Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आईच्या झुंजीमुळे मुलाचे अपहरण फसले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‌डोळ्यांदेखत दीड वर्षाच्या चिमुकल्याला पळवून नेणाऱ्या नराधमाशी आईने प्राणांतिक ओढीने झुंज दिली. या रणरागिणीच्या शौर्यामुळे चिमुकला वाचला. पलायन करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चित्रपटात साजेशा या घटनेने जयसिंगपुरात दहशत पसरली आहे.
शेख शहेनाज शेख रशीद (रा. जयसिंगपुरा) ही महिला बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घरामध्ये दीड वर्षाच्या मुलासह झोपली होती. यावेळी संशयित आरोपी हरीश शेषराव बारापात्रे (रा. पाचपावली, नागपूर) हा तिच्या घरात घुसला. त्याने टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाला उचलून पलायन केले. जागे झालेल्या शहेनाज यांनी त्याला कडवा प्रतिकार केला. यावेळी मुलाला खाली सोडून हरीशने पलायन केले. पळत असताना खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. हा प्रकार पाहून गल्लीतील इतर नागरिकांनी धाव घेत त्याला पकडले. बेगमपुरा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपी हरीशला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न, घरात जबरदस्तीने घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय कुलकर्णी या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंग प्रवेश आजच कन्फर्म करा

$
0
0

'मटा'ने आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना आवाहन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'इंजिनीअरिंग प्रवेश आजच कन्फर्म करा,' असे आवाहन गुरुवारी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'इंजिनीअरिंग सुधारित प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यशाळे'त तज्ज्ञांनी केले. इंजिनीअरिंगच्या सुधारित प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश फेऱ्या कशा असतील. नोंदणी, अर्ज निश्चिती कशी करावी इथपासून ते नव्याने प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या 'फ्रीझ', 'फ्लोट' व 'स्लाइड' टप्प्यांचे महत्त्व काय, याबाबत विद्यार्थी, पालकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. 'प्रत्येक क्षेत्रावर इंजिनीअरिंगचा प्रभाव आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत केलेले बदल विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत,' असे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर म्हणाले.
एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन कार्यशाळेत तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. शिवणकर यांच्यासह प्रवेश प्रक्रियेतील तज्ज्ञ डॉ. गोविंद संगवई, प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, डॉ. अभिजित वाडेकर, डॉ. संतोष भोसले, डॉ. दीपक गौर, डॉ. आर. एस. पवार यांनी मार्गदर्शन केले. 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी प्रारंभी उपक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडली. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडियासारख्या उपक्रमातून प्रोत्साहन दिले जात आहे. डीएमआयसी, ऑटो हब, सिस्टरसिटी, फार्मास्युटिकल हब, टेक्सटाइल, एव्हिएशन अशी क्षेत्रे विस्तारत आहेत. नोकरीसह स्वतःला उद्योजक म्हणून उभे राहण्याची विद्यार्थ्यंना संधी असल्याचेही डॉ. शिवणकर यांनी सांगितले.
ते म्हणाले,'यंदा सीईटी प्रवेश प्रक्रियेत झालेले बदल हे विद्यार्थीभिमुख आहेत. सीईटीचा स्कोअर माफक असला, तरी प्रवेश मिळेल, परंतु यशस्वी अभियंता होण्यासाठी तुम्हाला दक्ष रहावे लागेल. देशात चार हजार इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये २० लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. राज्यात ३५० कॉलेजांमध्ये दीड लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत नोकरीची संधी कमी आहेत, हे सत्य आहे, परंतु त्याचवेळी उद्योगांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही. हा विरोधाभास आहे. त्यामुळे यशस्वी अभियंता होण्यावर तुमचे लक्ष केंद्रित पाहिजे. तुमच्याकडे ज्ञानाबरोबर कौशल्याची गरज आहे. हार्ड वर्क, उन्हात काम करण्याची सवय, फिल्डवर टीमवर्कम्हणून काम करण्याची सवय गरजेची आहे. संवाद कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, आपले म्हणणे ठासून मांडण्याची, ऐकण्याची, अडचणीवर उपाय शोधण्याची क्षमता आपल्यात असायला हवी, तरच तुम्ही चांगले अभियंता होऊ शकता. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेबाबतही जागरूक असले पाहिजे. प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणीला आणि नोंदविलेल्या अर्जाची निश्चिती करण्याला महत्त्व आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये सुविधा केंद्र आहे. दोन्ही टप्प्यांवर तुम्ही योग्य प्रक्रिया केली असेल, तर १९ जून रोजी पहिल्या गुणवत्ता यादीत नाव असेल. व्यवस्थापन कोट्यातूनही प्रवेश घ्यायचा असेल, त्यासाठीही तुमची ऑनलाइन नोंदणी आवश्यकच आहे. २२ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी आणि कॉलेज, प्रवेश क्षमता, शाखांची माहिती देणारे सिटमॅट्रिक्स जाहीर होईल. यंदा राज्यात २ लाख ६२ हजार विद्यार्थी प्रवेशास यंदा पात्र आहेत. यातील २ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा कमी गुण आहेत, ही खेदाची बाब असली तरी प्रत्येकाला प्रवेश मिळेल अशी स्थिती आहे. यंदा ३०० ऑप्शन भरण्याची मुभा आहे. पहिल्या फेरीदरम्यान दिलेले पर्याय तिन्ही फेऱ्यांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे हे पर्याय काळजीपूर्वक भरा. आयआयटी, एनआयआयटीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना चांगले पर्याय निवडण्याची संधी मिळावी यासाठी 'फ्रीझ', 'फ्लोट' व 'स्लाइड' असे पर्याय यंदापासून देण्यात आले आहेत. चौथी फेरी ही पहिल्या तीन फेरीत आपले काही चुकले असे वाटत असेल, तर तुम्हाला मिळालेली एक संधी आहे. त्यात तुम्हाला नव्याने कॉलेज, ब्रँचचे पर्याय देता येतील. ही प्रक्रिया झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना २८ जुलैला कॉलेजला जात प्रवेश निश्चित करावयाचा आहे. १ ऑगस्टला सर्व इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होतील.'

यंदा प्रवेश प्रक्रियेची पद्धत पारदर्शी, विद्यार्थी केंद्रित आहे. स्वायत्त कॉलेजांचे प्रवेशही राज्य गुणवत्ता यादीनुसार होणार आहेत. पर्याय निवडताना प्र‌थम शाखा निवडावी. त्यानंतर विद्यापीठ क्षेत्र, संस्थेचा प्रकार (शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, विद्यापीठ संचलित-विभाग) त्यानंतर संस्था स्वायत्त आहे की नाही यांतून निवड करावी. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या संस्था निवडाव्या, सर्व शाखा, संस्था निवडल्यास त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा. पहिल्या फेरीदरम्यान दिलेले पर्याय तिन्ही फेऱ्यांसाठी ग्राह्य धरले जातील. तीन फेऱ्यांदरम्यान त्यात बदल करता येणार आहेत. विद्यार्थ्याला ३०० पर्याय देता येणार आहेत. चांगली ब्रँच, कॉलेज निवडण्याची संधी पहिल्या तीन राउंडमध्ये फ्रीझ, फ्लोट व स्लाइड या माध्यमांतून मिळणार आहे. 'ट्यूशन फी व्हेवर स्किम' (टीएफडब्ल्यूएस) या योजने शैक्षणिक शुल्क माफ केले जाते. त्यात प्रवेश घेतला, तर शाखा व कॉलेज बदलता येत नाही. स्वायत्त संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य गुणवत्ता क्रमांक महत्त्वाचा आहे. उर्वरित स्वायत्त नसलेल्या संस्थामध्ये त्या-त्या विद्यापीठ क्षेत्रातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सत्तर टक्के

जागा राखीव, तर उर्वरित विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत. विनाअनुदानित संस्थामध्ये ऑल इंडिया कोट्यातील १५ टक्के जागाांसाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.
- डॉ. गोविंद संगवई, प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ

मिळेत ती शाखा स्वीकारा
अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेताना आपल्याला कोणती शाखा मिळेल किंवा कोणती शाखा घ्यावी, अशी घालमेल विद्यार्थ्याच्या मनात असते. अभियांत्रिकीमध्ये शाखा फारशी महत्त्वाची नाही. आपण निवडलेली शाखा असो की मिळालेली. ज्या शाखेत प्रवेश घेतला आहे, त्याचा निट अभ्यास करा. त्यातील विषयांच्या मुळाशी जायला शिका. याबळावरच त्या शाखेत आपण चांगले ते करू शकतो. सर्वोच्च स्थानावर जाण्याचा प्रयत्न करा. अभियांत्रिकीला प्रवेश घेतला म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश घेतला. त्यात 'नॉलेज' आणि 'स्किल' यांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागते. त्याच्या बळावर भरीवकामगिरी करा. आवड आहे त्यात प्रवेश घ्यावा, नाही तर जे मिळाले आहे, त्यात आवड निर्माण करा.
- डॉ. सुधीर देशमुख, जेएनईसी

बदल विद्यार्थ्यांच्या हिताचे
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल करण्यात आले. हे बदल विद्यार्थीहिताचे आहेत. जागतिक पातळीवरील बदल लक्षात घेऊन आपल्याकडील कॉलेजांमध्ये बदलाची प्रक्रिया वेगाने होते आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटीत मिळालेले गुण महत्त्वाचे असतात. यासह आर्थिक क्षमताही प्रभाव टाकते. कॉलेजांना भेटी द्या, तेथील भौतिक सुविधा, प्रयोगशाळा पहा, त्यांची माहिती घ्या. अभियांत्रिकीच्या कोणत्या शाखेला, कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, याबाबत कुटुंबीयांशी चर्चा करा. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्या. कारण हा निर्णय आपल्या करिअरशी निगडित आहे. अभियांत्रिकी आणि बीटेक यातील फरकही पालकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. बीटेकसारख्या अभ्यासक्रमाला शेवटच्या सहा महिन्यात इनप्लाँट ट्रेनिंग उपलब्ध असते.
- डॉ. संतोष भोसले, एमआयटी

आवडीची शाखा निवडा
आपली आवड लक्षात घेत अभियांत्रिकीची शाखा निवडा. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती घ्या, कॉलेजांमधील स्थिती, भौतिक सुविधा, प्लेसमेंट कशा प्रकारे होते, किती प्रमाण आहे. प्रयोगशाळा, कॉलेजचे शैक्षणिक वातावरण अशा सर्वच बाबींचा विचार करत, माहिती घेत विद्यार्थ्यांनी कॉलेजची निवड करावी. आज अभियांत्रिकीमधील नवनवीन शाखा समोर येत आहेत. त्याचा अभ्यास करा. आज ज्ञानबरोबरच कौशल्य महत्त्वाचे आहे. जेथे अशी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते अशा कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी आग्रही रहा. आवड आणि गरज यांचा मध्य साधा. सर्वांचे मत विचारात घ्या, परंतु आपल्या मनाप्रमाणे, आवडीप्रमाणे अभियांत्रिकीची शाखा निवडण्याकडे लक्ष द्या.
- डॉ. आर. एस. पवार, श्रीयश इंजिनीअरिंग

विविध शाखांत संधी
पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षांचे आझे लादू नयेत. आवडीनुसार त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू द्या. मुलांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेतला, तर त्यात उत्तम करिअर करतात. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटू देण्याची संधी द्या. अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये नानाविध संधी आहेत. आपण इंजिनीअरिंग कोणत्य शहरात करतो, हे महत्त्वाचे नसते. आपण काय शिकतो, त्यातून काय घेतो हे महत्त्वाचे आहे. मोठ्या शहरांकडे विद्यार्थ्यांचा कल असतो, परंतु हा कल केवळ ऐकीव गोष्टीवर अवलंबून असतो. आज शहरातील सर्वच कॉलेज आपल्या मुलांना अधिकाधिक काय चांगले देता येईल, चांगले मनुष्यबळ निर्मितीसाठी नवनवे उपक्रम राबवित आहेत. आयआयटीशी सामंजस्य करार, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या लँग्वेज देण्याचा प्रयत्न करत आहेत.
- डॉ. दिलीप गौर, आयसीईईएम

सर्व शाखा समान
इंजिनीअरिंगमध्ये करिअरच्या संधी कमी नाहीत. त्यात विद्यार्थ्याचा रोल महत्त्वाचा असतो. कॉलेज, ब्रँच निवडताना आपण दक्ष असणेही महत्त्वाचे असते. भौतिक सुविधा, शिक्षक, उपलब्ध सोयी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी जाणून घ्याव्यात. विद्यार्थी, पालकांना कॉलेजकडूनला मोठ्या अपेक्षा असतात. कॉलेजमधून होणारी प्लेसमेंट, कॉलेजमधील पायाभूत सुविधा, प्रयोगशाळां लक्ष असते. ही चांगली बाब आहे. कॉलेजांनीही त्यानुसार सक्षम व्हायला हवे. अभियांत्रिकीची एखादी शाखा चांगली, दुसरी कमी महत्त्वाची असे नसते, हे लक्षात असू द्यावे. आपल्यातील क्षमता, अभ्यास, नवनवीन शिकण्याचीवृत्ती हीच आपल्याला यश मिळवून देते.
- डॉ. अभिजित वाडेकर, पीईएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगला रंगकर्मींचा सन्मान सोहळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठी लोककलांचा अस्सल आविष्कार आणि नवोदित रंगकर्मींच्या उत्साहात ५५ वी महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्य स्पर्धा व १३ व्या बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण रंगले. तापडिया नाट्यमंदिरात गुरुवारी सायंकाळी हा रंगारंग कार्यक्रम झाला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने औरंगाबाद विभागीय केंद्रावर ५५ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा, १३ वी बालनाट्य स्पर्धा घेतली होती. औरंगाबाद आणि नांदेड केंद्रावरील विजेते नाट्य संघ आणि कलाकारांचा मान्यवर रंगकर्मींच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी 'नमन नटवरा' हा सांस्कृतिक कार्यक्रम विशेष रंगला. गण, बतावणी, बाल्या, लावणी या मराठमोळ्या लोककलांनी बहार उडवली. अस्सल लोकाविष्कार पाहून रसिकांनी भरभरून दाद दिली. अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन व कलाकारांचे उत्तम सादरीकरण यांची जुगलबंदी लक्षणीय ठरली. विशेषतः बाल्या नृत्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रत्येक लोककला प्रकारानंतर वेगवेगळ्या गटातील पारितोषिक वितरण करण्यात आले. रंगकर्मी, डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर, डॉ. दिलीप घारे, जयंत शेवतेकर, डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. विजया शिरोळे, सुजाता पाठक, प्रा. राजू सोनवणे, प्रेषित रूद्रवार, प्रा. अनिलकुमार साळवे, प्रा. वीरा राठोड व गिरीधर पांडे यांनी पारितोषिके प्रदान केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे, मेघा लोंढे यांनी मान्यवर रंगकर्मींचा सत्कार केला. सूत्रसंचालन उज्ज्वल धनगर व रेणुका देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. रमाकांत भालेराव, रमेश वाघ आदींनी परिश्रम घेतले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालनाट्य स्पर्धा
उत्कृष्ट अभिनय
प्रथम - राखेतून उडाला मोर (संस्कार विद्यालय, बीड)
हौशी नाट्य स्पर्धा
नांदेड केंद्र : प्रथम खंडहर (तेजोमयी प्रतिष्ठान, परभणी), नरकचतुर्दशी (तन्मयी ग्रुप, नांदेड)
औरंगाबाद केंद्र : प्रथम - गोडसे@ गांधी डॉट कॉम (लोकरंग बहु. प्रतिष्ठान), द्वितीय - तहान (भोईदेव शिक्षणसंस्था, फुलंब्री)
उत्कृष्ट दिग्दर्शन
बालनाट्य प्रथम : सतीश साळुंके (राखेडून उडाला मोर), हौशी नाट्य स्पर्धा - प्रथम - गणेश शिंदे (गोडसे @ गांधी डॉट कॉम), नांदेड केंद्र - किशोर पुराणिक (खंडहर)

रंगभूषा
बालनाट्य स्पर्धा (औरंगाबाद केंद्र) - प्रथम - प्रवीण शीतल कुलकर्णी (गुरुदक्षिणा)
द्वितीय - प्रवीण मडके (राखेतून उडाला मोर)
हौशी मराठी नाट्य स्पर्धा - औरंगाबाद - प्रथम - कविता दिवेकर (गोडसे @ गांधी डॉट कॉम) द्वितीय - अक्षय जमदाडे (भेट), नांदेड केंद्र - प्रथम नेहा चितळे (नरकचतुर्दशी), द्वितीय - पुरुषोत्तम हळदेकर (रक्तमुखी)

उत्कृष्ट अभिनय
बालनाट्य स्पर्धा : राघव राऊत (राखेतून उडाला मोर), सानिका कुलकर्णी (राखेतून उडाला मोर), हौशी नाट्य स्पर्धा - रामेश्वर देवरे (बरबाद्या), प्रियंका उबाळे (तहान), नांदेड केंद्र - किशोर पुराणिक (खंडहर), स्वाती देशपांडे (गोडसे @ गांधी डॉट कॉम)
अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र (बालनाट्य स्पर्धा, केंद्र औरंगाबाद ) - ऐश्वर्या बायस (सोनेरी पिंजऱ्यातील), चैताली कुलकर्णी (कस्तुरी), इशा देशपांडे (मिसिंग), स्वर्णिम सराफ (खेळ), शुभम कुलकर्णी (गुरुदक्षिणा), सुहास पाथरकर (सर, तुम्ही गुरुजी व्हा), प्रसाद राजापूरकर (होत्या काही चिमण्या)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीच्या जळालेल्या मृतदेहाने खळबळ

$
0
0


औरंगाबाद ः चिकलठाणा येथील सुखना नदी पात्राजवळ अनोळखी तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह नागरिकांना सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणीचे हातपाय बांधलेले असून तोंडात बोळा कोंबला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखना नदी पात्राजवळ हनुमान मंदिरामागे एक नाला आहे. या नाल्याजवळील मोकळ्या जागेत सकाळी काही नागरिकांना तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेततील मृतदेह आढळला. या महिलेचे वय अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे आहे. तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा टॉप असून पायात पांढऱ्या रंगाची सलवार आहे. तिच्या तोंडात बोळा कोंबलेला होता आणि हात-पाय बांधलेल्या अवस्थेत होते. तिच्या हातावर 'अनिल' नाव गोंदलेले आहे. नागरिकांनी सिडको एमआयडीसी पोलिसांना हा प्रकार कळवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेची ओळख पटेल असा एकही पुरावा पोलिसांना आढळला नाही. घाटी हॉस्पिटलमध्ये हा मृतदेह हलवण्यात आला आहे. सदर तरुणीचा अन्य ठिकाणी खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शंका पोलिसांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली गेट जवळ ‘झंडा ऊँचा’!

$
0
0


औरंगाबाद : शहराची शान ठरणारा २०० फूट स्मरणीय ध्वजस्तंभाच्या जागेसाठी (मोनेमेंटल फ्लॅग) शोधाचा शेवट आता काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे झाला असून, विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील १ एकर मोकळ्या जागेवर हा स्मरणीय ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनाचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईतल्या राजभवनात असलेल्या ध्वजस्तंभाप्रमाणे औरंगाबादमध्येही स्मरणीय ध्वजस्तंभ असावा, अशा सूचना राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या पाच ते सहा दिवसांपासून स्मरणीय ध्वजस्तंभासाठी तयार केलेल्या समितीकडून शहराच्या विविध भागातील जागेचा शोध सुरू होता. सुरक्षा तसेच प्रशासकीय कामकाजाच्या इमारतींशेजारी ध्वज असावा, यामुळे या जागेचा शोध आता विभागीय आयुक्तत कार्यालयासमोरच्या जागेवर येऊन थांबला आहे. सुभेदारी विश्रामगृहा शेजारी असलेल्या सुमारे १ एकर जागेवर ध्वजस्तंभ व उद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजस्तंभासाठी तयार करण्यात आलेल्या समितीची शुक्रवारी बैठक होणार असून या बैठकीत दिल्लीगेट जवळील जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
ध्वजस्तंभाच्या आवारामध्ये सर्वसामान्य नागरिकांना बसण्यासाठी लहान उद्यानाची उभारणी करण्यात येणार असून ध्वजस्तंभ तसेच उद्यान उभारणीचे काम येत्या १७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा समितीचा मानस आहे. यापूर्वी १० जून रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ध्वजस्तंभाच्या जागेसाठी शहरातील सिद्धार्थ उद्यान, खंडपीठातील मोकळी जागा, दूध डेअरी परिसरातील मुंडे स्मारकाजवळील जागा, कॅनॉट गार्डन, क्रांतिचौक चबुतरा, ज्योतीनगर, एसआरपी ग्राउंड या जागांविषयी चर्चा करण्यात आली होती. स्तंभासाठी अंदाजे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकिंग कोडवर बैठकीत काथ्याकूट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया (बीसीएसबीआय) या स्वायत्त संस्थेतर्फे गुरुवारी सिडको एन-१ मधील हॉटेल विंडसर कॅसल येथे झालेल्या ग्राहक बैठकीत बॅँकिंग कोडबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सीआयबीआयएल, शहरातील बँकांचे अधिकारी आणि बीसीएसबीआयचे विविध अधिकारी आणि ग्राहक यावेळी उपस्थित होते. ही बैठक ३०० हून अधिक रिटेलर, सूक्ष्म आणि लहान उद्योजक यांना बँकेच्या प्रणालीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष ए. सी. महाजन, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आरस, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक एन. के. मिश्रा, सीबीलचे प्र‌तीक झव्हेरी आदींची उपस्थिती होती. यावेळी ए. सी. महाजन यांनी ग्राहकांचे हक्क, त्यांना बँकेकडून होणारी मदत यासाठी बँकिंग कोड आणि तरतुदी कशा उपयुक्त आहेत, याविषयी सविस्त मार्गदर्शन केले. 'ग्राहकांचा अनुभव आणि बँकेच्या प्रक्र‌िया या विषयी सविस्तर माहिती देताना बँकेच्या कर्मचारी वर्गामध्येही कोडबाबत जागृती आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे,' असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी आरस म्हणाले, 'बीसीएसबीआय कोडचे पालन न केल्याने बँकेशी संवाद साधून तक्रारी करता येतात.'
सीआयबीआयएलचे झवेरी यांनी 'कर्ज मिळवण्यासाठी आजच्या घडीला तुमचे उत्पन्न आणि रोजगार याशिवाय सीआयबीआयएलचा अहवाल आणि त्यातील गुण हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात,' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना हवे ३५ हजार मानधन!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पालिकेतील नगरसेवकांना मानधनात तब्बल पाच पट वाढ हवी आहे. दरमहा ३५ हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी नगरसेवकांमध्ये लगबग सुरू झाली आहे. पालिकेच्या तिजोरीतील खडखडाटामुळे गेल्या काही वर्षांपासून विकास कामे ठप्प आहेत, मालमत्ता कराची वसुली जेमतेम असल्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावरही बंधने आली आहेत. अशा परिस्थितीत मानधनात पाच पट वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्याची तयारी केली जात आहे.
औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांना दर महिन्याला सात हजार रुपयांचे मानधन दिले जाते. दहा वर्षांपासून एवढेच मानधन मिळते, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यात वाढ झाली पाहिजे, असे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे मत आहे. यासंदर्भात उपमहापौर प्रमोद राठोड म्हणाले, 'गेल्या काही वर्षांत नगरसेवकांच्या मानधनात वाढ झालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांचे दर महिन्याचे मानधन ३५ हजार रुपये करण्यात यावे, असा प्रस्ताव तयार करण्याचा विचार आम्ही करीत आहोत. सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव ठेवला जाईल. सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर झाल्यावर तोअंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येईल.'
महापालिका गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. मालमत्ता कराची वसुली निकषानुसार नसल्यामुळे शासनाकडून निधी मिळवण्यासही पालिकेला मर्यादा पडत आहेत. वसुली नाही आणि शासनाचा निधीही नाही, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत. एप्रिल २०१५मध्ये निवडणूक झाली. नवनिर्वाचित नगरसेवकांना पहिल्या वर्षात निधीअभावी वॉर्डात विकास कामे करता आली नाहीत.

अन्य महापालिकांमध्ये मिळणारे मानधन
मुंबई ः १०,०००
नागपूर ः ७,५००
पिंपरी-चिंचवड ः ७,५००
नाशिक ः ७,५००
पुणे ः ७,५००
अमरावती ः ७,५००
कल्याण-डोंबिवली ः ७,५००
(मानधन रुपयांमध्ये)

मटा भूमिका
नगरसेवकांना महाराष्ट्रात सर्वाधिक मानधन मिळवून देणारा प्रस्ताव महापालिकेत तयार केला जात आहे. महापालिकेचे उत्पन्न काय, उत्पन्नाचे स्रोत कोणते, निधीअभावी शहराची अवस्था काय, या प्रश्नांचा विचार करण्याची कोणालाही गरज वाटत नाही, पण मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्याचा उत्साह सर्वांमध्ये संचारला आहे. ही महापालिका ठेकेदारांसाठी काम करते, असा निष्कर्ष ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला. तेव्हा पालिकेची ही प्रतिमा बदलण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करणे आवश्यक होते; पण तसे काहीही घडले नाही. मानधनवाढीचा प्रस्ताव आला तसा मंजूर होईल असेही नाही, परंतु अशा आर्थिक परिस्थितीत तो येतोच कसा, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनीच देणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रिणीच्या त्रासामुळे आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींने गुरुवारी सकाळी शिवाजीनगर येथे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत आहे. मैत्रिणीने पाठविलेल्या मेसेजमुळे हा प्रकार समोर आला.

प्रतीक्षा मोतीराम वाघ (वय १९, रा. शिवाजीनगर) असे या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील एसबीआय लाइफ बँकेत व्यवस्थापक आहेत. औरंगाबादेत बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात प्रवेश घेतला तेथे ती मुलींच्या होस्टेलमध्ये राहत होती. परीक्षा संपून सुट्या लागल्याने प्रतिक्षा गेल्या महिन्यापासून औरंगाबादेत होती. गुरुवारी सकाळी वडिलांसोबत जेवण केल्यानंतर, अभ्यासिकेत जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. जवळच असलेल्या रेल्वे रुळावर तिने पॅसेंजर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. बॅगमधील कागदपत्रांवरून तिची ओळख पटली. पोलिसांनी तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. तिचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. याप्रकरणी सुरुवातीला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.


मैत्रिणी करीत होत्या मानसिक छळ

प्रतीक्षाच्या रुममेटमध्ये निशीगंधा, सरस्वती व इतर मुली होत्या. तिला कॉलेजच्या ‌‌प्रीलिम परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. ती हुशार असल्याचा राग मैत्रिणींना होता. त्यांनी तिच्यावर नोट्स चोरल्याचा आरोप केला होता. त्यांनी रुममध्ये नोट्स लपवून, त्या प्रतीक्षाने लपवल्याचा कांगावा केला होता. महाविद्यालयात देखील त्यांनी तिची बदनामी केली होती. या मानसिक छळाला प्रतीक्षा कंटाळली होती.
मेसेजमुळे प्रकार उघड

प्रतीक्षाने हा प्रकार पालकांपासून लपवून ठेवला होता. मंगळवारी तिने कंटाळून निशीगंधाला मेसेज केला होता. यामध्ये आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख होता. निशीगंधाने हा मेसेज तात्काळ प्रतीक्षाच्या वडिलांना पाठवला. त्यांनी तात्काळ घर गाठले. प्रतीक्षा घरीच होती. त्यांनी तिचे समुपदेशन केल्यानंतर हा प्रकार त्यांना समजला. त्यांनी तिच्या मैत्रिणींना फोन करून समजावले. शुक्रवारी तिला घेऊन ते अंबाजोगाइल जाणार होते, मात्र कॉलेजमध्ये जाण्यास तयार नसलेल्या प्रतीक्षाने एक दिवस आधी आत्महत्या केली.

'तुझ्यामुळे हे पाऊल उचलावे लागत आहे'

प्रतीक्षाने तिची मैत्रीण निशीगंधा हिला मोबाइलवर मेसेज पाठविला. त्यात तिने म्हटले होते की, 'निशीगंधा... हा लास्ट मेसेज. तुझ्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागत आहे. माझ्या शेवटास तूच जबाबदार आहे, पण हे मी कोणालाच सांगणार नाही. तुझ्या खुशीसाठी मी माझा जीव देत आहे. आणि जोपर्यंत तू हा मेसेज वाचशील तोपर्यंत कदाचीत मी मेले असेल. कृपा करून आपले काय भांडण झाले कोणाला काही कळाले, तर बर होईल. तस मी तर मरून चालले, पण माझ्या आईला थोडासा सपोर्ट दे आणि तुझे नाव कोणाला कळू देत नाही मी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२०० घरे पाडणार

$
0
0

विमानतळ सुरक्षेसाठी पालिका कारवाईच्या तयारीत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धावपट्टीवर कुत्री शिरल्यामुळे चिकलठाणा विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चिकलठाणा विमानतळाला खेटून असलेली सुमारे २०० घरे संकटात सापडण्याची शक्यता आहे. महापालिकेने गुरुवारपासून या घरांचे सर्वेक्षण सुरू केले अाहे. सर्वेक्षणानंतर घरांवर होताडा मारला जाणार आहे.
विमानतळाच्या धावपट्टीवर दोन दिवसांपूर्वी मोकाट कुत्री घुसली. त्यामुळे विमानाच्या उड्डाणाला तब्बल तीन तास उशीर झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बुधवारी विमानतळ प्राधिकरण व महापालिकेचे अधिकारी यांची विमानतळ सुरक्षेबाबत बैठक झाली. विमानतळाच्या संरक्षक भिंतीला खेटून अनेक घरे बांधली आहेत, ही बाब या बैठकीत लक्षात आली. या घरांमुळे विमानतळ सुरक्षेला धोका असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये झाली. त्यामुळे पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी विमानतळाच्या भिंतीला खेटून असलेल्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उपायुक्त रवींद्र निकम यांना दिले. त्यानुसार निकम व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी विमानतळ परिसराला भेट दिली. विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर भींत बांधून अनेकांनी घरे उभारल्याचे यावेळी लक्षात आले, असे निकम यांनी सांगितले.
महाराष्ट्र नगररचना अधिनियमात विमानतळ परिसरात बांधण्यात येणाऱ्या घरांच्या उंची बद्दलचा उल्लेख आहे. ही घरे दुमजली असू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे, पण धावपट्टीपासून किंवा संरक्षक भिंतीपासून घरे किती लांब असावीत, याचा उल्लेख नाही. धावपट्टीपासून किमान १५० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम असू नये, असे मानून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकामांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. हे काम आठ दिवसांत संपवून त्यानंतर पाडापाडी सुरू केली जाईल, असे निकम यांनी सांगितले.
विमानतळाच्या भिंतीला भगदाड पाडून काही नागरिक आत प्रवेश करतात. कचरा, शिळे अन्न भिंतीच्या पलीकडे टाकले जाते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. येत्या काही दिवसात भींत व धावपट्टीदरम्यान पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबवून मोकाट कुत्री, पक्ष्यांचा वावर बंद केला जाणार आहे. त्यानंतर भिंतीचा पडलेला भाग विमानतळ प्राधिकरणाच्या मदतीने बांधला जाणार आहे. विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने अन्यही कामे येत्या काळात महापालिकेतर्फे केली जातील, असेही निकम यांनी सांगितले.

पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर गुरुवारी विमानतळ परिसराची पाहणी करण्यात आली. संरक्षक भिंतीवर अनेकांनी घरे उभारली आहेत. काहींनी आपल्या घराचे पाणी विमानतळ परिसरात सोडून दिले आहे. याशिवाय केरकचराही विमानतळाच्या परिसरात टाकत आहेत. ‌‌झोपडपट्टी सरंक्षक भिंतीपासून दहा फूट दूर करावी. संरक्षक भिंतीवर उभारलेली घरे हटविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
- अलोक वार्ष्णेय, विमानतळ व्यवस्थापक

विमानतळाच्या धावपट्टीपासून घरांची किंवा दुकानांची बांधकामे किती अंतरावर असावीत, या बद्दल लेखी माहिती आम्ही विमानतळ प्राधिकरणाकडून मागवली आहे. याबाबत सहा महिन्यांपूर्वीच पत्र दिले आहे. सध्या धावपट्टीपासून १५० मीटर व संरक्षक भिंतीपासून दहा फूट अंतरावर असलेल्या घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
- रवींद्र निकम, उपायुक्त, पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : वरदान ‘झिरो बजेट’ शेतीचे

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
शेती आतबट्ट्याचा व्यवसाय ठरवण्यात रासायनिक खत आणि रसायनांचा बेसुमार वापर एक महत्त्वाचे कारण आहे. पीक काढणीपर्यंत वेगवेगळ्या फवारणीसाठी शेतकरी एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करतात. हा खर्च उत्पन्नाच्या तुलनेत अधिक असल्याने शेती परवडत नसल्याची सार्वत्रिक ओरड वाढली आहे. सेंद्रीय खताचा आणि औषधीचा वापर जिकीरीचा असल्याने शेतकरी सहसा त्याच्याकडे वळत नाही. भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी बाजारपेठेत शेतीमाल विक्री करतात. मात्र, नफ्यातील निम्मे पैसे पुन्हा रसायने खरेदीवर खर्च होतात. शेती व्यवसाय फायदेशीर ठरवण्यासाठी मागील काही वर्षांपासून झिरो बजेट शेतीचा प्रसार सुरू आहे. या शेतीला सर्वदूर प्रतिसाद नसला तरी काही शेतकरी आवर्जून अवलंब करीत आहेत. नैसर्गिक साधनांचा वापर करून 'झिरो बजेट' शेती करतात. पाचलगाव (ता. पैठण) येथील बद्रीनाथ धोंडीराम बोंबले यांनी 'झिरो बजेट' शेती केल्यानंतर शेतीत आमूलाग्र बदल झाला आहे. वरूडी शिवारात ४५ एकर शेती असलेले बद्रीबापू वेगवेगळी पिके घेतात. मोसंबी, अद्रक आणि कापूस या पिकात त्यांनी 'झिरो बजेट' शेतीचा अवलंब केला. जीवामृत आणि बीजामृत यांचा पुरेपूर वापर केला. परिणामी, खर्चात ८० टक्के बचत होऊन उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या मोसंबी चार एकर आहे. एका एकरात ५५ क्विंटल अद्रक निघाली. सहा एकरात ४० क्विंटल कपाशी झाली. शिवाय भुईमूग, मिरची आंतरपीक घेतले. सेंद्रीय शेतीत निश्चित नफा असल्याचा प्रत्यय आला.
'रासायनिक शेती शाश्वत शेती राहिली नाही. या शेतीत फायदा होईल असे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे वर्षभरापूर्वी नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी 'नांदेड ४४' या नॉन बीटी वाणाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन निघत होते. आता रोग न पडणारे बीटी वाण असूनही एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन निघते. जमीन नापीक झाल्याचे स्पष्ट दिसते. जमीन फक्त माती-दगडाची नसून जिवाणूंची असते. या जिवाणूंची वाढ रोखणारे घटक रासायनिक खत आणि औषधीत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला' असे बद्रीनाथ बोंबले यांनी सांगितले. फवारणीसाठी 'दशपर्णी' वापरण्यात आली. वेगवेगळ्या दहा झाडांची पाने ४० दिवस भिजवून औषधी तयार करतात. शंभर लिटर पाण्यासाठी दहा लिटर दशपर्णी वापरतात. रसशोषक किडे, अळी यांचा निपटारा करण्यासाठी दशपर्णीची मात्र लागू पडते. जीवामृत हा 'झिरो बजेट' शेतीतील महत्त्वाचा घटक आहे. २० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, एक किलो गुळ, एक किलो बेसनपीठ आणि बांधावरील माती याचे मिश्रण दोन दिवस भिजवत ठेवतात. एकरी २०० लिटर जीवामृत वापरतात. सात दिवसात मिश्रण कधीही वापरता येते. बुरशीनाशक आणि टॉनिक असा जीवामृताचा दुहेरी उपयोग होतो. नैसर्गिक शेतीसाठी काही निकष आहेत. बियाणे देशी असावे, बियाण्याला बीजामृत लावावे, शेतीत दहा दिवसाला एकदा जीवामृत वापरावे आणि झाडाजवळ पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. या सर्व घटकांचा जिवाणू वाढीवर परिणाम होतो. जिवाणू वाढल्यास शेती जिवंत आणि सुपीक राहते. पाणी तुंबल्यास जिवाणू घटतात. 'झिरो बजेट' शेतीचे मूळ सूत्र लक्षात घेऊन बोंबले यांनी शेतीत प्रयोगशीलता आणली.
'झिरो बजेट' शेतीमुळे खर्चात ८० टक्के बचत झाली आहे. फक्त मजुरांचा खर्च असून शेतीच्या उत्पादनात वाढ झाली आहे असे बोंबले यांनी सांगितले. संपूर्ण सेंद्रीय शेती केल्यास निश्चित नफा मिळतो याचे उदाहरण बोंबले यांनी इतर शेतकऱ्यांना स्वानुभवातून दाखवले. मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकरी हतबल आहेत. हवामान बदल आणि शेतीतील वाढता खर्च शेतकऱ्यांच्या मुख्य अडचणी आहेत. केवळ नैसर्गिक साधनांद्वारे शेती करून उत्तम नफा देणारा 'झिरो बजेट' शेती उपक्रम आदर्श आहे.

नवीन प्रयोग
औरंगाबाद जिल्ह्यात 'झिरो बजेट' शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबाद आणि पैठण तालुक्यात याचे प्रमाण जास्त आहे. जीवामृत, बीजामृत तयार करण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना किचकट वाटते. मात्र, पद्धत समजून घेतल्यास प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. हजारो रुपये मोजून रसायने खरेदी करण्यापेक्षा नगण्य खर्चात शेती कसण्याचा हा प्रयोग फायदेशीर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्टडी अॅब्रॉड’वर शनिवारी सेमिनार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परदेशातील शिक्षणाची संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 'महागाष्ट्र टाइम्स'तर्फे 'स्टडी अॅब्रॉड' या सेमिनारचे शनिवारी (१८ जून) आयोजन करण्यात आले आहे. जेएनईसी कॉलेज कॅम्पसमधील आइन्स्टाइन हॉलमध्ये सकाळी ११ वाजता सेमिनार सुरू होईल.
सेमिनारमध्ये विश्वश्री कन्सल्टन्सीचे अनिरुद्ध हातवळणे व सय्यद नसिरुद्दिन हैदर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. टोफेल, जीआरई, यूएन, सॅट, जी-मॅट आदी विविध परीक्षा कोणत्या देशांसाठी केव्हा घेतल्या जातात, त्यांचा अभ्यासक्रम काय असतो, याबाबत सय्यद नसिरुद्दिन हैदर मार्गदर्शन करतील. कोणत्या देशासाठी कोणती परीक्षा केव्हा असते व त्याची पद्धत कशी असते, त्याबाबत अनिरुद्ध हातवळणे मार्गदर्शन करणार आहेत. 'स्टडी अॅब्रॉड' हा सध्या युवकांच्या करिअरच्या दृष्टिने महत्त्वाचा विषय आहे. याबाबत विद्यार्थ्यांना सखोल व अचूक मार्गदर्शन व्हावे, हा या सेमिनारचा उद्देश आहे.

प्रवेश मोफत
सेमिनारसाठी सर्वांना प्रवेश खुला अाहे. विद्यार्थी, पालकांनी या सेमिनारला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यनाथ बँक पंकजांकडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

राज्याचे लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ बँक निवडणुकीत राज्याच्या ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बाजी मारली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत, सर्वच्या सर्व १७ जागांवर पंकजा मुंडे यांच्या जनसेवा पॅनेलचे उमेदवार विजयी आघाडीवर होते.

बीड जिल्ह्याच्या सहकारातील महत्त्वाची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यंदा राज्याचे लक्ष लागले होते. बँकेचे संस्थापक गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे. पंकजा मुंडे या बँकेवरील पकड कायम ठेवतात का धनंजय मुंडे या बँकेवर ताबा मिळवतात, याची उत्सुकता लागली होती. या बँकेसाठी रविवारी ५५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीला मंगळवारी सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच जनसेवा पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. रात्री दहा वाजेपर्यंत चार फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या आणि जनसेवा पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी आठ हजार मतांनी आघाडीवर होते. यातही खासदार प्रीतम मुंडे यांना सर्वांत जास्त आघाडी मिळाली होती. या निवडणुकीचा फायदा पंकजा मुंडे यांना आगामी काळामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच, मुंडे यांच्या सहकार क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा धनंजय मुंडे यांचा प्रयत्न असून, पुन्हा एकदा त्यांना या प्रयत्नांमध्ये अपयश आले आहे. सुरुवातीपासून जनसेवा पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. तसेच, आघाडीच्या अंतराबरोबरच हा उत्साहही वाढत होता. अखेरच्या टप्प्यावर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजयी जल्लोष सुरू केला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी संधीसाधूंना योग्य धडा शिकविला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांनीही या निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. ते म्हणाले, 'लोकशाहीमध्ये निवडणुका लढवाव्या लागतात आणि त्यामध्ये जय-पराजय होतच असतो. मात्र, सुरुवातीपासून जनसंघाची विचारसणी असणाऱ्या या बँकेत पक्ष म्हणून आम्हाला सात हजार मतदारांनी स्वीकारले, ही महत्त्वाची बाब आहे. या निमित्ताने बँकेतील घोटाळ्यांची, गैरप्रकारांची माहिती सभासदांसमोर मांडण्याची संधी आम्हाला मिळाली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमधील गावाचा कायापालट करणार खा. सचिन

$
0
0

बीडः दुष्काळग्रस्त कऱ्हेवाडीचे (ता. आष्टी) रूपडे लवकरच बदलणार आहे. मास्टरब्लास्टर खासदार सचिन तेंडुलकर याने त्यासाठी आर्थिक मदत देऊ केली. जिल्ह्यातील दुष्काळीस्थितीची जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर तेंडुलकरच्या स्वीय सहाय्यकाने प्रत्यक्ष पाहणी केली होती. कऱ्हेवाडी ग्रामस्थांशी चर्चा करून दुष्काळी झळाही जाणून घेतल्या. त्यानंतर तेंडुलकरने बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पत्राद्वारे खासदारनिधीबाबत कळवले आहे.

कऱ्हेवाडीत पायाभूत सुविधा देणे तसेच, पाणी पातळी वाढण्यासाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे सचिनने जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. विकास कामासाठी सचिनसारखा पालक मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. बीडच्या दुष्काळाची दखल घेऊन सचिनने स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांना फेब्रुवारी बीडमध्ये पाठवले होते. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने आष्टी आणि पाटोदा तालुक्याला भेट दिली. पाटोदा तालुक्यातील कुसळंब आणि आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी या दोन गावांना भेटी दिल्या. यावेळी पाणी, चारा, रोजगार, दळणवळण, रस्त्यांची उपलब्धता यांविषयी चर्चा केली. तसेच कुठल्या प्रकारची मदत दिली जावी याची माहिती कन्हान यांनी घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंदराने कुरतडल्या ६४ हजारांच्या नोटा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दानपेटीत घुसलेल्या उंदराने भाविकांनी दिलेल्या ६४ हजार रुपयांच्या नोटा कुरतडल्या आहेत. दानपेटीत एकूण किती उंदीर घुसले, त्यांनी किती नोटा कुरतडल्या किंवा किती नोटा चालू शकतात, याची माहिती देण्यास संबंधितांनी नकार दिला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या नोटा कुरतडल्याने भाविकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

देवीच्या साडेतीन पीठांपैकी मुख्य पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे मंदिर विविध कारणांनी गाजत आहे. भाविकांनी दिलेल्या सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात तूट आलेली असून, त्याची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे. आता मंदिरातील दानपेटीत उंदीर घुसून भाविकांनी दिलेल्या ६४ हजाराच्या नोटा कुरतडल्या असल्याचे उघडकीस आले आहे. मंदिरातील गुप्तदान पेट्यातील रकमांची मोजदाद नुकतीच करण्यात आली होती. यात मंदिर परिसरातील विविध गुप्तदान पेट्यांतील रक्कम ५७ लाखांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. यापैकी मंदिरातील गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या स्नानगृहात ६४ हजाराच्या नोटा कुरतडल्याचे उघड झाले. तुळजाभवानी मंदिर रात्री बंद झाल्यावर तेथे केवळ जमादारखाण्यातील पोलिस आणि सुरक्षा रक्षक असतात. रात्री अकरा वाजल्यापासून सकाळपर्यंत मंदिराचा परिसर वर्दळमुक्त असतो. त्या कालावधीत उंदरांनी जेथून भाविक पैसे टाकतात तेथूनच प्रवेश केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारी पाश! शेतकऱ्याकडे सून-मुलीची मागणी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गहाण जमीन सोडवण्यासाठी मुलगी आणि सूनेला माझ्याकडे पाठव, अशी मागणी सावकाराने बीडमधील धारुर तालुक्यातील शेतकऱ्याकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यानं सावकारावर केलेल्या या गंभीर आरोपाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतकऱ्यानं केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरु आहे. आरोपात तथ्य आढळल्यास सावकाराविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही याप्रकरणाचा अहवाल मागविला आहे.

शेतकरी इंदर मुंडे यांनी सावकार भगवान बडे यांच्याकडे जमीन गहाण ठेवून कर्ज घेतले होते. कर्ज थकल्यामुळं सावकारानं जमिनीचा ताबा घेतला, अशी तक्रार शेतकरी मुंडे यांनी एप्रिलमध्ये पोलिसांकडे केली होती. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सावकाराने गहाण जमीन सोडवण्यासाठी मुलगी आणि सूनेला पाठव, अशी मागणी केली, असा आरोप शेतकऱ्यानं केला आहे. या प्रकरणाची आम्ही चौकशी सुरु केली असून, योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसामुळे दिलासा; टँकर संख्येत घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. २९ जून रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र दहा दिवसांत ही संख्या बऱ्यापैकी घसरली आहे. सध्या ६०० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान खात्याने पुढच्या दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार पाऊस झाला, तर टँकरची संख्या आणखी घटणार आहे.
भर उन्हाळ्यात जिल्ह्यातील १४ लाख नागरिकांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी दिले जात होते. गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई होती. यंदा मान्सूनने पहिल्या टप्प्यात हुलकावणी दिली. पण नंतर ठराविक कालावधीने पाऊस झाला. गेल्या आठवड्यात जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने कोरड्या साठ्यांमध्ये थोडेफार पाणी साचले. विहिरींनाही पाणी आले. त्यामुळे टँकरची संख्या घटली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात टँकरची संख्या ९५४ झाली होती. ७ जुलै रोजी ती घटून ६०१ झाली आहे. औरंगाबाद तालुक्यात ८०, गंगापूर १३४, कन्नड २३, खुलताबाद १४, पैठण १५४, फुलंब्री २९, सिल्लोड ४२, वैजापूर १२५.

सोयगाव टँकरमुक्त
सोयगाव तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत जोरदार पाऊस झाल्याने येथील टँकरची संख्या शून्य झाली आहे. मे महिन्यापर्यंत तालुक्यात पाणी उपलब्ध होते. उन्हाळा संपता संपता सोयगाव तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळी आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कॉलनीत वनौषधींचे रोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वृक्षसंवर्धन सप्ताहानिमित्त एसटी कॉलनीतील महिलांनी औषधी गुणांच्या वनस्पतींचे रोपण केले. अडुळसा, कोरफड, तुळस, निर्गुडी, गुळवेल अशा औषधी गुणधर्माच्या वनस्पती परिसरात लावण्यात आल्या.
याप्रसंगी वैद्य अनघा नेवपूरकर यांनी औषधी वनस्पतींची सविस्तर माहिती सांगितली. नेवपूरकर म्हणाल्या, 'औषधी गुणधर्माच्या वनस्पती परिसरात लावल्याने आरोग्य समृद्ध राखता येते.'
विविध औषधी वनस्पतींचे फायदे त्यांनी समजून सांगितले. 'वडाचे झाडही महिलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. मुका मार लागल्यास वडाची पाने बांधल्याने सूज उतरते आणि आरामही मिळतो. निर्गुडीच्या पानांचा लेप सांधेदुखीवर उपयुक्त ठरतो. त्याचे इतर दुष्परिमाण होत नाहीत. कोरफडचा उपयोग त्वचारोग, केसांच्या समस्या, स्त्रियांचे आजार, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होतो, वजन नियंत्रणात राहते. गुळवेलचा काढा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. हाडांना मजबूत ठेवतो. मधुमेहावर गुणकारक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ८० महिलांना आरोग्यवर्धक वृक्षांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पुष्पा गायकवाड, वर्षा गवारे, वंदना पोगुल यांची प्रमुख उपस्थिती होती. आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांच्या निरामय डाएट व रिचर्स सेंटरतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ‘इनक्युबेशन सेंटर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील तरुण संशोधक, प्राध्यापकांना मूलभूत व दर्जेदार संशोधनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जमनालाल बजाज इनक्युबेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते शुक्रवारी (८ जुलै) या सेंटरची पायाभरणी करण्यात आली.
सिफार्ट सभागृह परिसरात झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रभारी कुलसचिव डॉ. दिगंबर नेटके, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. एम. डी. सिरसाठ, नलिनी चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या केंद्रातून मराठवाड्यातील तरुण संशोधक, प्राध्यापकांना मूलभूत व दर्जेदार संशोधनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन आणि विकास (आर अँड डी) या माध्यमातून नवीन उद्योजक घडावेत, यासाठी विद्यापीठ अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नव्यानेच सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात या तरुण संशोधकांना प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते २ ऑक्टोबर रोजी (महात्मा गांधी जयंती) करण्यात येईल, असेही कुलगुरुंनी पायाभरणी प्रसंगी सांगितले.या कार्यक्रमास डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. सतीश पाटील, उपअभियंता रमेश क्षीरसागर, संजय हुसे, विष्णू कव्हळे, डॉ. गोविंद हुंबे, शिरीष बर्वे, कंत्राटदार अरुण मापारी आदींची उपस्थिती होती.

उद्योगपती बजाज यांच्याकडून २५ कोटी
विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या इनक्युबेशन सेंटरसाठी प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज २५ कोटी रुपये देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. त्यातील दीड कोटीचा पहिला हप्ता विद्यापीठास प्राप्त झाला आहे, असे सांगण्यात आले.

'ग्रीन बिल्डिंग' उभारणार
जवळपास आठ हजार चौरस फूट जागेत इनक्युबेशन सेंटरची 'ग्रीन बिल्डिंग' उभारण्यात येणार अाहे. इमारतीमध्ये नैसर्गिक हवा, प्रकाश व अन्य घटक या असणार आहेत. पहिल्या मजल्यासाठी एक कोटी ५२ लाखांचा खर्च प्रस्तावित असून, विद्यापीठात अद्ययावत सोयी सुविधासह असलेली पहिलीच इमारत असेल, अशी माहिती अभियंता आर. डी. काळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर ः पावसाच्या सरींसगे उस्मानभाईंची भजी

$
0
0

Shripad.kulkarni@timesgroup.com
भजी हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ. पावसाला सुरुवात झाली की घरोघरी भजांची फर्माइश केली जाते. भजी करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते. कुणी भजी करताना पिठात मसाले, जिरे, ओवा टाकतात. कुणी बटाटे, पालक यांचा वापर करतात. आळुच्या पानांचीही भजी केली जातात. कांदा भजे, पकोडे हे प्रकार बहुतेकांना आवडता. हरभरा डाळीच्या भजांप्रमाणे मूग डाळीचे भजेही अनेकांना आवडतात.
काही हॉटेल केवळ भज्यांसाठी प्रसिद्ध असतात. कोकणवाडीतील उस्मानभाईचे हॉटेलही त्यापैकीच एक. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून उस्मानभाईंची भजी प्रसिद्ध आहेत. स्टेशन रोडवर अग्निशमन दलासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली त्यांची रोज गाडी उभी असे. गाडीभोवती दिवसभर खवय्यांची गर्दी असे. तेव्हापासून उस्मानभाईंची भजी प्रसिद्ध आहेत. पूर्वी स्टेशन रोडवर देवगिरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी असे. उस्मानभाईंच्या भजांची गाडी हा विद्यार्थ्यांचा खास ठेपा होता. काही वर्षांपूर्वी कोकणवाडीतील जय टॉवर्समध्ये त्यांच्या हॉटेलचे स्थलांतर झाले.
भज्यांची गाडी सुरू करण्यापूर्वी उस्मानभाईंनी अनेक हॉटेलांत काम केले. 'अनेक ठिकाणी काम करताना विविध पदार्थ बनविणे शिकलो. त्यातून मोठा अनुभव मिळाला. या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. भजांसाठी दर्जेदार आणि ताज माल वापरला जातो. भजांची चव आणि ते गरम सर्व्ह केले जातात. त्यामुळे भजी खवय्यांच्या पसंतीला उतरली आहेत,' असे उस्मानभाई सांगतात.
भज्यांसाठी चांगल्या दर्जाचा, ताजा माल वापरला जातो. हरभरा डाळीचे भरडा पीठ वापरले जाते. कांदा, हिरवी मिरची, मीठ मिसळून भज्याचे पीठ भिजविले जाते. पीठ भिजविण्यापूर्वीच कांदा, मिरच्या चिरल्या जातात. डाळीचे भरडा पीठ वापरल्यामुळे भजी खुसखुशीत होतात, असे ते सांगतात. गेल्या ४० वर्षांत त्यांच्या भज्यांची चव कायम आहे.
तळलेली मिरची आणि पाव यांच्यासोबत गरम भजी सर्व्ह केली जातात. ही भजी गरमगरम खाण्याची मजा काही औरच आहे. या खुसखुशीत भज्यांची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळते. भजी खाण्यासाठी दिवसभर गर्दी असते. त्यात विद्यार्थी, तरुणांची संख्या मोठी आहे. भज्यांसाठी अनेकजण वेटिंगमध्ये असतात. खास उस्मानभाईंच्या हॉटेलातील भजे खाण्यासाठी शहरभरातून खवय्ये येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक घोटाळा: धनंजय मुंडेंना फरार घोषित करणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह बँकेच्या आजी-माजी संचालकांना लवकरच फरार घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फरार घोषित करण्यात येणाऱ्या आजी-माजी संचालकांमध्ये आमदार अमरसिंह पंडित, खासदार रजनी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह तब्बल ९३ जणांचा समावेश आहे.

बीड जिल्हा बँकेतून विनातारण कर्ज मंजूर करणं, बेकायदा कर्ज वाटप करणं आदींसह वेगवेगळ्या १४ गुन्ह्यांमध्ये अनेक नेत्यांसह बँकेच्या आजी - माजी संचालकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अखेर आरोप निश्चित करण्यात आले. आरोपपत्रात धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील यांच्यासह ९३ जणांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले. मात्र, एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे सर्व आरोपींना लवकरच फरार घोषित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images