Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिंदेवाडीतून ५९ जणांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर/ औरंगाबाद
नांदूर-मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आल्याने गोदावारी नदीचे पाणी गुरुवारी काही प्रमाणात ओसरले. त्यानंतर वांजरगावजवळील शिंदेवाडी येथील ५९ जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करून प्रशासनाने मदतकार्य थांबवले आहे.
नांदूर-मधमेश्वर धरणातून दीड लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने तालुक्यातील नदीकाठच्या १७ गावांना पाण्याने वेढले होते. त्यापैकी डोणगाव, बाबतरा, लाखगंगा, बाभुळगावगंगा, नांदूरढोक, वांजरगाव, भालगाव आदी गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. सावखेडगंगा व नांदूरढोक येथे नदीचा प्रवाह पात्र सोडून वाहत असल्याने या दोन्ही गावांचा संपर्क बुधवारी तुटला होता. गुरुवारी पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकपर्यंत कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले आहे.
शिंदेवाडी येथील ३५० जण पुराच्या पाण्यात वेढले गेल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवार राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना (एनडीआरफ) पाचारण केले. बुधवारी रात्री अंधार पडल्यामुळे मदतकार्य थांबवण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जवानांनी शिंदेवाडी येथील ५७ नागरिकांना दुपारपर्यंत बोटीद्वारे बाहेर काढले. त्यानंतर बचाव कार्य थांबवण्यात आले.

घर सोडण्यास नकार
गोदावरी नदीचा पूर ओसरला असल्यामुळे सराला बेट व शिंदे वाडी येथील नागरिकांनी घर सोडण्यास ठाम नकार दिला आहे. सराला बेट येथील नागरिकांनी बुधवारपासूनच प्रशासनाला आमची चिंता करू नका, आम्ही जेथे आहोत तेथपर्यंत पाणी येत नाही, असे सांगितले होते. परंतु, गुरुवारी पाणी ओसल्यानंतर शिंदे वाडी येथील नागरिकांनी सुद्धा घर सोडून येण्यास नकार दिला. फक्त ५९ जण बोटीत बसून बाहेर आहे.

दोन बोटी नादुरुस्त
आपत्कालीन बचाव कार्य करण्यासाठी येथे चार बोटी आणण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका बोटीची मोटार सुरू झाली नाही. दुसरी एक बोट बचाव कार्य करताना पंक्चर झाली. परंतु, दुसऱ्या दोन बोटी असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा आला नाही.

श्रीरामपूरचा रस्ता बंद
सावखेडगगंगा येथील श्रीरामपूरला जोडणाऱ्या नाऊर येथील पुलाजवळचा रस्ता खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली व संबंधितांना भराव टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुलाजवळचा वैजापूर शहराच्या बाजुच्या रस्त्याचा काही भाग खचल्याने वैजापूर-श्रीरामपूर राज्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

उपाध्यक्षांची भेट
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी गुरुवारी तालुक्यातील वांजरगाव व सावखेडगंगा या गावांना भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. एन. आठवले उपस्थित होते.

गोदावरीचा पूर ओसरल्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याची गरज वाटत नाही. परंतु आपत्ती निवारण दलाचे जवान गोदावरी नदीच्या काठावर तळ ठोकून आहेत.
- सुमन मोरे, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाम्पत्याच्या अंगावर दुचाकी घातली

$
0
0


औरंगाबाद ः दाम्पत्याच्या अंगावर दुचाकी घातली. यावर पती-पत्नीने जाब विचारल्यानंतर हाणामारी करून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रताप विशाल बबन डिडोरे उर्फ पप्प्या या तरुणाने केला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कलावती श्याम चव्हाण (रा. भानुदासनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चव्हाण दाम्पत्य भानुदासनगर गल्ली क्रमांक सहा येथून बुधवारी रात्री नऊ वाजता पायी जात होते. यावेळी त्यांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या विशाल डिडोरेने धडक दिली. चव्हाण दाम्पत्य खाली पडले. डिडोरेला अंगावर दुचाकी का घातली, याचा जाब चव्हाण यांनी विचारला. तेव्हा त्याने शिवीगाळ करत चव्हाण यांना मारहाण केली. कलावती चव्हाण यांच्या गळ्यातील ५२ हजारांचे मणी मंगळसूत्र व पोत हिसकावून पलायन केले. डिडोरेची माहिती मिळाल्यानंतर चव्हाण यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या प्रकरणी डिडोरे याने ही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये बुधवारी रात्री दुचाकीवर जाताना एक जोडपे पायी जात होते. दुचाकीचा हॉर्न वाजवला असता चव्हाण यांनी रोड तुझ्या बापाचा आहे का, म्हणत शिवीगाळ केली. यावर विशालने शिव्याचे कारण विचारले असता त्याला चव्हाण, त्यांची पत्नी व मुलाने लोखंडी गजाने मारहाण केली. विशालच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चैन व खिशातील बाराशे रुपये काढून घेतले. चव्हाण यांनी मी पोलिसवाला आहे. तुला जेलमध्ये टाकेन अशी धमकी दिली.या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात चव्हाण पतीपत्नी व मुलाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गढूळ पाणीपुरवठा; जलजन्य आजारांची भीती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळ्यात विविध आजारांनी डोके वर काढले आहे. सगळी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. अशातच गुरुवारी शहरातील अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. पाणी शुद्धीकरण योग्य झाले नाही का, असा सवाल केला जात आहे.
समांतर जलवाहिनीचा पीपीपीतत्वावरील करार रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाल्यापासून पाणीपुरवठ्याबद्दल विविध समस्या निर्माण होत आहेत. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गुरुवारी अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा झाला. प्रामुख्याने गारखेडा, सिडको, मुकुंदवाडी परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याची समस्या भेडसावली. फारोळा येथे जायकवाडीहून येणाऱ्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर नक्षत्रवाडी येथे क्लोरिनची प्रक्रिया केली जात होती, पण सहा महिन्यांपासून नक्षत्रवाडी येथील क्लोरिन प्रक्रिया बंद करण्यात आली. त्याचा परिणाम आता पाऊस पडल्यावर जाणवत आहे. गढूळ पाणीपुरवठ्या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपानासाठी आता परवाना सक्तीचा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तळीराम असोत की दर्दी मद्य रसिक. तुम्ही वर्षातून एकदा 'जाम' घ्या, की रोज धुंद व्हा. तुमच्या खिशात अधिकृत परवाना असल्याखेरीज तुम्हाला दारू मिळणार नाही. हे आदेश मोडल्यास सक्त कारवाई करू, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
सर्व देशी - विदेशी मद्य विक्रीच्या दुकानात हे आदेश लागू राहतील. मद्य खरेदीसाठी ग्राहकांना अगोदर मद्य सेवनाचा अधिकृत परवाना दाखवावा लागेल. ज्यांना फक्त कधी-कधी मद्य सेवनाची सवय असते, अशा लोकांसाठी उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाबरोबरच लिकर मार्टमध्ये मद्य सेवनाचा एक दिवसीय परवाना मिळेल. एक वर्षासाठीच्या परवान्याला शंभर रुपये, तर आजीवन परवान्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. यात देशी मद्य पिणाऱ्यांसाठी दोन रुपये दिल्यास एक दिवसीय परवाना मिळेल. विदेशी मद्य पिणाऱ्यांसाठी पाच रुपये शुल्क ठेवले आहे. यासंबंधीचा सूचना फलक ठळकपणे प्रत्येक लिकर मार्टमध्ये दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे, तसे आदेश विभागाने नुकतेच जारी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहिदचा आत्मघाती हल्ल्याचा कट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संशयित दहशतवादी शाहिदखान आयएसची पद्धत असलेल्या 'लोन वूल्फ अॅटॅक' या आत्मघाती पद्धतीचा वापर करणार होता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ज्या तरुणांना सिरियात जाणे शक्य नाही, अशा तरुणांचे ऑनलाइन ब्रेन वॉशिंग करून माथी भडकावण्याचे काम आयएसची इं‌टिलिजन्स विंग करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
आयएसमध्ये भरती करण्यासाठी तरुणांची माथे भडकावून त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न आयएसकडून सुरू आहेत. सोशल नेटवर्कींगचा यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. वैजापूर व परभणी येथून पकडण्यात आलेले संशयित दहाशतवादी इंटरनेटच्या माध्यमातून आयएसशी जोडले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणांना भडकावून त्यांच्याकडून दहशतवादी हल्ले करून घेण्यासाठी आयएस 'लोन वूल्फ अॅटॅक' कार्यपद्धतीचा वापर करते. यासाठी आयएसशी सबंधित इंटिलिजन्स विंग काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...अन् तयारी केली
शाहिद आयएसच्या संपर्कात आल्यानंतर त्याला दहशतवादी हल्ला करण्याची प्रेरणा देण्यात आली. त्याचे ब्रेन वॉशिंग करण्यात आले. हे कृत्य त्याला एकट्याला पार पाडायचे होते. म्हणून त्याने दुचाकी खरेदी, एसपी ऑफिसची रेकी आदी प्रकार केले. एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डीबाबत त्याला माहिती होती. या पार्श्वभूमीवर त्याने एसपी ऑफिसची निवड केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोन वूल्फ म्हणजे काय?
माथी भडकलेल्या ज्या तरुणांना इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया अँड इराक म्हणजेच आयएसचे हेडक्वार्टर असलेल्या सिरियात जाणे शक्य नसते, अशा तरुणांना लोन वूल्फ अॅटॅकसाठी तयार करतात. ज्या प्रमाणे लांडग्याला (वूल्फ) स्वतःची शिकार निवडून, धावपळ करून, समूहाचा भाग न बनता करावी लागते; त्याप्रमाणे लोन वूल्फ अॅटॅक करणारा दहशतवादी शक्यतो एकटा हे काम करण्यावर भर देतो. फ्रान्स येथे १५ जुलै रोजी सार्वजनिक ठिकाणी बसने चिरडल्याचा हल्ला तसेच १ जुलै रोजी ढाका येथील दहशतवादी हल्ला हे 'लोन वूल्फ अॅटॅकचे प्रकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने २० लाखांचा गंडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुबईतील अमेरिकी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी निवड झाल्याचे आमिष दाखवून शहरातील एकाला १९ लाख ८० हजाराचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूरबन कॉलनी येथील आदित्य दिवाकर वळसंगकर (वय ४७) हे मार्केटिंगचा व्यवसाय करतात. २७ एप्रिल २०१६ रोजी त्यांच्या मेल-आयडीवर दुबई येथील अमेरिकी हॉस्पिटलचा मेल आला. या मेलवरून वळसंगकर यांनी वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. या हॉस्पिटलचे नोकरीबाबत पत्र मिळाल्यानंतर वळसंगकर यांनी व्हिसासाठी अर्ज केला. त्यानंतर वळसंगकर यांचा ऑनलाइन इंटरव्ह्यू झाला. यानंतर ४ मे रोजी वळसंगकर यांची वरिष्ठ व्यवस्थापकपदी निवड झाली असून, मासिक वेतन ४६ हजार ५०० अमिराती दिरम्स वेतन भेटणार असल्याचे मेलद्वारे कळविले. वळसंगकर यांनी १० मे रोजी व्हिसासाठी लागणाऱ्या फिसपोटी ९२ ‌हजार ५०० रुपये क्रांतिचौकच्या एसबीआय शाखेत भरले. यानंतर हॉस्पिटलच्या वतीने वळसंगकर यांना ५० लाख रुपयांचे अॅडव्हान्स सॅलरी बिल पाठवले. त्यासाठी त्यांनी दुबईच्या अरब बँकेत खाते उघडण्यास सांग‌ितले. खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याचे वळसंगकर यांना भासवले. यानंतर ही रक्कम सोडवण्यासाठी त्यांना विविध वेळा बँकेत मोठी रक्कमा जमा करण्यास सांग‌ितले. १० मे ते १४ जून या कालावधीत वळसंगकर यांनी तब्बल १९ लाख ८० हजारांची रक्कम विविध बँकेच्या खात्यामध्ये समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे भरली. १४ जून रोजी त्यांना अनोळखी मोबाइलवरून कॉल आला. यामध्ये तुमचा व्हिसा व सोबत ५० लाख रुपये अॅनी स्टीफन नावाच्या महिलेसोबत पाठवत असल्याची थाप मारली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ खेड्यांचा ‘डीपी’ रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
घटनात्मक तरतुदीचे पालन अनिवार्य असताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर प्रक्रियेचा भंग व अनियमितता झाल्याचे निरीक्षण नोंदवून ४ फेब्रुवारी रोजी राजपत्रात प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. एल. वडणे यांनी दिले. या महत्त्वाच्या निर्णयामुळे महापालिकेच्या प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना जोरदार हादरा बसला आहे.
औरंगाबाद शहराच्या विकास आराखड्यात पालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेल्या बदलास विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केल्या. चिकलठाण्यातील शेतकरी गोविंद बाजीराव नवपुते, नगरसेवक सय्यद सर्वत आरेफ हुसेनी, विनोद अग्रवाल, गंगाबाई घुले, नाझीर खन रहीम खान, अशोक सुरडकर व विठ्ठलराव अंबरवाडीकर यांनी ही याचिका केली आहे. कोर्टाने ४ फेब्रुवारी रोजी राजपत्रात प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा रद्द केला. शासनाने २९ मार्च रोजी पूर्वलक्षी प्रभावाने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. हा आदेशही कोर्टाने रद्द केला.
पालिकेने आराखडा प्रसिद्ध करण्याआधीच नागरिक, बिल्डर्स यांच्याकडून प्रस्ताव व आक्षेप मागविले. ही बाब तरतुदींशी विसंगत आहे. आराखडा प्रसिद्ध करण्यापूर्वी नागरिकांकडून हरकती मागवून त्यात दुरुस्ती करण्याची तरतूद कायद्यात नाही. आक्षेपांवर विचार करण्याचे अधिकार केवळ नियोजन समितीस आहेत. या समितीची नियुक्ती पालिकेनेच केली होती. आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या नियोजन समितीने तब्बल दोन वर्षे लावली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने अवघ्या १२ दिवसांत दुरुस्ती करून नवीन आराखडा प्रसिद्ध केला, असे हायकोर्टाने दिलेल्या ६२ पानी निकालात म्हटले आहे.
या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती पालिकेतर्फे करण्यात आली. ती मान्य करून कोर्टाने सहा आठवड्यांची स्थगिती दिली. नवीन प्रारूप विकास आराखड्यात वगळलेल्या आणि अंतर्भूत केलेल्या जागांच्या आरक्षणावर कामे सुरू करण्याची परवानगी औरंगाबाद पालिकेने देऊ नये व आरक्षणावर अंतिम निर्णय नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे महापालिका, महापौर व पदाधिकारी यांना सुप्रीम कोर्टात धाव घेता येणार आहे.
विकास आराखडा तयार करण्यास महापालिका अपयशी ठरली असल्याने यापुढील सर्व कार्यवाही शासनाच्या नियुक्त अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी आणि शासन यासाठीलागणारा खर्च महापालिका वसूल करू शकते, असेही खंडपीठाने म्हटले आहे. हा आराखडा पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी विभागीय नगररचना सहसंचालक, उपसंचालक यांच्यावर टाकली आहे. त्यांनी नेमलेला पण तो अधिकारी सहसंचालक दर्जाचा असावा, अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली. त्यांनी हा आराखडा तयार करून नव्याने शासनास सादर करावयाचा आहे.
याचिकाकर्त्याची बाजून प्रदीप देशमुख, व्ही. डी. सपकाळ, देवदत्त पालोदकर यांनी मांडली. शासनाचे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, महापौर, आयुक्त व पालिकेतर्फे जेष्ठ वकील विजय थोरात, विनायक दीक्षित, जयंत शहा व अतुल कराड यांनी बाजू मांडली.

आरक्षणांवर कोर्ट आश्चर्यचकित
या निकालात कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे. पडेगांव येथील एमजीएम गोल्फ क्लब (२३.२० हेक्टर ) व पर्यटन विकास महामंडळाचे जटवाडा येथील गोल्फ कोर्टचे (६० हेक्टर) रुपांतर खुल्या मैदानांत केले. प्राथमिक शाळा, ग्रंथालय, आरोग्य केंद्र यांचीही आरक्षणे वगळली. एवढेच नव्हे विमानतळाच्या आजुबाजुची जागा आरक्षित ठेवण्याऐवजी त्यावर वाणिज्य वापराचे आरक्षण टाकण्यात आले, असे निरीक्षणही कोर्टाने नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वनिर्मिती शोधास २००० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुरुत्वाकर्षणीय लहरी मोजून विश्वनिर्मितीचे रहस्य शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी हिंगोली जिल्ह्यातील दुधाळ येथे प्रयोगशाळा उभारण्याचे निश्चित केले असून, ६ वर्षांत उभारण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेसाठी २ हजार कोटी रुपये लागणार आहे. प्रयोगशाळेसाठी लागणारी जमीन व अन्य बाबींसंदर्भात लायगो इंडिया कंपनीच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी (५ ऑगस्ट) विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी भेट घेतली. या प्रकल्पात अमेरिकेतील 'नासा' या संस्थेचा सहभाग आहे.
गुरुत्वीय लहरींचे कंपने अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे प्रयोगशाळेसाठी लोहमार्ग, रस्त्यांपासून दूर अंतरावर जागा असावी, असे ठरले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणापासून काही अंतरावर असलेल्या दुधाळा गावामध्ये ही प्रयोगशाळा होणार आहे. ४०० एकर जागेवर ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, यासाठी आवश्यक असलेली जमीन, वीज; तसेच पाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या जागेसाठी उपग्रहगामार्फत काढलेल्या नकाशांचा अभ्यासही करण्यात आला आहे.
या प्रयोगशाळेमध्ये चार किलोमीटरचे स्टील पाइप 'एल' आकारात टाकले जाणार असून, पाइपाच्या शेवटी ४० किलो आकाराचे आरसे बसविले जाणार आहेत. पाइपमधील कंपनांच्या आधारावर गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणारी प्रयोगशाळा लायगो इंडिया व लायगो यूएसए यांच्यातर्फे उभारली जाणार आहे.
या प्रयोगशाळेसंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी या प्रकल्पाचे सल्लागार तरुण सौरदीप व शरद गावकर यांनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांची भेट घेतली. या प्रकल्पाचे सादरीकरण आयुक्तांसमोर झाल्यावर प्रकल्प सल्लागार गावकर म्हणाले की, २००२मध्ये प्रयोगशाळेसंदर्भात चर्चा सुरू झाली होती. यानंतर केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून, प्रयोगशाळा तयार झाल्यास या क्षेत्रातील एक हजार शास्त्रज्ञ गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करू शकतील. या प्रकल्पात ३७ भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश असून, या प्रकल्पानंतर सूर्यमालेतील गूढ उकलता येणे अधिक सोपे होऊ शकेल.

विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्टची संधी
हिंगोली जिल्ह्यातील दुधाळ येथे प्रयोगशाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरणार असून, या प्रयोगशाळेत रिसर्च प्रोजेक्ट तयार करण्याची; तसेच संशोधन करण्याची संधीही मिळणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘खड्डेभूषण, खड्डासप्तर्षी पुरस्कार सुरू करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, प्रतिनिधी
महापालिका रस्ते नव्हे तर खड्डे कसे होतील, याचेच नियोजन करते. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी बजेट नाही, असे म्हणण्यापेक्षा खड्डे तयार करण्यासाठी पालिकेकडे बजेट नाही, असेच म्हणायला हवे. नागरिकांनी खड्ड्यांवरून आरडाओरड करू नये, तर अप्रतिम खड्डे कौशल्य असलेल्यांचा खड्डेभूषण, खड्डासप्तर्षी असे विविध पुरस्कार देऊन गौरव करायला हवा, अशी कोटी प्रसिद्ध कवी प्रा. दासू वैद्य यांनी केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांसह शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. सर्वसामान्यांना त्रास होणं साहजिक आहे, पण त्यापलिकडे जाऊन उपरोधिक अंगाने दासू वैद्य विचार करतात. त्यांच्या मते वेरूळ-अजिंठा या कलाकृती शेकडो वर्षांपूर्वी तयार झाल्या आणि केवळ त्या बघण्यासाठी सातासमुद्रापार असलेल्या पर्यटकांनी का म्हणून यावं, त्यानंतर आजवर आपल्याकडे काहीच झाले नाही का, जे बघण्यासाठी पर्यटकांना यावेसे वाटेल? वैद्य यांना वाटते की, खड्डे निर्मितीचे अप्रतिम कौशल्य आमच्याकडे राजकीय, प्रशासकीय व्यक्तींकडे आहे. जिथून वाहने नेली जातात त्याला आपण रस्ता म्हणतो. तो रस्ता नव्हेच, तर अत्यंत मेहनतीने ते खड्ड्यांचीच निर्मिती करतात. हे बघण्यासाठी आता यापुढे पर्यटकांनी यायला हवं. वेरूळ-अजिंठ्याकडे बघण्यासारखं आता काय राहिलंय?
कवीमनाचे वैद्य म्हणतात, 'सरळ रस्त्याने जाण्यात कुठली आलीय मजा! खड्ड्या-खड्ड्यांतून जाऊन बघा, त्यात एक लयबद्धता आहे. कविता म्हणताना कसे चढ-उतार असतात, तशीच लय खड्डेमय रस्त्यांतून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे खरेतर अशी अलौकिक निर्मिती करणारे गौरवास पात्र आहेत. खड्ड्यांची निर्मिती करणाऱ्यांचा गौरव करताना काही नागरी पुरस्कार द्यावेत असे ते सुचवितात. त्यात खड्ड्यांचा रस्ता, मोठ्ठा खड्डा, खड्ड्यांची साखळी असलेला रस्ता असे वर्गीकरण करून 'खड्डेभूषण', 'खड्डामहर्षी', 'खड्डासप्तर्षी' असे पुरस्कार द्यावेत.'

त्यांचा उपमर्द नको
खड्ड्यांवर एखादी कविता कधी सुचली का, असा प्रश्न केल्यावर दासू हलकेच म्हणतात, 'खड्डे हीच सर्वोच्च निर्मिती आहे. त्यावर आम्ही पामरांनी कविता करून खड्डे संस्कृती निर्मितीकारांचा उपमर्द करणे योग्य नव्हे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिस्चार्जसाठी रुग्णाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नसल्यामुळे अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेल्या रुग्णाने शुक्रवारी मध्यरात्री खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. बजाजनगरातील कामगार भवनासमोर असलेल्या हयात मल्टी स्पेशल हॉस्पिटलात घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, बजाजनगरातील पी-१४८ येथे उभारण्यात आलेल्या हयात हॉस्पिटलमध्ये दोन ऑगस्ट रोजी बाबुल लंकेश्वर बोरो (वय ३१, रा. बजाजनगर, मूळ रा. बोराम जि. बक्सा, आसाम) याला त्याचा मित्र संतोषकुमार शामलाल दुबे याने रक्तदाब वाढल्याने उपचारासाठी हयात हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेव्हापासून त्याच्यावर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्याचा हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी डिस्चार्ज करण्यावरून वाद झाला होता. बाबुल वारंवार बेडवरून उठून डॉक्टरांजवळ जाऊन उभा राहत होता. डॉक्टरांनी त्याला तीन-चार वेळा बेडवर नेऊन झोपविले व सलाइन सुरू केले, मात्र काही वेळानंतर तो पुन्हा उठून येऊन डॉक्टरांशी हुज्जत घालू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे त्याने अतिदक्षता विभागाच्या खिडकीवर डोके मारून घेतले होते. त्यानंतर तेथील डॉक्टर व वॉर्ड बॉय यांनी त्याला पुन्हा बेडवर नेऊन बसविले, मात्र त्यांना न जुमानता हातात कात्री घेऊन त्याने डॉक्टरांना धमकविले. त्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजा मोकळा करून दिला, मात्र भडकलेला बाबुल खिडकीला लावलेली लोखंडी तारेची जाळी तोडून बाहेर पडला. बाहेर बसविल्या 'एसी'च्या बॉक्सवर तो ठाण मांडून बसला व काही वेळातच त्याने उडी मारली. त्याने हातात कात्री घेतल्यानंतर डॉक्टरांनी भीतीने पलयान केले होते. हा सर्व प्रकाराचे सीसीटीव्हीमध्ये चित्रिकरण झाले आहे.
बाबुल रक्तदाब वाढल्याने हॉस्पिटलमध्ये २ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी त्याने मद्यधुंद अवस्थेत असताना डॉक्टर व नर्स यांच्यावर हल्ला चढविला. त्याने स्वतःहून खिडकीतून उडी मारून घेतली, असा अभिप्राय वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी 'एमएलसी'मध्ये नोंदविला, असे पोलिसांनी सांगितले.

हॉस्पिटल प्रशासनाचा प्रतिक्रियेस नकार
याप्रकरणी हयात हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीतील चित्रिकरण ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी ३० टक्क्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणामध्ये गेल्या २४ तासांत तब्बल १० टक्के पाण्याची वाढ झाली असून, शुक्रवारी (५ ऑगस्ट) रात्रीपर्यंत धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ६६४.८०८ दशलक्ष घनमीटरपर्यंत (३०.६२ टक्के) पोचला. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातही दमदार पाऊस झाल्यामुळे विभागातील सर्व ८५० प्रकल्पांमध्ये १७६७.१६ दशलक्ष घनमीटर (२२.१५ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी झाला असून, शुक्रवारी सायंकाळी जायकवाडी धरणस्थळी पाण्याची आवक ४४ हजार ९९ क्युसेक होती. गेल्या वर्षी जायकवाडीमध्ये ऑगस्टमध्ये केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
नाशिक येथे झालेल्या पावसामुळे ऊर्ध्व जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्यात यंदा जूनपासूनच वरुणराजाने कृपादृष्टी केली, यामुळे विभागातील लहान-मोठे प्रकल्प भरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मराठवाड्यातील ८५० प्रकल्पांमध्ये १७६७.१६ दशलक्ष घनमीटर (२२.१५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मृतसाठ्यातून उपसा सुरू असलेले जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, ऊर्ध्व पैनगंगा या प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मराठवाड्यात पाऊस सुरू असल्यामुळे लहान-मोठ्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचले आहे.

पाणीसाठ्यातील वाढ
प्रकल्प...............................उपयुक्त.........पाणीसाठा टक्के
मोठे...................................११४५.१६............२२.२७
मध्यम................................१५९.३९.............२३.६६
लघुप्रकल्प............................३७९.१५.............२३.६६
गोदावरी नदीवरील बंधारे.......४३.४७...............१८.७६
तेरणा, मांजरा, रेणा बंधारे.....३९.९९...............६०.१६
एकूण..................................१७६७.१६............२२.१५
(पाणीसाठा ५ ऑगस्टपर्यंत, दशलक्ष घनमीटरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखड्यात सुविधांचा बट्ट्याबोळ

$
0
0

Pramod.Mane@timesgroup.com
औरंगाबाद : नगररचना अधिनियमप्रमाणे दर २० वर्षांनी विकास आराखड्याचे पुर्ननिरिक्षण करून सुधारित आराखडा प्रसिद्ध करणे आवश्यक असते. त्यानुसार नगररचना अधिकाऱ्यांनी चार वर्षे विविध भागाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला व आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. विकास आराखडा नगररचना अधिकाऱ्यांनी गोपनीय पद्धतीने महापालिकेला सुपूर्द करावा व महापालिकेने प्रसिद्ध करावा, असे आदेश शासनाने दिले, मात्र महापालिकेने मूळ आराखड्यात फेरबदल केल्याने त्याविरोधात आठ याचिका दाखल झाल्या.

विकास आराखड्याचा प्रवास
महापालिकेची १९८२मध्ये स्थापना झाली. त्यावेळी लगतच्या १८ खेड्यांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. १९९२मध्ये समावेश केलेल्या क्षेत्राचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. दरम्यान, सिडकोने २०९ हेक्टर क्षेत्र त्यांच्या कार्यक्षेत्रातून वगळले व शिवाजीनगरचा सामावेश महापालिकेत झाला. त्यामुळे महापालिकेत १९८२मध्ये सामावेश झालेले क्षेत्र; तसेच सिडकोने वगळलेले २०९ हेक्टर क्षेत्र व शिवाजीनगर यांचा सुधारित आराखडा तयार करण्याची घोषणा २०११मध्ये करण्यात आली होती. त्यासाठी शासनाने महापालिकेत नगररचना उपसंचालकांची नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

नागरी सोयी-सुविधांना ठेंगा
शहरातील जनहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली ३६१ आरक्षणे व ४३ रस्ते नवीन विकास योजनेत बेकायदा वगळण्यात आली. नदी, नाले, तलाव व वनविभागाच्या एकूण जमिनीपैकी सुमारे ५०० हेक्टर जमीन कमी करण्यात आली. विमान वाहतूक खात्याच्या सूचना झुगारून विमानतळाच्या लगत व्यापारी प्रयोजनासाठी परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी रस्ते वगळल्याने नागरिकांना हेलपाटा पडणार होता. महत्त्वाच्या रस्त्यांची रुंदी बेकायदा कमी केली. अनेक ठिकाणी मंजूर ले-आउटवर निवासी घरे असतानाही आरक्षणे टाकली आहेत. नवीन आरखडा प्रसिद्धीपूर्व बदलण्यात आला व त्यावर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी नाही. शहराचा विकास ठप्प करणारा हा आरखडा रद्द करण्यात आला आहे .
संपूर्ण विकास आराखड्यात राजकारण्यांनी हस्तक्षेप केल्याचा दावाही करण्यात आला. त्यामुळे शेकडो आरक्षणे वगळली गेली होती. अनेक रस्ते गायब झाले आहेत. शहरासाठी आवश्यक असलेली ३७७ आरक्षणे व ३९ रस्ते नवीन विकास योजनेत बेकायदा वगळली आहेत. नागरी विमान वाहतूक खात्याच्या संचालकांनी आरक्षणासंदर्भात सूचना केल्या होत्या. आधीच्या आराखड्यात आरक्षण ठेवण्यात आले होते. नवीन आराखड्यात विमानतळाच्या बाजूला व्यावसायिक बांधकामासाठी आरक्षण ठेवले आहे. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो, असेही याचिकेत म्हटले होते. अनेक ठिकाणी रस्ते वगळल्याने नागरिकांना वळसे घालून जावे लागणार आहे. महत्त्वाच्या रस्त्यांची रुंदी बेकायदा कमी करण्यात आली आहे. निवासी घरांवर आरक्षणे टाकली आहेत, असाही आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी दाखल केलेले आक्षेप गंभीर स्वरुपाचे आहेत. ते शहर विकासाला बाधा करणारे आहेत, असे मत कोर्टाने नोंदवून अंतरिम आदेश दिले होते.

महापौरांकडून नियमांची पायमल्ली
जानेवारी २०१५मध्ये प्रारूप विकास आराखडा सीलबंद करण्यात आला होता. ३१ ऑक्टोबरला तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. २८ डिसेंबर २०१५ रोजी पालिकेच्या विशेष सभेत आराखडा ६ फेब्रुवारी २०१६पर्यंत प्रसिद्ध करण्याच्या तारखेस मंजुरी करण्यात आली. विशेष म्हणजे आराखड्याचा मसुदा सीलबंद असताना सर्वसाधारण सभेत तो उघडून त्याच्या प्रती नगरसेवकांना देण्यात आल्या. नगरसेवकांना अभ्यासासाठी प्रती दिल्याची घोषणा महापौरांनी केली होती.
नगररचना विभागाने हस्तांतरित केलेला आराखडा न स्वीकारता तो नव्याने दुरुस्त करून प्रसिद्ध करण्यात आला. महापौरांनी नियमबाह्यपणे हे प्रसिद्ध केले, असा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. नगररचना अधिकाऱ्यांनाही आराखडा बदलण्यात रस होता. बेकायदा आराखड्याला मंजुरी देण्याचे कामही त्यांनी केल्याचा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. महापौरांनी स्वाक्षरी केलेला विकास आराखडा शासनाने राजपत्रात ४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला. २८ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत पालिकेचे आयुक्त उपस्थित नव्हते. त्यांनी आराखड्यावर स्वाक्षरी केलेली नाही. पालिका व नगररचना प्रशासनाने कायद्याचा गळा घोटला आहे. या बेकायदा बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे महापौरांनी राजपत्रात प्रसिद्ध केलेला प्रारूप आराखडा बेकायदा आहे. सर्वसाधारण सभेने संमत केलेल्या ठरावात अधिकारांचा गैरवापर करण्यात आला आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
औरंगाबाद पालिकेला प्रारूप आराखड्यासंदर्भात ठराव करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला नाही. नियोजनप्रक्रियेत पालिका किंवा सर्वसाधारण सभेला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. नियोजन प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप मान्य नाही. नियोजन मानांकनांचा भंग करण्यात आला आहे, असाही आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता.

मागणी पूर्ण न झाल्याने आरक्षण
प्रारूप विकास आराखडा नव्याने तयार करताना अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नियोजन करणारे अधिकारी व पालिकेतील पदाधिकारी यांची मागणी पूर्ण न झाल्याने चिकलठाणा येथील शेतकरी गोविंद बाजीराव नवपुते यांची ३१ एकर जमीन ट्रक टर्मिनल्ससाठी आरक्षित करण्यात आली, असा सनसनाटी आरोप त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आलेल्या याचिकेत केला होता. विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी नगरसेवकांनी संपूर्ण शहरात केंद्र (दुकाने) उघडली होती. जमीन व शेतीवर असलेली आरक्षणे उठविण्यासाठी मालमत्ताधारकांना बोलावून घेतले जात होते. प्रशासन व नगरसेवकांनी हातमिळवणी करून अवघ्या ४ दिवसांत नवीन आराखडा तयार करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
नगररचना उपसंचालक हे शासकीय अधिकारी आहेत. त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. प्रारूप आराखड्यात बदल करण्यात त्यांनी रस दाखविला. प्रशासन, पदाधिकारी यांच्याशी हातमिळवणी करताना नगररचना उपसंचालकांनी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेतली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्वसामान्यांना अखेर न्याय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा प्रारुप विकास आराखडा रद्द सर्वसामान्य नागरिकांना अखेर न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद विकास आराखडा विरोधी नागरी कृती समितीचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी व्यक्त केली आहे.
सुधारित प्रारूप विकास आराखड्यात जाचक आरक्षणे टाकली गेली होती. नागरिकांच्या घरावरून, मोक्याच्या जागा वगळून केलेली आरक्षणे भविष्यात अडचणीच ठरणार होती. याविरोधात तत्कालीन काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली. राजेंद्र दाते पाटील, राजेश मुंडे, राजकुमार जाधव, जितेंद्र देहाडे, मोहमंद शोएब यांचा त्यात समावेश होता. विविध वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांच्या बैठका घेऊन समितीने जनजागृती केली. सुधारित प्रारुप विकास आराखड्याचे नकाशे लोकांसमोर दाखविले आणि आक्षेप नोंदवून घेतले. त्याचे एकत्रिकरण करून नगरविकास खात्याच्या सचिवांना ते सादर केले होते. उच्च न्यायालयाने महापालिकेचा प्रारुप विकास आरखडा उच्च न्यायालयाने रद्द केला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अक्रम म्हणाले,'समितीने शहरवासियांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन उभे केले होते. वॉर्डावॉर्डांत फिरून जनजागृती केली. न्यायालयाच्या निकालामुळे सर्वसमान्यांना न्याय मिळाला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल, क्रीडांगणे, शाळांच्या जागांवर डल्ला

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
औरंगाबाद : राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने सादर केलेल्या औरंगाबाद शहराच्या सुधारित विकास आराखड्यात सुधारणा करताना महापालिकेशी संबंधित यंत्रणेने भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार न करता रस्त्यांची रुंदी कमी करण्याबरोबरच क्रीडांगणे, शाळा, उद्याने, हॉस्पिटलच्या जागांवरही डल्ला मारला आणि या जागा आरक्षणातून मुक्त केल्या. मोठ्या प्रमाणावर जागा आरक्षणातून वगळल्यामुळे असमतोल विकास होईल. आवश्यक त्या सोई सुविधा मिळणार नाहीत, असे गृहित धरून आराखड्यातील बदलांच्या संदर्भात अनेक आक्षेप प्राप्त झाले आहेत.

सेक्टर ः ए
प्राथमिक शाळा, वाचनालय
महाराष्ट्र शासनाने १९७९मध्ये ठरवून दिलेल्या प्लॅनिंग स्टँडर्डनुसार (नियोजन मानांकन) प्राथमिक शाळा, वाचनालय, क्रीडांगण यासाठी लोकसंख्येच्या १५ टक्के प्रमाणात आरक्षण ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार ए-सेक्टरची २०२६मध्ये होणारी लोकसंख्या १ लाख ६० हजाराच्या घरात गृहित धरल्यास या सर्व प्रकल्पांसाठी ४८ जागा आरक्ष‌ित ठेवणे गरजेचे होते, पण प्रत्यक्षआत ३३ जागाच आरक्षित ठेवल्या. क्षेत्रफळही १९.२० हेक्टरवरून १६.१५ हेक्टर करण्यात आले.

क्रीडांगणे
प्लॅनिंग स्टँडर्डनुसार एक हजार लोकसंख्येसाठी ०.४० हेक्टर जागा क्रीडांगणासाठी असावी. या निकषानुसार ४० जागा क्रीडांगणासाठी आरक्षित करणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात ३२ जागाच क्रीडांगणासाठी राखीव असल्याचे दाखवण्यात आले. त्यांचे क्षेत्रफळ ६४ वरून ८३.९९ हेक्टर करण्यात आले. क्रीडांगणाचे क्षेत्रफळ वाढलेले दिसत असले तरी एमजीएमचे गोल्फकोर्ट क्रीडांगणासाठी आरक्षित असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले. त्यामुळे क्रीडांगणाचे क्षत्रफळ वाढल्याचे लक्षात येते. गोल्फक्लबचे क्षेत्रफळ वजा केल्यास सेक्टर एमध्ये क्रीडांगणासाठी ६०.३३ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहते.

हॉस्पिटल, आरोग्य केंद्र
दहा हजार लोकसंख्येसाठी ०.२५ हेक्टर क्षेत्र हॉस्पिटल, आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असावा. २०२६ची लोकसंख्या लक्षात घेता हॉस्पिटल, आरोग्य केंद्रांसाठी १६ जागा आरक्षित ठेवायला हव्यात, पण सुधारित आराखड्यात आठच जागा आरक्षित ठेवल्या. निकषानुसार आठ जागा कमी आहेत. त्यामुळे १.७६ हेक्टर क्षेत्र कमी झाले.

उद्याने
एक हजार लोकसंख्येसाठी ०.२० हेक्टरचे क्षेत्र उद्यानासाठी आरक्षण असणे मानांकनानुसार गरजेचे आहे. भविष्यातील १ लाख ६० हजारांची लोकसंख्या लक्षात घेता ३२ हेक्टर क्षेत्र उद्यानासाठी आरक्षित असले पाहिजे, पण सुधारणा केलेल्या विकास आराखड्यात २०.२८ हेक्टर क्षेत्रच उद्यानांसाठी आरक्षित ठेवण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला. उद्यानासाठीचे १२ हेक्टर क्षेत्र कमी करण्यात आले.

रस्त्याची रुंदी घटवली
जयसिंगपुरा ते शरणापूर चौक हा रस्ता ३० मीटर रुंदीचा होता. आराखड्यात सुधारणा करताना तो २४ मीटरचा करण्यात आला. पडेगाव येथील कत्तलखाना ते भावसिंगपुरा हा रस्ता मूळ आराखड्यात २४ मीटरचा होता, तो १५ मीटर रुंदीचा करण्यात आला.

सेक्टर ः बी
प्राथमिक शाळा, वाचनालय
२०२६मधील संभाव्य लोकसंख्या २ लाख १७ हजार गृहित धरल्यास प्राथमिक शाळा व वाचनालयासाठी ६५ जागा आरक्षित ठेवणे गरजेचे होते. त्यांचे एकूण क्षेत्रफळ २६.४ हेक्टर असले पाहिजे, पण प्रत्यक्षात ३२ जागाच प्राथमिक शाळा व वाचनालयासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. त्यांचे क्षेत्रफळही १४.७६ हेक्टर करण्यात आले.

हॉस्पिटल, आरोग्य केंद्र
बी सेक्टरची २०२६ मधील लोकसंख्या २ लाख १७ हजार गृहित धरल्यास हॉस्पिटल, आरोग्य केंद्रासाठी ५.४२ हेक्टर आरक्षण ठेवले पाहिजे. प्रत्यक्षात २.९० हेक्टर क्षेत्रच हॉस्पिटल, आरोग्य केंद्रांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या गरजेनुसार हॉस्पिटल, आरोग्य केंद्रांचा विकास होणे शक्य नाही.

उद्याने
उद्यानांसाठी ४३.०४ हेक्टर जागा आरक्षित ठेवायला हवी होती. प्रसिद्ध केलेल्या प्रारूप आराखड्यात उद्यानांसाठी ७५.४२ हेक्टर क्षेत्र आरक्षित असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे क्षत्र सुधारित आराखड्यात नमूद करताना हर्सूल येथील सध्या अस्तित्वात असलेले ४७.२० हेक्टरचे उद्यान त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. वास्तविक पाहता हे उद्यान वगळून क्षेत्रफळाची बेरीज करणे आवश्यक होते. ४७.२० हेक्टर क्षेत्र वजा केल्यास १४.६ हेक्टर क्षेत्र कमी करण्यात आले आहे.

क्रीडांगणे
एक हजार लोकसंख्येसाठी ०.४० हेक्टर क्षेत्राचे क्रीडांगण असले पाहिजे. २०२६मधील संभाव्य लोकसंख्या लक्षात घेता ८६ क्रीडांगणांसाठीच्या जागा आरक्षित ठवणे गरजेचे होते, पण सुधारणा करताना २० जागाच क्रीडांगणासाठी आरक्षित ठेवल्या. ६० हेक्टरच्या गोल्फकोर्ट मैदानावर आरक्षण दाखवून क्रीडांगणासाठीच्या जागांच्या क्षत्रफळाची गोळाबेरीज करण्यात आली. गोल्फकोर्टचे मैदान एमजीएम या संस्थेचे असून, त्याची मालकी वैयक्तिक आहे. सार्वजनिक वापरासाठी क्रीडांगण म्हणून त्याचा वापर होऊ शकत नाही.

सेक्टर ः सी
प्राथमिक शाळा, वाचनालय
सेक्टर सीमधील २०२६ची संभाव्य लोकसंख्या १ लाख ४३ हजार गृहित धरल्यास ४२ जागा आणि १७.५० हेक्टर क्षेत्र शाळा व वाचनालयासाठी आरक्षित असणे गरजेचे होते, प्रत्यक्षात २५ जागा आणि ११.४५ हेक्टर क्षेत्रच आरक्षित ठेवण्यात आले आहे.

उद्याने
या सेक्टरमध्ये उद्यानांसाठी २८.६० हेक्टर जागा उद्यानांसाठी राखीव ठेवणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १०.६० हेक्टर क्षेत्र कमी दाखवण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेले सी-८२ गार्डन उद्यानाच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. त्याचे क्षेत्रफळ १४.६० हेक्टर आहे. सध्या अस्तित्वास असलेले क्षेत्र सुधारित विकास आराखड्यात दाखवून नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आक्षेपही आहे. प्रारूप विकास आराखड्यात चिकलठाणा शिवारात गटक्रमांक २३६वर स्टेडिअम दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात ही जागा गायरान जमिनीची आहे.

हॉस्पिटल, आरोग्य केंद्र
हॉस्पिटल व आरोग्य केंद्रांसाठी सेक्टर सीमध्ये ३.५७ हेक्टर क्षेत्र आरक्षित ठेवणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात २.१५ हेक्टर क्षेत्रच आरक्षित ठेवण्यात आली. १.४२ हेक्टर क्षेत्र कमी ठेवलेले आहे. त्यामुळे मानांकनाचा भंग झाल्याचे आक्षेपांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सेक्टर ः डी
प्राथमिक शाळा, वाचनालय
डी - सेक्टरची २०२६मधील संभाव्य लोकसंख्या १ लाख ६८ हजार गृहित धरल्यास ५० जागांचे आरक्षण ठेवणे गरजेचे होते. त्याचे क्षेत्रफळ २०.१६ हेक्टर असणे अपेक्षित आहे. प्रारूप आराखड्यात मात्र १३ जागा दाखवण्यात आल्या. अस्तित्वात असलेल्या शाळा व वाचनालयाच्या १९ जागा गृहित धरल्यास १८ जागा कमी दाखवण्यात आल्या.

क्रीडांगण
क्रीडांगणांसाठी ६७ हेक्टर जागा आरक्षित असणे अपेक्षित आहे, पण सुधारित आराखड्यात २३.८७ हेक्टर जागाच क्रीडांगणासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला. ४३.३३ हेक्टर क्षेत्र कमी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात क्रीडांगणांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

उद्याने
डी - सेक्टरमध्ये ३३.६० हेक्टर क्षेत्र उद्यानांसाठी आरक्षित ठेवणे गरजेचे असताना ८.७३ हेक्टर क्षेत्रच राखीव ठेवण्यात आले आणि चारच जागा उद्यानासाठी आराखड्यात दाखविल्या. डी - सेक्टरचे क्षेत्रफळ १५४२.७४ हेक्टर आहे.

हॉस्पिटल, आरोग्य केंद्र
मानांकनानुसार दहा हजार लोकांसाठी ०.२५ हेक्टर क्षेत्र हॉस्पिटल, आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असले पाहिजे. संभाव्य लोकसंख्या लक्षात घेता १६ जागा आणि ४.२० हेक्टर क्षेत्र हॉस्पिटल, आरोग्य केंद्रांसाठी आरक्षित ठेवायला हवे होते, पण दहा जागा आणि ३.५१ हेक्टर क्षेत्रच आरक्षित करण्यात आले आहे. सहा जागा आणि ०.६९ हेक्टर क्षेत्र कमी दाखवण्यात आले आहे.

सेक्टर ः ई
प्राथमिक शाळा, वाचनालय
सेक्टर - ईची २०२६ मधील संभाव्य लोकसंख्या १ लाख ६२ हजार गृहित धरल्यास प्राथमिक शाळा व वाचनालयांसाठी ४९ जागा आरक्षित असणे गरजेचे आहे. त्याचे क्षेत्रफळ १९.४४ हेक्टर असले पाहिजे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यात २४ जागाच प्राथमिक शाळा व वाचनालयासाठी ठेवण्यात आल्या. त्याचे क्षेत्रफळ १२.२४ हेक्टर दाखवण्यात आले.

क्रीडांगण
क्रीडांगणांसाठी ६४.८० हेक्टर जागा आरक्षित ठेवायला हवी होती, पण प्रत्यक्षात ३०.७० हेक्टर जागाच क्रीडांगणासाठी आरक्षित असल्याचे दाखवण्यात आले. ३४.१० हेक्टर जागा कमी दाखवण्यात आली.

हॉस्पिटल, आरोग्य केंद्र
ई - सेक्टरची संभाव्य लोकसंख्या लक्षात घेता हॉस्पिटल, आरोग्य केंद्रांसाठी ४.०५ हेक्टर जागेचे आरक्षण ठेवायला हवे होते, प्रत्यक्षात २.९४ हेक्टर जागा आरक्षित ठेवण्यात आली. १.११ हेक्टर क्षेत्रफळ कमी ठेवण्यात आले.

उद्याने
सेक्टर - ईमध्ये ३२.४० हेक्टर जागा आरक्षित ठेवणे गरजेचे होते, पण प्रत्यक्षात २३.०५ हेक्टर क्षेत्र उद्यानांसाठी आरक्षित करण्यात आले. ९.३५ हेक्टर जागा कमी आरक्षित करण्यात आली.

रस्त्याची रुंदी घटवली
औरंगाबाद ते पैठणरोडवर खांडेवाडीला जाणारा रस्ता १९९१च्या मंजूर विकास आराखड्यात ६० मीटर रुंदीचा होता. प्रारूप आराखड्यात तो १५ मीटरचा करण्यात आला. संभाव्य लोकसंख्या आणि वाढणारी वाहतूक लक्षात घेता रस्ते जास्त रुंदीचे असले पाहिजेत, पण तसे करण्यात आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड शहरात आता विनामूल्य वाय-फाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

इस्लामपूरनंतर वाय फायची सुविधा मिळणारे बीड शहर हे राज्यातील तिसरे शहर असणार आहे. शनिवारी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी शहरातील बशीरगंज भागात या सेवेची सुरुवात करण्यात आली.

बीड शहर हे साधारण दोन लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल शहर असून स्मार्ट आणि डीजिटल शहराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. बीड नगरपालिकेने जिओ या कंपनीशी करार केला असून, या करारानुसार बीड शहर वाय फाय फ्री होणार असल्याची माहिती भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. विशेष म्हणजे नगरपालिकेस याचा एक रुपया खर्च येणार नसून, सर्व खर्च कंपनी उचलणार आहे. या करारानुसार सुरुवातीला बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, बशीरगंज, शाहू नगर, मोमीनपुरा, सुभाष रोड या पाच मोक्याच्या ठिकाणी वाय फाय फ्री सुविधा पुरवली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागात ही सुविधा देणार असल्याचे ते म्हणाले. या सेवेचा फायदा शहरातील नागरिक, विद्यार्थी, तरुण-तरूणी, व्यावसायिकांना होईल. तसेच नगरपालिकेच्या अनेक सुविधा यामुळे ऑनलाइन उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. या वेळी नगराध्यक्षा दुधाळ व अनेक नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी जिओ कंपनीचे अधिकारी आजिम शेख म्हणाले, 'बीड नगरपालिकेच्या वतीने या सुविधेसाठी एक वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. त्याला आता यश आले. या मोफत वाय फाय सुविधेसाठी कंपनी एक कोटी वीस लाख रुपये खर्च केला असून, बीड शहराला स्मार्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे.' पत्रकार परिषदेनंतर बशीरगंज परिसरात या सेवेची सुरुवात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिस्चार्ज न मिळाल्याने रुग्णाची आत्महत्या

$
0
0

हयात हॉस्पिटलमधील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नसल्यामुळे अतिदक्षाता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेल्या रुग्णाने शुक्रवारी मध्यरात्री खिडकीतून उडी मारून आपली आत्महत्या केली. बजाजनगरातील कामगार भवनासमोर असलेल्या हयात मल्टी स्पेशल हॉस्पिटलात घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, बजाजनगरातील पी-१४८ येथे उभारण्यात आलेल्या हयात हॉस्पिटलमध्ये दोन ऑगस्ट रोजी बाबूल लंकेश्वर बोरो (वय ३१, रा. बजाजनगर, मूळ रा. बोराम जि. बक्सा, आसाम) याला त्याचा मित्र संतोषकुमार शामलाल दुबे याने रक्तदाब वाढल्याने उपचारासाठी हयात हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेव्हापासून त्याच्यावर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्याचा हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी डिस्चार्जच्या करण्यावरून वाद झाला होता. बाबूल वारंवार बेडवरून उठून डॉक्टरांजवळ जाऊन उभा राहत होता. डॉक्टरांनी त्याला तीन-चार वेळा बेडवरून नेऊन झोपविले व सलाइन सुरू केले, मात्र काही वेळानंतर तो पुन्हा उठून येऊन डॉक्टरांशी हुज्जत घालू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे त्याने अतिदक्षता विभागाच्या खिडकीवर डोके मारून घेतले होते.

त्यानंतर तेथील डॉक्टर व वॉर्ड बॉय यांनी त्याला पुन्हा बेडवर नेऊन बसविले, मात्र त्यांना न जुमानता हातात कात्री घेऊन त्याने डॉक्टरांना धमकविले. त्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजा मोकळा करून दिला, मात्र भडकलेल्या बाबूल खिडकीला लावलेली लोखंडी तारेची जाळी तोडून बाहेर पडला. बाहेर बसविल्या 'एसी'च्या बॉक्सवर तो ठाण मांडून बसला व काही वेळातच त्याने उडी मारली. त्याने हातात कात्री घेतल्यानंतर डॉक्टरांनी भितीने पलयान केले होते. हा सर्व प्रकाराचे सीसीटीव्हीमध्ये चित्रिकरण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PSIचा अकरावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

रिवॉल्व्हरचा धाक दाखवून पोलीस उपनिरीक्षकानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये घडली असून खाकी वर्दीतील या हैवानास तत्काळ अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रेम बनसोडे (२६) असे आहे. उस्मानाबादमधील रहिवासी असलेला बनसोडे सध्या सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बनसोडेवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी अकराव्या इयत्तेत शिकत असून अत्याचाराबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिच्या आई-वडिलांना बनसोडेने रिवॉल्व्हरचा धाक दाखवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत उस्मानाबाद पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामेळाव्यात जंबो भरती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी झालेल्या रोजगार मेळाव्यातून जंबो नोकरभरती झाली. २७ कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला, तर १,८०० विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. यात अभियांत्रिकी, पॉलिटेक्निकच्या बेरोजगारांची संख्या सर्वाधिक होती. विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नायलिटतर्फे या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
नोकरीसाठी वाढलेली प्रचंड स्पर्धा काय असते, हे विद्यापीठात याची डोळा अनुभवायला मिळाले. विविध पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या, पूर्ण केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. औरंगाबाद ऑटो, स्कोडा, भारत आयरॉन, ग्रेटवेल, बीव्हीजी इंडिया, लिओ गेम इंजिनीअरिंग, वेदा इंजिनीअरिंग, हिंदुस्थान ग्लोबल, आयसीआयसी, एचडीएफसी, गामा प्रोसेस, ज्युबिलंट फूडवर्क, दानी ग्रुप, ट्रायजेन टेक्नॉलॉजी अशा नामांकित कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला. यात सर्वाधिक कंपन्या सेवा क्षेत्रातील होत्या. मुलाखत घेण्यासाठी प्रत्येक कंपनीसाठी व्यवस्था करण्यात आली, परंतु योग्य नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची काहीवेळ धांदल उडाली.

औरंगाबादच हवे...
मुलाखतीत विविध कंपन्यांनी दुसऱ्या शहरात जाण्याची तयारी आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. मात्र, बहुतांशी जणांनी नोकरीचे ठिकाण म्हणून औरंगाबादलाच प्राधान्य दिल्याचे निरीक्षण या कंपन्यांनी नोंदविले. व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवीधर विद्यार्थ्यांची नोकरीसाठी शहर सोडण्याची मानसिकता कमी असल्याचे समोर आले. बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी याबाबत आयोजकांकडे हे निरीक्षण नोंदविले.

-
तीन कंपन्यांसाठी मी मुलाखत दिली. हा अनुभव निश्चित फायद्याचा ठरला. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने प्रत्येकाला मुलाखतीसाठी कमी वेळ मिळाला. पाहू काय होते ते. - शीतल घांडगे
-
नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. खासगी क्षेत्रातील नोकरीकडे तरुणाईचा कल वाढला आहे. वाढती स्पर्धा लक्षात घेता मुलाखतीची तयारी कशी करायला हवी याचा अनुभव मिळाला. - तेजस्विनी गाजरे
-
विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी एकाच छताखाली मुलाखतीचे आयोजन केल्याचा फायदा आम्हा विद्यार्थ्यांना होतो. यात काही कंपन्यांनी केवळ आमचा बायोडाटा जमा करून घेतला. - नेहा सोनवणे
-
कंपन्यांना काय आढळले, विद्यार्थ्यांच्या क्षमता कशा आहेत, कशी तयारी करावी हे आम्ही कॉलेजांना कळवू. विद्यार्थी शहर सोडायला तयार नसतात. ही मानसिकता बदलावी. - गिरीष काळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी, विद्यापीठ
-
आपल्याकडील विद्यार्थी संवाद कौशल्यात कमी पडतात. त्यांच्यात क्षमता आहे, परंतु ते मांडण्यात ते कमी पडतात. याबाबत कॉलेजस्तरावर अधिक तयारी करून घेण्याची गरज आहे. - विजय रिसे, सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेरिटेज वॉक’ला उदंड प्रतिसाद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यटन प्रतिष्ठानतर्फे आयोजित हेरिटेज वॉकला शनिवारी शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. विद्यापीठ परिसरातील सोनरी महल भागात पहिला वॉक झाला.
शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळांपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पर्यटन प्रतिष्ठान तर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यातील पहिला वॉकचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या हस्ते झाले. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, बीसीयूडी डॉ. सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या अंतर्गत सोनेरी महल, पर्यटन प्रशासन, विद्यापीठ ग्रंथालय येथे भेट देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ, महापालिका व विभागीय आयुक्त कार्यालयच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी एमटीडीसीचे अण्णासाहेब शिंदे, मधुकर आर्दड, डॉ. विजयकुमार फड, वर्षा ठाकूर, प्रल्हाद कचरे, शिवाजी शिंदे, शशिकांत हदगल यांची उपस्थिती होती.

पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करू
हेरिटेज वॉकच्या उद्घाटनात आयुक्त डॉ. दांगट म्हणाले, 'शहरात ऐतिहासिक वास्तूंची संख्या मोठी आहे. आपण पर्यटन राजधानी आहे असे म्हणतो, परंतु शहरात पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करत नाही. आगामी काळात पर्यटन प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला भरभराटी मिळवून देण्यात येईल. यासाठी इतिहासप्रेमी, पर्यटनाचे अभ्यासक, उद्योजकांना सहभागी करून घेतले जाईल.'

पुढील वेळापत्रक
- ३० ऑगस्ट - नौखंडा पॅलेस
- ३ सप्टेंबर - सिद्धार्थ उद्यान
- १८ सप्टेंबर - मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रहालय
- १ ऑक्टोबर - औरंगाबाद लेणी
- ५ नोव्हेंबर - सलीम अली सरोवर
- १५ नोव्हेंबर - बीबी-का-मकबरा, भडकल गेट
- १९ नोव्हेंबर - नहर ए अंबरी
- ३ डिसेंबर - छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय
- १७ डिसेंबर - गुलशन महल
( वेळः सकाळी ७ ते ९)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...मित्र माझे भरलेले आभाळ!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'मैत्रिण माझी स्वच्छ दुपार
मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी
मैत्रिण भरेलेले आभाळ'

कवी संदीप खरे यांची ही कविता. मित्र, मैत्रिणीतले निर्मळ नाते उलगडते. जगातले सर्वांत सुंदर नाते मैत्रीचे. त्याला ना जातीच्या भिंती, ना सामाजिक चौकटी. ना स्वार्थाची किनार. बस असतो तो विश्वास. आपल्या मित्रासाठी वाट्टेल ते करणारा मित्र असतो, असा या सर्वांची यारी जपणारा फ्रेंडशीप डे रविवारी साजरा होतो आहे. त्यासाठी शनिवारी तरुणाईने शहरातील विविध दुकानांत जाऊन भेट वस्तूंची खरेदी केली.
ऑगस्टचा पहिला रविवार अर्थात फ्रेंडशीप डे. गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असूनही तरुणाईचा उत्साह कमी नव्हता. आपल्या जीवाभावाच्या मित्राला हटके भेट देण्यासाठी सर्वांनी जोरदार तयारी केली. यामध्ये लहान मुलेही मागे नव्हते. प्रत्येक वयोगटाची आवड लक्षात घेऊन गिफ्ट गॅलरीमध्‍ये यंदा सुंदर वस्तू उपलब्‍ध आहेत. फ्रेंडशीप बेल्ट. त्याचे प्लॅस्टिक, रबर व रेऑनचे वेगवेगळे प्रकार. वेगवेगळ्या डिझाइने तरुणांना भुरळ घातली. फॅन्सी बेल्टमध्ये मॅसेज बेल्ट, क्रिस्टल, नाइट लाइट ग्लोइंईंग, लकी स्टोन, कार्टून कॅरेक्टरच्या बेल्टसह वूडन व चक्‍क सुतळीचे इको फ्रेंडली फेंडशीप बेल्टही बाजारात आले आहेत.
लटकन बेल्टमध्ये क्रिस्टल, ब्लॅक स्टोन, मणी बेल्ट उपलब्ध आहेत. खास मुलींना देता येणारे मेटलचे फ्रेंडशीप बेल्ट, मुलांसाठी लेदर बेल्ट, मॅच बॉक्स लेटर विथ बेल्ट, कीचेन विथ बेल्ट यांनाही पसंती मिळाली. बेल्टची रेंज अगदी १० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यत आहे. वितभर काचेच्या बाटलीत रंगबेरंगी कागदाच्या गुंडाळीवर लिहलेल्या मॅसेजचे गिफ्टही भावणारे होते. क्रिस्टलचे फाउंटन असलेले शो पीस, ज्वेलरी बॉक्स, बेस्ट फ्रेंडचा किताब देणारे शील्ड, डीडीएलजे वॉलपीस, अक्रोड सरप्राइज, देखणे कप गिफ्टची तरुणाईंनी आवर्जून खरेदी केली.
-
'फेंडशीप डे'च्या गिफ्टसाठी यंदा कार्टून कॅरेक्टरचा जास्तीत जास्त वापर केला आहे. कमी बजेटमध्येही गिफ्ट असल्याने मुले खूप आनंदी होती. काहींनी तर आठवाड्याभरापूर्वीच खरेदी केली. व्हॉटस् अॅपच्या काळात भेटकार्डेही तितकीच लो‌कप्रिय आहेत. आर्कषक मांडणी व वाचनीय मजकुरामुळे मोठ्या माणसांनीही भेटकार्डे नेली. - भारती नांगरे, नयन क्रिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images