Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुनर्गठनाचा लाभ २९०९ शेतकऱ्यांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
खुलताबाद तालुक्यातील ५०पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून, २०१४-१५ या खरीप हंगामातील कर्जाची वसुली करू नये, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. त्याचा तालुक्यातील २९०९ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

खरीप हंगाम २०१५च्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सहकार अर्चना वाडेकर यांनी 'मटा'ला दिली. एप्रिलअखेरीस खुलताबाद तालुक्यात २९०९ शेतकरी सभासद असून, पीक कर्जाची ६ कोटी रुपये चालुबाकी आहे. वसुलीसाठी कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने खरीप हंगामात घेतलेल्या व परतफेड न केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची योजना जाहीर केली आहे. ११ मार्च २०१६च्या शासननिर्णयानुसार अशा गावातील शेतकऱ्यांनी २०१५च्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचे पाच वर्षे मुदतीच्या मध्यम मुदत कर्जत पुनर्गठन करावे. त्या कर्जाचे पाच हप्ते पाडणे आवश्यक आहे. यासाठी कर्जदार शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे. ३१ मार्च २०१६ वसुली होऊन थकित चालुबाकीदारांचे पुनर्गठन व्याजासह केले जाणार आहे. त्याची परतफेड सहा टक्के दराने करायची आहे. पुनर्गठन ३० एप्रिल २०१६पर्यंत करणे अपेक्षित होते. याविषयीची माहिती ठराव, पुनर्गठन पात्र शेतकऱ्यांची यादी संकलित करण्याचे काम सुरू आहे. खुलताबाद तालुक्यातील २९०९ सभासद शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे ६ कोटी बाकी असून, वसुलीची कारवाई सुरू आहे. पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना लगेच नवीन पीक कर्ज दिले जाणार आहे. खरीप २०१५मध्ये पीककर्ज घेतलेल्या व परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांनी सेवा संस्थेच्या गटसचिवाशी संपर्क साधून संमतीपत्र द्यावे, असे आवाहन सहाय्यक निबंधक सहकार वाडेकर यांनी केले आहे.

गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्यानंतर खरिपाचे पीक हातचे गेले होते. त्याचबरोबर पाण्याअभावी रब्बी पिकाची पेरणीही करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. जानेवारीपासून विभागात ३९२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यापार्श्वभूमीवर सरकारने पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निरंकारी बाबांचे अनुयायी हळहळले!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निरंकारी समुदाय प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने निरंकारी अनुयायांनी हळहळ व्यक्त केली. बाबांचे निधन धक्कादायक असल्याने त्यांच्या अनुयायांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते.
सिंधी कॉलनीतील निरंकारी भवनात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सत्संग घेण्यात आला. यात निरंकारी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अनुयायांना धैर्य देवो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करण्यात आली. मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे निरंकारी इंटरनॅशनल समारोह २९ जून ते ३ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणार होता. त्याच्या तयारीची पाहणी करण्याकरिता बाबा हरदेव सिंह गेले होते. कार उलटून झालेल्या अपघातात बाबांसह त्यांचे जावाई अवनित यांचेही निधन झाले. दुसरे जावई सन्नी हे जखमी झाले आहेत. निरंकारी भवनचे झोनल प्रमुख कन्हैयालाल डेबरा म्हणाले, '२७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेव सिंह हे गादीवर बसले. निरंकारी समुदायाचे ते चौथे गुरू होते. प्रेम व विनम्रता यावर त्यांचा भर असे. अत्यंत सोप्या व सरळ भाषेत ते अनुयायांशी संवाद साधत. २०१३ मध्ये ते औरंगाबादेत आले होते. या महिन्यात ते शहरात येतील अशी अपेक्षा होती. वयाच्या अकरा वर्षांपासून मी हे कार्य करीत आहे. बाबांनीच माझ्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यांचे निधन हे धक्कादायक आहे.' घनःश्याम माटरा म्हणाले, '१९७२ पासून मी सेवा करीत आहे. सर्वजण स्वच्छेने काम करतात. त्यासाठी कोणतेही मानधन दिले जात नाही.' हरिलाल नाथानी म्हणाले, 'सेवादलाची जबाबदारी बाबांनी माझ्याकडे सोपवली. साठ वर्षांपासून मी या सेवेशी जोडला गेलो आहे. मानवतेचा त्यांचा संदेश जगासाठी दिशादर्शक आहे.'अॅड. जग्यासी श्रीचंद म्हणाले, 'गेल्या ३० वर्षांपासून बाबांचा सत्संग मी अनुभवत आहे. सकारात्मक विचारसरणी मला भावलेली आहे. कोणीही लहान-मोठे नाही. कारण सर्वांमध्ये एकच आत्मा आहे. भेदभावाला त्यांच्याकडे कोणताही थारा नव्हता. गोरगरीबांमध्ये त्यांनी आत्मविश्वास जागवण्याचे मोठे काम केले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक संपर्कात; पैशाचा विषय नाही: राष्ट्रवादी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'एमआयएमचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यांच्यापैकी काही जणांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. मात्र, या घडामोडींशी पैशाच्या देवाण-घेवणीचा काहीच संबंध नाही,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी ३० लाख रुपये देऊन एमआयएमच्या नगरसेवकांना फोडत आहे, असा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी ख्वाजा शरफोद्दीन यांनी महापालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'एमआयएमकडून नगरसेवक म्हणून जे निवडून आले आहेत ते पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. हैदराबादहून ते आले नव्हते. एमआयएममध्ये आपल्याला काही वाव नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते आता स्वगृही परतत आहेत. त्यांना स्वगृही आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार केला जाणार नाही. तशी गरज देखील नाही. एमआयएमच्या आमदाराने नगरसेवकांचा उपयोग युतीच्या फायद्यासाठीच करून घेतला आहे. आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास दर्शक ठराव आणि नुकतेच झालेले स्थायी समिती सदस्यांचे राजीनामा नाट्य ही दोन उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. युतीसाठी आपला वापर केला जात आहे, असे लक्षात आल्यामुळे या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची तयारी दर्शवली आहे,' असे ख्वाजा शरफोद्दीन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चविष्ट ‘पनीर लबाबदार’

$
0
0


Abdulwajed.Shaikh
@timesgroup.com
अभिमन्यू फुटाणे यांनी दहा वर्षांपूर्वी खाणावळ सुरू केली आणि हॉटेल व्यवसायात त्यांचे पदार्पण झाले. नक्षत्रवाडी येथे हॉटेल सुरू केल्यानंतर त्यांनी रेस्टॉरंट थाटले. त्यासाठी व्यावसायिक अनिरुद्ध आणि मोईल अली हुसैन मर्चंट यांच्यासोबत 'हॉट प्लेट' नावाने रेस्टॉरंटची सुरुवात केली. येथील पनीर लबाबदार, पनीर काचीमिर्च आणि सिझलिंग बुलेट हे खादय पदार्थ खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.
हॉट प्लेट. बस्स नाम काफी है. उस्मानपुऱ्यात तुम्हाला कोणीही या रेस्टॉरंटची जागा दाखवेल. व्हेज चायनिजमध्ये व्हेज-६५, सिझलिंग बुलेट, व्हेज मन्च्युरियन, पनीर चिली, पनीर काला मिर्च मसाला, पनीर हरबरा कबाब, व्हेज सिक कबाब, तुंदरी आलू, गोबी, पनीर लबाबदार, पनीर अमृतसरी, व्हेज हैदराबाद आणि व्हेज कढाई हे इथले पदार्थ खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. यातले पनीर लबाबदार हे ग्राहकांच्या जास्त आवडीचे. हे पदार्थ तयार करण्यासाठी एका भांडयात तेल टाकावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, पनीरचे तुकडे टाकले जातात. यात तिखट, धणे, हळद टाकून हे सर्व पदार्थ एकजीव करतात. हे पदार्थ खरपूस परत्यानंतर पनीरमध्ये ग्रेव्ही टाकली जाते. ही ग्रेव्हीही खास तयार केली जाते. एका भांड्यात तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा, काजू, मध, गरम मसाला टाकून ग्रेव्ही तयार केली जाते. पनीर करतानाही या मसाल्याचा उपयोग केला जातो. पनीर तयार झाल्यानंतर ग्रेव्हीमध्ये टाकून हा खाद्य पदार्थ ग्राहकांना दिला जातो. पनीर लबाबदार ग्रेव्ही गार्लिक नान किंवा बटर नान सोबत खायला मजा येते. स्टार्ट टप चायनीज म्हणून येथे 'सिझलिंग बुलेट' प्रसिद्ध आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी पत्ता कोबी, गाजर बारीक करून इतर मसाल्यासोबत त्याचे मिश्रण करावे. मैदा, मक्याच्या पिठात एकत्रित करून त्याचे लहान-लहान गोळे तयार केले जातात. हे गोळे तेलात तळल्यानंतर
टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि सोसा सॉससोबत खायला दिले जातात. हा पदार्थ तयार करण्यासाठी विशेष डिश ट्रेचा वापर केला जातो. याशिवाय येथील पनीर ‌काली मिर्च टिकिया प्रसिद्ध आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी दही, अदरक लसूण पेस्ट, धने पूड, जिरा पूड एकत्र करून मिश्रण तयार केले जाते. पनीरच्या चौकोनी तुकड्यांना मसाला लावतात. त्यानंतर एका लोखंडी तारेला लावून तंदूरमध्ये भाजण्यासाठी पनीर ठेवण्यात येतात. पनीर तंदूरमध्ये काही वेळ ठेवल्यानंतर लज्जतदार प्लेट खाण्यासाठी तयार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५९ चेक बाउन्स; २ कोटींचा घाटा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेकडून मालमत्ता कर वसुलीच्या कामांत प्रचंड कुचराई सुरू असून आजवर ४५९ चेक बाउन्स झाल्याने सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. या ठकसेनांविरोधात अजूनही कारवाई झाली नाही हे विशेष.
पालिका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले होते. वसुली मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली. सुमारे ४०० कर्मचारी या कामासाठी नियुक्त करण्यात आले. या संपूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून ८० कोटींची वसुली करण्यात आली. गेल्यावर्षीपेक्षा यंदा वसुलीचे प्रमाण ३० कोटींनी जास्त असल्याचे सांगितले गेले. या वसुलीवेळी नागरिकांकडून रोखीने कर वसूल करताना काही नागरिकांकडून चेक देखील घेतले जातात. ते पुढच्या तारखांचे असतात. त्यामुळे ते लगेच वटत नाहीत. मात्र, चेकवर नमूद केलेली रक्कम वसुलीच्या एकूण किंमतीत गृहित धरली जाते. या जमा चेकचा आढावा नुकताच घेण्यात आला, तेव्हा दोन कोटी रुपयांचे एकूण ४५९ चेक वटले नसल्याचे लक्षात आले. ज्या व्यक्तींचे चेक वटले नाहीत, त्या व्यक्तींवर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याची माहिती जाणून घेण्यासाठी विधी विभागाशी संपर्क साधला. तेव्हा या विभागाने कारवाईच्या दृष्टीने पुरेशी तयारी केल्याचे लक्षात आले.
झोन कार्यालयांचा बेजबाबदारपणा
महापालिकेच्या झोन कार्यालयांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. न वटलेले चेक बँकेच्या मार्फत झोन कार्यालयाला पाठवले जातात. चेक न वटल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला या कार्यालयामार्फत नोटीस बजावणे कायद्यानुसार गरजेचे आहे. मात्र, पंधरा दिवसांत नोटीस बजावली जात नाही. तरीही पुन्हा एकदा चेक बँकेत टाकून तो न वटल्यास संबंधितांना नोटीस बजावून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, पण या कारवाईकडे झोन कार्यालयाने दुर्लक्ष केले आहे. न वटलेली चेक प्रकरणे हाताळण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या काळात विशेष वकिलाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या वकिलाकडेही न वटलेल्या चेकची प्रकरणे झोन कार्यालयाने दिली नाहीत. त्यामुळे अद्याप कुणावरही कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही.
उपायुक्त म्हणतात, कारवाई करू
चेकप्रकरणी बोलताना उपायुक्त अय्युब खान म्हणाले, 'न वटलेल्या चेकची माहिती बँकेकडून मागवली आहे. बँकेकडून माहिती येताच संबंधित व्यक्तींवर झोन कार्यालयाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एकही चेक न वटलेला राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमटीडीसी’त बँड, बाजा, बारातवर बंदीच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे कार्यक्रम घेऊ नये हा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. लग्न सोहळ्यांवरील बंदी उठवण्यासाठी एमटीडीसीने दाखल केलेली याचिका कोर्टाने निकाली काढली आहे. प्रदूषणविरहित कार्यक्रमासाठी कोर्टाने परवानगी दिल्याचा दावा एमटीडीसीने केला आहे, तर सुप्रीम कोर्टाचा अवमान करून एमटीडीसीने कार्यक्रम घेतल्यास अंमलबजावणी याचिका दाखल करू, असे अॅड. असिम सरोदे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या औरंगाबाद येथील रिसॉर्टमधील लग्न सोहळ्यांमुळे ध्वनी प्रदूषण समस्या वाढली होती. रिसॉर्ट परिसरातील वसाहतीत ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुले त्रस्त होती. या गैरसोयीविरोधात १९ एप्रिल २०१५ रोजी रहिवासी विवेक शेषराव ढाकणे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. याचिकाकर्त्याची बाजू ऐकून न्या. विकास किनगावकर आणि तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांनी ९ डिसेंबर २०१५ रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला. निकालानुसार 'वेडिंग टुरिझम'च्या नावाखाली सुरू असलेले बेकायदा कार्यक्रम थांबवण्याचे आदेश न्यायाधिकरणाने एमटीडीसीला दिले. या निकालानंतर राज्यभरातील ८० रिसॉर्टमधील कार्यक्रम बंद झाले होते. महसूल बुडत असल्यामुळे एमटीडीसीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने २९ एप्रिल २०१६ रोजी निकाली काढत न्या. अनिल दवे आणि न्या. आदर्श गोयल यांनी हरित न्यायाधिकरणाचा निकाल कायम ठेवला. ध्वनी प्रदूषण करणारे कार्यक्रम बेकायदा असल्याचे कोर्टाने ग्राह्य धरून रिसॉर्टमध्ये प्रदूषण करू नये, असे निकालात म्हटले आहे; तसेच प्रदूषण केल्यास संबंधिताकडून कायद्यानुसार दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, लग्न सोहळ्यांसाठी कोर्टाने मुभा दिल्याचे एमटीडीसीने सांगितले. कोर्टाने फटकारल्यानंतरही एमटीडीसी सोहळे घेणार असल्यास अंमलबजावणी याचिका दाखल करू असे अॅड. असिम सरोदे यांनी सांगितले.
सोहळ्यांवर बंदीच
मागील काही दिवसांपासून राज्यातील रिसॉर्टमधील लग्न सोहळे बंद आहेत. पर्यटक निवासाऐवजी रिसॉर्टची मंगल कार्यालये झाल्यामुळे पर्यटनप्रेमी नाराज झाले होते; मात्र, कंत्राटीकरणातून एमटीडीसीने फक्त महसूल गोळा करणे हेच उद्दिष्ट ठेवले. कंत्राटदार आणि एमटीडीसीच्या करारात खोल्या भाड्याने देणे आणि जेवणाची सुविधा पुरवणे हाच उल्लेख आहे. प्रत्यक्षात कंत्राटदार रिसॉर्टचा उपयोग मंगल कार्यालयासारखा करीत होते.

-
'वेडिंग टुरिझम' हा शब्द राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बेकायदा ठरवला होता. सुप्रीम कोर्टाने प्रदूषणविरहित कार्यक्रम घेण्यास परवानही दिली आहे, पण बँड, बाजा आणि फटाक्यांशिवायच्या लग्नाला रिसॉर्ट भाड्याने देण्यात येईल. - अण्णासाहेब शिंदे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी
-
सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे रिसॉर्ट परिसरात कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा अवमान करून एमटीडीसी कार्यक्रम घेणार असल्यास अंमलबजावणी याचिका दाखल करू. - अॅड. असिम सरोदे, वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरच्या पाणीप्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सप्टेंबर २०१५ अखेर पाणी नव्हते. लातूरसह मोठ्या शहरांना या धरणातून पाणी दिले जाते. तब्बल आठ महिने आधी याची माहिती असूनही सरकारने लातूरला पाणी देण्यासाठी काहीच पावले उचलली नाहीत. सरकारला दुष्काळाचे अजिबात गांभीर्य नाही,' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.
बीड जिल्ह्याचा दोनदिवसीय दौरा आटोपून पुण्याला जाताना औरंगाबादेत चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'दोन दिवसांत मी बीड जिल्ह्यातील सहा तालुक्यांत फिरलो. अंबाजोगाई तालुक्यातील तीन गावांमध्ये दुष्काळी कामे सुरू आहेत. या दरम्यान मांजरा धरणाला भेट दिली. मुळात पाणी नियोजन करण्यात सरकारचे प्लॅनिंग चुकले आहे. कारण सप्टेंबरमध्येच या धरणात पाणी नव्हते. पुढे गंभीर परिस्थिती उद्भवेल एवढी साधी गोष्ट सरकारच्या लक्षात आली नाही. २०१२ च्या दुष्काळात आम्ही विशेष निधी मंजूर करून उजनीहून उस्मानाबादला १२३ किलोमीटर जलवाहिनी करून पाणी दिले. उस्मानाबादेतील प्लँटची दररोज ८० लाख लिटर पाणी खेचण्याची क्षमता आहे. लातूरला सध्या रेल्वेने ७० लाख लिटर पाणी दिले जात आहे. सप्टेंबरमध्ये सरकारने प्लॅन करून उस्मानाबादच्या प्लँटची क्षमता वाढविता आली असती. याच काळात लातूर - उस्मानाबाद जलवाहिनी टाकता येणे शक्य होते. पण सरकारने गांभीर्याने घेतले नाही. बीडमध्ये ८०० टँकर सुरू आहेत. त्यापैकी सरकारी केवळ २५ आहेत. याअर्थी टँकर माफिया पुन्हा फोफावले आहेत. त्यावर कुठेतरी अंकुश ठेवला पाहिजे. बीड जिल्ह्यात जनावरांच्या ३०० छावण्या आहेत. तिथे तीन लाख जनावरे आहेत. सरकार प्रतिजनावर प्रतिदिन ७० रुपये देते. आमच्या काळात आम्ही ८० रुपये देत होतो. वास्तविक यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. हे सरकारने पाहायला हवे होते. ७० रुपयांमधून शेणाची साडेसात रुपये कपात केली जाते. कमी पैसे देताना किमान शेणाचे तरी पैसे द्यावेत, अशी मागणी जनावरांचे मालक करत आहेत. किमान महिनाभर तरी छावण्या सुरू राहतील. या कालावधीत प्रतिजनावर १०० रुपये दर दिला पाहिजे,' अशी मागणी श्री. चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकार दुबळे; सीएम एकाकी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकार कुठलाही निर्णय घेण्यात सक्षम नाही. त्यांना अनुभव नाही. असेही आता म्हणता येणार नाही. राज्याचा गाडा हाकताना लोकहिताचे निर्णय घ्यावे लागतात. सरकार मात्र सगळीकडे नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारमधील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतात आणि मुख्यमंत्री एकटे पडले आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगाविला.

चव्हाण म्हणाले,'हे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना अनुभव नाही, असे म्हटले जात होते, पण आता खूप कालावधी उलटून गेला. तरीही सरकारच्या कार्यपद्धती सुधारणा नाही. एप्रिल महिन्यात महसूलमंत्र्यांनी लातूर, बीड आणि उस्मानाबादमधील जनावरांच्या छावण्या बंद करण्याचे फर्मान सोडले. दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना एका मंत्र्याने असा आदेश देणे किती चुकीचे आहे. आम्ही आरडाओरड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सायंकाळी सारवासारव करावी लागली. सरकारमध्ये मुख्यमंत्री एकटे पडत आहेत. सरकारी अधिकारीही त्यांचे ऐकत नाहीत. किंबहुना त्यांनीही हताशपणे ही भूमिका मांडली आहे. दुष्काळावर मात करताना सरकारला अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या पण त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने सगळे गणितच बिघडले आहे.'

'आमच्या सरकारमध्येही मित्रपक्षाशी कसे 'मधूर' संबंध होते, हे सगळ्यांना माहिती आहे, पण राज्याचा विकास साधताना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतात. मुख्यमंत्र्यांना त्याचा अनुभव नाही, हे आजवरच्या वाटचालीवरून सिद्ध होते. बेकायदा इमारतींना नियमित करण्यासाठी माझ्यावर खूप दबाव होता. या सरकारने मात्र तत्काळ निर्णय घेतला. कोर्टाने हा निर्णय रद्द केल्यावर त्यांना गांभीर्य कळाले. एलबीटी बंद करण्याचा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा आहे. त्या निधीतून औरंगाबाद पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार तरी करता येत होते. ही पालिका कशीही चालो पण निधीचा स्त्रोत येणे आवश्यक आहे. सरकारला हे कळालेच नाही,' असा दावा त्यांनी केला.

मग स्फोट घडविला कुणी?

मालेगाव बाँबस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह यांना एनआयएने क्लिन चीट दिला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,'मालेगाव स्फोटाच्या चौकशीत तपास यंत्रणांनी प्रज्ञासिंह यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याचा तपास पुढे एनआयएकडे सोपविला होता. आता त्यांनी क्लिन चीट दिला. एनआयएची भूमिका अचानक कशी बदलली याचा विचार करणे गरजेचे आहे. याप्रकरणी अन्य काही जणांना पकडले होते. पुढे त्यांना सोडण्यात आले. मग प्रश्न असा उपस्थित होतो की स्फोट घडविला कुणी?'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातूरात भाजपाची आज जलजागरण सभा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
सर्व राजकीय पक्षांसाठी लातूर जिल्हा हे एक लक्षवेधी केंद्र झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि आता सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने १५ मे रोजी २० खासदार मैदानात उतरवून प्रत्येक तालुका पिंजुन काढण्यासाठीची योजना केली. सायंकाळी लातूरच्या आंबेडकर पार्कवरील मैदानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जलजागरण सभेचे आयोजन केले आहे. त्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत.
लातूराला एकाच दिवशी सर्व तालुक्यात मंत्री पाठवून शासनस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा उपक्रम केला होता. आता पक्षपातळीवर खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रत्येक तालुक्यात खासदार पाठवून राज्य, केंद्र सरकारच्या योजनाची फलश्रुती समजावून घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे. या सर्व प्रयोगाला एक पाऊल दुष्काळमुक्तीकडे असे भाजपाने म्हटले आहे. सध्या लातूर पालिकेत भाजपचा एकही सदस्य नाही. त्यामुळे उद्याच्या सभेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.
लातूर शहरात स्वत: खासदार रावसाहेब दानवे, नाना पटोल (निलंगा), दिलीप गांधी (शिरुर अनंतपाळ), ए. टी. नाना पाटील (देवणी), अशोक नेते (उदगीर शहर), शरद बनसोडे (उदगीर ग्रामीण), हरिश्चंद्र चव्हाण (जळकोट), गोपाळ शेट्टी (चाकुर), हंसराज अहिर व सुनील गायकवाड (अहमदपूर), डॉ. प्रितम मुंडे (रेणापूर), रामदास तडस, चिंतामण वणगा (लातूर ग्रामीण), डॉ. सुभाष भांबरे आणि कपील पाटील (औसा) येथे जाऊन पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळातही ग्राहकांना ‘शॉक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा दुष्काळाने त्रस्त असतानाच महावितरणने दुष्काळग्रस्तांना एक शॉक दिला आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेव (वाढीव डिपॉझीट) आणि वाढीव दराने वीज शुल्क आकारून देयके जनतेच्या माथी मारली आहेत.
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. मात्र, याचवेळी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी दुष्काळग्रस्तांची लूट करण्याचा उद्योग महावितरने आरंभिला आहे. महावितरणच्या या उद्योगाकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष आहे. किंबहुना शासनाच्या मदतीनेच महावितरणने हा लुटीचा उद्योग सुरू केला असावा अशीही चर्चा आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच यास कारणीभूत असल्याचेही यानिमित्ताने बोलले जात आहे. परिणामी शासनविरोधात जनतेचा रोष वाढत चालला आहे. एप्रिल महिन्याच्या बिलासोबतच अतिरिक्त सुरक्षाठेव (वाढीव डिपॉझीट) म्हणून ग्राहकांना स्वतंत्र देयके (बिले) देण्यात आली आहेत. तसेच एप्रिल महिन्याच्या नियमित बिलात वीज शुल्क १६ टक्के इतके आकारण्यात आले आहे.
महावितरणकडून वसूल करण्यात येणारी ही सुरक्षा ठेव (डिपॉझीट रक्कम) त्या वीज ग्राहकाच्या तीन महिन्याच्या वीज वापरापोटीच्या किंवा एका बिलिंग अवधीच्या रक्कमेपैकी जी कमी असेल तितकी असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. याशिवाय वीजवितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने पुर्ननिर्धारण करू शकते. या वाढीव डिपॉझीटचे बिल जे ग्राहक वेळेत भरणार नाहीत, त्यांच्या पुढील महिन्याच्या नियमित देयकात ही रक्कम थकबाकी म्हणून दाखविण्यात येईल. यानंतर ही रक्कम न भरल्यास संबंधिताचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल.
याशिवाय एप्रिल महिन्याच्या बिलात महावितरणने स्थिर आकार, वीज आकार, इंधन समायोजन आकार, असे लावले आहेत. याशिवाय वीज शुल्क १६ टक्के आकारले असून याचा वीज ग्राहकांना कसलाही बोध होत नाही.
दुष्काळामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त आहेत. जगणे असह्य होत असल्याने शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. अशावेळी महावितरणने सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे गरजेचे असताना ग्राहकांना अतिरिक्त रक्कमेत देयके देवून त्यांच्या समस्येमध्ये वाढ केली आहे. यामुळे महावितरण विरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. परप्रांतातून वीज आयात करण्यात येत आहे. त्याचा फटका वीज ग्राहकांना सोसावा लागत असल्याची माहिती एका महावितरणच्या अधिकाऱ्यांने दिली.


वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या दरात सतत कमी अधिक प्रमाणात वाढ होत असते. याचा परिणाम म्हणून वीज शुल्क (१६ टक्के) आकारण्यात आले आहे.
- अरुण दापडकर, अधिक्षक अभियंता, महावितरण, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी महाराजांचा जयघोष

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छत्रपती संभाजी महाराज यांची ३५९ वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर शिवप्रेमींची रिघ लागली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आणि वाहन रॅलीच्या माध्यमातून जयंती उत्सवाचा जल्लोष दिसला.
बुलंद छावा व शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त टीव्ही सेंटर चौकात मिरवणूक काढण्यात आली. बुलंद छावा विभागीय कार्यालयापासून निघालेल्या मिरवणुकीचा टीव्ही सेंटर चौकात समारोप झाला. या मिरवणुकीत महापौर त्र्यंबक तुपे, अभिजित देशमुख, बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे, नितीन शेळके, सतीश वेताळ, ज्ञानेश्वर जाधव, साहेबराव मुळे, मनोज गायके, धृपत निकम, नानासाहेब बढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. ढोल-ताशे, कोल्हापुरी डफ व तुतारीच्या तालावर निघालेली मिरवणूक महिलांच्या फुगड्यांनी लक्षवेधी ठरली. टीव्ही सेंटर चौकात मिरवणूक पोहचल्यानंतर संभाजीराजांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी 'छत्रपती संभाजी महाराज की जय' या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अभिवादन करण्यासाठी सायंकाळी सातपर्यंत जिन्याची सोय करण्यात आली. यावेळी तीन हजार लस्सी पॅकेटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल बोरसे, शिवराज पाटील, प्रदीप हारदे, कैलास कुंटे, संतोष जाधव, योगेश देशमुख, रामेश्वर राजगुरे, अंबादास सोनवणे, विलास पवार, सुरेश बोर्डे आदींनी परिश्रम घेतले.
औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वॉर्ड अध्यक्ष आनंद भामरे यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वराज्य कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या संभाजी महाराजांचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा असे आवाहन भामरे यांनी केले. यावेळी रोहन थोरात, अमिन त्रिभूवन, प्रबोधन बनसोडे, संदीप करोतिया, विशाल लांडगे, कडूबा राऊत, दादाराव बोर्डे, अरुण माने, सुनील नरवडे, सॅम हिवाळे, अमित दांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...देशाच्या उन्नतीसाठी झटणारा आर्य समाज!

$
0
0


Sudhir.Bhalerao
@timesgroup.com
स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईत १० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाज स्थापन केला. स्वामी दयानंद यांचा जन्म मोरवी संस्थानातल्या एका खेड्यात १८२४ मध्ये झाला. त्यांनी आपल्या हयातीत आपले मूळ नाव अथवा जन्मस्थान कधीही कोणास सांगितले नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी मूर्तिपूजेविरुद्ध बंड केले. मूर्तिपूजेविरुद्धची चळवळ स्वामींनी हरिव्दार काशी क्षेत्री केली. स्वामी दयानंदांनी प्रार्थनासमाज, ब्रह्मसमाज व आर्यसमाज सर्व एक करावे यासाठी प्रयत्न केले. परंतु, त्या त्या समाजाच्या पुढाऱ्यांना ते मान्य झाले नाही.
आ र्य समाजाच्या तत्वांपैकी परमेश्वराचे आस्तित्व व स्वरुप आणि वैदिक ग्रंथातील सिद्धांत यासंबंधाची पहिली तीन तत्वे धार्मिक व अत्यंत महत्त्वाची आहेत. काही तत्वे नीतिविषयक नियम आहेत. आर्य समाजाची धर्मसूत्रे अगदी थोडक्यात आहेत. विशिष्ट शब्दाबद्दल या धर्म पंथाचा मुळीच आग्रह नसतो. भारताची धार्मिक, राजकीय व शास्त्रीय बाबतीत उन्नती करणे हाच आर्य समाजाचा उद्देश आहे.
आर्य समाजाची स्थापना झाली तेव्हा भारतावर ब्रिटिशांचा राज्यकारभार होता. भारताला वैदिक मार्गावर नेणे आणि सर्व जगाला वैदिक धर्म शिकवणे यावर स्वामी दयानंदांनी भर दिला. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद अशा चार वेदांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम आर्य समाज शेकडो वर्षांपासून करत आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी लागणारे व्यक्तीचे चारित्र्य आणि समाजाप्रती लागणारे उत्तरदायित्त्व यावर वेदांमध्ये विशेष भर आहे. तसेच मातृभूमीसाठी सर्वस्व बलिदान करण्याची प्रेरणाही वेद देतात, असे औरंगाबादेतील आर्य समाजाचे सरचिटणीस दयाराम बसैय्ये यांनी सांगितले.
मराठवाड्यात शेकडो गावांमध्ये आर्य समाज प्रतिनिधी सभेचे कामकाज नियमितपणे आजही चालते. हैदराबाद मुक्तीसंग्रामात आर्य समाज प्रतिनिधी सभेच्या सभासदांना मोलाचा सहभाग राहिला आहे. सभेच्या माध्यमातून वार्षिक कार्यक्रम निश्चित केले जातात आणि नंतर ते वर्षभर राबवले जातात. श्रावणात मानव निर्माण वेद प्रचार सप्ताह घेतला जातो. साहित्य प्रचार यात्रा वर्षातून एकदा काढण्यात येते. आंतरशालेय पातळीवर वक्तृत्त्व स्पर्धा, लेखन व निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जोपासण्यावर भर दिला जातो, असे बसैय्ये यांनी नमूद केले.
आर्य समाजात पंचमहायज्ञाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, अतिथि यज्ञ, बलि यत्र असे पंचमहायज्ञ दररोज केले जातात. हिंदूंचे सोळा संस्कारही आर्य समाजाने स्वीकारले आहेत. त्यांचे वेदकालीन साधे स्वरुप कायम ठेवले. चुकीच्या प्रथांना आर्य समाजाने विरोध करून त्यात सुधारणा घडवून आणण्याकरिता पुढाकार घेतला. निराकारी ईश्वराची उपासणा करणे, यज्ञाचे महत्त्व राखणे, पर्यावरण शुद्धीकरण असे विविध धार्मिक कार्यक्रम नियमितपणे आर्य समाज करत असतो. वैदिक साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाते. औरंगाबाद आर्य समाजतर्फे वेदांचे मराठीतून अनुवाद करण्यात आलेला आहे. दर रविवारी साप्ताहिक सत्संग चालतो. सांस्कृतिक जतन व समाजप्रबोधन हेच आर्य समाजाचा मुख्य उद्देश असल्याचे बसैय्ये यांनी सांगितले. उपेक्षित समाजाला प्रवाहात आणण्याचे कामही समाजातर्फे सातत्याने करण्यात येते. गोवंश हत्या रोखण्याकरिता या समाजाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. औरंगाबादेत आर्य समाज भवनाची उभारणी १९८४ मध्ये करण्यात आली. वेद प्रचाराचे काम प्रामुख्याने चालते. संग्रामसिंह चव्हाण यांनी आर्य समाज भवन उभारणीसाठी स्वतःची जागा दान स्वरुपात दिली होती. राजाबाजार येथील चव्हाण निवासात अनेक वर्षे आर्य समाजाचे काम चालत असे. संग्रामसिंह चव्हाण, पंडित ज्ञानेंद्र शर्मा, शालीग्राम बसैय्ये, हरिदासभाई भानुशाली, पंडित नरदेव स्नेही, किशनसिंह यादव यांचा आर्य समाजाचे मोठे कार्य केले असल्याचे बसैय्ये यांनी सांगितले. आर्य समाजाच्या सध्याच्या कार्यकारिणीत अध्यक्ष जुगलकिशोर दायमा, उपाध्यक्ष सविता जोशी, वसंत भानुशाली, सरचिटणीस दयाराम बसैय्ये, कोषाध्यक्ष जोगेंद्रसिंह चव्हाण, सभासद जनार्दन भडके, वृतदेव आर्य, डॉ. सुजाता करजगावकर, संगेवार आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते कामांची आयुक्तांकडून झाडाझडती

$
0
0


Unmesh.Deshpande
@timesgroup.com
औरंगाबाद : शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचा क्वालिटी रिपोर्ट विभागीय आयुक्तांनी मागवला आहे. क्वालिटी रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्टसह रस्त्याच्या कामावर झालेल्या खर्चाचा तपशील सादर करा, असे आदेश त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत विभागीय आयुक्त याविषयी झाडाझडती घेणार आहेत.
औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला आहे. महापालिकेची यंत्रणा ढिसाळ असल्यामुळे या निधीचा विनियोग करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीने पाच रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी चार रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. या रस्त्यांची कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. शिवाय कामाच्या दर्जाच्या बाबतीतही आनंदीआनंद आहे. नवे रस्ते जागोजागी उखडत आहेत. त्यावरील पेव्हर ब्लॉकदेखील तुटत आहेत. निधी उपलब्ध असताना रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत का होत नाहीत, असा सवाल विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना विचारला आहे. बकोरिया यांच्याबरोबर रस्त्यांच्या कामांबद्दल डॉ. दांगट यांनी बैठक घेतली. या बैठकीच्या संदर्भात 'मटा' शी बोलताना डॉ. दांगट म्हणाले, 'रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या कामांचा आतापर्यंतचा प्रोग्रेस रिपोर्ट, क्वालिटी रिपोर्ट, झालेल्या खर्चाचा तपशील, रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली थर्डपार्टी एजन्सी या बद्दलचा सविस्तर अहवाल घेऊन पुढील आठवड्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. हे सर्व अहवाल तपासले जातील. रस्त्यांच्या कामात गुणवत्ता कायम ठेवणे गरजेचे आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात पुढच्या आठवड्यात समज देऊ. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, निधीचा विन‌ियोग योग्य प्रकारे व्हावा यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. '
रस्ता खचण्याची शक्यता
शासनाच्या निधीतून ज्या रस्त्यांची कामे केली जात आहेत, त्या रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने महत्त्वपूर्ण मत नोंदवले आहे. रस्त्यांची कामे जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चरकडून केली जात आहेत. ही कामे करताना दोन्हीही बाजूचे शोल्डर्स भरण्यात आले नाहीत. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे. ड्रेनेज लाइन रस्त्याच्या बाजूने टाकायला हवी, पण प्रत्येक रस्त्याच्या खालून ड्रेनेज लाइन टाकण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीसाठी रस्त्याखालची ड्रेनेज लाइन भविष्यात त्रासदायक ठरणार आहे. रस्त्यांच्या क्युरिंगचा विषय आता मागे पडला आहे. क्युरिंगच्या कारणामुळे रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत, या भेगा कशा बुजवणार, हा देखील प्रश्न आहे. या संदर्भात महापालिकेच्या यंत्रणेने गांभीर्याने विचार केलेला नाही. रस्त्यांच्या कामांचा टेस्ट रिपोर्ट वेळच्या वेळी सादर होणे गरजेचे आहे. हा रिपोर्ट ठेकेदाराकडून सादर झाला की नाही, या बद्दल संशय आहे, अशा आशयाची निरीक्षणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने नोंदवली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहशतीला महिलांचे चोख उत्तर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोडवरील मुथ्थुटमध्ये शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास दरोडेखोरांनी दहशतीचा नंगानाच घातला. शाखा व्यवस्थापक रिना रेजी यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण सुरू केली. मात्र, कर्मचारी हिमा बाबू यांनी चलाखीने सायरन वाजविले आणि सगळ्यांची या जाचातून सुटका झाली.
दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना एका रांगेत उभे केले. त्यांना तिजोरी कुठे आहे याची विचारणा करणे सुरू केले. ही विचारपूस सुरू असताना मोठ्या चलाखीने रेजी यांनी सगळ्यांना गुंगारा देत पळ काढला. मात्र, दरोडेखोरांनी पाठलाग करत त्यांना पकडले. या झटापटीत रेजी यांचे कपडे फाटले. गळ्यातील साखळी तुटली. दरोडेखारांचा हा नंगा नाच सुरू असताना हिमा बाबू या महिला कर्मचाऱ्याने हिंमत दाखवत अलर्मचे बटन दाबले. त्यामुळे सायरनचा मोठा आवाज सुरू झाला. या आवाजाने परिसरातले नागरिक मदतीसाठी धावले. त्यामुळे दरोडेखोरांचे धाबे दणाणले. दरोड्याचा प्रयत्न फसल्याची जाणीव त्यांना झाली. इंटरनेट रूटर आणि सीपीयू सोबत घेत दरोडेखोर बाहेर पडले. त्यांची शेजारीच असलेल्या मोतीवाला वर्कशॉपमधील मदतीसाठी धावून आलेल्या दहा-पंधरा कर्मचाऱ्यांसोबत गाठ पडली. त्यांनी या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोतया पोलिस अधिकाऱ्यासह अन्य एका आरोपीने पिस्तूलचा धाक दाखवत जमावाला मागे हटवले. कारमध्ये बसून आरोपी क्रांतिचौकाच्या दिशेने पसार झाले. गुन्ह्यासाठी आरोपींनी वरणा कारचा वापर केला. दोन आरोपी शासकीय दूध डेअरी कार्यालयासमोर उभे होते. कार येताच ते दोन्ही आरोपी रस्ता ओलांडून मुथ्थुट फिनकॉपकडे आले. काही आरोपी कार्यालय गेले, तर काहीं कार सुरू ठेवून पसार होण्यासाठी सज्ज होते. आरोपींनी वापरलेल्या कारचा नंबर (एम. एच २० बी. सी १३५७) हा बनावट असून तो दशमेशनगर येथील एका रहिवाशाच्या सेंट्रो कारचा आहे. पोलिसांनी चौकशी केली असता ही गाडी सध्या पाथर्डी येथे त्यांच्या मुलाकडे असल्याचे स्पष्ट झाले.
सर्वत्र नाकाबंदी
दरोड्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, राहुल श्रीरामे, सहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटजे तपासण्यात आले. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांनी पळून जाताना कार क्रांतिचौकच्या दिशेने सुसाट वेगाने नेली. त्यानंतर सिल्लेखाना चौकाच्या दिशेने ते गेली असावेत अशी शक्यता आहे. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरॅचे फुटे तपासण्यात येत आहे.
अन् कोट्यवधींचे घबाड वाचले
दरोडा पडल्यास कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसाठी काय करावे, याचे प्रशिक्षण त्यांना कंपनीतर्फे देण्यात आले होते. त्या प्रशिक्षणाचा कर्मचाऱ्यांना फायदा झाला. त्यांनी मूळ केरळी भाषेत एकमेकांशी संवाद साधत संधी मिळताच मदतीसाठी अलार्म रिमोटचे बटण दाबले. सायरन सुरू होताच दरोडेखोरांची भंबेरी उडाली व त्यांनी पळ काढला. दरोड्यांची योजना यशस्वी झाली असती, तर कोट्यवधींचा ऐवज चोरीस गेला असता, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
आरोपींनी केली रेकी
आरोपींनी कार्यालय कधी उघडते, किती कर्मचारी आहेत, यांची सर्व माहिती रेकी करून मिळवली. त्यानुसारच नियोजन करून दरोड्याचा प्रयत्न केला असावा, अशी शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचा रंग नेमका कोणता, हे लक्षात येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी जालना रस्त्यावरून जाणाऱ्या एका गोल्डन ग्रे रंगाच्या कारला थांबवले. त्या कारचा रंग सीसीटीव्ही फुटेजमध्ये कसा दिसतो, त्यावरून आरोपींनी वापरेल्या कारच्या रंगाचा अंदाज बांधला. मुथ्थुट कार्यालयात मोठ्या प्रमाणात सोने, पैसा आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षेसाठी एकही सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्याचे समोर आले आहे. कंपनीने चार महिन्यांपूर्वीच सुरक्षा रक्षकांना कमी केल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ भिंत अखेर पाडली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाल्याचे पाणी औषधी भवनमधील दुकानांमध्ये शिरू नये यासाठी बांधलेली भिंत शनिवारी ब्रेकर लावून तोडण्यात आली. यामुळे दलालवाडी व गांधीनगरातील नागरिकांना दिलासा मिळाला. येत्या पावसाळ्यात त्यांच्या घरात यामुळे पाणी शिरणार नाही.
दलालवाडीच्या नाल्यावर औषधीभवनची इमारत उभी आहे. इमारतीच्या खाली नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. या गाळामुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह थांबतो. हे पाणी औषधीभनवच्या इमारतीमधील दुकानांमध्ये शिरते. त्यामुळे हा प्रवाह थांबवण्यासाठी औषधीभवनच्या व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वी औषधीभवनच्या इमारतीच्या बेसमेंटवर सिमेंट काँक्रिटची सुमारे सहा फूट उंचीची भिंत बांधली. या भिंतीमुळे नाल्यातील पाणी आडवले जायचे आणि हे पाणी दलालवाडी, गांधीनगरातील नागरिकांच्या घरात शिरायचे. ती भिंत पाडण्यासंदर्भात या भागातील नागरिकांनी अनेकवेळा महापालिकेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला, पण त्यात त्यांन यश आले नाही. शेवटी शुक्रवारी या भागातील नागरिकांनी पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व औषधीभवनसह नाल्यावरच्या इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली. औषधीभवनच्या बेसमेंटवर बांधलेली भिंत पाडा, अशी विनंतीही करण्यात आली. त्यामुळे शनिवारी ती भिंत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. ब्रेकरच्या सहाय्याने भिंत पाडण्यात आली. नाल्यातील पाण्याचा प्रवाह थांबवणारी भिंत पाडल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरणार नाही असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खडसे - मुंडेंची बंद दाराआड चर्चा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि विधानपरिषदेचे विरोधपक्षनेते धनंजय मुंडे यांची शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास सुभेदारी विश्रामगृहावर पंधरा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत खुसखुशीत चर्चा रंगली.
खडसे यांचा स्वयंघोषित स्वीय सहायक गजानन पाटील याने एका जमिनीच्या कामासाठी ३० कोटींची लाच मागितल्याचे प्रकरण सध्या भलतेच चर्चेत आहे. या प्रकरणी पाटील याला पोलिसांनी अटकही केली आहे. या घटनेनंतर खडसे आज सायंकाळी शहरात होते. त्यांचा सुभेदारी विश्रामगृहातल्या गोदावरी दालनात मुक्काम होता. दरम्यान, उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दुष्काळी परिषदेच्या निमित्ताने धनंजय मुंडेही औरंगाबादमध्ये आहेत. त्यांचा सुभेदारी विश्रामगृहावरल्या मांजरा दालनात मुक्काम होता. रात्री नऊच्या सुमारास आल्यानंतर खडसे फ्रेश झाले. तेव्हा मुंडे यांनी सहाय्यकांकरवी त्यांच्या भेटीची वेळ घेतली. पावणे दहाच्या सुमारास मुंडे खडसे यांना भेटायला गेले. सुमारे पंधरा मिनिटे त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते. या चर्चेबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, 'ही काही राजकीय भेट नाही. सहज भेट होती. ते मला भेटायला आले. मीही विरोधीपक्षनेता असताना विलासरावांना भेटायला जायचो. त्याचा अर्थ तुम्ही काढू नये.'
खडसे म्हणजे टीआरपी
खडसे यांना स्वयंघोषित स्वीय सहायक पाटील बाबत विचारले असता ते म्हणाले, 'त्या जमिनीची किंमत पाच कोटी असेल, तर समोरची व्यक्ती ३० कोटी लाच कशी देऊ शकेल. ते तुम्ही पाहा...' असा उलट प्रश्न त्यांनी केला. 'हे आरोप बिनबुडाचे आहेत. खडसे माध्यमासाठी टीआरपी आहेत. त्यामुळे ही चर्चा जास्त रंगली,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर रेल्वे स्टेशनवर पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी अवस्था सध्या लातूरच्या रेल्वे कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यांच्या समोर दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरकरांसाठी येते. परंतु, रेल्वे स्टेशनच्या परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी मात्र, रेल्वेला स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागली आहे.

रेल्वे स्थानक परिसरात पाण्याची मोठी गरज आहे. स्टेशनवर प्रवाशांसाठी लागणारे पाणी, कर्मचाऱ्यांसाठी लागणारे पाणी हे वेगळे आहे. त्यासाठी सध्या रल्वे प्रशासनाने स्वत:च्या व्यवस्थेतून खासगी बोअर मालकांकडून टँकर विकत घेतले जात आहेत. त्याच प्रमाणे या परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ६० निवासस्थानासाठी सुद्धा पाणी विकत घेतले जात आहे. गेल्या आठवड्यापासून बोअर कोरडे पडल्यामुळे पाण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी फिरून टँकर मिळेल का यासाठी प्रयत्न करून कर्मचाऱ्यांच्या घरी पाणी देण्याची व्यवस्था करीत असल्याचे सांगून अभियंते दीपक सिंग म्हणाले, 'आम्ही खासदारांकडे, प्रशासनाला रितसर पत्रव्यवहार केला आहे. कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही प्रत्येक कुटुंबासाठी एक जार दररोज देत आहोत.'

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवाजी नरहरे म्हणाले, 'ज्या रेल्वेनी लातूरकरांसाठी तातडीने तोंडी आदेशावर पाणी पुरवठा सुरू केला. दररोज नित्यनियमाने वेळेत पाणी पुरवठा केला जात आहे. त्याच विभागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याच काम स्थानिक प्रशासनाने केल्याची शरमेची बाब आहे. रेल्वेला लागणारा पाणीपुरवठा होत असलेले बोअर कोरडे पडल्यामुळे रेल्वेच्या स्वच्छतेचा ही प्रश्न निर्माण झाल्याचे सांगुन नरहरे म्हणाले, 'खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दररोज पाच टँकर पाण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे खासदारांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्याच दिवशी पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. परंतु, अद्यापही महापालिकेने एक ही टँकर त्यांना पाठवलेला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनीही महापालिकेत अर्ज विनंत्या केल्या आहेत. त्यांनाही पालिकेतील अधिकाऱ्यांनी दादा लागू दिलेली नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा असंतोष आहे.'

या बाबत महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'रेल्वे स्थानक हे शहराच्या बाहेर आहे. तरी सुद्धा पाणी देता येऊ शकते. परंतु, या बाबत माझ्यापर्यंत कोणतीच ही बाब आली नाही. कम्युनिकेशन गॅपमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मीच आता या संबंधीचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पिण्यासाठी आणि वापरासाठी, रेल्वे प्रवाशांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी किती पाणी दररोज लागते याची माहिती घेऊन तातडीने व्यवस्था करणार आहे. सध्या दोन टँकर चालू आहेत. रेल्वे प्रशासनाची मागणी पाच टँकरची आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी तलवारीची धार दाखवा: नीलेश राणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्रात मराठा बहुसंख्य आहेत. आपण जर एकत्र येऊन ताकद दाखविली तर विधानसभेवर आपलाच झेंडा फडकेल, पण आपण जागरूक नसल्याने आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. आता घरात न बसता रस्त्यावर आले पाहिजे. रस्त्यावर उतरून आंदोलन करा, आपल्या तलवारीची धार दाखवून द्या,' असे आवाहन आमदार नीलेश राणे यांनी शनिवारी येथे केले.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा आरक्षण महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रदीप साळुंके, किशोर चव्हाण, माजी नगरसेवक अभिजित देशमुख, अभय चिकटगावकर, सुरेश वाकडे, सरोज मसलगे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. राणे म्हणाले, 'शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवसेना सत्तेवर आली, पण महापुरुषांचा मानसन्मान करणे ते सोयीस्करपणे विसरले. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची देखभाल करण्यासाठीही सरकारने दुर्लक्ष केले. त्यांना जमणार नसेल तर आम्ही देखभाल करण्यास सक्षम आहोत. मराठा समाज राज्यात ३२ टक्के आहे, पण आपल्यामध्ये जागृती नाही. सर्वपक्षीय १४५ आमदार मराठा आहेत. आपण जर एकत्र आलो तर राज्यात फक्त आपलीच सत्ता असेल. आपल्या मतावर निवडून आलेले शिवसेना - भाजपचे आमदार मराठा आरक्षणाबाबत काय करत आहेत ? असा सवाल उपस्थित करा. त्यांना धारेवर धरा. मराठा तरुणांना तुम्ही न्याय देणार की नाही याचा जाब विचारा, आमच्या मतावर निवडून आलेल्या आमदारकीचा योग्य वापर करत नसाल तर खुर्च्या रिकाम्या करा, तुम्ही गप्प बसू नका. आपण त्वेषाने लढण्यासाठी उठत नाहीत ही शोकांतिका आहे,' अशी खंत राणे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना तरुणपणाचा अहंकारःचव्हाण

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

'दुष्काळासारखा गंभीर प्रश्न हाताळताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजिबात गंभीर नाहीत. विरोधीपक्षातील मंडळींवर विश्वास नाही. सरकारी यंत्रणेबद्दल साशंकता बाळगली जाते. शेतकरी फसवणूक करतात, असे त्यांचा समज आहे. निर्णय घेताना पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगला जातो. मुख्यमंत्र्यांची मानसिकता योग्य नाही. त्यांना दुसरे लोक योग्य काम करत नाहीत, असे वाटते. कदाचित त्यांना तरुणपणाचा अहंकार आहे,' असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना केला.

चव्हाण राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भरभरून बोलले. ते म्हणाले, 'दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य जाणून सरकारने झटपट निर्णय घ्यायला हवे होते. आमच्या सरकारने पाच वर्षांत दोनदा दुष्काळाचा सामना केला. आम्ही दर मंगळवारी उपसमितीची बैठक घेत असू. मंत्रिमंडळाची आठवड्याची बैठक दुष्काळाच्या चर्चेची असायची. घेतलेल्या निर्णयाचे तातडीने दुसऱ्या दिवशी अध्यादेश काढले जात होते. आम्ही दुष्काळी कामात कुठेही काटकसर केली नाही. कारण हा सर्वसामान्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. हे सरकार निधी वाटपात कंजुषी करत आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लातूर, बीड, उस्मानाबादच्या जनावर छावण्या बंद करण्याचा आदेश दिला होता. ही कुठली मानसिकता आहे हेच कळत नाही. या सरकारचे बहुतांश मंत्री शहरी असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील अडचणींची जाण नाही. त्याचा फटका जनतेला बसत आहे,' असा आरोप त्यांनी केला.

'दुष्काळी उपाययोजनांचे निर्णय तातडीने घेतले पाहिजे. मुख्यमंत्री हे लक्षातच घेत नाहीत. एकदा काही डोक्यात घेतले की ते सोडत नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने बँकांना फायदा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. सातबारा कोरा नसेल तर बँका कर्ज कशा देतील ? सरकारी यंत्रणेबद्दल मुख्यमंत्र्यांना गैरविश्वास आहे. अधिकारी कामचुकार असल्याचे त्यांचे मत आहे. आधी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, मग राजकारण. बहुतांश सहकारी बँका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत, म्हणून पूर्वग्रह ठेवून काही निर्णय घेतले जातात. हे चुकीचे आहे. राज्याचे धोरण किंवा महत्वाचे निर्णय मुंबईत बसूनच घ्यावे लागतात. मुख्यमंत्री मात्र आठवड्याला नागपूरला पळतात आणि तिथे घोषणा करतात. मिहानमध्ये गेल्या दीड वर्षांत एकही नवीन प्रकल्प आलेला नाही. याला कोण जबाबदार आहे. ऑगस्टा वेस्टलॅँडप्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे सर्वप्रथम आमच्याच सरकारने मान्य केले होते. मगच ते कंत्राट रद्द केले. या प्रकरणात कोर्टानेही निकाल दिला होता. त्यावेळी मोदी सरकारच सत्तेवर होते. मग या प्रकरणात दोन वर्षांत त्यांनी काय केले? असा प्रश्न आहे. उलट ऑगस्टा प्रकरणात संशयाची सुई त्यांच्याकडेच जाते,' असा टोला त्यांनी लगाविला.

खडसेंना मुख्यमंत्री व्हायचंय

सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार यशस्वी होऊ नये, असे त्यांना वाटत असते. परिणामी निर्णयाची अंमलबजावणी होण्याबाबत अडचणी आहेत. त्यामुळे यंत्रणाही संभ्रमात सापडली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ चव्हाणांपेक्षा ‘हे’ चव्हाण लोकप्रिय

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद : काँग्रेसमध्ये वरिष्ठ राजकीय नेता आला की, त्याच्या स्वागतासाठी गर्दी होत असते. दिल्ली, मुंबईहून येणाऱ्या नेत्याच्या भेटीसाठी गर्दी होताना गटातटाचे दर्शन घडते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा म्हणावा असा गट औरंगाबादेत नाही, पण शुक्रवारी त्यांच्या दौऱ्यादरम्यान प्रथमच प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीसाठी होणाऱ्या गर्दीपेक्षा शुक्रवारी पृथ्वीराज बाबांसाठी झालेली गर्दी पाहता 'त्या' चव्हाणांपेक्षा 'हे' चव्हाण अधिक लोकप्रिय झाल्याचे दिसून आले.

प्रदेश काँग्रेसने राज्यातील वरिष्ठ नेत्यांना मराठवाड्यातील दुष्काळी आढावा दौऱ्यासाठी पाठविले होते. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते नेमून दिलेल्या जिल्ह्यात जात आहेत. दोन दिवस बीड जिल्ह्याचा दौरा करून पृथ्वीराज बाबा शुक्रवारी सायंकाळी औरंगाबादेत आले. सुभेदारी विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद होती.

काँग्रेस कार्यकर्ते दुपारी चारपासूनच सुभेदारीवर जमले होते. ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांसह युवक काँग्रेसची मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होती. चव्हाणांना पोचण्यास अर्धा तास उशीर झाला. तोवर सुभेदारीचा मुख्य हॉल गर्दीने भरला होता. महिला पदाधिकारीही स्वागतासाठी उपस्थित होत्या. एरव्ही प्रदेशाध्यक्ष चव्हाण येणार म्हटल्यानंतर गर्दी दिसायची. पूर्वी विलासरावांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असे. गेल्या दीड-दोन वर्षांत हे चित्र थोडे बदलले होते, पण कालच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या दौऱ्यात मात्र माजी मुख्यमंत्र्यांची पक्षांतर्गत लोकप्रियता वाढीस लागल्याचे दिसून आले. राज्याचा कारभार अत्यंत संयमाने हाताळताना पक्षातील गटातटांना तेवढ्याच कौशल्याने हाताळण्याचे तंत्र अवगत असलेल्या पृथ्वीराज बाबांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीची चर्चा स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images