Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाणी पेटवायचे काम नको!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परतीचा पाऊस अजून शिल्लक आहे. यंदा जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल. त्यामुळे मराठवाड्यात हक्काचे पाणी पेटवायचे काम नको. त्यासाठी समन्वय साधला पाहिजे, असे म्हणत पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मवाळ भूमिका मांडत शिवजलक्रांतीची यशोगाथा सांगितली.
जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी असले, तरी मराठवड्यातील इतर धरणे कोरडी आहेत. नगर व नाशिकची धरणे भरली असून, तेथून पाणी सोडून कालवे भरून घेतले जात आहेत. यावर पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांनी एकदम मवाळ भूमिका घेतली. ते म्हणाले, पाणी पेटवायचे काम आता कमी केले पाहिजे. नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याबाबत कोणताही वाद न करता शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मी असा मंत्री नाही की जेथे गेलो तेथे धरण भरतील असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर टोला मारला. यावेळी कदम यांनी शिवसेनेने दुष्काळात केलेली मदत वाटप; तसेच शिवजलक्रांतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, दुष्काळात शिवसेनेच्या वतीने २७ हजार शेतकऱ्यांच्या घरात धान्य पोचवण्यात आले. आरोग्य सुविधा, पाण्याच्या टाक्या वाटप, सामूहिक विवाह सोहळा आदी कार्यासाठी १५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली, तर शिवजलक्रांतीच्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शिवललक्रांतीच्या माध्यमातून कोणत्या तालुक्यात काय कामे झाली आहेत, किती जमीन ओलीताखाली आली, या बद्दलची सर्व माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे तसेच अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणी, जलसाठा, खरिपाच्या आढावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणारी बैठक पालकमंत्र्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर उरकून घेतली. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनातील मोजक्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना सांगणार
गेल्यावर्षी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठकीची पूर्ण तयारी करण्यात आली होती. तयारी संदर्भात मी आढावाही घेतला होता, मात्र कुठे माशी शिंकली ते माहित नाही, पण बैठक रद्द करण्यात आली. बहुदा दुष्काळी परिस्थितीमुळे बैठक झाली नसावी. यंदा मंत्रिमंडळ बैठकीचा विषय आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हर्सूलच्या विकासासाठी निधी देणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हर्सूल तलाव व परिसराच्या विकासासाठी पर्यावरण मंत्रालयातर्फे महापालिकेला भरघोस निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी केली. हर्सूल तलावात बोटिंग सुरू करा, रोप वेची व्यवस्था करा, असे ते म्हणाले.
महापालिकेतर्फे हर्सूल तलावाच्या परिसरात जांभुळबन विकसित करण्यात येणार आहे. जांभुळबनाच्या परिसरात पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, सुभाष झांबड, संदिपान भुमरे, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, सभापती मोहन मेघावाले, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नागरिकांची उपस्थिती होती.
कदम यांनी उपस्थितांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले. हर्सूल तलावाच्या परिसरात सुमारे सतरा एकर परिसरात जांभळाची सहा हजार झाडे लावली जाणार आहेत. त्याशिवाय आंबा, चिकू, सीताफळ, आवळा याची प्रत्येकी एक हजार झाडे लावली जाणार आहेत, असे सांगत या परिसराच्या विकासासाठी पर्यावरण मंत्रालयातर्फे भरघोस निधी देऊ, असे ते म्हणाले. महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्रास्ताविक केले खासदार चंद्रकांत खैरे यांचेही यावेळी भाषण झाले. पालिका शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सूत्रसंचालन केले. हर्सूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्षदिंडी काढली.

शिवाजी महाराज आणि वृक्षवल्ली
वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करून रामदास कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे..., असे शिवाजी महाराज म्हणाले होते,' असे कदम यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. हा अभंग संत तुकाराम महाराज यांचा आहे.

किस्सा एक किलो साखरेचा
खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाषण करताना कदम व विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्यातील संवादाचा उल्लेख केला. तलावाच्या परिसरात आल्यावर कदमांनी तलावातील पाणी पाहिले आणि यंदा हा तलाव भरला पाहिजे, अशी सद्‍भावना व्यक्त केली. तेव्हा डॉ. दांगट यांनी यंदा निश्चित तलाव भरेल असे कदमांना सांगितले. तलाव भरला तर तुमच्या तोंडात एक किलो साखर, असे कदम म्हणाल्याचे खैरे यांनी सांगितले. कदमांनी हाच संदर्भ आपल्या भाषणात घेतला. ते म्हणाले, 'मी फक्त तुमच्या तोंडात साखर घालेन, असे डॉ. दांगट यांना म्हणालो होतो. एक किलो साखर खैरेंनी मनाने लावली आहे. आता इथे जांभुळबन होणार आहे. मधुमेहावर जांभुळ हे रामबाण औषध आहे.'


भाजप पदाधिकाऱ्यांची कदम यांच्याकडे पाठ
महापालिकेतर्फे आयोजित जांभूळबनाच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. भाजपचा कोणताही पदाधिकारी किंवा नगरसेवक या कार्यक्रमाला आला नाही. कार्यक्रम पत्रिकेवर भाजपचे आमदार अतुल सावे, भाजप गटनेते भगवान घडमोडे यांची नावे विशेष आणि प्रमुख उपस्थितीमध्ये टाकली होती. शिवाय उपमहापौर प्रमोद राठोड या कार्यक्रमाचे महापौरांसोबत निमंत्रक होते, परंतु सावे आणि घडमोडे या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. प्रमोद राठोड देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला होता का, अशी चर्चा सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिशेबावर आता करडी नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कामाची विभागणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अधिकाऱ्यांकडे शालेय पोषण आहाराच्या हिशेबाची विशेष जबाबदारी असल्याने यापुढे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा हिशेब लागण्यास मदत होणार आहे.
ग्रामविकास खात्याने नऊ ऑगस्ट रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीने राज्य व केंद्र पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या दृष्टीने जिल्हा परिषदांकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विविध विकास योजनांचा निधी प्राप्त होत आहे. जिल्हा परिषदांकडील वित्त विभागाच्या कामकाजाचा व्यापही अधिक वाढत असून, योजनांचे अंदाजपत्रक तयार करणे, निधी व्यवस्थापन व वितरण, लेखे तयार करणे, अंतर्गत लेखा परीक्षण, नवीन अंशदायी निवृत्ती वेतन योजना, पंचायत राज सेवार्थ यासारख्या झालेल्या कामांच्या मूलभूत बदलांमुळे जिल्हा परिषद, वित्त विभागांतर्गत लेखा संवर्गातील वर्ग एक, वर्ग दोन अधिकाऱ्यांचे कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कामांची विभागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ लेखाधिकारी वर्ग एक यांचे पदनाम आता उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी असे करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदांमध्ये शिक्षण विभागात कार्यरत लेखाधिकारी (शालेय पोषण आहार), (सर्व शिक्षा अभियान) यांनी शिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्त संबंधित योजना व अनुषंगिक सोपविलेल्या विषयांचे काम करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

कामाची विभागणी
यामुळे शालेय पोषण आहाराचा हिशेब तपासण्यासाठी या अधिकाऱ्याकडे जबाबदारी असणार आहे. शालेय पोषण आहारासाठी दिली जाणारी देयके, धान्यादी, मदतनीस मानधन; तसेच अन्य निधी वितरणाचा हिशेब पाहत या अधिकाऱ्याकडे झेडपीच्या हिशेबावरही लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येत होते. त्यामुळे अधिकाऱ्यावर कामाचा ताण होता. आता स्वतंत्र अधिभार दिला गेल्याने शालेय पोषण आहाराचा हिशेब सुरळीत लागणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेतील खाजेकर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेसमोर उडी मारून दोघांच्या आत्महत्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे मार्गावर उडी मारून आत्महत्या केल्याच्या दोन घटनांनी शुक्रवारी शहर हादरले. यातील एक घटना पैठण रोड उड्डाणपुलाखाली, तर दुसरी घटना संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली.
पहिल्या घटनेत दुपारी साडेबाराच्या सुमारास पैठण रोड उड्डाणपुलाखाली सचखंड एक्स्प्रेससमोर उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. रेल्वे क्रॉसिंग गेटपासून काही अंतरावर ही घटना घडली. लीना विलास पाटील (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. लीना बालाजीनगरात राहतात. त्या सकाळी नऊ वाजल्यापासून घराबाहेर पडल्या होत्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे येत असताना अतिशय शांततेत चालणाऱ्या लीना धावतच रेल्वेच्या दिशेने निघाल्या. त्यातील काहींना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांना चिरडून रेल्वे पुढे निघून गेली होती. घटनास्थळी तत्काळ रेल्वे पोलिस दाखल झाले. त्यांनी मृतदेह अॅम्ब्युलन्सद्वारे घाटीत आणला. लीना पाटील यांनी आपल्या पती आणि दिराचा मोबाइल क्रमांक आपल्या जवळ ठेवला होता. त्या नंबरावरून लीना यांची ओळख पटली. घाटीत उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. लीना यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांचे पती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमध्ये शिपाई म्हणून काम करतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी सायली एका महाविद्यालयात शिक्षण घेते. लहान मुलगा शुभम बारावीत शिकतो.

पत्नीशी भांडणानंतर टोकाचे पाऊल उचलले
दुसऱ्या घटनेत संग्रामनगर उड्डाणपुलाखाली दुपारी पावणे चारच्या सुमारास औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरसमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. दिनकर आसाराम गायकवाड (वय ३२) असे मृताचे नाव आहे. मौलाना आझाद कॉलेजसमोरील नॅशनल कॉलनीत राहणारे गायकवाड राठी सेक्युरिटीमध्ये कामाला होते. त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले होते. भांडणात मी जीव देऊन टाकतो म्हणत ते घराबाहेर पडले, अशी माहिती पोलिसांना मृत व्यक्तीचा भाऊ नितीन नाडे यांनी दिली. या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅनॉटॉमी म्युझियम’ खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) 'अॅनॉटॉमी म्युझियम' हे आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना हे म्युझियम विनाशुल्क पाहता येणार असून, या विभागाच्या प्राध्यापकांकडून म्युझियम संदर्भातील नेमकी व सविस्तर शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान विषयाचा व विशेषतः शरीर रचनासंबंधीचा सर्वांगीण अभ्यास पुस्तकांमधून करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शरीररचना पाहता यावी, मेंदूपासून ते पायापर्यंतचे वेगवेगळे मानवी अवयव प्रत्यक्ष पाहता यावेत, विविध अवयवांची कार्यप्रणाली, संरचना, स्नायू, रक्ताभिसरण अभ्यासता यावे, या व्यापक हेतुने हे म्युझियम विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. अलीकडे शरीर रचनाशास्त्राचा अभ्यास स्टेट बोर्डासह सीबीएससी व आयसीएससी बोर्डामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. तसेच होमी भाभा व इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठीही शरीररचनाशास्त्राचा अभ्यास महत्वपूर्ण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर म्युझियम विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शरीर रचनासंबंधीची अचूक शास्त्रीय माहिती 'अॅनॉटॉमी' विषयाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना देणार आहेत.

अवयवदानाबाबतही जनजागृती
या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अवयवदान, देहदानाविषयीही जनजागृती होणार आहे. यापूर्वी 'अॅनॉटॉमी' विभागामार्फत वर्षातून एखाद्या वेळीच प्रदर्शन भरवले जात होते व त्यावेळीच हे म्युझियम खुले केले जात होते. त्यामुळे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना म्युझियम पाहण्याची संधी फार कमी होती. आता ही संधी किमान महिन्यातून दोनदा उपलब्ध होत आहे.

दुसऱ्या क्रमांकाचे म्युझियम
घाटीतील 'अॅनॉटॉमी म्युझियम' हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे म्युझिम असून, तब्बल ५० वर्षांपासून या म्युझियमचे संवर्धन वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले आहे. अॅनॉटॉमी विभागालगत असलेल्या या म्युझियममध्ये असंख्य नैसर्गिक-अनैसर्गिक अवयवांचे तसेच शरीर रचनाशास्त्राचे नमुने पाहायला मिळतात, हे विशेष उल्लेखनीय.

अधिष्ठातांच्या आदेशानुसार याच सप्टेंबरपासून हे म्युझियम विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात येत आहे. सध्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी हे प्रदर्शन खुले करण्यात येत असले तरी गरजेनुसार प्रत्येक शुक्रवारी खुले ठेवण्याचा निर्णयही भविष्यात घेतला जाऊ शकतो.
- डॉ. शिवाजी सुक्रे, शरीरचनाशास्त्र विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कृष्ट शिक्षकांचा सोमवारी गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे सोमवारी शिक्षकदिनाचे औचित्य साधून जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. वर्ष २०१५ -१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांतील पुरस्कार देण्यात येतील.
सोमवारी पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संत एकनाथ रंगमंदिरात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन अध्यक्षस्थानी असतील. महापौर त्र्यंबक तुपे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले.

२०१५ -१६साठी निवडलेले उत्कृष्ट शिक्षक
- प्राथमिक विभागः गोरखनाथ तळेकर, पांडुरंग बाचकर, बाळासाहेब म्हस्के, बाबासाहेब भोजने, रवींद्र पाटोळे, बापू डोळस, राजेंद्र खंडेलवाल, किशोर पाटील, कुंडलिक गाडेकर.
- माध्यमिक विभागः चेतना तायडे, विजयश्री मोरे, मंगल श्रेष्ठ, राजेंद्र शिंपी, भीमाबाई म्हस्के, हरी सोनवणे.

२०१६-१७ साठी निवडलेले उत्कृष्ट शिक्षक
- प्राथमिक विभागः केदार सांडू, संजय खाडे, व्यंकटेश श्रीनेवार, रायभान ठोंबरे, वाल्मिक भोजने, राजेंद्र महाजन, सोमीनाथ राणे, राजमल चव्हाण, कृष्णा शिंदे.
- माध्यमिक विभागः दादाराव गायकवाड, शिवनारायण काळे, रामेश्वर जाधव, पंढरीनाथ गायके, कडूबाई चव्हाण, कृष्णा दहेतकर, युवराज पाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद स्टेशनवर रेल्व इंजिन मेकॅनिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड ते मनमाड या मार्गावर रेल्वे इंजिनात बिघाड होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने औरंगाबाद, नांदेड व पूर्णा स्टेशनवर प्रत्येकी दोन मेकॅनिकची नियुक्ती केली आहे.
दोन दिवसांपूर्वी नंदीग्राम एक्स्प्रेसचे इंजिन परतूर जवळ नादुरुस्त झाले. तब्बल दोन तासानंतर जालना येथून इंजिन पाठवून ती मुंबईला पाठवण्यात आली. या मार्गावर वर्षभरात पाच ते सहा वेळा रेल्वे इंजिन नादुरुस्त होण्याच्या घटना घडल्या आहे. याशिवाय १५ दिवसांपूर्वी सचखंड एक्स्प्रेसचे चाक रुळावर घासून ठिणग्या उडणे, देवगिरी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये आग लागणे आदी घटना घडल्या.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील इंजिनची देखभाल दुरुस्ती मौला अली येथील शेडमध्ये केली जाते. तेथे काम केल्यानंतर सुद्धा इंजिन नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे औरंगाबाद, नांदेड व पूर्णा रेल्वे स्टेशनवर डिझेल इंजिन मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिक अशी दोघांची नियुक्ती केली आहे. यामुळे बिघाड ताबडतोब दुरुस्त करता येईल, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

विद्युतीकरण आवश्यक
औरंगाबाद रेल्वे मार्गावर डिझेल इंजिन चालवले जातात. या इंजिनमध्ये वारंवार बिघाड होतो. त्यामुळे मनमाड ते मुदखेड रेल्वेमार्ग दुहेरीकरणासोबतच विद्युतीकरण करण्याची गरज आहे, असे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : पौष्टिक थालिपीठ

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com
थालिपीठ, धपाटे हे महाराष्ट्रात आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ. नाश्त्यामध्ये थालिपीठ आवर्जून केले जाते. हा पदार्थ विविध पद्धतीने करण्यात येतो. ज्वारी, डाळ यांच्या पिठापासून केलेले साथे थालिपीठ, कांद्याचे थालिपीठ, जिरे, ओवा घातलेले थालिपीठ, टोमॅटो, गाजराचे थालिपीठ असे विविध प्रकार प्रसिद्ध आहेत. शिल्लक राहिलेल्या वरणाचेही थालिपीठ आवडीने खाल्ले जाते. मराठी माणसाची ही आवड पाहून कल्पना राजीव गुरव यांनी सिडको कॅनॉट सुमारे नऊ वर्षांपूर्वी, २००७मध्ये शबरी थालिपीठ सेंटरची सुरुवात केली. अल्पावधीतच येथील थालिपीठ खवय्यांच्या पसंतीस उतरले. रोज सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत थालिपीठ सेंटर सुरू असते. या कालावधीत तेथे खवय्यांची गर्दी होते. पौष्टिक आणि दर्जा या बळावर थालिपीठ खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकही थालिपीठ आवडीने खातात, असे कल्पना गुरव सांगतात.
शबरी सेंटरवर बटर थालिपीठ आणि दही - थालिपीठ हे प्रकार उपलब्ध आहेत. गहू, ज्वारी, बाजरी, विविध डाळी, कडधाने आदी १३ धान्यांचा थालिपीठासाठी वापर करण्यात येतो. ही धान्ये स्वच्छ करून घेतली जातात. त्यानंतर ती एकत्र भाजली जातात. प्रत्येक धान्याचे प्रमाण ठरलेले असते. थालिपीठ पौष्टिक असावे, म्हणून विविध धान्ये वापरण्यात येतात. हे पीठ थोडे जाडसर असते. त्यात हळद, मीठ, कांदा, कोथिंबीर, जिरे, ओवा आदी मिसळले जातात. पोटाच्या विकारांवर ओवा हे उत्तम औषध अाहे. जिऱ्यामुळे चव येते. त्यामुळे थालिपीठ करताना जिरे, ओवा यांचा वापर करण्यात येतो.
ऋतूंचा विचार करून पिठामधील धान्याचे प्रमाण बदलण्या येते. काही धान्ये विशिष्ट ऋतूमध्ये खाणे अधिक हितकारक असते. त्यामुळे त्या ऋतूमध्ये थालिपीठाच्या पिठामध्ये संबंधित धान्याचे प्रमाण वाढविण्यात येते. थालिपीठ पौष्टिक असले पाहिजे, असा आमचा कटाक्ष असतो. त्यामुळे ऋतूंचा विचार करून धान्याचा प्रमाण बदलण्यात येते, असे कल्पना गुरव सांगतात.
बटर किंवा दही यांसोबत थालिपीठ सर्व्ह करण्यात येते. त्याचबरोबर सोबत चटणी, लोणचेही देण्यात येते. गरमगरम, खमंग थालिपीठ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते. अनेक जण कांद्याचे थालिपीठ खाण्यास पसंती देतात. थालिपीठ करताना कांदा जास्त टाकावा, असे ग्राहक सुचवतात. अनेक ग्राहक थालिपीठ पार्सलही नेतात, असा गुरव यांचा अनुभव आहे.
औरंगाबादमधील थालिपीठ सेंटरला खवय्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आता पुण्यातही थालिपीठ केंद्र सुरू करण्याचा निर्णय गुरव यांनी घेतला आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. नोव्हेंबरमध्ये सदाशिवपेठेत केंद्र सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादेतील खमंग, खुसखुशीत थालिपीठ आता पुणेकरांनाही उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस आयुक्तांच्या पत्नीला डेंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पत्नी अपर्णा अमितेश कुमार यांना डेंगीची लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातून ही माहिती देण्यात आली.
अपर्णा अमितेश कुमार यांना सोमवारी ताप आला होता. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना डेंगी झाल्याचा संशय आल्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला. त्यामुळे त्यांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार उपचार करण्यात आल्यानंतर गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती संबंधित रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. पालिकेच्या आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात डेंगी आजाराचे १४९ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी २१ रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातेवाईक मुलीचे १३ वर्षांपासून लैंगिक शोषण

$
0
0

दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नातेवाईक मुलीचे १३ वर्षांपूर्वी अपहरण करत तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणी दोन आरोपीविरुद्ध अपहरण व बलात्काराचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल करून बदनापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

एका २७ वर्षांच्या महिलेने याप्रकरणी सुरुवातीला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये तिने म्हटले की, ती १४ वर्षांची असताना २००३ मध्ये वाहेगाव (ता. बदनापूर) येथून तिचा नातेवाईक पुंडलिक दत्तात्रय काळे (रा. वाकुळणी, ता. बदनापूर) याने त्याचा मित्र शांतीलाल दाभाडे (रा. न्यायनगर) याच्या मदतीने तिचे अपहरण केले होते. सुरुवातीला तिला अलाहाबाद येथे नेण्यात आले. यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण करण्यात आले. या काळात तिला एक मुलगा झाला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देण्यात येत होती. या प्रकाराला कंटाळून गुरुवारी या तिने अखेरीस पोलिस ठाणे गाठून आरोपी पुंडलिक काळे व शांतीलाल दाभाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुरुवात बदनापुर तालुक्यातून झाल्याने हे प्रकरण बदनापूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघ ‘दक्ष’ होताच शिवसेना ‘बॅकफूटवर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या देवगिरी बँकेच्या निवडणुकीतच्या रिंगणातून माघार घेतली आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला असून ही निवडणूक बिनविरोधच कशी होईल यासाठी आता संघप्रणित पॅनल 'दक्ष' झाले आहे.

औरंगाबादमध्ये देवगिरी नागरी सहकारी बँकेची निवडणूक जाहीर होऊन एक आठवडा झाला आहे. या आठवड्याभरात शिवसेनाप्रणित शिवशाही देवगिरी विकास पॅनलने जोरात तयारी करत सुमारे १५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. त्यांनी फॉर्म भरले, परंतु त्यातील १५ पैकी ७ जणांनी २ सप्टेंबरपर्यंत माघार घेतली. यामुळे शिवसेनाप्रणित पॅनलमधील सर्वच ढाणे वाघ माघारी फिरले आहेत. संघप्रणित उत्कर्ष पॅनलला शिवसेनेच्या शिवशाही पॅनलने केलेला विरोध आता हळूहळू मावळू लागला आहे. काही अपक्ष उमेदवारांनाही माघार घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रिंगणात असलेल्या एकूण ३८ जणांपैकी १३ जणांनी माघार घेतली आहे. आता २५ जण रिंगणात असून एकूण १७ जणांच्या संचालक मंडळासाठी ही निवडणूक होत आहे. ७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा उमेदवारांना आहे.

निवडणूक अधिकरी डी. बी. वरखडे आणि डीडीआर कार्यालयातील एस. बी. सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबरपर्यंत माघार घेणाऱ्या १३ जणांमध्ये अरविंद केंद्रे, जयश्री किवळेकर, जयश्री चामरगोरे, संभाजी मुळे, राजेंद्र दानवे (शिवसना), प्रकाश कमलाणी (शिवसेना), सूर्यकांत जायभाय (शिवसेना), गिरीजाराम हाळनोर (शिवसेना), सुनीता देव (शिवसेना), नितीन अजमेरा (शिवसेना), अनिल साळवे (शिवसेना) रामदास ठोंबरे (संघस्वयंसेवक), जगन्नाथ कोराळे यांचा समावेश आहे. आगामी पाच दिवसांत आणखी काही उमेदवार मागे घेण्याची शक्यता असून शिवसेनेने उभे केलेल्या १५ जणांपैकी सात जणांनी माघार घेऊन संघप्रणित पॅनलला पा‌ठिंबा दिला आहे.
खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आदेशानंतर २ सप्टेंबरपर्यंत आम्ही शिवसेनेच्या सात कार्यकर्त्यांनी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली असून उर्वरित सात जण देखील ७ सप्टेंबरपर्यंत माघार घेतील. १०० टक्के ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटते.

- राजेंद्र दानवे, शिवसेनाप्रणित शिवशाही देवगिरी विकास पॅनल

ही सहकार क्षेत्रात एक नावाजलेली बँक आहे. आजपर्यंतच्या स‍ंचालकांनी बँकेची यशस्वी घोडदौड केली आहे, हे शिवसेनेच्या सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यक़र्त्यांना माहित आहे. त्यांनी देखील सामंजस्याची भूमिका घेतली आहे. निवडणूक १०० टक्के बिनविरोध कशी होईल यासाठी संघप्रणित उमेदवार प्रयत्नशील आहेत.

किशोर शितोळे, उत्कर्ष पॅनल उमेदवार व विद्यमान संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११२ कोटींची एलईडी वर्कऑर्डर : याचिका फेटाळली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

एलईडी पथदिव्यांचा कंत्राट मिळालेल्या 'इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम' कंपनीला ११२ कोटींची वर्क ऑर्डर देण्याचे आदेश देऊन सुप्रीम कोर्टाने महापालिकेची फेरविचार याचिका फेटाळली. या निर्णयामुळे शहरात पथदिव्यांचा झगमगाट होणार आहे.

महापालिकेच्या एलईडी पथदिव्यांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द करून पालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयावर पालिकेने पुन्हा सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली होती. सुनावणी दरम्यान सुनील केंद्रेकर व ओमप्रकाश बकोरिया यांना कोर्टात हजेरी लावावी लागली. पालिकेने 'इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्ट‌िम' या कंपनीला निविदा मंजूर केली होती. त्याविरुद्ध मंजूर न झालेल्या 'पॉलिकॅब वायर्स' व 'शाह इन्व्हेस्टमेंट' या कंपन्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. या आदेशाला इलेक्ट्रॉनने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. एलईडी (४० हजार नग) लावणे व आठ वर्षांच्या देखभालीसाठीच्या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्या सहभागी होत्या. तांत्रिक कारणांवरून व अपेक्षित कागदपत्रे न दिल्याचे सांगत पालिकेने 'पॉलिकॅब' व 'शाह इन्व्हस्टमेंट'च्या निविदा नामंजूर केल्या होत्या. दोन सप्टेंबर २०१४ च्या 'इलेक्ट्रॉन लायटिंग'चा ठराव मंजूर झाला. दुसऱ्या दिवशी (तीन सप्टेंबर) 'वर्कऑर्डर'ही देण्यात आली. या निर्णयाला 'पॉलिकॅब' व 'शाह इन्व्हेस्टमेंट'नी स्वतंत्रपणे आव्हान दिले होते. २५ कोटींच्या वार्षिक उलाढालीचा निकष असताना 'इलेक्ट्रॉन'ने 'व्हॅट रिटर्न' ऐवजी 'सीए'चे प्रमाणपत्र दाखल केले. 'पॉलिकॅब'ची ४ हजार कोटींची उलाढाल आहे. तसेच 'टेक्निकल बीड' पूर्ण केल्यानंतर 'फिल्ड टेस्ट' घेतली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केल्यानंतरही, २८ ऑगस्ट रोजी 'फिल्ड टेस्ट' घेण्यात आली होती .३० ऑगस्ट रोजी 'टेक्निकल बीड'ची प्रक्रिया पूर्ण केल्याचे याचिकेत म्हटले होते. महापालिकेची एलईडी निविदा हायकोर्टाने रद्द ठरविली होती. हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध इलेक्टॉन कंपनीने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले होते. कार्यादेश देताना घाई झाली नाही. त्यामुळे पुरेसा वेळ देण्यात आला असा दावा कंपनीने केला. सामंजस्य करारासंबंधी तांत्रिक समितीच्या अहवालात चर्चा झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तांत्रिक निविदेसोबत चालू वर्षाचे व्हॅट रिटर्नस दाखल केले होते. यासंबंधीचा उल्लेख मुल्यमापन समितीच्या अहवालात असल्याचे कोर्टाने नमूद केले होते. एलईडी प्रक्रियेसंबंधीची ३ सप्टेंबर २०१४ रोजीचे पालिकेचे आदेश कोर्टाने वैध ठरविले होते.

जाहिरातीचे अधिकार देण्याचा निर्णय रद्द

२०११ ते २०१४ या तीन वर्षांत पालिकेला अडीच कोटी रुपये जाहिरातीचा महसूल मिळाला, पण त्यात पथदिवे खांबांच्या जाहिरातीचे उत्त्पन्न शून्य होते. जाहिरातीचे अधिकार हा सर्वस्वी वेगळा आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनला जाहिरातीचे अधिकार देण्याचा पालिकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविला. हे अधिकार देताना पालिका निरपेक्षपणे वागली नाही, असे मत व्यक्त करुन पालिकेने यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागविण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महारोगी आमचे खरे ‘सीएसआर’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'आनंदवन' घडण्यात सरकारचा सहभाग झिरो आहे. आमच्या कार्यात बाबा आमटे पहिले 'सीएसआर' व महारोगी दुसरे 'सीएसआर' आहेत. महारोग्यांचा 'स्वरानंदवन' ऑर्केस्ट्रा सर्वत्र पोहचला आहे. या कार्यात समाजातील सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे' असे प्रतिपादन शनिवारी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी केले. 'वाचक - पुस्तक अभियान' कार्यक्रमात ते बोलत होते.
राजहंस प्रकाशन आणि समकालीन प्रकाशन यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात आज सायंकाळी डॉ. विकास आमटे यांचे 'आनंदवन - आज आणि उद्या' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कौस्तुभ आमटे, डॉ. सदानंद बोरसे आणि आनंद अवधानी यांची मंचावर उपस्थिती होती. 'आनंदवन' प्रकल्पाचा इतिहास आणि नियोजित काम यावर आमटे यांनी प्रकाश टाकला. 'बाबा आणि साधनाताई यांना शेवटपर्यंत २०० रुपये दरमहा पगार होता. मृत्यूनंतर नवीन कापड घेण्याची गरज नाही. केळीच्या पानाचा वापर करा असे बाबांनी मृत्यूपत्रात लिहिले होते. त्यामुळे शून्यातून 'आनंदवन'चे काम सुरू केले. इथल्या कुष्ठरोग्यांना हाताची बोटे नसल्यामुळे आधार कार्ड नाही. मतदान कार्ड नसल्यामुळे मतदानाचा अधिकार नाही. परिणामी, राजकारणी कधीच आनंदवनात फिरकले नाही. आम्हाला नातेवाईक, वर्गमित्र आठवत नाहीत. या वातावरणात आम्ही घडलो.
अन्न हे अध्यात्म व्हावे असे बाबांना वाटत होते. कारण मोठ-मोठ्या उद्योगपतींनासुद्धा अन्न लागते. कोणतेही काम दुसऱ्यावर सोपवता येईल; पण माझे जेवण तू जेऊन ये असे कुणी म्हणत नाही. बाबांचे अनेक पैलू लोकांना माहिती नाहीत. नेल्सन मंडेला यांच्यापेक्षा बाबांना जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. पुरस्काराने माणूस मोठा होत नाही. मात्र, याद्वारे मिळालेली रक्कम 'आनंदवन'साठी उपयोगी पडली' असे आमटे म्हणाले. राज्यभर वाचनसंस्कृती वाढण्यासाठी वाचक - पुस्तक अभियान राबवत असल्याचे डॉ. सदानंद बोरसे यांनी प्रास्ताविकात सांगितले. दरम्यान, कौस्तुभ आमटे यांनी आनंदवनाची माहिती दृक-श्राव्य माध्यमातून दिली. यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यास अडीच कोटींचा गंडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फ्लॅट देण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्यास अडीच कोटींचा गंडा घालण्याचा आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बिल्डरासह तिघांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमप्रकाश बाबूअप्पा खके (रा. बीएमसी कॉलेजसमोर, पुणे) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
खके यांना गुंतवणूक म्हणून स्थावर मालमत्ता खरेदी करायची होती. कामानिमित्त ते १४ जानेवारी २००८मध्ये औरंगाबादमध्ये आले. तेव्हा चिकलठाणा परिसरात एका मध्यस्थी व्यक्तीमार्फत त्यांची मेसर्स रिटक्स बिल्डर्स अॅंड डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड कंपनीचे मालक अतुल डी. शिरोडकर (रा. मुंबई) याच्याशी ओळख झाली. त्यावेळी शिरोडकर याने नागपूर परिसरात मोठा गृहनिर्माण प्रकल्प सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांत चार ते पाच बैठका झाल्या. गुंतवणूक केल्यास पुढे निश्चितच मोठा फायदा होईल, असे सांगत शिरोडकर याने विश्वास संपादित केल्याने खके यांनी सुमारे ७५ हजार चौरस फूट बांधकाम असलेला फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांच्यात करार झाला. पुढे टप्प्या टप्प्याने खके यांनी बिल्डर शिरोडकर यास पैसे दिले. शिरोडकर याच्या कंपनीतील दोन कर्मचारीही उपस्थित होते. कराराप्रमाणे २०१०मध्ये फ्लॅट देण्याचे नमूद होते, पण शिरोडकर प्लॅट देण्यास टाळाटाळ करत होता. वारंवार मागणी केल्यानंतर पैसेही व्याजासह मिळत नाहीत आणि फ्लॅटही मिळत नसल्यामुळे खके यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे शुक्रवारी धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार बिल्डर अतुल शिरोडकर यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवतीला मारले; अर्भकाचा मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गर्भवती महिलेच्या पोटात पाण्याने भरलेली बकेट मारल्याने, तिच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना किलेअर्क परिसरात घडली. दोन वर्षांच्या मुलाकडून नळीवर पाय पडल्यामुळे झालेल्या किरकोळ वादातून हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी तीनजणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी महिलेचा नातू (वय 2) हा घरासमोर खेळत होता. पाण्याच्या नळीवर त्याचा पाय पडल्याने नळाला लावलेला पाइप निघाला. त्यामुळे शेजारी राहणारे वाजेद खान न अन्य दोन महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी मुलास मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीसह तिची चार महिन्याची गर्भवती मुलगी संशयित आरोपींची समजूत घालू लागले, पण ऐकण्यास तयार नसलेल्या आरोपींनी वाद घालत पाण्याने भरलेली बकेट मुलीच्या पोटावर मारली. त्यामुळे पोटातील गर्भास इजा होऊन बाळाचा मुत्यू झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी वाजेद खानसह अन्य दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रींच्या उत्सवात सामाजिक उपक्रम

$
0
0


औरंगाबाद : विविध सामाजिक उपक्रम, तलवारबाजी, कुस्त्यांच्या आखाड्याने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार श्री गणेश महासंघ उत्सव समितीने केला आहे, अशी माहिती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार व अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
देशमुख म्हणाले, सहा तारखेला झांबड इस्टेट येथील मीनाताई ठाकरे सभागृहात दुपारी ४ वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. ७ तारखेला सकाळी १० वाजता सिडको एन-३ भागात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ८ तारखेस सकाळी १० ते ५ या वेळेत विविध नाण्यांचे प्रदर्शन गुलाब विश्व हॉलमध्ये भरवण्यात येणार आहे. ९ तारखेला गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सिडको एन-६मधील तोरणा हायस्कूलमध्ये सकाळी १० वाजता होईल.
१२ व १३ सप्टेंबर रोजी महिला, मुली, तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी कॅनॉट प्लेस, व्टी.व्ही. सेंटर चौक, गजानन महाराज मंदिर चौक, गुलमंडी या ठिकाणी 'हमे आझादी चाहिए' हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कलेस वाव देण्यासाठी १४ सप्टेंबरला प्रतिभाताई प्राथमिक शाळा, वत्सल्याबाई माध्यमिक शाळा या ठिकाणी चित्रकला स्पर्धा होईल. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना संगणक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांच्या सहभागाने श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला १५ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रारंभ होईल. संस्थान गणपती मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. या प्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती राहाणार आहे. शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक, मछलीखडक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे जिल्हा परिषद मैदान असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत विसर्जन ठिकाणी भावगीत व भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर रोजी महासंघाच्यावतीने विसर्जन मार्गावर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे, असे पृथ्वीराज पवार, अभिजीत देशमुख यांनी सांगितले.

तलवारबाजी अन् कुस्त्यांची दंगल
शिवकालीन तलवारबाजीला ऐतिहासिक महत्त्व आहे. तलवारबाजीत शहरातील अनेक खेळाडूंनी पदके जिंकलेली आहेत. १० तारखेला तलवारबाजी स्पर्धा होईल. याच दिवशी प्रोझोन मॉल येथे दुपारी १२ ते ८ यावेळेत ढोल पथक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ तारखेला दुपारी १२ ते २ यावेळेत प्रोझोन मॉल येथे मोदक व लाडू तसेच एक मिनिट गेम शो आयोजित केला आहे. १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मैदानावर कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यातही हात बरबटले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका प्रशासनाचे हात कचऱ्यातही बरबटल्याचे स्पष्ट उघड झाले आहे. कचरा वाहतुकीच्या रिक्षा खरेदीसाठी डीपीडीसीतून निधी मिळूनही प्रशासनाने या पैशाची भाडोत्री रिक्षांवर उधळपट्टी केली. त्यात ७ महिन्यांत तब्बल १ कोटी ४० लाख ४५ हजार ८५० रुपयांचा भुर्दंड पालिकेच्या माथी बसला.
कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने स्वतःच्या मालकीच्या रिक्षा घ्याव्यात यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी एक वर्षापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालिकेला १ कोटी १० लाख रुपये मंजूर केले. ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीतही जमा झाली, परंतु एक वर्षाच्या काळात पालिका प्रशासनाने रिक्षा खरेदी टेंडरला प्रतिसाद मिळत नाही, असे कारण सांगून खरेदी प्रक्रिया लांबवली. दरम्यानच्या काळात कचरा वाहतुकीसाठी १५९ भाडोत्री रिक्षा लावण्यात आल्या. या रिक्षांच्या भाड्यावर सात महिन्यात १ कोटी ४० लाख ४५ हजार ८५० रुपये खर्च करण्यात आले. पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून पन्नास रिक्षा खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या महापालिकेने लगेच खरेदी केल्या असत्या, तर भाडोत्री रिक्षांवरचा खर्च कमी झाला असता. पालकमंत्र्यांनी दिलेल्या पैशांपेक्षा जास्तीचा खर्च पालिकेच्या प्रशासनाने भाडोत्री रिक्षांवर केला आहे. स्वतःच्या मालकीच्या रिक्षा न घेता भाडोत्री रिक्षा सांभाळण्यामागे कोणाचा काय 'अर्थ' आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही. तो कुणीही असो, त्याच्यावर सज्जड कारवाई करू, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथुर यांनी शनिवारी दिला.
गणेश उत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर माथुर यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील, चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह विभागीतील अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर माथुर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सणात घातपात होईल अशी शक्यता नाही. कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. याबाबत जिल्ह्यानिहाय आढावा घेतला आहे. नागरिक पोलिसांचे डोळे व कान आहेत. त्यांचे सहकार्य महत्वाचे. पोलिस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात विचारले असता त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे नमूद केले. लोकांमध्ये रोष आहे. त्या मागील कारण शोधले जाईल, पण त्याच बरोबर हल्ला करणारा कुणीही असो त्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून मराठवाड्यातील अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांना मुद्दाम टार्गेट केले जाते, असे विधान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच केले होते. याबाबत महासंचालक माथुर यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, पोलिसांकडून योग्य पद्धतीने कारवाई सुरू आहे. या राजकीय विधानावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. छगन भुजबळ यांच्या संपत्ती मोजणी संदर्भातही त्यांनी बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोळगे, मिटकर, जोशी यांना नोटीस

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा क्रिकेट संघटनेचा फेरफार अर्ज सहाय्यक धर्मादाय आयुक्त सय्यद विलायत हुसेन कादरी यांनी बुधवारी फेटाळला होता. या अर्जाबरोबरच नवीन ४८ आजीव सभासदांसह अर्जदार सचिन मुळे, आक्षेपकर्ते वसंत शर्मा, मोहन बोरा, सुहास कुलकर्णी यांचे सभासदत्व अवैध ठरविले होते. या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, असा अर्ज संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी शनिवारी केला. या अर्जावर १९८८च्या अभिलेखामध्ये असलेल्या विश्वस्तांना नोटीस बजावण्याचे आदेश सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी शनिवारी दिले. याक्षणी स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला असला तरी बुधवारी अर्जावर सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
सध्या अभिलेखावर १९८८मध्ये निवडून आलेल्या कार्यकारिणीची नावे आहेत. अध्यक्ष सुभाष लोळगे, सहसचिव किरण जोशी, कोषाध्यक्ष जे. यू. मिटकर, सदस्य व्ही. डी. चौधरी, व्ही. डी. संकेत, स्वीकृत सदस्य चक्रधर दळवी, करण डोग्रा यांची नावे अभिलेखावर आहेत. या सर्वांना नोटीस बजावून सुनावणी ७ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. सचिव सचिन मुळे, आक्षेपकर्ते वसंत शर्मा, मोहन बोरा, सुहास कुलकर्णी हे संघटनेचे आजीव सभासद आहेत. फेरफार अर्जातील प्रतिवादींच्या वकिलांनी हजर राहून कोर्टात लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी अर्जदार व आक्षेपकर्ते यांच्यावर आजीव सभासद नसल्याचा आक्षेप घेतला नाही. त्यांच्या आजीव सभासदावर सहधर्मादाय आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे असे दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे. आक्षेपकर्ते मोहन बोंबले यांच्यातर्फे त्यांचे वकील गणेश अनसिंगकर, नवीन ४८ सभासदांपैकी शिरीष बोराळकर व अन्य १७ जणांतर्फे आनंद चावरे, मोहन बोरा, वसंत शर्मा, सुहास कुलकर्णी यांनी नोटीस स्वीकारली. मुळे यांची बाजू आर. आर. चोभे यांनी मांडली.

अर्जात काय?
प्रत्येक वेळी प्रत्येक याचिकेत सभासदत्व सिद्ध करणे गरजेचे नाही. या व इतर मुद्दावर आव्हान द्यायचे आहे. अपील दाखल करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. १९८८मध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना संस्थेचा ताबा घेण्याची घाई झाली आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टच्या निर्णयाची कार्यवाही व अंमलबजावणी करू नये, अशी विनंती अर्जात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोसावी, गायकवाड; कामे आदर्श शिक्षक

$
0
0


औरंगाबाद : जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या यादीत समावेश आहे. सरकारने गुरुवारी सायंकाळी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर केली. प्राथमिक स्तरावर औरंगाबाद जिल्ह्यातून माँटेसरी बालक मंदिरच्या मीनाक्षी रामकृष्ण गोसावी, माध्यमिक स्तरावर देवगिरी ज्युनिअर कॉलेजचे चंद्रकांत साहेबराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे तर, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून सरला शामराव कामे यांची निवड करण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या कार्यरत आहेत. सरकारने यंदा १०९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images