Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ड्रेनेज लाइनअभावी सांडपाणी तुंबते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
बीड बायपासजवळील सारा सिद्धी वसाहतीमधील नागरिकांना मुलभूत नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. साफसफाई, ड्रेनेज लाइन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिकांची कुचंबणा होत आहे.
बीड बायपास परिसरात २००२ पासून सारा सिद्धी वसाहत व राजेशनगरमध्ये २००८ पासून घरे होण्यास सुरुवात झाली. या वसाहतींमध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यावसायिक राहतात. पण, गेल्या १५ वर्षांपासून मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. सारा सिद्धी वसाहतीमध्ये तयार केलेले सेफ्टी टँक कमी क्षमतेचे आहेत. पूर्वी सांडपाणी ओढ्यातून वाहून जायचे. परंतु मोठ्या प्रमाणावर घरे झाली असून, ड्रेनेज लाइन नसल्यामुळे ते ओव्हर फ्लो होत आहेत. परिणामी, सोसायटीच्या मोकळ्या जागेत सांडपाणी तुंबत आहे. त्यामुळे दुर्गंधी व डासांचा प्रादूर्भाव होतो. कचरा घेऊन जाणारी घंटागाडी हायवेपर्यंतच येते, वसाहतीमध्ये फिरकत नाही. पाण्याचे टँकरही इकडे आलेले नाहीत. सारा सिद्धीमधील चार पैकी दोन बोअर आटले आहे. उर्वरित दोन बोअरचे पाणी कमी झाले आहे.
या भागात पथदिवे देवळाई चौकापर्यंतच आहेत, त्यापुढे अंधार आहे. राजेशनगरमध्ये रस्त्याची कामे झालेली नाहीत. पावसाळ्यात चिखलातूनच जावे लागते. नाल्या नसल्यामुळे पाणीही तुंबून राहते. कंटाळून रहिवाशांनी स्वखर्चानेच तात्पुरता रस्ता बनवला आहे. जनावर मरून पडले तर, त्याची विल्हेवाट प्रशासन लावत नाही. चोरी, पोलिस ठाण्याशी संबंधित वादात चिकलठाणा पोलिस ठाण्याला जावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा निवडणुकीत अपक्षांची डाळ शिजेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असली की राजकीय पक्षांसाठी अपक्ष उमेदवारांची डोकेदुखी असते. परंतु, सातारा व देवळाई वॉर्डाच्या पोटनिवडणुकी अपक्षांची डाळ शिजताना दिसत नाही. माघार घ्या, अशी विनंती सुद्धा त्यांना कोणी केली नाही.
देवळाई सर्वसाधारण वॉर्डात ४ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी एक महिला आहे. सातारा वॉर्ड अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. या वॉर्डातून राजकीय पक्षांकडेच प्रवर्गातील उमेदवार नव्हते. त्यामुळे अपक्षांची उमेदवारी नाही. देवळाईतून राजकीय पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त अपक्षांसह १८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी बहुतांश पक्षांचे डमी उमेदवार होते. अधिकृत उमेदवाराच्या अर्जासंबंधी किंवा इतर काही अडचण आल्यास ऐनवेळी धावपळ नको म्हणून भरलेले १० जणांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे या वॉर्डात राजकीय पक्षांचे चार अधिकृत व चार अपक्ष, असे आठ उमदेवार रिंगणात आहेत. हे अपक्ष उमेदवार कोणाच्या फार परिचयाचे नाहीत. त्यामुळे त्यांच्यामुळे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता कमीच आहे. परंतु, त्यांचे उपद्रवमूल्य निकालानंतरच कळेल. सातारा वॉर्डातील तिन्ही उमेदवार राजकीय पक्षांचे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडूळ विकणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्नड येथील देवगाव रंगारी गावातील एका शेतात 'मांडूळ' असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वन विभागाने सापळा लावून दोन जणांना मांडळाची विक्री करताना अटक केली.
वन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मांडूळ असल्याची माहिती एक गुप्त माहितीदारांकडून वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी के. जी. सोनवणे यांना मिळाली. या माहितीनंतर देवगाव रंगारीत कचरू पन्नालाल गोमंलाडू (रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड) व व दिलीप दगडू मंजुळकर (रा. देहगाव, रिसोड, जि. वाशिम) याच्याकडे एक व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. या व्यक्तीसोबत मांडूळ विक्री करणाऱ्यांसोबत दोन लाखात मांडळाची विक्री करण्याचा सौदा पक्का करण्यात आला. पैसे घेण्यासाठी लासूर स्टेशनला दोघांना बोलविण्यात आले. या ठिकाणी वन विभागाच्या पथकाने मांडूळाची विक्री करणाऱ्यांसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून तीन मांडूळ जप्त करण्यात आले आहे. या दोघांवर भारतीय वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये ९ व ४४,४८,४९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी वन परिक्षेत्र अधिकारी के.जी. सोनवणे हे करित असून हा सापळा यशस्वी करण्यासाठी वन विभागाचे वनपाल व्ही.जी. जाधव, कचलोरे, चिकटे महिला वनसंरक्षक रेखा बरबडे यांनी केली. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, तसेच जमीनीतून धन काढण्यासाठी मांडूळाचा उपयोग केला जातो. यामुळे अशा मांडूळाची मागणी जास्त असते. यामुळे या मांडूळाची विक्री दोन लाखांपर्यंत विक्री होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी के.जी. सोनवणे यांनी दिली. मांडूळ हा शेड्युल चारचा प्राणी असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूधानोऱ्यात शेतवस्तीवर दरोडा; पती-पत्नी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
वाळूजपासून काही अंतरावर असलेल्या गुरूधानोरा येथे शेतवस्तीवर राहणाऱ्या पती-पत्नीला मारहाण करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. जखमी पती-पत्नीवर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
मनोहर शंकर निकम (वय ५५) हे पत्नी केसरबाई निकम यांच्या सोबत गावाजवळ असलेल्या शेतवस्तीवर राहतात. नेहमीप्रमाणे काम आटोपल्यानंतर रात्री ते झोपी गेले. रात्री साडेअकराच्या सुमारास ते लघुशंकेसाठी घराबाहेर पडले तेव्हा हाफ पँन्ट घातलेल्या दोघांनी पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने धारदार सुरी काढून डोक्यावर वार केला. त्यानंतर घरात जाऊन पत्नी केसरबाई हिच्यादेखील डोक्यावर वार करून जखमी केले व गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावून पळून गेले. जखमी पती-पत्नीने जीव वाचविण्यासाठी आरडा ओरड केला असता शेजारी राहणारे धावून आले. त्यांना तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. याप्रकरणी जखमी मनोहर निकम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प कोरडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाने दगा दिल्यामुळे यंदाही औरंगाबाद जिल्ह्याची परिस्थिती गंभीर आहे. एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी ४ तर, ९० लघु प्रकल्पांपैकी ४३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
जिल्ह्यात असलेल्या १६ मध्यम प्रकल्पांपैकी सुखना, गिरजा, वाकोद, अंबाडी, टेंभापुरी, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव हे आठ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. लघु व मध्यम अशा एकूण २२ प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहे. २५ टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या २० असून १५ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांपैकी ४७ प्रकल्प कोरडे पडल्यामुळे ग्रामीण औरंगाबादचा पाणीपुरवठा टँकरवर अवलंबून आहे. सध्या जिल्ह्यातील ४५५ गावे व ११ वाड्यांमधील ८९ लाख २७ हजार नागरीकांची तहान टँकरने भागवली जात आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील पाण्याची स्थिती बिकट आहे. सध्या जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ३१ दलघमी (८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी प्रकल्पांमध्ये ४३ दलघमी (१२ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. यामुळे यंदा एप्रिल महिन्यातच उपलब्ध पाणीसाठ्याची अशी स्थिती आहे. यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण औरंगाबादला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजेची बंदी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतिनिमित्त बुधवारी पोलिस आयुक्तालयात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मिरवणुकीमध्ये डीजे वाजवण्यास बंदी कायम असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. शिवाय दारूडे व बळबजबरीने वर्गणी घेणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीला पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, पृथ्वीराज पवार, मिलींद दाभाडे, दौलत खरात, गणपत खरात, राजू खरे, जालींदर शेंडगे, नागराज गायकवाड, राजू साबळे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर लाइट लावणे, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, फिरते शौचालय उपलब्ध करून देणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, वर्गणी संदर्भात खंडणीचे गुन्हे दाखल करू नये, तीन दिवस होर्डींग लावण्यास परवानगी द्यावी, मिरवणुकीनंतर परतण्यासाठी सिटी बसची व्यवस्था करावी, डिजे वाजवण्याची परवानगी द्यावी, आदी सूचना करण्यात आल्या. कोर्टाची मनाई असल्याने डीजे वाजवण्यास परवानगी देण्यास पोलिस आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला. 'डीजे वाजवल्यास कारवाईचा केली जाईल. दारू पिऊन गोंधळ घालणारे व त्यांना दारू देणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,' असा इशारा त्यांनी दिला.
शहरात तीन दिवस होर्डिंग लावण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, महापालिकेची परवानगी घेऊनच होर्डिंग लावावे, विना परवाना होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला. मिरवणुकीत विचित्र आवाजाच्या पिपाण्या विक्रेत्यांवर कलम १४४ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. बैठक अंतिम टप्प्यात असताना एका माजी नगरसेवकाने हॉलमध्ये प्रवेश करून शिवजयंती मिरवणूकीत ‌डीजे वाजवल्याचा आरोप केल्यानंतर गोंधळ माजला. बैठक संपल्यानंतर पोलिस आयुक्तांनी या माजी नगरसेवकाला केबिनमध्ये बोलावून शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोर सुनावले. त्यानंतर पद‌ाधिकाकारी व पत्रकारांना थोड्यावेळासाठी केबिनबाहेर काढून माजी नगरसेवकाला चांगलीच समज दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी जलतरण तलाव आजपासून सुरू

$
0
0

औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याच्या वापर न करणारे शहरातील खासगी जलतरण तलाव सुरू ठेवण्यास महापालिकेने बुधवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे गुरुवारपासून खासगी जलतरण तलाव सुरू करण्यात येणार आहेत.
दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत. त्या आदेशानंतर महापालिकेसह शहरातील सर्व खासगी जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जलतरण तलावांची वस्तुस्थिती मंगळवारी मनपा आयुक्तांना सांगण्यात आली. त्यानंतर बुधवारी त्यांनी खासगी तलाव सशर्त सुरू ठेवण्याची परवानगी दिली. तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून त्याच पाण्याचा पुनर्वापर करावा लागेल, अशी अट मनपाने घातली आहे. मनपाच्या सिद्धार्थ जलतरण तलावात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येत असल्याने तो पावसाळ्यापर्यंत बंदच राहाणार आहे. यासंदर्भात एमजीएम स्पोर्टस क्लबचे व्यवस्थापक मनीष पोलकम म्हणाले, 'एमजीएम परिसरात असलेल्या जलतरण तलावात बोअरचेच पाणी वापरले जाते. या पाण्याचे रिसायकलिंग करण्यासाठी एक प्लँट आहे. या पाण्याचा उपयोग परिसरातील उद्यानासाठी केला जातो. पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता शॉवरचा वापर कमी प्रमाणात करण्यात येणार आहे.' जायकवाडी धरणात जेमतेम पाणी असून ते पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. त्याचा काटकसरीने वापर करावा लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड तासाने ५ मिनिटे फिरा, मधुमेह रोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बैठी जीवनशैली हे मधुमेह होण्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. 'त्यामुळे प्रत्येक दीड तासाने ५ मिनिटे फिरा किंवा शारीरिक हालचाल करा. आठवड्यातून पाच दिवस न चुकता दहा हजार पावले चाला आणि मधुमेहाला दूर ठेवा,' असा सल्ला 'इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन'ने (आयडीएफ) दिला आहे. मधुमेहाचे प्रमाण जगभर अपेक्षेपेक्षा झपाट्याने वाढत असल्याने गुरुवारच्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेहाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेहाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या दिनानिमित्त 'बिट डायबेटिस'ची संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. तासन् तास एकाच जागेवर बसणे, हे 'टाईप टू' मधुमेह होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. कार्यालयात किंवा कुठल्याही कामासाठी एकाच जागेवर ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नये. दर ९० मिनिटांनी किमान ५ मिनिटे तरी शारीरिक हालचाल करावी किंवा पाय मोकळे करुन यावेत. यामुळे मधुमेह रोखता येऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे, असे 'आयडीएफ'ने म्हटले असल्याची मधुमेहतज्ज्ञ डॉ. अजय रोटे यांनी दिली.
भारतामध्ये गेल्या १३ वर्षांमध्ये 'टाईप टू' मधुमेह दुपटीने वाढला आहे. भारतीयांमधील व्यायामाच्या सवयीचा अभाव, फास्ट फुड, जंक फुड आदी अयोग्य आहार पद्धती, सोशल पार्टींचे वाढलेले प्रमाण, जेवणाच्या अयोग्य वेळा, टीव्हीसमोर बसून लक्षात न येणारे अतिखाणे, यामुळे स्थुलतेचा प्रश्न गंभीर होत आहे. केवळ प्रौढांमध्येच नव्हे तर, मुलांमध्येही स्थुलतेचे प्रमाण खूप वाढत आहे. यामुळे चरबीचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढत असून, 'फॅटी लिव्हर'ची गंभीर समस्या निर्माण होत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केवळ प्रौढ नव्हे तर, 'टीनेज' म्हणजेच १३ ते १९ वयोगटातील मुलांमध्येही 'टाईप टू' मधुमेहाचे प्रमाण उल्लेखनीयरित्या वाढले आहे. १५ वर्षांपूर्वी मुलांमध्ये 'टाईप टू' मधुमेहाचे प्रमाण शून्य होते; परंतु आज हेच महानगरे व मोठ्या शहरांमध्ये १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, अशी माहिती ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. संजीव इंदूरकर यांनी दिली.
एकदा का मधुमेह झाल्यानंतर तो नियंत्रणात आणता येईल; पण कुठल्याही उपायांनी मधुमेहाचा आजार कायमचा जाऊ शकत नाही. मात्र त्याचवेळी मधुमेहाच्या पूर्वस्थितीतून (प्री-डायबेटिस) बाहेर पडणे शक्य असून, अशी व्यक्ती पूर्णपणे सामान्य होऊ शकते. योग्य व समतोल आहार, योग्य जीवनशैली व व्यायामामुळे मधुमेहाच्या पूर्वस्थितीतून बाहेर पडणे शक्य आहे. मात्र आजाराच्या पूर्वस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास तीन वर्षांत ५० टक्के व्यक्तींचे पूर्वस्थितीतून मधुमेहाच्या पूर्ण स्थितीमध्ये रूपांतर होते आणि उर्वरित ५० टक्के व्यक्तींचे १० वर्षांपर्यंत पूर्ण मधुमेहामध्ये रूपांतर होते, असेही डॉ. रोटे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भूमिगत’ च्या कामाने जलवाहिनी फुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उल्कानगरीत खिंवसरा पार्कच्या शेजारी असलेल्या नाल्याला बायपास करून रस्ता खोदून टाकण्यात येत असलेल्या ड्रनेज लाइनच्या कामामुळे या परिसरातील जलवाहिनी फुटली. त्यामुळे तेथील नागरिकांना निर्जळीला सामोरे जावे लागले. भूमिगत गटार योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम केले जात आहे.
शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये भूमिगत गटार योजनेतून ड्रेनेज लाइन टाकून नाल्याचा प्रवाह भूमिगत करण्याचे काम केले जात आहे. उल्कानगरीत मात्र नाल्याच्या प्रवाहात ड्रेनेज लाइनचे पाइप न टाकता खिंवसरा यांच्या बांधकामाला अभय देत महापालिकेने रस्ता खोदून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्ता खोदून हे काम केले जात आहे. ड्रेनेज लाइनसाठी रस्ता खोदताना पाइप लाइन फुटली. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता जलवाहिनी पुटल्याची घटना घडली. नेमका याच वेळी या भागात पाणीपुरवठा होणार होता. जलवाहिनी फुटल्यामुळे अनेक घरांना पाणीपुरवठा झाला नाही. जलवाहिनी दुरूस्तीच्या संदर्भात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहूल मोतीयळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भूमिगत गटार योजनेचे काम खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे केले जात आहे. या कंपनीच्या कामामुळेच जलवाहिनी फुटली, त्यामुळे त्यांच्याकडूनच जलवाहिनीची दुरुस्ती करुन घेतली जात आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी दुरूस्तीचे सुरू करण्यात आले, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. गुरुवारी सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीत ट्रॅकबद्दल आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीचा ट्रॅक सदोष असल्यामुळे नुकसान झाल्याचा आरोप महिला उमेदवारांनी केला आहे. या प्रकरणी महिला उमेदवार कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
शहर पोलिस दलात महिलांसाठी २ एप्रिल रोजी चाचणी घेण्यात आली. फक्त १७ जागांसाठी दोन हजार महिलांनी अर्ज दाखल केले होते. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर महिलांची आठशे मीटर धावण्याची चाचणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात तयार करण्यात आलेल्या दोन ट्रॅकवर घेण्यात आली. एक ट्रॅक जनसंवाद विभागापासून डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत तर, दुसरा ट्रॅक नाट्यगृहापासून पुतळ्यापर्यंत करण्यात आला होता. नाट्यगृहापासून असलेल्या ट्रॅकला उतार होता तर, जनसंवाद ते पुतळ्यापर्यंतचा ट्रॅकला चढाव आहे, असा आरोप महिला उमेदवारांनी केला आहे. प्रथमच चाचणी देणाऱ्या उमेदवारांना हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी भरती प्रक्रियेत सामील झालेल्या उमेदवारांना हा प्रकार खटकला. दोन ट्रॅकच्या फरकामुळे वीस सेंकदाचे नुकसान झाल्याचा उमेदवारांचा दावा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला कर्ज हमी देण्यास पालिकेचा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड या कंपनीला कर्जासाठी हमी देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. त्यामुळे नोटीसच्या फेऱ्यात सापडलेल्या या कंपनीला कर्ज मिळणे अवघड होऊन बसेल, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनी बरोबर करार केला. या कंपनीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला या कामासाठी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून नियुक्त केले आहे. एसपीएमएलने समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी महापालिकेकडून १९ महिन्यांपूर्वी संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा महापालिकेकडून ताब्यात घेतली. पाणीपुरवठा यंत्रणा ताब्यात घेतल्या पासून समांतर जलवाहिनीच्या योजनेला बँकेने कर्ज द्यावे यासाठी कंपनीने बँकेकडे प्रयत्न सुरू केले. परंतु अद्याप कंपनीला कर्ज मिळालेले नाही. शासनाने महापालिकेला समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी १४४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला, त्यातूनच महापालिका व कंपनीतर्फे या योजनेचे काम केले जात आहे. कोर्टात प्रलंबित असलेले समांतर जलवाहिनीचे प्रकरण, या योजनेच्या चौकशीसाठी शासनाच्या स्तरावर तयार करण्यात आलेली समिती, या समितीने कंपनीस नोटीस बजावण्याचे महापालिकेला दिलेले आदेश या पार्श्वभूमीवर महापालिकेने कंपनीला कर्जासाठी हमीपत्र देण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेने कंपनीला तसे स्पष्टपणे कळविले आहे. नोटीस आणि कोर्टांच्या फेऱ्यात सापडलेल्या कंपनीला बँकेकडून कर्ज मिळवणे आता अवघड होऊन बसल्याचे बोलले जात आहे.

बँकेच्या जाचक अटी

कंपनीने कर्ज मिळवण्यासाठी आयडीबीआय बँकेकडे संपर्क साधला तेव्हा बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शवली पण कर्जाला महापालिकेने हमी दिली पाहिजे, अशी अट घातली. हमी पत्र कसे असावे याचा मसुदाही बँकेनेच तयार करून दिला. त्यात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोर्टात सादर केलेले शपथपत्र माग घ्यावे, महापालिका आणि कंपनी यांच्यात झालेल्या करारात काही सुधारणा करायच्या असतील तर, बँकेच्या परवानगी शिवाय त्या करता येणार नाहीत, असा उल्लेखही हमी पत्राच्या मसुद्यात करण्यात आला आहे. याशिवाय अन्यही काही अटी बँकेने हमीपत्रात समाविष्ट केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाच्या अपघातात शालेय विद्यार्थी बचावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज येथून शाळकरी मुलांना घेऊन येणाऱ्या अॅपेरिक्षाला मागून येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे गुरुवारी झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार झाला तर, सहा चिमुकले विद्यार्थी जखमी झाले. या रिक्षाचालकाच्या मुलीचे २८ एप्रिल रोजी लग्न होणार आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाळूज येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक मुनीर हुसेन पिंजारी (वय ४०) हे करत होते. ते नेहमीप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना शाळेत सोडण्यासाठी रिक्षा (एम एच २०, टी ४२४९) घेऊन जात होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारने रिक्षाला गुरुवारी सकाळी सात वाजता बजाज ऑटो कंपनीसमोर जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक मुनीर गंभीर जखमी होऊन ठार झाले. रिक्षामधील आठ विद्यार्थ्यांपैकी जय बाबासाहेब गायकवाड, संध्या गोटे, यश सुनील वाघ, आदित्य सुरेश सरोदे, रितेश झुंगडे आदी सहा विद्यार्थी जखमी झाले. अथर्व अशोक कोरडे यांच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी आहे. हर्षल सुनील वाघ व वैष्णवी गोरे हे किरकोळ जखमी झाले आहे. या अपघात प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. एम. साबळे तपास करत आहेत.
औरंगाबाद-नगर महामार्गावर झालेल्या अपघातात अॅपेरिक्षा चालक मुनीर हुसेन पिंजारी यांच्या मुलीचे २८ एप्रिल रोजी लग्न आहे. त्यांच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. पण लग्नाच्या २१ दिवसआधी नवरी मुलगी पोरकी झाली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्ताकडून लाच घेताना कालवा निरीक्षक जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका कालवा निरीक्षकाला पाच हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता पैठण जवळील मुधळवाडी येथे सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पीएफची कागदपत्रे पाठवण्यासाठी लाच मागण्यात आली होती.
जायकवाडी पाटबंधारे विभागातून २०१५ साली एक कर्मचारी सेवानिवृत्त झाला आहे. त्यांचा ९० टक्के जीपीएफ मंजूर झाला होता. मात्र उर्वरित दहा टक्क्यामध्ये असलेल्या त्रुटी काढून तो अहवाल नागपूर येथील महालेखाकार कार्यालयाकडे पाठवायाचा होता. हे काम कालवा निरीक्षक कांता प्रल्हादराव लाखोले यांच्याकडे होते. हा अहवाल पाठवण्यासाठी त्यानी पाच हजार रुपयांची मागणी केली. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी मुधलवाडी येथे सापळा लावून लाखोले याला घरामध्येच लाच घेताना अटक करण्यात आली. पैठण एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देशात प्रतिकूल वैचारिक परिस्थिती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
'सध्या देश प्रतिकूल वैचारिक परिस्थितीतून जात आहे. रोहित वेमुलासारख्या युवकाचा व्यवस्थेने खून केला असून रुढी-परंपरावाद वाढवला जात आहे. ही परिस्थिती भयानक असून या कठीण काळी आंबेडकरवादी विचारच तारू शकतील,' असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरवादी ‌विचारवंत एल. आर. बाली यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त मिलिंद कला महाविद्यालयात त्यांचे गुरुवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान होत्या. मंचावर उपप्राचार्य डॉ. एस. पी. गुरुकुल यांची उपस्थिती होती.
'देशात सध्या घडत असलेल्या घटना व कारवायांमुळे अशांतता आहे. त्यामुळे बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान सर्वांनी अंगिकारण्याची गरज आहे. संविधान आचरणात आणताना कोणताही जातीधर्मापेक्षा एक भारतीय आहोत, हे लक्षात घेऊन ते आचरणात आणावे,' असे आवाहन त्यांनी केले. 'रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर दलित चळवळी अधिक सक्रिय झाल्या आहेत. दलित युवक अधिक सजग झाले असून त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागची कारणे आणि त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांना लोकांपर्यंत नेण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन बाली यांनी केले. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तेव्हाच भक्कम तरतूद करून ठेवली आहे. सध्या देशाची वाटचाल खडतर असून या परिस्थितीत डॉ. आंबेडकरांनी भारतीय संसदेला सर्वोच्च अधिकार दिल्याचे लक्षात घेतले पाहिजे,' असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी व्याख्यानात सर्व राजकीय पक्षांचा समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डोळसे यांनी केले. कार्यक्रमला भदन्त सत्यपाल यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडूळ तस्करांना दोन दिवसांची कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
वन विभागाने पकडलेल्या दोन मांडूळ तस्करांना कन्नड कोर्टाने दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. त्यांना देवगाव रंगारीजवळ बुधवारी पकडण्यात आले.
कचरू पन्नालाल गोमलाडू (रा. देवगांव रंगारी ता. कन्नड) व दिलीप दगडू मंजुळकर (रा. देवगाव ता. रिसोड जि. वाशिम), अशी त्यांची नावे आहेत. ते मोटारसायकलवरून (एम एच २०, ए एम ४७७१) लासूरकडून येत असताना वन विभागाच्या फिरत्या पथकाने झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये मांडूळ सापडले. मोटारसायकलसह आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याविरूद्ध वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक उपवनसंरक्षक पी. पी. वरुडे यांनी दोघांना कन्नड कोर्टात हजर केले. सरकारी वकील एस. व्ही. देशमुख यांनी केलेल्या युक्तीवादानंतर दोन दिवसाची वन कोठडी
सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विदेशात राहणाऱ्या महिलेच्या घरावर अतिक्रमण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सौदी अरेबियात वास्तव्यास असलेल्या महिलेच्या घरावर अतिक्रमण केल्याचा प्रकार मंजूरपुरा भागात घडला. याप्रकरणी ७ आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नसिमा नाजमिन आसिफ सिद्धीकी या सध्या सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असून त्यांचे मंजूरपुरा येथे घर आहे. त्यांच्या मालकीच्या असलेल्या घराची बनावट कागदपत्रे तयार करून घराचा ताबा घेण्यात आला. तसेच त्यांचे घरगुती साहित्य लांबवण्यात आले. ताबा घेतल्यानंतर अर्धे घर आरोपींनी पाडून त्याच्या सागाच्या लाकडाची विक्री केली. नसिमा सिद्दीकी यांना हा प्रकार शहरात परतल्यानंतर समजला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख नईम युनूस (रा. नाशिक), जावेद वहीद खान (रा. आरेफ कॉलनी), शेख अब्दुल जफर अब्दुल रशीद, (रा. सेंट्रल नाका), नरगीस बेगम जावेद अली, सय्यद जावेद अली, साजेद अली मदद अली, रुबीना बेगम मदद अली (सर्व रा. मुंबई) यांच्या विरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपरीचालकाचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी

$
0
0

Ashish.Choudhari@timesgroup.com
औरंगाबाद ः वडिलांची चहाची टपरी. घरची परिस्थिती बेताची असल्याने सायन्सला जाता आले नाही. त्यामुळे ऑफिसर व्हायचे ठरवून त्याने औरंगाबाद गाठले. कठोर मेहनत करून त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खणखणीत यश मिळविले. ही संघर्षगाथा आहे अतुल चोरमारे याची...

भोकरदन तालुक्यातील सावंगी (अवघडराव) गावचा अतुल रहिवासी. त्याचे वडील पंडितराव चोरमारे यांची गावात चहाची टपरी. आई गृहिणी. स्वतःची शेतीही नाही. गावोगावच्या जत्रांमध्ये वडील टपरी लावतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालते.

अतुलला दोन भाऊ. ते वडिलांना मदत करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने दहावीनंतर अतुलला सायन्सला प्रवेश घेता आला नाही. त्याचवेळी त्याने एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी बनायचे, असा निश्चय केला. तो २०१२मध्ये औरंगाबादला आला. रूम घेऊन अभ्यास सुरू केला. घरून पैसे येणार नव्हते. त्यामुळे त्याने कॉल सेंटरमध्ये काम केले. खाजगी शिकवणी लावण्याची परिस्थिती नव्हती. त्याने घरीच राहून अभ्यास केला. त्याची जिद्द, मेहनत शेजारी राहणारे कृष्णा गोरे यांनी पाहिली. त्यांनी 'तू फक्त अभ्यास कर, जमेल तशी मदत करतो,' असे सांगत त्याला आधार दिला. रात्रंदिवस परीक्षेची तयारी करून त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाचे शिखर गाठले. गावातील पहिलाच क्लास-वन अधिकारी ठरलेल्या अतुलचे गावकऱ्यांनी वाजत-गाजत स्वागत केले. घरच्यांचा आनंदाला पारावार उरला नाही. अतुलचे शालेय शिक्षण गावातीलच भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालयात झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव रेणुकादेवी उच्चमाध्यमिक विद्यालयात तर, बीकॉमपर्यंतचे शिक्षण पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले.

माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने इतर शिक्षणाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हे ध्येय ठरवून औरंगाबाद गाठले. शेजारी रहणारे कृष्णा गोरे यांनी मुलाप्रमाणे सांभाळले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी यश मिळवू शकलो.
- अतुल चोरमारे

अतुलची मेहनत मी पाहिली. त्याच्या घरची परिस्थिती मला समजली. तो रात्रंदिवस अभ्यास करीत असे. त्यामुळे यश मिळवेल याची आम्हाला खात्री होती. मी जशी जमली तशी थोडीशी मदत केली.
- कृष्णा गोरे, शिक्षक, शारदा हिंदी विद्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ एप्रिलपासून लातूरला रेल्वेने पाणी

$
0
0

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूर शहरात येत्या १५ एप्रिलपासून मिरज येथून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.

वारणा प्रकल्पातील १६ दशलक्ष घनमीटर पाणी रेल्वेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यातील काही पाणी लातूरकरांसाठी देण्यात येणार आहे. यासाठी लातूरला कृत्रिम तलावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिरजहून लातूरला आणलेले पाणी पाइपद्वारे तलावात टाकण्यात येईल. तेथून ३ किलोमीटर अंतरावरील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी लातूर शहरात पुरविण्यात येणार आहे.

मिरज येथून लातूरला पाणी आणण्यासाठी १० एप्रिल रोजी रेल्वे येणार आहे. गरज पडल्यास १७ एप्रिल रोजी अतिरिक्त वॅगनही देण्यासाठी रेल्वे विभागाने सहमती दर्शवली आहे. अतिरिक्त वॅगनची व्यवस्था झाल्यास कृत्रिम तलावातून पाण्याचा उपसा करुन टँकरद्वारे ग्रामीण भागातही पाणीपुरवठा करणे शक्य होईल असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. सध्या मांजरा प्रकल्पात चर खोदून काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे; तसेच भंडारवाडी प्रकल्पातून काही पाणी लातूर शहरला दिले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये निम्न तेरणा प्रकल्पातील पाणीही उपलब्ध करून देणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७८ हजार जणांची शिष्यवृत्ती रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समाजकल्याण विभागाकडून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, मिळालेली नाही. औरंगाबाद विभागात तब्बल ७८ हजार ३०५ अर्ज प्रलंबित आहेत. प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्याचवेळी कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांकडून शुल्काचा तगादा लावला जात आहे.

शासनाकडून मिळणाऱ्या ईबीसीप्रमाणे अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आणि एसबीसी प्रवर्गांतली विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी शैक्षणिक वर्ष संपत आली तरी ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. वर्ष संपत आल्याने आणि शिष्यवृत्ती न मिळाल्याने कॉलेज व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडे शुल्काची मागणी करत आहेत. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. त्यात शिष्यवृत्तीची प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. विभागातील चार जिल्ह्यात १ लाख ७० हजार ८८० अर्जांपैकी ९२ हजार ५७५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ७८ हजार ३०५ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्यासाठी शासनाकडून विभागाला १०९ कोटी रुपये हवे आहेत. प्रक्रिया न झाल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे. त्याचवेळी कॉलेज प्रशासन शुल्कासाठी तगादा लावत आहेत. विशेषतः व्यवायायिक अभ्यासक्रमांचे शुल्क अधिक असल्याने या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात ४४ हजार विद्यार्थी प्रतिक्षेत
विभागात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील ४४ हजार ३४६ अर्ज प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी शासनाकडे अपेक्षित ५८ कोटी रुपये लागण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे.

दुष्काळामुळे मराठवाड्या तील परिस्तिती चिंताजनक आहे. सरकारने येथील विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यायला हवेत, परंतु विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. शुल्कमाफीबाबत आम्ही राज्यभर आंदोलने केली, शिष्यवृत्तीबाबतही आम्ही रस्त्यावर उतरलो. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे प्रश्न तात्काळ मार्गी लावावते.
- संग्राम कोते पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

रखडलेली शिष्यवृत्ती
जिल्हा........प्रलंबित अर्ज.....निधी
औरंगाबाद.....४४३४६........५८ कोटी
जालना.........७०७४..........१२ कोटी
बीड.............२३४९५........२२ कोटी
परभणी........३३९०..........१७ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणिताची भीती दूर करणार : आयुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'महापालिकेच्या शाळेत गरीब घरातील मुले येतात. स्पर्धा परीक्षेत हे विद्यार्थी टीकावेत म्हणून त्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करण्यावर येत्या शैक्षणिक वर्षात भर दिला जाईल,' अशी ग्वाही महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित 'मटा संवाद'मध्ये दिली.

महापालिका शाळा आणि तेथे देण्यात येणाऱ्या शिक्षणाबद्दल आयुक्तांनी मोकळेपणाने संवाद साधला. बकोरिया म्हणाले, 'महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी येत्या काळात विशेष लक्ष देणार आहोत. त्यातही गणितावर अधिक लक्ष दिले जाईल. केवळ गणित कच्चे असल्यामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडतात. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांबद्दल हे घडू नये यासाठी त्यांच्या मनात गणिताबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जाईल. यासाठी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणिताचे विशेष शिक्षण देण्याची योजना तयार केली जाईल. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे आहेच, पण त्याच बरोबर पहिली - दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. लहान वर्गात चांगले शिक्षण मिळाले, आत्मविश्वास निर्माण झाला, तर ते विद्यार्थी वरच्या वर्गात चांगली प्रगती करू शकतात. हे सूत्र लक्षात घेऊन शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक ठरवले जाईल. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून शिक्षकांनी दररोज सामान्य ज्ञानाचे पाच व इंग्रजीचे पाच शब्द पाठ करून घ्यावेत असे आदेश शिक्षकांना दिले जातील. सामान्य ज्ञान व इंग्रजी चांगले आले, तर विद्यार्थी स्पर्धेच्या युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो. ज्या शाळेत संगणक आहेत, त्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकावर काम करता आले पाहिजे यासाठी आग्रह धरला जाईल. या सर्व उपक्रमांसाठी शिक्षकांची मानसिकता तयार झाली पाहिजे. त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. तो वाढवण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्याची पालिकेची तयारी आहे. यासाठी एक संस्था सहकार्य करण्यास तयार आहे, त्या संस्थेबरोबर चर्चा सुरू आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी निवृत्त शिक्षक पुढे आले तर त्यांचे स्वागतच करू,' असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शिक्षणाधिकारी मिळवू
'महापालिकेत शिक्षणाधिकाऱ्याचे पद दोन वर्षांपासून रिक्त असल्याची बाब खरी आहे. शिक्षणाधिकारी हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून पालिकेसाठी लवकरच शिक्षणाधिकारी मिळवला जाईल,' असे आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images