0


ashish.choudhari
@timesgroup.com
औरंगाबादः मराठी शाळा काळाशी सुसंगत होत आता तंत्रज्ञानाशी जोडल्या जात आहेत. राज्यातील ११ जिल्ह्यांतील २५ हजार शाळांमध्ये 'मोबाइल डिजिटल क्लासरूम' आली आहे. मॅग्निफाइन ग्लासच्या माध्यमातून मोबाइलमधील विविध अॅपद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.
शिक्षण विभागाने आणलेल्या ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून शाळांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. रंगरंगोटी, साहित्यनिर्मिती आणि लोकसहभागातून शाळांमधील अध्ययन व अध्यापन पद्धती पूर्णपणे बदलते आहे. यात आता 'मोबाइल डिजिटल क्लासरूम'ची संकल्पना राबविली जात आहे. राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये ही संकल्पना राबविली जात आहे. ज्ञानरचनावाद शिक्षणपद्धतीसह शाळा डिजिटल करत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान सुरू आहे.
...अशा आहेत शाळा!
'मोबाइल डिजिटल क्लासरूम'मध्ये मॅग्निफाइन ग्लासच्या माध्यमातून मोबाइलच्याद्वारे विद्यार्थ्यांना धडे दिले जातात. शिक्षकांने आपल्या मोबाइलवर शैक्षणिक अॅप डाउनलोड करायचे, यासह इतर शैक्षणिक व्हिडिओ, माहिती एकत्र करत विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे ज्ञान द्यायचे. 'मॅग्निफाइन ग्लास'समोर मोबाइल लावला जातो. जे मोठ्या स्वरूपात दिसते. विद्यार्थ्यांना एकत्र बसवून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धडे दिले जात आहेत.
हे अकरा जिल्हे
नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,पालघर,गडचिरोली,नंदूरबार.अहमदनगर.
-
शिक्षक तंत्रस्नेही होत आहेत. शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता आहे. याच माध्यमातून आपण अकरा जिल्ह्यात 'मोबाइल डिजिटल क्लासरूम' संकल्पना राबवित आहोत. ज्यातून उपस्थिती वाढली आहे. अकरा जिल्ह्यातील २५ हजार शाळांमध्ये असा प्रयोग राबविला जात आहे.- डॉ. पुरुषोत्तम भापकर, शिक्षण आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हाडाच्या घरांसाठी पोलिस इच्छुक

$
0
0


ravindra.taksal
@timesgroup.com
औरंगाबादः प्रत्येकाला हक्काचे घर हवेच असते. त्याच क्वार्टर, भाड्याच्या खोल्या याला कंटाळून पोलिसदल आणि भारत राखीव बटालियनने म्हाडाची घरे घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला असून त्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती म्हाडाकडून मिळाली.
सध्या शहर दलात तीन हजार सहाशेच्यावर पोलिस आहेत, पण त्यांच्या निवासाचा प्रश्न कायम आहे. आयुक्तालय परिसरात नवी इमारत बांधल्याने ही समस्या थोडी दूर झाली. क्रांतिचौक पोलिस वसाहतीत इमारत बांधण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, पोलिस उपनिरीक्षकासह बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न कायम आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी व अधिकाऱ्यांना दर्जेदार घरे मिळावेत यासाठी शहर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती. अखेर त्यांनी म्हाडाच्या तिसगाव शिवारातील प्रकल्पास पसंती दिली आहे. येथील ६४ फ्लॅट घेण्यासंबंधीचा प्रस्ताव शहर पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकल्पास भेट देत पाहणी केल्याचे समजते. सातारा परिसरातील भारत राखीव बटालियन दलात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार आहे. येथे ३२५ फ्लॅट असून अनेक कर्मचाऱ्यांची स्वतःची शहरात घरे आहेत. मात्र, अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना हक्काचे घर नसल्याने त्यांना किरायाच्या घरात राहावे लागते. ही बाब लक्षात घेत बटालियन अधिकाऱ्यांनी घरासाठी शोध मोहीम सुरू केली होती. त्यांनी म्हाडाच्या देवळाईतील गृह प्रकल्पास पसंती दिली आहे.
-
म्हाडा विभागाच्या देवळाई प्रकल्पातील १२८ घरांसाठी डीजी कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांच्या आदेशाने पुढील निर्णय घेण्यात येईल.
- निसार तांबोली, समादेशक, भारत राखीव बटालियन
-
शहर तसेच भारत राखीव बटालियनच्या अधिकाऱ्यांनी म्हाडाचे घर घेण्यास तयारी दर्शवली आहे. तिसगाव येथील प्रकल्पात लिफ्ट असावी असेही शहर पोलिसांनी नमूद केले आहे. यासंबंधी विचार सुरू आहे.
- अनिल रामोड, मुख्याधिकारी म्हाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या सर्व शाळेत पहिलीपासून सेमी इंग्रजी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका शाळेतील पहिलीच्या वर्गासाठी आता सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करा, असे आदेश महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शनिवारी मुख्याध्यापकांना दिले.
पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक शनिवारी बकोरिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात घेतली. उपायुक्त रवींद्र निकम यावेळी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षापासून पालिकेच्या सर्व शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलेच पाहिजे, असे आदेश आयुक्तांनी मुख्याध्यापकांना यावेळी दिले. ज्या मुख्याध्यापकांना शक्य आहे, त्यांनी इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग सेमी इंग्रजी माध्यमातून सुरू करावेत, हे वर्ग ऐच्छिक स्वरुपाचे असतील. पहिलीच्या वर्गासाठी मात्र सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग मुख्याध्यापकांना सुरू करावेच लागतील, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले. पालिका शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रज्ञा शोध परीक्षेला बसवा, असे आदेशही त्यांनी दिले. शाळेतील विद्यार्थ्यांकडून रोज सामान्यज्ञानाचे दहा प्रश्न व दहा इंग्रजी शब्द पाठ करून घेण्याचे बंधनही बकोरिया यांनी घातले आहे. सामान्यज्ञान व इंग्रजी शब्दांच्या संदर्भात ऑक्टोबर महिन्यात आपण स्वतः पन्नास गुणांचा पेपर काढून विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ, असे त्यांनी सर्व मुख्याध्यापकांना सांगितले. संगणक शिक्षण व गणित या विषयाकडे सर्व शिक्षकांनी व्यक्तीशः लक्ष द्यावे, ज्या शाळेत संगणक आहेत त्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक आलेच पाहिजे, विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संजीव सोनार, हेमलता भुयार, देवेंद्र सोळुंके, रजनी हिवाळे या मुख्याध्यापकांनी विविध सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत फळे चाखून बाहेर गेलेल्यांच्या छाताडावर बसा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'शिवसेनेत मोठा होऊन फळे चाखून बाहेर गेलेला आता आपल्या विरोधात उभा आहे. त्याच्या छाताडावर बसा आणि सातारा - देवळाई या दोन्ही वॉर्डात शिवसनेचा भगवा फडकवा,' असे आवाहन पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
सातारा-देवळाई पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार हरिभाऊ हिवाळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन कदम यांच्या शनिवारी केले. तेव्हा ते बोलत होते. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, बंडू ओक, शहरप्रमुख राजु वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणूकीत शिवसेना-भाजपची युती झालेली नाही. शिवसेनेत राहून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेलेले किशनचंद तनवाणी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये गेले. सध्या ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता कदम यांनी टोलेबाजी केली. 'शिवसेनेत मोठा होऊन फळे चाखून बाहेर गेलेला आता आपल्या विरोधात उभा आहे. त्याच्या छाताडावर बसा. सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डात भगवा फडकवून औरंगाबाद हे शिवसेनाप्रमुखांचेच आहे, हे पुन्हा एकदा सिध्द करा. देवळाई रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपयांचा निधी दिला. यापुढेही विकास कामे केली जातील,' असे आश्वासन त्यांनी दिले. खासदार खैरे यांचेही यावेळी भाषण झाले. सातारा देवळाई हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या भागातील शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार निवडून देऊन हा बालेकिल्ला अभेद्द ठेवा असे आवाहन त्यांनी केले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला सोमवारी नोटीस बजावणार

$
0
0


औरंगाबाद ः समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला महापालिका सोमवारी नोटीस बजावणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने दिलेल्या आदेशानुसार ही नोटीस बजावली जाईल.
२१ मार्च रोजी मुंबईत बैठक झाली. त्यात चौकशी समितीचे प्रमुख संतोषकुमार यांनी पालिकेला निर्देश देताना महापालिकेने कंपनीला नोटीस बजवावी असे सांगितले होते. संतोषकुमार यांचे निर्देश प्राप्त झाल्यावरही पालिकेतर्फे नोटीस बजावण्यात येत नव्हती. विधीसल्लागार, लेखाविभाग यांच्याशी समन्वय साधून नोटीस तयार करण्याचे काम सुरू होते. शनिवारी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सुमारे सात पानाची नोटीस तयार केली. तयार करण्यात आलेली नोटीस अंतिम मंजूरीसाठी सायंकाळी आयुक्तांकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोटीसच्या मसुद्याला आयुक्तांनी मंजूरी दिल्यावर सोमवारी कंपनीला नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरला मागितली साडेतीन लाखांची खंडणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जाहिरात देण्यास नकार देणाऱ्या बिल्डराला बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध करेल, अपहरण करू अशी धमकी देत साडेतीन लाखांची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरुन नरेश वसंत खोचे (रा. सातारा) विरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय बोडखे (शिवशंकर कॉलनी) असे फिर्यादीचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. देवळाई गट क्रमांक १३७ व १३८ मध्ये गुरू शिष्य प्रांगण नावाचा गृह प्रकल्प ते उभारत आहेत. या गृहप्रकल्पाची दोन लाखांची जाहिरात साप्ताहिकात द्यावी, अशी मागणी खोचे याने केली होती. त्यास फिर्यादीने नकार दिला. तेव्हा खोचे याने फोन करत साडेतीन लाख रुपये द्या, अन्यथा वर्तमानपत्रात बदनामी करून चारित्र्य हनन करू, अपहरण करू, अशी धमकी दिल्याचे बोडखे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरुन खोचे विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>