Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तुळजाभवानी मार्गाचा वाद मुख्यमंत्री दरबारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

नवरात्रौत्सवात देवीभक्तांना महाद्वारातूनच प्रवेश देण्यात यावा, या मागणीवर तुळजापूर येथील संघर्ष समिती ठाम आहे. त्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपतीचे विर्सजन करणार नाही, असा प‌‌वित्रा घेतल्याने राज्य सरकारकडून याप्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घाटशीळ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा‌निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थितीत राहणार आहेत. दुसरीकडे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे त्यांच्या निर्णयावर ठाम असून एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

नवरात्रौत्सवात गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना मंदिराच्या मागील बाजूने घाटशीळमार्गे प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या वर्षी तुळजापुरातील व्यापाऱ्यांनी व पुजाऱ्यांनी या प्रकारास विरोध केला होता. परंतु, देवस्थान समितीने आपली हटवादी भूमिका पार पाडून भविकांना घाटशीळमार्गेच प्रवेश दिला. या मार्गे भाविकांना तीन किलोमीटरची आधिक वाटचाल करावी लागत आहे. त्याशिवाय त्याचा येथील व्यापारावरही परिणाम झाला. शिवाय देवस्थानच्या दर्शनी भागाचे महत्त्व लोप पावत चालले आहे.तुळजापूर देवस्थानच्या रूढी व परंपरेत देवस्थान समिती हस्तक्षेप करत असून, ही समिती भावनांशी खेळ करीत असल्याचा आरोप करीत तुळजापूर संघर्ष समितीच्यावतीने सहा दिवस उपोषण करून तुळजापूर बंदचे आयोजन केले होते. यासाठी तुळजापुरातील नागरिकांनी मोर्चा काढला होता.

भाविकांची व देवस्थानची सुरक्षा व्यवस्‍था लक्षात घेऊन देवस्थान समितीने गतवर्षी नवरात्रौत्सवात भविकांना घाटशीळ मंदिरात प्रवेश मार्गे मंदिरात प्रवेश दिला. या व्यवस्‍थेबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, या मार्गाची पाहणी एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागान केली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी स्पष्ट केले. रविवारी औरंगाबाद विभागाचे पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

दरम्यान, सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घाटशीळ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा‌निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थितीत राहणार असल्याने या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोनशे कोटी रुपयांचा निधी द्यावा

मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यासाठी ग्राम विकास विभागाने दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे शक्य होणार असल्याची मा‌हिती जिल्हा‌धिकारी नारनवरे यांनी दिली.

मंदिराच्या सुरक्षिततेसाठी परिसरात १५० मीटरचा डी झोन तयार करण्यात यावा. रस्त्याचे रुंदीकरण करावे. परिसरातील अतिक्रमण काढून धोकादायक इमारती पाडाव्यात. त्यासाठी एटीएस, खोचर समिती व आपत्कालीन व्यवस्था विभागाने केलेल्या सूचनाची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत देणार आहोत.

डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अगोदर डाळ उचला, तरच मिळेल साखर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात रेशनच्या महागड्या डाळीला एकीकडे ग्राहक नाही, तर दुसरीकडे डाळ घेतल्याशिवाय साखरेचे परमिट मिळणार नाही, असे अजब फर्मान सरकारने काढले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांची पुरती कोंडी झाली आहे.

एकीकडे खुल्या बाजारात ८० ते ९० रुपये किलोदराने चांगल्या दर्जाची डाळ मिळत आहे, तर दुसरीकडे रेशनदुकानदारांना डाळ उचलण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे. अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी रेशनदुकानदारांना प्रथम डाळीचे परमिट घ्यावे, त्यानंतर साखरेचे परमिट देण्यात येईल असे सांगितले. अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच जिल्ह्यातील इतर तहसीलदारांनीही डाळ उचलणे सक्तीचे केले आहे.

रेशनदुकानदारांना वाहतूक खर्च व हमालीसह ही डाळ दुकानापर्यंत आणण्याठी प्रतिक्विंटल ३५ रुपये खर्च करण्यात येतो. दुसरीकडे या डाळीला उचल नाही. त्यामुळे रेशनदुकानदारांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. डाळीच्या या अवस्थेमुळे शासनाकडून आलेल्या एकूण डाळीपैकी केवळ ५ टक्केच डाळ उचलण्यात आली. बाजारात डाळ स्वस्त मिळत असल्यामुळे ग्राहक मॉलमध्ये डाळ खरेदीसाठी जात आहेत. दरम्यान, या कोंडीतून सुटका करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक महासंघाचे राज्य अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी आज जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.

शिजण्यासाठी दुप्पट वेळ

रेशन दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या तुरडाळीत जवळपास १५ टक्के डाळ ही सोयाबीन आणि हिरवा वटाण्याची आहे. तूरडाळ शिजण्यासाठी जितका वेळ लागतो, त्यापेक्षा दुप्पट वेळ स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध होणारी तूरडाळ शिजण्यासाठी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून स्वस्त धान्य दुकानातील डाळ घेण्यात येत नाही. याचा परिणाम ही डाळ दुकानांमध्ये पडून आहे.

सरकारी भाव चढे

सध्या रेशनवर मिळणारी तूरडाळ १०३ रुपये किलोने मिळते आहे. बाजारात आणि मॉलमध्ये ८० ते ९० रुपये किलोने चांगल्या प्रतीची तूरडाळ मिळत आहे. त्यामुळे रेशनच्या डाळीला उठाव नाही. बहुतांश ग्राहक रेशनच्या डाळीकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे रेशनदुकानदारांकडे ही डाळ पडून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णकार तरुणाची आत्महत्या

$
0
0

सुवर्णकार तरुणाची आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सराफा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी महावीर चौकाजवळील म्हाडा कॉलनी येथे उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
व्यंकटेश भगवानराव जोजारे (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी) असे या तरुणाचे नाव आहे. जोजारे यांचे नांदेड येथे सुवर्ण आभूषणे विक्रीचे दुकान आहे. त्यांचे आईवडील म्हाडा कॉलनी येथे राहतात. गणेशोत्सवानिमीत्त जोजारे आईवडिलांकडे आले होते. सोमवारी रात्री कुटुंबीयासोबत जेवण करून ते झोपी गेले होते. सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांनी घराच्या गॅलरीत असलेल्या हुकाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी क्रांतिचौक पोलिसांना या घटनेची मा‌हिती दिली. पोलिसांनी जोजारे यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवला. व्यंकटेश जोजारे यांचा चार वर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन वर्षाची संस्कृती नावाची मुलगी आहे. जोजारे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्यात सजीव देखाव्यांची परंपरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाण्यातील गणेश मंडळांनी सादर केलेले सजीव देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. सावता गणेश मंडळ, अचानक गणेश मंडळ, मराठा गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ आदी मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून सजीव देखावे सादर करीत आहेत.
सावता गणेश मंडळाने यावर्षी ३०-४० जणांना घेऊन अतिभव्य सजीव देखाव्याचे सादरीकरण केले आहे. मंडळ यंदा समुद्र मंथन हा सजीव देखावा तयार केला आहे. शुक्रवारी या देखाव्याची तयारी पूर्ण झाली असून, रविवार-सोमवारपासून यात रंगत आली आहे. समुद्र मंथनासाठी १२० बाय ८० फुटांचे तळे तयार केले असून, त्यास समुद्राचे रूप देण्यात आले आहे. या देखाव्यात ६०-७० कलाकार काम करीत आहेत. देखाव्यासाठी नगरसेवक कारभारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष दीपक धोत्रे, सचिवपदी लक्ष्मण गाधू, उपाध्यक्ष राजू गाजरे, सदस्य योगेश गोरे, गोरख नवपुते, गणेश गाजरे, अर्जुन लोंढे, संतोष क्षीरसागर, भारत जाधव, कारभारी नवपुते, गणपत नवपुते, राजू गवळी, राहुल गोरे मेहनत करत आहेत.
चिकलठाण्यातील इतर मंडळे देखील सजीव देखाव्यातून सामाजिक, धार्मिक आणि भोंदूग‌िरी विरोधातील विषय मांडून दरवर्षी सजीव देखाव्यात रंगत आणत असतात. यंदा जयमल्हार गणेश मंडळ, अचानक गणेश मंडळ, जयमराठा गणेश मंडळांनी देखाव्यातून आपले वेगळेपण जपले आहे. सामाजिक, धार्मिक महत्त्व सांगत जय मल्हार गणेश मंडळाने बाहुबली सिनेमातील सजीव देखावा सादर केला आहे. अचानक गणेश मंडळाने अल्पवयीन मुली व महिलांवर होणारे अत्याचार सजीव देखाव्यातून मांडले आहेत. महिलांवर अत्याचार करू नका, त्यांचा सन्मान करा आणि मानाने जगा असा संदेश त्यांनी दिला आहे. जय मराठा गणेश मंडळाची संत परंपरेतील आणि ध‌ार्मिक देखावे सादर करण्याची परंपरा आहे. यंदा या मंडळाने संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील सजीव देखावा सादर केला आहे. संत तुकारामांच्या जीवनातील विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेतून उत्तम सजीव देखावा त्यांनी मांडल्याने संत सावता गणेश मंडळानंतर या मंडळाच्या देखाव्याची चर्चा आहे.

महिनाभर तयारी
सजीव देखावा सादर करण्यासाठी चिकलठाण्यातील मंडळे महिनाभर तयारी करतात. देखाव्यातील प्रसंग नाट्यरूपातून माडण्यात येतात. देखावा उभारणी आणि कलावंताची वेशभूषा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. देखाव्यातील स्त्री पात्रांच्या भूमिकाही पुरुष कार्यकर्ते करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात महिलांचा ‘आवाज’

$
0
0

औरंगाबाद : 'आपली भाषा ढोल ताशा...' म्हणत यंदाही गणेशोत्सवात ढोल-ताशाची धम्माल आहे. अवजड ढोल वाजवण्यासासाठी यंदा महिलांनही पुढाकार घेतला असून, अनेक मंडळांनी महिला ढोल पथक, पावली पथक तयार केले आहेत.
सिडको एन ९ येथील रेणुकामाता गणेश मंडळाने यंदापासून २० महिलांचे ढोल पथक तयार केले आहे. रेणुकामाता मंदिर परिसरामध्ये दररोज या पथकाची तालीम घेण्यात येते. पथकाकडे ५५ ढोल; तसेच ताशा असून, सुमारे अडीचशे सदस्यांचा पावली पथकामध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणी महिला आज पुरुषांच्या बरोबरीने आहेत. समाजामध्ये महिला व पुरूष असा भेदभाव न करता महिलांनाही समान वागणूक मिळायला हवी, याचाच एक भाग म्हणून या वर्षीपासून ढोल पथकामध्ये महिलांना सहभागी करून घेतले असल्याचे मंडळाचे सचिन बैनाडे यांनी सांगितले. यंदापासून विसर्जन मिरवणुकीमध्येही महिला ढोल पथकाचा सहभाग राहणार आहे. प्रतापनगर, देवानगरी युवक मंडळ प्रणित आमची संस्कृती गणेश मंडळाने या वर्षीपासून महिलांचे वाद्य पथक तयार केले आहे. ३१ जुलै रोजी वाद्यपूजन करून पथकाला सुरुवात करण्यात आली. महिलांच्या या ढोल पथकामध्ये ४ वर्षांपासून ५५ वर्षांच्या सदस्य असल्याचे संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणरायांच्या दारी जागृतीची फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणी आडवा पाणी जिरवा, कृषिक्रांती, भारतीय एकात्मता यांसह विविध प्रश्न, विषय देखाव्याच्या माध्यमातून साकारण्याची परंपरा बजाज बजाज ऑटो कामगारांच्या न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळाने १९८७पासून जोपासली आहे. यंदा ही मंडळाने परंपरा कायम ठेवत जलसंधारणाबाबत जनजागृती केली आहे.
बजाज ऑटो कामगार, कर्मचारी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेले शिवशक्ती गणेश मित्र मंडळ म्हणजे सामाजिक विषयावर देखावा सादर करणे मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. मंडळ स्थापनेस ३१ वर्षे पूर्ण झाले असून, उद्योजक मधूर बजाज यांच्यासह चंद्रप्रकाश त्रिपाठी, सिनीअर व्हाइस प्रेसिडेंट कैलास झांजरी यांनी मंडळ सदस्यांना नेहमी प्रेरणा देत आहेत.
वर्षभरात घडणाऱ्या ठळक घडामोडींवर आधारित प्रबोधनात्मक देखावे हे मंडळ साकारत आले आहे. देखावे सादर करण्यासाठी लागणारी तांत्रिक मदत किंमती मशीनरी बजाज ऑटोतर्फे पुरविण्यात येतात. त्यात कुशल तंत्रज्ञ सजावट समितीमध्ये असल्याने हे देखावे आकर्षक होतात. बजाज ऑटो व्यवस्थापन, विजय लोणीकर, बजाज ऑटो एप्लाइज युनियन व भारतीय कामगार सेना यांच्या सल्ल्यानुसार लोकशाही पद्धतीने प्रत्येक प्रत्येक वर्षी नवीन कार्यकारणी निवडली जाते. यंदा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी उत्तम चिकाळे, सचिवपदी कल्याण मसवले आहेत. यासह सुहास जोशी, राजेंद्र हिवाळे, विजय शिंदे, सुधाकर ढगे यांची उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. सुनील नवले, धनंजय कुलकर्णी, एन. बी. तायडे, बाबुराव अपार, प्रकाश यादव, सुनील उपाध्ये, संपत महाडीक, ब्रिजलाल बन्सवाल, संदीप जाधव, नरेंद्र मराठे आदी सजावट समितीचे काम पाहतात. मंडळाची सर्व आर्थिक बाबींची पडताळणी अंतर्गत हिशेब तपासणीसकडून व सीएकडूनही केली जाते.
दरम्यान, मंडळात कार्यरत कार्यकर्त्यांपैकी सुमारे दीडशे जणांना गुणवंत कामगार, तर आठ जणांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंडळाच्या २००९मध्ये झालेल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा यांसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.

शेती, उद्योग, विज्ञानाचे देखावे
सतत दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाड्याने पाणी आडवावे, पाणी जिरवावे असा संदेश देणारा देखावा मंडळानेने खडकेश्वर मंदिर मैदान परिसरात साकारला आहे. १९८७पासून सामाजिक देखावे सादर केले जात असून, पहिल्या वर्षी कृषीक्रांती हा देखावा सादर केला होता. त्यानंतर भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी, वेद आणि विज्ञान, मेरा भारत महान, भारतीय एकात्मता, औद्योगिक क्रांतीचे फायदे-तोटे, अष्टविनायक दर्शन, ज्युरासिक पार्क, फिरतारंगमंच (रोबोट), २१व्या शतकातील भारत, ऐतिहासिक वारसा जतन करा, कारगील युद्ध, भारतीय शास्त्रज्ञानाची अंतराळ कामगिरी, अणुचाचणी, संसदेवरील हल्ला व दहशतवादाचा भस्मासूर, कल्पना चावला यांसह विविध सामाजिक विषयावरील देखावे सादर केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा पावले..मराठवाड्यात पावसाला सुरुवात

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
दोन आठवड्यापासून गायब झालेल्या पावसाला मंगळवारा सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजाच्या मदतीला पुन्हा एकदा गणपती बाप्पा धाऊन आले आहेत. मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
लातूरमध्ये दमदार पाऊस
लातूर - लातूर जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, जळकोट तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण होते.

बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी
बीड - जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील वडवणी, धारूर, बीड, केज तालुक्यात दुपारपासून आभाळ भरून आले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. उत्तरा नक्षत्रास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. व या नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून आणि जुलै महिन्यात पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. पिकेही चांगली होती. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे पीक वाढीच्या अवस्थेत पाऊस गायब झाल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडल्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यासारख्या पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र त्यानंतर आठ दिवसांपासून पुन्हा पाऊस गायब झाला होता. मंगळवारी पुन्हा पाऊस पडल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत बीड जिल्ह्यात मंगळवार सकाळपर्यंत ३७८ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ५६.८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात गतवर्षी केवळ ३३० म्हणजेच ४९ टक्के पाऊस झाला होता.

नांदेडमध्ये पावसाचे पुनरागमन
नांदेड - जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर , संकरित ज्वारी या पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांत विघ्नहर्ता गणपती पावला अशी भावना दिसून येत आहे. या पावसामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगात दाणे भरून त्यांचे वजनही वाढणार आहे. त्यासोबतच खुरटे झालेले गवत वाढणार असून जनावरांना पुन्हा हिरवाचारा मिळणार आहे.
राज्यात सर्वत्र पावसाने डोळे वटारले होते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. दरम्यान, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली असतानाच मराठवाडा भागात काही जिल्ह्यात परतीचा पाऊस बळीराजाच्या मदतीला धाऊन आला आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी व रात्री जिल्ह्यात आगमन झाले. मंगळवारी दुपारपासून पिकांना हवा तसा मुरवणी पाऊस पडत आहे.

उस्मानाबादमध्ये रिमझिम
लातूर - उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी रिमझिम
पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने तुळजापूर व उमरगा तालुक्यातील काही भागात हजेरी लावली. उस्मानाबाद शहरासह अन्य तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

परभणीत सर्वदूर हजेरी
परभणी - गेल्या दोन आठवड्यापासून ओढ दिलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून जोर धरला आहे. पावसाने जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६० टक्के पाऊस पडला असून येत्या १५ दिवसात उर्वरीत ४० टक्के पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी ७७४ मिलिमीटर इतकी आहे. गेल्या साडेतीन महिन्यात ४६७ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली. सरासरीच्या ६०.४६ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपासून ढग दाटून आल्याने पावसाची शक्यता वाढली होती. त्यानुसार मध्यरात्री रिमझीम पाऊस पडला. त्यानंतर मंगळवारी दुपारी ३.३० नंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊसाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी ६.३० पर्यंत पावसाची रिमझीम सुरुच होती. पालम, सेलू, मानवत, पाथरी तसेच गंगाखेड तालुक्यात हा पाऊस चांगल्या प्रमाणात बरसला. या पावसामुळे नदी, नाले, ओढे, तळे भरुन रब्बीची सोय होणार आहे. ज्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनभावना लक्षात घेऊन निर्णय घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
नवरात्र उत्सवातील देवीभक्तांच्या मार्गावरुन प्रशासन व तुळजापूर येथील संघर्ष समितीमध्ये मतभेद असले तरी, जनभावना व पोलिसांचा प्राप्त होणारा अहवाल लक्षात घेऊन याप्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याचा तोडगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. त्यामुळे तुळजापूर येथील संघर्ष समितीने गणेश विर्सजन न करण्याचा निर्णय मागे घेतला.
देवीभक्तांच्या मार्गावरुन प्रशासन व तुळजापूर येथील संघर्ष समितीमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपतीचे विर्सजन करणार नाही, असा पवित्रा संघर्ष समितीने घेतल्याने मंगळवारी याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उशीरा बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले.
या बैठकीस सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह देवस्थान समिती, मंदिर समिती व संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.


नवरात्रात गेल्या वर्षीपासून भाविकांना मंदिराच्या मागील बाजूने घाटशीळमार्गे प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या वर्षी तुळजापुरातील व्यापाऱ्यांनी व पुजाऱ्यांनी या प्रकारास विरोध केला होता. परंतु, देवस्थान समितीने आपली हटवादी भूमिका पार पाडून भविकांना घाटशीळमार्गेच प्रवेश दिला. या मार्गे भाविकांना तीन किलोमीटरची आधिक वाटचाल करावी लागत असल्याचा आरोप करीत तुळजापूर संघर्ष समितीच्यावतीने सहा दिवस उपोषण करून तुळजापूर बंदचे आयोजन केले होते. यासाठी तुळजापुरातील नागरिकांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घाटशीळ मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
संघर्ष समितीचा विर्सजन करण्याचा निर्णय
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनभावनावा आधार करून येत्या काळात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने तुळजापूर येथील संघर्ष समितीने गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वेधशाळेसाठी औंढ्यातील भौगोलिक परिस्थिती सरस‘

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
भारतात उभारण्यात येणाऱ्या वेधशाळेसाठी आवश्यक ती सर्व उपकरणे अमेरिकेतील प्रयोगशाळेत तयार आहेत. प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी भारतातील शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. ही वेधशाळा इतर वेधशाळेच्या मानाने अतिशय प्रगत स्वरूपाची असेल. या वेधशाळेच्या उभारणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून जागेचा शोध घेण्यात येत होता. पण औंढा येथील भौगोलिक परिस्थिती इतर ठिकाणच्या मानाने अधिक सरस असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील औंढा हे स्थान निश्चित करण्यात आले आहे, असे मत अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रो. डॉ. फ्रेडरिक राब यांनी व्यक्त केले.
प्रो. राब गुरुत्वीय लहरी एक शोध या विषयावर सोमवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर हे होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर आयुकाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा भारतात उभारण्यात येणाऱ्या लाईगो प्रयोगशाळेचे प्रमुख प्रो. डॉ. तरुण सौरदीप, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. गंणेशचंद्र शिंदे, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. डॉ. आर. एस. खैरनार व संयोजक प्रो. डॉ. एम.के. पाटील यांची उपस्थिती होती.
या वेधशाळेच्या उभारणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची महत्वाची भूमिका असणार आहे. यासाठी विशाल स्वरूपात कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाची गरज पडणार आहे. स्थपत्य, तांत्रिक, विद्युत, इलेकट्रोनिक्स, संगणके इत्यादी अभियंते व वैज्ञानिकांची गरज या भागात पडणार असून रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या वेधशाळेच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार असून त्याचा फायदा या भागाच्या विकासावर होणार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पुढे डॉ. राब म्हणाले, 'सुमारे १०० वर्षांपूर्वी २० व्या शतकातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी १९१५ मध्ये सापेक्षता वादाचा सर्व समावेशक सिद्धांत मांडला. तेंव्हा या लहरींची संकल्पना मांडली होती. या लहरी अतिशय सूक्ष्म स्वरूपाच्या असून त्या शोधने एक आव्हान असेल, अशा या लहरी शोधण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान देखील तितकेच क्लिष्ट असते. त्याची क्षमता अनुच्या एक लक्षांश पट कमी आकाराचे देखील होणारे बदल देखील टिपू शकतील अशा प्रकारची असायला हवी. या शोधासाठी अमेरिकेत उभारण्यात आलेल्या दोन मुख्य प्रयोगशाळेमध्ये इंग्रजी एल आकाराची सुमारे चार किलोमीटर लांबीचे निर्वात पोकळीचे आरसे बसविले जातात. केंद्रस्थानातून एक अतिशय उच्च शक्तीचा लेजर किरणे दोन समान भागात विभागून दोन दिशांना पाठविले जातात जे शेवटी ठेवलेल्या आरशातून परावर्तीत होऊन परत केंद्रस्थानी एकमेकात मिसळून इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये झालेल्या बदलावरून अभ्यासता येतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज कौतुकसोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बिकट परिस्थितीशी झुंज देऊन दहावीच्या परीक्षेत यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या पाच गुणवंतांना 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांनी भरभरून लाखमोलाची मदत केली असून, ती त्यांना आज, बुधवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा मिलाफ असलेला 'मटा हेल्पलाइन'चा हा कार्यक्रम दुपारी एक वाजता एमजीएमच्या आर्यभट्ट (जेएनईसी इंजिनियरिंगजवळ) सभागृहात होणार असून, त्यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे. या वेळी ऋचा इंजिनीअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक उमेश दाशरथी व एमजीएम मेडिकल कॉलेजचे सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
'मटा हेल्पलाइन' उपक्रमासाठी पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना 'मटा'च्या वाचकांनी भरभरून मदत केली आहे. औरंगाबादसह परभणी, लातूर, नांदेड, उदगीर, सेलू, बीड अशा अनेक ठिकाणांहून वाचकांनी आवर्जून मदतीचे चेक 'मटा'कडे पाठवले. हे सर्व चेक बुधवारी उद्योजक उमेश दाशरथी व एमजीएम मेडिकल कॉलेजचे सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते शिवानी नरवडे, सीताराम केदारे, सोनल मसुरे, मंगेश शेंडे व संघरक्षिता बिरारे या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे स्थळ ः एमजीएम आर्यभट्ट सभागृह.
वेळ ः दुपारी एक.
प्रमुख पाहुणे ः उमेश दाशरथी, व्यवस्थापकीय संचालक, ऋचा इंजिनीअरिंग, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, सीईओ, एमजीएम मेडिकल कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिकवादात गमावल्या ‘हिंदी’तील संधी!

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
Tweet : @tusharbMT
औरंगाबाद ः सर्वभाषिक नागरिकांना जोडणारी भाषा असा हिंदी भाषेचा लौकिक आहे. परराष्ट्र मंत्रालय ते बँक भाषा अधिकारी अशा हजारो संधी हिंदी भाषेत आहेत, मात्र प्रादेशिकवाद आणि राजकीय आंदोलनांमुळे मराठी विद्यार्थी हिंदी भाषेपासून दुरावले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, माध्यमातील संधी आणि इतर उच्चपदस्थ नोकरीपासून मराठी भाषिक विद्यार्थी वंचित आहेत.
देशभरात संवादासाठी हिंदी भाषा वापरतात. दाक्षिणात्य राज्य वगळता सर्वत्र नागरिकांनी हिंदी भाषा स्वीकारली आहे. मातृभाषेसह हिंदीचा व्यावहारिक उपयोग सुरू आहे. पाश्चात्य देशांनी स्थानिक भाषेच्या बळावर जागतिक बाजारपेठ काबीज केली. भारतातही हिंदीचा वापर वाढण्यावर भर आहे. विदेशी कंपन्यांनी हिंदी भाषेचा काही प्रमाणात वापर सुरू केला आहे, मात्र प्रादेशिकवाद उफाळल्यानंतर काही राज्यात हिंदी भाषेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्रातही बिकट स्थिती असून, प्रादेशिकवाद आणि राजकीय पक्षांच्या टोकदार 'अस्मितां'नी हिंदी भाषा अडगळीत पडली आहे. पक्षांच्या विचारधारेचा तरुणांवर निश्चित परिणाम होतो. 'आमचीच भाषा बोलू' हा अविर्भाव वाढल्यामुळे राष्ट्रभाषेला विरोध वाढला आहे. मराठी व हिंदीची जननी संस्कृत भाषा असल्यामुळे भाषिक मतभेद टळले नाही. दुसरीकडे जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर हिंदी भाषेत सर्वाधिक संधी निर्माण झाल्या आहेत. रेल्वे, विमा, बँक, विदेश मंत्रालय, यूपीएससी, केंद्रीय खात्यातील भाषा अधिकारी, प्रसारमाध्यमे, बॉलिवूड, जाहिराती, अध्यापन, दुभाषा अशा विविध क्षेत्रात संधी आहेत, पण हिंदी भाषेचे पुरेसे आकलन नसल्यामुळे मराठी विद्यार्थी संधीपासून दुरावले आहेत. औरंगाबाद शहरातसुद्धा हिंदी बोलण्याचे प्रमाण लक्षणीय घटले आहे.

हिंदी हरवली
शाळेत हिंदी द्वितीय भाषा असताना विद्यार्थी नवीन भाषा शिकत होते. आता द्वितीय भाषा म्हणून संस्कृतचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी हिंदीपासून दुरावले आहेत. महाविद्यालयीन पातळीवरही निराशेचे वातावरण आहे. विद्यापीठ स्तरावरही पुरेसे प्रवेश नसल्याची स्थिती आहे. एका भाषेचा आग्रह वाढल्याने देशाची राजभाषा व्यवहारातून हरवली आहे.

हिंदी विभागात काही वर्षांपासून प्रयोजनमूलक हिंदी विषय आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन संधी कळतात. पुरेसा प्रचार व प्रसार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी माहिती नसतात. किमान महाराष्ट्रात दक्षिणेपेक्षा समाधानकारक स्थिती आहे.
- प्रा. डॉ. सुधाकर शेंडगे, डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ

भारतीय भाषांत विद्यार्थ्यांची उत्तम प्रगती होऊ शकते. कॉर्पोरेट क्षेत्रात इंग्रजीचा सर्वाधिक वापर होतो. मात्र, इतर ठिकाणी हिंदी भाषा आवश्यक आहे. भाषिक मतभेदामुळे विद्यार्थी राष्ट्रीय संधीपासून वंचित आहेत.
- प्रा. डॉ. संतोष तांदळे, पंडित नेहरू महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ लाख रुपये भरपाईचे आदेश

$
0
0

अपघातात मृत्यू, तरुणाच्या कुटुंबीयांना
१५ लाख रुपये देण्याचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना १५ लाख रुपये नुकसान भरपाईचे आदेश अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य बी. पी. क्षिरसागर यांनी दिले आहेत. ट्रकचा विमा काढलेला नसल्याने ही रक्कम चालक व मालकाला द्यावे लागणार आहेत.
पडेगाव येथील रामेश्‍वर शेषराव नागरे व त्यांचे मित्र मजुरीच्या कामासाठी दुचाकीवरून सातारा परिसराकडे जाण्यासाठी निघाले होते. बीडबायपास रस्त्याने जाताना, महानुभाव चौक ते देवळाई चौका दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात ट्रकचालक सत्तार खान रज्जाक खान (रा. नारेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामेश्‍वर यांची पत्नी अनिता मगरे, वडील शेषराव नागरे यांनी अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला. या प्रकरणात ट्रकमालक रविकांत दुबे (रा. गीतविहार) यांना प्रतिवादी करण्यात आले होते. सुनावणी नंतर कोर्टाने ट्रक चालक व मालक यांनी संयुक्तरित्या १५ लाख ९२ हजार रुपये साडेसात टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. अर्जदारांतर्फे पी. एस. तांदुळजे, सुनीता तांदुळजे, आर. टी. बावस्कर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईवरून मतभेद?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांच्या चौकशीबद्दल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत, दोषी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या शिफारशीवरून अधिकाऱ्यांमध्येच मतभेद झाल्याचे वृत्त आहे.
राज्य सरकारकडून रस्त्यांच्या कामासाठी मिळालेल्या २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून शासनाची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. दहा रस्त्यांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून रस्ते तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीत तीन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. या त्रिसदस्यीय समितीने रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेवावे, असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. या निधीतून दहा रस्त्यांची कामे होणे शक्य नाही, असे सांगून व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून फक्त पाच रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या रस्त्यांचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याची तक्रार करीत एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामाबद्दल ११ पानांचा अहवाल तयार केला. त्यात महापालिकेचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता व जीएनआय कंपनी यांनी संगनमत करून शासनाची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे, असा स्पष्ट उल्लेख केला. या अहवालानुसार संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक तीनवेळा पुढे ढकलण्यात आली. अखेर सोमवारी ही बैठक झाली.
फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेण्यावरून या बैठकीत अधिकाऱ्यांमध्येच मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रस्त्यांची कामे आता होत आली आहेत, ९ टक्के जादा दराने टेंडर देता येऊ शकते, थोडीफार अनियमितता झाली असेल तर अॅडजेस्ट करून घेतले पाहिजे, असे म्हणत एका अधिकाऱ्याने महापालिका अधिकाऱ्यांची व कंत्राटदाराची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. अन्य दोन अधिकारी मात्र कारवाईबाबत ठाम होते. त्यामुळे बैठक रागारागातच संपली, अशी माहिती सूत्रांनी दिली. तथापि, या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही. या बैठकीचा अहवाल हायकोर्टात सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता सर्व्हेत खोडा

$
0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
Tweet : @UnmeshdMT

औरंगाबाद : मालमत्ता सर्वेक्षणासाठी पात्र ठरलेल्या टेंडरमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न अपात्र ठरलेल्या कंपन्यांच्या शिलेदारांकडून केला जात आहे. त्यामुळे वाटाघाटीनंतरही महापालिकेच्या प्रशासनावर पात्र टेंडर रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. परिणामी मालमत्ता सर्वेक्षणाचे व कर आकारणीचे काम किमान सहा महिने पुढे ढकलले जाईल, अशी शक्यता आहे.

महापालिकेने मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे आणि कर आकारणीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून नव्या मालमत्तांना कर आकारणी करावी. कर आकरणीच्या दृष्टीने फेरसर्वेक्षण झालेले नाही अशा मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे कामे खासगीकरणातून करण्यात येणार आहेत. त्यानुसार टेंडर काढण्यात आले. दोन वेळा टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले. तिसऱ्यावेळी कोलब्रो ग्रुप (नागपूर), ओस्वाल कम्प्युटर्स (इंदूर), स्टेट स्टायलिस (चेन्नई) या तीन कंपन्यांनी टेंडर भरले. तिन्ही कंपन्यांचे टेक्निकल बीड पालिकेच्या प्रशासनाने सुरुवातीला खुले केले. त्यात कोलब्रो ग्रुप आणि स्टेट स्टायलीस या दोन कंपन्यांचे टेंडर अपात्र ठरविण्यात आले. कोलब्रो ग्रुपचे टेंडर वार्षिक उलाढाल कमी असल्याने अपात्र ठरले, तर स्टेट स्टायलिस कंपनीचे टेंडर अनुभवामुळे प्रशासनाने रद्द केले. या दोन्ही कंपन्या पालिकेतील दोन बड्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मालमत्ता सर्वेक्षण आणि कर आकारणीच्या स्पर्धेत उतरल्या होत्या. छाननीत प्रशासनाने या दोन्ही कंपन्या अपात्र ठरविल्यानंतर पालिकेतील कंपनीच्या शिलेदारांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला. पात्र ठरलेल्या कंपनीला टेंडर द्यायचे असेल, तर 'वाटाघाटी'चे काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यामुळे टेंडर पात्र ठरल्यानंतरही पुढील प्रक्रियेत खोडा घातला जाऊ लागल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. टेंडरप्रमाणे मालमत्तांचे सर्वेक्षण व कर आकारणीचे काम 'जीपीएस'नुसार केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मालमत्तेला युनिक आयडी क्रमांक मिळणार आहे. या क्रमांकामुळे मालमत्तेचे विवरण एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे. मालमत्ता कर आकारणीच्या मास्टर फाइलला मालमत्तेची सॅटेलाइट इमेज लावली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मालमत्तेला किती कर लागला, याची त्रयस्थाकडून तपासणी करणे महापालिकेच्या यंत्रणेला सहज शक्य होणार आहे. कर आकारणीत पारदर्शकता आणणारे हे काम अपात्र ठरलेल्या कंपन्यांच्या स्थानिक शिलेदारांमुळे आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मालमत्ता कर आकारणीचे नियम तयार करण्याचे आदेश सर्वसाधारण सभेने प्रशासनाला दिले आहेत. नियम तयार करून ते पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर आणा. सर्वसाधारण सभेने त्याला मान्यता दिल्यावर टेंडर प्रकिया करा, असे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. नियमांमुळे कर आकारणीत सूसुत्रता येईल, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

- त्र्यंबक तुपे, महापौर

कर आकारणीची नियमावली तयार करेपर्यंत टेंडर प्रक्रिया रद्द करा, असे आदेश सर्वसाधारण सभेने दिले आहेत. त्यामुळे टेंडर रद्द करावे लागेल. त्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे, पण पात्र ठरलेल्या कंपनीशी वाटाघाटी करून दर निश्चित केले होते. जीपीएसची शासनाकडून परवानगी घेणे बाकी होते. सर्वसाधारण सभेचा ठराव प्रशासन पाळेल.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहर व जिल्ह्याच्या शिवसेनेत कोणत्याही प्रकारचा बदल न करण्याची भूमिका नेत्यांनी घेतल्यामुळे शिवसेनेत 'जैसे थे' स्थिती राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हकालपट्टीची भाषा करणाऱ्यांना त्यामुळे मूग गिळून गप्प रहावे लागले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दानवे यांना पदावरूनच नव्हे, तर शिवसेनेतून काढून टाका, अशी मागणी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यांना माजी आमदार अण्णासाहेब माने, ग्रामीण भागाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, माजी महापौर विकास जैन पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१३ सप्टेबर) मुंबईत शिवसेना भवनात बैठक झाली. पक्षाचे सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख दानवे, महानगरप्रमुख जैस्वाल उपस्थित होते. सुमारे दोन तास ही बैठक चालली. घोसाळकर यांनी 'मटा' ला माहिती देताना सांगितले की, 'जिल्हाप्रमुखांसंबंधीचा विषय बैठकीच्या सुरुवातील काही मिनिटांतच निकाली निघाला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेता 'जैसे थे' स्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्यातरी कोणताही बदल केला जाणार नाही. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पक्षाची काय तयारी आहे. आपण कोठे कमी पडत आहोत, याचा आढावा घेण्यात आला.

शिक्षक मतदारसंघाची मागणी

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेला मिळाला पाहिजे, या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. उद्धव ठाकरे १७ सप्टेबर रोजी विदेशातून परतणार आहेत. ते आल्यानंतर त्यांच्याकडे याबद्दल आग्रह धरला जाईल. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याचेही घोसाळकर यांनी सांगितले. या मतदारसंघाच भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुलंब्रीच्या सभापतींवर अविश्वास मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
पंचायत समिती सभापती माधुरी गाडेकर यांच्यावरील अविश्वास ठराव बुधवारी ७ विरुद्ध १ मताने मंजूर करण्यात आला. हा अविश्वास प्रस्ताव २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला होता. त्यावर मतदान घेण्यासाठी बुधवारी घेण्यात विशष सभा घेण्यात आली.
पायउतार झालेल्या सभापती माधुरी गाडेकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या. या पंचायत समितीमध्ये आठपैकी प्रत्येकी तीन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे असून दोन सदस्य शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सुद्धा गाडेकर यांच्यावर विश्वास दाखवला नाही. सर्व सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, जनतेची विकास कामे न करणे, सदस्यांनी सुचविलेले घरकुल, विहिरी व इतर कामे मुद्दाम टाळणे, मासिक बैठकीला गैरहजर राहणे आदी आरोप अविश्वास ठरावात करण्यात आले होते. उपसभापती किशोर बलांडे, डॉ. सारंग गाडेकर, रऊफ कुरेशी, सुनिता जाधव, सुनिता भागवत व सरोजा काळे, मोहन सोनवणे या सात सदस्यांनी गाडेकर यांच्या विरोधात मतदान केले.
विधानसभा निवडणुकीत डॉ. कल्याण काळे यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी मतदारसंघावर पकड घेत शिवसेनाला जवळ केले आहे. सर्व निवडणुकीत हरिभाऊ बागडे व अनुराधा चव्हाण यांना यश मिळू दिलेले नाही.

शिवसेनेला संधी
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकारणात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नितीन देशमुख गट असे समिकरण तयार झाले आहे. शिवसेना आपल्या बाजूने राहावी यासाठी माधुरी गाडेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून शिवसेनेच्या सरोजा राजेंद्र काळे यांना सभापतिपदी बसवणार असल्याची चर्चा आहे. आठ पैकी चार महिला सदस्या असून सभापतिपद ओबीसी महिला राखीव आहे. माधुरी गाडेकर व सरोजा काळे ह्या दोघीच ओबीसी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात गावकऱ्यांनी केली पाइप दुरुस्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
विहिरीत पाणी असूनही केवळ महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या सातारा येथील ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन बुधवारी पाइपलाइन दुरुस्ती करून घेतली. यामुळे २४० घरांचा सहा महिन्यांपासूनचा प्रश्न सुटला आहे.
सातारा येथे ग्रामपंचायतीच्या काळात नळयोजना करण्यात आली आहे. या योजनेतून ४० गल्ल्यांमधील १०३८ घरांना पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असताना गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सहा महिन्यांपूर्वी पाइपलाइन फुटल्यामुळे खंडोबा मंदिर परिसर, गणपती बाग, शंकरनगर, भीमशक्तीनगर, शेख गल्ली, पटेल गल्ली आदी भागातील २४० घरांचा पाणीपुरवठा थांबला होता.
या प्रकाराची माहिती दिल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. पण, पाइपलाइन दुरुस्तीचे काम केले नाही. सतत सहा महिने पाठपुरावा करूनही दुरुस्ती होत नसल्याने भरपूर पाणी असताना २४० घरांतील नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागत होते. माजी सरपंच फिरोज पटेल यांनी पुढाकार घेऊन पाइपलाइन दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. बुधवारी काम झाल्यानंतर गावातील या भागाला सहा महिन्यानंतर पाणी मिळाले. या कामासाठी सोमीनाथ शिराणे, रंगनाथ नरवडे, बंडू पारखे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात अतिवृष्टी झाली.

सर्वाधिक पाऊस वसमत तालुक्यात

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात ९२.४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात जिल्ह्यात सरासरी १८.४८ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६६३.५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी ७४.७३ टक्के झाली आहे. सर्वाधिक पाऊस वसमत तालुक्यात झाला आहे.

बीड जिल्ह्यात १९ ‌‌मिलिमीटर.पाऊस

बीड - बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना जीवदान लाभले आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासात १९ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील धारुर तालुक्यात सर्वाधिक ५७ मिलिमीटर पाऊस झाला. पहाटे अनेक ठिकाणी सरी कोसळल्या. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिलिमीटर असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ५९ टक्के पाऊस झाला आहे. येत्या काळात अजूप पावसची प्रतीक्षा आहे.

उमरगा तालुक्यात अतिव़ृष्टी

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. उमरगा तालुक्यात अतिव़ृष्टी झाली असून एकाच दिवशी ९१ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बुधवारी दुपारपर्यंत ‌‌जिल्ह्यातील सर्व भागात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. रब्बी पिकाच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे. मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली. बुधवरी सकाळी आठ वाजेपर्यंत उमरगा तालुक्यात ९१ मिलिमीटर, लोहारा तालुक्यात ५३ मिलिमीटर, तुळजापूर तालुक्यात ३१ मिलिमीटर, उस्मानाबाद तालुक्यात २२ मिलिमीटर, भूम १०, कळंब ८, वाशी ११ तर परंडा तालुक्यात ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी दुपारी आठनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६७ मिलिमीटर असून आतापर्यंत ४३५ मिलिमीटर म्हणजे ५६.८१ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा सर्वाधिक फायदा तुरीला

लातूर - तब्बल एक महिन्यानंतर मंगळवारी झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयबीनची उशीरा पेरणी केली आहे. त्यांनाही या पावसाचा फायदा होणार आहे.

मंगळवारी जिल्ह्यात दिवसभर पावसाच्या सरी येत होत्या. संध्याकाळपासून मात्र, रात्रभर भीज पाऊस झाल्यामुळे एकाच दिवशी पुन्हा एकदा जिल्ह्यात सरासरी ६७ मिलिमिटर पाऊस झाला. या पावसाचा फायदा महिनाभरात कमी झालेले पाणी होत ते पुन्हा पुर्ववत वाढण्यासाठी होत आहे. खुलगापूर बॅरेजमध्ये सात सेंटिमिटरने पाणी कमी झाले होते. ते पाणी पुन्हा वाढले असल्याची माहिती देऊन उपअभियंता प्रकाश फंड म्हणाले, 'डोंगरगाव बॅरेज यावेळी पूर्ण क्षमतेने भरले आहे. ज्या भागात दमदार पाऊस झाला. त्याच भागात पाणी साठले आहे. मांजरा धरणाच्या लाभक्षेत्र परिसरात अवघा एक इंच पाऊस झाल्यामुळे मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात मात्र वाढ झालेली नाही.

जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बी. एस. रणदिवे म्हणाले, 'सोयाबीनचे नुकसान हे सरसकट झालेले नाही. काही गावे आणि काही मंडळात ते झाले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उशीरा पेरणी केली होती. त्यांच्यासाठी सुध्दा हा पाऊस महत्वाचा आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे. या पावसाचा परिणाम हा जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास होणार आहे. त्याच बरोबर ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या रब्बीच्या पेरणीसाठी सुद्धा हा पाऊस अत्यंत उपकारक ठरणारा आहे.

बुधवारी सकाळी दहानंतर पाऊस थांबला असला तरी जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझीम, हलक्या सरी येऊन गेल्या आहेत. पुढील ४८ तासात लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिला असून नागरिकांना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना जिल्ह्यातील गणेश विसर्जनासाठी जालना पोलिस दल सज्ज झाले आहे. एसआरपीच्या कंपनीसह सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण एक हजार ७२३ गणेश मंडळाने गणेशमुर्तिची स्थापना केली असून ३९५ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरुवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी जालना पोलिस दल सज्ज झाले असून एसआरपीच्या कंपनीसह सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्ताला तैनात राहणार आहेत. ज्यामधे पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, आठ उपअधीक्षक, १५ पोलिस निरीक्षक, २५ सहाय्यक निरीक्षक, ३८ फौजदार, महिला व पुरुष पोलिस शिपाई, गृहरक्षक दलाचे जवानाचा समावेश राहणार आहे.
जालना, भोकरदन आणि परतूर येथे राज्य राखीव पोलिस दलाचे बदनापूर आणि अंबड येथे दंगा नियंत्रण पथक तैनात केले जाणार आहे. महिला सुरक्षा आणि छेडछाडीवर आळा घालण्यासाठी दामिनी पथक गस्त घालणार आहे. या व्यतिरीक्त ठिकठिकाणी फिक्स पॉइंट, पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि विशेष कृती दल साध्या वेशात नजर ठेऊन असणार आहेत.
दीड हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पोलिस विभागाकडूंन गणेशोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. आतापर्यंत ९८ जणांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. पाच जनांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दीड हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गणेशोत्सव काळात दारुबंदीचे ७९ तर जुगाराच्या १९ कारवाया करण्यात आल्या. दारुबंदीसाठी विशेष सहा पथके तयार करण्यात आले आहेत.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाचे आदेश आणि ध्वनी प्रदूषण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. मी स्वतः मिरवणुकीत फेरफटका मारनार असून नागरिकांनी ही दक्ष राहून पोलिसांना सहकार्य करावे.
ज्योतिप्रिया सिंग, पोलिस अधीक्षक, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेस्टिव्हलच्या निमित्ताने जालनेकर मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
जालना गणेश फेस्टिव्हलच्या निमित्ताने यंदा एकाहून एक सरस अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रारंभापासून ते शेवटपर्यंत जालनेकरांनी फेस्टिव्हलच्या सर्वच कार्यक्रमांना भरभरून दाद दिली. या निमित्ताने रसिक मंत्रमुग्ध झाले.
फेस्टिव्हलच्या कार्यक्रमांना सहा सप्टेंबरपासून भूमिपूत्र राजकुमार तांगडे लिखीत सुप्रसिद्ध नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या कार्यक्रमाने सुरुवात झाली. त्यानंतर सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम पार पडला. या दोन्ही कार्यक्रमांनी स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. रेकॉर्ड ब्रेक असे हे कार्यक्रम ठरले. त्यानंतर आठ सप्टेंबर रोजी सप्तखंजेरी वादक तथा राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रमही जालनेकरांच्या काळजाचा ठाव घेऊन गेला. अंधश्रद्धेवर प्रहार करत, शिक्षण, स्वच्छता, व्यसन, पाणी आणि शेतकरी अशा विविध विषयांना स्पर्श करत त्यांनी युवा पिढीला सैराट न होण्याचा सल्लाही दिला.
नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णीचा कायापालट करून राज्याला शोषखड्ड्याची महती पटवून देणारे इंजिनिअर भाऊराव पाटील यांचा मॅजिक पीट हा कार्यक्रमही प्रेक्षकांना प्रेरणादायी ठरला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री लोणीकर यांच्यासह ग्रामीण विकासाचा कणा समजण्यात येणाऱ्या ग्रामसेवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
त्यानंतर रात्री सुप्रसिद्ध आणि ख्यातनाम कविंचे संमेलन आणि गजल गायनाचा कार्यक्रमाने श्रोत्यांना तब्बल तीन तास खिळवून ठेवले. दहा सप्टेंबर रोजी सप्तसूर संगित रजनी सारेगमपा महाविजेते रोहित राऊत, जुईली जोगळेकर, कार्तिक गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांचा बहारदार गितांचा कार्यक्रम झाला. त्यांनी गायिलेल्या अनेक गितांना वन्समोर मिळतांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवडा गात कलावंतांनीही शाब्बासकीची थाप मिळवली.
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राचे चंद्रकांतदादा मोरे यांचे बाल संस्कार, आरोग्य आणि कृषी विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला. यावेळी स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकऱ्यांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. ११ सप्टेंबर रोजी उदय साटम यांचा रंगमराठी ढंग मराठी हा महाराष्ट्र साहित्य संस्कृती आणि परंपरा यावर आधरित कार्यक्रम झाला. १२ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातनाम गायिका गितांजली रॉय अरोरा यांचा भक्तीगीत व गझल गायनाचा बहारदार कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. दीड तास चालणाऱ्या या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा एकट्या गितांजली अरोरा यांनी एकहाती कायम ठेवत तब्बल अडीच अखंडपणे गायन केले.
सुप्रसिद्ध दिग्ददर्शक केदार शिंदे आणि मराठी ख्यातनाम अभिनेता भरत जाधव यांचा चौरंगी भूमिकेतील 'सही रे सही' हे नाटकही प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. या कार्यक्रमानेही संपूर्ण क्रीडा संकुल खचाखच भरले होते. तर शेवटी समारोपाला सुप्रसिद्ध गायक स्वरुप भालवणकर यांचा गायनाचा बहारदार कार्यक्रमही हाऊसफुल्ल झाला.
प्रत्येक कार्यक्रम यशस्वी ठरावा, रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा, उपस्थित प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अध्यक्ष राजेश राऊत आणि त्यांचे सहकारी तथा कार्यकारिणीतील पदाधिकारी घेतांना दिसून आले. सर्वच कार्यक्रमांना रसिकांनी अत्यंत भरभरुन प्रतिसाद दिला.

अनंत चतुर्थीनिमित्त आज महाप्रसाद
अनंत चतुर्थी दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दिवशी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह गणेश भक्तांसाठी जुना जालना भागातील शनिमंदिर चौकात माजी नगरसेवक संताजी वाघमारे, राजेंद्र गोरे, शंकर लुंगे, बाळासाहेब देशमुख आणि कृष्णा पळसखेडकर, रमेश महाराज ढोले यांच्यावतीने दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जालना गणेश फेस्टिव्हलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images