Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मुकुंदवाडीत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकंदवाडी वार्ड कचराकुंडीमुक्त करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वार्ड क्रमांक ८३ मुकुंदवाडीतील शिवाजी कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक रामचंद्र नरोटे, सफाई कर्मचारी, सिव्हिक रिस्पॉन्स टीमचे सदस्य उपस्थित होते.
मुकुंदवाडीत जानेवारीपासून घनकचरा वर्गीकरणाचे काम सुरू आहे. एका महिन्यापूर्वी जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांची मेहनत बघून हळूहळू लोकप्रतिनिधी व तरुणही या कामात मदत करू लागले, पण पोलिस कॉलनी, देव‌गिरी कॉलनी, मनपा दवाखाना, शिवाजी कॉलनी, ए-वन हॉटेल या परिसरात मोठ्या कचराकुंड्या व छोटे ट्रक (स्कीपलोडर)बाहेरुन कचरा ओसंडून वाहायचा. या कचराकुंड्या हटवण्यात सफाई कर्मचाऱ्यांना यश आले. या कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमास नगरसेवक रामचंद्र नरोटे, रामभाऊ ठुबे, किसन ठुबे, नामदेव राते, ज्ञानेश्वर शिंदे, जगदीश गायकवाड, बबन जगताप, संतोष शिंदे, गणेश खोतकर, मनोहर जगताप आदी उपस्थित होते. यावेळी जवान शिवसांब काळे, भीमराव वाघ, कांताबाई खंडागळे, लक्ष्मीबाई सोनवणे आदींसह सिव्हिक रिसॉन्स टीमचे संतोष गायकवाड आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुण, तरुणींना हवा क‌रिअर ओरिएंटेड जोडीदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आम्हाला क‌‌रिअर ओरिएंटेड जोडीदार हवा,' असा सूर गुजराती समाजातील विवाहेच्छुक तरुण-तरुणींचा होता. गुजराती समाज मॅरेज ब्युरोतर्फे रविवारी आयोजित युवक-युवती परिचय मेळाव्यात नव्या पिढीच्या या अपेक्षांना ज्येष्ठांनीही साद दिली.
पानदरिब्यातील अग्रेसन भवन येथे माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. व्यासपीठावर संयोजक लालदासभाई जव्हेरी, वालजीभाई पटेल, चंदूभाई दौलताबादकर, दिलीप शहा, दिलीप गांधी, राकेश जोशी, डॉ. नूतन शहा आदी उपस्थित होते. समाजाची एकजूट समोर ठेवून घेऊन २००२पासून लालदासभाई जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात येतो. काळानुरूप बदल करत गुजराती समाजातील साडेबारा जातींमध्ये आता आपसात लग्न लावण्याची परंपरा सुरू झाल्याने या मेळाव्यासही संपूर्ण समाज आला होता. राज्यासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून युवक-युवती आल्या होत्या. यंदा १ हजारांपर्यंत नोंदणी झाली. यामध्ये घटस्फोटित, विधवा, विदूर यांचाही समावेश होता. उमेदवारांची माहिती व फोटो असलेली पुस्तिकाही देण्यात आली. उषाबेन सुखिया यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मीकांत शहा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश शहा, मुकेश घोडा, मनोज टोपीवाला आदी उपस्थित होते.
इतर समाजाप्रमाणे गुजराती समाजातही मुलींचे प्रमाण कमी आहे. मेळाव्यात झालेल्या नोंदणीमध्ये मुलांची संख्या जवळपास ७००, तर मुलींची ३००च्या आसपास होती. याविषयी समाजातील ज्येष्ठ सदस्य दिलीप शहा म्हणाले की, गुजराती समाजात आजही मुलांना पिढीजात व्यवसाय करावे लागतात. यामुळे बहुतांश मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळत नाही, पण मुली उच्चविद्याविभू‌षित आहेत. साहजिकच मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणूनच मुला-मुलींमधले शैक्षणिक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

१४ वर्षांपूर्वी आम्ही सुरुवात केली तेव्हा पोस्टाने फॉर्म पाठवून समाजाला माहिती द्यायचो. आज मात्र सोशल मीडियाद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवली. समाजहिताच्या दृष्टिकोनातून म्हणून हा मेळावा घेतो. बदल स्वीकारत नव्या पिढीला सोबत घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्व अपेक्षा पूर्ण करणारे स्थळ मिळणे अवघड होते, पण आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- लालदासभाई जव्हेरी, संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३९१ गावांना रेडकार्ड जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हा हा मुलींसाठी धोकादायक झाला असून, जिल्ह्यातील ३९१ गावे या दृष्टीने धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील आठ पैकी चार तालुक्यांनाही रेड कार्ड देण्यात आले असून, कळंब तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर हा सर्वात कमी आहे. तर तुळजापूर तालुक्यातील ७६ गावांमध्ये मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे. गर्भात मुलीच्या होणाऱ्या हत्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून, गर्भपातासंदर्भातील कुठलीही आकडेवारी प्रशासनातील आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यात मुलीचा जन्मदर घटतोय, ही चिंतेची बाब आहे. 'बेटी बचाओ - बेटी पढओ' या शासन उपक्रमाकडे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ६१८ गावांची माहिती जिल्हास्तरीय (प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान चाचणी कायदा) 'पीसीपीएनडीटी' समितीने एकत्रित करून ३९१ गावांना रेड कार्ड जारी केले असून, जिल्ह्यातील आठ पैकी तुळजापूर, परंडा, वाशी व कळंब या चार तालुक्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील सर्वाधिक ७६ गावे ही मुलीच्या जन्मासाठी धोकादायक म्हणून घोषित केली आहेत. याच बरोबर उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचे प्रमाण कमी होवून हजार मुलांमागे ८९२ मुलींची संख्या आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील १९ हजार ९१८ प्रसुतींची माहिती एकत्रित करून ही आकडेवारी जाहीर केली असून, यामध्ये तुळजापूर, तालुक्यात मुलींचे प्रमाण ८७५, कळंब ७९१, वाशी ८४८, परांडा ८९६, उस्मानाबाद ९४२, लोहारा ९०६, भूम ९३३ आणि उमरगा ९४५ इतके आहे.
जिल्ह्यात मुलींच्या लिंग गुणोत्तर प्रमाणाबाबत इतकी बिकट स्थिती असून, गर्भपाताबाबत बरीचशी आकडेवारी ही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. टेलीमेडीसीनसह अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांचे घोषणा करून राजकीय भांडवल करणाऱ्या शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील हे भीषण वास्तवसमोर आले असतानाही डॉ. सावंत हे मौन वाळगून आहेत.
सत्तेत राहून भाजपच्या मंत्र्यावर टीकेची झोड उठविणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आरोग्य मंत्र्यासह सेनेच्या अन्य मंत्र्यांचे काय कामाचे रिपोर्टकार्ड तपासून आत्मचिंतन करणार काम, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे ते मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ही स्थिती पाहता मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी २४ मे पासून शेम या नावाने मोहीम हाती घेण्याची घोषणा जिल्ह्याधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली असून, प्रत्येक गावात मुलींच्या प्रमाणाचे बोर्ड लावून, त्याकडे जनतेचे लक्ष वेधण्यात येणार आहे. याचबरोबर तालुका व ग्रामपातळीवर दक्षता पथक, जनजागृतीचे कार्यक्रम, सोनोग्राफी केंद्रावर धाडी, गर्भपाताची कारणे यांचा शोध घेवून वर्षभर बेटी बचाओच्या हेतुने उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पीसीपीएनडीटीच्या बैठकीत अनेक संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. उपस्थित अधिकाऱ्यांकडे या संदर्भाने पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी त्यांची खरडपट्टी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल मिरची झाली ‌‘तिखट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उन्हाळा म्हटले की, लाल मिरचीचा खकारा आणि देठ खुडणे, तिखट करणे हे ठरलेलेच असते. घरगुती मसाले तयार करण्यासाठी लाल मिरची खरेदी या काळात उत्तम मानली जाते. यावर्षी मिरची खरेदी 'तिखट' झाली आहे. सर्व प्रकारच्या लाल मिरचा किलोमागे साधारण ४० ते ५० रुपयांनी महागल्या आहेत.
लाल मिरच्यांमध्ये गुंटूर, धर्माबादी, नांदेडी, लवंगी, नंदुरबारी मिरच्या अादी प्रकार बाजारात आले आहेत. यंदा या सर्व मिरच्यांचे दर वाढले आहे. लाल मिरचीची आवक उत्तम आहे. औरंगाबाद कृषी उत्तन्न बाजार समितीत व औरंगपुरा परिसरात लाल मिरचीची आवक सर्वसाधारणपणे एप्र‌िल व मे महिन्यात अधिक होते, असे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची व्यापारी प्रभाकरराव पवार यांनी सांगितले.
किरकोळ बाजारात मिरची १७५ ते २२० रुपये किलो या दराने विकली जात आहे. लाल मिरचीत गुंटूर मिरची १७५ रुपये किलो, लवंगी मिरची १८५ ते १९० रुपये, नंदुरबारी लवंगी मिरची २०० ते २१० रुपये तर, धर्माबादी मिरची यंदा १८० ते १८५ रुपये किलो या दराने विकली जात आहे, असे सिडकोतील व्यापारी ‌जनार्दन जाधव यांनी सांगितले.

लाल मिरची खुडणे, देठ काढण्याचे दर वाढले
दररोज सुकलेल्या मिरच्या बाजारात येत असताना त्या खुडणे आणि देठ काढणे अपेक्षित असते. लाल मिरची खुडणे किंवा देठ काढण्याचे दर यंदा वाढले आहेत. दररोज १०० ते १२५ महिला या कामाला लागलेल्या आहेत. वृद्ध महिला, पुरुष यांचाही यात समावेश आहे. उन्हाळी सुट्या लागल्याने अनेक कुटुंब मिरच्यांची देठ काढण्याची कामे करातत. त्याचे दर साधारण ५० ते १०० रुपये पोते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन परिसरात चार डिटोनेटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीच्या परिसरात रविवारी रात्री चार डिटोनेटर सापडल्याने खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांच्या बाँबशोधक पथकाने हा परिसर पिंजून काढला. हे डिटोनेटर विहिरीच्या कामासाठी वापरण्यात येतात. या प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीच्या बाहेर रविवारी साडेआठच्या सुमारस भीक मागणाऱ्या एका मुलाच्या हातात शनिमंदिराजवळ पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळून आली. ही वस्तू डिटोनेटर असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बाँबशोधक पथकाशी संपर्क साधला. काही वेळातच पथक स्टेशनवर दाखल झाले. त्यांनी ही वस्तू डिटोनेटर असल्याची खात्री केली आणि परिसरात श्वानपथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी स्टेशनच्या नव्या इमारतीच्या एका खिडकीजवळ आणखी तीन डिटोनेटर आढळले. या प्रकाराची माहिती मिळताच सहायक आयुक्त बाहेती घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकही पोहोचले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस चौकीत गुन्हा नोंदविण्यात आला. बाँबशोधक पथकात सुशील जुंबडे, एकनाथ गरड, दायमा, नवनाथ वाळके यांचा समावेश होता.
रेल्वे सुरक्षा दल अनभिज्ञ
रेल्वे स्टेशन परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलालकडे असते. या प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याला विचारले असता, बाँब स्क्वॉडची ही कारवाई रुटीन असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हरेस्टवीर रफिक शेखला हिमदंश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादचा पहिला एव्हरेस्टवीर पोलिस कॉन्स्टेबल शेख रफिकला हिमदंश झाला आहे. काठमांडू येथून त्याला नवी दिल्ली येथील लष्कराच्या हॉस्टिपलमध्ये उपचारासाठी आणण्यात येणार आहे. पायाच्या बोटांना हिमदंशाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिस दलातील पहिला एव्हरेस्टवीर होण्याचा बहुमान शेख रफिकने १९ मे रोजी सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी एव्हरेस्ट शिखर (८८४८ मीटर उंची) सर करून मिळविला होता. एव्हरेस्ट शिखर चढताना उणे ४५पेक्षा कमी तापमान असल्याने त्याच्या पायाच्या बोटाला हिमदंश झाला. त्याच्यावर काठमांडूत प्राथमिक उपचार करण्यात आले. नवी दिल्ली येथील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये रफिकला उपचारासाठी आणण्यात येणार आहे. एव्हरेस्ट शिखरवर अखेरच्या टप्प्यात रफिकला गोठून टाकणाऱ्या हवामानाचा त्रास जाणवायला लागला. अंगावरील बर्फ थिजून गेल्यामुळे त्याला चिंता वाटत होती. पायाच्या बोटांना त्याचा अधिक त्रास झाला.

अशा प्रकारच्या त्रासाला हिमदंश झाला, असे म्हटले जाते. त्यामुळेच त्याला काठमांडूला हेलिकॉप्टरने हलवण्यात आले. त्याची प्रकृती उत्तम असून, हिमदंशाचा कोणताही धोका त्याला झालेला नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

पोलिसांची टीम रवाना

पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी हे रफिकच्या संपर्कात असून, त्यांनीही रफिकची विचारपूस करून ग्रामीण पोलिस विभागाची एक टीम नवी दिल्ली येथे तातडीने पाठवली आहे. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित बडे, कॉन्स्टेबल वाल्मिक निकम आणि रफिकचा भाऊ यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवना-टाकळीने गाठला प्रथमच तळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख सिंचन प्रकल्प व कन्नड तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना-टाकळी प्रकल्प नऊ वर्षाच्या कालावधीत कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.
यापूर्वी २०१३ मध्ये या धरणातील पाणीसाठा जोत्याच्या खाली आला होता. परंतु, धरण रिते झाले नव्हते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केसापूर, अंतापूर, आलापूर, जैतापूर व हतनूर या गावातील ३१७.३६ चौरस हेक्टर जमीन येत असून ५६.४० किलोमीटरच्या उजव्या कालव्यातून ४६०० हेक्टर तर, १०.५६ किलोमीटरच्या डाव्या कालव्यातून २७०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. २००६, २००७ व २०१० मध्ये प्रकल्प पूर्ण क्षमतने भरला होता. यंदा ऑक्टोबरमध्ये सरासरी ७ द.ल.घ.मी. एवढा (सुमारे २० टक्के) पाणीसाठा होता. बाष्पीभवन व पाणलोट क्षेत्रातील काही गावाच्या भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा झाल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. सद्यस्थितीत वेगवेगळ्या क्लुपत्या वापरून सर्रास पाणीउपसा सुरू आहे. त्यामुळे शिवना-टाकळी प्रकल्पाने नऊ वर्षाच्या कालावधीत प्रथमच तळ गाठला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’साठी २५ लाखांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जलयुक्त शिवार प्रकल्पसाठी शासनाने २५ लाख रुपयांची मदत केली आहे. प्रशासनाने विद्यापीठ परिसराचे भूशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यानंतर परिसरातील बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे सुरू केली आहे.

विद्यापीठाला दरवर्षी पाणी टंचाई भेडसावते. चहुबाजूंनी डोंगर असलेल्या विद्यापीठाने पावासाचा प्रत्येक थेंब साठवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदा जलयुक्त प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत विद्यापीठातील ४२ विहिरींचे गाळ काढणे, बंधाऱ्यांचे साठवण क्षमता वाढविणे, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण करून पाणी विहिरींसह बंधाऱ्यात सोडणे; तसेच बांधावर वृक्षलागवड करणे असा हा प्रकल्प आहे. त्यानुसार खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री मदत निधीतून या प्रकल्पाला २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी यासंदर्भातील पत्र विद्यापीठाला दिले आहे. कोणत्या कामासाठी निधी दिला हे सांगताना काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी खोल चर खोदणे व त्यावर वृक्षलागवड करणे, सिमेंट बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढविणे आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

दोन कोटींची मागणी : विद्यापीठाने आपल्या परिसरात जलयुक्त शिवार प्रकल्पसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. यासंदर्भातील प्रस्तावही विद्यापीठाकडून देण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाचा परिसर ७०० एकरचा आहे. परिसरात प्राचिन ७२ विहिरी आहेत. त्यातील ४२ विहिरींचे खोलीकरण करून पुर्नभरण केले जाणार आहे. त्यासह बंधारे, नाले सफाई, खोलीकरणासाठी मोठा निधी लागणार आहे. या कामांसाठी सरकारने दोन कोटी रुपये शासनाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठासह परिसरातील विविध भागांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्या-त्या भागातील विहिरी, बोअरचे पाणी मिळेल, असा दावा विद्यापीठाने केला आहे. सध्या जलयुक्त प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत इतिहास विभागाच्या वस्तू संग्रहालयासमोरील परिसर, वनस्पत्योद्यानासामोरील नाला, मुख्य प्रशासकीय इमारत व विद्यार्थी कल्याण विभागासमोरील नाल्यांची कामे करण्यात आली आहेत.

शासनाकडून या प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची मदत मिळाली, ही विद्यापीठासाठी चांगली बाब आहे. स्वयंसेवी संस्थाही मदतीला पुढे आल्या असून, प्रकल्पामुळे पाण्याबाबत विद्यापीठ स्वावलंबी होईल. लगत असलेल्या परिसरालाही प्रकल्पाचा फायदा होईल.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हतनूरमध्ये प्रथमच पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
उन्हाची दाहकता, मोठ्या प्रमाणावर कमी होणारी विहिरींचा पाणीपातळी यामुळे तालुक्यातील हतनूर येथील गावकऱ्यांवर प्रथमच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावात सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत असून २६ लाख ९१ हजार रुपयांची तातडीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होण्याची गरज आहे.
हतनूरमध्ये एक लाख व ५० हजार लिटर क्षमतेचे प्रत्येकी दोन, असे चार जलकुंभ व चार ठिकाणी थेट पंपाच्या साह्याने पाणीपुरवठा करण्यात येतो. लोकसंख्या वाढून सुद्धा सद्यस्थितीत २५ वर्ष जुन्या योजनेवरच भार आहे. नवीन योजनेसाठी प्रयत्न झाले नसल्याने सध्या ग्रामस्थांवर पाणीटंचाईच्या सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतच्या ताब्यातील शिवना नदीतील विहीर धरणाच्या बुडित क्षेत्रात गेल्याने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने प्रयत्न करून सुद्धा लघु पाटबंधारे विभागाने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही. गावाची तहान भागविण्यासाठी पी. एन. शहरवाले यांच्या विहिरींवरून सुमारे सहा ते सात वर्षांपासून मोफत पाणीपुरवठा होत होता. विहिरींचे पाणी आटल्याने पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला. त्यातच भर म्हणून दोन दिवसांपूर्वीच अर्ध्या गावाला पिण्यासाठी पाणी पुरवणारा हातपंप नादुरुस्त झाल्याने टंचाई भर पडली आहे. हा पंप दोन दिवसात दुरुस्त करण्याचे आश्वासन पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून मिळाले आहे. ग्रामपंचायतीकडून हतनूर शिवारातील गट क्र.६३ मधील बुडित क्षेत्रातील विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. या विहिरीत इतर शेतकऱ्यांनी कृषी पंप टाकल्याने गावासाठीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने दुसऱ्या विहिरीचा शोध सुरू केला आहे. अधिग्रहणासाठी विहिरी उपलब्ध असून सुद्धा बागायतदार व धनदांडग्या शेतकऱ्यांचे हित जपण्याचे काम प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहे.
विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी शासनाच्या पाणपुरवठा व स्वच्छता विभगाकडे तातडीची पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २६ लाख ९१हजार रुपयांच्या प्रस्ताव सादर केला होता. शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या सचिवस्तरीय स्थायी समितीच्या बैठकीत ४ मे २०१६ च्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. ही तातडीची योजना निविदा प्रक्रियेत आहे.

ग्रामसेवकाचे दुर्लक्ष
गावातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याने त्यांच्या पद्धतीने वितरण होत आहे. ग्रामविकास अधिकारी औरंगाबाद येथून ये-जा करत असल्याने त्यांचे टंचाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याच्या समान वितरणाला खो बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवार कामांची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील गणोरी येथे कृषी विभागामार्फत चालू असलेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहाणी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप यानी बुधवारी केली. अपूर्ण काम पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
गणोरी शिवारातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. शासकीय योजनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो की नाही याची सानप यांनी गणोरी परिसरात अचानक भेट देऊन पाहाणी केली. कृषी विभागाकडून तयार केलेले सहा शेततळे, दोन माती नालाबांध, जलसंधारण विभागामार्फत करण्यात आलेल्या सिमेंट नालाबांधाची पाहणी केली. गणेशपूर शेतवस्ती ते जामकूद काळेवस्ती या रस्त्याचे एस्टिमेट दाखल करावे, वन विभागाचे समपातळी बांधाचे काम त्वरित करावे, या सूचना त्यांनी दिल्या. लोकसहभागातून तलावातून गाळ काढण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी एस. जी. नरके, कृषी पर्यवेक्षक एस. व्ही. खडके, कृषी सहायक एच. एस. पाटील, शाखा अभियंता कुलकर्णी, लघुपाटबंधारे तांत्रिक सहायक दुधे, प्रभारी नायब तहसीलदार चौधरी, तलाठी तनुजा जगताप, गणोरीचे उपसरपंच बाळासाहेब तांदळे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वखर्चाने भागवतात नागरिकांची तृष्णा

$
0
0

औरंगाबाद : कडक रखरखीत उन्हाळा, तहानेने जीव व्याकूळ झालेला आणि अचानक समोर थंड पाण्याचे जार दिसल्यास होणारा आनंद वेगळाच असतो. नूतन कॉलनी भागातील वसीमभाई नागरिकांना अशाच प्रकारचे जारमधील पाणी स्वखर्चाने उपलब्ध करून देत आहेत.
सय्यद वसीम अली झैदी यांचा व्यवसाय आठवडी बाजार करण्याचा आहे; तसेच नूतन कॉलनीत त्यांचे कुरिअरचे दुकान आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांना पाण्याचे जार मागवावे लागत होते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पाहून कर्मचाऱ्यांसोबतच अन्य नागरिकांसाठीही पिण्याची पाण्याची सोय करावी, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. या संकल्पनेला त्यांनी तात्काळ मूर्त रूप दिले. दुकानाबाहेर दररोज थंड पाण्याचे जार लावण्यात आले. दररोज १५ ते २० जार त्यांना लागतात. त्यांनी हा उपक्रम स्वखर्चाने सुरू केला आहे. या पाण्याचा वापर कोणी हात-तोंड धुतल्यास वसीमभाई त्यांना खडेबोल सुनावतात. या भागात एकही पाणपोई नसल्याने वसीभाईने केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांची तृष्णा भागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचोली नकीबमध्ये जलफेरभरणची कामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील चिंचोली नकीब येथे नाम फाउंडेशन व लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी नदी, नाले खोलीकरण व सरळीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
चिंचोली नकीब गावाला अत्यंत तीव्र पाणीटंचाई आहे. या गावात तालुक्यात सर्वप्रथम टँकर सुरू झाले. येथे डिसेंबरपासून टँकर सुरू असल्याने ग्रामस्थांना एकवटून गावालगतचे नदी, नाले खोलीकरण कामाला शनिवारपासून सुरुवात केली. या कामासाठी नाम फाउंडेशनने एक पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलकरिता ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली आहे. गावाजवळील दोन सिमेंट बांध, नदीचे जवळपास दीड किलोमीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले असून उर्वरित नाले खोलीकरण सुरू असल्याचे उपसरपंच कैलास जंगले यांनी सांगितले. या कामासाठी कैलास जंगले, राजू वाडेकर, सुरेश वाडेकर, विष्णू जंगले, भाऊसाहेब जंगले, पुंडलिक जंगले, मिनाज शहा यांनी नाम फाउंडेशनकडे सतत पाठपुरावा करून गावात पोकलेन मशीन उपलब्ध करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या दुर्लक्षामुळे मिटमिट्याच्या घशाला कोरड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मिटमिटा
औरंगाबाद-मुंबई महामार्गावर असलेल्या मिटमिटा या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर असूनही महापालिका अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पाण्याची दाहकता गेल्या चार-पाच महिन्यांपासून सहन करणाऱ्या नागरिकांमध्ये आता संताप व्यक्त होत आहे.
मिटमिटा गावाच्या परिसरातून वाहणारी नदी, दोन तलाव, विहिरी कोरडेठाक पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावालगतच असलेल्या डोंगरावरून वाहत येणाऱ्या नदीचे पात्र छोटे झाले आहे. गाळ साचल्याने नदी पात्राचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण करणे गरजेचे आहे. नदीचे खोलीकरण झाल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल, असे गावकऱ्यांचे मत आहे. साहेबराव चितचाडे, खंडेराव मुळे, लक्ष्मण बनकर, अजबराव मुळे या गावकऱ्यांनी यंदा नोव्हेंबरपासूनच पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याचे सांगितले. महापालिकेचे तीन-चार दिवसांनी १५-२० टँकर येतात. गावातच असलेल्या विहिरीत हे टँकर रिकामे केले जातात. या विहिरीतून हे पाणी मोटारद्वारे दुसऱ्या विहिरीत आणले जाते आणि तेथून ते नागरिकांना उपलब्ध होते. या दोन्ही विहिरींची पाणी पातळी खोलवर गेलेली आहे. पिण्याची तहान काही अंशी भागत असली तरी पिण्याचे पाणी मिळवण्याकरिता नागरिकांची दिवस-रात्र धावपळ होताना दिसत आहे.
नगरसेवक रावसाहेब आम्ले म्हणाले,'पिण्याच्या पाण्याची स्थिती यंदा बिकटच आहे. महापालिकेकडून २० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र हे पाणी कमी पडत आहे. मूलभूत सुविधांमध्ये पाण्याचा समावेश आहे. महापालिकेत समावेश होऊन आता २४ वर्षे लोटली आहेत. तरीही पाण्याचा प्रश्न काही मार्गी लागलेला नाही. महापालिकेचे अधिकारी मिटमिटा गावाच्या सुविधांकडे दुर्लक्ष करतात हे दुर्दैवी आहे.'
मिटमिटा गावठाणासह अनेक नवीन वसाहती परिसरात गेल्या काही वर्षांत उभारण्यात आल्या आहेत. त्यात तारांगण, देवगिरी व्हॅली, मीरानगर, चैतन्यनगर, सुंदरनगर, पृथ्वीपार्क कॉलनी यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकीकरण वाढतच आहे. मतदारांची संख्या कमी असली तरी, नागरिकांची संख्या वाढलेली आहे. अनधिकृत वसाहती वाढतच आहेत. त्याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची टीका नगरसेवक आम्ले यांनी केली. अनधिकृत वसाहतींना नागरी सुविधा देण्यात येत नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हेच प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतात, असे आम्ले म्हणाले.
मिटमिटा गावातील नागरिकांना एका विहिरीवर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. डोंगराच्या पायथ्याशी एक मोठा व एक छोटा तलाव आहे, मात्र त्यात गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याने पाणीसाठा फारसा होत नाही. तलावात एखादी विहीर घेतल्यास पाणी प्रश्न सुटू शकतो, अशी गावकऱ्यांनी भावना आहे. सद्यस्थितीत गावकरी खासगी टँकरने पाणी मागवून तहान भागवताना दिसत आहेत.

डोंगर परिसरातून गावाकडे वाहत येणाऱ्या नदी पात्राचे खोलीकरण व सरळीकरण केले गेले, तर पाण्याचा प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होऊ शकेल. शिवाय परिसरातील पाणी पातळीतही वाढ होईल. त्यामुळे बोअर, हापशांतून पाणी मिळू शकेल. या प्रश्नाकडे केवळ उन्हाळ्यात लक्ष देऊन काहीही उपयोग नाही. पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरुपी सुटण्यासाठी गंभीरतेने नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
- साहेबराव चितचाडे

बाबा पेट्रोल पंप ते मिटमिटा अशी जलवाहिनी टाकण्याची गरज आहे. त्यामुळे मिटमिटाच नव्हे, तर पडेगावचाही पाणी प्रश्न सुटू शकेल. त्याचा पाठपुरावा करूनही काहीच हालचाल अद्यापही झालेली नाही, हे दुर्दैवी आहे. टँकरने पाणी प्रश्न सुटणार नाही. जलवाहिनीद्वारेच पाणी पुरवण्याचे योग्य नियोजन झाले, तर नागरिकांना दिलासा मिळू शकेल.
- रावसाहेब आम्ले, नगरसेवक, मिटमिटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजांना ‘नॅक’चा चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच पॅथींच्या पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांना 'नॅक' मूल्यांकन करून घ्यावे लागणार असून, तशी सूचना विद्यापीठाने सर्वच संस्था-महाविद्यालयांना नुकतीच केली आहे. सद्यस्थितीत सुमारे ३२५ महाविद्यालयांपैकी केवळ १० ते १२ महाविद्यालये 'नॅक' प्रमाणित असून, मूल्यांकनाच्या 'डोस'मुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार महाविद्यालयांचा पर्याय उपलब्ध होणार आहे आणि दर्जेदार महाविद्यालयांना प्राधान्य देता येणार आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये दर्जात्मक व गुणात्मक सुधारणा व्हावी, या हेतूने महाविद्यालयांचे राष्ट्रीय मूल्यांकन व गुणांकन परिषदेद्वारे (नॅशनल अॅसेसस्मेंट अँड अॅक्रेडिटेशन काउंसिल) परीक्षण व मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे, अशी शिफारस कुलपती अर्थात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत करण्यात आली. तसा ठराव विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी विद्यापीठ; तसेच संबंधित केंद्रीय परिषदेच्या मानकांनुसार आवश्यक त्या शैक्षणिक सोयीसुविधा व शिक्षकांची पूर्तता करून कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि 'नॅक'चे मूल्यांकन-गुणांकन करून घ्यावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. असे पत्र विद्यापीठाने नुकतेच राज्यातील सर्व महाविद्यालये व संस्थांना पाठवले आहे. परिणामी, आता विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व पॅथींच्या सर्व महाविद्यालयांना 'नॅक'चे मूल्यांकन व गुणांकन करावे लागणार आहे. सुमारे ३२५ महाविद्यालयांपैकी केवळ १० ते १२ महाविद्यालये 'नॅक' प्रमाणित असून, प्रमाणित महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे खासगी महाविद्यालयांचे आहे.

दर्जा होणार सुस्पष्ट
'नॅक'च्या मूल्यांकन व गुणांकनानंतर प्रत्येक महाविद्यालयाला त्याच्या दर्जानुसार ए, ए+, ए++, बी, बी+, बी++, सी व डी असे विविध ग्रेड जाहीर होणार आहेत. या ग्रेडची चाचपणी करुन कुठलाही विद्यार्थी आपल्या गुणांसह सर्वाधिक दर्जा असलेल्या महाविद्यालयाला प्रवेशासाठी प्राधान्य देऊ शकतो. 'नॅक'प्रमाणिकरणामुळे महाविद्यालयांच्या दर्जा-गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांकडे सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.

सुविधांचा स्तर उंचावणार
'नॅक'च्या मूल्यांकन व गुणांकनाला सामोरे जाणाऱ्या त्या त्या महाविद्यालयातील एकूणच शैक्षणिक सोयी-सुविधांचा स्तरही उंचावणार आहे. महाविद्यालयातील पायाभूत सोयी-सुविधांमध्ये निश्चित सुधारणा होण्याबरोबरच शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्नही मार्गी लागू शकतो. त्याचप्रमाणे, कमी वेतनावर खासगी महाविद्यालयात काम करून स्वतःची खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या शिक्षक डॉक्टरांवरही 'नॅक'चा चाप बसू शकतो आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो, अशी आशा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

'नॅक'चे मूल्यांकन-गुणांकन करून घेणे, हे महाविद्यालयांना सक्तीचे नाही; परंतु एकूणच शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी ते आवश्यकही आहे. 'नॅक' प्रमाणिकरणामुळे संशोधनासाठी फंडस मिळू शकतात व त्याचा अंतिम लाभ विद्यार्थी, समाज, देशाला होतो.
- डॉ. काशिनाश गर्कळ, रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ

दर्जात्मक, गुणात्मक व सर्जनशील शिक्षण व शिक्षण पद्धतीसाठी, संशोधन वाढीसाठी आणि खऱ्याअर्थाने विद्यार्थी घडण्यासाठी 'नॅक'चे प्रमाणिकरण उपयुक्त आहे, मात्र सर्व पॅथींचे केवळ १० ते १२ वैद्यकीय महाविद्यालये 'नॅक' प्रमाणित आहेत. आता आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या परिपत्रकामुळे मूल्यांकन व गुणांकनाच्या प्रक्रियेला नक्कीच चालना मिळेल.
- डॉ. अजित थेटे, संचालक, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ लीडरशिप इन एज्युकेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाखाचा ऐवज लांबवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
न्यू श्रेयनगर भागात चोरट्यांनी शनिवारी ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच अन्य एका घटनेत जाधववाडी येथून ४५ हजार रुपये असलेली पर्स लांबवण्यात आली आहे.
जगदीश रतनलाल मुंदडा (वय ६२, रा. न्यू रत्नश्रेय सोसायटी, न्यू श्रेयनगर) हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून शनिवारी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची जाळी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील रुद्राक्षाची व सोन्याची माळ, बांगड्या, चैन आदी ७२ हजारांचा ऐवज लंपास केला. मुंदडा घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखरपुड्यातून पर्स पळवली
गोरेगाव (मुंबई) येथील किशोर मधुकर ‌दसपुते (वय ३४) हे रविवारी जाधववाडी येथील कलावती लॉन्समध्ये मेहुण्याच्या साखरपुड्यासाठी आले होते. मंगल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर त्यांनी खोलीमध्ये पर्स ठेवली होती. या पर्समध्ये ४५ हजार रुपये रोख व मोबाइल होता. चोरट्यांनी ही पर्स लंपास केली. याप्रकरणी दसपुते यानी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्कानगरी भागात तीन दुकाने फोडली
उल्कानगरी चेतक घोडा चौकातील तीन दुकानांना रविवारी लक्ष्य केले. तीन दुकाने फोडून चोरट्यानी २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भागात राजू इंगळे यांचे वरद फॅब्रिकेशन आहे. रविवारी दुपारी दुकान बंद करून इंगळे घरी गेले होते. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. दुकानातील २० हजाराचे तांबे चोरट्यांनी येथून लांबवले. त्यानंतर जवळच असलेल्या एका लॉटरी दुकानचे शटर फोडण्यात आले. तेथून चोरट्यानी एक हजार रुपये लंपास केले. जवळच असलेल्या सम्राट ड्रायव्हिंग स्कूलचे शटर फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला, मात्र तेथे त्यांच्या हाती काही लागले नाही. इंगळे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकानांचे शटर फोडून महिलांनी केली चोरी
दुकानाचे शटर उचकटवून चार महिलांनी डेली निडस् शॉपी फोडल्याची घटना बन्सीलाल नगर भागात घडली. हा प्रकार शनिवारी रात्री घडला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे चित्रिकरण झाले आहे.
पंकज सतीश अरोरा (वय ४७, रा. वेदांतनगर) यांचे बन्सीलालनगरात दुकान आहे. शनिवारी रात्री अरोरा दुकान बंद करून गेले होते. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी अरोरा आले. यावेळी त्याना दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटून गल्ल्यामधून रोख ६ हजार २०० रुपये लांबवले. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज अरोरा यानी तपासले असता चार महिलांनी हा प्रकार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाणे गाठून चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाकुच्या धाकाने महिला दुकानदारास लुबाडले
किराणा दुकानदार महिलेला चाकुचा धाक दाखवून दोघांनी लुबाडण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरनगरातील शिवनेरी कॉलनी येथे रविवारी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्मिनी मच्छिंद्र गायकवाड (वय ५८, रा. शिवनेरी कॉलनी, आंबेडकरनगर) यांचे शिवनेरी हॉटेलजवळ किराणा दुकान आहे. रविवारी दुपारी गायकवाड या दुकानात बसल्या होत्या. यावेळी दोन तरुण त्यांच्या दुकानापाशी आले व येथे बसू का, असे विचारले. गायकवाडी यानी नकार दिल्यानंतर हे दोघे निघून गेले. काही वेळाने पुन्हा हे तरुण दुकानात शिरले. गायकवाड याना चाकुचा धाक दाखवत त्यांनी मंगळसूत्र व गल्ल्यातील रक्कम हिसकावून पलायन केले. दोन्ही संशयित आरोपी २० ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांनी हिरव्या रंगाचे टी शर्ट व जिन्स पँट घातलेली होती. याप्रकरणी आरोपींविरुद्ध सिडका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफारी पार्क @ अडीच नव्हे, ६० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सफारी पार्कच्या जागेसाठी रेडीरेकनर नुसार पैसे भरा, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना केली. त्यामुळे १०० एकर जागेसाठी महापालिकेला किमान ५० ते ६० कोटी रुपये भरावे लागतील. चार वर्षांपूर्वी याच जागेची किंमत महसूल विभागाने अडीच कोटी रुपये निश्चिच केली होती. आता ६० कोटी रुपये कसे उभे करायचे, असा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.

मिटमिटा शिवारात सफारी पार्कसाठी महापालिकेला शंभर एकर जागा देण्याची तयारी महसूल विभागाने दाखवली आहे. पाच वर्षांपासून या जागेबद्दल चर्चा सुरू आहे. मिटमिटा शिवारात मोठ्या प्रमाणावर शासनाच्या मालकीची गायरान जमीन आहे. त्यापैकी शंभर एकर जमीन सफारी पार्कसाठी दिली जाणारा आहे. चार वर्षांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाने या जमिनीसाठी महापालिकेने अडीच कोटी रुपये भरावेत आणि सफारी पार्कचे काम सुरू करावे, असे कळविले होते. हे पैसे एकदम भरण्याचीही काहीच गरज नव्हती.

सुरुवातीला दहा लाख रुपये भरून जागा ताब्यात घ्या, असेही विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेला कळवले होते, पण महापालिकेने पैसे भरले नाहीत. त्यामुळे जागेचे प्रकरण अधांतरीच राहिले. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. दांगट, महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सफारी पार्कच्या जागेची संयुक्त पाहणी केली. महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गटक्रमांक ३०७मध्ये ८५ हेक्टर जागा आहे. त्या जागेत दोन स्मशानभूमी व काही अतिक्रमणे आहेत. त्यातीलच काही १५ ते २० एकर जागा महसूल विभागाने काही संस्थांना दिली आहे. त्यामुळे महापालिकेला ७५ हेक्टर जागा सफारी पार्कसाठी मिळू शकते. याच जागेच्या बाजूला वनविभागाची ५७ एकर जागा आहे. सफारी पार्कसाठी गायरान जागा हवी असेल, तर रेडीरेकनर दराने पैसे भरा, असे विभागीय आयुक्तांना पालिका आयुक्तांना सांगितले. रेडीरेकनरनुसार १०० एकर जागेसाठी किमान ५० ते ६० कोटी रुपये भरावे लागतील, असे पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निजामकालीन धरण सापडले

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com

औरंगाबाद ः हर्सूल तलावाच्या मागील बाजुला सुमारे एक किलोमीटर अंतरावर ओहर नदीच्या पात्रात निजामकालीन धरण सापडले आहे. या परिसरात गाळाचा उपसा शेतकऱ्यांनी केला आणि खडकात बांधलेले हे धरण उघडे पडले. नदीतील पाणी आडवण्यासाठी तयार धरणाचे बांधकाम विशिष्ट प्रकारे केल्याचे प्रत्यक्ष पाहणीनंतर स्पष्ट झाले. आता या धरणाचे जतन कसे आणि कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन-तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हर्सूल तलाव आणि आजुबाजुचा परिसर कोरडा पडला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणावर गाळाचा उपसा केला जात आहे. या तलावाच्या परिसराबाहेर शेतकरी, अन्य नागरिक यांनी तलाव व ओहर नदीच्या पात्रातील गाळाचा उपसा केला. तलावाच्या पाठीमागे सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ओहर नदीच्या पात्रात ठिकठिकाणी गाळ उपसण्यात आला आहे. या पात्रात प्राचीन धरणाचे बांधकाम अचानक उघडे पडले. इतके दिवस ते गाळात, वाळूत रुतून बसले होते. नागरिकांनी गाळाच्या व वाळूचा उपसा केल्यामुळे धरणाची वरची बाजू उघडी पडली आणि नदीवरचा मोठा पूल सापडल्याची चर्चा सुरू झाली. 'मटा' प्रतिनिधींनी सोमवारी या परिसराला भेट दिली असता, तो पूल नसून धरण असल्याचे दिसून आले. निजामाच्या काळात त्याचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. धरण बांधण्यासाठी पाषाणांचा वापर करण्यात आला आहे. काळे पाषाण आणि पांढरा चुना वापरून धरणाची भींत उभारली आहे. तेथे प्रत्येक गाळ्याला खाचा आहेत. या खाचांमध्ये त्या काळी दरवाजे असावेत. खाचांमध्ये दरवाजा आडकवल्यावर नदीच्या पात्रात पाणी साचून राहत असे. पूर्ण क्षमतेने धरण भरल्यावर त्याला सांडवा काढून जास्तीचे पाणी नदीच्या पुढच्या पात्रात सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याचे एकूणच बांधकामाच्या पद्धतीवरून लक्षात येते. या धरणाची लांबी सुमारे ५०० ते ७०० फूट असून, उंची १२ फुटापर्यंत आहे. धरणाच्या दोन्ही बाजूने नहरीचे बंबे आहेत. धरणाच्या भिंतीची दोन्ही कडची बाजू ढासळलेली आहे. त्यामुळे धरणासाठी वापरलेले दगड विखुरलेले दिसून येतात, पण धरणाचा मूळ गाभा सुस्थितीत आहे. पाणी आडवण्यासाठीचे गाळे आजही कायम आहेत. धरणाच्या प्रत्येक गाळ्याला किमान एक ते दीड फुटांचा उंबरठा आहे. म्हणजे उंबरठ्याच्या उंची इतके पाणी नदीच्या पात्रात कायम रहावे, अशी योजना धरणाच्या बांधकामाच्या वेळी करण्यात आली होती. आजही नदीच्या पात्रात पाणी थांबून राहण्यासाठी या उंबरठ्यांचा उपयोग होतो. गाळ्यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी मात्र नदीपात्रात थांबू शकत नाही. धरणाच्या भिंतीवरून एकावेळस एक किंवा दोन माणसे जाऊ शकतात. धरणाची भींत भक्कम असून, त्याचे प्लास्टर आजही जसेच्या तसेच आहे.

ओहर नदीच्या पात्रात पुरातन धरण सापडले तो परिसर पाणचक्की नहरीचा आहे. निजामाच्या काळात १७३० ते १७३४च्या दरम्यान नहरीचे बांधकाम झाले. त्याच वेळी या धरणाचेही बांधकाम झालेले असावे. पाणचक्की नहरीचा उगम जटवाडा गावाच्या पलीकडे आहे. ओहर नदीला लागूनच ही नहर आहे आणि सापडलेले धरण नदीच्या पात्रात आहे. गाळ काढल्यामुळे धरणाचा पृष्ठभाग उघडा पडला आणि तेथे धरण असल्याचे स्पष्ट झाले. हे निजामकालीन धरण जतन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

- डॉ. शेख रमझान, नहरींचे अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हरेस्टवीर रफिकचं सरकारला ‘कौतुक’ नाहीच

$
0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com

औरंगाबादः हलाखीच्या परिस्थितीतही जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर (८८४८ मीटर उंच) सर करणारा महाराष्ट्र पोलिस दलाचा पहिला जवान असा बहुमान औरंगाबादच्या शेख रफिकने मिळविला. या ऐतिहासिक कामगिरीला पाच दिवस उलटूनही सरकारने कोणतीही आर्थिक मदत करण्याची तत्परता न दाखविल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.

शेख रफिकने तिसऱ्या प्रयत्नात एव्हरेस्टचा सागरमाथा १९ मे रोजी गाठला. जगातील सर्वोच्च शिखरावर पोचल्याबद्दल रफिकवर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आघाडीवर होते. मात्र या कामगिरीनंतर रफिक थेट स्वगृही परतू शकलेला नाही. हिमदंशामुळे त्याला सोमवारी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. एव्हरेस्ट मोहिमेसाठी रफिकला आतापर्यंत सुमारे ७० लाख रुपये लागले आहेत. हा निधी त्याने बचत, कर्ज व आप्तेष्टांच्या मदतीने उभा केला. उपचारासाठी हलवण्याकरिता हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात आला. तो खर्चही त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे.

अशा स्थितीत गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून रफिकला आर्थिक मदत जाहीर होईल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. कारण एव्हरेस्टवीर होणारा महाराष्ट्र पोलिस दलातील रफिक हा पहिलाच जवान ठरला आहे, परंतु अद्याप सरकारने कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्याची तत्परता दाखवलेली नाही. एरवी क्रिकेट वा अन्य खेळातील पदक विजेत्यांवर तत्काळ लाखो रुपयांच्या पारितोषिकांचा वर्षाव होतो. मराठवाड्यातील एकमेव एव्हरेस्टवीर ठरल्यानंतरही रफिकच्या वाट्याला आतापर्यंत काहीच आलेले नाही, अशी भावना क्रीडा क्षेत्रात उमटू लागली आहे.

ब्रँड अॅम्बॅसेडर करा

शेख रफिकला एव्हरेस्ट मोहिमेसाठी बहुमोल मदत करणारे पुणे येथील सुरेंद्र शेळके म्हणाले, 'रफिकचे हे यश ऐतिहासिक आहे. खरे तर त्याला आर्थिक मदतीची खूप गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट मदत जाहीर करायला हवी होती. तसेच रफिकला ब्रँड अॅम्बॅसेडर करण्याची गरज आहे. यंदाच्या मोहिमेसाठी रफिकला आतापर्यंत ३५-४० लाख रुपये खर्च आला आहे. हा खर्च तो एकटा निश्चितच करू शकत नाही. त्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने मदत करायला हवी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रासलेले ४५ पती पोलिसांच्या दारात

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

औरंगाबादः सासरी पती व अन्य नातेवाईकांकडून पत्नीला त्रास होत असल्याचे प्रकार कायम समोर येतात, मात्र पत्नीमुळे त्रासलेल्या ४५ पतींनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आई-वडिलांशी पत्नी नीट वागत नाही, मोबाइल फोनचा सतत वापर करते, एकत्र कुटुंब नको, पत्नीचे नातेवाईक त्रास देतात आदी कारणे यामागे आहेत.

शहरातील मध्यमवर्गीय भागात राहणारा राजू (नाव बदलेले आहे) शासकीय नोकरी करतो. त्याचे नात्यातील एका मुलीसोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले. काही महिन्यानंतरच पती-पत्नीत कुरबुरी सुरू झाल्या. पतीने आपलेच ऐकावे, एकत्र कुटुंब नको, वेगळे राहू, असा अट्टहास पत्नीने धरल्याचे राजू सांगतो. वाद वाढल्याने पत्नी माहेरी गेली आणि या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या राजूने पोलिस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण केंद्राकडे धाव घेतली. कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांत समुपदेशन करणाऱ्या या केंद्रात आतापर्यंत केवळ महिलांच्याच तक्रारींची दखल घेतली जात होती, पण जानेवारी २०१६पासून पुरुषांचीही तक्रार घेतली जात आहे. गेल्या चार महिन्यांत ४५ पुरुषांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.

वादावादीची कारणे : पत्नीकडून आणि सासुरवाडीच्या नातेवाईकांकडून त्रास झाल्यावर छळाची तक्रार करणे पुरुषांना कमीपणाचे वाटते, असे मानले जाते, परंतु आता अनेकजण समोर येऊ लागले आहेत. सासरच्या लोकांनी संसारामध्ये मध्यस्थी करणे, पत्नीचे कान भरून तिला माहेरी घेऊन जाणे, घरातील लोकांनी अपमानास्पद वागणूक देणे, सन्मान न करणे, एकमेकांवर संशय असणे, नेहमी माहेरी जाणे, मोबाइलचा सतत वापर, एकत्र कुटुंबात राहण्यात विरोध, वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह अशा स्वरुपाच्या तक्रारी पीडित पतींनी केल्या आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक एल. ए. शिनगारे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

केंद्र ठरत आहे नवसंजीवनी

या केंद्रात समपुदेशक म्हणून शकिला पठाण, एफ. के. शेख, इल्तेजा शेख, कल्पना नाईक, रुख्मणी गाडेकर, नंदा तिडके, समिंद्रा गायकवाड, विनोद आघाव, सुभाष चव्हाण आदी पोलिस कर्मचारी काम पाहतात. या केंद्राच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांत ८०हून अधिक मोडणारे संसार पुन्हा फुलविले आहेत.

महिलांच्या तक्रारी

छळाची कारणे अनेक असली तरी, प्रामुख्याने पत्नी किंवा पतीकडून चारित्र्यावर संशय, पतीचे दारूचे व्यसन, मोबाइलचा अतिवापर आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी लावला जाणारा तगादा, पैशाची चणचण या तक्रारी सर्वाधिक असून, गेल्या चार महिन्यांत ५२३ पीडित महिलांनी न्यायासाठी केंद्राकडे धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधी भवन खालचा गाळ पोकलेने काढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या पथकाने औषधी भवनची मंगळवारी पाहणी केली. हा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असून त्यांच्या आदेशानंतर पुढील कारवाई केली जाईल. या इमारती खालून वाहणारा नाला स्वच्छ करण्यासाठी पोकलेन मशीनचा प्रयोग केला जाणार आहे.
सध्या पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या रडावर नाल्यावर बांधलेल्या औषधी भवन, पीपल्स बँक, श्रीमान-श्रीमती व मराठा सेवा संघ या चार इमारती आहेत. या इमारतीचे मालक व विकसकांना सोमवारी पालिकेत सुनावणीसाठी बोलावून त्यांची बाजू लेखी घेण्यात आली. त्यानंतर मंगळवारी पालिकेच्या पथकाने औषधी भवनची पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अय्युब खान, अग्निशामक विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, नगररचना व मालमत्ता विभागातील कर्मचारी यांचा पथकात समावेश होता.
या पथकाने औषधीभवनच्या इमारतीची मोजणी केली. इमारतीच्या खालून वाहणाऱ्या नाल्यातील गाळ काढणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने एक पोकलेन मशीन मागवून इमारतीच्या मागने ते नाल्यात उतरवून गाळ काढण्याचा प्रयत्न करा, अशी सूचना कार्यकारी अभियंता कोल्हे यांना करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images