Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जलसंधारणाची लोकचळवळ व्हावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

राज्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून हा प्रश्न कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जलसंधारणाच्या कामास प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारतर्फे जलयुक्त शिवार अभियान सुरू आहे. त्यात लोकसहभागाबरोबरच गावपातळीवर लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, अशा शब्दांत सिनेअभिनेता आमीर खान याने शुक्रवारी मार्गदर्शन केले.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धक गावांच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना तो बोलत होता.

प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, राजकिशोर मोदी व्यासपीठावर होते.

आमिर म्हणाला की, पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. त्यात अंबाजोगाई तालुक्याचा समावेश आहे. निवड झालेल्या गावांतील पाच नागरिकांना पाणी फाऊंडेशन प्रशिक्षण देणार आहे. नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, श्रमदानातून काम करणे आणि सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे पाणी मुरविण्यासाठीची कामे हाती घेतली जाणार आहेत.

उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन गावांना वॉटर कप पारितोषिक दिले जाणार आहे. प्रथम - ५० लाख रूपये, द्वितीय पारितोषिक ३० लाख रूपये तर, तृतिय पारितोषिक २० लाख रूपयांचे आहे.

जलसंधारणाच्या कामामध्ये प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. मी स्वत:ही या कामांमध्ये श्रमदान करणार आहे. इतर कलावंतानांही श्रमदानाच्या या कामामध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - आमीर खान, सिने अभिनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामानवाला अभिवादन

0
0

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त अपूर्व उत्साहात मिरवणूक

औरंगाबाद : ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, टू वे स्पीकरच्या तालावर नाचणारी तरुणाई आणि आसमंतात घुमणाऱ्या जयभीमच्या घोषणा अशा अपूर्व उत्साही वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी मंडळांनी दुष्काळासह विविध सामाजिक विषयांवर देखावे सादर केले. रात्री उशिरा या मिरवणुकीचा समारोप भडकलगेट येथे झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतिचौकातून सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. डॉ. आंबेडकरांचा जयघोष करीत नागरिकांचे जथ्थे क्रांतिचौकात येण्यास सायंकाळपासून सुरुवात झाली. रमानगर येथील नवयुवक मित्र मंडळ, ब्लू फोर्स ग्रुपने भारताचे संविधानांची प्रतिकृतीचा देखावा सादर केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (डेमोक्रॅटिक) दुष्काळाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा देखावा सादर केला. नागसेन मित्र मंडळाने डॉ. बाबासाहेब यांचा खुर्चीवर विराजमान असलेले देखावा सादर केला.

मिरवणुकीत काही युवा खेडाळूंनी तलवारबाजीचे प्रात्याक्षिक साजर करून साऱ्यांचे लक्ष वेधले. मैत्रेय क्रीडा मंडळाच्या ढोल पथकाने तरुणांचा उत्साह वाढविण्याचे काम केले. भाकप, काँग्रेस, भाजप कामगार आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारतीय बौद्ध महासभा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यूथ फोर्स, भारतीय दलित कोब्रा, पँथर्स मित्र मंडळ, समता सैनिक, भारतीय जनसंघर्ष सेना, बहुजन मुक्ती पार्टी, जनक्रांती संघटना, बहुजन समाज पक्ष आदी पक्ष, संघटनांनी जागोजागी स्टेज उभारून मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणुकीत कबीरनगर येथील द ग्रेट बुद्ध मित्र मंडळ, संविधान मित्र मंडळ, फुलेनगर येथील तथागत मित्रमंडळ, त्रिरत्न मित्र मंडळ, धर्मोदय बुद्ध विहार यांसह शहरातील विविध भागातील मंडळांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्करबावडीचे पाणी गेले कुठे?

0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
औरंगाबाद ः हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचा मुख्य जलस्रोत असलेल्या 'शक्करबावडी' या विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. पुढील महिन्यात फळबागा व रोपवाटिकांना कमी पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशोधन केंद्राने इतर तीन विहिरींचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शक्करबावडी कधीच कोरडी पडली नाही. यावर्षीही विहिरीतील पाणी कमी होणार नाही, असा दावा इतिहास अभ्यासक डॉ. रमजान शेख यांनी केला आहे.

निजामकालीन हिमायतबाग परिसर स्थानिक जलस्रोत आणि वनराईसाठी प्रसिद्ध आहे. हिमायतबागेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे फळ संशोधन केंद्र आहे. दोनशे एकरांपेक्षा जास्त जागेवर विविध संशोधन प्रकल्प, रोपवाटिका व फळबागा आहेत. फळबागांना पाणी पुरवठा करण्यासाठी 'शक्करबावडी'चा उपयोग झाला आहे. या मोठ्या विहिरीने कधीच तळ गाठला नसून, मुबलक पाणी असल्यामुळे संशोधन केंद्राला फायदा होतो. जवळपास ५० एकर फळबागांना या विहिरीचे पाणी आहे. एक मोठी रोपवाटिका, वीस एकरवरील केशर आंबा संशोधन केंद्र, पाच एकर लिंबूवर्गीय योजनेसाठी शक्करबावडीचे पाणी आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे शक्करबावडीची पाणी पातळी कमी झाली. मुख्य विहीर आणि समोरील बाजुला मुबलक पाणी असते. यावर्षी समोरील बाजूचे पाणी कमी झाले. विहीर पूर्ण कोरडी पडणार नसली तरी मे महिन्यात फळबागांना पाणी टंचाई भेडसावणार आहे. पाणी कमी झाल्यामुळे पाणी देण्याच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन फळबाग संशोधन केंद्राने इतर तीन लहान विहिरींचा गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाला सोमवारी (१८ एप्रिल) सुरुवात होईल, असे केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

१९७२च्या दुष्काळात औरंगाबाद शहराला या विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा पाणी टंचाईत शक्करबावडीचा मुख्य स्रोत आहे, पण विहिरीचे पाणी कमी झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

ठिबकचा वापर
हिमायतबाग फळ संशोधन केंद्रात आंबा, पेरू, चिकू, सीताफळ फळबागा आहेत. शिवाय रोपवाटिका स्वतंत्र आहेत. या प्रत्येक ठिकाणी ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याचा काटकसरीने वापर करून जलस्रोत टिकण्यावर भर दिला आहे. या परिसरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोवपाटिकेलाही २० वर्षांपासून शक्करबावडीचे पाणी आहे. या विहिरीची देखभाल संशोधन केंद्रामार्फत केली जाते. मागील वर्षी विहिरीला तारेचे कुंपण घालण्यात आले.

हिमायतबाग परिसरात २४ विहिरी असून शक्करबावडी मुख्य स्रोत आहे. शक्करबावडीचे पाणी कमी झाले असून इतर विहिरीचे पाणी वापरणार आहोत. कमी पर्जन्यमानाचा परिणाम शक्करबावडीवर झाला आहे. यापूर्वी पाणी मुबलक असले तरी ठिबक व तुषार सिंचनाद्वारे फळबागांचे संवर्धन करण्यात आले.
- डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ

शक्करबावडीचा जलस्रोत निश्चित सांगता येणार नाही, मात्र ही विहीर आतापर्यंत कधीच आटली नाही. यावर्षीही विहिरीचे पाणी पूर्ण संपणार नाही. या निजामकालीन विहिरीचे महत्त्व वेगळे असून, भरपूर पाणी असलेली ही ऐतिहासिक विहीर आहे.
- डॉ. रमजान शेख, इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीच्या पाण्यावरून देवदरा भडजीत मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
सामायिक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत लाठ्या-काठ्या, कुऱ्हाड, तलवारीने मारहाण केल्याने तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास देवदरा भडजी शिवारात घडली. याप्रकरणी खुलताबाद पोल‌िस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे आता ग्रामीण भागात मारहाणीच्या घटना घडत आहेत. भडजी गावाजवळील देवदरा येथे गवळे कुटुंबीय शेतवस्तीवर राहतात. गट नंबर २१०मध्ये सामायिक विहीर अाहे. या विहिरीतून पाणी भरण्याच्या कारणावरून बुधवारी रोशन गवळे व ज्ञानेश्वर गवळे यांच्यामध्ये वाद झाला होता. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास पुन्हा मारहाणीची घटना घडली. सामायिक विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून रोशन गवळे यांना व त्यांच्या आई-‌वड‌िलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्लात लाठ्या-काठ्या, कुऱ्हाड, तलवारीचा वापर करण्यात आला. हल्ल्यात गवळे, त्यांची आई आणि वडील हरिष गवळे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी रोशन गवळे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर गवळे, रामलक्ष्मण गवळे, शाम गवळे, रमाबाई गवळे, संजना गवळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोल‌िस निरीक्षक एस. डी. रामोड पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीमुळे रेल्वेची दहा लाखांची बचत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशनला महापालिकेकडून पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाण्याचा वापर सफाई व अन्य कामांसाठी होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनच्या परिसरात असलेल्या विहिरीतील पाणी वापरले जात आहे. या पर्यायी स्त्रोतामुळे रेल्वे विभागाची दरवर्षी सुमारे दहा लाख रुपयांची बचत होत आहे.

औरंगाबाद स्टेशनमध्ये येणाऱ्या रेल्वेची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर प्रवासी संख्याही वाढत आहे. याशिवाय औरंगाबाद स्टेशनमध्ये काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणखी निवासस्थानेही बाधण्यात आली आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाला महापालिकेकडून तीन दिवसांआड बारा लाख लिटर खरेदी करावे लागते. रेल्वेची गरज वाढल्याने खर्चही वाढला. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी रेल्वे सुरक्षा दल कार्यालयाच्या बाजुला विहीर खणली. त्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या विहिरीला चाळीस फुटांवर पाणी लागले आहे. ही विहिर शंभर फुटांपेक्षा अधिक खोल खोदण्यात आली आहे.

या विहिरीतून दररोज ३० ते ४० हजार लिटर पाण्याचा उपसा करण्यात येतो. या विहिरीतील पाणी फलाट क्रमांक एक व दोनवर नेण्यात आले आहे. हे पाणी रेल्वे कोच धुण्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर कोचमधील बाथरूमसाठीही हे पाणी पुरविण्यात येते. लोहमार्गाच्या स्वच्छतेसाठीही या पाण्याचा वापर करण्यात येतो. दररोज १५ ते २० रेल्वे कोचसाठी हे पाणी वापरले जाते. त्याचबरोबर दिवसभरातून तीन किंवा चारवेळेस लोहमार्ग स्वच्छतेसाठी विहिरीचे पाणी वापरण्यात येते.

टँकरची संख्या झाली कमी
महापालिकेकडून पाणी घेतल्यानंतरही रेल्वे विभागाला दररोज ४० ते ४५ टँकर पाणी विकत घ्यावे लागत होते. ते रेल्वेच्या टाकीत भराले जात होते. विहिरीमुळे टँकरची संख्या कमी झाली अाहे. त्यामुळे वर्षाकाठी सुमारे दहा लाख रुपयांची बचत होत आहे, अशी माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. विहिरीतील पाण्याचा वापर स्वच्छता व अन्य कारणांसाठी करण्यात येतो. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे ते पिण्यासाठी वापरण्यात येत नाही. महापालिकेने पुरविलेले पाणी प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आले आहे, असेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप आढावा बैठकीत देणार पाणीबचतीच्या सूचना

0
0

औरंगाबाद : यंदा दुष्काळामुळे मेऐवजी २० एप्रिलपूर्वीच प्रत्येक जिल्ह्यात खरीप आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. खरिपाच्या आढाव्यात शेतीसाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत.

बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी, कृषी विभागातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्यांना या बैठकीबाबत सूचना दिल्या. यंदा हंगामात शेतकऱ्यांनी दोन पिकांमध्ये कडधान्य व तेल‌बिया पेराव्या यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी भर द्यावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. मराठवाड्यात एकूण क्षेत्रापैकी एक तृतीअंश क्षेत्रावर कापूस एक तृतीअंश क्षेत्रावर सोयाबीन तसेच इतर कडधान्ये घेण्यात येतात. तर उर्वरित क्षेत्रावर ज्वारी, मका, बाजरी, गहू, यासह इतर पिके घेतली जातात. या पार्श्वभूमीवर या बैठकीत दांगट यांनी आंतरपीक घेण्याच्या सूचना दिल्या. तुरीसोबत सोयाबीन, कापसासोबत मूग, उडीद घेण्यास शेतकऱ्यांना सांगावे, असे ते म्हणाले. तसेच ज्याच्याकडे पाणी आहे त्यांनी उसाऐवजी ठिबक सिंचनचा वापर करून तूर तसेच कापसाचे उत्पादन घ्यावे. प्रक्रिया उद्योग तसेच मार्केटिंगच्या कंपन्या स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. एका भागात एक पीक घेतल्यास मार्केटिंग करणे सोपे होत असल्याने केवळ उत्पादन वाढवणे यावर भर देण्यासोबत शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या उपस्थिती एक महिना अगोदरच ही बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर मुख्यमंत्री एकत्रित आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अत्यल्प पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागत असून, त्यात जनावरांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, पशुपालकांना पशुधनाचा सांभाळ करणे अवघड झाले असून, मात्र आता शासनाच्या सूचनेनुसार 'जिथे गरज तिथे छावणी' या धोरणामुळे जनावरांसाठी चारा-पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या मराठवाड्यात बीड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांत चारा छावण्या सुरू आहेत, मात्र यंदा सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नांदेड आणि परभणी जिल्ह्यातूनही छावण्या उघडण्याची मागणी होती. आता नवीन धोरणानुसार ज्या गावांचे चारा छावणी सुरू करण्याचे प्रस्ताव आले आहेत, तेथे छावण्या सुरू करण्यात येणार अाहेत. या प्रस्तावासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता उपाशी आणि तहानलेल्या प्रत्येक जनावराला चारा-पाणी मिळण्याची आशा आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत चारा-पाण्यासाठी दररोज दोन हजारांची वाढ होत आहे. चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे ग्रामपंचायतस्तरावर चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही जोर धरत होती. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही सर्कलमध्ये छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आले होते. त्यांना तत्काळ परवानगी देण्यात आली अाहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्कलनिहाय चारा टंचाईचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चाराटंचाई असेल तेथे छावणी सुरू करण्यासंदर्भातचे प्रस्ताव दाखल करावा. तेथे छावणी सुरू करण्याची तत्काळ परवानगी देण्यात येईल, असेही सांगण्यात आले अाहे. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद व बीड वगळता इतर जिल्ह्यांतही पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

३५६ छावण्यांत ३ लाख ७१ हजार जनावरे
मराठवाड्यात सध्या बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या ३५६ छावण्यांमध्ये लहान मोठ्या ३ लाख ७१ हजार जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील २६५ चारा छावण्यांमध्ये २ लाख ८० हजार ४९६, लातूर जिल्ह्यात ३ चारा छावण्यांमध्ये १६९५ जनावरे तर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८८ चारा छावण्यांमध्ये ८९ हजार १९५ लहान मोठी जनावरे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलदूत एक्स्प्रेसचा वेग आणखी वाढला

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मिरजहून पाणी घेऊन निघालेली तिसरी रेल्वे जलदगतीने पोहचली. मिरज ते लातूर हे अंतर कापण्यासाठी प्रवासी रेल्वेला लागणाऱ्या वेळेत जलदूत लातूरला पोहचली. सायंकाळी सहा वाजता ही रेल्वे लातूर स्टेशनवर आली. तेथे पाणी उतरवून घेण्याची व्यवस्था पूर्णत्वाकडे जात असल्याने अवघ्या अडीच तासांत दहा टँकर रिकामे करून पाणी विहिरीत साठविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा रेल्वे मिरज‌कडे रवाना झाली.

मिरजेहून दहा टँकरची रेल्वे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास निघाली. ती सायंकाळी सहा वाजता लातूरमध्ये पोहचली. या रेल्वेच्या प्रवासाचा आढावा दर तासाला घेतला जात आहे. मिरज-लातूर या मार्गावर अरग, पंढरपूर, कुर्डवाडी आणि लातूर येथून प्रत्येक तासाला सोलापूर, पुणे येथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ताजी माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती लातूरचे स्टेशन मास्तर बी. के. तिवारी यांनी दिली. रेल्वेला कुठेही थांबवता कामा नये, याची दक्षता घेतली जात अाहे. इतर रेल्वे बाजुला उभ्या करून या रेल्वेला वाट करून दिली जात आहे, असे सहाय्यक स्टेशन मास्तर एन. के. चौधरी यांनी दिली. रेल्वेच्या संपूर्ण व्यावस्थेवर परिचलन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक नरमदेश्वर झा हे यंत्रणेवर स्वत: लक्ष ठेऊन आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्याला यंदाही पावसाचा दगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. इतरत्र पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी मराठवाडा, विदर्भ व तेलंगणा विभागात ६५ ते ७० टक्के पाऊस राहील. जून-जुलै महिन्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल, असा निष्कर्ष प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी काढला आहे; तसेच यंदा गारपीट अधिक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सतत चार वर्षे अत्यल्प पावसामुळे मराठवाड्याची मोठी हानी झाली आहे. कृषी अर्थव्यवस्था संपूर्णतः मोडीत निघाली असून नागरी वस्त्यांनाही पाणी टंचाईची झळ बसली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील असा अंदाज भारतीय हवामान विभाग व स्कायमेट संस्थेने जाहीर केला आहे, मात्र यावर्षीही मराठवाड्यात कमी पाऊस राहील असा दावा नांदेड येथील एमजीएम खगोलशास्त्र केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. औंधकर यांनी केला आहे. मराठवाडा, विदर्भ व तेलंगणा देशातील दक्षिण मध्य - पूर्व भागात आहे. 'आपल्याकडे पावसाळा प्रामुख्याने बंगालच्या उपसागराकडून येतो. गेल्या ४० वर्षांत बंगालच्या उपसागरात जवळपास ११८ चक्रीवादळे आली आहेत. ऑक्टोबर - डिसेंबरमध्ये (पोस्ट मान्सून काळात) ७४, मार्च - मे कालावधीत (प्री-मान्सून) २५ चक्रीवादळे झाली. या ७४ चक्रीवादळांपैकी ३१ 'ला-निना'च्या काळात, सर्वसाधारण काळात २७ व फक्त १६ ही 'अल-निनो'च्या काळात झाली,' असे औंधकर यांनी सांगितले.

२०१६मध्ये 'अल-निनो'चा प्रभाव असल्याने मार्च ते मे महिन्यात चक्रीवादळांची शक्यता कमी आहे. त्यामुळे मान्सूननंतर ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीत बंगालच्या उपसागराकडे निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची शक्यता आहे. या काळात उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू असल्याने नोव्हेंबर महिन्यात पश्चिमोत्तर दिशेकडील अतिथंड ध्रुवीय वाऱ्यामुळे सुरू झालेली गारपीट मार्च २०१७पर्यंत कायम राहणार आहे. 'अल-निनो'चा फटका यावर्षीही काही प्रमाणात बसणार आहे. इंडियन डायपोल इंडेक्स (आयओडी) यंदा धन असण्याची शक्यता एप्रिल - मे महिन्यातच दिसत आहे. त्यानंतर अशी शक्यता नसल्याने पावसाळ्यासाठी पोषक वातावरण सुरुवातीलाच आहे; तसेच मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पावसाची प्रतीक्षा

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १०६ टक्के पावसाळा असला तरी मराठवाडा, विदर्भ व तेलंगणात मागील दोन वर्षांपेक्षा जास्त म्हणजे सरासरीच्या ६५ ते ७० टक्के पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात सर्वसाधारण चांगला पाऊस अपेक्षित आहे. देशातील इतर राज्यात पावसाचा अंदाज पाहता सरासरीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यावर्षीचा पावसाळा भारतीय हवामान खात्याने ११६ टक्के व 'स्कायमेट' संस्थेने १०४ टक्के जाहीर केला आहे. पावसाचे गणित मांडण्यासाठी वेगवेगळी मॉडेल्स तयार होत आहेत. माझ्या मॉडेलनुसार इतर महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस असला तरी मराठवाड्यात कमी पाऊस राहणार आहे.

- डॉ. श्रीनिवास औंधकर, हवामान शास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसेंच्या दौऱ्यात हजारो लिटर पाण्याची नासाडी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लातूर

थेंबभर पाण्यासाठी लातूरकर तरसत असताना महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी लातूर दौऱ्यात १० हजार लिटर पाण्याची नासाडी केली, असा आरोप होतोय. खडसेंच्या दौऱ्यात हेलिपॅडसाठी हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा आरोप आहे. पण हेलिपॅडसाठी पाण्याचा वापर झाल्याची काहीच माहिती नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलंय. तसंच हेलिपॅडसाठी वापरलेलं पाणी शुद्धीकरण केंद्रातून आणलेलं होतं आणि पुनर्प्रक्रिया केलेलं होतं. ते पिण्यायोग्य नव्हतं म्हणून त्याचा वापर करण्यात आला, असं ट्विट खडसेंनी केलं आहे.





एकनाथ खडसे आज लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरनंतर ते औसा तालुक्यातील बेलकुंड गावालाही भेट देणार आहेत. आणि याच बेलकुंड गावात हेलिपॅड बांधण्यासाठी १० हजार लिटर पाणी वापरलं गेलं.





खडसे बेलकुंडला रस्त्यानेही जावू शकत होते. तसंच विमानतळावरही त्यांचं हेलिकॉप्टर लँड करता आलं असतं. यामुळे बेलकुंडला हेलिपॅड बांधण्याची गरज नव्हती, असं स्थानिक गावकऱ्यांनी सांगितलं. दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या लातूरकरांना मिरजेतून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्या ऐवजी त्याची नासाडी, झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूपुष्यामृत योगावर कोट्यावधींची उलाढाल

0
0

गुरूपुष्यामृत योगावर कोट्यावधींची उलाढाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाडव्यानंतर पहिलाच गुरुपुष्यामृत योग आल्याने आणि बंदनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात सराफ दालने उघडल्याने गुरुवारी (१४ एप्र‌िल) सुवर्ण दालनांमध्ये मोठी उलाढाल झाली. सव्वा महिन्यापासून संपामुळे बंद असलेली सराफा बाजारपेठ गुरुवार सकाळपासून सजली होती. व्यापारीही मोठ्या उत्सुकतेने व्यवहाराकडे लक्ष ठेवून होते. या मुहूर्ताला २० कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. गुरुवारी दुपारी अडीचनंतर केवळ पाच-सहा तासांतच सुमारे २० कोटींची उलाढाल झाली, असे सराफा असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले.
गुरुपुष्यामृत योगात सुवर्ण खरेदी ही अक्षय्य संपत्ती मानली जाते. त्यानुसार गुरुवारी दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासूनचा मुहूर्त सोने खरेदीसाठी होता. अडीच ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या उलाढालीत २० कोटींपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सराफा असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य दत्ता सावंत म्हणाले, 'सुवर्ण व्यापाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी सुवर्ण ठरली, पण नेमकी किती कोटींची उलाढाल झाली हे सांगणे कठीण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाच्या छळामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

0
0

औरंगाबाद ः शिक्षकाच्या छळाला कंटाळून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी रुपेश अशोक साळवेविरुद्ध देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

साळवे महाविद्यालयातील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला गेल्या वर्षीपासून त्रास देत होता. मोबाइलवर संपर्क साधणे, एसएमएस करणे, प्रत्यक्ष भेटून त्रास देणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे कंटाळून विद्यार्थिनीने सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. औरंगाबादेतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. फरार साळवेचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांचे पाणी पुरवठा बंद करणे अयोग्य- पंकजा मुंडे

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्यात भीषण दुष्काळ असताना मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना पाणी पुरवठा करण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असताना राज्याच्या महिला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र अजब भूमिका घेतली आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना देखील पंकाजा मुंडे यांनी मद्यनिर्मिती कंपन्यांना पाणी पुरवठा केला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.

मद्यनिर्मितीसह अन्य उद्योगधंद्यांना देण्यात येणारे पाणी आरक्षित असल्याने त्याचे पाणी बंद करणे योग्य ठरणार नाही, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. जर उद्योगांना आरक्षित पाण्याशिवाय अन्य कोट्यातून पाणी दिले जात असेल तर ते बंद करावे, असे त्या म्हणाल्या.

जर उद्योगांचे पाणी बंद केले तर त्यामुळे उद्योगांपेक्षा लोकांचे आणि सरकारचे अधिक नुकसान होईल. या उद्योगांमुळेच सरकारला महसूल आणि लोकांना रोजगार मिळतो. मद्यनिर्मिती करणारी कंपनी असली तरी त्यातून अनेकांचे पोट भरते. या कंपन्या बंद झाल्यातर अनेकांवर उपासमारीची वेळ येईल, असे बीडमध्ये बोलताना म्हणाल्या.

सध्या शेती आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागल्यानंतरच उद्योगांना पाणी देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मात्र सरकारमधील मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनीच या उलट भूमिका घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दारू कंपन्यांचे पाणी तात्काळ बंद करा, अशी भूमिका घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागेल त्याला शेततळे घोषणा फसवी- कदम

0
0

औरंगाबाद : 'मागेल त्याला शेततळे' सरकारने केलेली घोषणा फसवी असल्याचे सांगून पालकमंत्री रामदास कदम यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. या योजनेचे जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले, मग मागेल त्याला शेततळे कसे मिळणार, असा सवाल त्यांनी केला. या योजनेत फसवणूक होत असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री ‌देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे ही घोषणा केली. ५० हजार रुपयांमध्ये शेततळे होणार कसे आणि किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल, असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते. शुक्रवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी, मागेल त्याला शेततळे या योजनेत जिल्ह्यामध्ये देण्यात आलेल्या २४१७ उद्दिष्टासाठी १०७९५ अर्ज आले असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी पडवळ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कदम म्हणाले,'सर्व शेतकऱ्यांना जर योजनेचा लाभ मिळत नसेल तर 'मागेल त्याला शेततळे' कसे, घोषणा लक्षात घ्या ही चूक कुणाची आहे, असे प्रश्न त्यांनी केले. घोषणेबद्दल तुमच्या सचिवांना सांगा, अशा सूचनाही पडवळ यांना केली. मागेल त्याला शेततळे कसे, हे समजून सांगा, असा सवाल कदम यांनी पुन्हा केल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले.

बागडेंनी प्रकरण सावरले
'मागेल त्याला शेततळे' या घोषणेवरून अधिकाऱ्यांना उत्तर देता येत नसल्यामुळे विषय पुढे सरकत नव्हता. शेततळ्यावर चर्चेची सुई अडकल्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी माइकचा ताबा घेत, 'मागेल त्याला पण टप्प्या टप्प्याने' असे म्हणत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयसीटी’चे उपकेंद्र औरंगाबादेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबईतील प्रतिष्ठेची संस्था म्हणन जगभरात ओळखल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) उपकेंद्र औरंगाबादेत लवकरच सुरू होणार आहे. त्याला सरकारने लवकर मंजुरी दिल्यास येत्या शैक्षणिक वर्षात जूनपासूनच केंद्र सुरू होऊ शकेल, अशी माहिती कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी शुक्रवारी येथे दिली.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर, आयसीटी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने यादव यांच्यासमवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सीएमआयए अध्यक्ष आशिष गर्दे, उपमहापौर प्रमोद राठोड, जी. डी. अग्रवाल, मुकुंद भोगले, भगवान घडमोडे, भाजप प्रदेश सचिव मनोज पांगारकर, प्रसाद कोकिळ आदींची उपस्थिती होती.

यादव म्हणाले, 'संस्थेच्या व्यवस्थापनात हा ठराव मंजूर झाला आहे. आता राज्य सरकार, यूजीसीची परवानगी मिळाली की प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर संपली तर जूनपासून केंद्रे कार्यान्वित होऊ शकेल.'

डॉ. यादव म्हणाले,'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी देशपातळीवर दुसरे आहोत. विद्यापीठ म्हणून तर देशपातळीवर अव्वल आहोत. केवळ रसायनशास्त्राशी संबंधित नव्हे तर उद्योगाशी निगडित अनेक क्षेत्रांचे अभ्यासक्रम आणि संशोधन आयसीटीमध्ये केले जाते. मुंबईत आम्हाला मिळालेली जागा पुरेशी नाही. १०० एकर जागा सरकारकडे मागितली आहे.'

आयसीटी औरंगाबाद केंद्राला २०० एकर जागेची गरज आहे. जागा उपलब्ध होईल त्याठिकाणी उपकेंद्र उभारण्यात येईल. सरकारी मंजुरीनंतर अधिकृत घोषणा करणे योग्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

मदतीसाठी उद्योजक सरसावले
यादव यांनी भाषणातून आयसीटीसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत उमेश दाशरथी यांनी दहा लाखांची मदत जाहीर केली. मुकुंद भोगले, रितेश मिश्रा आणि प्रसाद कोकिळ यांनी पीएचडीच्या एकेका विद्यार्थ्याला दत्तक घेण्याचे जाहीर झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातूरला कायमस्वरुपी पाणी देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूरला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. त्यासाठी पाणी उजनीहून आणायचे का ? जायकवाडीतून द्यायचे याचा अभ्यास केला जात आहे. परंतु, लातूरला पाणी कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणारच आहोत. राज्य सरकारची पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असून ती पूर्ण करीत आहोत. आता त्याचे सुयोग्य वाटप पालिकेने केले पाहिजे अशी अपेक्षा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

यावेळी महसूल मंत्री खडसे यांनी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाणी टंचाई जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, आमदार त्रिंबक भिसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतीभा पाटील-कव्हेकर, महपौर अख्तर शेख उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना खडसे म्हणाले, 'मराठवाड्यात सध्या दोन हजार ८५६ टँकर सुरू असून पाच हजार ९४४ विंधन विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. ३५६ छावण्या सुरू असून ३७३ छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या तीन लाख ७२ हजार ८८१ जनावरे असल्याची माहिती दिली. चारा छावणी चालकांना जिल्ह्या बाहेरुन जरी चारा आणायचा असेल तर त्याला सरकार परवानगी देईल.'

मिरज रेल्वे स्थानकावर लातूरसाठी टँकर भरण्याची व्यवस्था शनिवार सायंकाळपर्यंत संपुर्णपणे पूर्ण होईल. त्यानंतर पन्नास हजार लिटर क्षमतेचे पन्नास टँकर असलेली रेल्वे लातूरला तीन दिवसांतून दोनवेळा येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. विविध ठिकाणाहुन लातूरला एकूण एक कोटी लीटर पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

रेल्वेने पाणी लातूरला देण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले आहे. उर्जामंत्री पियुष गोयल यांनी ही तांत्रिक परवानग्या पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाची मदत केल्याचे सांगून महसूल मंत्री खडसे म्हणाले, 'रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. या पाण्याचा खर्चही रेल्वे बोर्ड करेल.'

लातूर पालिकेची पाणी वाटप व्यवस्था चांगली नाही. गळतीचे प्रमाण अधिक असल्याच ही त्यांनी सांगितले. यावर महापौरांनी हस्तक्षेप करून गळती म्हणतात तेवढी नसल्याचा खुलासा केला. परंतु, नळाने पाणी देता येणार नाही असे ही सांगितले.

लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले आणि एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत रेल्वेने पाणी आणण्यासाठी लातूरात जी व्यवस्था करणे आवश्यक होते ते काम, मातोळ्याचा बंद पडलेला जलशुध्दीकरण प्रकल्प काही दिवसात सुरू केला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन महसूल मंत्र्यानी पत्रकार परिषदेत केले.

मांजरा धरणातील गाळ काढावा

मांजरा धरणातील गाळ काढून त्याची क्षमता वाढवावी. त्याचा लातूरसह तीन जिल्ह्यातील शहरांना उपयोग होणार आहे, अशी मागणी आम्ही बैठकीत केली असून त्यास महसूल मंत्र्यानी सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती खासदार डॉ. सुनील गायकवाड आणि आमदार अमित देशमुख यांनी दिली. महसूल मंत्र्यांनी या कामासाठी तीन ही जिल्ह्याच्या डीपीडीसीतून दहा-दहा कोटी रुपये घेण्याची सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे, असे आमदार देशमुख यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी जीवघेणी कसरत

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पिंपरी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ५० फुट खोल विहिरीत पायरी उतरत जीव घेणी कसरत करावी लागते आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्याची भीषण दुष्काळ असून लोकानां पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात सध्या केवळ ०.५ टक्का पिण्याचा उपयुक्तसाठा असून तो अवघा आठ दिवस पुरेल इतकाच आहे. जिल्ह्यातील धरणात असलेले पाणी हे मृत साठ्यातील असल्याने लोक पिण्याच्या पाण्याचा एक एक थेंब अमृतासारखा जपून वापरत आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी हे गाव उस्मानाबाद शहरापासून १२ किलोमीटर असून गेल्या चार वर्षांपासून हे गाव भीषण पाणीटंचाईने ग्रासले आहे. गावात पाणी साठवण्याच्या दोन टाक्या व एक आड आहे. मात्र, पाणी नसल्याने लोकाना हरिदास नाईकवाडी यांच्या खासगी विहिरीतील पाण्याचा आधार आहे. मात्र, ही विहिर इतकी खोल आहे. पाहणाऱ्याचे डोळे गरगरतात. ५० फुट खोल विहिरीत पायरी उतरून पाणी आणत कसरत करावी लागते. गावात एकमेव पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असल्याने लोकांची दिवसभर या विहिरीवर गर्दी असते. या विहिरीत उतरल्यावर एक मोठा दगड लागतो. त्यावरून खाली उतरून पायऱ्यावरुन चढ-उतार करीत एक-एक घागर पाणी आणावे लागते.

नाईकवाडी कुटुंबाच्या दातृत्वाचा आधार
१९७२ च्या दुष्काळात पुंडलिक नाईकवाडी यांनी खोदलेली विहिर आजही गावकऱ्यांसाठी तारणहार ठरत आहे. गावातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी या विहिर मालक हरीदास नाईकवाडी व त्यांच्या परिवाराने गेल्या दोन वर्षांपासून शेतात पेरणी सुद्धा केलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहेत. त्यांनी हे समाज उपयोगी पाऊल उचलल्याने दुष्काळाच्या झळा काही अंशी कमी झाल्या आहेत. यामुळे गावातील दुष्काळ कमी झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून या कुटुंबाच्यावतीने नागरिकांना मोफत पाणी देण्यात येते. नाईकवाडी कुटुंबाच्या दातृत्वमुळे नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी लातूरमध्ये पाण्याची नासाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूरमध्ये अभुतपूर्व पाणीटंचाई असताना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हेलिपॅडवर दहा हजार लिटर पाणी वाया गेल्याचा आरोप शुक्रवारी विरोधकांनी केला. सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र, या आरोपांचा इन्कार केला आहे.

बेलकुंडजवळील (ता. औसा) मातोळा शुद्धीकरण केंद्राची दुरूस्ती व अन्य समस्यांचा आढावा घेण्यासाठी खडसे यांचा दौरा होता. बेलकुंडमध्ये (ता. औसा) त्यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले होते. त्यासाठी पाणी वापरल्यावरून चर्चा रंगली. दरम्यान, आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे खडसे यांनी येथील पत्रकार परिषद संपल्यानंतर सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, हेलिकॉप्टर सुरक्षित उतरण्यासाठी जेवढे पाणी लागते तेवढेच, पाच हजार लिटरपेक्षाही कमी पाणी वापरण्यात आले. त्यामुळे हेलिकॉप्टर आल्यानंतर धूळही उडाली होती. शिवाय, पिण्यास योग्य नसलेलेच पाणी त्यासाठी वापरण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाव उशाला; कोरड घशाला

0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबाद ः हर्सूल पंचक्रोशीत मोठ्या आकाराचे दोन तलाव असूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवत आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यापासून हर्सूलवासीय अद्यापही वंचितच आहेत. अवघ्या तीन विहिरींमधील पाण्यावर हर्सूलकरांची तहान भागवली जात आहे. पिण्याचे पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नागरिकांसमोर राहिलेला नाही.

हर्सूल पंचक्रोशीत जटवाडा रोडवरील हर्सूल तलाव आणि हर्सूल-सावंगी तलाव असे दोन मोठे आकाराचे तलाव आहेत, परंतु या दोन्ही तलावांचा सद्यस्थितीत हर्सूलवासीयांना काहीच उपयोग होताना दिसत नाही. जवळपास सहा महिने अर्ध्या औरंगाबाद शहराला हर्सूल तलावातून पाणी पुरवठा होतो, मात्र या तलावातून हर्सूलला पाणी पुरवठा होत नाही, अशी विचित्र स्थिती या भागात आहे. हर्सूल-सावंगी तलाव हा गेल्या पाच-सात वर्षांपासून ओसाड जागेसारखाच आहे. पावसाळ्यातही या तलावात फारसे पाणी येत नाही. त्यामुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून राहाता येत नाही. या तलावाजवळच्या परिसरात तीन विहिरी आहेत. तेथील पाण्यावरच हर्सूलवासीय आता पाण्याची तहान भागवत आहेत.

चौका परिसरातील डोंगरावरून हर्सूल-सावंगी तलावात पाणी येते, परंतु पावसाचे अत्यंत कमी प्रमाण असल्याने हा तलाव भरला नाही. हा तलाव भरला तर पाच वर्षे पाण्याची व्यवस्था होऊ शकेल. या तलावाच्या पाण्याच्या स्त्रोताकडे कोणीही गांभीर्याने पाहात नसल्याने तलाव कोरडाठाक पडलेला आहे.

३० रुपये ड्रम
पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याने विकतचे पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. खासगी व महापालिकेच्या पाण्याच्या टँकरद्वारे या भागात पाणी पुरवठा केला जातो. हर्सूल पंचक्रोशीतील प्रत्येक कुटुंब पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून आहे. महापालिकेचे टँकर नियमित येते, मात्र एका गल्लीत पुन्हा टँकर येण्याकरिता आता १८ दिवसांचा कालावधी लागत आहे. दरमहा ३०० रुपये नागरिक पाण्यासाठी मोजत आहे. एक ड्रम पाण्यासाठी ३० रुपये आकारले जात आहेत. त्यात दोन हजार लीटर पाणी मिळते. एका पाण्याच्या टँकरमध्ये वीस ड्रम पाणी असते. साहजिकच एका टँकरमधून सहा हजार रुपयांची मिळकत होत आहे. खासगी टँकरही आसपासच्या शेतातून पाणी आणत आहेत.

हर्सूल परिसरात अनेक नव्या वसाहती उभ्यारल्या आहेत. हर्सूल गावठाणासह एकतानगर, राधास्वामी कॉलनी, चेतनानगर, जहागिरदार कॉलनी, भगतसिंगनगर, मयूरपार्क, फुलेनगर, पिसादेवीरोड, होनाजीनगर असा मोठा परिसर आहे. जवळपास ६०-७० हजार लोकसंख्या या भागाची झाली आहे. हर्सूल गावठाणाचीच लोकसंख्या २० हजारांवर आहे. या परिसरात अजुनही शेती केली जाते. वाढत्या नागरीकरणाचा धोका शेतीला निर्माण झालेला आहे. पाण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने या परिसरातील नागरिकांना पाणी संकटाचा दरवर्षी सामना करावा लागत आहे. कायमस्वरुपी पाण्याचे नियोजन करण्याची नागरिकांची मागणी आहे.

जायकवाडीच्या पाण्यापासून वंचित
जायकवाडी धरणाचे पाणी औरंगाबाद शहराला होते, मात्र हर्सूल परिसरात धरणाचे पाणी देण्याची सुविधाच नाही. हर्सूल-सावंगी रोडवर दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यात तीन विहिरींतून पाणी आणले जाते आणि तेथूनच पाणी पुरवठा होतो. जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे, अशी या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनच मागणी आहे, मात्र महापालिकेने या मागणीकडे कधीही गांभीर्याने पाहिलेले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या अनेकांनी 'मटा'शी संवाद साधताना व्यक्त केली.

हर्सूल तलावात चर खोदून अनेक खासगी टँकरचालक पाणी नेतात. या पाण्याचे शुद्धीकरण झालेले नसते. पाण्याच्या दर्जाविषयी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, परंतु याकडेही कोणालाच गांभीर्याने लक्ष देण्यास वेळ नाही.

हर्सूल-सावंगी तलाव पूर्णपणे भरला तर, पाच वर्षे पाणी या भागात पुरवले जाऊ शकते. चौका घाटातून या तलावात पाणी येते. अन्य पाण्याचे स्त्रोत निर्माण केले तर हा तलाव संपूर्ण शहराची पाण्याची गरज भागवू शकतो. पाण्याची ओरड सुरू झाल्यानंतरच पाणी प्रश्न कळतो, हे चुकीचेच आहे. पाण्याची कायमस्वरुपी नियोजन करणे आवश्यक बनले आहे.
- सांडू औताडे

दोन मोठे तलाव असूनही हर्सूल परिसरातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असली तरी दैनंदिनीसाठी पुरेसे पाणीदेखिल मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पाण्याचे गंभीर संकट असून, नागरिक त्याचा सामना करीत आहेत. जायकवाडी धरणातील पाणी या भागातील नागरिकांना मिळायलाच हवे.
- माधव वाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हामुळे पपई कोमेजली

0
0

फुलंब्री तालुक्यात फटका
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पाणीटंचाई यातून तालुक्यातील बिल्डा व गणोरी परिसरातील शेतकऱ्यांनी मार्ग काढला आहे. पारंपरिक पिकांना फाटा देऊन या भागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आधारित पपईचे पीक घेतले आहे. पण या पिकाला उन्हाचा फटका बसत आहे.

दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक व पाणी देण्याच्या पद्धतीला फाटा दिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कमी पाण्यात ठिबक सिंचनचा आधार घेऊन खडकाळ व मुरमाड जमिनीत बारा महिन्यात फळ लागणारे व नगदी उत्पन्न मिळवून देणारे पपई पिकाची निवड केली आहे. या पिकातून भरघोस उत्पन्न मिळेल, ही अपेक्षा फोल ठरत आहे. गणोरी, बिल्डा या परिसरात शेतकऱ्यांनी लागवड करताना शेणखत, रासायनित खतांची मात्रा दिली. जमिनीची मशागत, सात बाय सातच्या अंतरावर लागवड करून ठिबक सिंचन करून पाणी दिले. हिवाळ्यापर्यंत पपईला मोठी फळे लगडली. मात्र, एप्रिलमध्ये ऊन वाढताच उष्णतेचा फटका बसून जोमात आलेले पपईचे पीक सुकत आहे. पाणीटंचाई व वाढती उष्णता यामुळे झाडांची पाने जळत आहेत. पपईचे फळ उघडे पडून सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जळून जात आहे. यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देऊन वेगळा प्रयोग करताना अपयश आल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images