Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्राणी-पक्ष्यांसाठी पाणपोई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मयूरनगरात कचराकुंडीच्या जागेवर आता प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई उभारण्यात आली आहे. रामनवमीचा मुहूर्त साधून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेविका स्वाती नागरे यांच्या पुढाकाराने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी वॉर्डात साठे चौकामध्ये त्यांच्या पुढाकाराने पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर होत आहे. त्याची झळ प्राणी व पक्ष्यांना बसत आहे. त्याची दखल घेऊन वॉर्डात किमान पाच ठिकाणी प्राणी-पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्याचे स्वाती नागरे यांनी ठरविले. त्यातील पहिली पाणपोई त्यांनी साठेनगरच्या चौकात आठ दिवसांपूर्वी सुरू केली. शनिवारी रामनवमीच्या मुहूर्तावर मयूरनगरात दुसरी पाणपोई सुरू करण्यात आली.

पूर्वी कचराकुंडी असलेल्या ठिकाणी ही पाणपोई सुरू केली आहे. मयूरनगर परिसरात शून्य कचरा मोहीम राबवून ही कचराकुंडी बंद करण्यात आली. तेथे बांबू आणि तट्ट्याचे शेड तयार करण्यात आले आहे. त्यावर हिरवी नेट लावण्यात आली असून, या शेडमध्ये प्रत्येकी ५० लिटरच्या तीन पिंपात प्राण्यांसाठी पाणी भरून ठेवण्यात आले आहे. पक्ष्यांसाठी खापरी कुंड्यांत पाणी व दाणे ठेवण्यात आले आहेत. खापरी कुंड्या शेडला लटकविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वॉर्डातील विविध झाडांवरही खापरी कुंड्या लटकविण्यात आल्या आहेत.

या उपक्रमासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील यात सहकार्य केले, , असे नागरे यांनी सांगितले. पाणपोई सुरू करण्यासाठी संजिवनी देशमुख, अजना गायकवाड, जमनाबाई काळे, प्रविणा जोशी, विद्या देवकर, संगिता पाटील, उज्ज्वला रोडे, उदय न्यायाधिश, अरविंद भालेराव, आर, जे. पाटील, ए. एस. नाईक, विनोद पाटील, निलेश काळे, अनिकेत राठोड आदींही सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांनी उभारला दुष्काळग्रस्तांसाठी निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सव्वादोनशे पोलिस अधिकाऱ्यांनी व्हॉटस् अॅप ग्रुपच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येकी हजार रुपये जमा करत हा निधी लातूरमधील शासकीय रुग्णालयांना शुद्ध पाणीपुरठा करण्यायासाठी देण्यात येणार आहे. शुक्रवारी या उपक्रमास लातूरमध्ये सुरुवात झाली.

लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता महापौर अख्तर मिस्त्री, खासदार सुनील गायकवाड, पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अधिष्ठाता अशोक शिंदे, भाजप महिला आघाडीच्या स्वाती जाधव, निवृत्त पोलिस अधिकारी अंदुरकर यांच्यासह ८० मान्यवरांच्या उपस्थितीत जलवाटप उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

या उपक्रमासाठी १९८९च्या पोलिस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. व्हॉटस् अॅप ग्रुपच्या माध्यमातून निधी संकलन करून लातूर येथील रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना पाणीपु्रवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून १५ मे पर्यंत थंड आणि शुद्ध पाण्याचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. लातूर येथे वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी रक्कम जमा करणे, पाण्याची व्यवस्था करणे, देखरेख करणे, कार्यक्रम आयोजित करणे या कामात सिंहाचा वाटा उचलला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईच्या तडाख्याने लॉन्स झाले ओसाड

0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः विवाह सोहळे, मंगलकार्ये आणि इतर सण-समारंभासाठी लॉन वापरण्याचा ट्रेंड रुजला आहे, पण हे लॉन सध्या पाण्याअभावी ओसाड झाले आहेत. काही ठिकाणचे बोअर आटले असून, काही लॉन्सवरील विहिरींच्या पाण्यापातळीतही कमालीची घट झाली आहे. समारंभांची संख्या ८५ टक्क्यांपर्यंत घटली असून, काही ठिकाणी लॉन्स जगविण्यासाठी टँकरच्या पाण्याची सोयही करावी लागत आहे.

मंगल कार्यालय लॉन्स असोसिएशनचे वरिष्ठ पद‌ाधिकारी किशोर लव्हेकर यांनी सांगितले की, यंदा लॉन्सला जगवणे खूप कठीण झाले आहे. शहरातील लॉन्सवरील विविध कार्यक्रमांची संख्या ८५ टक्क्यांनी घटली आहे. मार्च, एप्र‌िल महिन्यांत विवाह, मंगलकार्ये, समारंभ आदींचे प्रमाण जास्त असतात. यावर्षी पाण्यामुळे अनेक समारंभ पुढे ढकलेले आहेत. लॉन्सला जगवणे कठीण झाले आहे. लॉन्स जगविण्यासाठी पाण्याचा मारा आवश्यक असतो. दिवसभरातून किमान २ आणि जास्तीतजास्त ४ वेळा पाणी दिल्यास लॉन टिकतात. सध्या दिवसभरातून एकदाच पाणी टाकावे लागत आहे. यामुळे हिरवेगार लॉन आता रूक्ष झाले आहेत. समारंभासाठी लॉन देणे अवघड झाले आहे. शहरातील सर्व, ८० लॉन्सचालकांकडे बोअर आहेत. सुमारे ५ टक्के संचालकांकडील बोअरवेल आटले आहेत. बोअरच्या पाणीपातळीवर दुष्काळ आणि उन्हाचा परिणाम झाला आहे. सकाळ-दुपार-संध्याकाळी मिळून रोज किमान २ तास बोअर चालत होते. आता ते फक्त सकाळीच बोअर सुरू असतात. पाणीपातळीत घट झाल्याचा हा परिणाम आहे, असे अंबरवाडकर लॉन्सच्या संचालकांनी सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही आमच्या शेतातून पाणी आणून या लॉन्सला जगवत आहोत.'

लाखो लिटर पाण्याची गरज
देशी लॉन जगवण्यासाठी रोज ४ हजार ते ५ हजार लिटर पाणी लागते. लॉनसाठी वापरलेल्या इंग्लिश किंवा अमेरिकी गवताना अधिक पाणी लागते. लॉनसाठी लागणाऱ्या पाण्याचे गणित सांभाळणे कठीण अाहे. उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी मिळणे, गवताची निगा राखणे कठीणच झाले आहे, असे जाणकार सांगतात. वेगवेगळ्या लॉन्सवर सावली व पाण्याचे गणित सांभाळावे लागते. शहरात पास्कलम, अमेरिकन ब्ल्यू, ऑस्ट्रेलियन लॉन, कोरियन लॉन आदी प्रकारचे गवत वापरले जात आहे. पास्कलम आणि कोरियन लॉन यांना पाणी कमी लागते. हे सगळे गवत स्वच्छ सूर्यप्रकाशात वाढते. हे चार प्रकारचे गवत पॅरोट ग्रीन, बॉटल ग्रीन, डार्क ग्रीन या रंगांत उपलब्ध आहे.

लॉन्सवर बोअर आहेत. काही ठिकाणी विहिरीदेखील आहेत, पण पाणीपातळी घटल्याने लॉन्स जिवंत कसे ठेवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या परिस्थिती फार गंभीर आहे. व्यवसायावर ८५ टक्के परिणाम झाला आहे.
- किशोर लव्हेकर, संचालक, कलश मंगल कार्यालय

मोठ्या लॉन्सवर तीन ते चार प्रकारचे गवत लावले जाते. एका चौरस फुटावरील गवतासाठी किमान १० लिटर पाणी लागते. यामुळे हजारो चौरस फुटांवरील लॉनसाठी लाखो लिटर पाण्याची गरज असते. सध्या पाणी नसल्याने गवत जळून जात आहे.
- सुहास वैद्य, संचालक पल्लवांकुर नर्सरी

मोठ्या लॉन्सची संख्या ः ४०
छोट्या लॉन्सची संख्या ः २०
मंगल कार्यालयातील लॉन्स ः २०
मार्च महिन्यानंतर झालेले समारंभ ः सुमारे ३० ते ४०
मार्च महिन्यापूर्वी झालेले समारंभ ः ३००हून अधिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांच्या घरचे लग्न शाही थाटात!

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

शिवसेनेने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याने दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या मुलांची लग्नं कशी होणार?, या चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज येथे पार पडलेल्या 'शाही' विवाहसोहळ्याने आनंदाश्रूच तरळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे वधूस मणी, मंगळसूत्र, जोडवे, पैंजण आणि नथ असा खास आहेर 'मातोश्री'कडून देण्यात आला. ठाकरे कुटुंबाच्या वतीने देण्यात आलेला आहेराचा प्रत्येक सेट सुमारे ३२ हजार रुपये किंमतीचा आहे. वधूस एक पैठणी, एक हळदीची साडी तसेच वराला एक सफारी सूट संयोजकांतर्फे देण्यात आला. ७३ संसारोपयोगी वस्तू. त्यात कपाट, पलंग, गादी, घड्याळ, पंखा, कूकरसह अन्य वस्तूं देऊन जणू शिवसेनेने लग्न लावून देण्याबरोबरच या नवदाम्पत्यांची संसाराची घडीही बसवून दिली.

शिवेसेनेने दुष्काळी भागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू केली असून त्याअंतर्गतच येथील अयोध्यानगरी मैदानावर या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ११५ हिंदू, ४२ बौद्ध आणि ८ मुस्लिम वधू-वरांची लग्नगाठ बांधण्यात आली. या सोहळ्यासाठी शाही भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी या विवाह सोहळ्याचे आयोजन केले.

दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ असेपर्यंत दारू कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद केला पाहिजे, अशी मागणी केली. सध्याची परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. किती काहीही केलं तरी पिण्याचं पाणी या स्थितीत निर्माण करता येणार नाही. त्यामुळे आहे तेच पाणी वाचवून आणि पुरवून वापरावं लागणार आहे, असंही उद्धव यांनी नमूद केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योगांची पाणीकपात हा शेवटचा पर्याय’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात यंदा दुष्काळ असला तरी, पाण्याचे स्त्रोत निश्चित आहेत. जिल्ह्यात पाणी, चाऱ्याचे संपूर्ण नियोजन झाले आहे. त्यामुळे उद्योगांची पाणीकपात हा सर्वात शेवटचा पर्याय असल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

जिल्ह्यात पाणीटंचाई असली तरी पाण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. शहरी भागामधील; तसेच उद्योगांची पाणीकपात हा सर्वात शेवटचा पर्याय आहे. उद्योगांची पाणीकपात करतांना त्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या कामगारांचाही विचार करावा लागणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ५०० गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, यासाठी ६६१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथे पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे स्त्रो‌त निश्चित करण्यात आले असून, टँकरची मागणी आल्यानंतर तीन ते चार दिवसात टँकर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

एमआयडीसीच्या पाण्यात जुलै महिन्यापासून १० टक्के पाणीकपात करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात पाठवण्यात येणारे निम्मे टँकर एमआयडीसीच्या हायड्रंटमधून भरले जात आहेत. त्यासाठी एमआयडीसीला अतिरिक्त पाणीसाठा दिलेला नसल्याने गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या पाणी नियोजनाच्या बैठकीमध्येही पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. शुक्रवारी झालेल्या खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी तत्काळ टंचाई नियोजनावर बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी जिल्ह्यातील टंचाईबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील ५०१ गावे व १५ वाड्यांची तहान भागवण्यासाठी ६६१ टँकर सुरू करण्यात आले असल्याचे गावंडे यांनी सांगितले. टँकर सुरू असलेल्या गावांची एकुण लोकसंख्या १० लाख ४९ हजार असून, पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यात नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

टँकरलॉबी होऊ नये म्हणून तपासणी
जिल्ह्यात टँकरची संख्या ६६१वर पोचली आहे. टँकरच्या वाढलेल्या संख्येमुळे जिल्ह्यात टँकरलॉबी होऊ नये, यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदार, इतर अधिकाऱ्यांकडून टँकरच्या फेऱ्या, निकष, नियम याबाबतची माहिती घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावण्यासाठी जाणारा चारा अडवू नका

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
मराठवाड्यात सुरू असलेल्या चारा छावण्यात लाखो जनावरे संभाळली जात आहेत. छावणी चालकांनी या छावण्या योग्य प्रकारे चालवाव्यात. सोलापूर, अहमदनगर यासारख्या शेजारच्या जिल्ह्यत चारा बंदी आहे. त्यामुळे चारा आणणऱ्या वाहनांना अडवले जात आहे. मात्र, यापुढे चारा छावण्यांसाठी चारा आणणऱ्या ट्रक न आडवण्याच्या सूचना देण्यात येतील. या वाहनांना चारा बंदीपासून मुक्ती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यशवंत सेवाभावी संस्थेच्यावतीने जनावरांच्या छावणीवर आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. या सामुदायिक विवाह सोहळ्यात चाळीस विवाह पार पडले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'मराठवाड्यातील दुष्काळाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या दुष्काळीस्थितीमध्ये पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मदतीने एक रुपया न देता मिरजहून लातूर येथे रेल्वेने पाणी देणे शक्य झाले.'
चार वर्षात तिसऱ्यांदा कमी पाऊस पडल्याने यावर्षी मराठवाड्यात अभूतपूर्व दुष्काळीस्थिती आहे. खरीप आणि रबी पिके हातातून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढच्या काळात दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे. मात्र, सरकार दुष्काळग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे पशुधन जगवण्यासाठी ऑगस्ट महिन्यात गुरांच्या छावण्या सुरू केल्या. या दुष्काळीस्थितीत शेतकरी वाचवण्यासाठी सरकार संवेदनशील असून अनेक उपयोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार विनायक मेटे यांनी सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आमदार प्रशांत बंब, संतपिठाचे प्रकाश महाराज बोधले, नारायण गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज उपस्थित होते.

दुष्काळाचे राजकारण करू नका
लातूरसाठी मिरजहून रेल्वेने पाणी पुरवण्याचा निर्णय झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना महाराष्ट्र सरकारला मदत करण्यास सांगितले. त्यामुळे घोषणा केल्यानंतर पंधराव्या दिवशी लातुरला पाणी पोहचवता आले. यासाठी एकही पैसा रेल्वेने घेतला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियोजनामुळे रेल्वेने पाणी पुरवठा केवळ घोषणा न उरता ते प्रत्यक्षात उतरले. मात्र, अशा दुष्काळीस्थितीमध्ये दुष्काळाचे राजकारण न करता सर्वांनी मिळून दुष्काळाचा मुकाबला करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळनेरचा गड भाजपने राखला

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर जिल्हा परिषदेच्या गटाची पोटनिवडणूक रविवारी झाली. या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवत ही जागा राखली आहे. त्यामुळे पालकमंत्री पंकजा पालवे यांची सरशी झाल्याचे स्पष्ट झाले.
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर जिल्हा परिषदेच्या गटाचे भाजप सदस्य अपात्र ठरले होते. त्यामुळे या गटाची पोटनिवडणूक घ्यावी लागली. ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चिन्हे सुरूवातीला होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला नऊ महिने राहिले, असताना झालेल्या या पोटनिवडणुकीत चांगलाच रंग भरला. या निवडणुकीसाठी रविवारी ६१ टक्के मतदान झाले होते. भाजप उमेदवारास शिवसेना, रासपने पाठिंबा दिला होता. तर शिवसंग्राम पक्षाच्यावतीने आमदार विनायक मेटे यांनी उमेदवार गोपीनाथ घुमरे यांचा प्रचार केला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवनाथ थोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. सोमवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार मनोज पाटील आघाडीवर होते. मतमोजणीनंतर पाटील हे एक हजार ४१४ मताने विजयी झाले. भाजपचे मनोज सतीश पाटील यांना ६ हजार ६०१ मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसंग्रामचे गोपीनाथ घुमरे यांना पाच हजार १४७ व काँग्रेस उमेदवार नवनाथ थोटे यांना चार हजार ७७९ मते पडली. या विजयामुळे पिंपळनेर गटातील मतदारांनी भाजपच्या उमेदवारावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून भाजपने हा गड कायम राखल्याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी नवनिर्वाचित उमेदवार मनोज जाधव-पाटील यांचे अभिनंदन केले.
आष्टी गणात राष्ट्रवादी विजयी
आष्टी तालुक्यातील आष्टी (मुर्शदपूर) गणातून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक मुळे आणि भाजप उमेदवार गणेश धोंडे यांच्या दोघात ही लढत झाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक मुळे यांना एक हजार ४२६ मते पडली तर भाजप उमेदवार गणेश धोंडे यांना ८४८ मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक मुळे यांना ६८२ मतांनी विजयी घोषीत केले. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांनी विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्यावर मात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये उष्माघाताने शाळकरी मुलीचा मृत्यू

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील साबळखेड गावात पाण्यासाठी कुपनलिकेवर सतत फेऱ्या मारल्यामुळे १२ वर्षाच्या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला. शाळेला सुट्टी असल्यामुळे पाणी वाहून आणण्यासाठी घरच्यांना ही शाळकरी मुलगी मदत करत होती. घराजवळच्या कुपनलिकेवरून पाण्यासाठी तिने अनेक फेऱ्या मारल्या होत्या.

बीड जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तेथील लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. साबळखेड गावातील ग्रामस्थांची हीच अवस्था आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य पाण्यासाठी फिरत असल्याचे चित्र गावात आहे. या गावातील पाचवीत शिकणारी मुलगी पाणी आणण्यासाठी घरच्यांना मदत करत होती. भर उन्हात ती घराजवळच असलेल्या कुपनलिकेवरून पाणी वाहून नेत होती. पाण्यासाठी वारंवार फेऱ्या मारल्याने ती चक्कर येऊन पडली. बेशुद्ध झालेल्या या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

गावात पाण्याची प्रंचड टंचाई आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य पाण्यासाठी दिवसभर फिरतात. शाळेला सुट्टी असल्याने घरातील लहान मुलेसुद्धा पाणी वाहून आणण्यासाठी मदत करतात. माझी पुतणी कुपनलिकेवरून पाणी वाहत होती. उन्हाच्या तडाख्यात तिने वारंवार फेऱ्या मारल्या. तेव्हा तिला चक्कर आली आणि बेशुद्ध पडली. आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याचे या मुलीचे काका ईश्वर यांनी एएनआय वृत्तसंस्थेकडे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योगांचा अहवाल सरकारला पाठवणार

0
0

औरंगाबाद ः जायकवाडीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असलेल्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवारी बिअर उद्योगांची अतिरिक्त दहा टक्के पाणीकपात केली होती. प्रशासन, उद्योग विभागाचे अधिकारी आणि उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक झाली. त्यात पाणीवापराचा आढावा घेण्यात आला. त्याचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

दुष्काळामुळे जुलै २०१५मध्येच प्रशासनाने उद्योगांची दहा टक्के पाणीकपात केली होती. गेल्या महिन्यात जायकवाडीचा पाणीसाठा जोत्याखाली गेला. त्यामुळे उद्योगांची आणखी कपात होणार काय अशी चर्चा होती. वास्तविक वाळूज, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, शेंद्रा औद्योगिक वसाहतींना दैनंदिन चार एमएलडी पाणीपुरवठा होतो. मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना जास्तीचे पाणी लागते, दुष्काळी परिस्थिती पाहता या उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. प्रशासनाने तत्काळ दहा टक्के पाणीकपात केली. या पार्श्वभूमीवर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे यांच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी बैठक बोलाविली होती. सर्व उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांचे प्रतिनिधी, आमदार अतुल सावे यावेळी उपस्थिती होते. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार जायकवाडीतील पाणीसाठा, दैनंदिन होणारा उपसा, उद्योगाला लागणारे पाणी याचा आढावा घेण्यात आला. मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना एमआयडीसीकडून किती पाणी दिले जाते, कंपन्यांचे स्वतःचे स्त्रोत काय आहेत, पाण्याचा फेरवापर कसा केला जातो, याविषयी माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; बैठकीमध्ये पाणीकपातीवर अनेक बाजूंनी चर्चा झाली. उद्योगांना दिले जाणाऱ्या पाण्याएवढे बाष्पीभवन सध्या केवळ चार तासांत होत असल्याचे बैठकीत मांडण्यात आले. दुष्काळी परिस्थिती असताना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे योग्य आहे, पण उपलब्ध पाण्यातून ते कसे साध्य होणार, याचे मॉडेलही तयार झाले पाहिजे, असा विचार काही उद्योजकांनी मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वर्धमान’ची टंचाईवर यशस्वी मात

0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः सोसायटीतील बोअर आटले की टँकरचा फेरा सुरू होत असे. दरमहिन्याला त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत होते. कॉलनीतील रहिवासी एकत्र आले. ९४ हजारांत रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आणि कॉलनीतील पाणीटंचाई निकाली निघाली...

उल्कानगरीतील रिद्दीसिद्धी हॉलजवळ वर्धमान रेसिडेन्सी ही छोटीशी टाउनशीप. चार वर्षांपूर्वी तेथील बोअरवेलचे पाणी बंद झाले. कॉलनीला रोज ५० हजार लिटर पाणी लागते. त्यामुळे रोज टँकर मागविले जात होते. टँकरवर वर्षभरात सुमारे ५-६ लाख रुपये खर्च करावे लागत होते. २००१पासून २००९पर्यंत टंचाईचे चटके सहन करावे लागले. त्यावर उपाय शोधला पाहिजे असे असे कॉलनीतील रहिवाशांनी ठरविले. २०१२-२०१३मध्ये पडलेल्या पावसाचे पाणी अडवून रेसिडेन्सी परिसरात असलेल्या एक-दोन बोअरवेलमध्ये जिरविले. त्यामुळे बोअरची पाण्याची पातळी वाढली. २०१२पासून आजपर्यंत कॉलनीवर एकदाही टँकर घेण्याची वेळ आली नाही. कधीकाळी वर्षभरात ५-६ लाख रुपये टँकरवर खर्च करणाऱ्या कॉलनीचा त्रास संपला.

कॉलनीतील पाणीसंकट तेथील रहिवासी सीए रोहन आचलिया यांनी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची कल्पना मांडली होती. बघताबघता सगळेच कामाला लागले होते. २०१२मध्ये चार-पाच महिन्यांत रेन वॉटर हार्वेस्टिंग झाले होते. त्यामुळे बोअर पुन्हा खळाळला अन् कॉलनी टँकरमुक्त झाली. पाण्याचे 'टेंशन' नाहीसे झाले. २०१३ व २०१४ दोन्ही वर्षी पावसाचे सुमारे ५० लाख लिटर पाणी कॉलनीतील रहिवाशांच्या प्रयत्नांमुळे जमिनीत मुरले. त्याचा या वर्षीही उपयोग होत आहे. कॉलनी टँकरमुक्त झाल्यामुळे हाच उपाय सर्वांनी करावा, यासाठी या रेनवॉटर हार्वेस्टिंगची माहिती असलेले पत्रक कॉलनीवासीयांनी काढले. ते वाटून संपूर्ण गारखेडा, उल्कानगरी भागात जनजागृती करण्यात येत आहेत.

आम्ही सर्वांनी कॉलनी टँकरमुक्त व पाणीटंचाईमुक्त करण्याचा संकल्प केला व तो तडीस नेला, याचा आम्हाला अभिमान आहे. आता रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत आम्ही सातत्याने आता जनजागृती करीत आहोत.
- रोहन आचलिया, रहिवाशी वर्धमान रेसिडेन्सी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसोल, तारूरला टँकरने पाणीपुरवठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळात रेल्वे स्टेशनवरील येणाऱ्या प्रवाशांसाठी पाणी पुरविण्यासाठी रेल्वे विभागाला सध्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. नगरसोल, पोटूळ आणि तारूर या रेल्वे स्टेशनवर दररोज टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. रेल्वे विभागाला त्यासाठी गेल्या साडेतीन महिन्यांत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागला.

औरंगाबाद-मनमाड मार्गावर नगरसोल हे महत्त्वाचे स्टेशन आहे. दक्षिण भारतातून शिर्डी येथे साई दर्शनासाठी येत असलेल्या गाड्या नगरसोलपर्यंत चालविण्यात येतात. त्यात चेन्नई-नगरसोल, नगरसोल-नरसापूर, जालना-नगरसोल या रेल्वेंचा समावेश आहे. नगरसोल रेल्वे स्टेशन नाशिक जिल्ह्यात आहे. या भागात जिल्हाधिकाऱ्यांनी टँकरवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे नगरसोल रेल्वे स्टेशनला केला जाणारा पाणीपुरवठा थांबला होता. रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून रेल्वे स्टेशनला पाणी पुरविण्यासाठी टँकरचा सुरू करण्याची विनंती केली होती. यानंतर दररोज नगरसोल रेल्वे स्टेशनला पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला जात आहे. तेथे राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय पोटूळ आणि तारूर येथेही पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. या‌ ठिकाणीही थांबणाऱ्या पॅसेंजरच्या रेल्वेतील प्रवाशांसाठी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पोटूळ आणि तारूर स्टेशनवरून आसपासचे नागरिकही पाणी नेत असल्याची माहिती रेल्वे स्टेशनच्या सूत्रांनी दिली.

बोअरचा प्रयत्न निष्फळ
नगरसोल रेल्वे स्टेशन येथे पाण्याची सोय करण्यासाठी बोरवे घेण्यात आले. अडीचशे फुटांपर्यंत बोअर केल्यानंतरही पाणी लागले नाही. यामुळे रेल्वे स्टेशनला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी ग्रामस्थ पैठणमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
टँकरद्वारे पुरवण्यात येत असलेले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने शहरालगतचे टंचाईग्रस्त गावकरी शहरातून पिण्याचे पाणी नेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पैठण शहरातून पाणी नेण्याची सोय करावी, अशी मागणी लगतच्या गावकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील बहुतांश गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणारे पाणी दूषित असल्याने या पाण्यामुळे विविध रोग होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या पाटेगाव, चनकवाडी, वाघाडी, आखतवाडा, करंजखेडा, दादेगाव खुर्द व बुद्रुक या गावातील नागरिक पैठण शहरातून पिण्याचे पाणी त्यांच्या वाहनाद्वारे घेऊन जात आहेत, मात्र सध्या पैठण शहरात एकदिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील गावकऱ्यांना शहरात पाणी मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

टँकरच्या पाण्यामुळे मुलांना वेगवेगळे आजार होत आहेत. त्यामुळे आम्हाला पैठणहून पिण्यासाठी पाणी आणायला जावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी शहरात सहज पाणी उपलब्ध होत असे. मात्र, शहरात एकदिवसा आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने आम्हाला पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याची माहिती आखतवाडा येथील गावकरी कृष्णा भुजबळ यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नगरपालिकेने वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यामुळे महिलांना मान-पाठ-कंबरदुखीचा त्रास

0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
औरंगाबाद ः नेमेची येतो दुष्काळ... अशी संपूर्ण मराठवाड्याची परिस्थिती झाली असून, केवळ ग्रामीण भागात नव्हे तर शहरातील अनेक वस्त्यांमध्येही महिलांना-मुलींना चक्क अर्धा-अर्धा किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामीण भागातील महिलांना तर पाण्यासाठी काही किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. परिणामी, महिलांच्या मागे मान-पाठ-कंबरेची कायमची दुखणी लागत असून, लहान वयामध्ये हा भार सोसावा लागणाऱ्यांची वाढही खुंटू शकते, असे निरीक्षण अस्थिरोगतज्ज्ञांसह फिजिओथेरपिस्ट तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

एकीकडे संपूर्ण मराठवाडा वाढत्या उष्णतेने होरपळून निघत आहे, तर दुसरीकडे पाणी नसल्याने दुहेरी हाल होत आहेत. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी अत्यंत कमी प्रमाणात येते, तर गोरगरीबांच्या अनेक वस्त्यांमधील लोकांना फार दुरून पाणी आणावे लागते. दुर्दैवाने, शहर परिसर असो की ग्रामीण भाग, पाणी आणण्याचा भार अधिकतर महिलांनाच सोसावा लागतो. अनेक ठिकाणी तर लहान मुलींवर पाणी आणण्याची वेळ येते. परिणामी, अनेक गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. या संदर्भात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सचिन फडणीस म्हणाले, 'डोक्यावर वारंवार पाण्याचे हंडे घेऊन येणाऱ्यांच्या मानेवर १०० टक्के दुष्परिणाम होतात. 'डिस्क प्रोलॅप्स' म्हणजेच गादी (डिस्क) सरकणे, असेही प्रकार होऊ शकतात. अशांच्या मागे तात्पुरते, तर काहींच्या मागे कायमचे मानेचे व कंबरेचे दुखणे लागू शकते. 'सर्व्हाकल स्पॉन्डिलिसिस' हा त्याचाच फटका. वर्षांनुवर्षे पाणी वाहून आणण्यामुळे मणक्यांची झीज होते. ग्रामीण भागातील ७० टक्के महिलांमध्ये या समस्या अगदी सर्वसामान्य आहेत.'

लहान व वाढत्या वयातील मुलींवर ही वेळ वर्षानुवर्षे आल्यास त्यांची वाढ खुंटू शकते; तसेच पाणी आणण्याच्या कामामुळे वेगवेगळे अपघात होऊ शकतात.

यामध्ये मणक्यांना गंभीर इजाही होऊ शकते, ज्याला 'स्पाइन इन्जुरीज' असे म्हटले जाते. अपवादात्मक स्थितीत मेंदूचे आजारही बळावू शकतात, असे डॉ. फडणीस यांनी 'मटा'ला सांगितले. कोवळ्या वयात हा गंभीर भार सोसावा लागला तर मुलांमध्ये-मुलींमध्ये बाक येणे, वाढीवर परिणाम होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात, असे स्पाईन सर्जन डॉ. केतन देशपांडे म्हणाले.

हौदातून पाणी काढल्याने 'बॅक पेन'
पाणी टंचाईमुळे शहरामध्ये पाणी पुरवठा कमी झाला आहे आणि त्यामुळेच घर परिसरातील झाडांना, परस बागेला मिळेल तसे पाणी देण्याचे प्रमाणही वाढले आहे. पाणी नसल्यामुळेच शहरातील एक ५५ वर्षीय व्यक्ती हौदातून तळाचे पाणी काढून झाडांना जगवण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र पाणी काढताना संबंधित व्यक्तीला पाठदुखी सुरू झाली आणि शेवटी त्या व्यक्तीवर फिजिओथेरपी घेण्याची वेळ आली, असे फिजिओतेरपिस्ट डॉ. रुपाली मुळे यांनी 'मटा'ला सांगितले. ग्रामीण भागातील महिला आमच्या सेंटरपर्यंत येत नसल्याने त्यांच्याविषयी सांगता येत नसले तरी अनेक महिलांना पाणी भरण्यातून, लांबून पाणी आणण्यातून मान-पाठ-कंबरदुखी सुरू होते. आधीच व्यायाम हा प्रकार कमी झाल्यामुळे, फिटनेस कमी झाल्यामुळे व विविध व्याधी जडल्यामुळे शहरातील महिलांना पाणी भरण्यातून त्रास सुरू होतो व त्यांना फिजिओथेरपी घ्यावी लागते, असेही त्यांनी सांगितले. सातत्याने लांबून पाणी आणण्यामुळे मणक्यांची झीज लवकर होणे, नस दबणे, असे प्रकार होऊ शकतात. काहींना तीव्र त्रासामुळे शस्त्रक्रियेचीही गरज पडू शकते, असेही फिजिओथेरपिस्ट आदित्य वैद्य यांनी सांगितले.

तब्बल ५०१ गावांतील 'पाणीवेदना'
औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ५०१ गावांत टँकरद्वारे तसेच विहीर अधिग्रहण करुन पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील ४७, फुलंब्री तालुक्यातील १६, पैठण तालुक्यातकील १३५, गंगापूर तालुक्यातील १२०, वैजापूर तालुक्यातील १०९, खुलताबाद तालुक्यातील १३, कन्नड तालुक्यातील २५, सिल्लोड तालुक्यातील ३५, सोयगाव तालुक्यातील १ गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अर्थात, ५०१ गावांतील हजारो महिलांना हा त्रास कमी-अधिक प्रमाणात सोसावा लागत असल्याचे स्पष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात दूध संकलनात घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील दूध संकलन सुमारे २० हजार लिटरने कमी झाले आहे. फुलंब्री तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, दुष्काळ व उन्हामुळे दूध उत्पादनात घट होत आहे.

तालुक्यातील शेतकरी तीन वर्षांपासून कमी पाऊस व दुष्काळाला तोंड देत आहेत. यावर्षी विहीर, विंधन विहिरी, छोटे-मोठे तलाव कोरडे पडत आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे सर्व पाणी तालुक्यात अडवता आले नाही. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची समस्या गंभीर आहे. काही गावांती विहिरींना पाणी अाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला होता. परंतु, उन्हाळा तीव्र होत असताना जलस्त्रोत आटत आहेत. याचा फटका दूध व्यावसायिकांना बसला आहे. पशुखाद्यांचे वाढलेले दर, हिरव्या चाऱ्याचा अभाव यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. परिणामी तालुक्यातील दुधाचे उत्पादन घटले आहे. तालुक्यात दररोज सरासरी ६० हजार लिटर दुधाचे संकलन होते. त्यात आता २० हजार लिटरची घट झाली आहे.

जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाथ्रीकर यांनी दुधाचे उत्पादन कमी झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. दररोजचे संकलन २० हजार लिटरने कमी झाल्याचे सांगून हा वाढते ऊन व हिरवा चारा नसल्याचा परिणाम असल्याचे सांगितले. हिरवा चारा विकत घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. चारा व पाणीटंचाई लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सहा दुभती जनावरे असलेल्या भाऊसाहेब गायकवाड यांनी जनावरांचा सांभाळ करणे अशक्य झाल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मकबरा परिसरात बाटल्यांचा खच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जागतिक वारसादिनाचे औचित्यसाधून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ऐतिहासिक बीबी का मकबरा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत मकबऱ्याच्या परिसरातून तब्बल पोते भरून दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. मकबरा परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्यामुळे अधिकारी आश्चर्यचकित झाले होते.

महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या नेतृत्वाखाली शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. बकोरिया यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या मोहिमेत सहभागी होतात व परिसर स्वच्छ करतात. सिद्धार्थ उद्यान, विमानतळाच्या समोरील रस्ता या भागांत आतापर्यंत या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हे अधिकारी बीबी का मकबरा परिसरात पोचले. यावेळी बकोरिया यांच्याबरोबर अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख शिवाजी झनझन यांच्यासह अ.न्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मकबरा परिसरातील झाडे, झुडपे त्यांनी स्वच्छ केली. भिंतीच्या कडेला, कपारीच्या खाली त्यांना रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यांनी या बाटल्या गोळा करण्यास सुरुवात केली. काही मिनिटांत पोते भरून बाटल्या जमा झाल्या. पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीत त्या बाटल्या टाकण्यात आल्या.

अधिकारी आश्चर्यचकित
दारूच्या बाटल्यांबरोबरच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या देखील मोठ्या संख्येने गोळा करण्यात आल्या. ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या सापडल्यामुळे पालिकेचे अधिकारी अवाक् झाले. मकबऱ्याचे व्यवस्थापन, तेथील सुरक्षारक्षक काय करतात, पर्यटकांवर त्यांचा धाक नाही का, असे विविध प्रश्न या निमित्याने निर्माण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एनआरआय तरुणीची आयुक्तांकडे धाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुबई येथील आयटी इंजिनियर असलेल्या अनिवासी भारतीय तरुणीने सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत वडिलांच्या खुनप्रकरणी दाद मागितली. आरोपींच्या धमक्यामुळे या प्रकरणातील साक्षीदार बेपत्ता झाले असल्याचा आरोप करीत सबंधीतावर कारवाईची मागणी या तरुणीने केली.

केतकी विश्वास शिंदे यांनी पोलिस आयुक्ताना दिलेल्या म‌ा‌हितीनुसार, त्यांचे वडील विश्वास आसाराम शिंदे (वय ६० रा. सिडको) यांनी २० वर्षांपूर्वी ओव्हर जटवाडा येथे दहा एकर जमीन घेतली होती. जमिनीच्या खरेदीनंतर गावातील काही रहिवाशांनी कोर्टात खटले दाखल केले. कोर्टाने मात्र शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. यानंतर देखील सबंधितांच्या कुरापती सुरूच होत्या. त्यांच्या शेताचा बांध फोडून आत शिरकाव करण्यात आला होता. शिंदे यांनी कोर्टाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर कोर्टाने त्याना पंधरा दिवसांची शिक्षा देखील सुनावली होती. २०१४मध्ये शिंदे यानी कोर्टात विहिरीचे काम सुरू केले होते. १४ मार्च २०१५ रोजी विश्वास शिंदे शेतात गेले असता त्यांच्यासोबत वाद घालीत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यामध्ये शिंदे यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संजय भालकर, अलका भालकर, साहेबराव भालकर, कुसूम, शिवाजी उर्फ मनोहर भालकर व श्रीनाथ भालकर यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.

विहिरीचे काम करीत असलेले मंगलचंद जाट व शिवपाल जाट हे या घटनेचे साक्षीदार होते. दरम्यान, साहेबराव याची ऑक्टोबर २०१५मध्ये जामिनावर सुटका झाली. जानेवारी २०१६मध्ये शिवाजी व श्रीनाथ यांची जामीनावर सुटका झाली. संजय व अलका अद्यापही जेलमध्ये आहेत. जामिनावर सुटलेल्या आरोपींनी साक्षीदारांना धमकावणे सुरू केले, असा आरोप केतकी शिंदे यांनी केला आहे.

साक्षीदारांचे पलायन
जाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या धमक्याला कंटाळून मंगलचंद जाट याने राजस्थानला पलायन केले आहे. साक्षीदारांवर दबाव येत असल्याने या प्रकरणात आरोपींचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केतकी शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्त अमितेशकुमार यानी या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणासाठी केतकी शिंदे यांनी दुबईवरून औरंगाबाद गाठले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’ सदस्यांच्या निवृत्तीवरून संभ्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवृत्तीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे सभापती दिलीप थोरात यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले आहे. राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनाही त्यांनी पत्र दिले आहे. हा पत्रप्रपंच सुरू असतानाच पालिकेच्या नगरसचिव विभागाने आठ सदस्यांच्या निवृत्तीसाठी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्याचे पत्र सर्वच्या सर्व सोळा सदस्यांना दिले आहे.

स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होतात. पहिल्या वर्षी सोळा सदस्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात. त्यातून आठ चिठ्ठ्या काढल्या जातात. ज्यांच्या नावच्या चिठ्ठ्या निघतात ते सदस्य स्थायी समितीतून निवृत्त होतात. जे आठ सदस्य शिल्लक राहतात, ते पुढील वर्षी निवृत्त होतात. स्थायी समितीच्या सोळा सदस्यांचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून आठ सदस्यांना निवृत्त केले जाणार आहे. सदस्यांच्या निवृत्ती संदर्भात महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम २० (३)मध्ये तरतुदीनुसार महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ज्या महिन्यात होते, त्या महिन्याच्या पहिला तारखेला स्थायी समितीचे सोळापैकी आठ सदस्य निवृत्त झाले पाहिजेत, असा उल्लेख आहे.

कलम २० (४) मधील तरतुदीनुसार स्थायी समितीच्या सदस्यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला पाहिजे, असा उल्लेख आहे. कलम २० (४) गृहीत धरले, तर सदस्यांचा एक वर्षाचा काळ पूर्ण होण्यासाठी २९ दिवस शिल्लक राहतात. कलम २० (३) नुसार कार्यवाही केल्यास पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ३० मे २०१५ रोजी झाली होती, त्यानुसार स्थायी समितीचे आठ सदस्य १ मे रोजी निवृत्त झाले पाहिजेत. एक मे रोजी हे सदस्य निवृत्त झाल्यास एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे कोणत्या कलमाचे पालन करायचे याचे मार्गदर्शन करा, असे पत्र सरकारला पाठवले आहे, असे थोरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आयुक्त जेव्हा शहरात येतात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निमित्त होते लग्न समारंभाचे, खास या समारंभासाठी महापालिकेचे माजी आयुक्त मुंबईहून येतात. अर्धा तास लग्न समारंभात थांबतात आणि निघून जातात. या अर्धा तासाच्या काळात त्यांच्या भोवती अधिकाऱ्यांचा गराडा पडतो. 'इसमे दो बाते, उसमे दो बाते' च्या पालुपदात हस्स्याच्या फवाऱ्यात गप्पा रंगतात; आणि सर्वांच्या डोळ्यासमोर त्या आयुक्तांचा महापालिकेतील काळ एखाद्या पटकथेप्रमाणे उभा राहतो.

महापालिकेच्या आयुक्तांचे स्वीय सहाय्यक सुनील ढेकळे यांच्या कन्येचे लग्न रविवारी हडकोमधील सप्तपदी मंगल कार्यालयात झाले. या लग्नात उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण महापालिका लोटली होती. महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते. लग्नाची वेळ सकाळी ११.५१ ची होती. लग्नघटिका समीप येऊ लागली, अक्षतांचे वाटप झाले, मंगलाष्टक सुरू झाले पण ढेकळे यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खोळंबले होते. तेवढ्यात एक आलीशान कार कार्यालयासमोर येऊन उभी राहिली. त्यातून महापालिकेचे माजी आयुक्त असीमकुमार गुप्ता उतरले. उद्योगपती उल्हास गवळी त्यांना आपल्या कार मधून या लग्नासाठी घेऊन आले होते. गुप्ता सध्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आहेत. ३० मे २००५ ते २ जून २००८ या काळात ते औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त होते. अधिकारी प्रिय आयुक्त, अशी त्यांची ख्याती होती. महापालिकेत बीओटीची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेले बीओटीचे प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. लग्न समारंभात काही पत्रकार देखील उपस्थित होते. गुप्ता यांना पाहिल्यावर पत्रकारांनी त्यांना राम राम घातला, त्यावर 'क्या चल रहा है, कैसे हो,' असे गुप्ता यांनी त्यांच्या खास शैलीत विचारले. गुप्तांना पाहताच पत्रकारांना बीओटी प्रकल्पांची आठवण झाली. पण या प्रकल्पांबद्दल बोलण्याचे लग्न समारंभ हे योग्य स्थाळ नव्हते; त्यामुळे 'ठिक है, आपका कैसा चल रहा है,' असे म्हणत पत्रकारांनी लाइट मूड मध्ये चर्चा सुरू केली. वधू-वरांना आशीर्वाद देऊन, भोजन करून कार मध्ये बसेपर्यंत गुप्ता यांच्या भोवती पालिकेच्या अधिकाऱ्यांचा गराडा होता. त्यात शहर अभियंता

सखाराम पानझडे, निवृत्त शहर अभियंता सी. एस. सोनी, एम. डी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अग्निशामन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया देखील सपत्निक या लग्नाला आले होते. त्यांची आणि गुप्ता यांचीही भेट झाली.

बीओटी पाठ सोडेना
पालिकेचे बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली म्हणाले, 'आपको बीओटी के बारेमे कुछ पुछना है तो गुप्ता साब से पुछो, वो निकल जा रहे है' यावर तेवढ्याच तत्परतेने गुप्ता म्हणाले, 'मला काही विचारू नका, मी आता मुंबईत खुष आहे,' असे म्हणत ते मंगल कार्यालयाबाहेर गेले. तेथून ते गवळी यांच्या कारमध्ये बसून निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारे गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कामगार कंत्राटदाराला उपोषणाची धमकी देत दहा हजाराची खंडणी उकळणाऱ्या दोघांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. रविवारी रात्री आठ वाजता कॅनॉट गार्डनजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथ त्रिंबक लगामे (रा. एन सात, सिडको) यांची द्वारका इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस नावाने लेबर सप्लायर्स फर्म आहे. बीसीएल नावाच्या कंपनीमध्ये त्यांचे सध्या कंत्राटी काम सुरू आहे. या कंपनीमध्ये गौरी सर्व्हिसेस या दुसऱ्या कंत्राटदाराचे काम सुरू आहे. गौरी सर्व्हिसेसचे सुपरवायझर सुरेश नरवडे, प्रकाश नरवडे, प्रकाश खडसन व सुनील निकाळजे हे गेल्या काही दिवसांपासून लगामे यांना त्रास देत होते. पीएफ, ईएसआय ऑफिस, पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी देणे, कामगारांना भडकावणे आदी प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. रविवारी लगामे यांना सुरेश नरवडे याने फोन करून साठ हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास गेटसमोर गोंधळ घालू, कामगार उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण करू, अशी धमकी दिली.

या प्रकाराला कंटाळून लगामे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत दादा मागितली. विशेष पथकाकडे आयुक्तांनी ही कामगिरी सोपवली. रात्री आठ वाजता कॅनाट गार्डन येथे दहा हजाराची खंडणी घेताना आरोपी सुरेश उर्फ सूरज उर्फ बाबासाहेब लक्ष्मण नरवडे (वय ३०, रा. आंबेडकरनगर) आणि प्रकाश अर्जुनराव नरवडे (वय २८, रा. ब्रिजवाडी) याना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक भारत काकडे सहायक पोलिस निरीक्षक अब्बास सय्यद, जमादार मधुकर नीळ, सुनील धुळे, गणेश शिंदे आदींनी केली. आरोपींना उद्यापर्यंत कोठडी

यासंदर्भात आरोपी सुरेश नरवडे व आरोपी प्रकाश नरवडे यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी इतरांकडून खंडणी वसूल केली आहे का, याचा तपास करणे आहे; तसेच इतर आरोपींना ताब्यात घेणे बाकी आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आली. ही विनंती ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. वाय. डोईफोडे यांनी दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

यापूर्वी पोलिस ठाण्यात दिली होती तक्रार
रघुनाथ लगामे यांना गेल्या काही दिवसांपासून हे चौघे ब्लॅकमेल करीत होते. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात देखील त्यांनी लगामे यांच्याविरुद्ध अर्ज दिला होता. याप्रकरणी ७ एप्रिल रोजी लगामे यांनी या चौघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता, मात्र त्यावर काही कारवाई झाली नसल्याने चौघांचा त्रास सुरूच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्य‌ कारखान्यांचे पाणी बंद करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळामुळे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना शहरातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी शहर व परिसरातील गावांना द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड निदर्शने करण्यात आली. शासनाने पाच दिवसात कारवाई न केल्यास पक्षातर्फे कारखान्यांचे पाणी तोडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

अत्यल्प पर्जन्यमानामुळे मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असून जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्येही हंडाभर पाण्यासाठी वनवन करावी लागत असतांना मद्यनिर्मिती कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रशासनाने प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन मद्यनिर्मिती कारखान्यांचे पाणी पावसाळा सुरू होऊन पाण्याचे स्त्रोत निर्माण होईपर्यंत दोन महिन्यांकरीता बंद करावा. या पाण्याचा शहरासह जवळच्या गावास पाणी पुरवठा करण्यात यावा यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीचे निवेदन निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखील करण्यात आलेल्या या निदर्शनासाठी केशवराव औताडे, डॉ. कल्याण काळे, समशेर सिंग सोधी, नामदेव पवार, श्रीराम महाजन, मनोज पाटील, नंदू सहारे, सरोज मसलगे, नितीन पाटील, प्रभाकर मुट्ठे, मीर हिदायत अली, रवींद काळे, शोभाताई खोसरे, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, बबन दिंडोरे, अनिल मानकापे, आतिष पितळे, जमील अहेमद, शेख अथर, खालेद पठाण, हमद चाऊस, इब्राहिम पठाण, फेरोज पटेल, जनार्धन निकम आदींची उपस्थिती होती.मद्य‌ कारखान्यांचे पाणी बंद करा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळामुळे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना शहरातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी शहर व परिसरातील गावांना द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड निदर्शने करण्यात आली. शासनाने पाच दिवसात कारवाई न केल्यास पक्षातर्फे कारखान्यांचे पाणी तोडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

अत्यल्प पर्जन्यमानामुळे मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत असून जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्येही हंडाभर पाण्यासाठी वनवन करावी लागत असतांना मद्यनिर्मिती कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रशासनाने प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन मद्यनिर्मिती कारखान्यांचे पाणी पावसाळा सुरू होऊन पाण्याचे स्त्रोत निर्माण होईपर्यंत दोन महिन्यांकरीता बंद करावा. या पाण्याचा शहरासह जवळच्या गावास पाणी पुरवठा करण्यात यावा यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीचे निवेदन निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखील करण्यात आलेल्या या निदर्शनासाठी केशवराव औताडे, डॉ. कल्याण काळे, समशेर सिंग सोधी, नामदेव पवार, श्रीराम महाजन, मनोज पाटील, नंदू सहारे, सरोज मसलगे, नितीन पाटील, प्रभाकर मुट्ठे, मीर हिदायत अली, रवींद काळे, शोभाताई खोसरे, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, बबन दिंडोरे, अनिल मानकापे, आतिष पितळे, जमील अहेमद, शेख अथर, खालेद पठाण, हमद चाऊस, इब्राहिम पठाण, फेरोज पटेल, जनार्धन निकम आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images