Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘माथाडीं’ना सुविधांची प्रतीक्षा

$
0
0

औरंगाबाद : माथाडी कामगारांसाठी शासनाने माथाडी मंडळाच्या माध्यमातून कल्याणकारी योजना आखल्या, पण प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे २० हजारांहून अधिक माथाडी कष्टकरी योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत. कायद्याचा आग्रह धरणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकले जाते, असा आरोपही कामगार नेत्यांनी केला आहे.
डोक्यावरून ओझे वाहून नेणाऱ्यांना माथाडी कामगार म्हणतात. माथाडी कामगार ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे. अशासारखी अन्य कामे करतात. हमाल व माथाडी कामगार यांना योग्य वेतन आणि अन्य सुविधा मिळत नव्हत्या. मालकांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असे. १९६६मध्ये (कै.) आण्णा साहेब पाटील यांनी माथाडी कामगार व मुंबई मधील इतर बाजारातील त्याच्या नेत्यांना एकत्र केले. माथाडी कामगार यांनी कायद्याच्या एका भागात यावे, अशी मागणी केली. मोठ्या संघर्षानंतर आणि समितीने दिलेल्या अहवालाचा विचार करून शासनाने माथाडी कामगारांसाठी ‘महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९’ कायदा तयार करण्यात आला.
या कायद्यांतर्गत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. किराणा दुकाने, कागद, लोखंड व पोलाद, कापड, भाजीपाला, वाहतूक, रेल्वे, साफसफाई आदी ठिकाणी हे कायदे लागू आहेत. तेथील नोंदणीकृत माथाडी कामगारांना प्रत्येक महिन्याला मंडळामार्फत मासिक वेतन दिले जाते. त्यात संबंधित कंपनी किंवा आस्थापना मालकास त्या कामगाराच्या श्रमाप्रमाणे निर्धारित वेतन, त्यावर ३० टक्के लेव्हीप्रमाणे रक्कमही माथाडी मंडळाकडे जमा करावी, असा नियम आहे. त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी, उपदान, वैदकीय लाभ, बोनस, सुटीचे वेतन आदी लाभही कायद्याने माथाडी कामगारास देऊन सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सहायक कामगार आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माथाडी मंडळाचे काम चालते. कामगार नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार; जिल्ह्यात सुमारे ४० हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत, पण मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांची संख्या केवळ सात हजारांच्या घरात आहे. त्यापैकी सुमारे तीन हजार कामगारांचे वेतन मंडळामार्फत दिले जात. जिल्ह्यातील शेकडो कामगार या योजनेच्या लाभापासून वंचित असून, कल्याणकारी योजना केवळ कागदोपत्रीच आहेत. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून अनेकदा कामगार रस्त्यावर उतरले. कायद्याचा आग्रह धरणाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते, असा आरोपही अनेकवेळा झाला.

माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, काढून टाकलेल्या नोंदित माथाडींना त्वरित कामावर घ्या, शासकीय गोदामात माथाडी कामगारांची होणारी लूट थांबवा, भाजी मंडईमध्ये माथाडी कायदा लागू करा, कामगारांना कायद्याचे संरक्षण द्या, यांसह माथाडी कामगारांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष सुरू आहे. लाभापासून वंचित माथाडी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे.
- सुभाष लोमटे, कामगार नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भोगवटा’मुळे बिल्डर्स जात्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘वारंवार सूचना करूनही भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या बिल्डर्सवर कायदेशीर कारवाई करा. त्यांना काळ्या यादीत टाका,’ असे आदेश महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी बुधवारी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
बकोरिया यांनी नगररचना विभाग व लेखाविभागाची झाडाझडती घेतली. नगररचना विभागात ते सुमारे एक तास होते. त्यांनी तेथील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या दोन महिन्यांत या विभागातर्फे केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. दोन महिन्यांत समाधानकारक काम झाले असले, तरी कामाची गती वाढवली पाहिजे, असे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. नगररचना विभागात येणारी सर्व प्रकरणे निकाली निघालीच पाहिजेत. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे. जी प्रकरणे निकाली निघण्यासारखी नसतील, त्या प्रकरणात संबंधितांना स्पष्ट कल्पना द्या. नागरिकांना चकरा मारायला लावू नका, असेही त्यांनी बजावले. नगररचना विभागात दाखल झालेल्या प्रत्येक प्रकरणाची नोंद दोन रजिस्टरमध्ये घेतली जाते. बकोरिया यांनी या दोन्ही रजिस्टरची पाहणी केली. येथे दोन रजिस्टरची गरज नाही. एकाच रजिस्टरमध्ये नोंद करीत जा. नगररचना विभाग व प्रशासकीय विभाग यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना केल्या.

दोन वर्षांपासून पेमेंट थकले
नगररचना विभागातून बकोरिया आपल्या दालनात येऊन बसले. तेथे काही कंत्राटदार होते. दोन-दोन वर्षांपासून आमचे पेमेंट मिळत नाही, अशी तक्रार त्यांनी आयुक्तांकडे केली. कंत्राटदारांनी लेखा विभागात सादर केलेल्या बिलांच्या आधारे त्यांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे यादी तोडून पेमेंट होणे शक्य नाही. दोन वर्षांपूर्वीचे बिल असेल तर निघालेच पाहिजे, असे त्यांनी कंत्राटदारांना सांगितले. कंत्राटदार निघून गेल्यावर बकोरिया लेखा विभागात आले. त्यांनी किऑस मशीनची पाहणी केली. कंत्राटदारांची ज्येष्ठता यादी पाळली जाते की नाही, हे देखील तपासले. ज्येष्ठता यादी पाळली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ज्या टेबलवरून चेक्स काढले जातात त्या टेबल जवळ बसून त्यांनी चेक काढण्याची पद्धत समजून घेतली. आरटीजीएसची प्रक्रिया कशी पाळली जाते, याचीही पाहणी केली.

भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासंदर्भात बिल्डर्सना वारंवार कळविण्यात आले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या गृहनिर्माण योजनांसाठी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या बिल्डर्सची यादी तयार केली जाईल. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.
- ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त

बिल्डर्स भोगवटा प्रमाणपत्र देण्यास तयार आहेत, पण महापालिकेने डाक्युमेंटेशनची पद्धत सुटसुटीत केली पाहिजे. प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड आणि बांधकाम परवानगीचा प्लान घेऊन महापालिकेने बिल्डर्सच्या पूर्वीच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र द्यावे. महापालिकेने हे धोरण स्वीकारले, तर प्रमाणपत्र न घेतलेले सर्वच बिल्डर्स भोगवटा प्रमाणपत्र घेतील.
- सुनील पाटील, अध्यक्ष, क्रेडाई, औरंगाबाद शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० बैलांचा अन्न-पाण्याविना मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठेकेदार, अधिकारी वर्गाच्या निष्काळजीपणामुळे छावणी परिसरातील आठवडी बाजारात बुधवारी अन्न, पाण्याविना तडफडून ४० बैलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी ठेकेदार अजिम देशमुख, अक्रम पटेल यांच्यावर पशुसंरक्षण अधिनियम आणि ‌‌वि‌‌विध कलामांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छावणीत गुरुवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारात साधारणतः २ हजार गायी-बैल येतात. आज ३०० पेक्षा जास्त गायी-बैल आले होते. यापैकी सकाळी साडेदहापर्यंत सुमारे २८ बैलांचा अचानक मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्र‌िगेडिअर अनुराग विज यांनी कर्नल गुप्ता यांना तत्काळ घटनास्थळी पाठवले. अतिसार, कुपोषण, अन्न-पाणी पोटात नसणे, अन्नातून विषबाधा आदी प्रकारांमुळे मृतसंख्येचा आकडा वाढला. हे लक्षात येताच पशुवैद्यकीय अधिकारी, आयुक्तांना पाचारण करण्यात आले. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. जी. एन. पांडे व डॉ. एस. बी. कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून डॉक्टरांनी निपचित पडलेल्या बैलांवर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान सुमारे १२ बैल पुन्हा दगावले. स्वच्छता निरीक्षक संतोष बसोले चार दिवसांपासून सुटीवर आहेत. याचा फायदा घेत ठेकेदार अजिम देशमुख यांनी बैलांना चारा, पाणी पुरवला नाही. त्यात या बैलांचा तडफडून मृत्यू झाल्याचे समजते. ही घटना समजताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.

चार दिवसांपासून मृत्यू
छावणीतल्या गुरांच्या बाजारात गेल्या तीन दिवसांपासून मध्यप्रदेश, गुजरात आणि इतर राज्यातून जनावरे विक्रीसाठी येत होती. काही गायी-बैल मागील आठवड्यापासूनच बाजार परिसर होते. त्यांची देखभाल व्यवस्थित ठेवली नव्हती. त्यांना चारापाणी मिळत नव्हते. यामुळे चार दिवसांपासून बैल मृत्यू पावत होते. बुधवारी हा आकडा चाळीसपर्यंत पोहचल्यानंतर प्रकार उघड झाला.

ठेकेदार, सीईओंचे दुर्लक्ष
आठवडी बाजारातील जनावरांचे चारापाणी बंद होते. याकडे ठेकेदार अजिम देशमुख, अक्रमक पटेल यांनी मुद्दाहून दुर्लक्ष केले. छावणीचे ब्र‌िगेडिअर व सीईओ यांनी हे प्रकरण हाताळताना अक्षम्य बेपर्वाई केली. मुक्या जनावरांच्या मृत्यूस ठेकेदार व अधिकारी वर्गातील भ्रष्टाचार कारणीभूत आहे, अशी चर्चा छावणी बाजारात सुरू होती.

ठेकदाराला ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत. गुन्हेगारांना सोडणार नाही. छावणीचे सीईओ विजयकुमार नायर यांना उर्वरित गायी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत. छावणी परिषदेला परिसर स्वच्छ करण्यास सांगितले आहे.
- अमितकुमार, पोलिस आयुक्त

छावणीत कत्तलखाना चालतो. येथे गाई-बैल नेण्यासाठी उपाशी ठेवले जाते. त्यामुळेच बैलांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आम्ही छावणी व पोलिस पोलिस प्रशासनाला वारंवार सांगूनही कारवाई झाली नाही. आज त्यामुळेच बैलांचा मृत्यू झाला.
- वीरेंद्र गायकवाड, ग्रीन स्वस्तिक एनजीओ

ठेकेदार अजिम देशमुख, अक्रम पटेल यांच्या निष्काळजीपणामुळे बैल दगावले. अजून जवळपास ३० गायी आठवडी बाजारात आजारी आहेत. त्यांना अतिसार, कुपोषणाचा त्रास आहे. याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत.
- मयंक पांडे, छावणी युवा विकास मंच

दोन दिवसांपासून सिल्लोडसह विविध ठिकाणाहून गायी येत होत्या. एकेका गाडीत २० गायींऐवजी ७०-८० गायी बसवल्या. यामुळे त्रास झाला व त्यांचा मृत्यू झाला. मी दोन दिवसांपासून पुण्यात होतो. बैलांना काही तरी आजार झाला असेल अशी शंका आहे.
- अजिम देशमुख, ठेकेदार

आठवडी बाजार स्वच्छ करून साफसफाई करण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत. ते आम्ही करू. याशिवाय ठेकेदार, स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करू. दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू. आज बैलांचा मृत्यू खेदजनक बाब आहे.
-विजयकुमार नायर, सीईओ छावणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५९ शिक्षक मोर्चेकऱ्यांना दगडफेकीबद्दल बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या ५९ शिक्षक मोर्चेकऱ्यांना बुधवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मंगळवारी जामा मशीद चौकात मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी जवळपास चार हजार मोर्चेकऱ्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, दगडफेक, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक नागना‌थ कोडे यांनी शासनाच्या वतीने या प्रकरणात फिर्याद दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांना आमखास मैदान येथे थांबवण्यात आले होते. यावेळी मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी चिथावणीखोर भाषण करीत जमावाला भडकावले. तसेच मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या नावाने अश्लील शिवीगाळ करत घोषणाबाजी केली. यामध्ये मंत्रिमंडळ बैठक उधळून लावण्याची चिथावणी देण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन केल्यानंतरही जमावाने पोलिसांचे कडे तोडून सुभेदारीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये १८ पोलिस कर्मचारी, अधिकारी जखमी झाले. यापैकी विशाल बोरसे यांच्या डोक्याला दगडाचा वार लागल्याने त्यांना आठ टाके पडले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत चिथावणी देणाऱ्यांना ताब्यात घेतले.

१२ शिक्षकांना पोलिस कोठडी; ४७ जणांची ‘हर्सूल’मध्ये रवानगी
औरंगाबाद : शिक्षकांच्या मोर्चात मंगळवारी झालेल्या गोंधळात ५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सर्व ५९ मोर्चेकरी शिक्षकांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता सुनावणीनंतर १२ शिक्षकांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सुनावणी दरम्यान या घटनेमागे पूर्व नियोजित कट कारस्थान आहे का, आंदोलकांना हेतुपुरस्सर दगड-काठ्या पुरवण्यात आल्या होत्या का, विविध खात्याच्या मंत्र्यांवर घातपात करण्याचा कट होता का, मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त आणण्यात आलेल्या विविध महत्वाच्या फाईली गहाळ करण्याचा हेतू होता का, या मागे कोण-कोण आहे आदी बाबींचा सखोल तपास करणे बाकी आहे आणि तो पोलिस कोठडीशिवाय शक्य नाही. त्यामुळे आरोपी शिक्षकांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून सिताराम उंधळ्या म्हसकर (७७, रा. मोपाडा, ता. खालापूर, जि. रायगड), मनोज शिवाजीराव पाटील (४०, रा. बालाजीनगर, औरंगाबाद), खंडेराव शिवाजी जगदाळे (४४, रा. शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), शिवराम विश्वनाथ म्हस्के (३३, रा. जोड बोसर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), वाल्मिक सखाराम सुरासे (५२, रा. सिडको एन-४, औरंगाबाद), रविंद्र पदमासिंग मंडावर (३३, रा. वैजापूर, जि. औरंगाबाद), मिर्झा सलीम बेग (५३, सादातनगर, औरंगाबाद), अन्सारी मोहम्मद जावेद (४०, नायगाव, औरंगाबाद), अभिजित दिनकरराव कदम (३३, कातनेश्वर, ता. पूर्णा, जि. परभणी), रमेश सदाशिवराव देशमुख (३९, पाथरी, जि. परभणी), संदीप रामधन देवरे (३७, बेलोरो, ता. जाफ्राबाद, जि. जालना) व दिपक विठ्ठल इंगळे (४१, बेलोरो, ता. जाफ्राबाद, जि. जालना) या आरोपी शिक्षकांना सोमवारपर्यंत (१० ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे, तर इतर ४७ आरोपी शिक्षकांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षकांनी केली अर्वाच्य शिवीगाळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मंत्रिमंडळ बैठकीवर नेण्यात आलेल्या मोर्चामध्ये विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरुवातीपासून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवराळ घोषणा दिल्या. वारंवार समजावल्यानंतरही या घोषणा कमी झाल्या नाहीत, असा उल्लेख पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. या शिवीगाळीचे चित्रण सोशल मिडियावर व्हायरल झाले असून, बुधवारीही त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे मंत्रिमंडळ बैठकीवर बुधवारी ‘अनुदान हक्क मोर्चा’ काढण्यात आला. आंदोलकांपैकी अनेकजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा एकेरी उल्लेख करत, अश्लील शब्दांचा वापर करून घोषणा देत होते, असे पोलिसांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आंदोलनात शिक्षक होते की संस्थाचालकांचे घुसलेले भाडोत्री गुंड होते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिक्षकांनी आंदोलनादरम्यान दिलेल्या घोषणांच्या क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन क्रांतिचौकातून हा मोर्चा निघाला. त्यात अनेक शिक्षक अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करत होते. मोर्चा जस-जसा आमखास मैदानाकडे येत होता, तशा या घोषणा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी मोचेकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, आंदोलकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वातावरण लाठीहल्ल्यापर्यंत गेल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ विद्यमान सदस्यांना ‘धक्का’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर पवार, शिक्षण सभापती विनोद तांबे, बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्यासह १३ दिग्गज सदस्यांचे गट अन्य प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे पुढची राजकीय वाटचाल सुकर करण्यासाठी या मंडळींना दुसऱ्या गटांचा शोध घ्यावा लागेल. अध्यक्ष श्रीराम महाजन यांना मात्र दिलासा मिळाला.
जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी गटांची आरक्षण सोडत निघाली. जिल्ह्यातील राजकीय मंडळींना या क्षणाची कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. आपापले गड सुरक्षित राहावेत, यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले होते. जसजसे आरक्षणाचे गट जाहीर होत होते. तसे प्रस्थापितांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत होती. आजच्या आरक्षण सोडतीत उपाध्यक्ष दिनकर पवार यांचा बोरसर गट सर्वसाधारण (स्त्री) गटासाठी आरक्षित झाला. शिक्षण सभापती विनोद तांबे यांचा विहामांडवा, तर संतोष जाधव यांचा शिल्लेगाव हा गटही दुसऱ्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला. त्यामुळे या मंडळींना पुन्हा जिल्हा परिषदेत येण्यासाठी दुसऱ्या गटांकडे धाव घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य रामदास पालोदकर, भाजप गटनेते ज्ञानेश्वर मोठे, मनसे गटनेते डॉ. सुनील शिंदे, शैलेश क्षीरसागर, शिवसेना गटनेते मनाजी मिसाळ, मनसेचे माजी सभापती बबन कुंडारे, अनिल चोरडिया, माजी सभापती रामनाथ चोरमले, माजी उपाध्यक्ष विजया निकम चिकटगावकर यांच्या गटांचेही आरक्षण बदलले आहे. अध्यक्ष श्रीराम महाजन यांचा गट सर्वसाधारण गटासाठीच सुटल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. गणोरी गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य अनुराधा चव्हाण यांचा गट सर्वसाधारण (स्त्री) गटासाठी सुटला आहे. फुलंब्री तालुक्यातील अन्य तीन गट सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहेत. आमदार बंब गटाच्या पुष्पा जाधव यांचे गाव गट फेररचनेत शिल्लेगाव गटाला जोडले गेले आहे. हा गट सर्वसाधारण (स्त्री) गटासाठी आरक्षित झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. कन्नड तालुक्यातील दिग्गजांना २०१७ च्या निवडणुकीतून जिल्हा परिषदेत येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सोडतीनंतर थेट सर्कल
आरक्षण सोडतीत दिलासा मिळालेल्या काही सदस्यांनी थेट सर्कल गाठून मोठ्या गावातून भेटीगाठींनाही सुरुवात केली. फुलंब्री तालुक्यातील लढती यंदा अधिक लक्षवेधक होण्याची चिन्हे आहेत. काही इच्छुकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट सर्कल गाठून ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्सपोर्ट हबच्या माध्यमातून रोजगारातही होणार वाढ

$
0
0

ट्रान्सपोर्ट हबच्या माध्यमातून रोजगारातही होणार वाढ
'ट्रान्सपोर्ट हब' मध्ये गॅरेजपासून गोदामापर्यंत सर्व सुविधा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
'ट्रान्सपोर्ट हब'साठी करोडी येथील जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आल्यामुळे कित्येक वर्षांपासून रेंगाळलेला ट्रक पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय शहरातील ट्रक वाहतुकीलाही आळा बसणार आहे.
औरंगाबाद शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आला आहे. शिवाय डीएमआयसीच्या माध्यमातून अनेक उद्योग औरंगाबादेत येणार आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट नगरी उभारण्याची मागणी उद्योजक, व्यापारी आणि औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून केली जात होती. करोडी येथे होणाऱ्या या ट्रान्सपोर्ट हबमध्ये माल गोदामापासून गॅरेजपर्यंत आणि कामगारांसाठी मनोरंजनाच्या सुविधाही दिल्या जाणार आहेत. ट्रान्सपोर्ट हब लवकरात लवकर तयार झाल्यास या ठिकाणी रोजगारही वाढेल, असा विश्वास ट्रान्सपोर्ट असो‌सिएशनने व्यक्त केला आहे.
करोडीच्या गट क्र. २४ मध्ये ट्रान्सपोर्ट हबसाठी जागा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गट क्र. २४ या गटात औरंगाबाद आरटीओ कार्यालय, महापालिका, महावितरण, लॉ विद्यापीठासह आणखी दोन संस्‍थांना जागा देण्यात आली आहे. तसेच मराठा व महार या समाजांच्या स्मशान भूमीसाठीही येथेच जागा देण्यात आली आहे. या सर्वांना जागा दिल्यानंतर सध्या ८० एकर जागा ट्रान्सपोर्ट हबसाठी मिळणार असल्याचे संकेत एमएसआरडीसी विभागाकडून देण्यात आले आहे.
औरंगाबाद-नाशिक रोडपासून हे हब साडेतीन किमी, तर ‌एएस क्लबपासून ३०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे करोडीची जागा ट्रान्सपोर्ट हबसाठी अनुकूल आहे. या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या हबमध्ये औरंगाबाद शहरातील वाहतूकदारांची गोदामे, ट्रक थांबविण्यासाठी पार्किंग, तसेच छोट्या वाहनांसाठी जागा, बॉडी बिल्डींगचे गॅरेज, ट्रक दुरुस्ती, अॉटो पार्टसची दुकाने, वजन काटा, याशिवाय वाहन चालकांसाठी विश्रांतीगृहे, हॉटेल, स्वच्छतागृहे, मनोरंजनासाठी थिएटर उभारण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या भागात रोजगारही उपलब्ध होईल. जी जड वाहने औरंगाबाद शहरात थांबतात, ती करोडीत थांबणार आहेत. औरंगाबादमार्गे परराज्यात जाणाऱ्या वाहनांनाही या ठिकाणी थांबता येणार आहे.
भविष्यात माळीवाडा कंटेनर डेपोचाही विस्तार केला जाणार आहे. रेल्वे लाइन जवळ असल्याने याचा फायदा स्‍थानिक वाहतूकदारांना मिळेल. याशिवाय एनएच २११, तसेच नागपूर मुंबई एक्सप्रेस-वे झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढणार आहे. ही वाहने रात्रीच्या मुक्कामास ट्रान्सपोर्ट नगरात थांबू शकतील.
सध्याचे चित्र
सध्या औरंगाबादेत येणारे ट्रक वाळूज एमआयडीसीच्या क्षेत्रात उभे केले जातात. काही खासगी लोकांनी ट्रक टर्मिनलची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी या गाड्या उभ्या केल्या जातात.
आकडेवारीत ट्रक -लॉरी
१९८६ - ३९९७
१९९६ - ४३६६
२००६ - ७२९१
२०१६ - १३११९ (ऑगस्ट २०१६ पर्यंत)
मागील २५ वर्षांपासून ट्रान्सपोर्ट नगरीसाठी जागा मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. या मागणीसाठी आरटीओ सर्जेराव शेळके यांनीही पाठपुरावा केला. विभागीय आयुक्तांच्या पुढाकारामुळे ही जागा मिळाली आहे. यामुळे वाहतूक कोंडी, तसेच ट्रान्सपोर्टर्सला चांगल्या सुविधा या हबमध्ये उपलब्‍ध होणार आहेत. यातून औरंगाबाद शहराच्या विकासालाही ट्रान्सपोर्टर्सचा मोठा हातभार लागेल. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार.
फय्याज खान, अध्यक्ष औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिऐशन
औरंगाबाद शहरात दररोज शेकडो ट्रक येतात. त्यांच्या पार्किंगसाठी ट्रान्सपोर्ट हबची गरज होती. ही जागा मिळाल्याने ट्रक चालकांची सोय होणार आहे. हा हब तयार केल्यामुळे ट्रकसाठी गॅरेज, अॉटोमोबाईल आणि इतर सुविधा एकाच ठिकाणी मिळतील. शहरातील जड वाहनांची समस्याही संपणार आहे.
असद अहमद, उपाध्यक्ष, औरंगाबाद ट्रान्सपोर्टर असोसिऐश
ट्रक टर्मिनलसाठी २५ वर्षांपासून असोसिएशनची मागणी होती. तत्कालीन मनपा आयुक्‍त असीमकुमार गुप्ता यांच्या काळात घोषणा करण्यात आली होती. मात्र, जागा मिळाली नाही. जागेचा शोध सुरू होता. अखेर करोडी येथे विभागीय आयुक्तांच्या पुढाकाराने जागा मिळाली आहे. असोसिएशनची मागणी पूर्ण केल्यामुळे वाहतूकदारांना लाभ मिळेल.
जयकुमार थानवी, सचिव, औरंगाबाद ट्रान्सपोर्टर असोसिऐशन
ट्रान्सपोर्ट नगरीची शहराला गरज होती. याबाबत विभागीय आयुक्तांशीही चर्चा झाली होती. वाहतुकीच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक होता. यामुळे औरंगाबादच्या ट्रान्सपोर्ट उद्योगाला चालना तर मिळणारच आहे, शिवाय रोजगारही वाढेल.
सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्मरणीय लढाईचे डॉक्युमेंट्रीतून जतन

$
0
0

संस्मरणीय लढाईचे डॉक्युमेंट्रीतून जतन
आसईची लढाई झाली चित्रबद्ध
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात नामशेष होत असताना संस्मरणीय घटनांचा विसर पडत आहे. इतिहासाचा सखोल अभ्यास करून नवीन मांडणी करण्याचे प्रयत्न थांबले आहेत. या पार्श्वभूमीवर आसईच्या लढाईवर तरूण चित्रकर्मींनी अभ्यासपूर्ण ‘डॉक्युमेंट्री’ तयार केली आहे. इंग्रज-मराठे यांच्यातील लढाईवर माहितीपटातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे.

आसई (ता. जाफ्राबाद) येथे २३ सप्टेंबर १८०३ रोजी इंग्रज-मराठा युद्ध झाले होते. भारतात प्रवेश केल्यानंतर इंग्रजांनी लष्करी सामर्थ्याच्या बळावर वेगवेगळी राज्ये जिंकली. १८१८ मध्ये पेशव्यांचे अधिराज्य संपले; मात्र, त्यापूर्वी स्वराज्याचे जतन करण्यासाठी मोठा संघर्ष झाला. या पार्श्वभूमीवर आसईच्या लढाईचे वेगळे महत्त्व आहे. शिंदे, होळकर व भोसले यांनी एकत्रितपणे इंग्रजांचा सामना केला. या एक दिवसाच्या लढाईत इंग्रजांची सरशी झाली. या लढाईचे प्रतीक असलेले स्मृतीस्थळ अजूनही उभे आहे. स्मृतीस्थळाचे जतन करण्यासाठी सभोवताली संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. काळाच्या ओघात स्मृतीस्थळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इतिहासाचा आढावा नवीन माध्यमाद्वारे घेण्याचा प्रयत्न युवा दिग्दर्शक विश्वास कोलते यांनी केला आहे. इतिहास अभ्यासक आणि स्थानिकांशी चर्चा करून अभ्यासपूर्ण संहिता लिहिण्यात आली. या संहितेनुसार दोन दिवस आसई येथे चित्रीकरण करण्यात आले. ऑर्थर वेल्सली विरूद्ध मराठे असा संघर्ष माहितीपटात मांडला आहे. माहितीपटाचे सहाय्यक दिग्दर्शन अजिंक्य गुठे आणि छाया दिग्दर्शन विजय शिंपी यांनी केले. लढाईच्या २१३ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त आसईला माहितीपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला फुलंब्री येथील संत सावता माळी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. विजय पांडे, निर्माता-दिग्दर्शक विश्वास कोलते, सहाय्यक दिग्दर्शक अजिंक्य गुठे सालेगावकर, छाया दिग्दर्शक विजय शिंपी आणि सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हादराव इंगळे उपस्थित होते. ‘युद्ध स्थळाच्या चित्रीकरणासह संपूर्ण मांडणीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. परिसरातील इतिहासाची सर्वसामान्यांना आणि नवीन पिढीला माहिती देण्यासाठी माहितीपट निर्मिती केली’ असे कोलते यांनी सांगितले. आसई येथे सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या जुई फाउंडेशनने या उपक्रमसाठी विशेष सहकार्य केले. यावेळी प्रा. शालीग्राम इंगळे, रमेश इंगळे, तुळशीराम लोखंडे, गजानन इंगळे, विजय इंगळे, डॉ. कैलास इंगळे, दत्तू कोरडे, भाऊसाहेब कोरडे आदी उपस्थित होते.

सोशल मीडियाचा वापर

‘आसईची लढाई’ ही डॉक्युमेंट्री यू-ट्यूबद्वारे सर्वांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. स्वतंत्र फेसबुक अकाउंटही तयार करण्यात आले आहे. इतिहास संशोधक आणि विद्यार्थ्यांना लढाईचा सविस्तर तपशील उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

कोट

सध्या अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक वास्तू काही वर्षानंतर नामशेष होतील. सद्यस्थितीत चित्रीकरण आणि लेखन या माध्यमातून त्यांचे जतन करणे शक्य आहे. डॉक्युमेंटेशन प्रकार नेहमी दुर्लक्षित राहिला आहे. आपल्या ऐतिहासिक घटनांचा तपशील टिपण्यासाठी डॉक्युमेंट्री प्रभावी माध्यम आहे.

- अजिंक्य गुठे, सहाय्यक दिग्दर्शक

इंग्रज-मराठा युद्धासाठी आसई गावाचे महत्त्व आहे. दोनशे वर्षांपूर्वी घडलेल्या लढाईची सविस्तर माहिती सर्वांना उपलब्ध करुन देण्यासाठी माहितीपट निर्मिती झाली. अभ्यासकांना माहितीपटाचा निश्चित उपयोग होईल.

- डॉ. कैलास इंगळे, समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनावरे जाणीवपूर्वक ठेवली उपाशी

$
0
0

जनावरे जाणीवपूर्वक ठेवली उपाशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीच्या आठवडी बाजारात गायी-बैल मृत्युमुखी पडल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी सिल्लेखान्यात जनावरांची अवैधरित्या कत्तल करणारे रॅकेड उघडकीस आले. बुधवारी छावणीत मरणासन्न आढळलेल्या गायींना उपचारासाठी नेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्याच गायी गुरुवारी सिल्लेखान्यात पोलिसांना आढळल्या. या गायी-बैलांना जाणीवपूर्वक उपाशी ठेवले जात असल्याचेही लक्षात आले.

जनावरांची अवैध कत्तल करणारे हे रॅकेट या जनावरांना उपाशी ठेवण्याचा प्रकार जाणीवपूर्वक करीत असल्याचे दिसून आले आहे. जनावराच्या पोटात काही नसल्यास त्याला कापल्यानंतर फेकून देण्यासारखे जास्त अवशेष मिळत नाही. उरलेल्या अवशेषांची ड्रेनेजलाइनमध्ये विल्हेवाट लावणे सोपे जाते म्हणून त्यांना जाणीवपूर्वक उपाशी ठेवून त्यांची कत्तल करण्याचा प्रकार घडत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सिल्लेखान्याची नाकेबंदी

पोलिसांनी या कोंबिग ऑपरेशनची जय्यत तयारी केली होती. ‌सिल्लेखान्याला चारही बाजूने घेरण्यात आले होते. रस्त्यावरच्या व्यक्तीला देखील थांबवण्यास मनाई करण्यात आली होती. कोणी विरोध केल्यास तो प्रखरपणे मोडून काढण्याच्या प्रयत्नात पोलिस उतरले होते. मात्र, तशी वेळ आली नाही.

जनावरांची काळ कोठडी

पोलिसांनी या जनावरांची सुटका केली. यावेळी एका एका खोलीत दहा जनावरे जनावरे दाटीवाटीने कोंबून ठेवल्याचे चित्र दिसून आले. या जनावरांना जिवंत राहण्यासाठी हवा मिळावी म्हणून त्या ठिकाणी फक्त एका फॅनची व्यवस्था करण्यात आली होती.

दरवाजे तोडून काढले बाहेर

पोलिसांना जनावरांची कत्तल नेमकी कोणत्या ठिकाणी सुरू आहे याची माहिती होती. या घरमालकांनी दरवाजे उघडण्यास नकार दिल्यानंतर हे दरवाजे तोडून या खाटकांना बाहेर ओढण्यात आले व जनावरांची सुटका करण्यात आली.

रक्ताळलेले अश्रू

काही जनावरांची नुकतीच कत्तल करण्यात आली असल्याचे यावेळी दिसून आले. या जनावरांचे तोंड धडापासून कापून वेगळे ठेवण्यात आले होते. या जनावरांच्या डोळ्यातून मृत्युपूर्वी रक्ताश्रू बाहेर आलेले असल्याचे दिसून आल्याने छापा टाकणारे कर्मचारी देखील हळहळले.

शहरातील सिल्लेखाना भागात कोंबिग ऑपरेशन राबवून अवैध कत्तलीसाठी आाणलेली जनावरे जप्त करण्यात आली आहेत. दौलताबाद येथे देखील मध्यंतरी अवैध मांसाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारावरून शहरात जनावरांची अवैध कत्तल करणारे रॅकेट सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. शहरात कोणत्याही प्रकारे जनावरांची अवैध कत्तल होऊ देणार नाही. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

अमितेशकुमार - पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी बाजारात शुकशुकाट

$
0
0

छावणी बाजारात शुकशुकाट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील गुरांच्या आठवडी बाजारात आणलेल्या गायींना चार दिवसांपासून उपाशी ठेवत चारापाणी न दिल्यामुळे ४० गायी-बैलांचा बुधवारी (५ ऑक्टोबर) मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर दर गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार आज (६ ऑक्टोबर) भरला नाही. संपूर्ण बाजारात आज शुकशुकाट पाहायाल मिळाला.
याआधी बाजारत आलेल्या गायींकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या गायी कुपोषण आणि पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडल्या होत्या. या गायींना छावणी परिषदेत बेकायदेशीरपणे चालवल्या जात असलेल्या कत्तलखान्याकडे रवाना करण्यासाठी उपाशी ठेवण्यात आले होते, असा आरोप छावणीतील नागरिकांनी आणि ग्रीन स्वस्तिक संस्थेने केला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बाजार भरवू नये, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. या आदेशाचे पालन करत हा गुरांचा बाजार भरला नाही. या आदेशाची अंमलबजावणी ठेकेदार आणि छावणीचे सीईओ विजयकुमार नायर यांनी केली. दरम्यान, येथील बाजारात बुधवारी निपचित पडलेल्या गायी गुरुवारी उपचारासाठी पाठवू असे सांगण्यात आले होते, परंतु या गायी व बैल शहरातील सिल्लेखाना भागात आढलल्याने एकच खळबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्यांक समाजाने एकजूट दाखवावी

$
0
0

अल्पसंख्यांक समाजाने एकजूट दाखवावी

आमदार अस्लम शेख यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जातीयवादी शक्तींचा बिमोड करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने एकजूट दाखवण्याची गरज आहे. काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून जातीयवादी शक्तींना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन अल्पसंख्यांक समितीचे प्रमुख आमदार अस्लम शेख यांनी केले.

जिल्हा काँग्रेस समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, कल्याण काळे, नितीन पाटील, हमद चाऊस, मोहसीन अहेमद, प्रभाकर मुठ्ठे पाटील, भाऊसाहेब जगताप, अय्युब खान, अब्दुल नावीद, सोहेल खान, इब्राहिम पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार अस्लम शेख म्हणाले, ‘अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. देशाचा गौरवशाली इतिहास पाहता अल्पसंख्यांक समाजाचा देखिल सिंहाचा वाटा आहे. काँग्रेसच्या राजवटीतच अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचे काम झाले आहे.’

अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व वक्फ बोर्डाचे अध्यक्ष माजी आमदार एम. एम. शेख म्हणाले, ‘अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून गोरगरीब महिलांनाही आर्थिक लाभ देणारी योजना काँग्रेस पक्षाने राबवली आहे. काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी काम केलेले असल्यामुळेच आज समाज प्रगतीपथावर दिसत आहे.’ यावेळी अल्पसंख्यांक समितीचे समन्वयक हमद चाऊस, इ्ब्राहिम यांनी मार्गदर्शन केले. अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खालेद पठाण यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार यांनी आभार मानले. कार्यक्रमास मीर हिदायत अली, अकिल पटेल, मुजाहेद पटेल, सैफ फेरोज खान, आतिष पितळे, लियाकत पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभीम फेस्टीव्हल आजपासून

$
0
0

जयभीम फेस्टीव्हल आजपासून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कला, साहित्य, क्रीडा व समाज प्रबोधनाचा जागर असलेल्या तीन दिवसीय जयभीम फेस्टिव्हल आजपासून (शुक्रवारी) मिलिंद कॉलेजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल परिसरात सुरुवात होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त या फेस्टिव्हल आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता उद्‍घाटन होणार असून अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे उपस्थित राहणार आहेत. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्‍घाटनानंतर परिवर्तनवादी भीमबुद्ध गीतांचा व कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे.

फेस्टिव्हलच्या समारोप रविवारी होणार असून त्यात माजी मंत्री गंगाधर गाडे यांना जीवनगौरव देण्यात येणार असून जिल्हाधिकारी निधी पांडेय यांना रमाई पुरस्कार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासह रमेश खंडागळे, डॉ. वैशाली प्रधान, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, पत्रकार संजय मिस्त्री, शेखर मगर आदींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, ‘धर्म ही अफुची गोळी’ या नाटकाचे सादरीकरण सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्यानंतर संभाजी भगत आणि संच प्रस्तूत शिवराय ते भीमराय विद्रोही शाहिरी जलसा सादर होईल. मिलिंद मोरे यांचा भीम पहाट हा कार्यक्रम ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता होणार असून भीमनगर भावसिंगपुरा येथील विविध विकासकामाचे उद्‍घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता तर सायंकाळी सहा वाजता ‘महासूर्य’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक चेतन कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव

$
0
0

वैद्यकीय प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव

आज सुनावणी

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाचे ५३४ जागांचे प्रवेश कॅप राऊंडविना झालेले आहेत. हे प्रवेश रद्द करून पुन्हा नव्याने तिसरी फेरी घ्यावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. के. सोनवणे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद येथील रेणुका चंदनशिव या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केली. रेणुका हिला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता, पण तिला प्रवेश मिळाला नाही. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने रिक्त जागा सामुदायिक वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून (सीईटी) भरणे गरजेचे होते, पण तसे न करता संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयाला प्रवेशासाठी अर्ज करण्यास सांगितले. महाविद्यालयांना गुणवत्ता यादी तयार करण्याचे व त्याआधारे २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान प्रवेश देण्याचे निर्देश दिले. खासगी महाविद्यालयांनी मर्जीप्रमाणे गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथील एसपीएम मेडिकल महाविद्यालय, खटाव तालुक्यातील इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल कॉलेज सायन्सेस या तीन वैद्यकीय महाविद्यालयांनी २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यासाठी कॅप राऊंडही झाला नाही. अशा एकूण ५३४ जागा कॅप राऊंड न घेता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला नाही म्हणून रेणुका हिने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्याची बाजू सिद्वेश्वर ठोंबरे हे मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साई’मध्ये चार खेळांचा अभ्यासक्रम

$
0
0

‘साई’मध्ये चार खेळांचा अभ्यासक्रम
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मास स्पोर्टस् पार्टिसिपेशन’ योजनेअंतर्गत साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात तिरंदाजी, बॉक्सिंग, हँडबॉल व जिम्नॅस्टिक्स या चार खेळांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. १८ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत हा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे.
देशातील सहा साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रांत विविध खेळांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. तिरंदाजी, बॉक्सिंग, हँडबॉल, जिम्नॅस्टिक्स (औरंगाबाद), क्रिकेट, हँडबॉल, कबड्डी, व्हॉलिबॉल (गांधीनगर), बॅडमिंटन, हेल्थ अँड फिटनेस, खोखो, व्हॉलिबॉल (गुंटूर), क्रिकेट, हेल्थ अँड फिटनेस, जलतरण, व्हॉलिबॉल (भुवनेश्वर), बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल (पाचोरी), सेपक टकरॉ, वुशू (इम्फाळ) या सहा साई क्रीडा केंद्रांत २१ खेळांचा अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत.
या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती देताना उपसंचालक वीरेंद्र भांडारकर म्हणाले, ‘प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी होण्याकरिता दहावी व बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वैयक्तिक अथवा सांघिक क्रीडा प्रकारांत पहिले तीन क्रमांक मिळवणारे खेळाडू, क्रीडा संघटक यात सहभागी होऊ शकतील. २० ते ४० वर्षे वयोगटातील खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. हा अभ्यासक्रम सहा आठवड्यांचा आहे. या कालावधीत प्रत्येकाला स्पोर्ट्स कीट, गणवेश, क्रीडा साहित्य सोबत आणणे अनिवार्य आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पिकांना फटका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पडलेल्या अतिवृष्टीने ओला दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तीन लाख ऐंशी हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असताना आतापर्यंत सरासरी ८३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तब्बल १२५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४४ सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. मांजरा, बिंदुसरा, माजलगाव धरणातून पाणी खाली सोडले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे.
अनेक गाव तलाव आणि पाझर तलाव फुटल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पावसाने जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बीड जिल्ह्यात सात लाख ३१ हजार पेरणी क्षेत्र होते. यापैकी या पावसाने जिल्ह्यातील तीन लाख ऐंशी हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, बाजरी यासारख्या खरीप पिकाचे नुकसान झाले असल्याचा अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे.
तीन लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे, असा जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी एकत्रित अहवाल सरकारी दरबारी पाठवला आहे. जिल्ह्यात तीन लाख ३४ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. त्यातील एक लाख अकरा हजार हेक्टरवरील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान पावसाने झाले आहे. कापूसनंतर सोयाबीन पिकाचा पेरा झाला होता. जिल्ह्यातील दोन लाख १७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले होते. त्यातील दोन लाख चार हजार हेक्टरवर सोयाबीन पावसाने बाधित झाले आहे. तूर पीक मात्र, त्यातुलनेत पावसाने बाधित झाले नाही. केवळ आठ हजार हेक्टरवरील तुर पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीने १५ जण वाहून गेले
खरीप पिकाच्या नुकसानी बरोबर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने १५ जण वाहून गेले. ४५ लहान जनावरे व २४ मोठी जनावरे अशी एकूण ६९ जनावरे पुरात वाहून गेली आहेत. ५५ महसूल मंडळामध्ये १ हजार १४४ गावे या अतिवृष्टीने प्रभावित झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणे भरूनही उस्मानाबादमध्ये पाणीकपात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उजनीसह उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, रूईभर धरण शंभर टक्के भरले असून उस्मानाबाद शहर व परिसरातील जलसंकट टळले आहे. मात्र, अद्यापही आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करण्यावर उस्मानाबाद नगरपालिका ठाम आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचे पाण्याचे भोग अद्यापही कायमच आहेत.
उस्मानाबाद शहराचा पाणीपुरवठा सतत विस्कळीत होतो. त्याचे प्रत्यंतर उस्मानाबादकर गेल्या चार ते पाच वर्षांपासून अनुभवत आहते. गेली तीन वर्षे दुष्काळामुळे उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणारया तेरणा, रूईभर धरणातील पाणीसाठा संपल्याचा बहाणा उस्मानाबाद नगरपालिका करीत होती. तर उजनी पाणीपुरवठा योजनेतही अनेक तांत्रिक त्रृटी दर्शवित शहरवासियांना दोन, चार आणि त्यानंतर तर दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण उस्मानबाद नगरपालिकेने अवलंबिले.
उस्मानाबाद शहराला पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा नव्हे तर नियोजनाचा अभाव विस्कळीत झाला की बैठकीचे सत्र अवलंबून महावितरणसह प्रशासनाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आजवर सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, असाही सत्ताधारी म्हणून तेही तितकेच जबाबदार आहेत. याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला आहे. उस्मानाबाद शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमीत व्हावा यासाठीच्या ठोस उपाययोजना करण्याच्यादृष्टीने नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाकडून अपे‌क्षित पुरेसे प्रयत्न देखील झाले नाहीत, हे वास्तव आहे. म्हणूनच जलसाठा पुरेसा असो वा नसो उस्मानाबाद शहराचा पाणीप्रश्न मात्र, कायम असल्याचे चित्र वर्षानुवर्षे पहावयास व अनुभवयास मिळत आहे.
यंदा वरूणराजा प्रसन्न झाल्याने उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेले तेरणा, रूईभरसह अन्य लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्याशिवाय उजनी पाणीपुरवठा योजनेसाठीचे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणही शंभर टक्के भरले आहे. यामुळे आनंदित झालेले उस्मानाबाद नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उत्साहाच्या भरात व नगरपालिका निवडणुकीचे भान लक्षात ठेवून चक्क मुबलक नव्हे तर नियोजित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची भाषा करू लागले आहेत. मात्र, सध्या शहरात होणाऱ्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या वस्तुस्थितीचे भान नाही, हेच यातून जाणवते. केवळ आता पाणीसाठा मुबलक आहे, म्हणून दररोज पाणीपुरवठा करण्याची भाषा सत्ताधारी व पदाधिकारी नगरसेवक करू लागले असले तरी ही बाब व्यवहार्य नाही. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबर शहरातील अंतर्गत जलवितरण व्यवस्था सुधारणे व क्षमता वाढविण्याची शिवाय त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
दररोज पाणीपुरवठा करण्याचे गाजर
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दररोज मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना ते शक्य झाले नाही. आता जिल्ह्यात तसेच उजनी धरणात मुबलक जलसाठा असूनही ते जमेल याची खात्री वाटत नाही. मात्र, केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालिकेतील सत्ताधारी असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नेतेमंडळी आता दररोज पाणीपुरवठा करू अशी गाजराची पुंगी वाजवू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लेखान्यात पोलिस कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी सिल्लेखाना परिसरात गुरुवारी पहाटे कोंम्बिग ऑपरेशन करून कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल ५० जनावरांची सुटका केली. तेथे दहा जनावरे मृतावस्थेत आढळली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बुधवारी छावणी येथील आठवडी बाजारात ४० जनावरे मृत्युमुखी पडली होती. तेथील उर्वरित मरणासन्न जनावरांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्याचे आदेश देण्यात आले होते. या जनावरांना उपचारासाठी न पाठविता कत्तलीसाठी सिल्लेखान्यात आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
सिल्लेखान्यात जनावरांची अवैध कत्तल होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली होती. त्यावरून गुरुवारी पहाटे कोंम्बिग ऑपरेशन करण्यात आले. महापालिकेचे अवैध कत्तल विरोधी पथकही पोलिसांसोबत होते. गुन्हे शाखा, विशेष शाखा व क्रांतिचौक या ठाण्यातील सुमारे १२५ पोलिस अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती दल यांसह वज्र वाहन तैनात करण्यात आले होते.
पोलिसांनी शोधमोहीम राबवून वाड्यांत व इमारतींच्या तळमजल्यांत छापे टाकले. पाच ठिकाणी दहा जनावरे मृतावस्थेत पोलिसांना आढळली. तेथून पोलिसांनी ५० जनावरांची सुटका केली. यामध्ये २९ गायी, कालवड, २१ बैलांचा समावेश असल्याची माहिती क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली. पोलिसांनी मुतालिक वहाब कुरेशी, मोईन कुरेशी, महेबूब बाबुमिया कुरेशी, सत्तार बशीर कुरेशी व अखिल खलील कुरेशी यांच्यासह एकावर गुन्हा दाखल केला.

छावणीची जनावरे कत्तलीसाठी!
छावणीच्या आठवडी बाजारात बुधवारी ४० जनावरे मृत्युमुखी पडली होती. तेथे अनेक जनावरे मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले होते. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी छावणीला भेट देऊन या जनावरांना उपचारासाठी हलविण्याचे आदेश दिले होते, मात्र ठेकेदाराने ही जनावरे उपचारासाठी न पाठवता कत्तलीसाठी पाठवली होती. जनावरे कोणाची आहेत हे स्पष्ट व्हावे म्हणून त्यांच्या पाठीवर मालकाच्या नावाचे इंग्रजी अद्याक्षर लिहिले होते. छावणीतील जनावरांच्या पाठीवर अशाच खुणा होत्या. हीच जनावरे सिल्लेखान्यात पाठविण्यात आली असल्याची माहिती आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली होती. पोलिसांना सिल्लेखान्यात आढळलेली जनावरे छावणीतीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६९ मेडिकल स्टोअर्स बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाने १७६ औषध दुकानदारांचे परवाने निलंबित केले असून, ६९ दुकानदारांचे परवाने रद्द केले आहेत. गेल्या पाच महिन्यांत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधिक परवाने रद्द करण्यात आले आहेत.
मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट नसल्याच्या तक्रारी एफडीएकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या‌ जिल्ह्यांत कारवाई करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये फार्मासिस्ट नसणे, बिलांच्या नोंदी नसणे, फार्मासिस्टच्या गैरहजेरीत औषधांची विक्री करणे, बिले न देणे, विनापरवाना होमिओपॅथिक औषधविक्री करणे, मादक औषधी व गर्भपाताशी संबंधित औषधविक्रीचा तपशील न ठेवणे; तसेच औषधे व सौंदर्यप्रसादने कायद्याचे उल्लंघन करणे आदी प्रकार आढळल्याने या १७६ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २०, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद लातूर येथे १५६ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर एफडीएने ६९ दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. परवाने निलंबित केल्यानंतर ७४ दुकानदारांनी कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, पाच महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाने उघडलेल्या विशेष मोहिमेत ६८१ जणांवर कारवाई केली, पण या सर्व दुकानदारांनी कोर्टात स्थगिती मिळविली आहे.

हा तर पाण्याचा बुडबुडा
मेडिकल दुकानदारांवर केलेली ही कारवाई फार छोटी आहे. यापेक्षा मोठ्या कारवाया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या औषधांचे उत्पादक व विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएचे सहायक आयुक्त राजकुमार झाडबुके यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र संघास दुहेरी मुकुट

$
0
0

महाराष्ट्र संघास दुहेरी मुकुट
राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वरंगल (तेलंगणा) येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरशालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटातील विजेतेपदासह दुहेरी मुकुट पटकावला.
मुलींच्या १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा २-० ने पराभव केला. एकेरी लढतीत महाराष्ट्र संघाने १९-२१, २१-१०, २१-९ अशा फरकाने विजय मिळवून आघाडी घेतली होती. आरती चिनकेने पिछाडी भरून काढत या सामन्यात विजय नोंदवला. दुहेरीचा सामना निकिता साळुंके व वैशाली लाटे या जोडीने २१-१७, २१-१३ असा जिंकून महाराष्ट्राचे सुवर्णपदक निश्चित केले. या गटात दिल्ली संघाने ब्राँझपदकाची कमाई केली.
मुलांच्या १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्र संघाने दिल्ली संघावर २-१ ने मात करून सुवर्णपदक जिंकले. एकेरी लढत किशन धोत्रेने २१-१७, २१-१६ अशा फरकाने जिंकली. दुहेरीत महाराष्ट्राच्या हिरो शेख, ईश्वर लाहमगे या जोडीला चुशीच्या सामन्यात २०-२२, २१-१६, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. परतीच्या एकेरी सामन्यात स्वप्नील जाधवने २१-१६, १९-२१, २१-११ असा विजय मिळवून महाराष्ट्राच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. चंद्रशेखर साठे, मनोज चव्हाण यांची त्याला सुरेख साथ लाभली. या संघास प्रमोद महाजन, भाग्यश्री पाटील, सदाशिव सावळे, करण खोमणे यांचे मार्गदर्शन लाभले. या गटात गुजरात संघाने ब्राँझपदक मिळविले. या स्पर्धेत तांत्रिक समिती प्रमुख म्हणून गणेश माळवे यांनी, तर पंच म्हणून धर्मसिंग जडेजा, जुलाह खुदूस, गजानन शिंदे, गणेश पाटील, नागेश कान्हेकर यांनी काम पाहिले. भारतीय टेनिस व्हॉलिबॉल महासंघाचे सरचिटणीस डॉ. व्यंकटेश वांगवाड, ऋषी अवस्थी, सतीश कोटा यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादच्या पाणीपुरवठ्यावर वीज संकट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तेर, वलगुड येथील पाणीपुरवठा योजनेचे महाराष्ट्र जीवन प्र्धिकरणकडील एक कोटी ४५ लाख रुपये वीज बिल थकले आहे. त्यामुळे येथील वीज पुरवठ्याची जोडणी खंडीत करण्यात येणार असल्याची मा‌हिती उस्मानाबाद येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता पी. एन. पोहणीकर यांनी दिली. यामुळे येत्या काळात उस्मानाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.
तेर व गोवर्धनवाडी येथून पाणी पुरवठ्यासाठी वीज दिली जाते. तेर येथे एक कोटी १३ लाख रुपये तर वलगुड येथील वीज बिल १८ लाख रुपये थकीत आहे.
लोकमंगलला कारणे दाखवा नोटीस
लोहारा येथील लोकमंगल सहकारी साखर कारखान्यातील वीज वापरात अनियमीतता आढळून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकाराला वीज चोरी असे म्हणता येणार नाही, असे स्पष्टीकरण महावितरणचे अधीक्षक अभियंता पी. एन. पोहणीकर यांनी दिले आहे. अनियमीतता संदर्भातील अहवाल दक्षता पथकाकडून प्राप्त झाल्यानंतर व लोकमंगलकडून नोटीसीचे उत्तर देण्यात आल्यानंतर त्या संदर्भात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images