Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ट्रॅव्हल्सखाली चिरडून दुचाकीस्वार तरुण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने चिरडल्यामुळे मोपेडवरील १८ वर्षांचा विद्यार्थी जागीच ठार झाला. मुकुंद सदाशिव टाक, असे या तरुणाचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी सात वाजता रोपळेकर हॉस्पिटल चौक ते दर्गा चौकाच्या दरम्यानच्या वरद हॉस्पिटलसमोर झाला.
मुकुंद उर्फ मधुसूदन सदाशिव टाक हा शिवशंकर कॉलनी येथील रहिवासी आहे. तो गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता फिरायला जातो, असे सांगून अॅक्टिव्हा मोपेडवरून घराबाहेर पडला. यावेळी वरद हॉस्पिटलसमोर त्याला सागर ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिली. या अपघातात चाकाखाली आल्याने मुकुंद जागीच ठार झाला. हा अपघात होताच परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर व वाहतूक शाखेचे अविनाश आघाव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मुकुंदला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे तपासून मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी ही बस जप्त केली आहे. मुकुंदची बहिण दीपा टाक यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्सचालक मोहम्मद जलील मोहम्मद पाशुमिया याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.

तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू
मुकुंद हा घरातील सर्वात लहान होता. त्याला तीन मोठ्या बहिणी असून दोन बहिणींचे लग्न झाले आहे. त्याच्या वडिलांचा तीन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. अवघ्या तीन महिन्यात मुलाचा देखील मृत्यू झाल्याने शिवशंकर कॉलनीत हळहळ व्यक्त झाली.

जेसीबीने काढला मृतदेह
विद्यार्थ्याचा मृतदेह ट्रॅव्हल्स बसच्या चाकाखाली अडकला होता. बसचे वजन जास्त असल्याने मृतदेह काढणे शक्य नव्हते. त्याचवेळी जवळच एका जेसीबीद्वारे काम सुरू होते. पोलिसांनी हा जेसीबी मागवून बसचा समोरील भाग उचलून मृतदेह बाहेर काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदनियुक्ती रखडली; भाजपमध्ये धुसफूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
बजाजनगर मंडळातील भाजप पदाधिकारी निवड गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. त्यामुळे पद निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असून कार्यकर्तांमध्ये असंतोष वाढत आहे. पदांसाठी कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस सूरू आहे.
बजाजनगर हा शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भाग समजला जातो. बजाजनगर मंडळ हे भाजप-शिवसेनेचा मोठा मतदार असलेला भाग आहे. पण, विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यातील आकडेवारीनुसार या भागात भाजपला पक्षवाढीसाठी वाव असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या परिसरातील शिवसेनचे जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडीया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना जिल्हा शहरउपाध्यक्षपद देण्यात आले आहे. चोरडिया यांना पद दिल्यामुळे बजाजनगर मंडळात भाजपच्या मतदारांत वाढ होईल, असा पक्षाचा अंदाज होता. पण, वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकीत एकाकी पडल्याने भाजप पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांपैकी फक्त एकाचा विजय झाला.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गट व गणाची फेररचना झाल्याने अनेकांना डावपेच बदलावे लागत आहेत. प्रत्येकाचा हक्काचा मतदार तुटल्याने मतदानाचे गणित कसे जुळविणार यावर विचार मंथन सुरू आहे. मात्र, त्यातही नव्याने आरक्षण पडणार आहे. या परिस्थितीत पक्षातील कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार निवडणूक तयारीला लागले आहेत. या स्थितीत भाजपमध्ये पद निवडीचे घोडे अडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

भाजप मंडळ अध्यक्षाची निवड यापूर्वी करण्यात आली आहे. उर्वरित काही पदांची नियुक्ती येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे.
-किशनचंद तनवाणी, शहर जिल्हाध्यक्ष भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंधारणाने पाणी प्रश्न मिटला

$
0
0


अरुण समुद्रे, लातूर 
गेल्या तीन महिन्यांपूर्वी जलमुक्त लातूर म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख होती. ती निसर्गाच्या कृपेने आता जलयुक्त लातूर अशी होऊ लागली आहे. उदगीर सारख्या मोठ्या शहरापासून ते सताळ्यासारख्या दहा वर्ष टँकरने पाणी आणलेल्या गावापर्यंत आता लोकसहभागातील जलसंधारणाच्या कामामुळे मुबलक असा पाणीसाठा झाला आहे.
उदगीर तालुक्यातील सताळा या गावालगत असलेल्या नाल्याचे रुपांतर चक्क नदीसमान करण्यात आले आहे. चार किलोमीटर अंतराच्या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण लोकसहभागातून करण्यात आले आहे. या कामाला आमदार सुधाकर भालेराव यांनी पाच लाखाचा निधी दिला. सताळ्यातील रामचंद्र तिरुके यांनी तेराव्या वित्त आयोगातून सहा लाख रुपयांचा निधी दिला. गावकऱ्यांनी पाचशे रुपयापासून ते ४० हजार रुपयापर्यंतचा निधी दिला आहे. या नाल्यात साठलेल्या पाण्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे. परंतु आज परिसरातील किमाना पाच किलोमीटर अंतरातील शेतीतील विहिरी, बोअरवेल्सचे पाणी वाढले असल्यामुळे शेतकरी आनंदून गेला आहे. मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात पावासाने ताण दिला होता. त्यावेळी या नाल्यातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांनी सोयाबीन जगविण्यासाठी सुद्धा केला.
गावात पाणी मुबलक झाले असले तरी गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठीची यंत्रणा प्रत्येक गावी सरकारने दिली तर अनेक आजारापासून ग्रामीण भागातील नागरिकांची सुटका होऊ शकते, असे मत जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केले.
उदगीर हा आंध्र आणि कर्नाटकाच्या सिमेवर असलेला तालुका आहे. या ठिकाणी गेल्या उन्हाळ्यात टँकरचा भरमसाठ वापर केला गेला. उदगीर पालिकेच्या मालकीचा असलेल्या बनशेळकी तलाव आटला होता. या तलावातील गाळ काढण्याची प्रेरणा लातूरच्या जलयुक्त समितीकडून घेऊन मनोज पुदाले यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र मलगे, डॉ. संजय कुलकर्णी, नितीन भंडे, शंकर मुक्कावार, उत्तम मोरे, मोतीलाल डोईजोडे, सतीश धोंगडे, रवींद्र हसरगुंडे, मनोज धावडे, मनोज कोटलवार, संजय जाधव, श्रीपाद सीमांतकार, या मित्रांनी एकत्र येऊन जलसंचयनी अभियान राबवले. त्यासोबतच तलावातील गाळ काढला. आता हा तलाव भरून वाहत आहे. अत्यंत विहंगम असे दृश्य आहे. हे पाणी पाहण्यासाठी आणि सांडव्यावरून वाहत जाणारे पाणी पाहण्यासाठी शेकडो लोक दररोज बनशेळकी तलावावर येत आहेत.

बेशरमाचे निर्मूलन
६२ लाख ८० हजार रुपयांचा लोकवाटा जमा करून ४५ एकरवरील बेशरमाचे निर्मूलन केले. तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. आज साठलेले १४७ एकरवरील तलावातील पाणी उदगीरकरांना किमान दोन वर्ष पुरेल एवढे असल्याची माहिती जलसंचयनी अभियानाचे सदस्य डॉ. संजय कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ बैठकीमुळे रस्ते, चौक सजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते, चौकांचे सुशोभीकरण करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले. शहरात पुढील चार दिवस स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. रस्ते, दुभाजक, झेब्रा क्रॉसिंगची रंगरंगोटी करण्याच्या सूचना कत सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाच्या माहितीसह सतर्क रहावे असे निर्देश त्यांनी दिले.
शहरात येत्या ४ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या निमित्ताने आयुक्तांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीला महापालिकेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. शुक्रवारपासून सलग चार दिवस राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेशोत्सवानिमित्त बहुतेक रस्त्यांवर पॅचवर्क करण्यात आले आहे. ज्या रस्त्यावर काम झालेले नाही त्यापैकी महत्त्वाच्या रस्त्यांचा आढावा घेऊन पॅचवर्कचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. बकोरिया यांनी विविध अधिकाऱ्यांवर कामांची जबाबदारी वाटून दिली आहे. ते स्वतः विविध कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना दररोज कामाची माहिती द्यावी लागणार आहे. रस्ते, वीज, स्वच्छता, रंगरंगोटी या सुविधांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

ही कामे होणार
-विमानतळापासून सुभेदारी विश्रामगृहापर्यंत रस्त्याची स्वच्छता
-शहरातील प्रमुख चौक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण
-प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंगची आखणी, ठळकपणे रंगरंगोटी
-रस्ते, दुभाजक, चौक, सुभेदारी विश्रामगृह व विभागीय आयुक्तालयाचा परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष

५० लाखांचा खर्च
पालिकेतर्फे रस्त्यांची डागडुजी, साफसफाई नियमित केली जाते. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने हे काम अधिक प्रभावीपणे करावे लागणार आहे. रंगरंगोटीचे कामही करावे लागणार आहे, त्यामुळे किमान ५० लाख रुपयांचा तातडीचा खर्च करावा लागेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंजूरपूरा टीडीआर;गुन्हे दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मंजूरपुरा टीडीआर प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. टीडीआर दिलेला नसला तरी अधिकाऱ्यांनी तो मंजूर केला आहे आणि ही बाब गंभीर आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विकास एडके यांनी मंजुरपूरा येथील सिटीसर्व्हे क्रमांक ७६६१ वरील मालमत्तेला टीडीआर देण्याचे प्रकरण उपस्थित केले होते. ज्या मालमत्तेला टीडीआर देण्याची कार्यवाही करण्यात आली, त्याच मालमत्तेला १९९७ मध्ये सुमारे आठ लाख रुपयांचा मोबदला महापालिकेने दिला आहे. मोबदला दिलेला असताना पुन्हा त्याच मालमत्तेला टीडीआर देण्याचा घाट घातला जात आहे, या संदर्भात अधिकाऱ्यांनी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली होती. पण, नगररचना विभागाचे सक्षम अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने खुलासा झाला नाही. त्यामुळे एडके यांनी आयुक्तांकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
मोबदला देण्यात आलेल्या त्या मालमत्तेचा टीडीआर मालमत्ताधारकाला अद्याप देण्यात आलेला नसला तरी टीडीआर देण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली होती. वृत्तपत्रात जाहीर प्रगटन देऊन टीडीआर देण्याची इच्छाही प्रदर्शित केली होती. आक्षेपांकडे दुर्लक्ष करून टीडीआर देण्याची तयारीही केली होती. टीडीआरचे प्रमाणपत्रही तयार केले होते. पण, या सर्व बाबींचा भांडाफोड झाल्यामुळे प्रशासनाने टीडीआर प्रमाणपत्र त्या मालमत्ताधारकाला दिले नाही. मालमत्ताधारकाला प्रमाणपत्र दिले नाही याचा अर्थ अधिकाऱ्यांनी काहीच चूक केली नाही, असे होत नाही. टीडीआर देण्याच्या दृष्टीने केलेली तयारी व घेतलेली मंजुरी या बाबी आक्षेपार्ह असून गुन्हेगारी स्वरुपाचे हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एडके यांनी केली आहे.

‘मटा’ ने वाचा फोडली
मंजूरपुरा सीटीएस क्रमांक ७६६१ वरील मालमत्तेला टीडीआर देण्याच्या प्रकरणाला ‘मटा’ ने वाचा फोडली. मोबदला दिल्यावरही त्याच मालमत्तेला टीडीआर देण्याचा घाट घातला जात असल्याचे उघड केले. त्यामुळे तयार झालेले टीडीआर प्रमाणपत्र नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ताधारकाला दिले नाही. मोबदला दिला असेल, तर टीडीआर नको, अशी भूमिका नंतर मालमत्ताधारकाने स्पष्ट केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेल्डिंग करताना बोअरच्या ट्रकला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
शहरानजिक असलेल्या दीपक पेट्रोल पंपापासून हाकेच्या अंतरावर उभा असलेल्या बोअरच्या ट्रकला (ए. पी. २९, ४५९९) वेल्डिंग करत असताना डिझेल टाकीचा स्फोट होऊन अचानक लागलेल्या आगीत ट्रक भस्मसात झाला.
या आगीत ट्रकजवळील कारागीर सोमराज मुंडा (वय३०), जगन बुधनाथ भंडाईत (वय२३, दोघेही रा. झारखंड) व लक्ष्मण बारकू मुरकुंडे (वय ३५, रा. नावडी) या घटनेत होरपळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. जवळच असलेले व्यवसायिक व घटनास्थळापासूनच जवळ असलेल्या बारामती अॅग्रो, नगरपालिजकेच्या बंबने आग आटोक्यात आणून मोठी दुर्घटना टाळली. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. जखमींना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. घटनास्थळी पोहेकॉ कैलास निंभोरकर, कैलास करवंदे, गणेश चेळेकर, अंकुश सरोदे, प्रवीण बरडे, युसूफ शेख यांनी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आगीवर वेळेतच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेचा पुढील तपास कन्नड शहर पोलीस करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅट्रॉसिटीग्रस्तांना शिवसेनेची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या सर्वांना शिवसेना न्यायालयीन लढाईसाठी मदत करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमु्ख अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबद्दल जनजागृती करणार असल्याचे ते म्हणाले.
खुलताबाद तालुक्यात एका वर्षात अॅट्रॉसिटीचे २२ गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तिंना दानवे यांनी पत्रकार परिषदेत पाचारण केले होते. यावेळी महापालिका सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात उपस्थित होते. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले आकाश हिवर्डे, साईनाथ मातकर, दत्तू मालोदे यांनी त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग पत्रकारांना सांगितला. वैयक्तिक हेव्या-दाव्यातून, राजकीय वैमनस्यातून गुन्हे दाखल करण्यात आले, पोलिसांनी देखील शहानिशा न करता अटक केली, हर्सूल तुरूंगात आठ-आठ दिवस डांबून ठेवले. या प्रकारामुळे नोकरीच्या संधी हुकल्या, असे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक अटी रद्द झाल्या पाहिजेत, या कायद्यात सुधारणा झाली पाहिजे, अशी भावना या तिघांनी व्यक्त केली.
‘मराठा क्रांती मोर्चात सर्व समाज उतरला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल झाला पाहिजे, अशी सर्वांची मागणी आहे. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कायद्यात ढवळाढवळ करू नये, असे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करणाऱ्याला शासन आठ लाख रुपयांची मदत करते. गुन्हा सिद्ध न झाल्यास संबंधितांकडून आठ लाख रुपये वसूल केले पाहिजेत,’ अशी मागणी दानवे यांनी केली. एखाद्या जातीचे संरक्षण करणारा कायदा दुसऱ्या जातीला त्रासदायक ठरत असेल, तर त्या कायद्यात सुधारणा केली पाहिजे, असे जंजाळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात खासदार विरुद्ध दोन आमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कंत्राटी कामगारांना विद्यापीठ सेवेत १० ऑक्‍टोबरपर्यंत कायम करा, अन्यथा पोलिसात तक्रार नोंदविण्याचा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला असताना, आमदार अतुल सावे आणि आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी गुरुवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली. नियमानुसारच कार्यवाही करा, राज्यशासनाला रितसर प्रस्ताव पाठवा, शासनाच्या आदेशानुसारच प्रक्रिया राबवावी, असे आमदारांनी स्पष्ट केले. यामुळे खासदार विरूद्ध दोन आमदार, असे चित्र विद्यापीठ आखाड्यात निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाला राजकीय वळण लागले आहे. ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांनी उपोषण केले, २४ ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत खासदार खैरे यांनी कुलगुरूंची भेट घेत, या कर्मचाऱ्यांना कायम करा, किमान वेतन कायद्यानुसार वेतन करा अशी मागणी केली. महिनाभरात ही प्रक्रिया करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहाडसिंगपुरा-बेगमपुरा वॉर्डातील पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खासदार आल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. महिनाभरानंतर विद्यापीठाने या प्रश्नावर प्रक्रिया न केल्याने २७ सप्टेंबर रोजी खासदार खैरे यांनी कुलगुरू डॉ. चोपडे याची भेट घेतली. त्यावेळी भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी, कामगार आयुक्त, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. १० ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाने कार्यवाही करावी, अन्यथा पोलिसात तक्रार नोंदविण्याचा इशारा देण्यात आला. त्याच्या दोन दिवसानंतर गुरुवारी अधिसभा सदस्य भाजप आमदार अतुल सावे व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेतली. कुलगुरूंच्या दालनात झालेल्या या बैठकीत खासदारांना दिलेले आश्वासन, पोलिसात जाण्याचा दिलेला इशारा यावर तासभर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाने कायदेशीर बाजू तपासूनच निर्णय घ्यावा, काहीतरी करण्याच्या नादात प्रशासन अडचणीत येऊ शकते, असे आमदारांनी बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही आमदारांना कुलगुरू डॉ. चोपडे यांनी या प्रश्नावर चर्चेसाठी बोलावून घेतले होते, असेही सूत्रांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर विद्यापीठाच्या आखाड्यात खासदारांविरोधात दोन आमदार, असे चित्र निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे.

४९३ कंत्राटी कर्मचारी, २१७ पदे रिक्त
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये ४९३ कंत्राटी कामगार काम करत आहेत. कुशल आणि अकुशल अशी त्यांची विभागणी करण्यात येते. अनेक वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटीपदावर काम करत आहेत. कायम करावे यामागणीसाठी वारंवाद आंदोलन केले. प्रशासनाकडून वेगवेगळी आश्वासनही देण्यात आले. आजघडीला विद्यापीठात २१७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्याच्या भरतीची प्रक्रियाही रखडलेली आहे.

विद्यापीठाने कायदेशीर बाजू तपासूनच काय तो निर्णय घ्यावा. सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रक्रियेबाबत राज्यपाल, राज्यशासन यांच्याकडे रितसर प्रस्ताव पाठवावा. त्यांचे म्हणणे, कायदेतज्‍ज्ञांचे मत विचारात घेऊन प्रशासनाने पुढील निर्णय घ्यावा, असे आम्ही कुलगुरूंना सांगितले. अन्यथा प्रशासनालाच ते अडचणीचे ठरू शकते. खासदार चंद्रकांत खैरे यांनाही याबाबत आम्ही बोलणार आहोत.
-अतुल सावे, आमदार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सफारी पार्कचे जेसीबी जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
मिटमिटा परिसरातील नियोजित सफारी पार्कच्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी आणलेले चार जेसीबी जाळून टाकण्याचा प्रयत्न गुरुवारी करण्यात आला. मंडळाधिकारी वेळेवर घटनास्थळी पोहोचल्यामुळे त्यांनी अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. अन्यथा दुर्गम ठिकाणी थांबलेले हे जेसीबी जळून खाक झाले असते.
मिटमिटा परिसरात महापालिकेतर्फे सफारी पार्क तयार करण्यात येणार आहे. याच्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग असे लिहलेले १५ दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. या जेसीबीली आग लागल्याची माहिती मंडल अधिकारी यांना दुपारी सव्वा वाजता मिळाली. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन महापालिका अधिकारी व अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने येथे धाव घेऊन ही आग वेळीच आटोक्यात आणली. बॅटरी किंवा डिझेल चोरी करताना आग लागली असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ही माहिती समजल्यानंतर घटनास्थळी महापौर त्र्यंबक तुपे, कार्यकारी आभियंता हेमंत कोल्हे, तहसीलदार रमेश मुनलोड, मंडल अधिकारी गणेश देवकाते, तलाठी पुनमसिंग डोंगरजाळ यांनी पाहणी केली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. 

अधिकाऱ्यांत कलगीतुरा
मंडल अधिकारी यांनी घटनास्थळावरून आगीची माहिती मनपा अधिकाऱ्यांना दिली तेव्हा मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीत असल्याचे सांगून घटनास्थळावर येण्यास टाळाटाळ करण्यात आली. या मशीन जलसंपदा विभागाकडून परवा महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आल्या, असा कलगीतुरा प्रत्यक्ष घटनास्थळी रंगला होता. चारही मशीन जळून खाक झाल्या असत्या तर त्याची जबाबदारी कोणाची यावरूनही मनपा व महसूल अधिकाऱ्यांमध्ये जुंपली होती. पालकमंत्री रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे यांनी बुधवारी सफारी पार्क जमीन सपाटीकरणाची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला. पण, या मशीन विनासंरक्षण आडरानात उभ्या करून ठेवल्याबद्दल सुद्धा नागरिकांमधून टीका होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा बास्केटबॉलपटूंची राज्य संघात निवड

$
0
0

सहा बास्केटबॉलपटूंची राज्य संघात निवड
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ऋषिकेश दरक, तन्वीरसिंग दारोगा, खुशी डोंगरे, विपुल कड, सिद्धांत बियाणी, पार्थ नांगरे या सहा खेळाडूंची राज्य संघात निवड करण्यात आली आहे.
अमरावती येथे राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा झाली. १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षांखालील गटांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेतून औरंगाबादच्या सहा खेळाडूंची राज्य संघात निवड झाली. या खेळाडूंना संदीप ढंगारे, गजानन दीक्षित, विश्वास कड यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल अॅड. संजय डोंगरे, गणेश कड, मनजितसिंग दारोगा, महेश भागवत, ज्ञानेश्वर जगताप, जयंत हातोळकर, प्रशांत बुरांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीत दलितांचा मोर्चा

$
0
0


परभणी – अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) कडक करण्यासाठी गुरुवारी लातूरपाठोपाठ परभणीत दलित संघटनांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरून या मोर्चास सुरूवात झाली. उड्डाणपूल, बसस्थानकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीच्या घटनेला १० वर्ष पूर्ण होऊनही देशात जातीयवादी व्यवस्था वाढली आहे. अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती यांच्यावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व अन्याय थांबविण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा कडक करणे गरजेचे आहे. अॅट्रॉसिटी कायद्यातील साक्षीदाराच्या जाचक अटी वगळण्यात याव्यात, या कायद्यातील आरोपींना न्यायालयातून अटकपूर्व जामीन देण्याची प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्यातील प्रकरणे उच्च न्यायालयात व जलद गती न्यायालयात चालविण्यात यावेत, या कायद्यातंर्गत अत्याचार पिढीताना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत गुन्हा दाखल झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत ३० टक्के मिळावी, अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत शिक्षा झालेल्या आरोपीला पॅरोलची सुविधा रद्द करण्यात यावी, तसेच कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

दरम्यान, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मैदानावर मोर्चातील प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने दलित बांधव सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठासाठी बस सुरू करा

$
0
0

विद्यापीठासाठी सीटीबस सुरू करा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाता यावे यासाठी सीटीबस सुरू करा, अशी मागणी करीत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने एसटीचे विभागीय नियंत्रक कार्यालयावर धरणे आंदोलन केले. या आंदोलनानंतर आगामी आठ दिवसांत विद्यापीठात जाण्यासाठी विशेष बस देण्याची मागणी विभागीय वाहतूक अधिकारी एस. एस. रायलवार यांनी तत्त्वतः मान्य केली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुशील बोर्डे, राहुल तायडे आणि मयुर सोनवणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने वारंवार विद्यापीठ ते औरंगपुरा, विद्यापीठ ते वाळूज, शिवाजीनगर ते औरंगपुरा, हर्सूल ते विद्यापीठ या मार्गावर बस सुरू करण्यात आली आहे. याची दखल घेतली न गेल्याने शुक्रवारी पुन्हा हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन येत्या आठ दिवसांत विद्यापीठासाठी बस सेवा सुरू करण्याची तयारी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी दाखविली. आठ दिवसांत ही बस सुरू झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.
या आंदोलनात रोहित चव्हाण, ऋषिकेश डाके, अक्षय जाधव, रवी गंडे, दिनेश पांडदे, अमर तारक यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरगरीबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा

$
0
0

गोरगरीबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा
खंडूजी गायकवाड यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, हे लक्षात आल्याने आपल्या हातून सेवाकार्य घडत आहे, असे प्रतिपादन अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे किर्तनकार खंडू गायकवाड यांनी केले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, कामगार नेते विजयेंद्र काबरा यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त किर्तनकार खंडू गायकवाड यांचा सत्कार सोहळा औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
स्वातंत्र सेनानी तारा लड्डा, कामगार नेते विठ्ठलराव कदम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्याच्या हस्ते काबरा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलराव कदम यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात गायकवाड यांनी पाचशेहून अधिक लोकांना व्यसनमुक्त केल्याचे सांगितले. तर संत गाडगेबाबांंच्या कार्याचा वारसा गायकवाड चालवित आहेत, अशा शब्दात कदम यांनी त्यांचा गौरव केला. जनशिक्षण संस्थेच्या संचालिका स्मिता अवलगावकर, सुरेखा कौशिके, गंगाधर थोरात, आम्रपाली पगारे, शोभा घाटगे, लता पगारे, शिवाजी गायकवाड, राजश्री शिरसाठ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथदिव्यांना सौरउर्जेचा प्रकाश

$
0
0

पथदिव्यांना सौरउर्जेचा प्रकाश
सौर उर्जेचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड करण्यात आली आहे. या स्मार्ट सिटीमध्ये सौर उर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा म्हणून शहरातील सर्व पथदिव्यांना सोलार दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहराच्या समावेशानंतर महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सोलार उर्जेच्या वापराबाबत शहरातील दहा ते बारा उर्जा तज्‍ज्ञ, महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेला उत्पन्नाच्या १० ते १५ टक्के भाग हा वीज बिलावार खर्च करावा लागत आहे, असे लक्षात आले. यात पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनेवरील वीज बिलाचा खर्च जास्त आहे. हा खर्च कमी करण्यासाठी सोलार उर्जेचा वापर पथदिव्यांसाठी करण्याबाबत बैठकीत चर्चा आली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एका नामांकित कंपनीकडून मदत घेतली जाणार आहे. या कंपनीला सौरउर्जा पॅनलच्या देखभाल दुरुस्तीसाठी अत्यंत अल्प दर द्यावे लागणार आहेत. सौरउर्जेच्या वापरामुळे महापालिकेचा वीज बिलावरील भार कमी होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे के. डी. देशमुख यांनी दिली.
याशिवाय केंद्र शासनाकडून सौरउर्जेचा वापर करण्यासाठी शहरातील पाच इमारतींची निवड करण्यात आली आहे. यात बीबी का मकबरा तसेच अन्य इमारतींचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या बैठकीनंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्याशीही चर्चा केली हो. त्यांनी पथदिव्यांना सौरउर्जेबाबतचा अहवाल सादर करून राज्य शासनाकडे पाठवून निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नेट मीटरिंगचे ग्राहक
शहरात २१ ग्राहकांनी रूफ टॉप सोलार एनर्जी सिस्टम बसविली आहे. या ग्राहकांकडे नेट मीटरिंग बसविण्यात आले आहे. ते ग्राहक स्वतः सौर उर्जेचा वापर करणा असून जास्तीची वीज महावितरणला देणार आहेत. वर्षाच्या अखेरीस हिशेब करून वीज खरेदी दरानुसार महावितरण या ग्राहकांना त्याचे पैसे ग्राहकांना दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. याशिवाय शहरातील एक उद्योजक दहा किलोव्हॅटचा सौर उर्जेचा प्रकल्प आपल्या कंपनीत उभारत असल्याची माहितीही गणेशकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा राऊंड टेबल : पारदर्शकपणे काम करा; प्रसंगी कठोर व्हा!

$
0
0


महिलांना न्याय देण्यासाठी महिलांनी सक्षमपणे राजकारणात आले पाहिजे. गुणवत्तेच्या आधारावर राजकारणात आपण आपले स्थान निर्माण केले पाहिजे. राजकारणाची भाषा आता बदलली आहे. त्यामुळे नेत्यांच्या आशीर्वादाने राजकारणात काम न करता स्वच्छ, पारदर्शकपणे प्रसंगी कठोर होत जनहितासाठी व प्रामुख्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले पाहिजे, असा सूर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने नवरात्रानिमित्त आयोजित केलेल्या ‘राऊंड टेबल’मध्ये व्यक्त करण्यात आला. या राऊंड टेबलमध्ये विविध पक्षांच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाल्या. ‘मटा’च्या या उपक्रमाचे स्वागत करून त्यांनी आपले अनुभव शेअर केले.

सभागृहात बोललेच पाहिजे
राजकारणातील सर्व महिलांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. महापालिका, जिल्हा परिषदेतील महिला लोकप्रतिनिधींनी सभागृहात बोललेच पाहिजे. त्या बोलणार नाहीत तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. सभागृहात बोलणाऱ्या महिलांनाच अधिकारी घाबरतात, पण अधिकाऱ्यांनी घाबरावे म्हणून बोलू नये. कामे होण्यासाठी राजकारणातील महिलांनी बोलले पाहिजे. महिलांना न्याय देण्यासाठी बोलले पाहिजे. माझे पती २५ वर्षांपासून शिवसेनेत काम करतात. मी संस्थाचालक आहे, मुख्याध्यापिका आहे. १८९० मतांनी मला मतदारांनी निवडून दिले व महापलिकेत पाठवले. एकदा निवडून आल्यावर विरोधकांचा विरोधक म्हणून विचार करायचा नसतो. ते देखील आपलेच नागरिक आहेत, असे समजून काम करायचे असते. मी आता त्याच पद्धतीने काम करीत आहे. माझ्या माहेरीही राजकारणाचा वारसा आहे. सासर आणि माहेरच्यांचा राजकारणातील सक्रिय सहभागाचा आता उपयोग होत आहे. महिलांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना प्रशासनाकडून काही अडचणी येतात, पण आपण खंबीरपणे उभे राहून काम करून घेण्याची भूमिका ठेवल्यास प्रशासनाचीही मानसिकता बदलते. महिलांना सहकार्य करण्याच्या निर्णयाप्रत प्रशासन येते, असा माझा अनुभव आहे.
- सीमा खरात, शिवसेना, नगरसेविका, महापालिका.

राजकारणाची भाषा बदलत आहे
राजकारणात काम करताना आपल्याला राजकीय पार्श्वभूमी असणे गरजेचे असते. ही पार्श्वभूमी नसेल, तर काम करताना अडचणी येतात. सध्या या अडचणींना तोंड देत काम करणे सुरू आहे. मी स्वतः उच्च शिक्षित आहे. त्याचा फायदा राजकारणात काम करताना होईल, असा मला विश्वास आहे. मी प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर पहिले एक-दोन महिने ब्लँक गेले. यावेळी बहुतेक नगरसेवकांची पहिलीच टर्म आहे. असे असले तरी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकाचा पक्ष पाहिला जात नाही. त्याने मांडेलल्या प्रश्नाला प्राधान्य दिले जाते. दीड वर्षाच्या काळात महापालिकेत तीन आयुक्त झाले. त्यामुळे कामे करताना थोडे अडथळे आले. वॉर्डाच्या विकासासाठी निधी मिळाला नाही, याचे दुःख आहे, पण येत्या काळात सगळे चांगले होईल असा विश्वास वाटतो. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन भांडत राहिले, तर शहराचाच तोटा आहे. त्यामुळे शहराचा विकास साधण्यासाठी या दोन्ही घटकांनी समन्वयाने काम केले पाहिजे. महिलांना राजकारणात काम करताना अडचणी येतात, पण आपले ध्येय आणि दृष्टिकोन स्पष्ट असेल, तर त्यांवर सहज मात करता येते. राजकारणाची भाषा आता बदलत आहे, उच्चशिक्षित महिला या क्षेत्रात येत आहेत. त्यामुळे नक्कीच चांगले बदल या क्षेत्रात घडतील, असा विश्वास वाटतो.- अंकिता विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस, नगरसेविका, महापालिका.

कठोर बना, स्पष्ट भूमिका घ्या
आमचे कुटुंबच राजकारणातले. वडिलांनी कॉलेज काढले. त्यात मी शिकवते. घरात सगळे काही असले, तरी मला जे काही मिळाले ते स्ट्रगल करूनच. मी राजकारणात येऊ नये, असे घरच्यांना वाटत होते, पण मी राजकारणात आले. राजकारणातील महिलांकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नाही, पण मी माझा स्वभाव कडक ठेवला आहे. आपण कसे वागतो, बोलतो यावर सगळे अवलंबून असते. आपण स्वच्छ, पारदर्शक, कडक स्वभाव ठेवून काम केले, तर सगळेजण योग्य अंतर ठेवून आपल्याशी वागतात, हे मी अनुभवले आहे. राजकारणातील महिलांनी असेच वागले पाहिजे. मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही. चांगले काम करून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मी कॉलेजमध्ये आता संचालक म्हणून काम करते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहते. राजकारणात आल्यावर माझा हा स्वभाव मी कायम ठेवला आहे. शिक्षित महिला राजकारणात आल्याच पाहिजेत. आता काम करणाऱ्यांनाच चांगले दिवस आहेत, हे राजकारणात येण्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी लक्षात घेतले पाहिजे. आपली भूमिका स्पष्ट असेल, तर काम करताना येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात.
- डॉ. अनुपमा पाथ्रीकर, जिल्हा कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस.

महिला सक्षमीकरणासाठी काम करावे
नेत्यांच्या वरदहस्तामुळे पक्ष-संघटनेत काम करण्याची काँग्रेसची परंपरा मी मोडीत काढली. राजकारणात काम करणाऱ्या महिलेचे विचार आणि काम करण्याची पद्धत स्पष्ट असली, की तिला मानसन्मान मिळतोच. राजकारणातील महिलेने स्वतः स्वच्छ, पारदर्शक वेळप्रसंगी कठोर असले पाहिजे. आज राजकारणाची भाषा बदलली आहे. राजकारणात आता महिला स्वतःच्या गुणवत्तेने काम करू लागल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजप्रबोधनासाठी महिलांनी राजकारणात काम केले पाहिजे. माझे माहेर लातूरचे. माहेरी राजकारणाचा वारसा होता, पण सासरी तसे वातावरण नव्हते. पती इंजिनीअर. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मी त्यांच्याबरोबर गारमेंटचा व्यवसाय सुरू केला. त्यातच काँग्रेसने बचत गटाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली. पती इंजिनीअर असले, त्यांचा स्वतःचा व्यवसाय असला, तरी ते समाजकारणात आहेत. त्यामुळे बचत गटाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी आल्यावर देखील आम्हा दोघांचे ट्युनिंग चांगले जमले. राजकारण माझ्या अंगात भिनलेले नाही. समाजकारणाच्या दृष्टीने मी राजकारणात आले. काम करताना आपला मार्ग आणि विचार स्पष्ट असला पाहिजे, असे मला या क्षेत्रात काम करताना वाटते.
- सरोज मसलगे, शहराध्यक्षा, काँग्रेस महिला आघाडी.

महिला सक्षम होत असल्याचे चित्र
महिला आरक्षण मिळाल्याने मी फुलंब्री येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. महिला सक्षमीकरणाबाबत मी समाधानी आहे. पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांचे वाढते वर्चस्व असून, त्यातून महिला सक्षम होऊ लागल्या आहेत, हे स्पष्ट दिसून येते. सत्ताधारी आणि जिल्हा परिषद यात समन्वयाचा अभाव आहे. प्रशासनाची भूमिका कायम असहकार्याचीच राहिली आहे, तरीही विकास कामांना आम्ही प्राधान्याने व नेटाने सुरुवात केली आहे. माझा जिल्हा परिषदेतील राजकीय प्रवास २०१२ ते २०१७पर्यंत आहे. माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात २२ गावे आहेत. तेथे कायम महिलांनाच कसा पुढाकार मिळेल, यासाठी मी दक्ष असते. त्या-त्या गावांतील सजग नागरिकांमुळे म‌हिलादेखील पुढे आल्या आहेत. माझ्या माहेरी आणि सासरी राजकीय पार्श्वभूमी असल्याने मला स्वतंत्र निर्णय घेताना काहीही अडचणी आल्या नाहीत. सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा, सिमेंट बंधारे, रस्ते याअंतर्गत जिल्हा परिषदेचे सीईओंपासून यांत्रिकी विभागापर्यंतचे सर्वच अधिकारी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे. यामुळेच मी आज स्वतंत्र निर्णय थेऊ शकते आणि सभागृहात देखील अन्यायाविरोधात वाचा फोडू शकते.
- नंदा ठोंबरे, शिवसेना, जिल्हा परिषद सदस्या, फुलंब्री
विकासाच्या कामांत महिलांचा पुढाकार

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सुमारे ६५ सदस्यांत ३५ महिला आहेत. यावरून तेथे मह‌िलांचे वर्चस्व आहे हे दिसून येते. मुळात सक्षमीकरण आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता महिलांना खूप पुढे घेऊन जात असते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाच्या कामांत महिलांनीच अधिक पुढाकार घेतला असल्याचे मी आवर्जून सांगते. राजकारण, पक्ष आणि वैयक्तिक पातळीवर महिलांना एक जाण असते. त्यातून जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकासकाम केली आहेत. मी काँग्रेसची सदस्य असले, तरी सभागृहात आजपर्यंत महिलांसाठी सर्वसमावेशक योजना कशा आणता येतील याचाच विचार केला आहे. शेती, ग्रामविकास यांसह महिलांसाठी विविध योजना मी हिरीरीने आणल्या, सक्षमीकरणासाठी २००हून अधिक मुलींना सायकली, ५०शिवण यंत्रे व ५० पीठ गिरण्या दिल्या आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून मदत केली आहे. मी स्वत: १२वीनंतर सासरी आले, पतीसह सासरच्या सर्व मंडळींनी मला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केले. सासरच्या मंडळींनी एमए, एमएडपर्यंत शिकवले. हेच माझ्यासाठी पूरक ठरले. यामुळेच मी सर्कलमधील महिलांचे सक्षमीकरण आणि शैक्षणिक धोरण यांविषयी बोलू शकते. त्यांनीही सक्षम व्हावे, यासाठी काम करू शकते. मी देवगाव रंगारी परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुला-मुलींसाठी डिजिटल शाळा सुरू केल्या आहेत. गाव पातळीवर पाणीपुरवठा योजना आणल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरला, याचे मला समाधान आहे.
- उज्ज्वला सोनवणे, काँग्रेस, जिल्हा परिषद सदस्य, देवगाव रंगारी

राजकारणाबरोबर समाजकारण
महिलांना दुर्गेचे रूप म्हटले जाते. त्यामुळे महिलांना डावलून चालणार नाही, हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. राजकीय पातळीवर काम करताना आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण लक्षात घेतली आहे. त्यातूनच मला प्रेरणा मिळाली आणि महिला आघाडीची शहर संघटक झाले. समाज आजिबात वाईट नाही, प्रवृत्ती वाईट असते. मला दहावीनंतर माझ्या पतींनी आणि सासरच्या मंडळीनी शिकविले. मी बीएस्सी झाले. शिवाजीनगरसारख्या मध्यमवर्गीय वॉर्डात पक्षाचे काम करताना समाजहित आणि वॉर्डाचे हित लक्षात घेतले. प्रसंगी माझ्यावर अन्यायही झाला असेल, पण मी शिवसेना सोडली नाही. सातत्याने समाजासाठी काम करत राहिले. पतीने व्यक्त केलेला विश्वास, सचोटी आणि कायम दिलेली साथ, यामुळे मी काम करतेय. स्वामी समर्थ केंद्र, स्वच्छता मोहीम, महिला बचत गटाचे काम यांचा सातत्याने फॉलोअप असतो. त्यातून मला समाजात स्थान मिळाले. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी माझी दखल घेतली आहे. स्थानिक पातळीवरही माझ्या कामातून मी मला सिद्ध केले आहे. मी महिला म्हणून सक्षम आहे. शिवसेनेतही महिलांना मिळणारे मानाचे स्थान त्यासाठी कारणीभूत आहे.
- ‌ज्योती काथार, शिवसेना, महिला आघाडी शहर संघटक, औरंगाबाद.

सक्षमपणे कामाची पक्षाने दिली संधी
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीची शहराध्यक्ष म्हणून मला खूप मोठी संधी मिळाली, असे मी मानते. त्यातून जबाबदारीची जाणीव निर्माण होत आहे, अशी माझी भावना आहे. आमच्याच पक्षाची सत्ता असल्याने आमच्यावर जबाबदारी अधिक आहे. हे सरकार काय करते, कोणत्या योजना राबवते, महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न काय केले जात आहेत, महिला व बालविकासाच्या माध्यमातून सक्षमीकरण कसे केले जात आहे, याविषयी अधिक सजगपणे सांगण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. पक्षात महिलांसाठी अतिशय सन्मानाचे स्थान आहे. त्यामुळे सक्षमपणे काम करता येते. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राजकारणातील माझा प्रवास सार्थक ठरेल, असे मला वाटते.
- मनिषा भन्साळी, भारतीय जनता पक्ष, महिला आघाडी शहराध्यक्ष, औरंगाबाद.
(संकलन : उन्मेष देशपांडे, धनंजय कुलकर्णी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फूड कॉर्नर : लज्जतदार पोहे

$
0
0

shripad.kulkarni@timesgroup.com
Tweet : @kulshripadMT
सिडकोत एमजीएम हॉस्पिटलकडे जाताना राज हाइट्स येथे मीरा रामेश्वर वाघमारे यांचा पोह्याचा स्टॉल आहे. तेथे सकाळी सातपासून पोहे खाण्यासाठी गर्दी असते. या गर्दीत विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांचे नातेवाईक, कामावर जाणारे कामगार, कर्मचारी असतात. या परिसरात येणारे-जाणारे पोहे खाण्यासाठी त्यांच्या स्टॉलवर आवर्जून थांबतात.
सुमारे तीन वर्षांपूर्वी मीरा वाघमारे यांनी पोह्याचा स्टॉल सुरू केला. त्यापूर्वी त्या घरून पोहे, उपमा, इडली, शिरा आदी पदार्थ घरी करून आणत असत. त्यात पोह्यांना ग्राहकांची मागणी जास्त होती. त्यामुळे फक्त पोहेच तयार करायचे, असे त्यांनी ठरविले. पोहे घरून करून आणण्याऐवजी स्टॉवर तयार करण्यास सुरू केले. त्याला खवय्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
चांगल्या दर्जाचे साहित्य, ताज्या भाज्यांचा वापर यांमुळे पोहे चवदार होतात, असे त्या सांगतात. चांगल्या दर्जाचे, ब्रँडेड पोहे, शेंगादाणे वापरले जातात. रोज सकाळी ताज्या मिरच्या कोथिंबीर, आलं, लसूण आदी आणले जाते. रिफाइन्ड तेल वापरले जाते. पोह्यासाठी भाजलेले शेंगादाणे वापरले जातात. ग्राहकांचा अंदाज घेऊन पोहे तयार केले जाता. दहा ते पंधरा मिनिटांत पोहे तयार होतात. प्रत्येक ग्राहकाला ताजे, गरम पोहे मिळाले पाहिजेत, असा कटाक्ष असतो. त्याशिवाय ग्राहकांना जारचे पाणी उपलब्ध करून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
गरम गरम पोहे काकडीच्या फोडी, त्यावर कोथिंबीर, शेव टाकून सर्व्ह केले जातात. आलं, लसूण, भाजलेले शेंगादाणे यांमुळे पोह्यांची चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते. अनेक जण पोह्यांचे पार्सलही नेतात. ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने त्यांनी आता टोकन सिस्टिम सुरू केली आहे. सुरुवातीच्या काळात घरून अर्धा ते एक किलो पोहे आणले जात होते. त्यांची चव ग्राहकांना आवडली. त्यामुळे पोहे येथे तयार करण्याचे ठरविले, असे मीरा वाघमारे सांगतात.
पोह्याबरोबर अनेक ग्राहक चहाची मागणी करतात. ‘येथे पोहे खावून दुसरीकडे चहा प्यावा लागतो. त्यात खूप वेळ जातो,’ असे ग्राहकांचे म्हणणे होते. त्यामुळे पोह्याच्या जोडीला चहा तयार करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. पाणी न वापरता फक्त दुधाचाच चहा केला जातो. त्यात आलं, वेलदोडे टाकले जातात. त्याचबरोबर चतुर्थी, एकादशी, शनिवार, महाशिवरात्र आदी उपवासाच्या दिवशी शाबुदाणा उसळ उपलब्ध करून दिली जाते, असे त्यांनी सांगितले. घरातील कामे आटपून सात वाजता स्टॉलवर पोचावे लागते. त्यासाठी पहाटे चार वाजता उठून घरातील कामे करावी लागतात. त्यामुळे दिवसभर स्टॉल सुरू ठेवणे शक्य होत नाही.
दुपारी बारापर्यंत स्टॉल सुरू असतो, असे मीरा वाघमारे यांनी सांगितले. गरम-गरम पोहे आणि त्यानंतर दुधाचा आलं, वेलदोडे घातलेला चहा हे समिकरण खवय्यांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे या भागातील अनेक जण आवर्जून पोहे, चहासाठी येथे थांबतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुऱ्याची कर्णिका माता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी परिसरातील कर्णपुरा देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहराची ग्रामदेवता म्हणून कर्णिका माता देवीची ओळख आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. राजस्थानातून आलेल्या कर्णसिंग राजाने या मंदिराची उभारणी केली. दानवे कुटुंबांची सातवी पिढी या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहे.
राजस्थानचा बिकानेर येथील राजा कर्णसिंग १८३५मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्याचे वास्तव्य होते. राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते. या ठिकाणी देखील कर्णिका मातेचे मंदिर बांधायचे त्याने ठरवले. त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली.
राजस्थानी शैलीने हे मंदिर उभारण्यात येते. कालांतराने १९८२मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. कर्णसिंग यांचे या परिसरात २० ते २५ वर्षे वास्तव्य होते. त्यानंतर येथील दानवे कुटुंबाकडे या मंदिराचे पुजारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. दानवे कुंटुबाची सातवी पिढी सध्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत असल्याची माहिती पुजारी अंबादास दानवे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसमाळची गिरिजादेवी

$
0
0

श्रीक्षेत्र म्हैसमाळ येथील श्री गिरिजादेवी हे जागृत दैवत मानले जाते. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण व पर्यटनस्थळ आहे. औरंगाबाद पासून ३५ किलोमीटर व खुलताबाद येथून ११ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून ९१३ मीटर उंचीवर असलेले हे मंदिर आहे. पद्मपुराणात म्हैसमाळ संबंधी लिखाण आहे, त्यानुसार सारीपाट्याच्या खेळात भगवान शंकराकडून माता पार्वती पराभूत झाल्या. त्यावेळी देवगण हसल्यामुळे पार्वती माता कैलास पर्वत सोडून दक्षिणेकडील पर्वतावर आल्या. त्यांनी येथे कठीण तपश्चर्या केली. भगवान शंकर त्यांचा शोध घेत येथे आले, त्यामुळे महेशाने वास केलेले हे पठार म्हणजे म्हैसमाळ, अशी मान्यता आहे. श्री गिरिजादेवीविषयी पद्मपुराण, काशीखंड, शिवालय महात्म्य, ब्रह्मसरोवर आदी धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे.
देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदार यांच्या हस्ते घटस्थापना करून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. सकाळी, संध्याकाळी सनई-चौघडा, अखंड नंदादीप, अष्टमी रोजी होमहवन, विजयादशमीला शमीपूजन, सीमोल्लंघन असे धार्मिक कार्यक्रम होतात. देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या सर्व भागातून भाविक येतात, पर्वताच्या पायथ्यापासून दंडवत करीत नवस फेडतात. नवरात्रोत्सवात श्री गिरिजादेवीचे आकर्षक रूप पाहण्यास मिळते. देवीला सोन्या-चांदीचे दागिने, बहुमोल रत्ने, अस्सल सोन्याच्या माळा, गोट, तोडे, पाटल्या, कंबरपट्टा, रत्नजडीत टोप, सौभाग्य अलंकारांनी सजविले जाते. मनोरथ पूर्ण झाल्यामुळे नेपाळच्या राणीने अर्पण केलेला रत्नहार देवीला घातला जातो. सध्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. येथे ६० बाय ११४ फुट आकाराचा सभामंडप, २६ बाय ६० फुट आकाराचा गाभारा बांधण्यात येणार आहे. कळसाची उंची ५१ फुट राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३ लाख ८७ विद्यार्थ्यांची यादीतून नावे गायब

$
0
0

३ लाख ८७ विद्यार्थ्यांची यादीतून नावे गायब
‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ नूतनीकरणानुसार पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीत नूतनीकरणातील त्रूटींमुळे राज्यातील तब्बल साडेतीन लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून दूर फेकले गेल्याची धक्कादायकबाब अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. शाळांची उदासिनता, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याचा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे.
केंद्र सरकारतर्फे २००७-०८ पासून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. २०१५-१६ वर्षासाठी योजनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. राज्यात यंदा ३ लाख ३० हजार ८४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. २०१४-१५ मध्ये ७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती. २०१५-१६च्या नूतनीकरणाच्या यादीत राज्यातील विविध शाळांतील ३ लाख ८७ हजार १२० विद्यार्थ्यांची नावे गायब झाली आहेत.
७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र यादीत ३ लाख ३० हजार ८४४ विद्यार्थ्यांचा समावेश कसा होतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी नॅशनल स्कॉरलशिप पोर्टलचा उपयोग करण्यात आला होता. यात डेटा भरताना व अपलोड करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्याबाबत शाळांनी तक्रारीही केल्या. तक्रारींचे निराकरण होत नसल्याने राज्यभरातील शाळांनी विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती डेटाशीटमध्ये भरून सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण संचालकनालयाकडे दाखल केली होती. त्यानंतरही पात्र विद्यार्थ्यांमध्ये साडेतीन लाख विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्यात उद्दिष्ट, पात्र संख्या
जिल्हा... उद्दिष्ट....... पात्र ठरले
औरंगाबाद... ५७४६८........१८६५१
बीड..............४३१७०७......१२३३४
हिंगोली........२६४४४.........१३८३७
जालना.........२६२५७........१३३२७
लातूर...........२९७६१.........९६८८
नांदेड...........४५९१५.........१८५८६
उस्मनाबाद...९१९५...........२२५२
परभणी........२६६९४..........५५२३
मागील वर्षी सात लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली. यंदा ही संख्या तीन लाखांवर आली. वर्षभरातच ४ लाख विद्यार्थी यादीतून कमी होतात कसे? यात अधिकारी दोषी आहेत. मागील वर्षाचीही शिष्यवृत्ती हजारो विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्यात हा गोंधळ. योजनेच्या अंमलबजावणी, तांत्रिक अडचणीबाबतचे प्रश्न आम्ही वारंवार मांडले. त्यानंतरही हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जबाबदार असलेल्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून नूतनीकरणाची प्रक्रिया पुन्हा करावी व जे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत, त्यांना न्याय द्यावा.
साजिद अहमद,
राज्य सरचिटणीस,
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ.
सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत, ही बाब गंभीर आहे. त्यात दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. नवीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतरच बँक खाते उघडण्याची सक्ती करावी.
इल्हाजुद्दीन फारूकी,
अध्यक्ष,
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार भुमरेंवर कडक कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना मारहाण करून तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या आमदार संदीपान भुमरे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरूण काळे यांनी केली. सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला.
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत, आमदार संदीपान भुमरे व त्यांच्या समर्थकांनी जयाजीराव सूर्यवंशी यांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. शहरातील शिवाजी पुतळ्यापासून दुपारी बारा वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा महाराणा प्रताप चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे नेण्यात आला. आंबेडकर पुतळा येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना शिवसेना माजी तालुका प्रमुख काळे म्हणाले, तालुक्यातील समस्येविषयी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज आमदार भुमरे बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदार भुमरेंविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माऊली मुळे, किशोर दसपुते, विष्णू बोडखे आदी वक्त्यांनी सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images