Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'वर्ष संपले तरी शिष्यवृत्ती नाही', 'शिष्यवृत्ती द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या', 'शिक्षण आमच्या हक्काचे' अशा घोषणांनी शहर दणाणले. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळणारी शिष्यवृत्ती रखडल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेतर्फे विभागीय समाज कल्याण कार्यालयावर गुरुवार (७ एप्रिल) रोजी मोर्चा काढण्यात आला.

मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असताना, शासनाकडून शिष्यवृत्तीसाठीचा निधी रखडला आहे. त्यासह शुल्कमाफीच्या निर्णयाबाबतही शासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विभागीय समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. औरंगपुरा येथून निघालेला हा मोर्चा, निराला बाजार, पैठण गेट, सिल्लेखानामार्गे समाजकल्याण कार्यालयावर धडकला. विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या मागणीचे फलक हाती घेत, घोषणाबाजी केली. 'शिक्षण आमच्या हक्काचे', 'शिकू द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणला. यानंतर समाजकल्याण अधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शिष्यवृत्ती न मिळाल्याने कॉलेजवाले तगादा लावत असून, तात्काळ शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्यासह उल्हास उढाण, राहुल तायडे, मयूर सोनवणे, अमोल दांडगे, अक्षय पाटील, आषुतोश चव्हाण, नेताजी साळुंके, संदीप जाधव, राज सिंहराजे निंबाळकर, फिरोज पठान, सय्यद अश्फाक, आकाश सुरडकर, आशिष वाघमारे, ऋषिकेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माझं शिवार : व्यवस्थापनावर बहरली सेंद्रीय फळबाग

0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
परिश्रम, व्यवस्थापन आणि नावीन्यपूर्ण प्रयोग या त्रिसूत्रीवर गोलटगाव (ता. औरंगाबाद) येथील सुदामराव साळुंके यांनी फळबाग फुलवली. सेंद्रीय डाळिंबाच्या माध्यमातून नवा प्रयोग यशस्वी केला. दर्जेदार फळ उत्पादन घेतानाच यशस्वी निर्यातसुद्धा केली. ही फळबाग शेती शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरली आहे.

शेती ही एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडतो हा सिद्धांत आहे. फळबाग उत्पादक शेतकरी अशा प्रयोगांसाठी आग्रही असतात. पाणी टंचाई आणि बदलणारे हवामान नवीन प्रयोगांसाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करीत आहेत. 'मोसंबी फळबागांचा पट्टा' अशी ओळख असलेल्या करमाड, गोलटगाव परिसरातील फळबाग क्षेत्रात कमालीचे बदल झाले आहेत. कमी पाण्यात फळ उत्पादन काढण्यावर भर आहे. एकेकाळी मोसंबी फळपिकासाठी हा परिसर ओळखला जात होता. बदनापूर आणि औरंगाबाद तालुक्याचा बहुतांश भाग मोसंबी फळबागांनी व्यापलेला होता. अत्यल्प पाऊस आणि पाणी टंचाई अशा रेट्यात फळबागा नामशेष झाल्या. गोलटगाव येथील फळबागांचे अस्तित्वही संपुष्टात आले. मात्र, सतत नवनवीन प्रयोग करीत फळबागांना शेतीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात प्रगतीशील शेतकरी सुदामराव साळुंके यशस्वी ठरले. मोसंबी, डाळिंबासह इतर फळपिकांची लागवड करून त्यांनी नवीन यशस्वी मार्ग निर्माण केला. शेतीचे जास्त क्षेत्र असूनही नेटके नियोजन करून हा व्याप सांभाळला. मागील काही वर्षांपासून सेंद्रीय डाळिंब लागवडीतून साळुंके यांनी नवा प्रयोग केला. डाळिंबाच्या 'भगवा' वाणाची लागवड केली. चविष्ट आणि आकर्षक रंग अशी या डाळिंबाची बाजारपेठेत ख्याती आहे. रसायनांचा अतिरिक्त वापर व खतांची वाढती मात्रा बहुतेक शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे, पण साळुंके यांनी सेंद्रीय पद्धतीने डाळिंब उत्पादन घेतले. स्वतःकडे ४० जनावरे असल्यामुळे शेणखताची वानवा नव्हती. सेंद्रीय कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 'स्लरी' काढली. प्रत्येक झाडाला द्रावण देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दोनशे लिटर पाण्यात १० लिटर गोमूत्र, दोन किलो खराब गूळ, दोन किलो भरड धान्य यांचे मिश्रण करून सावलीत १५ ते २० दिवस ठेवतात. दररोज द्रावण ढवळणे आवश्यक असते. द्रावण झाल्यानंतर कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधीची मात्रा टाकतात. ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक झाडाला एक लिटर द्रावण देतात. फळझाडाच्या विशिष्ट टप्प्यातच सेंद्रीय कंपोस्ट खत देणे आवश्यक असते. रसायनविरहीत द्रावण सेंद्रीय पद्धतीने झाडाची निगा राखणारा अत्यंत महत्त्वाचा प्रयोग आहे. या प्रयोगामुळे साळुंके यांच्या शेतातील डाळिंब चविष्ट व अधिक रंगीत आहेत. या डाळिंबाना बाजारपेठेत चांगली मागणी असते.

'सध्या १२ एकर डाळिंब फळबाग आहे. सेंद्रीय फळाचे व्यापाऱ्यांना आकर्षण नसते. इतर फळाप्रमाणे त्याच्याकडे व्यापारी पाहत असतात. मात्र, फळाची गुणवत्ता चांगली घडत असल्याने भाव निश्चित अधिक मिळतो. सोलापूर किंवा नाशिकच्या बाजारपेठेत डाळिंबाची विक्री करतो. सेंद्रीय डाळिंबाचे चांगले उत्पादन झाले,' असे सुदामराव साळुंके यांनी सांगितले. २००७ यावर्षी नाशिकच्या बाजारपेठेत साळुंके यांचे डाळिंब अव्वल ठरले होते. दुबईला १५ टन माल निर्यात केला होता. या डाळिंबाला विक्रमी ६८ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सप्टेंबर महिन्यात पाच-सहा दिवस पाऊस झाल्यामुळे शेततळ्यात भरपूर पाणी आहे. या पाण्याचे योग्य नियोजन करून साळुंके यांनी फळबाग उत्तम स्थितीत ठेवली आहे. शेतीतील विविध प्रयोगांसाठी अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. ठिकठिकाणी कृषी परिषदा, मेळावे यात साळुंके यांचा सहभाग असतो. परिश्रमपूर्वक उभी केलेली प्रयोगशील शेती पाहण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी आवर्जून येत असतात. व्यवस्थापन, परिश्रम आणि प्रयोग या त्रिसूत्रीवर ही डाळिंबाची फळबाग बहरली आहे.

फळबाग वाचवली
सध्या गोलटगाव परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पाणी नसल्यामुळे फळबागा जळाल्या आहेत. मात्र, साळुंके यांच्याकडे तीन शेततळी असून पुरेसे पाणी आहे. २०१२ मध्ये पडलेल्या दुष्काळात त्यांनी हिमतीने फळबाग जगवली. स्वतः टँकर खरेदी करून चिकलठाणा परिसरातील सांडपाण्याचा फळबागांसाठी वापर केला होता. या पाण्यावर तीव्र उन्हात फळबागा टिकवली. त्यावर्षी दीड कोटी लिटर पाणी क्षमतेचे शेततळे बांधून साळुंके यांनी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली. या पाण्यावरच फळबागा बहरल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६५० विद्यार्थ्यांचे १८ तास अखंड वाचन

0
0

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारपासून १८ तास अखंड वाचन उपक्रमास सुरुवात झाली. या उपक्रमात ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरू म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षानिमित्त अखंड ज्ञान साधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा.' विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयात या उपक्रमास सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​'गोवंश हत्याबंदी'मुळे शेतकरी दुहेरी कात्रीत

0
0

प्रियांका काकोडकर, उस्मानाबाद

पाणी आणि चारा नसल्यामुळे उपाशी राहून गुरे मरत आहेत, आणि गोवंश हत्या बंदी असल्यामुळे त्यांना विकूही शकत नाही अशा दुहेरी कात्रीत दुष्काळग्रस्त शेतकरी सापडला असून 'आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना', अशीच अवस्था दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा बसलेल्या मराठवाड्यातील उस्मानाबादचे शेतकरी लक्ष्मण रितापुरे यांच्या गेल्या ६ महिन्यांमध्ये पाणी आणि चाऱ्याच्या अभावामुळे चार गायी, चार बैल आणि चार वासरे मृत्यूमुखी पडली आहेत.

महाराष्ट्र सरकारने गोहत्या बंदीच्या कायद्यात सुधारणा करून गोवंश हत्याबंदी आणली. यांमुळे कत्तलखान्यांमध्ये गायींसह बैल नेण्यावर देखील बंदी आणली. शासनाच्या या निर्णयामुळे गुरांच्या बाजारातील विक्रीवर मोठा परिणाम झाला. याचा परिणाम किंमती कोसळण्यावर झाला.

'गेल्या वर्षी मी गुरांना बाजारात विकण्यासाठी घेऊन गेलो होतो. मात्र किंमती खूपच खाली आल्या होत्या. त्यानंतर मी त्यांना पुन्हा जानेवारीत विकण्यासाठी घेऊन गेलो, मात्र कोणी खरेदीदारच मिळाला नाही', असे आपली गुरे गमावणारे दुष्काळग्रस्त शेतकरी रितापुरे आपली कैफियत मांडताना सांगत होते.

रितापुरे यांच्याकडे आणखी २६ गुरे आहेत. त्यांच्या नावे केवळ १ एकर जमीन आहे. अशा अवस्थेत रितापुरे यांनी ७ वर्षांपूर्वी १० जनावरे खरेदी केली होती. दरम्यानच्या काळात वासरांमध्ये वाढ होत गेली. रितापुरेना गुरांच्या चाऱ्यासाठी दर आठवड्याला २ हजार रूपये खर्च करावे लागतात. त्याना दूधविक्रीतून ही रक्कम ते कशीबशी मिळवतात.

'जर सरकारने गायी वाचवण्यासाठी गोवंश हत्याबंदीचा कायदा केला, तर मग अशा परिस्थितीत गुरांची काळजी देखील घ्यायला हवी', अशी मागणी रितापुरे करतात. ज्या जनावरांना आपण वाढवले आहे. त्यांना मरताना पाहून अतिशय दु:ख होते असे ते म्हणतात. ही सगळी गुरे माझ्या मुलाबाळासारखी आहेत. त्यांना मरताना पाहण्यापेक्षा मी उपाशी राहणे पसंत करेन असेही रितापुरे दु:खाने सांगतात.

रितापुरे यांचे शेजारी असलेले खरबूज उत्पादक शेतकरी किरण काळे यांनीही आपली ७ गुरे दुष्काळामुळे गमावली आहेत. सुर्यकांत कोंडे नावाच्या शेतकऱ्यानेही आपली एक गाय आणि वासरू गमावले आहे.
'दिवसभर मी माझी जनावरे बाहेर सोडून देतो. त्यानंतर जे काही त्यांना शोधून मिळते ते खातात,' अशी माहिती काळे यांनी दिली.

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबादसारख्या सर्वात जास्त दुष्काळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांमधील ३ लाख २ हजार गुरे चारा छावण्यांमध्ये ठेवण्यात आली आहेत. पण काही चारा छावण्या वस्त्यांपासून खूपच दूर असल्याने तिथपर्यंत पोहोचणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.

आपल्या गुरांवर लक्ष ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना चारा छावण्यांमध्येच रहावे लागते. मात्र तिथे अंघोळीची वा खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते. ' मला दररोज घरी परतावे लागते. दररोज अशा प्रवासासाठी ५० रूपये खर्च करणे कोणाला परवडेल?', असा प्रश्न रितापुरे विचारतात.

'आम्ही चारा छावण्या चालवत नाही, पंरतु त्या चालवण्यासाठी व्यक्ती अथवा संस्थांकडून आलेले अर्ज आम्ही मंजूर करण्याचे काम करतो' अशी माहिती उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नरनवरे यांनी दिली. आम्ही त्यांना राष्ट्रीय आपत्ती मदतकार्य फंडाच्या माध्यमातून दर गुरामागे दररोज ७० रूपये देतो असेही नरनवरे पुढे म्हणाले.

मराठवाड्यात सध्या सुरू असलेल्या चारा छावण्यांपैकी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्या स्थानिक नेत्यानी चालवलेल्या चारा छावण्यांची संख्या सर्वात जास्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरचे जेवण न दिल्याने कैद्यांचा पोलिसांवर हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोर्टात तारखेसाठी आणले असता नातेवाईकांनी दिलेले घरचे जेवण करू ‌दिले नसल्याने दोन आरोपींनी पोलिसांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा कोर्टासमोर घडली. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आदिल चाऊस व सचिन रवींद्र गायकवाड सध्या हर्सूल जेलमध्ये सजा भोगत आहेत. या दोघांची गुरुवारी कोर्टात तारीख होती. मुख्यालयातील जमादार सुभाष भालेराव व पथकाने या दोघांना कोर्टात आणले होते. सायंकाळी त्यांना हर्सूल जेलमध्ये घेऊन जाण्यात येत होते. यावेळी दोघांनी घरून आणलेला जेवणाचा डबा खाऊ ‌देण्याची मागणी केली. भालेराव यांनी नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ करत पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात भालेराव यांच्या गणवेशाची कॉलर फाटली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकाने केले पुतण्याचे अपहरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरगुती वादातून दिराने पुतण्याचे अपहरण केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या मृत्यूनंतर दिराने विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कविता शंकर इगवे (वय २७, रा. गजानन कॉलनी) या पतीच्या निधनानंतर मुलांसह माहेरी आई-वडिलांकडे राहण्यास आल्या आहेत. त्यांचा एन्नापल्ली (ता. विकाराबाद) येथील शंकर इगवे यांच्यासोबत विवाह झाला असून एक मुलगा व एक मुलगी आहे. मोठा दीर तुळशीराम इगवे याच्यासोबत भिशीच्या पैशावरून वाद झाल्याने त्यांच्या पतीने तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर तुळशीराम दारू पिऊन कविताला मारहाण करीत होता, त्याने विनयभंगही केला. या जाचाला कंटाळून त्या मुलांसह औरंगाबादला माहेरी राहण्यास आल्या. त्यानंतर तुळशीराम गुरुवारी गारखेड्यातील माहेरी आला व 'माझ्या भावाच्या मुलाला तुझ्यासोबत राहू देणार नाही', असे म्हणत बळजबरीने मुलाला सोबत घेऊन गेला. मुलगी मोठी झाल्यानंतर तिलाही उचलून नेण्याची धमकी दिली. याप्रकरणी तुळशीरामविरुद्ध अपहरण, विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानीची शिवकालीन अलंकार पूजा

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेची शुक्रवारी गुढीपाडव्यानिमित्त शिवकालीन दागिन्याची विशेष अलंकार पूजा मांडण्यात आली होती. देवीच्या मुख्य पूजेपैकी एक असलेल्या देवीच्या या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुळजाभवानी मातेची चरणतीर्थ पूजा करून शुक्रवारी सकाळी तुळजाभवानी मातेच्या मुख्य मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली. त्यानंतर देवीच्या मुख्य मूर्तीवर दही, दूध व पंचअमृताने अभिषेक घालण्यात आला. हीच ती तुळजाभवानी मातेची मुळ अष्टभुजा मूर्ती आहे. यावेळी धार्मिक पद्धतीने अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीला सुंदर असा निळ्या रंगाचा मानाचा शालू घालण्यात आला.
गुढीपाडवा असल्याने आई तुळजाभवानी मातेला सुहासिनीच्या रुपात शिवकालीन हिरे, माणिक, रत्न जडित मौल्यवान दागिने घालून विशेष अलंकार पूजा करण्यात आली. वर्षातून फक्त पाड्व्याच्या दिवशी ही अलंकार पूजा करण्यात येते. तुळजाभवानी मातेला शिवाजी महाराज यांच्यासह अनेक राजे महाराजे यांनी दागिने अर्पण केले होते. ते दागिने आज घालण्यात येतात. राजा शिवछत्रपती अशी मोहर असलेली सोन्याची १०८ पुतळ्याची माळ, रत्नजडित जोडवे देवीला घालण्यात आले.

आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढीपाडवा हा सन साजरा करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. भल्या पहाटे ४ वाजता आई तुळजाभवानी मातेची चरण तीर्थ पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराचे मुख्य पूजारी महंत तुकोजी बुवा व इतर पुजारी यांनी आई तुळजाभवानी मातेसाठी खास बनवलेला साखरेचा हार देवीला घातला. त्यानंतर देवीच्या मुख्य शिखरावर गुढीची स्थापना केली. मनाच्या काठीला रेशमी साडी, चोळी घालून विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली. गावातील सुवासिनी महिलांनी आणलेले साखरेचे हार देवीला अर्पण केले जातात व देवीची ओटी भरली जाते.
गुढी म्हणजे लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात उभारण्यात आलेल्या गुढीला विशेष महत्त्व आहे. तुळजापूरसह इतर भागातील भाविक गुढी उभारण्यासाठी मंदिरात येतात व तुळजाभवानीची गुढी उभारल्यानंतर गावातील सर्व घरो घरी गुढीची स्थापना करण्यात येते.
गुढी पाडवा असल्याने आजचा दिवस हा वर्षातील शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. नाव वर्षाची सुरुवात आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने आशीर्वाद घेवून सुरु करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती .

छबिनाने पाडव्याची सांगता
आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज गुढीपाडवा निम्मित विविध धार्मिक कार्यक्रम केले जात असून दुपारी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला संपूर्ण सुवासिनीच्या रूपाने शिवकालीन अलंका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूपाळी ते भैरवीने नांदेडकर मंत्रमुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
चैत्र प्रतिपदा अर्थात मराठी नववर्ष गुढीपाडवा या दिनाचे औचित्य साधून नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्यावतीने गुढीपाडवा पहाट-भुपाळी ते भैरवी हा गीत-संगीत नृत्यांचा अनोखा आविष्कार सादर करएयात आला. घनःश्याम सुंदरा ते तम निशेचा सरला....या एकापेक्षा एक सरस गितांनी तसेच विविध नृत्य कलाकृतीने या कार्यक्रमात रंगत आणली.
भुपाळी ते भैरवी या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर शैलजा स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते बंडू खेडकर, माजी सभापती किशोर स्वामी, सहायक आयुक्त चौरे यांची उपस्थिती होती. विजय जोशी आणि वर्धिनी जोशी यांच्या घनःश्याम सुंदरा या गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्त्रीच्या जन्मावर आधारीत १४ गाण्यांचा गितकुंज वर्धिनी जोशी हिने सादर केला. याला रसिकांनी उत्स्फूर्त दिला. रागिनी जोशीच्या बोलावा विठ्ठल व मायभवानी या गीतांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
श्रीरंग चिंतेवार यांनी गायिलेल्या 'नाम तुझे घेता देवा, तेच स्वप्न लोचनात, लाजून हासणे...' या गितांना रसिकांची भरभरुन दाद मिळाली. प्रसाद जोशी यांनी 'शोधीशी मानवा' हे गीत गावून कार्यक्रमात रंगत आणली. विजय जोशींनी गायिलेल्या 'दशरथा घे हे पायसदान, इंद्रायणी काठी' या गितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
भरत जेठवानी आणि संचाने सुर निरागस हो, जय मल्हार, कोळीगीत आदी नृत्य सादर करुन रसिकांच्या अपेक्षेचे पारणे फेडले. उत्कृष्ट लयबद्धता व नृत्यांची जबरदस्त मांडणी यामुळे हा कार्यक्रम चांगलाच रंगला. विजय बंडेवार यांनी निवेदनाला दिलेली साथ उत्कृष्ट होती.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रख्यात गायक धनंजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, वर्धिनी जोशी यांनी नाट्यगिते व गझल सादर करुन कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. 'जय शंकरा, दिल की तपिश, घेई छंद मकरंद, हे सुरांनो चंद्र व्हा' या एकापेक्षा एक सरल नाट्यगितांनी जोशी आणि अपस्तंभ यांनी रसिकांचे पारण फेडले. वर्धिनी जोशी ऋतूराज आज वनी आला हे नाट्यगित तर गाण्यात सर्व माझ्या...माझे इमान आहे, ही गझल सादर केली.
तम निशेचा सरला या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम सकाळी असला तरी सभागृह खचाखच भरले होते. कार्यक्रमाचे संगीत साथ शेख नईम, स्वरुप देशपांडे, स्वरेश देशपांडे, रतन चित्ते, सिध्दोधन कदम, पंकज शिरभाते, जगदीश देशमुख, भार्गव देशमुख यांनी केली. निर्माता विजय जोशी व सहाय्य गोविंद पुराणिक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कडधान्ये, तेलबिया पेरा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बदलत्या हवामानाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला असून, शेतकरी केवळ ऊस, कापूस आणि फळबागा या नगदी पिकांच्या मागे लागला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी आपले बलस्थान असलेले कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी केले.

शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी 'मटा संवाद'मध्ये त्यांनी 'मटा'च्या संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले,'हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांना उत्पादन घ्यावे लागेल. एकेकाळी कडधान्ये, तेलबिया हे मराठवाड्याचे बलस्थान होते. येणाऱ्या काळात शासनाकडून मराठवाड्यात तेलबिया, कडधान्ये यांचे क्षेत्र वाढविण्यासाठी येणाऱ्या काळात मोहीम राबवण्यात येणार आहेत. मराठवाड्यात तूर, उडीद, मुगासाठी योग्य प्रकारची जमीन असल्यामुळे दर्जेदार उत्पादन होते. ज्या ठिकाणी ऊस, सोयाबीन आहे तेथे तूर पेरावी. या पिकांमुळे जमिनीची पोत सुधारेल. तूर व सोयाबीन हे चांगले संयुक्त पीक आहे. आपल्याला खाद्यतेल आयात करावे लागते. हे पीक आपले बलस्थान होते. कापसात उडीद, मूग आंतरपीक घ्यावे. पाण्याच्या कमतरतेमुळे येणाऱ्या काळात आपल्याला एकमेकांना पूरक असलेली पिकेच घ्यावे लागणार आहे.'

शेती म्हणजे केवळ पिकवणे नव्हे. शेतीमालाचे मार्केटिंगही आवश्यक अाहे. शेतकऱ्यांनी गट तयार करून एकत्र यावे व तेलबियांवर प्रक्रिया करावी. माल स्वतः ग्राहकांपर्यंत पोचवावा. कडधान्ये,तेलबियांचे उत्पादन व क्लस्टर तयार करण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

कोरडवाहू फलोत्पादनाबाबत डॉ. दांगट म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बोर, सीताफळ, चिंचा, जांभूळ ही कमी पाणी लागणारी फळपिके घेणे उपयुक्त ठरेल.

क्लस्टर डेव्हलपमेंट
शेती उत्पन्नातील ७० टक्के वाटा मध्यस्थ व इतर खर्चात जातो. शेतकऱ्याला केवळ ३० टक्के उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डाळी, तेलबियांचे क्लस्टर तयार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन करून मार्केटिंग व निर्यात करावी. त्यासाठी येत्या काळात क्लस्टर डेव्हलपमेंट प्लानही तयार करण्यात येणार अाहे. जिल्हानिहाय क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. दांगट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिव्हॉल्व्हर रोखणारे डाके निलंबित

0
0

औरंगाबाद : मालमत्ता कर वसुलीसाठी हरिष पवार या व्यावसायिकावर रिव्हॉल्व्हर रोखणारे वॉर्ड अधिकारी विठ्ठल डाके यांना महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी निलंबित केले. डाके शासनाच्या सेवेतून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले होते.

सिडको एन २ परिसरातील मायानगरात हॉटेल प्लॅटिनम इन हे आहे. या हॉटेलच्या मालकाकडे मालमत्ता कराची २ लाख ७३ हजार रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विठ्ठल डाके यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या वॉर्ड 'इ' कार्यालयाचे पथक ३१ मार्च रोजी हॉटेलवर गेले. या ठिकाणी डाके आणि हरिष पवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान डाके यांनी पवार यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्या मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मटा सिटिझन अॅप'मुळे शहरातील समस्या मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 'अॅप'मुळे शहरातील समस्या सोडविण्यास मदत होईल, असे मत 'मटा सिटिझन रिपोर्टर' उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मटा सिटिझन रिपोर्टर अॅप' उपक्रमात गेल्या आठवड्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्ञानेश्वर मोहिते, ओमप्रकाश धूत यांचा शुक्रवारी (आठ एप्रिल) महाराष्ट्र टाइम्स कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. या आठवड्यात मोहिते 'बेस्ट सिटिझन रिपोर्टर' ठरले. 'मटा सिटिझन रिपोर्टर अॅप' हे शहरातील समस्या मांडण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. या समस्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर संबंधित यंत्रणा त्याची दखल घेतात, असा अनुभव आहे. 'अॅप'मुळे शहरातील समस्यांची सोडवणूक करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. 'मटा सिटिझन रिपोर्टर अॅप' हे एक समस्या मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. अशा प्रकारच्या 'अॅप'मुळे दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या शहरातील समस्या मांडण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील समस्या सोडविण्यास मदत होते, असे धूत यांनी सांगिले.

आपणही बनू शकता सिटिझन रिपोर्टर
वाचकहो, MT Citizen Reporter हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. त्यानंतर अॅपमधील तपशील पूर्णपणे भरा. हा तपशील प्रसंगी मटाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर तुम्ही फोटो, टेक्स्ट किंवा व्हिडीओ स्वरुपात आपले म्हणणे मांडू शकता. फोटो आणि त्याखाली टेक्स्ट हा पर्याय त्यातल्या त्यात सर्वोत्तम. फोटो आणि त्यासोबतच टेक्स्ट पाठवताना त्याची कॅटेगरी सिलेक्ट करा. समस्याप्रधान फोटो असल्यास सिव्ह‌िक इश्यू अशी कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तो फोटो पाठवा. बरेचदा अॅप तुम्हाला तुमचे लोकेशन विचारू शकेल. त्यावेळी 'औरंगाबाद' असे टाइप करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाचे उत्साहात स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उंट-घोडे, सनई चौघडे आणि पारंपारिक वेशभूषेत नववर्षाच्या स्वागताची मिरवणूक शुक्रवारी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत अाबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, पुष्पवृष्टीही करण्यात आली.

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते. यंदा या मिरवणुकीचे अकरावे वर्ष होते. औरंगाबादचे ग्रामदैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपतीची आरती करून सायंकाळी पाचच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला. स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे, स्वागत समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर डॉ. मंगलनाथ महाराज, डॉ. हेडगेवार स्वागत समितीचे अध्यक्ष देवजीभाई पटेल, आमदार अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, माजी महापौर डॉ. भागवत कराड, गजानन बारवाल, कला ओझा, अनिल मकरिये, विजय वाघचौरे, शिवसेनेचे शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, प्रफुल्ल मालाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मिरवणुकीमध्ये उंट आणि घोड्यांवर मावळ्यांच्या वेशात बसलेल्या कार्यकर्त्यांचे विशेष आकर्षण होते. विविध सजीव देखाव्यांनी नागरिकांना खिळवून ठेवले होते. कैलास पर्वतावर बसलेल्या शंकर-पार्वतीचा सजीव देखावा गर्दी खेचत होता. त्याशिवाय श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे सजीव देखावेही होते. एका सजवलेल्या रथात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचा फोटो ठेवून त्याचे पूजन करण्यात आले होते. हा रथ मिरवणुकीत सर्वात पुढे होता. 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' चा जयघोष करीत बालगोपाळांचे पावली पथकही सहभागी झाले होते. बजरंगदल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेही मिरवणुकीत सहभागी झाले होते. 'गो माता की जय', 'वंदेमातरम्'चा जयघोष करीत या कार्यकर्त्यांनी देशभक्तीचा संदेश दिला. जंगम व लिंगायत समाजातर्फे तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर करणारे कार्यकर्ते मिरवणुकीत चमक दाखवून गेले. स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या श्री संप्रदायाचे सेवेकरी देखील सहभागी झाले होते. रथावर स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा फोटो ठेवण्यात आला होता. त्यामागे भगवे फेटे बांधलेले पुरूष सेवेकरी, त्यानंतर नऊवारी साड्या नेसलेल्या महिला सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी डोक्यावर कलश घेतले होते. हे सेवेकरी स्वामी नरेंद्राचार्यांचा नामघोष करीत होते. काही महिला सेवेकऱ्यांच्या हातात समाजिक संदेश देणारे फलक होते. मिटमिटा येथील स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिरच्या श्रीनाथ परिवाराचे सदस्यही मिरवणुकीत होते. यज्ञाचे महत्त्व सांगणारा आर्य समाज मंदिराचा रथही मिरवणुकीत होता. मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली. राजाबाजार येथून निघालेल्या मिरवणुकीची सांगता खडकेश्वर येथील महादेव मंदिराच्या परिसरात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजराती समाज मंडळ कॉलेज सुरू करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'श्री गुजराती समाज मंडळाला ज्युनिअर कॉलेज काढायचे आहे. यासाठी लागणारी परवानगी मी आणणार असून समाज मंडळाने याची काळजी करू नये,' असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष व माजीमंत्री अनिलभाई पटेल यांनी केले.

ते शुक्रवारी श्री. गुजराती विद्या मंदिराच्या खाराकुँवा येथील नवीन वास्तू भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते. समाजमंडळातील सर्व सदस्यांसमोर मंडळाच्या भावी नियोजनाबाबत अनिल पटेल यांनी सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, 'आजच्या दिवसांपासून किमान ६ महिन्यात ही नवीन वास्तू उभी राहील. या वास्तूत लवकरच आपल्याला ज्युनिअर कॉलेज सुरू करायचे आहे. यासाठी विविध परवानगी, जागेची मालकी वगैरे जे काही सोपस्कार आहेत त्याची जुळवाजुळव ‌मी करेल, पण ही वास्तू लवकरच भव्यदिव्यपणे उभी राहील. ही चार मजली इमारत उभी राहणार असून २० वर्ग आणि शाळांना लागणारी सर्व सुविधा त्या वास्तूत असेल.'

यावेळी व्यासपीठावर लालदासजी झवेरी, शीलाबेन गुजराती, मंजुळाबाई मेहता, नटवरभाई पटेल, चंदूभाई पटेल, मदनभाई जालनावाला, नगरसेक यशस्वी बाखरिया, नटरवरभाई पटेल, शैलेशभाई मोतीवाला, आदींसह श्री गुजराती समाज विकास मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. विकास मंडळातील श्री. गुजराती विद्या मंदिर, कन्या विद्यालय, पाठशाला, बालकमंदिर, इंग्लिश प्राथमिक शाळा आदींचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्ष स्वागत मिरवणुकीत शिवसेना-भाजपचा सवतासुभा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना-भाजपमधील सवतासुभा शुक्रवारी नववर्ष स्वागताच्या मिरवणुकीत उघड झाला. दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या मिरवणुका काढून आपले अस्तित्व दाखवून दिले. राज्यपातळीवर शिवसेना - भाजपमध्ये विविध कारणांवरून धुसफूस सुरू असते. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात पडतात. औरंगाबादमध्येही या दोन पक्षांमध्ये काही मुद्यांवर मतभिन्नता आहे. ही मतभिन्नता आज पुन्हा उघड झाली.

शिवसेनेने राजाबाजार येथील संस्थान गणपतीच्या मंदिरापासून मिरवणूक काढली. नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपचे नेते व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या मिरवणुकीत पूर्णवेळ उपस्थित होते. त्यांच्याशिवाय भाजपचा एकही पदाधिकारी पूर्णवेळ उपस्थित नव्हता.

मिरवणुकीच्या सुरुवातीला भाजपचे पदाधिकारी हजर होते. मिरवणूक सुरू झाल्यावर त्यांनी काढता पाय घेतला. राजाबाजार येथून निघालेल्या मिरवणुकीत खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, माजी महापौर कला ओझा, माजी सभापती विजय वाघचौरे, वैजयंती खैरे, रंजना कुलकर्णी, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, संतोष जेजूरकर, प्रफुल्ल मालाणी, सुनीता देव आदी पदाधिकारी मात्र शेवटपर्यंत कायम होते. भाजप पदाधिकाऱ्यांच्या जयभवानीनगरातून काढलेल्या मिरवणुकीची सुरुवात आमदार अतुल सावे यांच्या हस्ते झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, माजी महापौर डॉ. भागवत कराड, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, अनिल मकरिये यांच्यासह भाजपचे आजी - माजी नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता गारखेडा येथील हनुमान मंदिराजवळ झाली. शिवसेनेचे पदाधिकारी शहरातील मिरवणुकीत तर भाजपचे पदाधिकारी गारखेडा भागातील मिरवणुकीत असे स्पष्ट चित्र होते. राजकीय वर्तुळात या दोन्हीही पक्षातील सवतासुभ्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : फालुदा, मिक्स ज्यूसचा गारवा

0
0

Abdulwajed.shaikh@timesgroup.com
निरोगी राहण्यासाठी डॉक्टर फळांचा रस किंवा ज्यूस पिण्याचा सल्ला देत असतात. उन्हाळ्यात ज्यूसला अनेकांची पसंती असते. पैठण गेट परिसरातील महोम्मद सलीम बागवान यांच्या फ्रेश ज्यूस सेंटरवर उन्हाळ्यात गर्दी वाढते. तेथे स्पेशल मिक्स ज्यूस, स्पेशल फालुदा मिल्कशेक आणि स्पेशल मस्तानी मिल्कशेकची मागणीही वाढली आहे.

पैठणगेट भागात १९८२मध्ये फ्रेश ज्यूस सेंटरची सुरुवात मोहम्मद सलीम बागवान यांनी केली. फळाच्या व्यवसायासोबत मोहम्मद सलीम यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. बागवान असल्याने त्यांना दर्जेदार, चांगल्या फळांची माहिती आहे. फळांचा अभ्यास असल्याने त्यांनी ज्यूसचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात ज्यूसच्या व्यवसायाला फारशी डिमांड नव्हती. त्यांनी आननस, मोसंबी, सफरचंद आदींच्या ज्यूसने व्यवसायाला सुरुवात केली. हळुहळु त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत गेली. सलीम बागवान यांच्या मुलांनी आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांची तिन्ही मुले आता त्यांना व्यवसायात मदत करतात. मध्यंतरीच्या काळात ज्यूस सेंटरचा व्यवसाय कोल्ड ड्रिंक्समुळे संकटात आला होता, मात्र कोल्ड ड्रिंक्सचे तोटे समजल्यामुळे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे अनेक नागरिक ज्यूसकडे वळाले. त्यामुळे ज्यूस सेंटरवर गर्दी वाढू लागली.

फ्रेश ज्यूस सेंटरमध्ये स्पेशल फालुदा मिल्कशेकला अधिक मागणी आहे. शहरात रमजानच्या महिन्यात बुढीलेन भागात फालुदा मिळतो, मात्र फ्रेश ज्यूस सेंटरमध्ये वर्षभर फालुदा उपलब्ध असतो. फालुद्यातील सब्जा, शेवयांसह आइस‌क्रिमची चवच न्यारी आहे. फालुद्यासाठी दूध गरम करण्यात येते. गरम केलेले दूध थोडे थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवले जाते. फालुदा तयार करताना ग्लासमध्ये रोझ सिरप घेऊन त्यात भिजवलेला सब्जा, उकडलेल्या शेवया टाकल्या जातात. नंतर त्यात दूध टाकून वरून आइसक्रिम, सुकामेवा टाकून सर्व्ह केले जाते. सब्जामुळे शरीरातील गारवा कायम रहातो.

त्याशिवाय मस्तानी ड्राय फ्रूट मिल्कशेकही प्रसिद्ध आहे. ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे, दूध, साखर टाकून मिक्सरमधून काढले जाते. या दुधात ग्राहकांच्या मागणीप्रमाणे लिक्विड चॉकलेट किंवा बटर स्क्वॉच, रोझ फ्लेवर टाकले जातात. याशिवाय मिक्स फ्रूट स्पेशल मिल्कशेकलाही ग्राहकांची मागणी आहे. मिक्स ज्यूसमध्ये त्या-त्या ऋतूत उपलब्ध असलेल्या फळांचा वापर प्राधान्याने केला जातो. त्यात आंबा, चिकू, अंजिर, सफरचंद, पपई या फळांचे ज्यूस वेगवेगळ्या मिक्सरमध्ये तयार करून ठेवले जातात. ऑर्डरनुसार ते एकत्र करून त्यात रोझ फ्लेवर, आइस्क्रिम टाकून सर्व्ह केले जाते. विविध फळांच्या ज्यूसचा आस्वाद 'मिक्स फ्रूट'मध्ये मिळतो. ज्यूस आरोग्यदायी असल्याने आता संत्री, डाळींब, मोसंबी आदी फळांच्या प्युअर ज्यूसला मागणी वाढत असल्याचे मोहम्मद सलीम सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टंचाई मुक्तीसाठी लातूरकर सरसावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूरच्या पाणीटंचाईची चर्चा देशभर होत असतानाच पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी लातूरकर सरसावले आहेत. जलयुक्त लातूर सर्वासाठी पाणी या चळवळीने वेग घेतला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समिती, नाम आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या पुढाकारातून विविध संस्था एकत्र आल्या आहेत.
जलयुक्त लातूर सर्वांसाठी पाणी या चळवळीच्या माध्यमातून मांजरा नदीच्या खोलीकरणाची सुरुवात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोकराव कुकडे उपस्थित होते.
जलयुक्त लातूर सर्वांसाठी पाणी या चळवळीच्या मार्गदर्शक मंडळाचे समन्वयक मकरंद जाधव प्रास्ताविकात म्हणाले, 'मांजरा नदीवरील साई आणि नागझरी बंधाऱ्याचे १८ किलो मीटर लांब, ८० मीटर रुंद आणि तीन मीटर खोलीकरण, रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी किमान साडेसात कोटी रूपये लागणार आहेत. या कामाचा फक्त लातूरकरांना फायदा होणार नसून नदी पात्राच्या दोन्ही बाजूच्या पाच ते दहा किलोमीटर अंतरातील विहिरीना पाणी येणार आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. ४० पोकलेनच्या साह्याने दररोज न थांबता २० तास काम करावे लागणार आहे.'
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह अरुण डंके यांनी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा पहिला हप्त्याचा चेक मार्गदर्शक मंडळाकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगितले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रदेश प्रतिनिधी उदय मोरे यांनी एक कोटी रुपयांची मदत घोषीत केली. कंत्राटदार दिलीप माने यांनी व्यक्तीगत एक लाख आणि ना नफा ना तोटा या तत्वावर यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे, कंत्राटदार संघटनेकडून किमान ११ लाख रुपये देण्याच घोषीत केले. उद्धवराव पाटील फाउंडेशनच्यावतीने अॅड. उदय गवारे यांनी ५१ हजार आणि शिवशंकर लातुरे यांच्याकडून २५ हजार रुपये घोषीत केले. अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेचे कार्यवाह प्रदिप नणंदकर यांनी संस्थेच्यावतीने एक लाख रुपये घोषीत केले. बालकिशन मुंदडा यांनी एक लाख, श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्यावतीने एक लाख ५१ हजार रुपये कार्याध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी घोषीत केले. नामचे विलास चामे यांनी वैयक्तीक एक लाख रुपये यावेळी घोषीत केले.
यावेळी बोलाताना पोलिस अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवारकडून लातूरकडे हा प्रवास देशभर आदर्श निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठवाडा वैधानिक मंडळाचे सदस्य बी. बी. ठोंबरे यांनी मांजरा धरणातील गाळ काढण्यासाठी ही प्रयत्न करण्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या गाळ काढण्यासाठी लागणारी राज्यातील सर्वात मोठी मशिन राज्य शासनाच्यावतीने या कामासाठी देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, अॅड. मनोहरराव गोमारे, अॅड. त्र्यंबकदास झंवर यांची भाषणे झाली.
यावेळी उद्योजक नीलेश ठक्कर, अॅड. संजय पांडे, सुनील कोचेटा, विशाल अग्रवाल, सुनील देशपांडे, साईचे सरपंच ज्ञानेश्वर पवार, नांदगावचे उपसरपंच ढमाले यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले. शिवदास मिटकरी यांनी आभार मानले.

डॉक्टर करणार ५१ लाखांची मदत
या कामासाठी शहरातील सर्व डॉक्टरच्या माध्यमातून ५१ लाख रुपये जमा केले जाणार आहेत. या कामासोबतच सर्वांनी छतावर पडणारे पाणी साठविण्याची मोहीम ही यशस्वी करा, असे आ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरी समता आर्थिक : डॉ. नेमाडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्वातंत्र्य, समता, बंधुभाव फक्त नावाला उरली आहे. अमूक आपले बांधव आहेत, असे म्हणणेसुद्धा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. नुसत्या आरक्षणाने समता येत नाही. खरी समता आर्थिक असावी लागते,' असे प्रतिपादन ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले. 'मुक्तसंवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या 'स्वातंत्र्ययोद्ध्याचे पाठीराखे महाराजा सयाजीराव गायकवाड' या पुस्तकाचे डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला बाबा भांड, संजय भास्कर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नेमाडे यांनी साहित्य, इतिहास, संस्कृती, राजकारण अशा अनेक विषयांवर चौफेर भाष्य केले. 'जात मोडा असे सांगणारेच मनात जात जपतात असे अनेक लोक पाहिले. ब्राह्मण राष्ट्रवाद रोखण्यासाठी १९०१मध्ये जाट, नागा, मराठा अशा जाती तयार झाल्या. तोपर्यंत मराठ्यांना कुणबी म्हणत. आपण कुणबी होतो मग आरक्षण पाहिजे, असे काही लोक आता म्हणत आहेत, पण या रचनेमागील सत्य समजून घेतले जात नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव जाहीर करूनही देशाचे भले झाले नाही. मागील ६६ वर्षांत घरोघरी पाणीसुद्धा दिले नाही.

आरक्षणाने समता येत नाही. खरी समता आर्थिक असावी लागते. नोकरी हुकली की दुसऱ्यांना आरक्षण असल्यामुळे संधी मिळाली नाही, असे म्हणण्याची फॅशन आहे. तर ज्यांचा नंबर खुल्या प्रवर्गात लागतो ते स्वतःला मेरीटचे समजू लागले,' असे नेमाडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरतीत मनमानी

0
0


म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
पूर्वप्राथमिक शाळांमध्ये शासनाचे नियम, निकष धाब्यावर बसवत संस्थाचालकांकडून शिक्षक भरती सुरू आहे. शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम ठरविण्याचे निकष याबाबत पालकांना अंधारात ठेवत चक्क अमराठी शिक्षकांची नेमणूक सुरू आहे. त्यामुळे या फरफटीत पालकांसोबत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाचे शाळांवर नियंत्रण नसल्याचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. पूर्वप्राथमिकस्तर आपल्या अखत्यारित नसल्याचे विभाग सांगतो. कोणाचेच नियंत्रण नसल्याने अशा शाळांमुळे पालक स्त्रस्त झाले आहेत. एप्रिलपूर्वीच अनेक शाळांचे प्रवेश फुल्ल झाले, तर अनेकांना शाळांचे शुल्क थक्क करणारे वाटते आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश, शुल्काप्रमाणेच शिक्षक नेमण्यातही सुसूत्रता नाही. आपल्या मर्जीप्रमाणे शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक केली जाते. संभाषण कौशल्य सोडाच काही शाळांमध्ये परराज्यातील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. विशेषतः केरळ राज्यातील किंवा कॉनव्हेंटमध्ये शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्याकडे कल असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक शाळेत अशा एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाचे शिक्षक भरतीचे कोणतेच निकष नसल्याने शाळा व्यवस्थापनाच्या मनावर शिक्षकाची नेमणूक आणि पगार ठरलेला असतो. हा पगार अडीच ते तीन हजारांपासून सुरू होतो. आपल्या मर्जीप्रमाणे शाळांची चालणारी प्रक्रिया ही शिक्षण व्यवस्थेला मागे खेचणारी आणि बालकांवर अन्याय आणि पालकांना आर्थिक भुर्दंड बसविणारी ठरते आहे.
अभ्यासक्रमाबाबत ताळमेळ नाही
शिक्षकांच्या नेमणुकाप्रमाणे अभ्यासक्रमाबाबतही ताळमेळ नाही. नॅशनल, इंटरनॅशन जसे मनात येईल तसे फलक अशा शाळांवर लटकवलेले आहेत. शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रमाची रचना त्याला कोणाची मान्यता याबाबत पालकांनाही फारशी माहिती दिली जात नाही. त्यांना अंधारात ठेवले जाते.
प्रोफेशन ट्रेनिंगचे फॅड
अनेक शाळांमध्ये प्रोफेशन ट्रेनिंग दिले जाते. विशेषतः साखळी शाळांमध्ये असे प्रकार सुरू आहेत. अनेक शाळांमध्ये परराज्यातील शिक्षकांनाही आमंत्रित केले जाते. छोट्या शाळांमध्ये तर प्रशिक्षणाचा विषय नसतो. जसे जमेल त्याप्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका हा फंडा वापरला जातो. पालकाला आपल्या पाल्याला कोण शिकवितो, त्याची पात्रता काय, याची कल्पनाच नसते.
-
भरतीबाबत कोणतेच नियम नाहीत. अभ्यासक्रमाबाबतही तसेच आहे. जसे ज्याला परवडेल तशा प्रकारे शिक्षकांना शाळेत पगार दिला जातो. यात सुसूत्रता असायला हवी. यापेक्षा दुसरीबाब म्हणजे अनेक ठिकाणी नॅशनल, इंटरनॅशनल असल्याचे शाळांकडून सांगितले जाते. हेही कितपत योग्य आहे, असा प्रश्न आहे.
- प्रल्हाद शिंदे, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)
-
पूर्वप्राथमिक म्हणजे शिक्षणाच्या पूर्वीचा टप्पा. येथे चिमुकल्यांच्या गरजा लक्षात घेत, त्यानुसार त्यांना समजून घेणारे शिक्षक लागतात. त्यासाठी माँटेसरी कोर्स आवश्यक असतो. तो शाळांनी बंधनकारक केलाही आहे. मात्र, दुसरे एक आहे. तुमच्याकडे कोणती पदवी आहे, यापेक्षा तुम्ही कसे शिकविता याला महत्त्व आहे. अनेक बाहेरुन आलेले शिक्षक चांगले शिकवित असतील तर, त्यांचेही स्वागत असयला हवे.
- ऋषिंदर दाभाडे, शिक्षक, न्यू लिटरस्टार इंग्लिश स्कूल
-
शाळांचा हा प्रकार बेलगामपणाचा आहे. कोणताच ताळमेळ नसल्याने पालकांची होणारी एक प्रकारची ही फसवणूक आहे. त्यामुळे यावर शासनाने तत्काळ नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
- राहुल तायडे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑस्ट्रेलियन स्पर्धेत बैजू पाटील प्रथम

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रतिभेला वाव देण्याच्या हेतूने ऑस्ट्रेलियातील 'शूट द फ्रेम' संस्थेतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना मिळाला. 'शूट द वाइल्ड‍ विनर' या प्रकारात जगभरातून आलेल्या ३५०० फोटोंमधून बैजू यांच्या जायकवाडी धरणावर काढलेल्या रिव्हरटर्न पक्ष्याच्या फोटोला पहिला पुरस्का‍राने सन्मानित करण्यात आले.
वन्यजीव छायाचित्रणातील ३५ पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कावर मिळवून बैजू यांनी देशाचे नाव उंचावले आहे. ऑस्ट्रेलियातील नॉर्थकोट व्हिक्टोरिया येथील संस्था दर महिन्याला जगभरातील वन्यजीव छायाचित्रकारांना स्पर्धेत आमंत्रित करते. मार्च महिन्यात बैजू यांच्या‍ फोटोला पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे वर्षाच्या शेवटी पुरस्कार प्राप्त १२ उत्तम छायाचित्रांतून एका फोटोची निवड केली जाणार आहे. स्पर्धेत अफ्रिकेतील वन्यजीव छायाचित्रकार अधिक प्रमाणात भाग घेतात. कारण वन्यजीव छायाचित्रणासाठी तेथे पुरक वातावरण आहे. त्या तुलनेत भारतात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जलप्रदूषण, धूळ, वातावरणातील बदल यामुळे पक्षी, प्राण्यांना सतत त्रास होत असतो. या सर्वांवर मात करत बैजू यांनी रिव्हरटर्न पक्ष्याचा पुरस्कार प्राप्त फोटो टिपला आहे.
१० दिवस दररोज ४ तास परिश्रम
बैजू म्हणाले, 'या फोटोसाठी मला सतत १० दिवस जायकवाडी धरणावर जावे लागले. पहाटे चार वाजता पैठणच्या दिशेने मी निघायचो आणि पाच ते आठपर्यंत उत्तम फ्रेम मिळण्यासाठी प्रतीक्षा करायचो. प्रत्यक्षात किंगफिशर या पक्ष्याचे फोटो घ्यायचे होते. मात्र, अचानक एके दिवशी दिवस उजाडण्याच्या वेळी पाण्यात काही हालचाल नव्ह‍ती. पाण्यावर दिसलेला मासा पकडण्यासाठी रिव्हरटर्न पाण्याच्या दिशेने खाली आला. त्याचवेळी कॅमेरा तिकडे फिरवला, पण हवी तशी फ्रेम मिळाली नाही. तो पक्षी त्याच भागात घिरटया घालत असल्याचे पाहून तो पुन्हा खाली येणार अशी खात्री झाली. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने चोचीत मासा पकडण्याणसाठी पुन्हा पाण्याकडे धाव घेतली आणि अप्रतिम असा फोटो मिळाला. यात दोन पक्षी असल्याचा भास होतो, पण प्रत्ययक्षात तो एकच आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...ध्वज ज्ञानाचा उंच धरा रे!

0
0


Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबाद:
पौरोहित्य करणारा समाज म्हणून जंगम समाज ओळखला जातो. शिक्षणाच्या अभावामुळे या समाजाची प्रगती होऊ शकली नाही. गेल्या काही वर्षांत शिक्षणाचे महत्त्व समजल्याने युवा वर्गाचा कल शिक्षणाकडे वाढला आहे. आर्थिकदृष्ट्या हा समाज सक्षम होण्यासाठी शासकीय लाभ मिळणे आवश्यक झाले आहे.
जंगम ही लिंगायत गुरुची जात. जंगम लिंगाचे उपासक हे जंगम. प्रत्येक लिंगायताला गुरू असावाच लागतो. त्यामुळे जंगमवर्गाला महत्त्व आले आहे. गुरुस्थल (विवाहित) व विरक्त (ब्रह्मचारी) असे या जंगमांचे दोन ठोकळ भेद आहेत. गुरुस्थल जंगमांकडे गृहसंस्कारांचे काम असते. विरक्त जंगम वेदांतादी धार्मिक विषयांचे अध्ययन, अध्यापन करतात. दोघेही मठवासी असतात. जंगमांत पाच संप्रदाय आहेत. एकोरामाध्य, पंडिताराध्य, मरुलाराध्य, रेवणाराध्य आणि विश्वाराध्य अशी त्यांची नावे. गृहस्थाश्रमी लिंगायत जंगमांस फार पवित्र मानतात. प्रत्येक संप्रदायात १३ भेद आहेत. या भेदांस ते बागी म्हणतात. विवक्षित संप्रदायांतील एकाच भेदाच्या जंगमांत परस्पर लग्ने होत नाहीत. वेगवेगळ्या प्रांतात जंगमांचे निरनिराळे प्रकार आहेत. हा समाज लातूर, सोलापूर भागात अधिक प्रमाणात आहे. माला जंगम, बेडा जंगम, बुडगा जंगम अशा प्रमुख तीन पोटजाती जंगम समाजात आहेत. पूजापाठ करुन उदरनिर्वाह करणे, हेच जंगम समाजाचे मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. वीरशैव समाज हा अनेक पोटजातीत विभागलेला आहे. त्यात जंगम समाजाचे प्रश्न इतरांपेक्षा वेगळेच आहेत. शिक्षणाचा अभाव व पौराहित्यावर उदरनिर्वाह करणारा जंगम समाज वीरशैव मेळाव्यात फारसा सहभागी होत नसे. हा समाज विखुरलेला आहे. प्रत्येक गावा-गावांत तो दिसत असला तरी त्यांची संख्या फारसी नाही. १९९०-९१च्या काळात जंगम समाजाचा पहिला वधू-वर परिचय मेळावा अंबाजोगाई येथे घेण्यात आला. त्यानंतर वधू-वर परिचय मेळावा अन्यत्र घेण्यास प्रारंभ झाला. जंगम समाज प्रामुख्याने भटका, विखुरलेला आणि संघटीत नसल्याने या समाजाचा एकत्र आणण्यासाठी जंगम समाज संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. समाज एकत्रित येण्याकरिता वधू-वर परिचय मेळाव्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम नियमित घेण्यात येतात, असे जंगम समाज संघटनेचे अध्यक्ष एल. एम. वाडकर यांनी सांगितले. पौरोहित्य हाच पारंपरिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने शिक्षणाचा मोठा अभाव जंगम समाजात आहे. पूजापाठ करण्याकडेच कल आजही दिसून येतो. मात्र, काळाच्या बदलानुसार जंगम समाजही बदलत आहे. मात्र, या बदलाचा वेग फारसा दिसून येत नाही. शिक्षण घेण्याकडे युवा वर्गाचा कल वाढला आहे. मुले-मुली उच्च शिक्षण घेत आहेत. पदवीपर्यंतच शिक्षण घेऊन सरकारी अथवा खासगी नोकरी मिळवणे हाच हेतू यामागे आहे. सरकारी नोकरीत उच्च पदावर जंगम समाजातील मंडळी फारसी नाहीत. खासगी नोकरीतही अशीच परिस्थिती आहे. शिक्षणाचे महत्त्व वाढवण्याच्यादृष्टिने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. जंगम समाजाची प्रगती होण्याकरिता युवा पिढी उच्च शिक्षित झाली पाहिजे, तरच समाजाचीही प्रगती होऊ शकणार आहे. त्यामुळे जंगम समाज संघटना मुला-मुलींच्या शिक्षणावर भर देत असल्याचे वाडकर यांनी सांगितले. जंगम समाजाचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात आहे. जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जंगम समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रमाणपत्राची पडताळणीही लवकर होत नाही. त्यामुळे जंगम समाजातील अनेकजण शासकीय लाभापासून वंचित राहातात. गेल्या ३५ वर्षांपासून जंगम समाज मागणी करत आहे. मात्र, या मागणीचे गांभीर्य अद्यापही लक्षात घेण्यात आलेले नाही, याची खंत वाटते. जंगम समाजातील युवा पिढी शैक्षणिक तसेच नोकरीच्या लाभापासून कोसोमैल दूरच आहे, याकडे वाडकर यांनी लक्ष वेधले.
वसतिगृहाची योजना
जंगम समाजातील मुला-मुलींसाठी औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी एक वसतिगृह असणे आवश्यक वाटते. या सामाजिक उपक्रमासाठी शासनाने एखादी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेतला, तर युवा वर्गाच्या शिक्षणाची सोय होऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या हा समाज मागे असल्याने शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. त्याचमुळे शासनाने जंगम समाजातील तरुणाईकरिता एखादा भूखंड उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा वाडकर यांनी व्यक्त केली.
वधू-वर परियच मेळावा
गेल्या दोन वर्षांपासून जंगम संघटनेतर्फे औरंगाबादेत वधू-वर परिचय मेळावा घेण्यात येत आहे. आगामी काळात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा मानस आहे, असे वाडकर यांनी सांगितले. जंगम समाज विखुरलेला असल्याने योग्य स्थळांची माहिती नसणे, हुंडा समस्या, वेळेची मर्यादा अशा कारणांमुळे वधू-वरांच्या विशेषतः वधूंच्या माता-पित्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नोकरी, व्यवसायाच्यानिमित्ताने जंगम समाज स्थलांतरित झालेला आहे. शिक्षणाकडे कल वाढल्याने सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. वधू-वर परिचय मेळाव्यातून योग्य स्थळांची माहिती होत आहे. या मेळाव्याची संकल्पना आता समाजात रुजत चालली आहे. त्याचा चांगला फायदा दिसून येत असल्याचे वाडकर यांनी सांगितले. जंगम समाजात रुद्राक्षाची माळ व भस्म लावण्याची प्रथा आहे. हा समाज महादेवाचा परम भक्त आहे. या समाजात 'करुणा' विधीला महत्त्वाचे स्थान आहे. मुले झाल्यानंतर हा विधी केला जातो. जंगम समाजात प्रेताला अग्नी देण्यात येत नाही, तर प्रेताची आसनमांडी घालून शिवलिंग हातात देऊन पुरले जाते.
औरंगाबाद जिल्हा जंगम समाज कार्यकारिणीः अध्यक्ष एल. एम. वाडकर, उपाध्यक्ष नागनाथ स्वामी काजळे, सचिव शिवशंकर स्वामी, सहसचिव विलास स्वामी, कोषाध्यक्ष बालू स्वामी, सदस्य मधुकर स्वामी, अजय तोडकर, अमोल स्वामी, शैलजा स्वामी, सुरेखा पंढरपुरे, जगदेवी स्वामी, सविता स्वामी. प्रसिद्धी प्रमुख विजय आगलावे, विधी सल्लागार शिवकुमार मठपती.
-
जंगम समाज विखुरलेला असल्याने वधू-वरांची योग्य निवड करणे हे अतिशय अवघड झाले आहे. शिक्षणाचा अभाव ही मोठी समस्या आहे. समाज एकत्र आल्याशिवाय प्रगती होणे अशक्य आहे आणि म्हणूनच संघटना विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
- एल. एम. वाडकर, अध्यक्ष, जंगम समाज संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images