Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘रोहित्राचे पैसे घ्याल तर, पोलिसांत गुन्हे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
विद्युत रोहित्रासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागाल तर, पोलिसात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. बावनकुळे यांनी बुधवारी सिल्लोड येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला शेतकरी, वीज ग्राहक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शेतकरी, वीज ग्राहका, भाजप पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जैस्वाल यांनी अधिकारी काम करत नसल्याचे सांगितले. सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विद्युत रोहित्रासाठी होणाऱ्या फजितीची माहिती मंत्र्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांनी निवेदने दिली. रोहित्र जळाल्यानंतर ते बदलून देण्यासाठी अधिकारी कार्यालयात चकरा मारायला लावतात, रोहित्र लवकर देत नाहीत, पैसे मागतात, अशा तक्रारी केल्या. दोन वर्षे होऊनही विद्युत जोडणी दिली जात नसल्याचे सांगितले. या तक्रारी ऐकल्यानंतर उर्जामंत्र्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा दिला. रोहित्र जळाल्यानंतर सात दिवसांच्या आत दुरुस्त करून किंवा बदलून द्यावा, असे आदेश दिले. अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार माझ्या मोबाइलवर करा, असे सांगितले.
या बैठकीला माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, उपसभापती इद्रीस मुलतानी, माजी तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर, ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता सादोरे, सहायक अभियंता अरूण गायकवाड आदी उपस्थित होते.

कर्मचारी निलंबित
सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून विजेची कामे करणारी खासगी बीव्हीजी हा कंपनीचे कर्मचारी सचिन बर्दापूरकर यांना निलंबित करावे, असे आदेशत्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दुष्काळ आहे, मला पास करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तरपत्रिकेत कविता लिहिण्याचे अनेक प्रकार समोर येतात, यावर्षी बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेत काही परीक्षार्थींनी चक्क दुष्काळाचा उल्लेख केला आहे. काही बहादरांनी चक्क 'दुष्काळ आहे, पास करा,' असे आवाहन परीक्षकांना केले होते. काही विद्यार्थ्यांनी रोल नंबर, तर काहींनी खाणाखुणा केल्या आहेत. अशा आक्षेपार्ह ९७ उत्तरपत्रिका तपासणीत आढळून आल्या. या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी जालन्यातील फेरलेखन रॅकेटमधील आक्षेपार्ह उत्तरपत्रिकांचा मुद्दा गाजत असताना, उत्तरपत्रिका तपासताना आढळलेल्या आक्षेपार्ह उत्तरपत्रांबाबत चर्चा रंगली आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार; परीक्षेत गैरप्रकारचे दोन वर्ग आहेत. त्यात परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळलेले विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत केलेल्या खाणाखुणा. यंदा तपासणीदरम्यान ९७ उत्तरपत्रिकांवर खाणाखुणा केल्याचे आढळले. यात चक्क काही बहाद्दरांनी यंदा दुष्काळ असल्याने पास करण्याची विनंती केली आहे. 'सर मला पास करा...,' यासह काहींनी आपला बैठक क्रमांक, स्वतःचे, गावाचे नाव, तर एका विद्यार्थ्याने 'आय मिस यू,' असे लिहिलेले आहे. असे मंडळातील सूत्रांनी सांगितले. पास करण्यासाठी शिक्षकांना विनंती करणारे हे लेखन या विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. उत्तरपत्रिकेवर खाणाखुणा केलेल्या उत्तरपत्रिका आक्षेपार्ह ठरविण्यात आल्या आहेत. त्यांचा निकाल राखीव ठेवण्याची कारवाई करण्यात आली.

खाणाखुणा न करण्याच्या स्पष्ट सूचना

परीक्षेत उत्तरपत्रिकेच्या पहिल्याच पानावर विद्यार्थ्यांना विविध सूचना दिलेल्या असतात. उत्तरपत्रिकेवर खाणाखुणा करू नयेत, आक्षेपार्ह मजकूर लिहू नये, यांचा त्यात समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतरही असे प्रकार घडतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत पत्नीविषयी अपशब्द काढल्याने खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृत पत्नीविषयी सातत्याने अपशब्द काढत असल्याने दत्ता डिघोळे या तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गुन्हेशाखा व सिडको एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कामगिरी करीत दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. रविवारी रात्री बीड बायपासवरील बाळापूर शिवारात हा खून झाला आहे.

दत्ता जनार्दन ‌डिघोळे (वय ३१, रा. अरिहंतनगर) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी बाळापूर शिवाराजवळील एका मोकळ्या जागेत सापडला होता. मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून सिमेंट पोल व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मंजीत कुलदीपसिंग पन्नू (वय २७ रा. गजानन मंदिराजवळ, मलकापूर बँकेच्या मागे, गारखेडा) व महेश उर्फ बट्टी उत्तमराव बनकर (वय २६ रा. हरेरामनगर, गारखेडा) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

मंजीतच्या पत्नीचे सहा महिन्यांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. दत्ता व तो पूर्वी एकाच परिसरात राहत होते. दत्ता त्याला नेहमी पत्नीवरून अपशब्द बोलत असल्याचा राग मंजीतला होता. दत्ताने मद्यधुंद अवस्थेत त्याला पुन्हा हिणवले. त्यामुळे मंजीतने दत्ताला बियर पाजतो, असे आमिष दाखवून दुचाकीवरून बीड बायपासवर घेऊन गेला. तेथे महेशला बोलावून बेदम मारहाण केली. त्यात दत्ताचा मृत्यू झाला.

ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, मनीष कल्याणकर, उपनिरीक्षक अनिल वाघ, मधुकर शिंदे, आरेफ शेख, भीमराव आरके, मनोज चौहान, संजय खोसरे, संतोष सुर्यवंशी, मुक्तेश्वर लाड, सतिश जाधव व राम हत्तरगे यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून केला गुन्हा उघड

दत्ता हा रविवारी सकाळी कन्नड येथे सासूरवाडीला जाण्यासाठी निघाला होता. पोलिसांनी त्याचा रविवारचा दिनक्रम मिळवला. तो चार मित्रांसोबत एका कंदुरीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात होता. त्यावेळी शेवटी तो मंजितच्या दुचाकीवरून गेल्याचे एकाने पोलिसांना सांगितले. आकाशवाणी चौक ते बाळापूर शिवारापर्यंतच्या रस्त्यांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. पण, वाहनचालक असलेला मंजीत भाडे घेऊन सोलापूरला गेल्याचे समजले. पोलिसांनी मंजीत येताच त्याला पकडले, त्याने महेश सोबत असल्याचे सांगितल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. मंजीतने आधी दत्ताला त्रिमूर्ती चौकाच्या अलिकडील देवीच्या मंदिरापर्यंत लिफ्ट दिल्याचे सांगि‌तले. मात्र, खाक्या दाखवल्यानंतर कबुली दिली. त्याने बायजीपुरा येथील नाल्यात रक्ताने माखलेले कपडे पेटवून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंतप्रधान विमा योजनां’चा बोजवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये सत्ता मिळवल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत जनधन योजना आणि दुसऱ्या वर्षी, २०१५मध्ये तीन पेन्शन योजना सुरू केल्या. देशभरात या योजनांचे कौतुक सुरू असले, तरी औरंगाबाद शहरात नागरिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे.

औरंगाबादची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. 'पंतप्रधान जीवन ज्योती योजनेत' शहरातील ८३ हजार ७२१ जणांनी विमा उतरवला आहे. या विमा योजनेत वार्षिक ३३० रुपये हफ्ता आहे. या योजनेत एकूण २ कोटी ७६ लाख २७ हजार ९३० रुपये जमा करण्यात आले. 'पंतप्रधान सुरक्षा विमा योजने'त शहरातील १ लाख ६५ हजार ६४ जणांनी सुमारे २० लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. या योजनेसाठी फक्त १२ रुपये वार्षिक प्रिमिअम आहे. अटल पेंशन योजनेकडे औरंगाबादकरांनी पूर्णच पाठ फिरवली आहे. शहरात फक्त २ हजार १४ जणांनी विमा उतरवला आहे. जनधन योजनेत आतापर्यंत सहा लाख नागरिकांनी ६४७ बँकांमध्ये खाते उघडून त्यामध्ये जवळपास ३८ कोटींची रक्कम गुंतवली आहे. मुद्रा योजनेतही स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या सुमारे १ लाख नागरिकांना तब्बल ७५ कोटीहून कर्जवाटप करण्यात आले आहे.

दरम्यान, या योजनांना नागरिकांचा प्रतिसाद अजूनही कमी असल्याने गावांमध्ये दौरे करून जनजागृतीचे नियोजन केले जात आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते असायला हवे, यासाठी सुरू झालेल्या जनधन योजनेस फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आताही शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या ३० टक्के लोकांचे बँकेत खाते उघडण्यात सरकारी यंत्रणांना यश मिळाले आहे. शहरातील छोट्या-मोठ्या बँकांमध्ये ६ लाखांहून अधिक नागरिकांनी खाती उघडली आहेत. या योजनेत नागरिकांना एक लाखांच्या विम्याचीही सुरक्षा मिळणार आहे. जनधन योजनेनंतर पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत अवघ्या ३ ते ४ लाख नागरिकांनी विमा उतरविला आहे. बाजारपेठेत विमा कंपन्यांची जोरदार स्पर्धा सध्या सुरू आहे.

ग्राहकांना विमा उतरविण्यासाठी हजारो योजना कंपन्यांकडून राबविल्या जात आहेत. या स्पर्धेत आणखी एका योजनेची भर पडली, असा समज करून घेतल्याने त्याचा विपरीत परिणाम झाला. बँकांडूनही माहिती देण्यात चालढकल केली जात असल्यानेही योजनांना फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटची कारवाई रात्रीही करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवसा हेल्मेट घालून नियम पाळले जातात, पण संध्याकाळी दुचाकीस्वार हेल्मेट घालीत नसल्याची बाब हेरून पोलिस आयुक्तांनी विशेष हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेश बुधवारी दिले. त्यानुसार सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात जोरदार मोहीम पोलिसांनी सुरू केली. शहरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर दिवसासोबतच सायंकाळनंतरही हेल्मेट न घालणारांवर कारवाई होईल, असे आयुक्तांनी सूचित केले होते.

सध्या दिवसा हेल्मेट घातले जाते, पण सायंकाळनंतर दुचाकीस्वार हेल्मेट घालण्याचे टाळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सर्व ठाण्यांचे अधिकारी, वाहतूक अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. सायंकाळी सहापासून पोलिस आयुक्तालय परिसर, मिलकॉर्नर, सिडको येथील वसंतराव नाईक चौक, आकाशवाणी येथील महात्मा बसवेश्वर चौक, दूध डेअरी येथील महर्षी दयानंद चौक, आकाशवाणी, बाबा पेट्रोलपंप येथील महावीरचौकासह विविध ठिकाणी पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करून दंड आकारला; तसेच अधिकाऱ्यांनी हेल्मेट घालण्याच्या सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...वो गझल आप को सुनाता हूँ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आशयसंपन्न रचना आणि सुश्राव्य गायनाने 'शाम ए गझल' मैफल श्रवणीय ठरली. ज्येष्ठ पत्रकार सतीश सुदामे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीसंध्या आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात कलश मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी गझल मैफल झाली.
साहित्य संस्कृती मंच आणि सुदामे परिवार यांच्या वतीने 'शाम ए गझल' उपक्रम घेण्यात आला. मराठी, उर्दू आणि हिंदी गझल यांची रेलचेल असलेल्या सुश्राव्य कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले. गायिका कविता वतनी आणि राहुल आपशेट्टी यांचे वैविध्यपूर्ण गायन मैफलीची उंची वाढवणारे ठरले. 'आप जाने की जिद ना करो' ही गझल कविता यांनी गायली. गझल लेखनात विशेष योगदान असलेले दुष्यंतकुमार यांच्या गझलेने रसिकांचे भान हरपले. 'मै जिसे ओढता बिछाता हू, वो गझल आप को सुनाता हू' ही गझल राहुल यांनी सादर केली. सुरेश भट लिखित 'केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली' ही गझल राहुल यांनी वेगळ्या चालीत गायली. 'हमारे बाद हाले गम सुनाने कौन आएगा' ही गझल कविता यांनी गायली. हिमांशू कुलकर्णी लिखित 'सोडूनी मी बंध सारे' गझलेतून कविता यांनी रसिकांची दाद मिळवली. गझल प्रांतात अत्युच्च लोकप्रियता लाभलेल्या गझल या मैफलीत सादर झाल्या. भाषेचे बंधन झुगारून प्रत्येक गझलेचा रसिकांनी आनंद घेतला. मैफलीचे निवेदन श्रीकांत उमरीकर यांनी केले. तर संगीत साथसंगत शांतीभूषण चारठाणकर, अतुल देशपांडे, निषाद करलगीकर यांनी केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांवर दुजाभावाचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा नियोजन समितीमधून निधी देताना दुजाभाव केला जात आहे, असा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्यावरील रोष पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केला. तसेच वॉर्डातील विकासकामांसाठी महापालिकेला १०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली.
केंद्रातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रभारी खासदार अमर साबळे यांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात गुरुवारी दुपारी पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, अनिल मकरिये, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, भगवान घडमोडे आदी उपस्थित होते.
बंद दाराआड झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत बहुतेकांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्याविरोधात तक्रारी केल्या. विकासनिधी देताना पालकमंत्री दुजाभाव करतात, विश्वासात घेत नाहीत, असा आरोप नगरसेवकांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ठ झालेल्या सातारा, देवळाई वॉर्डाच्या विकासासाठी विशेष नियोजन शासनस्तरावरून होईल का, अशी विचारणा कांही कार्यकर्त्यांनी केली आहे. महापालिककडे निधी नसल्याने वॉर्डातील विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून विशेष निधी मिळेल का, अशी विचारणा करण्यात आली. विकासकामासाठी मनपाला शंभर कोटी रुपये देण्यात द्यावेत, अशी मागणी केल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांच्या कानी टाकणार
नगरसेवकांचा नूर लक्षात घेऊन पालकमंत्र्यांबद्दलच्या तक्रारींबद्दल मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन खासदार अमर साबळे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीप्ती वाघिणीने घेतला निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील दीप्ती ही पिवळी वाघीण गुरुवारी सकाळी दगावली. ही वाघीण दोन्ही डोळ्यांनी अंध होती. आजारपण आणि वृद्धापकाळाने ती दगावल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

तीन दिवसांपासून आजारी असल्याने दीप्तीने अन्न-पाणी सोडले होते. तिला बुधवारी बदल म्हणून चिकन देण्यात आले; त्यापैकी थोडेसे चिकन तिने खाल्ले. पण गुरुवारी सकाळी सात वाजता तिने जगाचा निरोप घेतला. दीप्तीची दृष्टी पाच वर्षांपूर्वी गेली होती; त्यामुळे तिला क्वचितच पिंजऱ्याबाहेर सोडले जात असे. आता प्राणिसंग्रहालयात पाच पिवळे वाघ आणि तीन पांढरे वाघ राहिले आहेत. दीप्ती मरण पावल्याची माहिती मिळाल्यानंतर मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उद्यान अधीक्षक तथा प्राणिसंग्रहालयाचे संचालक विजय पाटील, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी प्राणिसंग्रहालयात धाव घेतली. पशूसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. जी. एन. पांडे, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे डॉ. बी. यू. देशमुख, पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. टी. काळे, डॉ. के. एम. इनामदार यांना पाचरण करण्यात आले. या सर्वांसमक्ष शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. पांडे म्हणाले, दीप्तीच्या फुफ्फूसात दाह होत होता, त्यामुळे तिला श्वसनाचा त्रास होत होता. तिच्या किडनी आणि लिव्हरचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दीप्तीचा वंश बहरला
पंजाबमधील चतबीर येथील महेंद्र चौधरी झुऑलॉजिकल पार्क येथून ७ डिसेंबर २००५ रोजी दीप्ती व गुड्डू या पिवळ्या वाघांना येथे आणले होते. त्यावेळी दीप्ती एक वर्षाची होती. गुड्डू व दीप्ती यांनी सिद्धार्थ आणि समृद्धी यांना जन्म दिला. सिद्धार्थ व समृद्धीपासून करिना, करिश्मा, अर्जून ही तीन पिल्ले झाली. तिचा जोडीदार गुड्डू चार महिन्यांपूर्वी दगावला.

गीता, राणीची प्रकृतीही नाजूक
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील गीता आणि राणी या दोन पांढऱ्या वाघिणींची प्रकृती नाजूक आहे. गीताचे वय १८ तर, राणीचे वय २० वर्षे आहे. वृद्धापकाळामुळे त्यांचा आहार कमी झाला असून बीफऐवजी चिकन दिले जात आहे. त्यांचा आहारावर व प्रकृतीवर प्राणिसंग्रहालयाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात दिवसांत इमारत सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे सात दिवसांत इमारत रिकामी करा, अशी नोटीस महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष (औषधीभवन) यांच्या नावे बजावली आहे. इमारत रिकामी करून दिली नाही तर, पालिका एकतर्फी ताबा घेईल. दरम्यानच्या काळात जीवित, वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी औषधी भवनवर राहील, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिलेली जागा नालाजमीन असून पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणे हे करारनाम्यातील अट क्रमांक १३ नुसार बंधनकारक आहे. पण कोणतीही कारवाई न केल्याने बांधकाम परवानगी रद्द केली आहे.
बांधकाम परवानगी रद्द केल्यानंतर असोसिएशनच्या अध्यक्षांनी महापालिकेबरोबर कोणताही पत्रव्यवहार केला नाही आणि इमारतीचा वापर सुरू ठेवला, हे अयोग्य आहे. अट क्रमांक ५ नुसार इमारतीच्या उत्तरेकडे तीन मीटर रुंदीचा स्लॅब टाकून तो पूर्वेकडील नागरिकांना पोचरस्ता म्हणून वापरासाठी खुला ठेवणे, त्यावर कंपाऊंड न बांधता , ती जागा महापालिकेस हस्तांतरित करणे गरजे होते. पण तीन मीटरचा रस्ता पालिकेला हस्तांतर केला नाही. त्यावर भिंत बांधल्याने पोचरस्ता राहिला नाही. अट क्रमांक ५ नुसार प्रत्येक वर्षी ९०० रुपये भाडे आगाऊ भरणा करणे गरजेचे असताना २०१० पासून भाडे भरलेले नाही.
करारनाम्यास २२ नोव्हेंबर २०१३ रोजी तीस वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही संस्थेच्या अध्यक्षांनी भाडे सुधारित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. ही बाब करारनाम्यातील भंग करणारी आहे. करारातील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे अट क्रमांक १९ नुसार ती इमारत व त्याखालील नाला आपोआप पालिकेच्या ताब्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करून ताब्यात द्यावी, असे बजावण्यात आले आहे. ही नोटीस असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांना देण्यात आली असून खेडकर यांनी नोटीस मिळाल्याची स्वाक्षरी केली आहे. संदर्भात प्रतिक्रिया देण्यास खेडकर यांनी नकार दिला.

'या' इमारतींनाही नोटीस बजावणार
नाल्यावर बांधलेल्या पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, श्रीमान-श्रीमती व मराठा सेवा संघ या तीन इमारतींचे बांधकाम परवाने महापालिकेने यापूर्वीच रद्द केले आहेत. परवाने रद्द केल्यानंतरही या इमारती उभ्या असून त्या पालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या तीन इमारतींना औषधी भवनप्रमाणे शुक्रवारी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस वर्षे जुन्या इमारती रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बांधकाम होऊन तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. त्यामुळे आता किमान एक हजार इमारतीचे ऑडिट करावे लागेल, अशी माहिती पालिकेच्या नगररचना विभागातून देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६ अन्वये मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम २६५(अ) नुसार इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी हे आदेश काढले. या कलमानुसार ज्या इमारतींचे बांधकाम होऊन तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, अशा इमारत मालकांनी किंवा सोसायटींनी त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेने प्रमाणित केलेल्या अभियंत्यामार्फत करून घेणे गजरचे आहे. या कलामाच्या आधारे महापालिकेने यापूर्वी १८ जून २०१० आणि ११ सप्टेंबर २०१५ रोजी जाहीर प्रगटन काढून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन केले होते. पण या जाहीर प्रगटनाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता आयुक्त बकोरिया यांनी पुढाकार घेऊन नव्याने जाहीर प्रगटन दिले आहे.
महापालिकेने नियुक्त केलेल्या अभियंत्यांच्या पथकाकडून इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या आणि त्याचा अहवाल सादर करा, असे बकोरिया यांनी म्हटले आहे. तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळाचे बांधकाम असलेल्या किमान एक हजार इमारती महापालिकेच्या क्षेत्रात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या सर्व इमारतींचे ऑडिट करावे लागणार आहे.

२५ हजारांचा दंड
ज्या इमारती स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करणार नाहीत त्या इमारतीच्या मालकांवर किंवा सोसायटीवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. इमारतीला २५ हजारांचा दंड किंवा संपूर्ण इमारतीचा मालमत्ता कर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रक्कमेचा दंड आकारला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससीतील यशवंतांचा आज विद्यार्थ्यांशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिद्दीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा गड पहिल्याच प्रयत्नात सर करणारे अन्सार शेख शुक्रवारी (२७ मे) आपले अनुभव सांगणार आहेत 'मटा'च्या 'प्लॅनेट कॅम्पस' उपक्रमातून. त्यांच्याबरोबरच या परीक्षेत यश मिळविणारे डॉ. लक्ष्मीकांत सूर्यवंशी, रोहित घोडके हेही आपले अनुभव शेअर करणार आहेत. एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात २७ मे रोजी दुपारी साडेचार वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील सेलगाव येथील अन्सार शेख यांनी यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशातून ३६१वी रँक पटकावून यश मिळवले. रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी अन्सार यांना यथाशक्ती शिक्षण दिले आणि अन्सार यांनीही त्यांच्या कष्टाचे चीज करून दाखविले. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या परीक्षेत ते यशस्वी ठरले. त्यांची जीवनयात्रा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. 'मटा'च्या मंचावरून ते प्रथमच औरंगाबादच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेले डॉ. लक्ष्मीकांत सूर्यवंशी, रोहित घोडके हेही या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत.
महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. एमजीएमचे विश्वस्त अंकुशकुमार कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. एमजीएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने कार्यक्रमासाठी सहकार्य केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमी योजनेवर दोन लाखांवर मजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळी मराठवाड्यात यावर्षी पहिल्यांदाच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात वाढ झाली आहे. या कामांवरील मजुरांची संख्या दोन लाख दोन हजारांपर्यंत पोचली. दुष्काळाने होरपळलेल्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६६ हजार मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर आहेत.
प्रशासनाने दुष्काळात लाखो मजुरांच्या हाताला काम मिळेल, अशी तयारी करून ठेवली होती, मात्र अत्यल्प मजुरीमुळे ऐन दुष्काळातही रोजगार हमी योजनेच्या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली होती. आता पावसाळ्याच्या तोंडावर मजुरांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर होत असताना हमी योजनेचे चक्र मात्र उलटे फिरले होते. या हाताला काम नसल्याने ग्रामीण भागातून असंख्य नागरिक कामाच्या शोधात स्थलांतरित झाले होते, मात्र आता मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असलेल्या बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांत मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याअखेर हमी योजनेंतर्गत कामांवर मजुरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या ३ हजार ०३७ कामांवर ६६ हजार ७६५, लातूर जिल्ह्यात २ हजार ८४५ कामांवर ३६ हजार ८५ मजूर कामावर आहेत. जालना आणि हिंगोली जिल्ह्यातही मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही मजूर उपस्थितीची संख्या दहा हजारांवर पोचली आहे.

हमी योजनेची जिल्हानिहाय स्थिती
जिल्हा.........कामांची संख्या......मजुर उपस्थिती
औरंगाबाद........९२९.....................१०६०८
जालना.............७४५....................२३१६१
परभणी............१३५६...................१९०१८
हिंगोली............३८०.....................१३१३२
बीड.................३०३७....................६६७६५
नांदेड...............७९३.....................१४६६३
उस्मानाबाद......९३७.....................१६७४३
लातूर..............२८४५....................३६०८५
एकूण..............११०१३..................२०२०७९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी पुरविले बदनापुरात पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ज्येष्ठ समाजसेविका तारा बसोलेंच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या महिलांनी एकत्र येऊन जालना जिल्ह्यातील बदनापूरमधील संत सेवानगर येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. त्याचबरोबर बीड बायपासवर राहणाऱ्या भटक्या नागरिकांनाही त्यांनी पाणी पुरविले.
बदनापूर येथे महिलांनी ५ हजार लिटरचे दोन टँकर पाणी स्वखर्चातून पुरवले आहे. याशिवाय सातारा परिसरातील बेंबडे हॉस्पिटलजवळील झोपडपट्टीत १ टँकर, तीन किलोमीटर अंतरावरील भटक्या जमातीच्या पाल्यांवर १ टँकर पाणी दिले. वर्तमानपत्रातून पाणीबाणी विषयीच्या बातम्या वाचून ही पाणीदान करण्याची संकल्पना राबवल्याचे तारा बसोले आणि सुनंदा आचवल यांनी सांगितले. या पाणीवाटपाच्या कामात प्रतिभा धारासूरकर, हाजी परवेज, श्रीमती अमृते, श्रीमती पाठक, जॉनी अरोरा यांनी सहकार्य; तसेच आर्थिक सहाय्य केले. पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असलेल्या भागात आम्ही पाणी टँकरद्वारे पुरवणार असून, संबंधितांनी समाजसेविका बसोले यांच्याशी संपर्क साधावा, असे सुनंदा आचवल यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त विद्यापीठ’ला सहकार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या 'जलयुक्त विद्यापीठ' प्रकल्पास राज्य शासनाने २५ लाखांचा निधी दिला आहे. या प्रकल्पाच्या कामाची विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी पाहणी केली. प्रकल्पाला आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
विद्यापीठाने पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 'जलयुक्त विद्यापीठ' प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात विद्यापीठातील असलेल्या प्राचीन विहिरी, बंधारे यांची साफसफाईसह, जोडणी, रुंदीकरण, नाल्यांचे खोलीकरणा आदी कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी विद्यापीठाने परिसराचे भूशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यानंतर या कामांना सुरुवात झाली आहे. जालना येथील अरुणिमा फाउंडेशनचे या प्रकल्पाला सहकार्य मिळाले आहे. या मोहिमेत आतापर्यंत इतिहास वस्तू संग्रहालय समोरील परिसर, वन्सपती उद्यानासमोरील नाला, मुख्य प्रशासकीय इमारत व विद्यार्थी कल्याण विभागासमोरील नाल्याचे काम करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सोनेरी महल व बुद्ध लेणी परिसरात काम हातील घेण्यात आले आहे. दोन तलावांचे काम सुरू झाले आहे. विद्यापीठाच्या या प्रकल्पाला राज्य शासनाने २५ लाखांचा निधी दिला आहे.
या प्रकल्पाची विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुक्तांनी या प्रकल्पाचे कौतुक करून आणखी २५ लाख रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डॉ. अशोक तेजनकर, रघुनंदन लाहोटी, डॉ. सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, डॉ. किशन धाबे, संदीप नागोरी, दिलीप यार्दी, डॉ. सर्जेराव ठोंबरे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख झाडे लावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कमी झालेले वनक्षेत्र, सततचा दुष्काळ या पार्श्वभूमीवर चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रासह सिडको, पुंडलिकनगर आदी भागांत सुमारे दोन लाख झाडे लावण्यात येणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या उपक्रमास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांनी दिली. दरम्यान, झाडांचे जतन व संवर्धनासाठी झाड दत्तक योजनाही हाती घेण्यात आली असून, त्यासाठी आतापर्यंत ८०० जणांनी पुढाकार घेतला आहे.
सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणातही हाती घेण्यात आली अाहेत. कमी झालेले वनक्षेत्र वाढविण्यासाठीही साऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असे मत आमदार सावे यांनी व्यक्त केले. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व संवर्धनाचे प्रयत्न प्रत्येक पातळीवर होणे गरजेचे आहे. वृक्षारोपण कोठेही करता येते, मात्र झाडांचे संवर्धन करणेही महत्त्वाचे आहे, असेही सांगून त्यांनी, यावर्षी यंदा दोन लाख झाडे लावण्याचा निर्धार केल्याचे नमूद केले.
लोकसहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून वृक्षारोपणास सुरुवात केली जाणार आहे. चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात रस्त्यालगत दोन्ही बाजूने, बंद असलेल्या काही कंपन्यांच्या परिसरात; तसेच सिडको, पुंडलिकनगर, गारखेडा आदी भागांतील मोकळ्या मैदानांत टप्प्याटप्प्यांने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वनीकरण विभाग, महापालिका, एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
झाडे दत्तक योजनाही हाती घेण्यात आली असून, जतन व संवर्धनासाठी आतापर्यंत ८०० जणांनी नोंदणी केली आहे. या झाडांना नागरिकांची नावे देण्यात येणार आहेत.

लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हावे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. नावापुरते वृक्षारोपण न करता त्यांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. त्यादृष्टीने हा उपक्रम राबविला जाईल.
- अतुल सावे, आमदार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात १२ वर्षांतील टँकरचा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
उशाला जायकवाडी धरण असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला यंदा तीव्र पाणीटंचाईला सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात टँकरच्या आकड्याने (९०२) गेल्या १२ वर्षांतील उच्चांक गाठला असून, जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. मान्सूनचे आगमन वेळेवर झाले नाही, तर औरंगाबाद जिल्ह्यात टँकरची एक हजाराचा आकडा पार करणार, हे निश्चित.
दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या औरंगाबादला यंदा केवळ टँकरचा आधार आहे. २०१२-१३मधील दुष्काळाची तुलना १९७२च्या दुष्काळासोबत करण्यात आली, मात्र यंदाच्या दुष्काळाची तीव्रता अधिक भीषण असल्याचे चित्र टँकरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या संपूर्ण मराठवाड्यात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी अधिक टँकर सुरू आहेत. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६५३ गावे व २५ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. तेथील १३ लाख ४ हजार नागरिकांची तहान ९०२ टँकरद्वारे भागविण्यात येत असल्याचे भीषण वास्तव आहे.
लातूरच्या पाणीटंचाईमुळे यंदाचा दुष्काळ चांगलाच गाजला, शासनातील बड्या-बडया मंत्र्यांनी लातूरला भेटी देऊन पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले, मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांना रेल्वेने पाणी आणावे लागले. अशा लातूर जिल्ह्यात मात्र २०१० हे वर्ष वगळता आतापर्यंत जिल्ह्यातील टँकरसंख्येने दुहेरी आकडाही गाठला नाही. जिल्ह्यात सध्या केवळ ३४१ टँकर सुरू आहेत. त्या उलट औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अद्यापही काहीप्रमाणात पाणीसाठा शिल्लक असताना जिल्ह्यात लातूरपेक्षा जवळपास ‌तिप्पट, ९०२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकर हा पाणीटंचाईवरील सर्वात शेवटचा उपाय असला, तरी हा पर्याय सहजतेने वापरण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात टँकरचे विक्रम होणेही शक्य आहे. २००४, २०१३ व २०१५ या वर्षांमध्ये जिल्ह्यातील टँकरसंख्या पाचशेपेक्षा अधिक झाली होती, मात्र यंदा टँकरने हे सर्व विक्रम मोडले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पर्जन्यमान; तसेच पाण्याचे स्त्रोत पाहता प्रशासनाकडून ३० जूनपर्यंत तयार करण्यात आलेल्या टंचाई आराखड्यात जिल्ह्यासाठी ४६७ टँकरचा अंदाज बांधला होता, मात्र आता टँकरचा आकडा दुपटीपेक्षा अधिक झाला आहे.

गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक टँकरसंख्या
दिनांक.....................टँकरसंख्या
१० जून २००४................५०९
१५ जून २००५................२२५
२३ जून २००६................२२९
२२ जून २००७................४३
२५ जुलै २००८...............२७०
४ जुलै २००९.................१८५
२ जून २०१०..................१७२
९ जून २०११..................५५
२२ जून २०१२................१७४
१० जून २०१३................७५५
२२ जून २०१४................३३३
७ जून २०१५.................५६१
२५ जून २०१६पर्यंत.........९०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात हिरवाईचे ध्येय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यभरात एक जुलै रोजी दोन कोटी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४८ लाख ३५ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण व इतर यंत्रणा या उपक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती सामाजिक वनीकरणचे प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एक जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला आहे. या उपक्रमाची मराठवाड्यात विशेष नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे केवळ वनीकरण करणे हा उपक्रमाचा उद्देश नसून समाजघटकांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि इतर यंत्रणांचा उपक्रमात सहभाग राहणार आहे, अशी माहिती प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली. जिल्हा ते गाव या प्रत्येक स्तरावर एक समिती नेमण्यात आली आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत हरितीकरण करण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. या उपक्रमाला वन विभाग सहकार्य करणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकाच दिवशी ४८ लाख ३५ हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. या उपक्रमासाठी भरपूर रोपे उपलब्ध आहेत. वृक्ष लागवड करण्याची इच्छा असलेल्या इतर संस्थांनाही रोपे देण्यात येणार आहेत.
दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी शहरातील स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाची बैठक झाली. या बैठकीत वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. लागवडीचे स्थळ आणि एकूण उद्दिष्टाबाबत चर्चा करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात ८५ ठिकाणी सहा लाख ३० हजार झाडे लावणार आहेत. या बैठकीला मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे, उपवनसंरक्षक ए. पी. गिऱ्हेपुजे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. दिलीप यार्दी, उद्योजक बी. एस. खोसे, प्रसाद कोकिळ, पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक, प्रयास यूथ फाउंडेशनचे रवी चौधरी, कालिदास वेदपाठक, तेजस पुजारी आदी उपस्थित होते.

रोपांची कमतरता पडणार नाही
वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण, रोहयोच्या रोपवाटिका आणि काही खासगी रोपवाटिका यांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे रोपांची कमतरता पडणार नाही, असा दावा वन विभागाने केला आहे.

वृक्षलागवडीचे नियोजन
जिल्हा.............रोपांची संख्या
औरंगाबाद........सहा लाख ३० हजार
जालना............तीन लाख २२ हजार ५००
बीड.................आठ लाख ११ हजार
उस्मानाबाद......पाच लाख ४६ हजार ५००
लातूर...............नऊ लाख तीन हजार
हिंगोली.............पाच लाख १७ हजार
परभणी.............तीन लाख १० हजार
नांदेड...............सात लाख ९५ हजार ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३ मुलींचा खून; मातेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोटच्या तीन चिमुकल्या मुलींचा घरगुती गॅसचा वापर करून, उशीने तोंड दाबत महिलेने खून केला. यानंतर मातेने स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. रेल्वे स्टेशन परिसरातील राहुलनगर परिसरात गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, मुलगा होत नसल्याने आपल्या मुलीचा सासरी छळ करण्यात येत होता. त्यांनीच तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळीनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

राहुलनगर गल्ली क्रमांक दोन येथे संतोष किसन त्रिभुवन हा टेंपो चालक पत्नी राधा (वय २४) मुलगी राजनंदनी (वय ७), कोमल (वय ४) व प्रांजल (वय २) यांच्यासोबत राहतो. चार रुमच्या वाड्यात मागच्या दोन रुममध्ये संतोष व कुटुंब राहते. संतोषचा राधासोबत आठ वर्षापूर्वी विवाह झाला आहे. बुधवारी टेंपोचे भाडे घेऊन संतोष मढी या गावी गेला होता. राधा व मुली घरीच होत्या. गुरुवारी सकाळी राधाची सासू कमलबाई सहा वाजता उठल्या. त्या स्वच्छतागृहाकडे गेल्या असता त्यांना ते आतून बंद आढळले. बराच वेळ वाट पाहूनही कोणी बाहेर येत नसल्याने त्यानी दार ढकलले. यावेळी आतमध्ये त्याना धाकटी सून राधा हिने दोरीने गळफास घेतल्याचे आढळले. राधाला लगेच घाटी ह‌ॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरानी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, अर्धा तास झाला तरी राधाच्या मुली झोपून असल्याने जाऊ वर्षा हिने खोलीत जाऊन पाहिले. यावेळी तिन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांना देखील नणंद सुनिता मगरे व एका मुलाने घाटी हॉस्पिटलमध्ये तात्काळ हलविले. तेथे तिघांना देखील मृत घोषित करण्यात आले.

याप्रकरणी राधाची आई शोभाबाई, मावशी रमाबाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लग्न झाल्यानंतर तीन महिन्यानंतर मुलीचा छळ सुरू झाला. तिला तिन्ही मुली झाल्याने व मुलगा होत नाही म्हणून टोमणे मारण्यात येत होते. पती मारहाण करीत होता. पैशांची मागणी केल्यामुळे तीन वर्षांपूर्वी जावयाला गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये दिली. याप्रकरणी अडीच वर्षापुर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात देखील तक्रार करण्यात आली होती, मात्र सासरच्या मंडळीनी तिला चांगले नांदवण्याच्या सांगितले होते. राधाने आत्महत्या केली नसून, तिचा व मुलींचा खून केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बंदोबस्तात शिक्षकांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
जिल्हा परिषदेतील सर्वाधिक चर्चेच्या असणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात विनंती बदल्यांची प्रक्रिया राबविताना झालेली गर्दी पाहून प्रशासनाने चक्क पोलिस बंदोबस्त बोलावून घेतला. दिवसभराच्या प्रक्रियेसाठी १००० सहशिक्षकांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. पदोन्नतीच्या आधी बदली प्रक्रिया राबविल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी होती.
ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने गेल्या महिनाभरात विविध विभागांची सार्वजनिक बदली प्रक्रिया राबविली. शिक्षण विभागाच्या बाबतीत मात्र अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये संचमान्यता, पदोन्नती, समायोजन प्रक्रिया न झाल्याने शिक्षकांच्या बदल्यांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पाच जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. औरंगाबाद जिल्हा परिषदेत संचमान्यता झाली त्यानंतर समायोजन प्रक्रियाही पार पडली. त्यामुळे शुक्रवारी विनंती बदल्या करण्यात आल्या.
सीईओ डॉ. अभिजित चौधरी, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख यांच्यासह शिक्षण विभागाचा स्टाफ झाडून हजर होता. बदल्यांपूर्वी पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटना, पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. पण प्रशासनाने ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आज बदली प्रक्रिया राबविली. चार टप्प्यांत १००० शिक्षकांना बोलाविण्यात आले. २३ जागा रिक्त होत्या. पण विनंतीने बदली म मागितल्यानंतर दिवसभरात ५० बदल्या झाल्या. त्यात मराठी माध्यमाच्या ४२ व उर्दू माध्यमांच्या आठ बदल्यांचा समावेश आहे. बदल्यांसाठी प्रचंड गर्दी
बदली प्रक्रियेसाठी जिल्हाभरातून शिक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी झेडपी प्रशासनाच्या आटोक्यात येणार नाही याचा अंदाज आल्यानंतर पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या दरवाजावर हे पोलिस होते. बदल्यांसाठी पोलिस बंदोबस्त लावल्याची जिल्हा परिषदेत चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठगांनी लांबवले वृद्धेचे दागिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सेल्समन असल्याची थाप मारून दागिने उजळून देण्याचे आमिष दाखवत एका जेष्ठ नागरिक महिलेच्या दीड लाख रुपयांच्या बांगड्या दोघांंनी लांबवल्या. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सिडको एन ३ मध्ये घडली. भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको एन ३ मधील प्लॉट क्रमांक ५१० येथे कुंजबाला चंद्रकांत शहा (वय ६८) या कुटुंबासोबत राहतात. त्याचा मुलगा सध्या चंद्रपूरला गेला असून सून सकाळी सून कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यामुळे घरात कुंजबाला शहा व त्यांचा नातू दोघेच होते. सकाळी अकराच्या सुमारास दोन व्यक्ती घरी आले. जुन्या भांड्याला पॉलिश करण्याचे काम करतो, असे सांगून त्यांनी 'उजाला शाईन' असे लिहलेले कार्ड दाखवले. ही पावडर दहा दिवसांनी ‌मेडिकलवर मिळणार असून जाहिरात म्हणून भांडे, दागिने फुकटात पॉलिश करून देतो, असे आमिष दाखवले. शहा यांनी दोघांना आधी तांब्याची घागर व चांदीची गाय पॉलिश करण्यासाठी दिली. ती चकचकित करून दिल्यानंतर त्यांनी तुमच्या हातातील बांगड्या पॉलिश करून देतो, असे सांगितले. ते व्यक्ती निघून गेल्यानंतर डब्यात पाहिले असता बांगड्या नसल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
सहा तोळ्याच्या दीड लाख रुपये किंमतीच्या चार बांगड्या घेऊन त्या हळदीच्या पाण्यात उकळाव्या लागतील, असे सांगत त्या दोघांनी बंद झाकणाचा डबा व हळद आणायला सांगितली. शहा यांनी डब्बा व हळद आणल्यानंतर त्यांनी डब्यात चार बांगड्या व हळद टाकली. शहा यांना आणखी हळद आणा, असे म्हणत घरात पाठवले. हळद आणल्यानंतर दोघांनी हळद व पाणी टाकून गॅसवर डबा गरम करायला ठेवा, असे सांगितले. गॅसवर चांगले उकळू द्या, असे म्हणत त्यांनी बेसनमध्ये हात धुतले. त्यानंतर एक व्यक्ती बाहेर गेला व दुचाकी घेऊन आला. त्यानंतर दुसरा व्यक्ती दुचाकीवर बसून दोघे निघून गेले. काही वेळाने शहा यानी डबा उघडून पाहिला असता त्यात बांगड्या दिसल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images