Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिल्हाधिकारी महिवाल यांच्यावर दोषारोपपत्र नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सेवाभरती परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यानी ही माहिती दिली. १ नोव्हेंबर २०१४ रोजी आर्थिक गुन्हे शाखेने बीड बायपास परिसरात अकरा जणांच्या टोळीला अटक केली होती.
यवतमाळ जिल्हा परिषदेत २ नोव्हेंबर २०१४ रोजी जिल्हा विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य व तारतंत्री या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, त्यापूर्वीच १ नोव्हेंबर रोजी बीड बायपास परिसरात अकरा जणांच्या टोळीला अटक केली होती. यामध्ये विक्रीकर निरीक्षक मकरंद खामनकर, वाडेकर क्लासेसचा संचालक दादासाहेब वाडेकर यांच्यासह तीन दलाल, तीन परीक्षार्थी व दोन चालक यांचा समावेश होता. या टोळीकडे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या परीक्षेची अॅँन्सर की सापडली होती. ही प्रश्नपत्रिका यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी स्वतः तयार केल्याची माहिती टोळीने पोलिसांना दिली होती. महिवाल यांची औरंगाबाद पोलिसांनी चौकशी करीत त्यांचा लॅपटॉप जप्त केला होता. त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे असून त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी शहर पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत शासनाकडे मागितली होती. गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी प्रलंबित होती. शासनाने ही मागणी नाकारली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारीदिली. ही मागणी का नाकारण्यात आली, याबाबतचे कारण माहित नसल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आघाव वाहतूक शाखेत; सावंत क्राइममध्ये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस आयुक्तयालयांतर्गत १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले. यामध्ये गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांची शहर वाहतूक शाखेत, तर आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे.
मंगळवारी सायंकाळपासून या निरीक्षकांना सध्याच्या ठिकाणावरून कार्यमुक्त होऊन नवीन पदभार स्वीकारायचा आहे. सिटीचौक, जिन्सी, पुंडलिकनगर व विशेष शाखेमध्ये सध्या उपलब्ध असलेले वरिष्ठ अधिकारी, प्रभारी अधिकारीपदाचा तात्पुरत्या स्वरुपात अन्य पोलिस निरीक्षकाची नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोट्या प्रमाणपत्राआधारे नोकरी मिळविणारे बडतर्फ

$
0
0


औरंगाबाद : खोट्या प्रमाणपत्राआधारे नोकरी मिळवणाऱ्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सोमवारी पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महापालिका सेवेतून बडतर्फ केले. कमल अंभोरे, विजय अंभोरे अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही पती-पत्नी आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, श्रीमती कमल विजय अंभोरे या वॉर्ड 'ड' कार्यालयात मजूर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म १९६४ या वर्षाचा असताना त्यांनी १९६७ मध्ये जन्म झाल्याचे प्रमाणपत्र दाखल करून महापालिकेत नोकरी मिळवली. त्यांचे पती विजय मल्हारी अंभोरे यांची जन्म तारीख ९ मे १९५६ असताना त्यांनी देखील १९६७ मध्ये जन्म झाल्याचे प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळवली. ते मालमत्ता विभागात कार्यरत आहेत. या दोघांचे जन्माचे प्रमाणपत्र खोटे आहे, अशी तक्रार पालिकेचे तत्कालीन उपायुक्त अंभोरे यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे चौकशी करण्यात आली. या चौकशीत अंभोरे दाम्पत्य दोषी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसचे उत्तर समाधानकारक नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या बडतर्फीचे आदेश सायंकाळी उशिरा काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समज दिल्यानंतरही पोतलवाडची बेटिंग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयपीएल बेटिंग प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी नरेश पोतलवाडला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बोलावून समज दिली होती. मात्र, पोतलवाडने शहराबाहेर जम बसवत सट्टा सुरूच ठेवला. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर त्याने शहरात येवून बेट‌िंग सुरू केले. सामन्याची काही षटके बाकी असताना तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
मोबाइलचा वापर करत बेटिंगच्या लाइन चालवणाऱ्या पोतलवाडला गेल्या वर्षी मे ‌महिन्यात सट्टा लावताना अटक करण्यात आली होती. आयपीएल सामन्यावरही बेटिंग करतानाचा तो जाळ्यात अडकला होता. यंदाच्या आयपीएल स्पर्धेपूर्वीच पोलिसांची नजर नरेश पोतलवाडवर होती. सामने सुरू होण्यापूर्वीच नरेशला अमितेशकुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. त्यांनी त्याला यंदाच्या आयपीएल सामन्यावर बेटिंग न करण्याबाबत समज देखील दिली होती. ही सर्स्धा सुरू होताच नरेश शहराबाहेर पसार झाला. बाहेरून बेटिंगच्या लाइन त्याने सुरू केल्या होत्या. कार्यक्षेत्राबाहेर असल्याने त्याच्यावर कारवाई करणे पोलिसांना शक्य होत नव्हते. अंतिम सामन्यासाठी त्याने शहर गाठले होते. पोलिस त्याच्या मागावर होते. बेटिंग सुरू होताच त्याच्यावर छापा टाकण्यात आला, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

घरमालकावर गुन्हा
पोतलवाडने फ्लॅट भाड्याने घेवून त्याठिकाणी बेटिंग सुरू केले होते. पोलिस दलातील कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा हा फ्लॅट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली नसल्याने घरमालकावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोपटे दत्तक योजनेचा श्रीगणेशा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाला धक्का देण्यासाठी शहसवासीय सरसावले आहेत. एन एक प्रभागाने नव्या पिढीच्या शाश्वत भविष्यासाठी 'रोपटी दत्तक योजना' सुरू केली असून सोमवारी शेंद्रा एमआयडीसी परिसरात ३०० रोपटी लावून या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला.
एन एक प्रभागाने शहरात यावर्षी १ हजार रोपटी लावण्याचा संकल्प केला होता. मात्र, वृक्षारोपण करून आपली सामाजिक जबाबदारी संपत नाही, हे ध्यानात घेत त्यांनी दत्तक योजना सुरू केली. प्रभागाचे अध्यक्ष संजय मंत्री, भिकमचंद मल यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला वृक्षांशी मैत्री करण्याचा हा उपक्रम सर्वांनाच पसंत पडला. एकाच ठिकाणी वृक्षारोपण करण्याऐवजी प्रभागाने ३०० रोपटी शेंद्रा एमआयडीसी परिसरात लावली. भूषण मालपाणी यांच्या शेंद्रयातील युनिटजवळ आंबा, चिंच अशी भारतीय मूळ असलेली रोपटी लावली. भूषण मालपाणी या रोपट्यांची संपूर्ण निगा राखणार आहेत. या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख प्रवीण सोमाणी होते. यावेळी सीए प्रवीण मुंदडा, अनिल करवा, योगेश झंवर, अनुराधा मंत्री, जितेंद्र मालू, भूषण मालानी आदींसह संपूर्ण टीम उपस्थित होती. लवकरच उर्वरित रोपटी शहराच्या अन्य भागात लावण्यात येतील व त्यांची संपूर्ण निगा राखण्याचे काम त्या परिसरातील व्यक्तीकडे सोपवण्यात येईल असे संजय मंत्री यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयपीएल सट्टेबाजांची रवानगी पोलिस कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयपीएल सट्टाप्रकरणी रविवारी (२९ मे) अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींपैकी दोन आरोपींना ६ जूनपर्यंत, तर एका आरोपीला १ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांनी दिले.

या प्रकरणी नरेश धर्माजी पोतलवाड (३४, रा. उस्मानपुरा), अजित अर्जुन आगळे (२०, रा. रमानगर) व प्रकाशकुमार भिकचंद ठोळे (५०. रा. मयूरनगर) या तिन्ही आरोपींना रविवारी रात्री नऊच्या सुमारास अटक करण्यात आली होती. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, घटनास्थळी जप्त करण्यात आलेले ४२ मोबाइलचे मालक कोण, त्या मोबाइलमधील सीम कोणाच्या मालकीचे आहे, यासह आरोपींनी लाइनबॉक्स कुठून आणले याचा तपास करणे आहे, तसेच इतर आरोपींचा शोध घेणे असल्याने आरोपींना १४ दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपी पोतलवाड व आरोपी आगळे यांनी ६ जूनपर्यंत, तर आरोपी ठोले याला १ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत ठेकेदारांचे खिसे भरण्याचे उद्योग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ठेकेदारांचे खिसे कुठवर भरणार हे ठरवले पाहिजे. कोणते तरी काम प्रामाणिकपणे व्हावे अशी अपेक्षा आहे. प्रत्येक कामात ठेकेदाराचे हित साधले जाणार असेल, तर ते योग्य नाही,' अशा शब्दांत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या समक्ष महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यावर पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दुपारी हर्सूल तलावाची पाहणी केली. महापालिकेतर्फे तलावातील गाळ काढण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावेळी डॉ. दांगट यांच्यासह महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाहणी करण्यास येण्यापूर्वीच डॉ. दांगट, बकोरिया व अन्य अधिकारी हर्सूल तलावावर पोचले होते. पालकमंत्री दीडच्या सुमारास तलावाच्या पाहणीसाठी आले. गाळ काढण्याचे काम कसे काय सुरू आहे, असा प्रश्न कदम यांनी विचारला. डॉ. दांगट जणूकाही याच प्रश्नाची वाट पहात होते. त्यांनी लगेच महापालिकेच्या कामाचे वाभाडे काढणे सुरू केले. ते म्हणाले, 'प्रत्येक कामात ठेकेदाराचे खिसे भरण्याचे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असते. ठेकेदाराचे खिसे कुठवर भरणार, हे ठरवले पाहिजे. कोणते तरी काम प्रामाणिकपणे झाले पाहिजे, पण तसे होत नाही.' यावर पालकमंत्री कदम पालिका आयुक्त बकोरिया यांना म्हणाले, 'तीन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या निधीचे टेंडर आता कसे काय काढले. निधी प्राप्त झाल्यावर टेंडर केव्हा काढायचे, काम केव्हा सुरू करायचे याचे काही निकष आहेत की नाही?'

'गाळ काढण्यासाठी जास्तीचा निधी लागला, तर जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येईल. पाच कोटींपर्यंतचा प्रस्ताव तयार करून पाठवा,' असेही पालकमंत्री कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’ वाटणाऱ्यांची ‘हजेरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील टीडीआर (ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राइटस्) घोटाळ्यातील निलंबित अधिकाऱ्यांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयात हजेरी लावली. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता शिरीष रामटेके आयुक्तालयात दाखल झाले. पालिकेत उघड झालेल्या एखाद्या घोटाळ्यात पोलिसांनी चौकशीसाठी अधिकाऱ्यांना बोलावण्याची ही पहिलीच घटना आहे.

टीडीआर घोटाळ्याला 'मटा'ने वाचा फोडली. नारेगाव, फाजलपुरा आणि अल्तमश कॉलनी येथील टीडीआर प्रकरण 'मटा'ने उघड केले. त्याची गंभीर दखल घेऊन पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी डी. पी. कुलकर्णी, शिरीष रामटेके, आर. पी. वाघमारे यांच्यासह निवृत्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे सर्वांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर नवे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या घोटाळ्याची चौकशी करून कुलकर्णी, रामटेके, वाघमारे यांना निलंबित केले.

यासंदर्भात आयुक्त बकोरिया यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने टीडीआर घोटाळा प्रकरणाची सर्व कागदपत्रे घेऊन सोमवारी डी. पी. कुलकर्णी, शिरीष रामटेके यांना बोलावले होते. कादगपत्रांसह हे अधिकारी दुपारी बाराच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेत आले. तपास अधिकारी व त्यांनी भेट झाली नाही. त्यामुळे त्यांना काही काळ तेथे बसून रहावे लागले. आर्थिक गुन्हे शाखेतर्फे मंगळवारी महापालिकेला पत्र देऊन या अधिकाऱ्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे प्रकरण...

नारेगाव येथील बारा मीटर रस्त्यासाठी २४ मीटर रस्त्याचा टीडीआर देण्यात आला. फाजलपुरा येथील एका जागेला टीडीआर देताना महापालिकेने ती स्वतःच्या नावावर करून घेतली नाही. ही जागा बँकेकडे तारण होती. त्यावर टीडीआर देण्यास बँकेने आक्षेप घेतला होता. त्याकडे दुर्लक्ष करून नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी टीडीआर दिला. अल्तमश कॉलनी येथील जागाही पालिकेच्या नावावर करून न घेता टीडीआर वाटल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार संदीपान भुमरेंना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात धुडगूस घालून ३५ हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी आमदार संदीपान भुमरे यांच्यासह १९ जणांना दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी सोमवारी (३० मे) ठोठावली. लोकप्रतिनिधिला अशाप्रकारची शिक्षा सुनावण्याची ही गेल्या काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. दरम्यान, हायकोर्टात जाण्यासाठी आरोपींच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव बाबुराव जोशी यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, १९ जून २००५ रोजी दुपारी बाराच्या सुमारास आमदार भुमरे यांनी फिर्यादीला फोन करून सांगितले की, पिंपळवाडी फाटा येथे आलो असून, माझ्याकडे ३००-४०० नागरिक तुमच्याबद्दल तक्रारी घेऊन आले आहेत. दुचाकी व रिक्षाचालकांना पकडून तुम्ही केसेस केल्या आहेत. म्हणून त्यांच्यासह मी पोलिस ठाण्यावर मोर्चा घेऊन येत अाहे. त्यानंतर भुमरे हे त्यांच्या जीपमधून (क्रमांक एमएच २०, ७७७७) आले व पोलिस ठाण्यात शिरले. या वेळी त्यांच्या पाठीमागे सुमारे ३०० ते ३५० नागरिक घोषणाबाजी करीत रिक्षा, दुचाकी व पायी आले. भुमरे यांनी शिवीगाळ करीत 'मारा, तोडा,' अशी चिथावणी दिल्यानंतर भुमरे, अरुण रुस्तुम काळे, श्याम शिवराम जगताप, रामदास काळे, प्रभुराम जाधव, बबन बोबडे, लक्ष्मण औटे, संजय दिवेकर, शंकर वाघमोडे, अण्णा लबडे, राजू गायकवाड, सोमनाथ जाधव, रतन भालेराव, दिलीप गोरे, विष्णू मिटकर, नंदू पठाडे, देविदास पठाडे, समद भाई, जाहेर गुलाब पठाण (सर्व रा. पैठण) हे आरोपी पोलिस ठाण्यात शिरले. त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. ठाणे अंमलदार यांच्या टेबल व दरवाज्यावर लाथा मारल्या. 'स्टेशन डायरी', हॉटलाइन फोन फेकून दिला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी 'वायरलेस रूम'मध्ये असभ्य वर्तन केले. भुमरे, अरुण काळे यांनी ठाण्यासमोर चिथावणीखोर भाषणे केली. त्याचवेळी ठाणे परिसरातील एमएच २०-डब्ल्यू १९३० व एमएच २०-वाय ४०८७ या दोन रिक्षा ओढून नेल्या. पोलिस ठाण्याचे एकूण ३५ हजारांचे नुकसान केले व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३९५, १४३, ३५३, ५०९, ५०६, ५०४, ४२७, ४०९, १८९, ११७, मुंबई पोलिस कायदा १२०, १३५, सीआरपीसी कंटेप्ट अॅक्ट ७, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा ३, ४ अन्वये गुन्हा दाखल झाला. सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब मेहेर यांनी ११ साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध केला.

प्रत्येकी दोन हजारांचा दंड

याप्रकरणी कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे) अन्वये सर्व आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी व कलम १४३ (गैरकायद्याची मंडळी जमा करणे) अन्वये सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने ठोठावली. दरम्यान, या प्रकरणामध्ये एकूण ३८ आरोपी होते. यातील १८ आरोपींची निर्दोष सुटका झाली व निर्दोष आरोपींपैकी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलसचिवपदाची संगीत खुर्ची

$
0
0

कुलसचिवपदाची संगीत खुर्ची

चौदा महिन्यांत दहा कुलसचिव, डॉ. भरड यांची वर्णी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. दिलीप भरड यांची निवड झाली आहे. डॉ. मुरलीधर लोखंडे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. दरम्यान, गेल्या चौदा महिन्यांत विद्यापीठाने दहा कुलसचिव पाहिले आहेत. त्यामुळे कुलसचिवपद म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ झाला अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.

विद्यापीठात प्रशासकीय पातळीवर संवैधानिक अधिकारी पदे दोन वर्षात कायम अस्थिर राहिली आहेत. त्यात मंगळवारी पुन्हा सकाळी कुलसचिव डॉ. लोखंडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली अन् सायंकाळपर्यंत यात सत्यता असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी उपकुलसचिव डॉ. दिलीप भरड यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी जाहीर केले. २ फेब्रुवारी २०१६ रोजी वाणिज्य विभागातील डॉ. मुरलीधर लोखंडे यांनी कुलसचिवपदाचा पदभार स्विकारला होता. चार महिन्यात डॉ. लोखंडे यांच्या राजीनाम्याची अनेकदा चर्चा झाली. तत्कालिन कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांची संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर ५ जानेवारी २०१५ ते आजपर्यंत या पदावर आजपर्यंत दहा कुलसचिव विद्यापीठाने पाहिले. त्यामुळे हे पद संगीत खुर्चीप्रमाणे झाल्यागत स्थिती आहे.

कोण कोण झाले कुलसचिव

तत्कालिन कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांच्याकडून ६ जानेवारीला डॉ. सुरेश गायकवाड यांनी पदभार स्विकारला. काही दिवसानंतर त्यांचा राजीनामा घेत या पदाचा कारभार डॉ. महेंद्र शिरसाट यांच्याकडे देण्यात आला. दोनच दिवसांत त्यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांच्याकडे पदभार आला. त्यावरून अधिकारी आणि प्रशासनात वादही झाले. त्यानंतर काही दिवस तत्कालिन परीक्षा नियंत्रक प्रल्हाद लुलेकर, बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे यांनी पदभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा डॉ. महेंद्र शिरसाट यांच्याकडे कुलसचिवपदाचा पदभार देण्यात आला. त्यांनीही फार दिवस न राहता राजीनामा देणे पसंत केले. त्यानंतर २ फेब्रुवारीला डॉ. लोखंडे यांच्या गळ्यात कुलसचिवपदाची माळ घालण्यात आली. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता डॉ. भरड यांची नियुक्ती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलांना मारून आईची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका निर्दयी महिलेनं स्वत:च्या दोन मुलांचा खून करून स्वत: आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील चौसाळा गावात ही घडली आहे.

नवऱ्याशी भांडण झाल्यानं रात्रीच तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर रागात असलेल्या पत्नीनं आपल्या पोटच्या दोन मुलांचा ठेचून खून केला आणि नंतर स्वत:ला संपवले. या प्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे डोळे विमा रकमेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
फुलंब्री तालुक्यातील सुमारे ११ हजार शेतकऱ्यांना पावणेपाच कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. मात्र, पेरणी तोंडावर आली असून सुद्धा शेतकऱ्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.
फुलंब्री तालुक्यात या वर्षी दुष्काळ असून खरीप व रब्बी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या हाती पीक लागले नाही. काही शेतकऱ्यांना खरीप पीक हाती लागण्याची आशा होती. मात्र, गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असून त्यांच्याकडे या हंगामासाठी बियाणे व खत खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांची आशा पीक विमा रकमेवर आहे.
तालुक्यातील १३ हजार १२३ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. त्याकरिता बँकांमध्ये ९८ लाख रुपयांची रक्कम भरली. यापैकी १० हजार ८६९ शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला असून ही रक्कम चार कोटी ७२ लाख रुपये आहे. विमा रक्कम जाहीर झाल्याचे कळाल्यानंतर तालुक्यातील विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ही रक्कम तत्काळ मिळाल्यास हंगामातील पेरणीसाठी फायदा होणार आहे. यंदा शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने कपाशी, मका, सोयाबीन व कडधान्य आदी पिकांचे बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची गरज आहे. तालुक्यात गतवर्षी कापूस, मका, लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. अत्यल्प पावसामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा रकमेची वाट पहात आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. परिणामी लागवडीसाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. काही शेतकरी बियाणे खरेदीसाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव करत आहेत.

खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. येत्या हंगामामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून सहकार्य करावे.
शिरीष घनबहादूर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगिरी सांगण्यासाठी मंत्री येणार मराठवाड्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने दोन वर्षांत कोणती कामे केली, देशाच्या विकासात कसा हातभार लावला, याची जंत्री सांगण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्री जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मराठवाड्यात येणार आहेत. भाजपच्या अभ्यासवर्गांना भेटी देऊन हे मंत्री माहिती देतील.
भाजप सरकारला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाले. दोन वर्षांत सरकारने कोणती कामे केली ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांवर टाकण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भाजपच्या मंडळ अधिकारी, प्रदेश पदाधिकाऱ्यांचे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे अभ्यासवर्ग घेण्यात आले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करत भाजप नेतृत्वाने तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे.
१५ जून ते एक जुलैदरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २३ तालुकास्तरीय अभ्यासवर्गांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, पियूष गोयल, उमा भारती, सुरेश प्रभू, मनोहर पर्रिकर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच्या नियोजनासाठी औरंगाबादेत सोमवारी भाजपची बैठक झाली. रामदास आंबटकर, प्रवीण घुगे, राम कुलकर्णी, भाऊराव देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याला ३० लाखांचा गंडा घालणारा गजाआड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
व्यवसायासाठी इंदूरच्या व्यापाऱ्याकडून ३० लाखांचे कर्ज घेऊन त्याला बनावट चेक देत गंडा घालणाऱ्या आरोपीला आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. अखिलेश कांतीलाल सोनी असे आरोपीचे नाव असून जून २०१५मध्ये त्याने हा प्रताप केला होता.
इंदूर येथील व्यापारी धन्नालाल हीरालालजी गोयल हे व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करतात. अखिलेश सोनी (रा. शांतीविला, एन ३, सिडको) याने त्यांना व्यवसायासाठी ३० लाख रुपये कर्जाची मागणी केली होती. एक रुपये पस्तीस पैसे दर शेकडा दर महिनाप्रमाणे दहा लाखांच्या तीन ‌डीडीद्वारे ही रक्कम जून २०१५ मध्ये गोयल यांनी सोनीच्या बँकखात्यावर जमा केली. या ३० लाखांच्या बदल्यात सोनीने ९ ऑक्टोबर २०१५ रोजी आयडीबीआय बँकेचे १० लाखांचे तीन चेक सह्या करून गोयल यांना दिले. गोयल यांनी इंदूर येथील त्रावणकोर बँकेत जानेवारी २०१६ मध्ये हे चेक वटवण्यासाठी टाकले. यावेळी बँकेने चेकमधील सह्यामध्ये फरक असल्याचे सांगत चेक परत केले. सोनीने कर्ज घेताना जाणीवपूर्वक बनावट सह्या असलेले चेक दिल्याचे गोयल यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. चौकशीमध्ये ही फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने सोनीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हेशाखेने अखिलेश सोनीला अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुभाष खंडागळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

जालन्याच्या व्यापाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक
आरोपी अखिलेश सोनीने जालना येथील व्यापारी परेश निमिचंदजी रुणवाल यांना ५७ लाखांचा गंडा घातला आहे. सरकी बियाणे पाठवतो म्हणत, त्याने ही रक्कम घेतली होती. रक्कम परत केली नसल्याने रुणवाल यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सोनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सोनीने इतर व्यापाऱ्यांनाही फसवल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’ कासवगतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे, मात्र औरंगाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे संथगतीने सुरू आहेत. प्रशासन मात्र केवळ आढावा बैठकांवर भर देत आहे. जिल्ह्यात २२८पैकी केवळ ६३ गावांमध्ये अभियानाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जलयुक्त शिवार अभियानातील बहुतांश कामे बंद करावी लागणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या काय होणार, असा प्रश्न आहे. या अभियानातील कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देत अाली, मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्ह्यात जलयुक्तच्या या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्येही रखडलेली कामे आणि कामांवर करण्यात येत असलेला खर्चावरून पालकमंत्री रामदास कदम आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले होते.
'सर्वांसाठी पाणी' हे ब्रीद घेऊन राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. औरंगाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात २२८ गावांची निवड करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत, यासाठी शासनाने दोन वेळा मुदत वाढवून दिली. आता कामे पूर्ण करण्याची जूनपर्यंतची डेडलाइन आहे, मात्र उर्वरित कामे कशी पूर्ण होतील, असा प्रश्न आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. त्याला शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा ओघ सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २२८पैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झालेल्या १२५ गावांमधील कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडलेल्या गावांमधील कामे कासवगतीने सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सर्व यंत्रणा; तसेच विविध योजनांमधून २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत १०८ कोटी ९५ लाख रुपये मिळाले. यापैकी आतापर्यंत विविध कामांवर ६८ कोटी ३८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२८ गावांमध्ये एकूण ५ हजार ८०१ कामे करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यातील ४ हजार ३९७ कामे झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जलयुक्त शिवारचे कामे गावनिहाय कामे पूर्ण करण्याचे आदेश मिळाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील १२५ गावांमध्ये कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. आता या वर्षीसाठी नव्याने निवडण्यात आलेल्या गावांमध्येही कामाला सुरुवात करावी लागणार आहे.

१४०४ कामे रखडली
गेल्या दोन वर्षांपासून २२८ गावांमध्ये सुरू असलेल्या ५ हजार ८०१ कामांपैकी १ हजार ४०४ कामे अद्याप 'प्रगत‌िपथा'वर आहेत. जिल्ह्यात जूनपर्यंत १२५ प्राधान्यक्रमात असलेल्या सर्व गावांमधील कामे पूर्ण करावयाची आहेत सध्या ६३ गावे पूर्ण झाली असल्याचे प्रशासन सांगते. येत्या काही दिवसांत अजून ६० गावातील कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभागृह बांधण्यासाठी खर्च किती आला?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौर त्र्यंबक तुपे यांनी गावाकडच्या बालगोपाळांना मंगळवारी महापालिकेची सफर घडविली. महापालिकेचे मुख्य सभागृह, महापौरांचे दालन आणि बंगला दाखवला. हे सर्व वैभव पाहून मुले हरखली. त्यातील एकाने सहज प्रश्न केला, 'साहेब सभागृह खूप छान आहे, पण हे बांधण्यासाठी खर्च किती आला, त्यासाठी पैसा कुठून आणला?' अनपेक्षितपणे आलेल्या या प्रश्नामुळे महापौर अचंबित झाले. काय उत्तर द्यावे हे त्यांना कळालेच नाही.
फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा हे महापौर त्र्यंबक तुपे यांचे गाव. या गावात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही मोफत उपक्रम सुरू केले आहेत. सध्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी वर्ग घेतले जातात. आजूबाजूच्या सुमारे १८ गावांतून दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी उन्हाळी वर्गांना येतात. तुपे यांनी या विद्यार्थ्यांना मंगळवारी पालिकेची सफर घडवली. मुला-मुलींसाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करून त्यांना पालिकेच्या मुख्यालयात आणले. त्यांना महापौरांचे दालन दाखवण्यात आले. त्यानंतर या सर्वांना मुख्य सभागृहात नेण्यात आले. सभागृहात ज्या बाकांवर नगरसेवक बसतात त्या बाकांवर विद्यार्थी बसलेले होते. भव्यदिव्य सभागृह पाहून विद्यार्थी हरखून गेले. कुणाला काही बोलायचे आहे का, असे महापौरांनी विचारले. तेव्हा विकास हिवाळे हा विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उभा राहिला. 'साहेब हे सभागृह खूप छान आहे, पण त्याचे बांधकाम करण्यासाठी किती खर्च आला? त्यासाठी पैसा कुठून आणला ?' महापौर या अनपेक्षित प्रश्नाला काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांनी फक्त स्मितहस्य केले. दीपक गाडेकर म्हणाला, 'शहरातील मुलांना घालण्यासाठी चांगले कपडे मिळतात. खेड्यात राहणाऱ्या आमच्या सारख्या मुलांना फाटलेले कपडे घालावे लागतात. शेतात, दुकानात काम करून आम्हाला शिकावे लागते. अशा मुलांसाठी तुम्ही काही तरी मदत करा.' निकिता गाडेकर ही विद्यार्थिनी म्हणाली, 'शहरातल्या विद्यार्थ्यांना रिक्षा, बसची सुविधा आहे. आमच्या गावाला साधी एसटी येत नाही. एसटी सुरू करण्यासाठी काही तरी करा. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल.'

'मीही महापौर होणार'
उज्ज्वला गाडेकर ही विद्यार्थिनी म्हणाली, 'महापौर होऊन समाजासाठी खूप काही करता येणे शक्य आहे. संधी मिळाली, तर आपणही महापौर होऊ,' असे मत व्यक्त केले. पालिकेच्या मुख्यालयातून हे विद्यार्थी महापौर बंगल्यात आले. या ठिकाणी त्यांना जेवण देण्यात आले. महापौर बंगल्यातील हिरवळीवर चिमुकले मनसोक्त खेळले. या पाहुणचारानंतर सर्वांना सिद्धार्थ उद्यानात नेण्यात आले. तेथे मनसोक्त खेळल्यानंतर सर्वांनी आपल्या गावाचा रस्ता धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादुरुस्त हापशाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

$
0
0

सातारा : नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून साताऱ्यात तत्कालीन ग्रामपंचायतीने ३५ हातपंप बसविले, परंतु त्यातील काही नादुरुस्त असल्यामुळे भरपूर पाणी असून, त्याचा उपयोग होत नाही. काही पाण्याअभावी बंद आहेत, तर अनेक पंप नादुरुस्त आहेत. पाणीटंचाईच्या काळात केवळ हापशांच्या दुरुस्तीअभावी परिसरातील रहिवाशांना पाणी मिळत नाही.
गट क्रमांक १०५मधील संतकृपा हाउसिंग सोसायटीतील त्रिदेवता मंदिराजवळ असलेल्या या हापशाला भरपूर पाणी आहे. तो सुरू असताना पाणी भरण्यासाठी गर्दी व्हायची. जनावरांनाही पिण्यासाठी पाण्याची सोय या हापशामुळे होत होती. हा हापसा आता नादुरुस्त झाला आहे. महापालिकेतर्फे पैसे घेऊन एकदिवसा आड पाणी पुरवले जात असले, तरी ते पुरेसे नाही. टँकरच्या अपुऱ्या संख्येमुळे पैसे घेणेही बंद केले आहे. त्यामुळे पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. खासगी टँकरने पाणी घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने हापशाची दुरुस्ती करण्याची मागणी स्वप्नील शिरसाठ, डॉ. सुदर्शन मुंडे यांनी केली आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यू. जी. शिरसाट यांनी सांगितले की, परिसरातील काही हापशांशी दुरुस्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय काही हापसे नादुरूस्त असतील तर त्याची दुरुस्ती केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतून होस्टेलचे पाणी बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीरबाजार परिसरातील स्वामी विवेकानंदपूरम को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील विहिरीतून पाणी उपसण्यासाठी होस्टेल्सला देण्यात आलेली परवानगी रद्द करा, अशी मागणी या सोसायटीमधील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. पाणी उपसण्याची परवानगी महापालिकेने रद्द न केल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, विवेकानंदपूरम हा मान्यताप्राप्त ले-आउट अाहे. ले-आउटमध्ये नियमाप्रमाणे मोकळी जागा सोडण्यात आली आहे. ही जागा दोन ठिकाणी विभागलेली आहे. एका मोकळ्या जागेत पूर्वीपासून पडित विहीर होती. सोसायटीच्या सदस्यांनी वर्गणी करून गाळ काढला व विहीर स्वच्छ केली. त्यावर स्लॅब टाकला, पण कंदी होस्टेल, पाठक होस्टेल, गुरुदेव होस्टेलच्या संचालकांनी या विहिरीतून पाइप लाइन टाकली. यासाठी सोसायटीची परवानगी घेतली नाही. प्रत्येक होस्टेलमध्ये शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी राहतात. त्यासाठी दिवसातून तीन-चार वेळा विहिरीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो. त्यामुळे सोसायटीमधील अनेक घरांच्या बोअरचे पाणी कमी झाले आहे. सोसायटीमधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई जाणवते.
हे तीन होस्टेल्स सोसायटीच्या ले-आउटच्या बाहेर आहेत. त्यांचा आणि सोसायटीचा कोणताही संबंध नाही. होस्टेल्स व्यापारीतत्वावर चालविले जातात. त्यांना सोसायटीच्या विहिरीतून पाणीपुरवठा करणे नैतिकतेस धरून नाही. होस्टेल्ससाठी विहिरीतून पाणीपुरवठा करण्याची परवानगी महापालिकेने चुकीच्या आधारावर दिली आहे. त्यामुळे ही परवानगी तातडीने रद्द करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
होस्टेल्सला महापालिकेने व्यावसायिक दराने विहिरीतून पाणी दिले पाहिजे, असा उल्लेख निवेदनात करून सोसायटीमधील नागरिकांनी म्हटले आहे की, पाण्यासाठी वर्षाला फक्त २८ हजार ८९० रुपये दर आकारण्यात आला आहे. तीन होस्टेल्समध्ये ही रक्कम विभागली, तर एका होस्टेलला एका वर्षासाठी सुमारे नऊ हजारांचे बिल येते. एवढा कमी दर कसा लावण्यात आला. महापालिकेने होस्टेलच्या संचालकांकडून परस्पर ५७ हजार रुपये भरून घेऊन परवानगी दिली. होस्टेलच्या संचालकांनी महापालिका व महावितरण यांना अंधारात ठेवून पाण्याचा वापर व्यावसायिक पद्धतीने सुरू केला आहे. त्यामुळे सोसायटीच्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी होस्टेल्सला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी.
होस्टेल्सच्या संचालकांनी पोलिसांत खोट्या तक्रारी दिल्यामुळे आमचा मानसिक छळ होत आहे, असेही नागरिकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर २३ रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

२०१३मध्ये सोसायटीचे अध्यक्ष संजय टोपे होते. विहिरीतून सहा इंची पाइप लाइन टाका. सर्व घरांना एक इंची नळकनेक्शन द्या, विहिरीवर स्लॅब टाका, असे प्रपोजल त्यांनी आम्हाला दिले होते. त्यानुसार पाच लाख रुपये खर्च करून ही सर्व कामे आम्ही केली. त्यानंतर आम्ही महापालिकेकडे संपर्क साधला. मोकळ्या जागेतील विहीर महापालिकेची आहे, सोसायटीची नाही. २००२मध्येच ती विहीर सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आली. महापालिकेने आम्हाला त्या विहिरीतून पाणी घेण्यासाठी परवानगी दिली. आम्ही पाणीपट्टी व्यावसायिकदराने भरतो. असे असतानाही सोसायटी आमच्याकडून मेंटेनन्ससाठी पैसे मागते. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही टाकलेला पाइप तोडला आहे. आता हे प्रकरण पोलिसात गेले आहे.
- सतीश कंदी, संचालक, कंदी होस्टेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी अडविण्यासाठी ‘साई’त बंधारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात गोगाबाबा टेकडीवरून वाहणारे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे किमान ५० लाख लीटर पाणीसाठा होणार आहे.
शंभर एकर जागेत साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्राच्या परिसरातून एक मोठा नाला आहे. सात-आठ महिने हा नाला वाहात असतो. काही छोटे नालेही आहेत. गोगाबाबा टेकडीवरून वाहून आलेले पाणी या नाल्यातून पुढे जाते. टेकडीवरून येणारे पाणी अडवले, तर भूजलात मोठी वाढ होणार आहे. वाहणारे पाणी अडवण्याची कोणतीही व्यवस्था पुढच्या भागात नाही. त्यामुळे केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी बंधारा बांधण्याची योजना आखली. गेल्या काही दिवसांपासून बंधाऱ्याच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. एक जेसीबीने काम करण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे केंद्रातील दोन विहिरी व चार बोअरच्या पाणी पातळीतही वाढ होईल, असे उपसंचालक भांडारकर यांनी सांगितले.
साई क्रीडा केंद्रात गेल्यावर्षी नैसर्गिक पद्धतीने एक तलाव बांधण्यात आला होता. गोगाबाबा टेकडीवरून आलेले पाणी या तलावात रोखण्यात आले होते. या पाण्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे यंदा या तलावाला एका बंधाऱ्याचे स्वरूप देण्यात येत आहे. खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पाणीसाठ्याची क्षमता वाढली आहे. जवळपास पन्नास लाख लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

एक लाख वृक्ष लागवड
पावसाळ्यात गोगाबाबा टेकडीवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहात येते. दोन-तीन पावसातच हा बंधारा भरुन वाहणार आहे. या बंधाऱ्यानंतरही एक मोठा बंधारा बांधण्याची केंद्राची योजना आहे. त्यासाठी रोटरी क्लबची मोठी मदत होत आहे. बंधारा परिसरात पावसाळ्यात एक लाख झाडे लावण्यात येणार आहे. निसर्गरम्य वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. झाडांमुळे हा परिसर खेळाडूंनाच नव्हे तर केंद्रात येणाऱ्यांसाठी एक पिकनिक स्पॉट होऊ शकणार आहे. खेळाडूंसाठी असे वातावरण हे नेहमीच उपयुक्त ठरते, असे भांडारकर यांनी सांगितले.

मातीचा उपयोग ट्रॅकसाठी
बंधाऱ्यातील मातीचा उपयोग केंद्रात अॅथलेटिक्स ट्रॅक उभारण्यासाठी करण्यात येत आहे. एक चांगला ट्रॅक, जॉगिंग ट्रॅकची निर्मिती या मातीतून होत आहे. ट्रॅकसाठी ही माती अतिशय योग्य असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळतीकडे दुर्लक्ष; पाण्याची नासाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ शहरात नागरिकांवर आली आहे, मात्र काही भागात जुन्या जलवाहिन्यांना गळती लागल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे चित्र आहे. जयभवानीनगरमध्ये जागोजागी बंद झालेल्या जुन्या नळ कनेक्शनमधून पाणी गळती होत असल्याने शेकडो लीटर पाणी वाया जाते.
जयभवानीनगरमध्ये नळास पाणी येण्याच्या दिवशी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. प्रत्येक लाइनला ठराविक अंतराने पाणी सोडले जाते. नळाला साधारणपणे ४० मिनिटे पाणी असते. त्याचवेळी या जुन्या नळ कनेक्शनमधून पाणी गळतीला सुरुवात होते. काही जागरूक नागरिकांनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयास अनेक वेळा ही माहिती कळविली. वारंवार तक्रारी केल्यानंतर महिन्यापूर्वी कंपनीचे कर्मचारी येऊन तपासणी करून गेले. नेमकी किती गळती होते हे तपासण्यासाठी खड्डाही खोदला, पण त्यानंतर नळाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पाणीगळती सुरूच आहे. याउलट वर्दळीच्या रस्त्यावरच खड्डा असल्याने भांडणे होऊ लागली. अखेर नागरिकांनीच हा खड्डा बुजवला. त्याचबरोबर त्यांना शक्य असतील तेवढे जुने कनेक्शन बंद केले, पण अद्यापही अनेक कनेक्शनमधून गळती सुरू आहे. महापालिकेने पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांना काही दिवसांपूर्वी दंड ठोठावला, पण अशा प्रकारे शेकडो लीटर पाण्याचा अपव्यय होत असताना त्याकडे कुणाचे लक्ष नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images