Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रेमीयुगलाने घेतले विष; तरुणीचा मृत्यू, युवक गंभीर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रेमीयुगलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात युवतीचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला, तर युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू आहेत. सिडकोतील ठाकरे नगरात ही घटना घडली.
आकाश (वय २४, रा. बीड) व प्रियांका (वय २३, रा. जालना) (दोघांचे नाव बदलले आहे) असे या प्रेमीयुगलाचे नाव आहे. आकाश बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तो येथील एका नामांकित कंपनीत गेल्या चार वर्षांपासून नोकरीला आहे. मित्रांसह तो सिडको एन २, ठाकरे नगर परिसरात किरायाच्या खोलीत राहत असे. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास आकाशचा रूमपार्टनर घरी आला. त्यावेळी घराला आतून कडी लावलेली होती. आवाज देऊनही आकाशने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याला शंका आली. याबाबतची माहिती त्याने मुकुंदवाडी पोलिसांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून प्रवेश केला. त्यावेळी आकाश व प्रियांका हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा उपाचारादरम्यान प्रियांकाचा मृत्यू झाला, तर आकाशवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड करत आहेत.

लग्नास विरोध म्हणून...
प्रियांका ही जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील रहिवासी असून नात्यातीलच एका तरुणाशी तिचे लग्न ठरले होते. औरंगाबादेत राहणाऱ्या मावशीला भेटण्यासाठी म्हणून ती दोन दिवसांपूर्वी येथे आली होती, अशी माहिती तपासात समोर येत आहे. घराच्याकडून लग्नास विरोध होईल, अशी शक्यता गृहीत धरून या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

सुसाइड नोट सापडली
घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली. त्यात आकाशने 'आम्ही स्वखुशीने हे पाऊल उचलत आहोत,' असे म्हटले आहे. चिठ्ठीत एटीएम कार्डाचा कोड नंबर दिला असून, 'खात्यातील सर्व पैसे व गाडी पालकांना द्या,' असा मजकूर आहे. घटनास्थळी औषधाची बाटली सापडली असून ती तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जात प्रमाणपत्राअभावी प्रगतीत अडसर

$
0
0


Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबादः निझाम राजवटीच्या काळात नोकरी, उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील मन्नेरवारलू समाज मराठवाड्यात आला. नोकरी, व्यवसायाच्यानिमित्ताने तो महाराष्ट्रात पसरला. विखुरलेल्या या समाजाला एकत्रित आणण्याकरिता महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटनेची स्थापना करण्यात आली. या समाजाची आणि संघटनेची वाटचाल आजच्या समाजमनमध्ये.
-
आंध्रातील मांडवा भागातून मन्नेरवारलू समाज प्रामुख्याने औरंगाबादमध्ये आला. छावणी भागात हा समाज मोठ्या संख्येने राहतो. पूर्वीच्या काळात भातशेती, मजुरी हेच या समाजाचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत होते. आज हा समाज प्रामुख्याने गवंडी, सुतारकाम काम करून उदरनिर्वाह करतो. उदरनिर्वाहासाठी हा समाज कायम भटंकती करीत असल्याने पूर्वीच्या काळात या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प होते. शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर या समाजाने मुला-मुलींच्या शिक्षणावर भर दिला. आठवी-दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मुले कुटुंबाला हातभार लावण्याकरिता सुतार, गवंडी काम करीत असत. त्यामुळे शिक्षण अर्धवट राही. त्याचा फटका हा समाज आजही सोसत आहे. या समाजाची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बहुतांश मुलांचे शिक्षण अर्धवट राहिले. आता या परिस्थितीत बदल होताना दिसत आहे. बहुतांश पालक मोलमजुरी करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, असे संस्थापक अध्यक्ष मनोहर यादव व सचिव यशवंत यादव यांनी सांगितले. प्रमाणपत्राची मुख्य अडचण
मन्नेरवारलू समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात येतो. दरनिर्वाहासाठी कायम भटकंती करीत राहिल्याने या समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळवणे हे अत्यंत अवघड व किचकट झाले आहे. प्रमाणपत्राअभावी या समाजाला आरक्षणाचे कोणतेच लाभ मिळत नाहीत. शासकीय लाभापासून हा समाज अद्यापही मोठ्या प्रमाणावर वंचित आहे. मुला-मुलींनाही शिष्यवृत्ती व अन्य फायदे मिळत नाहीत. त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणातही अडसर ठरत आहे, अशी खंत सचिव यशवंत यादव यांनी व्यक्त केली.
निझाम राजवटीच्या काळापासून हा समाज औरंगाबादमध्ये राहतो आहे. या समाजाला एकत्रित आणण्याकरिता १९७५मध्ये महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटनेची स्थापना करण्यात आली. मनोहर यादव हे संस्थापक अध्यक्ष आहेत. शासनाची कठोर भूमिका व वेगवेगळ्या कायद्यांमुळे हा समाज आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहे. पूर्वजांचे प्रमाणपत्र, पन्नास वर्षांपूर्वीचा पुरावा असे काही पुरावे सादर करणे एक आव्हान ठरलेले आहे. त्याचा फटका या समाजाच्या युवा पिढीला बसत आहे. प्रमाणपत्रासाठीच्या अटी शिथिल केल्या, तर मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील, असे यशवंत यादव यांनी सांगितले.

विविध सामाजिक उपक्रम
मन्नेरवारलू समाज संघटनेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मुर्त्यालंबादेवी, पोतंम्बादेवी, यलम्मादेवी हे मन्नेरवारलू समाजाचे कुलदैवत. पूर्वीच्या काळात समाजातील विवाह सोहळे हे तीन दिवसापर्यंत चालत. पूर्वीपासूनच या समाजात हुंडा पद्धत नाही. विवाह सोहळ्याचा खर्च वधू-वर पक्ष आपापल्यापरीने करतो. अलीकडच्या काळात विवाह सोहळेही आटोपशीर पद्धतीनेच होत आहेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसत आहे. वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळ्याचे संघटनेतर्फे आयोजन केले जाते. गणपती, नवरात्र, सक्रांत असे उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे केले जातात. तेलगू ही मातृभाषा असली, तरी आता हिंदी आणि मराठी हीच या समाजातील बोलीभाषा बनलेली आहे. या भाषेतूनच शिक्षण व व्यवहार करतात, असे यशवंत यादव यांनी सांगितले.

आखाडी पूजा
आषाढ महिन्यात मुर्त्यालंबादेवी देवीची पूजा हा समाज एकत्रितपणे उत्साहात करतो. यंदाही हा पूजा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक प्रशांत तारगे, मनोहर यादव, गजानन चॅम्पीयाल, सुभाष कॅदल, राजू पोतराज, विजय संकेत, शशिकांत गणपे, राजेश गोरे, दीपक गवल, मनोज एरपुले, पुरुषोत्तम कोमरे, संतोष गवल, आनंद पंदीकर, प्रीती दुबे, मंगला पंदीकर, विजया यादव, राणी नेरले आदी उपस्थित होते. ही परंपरा हा समाज ४२ वर्षांपासून नियमितपणे पाळत आहे.

महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटना कार्यकारिणीः संस्थापक अध्यक्ष मनोहर यादव, अध्यक्ष गजानन चम्पीयाल, उपाध्यक्ष शशिकांत गणपे, सचिव यशवंत यादव, सहसचिव मनोज यरपुले, पुरुषोत्तम कोमरे, कोषाध्यक्ष राजेश गोरे, सदस्य - दीपक गवल, राजेश दुबे, संदीप गुंडलेकर, गजानन मनोरे, बाबुलाल जुन्नाडकर, जितेश गंगावते, राजेश नित्यालू.
-
जातीचे प्रमाणपत्र मिळवणे हेच मोठे आव्हान मन्नेरवारलू समाजासमोर आहे. त्यामुळे शासकीय लाभापासून हा समाज वंचित राहात आहे. यात शिथिलता आणल्यास समाजातील युवा पिढीला फायदा होऊ शकेल. - मनोहर यादव, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटना
-
शिक्षणाकडे कल वाढल्यामुळे मुला-मुलींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आर्थिक कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहाता कामा नये. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुटसुटीत करणे आवश्यक आहे. - यशवंत यादव, सचिव, महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारांचे औताडेंना खडे बोल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'पक्षात शिस्त पाळणे आवश्यक आहे. जमत नसेल तर पक्ष सोडून जा. नाहीतर मी पदत्याग करतो. दुसऱ्याचे पद सहन करण्याची ताकद ठेवा. तुम्ही आठ वर्षे अध्यक्ष होतात मी सामान्य कार्यकर्ता म्हणून राहिलो. आता दुसरा अध्यक्ष झाला की असे का बोलता ?,' अशा शब्दांत काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार केशवराव औताडे यांना खडे बोल सुनावले.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने शनिवारी गांधीभवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, केशवराव औताडे, निरीक्षक खातिबउद्दीन यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आढावा सादर करताना तक्रारींचा सूर होता. औताडे म्हणाले, 'लवकरच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना सामोर जायचे आहे. पक्षात अनेक बडे नेते कामासाठी पुढे येत नाहीत. ग्रामीण भागात बळदामध्ये ज्वारी ठेवली जाते. ती जर काढली नाही तर कुजते. तसे अनेकांच्या बळदा भरल्या आहेत, पण त्याचा वापर होत नाही. वैजापूरमध्ये एकही जिल्हा परिषद सदस्य नाही. नेते मंडळी काय करतात ?,' असा सवाल आमदार झांबड यांना विचारला. 'सहकार क्षेत्राच्या निवडणुका लढताना सगळे संकते तुडविले जातात. निवडून आलेले आपल्या पक्षाचे आहेत की नाही अशी शंका येते. कुणाशीही युती केली जाते. हे योग्य नाही. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद किती राहिली आहे, याचा तपास केला पाहिजे. यावर जिल्हाध्यक्षांनी काहीतरी तोडगा काढावा,' अशी मागणी केली.
आमदार झांबड म्हणाले, 'सत्ता गमावल्यानंतर तरी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे. पुढे निवडणुका आहेत. जे लोकांपर्यंत पोचतील, त्यांचे प्रश्न जाणून घेतील त्यांनाच तिकिटाचा विचार करण्यात येईल. वशिलेबाजीला थारा मिळणार नाही.' खतिबउद्दीन यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. कल्याण काळे यांनी औरंगाबाद व फुलंब्रीतील सहकारी संस्था ताब्यात घेतल्याचे सांगितले.
त्यानंतर सत्तार यांनी चौफेर टोलेबाजी केली. 'यापुढील निवडणुका पक्षाच्या झेंड्याखाली लढविल्या जातील. या व्यासपीठावर एकमेकांविषयी बोलणे अपेक्षित नाही. तुम्हाला हे मान्य नसेल, तर मी राजीनामा देतो तुम्ही काम करा, पण शिस्त मोडणे मला कदापि मान्य नाही. कार्यकर्त्यांसमोर नेत्यांची ही भाषा चुकीची असल्याचे त्यांनी काळे आणि औताडे यांचे नाव घेऊन नमूद केले. ज्यांना अशी कार्यपद्धती रुजत नसेल, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावे. काँग्रेस एका माणसामुळे चालते असे समजू नका.'
औताडेंना उद्देशून सत्तार म्हणाले, 'दुसऱ्याचे पद सहन करायची ताकद असली पाहिजे. तुम्ही आठ वर्षे जिल्हाध्यक्ष होतात. तेव्हा मी आमदार असूनही सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम केले. आता दुसरा अध्यक्ष झाला की असे का बोलायचे ? हे व्यासपीठ म्हणजे वाद करण्याचा अड्डा नाही. मोघम कुणाला बोलू नये, पुरावा असल्यास तक्रार करावी, गटबाजी कुठेही होऊ नये.पुढे निवडणुका आहेत. ज्येष्ठांना विनंती की तुमचे वाद जाहीरपणे मांडू नका.'

काळे, पाटील , झांबड यांच्यावर जबाबदारी
जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी तीन नेत्यांकडे नऊ तालुक्यांची निवडणूक जबाबदारी सोपविली. त्यानुसार डॉ. कल्याण काळे यांच्याकडे जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झालेले पैठण, औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव तालुके, माजी आमदार नितीन पाटील यांच्याकडे कन्नड, सोयगावचा काही भाग, तर आमदार सुभाष झांबड यांच्याकडे गंगापूर व वैजापूरची जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरबदार, साप पकडाल तर!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरी वसाहतीत निघालेले साप नागरिकांच्या रोषाला बळी पडू नये आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी वन विभागाने अधिकृत वीस सर्पमित्रांची निवड केली आहे. अधिकृत ओळखपत्र असलेले वीस सर्पमित्र जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात काम करणार आहेत. सापांची तस्करी आणि छळ रोखण्यासाठी ही प्रभावी उपाययोजना केली आहे. इतरांनी साप पकडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

जंगलात मानवी हस्तक्षेप वाढल्यानंतर वन्यजीव नागरी वसाहतीत आढळत आहेत. साप व नागाला ठार करण्याचे प्रकार भीतीपोटी घडतात. या वन्यजीवांना योग्य पद्धतीने पकडून पुन्हा निसर्गात सोडणे अपेक्षित आहे. मात्र, हा प्रकार क्वचितच घडतो. मांडूळ, साप आणि नागाची काही ठिकाणी तस्करी झाल्याचे प्रकार उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर वन विभागाने खबरदारीचे पाऊल उचलून अधिकृत सर्पमित्र निवडले आहेत. सापांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षण दिले आहे. परवानगीशिवाय साप पकडणे आणि पकडण्याचा प्रयत्न करणे 'शिकार' समजले जाते. त्यामुळे साप पकडणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होते. नागरी वसाहतीत, घरात आणि परिसरात साप निघाल्यास नागरिक घाबरतात. नागरिक आणि सापांचे संरक्षण करण्यासाठी आता वीस सर्पमित्र काम करणार आहेत. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात त्यांचे कार्यक्षेत्र आहे. २०१६-१७ या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. सर्पमित्र असलेल्या स्वयंसेवी व्यक्ती साप पकडून निसर्गमुक्त करणार आहेत. सर्पमित्रांना वन विभाग मानधन देत नाही. मात्र, सर्पमित्रांना प्रवास खर्च म्हणून प्रत्येक घटनेत २०० रुपये देणे अपेक्षित आहे. नागरिकांनी हा खर्च द्यावा, असे वन विभागाने म्हटले आहे. शहरात साप निघाल्यास जवळील सर्पमित्राशी संपर्क साधावा. ओळखपत्र नसलेल्या व्यक्तीने साप पकडणे गुन्हा ठरतो असे उपवनसंरक्षक ए. पी. गिऱ्हेपुजे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

अधिकृत सर्पमित्र
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी डॉ. किशोर पाठक, बंडू पवार, सुरेश साळ‍वे, सतीश कांबळे, सदानंद शिंदे, सुभाष राठोड, भीमराव चव्हाण, चार्ल्स बत्तीसे, वैजनाथ कोकणे, अंबादास हिवराळे, संजय हिवराळे, बाबूजी वनचरे, विजय उजीवाल, अनिल सिरसे, दिलीप उजीवाल, पारस धनाईत, हरिश्चंद्र लव्हाळे, राजेश उजीवाल यांची निवड झाली आहे. जालना जिल्ह्यासाठी राजेंद्र साबळे व शेख रफीक शेख नईम कार्यरत राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अपनी जीत हो, उनकी हार हॉँ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रिओ दी जानेरो' शहरात क्रीडा क्षेत्रातील महाकुंभ ऑलिंपिक स्पर्धेला भव्यदिव्य सोहळ्यात प्रारंभ झाला. या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंना पाठिंबा व पदक जिंकण्याची प्रेरणा देण्याकरिता औरंगाबाद शहरात 'रन फॉर रिओ ऑलिंपिक दौड' आयोजित करण्यात आली. या दौडमध्ये खेळाडू, क्रीडा संघटक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रातर्फे (साई) या दौडचे आयोजन करण्यात आले होते. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते दौडचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी साई क्रीडा केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतिचौकातून या दौडला प्रारंभ झाला. यात शहरातील विविध शाळांमधील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा प्रेमींनी उत्साहात सहभाग घेतला. पैठणगेट, औरंगपुरा, मिलकॉर्नर, ज्युबली पार्कमार्गे दौड साई क्रीडा केंद्रात पोहोचली. यावेळी खासदार खैरे, अंबादास दानवे, वीरेंद्र भांडारकर यांनी मनोगत व्यक्त केले. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी पदके जिंकून देशाचा नावलौकिकात भर टाकावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

दौडमध्ये विनोद नरवडे, दयानंद कांबळे, संदीप जगताप, राकेश खैरनार, अॅड. संजय डोंगरे, फुलचंद सलामपुरे, सागर बडवे, प्रदीप बोरसे, कुलजितसिंग दरोगा, शेख अस्लम, मोहंमद शेख, नितीन निरावणे, संजीवनी दिल्लीकर, राशी जाखेटे यांच्यासह साई क्रीडा केंद्रातील प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. क्रीडा शिक्षक अमृत बिऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.



दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना टी-शर्ट देण्यात आला. त्यामुळे दौडचे वातावरण ऑलिंपिकमय होऊन गेले होते. रिओ ऑलिंपिकचा टीशर्ट घेण्यासाठी खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. समारोपानंतर सर्व सहभागी खेळाडूंना साई केंद्रातर्फे नाश्ता देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत ५० कोटींच्या कामांचा बार!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वॉर्डात विकासकामे ठप्प असल्याच्या तक्रारी करणाऱ्या नगरसेवकांचा रुसवा शनिवारी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी काढला. तब्बल ५० कोटींचा बार उडवत अभियंत्यांनी विविध कामांची अंददाजपत्रके तयार केली. त्यामुळे नगरसेवकांसाठी आजचा दिनु आनंदाचा ठरला.
शहरात विकास कामे होत नाहीत, अशी तक्रार नगरसेवकांकडून वारंवार होत आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही विकासकामे होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या नगरसेवकाने सभात्याग केला. त्यापूर्वी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी विकास कामांच्या वॉर्डनिहाय फाइल स्वाक्षरीसाठी आयुक्तांकडे पाठवल्या होत्या. आयुक्तांनी त्या स्वाक्षरी न करता परत पाठवल्या. कोणत्या नगरसेवकाच्या वॉर्डात किती कामे झाली, याच्या यादीसह फाइल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यामुळे नगरसेवकांमधील असंतोष अधिकच तीव्र झाला. कामेच होत नाहीत तर महापालिकेत यायचेच कशाला, असे प्रश्न नगरसेवकांकडून विचारले जाऊ लागले. त्यामुळे आयुक्तांनी विकास कामे करण्याची भूमिका घेतली. त्यासाठी शनिवार हा दिवस 'अंदाजपत्रक दिवस' म्हणून पाळण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज सकाळपासून कार्यकारी अभियंत्यासह सर्व अभियंते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात विविध कामांच्या अंदाजपत्रकांच्या फाइल तयार करण्यात गुंतले होते.
प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती, मुरुम टाकणे, शाळांची दुरुस्ती या कामांसाठीचे अंदाजपत्रक दिवसभरात तयार करण्यात आले आणि मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आले. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर ही कामे सुरू होतील, असे मानले जात आहे. सुमारे पन्नास कोटी रुपयांची कामे येत्या काही दिवसात विविध वॉर्डात केली जातील, असे सूत्रांनी सांगितले. आयुक्तांच्या या अंदाजपत्रक दिवसामुळे नगरसेवकांना दिलासा मिळाला. आता वॉर्डात कामे होतील, अशी प्रतिक्रिया नगरसेवकांनी आपापसात व्यक्त केली.

दीड वर्षानी वॉर्डात फुटणार नारळ
अंदाजपत्रकांना आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल दीड वर्षानी विविध वॉर्डांमध्ये विकासकामांचा नारळ फुटणार आहे. यापूर्वी निधी अभावी, मान्यतेअभावी ही कामे बंद होती. खड्डे बुजविणे, मुरुम टाकणे, शाळांची दुरुस्ती अशी कामे येत्या काही दिवसांत सुरू होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकांच्या पतींना आयुक्तांच्या दालनात बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगरेसविकांचे पती, मुले यांना आपल्या दालनात प्रवेश देण्यास महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी फर्मान काढून बंदी घातली आहे. आयुक्तांच्या या कडक फंड्याने पालिकेत खुसखुशीत चर्चा सुरू आहे. वॉर्डातील विकासकामे असतील, तर नगरसेविकांनीच आली पाहिजे, असा दंडक त्यांनी घातला आहे.

महापालिकेत ११५ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी पन्नास टक्के महिला आहेत. नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या पन्नास टक्के महिलांपैकी आठ ते दहा महिला नगरसेवक महापालिकेत स्वतःहून काम करतात, पण बहुतांश महिला नगरसेवक वॉर्डातील विकास कामांसाठी, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी, वॉर्डातील विविध समस्यांसाठी आपला पती किंवा मुलांना पुढे करतात. त्यांच्या माध्यमातूनच कामे करून घेतात. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची बैठक आणि विषय समितींच्या बैठकांना पती आणि मुलांना उपस्थित राहता येत नाही म्हणून या बैठकांना महिला नगरसेवक उपस्थित राहतात. बैठक संपल्यावर त्या घर संसारात गुरफटून जातात. पती आणि मुले वेळप्रसंगी दबावतंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांकडून कामे करून घेतात. बकोरिया यांनी या प्रकारावरच बंदी घातल्याची पालिकेत चर्चा आहे.

महिला नगरसेवकाच्या पतीने किंवा मुलाने वॉर्डातील विकास काम घेऊन दालनात यायचे नाही, असे फर्मान त्यांनी काढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालिकेतील 'पतीराज' संपुष्टात येईल, असे मानले जात आहे.

बाटल्या आपटल्या, नगरसेवक गडबडला

दोन दिवसांपूर्वी एमआयएमचा सिडको भागातील एक नगरसेवक त्याच्या वॉर्डात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार घेऊन बकोरिया यांना भेटण्यासाठी गेला. सोबत त्याने बाटल्यांमध्ये दूषित पाणी भरून नेले होते. त्याने त्या बाटल्या बकोरिया यांच्या टेबलवर आपटल्या आणि आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये तावातावात बकोरिया यांच्याशी बोलू लागला. बकोरिया यांना त्या नगरसेवकाचे तसे वागणे आवडले नाही. त्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला बोलावले व त्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करा असे सांगितले. बकोरिया यांच्या तोंडून गुन्हा दाखल करा, असा शब्द निघताच तो नगरसेवक गडबडला आणि दूषित पाण्याच्या बाटल्यांसह दालनातून बाहेर पडला. या घटनेची पालिकेत चविष्ट चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅनॉट’मध्ये वाटमारी; तीन हजार लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुणे येथून आलेल्या एका तरुणाला कॅनॉट प्लेस भागात शनिवारी भरदुपारी पोटाला चाकू लावून लूटण्यात आले. त्याच्या खिशातील ३२०० रुपये, मोबाइल व टुलकिट बॅग घेऊन लुटारू पसार झाले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहेबसिंग गंगाराम धोर्या (वय २५, रा. हडपसर, पुणे) हा तरुण पुणे येथून शनिवारी दुपारी सिडको बसस्टँड येथे उतरला. कॅनॉट प्लेस भागातील इंड्स टॉवर येथे जाण्यासाठी तो पायी जात होता. तेव्हा त्याला दोन अनोळखी तरुणांनी एक पत्ता विचारला, साहब‌सिंग याने माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर ते तरूण पुढे काही अंतर गेले. साहेबसिंग त्यांच्याजवळ आल्यानंतर कॉलर पकडून दोघांनी पोटाला चाकू लावला व एका बोळीत ओढत नेले. तेथे साहबसिंगला मारहाण करीत खिशातील ३२०० रुपये,मोबाइल व टुलकिट बॅग हिसकावून पळ काढला. साहेबसिंगच्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेगमपुरा वॉर्डात शिवसेना-भाजप समोरासमोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेगमपुरा वॉर्ड पोटनिवडणुकीत शिवसेना व भारतीय जनता पक्ष आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणूक रिंगणात उमेदवार उतविण्याचे ठरवले आहे. दोन्ही पक्षांकडून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. बुढीलेन वॉर्डात काँग्रेस, एमआयएम यांच्यात लढत होईल, असे मानले जात आहे.
बेगमपुरा आणि बुढीलेन या दोन वॉर्डांमध्ये महापालिकेची पोटनिवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवार (९ ऑगस्ट) आहे. महापालिकेत शिवसेना-भाजप युती असल्याने पोटनिवडणुकीतही युती कायम राहणार का याची अनेकांना उत्सूकता आहे. त्याबद्दल माहिती घेतली असता दोन्ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. पालिका निवडणुकीत बेगमपुरा वॉर्ड शिवसेनेच्या वाट्याला आला होता, मात्र शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. तेथून विजयी झालेले अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर जाधव यांनी नंतर शिवसेनेला पाठिंबा दिला. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. युतीमध्ये बेगमपुरा वॉर्ड शिवसेनेकडे असल्यामुळे पोटनिवडणुकीत सुद्धा शिवसेनाच उमेदवार देईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
पालिका निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले होते, त्यामुळे या वॉर्डातून आता भाजपला संधी मिळाली पाहिजे असे भाजपचे मत आहे. पण, शिवसेना बेगमपुरा वॉर्डावरील दावा सोडण्यास तयार नसल्याने येथे शिवसेना-भाजप अशी सरळ लढत होईल, असे मानले जात आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांना उशीर; गणेशभक्त ताटकळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वर्ष २०१४ व २०१५ मधील विविध स्पर्धांतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी पार पडला. पण, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे कार्यक्रम दीड तास उश‌िरा सुरू झाला. शिवाय अनेक पाहुण्यांनी दांडी मारल्याने कार्यक्रम कसाबसा उरकवा लागला. यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
श्री गणेश महासंघातर्फे दरवर्षी गणेश मंडळासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याचे बक्षीस वितरण दोन वर्षांपासून करण्यात आले नाही. त्यामुळे रविवारी दुपारी साडेबारा वाजता तापडिया नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार चंद्रकांत खैरे शहराबाहेर असल्यामुळे त्यांना कार्यक्रमास येण्यास विलंब झाला. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी वेळेवर हजर होते. मात्र कार्यक्रमाला उशीर होत असल्याने तनवाणी, नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, बापू घडमोडे कंटाळून निघून गेले. उपायुक्त वसंत परदेशी यांना देखील कार्यक्रमासाठी ताटकळावे लागले. या प्रकारामुळे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी संतापून कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश दिले. जे निघून गेले होते त्यांना फोन करून बोलावण्यात आले. माजी आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, उपायुक्त परदेशी, बापू घडमोडे, अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत दीड तास उशिरा कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळाने आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाठ यांचे आगमन झाले. खासदार चंद्रकांत खैरे तीन वाजता दाखल झाले. त्यानंतर विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.

इतर पाहुण्यांची दांडी
महासंघाच्या वतीने छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महापौर त्रिंबक तुपे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुभाष झांबड, अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा परिषद सीइओ मधुकर आर्दड, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची नावे होती. मात्र, या मान्यवरांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावकरी आहाराबाबत जागरूक

$
0
0

Vijay.Deoulgaonkar@timesgroup.com
औरंगाबाद ः खामखेडा एक लहानसे खेडेगाव, येथील जिल्हा परिषदेची शाळा सुरू होऊन तब्बल ५० वर्षे उलटली, मात्र आडरानात असलेल्या या शाळेमधील विद्यार्थी कम्प्युटरचा वापर करून आधुनिक पद्धतीने ज्ञानार्जन करीत आहेत. गावकऱ्यांचा सहभाग व शिक्षकांचा पुढाकार यामुळे एका खेडेगावात हे शक्य झाले आहे. पोषण आहाराबाबत खामखेड्यातील नागरिक जागरूक आहेत. आहाराचा दर्जा चांगला असावा म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष भाज्या, धान्य आणून देतात.
चौका घाट ओलांडला की डोंगराळ भाग लागतो. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये गेल्यास अनेक लहानशी गावे, वाडे वस्त्या लागतात. या गावांना निसर्गाने भरभरून वरदान दिलेले आहे. चौका गावापासून आत दहा किलोमीटर अंतरावर खामखेडा गाव आहे. ८०० हजार लोकसंख्येच्या या गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. एकूण चार शिक्षक असलेल्या या शाळेत एकूण १०५ विद्यार्थी आहेत.
खामखेडा गावातील नागरिक पोषण आहाराच्या दर्जाबाबद जागरूक आहेत. पोषण समितीचे अध्यक्ष धान्य, भाज्या आणून देतात. शाळेत किचनशेड उभारले आहे. तेथे स्वच्छता आहे. विद्यार्थ्यांसाठी प्लेट आहेत.
शाळेला पुरेशी जागा नसल्याने दोन ‌ठिकाणी या शाळेचे वर्ग भरतात. सध्याचे युग कम्प्युटरचे आहे. येथील तरुण शिक्षकांनी ही बाब हेरली. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कम्प्युटरच्या माध्यमातून शिकवला, तर त्याचे अाकलन लवकर होऊ शकते, असा विचार शिक्षकांच्या मनात आला. यातून अभ्यासी वर्गाची (व्हर्चुअल क्लासरूम) संकल्पना मांडण्यात आली. शाळेच्या अपुऱ्या खोल्यांमुळे हे शक्य नव्हते. गावातील समाज मंदिर मोकळे व पडिक अवस्थेत होते. गावकऱ्यांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला. समाज मंदिर अभासी वर्गासाठी देण्यात आले. या समाज मंदिराची डागडुजी करून व्यवस्थित करण्यात आले. तेथे विविध प्रकारची चित्रे काढून
विद्यार्थ्यांसाठी आकर्षक वर्गाचे स्वरूप देण्यात आले. कम्प्युटर व भिंतीवर प्रोजेक्टरचा वापर करून हा आभासी वर्ग तयार करण्यात आला. यासाठी एक लाख रुपये खर्च आला. यासाठी शिक्षकांनी प्रत्येकी पाच हजार दिले. गावकऱ्यांचा लोहसहभाग काही रक्कम उभी राहिली. अभ्यासक्रमाच्या सिडी आणून अवघड विषय सोपे करून शिकविण्यात येतो. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत एस. एस. एखंडे, जे. एस. राजपूत, एस. आर. माडवर, एम.व्ही. कुलकर्णी हे परिश्रम घेत आहेत.

आवड निर्माण होण्यासाठी गणवेश बदलला
जिल्हा परिषदेचा पारंपारीक गणवेश म्हणजेच खाकी चड्डी, पांढरा शर्ट होय, मात्र खामखेडा येथील शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात रस निर्माण व्हावा म्हणून लाल रंगाचा आकर्षक गणवेश देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहाडसिंगपुऱ्यातील रहिवाशांवर पुन्हा संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहाडसिंगपुरा परिसरातील रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी परिसरातील रहिवाशांना तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा घरे रिकामी करून चाव्या जमा करण्याची नोटीस बजावली आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार महसूल विभागाने गेल्या वर्षी या १८ एकर जमिनीवरील घरांचा ताबा घेऊन ती मूळ मालकाच्या स्वाधीन केली होती. त्यामुळे १०५ रहिवाशांना बेघर व्हावे लागले होते.
रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनीमध्ये भूमाफियांनी अनाधिकृत प्लॉटिंग करून त्याची गोर-गरिबांना विक्री केली होती. या जमिनीवर अनेक रहिवाशी घरे बांधून राहण्यासाठी आले आहेत. याबाबत जमिनीचे मूळ मालक माधवराव सोनवणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने महसूल विभागाला आदेश दिल्यानंतर ३१ ऑगस्ट २०१५ रोजी कारवाई करीत ही घरे रिकामी करीत महसूल विभागाने माधवराव सोनवणे यांना ताबा दिला होता. यामधील काही रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतल्यानंतर घरातील साहित्य काढून घेण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर सुद्धा रहिवाशांनी घरे रिकामी केली नाहीत. त्यामुळे मूळ मालकाने पुन्हा कोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर तहसील विभागाने या रहिवाशांना घरे रिकामी करून सोमवारपर्यंत चाव्या मंडळ अधिकाऱ्याकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा अवमान झाल्यास हायकोर्टाच्या आदेशाने पुढील कारवाई करण्याचा इशारा रहिवाशांना देण्यात आला आहे. या नोटीसमुळे रहिवाशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहाडसिंगपुरा येथील रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी येथील रहिवाशांना सोमवारपर्यंत घरे ‌रिकामी करून चाव्या मंडळ अधिकाऱ्याकडे जमा करण्याचे नोटीसद्वारे कळवण्यात आले आहे.
- रमेश मुनलोड, अप्पर तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन टू वन’ : वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.con
महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदावर माजी आमदार एम. एम. शेख यांची निवड करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाचे उत्पन्न कमी असल्याने अनेक चांगल्या योजना राबविता येत नाहीत. त्यामुळे बोर्डाच्या जमिनीवरील मालमत्तांकडून रेडी रेकनर दरानुसार भाडे वसूल करून उत्पन्नात वाढीचा प्रयत्न करणार आहे. वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे शासनाच्या मदतीने फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. बोर्डाची मालमत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठीही काय करता येईल, याचे नियोजन करणार आहे. या मालमत्तांचा उपयोग हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, तंत्रविद्यालये यांच्यासाठी करून तेथे दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न आगामी काळात करणार अाहे; अशी माहिती अध्यक्ष शेख 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

- वक्फ बोर्डात कोणती कामे प्राधान्याने करणार?
- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ कार्यालयाच्या जमिनीवर अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या भाड्यातून वक्फ बोर्डाला मिळणारे उत्पन्न कमी आहे. काही ठिकाणी उत्पन्नच नाही. यामुळे या शासकीय कार्यालयांकडून आजच्या रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे वसूल करण्याचा आमचा प्रयत्न राहील. शासकीय कार्यालयाकडून पैसा मिळत नसेल, तर या जमिनींऐवजी तेवढीच जमीन सरकारने अन्य ठिकाणी द्यावी. याशिवाय अनेक खासगी मालमत्ता बोर्डाच्या जमिनींवर आहेत. त्यांच्या ताबेदारांकडून रेडीरेकनरप्रमाणे पैसा वसुलीचा प्रयत्न आहे.

- वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनीवर अनेकांनी स्वतःच्या मालकीच्या करून घेतल्या आहेत. अशा प्रकरणात काय करणार?
- तत्कालीन अल्पसंख्यांक विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी एप्रिल २०१६मध्ये एक अध्यादेश काढला. त्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींवरून खासगी मालकांचे नाव काढून पुन्हा वक्फ बोर्डाचे नाव लावण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बोर्डाची संपत्ती पुन्हा वक्फ बोर्डाच्या नावावर येण्याची आशा आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न राहील. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून वक्फ बोर्डाच्या जमिनी बोर्डाच्या नावावर करण्यात येणार आहे. पूर्वी वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि इतरांशी संगनमत करून बोर्डाच्या जमिनी बळकाविण्याचा धंदा सुरू होता. आता यावर लगाम लावला जाईल. अशा स्वरुपाचे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. गेलेल्या जमिनी कोणच्याही बड्या व्यक्तीच्या ताब्यात असल्यातरी त्या परत घेण्यासाठी बोर्डाचा प्रयत्न राहील.

- बोर्डाच्या किती जमिनी आहेत? किती जमिनींवर अतिक्रमणे आहेत?
- बोर्डात असलेल्या आकडेवारीनुसार बोर्डाकडे मालमत्ता अधिक आहेत, मात्र रेकॉर्डवरील जमिनी आणि प्रत्यक्षात ताब्यात असलेल्या जमिनी यांत तफावत असण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने बोर्डाच्या जमिनींचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. एका खासगी एजन्सीमार्फत हे सर्वेक्षण करून त्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे कोणत्या जमिनी कोणाकडे आहेत. किती जमीन बोर्डाकडे आहे, याचा निश्चित आकडा समजेल. बोर्डाच्या मालमत्तांची निश्चित माहिती उपलब्ध होणार आहे.

- वक्फ बोर्डात कर्मचारी संख्या कमी आहे. त्याचा फटका बसतोय?
- बोर्डात कर्मचारी संख्या कमी आहे. २०० जणांची भरती करावी, अशी आमची मागणी आहे, मात्र १०६ कर्मचारी भरतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तो शासनाच्या विचाराधीन आहे. त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. राज्यातील विविध भागात वक्फ मालमत्ता आहेत. छोट्या कामासाठी औरंगाबादला यावे लागते. ही भरती झाल्यानंतर महाराष्ट्र वक्फ बोर्डाची सहा प्रादेशिक कार्यालयेही स्थापन करण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांची कामे त्यांच्याच भागातील प्रादेशिक कार्यालयात होतील. भविष्यात बोर्डाचे काम अधिक प्रभावी होईल.

- बोर्डाला सक्षम अधिकारी मिळत नसल्याने कामे रेंगाळलीत का?
- कोर्टात दाखल एका याचिकेत शासनाने बोर्डाला सक्षम अधिकारी देण्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सक्षम अधिकारी निवडण्यासाठी शासनाने प्रयत्न केले होते. वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या समकक्ष असलेल्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. जोपर्यंत शासनाकडून एखादा सक्षम अधिकारी मिळत नाही, तोपर्यंत प्रभारी पदावरील अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागणार आहे. बोर्डात रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुका टांगणीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यापीठ कायदा या अधिवेशनातही मंजूर होऊ न झाल्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकांना यंदाही मुहूर्त मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाही निवडणुका झाल्या नाहीत, तर सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांचा हक्क डावलला जाणार आहे.
महाविद्यालयीन निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्यात याव्यात, याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. नवीन विद्यापीठ कायद्यात त्याचा अंतर्भाव करण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत होते. नवीन कायद्या मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याने मागील वर्षी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०१६पर्यंत थांबविण्यात आल्या. त्याबाबत राज्यपालांनी निर्देश दिले. त्यामुळे २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयीन निवडणूकही घेण्यात आली नाही. या निवडणुका गुणवत्तेनुसार घेण्यात येतात. नवीन कायदा येणार असल्याने या पद्धतीनेही निवडणूक होऊ शकली नाही. आता विधीमंडळ अधिवेशनातही नवीन विद्यापीठ कायद्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे यंदाही महाविद्यालयीन निवडणुका होणार की नाही, याबाबत टांगती तलवार कायम आहे. उच्चशिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; या निवडणुकांना यंदा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सलग दोन वर्षे हक्क डावलला जाणार
महाविद्यालयीन निवडणुका खुल्या पद्धतीने व्हाव्यात, ही विद्यार्थ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयीन निवडणुका झाल्या नाहीत. यावर्षी अद्याप कायद्याला विधीमंडळाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे दोन वर्षे विद्यार्थ्यांचा हक्क डावलला जाणार असल्याने विद्यार्थ्यांत नाराजी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम विभागाला पूल सापडेनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील रस्ते, पुलांचे मालक असलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला एकूण किती पूल आहेत, याचीच माहिती नाही. महाड दुर्घटनेनंतर राज्यभरातील यंत्रणा हलली असून छोट्यामोठ्या पुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. औरंगाबाद झेडपीच्या बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांवर किती पूल आहेत याचीच माहिती नसल्याने विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अतिवृष्टीमुळे महाडमधील सावित्री नदीचा पूल वाहून गेला. या दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरातील यंत्रणेला जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत सर्वच पुलांची तपासणी करावी, असे सांगण्यात आले आहे.
औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वीच पुलांची माहिती संकलित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित जिल्ह्यातील रस्ते आणि पूल येतात. झेडपी बांधकाम विभागाकडे या सर्व कामांची माहिती असणे आवश्यक आहे. यासंदर्भात विचारणा केली असता बांधकाम विभागातील मुख्यालयात याविषयीची माहितीच उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचे किती पूल आहेत ही माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे पूल जीर्ण झाले, धोकादायक आहेत याचा अहवाल कधी तयार होणार? असा प्रश्न आहे.

जिल्ह्यातील नळकांडी पूल, सिमेंट पुलांची सविस्तर माहिती सर्वेक्षण करून पाठविण्याचे आदेश उपअभियंत्यांना दिले आहेत. दोन दिवसांत सर्व अहवाल अपेक्षित आहेत. त्यानंतर सर्व पुलांची स्थिती काय आहे हे समजेल.
- आर. आर. पवार, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, झेडपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकचालकाला लुबाडणारे तीन अट्टल गुन्हेगार जेरबंद

$
0
0

औरंगाबाद : ट्रकचालकाला लुबाडणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना गुन्हेशाखेच्या पथकाने अवघ्या अठरा तासांत गजाआड केले. नगरनाका येथे रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या टोळीने शनिवारी पहाटे मुंबई हायवेवर साजापूर फाटा येथे ट्रकचालकास लुबाडले होते.
गुन्हे शाखेचे पथक रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता नगरनाका येथे गस्त घालीत होते. यावेळी एका दुचाकीवर तीन तरूण संशयितरित्या जाताना आढळले. या तरुणांना अडवण्यात आले असता त्यांनी पलायन केले. पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. आरोपीमध्ये अट्टल गुन्हेगार सुमित उर्फ सोन्या सुभाष पंडित (वय २५ रा. भुजबळनगर, नंदनवन कॉलनी), शेख आमिर शेख सलिम (वय २० रा. मिठ्ठालालनगर, भावसिंगपुरा), योगेश अनिल वर्मा (वय २१ रा. भुजबळनगर) यांचा समावेश होता. चौकशी केली असता त्यांनी पहाटे साजापूर फाट्याजवळ ट्रकचालकाला मारहाण करून मोबाइल व रोख लुबाडल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ३६ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदिप आटोळे, एसीपी खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय अमित बागूल, जमादार नितीन मोरे, सुधाकर राठोड, विलास वाघ, सुनील पाटील, शिवाजी भोसले, लालखा पठाण, इजाजखान यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एक संशयित अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी परभणीत इकबाल अहमद कबीर अहमद (वय २८) यास अटक केली. यापूर्वी परभणीतून नासेरबिन चाऊस आणि मोहमंद शाहीदखान या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत इकबालही गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा एटीएसने केला आहे. महिनाभरात परभणीत तिसऱ्या आयएस समर्थकास अटक झाली आहे.
एटीएसने गेल्या काही दिवसांत परभणीतून नासेर आणि मोहमंद शाहीदखान या दोन आयएस समर्थकांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून तिसरा साथीदार इकबाल अहमद (रा. गुलजार कॉलनी, मदिना पाटीजवळ, परभणी) हा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून इकबालला एटीएस पथकाने रविवारी घरातून अटक केली.
या कारवाईत औरंगाबाद व नांदेडची पथके सहभागी झाली होती. दुपारी बारा वाजता गुलजार कॉलनीत एटीएसचा ताफा दाखल झाला. अत्यंत गुप्त पद्धतीने ही कारवाई झाली. पंचासमक्ष व इन कॅमेरा कारवाई केल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. कारवाईत नेमके काय जप्त केले, यासंदर्भात माहिती दिली गेली नाही.
आयएस संबंधित नासेर आणि शाहिद खान यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत इकबाल अहमदचे नाव समोर आले.

इकबाल सीमकार्ड विक्रेता
इकबाल मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. परभणीत भाड्याच्या घरात तो राहतो. त्याचे वडील एका कापड दुकानात काम करतात. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, तो मोबाइल सीमकार्ड विक्रीचा व्यवसाय करतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा

$
0
0

उस्मानाबाद बलात्कारप्रकरणी शरद पवार यांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबादमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील खटला 'फास्ट ट्रॅक कोर्टा'त चालविण्यात यावा आणि या प्रकरणात राज्य सरकारने तज्ज्ञ वकिलाची नियुक्ती करावी, तपास उच्चपदस्थ महिला पोलिस अधिकाऱ्याकडून करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

उस्मानाबादमध्ये एका फौजदाराने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे शनिवारी समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, पवार यांनी उस्मानाबादचा दौरा केला. या वेळी त्यांच्याबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ होते.

ते म्हणाले, 'बलात्कार विरोधातील अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे आहेत. यामध्ये बदल करण्याची किंवा दुरूस्तीची फारशी गरज नाही. मात्र, कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. गुन्हेगारी वाढ होत आहे, ही राज्याच्या दृष्टीने चांगली बाब नाही. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक आहे. प्रशासनाने शिक्षेचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून त्यात पोलिस खात्याची जबाबदारी महत्त्वाची आहे.'

'स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज'

राज्यामध्ये बलात्कार व महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे राज्याला अधिक निगराणी करणाऱ्या गृहमंत्र्यांची गरज आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. त्याविषयी ते म्हणाले, पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री असताना राज्याचे गृहखाते माझ्याकडेच होते. त्यामुळे या संदर्भात फारसे बोलणे उचित ठरणारा नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी, यासाठी अधिक निगराणी ठेवणारा व्यक्ती असल्यास ते उचित ठरेल. बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे विशेष करून ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शिवाय या कामी तपास करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर अंकुश व दबाव राहावा, शिवाय बलात्काराचे प्रकरण गांभीर्याने हाताळले जावे, यासाठी हा तातडीचा दौरा होता.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...घरी पोहचण्यापूर्वी निरपराधाचा बळी आहे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अपघातात डोक्याला होणारी गंभीर इजा टाळण्यासाठी हेल्मेट घालतात; पण खड्ड्यात पाय मोडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा उपहासात्मक सवाल करीत वात्रटीकाकार प्रा. विष्णू सुरासे यांनी 'खड्डेपुराण' मांडले. शैक्षणिक व पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध औरंगाबाद शहराची खड्ड्यांमुळे वाताहत झाली आहे. आता 'खड्डेनगरी' अशी शहराची ओळख ठसत आहे.

आंदोलने, निवेदने, निदर्शने करून शहर खड्डेमुक्त झाले नाही. मेटाकुटीला आलेल्या नागरिकांनी खड्ड्यांची आरती केली. कारचे टायर फुटले म्हणून एका व्यक्तीने खड्ड्यावर गुन्हा दाखल केला. अख्खा पावसाळा खड्डे अन् खड्डे या एकाच समस्येने सामान्यांचे जीवन व्यापले आहे. एखादा विषय प्रचंड चर्चेत असताना सच्चा कवी स्वस्थ बसत नाही. वात्रटिकाकार प्रा. विष्णू सुरासे यांनी खड्ड्यांवर खुमासदार चारोळ्या लिहून वर्मावर बोट ठेवले आहे.
खड्डेमय रस्त्यांची
जीवघेणी खेळी आहे
घरी पोहचण्यापूर्वी
निरपराधाचा बळी आहे

अशा रचनेतून सुरासे यांनी औरंगाबादकरांची फरफट मांडली आहे. पोलिस आयुक्तांनी शहरात हेल्मेटसक्ती लागू केली. अपघातात हेल्मेटमुळे प्राण वाचतील; पण खड्ड्यात पडल्यास पाय मोडेल त्याचे काय, असा तिरकस सवाल सुरासे यांनी केला. खड्ड्यात पडून अपघात झाल्यास रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभी करावी असा गंमतीदार सल्लाही त्यांनी दिला आहे.

शहरातील रस्त्यांचा
काहीच भरवसा नाय
डोक्यात होते हेल्मेट
पण, पाय मोडला त्याचे काय?

या वात्रटिकेतून प्रा. सुरासे यांनी सद्यस्थितीवर जोरदार आसूड ओढला आहे. औरंगाबाद शहरात एकही रस्ता खड्डेमुक्त नाही. रस्त्याला कुणाची नजर लागू नये म्हणून खड्डे आहेत की काय असा प्रश्न पडतो. उपहास, नर्मविनोदी शैलीतून कवी सुरासे यांनी रस्त्यांचे भीषण वास्तव मांडले आहे.
निरागस जीवाचा आता
सस्ता झाला भाव
खड्ड्यांमुळे डोक्यातील हेल्मेट
खाली गळून पडतात राव!

'खड्डेपुराण' गाजत असताना खड्ड्यांच्या सुरस कथा समोर येत आहेत. निवडणुकीत शेकडो आश्वासने देणारे नेते गायब आहेत. आपल्या वात्रटिकेतून सुरासे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
रस्ता म्हणाला त्यांना
मला नीट करा
नाहीतर मी एखाद्याचा जीव घेईल
तो म्हणाला, निवडणुकीत मी
नक्कीच भेटायला येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील धरणे तुडूंब

$
0
0

मराठवाड्यातील प्रकल्पांमध्येही २७ टक्के पाणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

नाशिक व नगर येथे झालेल्या दमदार पावसामुळे गोदावारी ऊर्ध्व प्रकल्प तुडूंब झाले आहेत. त्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेली चार वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात यंदा जूनपासूनच वरुणराजाने कृपादृष्टी केल्यामुळे विभागातील प्रकल्प भरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १४०५.५१ दशलक्ष घनमीटर (२७.२८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मृतसाठ्यातून उपसा सुरू असलेले जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, ऊर्ध्व पैनगंगा या प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मराठवाड्यात पाऊस सुरू असल्यामुळे लहान-मोठ्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचले आहे. सध्या जायकवाडी प्रकल्पामध्ये ४०.६६ टक्के, निम्न दुधना ५३.८२, येलदरी ८.२७, सिद्धेश्वर १६.१९, पैनगंगा ३२.१४, विष्णुपूरी ८५.५८ तर शहागड बंधाऱ्यात आतापर्यंत ९.७५ तर खंडका बंधाऱ्यामध्ये १९.४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. उर्ध्वभागातून होत असलेला विसर्ग व मराठवाड्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चौकट

गेल्यावर्षीपेक्षा चारपट साठा

यंदा मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १४०५.५१ दशलक्ष घनमीटर (२७.२८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी यावेळेपर्यंत या प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के पाणीसाठा झाला होता. यावेळी सर्वत्रच पाऊस चांगला झाल्याने गेल्यावर्षीच्या ४ पट पाणीसाठा झाल्याचे सुखावर चित्र आहे. गोदावरीच्या उर्ध्व भागातील धरणे तुडूंब भरल्याने व यापुढेही आणखी दोन महिने पावसाचे बाकी असल्याने वरच्या धरणांतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह असाच सुरू राहून यंदा जायकवाडी धरणही लवकर भरले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

---.

वरच्या धरणाची स्थिती (७ ऑगस्ट)

------

प्रकल्प.................. टक्केवारी

करंजवण................९०.६४

वाघाड.....................१००

ओझरखेड................९४.४४

पालखेड......................४६.०३

गंगापूर.......................७९.६३

दारणा........................७९.३०

भावली..........................१००

मुकणे............................५७.१९

भंडारदरा..........................९५.१७

निळवंडे..........................१०६.७९

मुळा...............................८८.१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images