Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोपर्डीप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्यावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोपर्डी (ता. कर्जत, जि. नगर) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे.
महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोपर्डी येथे घडलेली घटना समाजासाठी घातक आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अल्पवयीन मुलींना शालेय शिक्षणादरम्यान संरक्षणीय कडक कायदा करावा, जेणेकरून भयमुक्त वातावरणात मुली शिक्षण घेऊ शकतील. त्याचबरोबर या कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी, अन्यथा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक रेणुकादास वैद्य, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल मुळे, शहराध्यक्ष मिलिंद पिंपळे, सतीश मंडपे, पी. पी. कारेगावकर, अनिरुद्ध गावपांडे, रंजना कुलकर्णी, मीना बेलसरे, रश्मी ठापरे, गौरी पांडे, शुभांगी तिवारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक लुटणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील कायगाव टोका येथे ट्रक लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना जेरबंद करण्यात ग्रामीणच्या दरोडा विरोधी पथकास यश आले आहे. अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. हा दरोड्याचा कट ट्रकच्या क्लिनरनेच रचल्याचे समोर आले आहे.
जितेंद्र पतंगे (रा. जयभवानी नगर) हे १८ जुलै रोजी पुणे येथून ट्रकने एका कंपनीला माल घेऊन औरंगाबादला येत होते. त्यांच्या सोबत क्लिनर प्रवीण मुळे हा देखील होता. त्याचा ट्रक कायगाव टोका येथून जात असतानाच दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी ट्रकला दुचाकी आडवी लावून वाहन थांबविण्यास भाग पाडले. चाकुचा धाक दाखवून सुमारे ५० हजारांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लासूरस्टेशन येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती दरोडाविरोधी पथक घेत असतानाच अशोक भागवत (रा. चिंचखेडा) हा तरुण कामधंदा न करता मौजमजा करत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथक प्रमुख मिलिंद खोपडे व पथकाने त्यास ताब्यात घेतले. चौकशीत हा दरोडा ट्रकचा क्लिनर प्रवीण मुळे याने पुरविलेल्या माहितीवरूनच टाकल्याचे समोर आले. गाडी कुठे आहे, कायगाव टोका येथे केव्हा येणार, पैसे कुठे ठेवले आहे, ही सर्व माहिती मुळे याने टोळीच्या सदस्यांना दिली होती. एवढेच नव्हे तर ट्रक तो स्वतःच चालवत होता. साथीदार येताच त्याने ट्रक थांबविला व फिर्यादी असलेल्या चालक पतंगे यांना संशय येऊ नये म्हणून भेदरल्याचे नाटक केले; तसेच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वाहन नोंदणीसाठी अतिरिक्त पुरावे आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकापेक्षा जास्त रहिवासी पुरावे दिल्यानंतरच यापुढे नवीन वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आरटीओ कार्यालयाने या नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
वाहनाच्या नोंदणीसाठी याआधी वाहनधारकाचा फक्त रहिवासी पुरावा इतर कागदपत्रांसोबत जोडला जात होता. मात्र तेवढा पुरावा अपुरा असल्यामुळे कार्यालयीन बाबींसाठी संबंधित व्यक्तीशी संपर्क करणे अवघड होत होते. काही महिन्यांपूर्वीच वाहनांची किंमत कमी दाखवून त्यानुसार टॅक्स कमी भरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अशा नागरिकांना कागदपत्रांच्या आधारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पत्ते योग्य नसल्याची माहिती समोर आली होती. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून आरटीओचा महसूल वसूल करण्याची कारवाई करण्याची वेळ आली आहे.
या प्रकरणानंतर कार्यालयाने नवा आदेश काढून ग्राहकांना अतिरिक्त पुरावे जोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी व्हॉट्स अॅपवरून प्रिंट काढलेला कोणताही पुरावासुद्धा ग्राह्य धरला जाणार नाही, असेही नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना यापुढे वाहन नोंदणीसाठी एकपेक्षा अधिक पुरावे जोडावे लागणार आहेत. आरटीओ कार्यालयासाठी हे सोयीचे झाले असले तरी यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. वाहन नोंदणीसाठी हा नियम लागू करण्यात आला असला तरी लायसन्स किंवा अन्य कामांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळेच वाहन नोंदणीसाठी हा नियम का लागू करण्यात आला, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वामीजी आसूड ओढणारे क्रांतिकारक!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जातीप्रथेचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नसून, ती केवळ एक व्यवस्था होती. कालपरत्वे ती धर्माशी जोडली गेली. यामुळे धर्मास दूषण लागले. हिंदूधर्माच्या अनिष्ट रूढींवर आसूड ओढणारे स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थाने क्रांतिकारक संन्याशी होते,' असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी केले. तेगीताभवनमध्ये बुधवारी आयोजित मेघमल्हार व्याख्यानमालेत बोलत होते.
प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, रोटरी क्लब औरंगाबाद मिडटाऊन व स्फूर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेघमल्हार व्याख्यानमालेस बुधवारपासून सुरुवात झाली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी गुंफले. 'स्वामी विवेकानंद यांनी मांडलेला हिंदूधर्म' या विषयावर बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, 'शिकागोच्या जागतिक परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी स्वामीजींना संघर्ष करावा लागला. परिषदेत बऱ्याच उशिरा त्यांना संधी मिळाली, पण नंतर जगाने जे ऐकले ते आजही अद्वितीयच. भिन्न भाषा, धर्म,संस्कती असूनही सर्वांना बंधू- भगिनींनो संबोधणाऱ्या स्वामींनी सुरुवातीलाच हिंदूधर्माची व त्याच्या सौंदर्याची ओळख जगास करून दिली. त्यांनी वेळोवेळी धर्मातील अनिष्ट रुढींवर सडेतोड टीका केली. यामुळे दक्षिणेतील मंदिंरांमध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. भगवे वस्त्र धारण करून हिंदूधर्माचे प्रतिनिधत्व करणारे स्वामी विवेकानंद पहिले भारतीय होते. जे स्वतःला समाजवादी म्हणायचे. हिंदूधर्मातील चुकीच्या परंपरांच्या विरोधात ते गेले, पण ते विद्रोही नव्हते. जसे वाट चुकलेल्या मुलास आई वाट दाखवते. तसेच स्वामी विवेकानंद यांनी हिंदूधर्मातील चांगले स्वरुप समोर ठेवले. मात्र, त्यांचे मुख्य कार्य माणूस उभा करणे होते. ते कायमच मनुष्यकेंद्री आयुष्य जगले,' असे डॉ. देशपांडे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर प्रा. दिनकर बोरीकर, आर. पी. दुसे, सीमा काथारवाणी, अलका अमृतकर होत्या. गायत्री कुलकर्णी यांनी स्वागत गायले. तुळपुळे यांनी सूत्रसंचालन केले.

आज धारूरकरांचे व्याख्यान
गुरुवारी डॉ. प्रा. वि. ल. धारूरकर हे 'बदलते प्रसारमाध्यम व आपण' हा विषय व्याख्यानमालेत मांडणार आहेत. व्याख्यानमालेचा समारोप पत्रकार गिरीधर पांडे यांच्या नाट्यअभिवाचनाने होईल. आजचा ज्वलंत विषय पाणी या विषयावर कलाकार काव्यवाचन करतील. दोन्ही कार्यक्रम एन पाच येथील गीताभवनमध्ये सायंकाळी पाच वाजता सुरू होतील, असे आयोजकांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीगुणवत्ता विषयक कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यापासून रोग उद्भवू नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी व उपाययोजना कराव्यात यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषदच्या वतीने पाणीगुणवत्ता विषयक जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळेचे उद्घाटन कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांच्या हस्ते झाले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जी. एम. कुंडलीकर, स्वाती टेकाळे, श्रीमती बेडवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय जोशी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी गटविकास अधिकारी, उपअभियंता, विस्तार अधिकारी, सर्व शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक, पाणी गुणवत्ता सल्लागार, प्रयोगशाळेचे कर्मचारी उपस्थित होते. रबडे, जोशी यांनी उपस्थितांना सूचना दिल्या. एस. के. घुगे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर विरोधातील सुनावणी ४ आठवड्यांनी

$
0
0


औरंगाबाद : समांतर पाणीपुरवठा राबविणाऱ्या कंपनीने लवादासमोर आव्हान दिले असले तरी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या ४ याचिकांवर चार आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.
समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात ४ याचिका करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. एल. वडणे यांच्यासमोर सुनावणी झाली. खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समिती तर्फे प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने आणि राजेंद्र लोखंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल करून योजनेचे स्वरूप, समांतरचा करार आणि त्याची अंमलबजावणी यांच्या वैधतेविषयी आक्षेप घेतला आहे. महापालिकेने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसह चार कंपन्यांना करार रद्द का करू नये, अशी नोटीस ४ जुलै रोजी बजावली आहे. ही एक महिन्याची नोटीस असून त्याची मुदत ३ ऑगस्टला संपणार आहे. या नोटीसला औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनीला (समांतर) ३ ऑगस्टपूर्वी उत्तर द्यावे लागणार आहे.

...तूर्तास जप्ती टळली
युटीलिटी कंपनीने आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन अॅक्ट १९९६ चे कलम ९ नुसार प्रधान जिल्हा न्यायाधीशासमोर अर्ज दाखल केला आहे. कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करू नये आणि बॅंकेची ७९ कोटी २२ लाख रुपयांची बॅंक गॅरंटी जप्त करू नये, असे आदेश प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश राजीव व्ही. देशमुख यांनी ४ जुलै रोजी दिले आहेत. यावर २६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या खुनप्रकरणी चौघांना अटक

$
0
0


औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून करणाऱ्या चौघा आरोपींना 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९'अन्वये अटक करण्यात येऊन गुरुवारी चौघांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी दिले.
या प्रकरणी शेख मुन्नाबी शेख करीम (४९, रा. बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ४ जून रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादीचा मामेभाऊ शेख रफीक शेख ख्वाजा हा रस्त्याने जात असताना त्याला शेख इरशादचा धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊन शेख इरशाद याच्यासह शेख एजाज शेख इब्राहीम, शेख इस्माईल शेख इब्राहीम व शेख शोहेब शेख रियाज यांनी शेख रफीक यास बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान शेख रफीक याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून ९ जून रोजी चौघांना अटक करण्यात आली. सद्यस्थितीत चौघे न्यायालयीन पोलिस कोठडीत असताना, त्यांच्या संघटित गुन्हेगारीच्या स्वरुपावरून व चौघे आरोपी खंडणी मागतात, असे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना 'मोक्का'खाली अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत सदस्य निवड याचिका काढली निकाली

$
0
0


औरंगाबाद : महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या निवडीला निवडणूक याचिकेद्वारे आव्हान दिले जाऊ शकते हा पर्याय उपलब्ध असल्याने न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. एल. वडणे यांनी याचिका निकाली काढल्या.
मनपाच्या ३० मे २०१५ रोजीच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य म्हणून कचरू घोडके, ए. टी. ए. के. शेख, चंदू तनवाणी, चेतन कांबळे आणि श्रीमती सुनीता आऊलवार यांची निवड करण्यात आली होती. ही निवड कायदेशीर नसून मनपा नियमांचे उल्लंघन करणारी आहे. अपात्र उमेदवारांची निवड रद्दबातल ठरवून नव्याने स्वीकृत सदस्यांची निवड करावी, अशी विनंती करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, आशा बिनवडे व लतिका नरवडे यांनी केली होती. या याचिका दखल घेण्यायोग्य नसून निवडणूक याचिकेचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे या याचिका फेटाळून लावाव्या, अशी विनंती निवड झालेल्या सदस्यांच्या वकिलांनी केली. याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका किंवा अन्य कायदेशीर कारवाई करण्याची मुभा कोर्टाने दिली. याचिकाकर्त्यातर्फे मधुर गोळेगावकर यांनी तर निवड झालेल्या सदस्यांची बाजू प्रदीप देशमुख, राजेंद्र देशमुख, देवदत्त पालोदकर यांनी मांडली. महापालिका आयुक्त आणि महापौरांच्या वतीने अतुल कराड यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पासपोर्ट कार्यालय औरंगाबादलाच होणार : स्वराज

$
0
0

पासपोर्ट कार्यालय औरंगाबादलाच होणार : स्वराज
औरंगाबाद : 'पासपोर्ट कार्यालय औरंगाबादलाच होईल,' असे आश्वासन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिले.
औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे. त्यामुळे या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय व्हावे, यासाठी आपण सतत पाठपुरावा करीत आहोत, असे खैरे यांनी स्वराज यांच्या लक्षात आणून दिले. पासपोर्ट कार्यालयासाठी महापालिका जागा देण्यास तयार आहे. त्यामुळे इंदूरच्या धर्तीवर औरंगाबादेत पासपोर्ट कार्यालय सुरू करा, असे खैरे म्हणाले. यावर स्वराज यांनी 'नवीन पासपोर्ट कार्यालयांच्या यादीत आपण स्वतः औरंगाबादचा समावेश करा अशा सूचना दिल्या होत्या. आगामी काळात औरंगाबादलाच पासपोर्ट कार्यालय होईल,' असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेघराज आडसकरांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अॅड. मेघराज बाबुराव कोकाटे-आडसकर (वय ५२) यांनी गुरुवारी पहाटे पेटवून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, 'बीड जिल्हा बँक घोटाळ्यास दोन माजी अध्यक्ष जबाबदार आहेत,' असे त्यात म्हटले आहे.
अंबाजोगाई येथील राहत्या घरी झालेला हा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या चालकाच्या लक्षात आला. त्यांची मुलगी विशाखा अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा मेडिकल कॉलेजमध्ये तर, मुलगा कृष्णा लातूर येथे बारावीचे शिक्षण घेतो. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांचे कुटुंबीय लातूरला राहत होते. त्यामुळे अंबाजोगाईतील घरी बुधवारी रात्री ते एकटेच होते. त्यामुळेच हा प्रकार दुपारी बारापर्यंत समोर आला नाही. संशय आल्याने चालक आणि नोकरांनी दरवाजा तोडला. तेव्हा बेडरूममध्ये आडसकरांचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील माजी आमदार बाबुराव आडसकर, भाऊ रमेशराव, पुतणे असा परिवार आहे.
बीडीसीसी घोटाळ्याने सध्या बीड जिल्हा गाजत आहे. चुकीचे कर्ज वाटप करणाऱ्या संचालक पदाधिकारी, अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आडसकर हे अंबा कारखान्याचे चेअरमन आणि बँकेचे माजी संचालक होते. त्यामुळे अंबा साखर कर्ज वाटप प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ते कारखान्याचे २००६पासून अध्यक्ष होते. चार हंगामात ६५ कोटी कर्ज त्यांनी फेडले. यापूर्वीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या कर्ज प्रकरणाशी जबाबदार नसल्याची भावना त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती. 'बॅँकेचे २००७पर्यंत संचालक असताना तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळाच्या वेळोवेळच्या ठरावाला विरोधी पक्षातील संचालक म्हणून विरोध दर्शविला, परंतु ऐनवेळी कोणतेही ठराव घेऊन याही प्रकरणात नाहक गोवले आहे. घोटाळ्यास आपण जबाबदार नसून दोन माजी अध्यक्ष जबाबदार आहेत', असे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
गेल्या काही वर्षांत अंबाजोगाई कारखाना दुष्काळामुळे बंद आहे. बँक कर्ज प्रकरणातील चौकशीनेही आडसकर त्रस्त होते, अशी माहिती मिळाली. या प्रकारानंतर त्यांच्या निवासस्थानी नातेवाईक, कार्यकर्ते, मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारी प्रकरणात पती-पत्नीला अटक

$
0
0

औरंगाबाद ः मुद्दल कर्जापेक्षाही जास्त व्याज भरले तरीही, बाकी काढून शेतकऱ्याची दोन एकर जमीन हडपल्याप्रकरणी पती-पत्नीला चिकलठाणा पोलिसांनी गुरुवारी अटक केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
जगन्नाथ बोंगाणे हे शेतकरी असून ते लायगाव (ता. जि. औरंगाबाद) येथे राहतात. त्यांनी गारखेड्यातील इंदिरानगर येथे राहणाऱ्या रवींद्र मोतीराम हिरे यांच्याकडून २०००मध्ये १ लाख ६० हजारांचे कर्ज घेतले. या बदल्यात बोंगाणेकडून हिरेने दोन एकर जमीन बॉँडवर लिहून आपल्याकडे गहाण म्हणून ठेवली. सोळा वर्षांच्या काळात बोंगाणे यांनी एक लाख ऐंशी हजार रुपये हिरेला दिले. मात्र, तरीही पैशांची मागणी सुरूच होती. तसेच बोंगाणे यांचे शेतही त्यांनी दिले नाही. यामुळे त्रस्त झालेल्या बोंगाणे यांनी चिकलठाणा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार २७ मे २०१६ रोजी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली. तेव्हापासून हिरे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जही दाखल केला होता; परंतु उपयोग झाला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, पोलिस नाईक ठोकळ, महिला कर्मचारी नवलंगे यांनी गारखेड्यातून हिरेसह त्याच्या पत्नीला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक जलकुंभात क्लोरिनचा डोस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या प्रत्येक जलकुंभात आता क्लोरिनची ट्रीटमेंट केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी गुरुवारी दिली. क्लोरिनच्या ट्रीटमेंटबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
क्लोरिन ट्रीटमेंटशिवाय पाणीपुरवठा करण्यात येत असल्याबाबत 'मटा'ने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले. नक्षत्रवाडी येथील 'एमबीआर' (संतुलित जलकुंभ) औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने बंद केला. त्यामुळे तेथे केली जाणारी क्लोरिन ट्रीटमेंट बंद पडली. नक्षत्रवाडीलाच तयार करण्यात आलेल्या बायपासच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करणे कंपनीने सुरू केले. त्यामुळे क्लोरिनचा डोस कमी झाला. फारोळा येथे पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येत असले, तरी नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोचेपर्यंत पाण्यातील त्यातील क्लोरिनचा अंश उडून जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली.
संतुलित जलकुंभात पुन्हा क्लोरिनची ट्रीटमेंट सुरू करणार का, या प्रश्नाच्या उत्तरात आयुक्त म्हणाले, 'आता शहरात पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेल्या प्रत्येक जलकुंभावर क्लोरिनची ट्रीटमेंट केली जाणार आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांकडून माहिती घेतली आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी देखील यासंदर्भात चर्चा केली जाईल. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात क्लोरिनचा अंश योग्य प्रमाणात असावा, यासाठी प्रयत्न केले जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे मुलांना मिळाले हक्काचे घर

$
0
0

Manoj.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः कर्जाच्या ओझ्यात पिचून चिपाड झालेले आयुष्य. दोनवेळेच्या जेवणाची भ्रांत. लग्नाला आलेल्या पोरीचा घोर. ज्यावर पोट ती शेती दुष्काळाकडे गहाण. पैशाच्या वसुलीसाठी सावकाराने लावलेला तगादा. यामुळे मराठवाडा, विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले. क्षणात त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. अशा दोनशे मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारण्याचे पुण्यकर्म शांतीवनच्या दीपक नागरगोजे या मोठ्या दिलाच्या बापाने केले आहे.
मराठवाड्यात विविध प्रश्न घेऊन २००१पासून काम करणाऱ्या शांतीवनला (आर्वी, ता. शिरूर) दुष्काळाने हेलावून सोडले. त्यांनी बीड जिल्ह्यात सर्वेक्षण केले. तेव्हा घरातील कर्ता गेल्यामुळे अनेक घरात भीषण दारिद्र्याने ठाण मांडल्याचे दिसले. त्यांच्या तरुण कळ्यांच्या आयुष्यात अंधार दाटला होता. या मुलांना घर देण्याचा निर्णय दीपक नागरगोजे यांनी घेतला. त्यासाठी फेसबूक, व्हॉटस् अॅपवरून या संकल्पनेची माहिती सर्वदूर पोहचवली. तेव्हा औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, बुलडाणा, अहमदनगर जिल्ह्यातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची नावे शांतीवनपर्यंत आली. या मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत निवासासह सर्व खर्च उचलण्यासाठी शांतीवनने हात पुढे केला. यातली १३४ मुले संस्थेत दाखल झाली आहेत. त्यांचे थांबलेले आयुष्य पुढे सुरू झाले आहे. उर्वरित मुले लवकरच दाखल होणार आहेत. सध्या शांतीवन ७०० वंचित मुले, १७ विधवा आणि घटस्फोटितांचे घर झाले आहे. विधवा, घटस्फोटितांना महिनाकाठी चार हजारांपर्यंतचे वेतन मिळेल असे काम दिले जाते. संस्थेने २०० मुलींना दत्तक घेतले आहे. त्यांचा निवास वगळता शिक्षण, एक वेळ जेवण असा खर्च शांतीवन उचलते. इथली १४ मुले पुण्यात उच्चशिक्षण घेत आहेत. ६० महिलांचा स्वयंरोजगार ग्रुप तयार करून त्यांना रोज २०० रुपये मिळतील असा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ११ शेतकऱ्यांना दत्तक घेऊन त्यांना आधुनिक शेती कशी करायची, इथपासून आर्थिक सहकार्य केले जात आहे. संस्थेने दुष्काळाशी दोन हात करत पाच कोटी लिटरचा तलाव उभारला आहे. सध्या साडेतीन कोटी लिटर पाणी तलावात साचले आहे. ८०० मीटर नदीखोलीकरण केले आहे. परिसरात बायोगॅस प्रकल्प उभारला असून, १५ घनमीटरची रोज एक टाकी त्यातून तयार होते.

सचिन, नानाची मदत
शांतीवनचे काम पाहून सचिन तेंडुलकरने संस्थेस खासदार निधीतून ४० लाखांची मदत केली. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने वसतिगृह उभारणी सुरू केली आहे. पुण्याचे शशिकांत चितळे, सुरेश जोशी यांनी मदत केली आहे.

बारावीत असताना बाबा आमटेंच्या शिबिरात गेलो आणि आयुष्य बदलले. साधनाताई आमटेंच्या नावाने शाळा सुरू केली. येथे वंचितांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. लोकसहभातून कामाचा व्याप वाढला. याचे समाधान वाटते.
- दीपक नागरगोजे, शांतीवन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने दिलेल्या निधीतून औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत उलटली आहे.
औरंगाबाद शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे सरकारने २४ कोटी ३३ लाख रुपयांचा विषेश निधी महापालिकेला दिला होता. रस्त्यांची ही कामे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली करण्याचे आदेशही शासनाने दिले होते. त्यानुसार पाच रस्त्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवून व्हाइट टॉपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेने या पैशांमधून सेव्हन हिल्स ते सूत गिरणी, गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर, कामगार चौक ते शनी मंदिर; तसेच कासलीवाल कॉर्नर ते तुकोबानगर हे चार रस्ते व्हाइट टॉपिंगचे करण्याचा निर्णय घेतला २०१४मध्ये या रस्त्यांची कामे सुरू झाली. रस्ते पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांची मुदत होती. सध्या यापैकी सेव्हन हिल्स ते सूत गिरणी व गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर हे रस्ते अपूर्ण आहेत. इतर दोन रस्ते पूर्ण झाले असले, तरी लहान मोठी कामे अद्याप शिल्लक आहेत. अपूर्ण रस्ते शहरातील मध्यवस्तीत अाहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. आता हे अपूर्ण रस्ते दोन महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

पाचव्या रस्त्यांचे नव्याने टेंडर
क्रांतिचौक ते महावीर चौक या रस्त्याऐवजी लक्ष्मणचावडी ते एमजीएम या पाचवा रस्ता या निधीतून करण्यात येणार आहे. शहरातील पाचही रस्‍त्यांची टेंडर एकाच एजन्सीला देण्यात आले होते, मात्र आता पाचव्या रस्त्याच्या कामात बदल झाल्यामुळे त्यासाठी नव्याने टेंडर काढण्यात येणार आहे.

रस्त्यांवर दिशादर्शक फलक
२४ कोटींच्या निधीपैकी पाच टक्के निधी रोड फर्निचरसाठी वापरण्यात येणार अाहे. यातून शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत. यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना शहरातील विविध भाग कोठे आहेत, हे समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर एेतिहासिक औरंगाबाद शहरात असलेल्या विविध पर्यटनस्थळांच्या ठिकाणी माहिती फलकही लावण्यात येणार अाहे. त्यासाठी अंदाजे सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्क परत मिळण्यासाठी अभाविपचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेले अतिरिक्त शुल्क परत करावे, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुरुवारी देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शुल्क परत करा, अशी मागणी कॉलेज प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
कॉलेजने विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिलेल्या शुल्का व्यतिरिक्त स्टेशनरी शुल्क पाच हजार, तर प्रवेश अर्जाच्या नावाखाली पाचशे रुपये अतिरिक्त वसूल केल्याचा आरोप विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेले हे अनधिकृत शुल्क परत करा, अशी मागणी करत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये धाव घेतली. प्रशासनाने हे शुल्क तात्काळ परत करावे, अशी मागणी केली. २५ जुलैपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी स्वप्निल बेगडे, योगेश पवार, मोहन भिसे, गोविंद देशपांडे, शिवा देखणे, गजानन वाभळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तरपत्रिका तपासणीवर आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तंत्रशिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी काळजीपूर्वक झाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. फेरतपासणीतही मंडळाने केवळ औपचारिकता केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याप्रश्नी अनेक विद्यार्थ्यांनी गुरुवारी (२१ जुलै) मंडळाच्या विभागीय कार्यालयात धाव घेतली. तेथेही त्यांना योग्य उत्तर मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. फेरतपासणीसाठी विभागात तब्बल ५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
दहावी, बारावी, अभियांत्रिकी अशा अनेक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत यंदा शिक्षण मंडळ, विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. त्यात आता तंत्रशिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीतही अनेक त्रुटी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्यात आल्या. त्याचा निकाल ९ जून रोजी जाहिर झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रिड्रेसलसाठी अर्ज सादर केले. मंडळातर्फे तात्काळ आणि नियमित अशा दोन प्रकारे रिड्रेसल केले जाते. त्यात तात्काळसाठी अडीच हजार, तर नियमितसाठी अडीच हजार विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज सादर केले. तात्काळ रिड्रेसलचा निकाल २० जुलै रोजी जाहीर करण्यात आला. नियमित रिड्रेसलचा निकाल २६ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यात फेरतपासणीचा निकाल जाहीर झाला. या प्रक्रियेत केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, तर या प्रकाराबाबत मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडूनही योग्य उत्तर दिले जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

तपासणीत ४० टक्के बदल
मंडळाच्या या फेरतपासणी प्रक्रियेत जेवढे अर्ज येतात, त्यातील सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल होतात, असे मंडळाच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही तपासणीत अनेकदा त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या आरोपामुळे उत्तरपत्रिका तपासणी काळजीपूर्वक होते का नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

७० विद्यार्थ्यांच्या निकालात बदल नाही
एमजीएम पॉलिटेक्निच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी पेपर तपासणीबाबत तक्रार दिली. कॉलेजमधील ७० विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज सादर केले. या सगळ्यांच्या गुणांमध्ये फरक पडला नाही. इतर शिक्षकांकडून तपासणी केल्यानंतर चांगले गुण असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी मंडळाच्या तपासणीत मात्र आमच्यापैकी एकाही विद्यार्थ्यांचे गुण वाढत नाहीत. त्यामुळे या प्रक्रियेवर शंका येत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांना अटकपूर्व जामीन नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश दयाराम पाटील यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी फेटाळला.
जिल्हा मध्यवर्ती बँकची एप्रिल २०१५मध्ये निवडणूक झाली. या वेळी सुरेश पाटील हे रामचंद्र जीनिंग प्रेसिंग सहकारी सूत गिरणीचे चेअरमन होते. त्यावेळी त्यांच्याकडे बँकेची १९ लाख ५३ हजार ५७९ रुपयांची थकबाकी होती. थकबाकी असतानाही संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी, मी कुठल्याही संस्थेचा थकबाकीदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले होते. ते दाखल करण्यासाठी कार्यकारी संचालक राजेश भीमराव कल्याणकर यांनी बेबाकी प्रमाणपत्र दिले होते, तर अण्णा बापू भोपळे व विजय उत्तमराव काळे यांना पाटील हे बँकेचे थकबाकीदार आहेत, हे माहिती असतानाही ते सूचक, अनुमोदक झाले. हा सर्व प्रकार ठरवून करण्यात आल्याची तक्रार सदाशिव गायके यांनी केली होती.
याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार सुरेश पाटील, राजेश्वर कल्याणकर, अण्णाभाऊ भोपळे व विजय काळे या चौघांविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, २१ जुलै रोजी सुरेश पाटील यांच्यासह राजेश्वर कल्याणकर, अण्णाभाऊ भोपळे व विजय काळे यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता.

गुन्हा गंभीर असल्याने जामीन नको ः सरकारी वकील
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, सुरेश पाटलांनी सहकारी संस्था अवसायानात घालून त्यावरील कर्ज माफ करून गैरव्यवहार केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी राजेश्वर कल्याणकर यांनी सुरेश पाटील यांना निवडणूक लढविण्यासाठी बेबाकी प्रमाणपत्र तयार करून दिले व संस्थेची थकबाकी असतानाही भोपळे व काळे यांनी अनुमोदन दिले असल्याने त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने सुरेश पाटलांसह चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या नियोजनावर फायद्याची शेती

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबादः जालना रस्त्यावर करमाडपासून उत्तरेकडे पिंपळुखंटा हे गाव. आजूबाजूला डोंगरांच्या रांगा. पावसाळ्यात शेतीला चिंता नसते, पण उन्हाळ्यात जलस्त्रोत आटतात. विष्णू नारायण घोडके हे पिंपळखुंटा येथील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी. वडील शेती करत. १९९२ मध्ये दहावी झाल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत शेती सुरू केली. पारंपरिक शेती करत दहा वर्षांनंतर त्यांनी शेतीत काहीतरी नवीन करण्याच्या दृष्टीने अभ्यास केला. २००२ मध्ये त्यांनी दीड एकरात द्राक्षे आणि दीड एकरात डाळिंबाची लागवड केली. ३० एकर शेतीत तीन विहिरी होत्या. उन्हाळ्यात विहिरी आटत. पारंपरिक पीकांसोबत फळशेतीचा नवा प्रयोग घोडकेंनी केला. गणेश द्राक्षे आणि आरक्ता डाळिंब लागवडी केली. बहिणीच्या घरी गेल्यानंतर तिथे द्राक्षाची बाग पाहिल्यानंतर त्यांच्या मनात आपल्या शेतात हा प्रयोग करण्याचा विचार आला आणि त्यांनी अंमलबजावणी केली. सुरुवातीचे दोन वर्षे अतिशय खडतर गेले. द्राक्षाची बाग पोसण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. तशीच परिस्थिती डाळिंबाची होती. मेहनत, नवीन करण्याची जिद्द आणि योग्य वेळी तज्ज्ञांकडून मिळालेले मार्गदर्शन याच्या जोरावर विष्णू घोडके यांचा शेतीतील प्रयोग यशस्वी झाला. २००६ मध्ये सरकारकडून शेततळ्याची योजना जाहीर झाली होती. घोडकेंनी पहिले शेततळे उभारले. डोंगराच्या पायथ्याशी उभारलेल्या या शेततळ्याचा उन्हाळ्यात खूप फायदा झाला कारण डोंगरावरून वाहून जाणारे पाणी या तळ्यात साठविले. २००९मध्ये दुसरे तर २०१२ मध्ये तिसरे शेततळे केले. या शेततळ्यांमुळे उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध राहू लागले. नुकत्याच सरलेल्या उन्हाळ्यात गंभीर दुष्काळ होता.

शेतकऱ्यांनी बागा टँकरचे पाणी देऊन वाचविल्या. अशा परिस्थितीत विष्णू घोडके यांना शेततळ्यांची मदत झाली. १७ सप्टेंबर २०१५ रोजी झालेल्या पावसामुळे शेततळ्यांमध्ये पाणी साठले होते. ते जूनअखेर पुरले. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी त्यांनी पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. संपूर्ण शेतात ठिबकसिंचन केल्यामुळे फायदा झाला. विष्णू घोडके यांचे भाऊही शेतीत त्यांच्यासोबत आहेत. दरवर्षी मिळणारे यश पाहून त्यांनी डाळिंबाचे क्षेत्र हळूहळू वाढविले. सध्या त्यांच्या शेतात १४ एकरवर डाळिंब, तीन एकर द्राक्षे, अडीच एकर कापूस, दोन एकर बाजरी तर तीन एकरात अन्य पीके आहेत.

डाळिंबाचे मोठे मार्केट आहे. बहुतांश माल जागेवरच विकला जातो, कधी कधी नाशिकच्या बाजारपेठेत विक्री करत असल्याचे घोडके सांगतात. भविष्यात डाळिंब आणि द्राक्षाचे क्षेत्र वाढविण्याचे विष्णू घोडके यांचे प्लॅनिंग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली, तर निश्चितपणे फायदेशीर आहे. खासगी नोकरीच्या आकर्षक पॅकेजपेक्षा शेतीचे पॅकेज कधीही फायद्याचे ठरते, असा ठाम विश्वास विष्णू घोडके यांनी व्यक्त केला.

नियोजन आणि अंमलबजावणी

विष्णू घोडके यांनी द्राक्षे व डाळिंबाची लागवड केल्यानंतर पाणी देण्याचे योग्य नियोजन केले आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी केली. पुढे डाळिंबाचे क्षेत्र वाढविताना बाजारात कोणते चलनी नाणे आहे याचा अभ्यास करून भगवा डाळिंबाची लागवड केली. द्राक्षासाठी मंडप पद्धती अवलंबिली. पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ठिबक सिंचन केल्यामुळे पाण्याची नासाडी थांबली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्या’

$
0
0

औरंगाबाद : कोपर्डी अत्याचार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनाम द्यावा, या मागणीसाठी मराठवाडा लेबर युनियन व स्वराज अभियानतर्फे शुक्रवारी क्रांतिचौकात निदर्शने करण्यात आली.
यावेळी कोपर्डी येथील घटनेचा निषेध करण्यात आला. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, गृहमंत्रिपदाचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, आदी मागण्या करण्यात आल्या. स्वराज अभियनाने कोपर्डी तालुक्यातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेटही घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानव कांबळे, सुभाष लोमटे (औरंगाबाद), अॅड. सविता शिंदे (सोलापूर), मारुती भापकर (पुणे), शुभदा चव्हाण-वंदना ‌शिंदे (ठाणे), प्रा. संगीता मोहिते, अॅड. सुनीता देवी (करमाळा), वैभव मेहता (श्रीगोंदा) आदींचा समावेश होता. शुक्रवारी झालेल्या निदर्शनात मराठवाडा लेबर युनियन, महाराज्य राज्य हमाल मापाडी महामंडळ, शेतकरी-शेतमजूर पंचायतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, डॉ. जर्नादन पिंपळे, कासम भाई शेख, डॉ. संदीप घोगरे, बुद्धप्र‌ीय कबीर, देविदास कीर्तीशाही यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त विद्यापीठ’ची आयुक्तांकडून पाहणी

$
0
0

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तलाव, बंधाऱ्यांमध्ये पाणी साठले अाहे. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जलयुक्त विद्यापीठ मोहिमेत केलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षापासून 'जलयुक्त विद्यापीठ' मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेंतर्गत तलावातील गाळ काढून खोली वाढविण्यात आली. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे सोनेरी महल व बुद्ध लेणी परिसरातील तलावात पाणी साठले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बंधारा तयार करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून ५० लाखांचा निधी दिला आहे. डॉ. दांगट यांच्या हस्ते गुरुवारी सायांकाळी जलपूजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. दिलीप खैरनार, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे आदींची उपस्थिती होती.

बंधाऱ्याचे सुभोभिकरण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणाकृर्ती पुतळा परिसरात तयार करण्यात आलेल्या बंधारा परिसरात बाग तयार करण्यात येणार आहे. येथे कारंजे बसविण्यात येणार असल्याचे यावेळी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images