Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

योजना गुंडाळल्याने गरजू वंचित

$
0
0



औरंगाबाद : गैरव्यवहार, थकित रक्कम आदी कारणांमुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अनेक कल्याणकारी योजना बंद आहेत.
महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना कंपनी अधिनियम, १९५६ (१) च्या तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दिनांक ११ जुलै, १९८५ रोजी केली. राज्यातील दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविणे, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या बारा पोट जातीतील व्यक्तींना महामंडळ अर्थसहाय्य करते, पण गेल्या काही वर्षांत त्यात सातत्य राहिले नाही. महामंडळात झालेला अनागोंदी कारभार, गैरव्यवहारसंबंधी झालेले आरोप आदी कारणांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य गरजूंना बसत आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळातर्फे मुदत कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज योजना आदी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी केंद्रीय महामंडळ राज्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास निधी देते. मुदत कर्ज योजनेत पाच लाखांपर्यंत कर्ज लाभार्थींना दिले जाते. सुमारे दहा हजार रुपयांची सबसिडी, मंडळाच्या कर्ज रक्कमेवर चार टक्के व्याज दर असतो. मात्र, गेल्या काही दोन ते तीन वर्षांपासून या योजनेसह केंद्रीय मंडळाच्या बहुतेक योजना बंद आहेत.

पाच वर्षांपासून प्रशिक्षण बंद
राज्य शासनामार्फत विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना, बीजभांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, भाग भांडवल तसेच विविध व्यावसायिक प्रशिक्षण योजना राबविल्या जातात. मात्र, यापैकी अपवाद वगळता बहुतेक योजना गेल्या दोन वर्षांपासून कागदोपत्रीच आहेत. प्रशिक्षण योजना गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. बीज भांडवल योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील सुमारे दीड हजार अर्जदार प्रतीक्षेत आहेत. २५ हजार रुपये अर्थ सहाय्य करणारी थेट कर्ज योजनाही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राबविली नाही.

काही वर्षांपासून कल्याणकारी योजना केवळ कागदोपत्री ठेवण्याचे काम सुरू आहे. परिणामी, कोणताही दोष नसताना अनेक गरजू लाभापासून वंचित आहेत. - बाबा तायडे, माजी अशासकीय सदस्य, समाज कल्याण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा-मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी याचिका

$
0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठा व मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे म्हणून मराठा-मुस्लिम आरक्षण कृती समितीने मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर ७ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
मराठा मुस्लिम आरक्षण कृती समितीचे सचिव राजेंद्र दाते पाटील, शेख मसुद शेख महेबूब व किशोर चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात ५ जानेवारी २०१५ रोजीच याचिका केली आहे. राज्य शासनाने शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग व विशेष मागास वर्ग तयार करून त्या प्रवर्गांतर्गत मराठा व मुस्लिम समाजाच्या आरक्षणामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजास ५ टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण दिले. आरक्षण देताना मुस्लिम समाजातील नोंद न झालेल्या इतर ५० जातींना सुद्धा आरक्षण मान्य करून शासकीय, निम शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण याला केतन तिरोडकर यांनी आव्हान दिले. या याचिकेत येथील समितीने हस्तक्षेप अर्ज केला आहे.
भारतीय राज्य घटनेतील विविध तरतुदी ज्यामध्ये भारताच्या संविधानाचा अनुच्छेद पंधरावा खंड ५ सोळाचा खंड ४ संविधानाच्या अनुच्छेद ३० च्या खंड एक आणि अनुच्छेद १५ (४ व ५) यासह अनुच्छेद ४६ चा विशेष करून उल्लेख केला आहे. करवीर संस्थान यांच्या शासकीय सेवामध्ये मराठा समाजाचा १४९ क्रमांकावर, तर मुस्लिम समाजाचा २२८ क्रमांकावर आरक्षणा अंतर्गत समावेश असल्याचा महत्वपूर्ण पुरावा सादर केला आहे. ब्रिटिशकालीन मुंबई प्रांतामध्ये २३ एप्रिल १९४२ च्या निर्णयात मराठा व मुस्लिम समाजास आरक्षण असल्याचा पुरावा दिला आहे. मुस्लिम आरक्षणाबाबत गोविंद सिंह समिती, डॉ. राजेंद्र सिंह समिती, डॉ. रंगनाथ मिश्रा समिती यांच्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठीच्या शिफारसींचे पुरावे व ऐतिहासिक महसूल पुरावे जोडले आहेत. याचिकाकर्त्याची बाजू अनिल गोळेगावकर हे मांडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : जिद्दीच्या बळावर मिळाले फळ

$
0
0

makarand.kulkarni@timesgroup.com
Tweet : @makarandKMT
औरंगाबादपासून जवळच बनगाव येथील नरहरी बापूराव मुरमे हे नवीन पिढीच्या शेतकऱ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्व. गावाजवळ लहुकी मध्यम प्रकल्पाच्या उभारणीत त्यांची वडिलोपार्जित शेती गेली. त्यातून तुटपुंजी रक्कम मिळाली. १९७२ मध्ये या पैशात काही पैसे समाविष्ट करून गावाजवळच पडिक असलेली पाच एकर जमीन मुरमे यांनी घेतली. उदरनिर्वाहासाठी ते दुसऱ्याचा ट्रॅक्टर चालवित. शेतात एक विहीर. गहू, ज्वारी, मका या पारंपरिक पिकांसोबत बाजरी हे मुख्य पीक घेतले जात होते. बनगावची बाजरी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. पारंपारिक पीके किती दिवस घ्यायची ? असा प्रश्न त्यांना होता. दहा वर्षांपूर्वी नरहरी मुरमे यांनी सीड प्लॉटचा प्रयोग केला. टरबूज, वांगी, वालाच्या शेंगांचा प्रयोग यशस्वी झाला. पाणी कमी पडू नये, यासाठी त्यांनी आणखी एक विहीर केली. तीन वर्षांनंतर आणखी एक प्रयोग राबविताना डाळिंबाची लागवड केली. अडीच एकरात भगवा जातीच्या डाळिंबाची ८०० झाडे लावली. ही रोपे तालुक्यातील जडगाव येथून आणली. नाविन्यपूर्ण शेती करण्यासाठी आग्रही असलेल्या नरहरी मुरमे यांनी पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी ठिबक सिंचन केले होते. डाळिंब लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला. नगदी पीक म्हणून डाळिंब शेती पाहिली गेली. मुरमे यांच्या शेतातील डाळिंब नाशिकच्या बाजारपेठेत विक्रीला जातात. दरम्यान शेतीच्या कामासाठी त्यांनी एक ट्रॅक्टर घेतला. डाळिंबाचे क्षेत्र वगळून उर्वरित ठिकाणी कापूस, चिकूची लागवड केली. पाण्याचे नियोजन अजून योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी त्यांनी सरकारी योजनेतून शेततळे घेतले. कमी जमिनीत नाविन्यपूर्ण शेती करताना नियोजन केल्यास कसा फायदा होतो, हे मुरमे यांनी दाखवून दिले आहे. त्यांची दोन मुले शिक्षक आहेत. वयाची साठ वर्षे पार केल्यानंतरही नरहरी मुरमे यांचा शेतीतील उत्साह वाखाखण्याजोगा आहे. कापूस चिकू, डाळिंबासह सध्या फ्लॉवर आणि पावसाळी कांदा त्यांच्या शेतात बहरला आहे. शेतीसाठी मुरमे यांनी जिद्द बाळगली आणि त्याचे फळ त्यांना बहरलेल्या शेतीच्या रुपात मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ ऑक्टोबर रोजी भूमिका जाहीर करणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मुकुल मंदिर शाळेतून निवृत्त व्हायचे की नाही, या बद्दलची अधिकृत भूमिका आपण वाढदिवसाच्या दिवशी (२७ ऑक्टोबर) जाहीर करणार आहोत,’ असे शाळेचे संस्थापक निर्मलदादा यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.
‘मुकुल मंदिरचे निर्मलदादा निवृत्त होणार ?’ या मथळ्याखाली ‘मटा’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर निर्मलदादा यांच्या हितचिंतकांनी त्यांना फोन करून, प्रत्यक्ष भेटून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुकुल मंदिर शाळा निर्मलदादा यांनी उभारली. या शाळेला नावारुपाला आणले. आता याच शाळेत त्यांच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होऊ लागली आहे. आपल्याच शाळेत आपल्याला डावलले जात आहे, असे त्यांना मनोमन वाटत आहे. मात्र, ही भावना त्यांनी अद्याप कुणाकडे बोलून दाखवली नाही. त्यांच्या अंतरंगाला ‘मटा’ ने वाट मोकळी करून दिल्यावर आज सकाळपासून निर्मलदादा यांना त्यांच्या हितचिंतकांनी फोन करून, प्रत्यक्ष भेटून संयम राखण्याचा सल्ला दिला. निवृत्तीचा विचार मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगत त्यांना धीर दिला. ‘मटा’ शी बोलताना निर्मलदादा म्हणाले, ‘मुकुल मंदिर शाळेतून निवृत्ती घेण्यासंदर्भात वाढदिवसाच्या दिवशी २७ ऑक्टोबर रोजी आपण भूमिका जाहीर करणार आहोत. अजून तेरा चौदा दिवस बाकी आहेत. तो पर्यंत आपण विचार करणार आहोत. काही जणांशी चर्चा करणार आहोत,’ असे संकेत त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटप्रकरणी साक्षीदारास धमक्या

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
५२ लाखांच्या लूट प्रकरणातील जप्ती पंचनाम्याच्या साक्षीदारास जिवे मारण्याची धमक्या दिल्याची जिल्हा कोर्टाने तत्काळ दखल घेऊन साक्षीदारांना संरक्षण देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी पोलिस आयुक्तांना नुकतेच दिले. तसेच या प्रकरणाचा तपास करुन अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, ‘झेविअर्स एज्युकेशन ट्रस्ट’चे व्यवस्थापक दीपक पद्मनाभ पुजारी यांनी ही फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा २१ जून २०१४ रोजी ट्रस्टचे ५२ लाख रुपये मलकापूर अर्बन बँकेत जमा करण्यासाठी कारमधून निघाला होता. रावदेव हॉस्पिटललगत दोन अनोळखी तरुण दुचाकीवर आले आणि त्यांनी कारला हुलकावणी देत कारचालकाशी वाद सुरू केला. त्याचवेळी आणखी तीन अनोळखी तरुण आले आणि त्यांनी चालकाशी वाद घालत कारमधील ५२ लाख रुपयांची बॅग पळविली. यातील एका आरोपीला फिर्यादीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्याचदिवशी पोलिसांनी सर्व पाच आरोपींना अटक केली. सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, या प्रकरणातील जप्ती पंचनाम्याचा साक्षीदार बाबासाहेब किसन चौधरी (रा. चिकलठाणा, औरंगाबाद) यांना कोर्टात साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार साक्षीदार बाबासाहेब चौधरी हे साक्ष देण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर झाले असता, आरोपीच्या नातेवाईकांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे कोर्टापुढे सांगून तसा लेखी विनंती अर्जही सादर केला.

अहवाल सादर करण्याचे आदेश
साक्षीदार चौधरी यांच्या अर्जानुसार, आरोपीच्या नातेवाईकांनी साक्ष न देण्यासाठी जिवे मारण्याच्या प्रत्यक्ष धमक्या दिल्या. तसेच खोट्या केसेसमध्ये अडकवण्याबाबतही धमकावले. त्याचवेळी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान दोन वेगवेगळ्या मोबाईल फोनवरूनही सतत धमक्या आल्याचे साक्षीदार चौधरी यांनी लेखी अर्जात म्हटले होते. या अर्जाची तत्काळ दखल घेत, पोलिस आयुक्त तसेच सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण देण्याचे आदेशही जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद दर्शन @ ८० रुपयांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात येणारे पर्यटक आणि हौशी फिरस्त्यांसाठी एक खूशखबर. समग्र औरंगाबाद दर्शन फक्त ८० रुपयांत तेही एकाच बसमधून करण्याची सोय परिवहन विभागाने केली आहे. या बसची सुरुवात शुक्रवारपासून होणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून २००६-०७मध्ये अशी बस सुरू होती. मात्र, काही दिवसानंतर ती बंद करण्यात आली. एसटीने तत्कालीन विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांच्या काळातही औरंगाबाद दर्शन बससेवा सुरू केली होती. आतापर्यंत चार वेळा पर्यटन बसचे प्रयोग करण्यात आले. मात्र, एमटीडीसीची सेवा वगळता इतर कोणत्याही बसला प्रतिसाद मिळाला नाही. वर्षभरापूर्वी औरंगाबाद अजिंठा आणि औरंगाबाद वेरूळ अशी वातानुकूलित बस सेवा सुरू झाली. या सेवेला मिळालेल्या प्रतिसादानंतर औरंगाबाद दर्शन बस सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना विभाग नियंत्रक आर. एन. पाटील म्हणाले. ‘औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळांसाठी बससेवा सुरू करावी ही मागणी होती. मिडी बसच्या माध्यमातून शुक्रवारपासून ही सेवा सुरू करत आहोत.’

...असे आहे वेळापत्रक

- सकाळी ७ वाजून ३० मनिटांनी पहिली फेरी सुरू
- दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी बसस्थानकावर
- दुपारी १ वाजता दुसरी फेरी सुरू होणार
- सायंकाळी ६ वाजता बसस्थानकावर

...असा आहे मार्ग

मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, एमटीडीसी क्रांतिचौक, औरंगपुरा, खडकेश्वर, पोलिस आयुक्त कार्यालय, पानचक्की, विद्यापीठ, सोनेरी महाल, औरंगाबाद लेणी, बीबी-का-मकबरा, आमखास मैदान, शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, दिल्ली गेट, हॉटेल ताज, जळगाव टी पॉइंट, रेणुका माता मंदिर, गरवारे स्टेडियम, कलाग्राम, प्रोझोन मॉल, विमानतळ, हॉटेल रामा इंटरनॅशनल, हायकोर्ट, गजानन महाराज मंदिर, सूतगिरणी, क्रीडा संकुल, शहानूर मियॉं दर्गाह, संत एकनाथ रंगमंदिर, क्रांतिचौक, बाबा पेट्रोल पंप, सिद्धार्थ उद्यान ते मध्यवर्ती बसस्थानक.

संकेतस्थळावर बुकिंग

http://public.msrtcors.com व http://www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर औरंगाबाद दर्शन बस सेवेसाठी बुकिंग करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग, पर्यटनाच्या वाढीसाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगभरातील बौद्ध राष्ट्रांबरोबर भारतीय बौद्धांचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध मैत्रीपूर्ण करून सहकार्याची भावना निर्माण व्हावी. होतकरूंना रोजगार, व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्यात. बौद्ध राष्ट्रांतील उद्योजकांनी औरंगाबादेत गुंतवणूक करावी, असा उद्देश इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलच्या आयोजनामागे आहे. या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक भिक्खू एम. धम्मज्योती थेरो यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आणि बौद्ध धम्मदीक्षा समारंभास ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टने शहरात प्रथमच इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. बीड बायपास रोडवरील जबिंदा इस्टेटच्या मैदानावर शुक्रवारी सकाळी आठ वाजता या फेस्टिव्हलला सुरुवात होईल, अशी माहिती भिक्खू एम. धम्मज्योती थेरो यांनी दिली.
श्रीलंका येथे सात वर्षे वास्तव्य केले त्यानंतर अनेक बुद्धिस्ट देशांत जाण्याची संधी मिळाली. तेथील फेस्टिव्हल, सेम‌िनारमध्ये सहभाग घेतला. भारत ही बुद्धभूमी असल्याने अन्य बौद्ध राष्ट्रे भारतभूमीकडे मोठ्या आदराने पाहतात. जीवनात एकदा तरी भारतात यावे, असे अशी तेथील नागरिकांची भावना असते. जगभरातील बौद्ध राष्ट्रांबरोबर भारतीय बौद्धांचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध निर्माण करून एकमेकांशी सहकार्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी या फेस्टिव्हलचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. या राष्ट्रांमधील उद्योजकांनी औरंगाबादेत गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामाध्यमातून येथील होतकरू तरुणांसाठी व्यवसाय किंवा रोजगारांच्या, प्रशिक्षणाच्या संधी कशा निर्माण व्हाव्यात, यावर भर असेल. त्यासाठी येत्या जानेवारी महिन्यात खास उद्योजकांच्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतात.या फेस्टिव्हलच्या माध्यमातूनही त्याला हातभार लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भिक्खू एम. धम्मज्योती थेरो यांनी सांगितले. बुद्धिस्ट सर्किट अधिक प्रोमोट करण्यात येणार असून, वेरूळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांसह औरंगाबादेत अधिकाधिक पर्यटकांनी भेटी द्याव्यात, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

आज उद‍्घाटन
तिबेटचे लामा लोब्जोंग यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार असून, देश विदेशातील भिक्खू उपस्थित राहणार आहेत. श्रीलंकेतील माजी मुख्यमंत्री शशीद्र राजपक्ष यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पशूसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदींची उपस्थिती राहणार अाहेत. आमदार संजय शिरसाट अध्यक्षस्थानी असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन संचालनालयाचे कार्यालय औरंगाबादेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपली संस्कृती, प्राचीन वारशामुळे जगभरातील पर्यटकांना अजिंठा, वेरूळची प्रचंड ओढ आहे. देश-विदेशातील पर्यटकांना आपण येथे आणू शकतो, ही आपली शक्ती असल्याचे सांगत पर्यटनाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पर्यटन संचलनालयाचे कार्यालय औरंगाबाद येथे सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वेरूळ लेणीच्या पायथ्याशी शुक्रवारी वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, आमदार प्रशांत बंब, सुभाष झांबड, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, प्रधान सचिव वल्सा नायर, डॉ. के. एच. गोविंदराज, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय आदींची उपस्थिती होती.
‘उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे सुरांचा हा कार्यक्रम लवकरच सुरू व्हावा, म्हणून मी कमी वेळ घेईल,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले,‘एखाद्या राज्याचा किंवा देशाचा विकासाचे मोजमाप हे रस्ते, इमारतींवरून नव्हे, तर तेथील संस्कृती किती समृद्ध झाली यावरून होते. आपली संस्कृती समृद्ध अाहे. महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय असलेल्या आपल्या लेण्या, वारसा जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.’
राज्यात ‘व्हिजिट महाराष्ट्र-२०१७’ या उपक्रमाचा भाग म्हणून; तसेच औरंगाबाद आणि परिसरातील पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत अाहे. शुलीभंजन-दौलताबाद- म्हैसमाळ टूरिझम सर्किटला दिलेली मान्यता, आंतरराष्ट्रीय विमाने औरंगाबादेत यावी यासाठी विमानतळ विस्तारीकरणासाठी घोषित केलेल्या २०० कोटी रुपयांच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. प्रास्ताविकात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी, कोजागरीच्या पूर्वसंध्येस पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला करत हा कार्यक्रम राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
आमच्याकडे पर्यटनाचा खजिना आहे, हे आम्ही जगाला दाखवू इच्छितो. दिल्ली, आग्रा आणि औरंगाबाद हे पर्यटनाच्या दृष्टीने सारखीच महत्त्वाचे शहरे आहेत. आपल्याकडे पर्यटन आणि संस्कृतीचा असलेला खजीना जगासमोर आणायचा अाहे. हा महोत्सव म्हणजे व्हिजिट २०१७ची नांदी असल्याचेही पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले.

अजिंठ्याची प्रतिकृती चीनमध्ये
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘चीनमधील ड्युनहाँग येथील जगप्रसिद्ध प्राचीन लेण्या पाहण्यासाठी गेलो होतो. तेथे लेण्यांचा इतिहास सांगण्यात आला. हजारो वर्षांपूर्वी एक व्यक्ती अजिंठा येथून सिल्करुटने चालत आला व त्यांनी तेथील लोकांना ट्रेनिंग देऊन या लेण्या तयार केल्या. मूळ लेण्या अजिंठा येथे असून, ड्युनहाँग येथील लेण्या या अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांची प्रतिकृती असल्याचे सांगण्यात आले. यावरून आपला वारसा किती समृद्ध आहे, हे स्पष्ट होते, पण चीनने तेथील लेण्यांचे मार्केटिंग प्रभावी पद्धतीने केले. त्यामुळे तेथील लेण्यात मूळ असल्याचे पर्यटकांना वाटते. मूळ लेण्या अजिंठा येथे असल्याची माहिती तेथे देण्यात येते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑरिकमध्ये जपानी उद्योग येण्याची शक्यता

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात औरंगाबादेत साकारणाऱ्या ऑरिक सिटीमध्ये जपानी उद्योग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डीएमआयसी सरव्यव्यवस्थापक गजानन पाटील, एमआयडीसीचे जॉइंट सीइओ आबासाहेब जऱ्हाड हे जपान दौऱ्यावर असून त्यांनी तोशिबा या जगप्रसिद्ध कंपनीसह सहा उद्योगांशी ऑरिकमध्ये गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली.
डीएमआयसीच्या देशभरातील टप्प्यांमध्ये औरंगाबादजवळील शेंद्रा टप्प्याचे काम देशात सर्वाधिक वेगाने झाले. पायाभूत सुविधांचे काम सध्या सुरू आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय उद्योग यावेत, यासाठी राज्य सरकारच्या उद्योग विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या आठवड्यात उद्योग विभागाचे प्रधान सचिव आणि एमआयडसीचे जॉइंट सीइओ कोरिया दौऱ्यावर गेले होते. त्याठिकाणी काही उद्योगांनी ऑरिकमध्ये येण्यास उत्सुकता दर्शविली. त्यानंतर दहा ऑक्टोबर रोजी गजानन पाटील आणि आबासाहेब जऱ्हाड जपान दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी तोशिबा, सुवा इंडस्ट्रिअल इन्व्हेस्टर्स तसेच अन्य सहा बड्या उद्योगांशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तोशिबा कंपनीसोबत झालेली चर्चा सकारात्मक झाली. या उद्योगांनी ऑरिकमध्ये येऊन गुंतवणूक करावी, यासंदर्भात अधिकाऱ्यांनी मार्केटिंग केले. तोशिबाची बेंगलुरू मध्ये मोठी गुंतवणूक असून एनर्जी सिस्टीम्स, इंडस्ट्रिअल सिस्टीम्स, स्टोरेज अँड इलेक्ट्रॉनिक्स उफकरणे बनविण्यात ही कंपनी जगात प्रसिद्ध आहे. तोशिबाचा उद्योग ऑरिकमध्ये आला तर शहराचा औद्योगिक चेहरामोहरा बदलून जाणार आहे. एमआयडीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी जपान दौऱ्यावर गेल्याचे सांगितले.

जपानमधील उद्योग ऑरिकमध्ये आले तर औद्योगिकदृष्ट्या औरंगाबादला मोठा लाभ होणार आहे. बहुराष्ट्रीय मोठी कंपनी येण्याचा सकारात्मक परिणाम पुढील उद्योगवाढीसाठी होत असतो. - आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी सुट्यांबाबत अजब न्याय

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना दिवाळी सुटीचे वेगवेगळे वेळापत्रक जाहीर करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अजब न्याय दिला आहे. या वेळापत्रकांमुळे संभ्रमावस्था वाढली असून तब्बल आठवडाभर आधी प्राथमिक विभागाची शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दहा ऑक्टोबर रोजी दिवाळी सुटीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार २४ ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर या वेळेत प्राथमिक विभागाला सुटी जाहीर केली गेली. पूर्वी २८ ऑक्टोबरपासून सुटी देण्यात येणार होती. माध्यमिक विभागाच्या दिवाळी सुटीचे वेळापत्रक शुक्रवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्या स्वाक्षरीने जाहीर केले गेले. त्यानुसार माध्यमिक शाळांना २८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर अशी १६ दिवस सुटी राहील. १३ नोव्हेंबर रोजी रविवार आणि १४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीच सुटी आहे. त्यामुळे शाळा १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. १७ ते २७ ऑक्टोबर दरम्यान नववी व दहावीच्या प्रथम सत्र परीक्षा पूर्वीच जाहीर केल्या आहेत. या पत्रानंतर शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी मोगल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्याची शिक्षण विभागाच्या इतिहासात ही पहिली घटना असावी. प्रशासनाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. - प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना

प्राथमिक व माध्यमिक हे दोन्ही संवर्ग एकच आहेत. दिवाळीच्या सुट्या एकत्रितपणे द्यायला हव्यात. प्रशासनाने दुजाभाव करू नये. यामुळे संभ्रम वाढणार आहे. - काकासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

एकसारखेपणा असला पाहिजे. दिवाळीची सुटी २८ ऑक्टोबरपासूनच असायला हवी होती, पण प्रशासनाने बदल केला. प्राथमिक विभागाचे वेळापत्रक बदलल्यामुळे चार दिवस सुट्या कमी मिळाल्या. - दिलीप ढाकणे, कार्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षा एेकताच स्वतःवर वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सासरच्यांसह पतीने पत्नीला छळछळ छळले. लग्नानंतरच्या दुसऱ्याच महिन्यात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. कोर्टात साक्ष-पुराव्यांवरून गुन्हा सिद्ध झाला. कोर्टाने खुनी पतीला शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) जन्मठेप ठोठावली. ही शिक्षा ऐकताच पतीने सोबत आणलेल्या ब्लेडने भर कोर्टात स्वतःच्या गळ्यावर सपासप वार केले. भर कोर्टात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आणि पोलिसांनी जखमी आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर आत्महत्येचाही गुन्हा नोंदवला.
जिल्हा कोर्टातील तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांच्या कोर्टात शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता हा प्रकार घडला. या प्रकाराने कोर्ट परिसर काही वेळेसाठी स्तब्ध झाला होता. पोलिसांनी खुनी आरोपी मुकेश विश्वनाथ चौधरी (रा. शिगाईत, ता. जामनेर, जि. जळगाव) याला तात्काळ ताब्यात घेतले आणि घडल्या प्रकाराबद्दल वेदांतनगर पोलिस चौकीला कळविण्यात आले. काही वेळेतच वेदांतनगर पोलिसांनी खुन्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

खून करून आल्यानंतरही नाटक
खुनी आरोपी मुकेश चौधरी खासगी कंपनीत नोकरीला होता आणि नक्षत्रवाडीतील कांचननगरमध्ये भाड्याच्या घरात राहात होता. घटनेच्या दिवशी म्हणजे १५ मार्च २०१० रोजी आरोपी मुकेश त्याची पत्नी माधुरी हिला संध्याकाळी सहा वाजता फिरायला घेऊन गेला होता, मात्र रात्री आठ वाजता तो एकटाच परतला आणि घराच्या मागच्या बाजुने घरात घुसताना घरमालकासह शेजारच्यांनी त्याला रक्ताच्या कपड्यांनी माखलेल्या अवस्थेत पाहिले. घरमालकासह इतरांनी आपल्याला ओळखल्याचे लक्षात येताच त्याने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले होते. त्याला घाटीत नेले असता, डॉक्टरांनी तपासून तो ठणठणीत असल्याचे सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या खुनी पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सव्वालाख हुंडा देऊनही फ्रीज, कूलर व इतर वस्तू दिल्या नाहीत म्हणून सासरच्यांसह पतीने पत्नीला छळले आणि लग्नानंतरच्या दुसऱ्याच महिन्यात नक्षत्रपार्कच्या पूर्व डोंगराच्या पायथ्याशी पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी खुनी पतीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी शुक्रवारी ठोठावली.
या प्रकरणी मृत विवाहिता माधुरी हिचे वडील भगवान गोविंद पाटील (रा. मोहाडी, ता. जामनेर, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी मुकेश विश्वनाथ चौधरी (रा. शिंगाईत, ता. जामनेर, जि. जळगाव) याच्याशी फिर्यादीची मुलगी माधुरी हिच्याशी २० जानेवारी २०१० रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर माधुरी ही शिंगाईत येथील सासरच्या घरात सासू, सासरे, दीर व पतीसोबत एकत्र राहात होती. विवाहावेळी माधुरीच्या माहेरच्यांनी एक लाख २१ हजार रुपयांचा हुंडा दिला होता. विवाहानंतर १५ दिवस माधुरीला सासरच्यांनी चांगले वागवले. मात्र त्यानंतर फ्रीज, कूलर व इतर वस्तू पाहिजेत म्हणून माधुरीला टोचून बोलणे, मारहाण करण्याचे प्रकार सासरच्यांनी सुरू केले. दरम्यान, आरोपी मुकेश याला औरंगाबादच्या ‘व्हेरॉक’मध्ये नोकरी लागली म्हणून दोघे नक्षत्रवाडी परिसरातील कांचननगर येथे एकनाथ नीळ यांच्या घरात भाड्याने राहण्यासाठी आले. या घरातही सासू-सासरे अधून-मधून येत होते व सासरच्यांकडून माधुरीचा छळ सुरू होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी म्हणजेच १५ मार्च २०१० रोजी संध्याकाळी सहा वाजता आरोपी मुकेश पत्नी माधुरी हिला फिरायला घेऊन गेला. त्यांना घराबाहेर पडताना घरमालक व शेजारी जयवंताबाई वेताळ यांनी पाहिले. मात्र, रात्री आठ वाजता आरोपी एकटाच घरी परतला आणि घराच्या मागच्या बाजुने घरात शिरताना आवाज आला म्हणून शेजारी जयवंताबाई यांनी घरमालकाला आवाज दिला. घरमालक धावत आला आणि रक्ताने माखलेल्या कपड्यांनिशी आरोपी मुकेश त्यांच्या दृष्टीस पडला. आपल्या ओळखल्याचे आरोपीच्या लक्षात येताच आरोपीने पडण्याचे नाटक केले. तो कुणाशीच काहीच बोलेना म्हणून पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस हेड कॉन्स्टेबल गणपत सोनुने यांनी आरोपीला घाटीत नेले असता, त्याला काहीही झाले नसल्याचे डॉक्टरांनी तपासून स्पष्ट केले. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल नारायण बुट्टे यांनी रात्री एक वाजता आरोपीला त्याच्या घरात आणले असता, तिथे मृत माधुरीचे वडील व इतर नातेवाईक आले होते. तिथे चौकशी केल्यानंतर आरोपीने पत्नी माधुरीचा खून केल्याचे कबूल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकिस्तानी कलाकारांना शहरातही बंदी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाकिस्तानी कलाकार असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे प्रदर्शन न करण्याची भूमिका आता शहरातील सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनीही घेतली आहे.
मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर असोसिएशनने ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला सिंगल स्क्रीन थिएटर उपलब्ध करून न देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयाला शहरातील सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनीही पाठिंबा दिला आहे.
सध्या शहरात सादिया, स्टेट, गुलजार, अंबा, अप्सरा, अभिनय, अभिनित अशी सात चित्रपटगृहे ही सिंगल स्क्रीन थिएटर म्हणून ओळखली जातात. या चित्रपटगृह मालकांनी पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांना प्रदर्शित करण्याकरिता थिएटर उपलब्ध करून न देण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरातील एकही सिंगल स्क्रीन थिएटर ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला मिळणार नाही. चित्रपट निर्माता भाड्याने चित्रपटगृह मागत असतील तरीही थिएटर देणार नसल्याची भूमिका थिएटर चालकांनी मांडली आहे.

पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटाला थिएटर उपलब्ध करू न देण्याच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून होत असलेले सीमा भागातील हल्ले पाहता आणि लोकांच्या मनातील राग पाहता असे निर्णय आवश्यक आहेत. आम्हीही या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहोत. - कैसर खान, संचालक, स्टेट टॉकीज, शहागंज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् नववीचे विद्यार्थी बनले लेखक!

$
0
0

Manoj.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @manojkulkarniMT
औरंगाबाद ः ‘काळा रंग भावनात्मक दृष्टीने वाईट, नकारात्मक असतो. मात्र, प्रत्येक काळा फळा विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो,’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे हे वाक्य त्यांच्या जंयतीदिनी एका शिक्षकाने सार्थ ठरवले आहे. त्यांच्यामुळेच नववीतले विद्यार्थी ‘झेप’ हा चरित्रग्रंथ लिहून लेखक बनले आहेत. राज्यातला हा पहिलाच आगळावेगळा प्रयोग ग्रामीण प्रशाला माडज (ता. उमरगा) शाळेतील.
गेल्या वर्षी वाचन प्रेरणा दिनाची सुरुवात झाली. हा दिन साजरा करताना शाळेतील उपक्रमशील शिक्षक बालाजी मदन इंगळे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम व इतर व्यक्तींची चरित्रे विद्यार्थ्यांना वाचायला दिली. तुम्ही सुद्धा असे चरित्र लिहिणार का, असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरुवातीला त्यांनी वेगवेगळी चरित्रे बारकाईने वाचली. एखादे चरित्र लिहिण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा अभ्यास केला. मग गावातील कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती घेतली. गावच्या विकासात ज्यांनी योगदान दिले, अशी नावे निश्चित केली. मग त्या व्यक्तींची भेट घेत त्यांना बोलते केले. त्यांची मुलाखत घेत माहिती संकलन केली. जे व्यक्ती हयात नाहीत त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. त्यानंतर या माहितीची वर्गवारी केली आणि स्वतःच्या भाषेत एकूण दहा व्यक्तींचे चरित्र लिहून 'झेप' हा ग्रंथ तयार केला. गेल्यावर्षी वाचन प्रेरणा दिनापासून सुरू झालेली ही प्रक्रिया यावर्षीच्या वाचन प्रेरणा दिनाला पूर्ण झाली.
डॉ. कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा खरा उद्देश, या विद्यार्थ्यांनी साध्य केला. हे विद्यार्थी चांगले वाचक झालेच, पण भविष्यातील भावी लेखक म्हणूनही त्यांची वाटचाल सुरू आहे.

सहभागी विद्यार्थी
उपक्रमांमध्ये ज्योती किशोर गायकवाड, प्रिया प्रेमनाथ घंटे, वैष्णवी व्यंकट गाडे, मेघा नंदकुमार पाटील, स्वाती नवनाथ कदम, निकिता दिलीप माने, पल्लवी दत्तात्रय बिराजदार, नेहा बाबू स्वामी, वैष्णवी किरण कुलकर्णी, पूजा सोपान सुगावे, मुद्र‌िका कमलाकर फुगटे, वैष्णवी वैजनाथ भोसले, सोनाली चंद्रकांत फुगटे, सूरज दगडू पाटील, श्याम मारुती सुगावे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या चरित्रांचा अभ्यास करावा, त्यातून प्रेरणा घ्यावी व त्यांच्या लेखन गुणांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम घेतला. समाजात मिसळणे, मोठ्या व्यक्तींशी व्यवस्थित रितीने संवाद साधणे, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणे हे ज्ञानरचनावादावर आधारित प्रत्यक्ष अनुभव शिक्षण देण्याचे काम या उपक्रमातून साध्य झाले. चरित्रग्रंथाचे लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करणार आहोत.
- बालाजी मदन इंगळे, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्ध‌िस्ट सर्किट विकसित करणार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्मामुळे भारताची जगात ओळख आहे. बुद्ध‌िस्ट सर्किट अधिक विकसित करण्यात येत आहे. केंद्राने त्यासाठी शंभर कोटी रुपये दिलेत. राज्यशासनही भरीव तरतूद करणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जगभरातील बौद्ध राष्ट्रांबरोबर भारतीय बौद्धांचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संबंध मैत्रीपूर्ण करून सहकार्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टने शहरात प्रथमच इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे शुक्रवारी आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तिबेट येथील लामा लोब्जोंग यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, श्रीलंकेचे माजी मुख्यमंत्री शशीद्र राजपक्ष, खासदार उदय गम्मनपिल, कोरियन कौन्स‌िल जनरल किम सुंग यून, श्रीलंकेचे सरोजा सिरिसेना, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अतुल सावे, संयोजक भिक्खू धम्मज्योती थेरो यांच्यासह देश विदेशातील भिक्खू उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय शिरसाट होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘बुद्ध धर्माने त्यागाची शिकवण देत संपूर्ण जगाला जिंकले. बंधुत्व, समता, स्वतंत्र यांची शिकवण दिली. पंचशील तत्व आत्मसात करणारा व्यक्ती कधीही मागे राहू शकत नाही. आपल्या राज्याला बौद्ध धर्माची वैभवशाली वारसा स्थळे अंजिठा-वेरूळच्या रूपात लाभलेली असून या पार्श्वभूमीवर देश विदेशातील बौद्ध धर्माचे अभ्यासक, उपासक यांच्यासाठी अद्यावत असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘बुद्ध‌िस्ट सेंटर’ महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. ‘बुद्ध‌िस्ट सर्किट’ विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून शंभर कोटींचे अर्थ सहाय्य मिळणार असून राज्य शासनही त्यासाठी आर्थिक योगदान देणार आहे. पाली भाषा केंद्राचा विस्तार करायचा की औरंगाबादेत नव्याने विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल,’ असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माजी मंत्री गंगाधर गाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे, अभिनेते गगन मलिक, अभिनेत्री आचल सिंग, विमान निर्माते अमोल यादव, धम्मसेवक अशोक आठवले यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिसाद जातीयतेने नको
‘काही घटना घडल्यानंतर त्याचे प्रतिसाद जातीयतेने उमटतात. हे भगवान बुद्ध, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आदी महापुरुषांना अभिप्रेत नाही. दलित दलितेत्तर संघर्ष पाहण्यास मिळतो. यासाठी स्वातंत्र्य मिळेल का, असा प्रश्न पडतो. साऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. काही समाजाच्या आर्थिक, सामाजिक मागण्या आहेत. त्या इतराच्या विरोधात नाहीत. त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, पण काही मुठभर लोक सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करत आहेत,’ नाशिक घटनेचा संदर्भात देत मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचे तत्व महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नृत्य साधकांनी बांधली शिवपूजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नृत्य साधकांचा लक्षवेधी पदन्यास आणि गायकांच्या स्वरमाधुर्याने जागतिक वारसा असलेल्या कैलास लेणीत अक्षरशः चैतन्य बहरले. निमित्त होते वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे. मंद चंद्रप्रकाश आणि मोहक वातावरणात रंगलेला नृत्य-संगीत सोहळा देश-विदेशातील पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
पर्यटक आणि रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव शुक्रवारी सुरू झाला. शास्त्रीय नृत्य आणि गायनाने महोत्सवाचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला. साक्षात शंकराचे वास्तव्य असलेल्या कैलास लेणीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी कथ्थक सादरीकरण केले. ‘शिवस्तुती’ने त्यांनी सुरुवात केली. घृष्णेश्वराचा जयघोष करणारा हा नृत्य प्रकार रसिकांना विशेष भावला. १४व्या शतकातील ‘राग बिलावल’मधील एक रचना सादर झाली. शिवपूजा बांधणारे नृत्य महोत्सवाचे वेगळेपण ठरले. त्यानंतर यास्मिन सिंग यांनी ‘शिवओम’ हा बॅले सादर केला. अर्धनारी नटेश्वराचे वेगळेपण अधोरेखित करणारे नृत्य रसिकांसाठी वेगळी पर्वणी ठरली. शिव-शक्तीचे रूप म्हणजे सृष्टी असल्याचा संदेश सिंग यांनी दिला. तर सानिया पाटणकर यांच्या सु्श्राव्य गायनाने महोत्सवाची रंगत वाढवली. जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका असलेल्या पाटणकर यांनी दोन बंदिशी सादर केल्या. ‘राग नंद’मधील ‘अजहून आये शाम बहोत दिन बिते’ ही विलंबित बंदिश विशेष ठरली. ‘नंदलाल ब्रिज युवती संग रचो रास’ ही द्रुत बंदिश श्रवणीय होती. ‘नटवरी तराणा’ दाद मिळवून गेला. नृत्य आणि गायनाने लेणीचा परिसर न्हाऊन निघाला. बेल्जियमचे बर्ट कार्नलिस आणि उद्धवबापू आपेगावकर यांची पखवाज-सतार जुगलबंदी विशेष रंगली. भारतीय संगीताचे वेगळेपण दाखवत बर्ट यांनी रसिकांचे लक्ष वेधले. ग्रेसी सिंग यांचे ‘शिवशक्ती’ नृत्य वेगळा प्रयोग होता. संगीत, प्रकाशयोजना आणि पदलालित्य यांचा सुंदर मिलाफ दाखवत ग्रेसी यांनी रसिकांना खिळवून ठेवले. पूर्णाश्री राऊत यांच्या ओडिसी नृत्याने पहिल्या दिवसाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केले.

विदेशी पाहुण्यांची उपस्थिती
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक व रसिक उपस्थित होते. स्थानिक रसिक जास्त संख्येने उपस्थित होते, मात्र विदेशी पर्यटकांची संख्यासुद्धा कमी नव्हती. शास्त्रीय नृत्याचा चोखंदळपणे आस्वाद घेताना विदेशी पाहुण्यांनी भरभरून दाद दिली. महोत्सवाची आठवण म्हणून सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती. प्रमुख पाहुण्यांची आसनव्यवस्था वगळता इतरत्र गर्दी कमी होती. शेकडो खुर्च्या रिकाम्या असूनही स्थानिक रसिकांना आत प्रवेश देण्यात आला नाही.

लेणीचे वेगळेपण
कैलास लेण्याची स्थापत्यशैली जगभर आश्चर्याचा विषय आहे. या लेण्याच्या सान्निध्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडणे रसिकांना आनंददायी होते. कैलास मंदिर, डोंगराचे पाठबळ आणि आकाशात उगवलेला चंद्र अशा मोहक वातावरणात कार्यक्रम रंगला. दरवर्षी वेरूळ लेणीच्या परिसरात महोत्सव घेण्याची रसिकांनी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषींना फाशी द्या; इतरांना त्रास का?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नाशिक येथील घटना दुर्दैवी आहे. यातील दोषींना फाशी द्या, पण विनाकारण दुसऱ्याला त्रास कशासाठी. त्यांना त्रास देऊ नका,’ असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
शुक्रवारी आयोजित इंटरनॅशनल बुद्ध‌िस्ट फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. नाशिक येथील घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रीयावर येथे नेत्यांनी परखड टीका केली.
आठवले म्हणाले, ‘कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून मराठा समाजाचे शांततेत मोर्चे निघत आहेत. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीस आमचा पाठिंबा आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळेल पाहिजे. अॅट्रासिटी कायदा रद्द होऊ शकत नाही. हा कायदा संरक्षणासाठी आहे. त्याचा गैरवापर कुणीही करता कामा नये.’ तर बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करा अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.

...तर राजीनामा देईनःबडोले
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, ‘अनुसूचित जाती जमातीतील समाजबांधवरील अत्याचार सहन केला जाणार नाही. तो सहन करण्याची वेळ आली तर मंत्रीपदाचा राजीनामा देईन. बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा हवा. केंद्रातील आरक्षणाचा प्रश्न मार्गा लावा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाग्रामकडे रसिकांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुप्रतीक्षित वेरूळ अजिंठा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. यानिमित्ताने कलाग्राम येथे आयोजित उपक्रमांकडे मात्र रसिकांनी पाठ फिरवली आहे. कलाजागर या सांस्कृतिक कार्यक्रमास आयोजक, स्पर्धक व त्यांचे पालक यांच्याशिवाय कुणीही उपस्थित नव्हते.
वेरूळ-अजिंठा महोत्सवानिमित्त कलाग्राममध्ये दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी गरवारे कम्युनिटी सेंटर आयोजक असलेल्या कलाजागर हा खास सांस्कृतिक कार्यक्रम इथे झाला. मात्र, स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धक नव्हते. कलाजागरच्या रिकाम्या खुर्च्या रसिकांची वाट पाहत होत्या. यावरून शहरवासीयांना या कार्यक्रमांची माहितीच नसल्याचे स्पष्ट होते. केवळ वेरूळ व सोनेरी महाल इथे होणाऱ्या कार्यक्रमांची जनजागृती करण्यात आली. मात्र, कलाग्रामच्या कार्यक्रमांविषयी सामान्य नागरिकांना माहिती नाही. विशेष म्हणजे महोत्सवाच्या कार्यक्रमांच्या माहिती पत्रिकेचे उद्घाटनही गुरुवारी करण्यात आले. परिणामी चांगले कार्यक्रम असूनही कलाग्राम रसिकांवाचून सुने भासत होते. केवळ इथे स्वयंसेवक म्हणून काम करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी व आयोजकांची वर्दळ होती. महोत्सवात स्थ‌ानिक कलाकारांना संधी मिळावी म्हणून आयोजकांतर्फे ६ व ७ ऑक्टोबरला जगद्गुरु संत तुकाराम नाट्यगृहामध्ये कलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून कलावंत आले. शास्त्रीय नृत्य, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, वाद्य वादन मुकाभिनय, प्रहसन (स्किट), मिमिक्री, पथनाट्य, स्टॅँडअप कॉमेडी, भजन, भारुड, पोवाडा गोंधळ, लावणी, लोकनृत्य तसेच शास्त्रीय, सुगम, गझल, पाश्चात्य गायन यांचा येथे होणाऱ्या कार्यक्रमात समावेश आहे.
चाचणीतून निवड झालेल्या कलाकारांनाच कलाग्राम येथे सादरीकरण्याची संधी मिळाली. १६ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते सायं ५ पर्यंत १७३ कलावंतांचा यात सादरीकरण करणार आहेत. मात्र, रसिक नसल्याने पहिल्या दिवशी कलावंतांचा हिरमोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूलशास्त्राचा स्वतंत्र विषय पदवीमध्ये : डॉ. म्हैसेकर

$
0
0

औरंगाबाद : प्रत्येक शस्त्रक्रियेपासून आयसीयू-क्रिटिकल केअरपर्यंत प्रत्येक ठिकाणी भूलशास्त्राचे निर्विवाद महत्त्व आहे आणि भूलशास्त्राचे महत्व-उपयुक्तता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच पदवीस्तरावर म्हणजेच एमबीबीएस अभ्यासक्रमात स्वतंत्र विषय म्हणून भूलशास्त्राचा समावेश करणार आहे. तसेच विद्यापीठामार्फत विविध विषयांत फेलोशिप सुरू करण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात येणार आहे,’ अशी घोषणा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी भूलशास्त्राच्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केली. एमजीएमच्या रुख्मिणी हॉलमध्ये आयोजित तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर ‘इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्ट’चे राज्य शाखा अध्यक्ष डॉ. अशोक देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मीनाक्षी सुंदरम, सचिव डॉ. मिलिंद पोळ, ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम, संघटनेच्या राज्य शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. हितेंद्र महाजन, सचिव डॉ. मिलिंद पोळ, शहराध्यक्ष डॉ. रोशन रानडे, सचिव डॉ. सुजित खाडे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, सचिव डॉ. बालाजी आसेगावकर आदी उपस्थित होते. डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘दीर्घ मागणीनंतर स्वतंत्र विषय म्हणून भूलशास्त्राचा पदवीस्तरावर समावेश करणार आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून हा समावेश करण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी भूलशास्त्र संघटनेने विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावेत. त्याचवेळी विद्यापीठामार्फत विविध विषयांमध्ये फेलोशिप सुरू करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्यात येणार आहे, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.’ डॉ. रश्मी बंगाली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. देशपांडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड कॉर्नर : लज्जतदार पफ

$
0
0

shripad.kulkarni@timesgroup.com
Tweet : @kulshripadMT
घरोघरी खारी, टोस्ट, पफ, ब्रेड, केक आदी बेकरी आयटम्स आवडीने खाल्ले जातात. पफ मात्र फार कमी ठिकाणी मिळतात. कुलकर्णी बेकर्सच्या हर्षद कुलकर्णी यांनी खुसखुशीत पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. देवळाईतील नाईक नगरभागात त्यांनी आउटलेट सुरू केले आहे. परिसरातील खवये त्यांच्याकडून खारी, टोस्ट, पफ आवर्जून नेतात. त्याशिवाय त्यांनी हे पदार्थ घरपोच पोचविण्याचीही सोय केली आहे.
बटाट्याची भाजी भरून तयार केलेली मोठ्या आकाराची खारी म्हणजे पफ. अनेक वेळा सकाळी नाश्त्यात पफचा समावेश असतो. महाविद्यालयीन विद्यार्थी पफ आवडीने खातात. साधारणपणे बटाटे उकडून त्यांत तिखट, मीठ, मसाला टाकला जातो. कुलकर्णी बेकर्सने बटाट्याची स्पायसी भाजी वापरून पफ तयार केले आहेत.
पफ हा खारीचा एक प्रकार. खारी तयार करण्यासाठी मशीनच्या मदतीने मैदा भिजविला जातो. मैदा भिजविताना तूप टाकले जाते. ही प्रक्रिया करताना बर्फाचा वापर करण्यात येतो. सुमारे २५ मिनिटांत मैदा भिजवून तयार होतो. त्यानंतर चौकोनी आकारात भिजविलेला मैदा लाटून घेतला जातो. लाटताना चार फोल्ड करून केले जातात. या प्रक्रियेसाठी सुमारे एक ते दीड तास लागतो. त्यानंतर लाटून तयार केलेली पोळी मोठ्या खारीच्या आकारात कापली जाते. त्यात बटाट्याची भाजी टाकून बेक केले जाते.
भाजीसाठी रात्री बटाटे उकडून ठेवलेले असता. सकाळी त्याची भाजी तयार केली जाते. भाजीसाठी मटर, मका, कढीपत्ता, आलं, लसूण, धणे पावडर, मसाला आदी वापरले जाते. पफमध्ये फोडणी दिलेली बटाट्याची भाजी अन्य फारसे कोणी वापरत नाही. खारीला च‍व नसते. त्यामुळे पफमध्ये मसालेदार भाजी वापरण्यात येते, असे हर्षल कुलकर्णी यांनी सांगितले. आम्ही केवळ रविवारी पफ तयार करतो. अनेक पफची ग्राहक ऑर्डर देतात. पहाटे चारपासून पफ तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. सकाळी सात-साडेसातच्या सुमारास पफ तयार होता. आम्ही बेकरी उत्पादने घरपोच देतो, अशीही माहिती त्यांनी दिली.
पफबरोबरच मस्का खारी, जिरा खारी, मेथी खारी, कुकीज, बटर केक आदी पदार्थ येथे उपलब्ध आहेत. कुकीजमध्ये व्हॅनिला, चॉकलेट, विलायची, आटा आदी प्रकार आहेत. या उत्पादनांसाठी लिली हे दर्जेदार तूप वापरले जाते, असेही त्यांनी सांगितले.
बेकरी उत्पादने सुरू करण्याबाबत ते म्हणाले,पूर्वी पुण्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करीत होते. प्रोजेक्ट संपल्यानंतर नोकरीचा शोध सुरू असताना त्यांची शेफ प्रसाद कुलकर्णी यांची भेट झाली. त्यांनी मार्गदर्शन केले. आई खाद्यपदार्थ उत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करते. पुरणपोळी, बासुंदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे मीही खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात येण्याचे ठरविले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images