Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

करवसुली ढेपाळली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विविध करांच्या वसुलीत महापालिकेला चार महिन्यांत तब्बल १६४ कोटी ८५ लाख रुपयांची तूट आली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत महापालिका ६६ कोटी रुपयांची पिछाडीवर आहे. उद्दिष्टानुसार वसुली होत नसल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कमांबरोबरच शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प १०७६ कोटी ७ लाख रुपयांचा आहे. विविध करांची वसुली आणि शासकीय अनुदानाच्या माध्यमातून या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे, परंतु एप्रिल ते जुलै २०१६ या चार महिन्यांची वसुलीची आकडेवारी लक्षात घेता १०७६ कोटी ७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प गडगडणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. लेखा विभागातून मिळालेल्या माहितीनुसार; या चार महिन्यांच्या काळात विविध करांच्या वसुलीत पालिकेला १६४ कोटी ८५ लाख रुपयांची तूट आली आहे. एकूण अर्थसंकल्पाचा विचार केल्यास एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ३५८ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात १९३ कोटी ८३ लाख रुपयेच वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण घसरू लागल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसुलीचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे त्याचा परिणाम शासकीय अनुदान मिळण्यावरही होऊ शकतो.
महापालिकेने महाराष्ट्र शासनाकडे रस्ते विकासासाठी १५० कोटींचे अनुदान मागितले आहे. सातारा-देवळाईच्या विकासासाठी ५०० कोटींचे विशेष अनुदान मागितले आहे. हे अनुदान देताना शासन विविध करांच्या वसुलीचा विचार करेल. वसुलीचे प्रमाण फारच कमी असेल, तर अनुदान न देण्याची भूमिका शासन घेऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

मालमत्ता कराची वसुली कमी
अर्थसंकल्पात मालमत्ता कराच्या वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट २९० कोटी रुपये देण्यात आले आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत ९६ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता कराची वसुली होणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात २९ कोटी ७७ लाख रुपयेच वसुली झाली. मालमत्ता कर वसुलीत ६६ कोटी ९० लाख रुपयांची तूट आली आहे. स्थानिक संस्था कराच्या वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट ३०० कोटी रुपये आहे. चार महिन्यांत ७४ कोटी ७ लाख रुपये वसुली झाली. २५ कोटी ९३ लाख रुपयांची तूट स्थानिक संस्था करात आली आहे. नगररचना विभागाने वर्षभरात १०० कोटी रुपये वसुली करणे अपेक्षित आहे. चार महिन्यात केवळ १० कोटी २३ लाख रुपये वसूल करण्यात आले. या विभागाची तूट २३ कोटी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्तेप्रकरणी गुन्हे दाखल करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाच्या निधीतून शहरात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांतील दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी महापालिकेतील एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. रस्त्यांच्या कामातील दोषींवर कारवाई करण्यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालीच बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एडके यांनी ही मागणी केली आहे.
राज्य शासनाने रस्त्यांच्या कामासाठी २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून रस्त्यांची कामे शासनाच्या समितीमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त आहेत. एडके यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यांच्या कामांसंदर्भात २७ जानेवारी रोजी लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे. त्यापूर्वीही पुराव्यासह तक्रार केली आहे. रस्त्यांच्या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने बनावट अनुभव प्रमाणपत्र जोडून निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचा उल्लेख आपण तक्रारीत केला होता. त्याचे पुरावे देखील जोडले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात या प्रमाणपत्राचा उल्लेख केला नाही. महापालिका आयुक्तांनी मात्र कारणे दाखवा नोटीसमध्ये याचा उल्लेख केला आहे.
निविदा नोटीसमधील अट क्रमांक १३ पोट कलम ५नुसार व्हाइट टॉपिंगचा अनुभव असला पाहिजे व व्हाइट टॉपिंगचे काम महापालिकेच्या हद्दीत केलेले असले पाहिजे. तसे अनुभवाचे प्रमाणपत्र हे फक्त शहर अभियंतांच्या स्वाक्षरीचेच स्वीकारले जाईल, असा स्पष्ट उल्लेख आहे. कंत्राटदाराने जे प्रमाणपत्र निविदेसोबत जोडले आहे त्यावर कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांची स्वाक्षरी आहे. रस्ता मात्र कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या हद्दीत आहे.
रस्त्याच्या कामासंदर्भात खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर फसवणुक करणे, खोटी कागदपत्रे तयार करून वापरणे, कट करणे या कलमाखाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवावा, असे या निवेदनात म्हटले आहे. एडके यांनी या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकदिनी गुरुजी रस्त्यावर

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या, अशी मागणी सोमवारी शिकदिनीच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रस्त्यावर उतरले. शासनाचा निषेध म्हणून अाश्वासित शिक्षक गणेश मंडळाने आदर्श शिक्षक पुरस्कारादरम्यान बाप्पांचा मुखवटा घालून, काळ्या फिती लावल्या. मुप्टातर्फे क्रांतिचौकात थाळीनाद, तर शिक्षण उपसंचालकासमोर विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांनी धरणे धरले.
सोळा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पगाराविना काम करतात. शासनाने अनुदानासाठी वारंवार आश्वासने दिले, परंतु ती पाळली नाहीत. वीस टक्क्यांऐवजी प्रचलित टप्पा नियमानुसार अनुदान द्यावे, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा द्याव्यात अशा मागणीसाठी विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी तयार केलेल्या अाश्वासित शिक्षक गणेश मंडळातर्फे शिक्षकदिनी निषेध व्यक्त करण्यात आला. संत एकनाथ रंग मंदिर येथे जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा सुरू होता. यावेळी प्रवेशद्वारावर अश्वासित शिक्षक गणेश मंडळाचे पदाधिकारी गणपती बाप्पाचा मुखवटा व काळ्याफिती लावून उभे होते. त्यांनी शिक्षक, अधिकारी या प्रत्येकाचे स्वागत केले. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले.
शिक्षक सेलचे प्रदेश अध्यक्ष मनोज पाटील, वाल्मिक सुरासे, पांडुरंग गोकुंडे, राजेश घाटे, पी. एम. पवार, रवींद्र तम्मेवार, हरी मोहिते, विजय काथार, आदिनाथ अडसरे, गणेश वरकड, विनायक देशमुख, ज्ञानेश्वर सोनवणे, गणेश पवार, गोपाळ अवघड, पी. के. शिंदे, संजय हांडे, शिवराज पवार, नीलेश कोल्हे यांची उपस्थिती होती.

कृती समितीची धरणे
कायम विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजांना शंभर टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी कायम विनाअनुदानित कृतीसमितीतर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मूल्यांकन पात्र उच्चमाध्यमिक विद्यालय, कनिष्ठ माध्यमिक विद्यालयांची पात्र यादी त्वरित जाहीर करत शंभर टक्के अनुदानाची तरतूद करणे, उर्वरित उच्चमाध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांची यादी आयुक्त कार्यालयातून शासनास पाठविणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देऊन वैयक्तिक मान्यता द्यावे, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठवाडा अध्यक्ष डी. डी. कुलकर्णी, ए. एस. क्षीरसाठ, प्रा. बनसोड, प्रा. व्ही. एस. शिंदे, प्रा. आर. के. गिधे, प्रा. सुनील गोरे, प्रा. संतोष साळवे, प्रा. के. व्ही. मगरे यांची उपस्थिती होती.

क्रांतिचौकात थाळीनाद
शाळांना अनुदान द्यावे, संच मान्यता २०१२-१३ची ग्राह्यधरा अशा मागणीसाठी मुप्टा महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेतर्फे क्रांतिचौकात थाळीनाद करण्यात आला. वर्षानुवर्ष विनाअनुदानित काम करणाऱ्या शिक्षकांचा विचार करत तत्काळ अनुदान द्यावे, १,६२८ शाळा २,४५२ तुकड्यांना अनुदान निधी तत्काळ मंजूर करावा, अनुदान पात्र मंजूर पदासाठी २०१५-१६च्या संच मान्यता लागू करण्यात येत असल्याने पाच हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता असल्याने २०१२-१३नुसार संच मान्यता ग्राह्य धरावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध मागण्यांचे फलक हाती घेत शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. निवेदनावर प्रा. सुनिल मगरे, राजेंद्र जाधव, शिवराम म्हस्के, शेख मुनीर, सुनील जाधव, अण्णा अंधळे, भास्कर टेकाळे, शेख हजूर, कृष्णा मुळीक, गजानन खैरे, सुरेश गवळी, भगवान जाधव, व्ही. एन. राठोड, बाबुराव सोनवणे, संतोष जाधव, त्र्यंबक पवार, गौतम इंगळे, सुनील चौधरी, मिलिंद भिवसने यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जास्त दर असल्याने रेशनवर डाळ पडून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाजारात तूर डाळीचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने रेशन दुकानांवर १०३ रुपये प्रतिकिलोने तूर डाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा फंडा आता शासनावरच उलटला आहे. खुल्या बाजारात डाळ ९५ ते ११० रुपये प्रतिकिलोपर्यंत विकण्यात येत आहे. त्यामुळे रेशनवरील डाळीला ग्राहक मिळत नसल्याने ती पडून आहे.
शहरातील १९९पैकी बहुतांश रेशनदुकानदारांना प्रत्येकी दोन क्विंटल डाळ मिळाली, मात्र ती ओली असल्याने रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. बाजारात डाळ स्वस्त मिळत असल्यामुळे ग्राहक मॉलमध्ये डाळ खरेदीसाठी जात आहेत. रेशन दुकानदारांना डाळ आणण्यासाठी शासनाकडून प्रतिक्विंटल साडेनऊ रुपये देण्यात येतात. प्रत्यक्षात दुकानदारांना वाहतुकीसाठी प्रतिक्विंटल २५ रुपये खर्च करावा लागला असल्याचे रेशनदुकानदारांचे म्हणने आहे. काही महिन्यांपूर्वी तूर डाळीचे भाव आकाशाला भिडले होते. एक किलो तूर डाळीसाठी नागरिकांना दीडशे ते पावणेदोनशे रुपये मोजावे लागत होते. डाळीच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने १२० रुपये किलो दराने खुल्या बाजारात तूर डाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. काही दिवसानंतर शासनाने मॉलमध्ये ९५ रुपये विक्री करण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जेदार शिक्षण द्या

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. दर्जात्मक शिक्षण देणाऱ्या शाळाच टिकाव धरणार आहेत. पुढच्या अडचणी टाळायच्या असतील तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळा सरस करणे, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी येथे केले.
शिक्षकदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ष २०१५-१६ व १६-१७ या दोन वर्षांचे जिल्हा शिक्षक पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बागडे बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन अध्यक्षस्थानी होते. आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष मधुकर अर्दड, शिक्षण सभापती विनोद तांबे, शीला चव्हाण, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, आर. एस. मोगल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
बागडे म्हणाले, यंदा माझ्याकडे पुरस्काराची शिफारस मागण्यासाठी एकही शिक्षक आला नाही. सर्वच शिक्षक कौतुकास पात्र असतात. शिक्षकांच्या अडचणी मागण्याच्या स्वरुपात मांडल्या जातात. जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रश्न वेगळे असतात. खाजगी शाळातील शिक्षकांनी अनुदानासाठी आंदोलन छेडले. सरकारने नुकतेच २० टक्के अनुदान जाहीर केले. जेव्हा या शाळा सुरू झाल्या, तेव्हा संस्थाचालकांनीच कायम विनाअनुदानित असे लिहून दिले होते. पुढे अपेक्षा वाढल्या. २००९ मध्ये कायम हा शब्द हटविला गेला. सहा वर्षांनंतर २० टक्के अनुदान सरकारने दिले. पुढे त्यात वाढ होईल, पण त्यासाठी वेळोवेळी मागणी करणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोगल यांनी प्रास्ताविक केले. आमदार सिरसाट, सावे, महाजन यांनी मार्गदर्शन केले. प्रविण लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान सोनवणे यांनी आभार मानले.

प्रथा नष्ट झाली
जिल्हा परिषद शिक्षकाच्या कार्यपद्धतीचा गौरव करताना बागडे यांनी काही उदाहरणे दिली. अगदी गावाला गाव खेटून असले, तरी शिक्षक नोकरीच्या ठिकाणी राहत असत. पूर्वी ही प्रथा होती. आता ती मोडली आहे. या विषयावर न बोललेलेच बरे, असे म्हटल्यावर सभागृहात हशा पिकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षांनंतर शहरात झाले गिधाडाचे दर्शन

0
0

औरंगाबाद : निसर्गातील सफाईगार म्हणून ओळख असलेले गिधाड शहरातून नामशेष झाल्याचे चित्र आहे. औरंगाबाद शहरात सोमवारी पक्षीमित्र, पर्यावरणप्रेमींना हिमातबाग परिसरात दुर्मिळ काळे ‌‌गिधाड दिसले. दहा वर्षांनंतर शहरात गिधाडाचे दर्शन झाल्याचे पक्षीमित्रांकडून सांगण्यात येत आहे.
गिधाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. शहरात त्यांचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे अन्नसाखळी धोक्यात आल. या पार्श्वभूमीवर सोमवारी हिमायतबाग परिसरात गिधाडाचे दर्शन झाल्याने पक्षीमित्र, पर्यावरणप्रेमिंमध्ये उत्सुकता वाढली आहे. हिमायतबाग परिसरात सकाळी आठच्या सुमारास पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक, मिलिंद गिरधारी, सार्थक आग्रवाल, पंकज शक्करवार यांच्या निदर्शनात हे गिधाड आले. हे गिधाड काही काळ आकाशात घिरट्या घालत होते.
शहरात दहा वर्षांनंतर गिधाड आढळले आहे. त्याचे परिसरात घरटे आहे का, याचीही पाहणी करण्यात येईल, असेही पक्षीमित्र, पर्यावरणप्रेमींनी सांगितले. मृत जणावरांच मांस खाणारे गिधाड निसर्गात सफाई कामगार म्हणून ओळखले जाते, परंतु आधिवास नाहीसा झाला. त्यात गुरांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनामुळेही गिधाडांची संख्या कमी झाली आहे. शहरात दहा वर्षापूर्वी गिधाड आढळून आले होते. त्यानंतर आताच गिधाडाचे शहरात दर्शन झाल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३९५ हाजी जेद्दाहला रवाना

0
0


औरंगाबाद : हज यात्रेसाठीचे शेवटचे विमान २३९५ यात्रेकरूंना घेऊन सोमवारी शहरातून जेद्दाहकडे रवाना झाले. यात एक वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंना जाण्यासाठी यंदा हज यात्रेसाठी ३० ऑगस्ट रोजी पहिल्या विमानाने २७३ हाजी रवाना झाले. यानंतर ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर, ३ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबरला जेद्दाहसाठी दिवसभरातून एक विमान फेरी झाली. याशिवाय २ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबरला औरंगाबादहून जेद्दाहला जाण्यासाठी दोन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. औरंगाबाद येथील जामा मशिद येथे तयार केलेल्या तात्पुरत्या हज कॅंपमध्ये हाजींची सुविधा करण्यात आली होती. या कॅंपमधून १२०८ पुरुष आणि ११८७ महिलांसह एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे, अशी माहिती अल हुज्जाज कमिटीचे अब्दुल करिम पटेल यांनी दिली. औरंगाबाद विमानतळावरून हज यात्रेला जाणाऱ्या हाजींना सामान व्यवस्थित नेता यावे यासाठी अल्तमश ग्रुपच्या शंभरच्यावर तरुणांनी परिश्रम केले. २००६ पासून या ग्रुपचे विनामोबदला काम सुरू आहे, अशी माहिती अल्तमश ग्रुपचे संस्थापक शेख टिल्लू यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम विभागात २२ कोटींचे नियोजन होईना

0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासाठी राज्य सरकार; तसेच जिल्हा नियोजन मंडळातून आलेले तब्बल २२ कोटी रुपये नियोजन न झाल्यामुळे पडून आहेत. विद्यमान सभागृहाची मुदत संपण्यास सहा महिने शिल्लक असल्याने पुढच्या काळात हे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. पदाधिकाऱ्यांकडून याप्रकरणी दुर्लक्ष केल्यामुळे सदस्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला रस्ते, पूल दुरुस्ती, डांबरीकरण, मजबुतीकरण, डागडुजीसाठी निधी दिला जातो. ग्रामविकास खात्याकडून ३ कोटी ३५ लाखांचा निधी प्राप्त झाला. ब गट योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या निधीचे नियोजन करण्यासाठी कामे प्रस्तावित करणे अपेक्षित होते. सहा महिने उलटून गेले तरी त्याचे नियोजन झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; याबाबत मागविलेल्या प्रस्तावांवर आक्षेप घेण्यात आला. ठराविक सदस्यांच्या सर्कलमधील कामे सुचविल्याबद्दल अन्य सदस्यांकडून प्रशासनाला जाब विचारण्यात आला. त्यामुळे याबाबतच्या अंतिम मंजुरीचा मसुदाच मुळी तयार झालेला नाही.
दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीतून गेल्यावर्षी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातून किती खर्च झाला याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. पालकमंत्री रामदास कदम यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दिलेला हा निधी गेल्यावर्षीच खर्च होणे अपेक्षित होते, पण
६० सर्कलमध्ये समान निधीचे वाटप करायचे की बांधकाम समितीतील सदस्यांना प्राधान्य द्यायचे? या वादात वर्षभर कुठलीच कामे मंजूर झाली नाहीत, मात्र यातील बहुतांश निधी खर्च झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला. त्याची माहिती मात्र उपलब्ध नाही.

निधी परत जाण्याची भीती
गेल्यावर्षी दिलेला निधी खर्च न झाल्याचे पाहून यंदा डीपीसीतून ७ कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी दिले गेले. नियोजनातील चालढकलीचा फटका बांधकाम विभागाला बसला आहे, मात्र त्यातून पदाधिकारी, प्रशासनाने अद्याप कुठलाच धडा घेतलेला नाही. फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. २२ कोटींचे नियोजन या महिन्यात झाले नाही तर यातील डीपीसीचा निधी परत जाण्याची भीती आहे.

बांधकाम विभागांतर्गत अनेक काम मंजूर झाली. त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्याचा एकत्रित हिशेब झालेला नाही. त्यामुळे निधी अखर्चित दिसतो. मार्च अखेर संपूर्ण निधीचे नियोजन करण्यात येईल.
- संतोष जाधव, बांधकाम सभापती, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणरायाचा भंडारा ‘एफडीए’च्या कचाट्यात

0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद: गणेश मंडळात भंडारा करताय, एफडीएची परवानगी घेतलीय काय, असे प्रश्न कोणी विचारले, तर गणेश मंडाळाच्या पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटू नये. गणेशोत्सवात भंडारा करण्यासाठी आता अन्न व औषधी प्रशासनाची (एफडीए) परवानगी घ्यावी लागणार आहे.

गणेशोत्सवाच्या १० दिवसांत सत्यनारायण आणि भंडारा यांचे आयोजन करण्यात येते. भंडाऱ्यानिमित्त सार्वजनिक ठिकाणी विविध पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. त्यात डाळबट्टी, मसालेभात, पुरी-भाजी, बुंदी आदी पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ शिजवल्यानंतर त्यांची तपासणी, पदार्थांचे विश्लेषण आणि पदार्थातील जिन्नसांची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या भंडाऱ्यातून विषबाधा होऊ नये म्हणून ही तपासणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. भंडारा करण्यापूर्वी तपासणी आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील विविध प्रसिद्ध गणेश मंडळांना कळवले अाहे. छोट्या-मोठ्या मंडळांनीही या आदेशाची नोंद घेऊन अन्न व औषध प्रशासनाकडून भंडाऱ्याच्या आयोजनासाठी परवागनी घेणे बंधनकारक केले आहे.

नियम जुनाच; अंमलबजावणी आता

सार्वजनिक ठिकाणी मंडळांनी भंडारा करताना परवानगी घेणे बंधनकारक असल्याचा नियम जुनाच आहे. हा नियम किमान १० वर्षांपूर्वीचाच आहे. त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती, परंतु भंडाऱ्यातील पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या घटना घडल्याने अशा नियमांची अंमलबजावणी कडक केली आहे. अशा घटना घडल्यानंतर मनुष्यवधापर्यंत विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मुभा अन्न व औषध प्रशासानस अाहे. त्यामुळे मंडळांनी भंडाऱ्याची परवानगी, पदार्थ तपासणी करून घ्यावी नाही. अन्यथा त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल, असे सहआयुक्तांनी स्पष्ट केले.

परवानगी कशामुळे?

गेल्या तीन-चार वर्षांत भंडारा व भंडाऱ्यातील पदार्थ खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याच्या घटना कोकण, मराठवाडा या भागांत घडल्या आहेत. यामुळे भंडारा करताना परवानगी घेऊन, त्या पदार्थांची तपासणी करण्याचे बंधनकारक केल्याचे औरंगाबाद विभागाचे अन्न व औषध ‌प्रशासन विभागाचे सहआयुक्त अशोक पारधी यांनी सांगितले.

मंडळांची संख्या वाढली

औरंगाबाद शहरात सुमारे ११५०हून अधिकृत नोंदणी केलेले गणेश मंडळे आहेत. सुमारे ४ हजार ५००हून नोंदणी नसलेली मंडळे असल्याची माहिती आहे. आतापर्यंत छोट्या-मोठ्या सुमारे १० ते १२ गणेश मंडळांनीच अन्न व औषध प्रशासनाकडे भंडाऱ्याच्या आयोजनाची परवानगी घेतल्याचेही अन्न व औषध विभागाच्या सहआयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाड दुर्घटना हलगर्जीपणामुळेच

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर रस्त्यावर असलेला खारपाडा पूल कोसळल्याप्रकरणी व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूल निरीक्षणामध्ये हलगर्जीपणा झाला असा आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेत केंद्र शासन व महाराष्ट्र शासनास नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांनी दिले. राज्य शासनास उत्तर दाखल करण्यास तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

तळेकर अँड असोशिएटस लिटिगेशन लॉ फर्मचे संचालक सतीश तळेकर व कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी महाराष्ट्र शासनास २०११पासून वेगवेगळ्या भागातील पूल निरीक्षण अहवाल माहिती अधिकारात अर्ज करून मागितले होते. आजवरही या अर्जावर कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. याचिकाकर्त्यांनी शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर पूल निरीक्षण करण्यात यावे, असे १९८८चे शासनाचे परिपत्रक असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

४ ऑगस्ट २०१६ रोजी सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर रस्त्यावरील खारपाडा पूल कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणत्याही प्रकारचा पावसाळ्यापूर्वीचा पूल निरीक्षण अहवाल उपलब्ध नसल्याने या घटनेतून ३०हूनअधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. ही घटना लक्षात घेता याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे.

न्या. शिंदे व न्या.पाटील यांच्यासमोर याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली. त्यांनी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनास नोटीस बजावल्या व राज्य शासनास उत्तर दाखल करण्यास मुदत दिली. शासनाच्या वतीने अमरजितसिंह गिरासे व केंद्र शासनाच्या वतीने भूषण कुलकर्णी यांनी नोटीस स्वीकारली. या याचिकेची सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हायटेक कॉपी करताना जालन्यात एकास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्हा निवड समिती मार्फत लिपिक, टंकलेखक, तलाठी आणि शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. लिपिक-शिपाई पदाच्या परीक्षेत उघडकीस आलेल्या या कॉपी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. हायटेक कॉपीचा हा प्रकार रविवारी उघडकीस आला.एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाच्या परीक्षेत चार हायटेक कॉपी बहाद्दरांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या घटनेला आठ दिवस देखील उलटले नाहीत. जिल्हा निवड समिती मार्फत लिपिक, टंकलेखक तलाठी आणि शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू असून रविवारी लिपिक व शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा पार पडली. शहरातील विविध शाळा महाविद्यालयात या परीक्षेसाठीचे केंद्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, सकाळी शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथील परीक्षा केंद्रातील चार क्रमांकाच्या हॉलमधे ज्ञानेश्वर शालिकराम दहातोंडे (वय २५, रा. कहाला ता. लोणार जि. बुलढाणा) हा संशयितरीत्या हालचाल करताना दिसल्याने त्याची झडती घेतली असता त्यांच्या खिशात एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आढळून आले. या इलेक्ट्रॉनिक डिवाइसमध्ये सीम कार्ड असून त्याद्वारे हायटेक कॉपी केली जात असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी परीक्षार्थीला अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
विहीर खोदण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणले नसल्याने एका २१ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पतीसह सासरकडील पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
अंबेलोहळ येथील ज्योती (वय २१) यांचा फेब्रुवारी २०१२मध्ये मच्छिंद्र सर्जेराव लाटे (रा. टाकळी धनगाव ता. पैठण) याच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर ज्योती यांचा विहीर खोदण्यासाठी दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरू झाला. त्या माहेरातून रक्कम आणत नसल्यने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. या जाचाला कंटाळून त्यांनी महिला तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. तेथे समझोता होऊनही सासरची मंडळी नांदवण्यास तयार नसल्याने ही फिर्याद देण्यात आली. या प्रकरणी पती मच्छिंद्र सर्जेराव लाटे, सासू जानकाबाई, दीर अश्विन, नणंद योगीता ताराचंद प्रधान व नंदवई ताराचंद अंबादास प्रधान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. जी. के. कोंडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक विरुद्ध अधिकारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील अधिकारी विरुद्ध नगरसेवक वादाने मंगळवारी सर्व सीमा ओलांडल्या. विशेष सर्वसाधारण सभेत नगरसेवकाने अपशब्द वापरल्यामुळे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकाऱ्यांनी सभात्याग केला. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी आयुक्तांना शासनाच्या सेवेत परत पाठविण्याची मागणी लावून धरली. महापौर त्र्यंबक तुपे यांनी आयुक्तांचा निषेध करीत ही सभा तहकूब केली.
रस्त्यावरील खड्डे, पाणीपुरवठा, बंद पडलेले पथदिवे, मालमत्ता कराची वसुली आणि अतिक्रमणे या पाच प्रमुख विषयांवर निर्णय घेण्यासाठी महापौर तुपे यांनी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी बहुतेक नगरसेवक तयारीनिशी आले होते. अनेकांनी आपापल्या वॉर्डातील समस्यांचे फोटोच पुरावा म्हणून सोबत आणले होते.
सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी सभेच्या सुरुवातीला सभागृहाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'खड्ड्यांचे शहर अशी आपल्या शहराची प्रतीमा निर्माण झाली आहे. खड्डे बुजवणे, रस्ते चांगले ठेवणे हे प्रशासनाचे काम आहे. नागरिक खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावत आहेत. खड्डे मोजण्याची स्पर्धा घेत आहेत. चांगल्या रस्त्यांसाठी होम हवन करीत आहेत. सोशल मीडियावर उपहासात्मक संदेश येत आहेत. 'रस्ते पे खड्डे है, गणपती बाप्पाका आज बर्थडे है' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काल गणरायांचे स्वागत केले. याला जबाबदार कोण आहे? एकही नगरसेवक आयुक्तांच्या कामावर समाधानी नाही.'
काँग्रेसच्या सायली जमादार यांनी पॅचवर्कबद्दल प्रश्न उपस्थित केले. पॅचवर्कवर पाच वर्षांत ५० कोटी ७५ लाख रुपये खर्च झाले. तो खर्च वाया गेला. पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर वचक ठेवावा. अधिकारी एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात, असा आरोप त्यांनी केला. एमआयएमचे शेख जफर म्हणाले, 'अधिकाऱ्यांची कातडी गेंड्यासारखी जाड झाली आहे. काहीही बोलले तरी त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही.' जफर यांना मध्येच थांबवत आयुक्त बकोरिया म्हणाले, 'मी असे शब्द ऐकून घेणार नाही, सहन करणार नाही.' त्यानंतर बकोरिया खुर्चीवरून उठून उभे राहिले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना हाताने इशारा केला व अधिकाऱ्यांसह त्यांनी सभात्याग केला. अधिकाऱ्यांच्या सभात्यागानंतर नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. नगरसेवकांनी आयुक्तांना पळपुटे, असे संबोधले. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून शासनाच्या सेवेत परत पाठविण्याची मागणी केली. कलम ३६ (३)नुसार आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जंजाळ व राजू शिंदे यांनी केली. महापौर तुपे यांनी आयुक्त व अधिकाऱ्यांची भूमिका योग्य नाही, असे म्हणत त्यांचा निषेध केला व सभा तहकूब केली.

तुकाराम मुंडे यांची चर्चा
महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची बदली होणार असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात मंगळवारी होती. मुंडे सध्या नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. तेथील लोकप्रतिनिधींशी त्यांचे खटके उडत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी बकोरिया यांना पाठवून मुंडे यांना औरंगाबादला आणण्याच्या हालचाली मंत्रालयाच्या स्तरावर सुरू आहेत. प्राथमिक चर्चेत मुंडे यांनी येथे येण्यास नकार दिला, पण शासनाने सक्ती केलीच तर ते औरंगाबादेत महापालिका आयुक्त म्हणून येऊ शकतील.

मटा भूमिका : समस्यांचे काय?
गेल्या ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत केवळ चर्चा आणि वादच झाले. त्यानंतर मंगळवारच्या विशेष सभेत काही निर्णय होतील अशी नागरिकांची अपेक्षा होती, पण ही सभादेखील वादांमुळे वांझोटीच ठरली. नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत आणि महापालिका खड्डे बुजवत नसल्यामुळे नगरसेवक संतापले आहेत. अधिकाऱ्यांवर टीका होताच आयुक्तांनी सभात्याग केला, पण अधिकारी किती कार्यक्षम आहेत हेदेखील त्यांनी तपासावयास हवे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे शहर वेठीस धरले गेले आहे. बोचऱ्या टीकेमुळे आयुक्त संतापले, पण नगरसेवकांना मतदार याहून कठोर शब्दांत सुनावत आहेत हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. उभयतांमधील वादाचा फटका शहराला बसत आहे. अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेलाही आहेत. ते वापरून नगरसेवकांनी त्यांना शिस्त लावावी. नागरिकांना समस्यांमधून सुटका हवी आहे. त्यांना अशा वादांमध्ये रस नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूल बांधला कोणी?

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सिल्लोड-कन्नड राज्य मार्गावर मोढावाडीजवळ ओढ्यावरल दगडी पूल सोमवारी दुपारी कोसळला. महाडमधील पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादेत घडलेल्या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. हा पूल नेमका बांधला कुणी, याची माहिती घेण्याचे काम बुधवारी सुरू होते, पण पुलाबद्दल काहीही माहिती हाती लागली नाही.
सिल्लोडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला हा पूल सोमवारी कोसळला. त्यात चार जण जखमी झाले. हा पूल ३५ वर्षे जुना होता. स्थापत्य अभियांत्रिकीच्या शास्त्रीय परिभाषेत स्टोन मेसोनरी (दगडी) पद्धतीने बांधला होता. आर्च तयार करून त्यावर चुन्याचा वापर करून स्लॅब टाकण्यात आला होता. पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला की जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याची माहिती दोन्ही विभागांकडे उपलब्ध नाही. विचारणा केल्यानंतर जिल्हा परिषदेने पीडब्ल्यूडीकडे बोट दाखविले. पीडब्ल्यूडीमध्ये पुलाचे रेकॉर्ड शोधण्याचे काम दिवसभर सुरू होते.

चौकशीसाठी समिती
दरम्यान, सिल्लोड-कन्नड रोडवरील मोढा वाजी गावाजवळ पडलेल्या पुलाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी मंगळवारी दिली.

सर्वेक्षणाबद्दलही संदिग्धता
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे राज्यातील पुलांचे एप्रिल व मे महिन्यात सर्वेक्षण केले जाते. सिल्लोडजवळील पूल २० मीटर लांबीचा होता. ३० मीटरपेक्षा अधिक लांबीच्या पुलांचे सर्वेक्षण अधीक्षक अभियंत्यांच्या देखरेखीखाली केले जाते. या पुलाचे सर्वेक्षण केले गेले होते की नाही, याबाबतही कुठलीच माहिती बुधवारी उपलब्ध झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकुलसचिव मंझा यांचे निलंबन

0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई केली आहे. उपकुलसचिवपदासाठी त्यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे विद्यापीठाने नेमलेल्या समितीने स्पष्ट केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
गुणवाढ प्रकरण, चेक न वटल्याप्रकरणी झालेली अटक, अनुभव प्रमाणपत्राबाबत संशय अशा विविध प्रकरणांमध्ये आरोप असलेल्या ईश्वर मंझा यांच्यावर अखेर अनुभव प्रमाणपत्रप्रकरणी मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. माजी कुलगुरूंचा सहभाग असलेल्या समितीच्या अहवालानंतर ही प्रशासनाकडून कारवाई करण्यात आल्याचे विद्यापीठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. चेक न वटल्याच्या एका प्रकरणात अटक झाल्यानंतर ईश्वर मंझावर १९ जून रोजी विद्यापीठाने निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई मागे घेतली होती.

समितीच्या अहवालानंतर कारवाई
उपकुलसचिवपदासाठी त्यांनी जोडलेले अनुभव प्रमाणपत्र अयोग्य असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कमलसिंग, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांची एक समिती नेमली होती. समितीने अहवाल विद्यापीठाला सादर केला होता. अहवालात समितीने प्रमाणपत्राबाबत त्यांना दोषी ठरविले. अहवाल व्यवस्थापन समितीसमोर ठेवण्यात आला. त्यानंतर निलंबनाचे आदेश काढण्यात आले. कुलसचिवांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर वाहतूक पोलिसांची दंडेली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हेल्मेटसाठी दुचाकीचालकांना वेठीस धरणाऱ्या पोलिसांनी आता सरकारी अधिकाऱ्यांवरही दंडेली सुरू केली आहे. मंगळवारी वाहतूक पोलिसांनी चक्क जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या गाडीलाच जॅमर लावून त्याची प्रचिती दिली. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी आपले सरकारी वाहन पोलिसांना देण्यास नकार दिल्याबद्दल त्यांना ही शिक्षा देणाऱ्या पोलिसांनीच, सरकारी जी.आर. दाखविल्यानंतर पाच तासांनी जॅमर काढून घेतला.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्यासाठी वाहन देण्यात आले आहे. झेडपीच्या ताफ्यात गाड्या नसल्याने त्यांना भाडेतत्त्वावरील टाटा सुमो देण्यात आली आहे. गणेशोत्सवात पोलिस बंदोबस्तासाठी गाड्या कमी पडतात म्हणून पोलिस सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या अधिग्रहित करतात. वरिष्ठांच्या सूचनेवरून मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहर पोलिस वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दीपक बिरारी शिक्षणाधिकारी मोगल यांचे वाहन ताब्यात घेण्यासाठी गेले. शिक्षणाधिकाऱ्यांनी 'माझ्याकडे लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सव हे सांस्कृतिक उपक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी जिल्हाभर फिरावे लागणार आहे. म्हणून मी गाडी देऊ शकत नाही,' असे सांगितले. गाडीसाठी बिरारी आग्रही होते, तर मोगल यांनी स्पष्टपणे नकार दिला. तिढा सुटत नसल्याचे पाहून बिरारी दालनाबाहेर आले आणि बाहेर उभ्या असलेल्या जीपला (एम एच २० डीव्ही ४०७७) जॅमर लावण्याची सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना केली.
दोन दिवसांच्या सुटीनंतर जिल्हा परिषदेत गर्दी होती. एरवीही शिक्षण विभागात तुलनेत जास्त गर्दी असते. पोलिसांनी गाडीला जॅमर लावल्याचे पाहून उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. या प्रकारावर शिक्षणाधिकारीही अचंबित झाले. दुपारी त्यांनी एका कर्मचाऱ्यामार्फत पोलिस आयुक्तांच्या नावे पत्र दिले. माझ्याकडे असलेले वाहन अधिग्रहित करू नये, अशी विनंती केली. त्यासोबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा जीआर जोडला. त्यानंतर तब्बल पाच तासांनी, म्हणजे सायंकाळी पाच वाजता वाहतूक पोलिसांनी गाडीचे जॅमर काढले. पोलिसांच्या मोगलाईचा अनुभव शिक्षणाधिकारी मोगल यांनी घेतला. या कारवाईमुळे शिक्षणाधिकाऱ्यांची महत्त्वाची कामे ताटकळली.
पोलिसांनी आता सरकारी अधिकाऱ्यांवरही दंडेली सुरू केल्याची चर्चा मंगळवारी शासकीय वर्तुळात होती. रस्त्यात वाहने उभी करणाऱ्यांवर जॅमर लावण्याची कारवाई करण्यास पोलिस धजावत नाहीत, पण शासकीय अधिकारी असहाय असल्यामुळे त्यांनाच टार्गेट केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

सकाळी अकरा वाजता वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कार्यालयात आले आणि त्यांनी माझी गाडी गणेशोत्सवानिमित्त मागितली. माझ्याकडे सरकारी गाडी नाही. खासगी गाडी भाडेतत्त्वावर मिळाली आहे. माझ्याकडे राज्य सरकारच्या लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व उत्सवाची जबाबदारी आहे. त्यासाठी जिल्हाभर फिरावे लागणार आहे. अशा परिस्थितीत गाडी कशी देणार?
- आर. एस. मोगल, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

गणेशोत्सवासाठी सरकारी गाड्या ताब्यात घेण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत. त्यानुसार मी शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांना गाडी कुणाची आहे, असे विचारले असता त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. त्यामुळे शंका निर्माण झाली. त्यानंतर जॅमर लावले.
- दीपक बिरारी, पोलिस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडची दुर्घटना देखाव्यात साकारली

0
0

औरंगाबाद : गेल्या महिन्यात महाडजवळ सावित्री नदीवरील पूल कोसळला. त्यात दोन बस वाहून गेल्या. त्याचा देखावा उस्मानपुरा भागात राहणाऱ्या रोहन देशपांडे यांनीही घरगुती बाप्पासमोर साकारला आहे.
एमबीएसचे शिक्षण घेत असलेले रोहन देशपांडे यांना लहानपणापासून गणरायासमोर आकर्षक सजावट करण्याची आवड आहे. गेल्या तीन वर्षांपासून केवळ सजावट न करता त्याने देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, संदेश देण्याचा प्रयत्न केला. यंदा त्याने महाड पूल दुर्घटनेचा देखावा सादर करत जीर्ण झालेल्या पुलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. थर्माकोल, कपड्याचा वापर देखाव्यासाठी केला आहे. बाप्पा व जीर्ण पुलांचा संवाद देखाव्यात दाखवत आहे. हा देखावा तयार करण्यासाठी बारा दिवस आणि सुमारे दोन हजार रुपये खर्च आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणरायांवर फुलांची उधळण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी गणेश महासंघाच्यावतीने सोमवारी (५ सप्टेंबर) गणरायाचे स्वागत फुलांची उधळण करत करण्यात आले. छावणीत प्रथमच गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्यात आली. स्वागताला सुमारे २ ते ३ क्विंटल फुले उधळण्यात आली.
नेहरू चौक आणि छावणी परिसरातील बहुतेक मंडळांनीही छावणी गणेशमहासंघाचे अनुकरण केले. छावणीत यंदा सुमारे ५५ गणेशमंडळांनी त्यांच्या-त्यांच्या भागात व गल्ल्यांमध्ये गणेशस्थापना केली आहे. यावर्षी महासंघाने गणेशस्थापना आणि गणेशविसर्जन असे दोन्ही वेळेस सुमारे ११ ते १२ क्विंटल फुले उधळायची ठरवली आहेत, असे छावणी गणेश महासंघाचे अध्यक्ष किशोर कच्छवाह यांनी सांगितले. त्यामुळे पाणीबचत तर होणार आहेच, शिवाय गणेशभक्तांच्या आरोग्याशीही होणारा खेळही थांबेल. गुलालाने त्वचारोग होतो, कपडे धुण्यासाठी दुप्पट पाणी लागते आणि अंगावरील गुलाल धुण्यासाठीही खूप पाणी लागते. फुले उधळल्याने पाणी बचत होईल. आधीच छावणीसह शहरात पाण्याचा प्रश्न असतो. यामुळे आम्ही फुले उधळण्याचा निर्णय घेतला, असेही कच्छवाह यांनी सांगितले.

मिरवणुकीनंतर स्वच्छताही
आता विसर्जनाच्या दिवशी, १६ सप्टेंबरलाही आम्ही गुलाल वापरणार नाही. त्यावेळी झेंडू व इतर फुले उधळू. याशिवाय विसर्जन झाल्यानंतरही त्या फुलांचा होणारा कचरा व फुलांच्या पाकळ्याही गोळा करून कचरा व्यवस्थापन करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुलालाऐवजी झेंडू फुले उधळण्याचा हा निर्णय छावणीत पहिल्यांदाच घेतला गेला असून, महासंघाच्या गणेशस्थापना व मिरवणुकीस सुमारे ३० वर्षांचा इतिहास असल्याचेही किशोर कच्छवाह यांनी सांगितले.

कुंभारवाड्यात फुलांची उधळण
औरंगाबाद : प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील काही गणेशमंडळांनी यंदा गणरायाच्या स्थापनेदिवशी गुलालाऐवजी फुलांचा वापर करून आदर्श घालून दिला आहे. औरंगपुरा परिसरातील कुंभारवाडा येथील तरूण भारत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा हा उपक्रम पार पाडला. अमृतेश्वर राम मंदिराशेजारी गणेशाची प्रतिष्ठापना सोमवारी करण्यात आली. सायंकाळनंतर मिरवणुकीने बप्पा मंडपात विराजमान झाले. औरंगपुरा, गुलमंडी मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत गुलाल न उधळता फुले, पाकळ्यांचा वापर केला. अध्यक्ष संतोष जैस्वाल, उपाध्यक्ष प्रांजल व्यवहारे, सचिव सुनील वालेकर, कोषाध्यक्ष विश्वजित भावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय वाखाखण्याजोगा ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक कार्याची परंपरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुलमंडीचा चांदीचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला अष्टविनायक गणेश मंडळाचा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. १९७९मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाचे हे ३७वे वर्ष आहे. गेल्या ३७ वर्षांत विविध धार्मिक, सामाजिक देखावे सादर करीत या मंडळाने आपली सामाजिक समरसतेची परंपरा कायम ठेवली आहे.
१९७९मध्ये अष्टविनायक हा गणेश महिमा सांगणारा चित्रपट शहरात प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाच्या नावावरून गुलमंडी येथील गणेश मंडळाने आपल्या अष्टविनायक गणेश मंडळाची स्थापना केली. संस्थापक सदस्य भूषणभाई पटेल, प्रदीप जैस्वाल, दयाराम बसैये, किशनचंद तनवाणी, सुरेश झांबड, श्रीनिवास खटोड, राजू भट, वल्लभ बागला आदींच्या पुढाकाराने या गणेश मंडळाची स्थापना झाली. मंडळाची सुरूवातीची वर्गणी १८०० रुपये झाली होती. आजही वर्गणी लाखोंच्या घरात आहे, मात्र दरवर्षी मंडळाच्या आर्थिक व्यवहाराची चार्टड अकाउंटंट मार्फत तपासणी होऊन अहवाल तयार करण्यात येतो. मंडळाच्या प्रत्येक वगर्णीदाराला हा अहवाल सादर करण्यात येतो. मंडळाची स्थापना झाल्यानंतर भाविकांनी गणपतीला सोने चांदीच्या वस्तु दान करायला सुरुवात केली होती. सहा किलो चांदी जमा झाल्यानंतर या चांदीची मूर्ती करण्याचे ठरवण्यात आले. खामगाव येथील सुवर्णकाराकडे मूर्ती तयार करण्यास टाकली. या मूर्तीसाठी दहा किलो चांदी लागली. मंडळाच्या सदस्यांनी वर्गणी जमा करून उर्वरित चांदीची रक्कम सुवर्णकाराला दिली. हा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला. गणेशोत्सवात या मंडळाकडे गर्दी होऊ लागली. भाविकांच्या सोने-चांदीच्या दानाचे प्रमाण वाढला. यामुळे पुन्हा मोठी मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्याची मंडळाची मूर्ती ६७ किलोच्या चांदीपासून बनवली असून, यावर एक किलोचे सोन्याचे दागिने आहेत, अशी माहिती मंडळाचे ट्रस्टी व कोषाध्यक्ष दयाराम बसैये यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष म्हणून ऋषीकेश जैस्वाल यांची निवड करण्यात आली आहे.

संगीत रोषणाईसाठी प्रसिद्ध
अष्टविनायक गणेश मंडळ काही वर्षांपूर्वी संगीत रोषणाईसाठी प्रसिद्ध होते. चित्रपट गीतांवर सादर होणारी आकर्षक विद्युत रोषणाई गणपती बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना खिळवून ठेवत होती. विशेष बाब म्हणजे हे संगीत रोषणाईचे काम बाहेरगावच्या व्यक्तीला न देता स्थानिक मंडळीला देण्यावर मंडळाचा भर होता.

सामाजिक कामात पुढाकार
अष्टविनायक गणेश मंडळात सर्व समाजाच्या प्रतिनिधींना समाविष्ट करून घेत सामाजिक समरसता जपण्यावर भर देण्यात आला आहे. मंडळाने सामाजिक, धार्मिक देखावे सादर करीत समाजप्रबोधन केले आहे. मंडळाच्या रक्कमेतून मंदिराला लाउड स्पीकर भेट, अमरनाथ येथील यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सायकल वाटप, हर्सूल सावंगी गाव दत्तक घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व मंदिरांना जिर्णोद्धारासाठी साहित्य वाटप करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक व्हा... : ...जिद्दीच्या जोरावर उद्योगभरारी!

0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
साईनाथ आहेर. पिंपळगाव देवचे (ता. फुलंब्री) रहिवासी. गावापासून जवळ असलेल्या डोंगरगाव येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. गावात वडिलोपार्जित चार-पाच एकर जमीन. भाऊबंदकीत फार काही हाताशी लागले नाही. आई मंजुळाबाई आणि वडील रंगनाथ आहेर. दोघांनी रोजंदारीवर काम करत मुलांना वाढवले. नोकरी, कामधंदा करून घराला हातभार लावावा हा विचार साईनाथ यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी तडक औरंगाबाद गाठले. तो काळ १९८५-८६चा होता. केवळ ५ रुपये रोजावर चिकलठाण्यात काम सुरू केले. रोज १८ ते २० तास काम करावे लागे. त्या काळी तसे मोठे पगार नसले तरी मोठ्या मनाची माणसं होती. मोठ्या मनाच्याच मालकाने अर्थात किंमतीलाल भाटिया यांनी साईनाथांना पहिली संधी दिली. कारखाना सुरू करण्याचीही ऊर्मी ‌‌दिली. केवळ २५ हजाराच्या भांडवलावर एक मशीन घेऊन काम सुरू केले. औरंगाबादमध्ये चिकलठाणा एमआयडीसीतील भाटिया यांच्या रिशपाल कंपनीला त्यांनी कामास सुरुवात केली. त्यांनीच साईनाथ यांना एक प्रेसिंग आणि गॅस्केटचे मशीन घरी घेऊन दिले होते. औरंगाबादला पत्नी मंगलाबाई यांच्या मदतीने घरी व कारखान्यात असे दोन ठिकणी गॅस्केटचे काम सुरू केले. एक हँडप्रेस‌िंगचे काम एका पैशात असा दर त्या काळी त्यांना दिला गेला. शेकडो प्रेसिंगवर्क केल्यानंतर कुठे शे-पाचशे रुपये मिळायचे. कारखान्यातील काम आणि घरी पॅकिंग वगैरेचे काम करत दिवस ढकलणे सुरू होते. अचानक भाटिया यांच्याशी संवाद साधताना मी देखील एक कारखाना उभारू शकतो का, असा प्रश्नच साईनाथांनी भाटियांना केला. त्यांच्या मदतीने चिकलठाणा येथे सुरुवातीला २०० चौरस फूट जागा भाड्याने घेऊन एका मशीनच्या सहाय्याने काम सुरू केले. तेथे त्रिमूर्ती एंटरप्राइजेसची मुहूर्तमेढ रोवली. स्वत: मशीनवर बसून प्रेसिंग, एसएस, गॅस्केट करणे सुरू केले. व्यवसाय वाढत गेला, विविध कारखानदारांशी संबंध वाढताना तोंडातली साखर आणि डोक्यावर ठेवलेला बर्फ कामी आला, मग चिकलठाण्यातच १९९९मध्ये स्वत:ची सुमारे २००० चौरस फुटांपेक्षा जास्त जागा घेऊन शेड उभारले. सुरुवातीला १० ते २० कामगार काम करू लागले. गावाकडील भूमीपुत्रांना व नातेवाईकांनाच स्वत:च्या कारखान्यात संधी दिली. रिशपाल येथे सुमारे १९९८५ ते १९९९पर्यंत केलेले काम आणि त्यापूर्वी गरवारे व बजाजमध्ये स्वीपर, हेल्परचे केलेले काम आयुष्यात स्वत:च्या कारखान्याच्या स्थापनेवेळी कामी आले, असे ते आवर्जून नोंदवतात.
हे काम करताना पत्नीचे बंधू पांडुरंग आणि बाळू टेकाळे यांची मदत झाली. गावाकडील घर आणि पाच-सहा एकरची जागा भाऊ जगन्नाथ आहेर यांनी सांभाळली. दोन बहिणींचे लग्नही साईनाथांनी आई वडिलांच्या आशीर्वादाने लावून दिले. आई-बाबांनी आम्हाला 'प्रामाणिकपणे वागा, प्राम‌ाणिकपणे काम करा, पैसा प्रामाणिकपणे कमवा' हे शिकवल्यानेच तेच व्यवहारात कामी आलेले तत्त्व. त्यामुळेच आम्ही आज मोठी मजल मारू शकलो, असे साईनाथ सांगतात. १९९९ ते आजपर्यंत कारखान्याचा व्याप दसपटीने वाढला आहे. चिकलठाण्याच्या कारखान्याच्या जोरावर शेंद्र्यातही दोन कारखाने काढून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेसमध्ये आज १५०जण अाहेत. शेंद्रा येथे २० चौरस स्क्वेअर फुटांचे दोन कारखाने आणि चिकलाठाण्यातील पहिला कारखाना असे तीन कारखाने आहे.

श्री गुरू दत्तात्रयांवर निस्सीम श्रद्धा
तीन कारखाने उभारताना आलेले संकट, नैराश्य आणि संकट यांच्याशी दोन हात करताना श्री. गुरू दत्तांत्रयांवरील श्रद्धेने अंगी बळ आले. कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणावर कायम विश्वास ठेऊन असल्याने कंपनीतील कर्मचारी व कामगारही कित्येक वर्षांपासून टिकून आहेत. त्यांच्याच पाठबळावर आपण हे साम्राज्य उभारू शकलो, असे साईनाथ आवर्जून सांगतात.

नामांकित कंपन्यांना पुरवठा
ग्रीव्हज, बजाज, ‌किर्लोस्कर, गोदरेज, व्हिडिओकॉन, गरवारे, एण्डुरन्स, केएसबी, लोंबा‌र्ड‌िनी यांच्यापासून किमान आठ ते दहा बड्या कारखान्यांचे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस व्हेंडर आहे. तीन शेडसमधून दोन शिफ्टमध्ये कामे चालते. आज साईनाथ यांच्या बरोबरीने त्यांचा मुलगा रवी (मेकॅनिकल इंजिनीअर) काम करतो आहे. ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन पासून ऑर्डर पूर्ण करण्यापर्यंत कम्प्युटराइ‌ज्ड कारखाना करण्यात साईनाथांनी मजल मारली आहे. त्यांना उद्योगासाठी असलेला मोठा पुरस्कारही मिळाला असून ते त्यांचा कच्चा माल अमेरिका, युके, जर्मनी येथून आणून आपले जॉब पूर्ण करून देतात हे विशेष.

२५ हून देशांना भेटी
केवळ दहावी पास झालेल्या साईनाथांनी आपल्या उद्योजकतेला पूरक असलेले 'ज्ञान' घेत आपले वेगळेपण सिद्ध करताना सुमारे २५ हून अधिक देशांत 'व्यावसायिक भेटी दिल्या. अमेरिका, जपान, तैवान, व्हिएतनाम यासारख्या नामांकित देशांचा यात समावेश आहे.

अशी आहेत उत्पादने
टू, थ्री आणि फोर व्हिलर्सला लागणारे विविध कंपनोनंटमधील गॅस्केट्सची निर्मिती त्रिमूर्तीमधून होते. येथून प्रेस कंपोनंट्स, इंडस्ट्र‌िअल गॅस्केट सप्लायर्स देखील होते. यात साईनाथ यांनी विशेषता कमावली असून कंपनीची स्वतंत्र्य वेबसाइट आणि तीन कारखान्यांचे कार्पोरेट ऑफिसही थाटले आहे.

शेतीवरीलप्रेम कायम
भाऊ जगन्नाथ आहेर हे गावाकडे शेती पाहतात. त्या शेतीवरील साईनाथ यांचे प्रेमही कायम आहे. भावालाही त्यांची मदत होत असते. याशिवाय गावाकडील तरुण सुशिक्षित आणि अशिक्षित बेरोजगारांनाही त्यांनी संधी दिली आहे. त्यांना त्यांच्या तीन कारखान्यात काम दिले आहे.

यांचे विशेष राहिले प्रेम
कंपनी स्थापन्यापासून ग्रीव्हज कंपनीचे सहकार्य कायम लाभले. बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांना वारंवार बँकेमार्फत आर्थिक मदत केली. आई-वडिलांचे आशीर्वाद, बँकेचे पाठबळ, विविध कंपन्यांचे सहकार्य, रिशपाल कंपनीचे क‌िंमतीलाल भाटिया यांनी दिलेली शिकवणूक आणि पत्नीने दिलेली साथ कंपनी उभारणीसाठी कायम मोलाची ठरल्याचे साईनाथ आहिरे सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images