Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बाथ्री तेली समाजाची राजेशाही वाटचाल!

$
0
0


Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
बाथ्री तेली समाज प्रामुख्याने बुंदेलखंडचा. राजा-महाराजांच्या सैन्यासोबत हा समाज महाराष्ट्रात आला आणि नंतर इथेच स्थायिक झाला. लढाईत तलवार चालवण्याबरोबरच काही लोक सैन्याच्या पोटपाण्याची व्यवस्था पाहात. त्यासाठी तेल-पाणी, घासलेट, मीठ-मिरची याची व्यवस्था हे लोक करत. प्राचीन व मध्ययुगात तेली लोक सैनिक व सेनापती होते. काही काळ शासक म्हणूनही त्यांनी राज्य केले. बुंदेलखंडातील उच्चहार येथील परिहार राजवंशज शासक लोक तेली समाजातील होते. मध्य प्रांतातील चेदिराजा गांगेय देव हे तेली समाजाचे होते. बुंदेलखंड, बघेलखंड आदी भागांवर शेकडो वर्षे तेली समाजाने राज्य केले होते. आजच्या समाजमनमध्ये ही वेधक वाटचाल.
राजे-महाराजांचा काळ संपला आणि बाथ्री तेली समाजाने तेलाचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. पहिल्या शतकातील शिलालेखांच्या आधारे तेली लोक हे श्रीमंत व मोठे व्यावसायिक होते असे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील तेली समाजाचे आचारविचार आणि रुढी, प्रथा, परंपरा बहुजन समाजासारख्याच आहेत. राज्यात तेली समाजाच्या २८ पोटशाखा आहेत. त्यात पंचम किंवा लिंगायत, कानडे, लाड, गुजर, अयार, कडू किंवा अकरमासे, कंडी, राठोड, परदेशी, तिळवण, गंधी अशांचा समावेश आहे. तिळवण किंवा मराठे तेली या पोटजातींची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे. देशात सातशेपेक्षा अधिक पोटजाती आहेत. मराठा तेली, देशकर तेली, क्षत्रिय तेली, एरंडेल तेली, बाथ्री तेली, साव तेली, सावजी तेली, छत्तीसगडी तेली, साहू तेली, हालिया तेली, साडिया तेली, चौधरी तेली आदी उपशाखा आहेत.
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, परतूर, उंडणगाव या ठिकाणी बाथ्री तेली समाजाची मोठी संख्या आहे. हा समाज प्रामुख्याने शहरी भागात अधिक दिसून येतो. विखरुलेला समाज असल्याने एकत्रीकरण करणे हेच मोठे आव्हान या समाजासमोर आहे. बाथ्री तेली समाज संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येतात, असे संघटनेचे अध्यक्ष अनिल मकरिये यांनी सांगितले.
पारंपरिक तेलाच्या व्यवसायाची घसरण सुरू झाली. तसेच अन्य समाजातील मंडळी या व्यवसायात उतरली. त्यांनी यात आधुनिकता आणली. ऑइल मिल सुरू केल्या. त्याचा मोठा फटका बाथ्री तेली समाजाला बसला. तेलाचा व्यवसाय बंद करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच राहिला नाही. तेलाच्या व्यवसायात फायदा होत नसल्याने या समाजातील मंडळींनी क्षमतेप्रमाणे अन्य व्यवसाय सुरू केले. सोने-चांदी, बांधकाम क्षेत्र, प्लॉटिंग, हॉटेल्स, किराणा दुकान अशा व्यवसायाकडे बाथ्री तेली समाजातील मंडळींचा कल वाढला, असे मकरिये यांनी सांगितले.
बाथ्री तेली समाजात पूर्वी शिक्षणाचे प्रमाण खूप कमी होते. दहावीपर्यंत शिक्षण होत होते. तेलाचा व्यवसाय घरोघरी असल्याने पारंपरिक व्यवसायच मुलांनी करावा असा पालकांचा आग्रह असे. त्यामुळे शिक्षणापेक्षा घरचाच व्यवसाय करण्याकडे त्यांचा कल असायचा, पण तेलाचा व्यवसाय बंद झाल्यानंतर बाथ्री तेली समाजातील युवा पिढीचा शिक्षणाकडे कल वाढला. वैद्यकीय, इंजिनीअरिंग, आयटी अशा विविध क्षेत्रात बाथ्री तेली समाजातील युवा पिढी हिरारीने पुढे आहे. मुलांबरोबरच मुलीही शिक्षणात आघाडीवर आहेत. उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. उच्चशिक्षितबरोबरच चांगला पगार, नोकरी याला प्राधान्य दिले जात आहे. विदेशातही या समाजातील युवा पिढी करिअर घडवताना दिसत आहे.
बाथ्री तेली समाज भवन
बाथ्री तेली समाज संघटनेतर्फे दरवर्षी वधू-वर परिचय मेळावा तसेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. जुना मोंढा भागात बाथ्री तेली समाज भवन उभारण्यात आले आहे. वीस हजार स्वेअर फूट आकाराच्या या भवनात समाजाचे विविध कार्यक्रम नियमित होत असतात. समाजातील लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांना अत्यंत माफक दरात हे उपलब्ध करून दिले जाते, असे संघटनेचे अध्यक्ष अनिल मकरिये यांनी सांगितले.
रक्षाबंधन सणाला अधिक महत्त्व
बाथ्री तेली समाजात सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात. मात्र, राखी पौर्णिमा सण हा दिवाळीपेक्षाही अधिक उत्साहाने साजरा केला जातो. पूर्वी लग्न समारंभ सात-आठ दिवस चालायचे. आता ही प्रथा एक दिवसावर आणण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. औरंगाबाद बाथ्री तेली समाज संघटनेची कार्यकारिणीः अध्यक्ष अनिल मकरिये, उपाध्यक्ष सुरेश बसैय्ये, सहउपाध्यक्ष संजय बसैय्ये, सरचिटणीस नीलेश पुरे, सहसचिव जयकुमार महतोले, सदस्य रामदास मकरिये, राजकुमार सरवय्ये, सतीश मकरिये, अशोक बसैय्ये, जितेंद्र बसैय्ये, सुरेश गुरुभय्ये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दर्जेदार रस्ते, स्वच्छ शहराला प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दर्जेदार रस्ते आणि स्वच्छ शहराला आपण प्राधान्य देणार आहोत असे सांगत महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कृती कार्यक्रम जाहीर केला. 'मटा संवाद'च्या निमित्ताने त्यांनी 'मटा'मधील संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सूत्रे स्वीकारल्यावर त्यांनी प्रथमच 'मटा' कार्यालयाला भेट देऊन महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. शहर विकासासाठीच्या कल्पना मांडताना ते म्हणाले की, औरंगाबाद पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे, त्यामुळे त्याचे वेगळेपण पर्यटकांच्या लक्षात कायम राहिले पाहिजे अशी आपली इच्छा असून त्या दृष्टीने काम करणार आहे.

चांगले रस्ते, नियमित पाणीपुरवठा व चांगली ड्रेनेज सिस्टीम या बाबी नागरिकांना हव्या असतात, त्यामुळे या तिन्हीही पातळीवर काम करण्याचे आपण ठरवले आहे. पर्यटनाचे शहर असल्यामुळे या शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत यासाठी आपण विशेष लक्ष देणार आहोत. विमानतळ, रेल्वेस्टेशन किंवा बसस्टँडमधून बाहेर पडणाऱ्या पर्यटकाला चांगले रस्ते आणि स्वच्छतेचे दर्शन झाले तर, त्याच्या मनात या शहराबद्दल चांगली प्रतिमा निर्माण होईल, त्या दृष्टीने काम करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे बकोरिया यांनी सांगितले.

महत्त्वाचे रस्ते, चौक, उड्डाणपूल, पर्यटन स्थळांचा परिसर स्वच्छ असावा याकडे महापालिकेची यंत्रणा लक्ष देईल, असे ते म्हणाले. 'मटा'चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी बकोरिया यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येयवेड्या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांची साथ

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद : पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळा ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यानंतर आता कृतियुक्त अध्ययन पद्धती (एबीएस) शाळा करण्यासाठी एका ध्येयवेड्या मुख्याध्यापकाने पुढाकार घेतला. आपल्या पाल्यांमध्ये झालेली सुधारणा पाहून खूष झालेल्या पालकांनी केवळ एका आवाहनावर पहिल्याच पालक सभेत १६ हजार रुपये जमवून या शिक्षकांच्या प्रयत्नांना बळ दिले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही शाळा मराठवाड्यातील पहिली एबीएस शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मुलांच्या शाळेत गेल्या नोव्हेंबरपासून शैक्षणिक क्रांती झाली आहे. मुख्याध्यापक बी. एन. काळोखे यांनी कुमठे बीटमधील (जि. सातारा) ज्ञानरचनावाद अभ्यासक्रम पाहिल्यानंतर २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिली ते चौथीच्या १६२ विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती सुरू केली. चार शिक्षक आणि काळोखे सरांनी पाहता पाहता शाळेत बदल केले. महिनाभरात बदल पाहून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही अचंबित झाला. चार महिन्यांत जिल्ह्यातील ५५ शाळांच्या शिक्षकांनी या शाळेला भेट दिली. काळोखे सर प्रयोगशील व्यक्तिमत्व. पुणे जिल्ह्यात शासन अनुदानाने कृती युक्त अध्ययन पद्धती राबविली जाते. तेथील १३०० शाळांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. ज्ञानरचनावादापाठोपाठ एबीएस शाळा करण्यासाठी काळोखेंनी पुढाकार घेतला. पुण्यात जाऊन ही पद्धती समजून घेतली आणि ३० मार्च रोजी परतल्यानंतर पालकसभा बोलाविली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी विचारणा केल्यानंतर सर्व पालक समाधानी होते. पुढचा टप्पा एबीएस शाळेचा करावयाचा असून त्यासाठी ४० ते ५० हजार रुपये लागणार आहेत. आपल्याकडे कुठलेही अनुदान नाही. लोकसहभागातून आपल्याला हे करता येईल, असे आवाहन त्यांनी केले. जमलेल्या पालकांनी तत्काळ प्रतिसाद दिला आणि १२ हजार रुपये जमले.

वीटभट्टीवर काम करणारे ज्ञानेश्वर सुपेकर यांनी त्यांच्या पहिलीत असलेल्या मुलाची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला आणि पाचशे रुपये योगदान दिले. दोन दिवसांत आणखी चार हजार रुपये जमले. पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी एबीएसचे साहित्य आणण्यासाठी रक्कम कशी जमणार, हा प्रश्न होता. काळोखेंनी हे साहित्य पुरविणाऱ्यास ही अडचण बोलून दाखविली. जिल्हा परिषदेचा एक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी एवढा पुढाकार घेतोय, हे पाहून या पुरवठादाराने कमी रकमेत साहित्य देण्याचे मान्य केले आहे. उर्वरित रक्कम लवकरच जमेल, असा काळोखेंना विश्वास आहे. १७ जून २०१६ रोजी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. यादिवशी ही शाळा एबीएस होईल आणि ती मराठवाड्यातील कदाचित पहिलीच शाळा ठरेल. ११ ते ३० एप्रिल दरम्यान शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल त्यातून एबीएसची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत मिळणार आहे.

ज्ञानरचनावादानंतर कृतियुक्त अध्ययन पद्धतीसाठी मी आग्रही आहे. गावकऱ्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. उर्वरित रक्कम लवकरच लोकसहभागातून जमा होईल. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे.

- बी. एन. काळोखे, मुख्याध्यापक, झेडपी शाळा, लासूरगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोर्डाचे विभागीय अध्यक्ष डेरे निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी उत्तरपत्रिका फेरलेखन घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे औरंगाबादचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण उपसंचालक असताना पूर्वलक्षी प्रभावाने, नियमबाह्य शिक्षकांच्या नेमणूका केल्याचे प्रकरण त्यांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे. मंडळातील कारभाराबाबतही त्यांच्या अनेक तक्रारी होत्या. निलंबनाचे आदेश आल्यानंतर शनिवारी विविध संघटनांनी बोर्ड कार्यालयासमोर फटाके वाजवित आनंद व्यक्त केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपसंचालक असताना डेरे यांनी दिलेल्या नियमबाह्य नियुक्तींचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेषतः पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मंडळातील कारभाराविषयीही विविध संघटनांनी सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेचे संचालक एस. के. घोनमोडे यांच्याकडे सध्या डेरे यांचा अधिभार देण्यात आला आहे.

दोन वर्षे उपसंचालक

डेरे उपसंचालक म्हणून ४ डिसेंबर २०१२ रोजी रूजू झाले. १७ जानेवारी २०१४ नंतर त्यांनी विभागीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. उपसंचालक असताना त्यांनी २५पेक्षा अधिक कॉलेजांमधील अनेक शिक्षकांना नियमबाह्य नियुक्ती दिल्याच्या तक्रारी होत्या.

उपसंचालक असताना त्यांनी आरक्षण डावलत, नियमबाह्य शिक्षकांना मान्यता दिल्या, चुकीच्या सचंमान्यता, शिक्षक, चालक भरती केल्याचे आरोप विविध संघटनांनी केले होते. 'जोशाबा'चे संजय शिंदे यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर नाशिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डी. बी. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली. त्यांनी ज्या ज्युनिअर कॉलेजांमधील नेमणुकांबाबत आक्षेप घेण्यात आला होता, त्यातील काही कॉलेजांच्या संचिका मागवून घेत, तपासणी केली. यात नियमबाह्य काम झाल्याचे आढळल्याचे बोलले जात आहे. समितीने मार्च-एप्रिल २०१४ दरम्यान सरकारला अहवाल सादर केला. मागासवर्गीय शिक्षक-अधिकारी-कर्मचारी महासंघ, फकिरा ब्रिगेड, मुप्टा अशा संघटनांनी डेरे यांच्याविरोधात वारंवार निवेदने दिली.

उपसंचालक असताना ढेरे यांनी दिलेल्या नियुक्त्यांमध्ये नियमबाह्य काम झाल्याच्या तक्रारी होत्या. चौकशी समितीच्या तपासणीत ते दोषी आढळले. समितीच्या अहवालानुसारच ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- डॉ. पुरूषोत्तम भापकर, शिक्षण आयुक्त, पुणे

डेरे यांच्या अनियमित कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून शासनाकडे तक्रारी केल्या. त्यांनी दिलेल्या नियुक्तींची माहितीही माहिती अधिकारात देण्यात आली नाही. शिक्षण व्यवस्थेतील अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे निलंबन ही चांगली बाब आहे, परंतु याला विलंब झाला.

- संजय शिंदे, अध्यक्ष, जोशाबा शिक्षक,कर्मचारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी खासदार अंकुशराव टोपे यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । जालना

जालना येथील माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज पहाटे चेन्नईतील रुग्णालयात निधन झाले. माजी मंत्री राजेश टोपे यांचे ते वडिल होत.

त्यांचे पार्थिव विमानाने दुपारी औरंगाबाद विमानतळावर आणण्यात येईल. त्यानंतर जालना येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तेथून अंबड येथे नेण्यात येणार आहे. संध्याकाळी समर्थ सहकारी साखर कारखान्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. कारखान्याच्या परिसरात सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अंकुशराव टोपे यांनी मोठे कार्य केले होते. त्यांच्या जाण्यानं सामाजिक-राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक घटली; फळभाज्यांनी गाठली शंभरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद तालुका व जिल्ह्यातून काही भाज्यांची आवक एकदम घटली असून नाशिकहूनही गेल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम फळभाज्यांनी सुमारे शंभरी गाठण्यावर झाला आहे. पालेभाज्या १० ते १५ रुपये जुडी यादराने विकल्या जात आहेत. उन्हाळ्याचा हा परिणाम असल्याचे सिडको येथील भाजीविक्रेते जर्नादन जाधव यांनी सांगितले.
किरकोळ बाजारात औरंगपुरा व सिडको येथे गेल्या आठवड्यात भाज्या ३० ते ४० रुपये किलो होत्या. रविवारी भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ९० ते १००रुपयांवर आहेत. विशेषत: गिलके, दोडके, वांगी, दुधी, गवार यांचे दर तर, अगदीच आवाक्याबाहेर गेले की काय, अशी परिस्थिती आहे. नाशिक, यावल, अहमदनगर, सिल्लोड, खुलताबाद आदी भागातून येत असलेल्या भाजीपाल्याची आवक उन्हामुळे मंदावली आहे. टमाटे, कांदे, बटाटे सुमारे १० ते २० रूपये किलो या दरात उपलब्ध आहेत. काही ठिकाणी याचे दर २५ ते ३० रुपये किलो असले तरी इतर भाज्यांच्या तुलनेत हे स्वस्त आहेत. हिरवी मिरची, फ्लॉवर, शिमला मिरची, भेंडी, सुमारे ७० ते ८० रुपये किलोने विकले जात आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रु पये जुडी यादराने मेथी, पालक आणि कोथिंबीर विकल्या गेल्या. औरंगाबाद शहरात आजूबाजूच्या गावातून भाजीची आवक सुरू असली तरी ती आवक तुरळक आहे. उन्हाचा तडाखा बसत असल्याने भाववाढ झाल्याचे जयभवानीनगर येथील सोमनाथ महाजन यांनी सांगितले. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटल्याने भाववाढीचा फटका आता ग्राहकांना बसू लागला आहे, असे औरंगपुरा येथील सुशिलाबाई खोबरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांना लुटणारी टोळी गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावीर चौकात रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या चौघांना क्रांतिचौक पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली. रविवारी पहाटे अडीच वाजता हा प्रकार घडला. या टोळीने सिडको, रेल्वे स्टेशन येथील देखील रिक्षाचालकांना लुबाडण्याच्या घटना घडल्या.
यशपाल गणपतसिंह ठाकूर (वय २२ रा. भोईवाडा) हा तरुण रिक्षाचालक आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता महावीर चौकात तो प्रवाशांची वाट पाहत उभा होता. यावेळी रिक्षा (क्रमांक एमएच २० डीसी २२४७) या रिक्षामध्ये पाच तरुण त्याच्याजवळ आले. हे सर्व मद्यधुंद होते. यशपालला शिवीगाळ करीत व चाकूचा धाक दाखवत त्यांनी त्याच्या जवळचे १२०० रुपये हिसकावून पलायन केले. यशपालने आरडाओरड केल्याने ‌इतर रिक्षाचालक त्याच्या मदतीला धावून आले. यावेळी प्रवीण पवार याला पकडण्यात रिक्षाचालकांना यश आले. मात्र, उर्वरित आरोपी रिक्षामध्ये पसार झाले. क्रांतिचौक पोलिसांना हा प्रकार कळवण्यात आला. डिबी स्क्वॉडचे पथक यावेळी रात्रपाळीच्या पेट्रोलिंगला होते. त्यांना हा प्रकार कळताच त्यांनी महावीर चौकात धाव घेतली. आरोपी सिडको बसस्टँडकडे गेल्याची माहिती त्यांना मिळाली. सिडको बसस्टँड गाठून रिक्षाचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये प्रवीण मगन पवार, प्रीतम ज्ञानेश्वर साळवे, लहू रमेश चव्हाण उर्फ झगऱ्या व कृष्णा सुधाकर पवार (सर्व रा. मुकुंदवाडी परिसर) यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नीतेश इंद्रोले, शेख रहीम, मुनीर पठाण, दीपक कोलमी, विशाल पाटील, सतीश जाधव व इंगोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बावीस प्रतिज्ञा म्हणजे सत्यदर्शन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'भाग्य नशीब, पुढचा जन्म, मागचा जन्म, पुनर्जन्म बौद्ध धम्मात नाही. बौद्ध म्हणजे सर्व कर्मविपात, संचित, ठरलेला आहे. पाप-पुण्यापासून मुक्त करणे हे बावीस प्रतिज्ञे काम आहे. बावीस प्रतिज्ञां अभियान म्हणजे विज्ञान व सत्यदर्शन आहे. हे अभियान प्रत्येक नागरिकापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन सहायक प्राप्तीकर आयुक्त अरविंद सोनटक्के यांनी व्यक्त केले.
महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात रविवारी आयोजित 'दलित नाही बौद्ध म्हणा अभियान' या कार्यक्रमातते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक गबरूसिंग राठोड, डॉ. अरविंद गायकवाड, चंद्रभान पारखे, बाबा गाडे, अनिलकुमार सोनकामळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
'मानव निर्मितीमागे कोणताही ईश्वर नाही. पण अनेक जण ईश्वराने जग तयार केल्याचे सांगतात. पण ईश्वरा कोणी तयार केले, याचे उत्तर कोणीही देत नाही. मानवाची निर्मिती उत्क्रांतीतून झाली आहे; तसा ऱ्हासही होणार आहे. तथागत गौतम बुद्ध यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी परमेश्वरांने नसल्याचे सांगितले. बौद्ध हा ईश्वरांची संकल्पना मानत नाही. बौद्ध विज्ञानाचा पाईक आहे. दलित हा सदैव गोंधळलेला असतो. तो आजारी पडला की तांत्रिक-मांत्रिकांची मदत घेतो,' असे सोनटक्के यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुकुंद सोनवणे, प्रवीण जाधव, भीमसेन कांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय लिखाणाची गरज :बोराडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मराठी साहित्यात राजकीय लिखाण अभावानेच दिसते. राजकारण व सहकारावर प्रामाणिकपणे लिखाण करणे आवश्यक आहे. राजकारणाचा नेमका परामर्श घेणारे डी. के. पवार यांचे लिखाण वास्तववादी आहे' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी केले. पवार यांच्या कादंबरीचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.
डॉ. डी. के. पवार लिखित 'राजकारणाचा सारीपाट', 'सत्तासंषर्घ' व 'सत्तासम्राज्ञी' या तीन कांदबऱ्यांचे रविवारी हॉटेल रामगिरी येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, कवी प्रा. फ. मुं. शिंदे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ. वि. ल. धारूरकर आणि डॉ. डी. के. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोराडे म्हणाले, 'सहकार व राजकारणावर पुरेसे लिखाण नाही. मराठीत राजकीय कथा, कांदबरी, नाटकांची संख्या कमी आहे. राजकारणाचा तिटकारा किंवा समर्थन त्याचे कारण असावे. अटीतटीच्या राजकारणाच्या वाटा सहजसोप्या नसून गुंतागुतीचा विषय आहे. राजकारणाच्या अंतरंगात शिरून लेखन करता आले पाहिजे. ही मानसिकता मराठी लेखकांमध्ये शिल्लक नाही. राजकारणाचे आकलन झाल्याशिवाय लिहिता येत नाही.' कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांनी राजकीय लिखाणावर भाष्य केले. 'भारतीय लोकशाहीत सत्तापालट व राजकारणाचा अंदाज नसतो. जनता दलाकडून निवडणूक लढवल्यानंतर खूप शिकलो. निवडणूक लढविल्याशिवाय लोकप्रियता कळत नाही आणि पडल्याशिवाय लोकप्रियता लक्षात येत नाही. बारकावे समजल्याशिवाय लेखनाच्या मुळाशी जाता येत नाही' असे प्रा. शिंदे म्हणाले. राजकीय, सहकार आणि सामाजिक चळवळीत झोकून देऊन प्रत्यक्ष अनुभवातून कादंबरी लेखन झाल्याचे प्रा. धारूरकर म्हणाले. गुरुजनांच्या प्रोत्साहनामुळेच लेखन करू शकलो, अशी भावना लेखक डॉ. डी. के. पवार यांनी व्यक्त केली. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्यास जलफेरभरणाचा

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
औरंगाबाद ः पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची यंत्रणा नसल्यामुळे बोअरवलची पाणी पातळी खालावली आहे. जमिनीत पाणी मुरवण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करण्याचे प्रयत्न वाढले आहेत; मात्र, छतावरील पाण्याचे पुनर्भरण करण्याबाबत कमालीची उदासीनता आहे. या प्रयोगामुळे अनेक रहिवाशांना भर उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाले आहे. तर इतर परिसरात पाण्याचा ठणठणाट आहे.

चार वर्षांपूर्वी ऐन दुष्काळात शहरी भागात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत जनजागृती करण्यात आली होती. सातारा परिसरात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे अनेक सोसायट्यांनी जल पुनर्भरणासाठी पुढाकार घेतला होता. राजधानी कॉलनी, नंदनवन कॉलनी, सम्राटनगर, पेशवेनगर, छत्रपतीनगर, रेणुकापुरम वसाहतींनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' अवलंबले. या प्रयोगाचा त्यांना विशेष फायदा झाला, मात्र मागील दोन वर्षे या प्रयोगाबाबत उदासीनता आहे. यंदा पाणी टंचाई तीव्र झाल्यानंतर पुन्हा एकदा 'रेन वॉटर'चा बोलबाला सुरू आहे. 'घर तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग' करण्यासाठी सामाजिक संस्था सक्रिय झाल्या आहेत. पावसाळ्यात पुरेसे पाणी जमिनीत मुरल्यास फेब्रुवारी-मार्चपर्यंत पाणी कायम असते. छतावरील पाणी, घरासमोरील पाणी आणि रस्ते-मैदानावरील पाणी मुरवणे शक्य आहे. हा प्रयोग केल्यानंतर सोसायट्यांना फायदा झाला आहे. सातारा परिसरात प्रत्येक शंभर फुटांनंतर एक बोअर असून, जवळपास एक लाख बोअरवेल आहेत. त्यामुळे जल पुनर्भरणाची गरज अधिक आहे. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' खर्चिक काम नाही. केवळ जागरुकता नसल्याने अनेकजण ही यंत्रणा कार्यान्वित करीत नाही. उन्हाळ्यात काम पूर्ण केल्यास पावसाळ्यात पाणी मुरण्यास सुरुवात होते. प्रत्येक घरात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सोसायटीत जागरुकता
आपल्या सोसायटीत 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' करण्याबाबत जागरुकता वाढली आहे. चेतनानगर, प्राइड इग्निमा सोसायटी, रामतारा सोसायटी, झांबड इस्टेट, महाजन कॉलनी, रेणुका सोसायटी, उल्कानगरी अशा काही सोसायट्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. लाखो लिटर पाणी सहज उपलब्ध झाल्यामुळे शेकडो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. इतर वसाहतींनी या प्रयोगासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

संस्थांचा पुढाकार
'रेन वॉटर हार्वेस्टिंग'साठी मोठ्या शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. देवगिरी महाविद्यालयात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाविद्यालयात परिसरातील विहिरींचे पुनर्भरण केल्यामुळे वर्षभर मुबलक पाणी असते. फक्त उन्हाळ्यातील दोन महिने सार्वजनिक पाणी पुरवठ्यावर अवलंबून असतात. मौलाना आझाद कॉलेजमध्येही हा प्रयोग यशस्वी झाला आहे. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'मुळे महाविद्यालयात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

आमच्या सोसायटीत ७८ कुटुंब राहतात. दोन वर्षांपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. या प्रयोगाचा खूप फायदा झाला आहे. गच्चीवरील पाण्याचे पुनर्भरण करण्यात आले. पाऊस कमी असल्यामुळे खूप पाणी नसले तरी २५ टक्के फायदा झाला आहे.
- शैलेश पत्की, प्राइड इग्निमा सोसायटी, गारखेडा

हा प्रयोग केल्यानंतर पाणी टंचाई जाणवली नाही. गच्चीवरील व आजुबाजुचे पाणी जमिनीत मुरवण्यावर भर असतो. आंघोळीचे पाणीसुद्धा जमिनीत मुरवतो. कमी व्यासाच्या बोअरचे लवकर पुनर्भरण होते. गार्डनजवळ मोठा खड्डा खोदून पुनर्भरणाचा प्रयोग केला.
- डॉ. विकास रत्नपारखी, उल्कानगरी

सातारा परिसरात किमान एक लाख बोअर आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर बोअरला मार्च महिन्यापर्यंत पाणी असते. हा प्रयोग करण्यापूर्वी भूशास्त्र विभागाचा मोफत तांत्रिक सल्ला घेणे गरजेचे आहे. प्लम्बिग असोसिएशनसुद्धा सवलतीच्या दरात सेवा पुरवतात.
- डॉ. अशोक तेजनकर, जल अभ्यासक

रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे पाणी टंचाई कधीच जाणवत नाही. पुनर्भरण केल्यामुळे माझ्या घरातील बोअरची पाणी पातळी वाढली. परिसरातील दोन बोअरलासुद्धा फायदा झाला. छतावरचे पाणी फिल्टर करून बोअरजवळ मुरवल्यानंतर बारा महिने भरपूर पाणी असते.
- श्रीकांत धांडे, रामतारा सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छताच्या आकारावर खर्च अवलंबून

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शंभर चौरस मीटरला दहा हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अपार्टमेंट, वसाहतींच्या तुलनेत स्वतंत्र बंगल्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी जास्त खर्च करावा लागतो, असे रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.

घराच्या छताचा आकार १०० चौरस मीटर असेल तर, वर्षभरात पावसाचे सुमारे ६० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. हे जमिनीत मुरविण्यासाठी दोन पद्धती आहेत, असे शहागंज येथील प्लंबर सुदाम पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, या दोन पद्धतींचे नावे झिरप खड्डा आणि कुपनलिका पुर्नभरण असे आहे.

झिरप खड्डापद्धत ही पाणी साठविण्याची साधी, सोपी पद्धत आहे. शिवाय या पद्धतीला खर्चही कमी येतो. खड्ड्यासाठी ५०० ते १००० रुपये खर्च येतो. हीच पद्धत वापरून प्लॉटवर पडणारे पाणीही आपण साठवू शकतो. प्लॉटला उतार असेल, तर झिरप खड्ड्याऐवजी झिरप चर तयार करावा. त्यातून पाणी जमिनीत मुरविले जाते. यासाठी अंदाजे अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो. चर, खड्याच्या आकार, खोलीवर खर्च अवलंबून आहे.

बोअर पुनर्भरण पद्धतीत, पावसाचे पाणी अपार्टमेंट किंवा सोसायटीतील बोअरवेल किंवा विहिरीत गाळून सोडावे. ते पाणी उन्हाळ्यात उपलब्ध होऊ शकतो. एखाद्या भागात कोरडा पडलेल्या बोअर किंवा विहिरी हे पाणी सोडावे. त्यामुळे एक-दोन वर्षांत जलस्त्रोत पुन्हा जिवंत करणे या पद्धतीने शक्य होते. रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी ८० हजारांपर्यंत खर्च येतो. घराच्या रचनेप्रमाणे खर्च कमी-जास्त होतो, अशी माहिती त्यांनी दिली.

रेन वॉटर हार्वेस्टिंगला लागणारे साहित्य
पाइप, फिल्टर, प्लंबिग साहित्य, मोटर, मशीन आणि चर खोदण्याचे साहित्य लागते. फिल्टरचा खर्च अधिक असतो. घराच्या, अपार्टमेंटच्या उंचीवर पाइपचा खर्च अवलंबून असतो. लागत असतात. एकूण खर्च कमीतकमी सुमारे २० हजार ते ८० हजारापर्यंत जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियुक्त्यांची माहिती लपविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बोर्डाचे तत्कालिन विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांच्या निलंबनाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिक्षण उपसंचालक असताना पूर्वलक्षी प्रभावाने, शिक्षकांच्या नियबाह्य नेमणुका केल्याचे प्रकरण त्यांच्या अंगलट आल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नियुक्तींच्या माहितीसाठी डॉ. संजय शिंदे यांनी एकाकी लढा दिला. सहसंचालक कार्यालयाने आपल्याला माहिती दिली नाही, चौकशी समितीचा अहवालही दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बारावी उत्तरपत्रिका फेरलेखन घोटाळ्यामुळे शिक्षण मंडळ चर्चेत आहे. त्यात शनिवार (३ मार्च) रोजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांच्या निलंबनाचे आदेश आले. उपसंचालक असताना डेरे यांनी दिलेल्या नियमबाह्य नियुक्तीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सूत्रांनी सांगितले. डेरे यांनी अनेक संस्थांत नियमबाह्य मान्यता दिल्याची तक्रार विविध संघटनांनी केली होती. त्यात 'जोशाबा' शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचे डॉ. संजय शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांनी डेरे यांनी आपल्या कार्यकाळात किती नियुक्ती केल्या, त्याची टिपणीसह माहिती मिळावी म्हणून माहिती अधिकारात अर्ज केला, परंतु त्यांना त्याचे उत्तर मिळाले नाही. त्यांनी पाठपुरावा सोडला नाही.

तक्रारीनंतर डी. बी. जगताप यांची चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीत दोषी ठरविल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले, परंतु या चौकशी समितीचाही अहवाल डॉ. शिंदे यांना दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ज्युनिअरच्या शिक्षक मान्यतेचे अधिकार
प्राथमिक शिक्षक नियुक्तीचे अधिकार प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्तीचे अधिकार माध्यमिक शिक्षकांना तर, शिक्षण उपंचालक स्तरावर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या नियुक्तीचे अधिकार आहेत.

डेरे यांच्या उपसंचालक असतानाच्या कार्यकाळात किती शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्याची टिपणीसह माहिती देण्यात यावी, अशी मी रितसर मागणी केली, परंतु माहिती दडविण्यात आली. जगताप समितीच्या अहवालाबाबतही असेच झाले. उपसंचालक, संचालक, मंत्रालय स्तरापर्यंत मी माहितीसाठी दाद मागितली.
- डॉ. संजय शिंदे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरिअन पर्यटकाला जेवायला बोलावून गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरिअन पर्यटकाला जेवायला बोलावून त्याचे १ लाख २५ हजार रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले. गुरुवारी दुपारी अमर‌प्रीत हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जियाँग सेहूई जियाँग टिक पंग (वय २८, रा. कोरिया) हा तरूण गेल्या आठवड्यात पर्यटनासाठी शहरात आला आहे. महावीर चौकातील युथ हॉस्टेल येथे तो थांबला आहे. गुरुवारी दुपारी पद्मपुरा भागात जियाँग रस्त्यावर सैरावैरा ‌पळत होता. नागरिकांनी ही बाब नियंत्रण कक्षाला कळविली. नियंत्रण कक्षाने क्रांतिचौक पोलिसांना ही घटना कळवली. पोलिसांनी जियाँगला ताब्यात घेतले. त्याची प्रकृती बरी नसल्याने त्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

शनिवारी त्याला डिसचार्ज दिल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आपले सामान चोरीस गेल्याची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार; जियाँगची ऑनी नावाच्या तरुणासोबत मुंबईला ओळख झाली होती. ऑनीने गुरुवारी जियाँगला फोन करून अमरप्रीत हॉटेल येथे बोलावून घेतले. या दोघांनी दुपारी जेवण केल्यानंतर ज्युस घेतला. यादरम्यान ऑनीने जियाँगचे एक हजार डॉलर, स्वीस कंपनीचे घड्याळ, सोन्याची अंगठी, पाकिट असा १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी जियाँगने दिलेल्या माहितीवरून संशयित आरोपी ऑनीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार घोरपडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बस, टँकरच्या वेगाला वेसण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अपघात रोकण्यासाठी स्कूल बस, टँकर, डंपर यांच्या वेगाला सरकारने लगाम घातला आहे. स्कूल बस, धोकादायक रसायनाची वाहतूक करणारी वाहने, डंपर आणि टँकर आदी वाहनांवर वेग नियंत्रक यंत्रणा बसविण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात आली आहे. छोट्या आकाराच्या वाहनांना या नियमापासून मुक्त ठेवले आहे.

आरटीओ विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार; केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत परिवहन संवर्गातील वाहनांसाठी वेग नियंत्रक (स्पीड गर्व्हनर) बसविण्याचे आदेश देण्यात आले आहे. या अधिसूचनेनुसार परिवहन सवंर्गातील एन-१ आणि एम-२ संवर्गातील वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणीकृत भारवहन क्षमता ३.५ टनांपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची आसन क्षमता ५ टनापेक्षा कमी आहे, अशा वाहनांना या आदेशामधून सूट देण्यात आली आहे. आयएएस - ०१८/२००१नुसार वेग नियंत्रक लावावेत. स्पीड गर्व्हनर लावल्याशिवाय वाहनाची पासिंग करण्यात येणार नाही, असेही आदेश आरटीओ विभागाने दिले आहे. स्पीड गर्व्हनर नसल्यास फिटनेस नाही

सरकारच्या आदेशानुसार वाहनांना वेग नियंत्रक यंत्रणा बसविणे बंधककारक करण्यात आले आहे. अधिकृत कंपनी किंवा सेवा पुरवठादाराकडून ही यंत्रणा बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही यंत्रणा बसविल्याचे प्रमाणपत्र सादर करावे आणि वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे. स्पीड गव्हर्नर नसल्यास फिटनेस प्रमाणपत्रम मिळणार नाही, असे आरटीओ सर्जेराव शेळके यांनी सांगितले.

केंद्र शासनाने ट्रान्सपोर्टर गाड्या, कंपन्यांच्या गाड्यांना स्पीड गव्हर्नर बसविण्याचा निर्णय अचानक जाहीर केला आहे. या निर्णयामुळे पूर्वी एक हजार रुपये किंमतीला मिळणारी स्पीड गव्हर्नर यंत्रणा आता २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. दुष्काळामुळे या व्यवसायासमोर संटक आहे. गाड्यांचे हफ्तेही फेडणे अवघड झाले आहे. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. यासंदर्बआत औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशन सर्व खासदार, आमदार यांना पत्र पाठविणार आहे.
- फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिऐशन

वाहनांचे वेग
वाहनाचा प्रकार............कमाल वेग मर्यादा
सर्व स्कूल बस..................४०
धोकादायक रसायनाची
वाहतूक करणारी वाहने.......६०
डंपर्स आणि टँकर्स.............६०
अन्य मोठी वाहने..............८०
(वेगमर्याता ताशी प्रतिकिलोमीटर)

वाहनांची संख्या
- स्कूल बस ः १९४५
- टँकर ः ४६९२
- ट्रक, ट्रॉली ः १२४७२
- ट्रेलर ः १४०५६
(वाहनांची संख्या मार्च २०१५पर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोअर मशीनची घरघर थांबली

$
0
0

Ramchandra.vaybhat@timesgroup.com
औरंगाबाद ः भूगर्भातील पाणीपातळी खालावल्यामुळे शहराच्या तुलनेत परिसरात बोअरवेल्स खोदण्याचे कामे अधिक सुरू असून, शहरात काही तुरळक ठिकाणी वगळता बोअरवेल्सची घरघर थांबली आहे.

अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाणीपातळी कमी झाले. शेजारी ३०० ते ३५० फुटांवर पाणी लागले, मात्र नव्याने खोदणाऱ्या बोअरला पाणी लागेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे खर्च वाया जाण्याच्या भीतीने नागरिक बोअरवेल खोदण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सध्या शहरात २०० ते २५० तर, सातारा, देवळाई या भागामध्ये ३०० ते ३५० फूटांवर पाणी लागत आहे. सततच्या दुष्काळामुळे भूगर्भातील पाणीपातळी सातत्याने खालावत आहे. यामुळे नागरिक बोअरवेलऐवजी पाऊस येईपर्यंत विकतच्या पाण्याच्या उपाययोजना करीत आहेत.

शहरातील पटेल बोअरवेलचे आसिफ पटेल म्हणाले की, २०१२ ते २०१४ या कालावधीमध्ये शहरात आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बोअर घेण्यात आले. ही परिस्थिती गेल्यावर्षीच्या सुरूवातीपर्यंत होती, मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे. २०१२च्या तुलनेत यंदा व्यवसायात ७० टक्के घट झाली आहे. पाणी नसल्यामुळे व्यवसायाला फटका बसला.

जलधारा बोअरवेलचे रियाज पठाण म्हणाले की, सध्या शहराऐवजी लगतच्या परिसरामध्ये बोअरवेलचा व्यवसाय सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी एका महिन्यात किमान २० ते २५ नवीन बोअर खोदण्याचे काम होते, मात्र यंदा हा आकडा केवळ पाचवर आला आहे.

३० किलोमीटरपर्यंत एकच दर
शहराच्या परिसरात ३० किलोमीटरपर्यंत प्रतिफूट दर सारखाच असतो. पावणेपाच इंचापर्यंत शहरातील हा दर ४७ ते ५० फूट असून, शहर परिसरामध्ये खोदण्यात येणाऱ्या बोरअवेलसाठी हा दर ५० ते ६० रुपये (साडेसहा इंच) प्रतिफूट असा आहे.

रिबोअर घेणे बंद, दुरुस्तीला ग्राहकी
शहरात रिबोअर घेणे जवळपास बंद करण्यात आले आहे. घरांचे बांधकाम झाल्यामुळे बोअर खोदलेल्या जागेपर्यंत गाडी जाणे शक्य नसते. शिवाय जास्त खर्चामुळे रिबोअर करणे जवळपास बंद झाले आहे. रिबोअरसाठी दीडपट अधिक खर्च लागतो. प्रतिफूट ४७ ते ५० रुपये जास्त द्यावे लागतात. मोटार जाम होणे, पाइपाची गळती अशा दुरुस्तीच्या कामांसाठी ‌ग्राहकी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मासिआचा अभ्यासगट जर्मनी दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मेसे ड्यूसेलडॉर्फ (जर्मनी) येथे सोमवारपासून आयोजित जागतिक औद्योगिक प्रदर्शनास भेट देण्यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरचा (मासिआ) अभ्यासगट शनिवारी रवाना झाला.

'वायर अँड ट्यूब २०१६' हे प्रदर्शन चार ते आठ एप्रिलदरम्यान मेसे ड्यूसेलडॉर्फ येथे आयोजित करण्यात आले आहे. स्टील, अॅल्युमिनिअम, लोखंड, तांबे अशा धातूंसह प्लास्टिकच्या वेगवेगळ्या जाडीच्या तार आणि पाइपची निर्मिती, त्यांचा वापर व उपयोगिता आणि त्यापासून यार करण्यात इतर उत्पादनांची माहिती देण्यात येते. तार आणि पाइप यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या मशीन आणि त्यातील अद्ययावत तंत्रज्ञान याचीही माहिती या प्रदर्शनात देण्यात येते. औरंगाबाद येथेही वायर अँड ट्यूबचे आणि त्यापासून तयार होणारी विविध उत्पादने तयार करणारे बरेच उद्योग आहेत. या क्षेत्रात काही नवीन प्रयोग करून उद्योग करण्याची तयारी असणारे मासिआच्या १३ सदस्यांचा अभ्यासगट शनिवारी रवाना झाला. विनय राठी, अजय गांधी, दयानंद मोदाणी, श्रीनिवास राठी, तुकाराम कंदाकुरे, सदानंद पाटील, अतुल भंडारी, दर्शन संचेती, सुनील पाटोदकर, अतुल परळीकर, शत्रुघ्न मुंडे आदींचा समावेश आहे. मासिआचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी या अभ्यासगटास विमानतळावर शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावकऱ्यांच्या श्रमदानाची दुष्काळावर मात

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
अंबाजोगाई ः मराठवाड्यातील इतर गावांसारखीच विदारक स्थिती. पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण अन् पाण्यावाचून पडून असलेली शेती. सरकारी योजनांपासून कोसो दूर असलेल्या कुंबेफळ (ता. अंबाजोगाई) गावाची स्थिती निराशाजनक होती, पण, अवघ्या २८ वर्षांच्या तरूण सरपंचाने श्रमदानातून गाव टंचाईमुक्त करण्याचा ध्यास घेतला आणि फक्त चार महिन्यांत नदीतील तब्बल नऊ किलोमीटर अंतराचा गाळ उपसला. लोकसहभागातून विकासाचा महत्त्वाचा टप्पा गाठलेल्या कुंबेफळची जिद्द दुष्काळाला आव्हान देणारी ठरली.

अंबाजोगाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील कुंबेफळ गावात दर बुधवारी व रविवारी भल्या सकाळी आवाज दुमदुमतो. श्रमदानातून नदीतील गाळ उपसण्यासाठी शेकडो ग्रामस्थ एकत्र येतात आणि बघता-बघता कामाचा मोठा टप्पा पूर्ण होतो. 'जलयुक्त शिवार' योजनेत वर्षभरात काम झाले नसल्याने कुंबेफळचे सरपंच प्रमोद भोसले निराश होते. तीन हजार लोकसंख्येच्या गावात लोकसहभागातून काम करण्यास विरोध होता, पण ग्रामसभेत सर्वांना विश्वासात घेऊन काम सुरू केले. बीड जिल्ह्यात लोकसहभागातून काम होण्याची सुतराम शक्यता नसताना कुंबेफळने विश्वास सार्थ ठरवला. लोकांची एकजूट पाहून 'नाम' संस्थेचे डॉ. अविनाश पोळ यांनी मार्गदर्शन केले. पुण्यातील एका डॉक्टरांनी स्वखर्चातून पाच दिवस पोकलेन दिले. गावानेही डिझेलसाठी ९० हजार रुपये जमवले. पाच दिवसांत नाला खोलीकरण व सरळीकरण झाले. 'शिवजलग्राम योजने'तून सलग १२५ तास काम करण्यात आले. लोकांची जिद्द कायम ठेवून भोसले यांनी कामाचा वेग टिकवला. गावाने तब्बल नऊ किलोमीटरचे खोलीकरण, सरळीकरण आणि रुंदीकरण केले. पावसाळ्यात पाणी अडल्यानंतर गावाचा कायापालट होणार आहे. या गावाची प्रगती ऐकून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी भेट दिली. गावासाठी ६५ लाखांचा आराखडा तयार केला. आता साडेसातशे हेक्टरची बांधबंधिस्ती व पाच सिमेंट बंधारे बांधले जाणार आहेत. गावात शोषखड्ड्याद्वारे दररोज ८० हजार लिटर सांडपाणी प्रक्रिया करून जिरवले जाणार आहे.

भावनिक दिलासा
दुष्काळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. परिस्थितीने गांजलेल्या शेतकऱ्यांशी खुली चर्चा करून अडचणी जाणून घेण्यासाठी प्रमोद भोसले यांनी उपक्रम सुरू केला. प्रत्येकाची व्यथा ऐकून गावकरी योग्य सल्ला देतात व मदत करतात. परिणामी, गावातील शेतकरी दुष्काळातही ठाम उभे आहेत.

पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामात एक गुंठासुद्धा पीक घेता आले नाही. गावाला टंचाईमुक्त करण्यासाठी सर्वांना एकत्र आणले. बीड जिल्ह्याची श्रमसंस्कृती जपणारा जिल्हा अशी ओळख तयार करायची आहे.
- प्रमोद भोसले, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी कर्मचारी विनावेतन

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

कायमस्वरुपी कर्मचारी असूनही त्यांच्या पगाराची तरतूद करण्यास राज्य सरकारने बजेट उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेतील तब्बल दहा हजार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून फटका बसत आहे. एप्रिल महिना उजाडला तरी या कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन झालेले नाही. दुष्काळ, परीक्षांचा काळ आणि त्यात प्राप्तिकराचा भरणा करण्यासाठी अनेकांनी उसनवारी करावी लागली. आता पगार या महिन्यात तरी होणार की नाही, असा प्रश्न आहे.

गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनपद्धतीत बदल केले. पूर्वी आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार वेतन बजेट उपलब्ध करून दिले जात होते. त्यात बदल करत उपस्थितीच्या क्रॉस चेकिंगनंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्यात थेट वेतन जमा केले जाते. त्यामुळे अडचणींमध्ये वाढ झाली आहे. वेतनासाठी आगाऊ बजेटची तरतूद पूर्वी केली जात होती. जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षण, आरोग्य, सिंचन, सामान्य प्रशासन, वित्तसह अन्य विभागांमध्ये १२ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ९३२७ शिक्षक आहेत. १२ हजारांपैकी तब्बल ७० टक्के कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; राज्य सरकारकडून वेतनासाठी लागणाऱ्या बजेटची तरतूद गेल्या आर्थिक वर्षात केली गेली नाही. त्यामुळे वेतन करायचे कुठून, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर पडला. बजेटची मागणी नोंदवून तीन महिने झाले तरी वेतनासाठी निधी मिळाला नाही. जानेवारी २०१६ पर्यंतही अशीच परिस्थिती होती. झेडपी प्रशासनाने आर्थिक ताळेबंद बाजूला ठेवून वेतनाची तरतूद केली, पण मार्चएंडच्या वेळी कुठलीच अडचण राहू नये, यासाठी बजेटवरच अवलंबून राहावे लागले. ३१ मार्च २०१६ रोजी वेतनासाठी तरतूद केलेले ८५ कोटी रुपये सरकारकडून दिल्याचे सांगण्यात येते, पण ते जिल्हा परिषद प्रशासनाला अद्याप मिळाले नाहीत.

बजेटची तरतूद करण्यास विलंब होण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कारण सांगण्यात आले. फेब्रुवारी महिन्याचे वेतन न झाल्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित पुरते बिघडले आहे. प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्यासाठी अनेकांना उसनवारी करावी लागली. सरकारच्या दुर्लक्षाचा फटका मात्र १० हजार कर्मचाऱ्यांना बसला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन कधी होणार, असा प्रश्न मात्र आजही कायम आहे.

प्रशासन आणि सरकारच्या गलथान कारभाराचा फटका आम्हाला बसला आहे. आर्थिक गणित जुळविता जुळविता हाल झाले. बजेटची तरतूद करण्यासाठी आधीच पावले उचलली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती.

- दिलीप ढाकणे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोयगाव तलावात पाणी चार दिवसांनंतर दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नाशिक जिल्ह्यातील सायखेडा, निफाडजवळ गोदावरी डावा तट कालवा फुटल्यामुळे तब्बल चार दिवसांनी वैजापूरसाठी सोडलेले पाणी बुधवारी सायंकाळी नगर पालिकेच्या गोयगाव (ता. कोपरगाव) येथील साठवण तलावात पोहचले.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालवा फुटल्यानंतर तातडीने पाणी बंद करून कालव्याची दुरुस्ती केली. हे पाणी पंपिंग करून वैजापूर येथे आणल्यानंतर नागरिकांना पुरवले जाणार आहे. त्यामुळे गुढी पाडव्यापासुन (शुक्रवार) पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून जवळपास ७५ किलोमीटर अंतरावरील नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले होते. तेथून साधारणपणे ६६ किलोमीटर अंतरावर गोदावरी डाव्या कालव्याद्वारे मोजणी करून गोयगाव येथील साठवण तलावात पाण्याची साठवणूक केली जाते. गोयगाव येथील चार साठवण तलाव भरल्यानंतर ४५० मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून रात्रीतून पाणी वैजापूरला आणले जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरवासीयांना नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
गोयगाव येथील तलावात पाणी पोहचण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक असतांना निफाड सायखेड्याजवळ कालवा फुटला. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पिण्यासाठी पाणी सोडलेले असल्यामुळे या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. जेसीबीच्या सहाय्याने, माती व मुरूम आणून कालव्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यांनतर पुन्हा कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू करण्यात आला. त्यामुळे गोयगाव येथे पाणी पोहचण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरचालकांना प्रसासनाकडून जादा रक्कम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरकरिता जास्तीची रक्कम देण्यात आल्याची बाब काही तालुक्यांत प्राथमिक तपासणीमध्ये लक्षात आली आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि सोयगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. गेल्या दीड वर्षातील या गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करून देण्यात आलेली जादा रक्कम कंत्राटदाराकडून वसूल करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.
पाणी टंचाईमुळे टँकर मंजुरीचे अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या मागणीची दखल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांच्या संमतीने टँकर सुरू केले जातात. ज्या ठिकाणी टँकर पाठविले जाते त्याचे अंतर, लोकसंख्या, दिले जाणारे पाणी याची सूक्ष्म नोंद ठेवली जाते. जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक तपासणी केली असता सिल्लोड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांमध्ये काही टँकरफेऱ्यांमध्ये तफावत आढळून आली. प्रत्यक्ष अंतर आणि कागदावर दर्शविलेले अंतर यात खूप फरक होता. विशेष म्हणजे ही सर्व देयके अदा करण्यात आली आहेत.
नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पंचायत समिती स्तरावर २०१४-१५ व २०१५-१६ च्या वितरित निधीची मागणी, झालेला खर्च याच्या तपासणीसाठी पथक नेमण्यात आले होते. त्यात वरील पंचायत समित्यांमध्ये ११ डिसेंबर २०१५ रोजी तपासणी करण्यात आली. त्याच्या अहवालात या त्रुटी नमूद करण्यात आल्या. त्याची दखल घेत सीइओंनी संबंधितांना नोटीस बजावावी, असे आदेश दिले आहेत. यावरून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रबडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. ज्याठिकाणी अतिरिक्त रक्कम देण्यात आली त्याची चौकशी करून जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे या पत्रात म्हटले आहे. यामुळे गेल्या दीड वर्षांत झालेल्या गैरप्रकारांची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images