Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुंगीचे बिस्कीट देत दीड लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

गुंगीचे बिस्कीट देत दीड लाखांचा ऐवज लंपास
करमाड ते देऊळगावराजा दरम्यान एसटी बसमधील घटना
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी बसमध्ये जेष्ठ नागरिक दाम्पत्यास गुंगीचे बिस्कीट देऊन दीड लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. गेल्या शनिवारी करमाड ते देऊळगावराजा दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून करमाड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सिडको परिसरातील ६० वर्षांची महिला व त्यांचे पती २४ सप्टेंबर रोजी एसटीने औरंगाबादवरून देऊळगावराजाला जात होते. सिडको बसस्टँडवरून ते बसमध्ये बसले. यावेळी करमाडजवळ अनोळखी सहप्रवाशाने त्यांना बिस्कीट खायला दिले. हे बिस्कीट खाल्यानंतर काही वेळातच त्यांना गुंगी आली. या दरम्यान आरोपीने त्यांच्या पतीच्या हातातील सोन्याचे लॉकेट, अंगठ्या व रोख चार हजार रुपये असा १ लाख ४४ हजारांचा ऐवज काढून घेतला. देऊळगावराजा जवळील वाटीका ढाब्याजवळ शुद्ध आल्यानंतर हा प्रकार या दाम्पत्याच्या लक्षात आला. याप्रकरणी गुरुवारी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा करमाड पोलिस ठाणे हद्दीत घडला असल्याने करमाड पोलिस ठाण्याकडे पोलिस उपायुक्तांचा मार्फत हा गुन्हा वर्ग करण्यात आला.
दोन महिन्यांत दुसरी घटना
दोन महिन्यांत गुंगीचे औषध देऊन लुबाडण्याची ही जालना मार्गावरील दुसरी घटना आहे. किसन रतन सरदार (वय ६५, रा. एन ९, शिवाजीनगर) हे शेतकरी ३१ जुलै रोजी दुपारी ते जालना येथे जाण्यासाठी सिडको बसस्टँडवर आले होते. पुणे-अकोला बसमध्ये ते बसले. शेजारी बसलेल्या अनोळखी सहप्रवाशाने त्यांना चॉकलेट दिले. या चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले होते. चॉकलेट खाल्यानंतर सरदार बेशुद्ध झाले. गुंगलेल्या सरदार यांच्याजवळील १६ हजार रुपये, सोन्याची अंगठी व मोबाइल असा ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज काढून घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेतीन लाख शिक्षकांना ६वा वेतन आयोग

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकांना एक समान वेतन मिळाले पाहिजे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेत शिक्षण विभागाने समान वेतनासाठी सेवाशर्ती नियमावलीत बदल करून निर्णय घेतल्याची माहिती मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली. या निर्णयाने राज्यातील विनाअनुदान शाळांतील साडेतीन लाखांपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासकीय व अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते दिले जातात, मात्र विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना एकसमान काम, सेवा करूनही समान वेतन दिले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र पब्लिक स्कूल व स्वामी विवेकानंद अकादमी या शाळांतील शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात गेल्या वर्षी याचिका केली. या याचिकेची सुनावणी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठासमोर झाली.

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे सर्वव्यापीकरण व प्रसार करण्यासाठी ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम’ असल्याचे शपथपत्र देणाऱ्या शिक्षण संस्थांना विना अनुदान तत्त्वावर शाळा चालवण्याला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा शाळा सुरू आहेत.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू केले असून, त्यासाठी ६ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केल्याचे खंडपीठात स्पष्ट केले. शासनाच्या या निर्णयाने शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनश्रेणीनुसार सुधारित वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या याचिकेवर ऑक्टोबर महिन्यात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांची बाजू बी. एल. सगर किल्लारीकर यांनी मांडली.

सरकारने शपथपत्रानुसार सेवाशर्ती बदलल्या

अनुदानित शाळांप्रमाणे विनाअनुदान शाळांतील शिक्षकांना वेतन देणे; तसेच सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी (सेवाशर्ती) नियम १९८१च्या अनुसूची ‘क’मध्ये सहा महिन्यांत योग्य ते बदल करण्याची हमी ८ फेब्रुवारी २०१६ रोजी मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांनी खंडपीठात शपथपत्र दाखल करून दिली होती. या याचिकेवर सुनावणी झाली, त्यावेळी शासनातर्फे महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी (सेवाशर्ती) नियम बदल करण्यात आल्याचे कोर्टात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पावसाचा कहर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

परतीच्या पावसानं सकाळपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. इथल्या लातूर, नांदेड आणि बीड या जिल्ह्याला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. या जिल्ह्यांतील विविध भागात तब्बल २०० जण पुरात अडकले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी कर्नाटकमधून दोन हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी पुण्याहून एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.

लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ मिलिमीटर आहे आणि यंदा आतापर्यंत सरासरी ९९३.२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरण प्रकल्प, नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. नांदेडमधील लिंबोटी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या धरणाचे १५ पैकी १४ दरवाजे उघडले आहेत. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस पडत होता. पुणे शहरातही दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय, फलटण आणि भोरमध्येही दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. पुढील २४ तासात पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटीदारांचा सुवर्ण महोत्सवी नवरात्रोत्सव

$
0
0



Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबादः कडवा पाटीदार समाज कच्छच्या रणप्रदेशातील. शेती व्यवसाय हेच त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत. सततच्या दुष्काळामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला. त्यामुळे त्यांनी शेतीबरोबरच लाकूडकाम करण्यास या सुरुवात केली. व्यवसायाच्यानिमित्ताने ते महाराष्ट्रात आले. हा समाज या वर्षी त्यांच्या सुवर्ण महोत्सवी नवरात्रोत्सव साजरा करतो आहे. आजच्या समाजमनमध्ये पाटीदारांची ही संघर्षमय वाटचाल.
पाटीदारांना फक्त झुंजणे माहित. या समाजाच्या वाटचालीची माहिती देताना श्री कडवा पाटीदार समाज संघटनेचे सरचिटणीस गोपालभाई पटेल म्हणाले, ‘आमचे पूर्वज हे कराची, सिंध, हैदराबादेत काम करत. व्यवसायानिमित्त ते विविध राज्यांत स्थायिक झाले. १९५६मध्ये करसनभाई पटेल हे सर्वप्रथम औरंगाबादेत दाखल झाले. त्यापाठोपाठ १९५८ला दाणाभाई पटेल, वालजीभाई पटेल आले. त्यानंतर औरंगाबाद शहरात कडवा पाटीदार समाजाची लोकसंख्या वाढत गेली. १९६७च्या काळात औरंगाबादेत पाटीदार समाजाची लोकसंख्या अवघी १७५ इतकी होती. कच्छचे पाटीदार म्हणूनच हा समाज ओळखला जातो. आज क्रांतिचौक परिसर गजबजलेला दिसून येत असला, तरी काही दशकांपूर्वी हा शहराबाहेरील भाग मानला जात असे. त्यामुळे सॉ-मिलची उभारणी या परिसरात दिसून येते. त्या काळात पैठणगेटनंतर क्रांतिचौक भागात सहजरित्या कोणी यायला तयार होत नसे. आमचा समाज हा क्रांतिचौक परिसरातच स्थायिक झाला.
१९८४ मध्ये कडवा पाटीदार समाज संघटनेची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत शहरात पाटीदार समाजाची लोकसंख्या अकराशेपेक्षा अधिक आहे. मराठवाड्यात प्रत्येक गावात पाटीदार समाज व्यवसायाच्या माध्यमातून स्थायिक झालेला दिसून येतो.’

वडिलोपार्जित परंपरा
कडवा पाटीदार समाजातील मंडळी ही प्रामुख्याने सॉ-मिलवर आधारित व्यवसाय करणारी. खास करून बांधकाम व्यवसायाशी संबंधित लागणाऱ्या गोष्टींची निर्मिती, पुरवठा, विक्री करणे यावर पाटीदार समाज व्यावसायिकांचा भर असतो. कडवा पाटीदार समाज हा व्यवसाय करण्यावरच भर देणारा समाज. त्यामुळेच वडिलोपार्जित व्यवसायाला पुढे नेण्याचे काम युवा पिढी करत असते. वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत मुलेही व्यवसायात रमतात. शिक्षण घेतानाच मुलांना व्यवसायाचे बाळकडू मिळते.

उच्च शिक्षणाकडे कल
पूर्वीच्या काळात कडवा पाटीदार समाजात शिक्षणाचे प्रमाण कमीच होते. काळानुसार हा समाजही बदलत गेला. व्यवसायानिमित्ताने शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी पालक प्रोत्साहित करतात. अनेक दशकांपासून पाटीदार समाजातील मुले-मुली ही उच्च शिक्षण घेत आहेत. सीए, इंजिनीअर्स, वैद्यकीय अशा काही क्षेत्रातही हा समाज दिसून येतो. मात्र, उच्च शिक्षण घेतल्यानंतरही वडिलांच्या व्यवसायाला पुढे नेण्याचे काम युवा पिढी करते, असे गोपालभाई पटेल व भावेशभाई पटेल यांनी सांगितले.

उत्सवात तबलावादन, गरबा
कडवा पाटीदार समाज संघटनेच्या नवरात्र उत्सवाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. १९६७मध्ये श्री विष्णू सॉ-मिल परिसरात सर्वप्रथम नवरात्र उत्सव सुरू करण्यात आला. करसनभाई पटेल, वालजीभाई पटेल, दाणाभाई पटेल, मणिलालभाई पटेल, हिरालाल पटेल, धरमसीभाई पटेल, सोमजीभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन नवरात्र उत्सव सुरू केला. तेव्हापासून आजपर्यंत नवरात्र उत्सव आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा करीत आहोत. वालजीभाई पटेल यांनी नवरात्र उत्सवानिमित्त तबलावादनला चालना दिली. तबल्याच्या सुरात गरबा खेळला जात असे. प्रारंभापासूनच महिला व पुरुष मंडळी ही स्वतंत्रपणे रास-दांडिया खेळत. गरबा हा धार्मिक पद्धतीनेच खेळण्यावर भर असतो. यात आम्ही ग्लॅमरला प्राधान्य देत नाही. वाणिया वाळीक, छकडी, दापडी, जाळीक रास असे गरब्याचे विविध प्रकार यानिमित्ताने होतात. गरबा खेळण्याकरिता वेगळी तयारी करण्याची गरज भासत नाही. आमच्या परिवारातील प्रत्येकाच्या रक्तातच हा गुण दिसून येतो, असे गोपालभाई पटेल, भावेशभाई पटेल, बाबूभाई पटेल व प्रभुलाल पटेल यांनी सांगितले.

समाजाची मुख्य कार्यकारिणी
अध्यक्ष जीवराजभाई पटेल, उपाध्यक्ष बाबूभाई पटेल, भावेशभाई पटेल, सचिव गोपालभाई पटेल, सहसचिव कांतीभाई पटेल, कोषाध्यक्ष हंसराज पटेल.
- युवा संघटनाः अध्यक्ष प्रवीण पटेल, उपाध्यक्ष जितेंद्र पटेल, सचिव रमेश पाटील.
- महिला कार्यकारिणीः अध्यक्ष जसवंतीबेन पटेल, उपाध्यक्ष हेमलताबेन पटेल, सचिव वर्षा पटेल.
- नवरात्र उत्सव समितीः अध्यक्ष हिमंतभाई पटेल, उपाध्यक्ष शंकरभाई पटेल, सचिव प्रवीण पटेल, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रभूलाल पटेल.

नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. वडिलधाऱ्या मंडळींचा शब्द आजही प्रमाण मानला जातो. एकत्रित कुटुंब पद्धतीत राहाणारा हा समाज आहे. सांस्कृतिक वारसा जोपासणारा समाज म्हणून पाटीदार समाजाची ओळख आहे. - गोपालभाई पटेल

पाटीदार समाजात युवा पिढीचा शिक्षणाकडे कल वाढलेला आहेच. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्यावरच युवा पिढीचा भर आहे. - बाबूभाई पटेल

वसंत पंचमीला दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्याचा सर्व खर्च समाजातर्फे केला जातो. विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातूनही पाटीदार समाज हा सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. - प्रभूलाल पटेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपास यंत्रणेने संवेदनशील व्हावे; महिला वकिलांचे आवाहन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या प्रमाणात शिक्षा कमी जणांना होते. पीडितांना न्याय देण्यासाठी तपास यंत्रणेने संवेदनशील व्हावे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता अशा प्रकरणांसाठी सरकारी महिला व‌किलांची संख्या वाढवावी. आगामी काळात सामाजिक बांधिलकी म्हणून तरुणींनी वकिली पेशात यावे, असे आवाहन शहरातील महिला वकिलांनी ‘मटा’ राऊंड टेबलमध्ये केले. त्यांनी विविध सामाजिक विषयांवर आपली रोखठोक मते मांडली.

आरोपींना कठोर शिक्षा गरजेची
महिला धोरणाच्या मसुद्यामध्ये ७५ टक्के कायदे महिलांच्या बाजूने आहेत. वाढते अत्याचार रोखण्यासाठी दोषी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. निर्भया प्रकरणानंतर तसेच विविध माध्यमातून झालेल्या जागृतीमुळे अन्याय सहन न करता पीडिता आता तक्रारीसाठी समोर येत आहेत. त्यामुळेही तक्रारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. काही प्रकरणात वैयक्तिक स्वार्थापोटी खोट्या तक्रारी केल्या जाऊ शकतात. अर्थात त्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये, पीडित व्यक्तीस न्याय मिळावा, यासाठी तपास यंत्रणेने संवेदनशीलपणे व अधिक कौशल्यपूर्ण तपास केला पाहिजे. महिलाविषयक, कायदेविषयक जनजागृतीसाठी तसेच महिला सबलीकरणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. ही आनंदाची बाब असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग पुढाकार घेताना दिसत आहे. वकिली क्षेत्राला असलेला सोशल टच मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. या माध्यमातून पीडितांना मदत करता येते. याचे समाधान वाटते. कोर्ट असो की अन्य कार्यालय त्याठिकाणी काम करणाऱ्या किंवा कामानिमित्त येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहासह आवश्यक त्या सुविधा पुरविल्या पाहिजे. - अॅड. रेणुका घुले-पालवे

कायद्यावर मंथन आवश्यक
कायदेशीर प्रक्रियेवर सातत्याने विचारमंथन होणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना जागरुक करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. महिला अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे. कोणत्याही वर्गातील महिला असली तरी ती सुरक्षित आहे, अन्याय अत्याचाराचा सामना करण्याची वेळ तिच्यावर येणारच नाही, अशी परिस्थिती सध्यातरी नाही. त्यामुळे आता महिलांनी अधिक सक्षम होण्याची गरज आहे. कायदे खूप आहेत, पण त्यातूनही काहीजण पळवाट शोधतात. हा प्रकार कसा थांबविता येईल, यासाठी कसोशीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रलंबित खटल्याचे प्रमाण अधिक असून पीडितांना न्यायासाठी अधिक चकरा मारण्याची गरज पडता कामा नये. यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. त्यावर मंथन झाले पाहिजे. वकिली क्षेत्र करिअर म्हणून अतिशय उत्तम असून स्वतःची ओळख निर्माण करण्याची अधिक संधी येथे मिळते. - अॅड. जयश्री देशपांडे

तपास अधिकारी कर्तव्यदक्ष हवा
वकिली क्षेत्रात काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. हे क्षेत्र आव्हानात्मक असले तरी पोषक वातावरण मिळाल्याने वकिलांचा आत्मविश्वासही वाढला आहे. मात्र, महिला म्हणून या क्षेत्रात वावरताना अनेक अनुभव आले. मुळातच कायदेशीर प्रक्रिया सामान्यांसाठी किचकट असते. तक्रारकर्त्या महिलेकडे बरेचदा पुरेसे पैसे नसतात. माहिती नसल्याने त्यांची मोठी परवड होते. त्यामुळेच अशा महिलांपर्यंत कायद्याची माहिती व आवश्यक ती मदत पोहचविणे आवश्यक आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व कौशल्यपूर्ण तपास यावर अधिक भर दिला जावा. कौटुंबिक अत्याचार प्रकरणात काम करणारे संरक्षण अधिकारी संवेदनशील पाहिजेत. फक्त दिखाऊपणा नको. आजही विविध कार्यालय, संस्थांमध्ये विशाखा समित्या गठीत आहेत किंवा नाही, हे लक्षात येत नाही. कागदोपत्री समित्या नको. - अॅड. सुजाता पाठक

जबाब बदलता कामा नये
महिला अत्याचार प्रकरणात शिक्षेचे प्रमाण कमी आहे. अनेक प्रकरणात आरोपी सुटतात. असे का होते, याचा सखोल विचार झाला पाहिजे. घटनास्थळाचा पंचनामा योग्य पद्धतीने झाला पहिजे. पंच म्हणून आणलेल्या लोकांना नंतर त्याचा विसर पडता कामा नये. जबाब बदलता कामा नये. तपास करताना संबंधित यंत्रणेने काही त्रुटी राहणार नाही, यांची काळजी घेतली पाहिजे. प्रकरण तांत्रिक आहे म्हणून त्या पद्धतीने हॅंडल करण्याची वृत्ती नको. संवेदनशीलपणे व कौशल्यपूर्ण तपासावर भर द्यावा. यात अनेक सुधारणाची गरज आहे. त्यादृष्टीने संबंधित सर्व विभागाचे एकत्रित प्रयत्न व्हावेत. त्याच प्रमाणे पीडितांना योग्य संरक्षण मिळाले पाहिजे. कारण त्यांना आमिष, भीती व दहशत दाखवून दडपण आणण्याचा प्रयत्न होण्याची जास्त शक्यता असते. गंभीर प्रकरणातील पीडितेला शासकीय वा खासगी हॉस्पिटलमध्ये तत्काळ व मोफत वैद्यकीय सेवा मिळण्याची तरतूद कायद्यात आहे. हॉस्पिटलने सहाय्य करण्यास नकार दिला, तर संबंधितांवर कारवाई होऊ शकते. कायद्यात प्रत्येकाचा विचार झाला आहे. महिला वकील म्हणून मला वाटते की, महिला पक्षकारही आमच्याकडे सुरक्षित वाटते. महिला सरकारी वकिलांची संख्याही तुलनेते कमी आहे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. - अॅड. प्रीती डिग्गीकर

पीडितेचे आर्थिक पुनर्वसन
महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. पुरुषांनी महिलांना सामाजिक भागीदार म्हणून पाहायला हवे. महिलांसाठी अनेक कायदे आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तपास यंत्रणेवर आहे. मात्र, दुर्देवाने अनेकदा योग्य ती कार्यवाही होत नाही. पीडित महिलेस न्याय मिळवून देण्याबरोबरच तिचे आर्थिक पुनर्वसनही गरजेचे आहे. न्यायहक्कासाठी महिलांनी एकत्रित येण्याची गरज आहे. विविध कार्यालय, संस्था आदी ठिकाणी असलेल्या विशाखा समित्याचे कामकाजही प्रभावी झाले पाहिजे. टी.व्ही. आणि इतर प्रसार माध्यमांतून विविध मार्गाने महिलांविषयक कायदे, स्त्री पुरुष समानता आदीबाबत जनजागृती व्हावी. यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. - अॅड. माया जमधाडे

मुलगा-मुलगी समान
कारागृहातील कच्च्या किंवा शिक्षा भोगत असलेल्या पुरुष बंदीवानास भेटण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याच वेळेस एखाद्या महिलेची रवानगी कारागृहात झाली, तर क्वचितच नातेवाईक तिला भेटण्यासाठी येतात. शिक्षा पूर्ण होईपर्यंत विचारपूस करणारे नातेवाईक तिला शोधावे लागतात. सुमारे ७० टक्के महिला कैदांना अशीच वागणूक मिळते. सामान्य महिलांसोबत भेदभाव होतो, पण कैदी महिलांचीही स्थिती अजिबात चांगली नाही. पत्र पाठवूनही त्यांना मुलाखतीला भेटायला येणारे कमीच असतात. घरातूनही मुलींना दुजाभाव मिळतो. माझी मुलगी स्वयंपूर्ण, उच्चशिक्षित असावी, पण सून म्हणून तिची हुशारी स्वीकारण्याची मानसिकता कमी आहे. महिलांकडून कायद्याचा दुरुपयोग करण्याचे प्रमाण कमी आहे. जनजागृती करताना कायम महिला किंवा मुलींनाच का सांगितले जाते? पुरुषांनी सुज्ञ नागरिक म्हणून कसे वागावे, यावरही भर द्यायला नको का? महिला व पुरुष दोघांनाही एकाच व्यासपीठावर जागृत करणे गरजेचे आहे. केवळ मुलींना धडे देऊन जमणार नाही. - अॅड. अनुराधा मगरे

ऑडिटपुरते धोरण सोडा
महिला सक्षमीकरणाचे बीज लहानपणापासून रुजायला हवे. त्यासाठी अधिक कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत. मुली व महिलांसाठी काम करणाऱ्या प्रामाणिक स्वयंसेवी संस्था अतिशय कमी आहेत. गरजू महिलांना पाठबळ कसे मिळेल, यासाठी अधिक प्रभावी काम झाले पाहिजे. केवळ ऑडिट करण्यापुरते काम नको. काही महिला तक्रार निवारण केंद्रातील समुपदेशकांची भाषा हा तर चिंतेचा विषय आहे. अशा ठिकाणी प्रशिक्षक समुपदेशकच असावा, वा तसे प्रशिक्षण दिले पाहिजे. तडजोडीसाठी महिलांवर दबाव आणण्याचे प्रकार होता कामा नये. सर्व अंगाने चौकशी करूनच कार्यवाही, सल्ला दिला जावा. - अॅड. मेघा गरुड

मुलींसाठी कार्यशाळा
महिला सक्षमीकरणाची सुरुवात शालेय स्तरापासूनच व्हायला हवी. आठवी ते दहावीच्या‌ विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा घ्यायला हव्या. भेदाभेद करण्याची सुरुवात घरापासूनच होते. ‌केवळ प्रसिद्धीसाठी आम्ही संवेदनशील आहोत, हे दाखवण्यापेक्षा ती संवेदनशीलता पालकांनी रुजवायला हवी व टिकवायला हवी. मुलींना घरून पाठिंबा मिळाला तर सामाजिक परिस्थिती नक्कीच सकारात्मक राहील. - अॅड. अर्चना सोनवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवसाला पावणारी हरसिद्धी देवी

$
0
0


giridhar.pande@timesgroup.com
औरंगाबादः नवसाला पावणारी माता अशी ख्याती असलेली हरसिद्धी देवी ही हर्सूल गावचे कुलदैवत. या देवीच्या मंदिराला मोठी परंपरा आहे. वर्षभर हरसिद्धी देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. नवरात्र उत्सवात तर लाखोंच्या संख्येने भाविक हरसिद्धीच्या चरणी माथा टेकण्यासाठी आवर्जून येतात.
मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा, नैवेद्य, आरती वैदिक पद्धतीने दररोज पुरोहितांकडून केले जातात. रामनवमी, हनुमान जयंती, कोजागरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी प्रसंगी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात.
हरसिद्धी देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. ही देवी चतुर्भूज असून तिच्या हातात शंख, चक्र, शस्त्र, तलवार आहे. देवीच्या समोरच शिवलिंग आहे. कार्तिकी पौर्णिमेला देवीची प्रतिमा आणि मुकुटाची पालखी काढली जाते. ही पालखी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास गावात येते. सकाळी पाच वाजता हरसिद्धी देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. नवरात्र उत्सवादरम्यान या मंदिरात भाविकांची रीघ लागते. घटस्थापनेनंतर अष्टमीपर्यंत नवस फेडणाऱ्यांची मोठी रांग येथे असते. अष्टमीला मंदिराच्या परिसरातील हवन कुंडावर मध्यरात्रीपासून होम सुरू होतो. दहा दिवस या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
या देवीच्या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ‘महादेव आणि पार्वती चौरस खेळत होते. काही कारणामुळे महादेव नाराज झाले आणि ते रुसून हर्सूलजवळ येऊन बसले. महादेवांना धत असलेल्या पार्वतीला अखेर ते हर्सूलजवळ सापडले. सिद्ध पावल्याने या ठिकाणी हरसिद्धी मातेचे मंदिर बनले’, अशी आख्यायिका भाविक सांगतात.
याच मंदिराबद्दल आणखीही एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, ‘पार्वतीला एकदा तहान लागली. तहान भागविण्यासाठी बाणांचा वर्षाव केला आणि त्यातून मंदिर परिसरातील कुंडाची निर्मिती झाली.’ असे पौराणिक दाखले असणाऱ्या हर्सूलमध्ये आता काळ्या पाषाणाची पूर्वेकडे मुख असलेली देवी असे मंदिर तयार करण्यात आले आहे. ही हरसिद्धी देवी भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, असा भाविकांचा विश्वास आहे.

मूळची उज्जैनवासी
हरसिद्धी देवी मूळची उज्जैनची. विक्रमादित्य राजाला हरसिद्धी देवी प्रसन्न झाली. राजाला अपार वैभव मिळाल्याचाही उल्लेख इतिहासात आहे. राजा विक्रमादित्यने हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैन येथे बांधले. त्याच काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्णपणे दगडी बांधकाम असून, मंदिराच्या गाभाऱ्यापासून कळसापर्यंतची उंची ३० फूट आहे. गाभाऱ्यासमोरचा सभामंडप १० फुटांचा आहे. मंदिराच्या बाजूला लक्ष्मीनारायणाचे मंदिर, मंदिरासमोर रामाचं छोटं मंदिर आहे. दोन्ही मंदिरांमध्ये रामकुंड बांधलेले आहे. मंदिरासमोर पाच फुटांचा नंदी आहे. नवसाला पावणाऱ्या या देवीची भाविक मोठ्या भक्तिभावाने आराधना करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजळले वेरूळ महोत्सवाचे पूर्वरंग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कथ्थकचा तालबद्ध पदन्यास आणि बासरीच्या मंजूळ सुरावटींनी ‘वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव पूर्वरंग’ कार्यक्रम शनिवारी सायंकाळी तापडिया नाट्यमंदिरात रंगला. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सुश्राव्य बासरीवादनाने रसिकांचे भान हरपले.
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वरंग आणि सुरमणी दत्ता चौगुले यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त संगीत-नृत्य महोत्सव घेण्यात आला. बालकलावंत सानिका शिंदे हिच्या भरनाट्यमने महोत्सव सुरू झाला. तिने राग वसंतातील ‘नटेश कीर्तनम्’ सादर केले. त्यानंतर डॉ. परिणिता शहा, वैदेही परशुरामी आणि भक्ती भाटवडेकर यांनी कथ्थक सादरीकरण केले. ‘दुर्गास्तुती’त तोडे, तिहाया, परण यांचे लक्षवेधी सादरीकरण दाद घेऊन गेले. मानवी स्वभावातील स्थिर, चंचल, धीट या स्वभावानुसार काही रचना सादर केल्या. हा अप्रतिम पदन्यास रसिकांना जिंकणारा ठरला. ‘गोपुच्छाय’, ‘बंदिश’, ‘गतनिकास’ या नृत्य रचनांनाही प्रतिसाद मिळाला. उरी हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करताना नृत्यांगणांनी अप्रतिम पेशकश केली. यावेळी टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले. तबला व घुंगराची जुगलबंदी विशेष ठरली. तबल्यावर पं. काशिनाथ मिश्र, संवादिनीवर सोमनाथ मिश्रा, सतारवर अलका गुजर आणि पढंत स्वप्नाली कदम यांनी साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन रंगले. ‘राग कृष्ण कल्याण’ने त्यांनी वादन सुरू केले. बासरीचे नादमय सूर आणि पं. चौरसिया यांची निपुणता यांनी सभागृह भारावून गेले. तबल्यावर सिवा सिम्पा व बासरीवर विवेक सोनार यांनी साथसंगत केली. दरम्यान, महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, दिलीप शिंदे, कवी प्रा. फ. मुं. शिंदे व एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महोत्सवाच्या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

‘व्हिजिट महाराष्ट्र’
‘व्हिजिट महाराष्ट्र - २०१७’ या उपक्रमाची मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली आहे. या उपक्रमाला औरंगाबाद शहरातील पूर्वरंग कार्यक्रमाने सुरुवात झाली. पर्यटन राजधानी औरंगाबाद शहराच्या सर्वांगिण विकासासाठी योग्य निधी देऊ. ट्रस्ट स्थापन करुन दरवर्षी महोत्सव नियमित घेण्यासाठी प्रयत्नशील राहू’ असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यजीव अधिवासावर मानवी अतिक्रमण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘प्रदूषण व मानवी अतिक्रमणांनी वन्यजीवांचा अधिवास संपुष्टात आला आहे. वन्यजीवांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शिक्षण व जनजागृती हाच वन्यजीव अधिवास टिकवण्याचा खरा उपाय आहे,’ असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांनी केले. वन्यजीव सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.
वन्यजीव सप्ताहानिमित्त (१ ते ७ ऑक्टोबर) वन विभाग, वन्यजीव संरक्षक विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाला शनिवारी भानुदास चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. यावेळी मंचावर वन विभागाचे उपवनसंरक्षक ए. पी. गिऱ्हेपुजे, सामाजिक वनीकरणचे संचालक ए. डी. भोसले, वन्यजीव संरक्षक विभागाचे उपवनसंरक्षक धामगे, सहाय्यक संरक्षक ए. पी. सोनवणे, पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे आणि कीटक अभ्यासक प्रा. आलोक शेवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पांडे यांनी ‘उदबिल्लू’ (पाणमांजर) प्राण्याचे सर्वेक्षण या विषयावर व्याख्यान दिले. ‘मऊ केस आणि तलम त्वचेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदबिल्लांची शिकार वाढली आहे. काही वर्षांपासून हा प्राणी तस्करीसाठी ओळखला जातो. या प्राण्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इला फाउंडेशनने कोकणातील विजयदुर्ग खाडी, आरवली, तारकर्ली, तेरेखोल, आचरा इत्यादी खाड्यांचा अभ्यास केला. उदबिल्लांचे प्रकार, भूभागाची वैशिष्ट्ये, सवयी, त्याचा अधिवास यांचे निरीक्षण केले. स्थानिकांशी चर्चा करून माहिती संकलित केली. खारफुटीच्या जंगलात उदबिल्लांचे सर्वाधिक वास्तव्य असते. माशांची शिकार करून उदबिल्ले जगतात. मात्र, वाळू उपसा, प्रदूषण, शिकार आणि मानवी अतिक्रमण यांनी उदबिल्लांचा अधिवास धोक्यात आला आहे’ असे
डॉ. पांडे म्हणाले.
दुसऱ्या सत्रात प्रा. आलोक शेवडे यांनी ‘कीटक विश्व अंतरंग दर्शन’ या विषयावर व्याख्यान दिले. ‘निसर्गचक्रात कीटकाचे विशेष स्थान आहे. कीटक संपल्यास पक्ष्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. निसर्गाला आकार देण्यात किडे आणि कीटकांचे महत्त्व आहे’ असे शेवडे म्हणाले. यावेळी पडद्यावर किटकांची छायाचित्रे दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, वन्यजीवप्रेमी आणि सेवाभावी संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याच्या टाकीवर आंदोलन; वसुली कार्यालयाला टाळे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी काही नगरसेवकांच्या मदतीने शनिवारी क्रांतिचौक पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या पाणीपट्टी वसुलीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
क्रांतिचौक पाण्याच्या टाकी अंतर्गत रमानगर, ज्योतीनगर, क्रांतिचौक परिसर, पैठणगेट, खोकडपुरा, काल्डा कॉर्नर, पदमपुरा आदी भागांना पाणीपुरवठा केला जातो. या सर्वच भागात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होतो, अशी नागरिकांची तक्रार होती. या संदर्भात चार महिन्यांपासून कंपनीकडे तक्रार करण्यात आली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी वॉर्ड सभापती नितीन साळवी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले. यावेळी विजया बनकर यांच्यासह विविध भागातील नागरिक उपस्थित होते.
साळवी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीच्या परिसरात असलेल्या पाणीपट्टी वसुलीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसच्या गळ्यात पुन्हा ‘पीपीपी’चे लोढणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पीपीपी तत्त्वावरचा ‘समांतर’ प्रयोग पुरता फसल्यानंतर आता शहरात याच धर्तीवर सिटी बस सुरू करण्याचा धाडसी निर्णय स्मार्ट सिटीसाठी स्थापन केलेल्या एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेकल) पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. आगामी सहा ते आठ महिन्यात ही सेवा सुरू होईल.
एसपीव्हीची पहिली बैठक शनिवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत एसपीव्हीचे कार्य, संचालकांचे अधिकार याबद्दलही चर्चा झाली. औरंगाबादचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसार तत्काळ ‘औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ नावावे एसपीव्ही स्थापन करण्यात आली. यात १५ संचालक आहेत. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. चोरमारे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, काँग्रेस गटनेते भाऊसाहेब जगताप, फोट्रेस कंपनीचे अजय भोये उपस्थित होते.
बैठकीच्या विषयपत्रिकेत २७ व्या क्रमांकावर तत्काळ सुरू होणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी घेऊन ते प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे असा उल्लेख होता. त्यानुसार शहरासाठी ‘पीपीपी’वर सिटी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाच्या माध्यमातून किंवा एसपीव्हीने स्वतःच्या माध्यमातून सिटी बस सुरू करणे असे पर्याय बैठकीसमोर होते. सहा ते आठ महिन्यात ही बससेवा सुरू होऊ शकेल. ‘पीपीपी’वर सिटी बस चालवू इच्छिणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागवून त्यानंतर कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सिटी बस चालवायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे. ही सेवा सुरू होईपर्यंत शहरातील प्रत्येक चौक आणि वाहतूक बेटांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेफ सिटी अंतर्गत प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचेही ठरविण्यात आले. एसपीव्हीच्या तात्पुरत्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली.
‘पीपीपी’वर २००६ मध्ये महापालिकेने एएमटी नावाने सिटी बस सेवा सुरू केली होती. खासगीकरणातून सुरू झालेली ही सेवा तीन वर्ष चालली. भाडेवाढ आणि अंतर्गत वादामुळे ती बंद पडली. स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीच्या माध्यमातून महापालिका पुन्हा खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. खासगीकरणातून सुरू केली जाणारी सेवा नागरिकांची आर्थिक लूट करणारी ठरू शकेल, असे बोलले जात आहे.

पुन्हा एक प्रयोग
शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेला असला तरी प्रयोगांचा सिलसिला सुरूच आहे. दहा वर्षांपूर्वी 'अकोला म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट' नावाने, 'पीपीपी' तत्त्वावरच सुरू करण्यात आलेल्या सेवेचा शहरवासीयांना चांगलाच अनुभव आहे. चालक-वाहकांच्या पगारापासून असंख्य वाद त्या सेवेतून उदभवले होते. पुन्हा तसाच प्रयोग नागरिकांच्या माथी मारला जात आहे. पुण्यात जशी बीआरटीएस सेवा सुरू करण्यात आली, तशी येथेही शक्य आहे. मात्र, खासगी कंपन्यांचेच खिसे भरण्याकडे सर्वांचा ओढा असल्यामुळे नागरिकांना आर्थिक चटके देण्याची तयारी चालली आहे. या कंपन्यांच्या मागे कोण असते, हेदेखील आता जगजाहीर झाले आहे. ही सेवा महागडी आणि बेभरवशाची ठरली तर तीदेखील अल्पावधीतच बंद पडेल. त्यामुळे 'एसपीव्ही'ने सरकारी सिटीबससाठी प्रयत्न केले पाहिजेत.
------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिमांना आरक्षण द्या

$
0
0



औरंगाबाद : मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेने शनिवारी विभागीय आयुक्तालयसमोर आंदोलन केले.
मुस्लिम समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. सच्चर कमिटी, रंगनाथ मिश्रा आयोग व रहमान कमिटीच्या अहवालानुसार हा समाज इतर समाजापेक्षा मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. घटनेनेही शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजास आरक्षणाचा हक्क दिलेला आहे. सर्व कायदेशीर घटकांचा विचार करून यापूर्वीच्या आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा हक्क या सरकारने त्वरित द्यावा. कोर्टाने आपल्या निकालात मुस्लिमांच्या शैक्षणिक आरक्षणावर बंदी केलेली नाही. म्हणून शैक्षणिक आरक्षण त्वरित देण्यात यावे, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार इम्त‌ियाज जलील, मोहसिन अहमद, मोहमद नवाज, खालेद पठाण, मीर हिदायत अली, मनमोहनसिंग ओबेरॉय आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ बैठकीवर ‘अनुदान हक्क मोर्चा’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे मंत्रिमंडळ बैठकीवर ४ ऑक्टोबर रोजी अनुदान हक्क मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यभरातील वीस हजारपेक्षा अधिक शिक्षक यात सहभागी होणार असून विनाअनुदानित शिक्षक हे खाकी हाफ पँट व पांढरा शर्ट परिधान करून आंदोलनात सहभागी होणार आहेत.
विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना मिळून तयार झालेल्या कृती समितीतर्फे या अनुदान हक्क मोर्चाची तयारी सुरू आहे. याबाबत समितीचे मिलिंद पाटील, मनोज पाटील, वाल्मिक सुरासे यांनी पत्रकारांना माहिती दिली. सोळा वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न गंभीर असून वारंवार आंदोलन केल्यानंतरही शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व विना अनुदानित चळवळीत मृत्यूमुखी पडलेल्या पंधरा शिक्षकांच्या कुटुंबाकडे असणार आहे. या मोर्चाला राज्यभरातील वीस हजार पेक्षा अधिक शिक्षक सहभागी होणार असल्याचा दावा समितीने केला. यावेळी महेश पाटील, नामदेव सोनवणे, संध्या काळकर, मनोहर सुरगडे, पाडुरंग गोकुंडे, राजेश घाटे, धीरज केंद्रे, शिवाजी चव्हाण, अंकूश पाल, प्रल्हाद शिंदे, पंढरीनाथ शिंदे, राजेश निंबेकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडावर कार धडकल्याने तरुण ठार

$
0
0

औरंगाबादः भरधाव कार झाडावर धडकून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मुत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. मिटमिट्याजवळ नाशिक महामार्गावर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. सौरभ पोपट पोळ (वय २० रा. सिद्धार्थ नगर, टी.व्ही. सेंटर) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
सौरभसह त्याचे मित्र जेवण करण्यासाठी दौलताबाद रोडवरील एका ढाब्यावर कारने गेले होते. जेवणानंतर ते घराकडे कारने येते होते. रस्त्यावर समोरील एक वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले. कार वडाच्या झाडावर धडकली. यात सौरभचा मृत्यू झाला. तर ओम डहाळके (लोणार, बुलढाणा), सचिन राजपूत, सचिन दौड, शुभम हिवराळे, युवराज कांबळे, शिवम पालवे(रा. सर्व उस्मानपूरा) हे जखमी झाले. सौरभ हा बारावी पास असून पुढील शिक्षणासाठी रशियाला जाण्याच्या तयारीत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पूरस्थिती, आठही जिल्ह्यांत पावसाचा कहर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। औरंगाबाद

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठा तडाखा दिला असून अतिवृष्टीमुळे लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती ओढवली आहे. मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे लातूर आणि नांदेड जिल्ह्यासह इतर अनेक ठिकाणी २२५ हून अधिक लोक अडकल्याचे वृत्त आहे. त्यांना वाचवण्यासाठी हॅलीकॉप्टर आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत घेण्यात आली असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात रात्रभर अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातल्या देगलुर तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या सीमेलगत कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. यामुळे लेंडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.

मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील रेणा नदीला मोठा पूर आला असून या पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. नांदेड जिल्ह्यात लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने डोंगरगाव येथे २३ गावकरी शनिवारी सकाळी सात वाजेपासून पुरामुळे झाडावर अडकले होते. त्यातील १५ जणांची सुटका केल्याचे समजते.

लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सात पाझर तलाव फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे.

लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर

लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीरबनत चालल्याचे लक्षात येताच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टर मागवले. शिवाय ​ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचीही मदत घेण्यात आली.

लातूरमधील भातखेडाच्या पुलावरुन पाणी गेलं आहे. लातूर ते नांदेड दरम्यानची वाहतूक बंद आहे. तसेच, नांदेडकडून सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरुन पाणी गेल्यानं अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच जळकोट तालुक्यात तलाव फुटून पीकांना मोठं नुकसान झाले आहे.

उदगीरमध्ये तिरु नदीला मोठा पूर आल्याने जवळपास १५० घरांमध्ये पाणी शिरले. पानगावातील रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्यामुळे शनिवारी सकाळी नांदेड-बंगळरू एक्स्प्रेस दोन तास पानगाव रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती.

उस्मानाबादमध्ये रात्रीपासून अतिवृष्टी, ईट, भूम परिसरात जोरदार पाऊस

उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून ईट आणि भूम परिसरात पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यातील तेरणा धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.

बीड जिल्ह्यालाही मोठा तडाखा

बीड जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीडमधील मांजरा नदीलाही पूर आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड मध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय ठिकठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. भुसावळमधील वरणगाव येथील रामपेठ व अयोध्यानगर भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.

पुढील ४८ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ बैठक; शस्त्र व जमावबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय व सुभेदारी गेस्ट हाउसच्या परिसरात मंगळवारी शस्त्र व जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटनांतर्फे मोर्चे, निदर्शने, धरणे, उपोषण होण्याची शक्यता पोलिसांनी गृहित धरली आहे. तसेच या कालावधीत विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्र्यांचे वास्तव्य असणाऱ्या सुभेदारी गेस्ट हाउसमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या परिसरात शस्त्र व जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. या परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येऊन सभा, बैठका, मोर्चे, धरणे, निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही पक्षाचे घातक शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आई, प्रियकराने दिले चिमुकल्यांना चटके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
प्रियकराच्या मदतीने पोटच्या दोन मुलांना चटके देऊन मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांच्या अंगावर चटके बघितल्यानंतर शिक्षकेने विचारपूस केल्यानंतर आई व तिच्या प्रियकराचे बिंग फुटले. शिक्षण संस्थाचालकाने पुढाकार घेऊन तक्रार दिल्यानंतर आई व तिच्या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा रसाडा येथील रहिवासी असलेली पार्वती शंभू गिरी ही महिला काही वर्षांपासून येथील बक्सटार कंपनीत काम काम करते. पतीने सोडून दिल्यानंतर ती प्रियकर नागेश चव्हाण (रा. खामगाव, ता. फुलंब्री) याच्यासोबत बजाजनगर येथे भाड्याच्या खोलीत राहते. तिला पतीपासून रवी (वय ११) व राज (९) ही दोन मुले आहेत. ही मुले बजाजनगर येथील सनराईज इंग्रजी शाळेत अनुक्रमे चौथी व तिसरीमध्ये शिकतात. ही मुले शनिवारी शाळेत आल्यानंतर शिक्षिकेला मुलांच्या पाठीवर, हातावर चटके व मारहाण झाल्याच्या खुणा आढळल्या. त्यांना मायेने जवळ घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी रडतरडत आई व तिच्या प्रियकरकाकडून होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. आई पार्वती व प्रियकर नागेश चव्हाण हे चटके देऊन मारहाण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने ही माहिती शिक्षण संस्थाचालक ज्ञानदेव झरेकर यांना दिली. झरेकर यांनी पुढाकार घेऊन ही माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. पोलिसांनी झरेकर यांच्या माहितीवरून फिर्याद नोंदवून घेऊन पार्वती व नागेश चव्हाण या दोघांना अटक केली.

मुले रिमांड होमध्ये
आई व तिच्या प्रियकराच्या अमानुष मारहाणीमुळे भयभित झालेल्याय दोन्ही मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याची औरंगाबाद येथील एन-१२मधील शासकीय रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल कारभारी देवरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या अधिकाऱ्यांना अम्‍बेसेडरमध्ये पाहुणचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीची जवळपास संपूर्ण तयारी झाली आहे. बैठकीसाठी येणाऱ्या ५० बड्या अधिकाऱ्यांची सोय शहरातील अम्‍बेसेडर हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या सचिव व अप्पर मुख्य सचिवांसाठी शहरातील नामांकित हॉटेल अंजंता अम्‍बेसेडर हॉटेलमधील ५० कक्ष आरक्षित करण्यात आले असून हे अधिकारी हॉटेलचा पाहुणचार घेणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे मंत्री, मुख्य सचिव, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी अशा सुमारे ३०० पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने समित्या तयार केल्या आहेत. यामध्ये मंत्री, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था शहरातील सुभेदारीसह विविध शासकीय विश्रामगृहांमध्ये करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने अपर मुख्य सचिव व प्रधान सचिवांसाठी अम्‍बेसेडरमधील ५० कक्ष आरक्षित केले आहेत.

बैठकीला ‘ताज’चा मेन्यू
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांसह २३ कॅबिनेट मंत्री, मुख्य सचिव, सचिव, प्रधान सचिव आदी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या सुरवातीला चहा-कॉफी सोबत कुकीज आणि ढोकळा देण्यात येईल. दुपारी मिंट आलूवडा, चटणी, व्हेजिटेबल कट्टी रोल, मूग डाळीचा हलवा वाढण्यात येईल. हे पदार्थ हॉटेल ताजमधून मागविण्यात आले आहेत.

सुभेदारीतील मेन्यू
बैठकीतील मंत्री, सचिव, प्रधान सचिव तसेच इतर अधिकाऱ्यांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाचा मेन्यू आहे. सुभेदारीत मुक्कामी राहणाऱ्या अधिकाऱ्यांना सोमवारी रात्री पनीर जहांगीर व मिक्स व्हेज अशा दोन भाज्या, सोबत दाल तडका, भात, लोणचे-पापड, सलाडची चव घेता येईल. स्वीट डिशमध्ये खास शेवयांची खीर चाखता येणार आहे. मंगळवारी सकाळी न्याहरीमध्ये इडली-वडा सांबर, चटणी, पोहे, शिरा आणि चहा-कॉफी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३२०० कोटींची वीजबिल थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील विविध शहरांतील ग्राहकांकडे ३२०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी २६४९ कोटी ही मूळ रक्कम असून त्यावर ५४६ कोटी रूपये व्याज भरावे लागणार आहे.
राज्यातील ३२०० कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी घरगुती ग्राहकांकडे १८६७ कोटी, लघुदाब वाणिज्यक ग्राहकांकडे ४३६ कोटी, शीतगृह असलेल्या ग्राहकांकडे ६ कोटी, सार्वजनिक सेवांकडे १२ कोटी, जाहिराती व होर्डिंग्सकडे २ कोटी, पावरलूम ग्राहकांकडे २४ कोटी, व उच्चदाब ग्राहकांकडे ६०८ कोटींची थकबाकी आहे.
ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेत ७५ टक्के ते १०० टक्के व्याज रक्कम व शंभर टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या तीन महिन्यात मूळ थकबाकी भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची शंभर टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. त्यापुढील तीन महिन्यात व सहामहिन्यांपर्यंत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाची रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. पहिल्या महिन्यात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीमधील पाच टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. थकबाकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षानंतर आकारण्यात येणार आहे.

न्यायप्रविष्ट प्रकरणे
अभय योजनेत लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणातील थकबाकीदारांना लाभ मिळणार आहे. तथापि त्यासाठी आवश्यक असलेली न्यायलयीन परवानगी, प्रक्रिया व त्याचा खर्च या थकबाकीदारांना करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड, लातूरमध्ये पावसाचा हाहाकार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असून बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यामध्ये हाहाकार उडाला आहे. रविवारी (२ ऑक्टोबर) एनडीआरएफ तसेच जिल्हा प्रशासनाकडून पूरात अडकलेल्या ११८ नागरीकांची सुखरुप सुटका करण्यात आली असून गेल्या तीन दिवसात ३०० नागरीकांना सुखरुप सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले आहे. रविवारी झालेल्या पावसामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
नेहमीच दुष्काळी परिस्थिती असलेल्या बीड जिल्ह्यात शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. संपूर्ण शहराला पुराने वेढा दिल्यामुळे रविवारी एनडीआरएफचे चार अधिकारी बीडमध्ये दाखल झाले. रविवारी शहरातील आंबेडकर पुतळा परिसरामध्ये पाण्यात अडकलेल्या १२ नागरीकांना तर मांडवजाई परिसरातून २ जणांची सुटका करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील २७ तसेच औसा तालुक्यात शेतात अडकलेल्या ४० जणांना व जिल्ह्यातील इतर ठिकाणी अडकलेल्या ३६ नागरीकांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले.
रविवारी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात २ जण पुरात वाहुन गेले, नायगाव येथे वीज कोसळून झालेल्या अपघातात १५ वर्षांचा मुलगा ठार झाला. देगलूर येथील दोन मुलांचा मृतदेह तेलंगणा येथील मदनूर परिसरात आढळला, तुळजापूर येथे पावसामुळे घर पडून महिला व मुलाचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातही पाण्यात वाहुन गेलेला एक मृतदेह सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.
एनडीआरएफ तैनात
मराठवाड्यात पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यामध्ये चार अधिकारी रविवारी दाखल झाले. लातूर जिल्ह्यात ४०, औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी ४०, तर नांदेड जिल्ह्यात १७ जणांच्या तुकडीकडून मदतकार्य करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६१ मंडळांमध्ये अतिवृष्टी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. या पावसामुळे मराठवाड्याचा दुष्काळ संपुष्टात आल्याचे चित्र आहे. विभागातील २३ तालुक्यातील ६१ मंडळांत रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळपर्यंत अतिवृष्टी झाली. एकाच दिवसांत विभागात सरासरी ३५.१० मिलिमीटर पाऊस झाला.
मराठवाड्यात वीस दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे औरंगाबाद व हिंगोली वगळता जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड या सहा जिल्ह्यांनी वार्षिक पावसाची सरासरी ओलांडली आहे. बीड, लातूर जिल्ह्याला रविवारी तुफान पावसाने झोडपून काढले. विभागात गेल्या २४ तासांत ३५.१० मिलिमीटर पाऊस पडला. हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा (६५ मिमी), नरसीनामदेव (९२), हत्ता (६७), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी (७९), लिंबगाव (११०), कुरुंला (७२), मुखेड (९२), जांब बु. (१२३), येवती (१०६), जाहूर (८६), चांडोळा (७५), बाऱ्हाळी (९८) या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दुष्काळाने सर्वाधिक होरपळलेल्या बीड जिल्ह्यामधील मांजरसुंभा (९६), लिंबागणेश (१२५), पाटोदा (११६), येरला (१२४), दासखेड (१५९), अंबाजोगाई (९५), घटनांदूर (८५), लो. सावरगाव (७८), बर्दापूर (१४०), पा. ममदापूर (८५), युसुफ वडगाव (६५), मोहखेड (१६५), तेलगाव (११०), धर्मापुरी (९१), लातूर जिल्ह्यातील गातेगाव (६९), तांतुळजा (८२), बाभळगाव (८५), चिंचोली बु. (७०), औसा (८०), भादा (११०), बेलकुंड (६५), रेणापूर (१२०), पोहरेगाव (१२२), कारेपूर (१४४), पानगाव (८७), हेर (१६०), वाढवणा बु. (२८०), नागलगाव (७५), अहमदपूर (६६), किनगाव (८६), खंडाळी (६७), शिरुर (९२), हाडोळती (६९),अंधेरी (७६), चाकूर (१००), वडवळ (८३), झरी बु. (१०२), शेळगाव (११९), जळकोट (९०), घोन्सी (९७), तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद (१५६), तेर (९०), जागजी (७८), केरोगाव (७०), तुळजापूर (१०७), मंगरुळ (१००), इटकूर (६५), भूम (७१) व तेरखेडा (९८) या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

विभागात १०७ टक्के पाऊस
मराठवाड्याचे सरासरी पर्जन्यमान ७७९ मिलिमीटर आहे. विभागात आतापर्यंत ८३४.९९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण १०७.१९ टक्के आहे. जालना (१०७.४६), लातूर (१३२.४५), बीड (११९.१०), उस्मानाबाद (१०३.४४), नांदेड (१०६.८०) व परभणी (१०३.९७) जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. हिंगोली जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुनलेत ९८.९३ तर औरंगाबाद जिल्ह्यात ८४.६१ टक्के पाऊस झाला आहे.

गेल्या २४ तासांतील पाऊस
जिल्हा ............... पाऊस
औरंगाबाद ........... ७.०८
जालना .............. १२.२५
परभणी .............. २९.०९
हिंगोली .............. ३८.००
नांदेड ................ ३२.३१
बीड .................. ५०.६४
लातूर ................. ६९.७५
उस्मानाबाद .......... ४१.६९
.
एकूण ............... ३५.१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images