Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लातूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश केतकर यांचं आज निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून पार्किन्सनने आजारी असलेल्या केतकरांना लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

मूळ पुण्याचे असलेले केतकर यांनी बी.एस.सी. व बी.पी.एड. पदव्या घेतल्यानंतर काही काळ नोकरी केली. पुढे ते संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत झाले. काही काळ सांगली, सोलापूर येथे काम केल्यानंतर पुढे त्यांनी मुंबई महानगर प्रचारक, महाराष्ट्र प्रांताचे शारीरिक शिक्षण प्रमुख, पश्चिम क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख, अखिल भारतीय प्रचारक प्रमुख, सह-सरकार्यवाह इत्यादी जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या.

चैतन्याचा झरा असलेले केतकर देशभरातील लाखो कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे जणू पालकच होते. त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक कामावर त्यांच्या आत्मियतापूर्ण शैलीचा प्रभाव होता. देशभरातील प्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची तपशीलवार माहिती लक्षात ठेवून पुढच्यावेळी त्यांची प्रेमळ विचारपूस करणारे केतकर हे संघकामाचा चालता-बोलता स्मृतिकोश होते.

गेली काही वर्षे वार्धक्यामुळे तसेच अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त असूनही सुरेश केतकर यांनी शक्य त्या पद्धतीने संघाचे काम सुरूच ठेवले होते. आपल्या प्रत्येक प्रवासात निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, पत्रांमार्फत देशभरातील कार्यकर्त्यांचे शंकासमाधान करणे अशी कामे ते सातत्याने करीत होते. क्रीडा भारती, संस्कार भारती, अखिल भारतीय किसान संघ अशा अनेक संस्था-संघटनांना उभे करण्यात केतकर यांचे मोठे योगदान होते.

गेले काही वर्षे पार्किन्ससचा विकार बळावल्यामुळे लातूर येथे त्यांचा मुक्काम होता. त्यांना विवेकानंद रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लातूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

स्वतःसाठी कठोर आणि इतरांसाठी मृदू असलेले केतकर हे आपले 'रोल मॉडेल' होते. कर्मठ आणि नेमस्त जीवन जगत असतानाही सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रेमाचा स्पर्श झाला होता. त्यांच्या स्मृती यापुढेही आम्हाला काम करण्याची प्रेरणा देत राहतील, अशा भावना संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलावात बुडून दोनविद्यार्थ्यांचा मृत्यू

$
0
0

तलावात बुडून दोन
विद्यार्थ्यांचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दोन वेगवेगळ्या घटनांत शनिवारी मृत्यू झाला. पहिली घटना खवड्या डोंगराजवळील परिसरात घडली. येथे पाण्याच्या डबक्यात बुडून पवन गजानन हाके (वय १२) या सहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत विशाल लक्ष्मण जाधव (रा. सातारा परिसर) या मुलाचा मृत्यू झाला.
सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरात शेजारी-शेजारी राहणारे विशाल जाधव व अशोक यशवंत थेले (वय १६) हे दोघेही दुपारी अडीचच्या सुमारास सातारा तांडा भागातील भारत बटालियनजवळ असलेल्या तलावाजवळ फिरायला गेले. विशाल पोहण्यासाठी तलावात उतरला, तर अशोक त्याचे कपडे सांभाळत उभा राहिला. विशाल तलावात गेला, पण खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात येताच अशोकने मदतसाठी आरडाओरड केली. त्यावेळी तेथून जात असलेल्या एक दुचाकीस्वार थांबला व त्याने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दल आणि सातारा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने विशालचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह घाटीत उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठविण्यात आला असून, सातारा पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बायपास, जालना रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर

$
0
0

बीड बायपास, जालना रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महामार्ग (जालना रोड) व बीड बायपास रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर लगेचच सुरू करण्यात येणार असल्याचे शनिवारी स्पष्ट करण्यात आले. ही कामे 'नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया'तर्फे (न्हाई) केली जाणार आहेत. तीन वर्षांत दोन्ही रस्ते सिमेंट काँक्रिटचे झालेले असतील, अशी ग्वाहीदेखील यावेळी देण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबरला याबाबतची घोषणा केली होती. केंब्रिज स्कूल ते नगरनाका हा १४ किलोमीटरचा जालना रोड काँक्रिटचा करण्यासाठी ४०० कोटींची आणि बीड बायपाससाठी २५० कोटींची तरतूद त्यांनी जाहीर केली होती. याशिवाय मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग येथे दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी शंभर कोटींची घोषणाही त्यांनी केली होती. या कामांचे नियोजन प्रत्यक्षात कुठपर्यत आले आहे, ते कसे केले जात आहे याचा आढावा शनिवारच्या बैठकीत घेण्यात आला.
दोन्ही रस्त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. जुलै अखेरपर्यंत ती पूर्ण होईल. त्यानंतर टेंडरचा मसुदा 'न्हाई'च्या मुख्यालयास पाठवला जाईल. राष्ट्रीय स्तरावर निविदा काढल्या जातील. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. जालना रोडवर सुरुवातीला साइड रोड आणि फुटपाथचे काम केले जाईल. त्यानंतर संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करून काँक्रिटीकरण केले जाईल. तोपर्यंत नागरिकांना साइड रोड आणि फुटपाथचा वापर करता येईल. बीड बायपासवरही असेच काम केले जाणार आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. नाधी पांडेय यांच्या उपस्थितीत खैरेंनी वैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयात ही बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे प्रकल्प संचालक यू. जी. चामरगोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अब की बार उड्डाणपूल चार!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोडवर (छत्रपती शिवाजी महामार्ग) केंब्रिज स्कूल, विमानतळ, आकाशवाणी आणि नगरनाका या चार ठिकाणी उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. याशिवाय धूत हॉस्पिटल आणि महर्षी दयानंद चौकात भुयारी मार्गाचे काम केले जाईल, असे शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले. रस्ता रुंदीकरणासाठी जयभवानीनगरात पुन्हा पाडापाडी केली जाणार आहे.
रुंदीकरणासाठी आवश्यक असलेले मार्किंग आठवडाभरात करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे शहरातील जालना रोड, बीड बायपास, सिडको बसस्टँड चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन आणि मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते बीड बायपास या रस्त्याचे काम देखील केले जाणार आहे. या रस्त्यांच्या कामासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. सिडको बसस्टँड चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनपर्यंतचा रस्ता सहा पदरी करण्याचे नियोजन आहे. यासाठी रस्त्याची ३० मीटर रुंदी लागणार आहे. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी या भागात पाडापाडी केली. तेव्हा रस्ता २४ मीटर रुंदीचा गृहित धरला होता. विकास आराखड्यातही तो २४ मीटर रुंदीचाच आहे, पण आता सहा पदरी रस्त्यासाठी आणखी सहा मीटरपर्यंत भूसंपादन करावे लागेल. मार्किंग करून तेवढे भूसंपादन महापालिकेने करून द्यावे, अशी मागणी बैठकीत अधिकाऱ्यांनी केली. शहर विकासाच्या दृष्टिने महत्त्वाचा असलेला हा रस्ता रुंद करण्यासाठी लवकरात लवकर मार्किंग करा, असे खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले. महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या संदर्भात नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेतला. विकास आराखड्यानुसार तो रस्ता २४ मीटर रुंदीचा होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तो ३० मीटर रुंद हवा असेल, तर पुन्हा मार्किंग करावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले. आठ दिवसात मार्किंग करून त्याचा अहवाल द्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जालना रोडच्या सहापदरीकरणासाठी ४५ मीटरचे भूसंपादन आवश्यक आहे. या रस्त्यावर सर्व मालमत्तांचे भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे रस्त्याचे काम करण्यात अडचणी येऊ शकतात, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यू. जी. चामरगोरे यांनी दिली. यावर महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भूसंपादनाबद्दल माहिती घेतली. चार मालमत्ता संपादित करण्याचे बाकी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढच्या शनिवारपर्यंत भूसंपादन करून ४५ मीटरचा रस्ता उपलब्ध करून द्या, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

रस्ते विकासातील ठळक मुद्दे
- ४५ मीटर रुंदीचा आणि १४ किलोमीटर लांबीचा जालना रस्ता सिमेंट काँक्रिटचा होणार.
- या रस्त्यावरील पथदिवे, जलवाहन्या, ड्रेनेज लाइन, टेलिफोनसह अन्य केबल्सचे स्थलांतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाणार.
- जालना रोड आणि बीड बायपास रोड मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन जवळ रेल्वे ओव्हरब्रीजच्या माध्यमातून जोडला जाणार.
- बीड बायपास रस्त्यावर शिवाजीनगर, संग्रामनगर, एमआयटी कॉलेज या ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम केले जाणार.
- पैठण-औरंगाबाद रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार असून, या रस्त्याचे काम औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोरून हर्सूल टी पॉइंटपर्यंत करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पैठण ते हर्सूल टी पॉइंट रस्ता सुस्थितीत येईल.
---
मटा भूमिका
---
खेळखंडोबा
---
औरंगाबादकरांच्या गैरसोयींमध्ये भर घालण्याचा चंगच राज्यकर्त्यांनी बांधलेला दिसतो. आता लोकांना या रस्त्यावरून 'सी-सॉ'चा खेळ करीत जावे लागणार आहे. तीन-चार वर्षांत १४ किमीच्या छत्रपती शिवाजी महाराज महार्गावर ९ उड्डाणपूल दिसणार आहेत. २००८ मध्ये तेव्हाचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी चिकलठाणा ते महावीर चौक असा एकच उड्डाणपूल बांधण्याचा विचार मांडला, तेव्हा स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. रेल्वेस्टेशन, भडकलगेट आणि मोंढा हे अपवाद वगळता उर्वरित उड्डाणपुलांच्या खालून जेवढा वापर होतो, त्याच्या २५ टक्केच वरून केला जातो. नव्या चार पुलांचीही हीच अवस्था असेल. सहापदरी अतिक्रमणमुक्त आणि सिग्नलयुक्त रस्ता हीच शहराची गरज आहे. ती ओळखून नियोजन करावयास हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावे व्यवस्थापन कौशल्याचा आदर्श

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'माजी खासदार (कै.) मोरेश्वर सावे म्हणजे वेळ आणि व्यवहाराचा आदर्श होते. एखादे काम करताना ते अक्षरशः हात धुवून मागे लागत. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, सामाजिक जाण आणि विकासाचा दृष्टीकोन त्यांच्याकडे होता. सावेसाहेबांचे हे गुण आपण अंगिकारले पाहिजेत,' असे मत विविध मान्यवरांनी शनिवारी व्यक्त केले.
(कै.) सावे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तापडिया नाट्यमंदिरात त्यांच्या 'सार्थक' या आत्मवृत्ताचे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. बागडे म्हणाले, 'काकांचा (सावे) आणि माझा परिचय ते राजकारणात येण्यापूर्वीपासून होता. शिवसेनेच्या मदतीने ते अपक्ष महापौर झाले. सावे कायम वेळेचे बंधन पाळणारे होते. वेळ आणि व्यवहार कसा पाळावा हे त्यांच्यापासून शिकण्यासारखे होते. एखादे काम तडीस नेण्यासाठी ते झपाटून काम करत. शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. 'माधवराव चित‍ळे म्हणाले, 'माझी सावेंशी उतारवयात मैत्री झाली. ते निर्भिड, स्पष्टवक्ते होते. सहकार्याची भावना ठेवून त्यांची कायम मदत करण्याची प्रवृत्ती होती. प्रांजळपणा या त्यांच्या गुणामुळे आम्ही जवळ आलो. औरंगाबादला चांगले स्वरुप देण्यासाठी त्यांनी धडाडीने प्रयत्न केला.'कागलीवाल यांनी सांगितले, की '(कै.) मोरेश्वर सावे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. परिवार व सामाजिक जबाबदारी सांभाळताना राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे कार्य बहुमोल आहे. ते जिंदाजिल व परखड मत मांडणारे होते. उद्योग क्षेत्रासाठी ट्रान्सपोर्टची मुहुर्तमेढ सावेंनी औरंगाबादमध्ये रोवली.'खैरे म्हणाले, 'सावे साहेबांमुळेच मी पहिल्यांदा आमदार होऊ शकलो. शहर व मराठवाड्यातील शिवसेना वाढीत त्यांचा मोठा वाटा आहे. जनसंपर्क कसा करावा हे मी त्यांच्याकडून शिकलो.'यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे, उद्योगपती नंदकिशोर कागलीवाल, खासदार चंद्रकांत खैरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार संजय सिरसाट, प्रशांत बंब, नारायण कुचे, लीलाताई सावे, कमांडर अनिल सावे, अजित सावे, आमदार अतुल सावे, अंजली राऊत यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आमदार शिरसाट, रहाटकर यांनीही आपले विचार मांडले. आमदार अतुल सावे यांनी प्रास्ताविक केले. कमांडर सावे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

राजकीय कोपरखळ्या
आमदार शिरसाट आणि खासदार खैरे यांनी भाषणातून राजकीय उल्लेख करत अंतर्गत तसेच भाजपला टोले लगावले. हे पाहून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही खैरेंना राजकीय कोपरखळ्या मारल्या. बागडे म्हणाले, '१९८८मध्ये पालिका निवडणुकीसाठी युतीच्या चर्चेसाठी खैरेंपेक्षा सुभाष पाटील आणि प्रदीप जैस्वाल हेच अधिक दिसत. सावे वेळेचे बंधन पाळणारे होते. खैरे त्यांचे पट्टशिष्य आहेत, पण ते वेळेचा गुण मात्र विसरले आहेत, ते का हे कळत नाही. पूर्वी कार्यकर्ते निवडणुकीसाठी पैसे दिले की त्याचा हिशेब देत असत. आज मात्र तंत्र बिघडले आहे. ते कुठून बिघडले कळत नाही.' खैरेंना संबोधून ते म्हणाले, की 'हे तंत्र तुम्ही राजकारणात आल्यापासून बिघडले की काय ? ' त्यावर जोरदार हशा पिकला. खासदार खैरे म्हणाले, '१९८८ च्या पालिका निवडणुकीसाठी युती करा म्हणून मी मागणी केली, पण हरिभाऊंनी त्याला नकार दिला. पुढे युती झाली. सावेसाहेबांच्या पुस्तकात ' खैरेंना शिवसेनेत विरोध होता.' असा उल्लेख आहे. तो विरोध आजही आहे,' असे शिरसाटांकडे पाहून खैरे म्हणाले. '२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व मतदारसंघातून कामाला लागण्याचे मी अतुल सावेंना सांगितले होते. त्याबद्दल संजय केणेकर, डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेकांचा आक्षेप होता, पण मी युतीचा नेता असल्याचे त्यांना सांगून भाजपमध्ये दुसरा कोण उमेदवार आहे का ? असा प्रश्न केला होता. युती तुटेपर्यंत मी सावेंसाठी आग्रही होतो. भाजपकडून सावेंचे नाव निश्चित होत नसताना त्यांना शिवसेनेकडून तिकीट देण्याचीही तयारी होती, पण तसे झाले नाही.'आमदार शिरसाट म्हणाले, 'खैरेसाहेब (कै.) मोरेश्वर सावेंमुळेच आमदार होऊ शकलो. सावे महापौर असताना पालिकेला एक प्रकारची शिस्त होती. आजही त्याची चर्चा होते, पण त्यानंतर पालिकेला शिस्त लागली नाही. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सखोल अभ्यास महत्त्वाचा:शेख अन्सार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'स्पर्धा परीक्षांची तयारी करताना प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास महत्त्वाचा ठरतो. विषयातील संपूर्ण ज्ञान कसे मिळेल, त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. त्यासाठी अभ्यास करण्याची तयारी असावी. विषयातील संकल्पना स्पष्ट असाव्यात,' असे प्रतिपादन आयएएस शेख अन्सार यांनी आज केले. ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.
अंडर प्रीव्हिलेज्ड पीपल्स् प्युपिल्स अँड टिचर्स असोसिएशन व आन-बान-शान प्रतिष्ठानतर्फे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी या एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जगतगुरू संत तुकाराम सिडको नाट्यगृहात झालेल्या कार्यशाळेला व्यासपीठावर महापौर त्र्यंबक तुपे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आयोजक प्रा. राजन शिंदे, यशवंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अन्सार म्हणाले,'विषयाबाबतच्या आपल्या बेसिक संकल्पना स्पष्ट असायला हव्यात. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर विषयाचा अभ्यास केल्यानंतर त्याचा सरावही महत्त्वाचा असतो. चालू घडामोडींकडे आपले लक्ष असावे. एखादी घटना असेल, तर त्याबाबतची परिपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. अर्थशास्त्रासारखा विषय हा गतिशील आहे. त्यात आकडेवारीला महत्त्व असते. इतिहास, कृषी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषयांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या पातळीवर कसा अभ्यास करता हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयाच्या संकल्पना समजून घेत अभ्यास केल्यास परीक्षा सोपी होते,' असे ते म्हणाले. दिवसभराच्या कार्यशाळेत त्यांनी अभ्यासक्रम, ऐच्छिक विषय कोणते, पुस्तकांची निवड, मुलाखतीची तयारी अशा विषयांवर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, 'स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर शिस्त महत्त्वाची. जीवनात शिस्त असेल, तर आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो.' मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, 'स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही. चांगला अभ्यास, विषयांची तयारी, विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटीस देताच कारवाई कराः आयुक्त

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'अतिक्रमण हटावसाठी नोटीस दिली, तर कारवाई झालीच पाहिजे. नोटीस देऊनही कारवाई होत नाही, हे आता सहन केले जाणार नाही,' असे म्हणत महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
सुपारी घेऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात असल्याचा आरोप सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात शनिवारी अतिक्रमण हटाव विभागाच्या आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात आतापर्यंत किती जणांना नोटीस दिल्या, त्यापैकी किती जणांवर कारवाई केली, सर्वांवर कारवाई का केली नाही, अशा प्रश्नांचा भडिमार आयुक्तांनी केला. या प्रश्नांना उपायुक्त रवींद्र निकम यांनी नेहमीच्या पद्धतीने छापील उत्तरे दिली. 'नोटीस दिली तरी न्यायलयाच्या स्थगितीमुळे पुढील कारवाई करता येत नाही,' असे ते म्हणाले. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. 'कायद्याच्या चौकटीत राहून नोटीस देत असाल, तर न्यायालयाची स्थगिती येण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या अतिक्रमणाबद्दल नोटीस दिली, तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे. शहरातील अनधिकृत होर्डिंगसंदर्भात सोमवारपासून कारवाई सुरू करा,' असे आदेशही बकोरिया यांनी दिले. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी बांधकाम परवानगीबद्दल प्रश्न विचारले, पण त्यांना समर्पक माहिती देता आली नाही. आयुक्तांनी त्यांचीही कानउघाडणी केली.

विशेष सभेची मागणी करणार
अतिक्रमणांच्या विषयात आयुक्त, नगरसेवक व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतील असे वाटले होते, पण त्यांनी अधिकाऱ्यांचीच बैठक घेतली. अतिक्रमण हटाव आणि मालमत्ता कर आकारणी या दोन्ही विषयासंदर्भात महापौरांनी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी, अशी मागणी करणार असल्याचे, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी पत्रकारांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू मोडक एकांकिका स्पर्धा ऑगस्टमध्ये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा अहमदनगरसह औरंगाबाद केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. येत्या २० व २१ ऑगस्ट रोजी स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल, अशी माहिती प्रवीण कुलकर्णी यांनी दिली. तापडिया आर्ट गॅलरीत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांसाठी २०१० यावर्षी कलायात्रिक नाट्यजल्लोष आणि आयआयआयडी अहमदनगर सेंटर यांनी नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धा सुरू केली. मागील पाच वर्षांपासून स्पर्धा फक्त अहमदनगर जिल्ह्यापुरतीच मर्यादित होती. यंदापासून औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात स्पर्धा होणार आहे. नगर जिल्ह्यातील नामवंत कलाकार प्रा. मधुकर तोरडमल, दत्तोपंत अडगटला, रुस्तुम हाथीदारू, सदाशिव अमरापूरकर, मिलिंद शिंदे यांच्या नावाने पारितोषिक दिले जाते. येत्या २० व २१ ऑगस्ट रोजी प्राथमिक फेरी असून नगर येथे २७ व २८ ऑगस्टला अंतिम फेरी होईल, असे अमोल खोले यांनी सांगितले. येत्या १० ऑगस्टपर्यंत संघांनी प्रवेश नोंदणी करणे आवश्यक आहे. सांघिक प्रथम पारितोषिक रोख सात हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रोख पाच हजार रूपये व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक तीन हजार रूपये व प्रमाणपत्र आहे. याशिवाय तेरा वैयक्तिक पारितोषिके आहेत. अधिक माहितीसाठी पी. डी. कुलकर्णी, अमोल खोले, प्रसाद बेडेकर, अमित खताळ यांच्याशी संपर्क साधावा किंवा natshreshthashahumodak या फेसबुक पेजवर माहिती उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक संकटावर मात करत वाटचाल

$
0
0


Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबादः कान्यकुब्ज ब्राह्मण समाज प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील. व्यवसाय व नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तो स्थायिक झाला. या समाजाला एकत्रित करण्यासाठी 'कान्यकुब्ज ब्राह्मण महासंघा'ची स्थापना करण्यात आली. आजच्या समाजमनमध्ये या समाजाची ही रोचक वाटचाल.
उत्तर प्रदेशात बहुसंख्येने असलेला कान्यकुब्ज ब्राह्मण समाज इतर राज्यात अल्पसंख्याक म्हणून गणला जातो. प्रत्येक जिल्ह्यात या समाजातील मंडळी कार्यरत आहेत. मात्र, अन्य समाजाच्या तुलनेत त्यांची संख्या तोकडी. महाराष्ट्रातही हा समाज अल्पसंख्यांक. त्यामुळे तो शासकीय सुविधांपासून वंचित आहे. पूर्वीच्या काळात पूजापाठ हाच या समाजाचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत होता. काळानुसार हा समाजही बदलत गेला. आता व्यवसायापेक्षा नोकरी मिळवण्यावर युवकांचा अधिक भर असतो.
औरंगाबादमध्ये या समाजाची जवळपास पाचशे घरे आहेत. या समाजात एकूण ७२ गोत्र आहेत. सद्यस्थितीत १६ गोत्र प्रचलित असून कनोजिया, सारस्वत, बिजोतिया, गौड अशा १६ पोटजाती आहेत. कान्यकुब्ज ब्राह्मण
समाजातील घरा-घरांत वेद-विद्या पठण होत असल्याने शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. वेद-विद्याची आता अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाने घेतली आहे. विविध खात्यांमध्ये अधिकारी पदावर या समाजाची मंडळी कार्यरत आहेत. शिक्षणाचे प्रमाण मुलांबरोबरच मुलीमध्ये लक्षणीय आहे. त्यामुळे युवा पिढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ग्रामीण भागात हा समाज आहे. मात्र, उच्च शिक्षण घेतलेल्या मुली लग्न करून खेड्यात जाण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे विवाह जुळवण्याकरिता हा मुद्दा अडसर ठरत आहे. हा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी महासंघाने पुढाकार घेतला आहे, पण मुलींबरोबरच पालकांचाही ओढा मुंबई, पुणे अशा शहरांकडे असल्याने हा प्रश्न एक आव्हान बनला असल्याचे डॉ. अजय पांडे यांनी सांगितले.

डॉ. पांडे म्हणाले, 'कान्यकुब्ज ब्राह्मण समाज महासंघातर्फे दरवर्षी वधू-वर परिचय मेळावा घेण्यात येतो. यंदा तो दिवाळी-दसऱ्याच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. गेल्यावर्षी चारशेच्या आसपास वधू-वरांनी यात सहभाग घेतला होता. तसेच सामूहिक मौजीं बंधनाचा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे,' असे पांडे यांनी सांगितले.

पहाटेच लग्न सोहळा
कान्यकुब्ज ब्राह्मण समाजात पहाटे लग्न करण्याची प्रथा आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही प्रथा आजही कायम आहे. पहाटे तीन-चारच्या सुमारास लग्नातील सर्व धार्मिक विधी पूर्ण केले जातात. हा समाज महाराष्ट्रात निवास करून रहात असल्याने येथील प्रथा, परंपरेचेही पालन करतो. समगोत्री विवाह मात्र या समाजात केले जात नाहीत, असे डॉ. पांडे यांनी सांगितले.

विविध सामाजिक उपक्रम
वधू-वर परिचय मेळावा, स्नेहसंमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, करिअर मार्गदर्शन, सामूहिक मौंजी बंधन असे विविध कार्यक्रम कान्यकुब्ज ब्राह्मण महासंघातर्फे नियमित होतात. युवा पिढीबरोबरच महिलांचेही स्वतंत्र कार्यक्रम घेतले जातात. आर्थिक प्रगती केलेली मंडळी समाजात फारशी सक्रिय राहात नाहीत. जे समाजाची नाळ घट्ट ठेवतात, त्यातील अनेक कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. या दोन्ही गोष्टींचा मध्यबिंदू काढून महासंघाचे काम चालते. हा समाज मूळचा उत्तर प्रदेशातील असल्याने अनेकांचे नातेवाईक उत्तर प्रदेशात आहेत. साहजिकच उत्तर प्रदेशाशी हा समाज आजही तेवढाच जोडलेला आहे. महाराष्ट्रात या समाजाच्या पाठीशी राजकीय पाठबळ नसल्याने हा समाज अल्पसंख्यांक म्हणूनच गणला जातो. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे, असे डॉ. पांडे यांनी सांगितले. वर्षापूर्वी ब्राह्मण युनिटी मंचची स्थापना करण्यात आली आहे. वेदपाठ कमी झाले आहेत. हा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने समाजाच्या कार्यासाठी भवन बांधण्याची कल्पना आहे. त्यासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शासकीय पातळीवर त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावती कार पेटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धावत्या मर्सडीज कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता चिकलठाणा आठवडी बाजाराजवळ घडली. आगीत सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. मात्र, कार जळून खाक झाली.

अमरकुमार नवनाथ शिंदे असे कारमालकाचे नाव असून, ते सातारा परिसरात राहतात. सांयकाळी पाचच्या सुमारास शिंदे आपली कार (एमएच-०१-एमए-०४०५) धुण्यासाठी चिकलठाणा शेंद्रा औद्योगिक परिसरात जात होते. चिकलठाणा गावाजवळ जातच कारच्या इंजीन मधून धूर निघू लागला. त्यामुळे ते कार थांबवत बाहेर पडले. काही क्षणातच कार आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे शरद घाटेशाही, एन. के. पठाण, व्ही. बी. कदम, अशोक खोतकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मात्र, तोपर्यत कार जळून खाक झाली होती. या घटनेत कारचे साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१९ वसाहतींमध्ये हायअलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डेंगी आणि गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ होऊ लागली आहे, त्यामुळे महापालिकेने शहरातील २१९ वसाहतींना धोकादायक म्हणून हायअलर्ट जारी केला आहे. या वसाहतींमध्ये डास निर्मूलन व शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी लक्ष दिले जात असल्याचा दावा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी केला.
डेंगीच्या रुग्णांबद्दल माहिती देताना डॉ. जगताप म्हणाले, 'जानेवारीपासून आतापर्यंत डेंगीचे ८० संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत. एकट्या जुलै महिन्यात डेंगीचे २४ संशयित रुग्ण सापडले. गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ३४ आहे. संशयित रुग्ण वाढत असले तरी अद्याप कुणाचाही मृत्यू झालेला नाही, ही आमच्यासाठी जमेची बाब आहे. डेंगी आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात आल्यामुळे शहरातील २१९ वसाहतींमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात सिडको - हडकोतील बहुतांश भाग, चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर, शिवाजीनगर, गारखेडा, हर्सूल आदी परिसराचा समावेश आहे. या सर्व परिसरामध्ये डास निर्मूलनाची विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.

नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाणीपुरवठ्याच्या वेळा व कोरडा दिवस याची सांगड घातली जाणार आहे. डेंगीचे रुग्ण 'स्वच्छ' वसाहतीत जास्त आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे,' असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूत उतरविण्यासाठी लोखंडी गजाने मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुणीतरी करणी केली आहे. अंगातले भूत उतरविण्याच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रयोग करत तिला लोखंडी गंजाने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा छळ सुरू होता. एका जागरुक नागरिकाने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या मुलीची सुटका केली.

पंधरा वर्षांची नंदा. (नाव बदलले आहे) अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी बजाजनगर येथे आई, वडील, लहान भाऊ व बहिणीसह एका किरायाच्या खोलीत राहत होती. आई-वडील दोघेही कंपनीत काम करत. त्यावेळी नंदा नेहमी आजारी पडे. त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून तिच्या आईने डॉक्टराकडे न नेता तिला सुनीता जाधव नावाच्या महिलेकडे उपाचारासाठी नेले. सुनीताने 'नंदाच्या अंगात भूत आहे. करणी केली आहे. ती उतरावी लागेल,' असे सांगितले. त्यानंतर ही बाब नंदाच्या आईने वडिलांना सांगितल्यावर त्यांच्यात वाद झाला. वडिलांना जाधव हिच्याकडे जाणे आवड नव्हते. त्यामुळे आई वडिलांमधील वाद वाढला. नंदा तिन्ही मुलांना सोबत घेत सुनीता जाधवकडे राहण्यास आली. काही महिन्यानंतर नंदाच्या बहिणीला आईने मारहाण केल्याची बाब वडिलांना समजली व त्यांनी बहीणीला सोबत नेले, तर भावाला एका आश्रम शाळेत प्रवेश दिला.

नंदाला नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी मारहाण करण्यात आली. ती घराबाहेर रडत असल्याचे एका जागरुक नागरिकाच्या निदर्शनास आले. त्या व्यक्तीने नंदाची विचारपूस केली. हकीकत समजताच त्याने तातडीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना संपर्क साधत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील व पथकाने कारवाई करत नंदाची सुटका केली व सुनीता जाधवला अटक केली. याप्रकरणी सुनीता जाधवविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानव्ये दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन वर्षांपासून छळ

नंदाने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, थोडी चूक झाली की सुनीता मारहाण करायची. आईला सांगूनही काही उपयोग होत नव्हता. उलट सुनीता आई असून ती आपला सांभाळ करते, असे आई सांगे. फेब्रुवारी २०१६ सुनीताच्या मुलाचे लग्न झाले. त्यानंतर नंदाला सुनीतासोबत करोडी भांगशी माता मंदिर परिसरात राहण्यास जावे लागले. अंगातले भूत काढावे लागेल असे म्हणत नेहमी उपाशी ठेवून लोखंडी गजाने नंदाला सुनीता मारहाण करे. १५ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजता झोपतानात सुनीताने नंदाला मारहाण करत निरंकार उपवास करण्यास सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा सर्व्हरवरील ‘डाटा’ क्रॅश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा, २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासूनचा विद्यार्थ्यांचा ऑनलाइन सर्व्हरवरील डाटा क्रॅश झाला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून निकालापर्यंतच्या या माहितीचा 'बॅकअप' ठेवण्याची यंत्रणा विद्यापीठात नाही. ही माहिती पुन्हा मिळविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातही २३ मार्च २०१६नंतरचा लोकल सर्व्हरवरील 'बॅकअप'ही उपलब्ध होणार नसल्याने डाटाबेस पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया नव्याने करण्याची वेळ परीक्षा विभागावर आली आहे.

विद्यापीठ २००७-०८पासून परीक्षा प्रक्रिया, 'एमकेसीएल'च्या मदतीने 'ई-सुविधे'च्या माध्यमातून राबविते. त्यात महत्त्वपूर्ण असलेल्या 'एक्झाम रिझल्ट प्रोसेसिंग सिस्टीम'मध्ये विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासून परीक्षा, परीक्षांचे निकाल, त्यातील सुधारणा अशा सर्व बाबींचा समावेश आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जाते. या प्रक्रियेचा विद्यापीठाकडे असलेला 'डाटा' ज्या सर्व्हरला जोडलेला आहे, त्याच्या हार्डडिस्क क्रॅश झाल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडे २००७-०८पासून डाटा सध्या नाही. त्यात विद्यापीठाकडे 'ऑटो बॅकअप मिरर सर्व्हर'ही नाही. त्यामुळे हा डाटा कसा मिळवायचा, हा पेच विद्यापीठासमोर आहे. मोबाइलमधील 'डाटा'ही बॅकअप ठेवला जातो, पण विद्यापीठासारख्या संस्थेत निष्काळजीपणा केलाच कसा, असा प्रश्न आहे. या गोंधळात लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडकले आहे.

डाटा मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, मिळाला तरी २३ मार्चपासूनचा डाटा बॅकअप मिळणे अडचणीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. तो डाटा मुख्य सर्व्हरकडेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. २३ मार्चनंतर परीक्षा विभागाने लोकल सर्व्हरवर केलेली प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. त्यात निकाल, गुणपत्रिकेतील सुधारणांचा समावेश आहे. या नोंदी करताना काही त्रुटी राहिल्या तर, ती मोठीच डोकेदुखी ठरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

प्रोग्रामरची तातडीची बैठक

विद्यार्थ्यांची महत्त्वपूर्ण माहिती असलेला 'डाटा' असलेली हार्डडिस्क क्रॅश झाल्यानंतर परीक्षा विभागातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे शनिवारी (१६ जुलै) परीक्षा नियंत्रकांनी 'युनिक'चे संचालक, तांत्रिक अधिकारी, प्रोग्रामरची तातडीची बैठक घेतली. बॅकअप डाटा कसा उपलब्ध करता येईल, संबंधित घटना कोण्याच्या चुकीमुळे घडली, त्याबाबतच्या उपाययोजना काय करायला हव्यात याबाबतची त्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी 'मटा'ला सांगितले.

मी बाहेरगावी असल्याने या प्रकरणाची मला माहिती नव्हती, मी रविवारी सायंकाळी आलो आहे. सोमवारी माहिती घेऊन याबाबत काय झाले ते सांगतो.

डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

सर्व डाटा आमच्याकडे आहे. आज मी 'युनिक'चे संचालक, प्रोग्रामरची बैठकही घेतली. असा काही प्रकार झालेला नाही आणि झाला तरी, चार ठिकाणी बॅकअप असते.

डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

हार्डडिस्क फेल झाल्याच्या कारणाने ही तांत्रिक अडचण आली, परंतु आपल्याकडे डेटा आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत ही प्रकिया सुरळीत होईल. तांत्रिक अडचण होती, बाकी काही नाही.

डॉ. सचिन देशमुख, संचालक, युनिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हात-तोंड बांधून, गोळी झाडून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
एक व्यक्तिचे हात व तोंड चिकटपट्टीने बांधून डोक्यात गोळी झाडून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील शिऊरपासून तीन किलोमीटर अंतरावर उघडकीस आली. या मृतदेहाची ओळख पटली नसून खून करण्याच्या पद्धतीमुळे रहस्य वाढले आहे.
शिऊरपासून औरंगाबाद रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर दादामुनी आश्रमाजवळ साईप्रसाद हॉटेल आहे. हे हॉटेल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या हॉटेलचा परिसर निर्जन असतो. त्याचा फायदा घेत कोणीतरी तीस वर्षीय व्यक्तीला हॉटेलजवळ नेले. तेथे अर्धनग्न करून त्याचे हात-तोंड चिकटपट्टीने घट्ट बांधले. त्यानंतर डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. या साफियाबादवाडी शिवारात नितीन जाधव यांची शेतजमीन आहे. या परिसरातून रविवारी सकाळी १० जाताना त्यांनी हॉटेलकडे डोकावून पाहिले असता एका व्यक्तीचा खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब घटनेबाबत शिऊर पोलिस, साफियाबादवाडीचे पोलिस पाटील अशोक जाधव, संताराम जाधव यांना घटनेची माहिती कळवली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीश्रक हर्ष पोद्दार व शिऊर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँडल मार्चने दणाणले शहर; शेकडोंची हजेरी

$
0
0

औरंगाबाद : कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना १३ जुलै रोजी घडली. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या शहरातील विविध संघटनांनी कॅनॉट प्लेस येथील महाराणा प्रताप उद्यानात श्रद्धांजली सभा घेतली. पीडित मुलीला श्रद्धांजली वाहून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी संघटनांनी केली.
या कँडल मार्चला मराठा संघटनांसह शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हा खटला तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्यानापासून कॅनॉट चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. संबंधित प्रकरण संवेदनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राहुल बनसोड, सचिन मगर, आकाश पाटील, अशोक काळे, सुनील कोटकर, गणेश कोळकर, दीपक पवार, गिरीश गायकवाड, सागर पाटील, पवन भावसकर, नीलेश शेलार या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणांत आले पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दीड महिन्यापासून मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली असली तरी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली नाही, मात्र इतर जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे दुष्काळात तळ गाठलेल्या लहान-मोठे बंधारे, प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमध्ये तब्बल २२७.४२ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाढ झाली आहे.
सध्या मराठवाड्यातील ८४७ प्रकल्पांमध्ये ३६२.८० दशलक्ष घनमीटर (४.५४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला असून, गेल्या आठवड्यामध्ये प्रकल्पांमध्ये १३५.३८ दलघमी (१.६९ टक्के) पाणीसाठा होता. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यात यंदा जूनपासूनच वरुणराजाने कृपादृष्टी केली. जुलै महिन्यामध्येही नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मृतसाठ्यातून उपसा सुरू असलेले विष्णुपुरी, निम्न दुधना, ऊर्ध्व पैनगंगा या प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणामध्येही पाण्याची आवक सुरू झाली असली, तरी अद्यापही धरण मृतसाठ्यातच आहे.
गेल्या दीड महिन्यापासून मराठवाड्यात पाऊस सुरू असून, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे लहान नद्यांना पूर आला आला. लहान-मोठ्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दुष्काळात बंद पडलेल्या बोअरवेल्सला पुन्हा पाणी आल्यामुळे टँकरसंख्येतही झपाट्याने कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील ८४७ प्रकल्पांतील पाणीसाठा तळाला गेला होता. सध्या मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १६४.८८ दशलक्ष घनमीटर (३.२१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यापैकी विष्णुपुरी प्रकल्पात ७२ दलघमी (८९ टक्के), निम्न दुधना ४१ दलघमी (१७ टक्के), तर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पामध्ये ५१.०५ दलघमी (५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ४९, तर १५ दिवसांपूर्वी ३० दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पामधील पाणीसाठ्यात वाढ होणे सुरू आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न मनार व सीनाकोळेगाव या प्रकल्पांतील पाणीसाठा अद्यापही जोत्याखाली आहे.

जायकवाडीत १९० दलघमी
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पावसामुळे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली. एक जूनपासून नाथसागर १९० दशलक्ष घनमीटर पाणी आले आहे. रविवारी प्रकल्पात नागमठाण येथून १२०६ क्युसेक्स पाणी येत होते. जायकवाडीच्या ऊर्ध्वभागामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वरच्या धरणातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याचा ओघ कमी झाला आहे. पाण्याचा ओघ सुरू असला तरी जायकवाडी धरण अद्यापही मृतसाठ्यात आहे. गेल्या आठवड्यात जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणामध्ये दारणा, पालखेड, गंगापूर धरणांतून पाणी सोडणे सुरू झाले होते. परिसरात झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाणी धरणात येत असले, तरी 'जायकवाडी'ला वरच्या भागातून येणाऱ्या पावसावरच अवलंबून रहावे लागणार आहे.

मध्यम, लघु प्रकल्पातही वाढ
मराठवाड्यात असलेल्या ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्यात २२.१३ आणि ७३२ लघु प्रकल्पांमध्ये तब्बल ६६.३६ दशलक्ष घनमीटरची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात प्रकल्पातील उपयुक्त साठा ३२.३८ दलघमी होता. ते ५४.५१ दलघमीपर्यंत वाढला आहे. लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात ५१.४७ दलघमीने वाढ होऊन तो ११७.८३ दलघमीपर्यंत पोचला आहे.

तीन जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा
मराठवाड्यात दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसलेल्या लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप समाधानकार पाऊस झाला नाही. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यात ८०, लातूर ८८.२, तर उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ ७३.९ टक्के पाऊस बरसला. याउलट औरंगाबाद जिल्ह्यात १०७.४, जालना १२०.२, परभणी १०३.७, हिंगोली ११४.७, तर नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या १२८ टक्के पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवीगाळ करणाऱ्या पोलिसाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मद्य प्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारा आणि आपल्याच सहकाऱ्याला धक्काबुक्की करून शिवीगाळ करणारा पोलिस कर्मचारी सतीश कारभारी हंबरडे याला पोलिसांनी अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधीकाऱ्यांनी त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
वाळूज पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी असणारा सतीश हंबरडे हा शनिवारी मध्यरात्री मद्यप्राशन करून महावीर चौक उड्डाणपुलाखाली डस्टर कार उभी करून गोंधळ घालत होता. या घटनेची माहिती काही नागरिकांनी क्रांतिचौक पोलिस ठाणे व वेदांतनगर पोलिस चौकीला दिली. माहिती मिळताच वेदांतनगर पोलिस चौकीचे कर्मचारी सचिन काळे हे सहकाऱ्यासह घटनास्थळी पोचले. त्यांनी हंबरडे याची समजूत काढत होते, मात्र हंबरडेने सचिन काळे व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. त्यामुळे काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हंबरडेला वेदांतनगर पोलिस चौकीत नेले. तेथेही हंबरडेने चौकीतील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून गोंधळ घातला, असे पोलिसांनी सांगितले.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून चौकीच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती रात्रीच्या गस्तीवर असणारे क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागनाथ कोडे यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी वेदांतनगर चौकीत पोचले. तेथे हंबरडेला रात्री एकच्या सुमारास अटक करून त्याच्याविरुद्घ गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन टू वन’ : विश्वकोश निर्मितीसाठी ज्ञान मंडळांचे सहाय्य

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
 राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या कोश डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले आहे का?
विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेल्या वेगवेगळ्या विषयांच्या कोशाचे डिजिटलायजेशन पूर्णत्वास आले आहे. मंडळाच्या वेबसाइटवर पूर्ण माहिती दिली आहे. तीन प्रकारात खंडाची माहिती आहे. खंड एक ते वीस अशी विस्तृत विभागणी आहे. इतिहास, विज्ञान, भाषाशास्त्र अशा प्रत्येक विषयांच्या नोंदीचा एक विभाग आहे. तर नोंदीच्या संदर्भाची माहिती देणारा वेगळा विभाग आहे. अभ्यासकांना विविध विषयांची विस्तृत माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.

 पण, राज्यभरातील अभ्यासकांपर्यंत ही माहिती कशी पोहचणार?
 वीस खंडांची एक सीडी तयार करण्यात येणार आहे. महिनाभरात सीडी सर्वांसाठी उपलब्ध होईल. सर्वांना परवडेल अशा माफक दरात सीडी मिळेल. शिवाय लहान-मोठ्या गावात सीडी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पूर्वी कोश निर्मितीत छपाई हाच एकमेव मार्ग होता. बदलत्या काळानुसार मंडळाने डिजिटायजेशनचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे कामात सुलभता निर्माण होणार आहे.

 विश्वकोश मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर कोणता नवीन प्रकल्प हाती घेतला आहे?
 कोश निर्मितीचे काम अत्याधुनिक पद्धतीने करीत आहोत. पुढील काम डिजिटल असणार आहे. प्रत्येक विषयाचे संकेतस्थळ उपलब्ध करणारा नवीन प्रकल्प आहे. विषयाची विभागणी केली असून, यात ६० ज्ञान मंडळे नियुक्त केली आहेत. राज्यातील विद्यापीठे, संशोधन मंडळ यांना कामाशी संलग्न केले आहे. फक्त पुणे किंवा मुंबईतील अभ्यासकांचीच ज्ञान मंडळावर नियुक्ती केली नसून राज्यातील वेगवेगळ्या भागातील अभ्यासक आहेत. मुंबई विद्यापीठाची १० ज्ञान मंडळे, मराठी विज्ञान परिषदेचे एक, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे एक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची दोन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची दोन अशी जवळपास २४ ज्ञान मंडळे निवडली आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी अजून चर्चा बाकी आहे. संबंधित विषयाचा तज्ज्ञ समन्वयक असणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक विषयाची एक वेबसाइट सुरू होणार आहे.

 विश्वकोश निर्मितीत काही विषयांचे पुरेसे संशोधन आवश्यक असल्याचे वाटते का?
 विश्वकोश मंडळात वेगवेगळ्या विषयांच्या १८ हजार ६०० नोंदी आहेत. अर्थात, माहिती-तंत्रज्ञान, संगणक अशा नवीन विषयांवर पुरेसे संशोधन आवश्यक आहे. काही नोदी कालबाह्य झाल्या आहेत, काही नोंदी अद्ययावत करणे सुरू आहे आणि काही नवीन नोंदीची भर घातली जाणार आहे. काही विषयांचे परिपूर्ण काम झाले आहे, मात्र कमी संशोधन व मांडणी झालेल्या विषयांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या कामासाठी राज्य शासनाने पुरेसा निधी दिला आहे. प्रत्येक काम पुरेशा तळमळीने पूर्ण करण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रभर विखुरलेली संशोधक मंडळी शोधणे आणि अधिक अभ्यास करून घेण्याची गरज आहे.

 मराठी भाषा मृतप्राय झाल्याची चर्चा असताना विश्वकोश निर्मितीचा भाषेसाठी काय उपयोग होतो?
 विश्वकोश मंडळात संशोधनाची प्रक्रिया सुरू असते. विविध ज्ञानशाखांचे ज्ञान कोशातून उपलब्ध होते. मराठी भाषेला या शब्दसंपत्तीतून जिवंतपणा प्राप्त होतो. वेगवेगळ्या विषयांचे शब्द मराठी शब्दकोशात समाविष्ट झाल्यास भाषेला निश्चित फायदा होईल. अर्थात, संशोधन व लेखनाची प्रक्रिया फार मोठी आहे. अगदी झटपट काम शक्य नसते. काळाशी सुसंगत माध्यमातून मराठी भाषेत मौलिक काम करण्याचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गणित’ कसं सोडवायचं?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळेत सुरुवातीपासून मनात भीती निर्माण करणाला विषय म्हणजे गणित आणि इंग्रजी. दहावीच्या परीक्षेत 'इंग्रजी'चा टप्पा अनेकांनी पार केला, मात्र गणिताने घात केला. दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांना गणिताने खिंडीत गाठल्याचे समोर आले आहे. दहावीची पुरवणी परीक्षा सोमवारी (१८ जुलै) सुरू होत अाहे. या परीक्षेत विभागात एकूण १६ हजार १६८पैकी तब्बल १२ हजार ४८९ विद्यार्थी गणिताचा पेपर देणार आहेत. 'गणित' कसं सोडवायचं, असाच प्रश्न त्यांच्यासमोर प्रश्न उभा आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १८ जुलैपासून दहावीची पुरवणी परीक्षा सुरू होत आहे. फेब्रुवारी-मार्च परीक्षांच्या निकालानंतर लगेच जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्याचे हे दुसरे वर्षे. शालेय जीवनातील शेवटचा टप्पा म्हणजे दहावी. हा टप्पा पार करताना अनेकांना गणित विषयाचाच अडसर ठरल्याचे समोर आले आहे. पुरवणी परीक्षेत सर्वाधिक परीक्षार्थी संख्या असलेले विषय गणित व भूमिती आहेत. औरंगाबाद विभागातून १६ हजार १६८ विद्यार्थी ही पुरवणी परीक्षा देणार आहेत. ५२ परीक्षा केंद्राहून ही परीक्षा होत आहे. यात गणित विषयाच्या बरोबरीने कोणताच विषय नाही. गणित व भूमिती विषयाचे १२ हजार ४८९ परीक्षार्थी आहेत. त्याखालोखाल इंग्रजीत ५ हजार ८४०, तर मराठी विषयाला ३ हजार ५४६ परीक्षार्थी आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या गणिताच असल्याचे पुन्हा समोर आले आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.

नापास विद्यार्थ्यांना ही संधी
आपला वर्ग मित्र, मैत्रिणींसोबत पहिल्यांदा कॉलेजमध्ये जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. अशा फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने लगेच जुलैमध्ये परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांसोबत कॉलेजला जाण्याची ही परीक्षा म्हणजे संधी आहे. या परीक्षेत यश न मिळाल्यास नाहीतर त्यांना पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल.

विषयनिहाय परीक्षार्थी
इंग्रजी.........................५८४०
मराठी.........................५४६
गणित पेपर-१...............१२४८९
गणित पेपर-२...............१२४८९
विज्ञान-तंत्रज्ञान..............३६०७
इतिहास-राज्यशास्त्र........१४१०
माहिती संप्रेशण तंत्रज्ञान..१३८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थिंनीत वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वसतिगृहात राहण्यावरून प्रशासन आणि विद्यार्थिनीत रविवारी (१७ जुलै) वाद झाला. अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्याने प्रशासनाने खोली रिकामी करण्यास दोन विद्यार्थिनींना सांगितले. त्यांनी खोली रिकामी न केल्याने खोलीला कुलूप लावण्यात आले. 'या प्रकरणात आमची चुक नसून प्रशासनानीच चूक आहे,' असे सांगत विद्यार्थिनींनी रविवारी चक्क कुलगुरूंच्या बंगल्याबाहेर भोजन करत आंदोलन केले, तर या विद्यार्थिनी अनधिकृत राहत असल्याचे प्रशासनाकडून सांगणत आले.
विद्यापीठातील वसतिगृहात राहण्यावरून आज प्रशासन आणि विद्यार्थिनीमधील वाद गाजला. एमफिल अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थिनींना कालावधी संपल्याने खोली रिकामी करण्याचे आदेश विद्यार्थी कल्याण विभागाकडून देण्यात आले. या विद्यार्थिनींनी खोली रिकामी केली नाही. त्यामुळे प्रशासनाने त्या खोलीला टाळे लावले. या मुलींची व्यवस्था कॉमन रूममध्ये केल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईने संतापलेल्या विद्यार्थिनींनी पूर्वीचीच खोली हवी, असे सांगत रविवारी कुलगुरूंच्या बंगल्यासमोर भोजन करून आंदोलन केले. 'आमचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. कालावधी संपला असला, तरी गेस्ट चार्ज देऊन राहण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळे तीच खोली देण्यात यावी,' अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

आम्ही गावाकडे गेलो होतो तेव्हा आमच्या रूमला लॉक लावण्यात आले. एमफीलचा कालावधी संपल्याचे सांगितले जात आहे, परंतु तसे नाही. अभ्याक्रम पूर्ण झाला असता तर येथे राहायची काय गरज होती. आम्ही गेस्ट चार्ज भरूनही राहायला तयार आहोत.
- गीता यादव, विद्यार्थिनी.

या विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रमाचा कालावधी केव्हाच संपला आहे. त्यानंतरही या मुली नियमबाह्यपणे राहत आहेत. नवीन विद्यार्थिनींनाही प्रवेश हवा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना रूम सोडण्यास सांगितले. त्यांची कॉमन रुममध्ये व्यवस्था केलेली आहे.
- डॉ. सुहास मोराळे, संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images