Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाकिस्तानविरुद्ध तरुणांचे उग्र आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निरालाबाजार येथे मंगळवारी सायंकाळी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आणि भारतीय लष्करावर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला.
पाकिस्तानने मंगळवारी काळा दिवस जाहीर केला होता. हिंदू राष्ट्र संघटनेचे विविध पदाधिकारी आणि राष्ट्रभक्त युवकांनी निरालाबाजार येथे मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता एकत्र‌ येऊन या आवाहनाचा निषेध केला. यावेळी ६० ते ७० युवक उपस्थित होते. काश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. या निषेधादरम्यान पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आल्याने आंदोलकांना क्रांतिचौक पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती नितीन उऱ्हेकर या आंदोलकाने 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२५६ कनिष्ठ अभियंते नेमण्याचा मार्ग मोकळा

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे 'पदविकाधारकां'मधून भरतीसाठीच्या जाहिरातील आव्हान देणाऱ्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी फेटाळल्या. या निर्णयामुळे पदांसाठीच्या राज्यस्तरीय नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला.
या आदेशासोबतच खंडपीठाने यापूर्वी पदवीधारकांना सुद्धा १२५६ पदांसाठी अर्ज करण्याची दिलेली मुभा आणि राज्य शासनाने निवड प्रक्रिया राबविण्यास मान्यता देणारा अंतरिम आदेश खंडपीठाने रद्द केला. राज्यस्तरीय निवड समितीने १५ फेब्रुवारी २०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ची १२५६ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. वरील पदांसाठी केवळ 'पदविकाधारकांकडून' अर्ज मागविले होते. या जाहिरातीस बीड येथील पदवीधारक संग्राम घोळवे व इतरांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले. अर्जदार हे पदवीधारक उच्च विद्याविभूषित आहेत. या पदांसाठी त्यांना अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती, ती मॅटने फेटाळली. या अर्जदारांनी औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या.
कनिष्ठ अभियंत्यांच्या पदांचे वेगवेगळे संवर्ग तयार करण्यात आले आहेत. 'पदविकाधारक' कनिष्ठ अभियंते हे अराजपत्रित अधिकारी असून 'पदवीधारक' हे राजपत्रित अधिकारी दर्जाचे असतात. राजपत्रित आणि अराजपत्रित कनिष्ठ अभियंत्यांचे ७५ आणि २५ टक्के प्रमाण निश्चित केलेले आहे. राज्यघटनेच्या कलम ३०९ नुसार राज्य शासनाने हे नियम तयार केलेले आहेत असा युक्तीवाद सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी केला. पदवीकाधारक आणि पदवीधारकांच्या बढतीचे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या विविध निवाड्यांचा संदर्भ देत गिरासे यांनी १२५६ पदांसाठीची संवर्गनिहाय भरती योग्य असल्याचे प्रतिपादन केले. सुप्रीम व हायकोर्टाच्या निर्णयानुसार एखादी जाहिरात दिल्यानंतर त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर जाहिरातीतील नियमात बदल करता येत नाहीत याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. सुनावणीअंती खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या. गिरासे यांना एस. के. कदम आणि विशाल बडक यांनी सहकार्य केले.

अर्ज करण्याची मुभा
याचिकाकर्ते उच्च विद्याविभूषित आहेत. त्यामुळे पदविकाधारकांऐवजी त्यांचा विचार व्हावयास हवा. राज्य शासनाची वरील पदांसाठीची निवड प्रक्रिया मनमानी आणि असंवैधानिक आहे, ती रद्द करून याचिकाधारकांनाही या पदांसाठी अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांच्या हट्टामुळे विमानास उशीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्ली ते मुंबई तिकीट काढून औरंगाबाद विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन प्रवाशांमुळे विमान उड्डाणास आठ मिनिटे उशिर झाला. या प्रवाशांना मुंबईला पाठवण्यात आले. कॅप्टन व अधिकाऱ्यांनी नियम समजावून सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी हट्ट सोडला नव्हता.
दोन दिवसांपूर्वी दिल्ली-औरंगाबाद-मुंबई हे विमान औरंगाबादला औरंगाबाद विमानतळावर उतरत असल्याची उद्घोषणा विमानात करण्यात आली. या उद्घोषणेनंतर दिल्ली-मुंबई प्रवासाचे तिकीट घेतलेल्या दोन प्रवाशांनी औरंगाबाद येथे उतरण्याचा निर्णय घेतला. दिल्ली-मुंबई तिकीट नियमानुसार औरंगाबादला उतरता येणार नाही, असे कॅप्टनने सांगितले. मात्र, त्यानंतर सुद्धा या प्रवाशांनी लगेज काढून देण्याच मागणी केली. कॅप्टनसह एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात येत नसल्याची माहिती देऊन त्यांची समज काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही प्रवासी जुमानत नसल्याने एअर इंडियाचे अधिकारी व सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून त्याच विमानातून मुंबईकडे रवाना केले. या प्रवाशांच्या हट्टामुळे औरंगाबाद-मुंबई विमानाला आठ मिनिटे उशीर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी वैजापूर
तालुक्यातील शिऊरजवळच्या एका बंद हॉटेलात रविवारी उघडकीस आलेला खून २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या आता चार झाली आहे. दुर्गाप्रसाद मिश्रा, इक्बाल मुसा शेख, भागीनाथ विश्वनाथ शिंदे व रसूल अयुब शेख (सर्व रा. शिर्डी), अशी आरोपींची नावे आहेत.
शिऊरपासून जवळ असलेल्या साईप्रसाद हॉटेलमध्ये झालेल्या खून प्रकरणात शिर्डी येथूनच आणखी दोघांना शिऊर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. १७ जुलै रोजी शिऊरजवळील बंद हॉटेलात एका अज्ञात व्यक्तीचे तोंड-हात चिकटपट्टीने घट्ट बांधून कानपटीत गोळी झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेने जिल्ह्यातील पोलिस दल हादरून गेले होते. मात्र शिऊर पोलिसांनी अवघ्या १५ तासात घटनेचा छडा लावत खून झालेली व्यक्ती शिर्डी येथील व्यापारी निशिकांत पांडे असल्याचे स्पष्ट केले. त्या दिशेने तपास केला असता पांडे यांचे जवळचे दोन मित्र संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. परंतु, चौकशीअंती दुर्गाप्रसाद मिश्रा व इक्बाल मुसा शेख यांनी खुनाची कबुली दिली. याप्रकरणी आणखी काही साथीदार असल्याचा संशय असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासोबत शिऊर पोलिसांनी सोमवारी रात्री शिर्डी येथे जाऊन आणखी दोघांना अटक केली. भागीनाथ विश्वनाथ शिंदे (वय ३५) व रसूल आयुब शेख (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी चार संशयित आरोपींना वैजापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या मोहिमेत सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनि धनंजय फराटे, पो.हे.कॉ रोहिदास तांदळे, पो.कॉ. ए. एस मगर, के. बी. रावते, स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार दीपक सरोदे, पो. कॉ. गणेश मुळे, सागर पाटील यांनी यशस्वी कामगिरी केली.

हा खून आर्थिक देवाणघेवाण आणि अपहरणातून झाला आहे. या घटनेत आणखी काहींचा सहभाग असू शकतो. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे.
हर्ष पोद्दार, सहायक पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रशरविरुद्ध शेतकरी हरित प्राधिकरणात

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
दगडखाण व क्रशर बंद करण्यासाठी औरंगाबाद तालुक्यातील रामपुरी येथील शेतकऱ्यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. या अर्जावर प्रतिवादी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन आणि पर्यावरण खाते, औरंगाबादचे जिल्हाधिकारी खनिकर्मचे उपसंचालक व क्रशर मालक पोपटलाल चौडिया, कृष्णा बनकर यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य न्या. यू. डी. साळवी व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी दिले आहेत.
अजंठा इंटरनॅशनल विपश्यना समिती आणि रामपुरी येथील शेतकरी रघुनाथ मोटे, शशिकलाबाई गायकवाड, बिनाबाई शेलार, अण्णा वाकडे, अर्जुन साबळे यांनी हरित न्यायाधिकरणाकडे अर्ज केला आहे. समितीचे विपश्यना केंद्र आहे. अन्य शेतकऱ्यांची त्यांच्या मालकीची शेती आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये स्वतःच्या मालकीच्या विहिरी आहेत. मौजे रामपुरी (गट नं. ४१) येथे चार महिन्यांपूर्वी दगडखाणी सुरू केल्या आहेत व क्रशरही बसवले आहेत. या खदाणींत सुरूंग लाऊन दगड फोडले जातात, त्यामुळे मोठमोठे आवाज होतात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनचाही आवाज येतो. दगडाच्या क्रशिंगमुळे निर्माण होणारे धुळीचे कण या शेतकऱ्यांच्या पिकांत जातात त्यामुळे फळझाडे, भाजीपाला शेती यांच्या लागवडीवर धुळीच्या कणांचे वाईट परिणाम होत आहेत. या क्रशरचा शेतकरी कुटुंबांना आणि विपश्यना संस्थेला त्रास होत आहे. धुळीचे कण शरिरासाठी घातक आहेत. हे उत्खनन विनापरवानगी सुरू आहे. स्टोन क्रशरमुळे ध्वनी व वायूप्रदूषण दिवसेंदिवस वाढत जाते. याला प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी हे जबाबदार आहेत. या क्रशर मालकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आक्षेप अर्जात नोंदविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या क्रशर मालकांनी परवानगी घेतलेली नाही. तरीही बेकायदेशीररित्या हे उत्खनन सुरू आहे, असा दावा अर्जात केला आहे. क्रशर मालकांवर कायदेशीर कारवाई करून ते बंद करण्याची विनंती शेतकऱ्यांनी अर्जात केली आहे. शेतकरी आणि विपश्यना केंद्रातर्फे असीम सरोदे हे बाजू मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या जलफेरभरण मोहिमेचा फज्जा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाण्याची बचत करण्यासाठी यंदा महापालिका स्तरावर अनेक उपक्रम राबविण्याचा निर्धार झाला. जलफेरभरणासाठी शहरवासीयांमध्ये जागृती आणण्यासाठी सक्ती करण्यासंदर्भात चर्चा झाली. याची सुरुवात पालिकेतून करावी, असे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सूचविले होते. महिना उलटून गेला तरी पालिकेत यासंदर्भात काहीच हालचाल नसल्याने या मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे.
पाण्याची बचत व साठवणूक करण्यासाठी पालिकेच्या पुढाकारने दोन महिन्यांपूर्वी एक परिसंवाद घेण्यात आला होता. त्यात अनेक संस्था, संघटनांनी पाणीबचतीचे उपाय सूचविले होते. त्यानंतर पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. शहरातील नागरिकांना जलफेरभरण सक्तीचे करावे, अशी सूचना मांडली गेली. त्यावर आयुक्त बकोरिया यांनी याची सुरुवात आपल्याला आधी करावी लागेल. पालिकेच्या इमारतींचे जलफेरभरण करावे लागेल. याशिवाय महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या घरात जलफेरभरण केले पाहिजे. त्याचा अहवाल विभागप्रमुखांनी द्यावा, असे सूचित केले होते. विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाचे प्रमाणपत्र द्यावे, असे बकोरियांनी सांगितले होते. त्यास महिना उलटून गेला तरी जलफेरभरणाचा अहवाल एकाही अधिकाऱ्याने सादर केलेला नाही. त्यामुळे या मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...भक्तांचा कल्लोळ दाटला!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील वेगवेगळ्या मंदिरात व आश्रमात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपूजन आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. भजन, प्रवचन आणि सत्संगाने शहर दुमदुमले.
राज्यभरातील भाविकांच्या जयघोषात मिटमिटा येथील स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. संस्थान चित्रकूट करवी, उत्तर प्रदेश येथील विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथांच्या गादीचे विद्यमान अधिपती मंगलनाथ महाराज यांनी पूजन केले. आश्रमात सकाळी आठ वाजता प्रातःस्मरण आणि मानसपूजा करण्यात आली. त्यानंतर विभूती अभिषेक, परात्पर सद्गुरू पूजन, श्री सद्गुरू पूजन, यज्ञ समिधा अर्पण आदी कार्यक्रम झाले. भाविकांनी 'श्री मंगलगाथा' ग्रंथाचे चक्रीपारायण केले. दुपारी १२ वाजता श्री नारायण स्तोत्र पठण आणि महाआरती झाली. भाविकांनी दुपारी भंडारा व महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी श्री मंगलनाथ महाराज यांचे गुरुचरित्र महात्म्यावर प्रवचन झाले. शहरातील निवडक मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यानंतर सांगता झाली. महोत्सवानिमित्त धार्मिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते. महोत्सवासाठी वेदांत रत्नपारखी, रंभाजी धोंडरे पाटील, देविदास कुलकर्णी, डॉ. पार्थ रत्नपारखी, विकास अधिकार, सुभाष गायकवाड, सुरेश कुलकर्णी, लक्ष्मीकांत खिची, संजय सोनवणे यांच्यासह अनेक साधकांनी सहकार्य केले.

साई मंदिरात गर्दी
देवळाई परिसरातील साई टेकडी येथील साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. साईबाबांच्या २५ फुटी मुर्तीची महाआरती करण्यात आली. ११ लाख नामाचा जप करण्यात आला. कार्यक्रमाला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची उपस्थिती होती. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

जैन मंदिरात गुरुपौर्णिमा
राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी भगवान शांतीनाथाचा पंचामृत अभिषेक, नित्यनिमय पूजा करण्यात आली. दिलीपकुमार कासलीवाल, सुरेशकुमार व विनोदकुमार कासलीवाल यांच्या हस्ते पादपक्षालन व गुरूपूजा करण्यात आली. राजाबाजार मंदिराचे विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ, चातुर्मास समिती यांनी यावेळी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर!

0
0


Dhananjay.Kulkarni
@timesgrop.com
औरंगाबाद: चिकल‌ठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीत तीन युनिट सुरू करून आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या दिगंबर मुळे यांना औद्योगिक क्षेत्रात गिअर्सचा अनभिषिक्त सम्राट मानले जात आहे. कायम हसतमुख राहणारे मुळे आयटीआय झाल्यानंतर सरळ व्यवसायाकडे वळले. आपले अढळस्थान निर्माण करताना त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला.
दिगंबर मुळे लातूर जिल्ह्यातील जगळपूरचे. घरी केवळ १० एकर शेती. आईवडिलांचा शेतीचा व्यवसाय. दिगंबर यांना शेतीची चांगली जाण, पण काहीतरी वेगळे करण्याची उर्मी त्यांनी बाळगलेली. शिक्षणात बारावीनंतर आयटीआय करून आपल्याला पारंपरिक नोकरी किंवा काही टर्नर, फिटर म्हणून राहायचे नाही, हे त्यांनी आयटीआय झाल्यावरच मनात पक्के केले. १९९४ साली आयटीआय झाल्यावर एक वर्ष पहिली आणि शेवटची नोकरी केली, ती औरंगाबादमध्ये वाळूजमधील सिविंड ट्यूब्ज कंपनीत. नोकरीत सीएनसी मशिनपासून गिअर व विविध कंपोनंटच्या निर्मितीप्रक्रियेत हातखंडा निर्माण केला. यात आपणच असे युनिट का सुरू करू नये असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला. वीरभद्र एंटरप्रायजेस नावाने पहिली कंपनी स्थापन करून चिकलठाणा एमआयडीसीत युनिट सुरू केले. टुलरूम आणि विविध कंपोनंट बनवून शाफ्ट आणि गिअर्स कसे बनवायचे याचे अनुभवातून शिक्षण घेतले. आयटीआयच्या आधी जगळपूरमधील सर्वमित्र डीएड, बीएडला गेले. मी एकटाच कमी मार्क पडले म्हणून या शिक्षणक्षेत्राकडे जाऊ शकलो नाही, पण वेगळे काहीतरी करण्याची उर्मी मनात कायम होती. मार्क्स कमी पडले, माझ्याकडे पैसा नाही, ही गोष्ट आपल्या आवाक्यातली नाही, असे म्हणणे हा एक बहाणा आहे. आपल्यात काही करून दाखवण्याची जिद्द, धमक, प्रबळ इच्छा शक्ती असेल, तर माणूस काहीही करू शकतो. या विचारातून मी लघु उद्योग सुरू केला आणि आज तीन कंपन्यांचा मालक आहे, हे सांगताना मुळे यांच्यातील 'आत्मविश्वास' ओसंडून वहात होता.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुळे यांनी डी.एड.करून शिक्षक व्हावे, असे त्यांच्या आई-वडिलांना वाटे. मात्र, खासगी डी.एड. कॉलेजमध्ये भरण्यासाठी आवश्यक पैसा नसल्यामुळे त्यांनी नांदेड येथील 'आयटीआय'मध्ये (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) प्रवेश घेतला. शिक्षक होण्याऐवजी आयटीआय करून त्यांनी सिविंड कंपनीत डेव्हलप्मेंट शाखेत नोकरी केली. एक वर्षाच्या नोकरीच्या काळात आलेल्या अनुभवावरून त्यांना असे वाटले की, आपणही लघु उद्योग सुरू करावा. याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी फार काही गुंतवणुकीची गरज नाही. सुरुवातीला, म्हणजे १९९४मध्ये त्यांनी त्यांच्या एका टर्नर ट्रेडमध्ये असलेल्या मित्रासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. मात्र, व्यवसायासाठी जागा कोठून मिळवायची असा प्रश्न होता. यासाठी त्यांनी बा. ह. कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांना आपली सर्व योजना सांगितली. यावर त्यांनी आपली चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील जागा भाड्याने देवू केली. या जागेवर मुळे यांनी मामाच्या मदतीने आई-वडिलांकडून मिळवलेल्या पस्तीस हजार रुपयांची गुंतवणूक करून एक लेथ आणि एका ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने व्यवसायास सुरुवात केली. मुळे यांनी पार्टनरशिपमध्ये चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सर्व्हिस सेक्टरमध्ये २००१-२००२ मध्ये पंतप्रधान अर्थसहाय्य योजनेतून (पीएमआरवाय) अर्थसहाय्य घेवून वीरभद्र इंडस्ट्रीज नावाने व्यवसाय सुरू केला. व्यवसाय वाढला, व्याप वाढला. त्यामुळे मुळे यांनी पार्टनरशिप सोडून आपला स्वतंत्र व्यवसायही सुरू केला. तेव्हा त्यांची भरभराट झाली. व्यवसाय वाढला. एका उद्योगापासून तीन उद्योग थाटले गेले. यातून मग सामाजिक, औद्योगिक प्रगती साधली गेली. आज ते दिवसाला २ हजार गिअर्स आणि शाफ्ट बनवतात. वेगळे होताना स्वत:चे मशीन आणि दोन लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन नवीन व्यवसाय सुरू केला. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जिद्दीच्या जोरावर नवीन उद्योग केवळ स्थिरच केला नाही, तर २००३पासून या उद्योगाने वेग घेतला. पुढे २००७मध्ये मुळे यांनी वाळूज येथे सेकंड सेलमध्ये प्लॉट घेतला आणि तेथे 'विजय गिअर्स' नावाचे दुसरे युनिट उभारले. हे युनिट उभारले आणि 'लाइफ की निकल पडी' अशा वेगात भरभराट झाली. एवढ्या वर्षातील व्यवहारामुळे त्यांच्यावर एस. बीएच. चिकलठाणा (इंडस्ट्र‌िअल ब्रॅंच) यांचा विश्वास बसला आणि मुळे यांना सीएनसी मशीन घेण्यासाठी अर्थसहाय्य केले. मुळे यांच्या विजय गिअर्स कंपनीत आज एकूण ५५ कर्मचारी आहेत. त्यापैकी तीन जण अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधर, एक अभियांत्रिकी शाखेतील पदविकाधारक आणि उर्वरित कर्मचारी आयटीआय, औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी कर्मचारी आहेत. मुळे यांच्या प्रेमळ स्वभावामुळे २००३ पासून त्यांच्यासोबत असलेले दोन-तीन कर्मचारी अजुनही त्यांच्या कंपनीत कार्यरत आहेत. अशा या सहकार्यांच्या बळावर त्यांनी आज एवढी प्रगती केली की, त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल आज ८ कोटीच्या घरात जावून पोहोचली आहे. ऑटो गिअर्सचे उत्पादन करत असलेल्या 'विजय गिअर्स'कडून 'इनसर गिअर्स, लोम्बार्डिनी, प्रांशु इलेक्ट्रिकल्स, प्रिमियम ट्रान्समिशन आदी ५ ते ६ कंपन्यामध्ये गिअर सप्लाय केले जातात. कंपनीत सध्या सुसज्ज अद्ययावत तंत्रज्ञानाचा गिअर मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे. कंपनीतील सर्व मशीन्स जर्मनीतून आयात करण्यात आल्या आहेत. जे मार्केटमध्ये उपलब्ध नाही, ते मशीन सेटअप करण्याचा मुळे यांना छंद आहे. वाळूज औद्योगिक परिसरात सिलिंड्रीकल ग्राइंड, हॉबिंग मशीन्स मुळे यांनी सर्वप्रथम आपल्या कंपनीत आणल्या. भविष्यात ट्रान्समिशन गिअर बॉक्स, प्लॅनेटरी गिअर बॉक्सचे उत्पादन, तसेच गिअर ग्राइंडिंग करण्याचा मुळे यांचा मानस आहे. आपल्या यशाचे गमक विषद करताना मुळे म्हणाले, लहानपणापासून काहीतरी वेगळे करायचे असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे कमी शिक्षण, पैशाची अडचण, तंत्रज्ञानाचा अभाव आदी अडचणी माझ्या मार्गात अडथळा निर्माण करू शकल्या नाहीत. आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी भाग्यश्रीचे सहकार्य, स्टेट बँक ऑफ हैदराबादने वेळोवेळी केलेली आर्थिक मदत यामुळे आजही मी एवढ प्रगती करू शकलो. नैराश्यावर कायम मात करत आलो. ती मात करताना मित्रमंडळीचा सहभाग मोठा होता.
यात सुधाकर गायकवाड, अंकुश लामतुरे, रवींद्र कोंडेकर, सुनील कीर्दक, दिगंबर देशपांडे आणि मशिन्सची खरेदी विक्रीत मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे 'श्री.' टेक्नो सोल्यूशन्सचे नितीन तोष्णीवाल यांचे कायम मोलाचे सहकार्य राहिले. केवळ आयटीआय झालेले मुळे आज तीन कंपन्यांचे मालक केवळ मेहनत आणि जिद्द ‌यामुळेच झाले. आगामी काळात त्यांना ट्रान्समिशन यु‌निटमध्ये काम करून त्यात अत्या‌धुनिकता आणायची आहे. मुळे यांचा ही तडफ गुरू ठाकूरच्या कवितेची आठवण करून देते...
'असे जगावे छाताडावर
आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर...'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भोगवटा नसलेल्यांना दणका : त्र्यंबक तुपे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'भोगवटा न घेतलेल्या मालमत्तांकडून तिप्पट कर वसूल करा,' असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवारी दिले. महापौरांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत मालमत्ता कराचा मुद्दा चर्चेला आला. शहरात झालेल्या बांधकामांनंतर भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी अनेकजण पुढे आले नाहीत. त्यात बिल्डरांची संख्या मोठी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेकायदा बांधकामांमुळे भोगवटा प्रमाणपत्र मागितले, तर पालिका प्रशासनाकडून दंड आकारला जाऊ शकतो.

प्रसंगी बांधकाम पाडण्याचीही कारवाई होऊ शकते, या भीतीने भोगवटा प्रमाणपत्र घेतले जात नाही, असे सांगण्यात आले. त्यावर महापौर म्हणाले, पुण्यात अशी अडचण आली होती. तेथील पालिकेने भोगवटा प्रमाणपत्र न घेणाऱ्या मालमत्तांना तिप्पट कर लावला होता. त्या धर्तीवर आपल्याकडेही कारवाई करावी. जी बांधकामे अनियमित आहेत. त्यांन नियमानुसार दंड आकारून नियमित करून घ्या. त्यातून कर वसुली अधिक होईल. त्यानंतरही ज्यांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही अशांना तिप्पट कर लावा, असे आदेश दिले.

उपायुक्त अयुब खान यांनी सांगितले, की यंदा २८ कोटी १८ लाख रुपयांची करवसुली झाली. गेल्या वर्षी हे प्रमाण १७ कोटी रुपये होते. दहा कोटी अधिकचे वसूल झाले. मात्र, अनेक मालमत्तांची पालिकेच्या दप्तरी नोंद व्हायची आहे. आमच्या माहितीनुसार ही संख्या एक लाख १९ हजार आहे. करवसुलीसाठी तीन दिवसांत सहा प्रभागांमध्ये कँप घेणार असल्याचे बी.एस. फड यांनी सांगितले. त्याचा पहिला टप्पा म्हणून गुरुवारी वॉर्ड ड ची बैठक घेतली जाणार आहे.

दवंडी देऊन वसुली

मोठ्या थकबाकीदारांना वारंवार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा झालेला नाही. या बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी दवंडी पथक लावण्यात येणार असून त्यांच्या इमारतीसमोर दवंडी लावून करवसुली केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला रोखल्यामुळे टॅँकर बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीला शहराच्या पाणीपुरवठ्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्यामुळे आमच्याच वॉर्डात हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष केले जात आहे. पाण्याची वेळ गैरसोयीची केली आहे. तर वर्षभराचे पैसे भरूनही गुंठेवारी वसाहतीमध्ये असलेले टँकर बंद करण्यात आले आहेत, असा आरोप महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी मंगळवारी केला.

महापौरांच्या आढावा बैठकीत विविध अडचणींचा आढावा घेताना पाणीप्रश्नावर चर्चा आली. महापौर म्हणाले, की माझ्या वॉर्डात पाणीपुरवठ्याची वेळ अत्यंत गैरसोयीची झाली आहे. नागरिकांना रात्री जागावे लागते. हे अचानकपणे कसे काय झाले कळत नाही. उपमहापौर प्रमोद राठोड म्हणाले, की गुंठेवारी वसाहतीमध्ये वर्षभराचे शुल्क घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून हे टँकर बंद करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना विचारले तर टँकर पुरविणाऱ्या कंत्राटदाराने टँकर काढून घेतल्याचे सांगण्यात आले. पैसे जर अॅडव्हान्स घेतले असतील तर नागरिकांना पाणी पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कंपनी प्रशासनाच्या वादात नागरिकांचे हाल होत आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने साहजिकच याचा जाब आम्हाला विचारला जातो. आम्ही समांतरच्या विरोधात ठराव घेतल्यामुळेच हे होत असावे, असा आरोप त्यांनी केला. शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले, की समांतरला १९ कोटी रुपयांचे देणे आहे. कंपनीबाबत निर्णय झाला असेल तरी देय रक्कम आपल्याला द्यावीच लागणार आहे. नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरू नये, अशी सूचना महापौरांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६ मुलांच्या हाती शिक्षणाचे सूर्यकमळ

0
0

Ashish.Chaudhari@timesgroup.com

औरंगाबादः शिक्षण तुमच्या जगण्याला दिशा देते असे म्हणतात. मात्र, ज्यांच्या माथ्यावरचे पाल कधी एकजागी थांबत नाही...आई-वडिलांना आयुष्यभर वणवण केल्याशिवाय दोनवेळचा तुकडा मिळणे शक्य नसते, अशा भटक्या मुलांचे शिक्षण होणार कसे...? यावरचे उत्तर सातारा शाळेतल्या शिक्षकांनी शोधले. त्यांच्या प्रयत्नामुळे १६ विद्यार्थ्यांना शाळेची दारे खुली झाली.

राज्यात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. अनेक कुटुंबांचे सतत स्थलांतर सुरू असते. अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. पैठण तालुक्यातील डोंबारी समाजातील काही कुटुंब सातारा परिसरात पाल करून राहतात. हाताला मिळेल ते काम, पारंपरिक कला सादर करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलांच्या जीवनातून शाळा कोसो मील दूर होती. मात्र, सातारा परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या कविता साळुंके, वैशाली सोनवणे या शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे या मुलांना शाळेची गोडी लागली. ही मुले शाळेत दाखल झाली आहेत. हे शिक्षक शाळेत जात असताना त्यांना मुले रस्त्यावर खेळण्यात गुंग असताना दिसायची. त्यांचे अंधकारमय भविष्य पाहून त्यांच्या अंतकरणात कालवाकालव व्हायची. ही मुले शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

शिक्षकांनी मोठ्या धाडसाने या कुटुंबांना मुलांच्या शिक्षणाबद्दल विचारले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. अनेकांनी अर्धवट शिक्षण सोडलेले. तुम्ही स्थलांतर केले तरी शिक्षण थांबणार नाही, याची शाश्वती दिली. या दिलाशानंतर पालक या मुलांच्या प्रवेशासाठी सहमत झाले. वयानुसार या विद्यार्थ्यांना योग्य त्या इयत्तेत प्रवेश देण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. अन् ती बाराखडी शिकण्यात दंग झाली. शाळेतर्फे या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापक मंजुश्री राजगुरू यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाले.

या शाळाबाह्य मुलांचा समावेश

अजय सोपान वाघ (इयत्ता पहिली), शिवानी आकाश वाघ, राम कल्याण वाघ, करिश्मा रूपचंद वाघ, राज हरिचंद वाघ (इयत्ता दुसरी), रोशनी रूपचंद वाघ, अक्षय सोपान वाघ, दिपाली दिलीप वाघ, ज्ञानेश्वर रूपचंद वाघ (इयत्ता तिसरी), अर्चना कल्याण वाघ, छकुली रामदास वाघ (इयत्ता पाचवी), वृषाली भास्कर वाघ (इयत्ता सहावी), संजना सोपान वाघ, रविना रूपचंद वाघ (इयत्ता सातवी), वंदना रूपचंद वाघ, भारती रामचंद्र वाघ.

शाळेत जाता-येता आम्ही या मुलांना पाहायचो. ही मुले शाळेत गेली, तर ती चांगल्याप्रकारे शिक्षण घेऊ शकतील असे वाटायचे. यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबातील प्रमुखांची भेट घेण्याचे ठरविले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांना शिक्षण अर्धवट राहणार नाही याची खात्री दिली. त्यानंतर पालकांनी मुलांना शाळेत प्रवेशित करण्याचा निर्णय घेतला.

- वैशाली सोनवणे, शिक्षक

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशातून आम्ही हा प्रयत्न केला. आमच्या शाळेतील सर्वांना ही बाब आवडली. त्यानुसार आम्ही प्रयत्न केले. आज ही मुले शाळेत दाखल झाली याचा आनंद आहे.

- कविता साळुंके, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळीचे स्टॉल लावणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वसामान्यांना रास्त दरात तूरडाळ मिळावी, यासाठी किराणा मर्चंट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शहरात डाळ विक्रीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. काही भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाहनांमधून डाळीची विक्री करण्यात येणार आहे.

गगनाला भिडलेल्या तूरडाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत तूरडाळ विकण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला. राज्यातील बाजारपेठेत तूरडाळीच्या किरकोळ दरामध्ये वाढ होत असल्यामुळे जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडून तुरीची खरेदी करून त्यापासून प्राप्त होणारी तूरडाळ खुल्या बाजारात स्वस्त दराने वितरित केली जाणार आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा विभागाकडून नुकतीच बैठक घेण्यात आली.

या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर म्हणाले, 'ओपन मार्केटच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वस्त दरामध्ये डाळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात सर्व तयारी करण्यात आली आहे. डाळ विक्री करण्यासंदर्भात शहरातील डी मार्ट, सपना मार्केट, बेस्ट प्राइज, स्टार बाजारसारखे मोठे दालन तसेच किराणा मर्चंट असोसिएशनची बैठक घेण्यात आली. प्रतिव्यक्ती १२० रुपये किलोप्रमाणे डाळीची विक्री करण्यात येणार असून महिन्याभरामध्ये १०० मेट्रीक टन डाळ खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी शहरात किराणा मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून विविध भागांमध्ये स्टॉल्स लावण्यात येणार असून शहराच्या विविध भागात वाहनांमधून डाळ विक्री करण्यात येणार आहे. प्रशासनाची या संदर्भात पूर्ण तयारी झाली आहे.' राज्य शसनामार्फत केंद्र शासनाकडून ६६ रुपये प्रतिकिलो या दराने तुरीची खरेदी करण्यात येणार असून त्या तुरीपासून प्राप्त होणारी डाळ बृहन्मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : घर सांभाळून व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न

0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
हर्सूल परिसरातील भगतसिंगनगर रस्त्यावर गिरजामाता नर्सिंग कॉलेजसमोर एका रो हाउसमध्ये सुवर्णा कटारे राहतात. त्यांचे पती सचिन कटारे एका कंपनीत आहेत. घरी पतीसह सासू-सासरे, एक मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मुलगा चौथीत, तर मुलगी दुसरीला आहे. या दोघांची शाळा दुपारची. त्यामुळे दुपारचा वेळ रिकामाच असतो. हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी कटारे यांनी घरीच साईश्रद्धा येवला पैठणीचा व्यवसाय सुरू केली. सुवर्णा कटारे यांचे शिक्षण डीएमएलटीपर्यंत झाले आहे. या शिक्षणावर त्यांना कुठेही नोकरी करता आली असती, पण त्यांनी घराला प्राधान्य दिले. नोकरी केली, तर वेळेचे बंधन पाळावे लागेल. शिवाय मुलांकडे लक्ष देता येणार नाही, असा विचार करून त्यांनी नोकरीचा मार्ग सोडला आणि स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. त्यांनी हा विचार घरातील सर्वांना बोलून दाखवला. त्यांनीही त्यांना सहकार्य केले. प्रोत्साहन दिले आणि कटारे यांनी स्वतःच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सात-आठ वर्षांपासून साड्या विक्रीचा आपला व्यवसाय होता, पण मध्यंतरीच्या काळात पती नोकरीच्या निमित्ताने बारामतीला गेले. त्यामुळे तीन-चार वर्षे हा व्यवसाय बंद ठेवावा लागला. एका वर्षापूर्वी ते पुन्हा औरंगाबादेत आले. औरंगाबादला आल्यावर व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय सुवर्णा यांनी घरातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन घेतला.
सुरुवातीच्या काळात आम्ही सिडको एन-७ येथे रहात होतो, त्यानंतर भगतसिंगनगर रस्त्यावर रो हाउस घेतले. त्यामुळे बँकेचा हप्ता एकदम वाढला. शिवाय मुलांच्या शैक्षणिक खर्चाने देखील वाढायला सुरुवात झाली. ट्युशनची फी, शाळेच्या बसचे भाडे व अन्य खर्च भागवताना तारेवरची कसरत होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला. 'येवला पैठणी'ने या प्रश्नाची कोंडी फोडली, असे सुवर्णा कटारे यांनी सांगितले.
कटारे यांचे भाऊ येवल्याचे. पैठणी विणण्याचा त्यांचा व्यवसाय. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुवर्णा यांनी औरंगाबादेत पैठणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पैठणीला महिलांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नाही, असे लक्षात आल्यावर पैठणीबरोबर प्युअर सिल्क आणि कॉटनच्या साड्या विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला परिचित महिलांनी साडी विक्रीच्या व्यवसायात कटारे यांना मदत केली. त्यानंतर म्हसोबानगर, मयूरपार्क, छत्रपतीनगर या परिसरातील महिला त्यांच्याकडे साड्या घेण्यासाठी येऊ लागल्या. एका वर्षाच्या काळात महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे व्यवसायात आत्मविश्वास निर्माण झाला, असे त्या सांगतात. पैठणीसह प्युअर सिल्क आणि कॉटनच्या साड्या सुवर्णा कटारे येवला येथून आपल्या भावांच्या मदतीने आणतात. एक रक्कमी पैसे देऊन पैठणी खरेदी करणारे ग्राहक कमी आहेत. त्यामुळे हप्त्यावर पैठणी विक्री करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्याला प्रतिसाद मिळू लागला. आता पैठणीसाठी भिशी सुरू करण्याचे त्यांनी ठरविले आहे. सेमी पैठणीला मात्र बऱ्यापैकी मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. येवल्याहून साड्या पाठवण्यासाठी भाऊ मदत करतात, तर औरंगाबादेत विक्री करण्यासाठी पती सहकार्य करतात असे, त्यांनी नमूद केले. सासू, सासऱ्याची मदत, तर आहेच, असे त्या आवर्जून सांगतात. साडी विक्रीच्या व्यवसायातून मुलांच्या शाळेची फी, ट्युशनची फी, गॅसचे सिलिंडर, घरातील सदस्यांच्या हॉस्पिटलचा खर्च यापैकी काही खर्च भागवता येतो. कुटुंबाला हातभार लावल्याचे समाधानही मिळते, असे कटारे यांनी सांगितले.
भविष्यात आपले स्वतःचे छोटे-मोठे दुकान असावे, असे त्यांचे स्वप्न आहे, परंतु मुलांचे दहावी होईपर्यंत दुकान नको, असे त्या म्हणतात. दुकानावर बसावे लागले, तर मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल शिवाय सासू-सासऱ्यांची काळजी घेता येणार नाही, असे त्यांना वाटते. त्यामुळे घरच्या घरीच साड्या विक्रीचा व्यवसाय करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईने ९ वर्षांच्या मुलीला विकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माय मरो, पण मावशी जगो म्हणतात. इथे मात्र आई आणि मावशीनेच पोटच्या पोरीला देहविक्रीसाठी विकले. राजस्थानमध्ये बुंदी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी बुंदी पोलिसांनी मुलीच्या आईला, तर मुकुंदवाडी पोलिसांनी तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या.

मुकुंदवाडी परिसरात एक मजुरी काम करणारी महिला प्रियकरासोबत राहते. या महिलेला तीन मुली आहेत. यापैकी एकीचे लग्न झाले असून, दोघी अनुक्रमे अकरा व नऊ वर्षांच्या आहेत. या दोघींना शिक्षणासाठी छावणी येथील विद्यादीप बालगृहात ठेवले होते. १४ एप्रिल रोजी शाळेला सुट्या लागल्याने या मुलींना त्यांची आई घरी घेऊन गेली. दरम्यान, २४ जून रोजी जिल्हा महिला बालकल्याण समितीचे अशोक शिंदे यांना रामनगर जि. बुंदी (राजस्थान) येथून कॉन्स्टेबल रणवीरसिंग यांचा फोन आला. त्यांनी एक नऊ वर्षांची मुलगी कुंटणखान्यात सापडल्याची माहिती दिली. या मुलीकडे विद्यादीपची माहिती असल्याने तिने पोलिसांना सांगितले. हा प्रकार समजल्यानंतर बालगृहाच्या अधीक्षकांनी मुकुंदवाडी पोलिसांना माहिती दिली. पीएसआय बनसोड व पथकाने या मुलीचा शोध घेतला. सोमवारी ही मुलगी घरी आल्यानंतर ताब्यात घेऊन विद्यादीप बालगृहात नेण्यात आले. या मुलीची चौकशी केल्यानंतर तिने धक्कादायक माहिती दिली. आपल्याला आई, दोन्ही मावशींनी व नितीन रोकडे नावाच्या व्यक्तीने रेडलाइट एरियात विकल्याचे सांगितले. याप्रकरणी विद्यादीपच्या अधीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मुलीच्या आई, दोन मावशांसह नितीन रोकडेविरुद्ध गुलाम म्हणून विक्री करणे, वेश्याव्यसायासाठी अल्पवयीन व्यक्तीची विक्री व खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुंदी पोलिसांनी या मुलीची सुटका केल्यानंतर तेथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या मुलीच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या मुलीची आई बुंदी पोलिसांच्या ताब्यात असून मुकुंदवाडी पोलिस तिला हस्तांतर करून घेणार आहे.

मुंबईत झाला सौदा

मुलीच्या दोन मावशी मुंबईत राहतात. या मुलीला विक्रीसाठी मुंबई येथे नेण्यात आले. यामध्ये या मुलीच्या आईचा प्रियकर नितीन रोकडे देखील सहभागी होता. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नाव बदलून राहत असलेला नितीन रोकडे उर्फ नितीन साळवेला मुकुंदनगर येथून अटक केली. रोकडेला बुधवारी कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या दोन्ही मावशींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासेरबिनकडून बाँब निर्मिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'इस्लामिक स्टेट' (आयएस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या व १४ जुलै रोजी परभणी येथे अटक केलेल्या नासेरबिन अबुबकर याफई (चाऊस) याने बाँब तयार केला आणि त्या बाँबचे छायाचित्र सिरियास्थित दहशतवादी फारूकला पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बाँब तयार करण्याचे साहित्य नासेरबिनने नागपूर, हैदराबाद व मुंबईतून आणल्याचे आणि त्यासाठी त्याला हवालामार्फत पैसा आल्याचेही 'एटीएस'च्या तपासात निष्पन्न झाले आहे.

नासेरबिन याफई (चाऊस, ३४, रा. देशमुख गल्ली, परभणी) हा इंटरनेटद्वारे 'आयएस' संघटनेच्या संपर्कात होता. इराक व सिरिया या देशांमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, 'एटीएस'ने त्याला १४ जुलै रोजी परभणी येथे अटक केली होती. त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, आरोपी नासेरबिन याच्याकडून २ लॅपटॉप, ५ मोबाइल हँडसेट, २ पेंटड्राइव्ह, १ कार्ड रिडर, १ ब्ल्यूटूथ कनेक्टर, २ बॅटरी सेल, २ पासपोर्ट जप्त करण्यात आले. 'एटीएस'ने केलेल्या तपासात, नासेरबिनने बाँब तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. बाँब तयार करण्याची सगळी माहिती नासेरबिन याला सिरियातील फारूक याने इंटेरनेटद्वारे दिली. त्यानंतर नासेरबिन याने नागपूर, हैदराबाद व मुंबई येथून बाँब तयार करण्यासाठीचे साहित्य आणले आणि बाँब तयार केला. तयार केलेल्या बाँबचे छायाचित्र नासेरबिन याने 'टेलिग्राम अॅप'द्वारे फारूकला पाठवले, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. तपासादरम्यान, नासेरबिन याने 'डिलिट' केलेल्या सर्व फाइल्स, इमेजेस, माहिती 'रिकव्हर' करण्यात आली आहे. 'एटीएस'च्या पथकाने 'अॅप्स'चे कोड हस्तगत केले असून, अकाउंटसची माहिती घेण्यात येत आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.

आता बाँब शोधण्याचे आव्हान

नासेरबिन याने तयार केलेला बाँब हस्तगत करण्याचे आव्हान 'एटीएस'पुढे आहे. त्याला बाँब तयार करण्याचे साहित्य कुणी पुरवले, त्याला नेमके किती पैसे मिळाले, या कटात कोणकोण सहभागी आहे आदींचा तपास करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर आहे. नासेरबिन याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, १५ दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. नासेरबिनला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काळी-पिवळी टॅक्सींना शहरात प्रवेश बंदी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सहा, नऊ आसनी काळी-पिवळी टॅक्सींना शहरात प्रवेश बंदी करणाऱ्या पोलिसांच्या कारवाईस टॅक्सी परवानाधारकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. प्राथमिक सुनावणीनंतर न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या.के.एल. वडणे यांनी प्रतिवादींना नोटीसा बजावण्याचा आदेश बुधवारी दिले.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे नियमन करण्यासाठी, तसेच लोकांना धोका, अडथळा आणि गैरसोय होवू नये म्हणून सहा आणि नऊ आसनी काळी पिवळी टॅक्सींना प्रायोगिक तत्वावर ३ जून २०१५ रोजी शहरात प्रवेश बंदी केली होती. पोलिस आयुक्तांनी महाराष्ट पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ अन्वये ही प्रवेशबंदी लागू केली होती. त्यानुसार फुलंब्रीकडून येणा-या टॅक्सींना दिल्लीगेट पर्यंतच प्रवेशाची परवानगी असून तेथून पुढे टॅक्सीला प्रवेश बंदी केली आहे. नगरनाक्याकडून येणाऱ्या टॅक्सींना लोखंडीपुलापर्यंत, पैठणकडून येणाऱ्या टॅक्सींना रेल्वे स्थानकाजवळील उड्डान पुलापर्यंत आणि जालन्याकडून येणाऱ्या टॅक्सींना चिकलठाणा येथील गोशाळेपर्यंतच प्रवेशाची परवानगी असून तेथून पुढे त्यांना प्रवेश बंदी आहे. कलम ११५ खालील आदेश केवळ ३० दिवसांपर्यंतच वैध असतो. असे असताना गेल्या वर्षभरापासून टॅक्सींना शहरात प्रवेश बंदी अद्यापही सुरू आहे. अशा टॅक्सींवर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करुन दंड वसूल केला जातो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या कारवाईस काळी-पिवळी टॅक्सी परवानाधारक शेख हसन शेख रामजू व इतर ९ जणांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. वैधतेची मुदत संपली तरी पोलिस टॅक्सींना बंदी करून इतर कलमांखाली शहरात अनेक कारवाई करीत आहेत. शहरात अनेक उड्डाणपूल आहेत. आरटीओंनी काळी-पिवळी टॅक्सींना परवाने दिले आहेत. टॅक्सीधारकांनी कर्ज घेवून टॅक्सी खरेदी केल्या आहेत. त्याचे हप्ते भरावे लागतात. शहरात प्रवेश बंदी केल्यामुळे टॅक्सीधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंदीमुळे टॅक्सीधारकांच्या व्यवसायाच्या मुलभूत हक्कावर गदा आली आहे. या उलट ओला, टॅक्सी फॉर शुअर व लक्झरी बसेसला शहरात प्रवेशबंदी नाही, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांचे वकील रामेश्वर तोतला यांनी केला. वैध आदेशाशिवाय पोलिसांनी टॅक्सींना शहरात प्रवेशबंदी करू नये, व्यवसायात हस्तक्षेप करू नये, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांना क्लोरिन ट्रिटमेंटशिवाय पाणी

0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com

औरंगाबाद : समांतर जलवाहनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नक्षत्रवाडी येथील एमबीआर (संतुलित जलकुंभ) गेल्या सहा महिन्यांपासून बंद केल्यामुळे शहराला क्लोरिन ट्रिटमेंटशिवाय पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर बांधलेल्या पंप हाउसद्वारे नाथसागरातील 'रॉ वॉटर' उपसून ढोरकीनमार्गे फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे ते शुद्ध केले जाते. तेथून हे पाणी नक्षत्रवाडी येथे पाठविले जाते. नक्षत्रवाडीला डोंगरावर महापालिकेने 'एमबीआर'ची (संतुलित टाकी) उभारणी केली आहे. डोंगराच्या पायथ्याशी पंपहाउस बांधले आहे. पंपहाउसमधून पाणी 'एमबीआर'मध्ये चढविले जाते, तेथे पाण्याला पुन्हा एकदा क्लोरिनचा डोस देऊन ते शहरात पाठवले जाते.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नक्षत्रवाडीच्या 'एमबीआर'चा वापर फेब्रुवारी महिन्यांपासून बंद केला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंपहाउसमधून एक बायपास कनेक्शन तयार करून पाणी शहरात वळविण्यात आले. त्यामुळे नक्षत्रवाडी येथेपाण्याला दिला जाणारा क्लोरिनचा डोस बंद झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; फारोळा येथे तीन ते चार पार्ट पर मिलिअनचा (पीपीएम) क्लोरिनचा डोस दिला जातो. त्यानंतर नक्षत्रवाडीच्या 'एमबीआर'मध्ये एक ते दोन 'पीपीएम'चा डोस दिला जातो. फारोळा येथे देण्यात आलेला क्लोरिनचा डोसची तीव्रता नक्षत्रवाडीला येईपर्यंत कमी होत होती. त्यामुळे नक्षत्रवाडी येथे क्लोरिनचा डोस देण्यात येत होता. या डोसचा काही अंश पाणी घरापर्यंत येईपर्यंत शिल्लक राहत होता. त्यामुळे जलजन्य आजारांना आळा बसत होता.
नक्षत्रवाडी येथील क्लोरिनचा डोस बंद केल्यानंतर कंपनीने फारोळा येथे देण्यात येत असलेल्या क्लोरिनच्या डोसचे प्रमाण वाढविलेले नाही. त्याचा नागरिकांना उन्हाळ्यात त्रास झाला नाही, मात्र पावसाळ्यात त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. शहरात जलजन्य आजार यामुळे वाढले आहेत.

नक्षत्रवाडी येथील एमबीआर फेब्रुवारी महिन्यापासून बंद केला आहे. ६३२ मीटर उंचीवर हा एमबीआर आहे. एवढ्या उंचीवर पाणी चढवण्याची गरज नाही, असे लक्षात आले. त्यामुळे बायपास तयार करून पाणी वळविले. त्यामुळे शहरात येणाऱ्या पाण्यात १५% वाढ झाली. 'एमबीआर'मध्ये दिला जाणारा क्लोरिनचा डोस आता फारोळा येथे दिला जातो.

- रमेश सोनकांबळे, व्यवस्थापक, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी.

शहरात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी कंपनीने एमबीआर बंद केला व बायपास तयार केला. 'एमबीआर'वर क्लोरिनची ट्रिटमेंट करणे ही जुनी पद्धत होती. आता त्याची गरज नाही. फारोळा येथे आणि जलकुंभात क्लोरिन ट्रिटमेंट केली तरी चालते.

- सरताजसिंग चहल, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जायकवाडी’चे डोळे पाण्याकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निम्मा पावसाळा उलटूनन गेला तरीही जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे. वरच्या धरणातून पाण्याचा ओघ सुरू अाहे, मात्र धरणाची जलसाठ्याची स्थिती गेल्यावर्षीपेक्षाही गंभीर आहे. धरणात उपयुक्त जलसाठा येण्यासाठी अद्याप तब्बल ७४ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे यंदा मार्च महिन्यापासून जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी उपसणे सुरू करावे लागले. गेल्या वर्षी ही परिस्थिती १७ जुलै रोजी ओढवली होती. गेल्या वर्षी २० जुलै रोजी जायकवाडी धरणात उपयुक्त जलसाठ्यासाठी केवळ ७ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज होती. यावर्षी मात्र परिस्थिती गंभीर अाहे. ७४ दशलक्ष घनमीटर पाणी आल्यानंतर धरण उपयुक्त जलसाठा उपलब्ध होईल. सध्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात ६६४ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. गेल्या दोन आठवड्यांत जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली होती. यामुळे नांदूर मधमेश्वर, दारणा, पालखेड आदी प्रकल्पांतून पाणी सोडणे सुरू झाले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाल्याने या पाण्याचा ओघ ओसरला आहे.

५० दिवसांत २०० दलघमी
जायकवाडीच्या ऊर्ध्व भागामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वरच्या धरणातून जायकवाडीत येणाऱ्या पाण्याचा ओघ कमी झाला आहे. १ जूनपासून २० जुलैपर्यंत जायकवाडी धरणामध्ये २०२. ६७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. १ जूनरोजी धरणामध्ये ५१९.७०१ दलघमी पाणी होते. सध्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन साठा ६६४.१५८ दलघमीपर्यंत पोचला आहे.

पाण्याचा ओघ ओसरला
नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसानंतर जायकवाडी धरणामध्ये पाणी येणे सुरू झाले होते. सध्या नांदूर मधमेश्वर येथून ३१५५ क्युसेक्स पाणी येत आहे. दारणा ३८९० क्युसेक्स पाणी सोडलेले आहे. नागमठाण येथून धरणात २१६० क्युसेक्सने पाणी येणे सुरू आहे. जायकवाडीच्या वरच्या भागामधील कालवे सुरू केल्यामुळे आवक पाण्याची काहीशी मंदावली आहे.

वरच्या धरणाची स्थिती
प्रकल्प.......टक्केवारी
करंजवण......४२.०२
वाघाड..........५८.७०
ओझरवेअर...१८.९
पालखेड........३६.७६
गंगापूर.........७०.६९
दारणा..........७५.२३
भावली.........९४.९०
मुकणे..........१९.३७
ना.म.बंधारा..९६.५०
भंडारदरा......५४.६१
निळवंडे........३६.९०
मुळा...........४२.१८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डी येथील घटनेचा काँग्रेसकडून निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोपर्डी (ता. कर्जत, जि. नगर) येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी शहर काँग्रेसने बुधवारी निदर्शने क्रांतिचौकात निदर्शने केली.
घटनेचा तपास राज्य सरकारने वेगाने करावा, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, कुठेही राजकारण न करता तपास व्हावा, पीडित कुटुंबीयांना त्वरित मदत करावी, कोपर्डी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील विद्यार्थिनींना संरक्षण पुरवावे आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलकांनी 'मुख्यमंत्री फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या, निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो, युती सरकार हाय हाय, महिला आयोग हाय हाय,' या घोषणा दिल्या. निदर्शनात शहराध्यक्ष नामदेव पवार, पृथ्वीराज पवार, इब्राहिम पठाण, सरोज मसलगे, रेखा जैस्वाल, समशेरसिंग सोधी, मनोज पाटील, बाबा तायडे, शेख अथर, हमद चाऊस आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्स चोरणाऱ्याला सोमवारपर्यंत कोठडी

0
0

औरंगाबाद : महिलेची पर्स चोरणाऱ्या आरोपीला सोमवारपर्यंत (२५ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी बुधवारी दिले.
या प्रकरणी ज्योती प्रवीण हर्सूलकर (रा. नंदनवन कॉलनी हाउसिंग सोसायटी, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नातेवाईकाच्या लग्नासाठी फिर्यादी ५ डिसेंबर २०१५ रोजी बीड बायपास येथील एका लॉनवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची पर्स आरोपी अंगत पांडुरंग शिंगटे याने लंपास केली होती. पर्समध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह, मोबाइल, पासबूक व चेकबूक असा सुमारे ६९ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता. पोलिस या घटनेचा तपास करत असताना ५ जून २०१६ रोजी आरोपी अंगतने फिर्यादीच्या चोरी केलेल्या पर्समधील दोन चेक वापरले. त्यातील एका चेकवर सव्वा लाखांची रक्कम, तर दुसरा चेक मित्र मोहन तोडकर याला ४० हजारांचा दिला. हे दोन्ही चेक आरोपी अंगतने वटविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, फिर्यादीच्या बँक खात्यात पैसे नसल्याने त्यांच्या बँकेतील ठेव रकमेपैकी १४४ रुपये कपात झाल्याचा मेसेज फिर्यादीला आला. याबाबत बँकेत चौकशी केली असता, ही बाब फिर्यादीच्या लक्षात आली. फिर्यादीने ही माहिती पोलिसांना दिली. आरोपीकडून चोरी केलेले दागिने, मोबाइल जप्त करणे बाकी असून, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सराकारी वकील बी. एम. राठोड यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images