Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भूलशास्त्रतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘लहान - मोठ्या सर्व शस्त्रक्रियांमध्ये, आयसीयूमध्ये, पेन मॅनेजमेंट, पेनलेस डिलिव्हरीमध्ये भूलशास्त्रतज्ज्ञ डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. वैद्यकशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भूलतज्ज्ञांनी आपली पडद्यामागील कलाकार ही भूमिका सोडून समाजासमोर यायला हवे,’ असे प्रतिपादन डॉ. बाल वेंकटसुंदरम यांनी शनिवारी येथे केले.
‘इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्ट’ची राज्य तसेच शहर शाखा आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय भूलशास्त्रावरील परिषदेच्या (मिसाकॉन २०१६) दुसऱ्या दिवशी, शनिवारी एका परिसंवादात डॉ. वेंकटसुंदरम यांनी मार्गदर्शन केले. ‘अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये आता पूर्ण भूल न देता लोकल ऍनेस्थेशिया दिल्याने अनेक धोके टाळतात, रुग्णाला लवकर डिस्चार्ज मिळू शकतो आणि याचे कोणतेही साईड इफेक्टही नाहीत,’ असे त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करताना सांगितले . दिवसभर तीन हॉलमध्ये तीस तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
डॉ. वेंकटसुंदरम म्हणाले, ‘आता भूलतज्ज्ञांनीच पुढे येणे गरजेचे झाले आहे. आपल्या शास्त्राचे महत्त्व सर्वसामान्यांना कळण्याकरिता संघटनेच्या माध्यमातून आणीबाणीच्या प्रसंगी करावयाच्या प्रथमोपचारांच्या प्रशिक्षणासारखे विविध उपक्रम राबविणे अत्यावश्यक आहेत. भुलीची गरज आणि महत्व पटवून देण्याकरिता जनजागृती, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद अशा विविध माध्यमातून संवाद वाढवून समाजापर्यंत पोहोचवा,’ असे आवाहन त्यांनी केले. संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या जीवन संजीवन योजनेअंतर्गत, आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णावर कोणते प्रथमोपचार करावेत, कसे करावेत याचे मोफत प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी सकाळी १० ते १२ दरम्यान ६५ ऑपरेशन थिएटर असिस्टंटना असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी संघटनेची नूतन राज्य कार्यकारिणी या वेळी निवडण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. हितेंद्र महाजन (नाशिक), सचिव म्हणून डॉ. मनीषा काटीकर (सोलापूर) यांची निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुनी पेन्शन योजना लागू करावी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने १९८२ ची जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांचे वर्तमान व भविष्य अंधारमय आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने शनिवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात जिल्हाभरातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चासाठी जिल्हा परिषदेच्या विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. जिल्हा परिषद मैदान ते जिल्हाधिकारी मैदान असा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. नवीन पेन्शन योजनेत मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कोणते लाभ दिले जातील हे स्पष्ट नाही. औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांची वेतनातून झालेल्या कपातीची रक्कम आणि प्रशासनाने दिलेल्या हिशेब यामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यासाठी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रामदास कवठेकर, राज्य सरचिटणीस गोविंद उगले, उद्धव बोचरे, नितीन नाक, जगन ढोके, दत्ता कळसकर, सचिन एखंडे, अनिल दाणे, दीपिका एरंडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको उड्डाणपुलाची तीन महिन्यांतच दुरुस्ती ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेतून उभारलेल्या सिडकोतील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपूल जुलै महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र, पुलावर काही डागडुजी करण्यासाठी शनिवारी एका बाजूची वाहतूक सकाळच्या सत्रात काही काळ बंद ठेवण्यात आली. ही दुरुस्ती रूटीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एक किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल जुलै महिन्यात तयार झाला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण झाले. क्रांतिचौक, सेव्हन हिल उड्डाणपुलाच्या तुलनेत या पुलावरून होणारी वाहतूक कमी आहे. शनिवारी सकाळी दक्षिणेकडील बाजूचा एकेरी रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आला होता. किरकोळ दुरुस्तीसाठी पूल काही काळ बंद करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र एवढ्या कमी कालावधीत पुलाची दुरुस्ती कशामुळे करावी लागली ? हे मात्र कोडे आहे. एमएसआरडीसीचे कार्यकारी अधिकारी विक्रम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘पुलाच्या सिलिंगमध्ये डांबर भरण्याचे काम शनिवारी करण्यात आले. हा रुटीन मेंटेनन्सचा भाग आहे. पुलाची दुरुस्ती वैगेरे नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबाही झालेला नाही. रस्त्यावरील एका बाजूने एकेरी वाहतूक सुरळीत सुरू होती.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीत पालिकेला टाळे

$
0
0

परभणी : नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, शिवसेनेने शनिवारी परभणी महापालिकेला टाळे ठोकले. चार तास चाललेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी ठिय्या मांडला होता. पोलिसांनी २००पेक्षा जास्त शिवसैनिकांना ताब्यात घेऊन, सायंकाळी त्यांची सुटका केली. या आंदोलनामध्ये पालिका प्रशासनाकडून निवेदन घेण्याचीही तसदी घेण्यात आली नाही, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली.
शहरामध्ये खड्ड्यांची समस्या असून खड्डे दुरुस्त करण्याच्या नावाखाली अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. तसेच अन्य नागरी समस्याही प्रशासनाकडून दुर्लक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्था अध्यक्षांचा विद्यापीठात ठिय्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजीव गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब लिहिणार यांना निलंबित केल्यानंतरही विद्यापीठाकडून त्यांना मुदतवाढ देण्यात आली. लिहिणार यांना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप करत संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ यांनी शनिवारी विद्यापीठात ठिय्या
आंदोलन केले.
मनाळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘इंदुमती डोणगावकर व शांताराम सावंत यांना कायदेशीररित्या कोणताही अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी डॉ. बाळासाहेब लिहिणार यांच्या प्रभारी प्राचार्य पदास मान्यता द्यावी असा दिलेला प्रस्ताव स्वीकारू नये व डॉ. लिहिणार यांना प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता देऊ नये, असे बीसीयूडींना कळविले होते. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही पडताळणी न करता डॉ. लिहिणार यांना प्रभारी प्राचार्य म्हणून मुदतवाढ दिली.. त्यासह १ ऑक्टोबर रोजी बीसीयूडी संचालकांना ई-मेलद्वारे डॉ. लिहिणार यांचे नाव सी.ए.एस.साठी पाठवू नये, असे कळविले. त्यानंतरही त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले गेले. या प्रकरणी कुलगुरूंनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. डॉ. लिहिणार यांच्या प्रभारी प्राचार्य पदाची मान्यता रद्द करावी,’ अशी मागणी करत मनाळ यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात मनाळ यांच्यासह संस्थेच्या सहसचिव शैलजा जोशी, सचिव प्रमोद जोशी, प्रा. एल. जी. दांडगे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...सव्वादोन लाख लिटर दुधाची कोजागरी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोसायटीत रात्री उशिरापर्यंत जमलेली मैफल...कोजागरी पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात हाती केशरयुक्त दुधाचा भरलेला ग्लास...अन् अवचित कुणाच्या ओठी किशोरदांचे सूर...अशी कोजागरी शनिवारी शहरात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. तब्बल सव्वादोन लाख लिटर दुधाची आज रात्रीपर्यंत विक्री झाली.
कोजागरी पोर्णिमेनिमित्त दुधाची मोठ्या प्रमाणात होणारी मागणी लक्षात घेता विक्रेत्यांनी तशी तयारी केली होती. शहरात दररोज किमान दोन ते अडीच लाख (पॅकबंद) लिटर दुधाची विक्री होते. त्यात सुट्या दुधाची होत असलेली विक्री ही वेगळी आहे. कोजागरीनिमित्त सकाळपासूनच दुधाची मागणी वाढली होती. अनेकांना आगाऊ मागणी विक्रेत्यांकडे नोंदवून
ठेवली होती.मुख्य दूध पुरवठादार असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे दररोज सुमारे ८० हजारांहून अधिक लिटर दुधाचे संकलन केले जाते. त्यापैकी किमान ५५ ते ६० हजार लिटर दुधाची शहरात विक्री होते. उर्वरित दूधापासून दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जाते. काही दूध मागणीनुसार मुंबईकडे महानंद डेअरीकडे पाठविले जाते. आज कोजागरीनिमित्ताने दूध संघाच्या सुमारे ४० हजार लिटर दुधाची विक्री झाली. रात्री उशिरापर्यंत यात दहा ते वीस टक्के वाढ होईल, अशी माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील यांनी दिली. अन्य ब्रँडच्या दुधास तसेच छोट्या डेअरी, घरपोच सेवा देणारे दूध विक्रेते याच्याकडील दुधासही चांगली मागणी होती. विविध सोसायट्या, कॉलनी व मंडळांमध्ये वर्गणी करून कोजागरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कॉलनीतील मैदान, गच्ची तसेच घरोघरी दूध गरम करून चंद्राला दाखविण्यात आले. त्यानंतर घरातील मंडळींनी आणि मित्र परिवारांसमवेत शहरवासीयांनी गरमागरम दुधाचा आस्वाद घेतला. अनेक ठिकाणी मसाला दुधासह पावभाजी, भेळ, वडापाव, पॅटिस अशा खमंग बेत झाला.

सुका मेव्याला मागणी
कोजागरीनिमित्त सर्व मिळून सरासरी सव्वादोन लाख लिटर दुधाची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. चारोंळी, दूध मसाला, काजू, बदाम, पिस्ता तसेच फरसाण, मिठाई आदींची पदार्थांनाही चांगली मागणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये दलित ऐक्याचा विराट मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

कोपर्डी आणि जातेगाव बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा द्यावी, अॅट्रॉसिटीची कडक अंमलबजावणी करावी, अॅट्रॉसिटी कायद्याच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील दलित, भटके विमुक्त या दलित ऐक्य मोर्चामध्ये सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मोर्चाचा मार्ग होता. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सकाळपासूनच महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणी यायला सुरुवात झाली. जिल्हाभरातून वाहनातून मोर्चेकरी येत होते. त्यानंतर, दुपारी एकला तेथून निळा झेंडा हाती धरलेला लहान मुलगा व त्याच्या मागे दलित समाजातील विद्यार्थिनी असा मोर्चा निघाला. सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पांढरा वेश, हाती फडकणारे निळे झेंडे हे या मोर्चाचे वैशिष्ट्य होते.

मोर्चाचे पहिले टोक तीन किलोमीटर असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोचले, तरी महिलांची शेवटची रांग छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. व्यासपीठावर विद्यार्थिनींनी सुरुवातीला संविधानाचे वाचन केले. त्यानंतर मोर्चाचे निवेदन वाचून दाखवले. प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले.

स्वच्छता आणि शिस्त

मोर्चात शांततेबरोबर स्वच्छताही दिसून आली. ठिकठिकाणी स्वयंसेवक स्वच्छताही करत होते. मोर्चा संपल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील कचरा गोळा केला. दोन हजार पोलिस तैनात होते. शिस्तीत निघालेल्या मोर्चात पोलिसांचे काम स्वयंसेवक करताना दिसत होते. मुस्लिम समाजाच्या वतीने काही ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले.

मोर्चातील मागण्या

कोपर्डी (जि. नगर) आणि जातेगाव (जि. सोलापूर) येथील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या.
अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करू नये.
अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी.
अॅट्रॉसिटी कायद्याच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती रद्द करावी.
शिक्षणाचे व शेतजमिनींचे राष्ट्रीयीकरण करावे.
भटक्या व विमुक्त समाजास अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा.
नाशिक येथील बंजारा समाजाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या.
बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कठोर कारवाई करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...नटरंग उभा ललकारी नभा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवघ्या महाराष्ट्राला जादुई संगीताने भारावून टाकणारे संगीतकार अजय-अतुल यांच्या लोकप्रिय गीतांनी वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला. सोनेरी महाल परिसरात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम रंगला. गाणी, नृत्य आणि विनोदी निवेदनाने ‘अजय-अतुल लाइव्ह इन कॉन्सर्ट’ रसिकांना भावली.
मराठी चित्रपटगीतांना एक वेगळी उंची गाठून देणारे संगीतकार अजय-अतुल यांचा संगीतमय कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवणे रसिकांसाठी पर्वणी ठरली. तांत्रिक अडचणी वगळता कार्यक्रम सदाबहार झाला. कोजागिरी पौर्णिमेच्या चंदेरी प्रकाशात संगीताची उधळण झाली. गणेश आराधनेने ऋषिकेश रानडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘गोऱ्या गोऱ्या गालावरी’ या गीतासाठी योगिता गोडबोले यांनी दाद मिळवली. ‘नीळकंठ मास्तर’ चित्रपटातील ‘अधीर मन झाले’ या प्रियांका बर्वे यांच्या गीतालाही प्रतिसाद मिळाला. ‘मन उधाण वाऱ्याचे’ गीत अभिजित सावंत यांनी सादर केले. अजय-अतुल यांच्या लोकप्रिय गीतांची चढती कमान प्रत्येक गायकाने उत्तम सादर केली. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा ललकारी नभा’ या गीतातून अजय-अतुल यांची मंचावर एंट्री झाली. या बहारदार गीताला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. स्वप्नील बांदोडकर यांनी ‘गालावरी खळी डोळ्यात धुंदी’ गीत गायले. अजय यांनी ‘खेळ मांडला’, ‘तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला’, ‘सैराट झालं जी’, ‘ये गो ये मैना’ अशी बहारदार गाणी गायली. स्वरूप खान यांनी ‘पीके’ चित्रपटातील ‘म्हारो मेहमान’ गीत गायले. आकर्षक रंगमंच, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था आणि वादकांचा ताफा असल्यामुळे हा मराठमोळा संगीत कार्यक्रम विशेष लक्षणीय ठरला. ‘झिंगाट’ गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.
दरम्यान, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भन्नाट नृत्य
‘नटरंग’ चित्रपटातील लावण्या अजूनही रसिकांनी खिळवून ठेवतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ‘अप्सरा आली’ लावणीवर नृत्य सादर केले. इतर गाण्यांना सहकलाकारांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाचे वेगळेपण जपले. अर्धा तास व्यत्यय आल्यामुळे कार्यक्रम अक्षरशः उरकण्यात आला. रसिकांच्या ‘वन्स मोअर’लाही गायकांनी प्रतिसाद दिला नाही.

रेखाचित्र भेट
शारदा मंदिर प्रशालेतील विद्यार्थिनी स्वरांगी येवले हिने अजय व अतुल यांची रेखाचित्र रेखाटले आहेत. ही दोन्ही चित्रे मंचावर स्वरांगीने दोघांना भेट दिली. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी स्वरांगीच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले. औरंगाबादकारांचे प्रेम पाहून भारावल्याचे अतुल यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील खड्डे, लोड शेडींग, जायकवाडीचे पाणी, समांतर योजना अशा अनेक मुद्यावर शाब्दिक चिमटे काढत मकरंद यांनी रसिकांना खळखळून हसवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भवानीच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह राज्यातील लाखो भाविकांचा महासागर तुळजापूरमध्ये लोटला आहे. त्यामुळे, तुळजापूरच्या दिशेने येणारे सर्व रस्ते या भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेले आहेत. यंदा भाविकांमध्ये युवक-युवतींसह महिलांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
नवरात्राचा उत्सव झाल्यानंतर, पायी चालत येत पौर्णिमेला तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची प्रथा परिसरातील जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये आहे. त्यामुळे, दरवर्षी लाखो भाविक तुळजापुरात येत असतात. त्याप्रमाणे शुक्रवारपासून तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर गर्दी दिसत होती. कोजागरी पौर्णिमा शनिवारी होता. मात्र, तुळजापूर मंदिराची पौर्णिमा रविवारी आहे. त्यामुळे, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये किमान दहा ते बारा लाख भाविक तुळजापुरात येतील, असा अंदाज आहे.
सीमोल्लंघनानंतर सुरू झालेली देवीची सुखनिद्रा शनिवारी रात्रीपर्यंत चालणार आहे. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे देवीची मूर्ती सिंहासनावर आरूढ होईल. त्यानंतर देवीची
नित्योपचार पूजा होईल. सोलापूरहून येणाऱ्या शिवलाड समाजाच्या काठ्यांसह रविवारी रात्री छबिना निघेल. सोमवारी मंदिरात अन्नदान व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह सोमवारी रात्री छबिना निघेल. त्यानंतर यंदाच्या शारदीय नवरात्राचा समारोप होईल.

मार्गावर सुविधा
‘आई राजा उदे उदे,’ या जयघोषात, तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांना सामाजिक संस्था व संघटना यांच्याकडून जागोजागी चहा, केळी नाष्टा यांचे वाटप करण्यात येत आहे. सोलापूर-तुळजापूर मार्गावर तामलवाडी येथे पोलिसांच्या वतीने भाविकांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सोलापूर व उस्मानाबाद विभागाकडून एसटी बसची पुरेशी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कर्नाटकातूनही बसची संख्या वाढविण्यात आली आहे.

दोघांचा तलावात बुडून मृत्यू
सोलापूर-तुळजापूर दरम्यान, सांगवी-म्हाळुंब्रा परिसरात असलेल्या साठवण तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या कर्नाटकाच्या कलबुर्गी येथील दोन भाविकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. विश्वा वंटी आणि राजू सुपनूर अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. हे दोघेही कलबुर्गीहून सोलापूरपर्यंत रेल्वेने आले होते. त्यानंतर तुळजापूरकडे पायी निघाले होते. या तलावाकडे कोणीही फिरकू नये, असे फलक या तलावाच्या परिसरामध्ये लावण्यात आले होते. तसेच, पोलिसांचा बंदोबस्तही होता. तरीही, पोलिसांची नजर चुकवून, या दोघांनी या तलावात उड्या मारल्या. त्यांनी पोहत ५० फुटांचे अंतर कापले. मात्र, तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजना गरजूंपासून अद्यापही दूरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

थकित कर्ज, वसुली कमी, योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध न होणे यांसारख्या कारणांमुळे शेकडो गरजूंना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कल्याणकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. काही योजना तीन ते चार वर्षांपासून कागदोपत्रीच आहेत. त्रुटी दूर करून या कल्याणकारी योजना खऱ्या गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयं-रोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा फुले महामंडळाची स्थापना १० जुलै १९७८ रोजी केली. हे महामंडळ सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करते. महामंडळ केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबवित असून, महामंडळाला निधी राज्य व केंद्र सरकारकडून मिळतो. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळाच्या (एनएसएफडीसी) विविध कल्याणकारी योजना आहेत. त्यापैकी मुदत कर्ज योजना ही एक आहे. यात पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यात महामंडळाकडून वीस टक्के बीजभांडवल चार टक्के व्याज दराने दिले जाते. यात दहा हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे, तर एनएसएफडीसीच्या कर्जावर सहा टक्के व्याज आकारले जाते. या योजनेत अर्जदाराचा वाटा हा पाच टक्के असतो. ही योजना २०११-१२ पासून बंद अवस्थेत आहे.
सुक्ष्मपत पुरवठा योजनेत २०१०मध्ये सुमारे १५० अर्जदारांना लाभ झाला. त्यानंतर नवीन अर्जदारांवर प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षणासाठी चार टक्के व्याजदराने वीस लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय करणारी कर्ज योजनाही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. केंद्राप्रमाणे महामंडळाच्याही अनेक योजना आहेत. पण, त्याची अवस्थाही फारशी वेगळी नाही.
पन्नास टक्के अनुदान योजनेसाठी २००८मध्ये अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे दोन हजार अर्ज प्रलंबित आहेत. विविध तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण देणारी योजनाही गेल्या वर्षाचा अपवाद वगळता मागील तीन ते चार वर्षांपासून नियमित सुरू नाही. पाच लाखांपर्यंत कर्ज देणारी बीज भांडवल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी २००८पासून सुमारे साडेतीन हजार गरजू प्रतीक्षेत आहेत. निधी प्राप्त होईल वा देण्यात आलेल्या टार्गेटप्रमाणे हे प्रकरणे निकाली काढले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महामंडळाची वसुली अत्यअल्प आहे. त्यात २००२पर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले होते, तर २००८ पर्यंतच्या थकबाकीदारांना सवलत देण्यात आली होती. त्यानंतरही पुढील वसुली अपेक्षित झाली नाही. परिणामी, एनएसएफडीसीची मोठी थकबाकी आहे. त्यामुळे नव्याने निधीही केंद्राकडून मिळण्यास अडचणीचे ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...व्यापारी म्हणून आले अन् इथलेच झाले!

$
0
0


Sudhir.Bhalerao@timesgroup.com
औरंगाबादः श्री गुजराती दसा पोरवाड समाज ट्रस्टच्या औरंगाबादेतील आस्तित्वाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी दसा पोरवाड समाज व्यापारउदीमानिमित्त गुजरातेतून औरंगाबादेत आला. ज्वेलरी, जरीकामात निष्णात असलेले कारागीर, कापड व्यापारी, व्यावसायिकांनी शहराला कर्मभूमी मानली. प्रारंभी हा समाज दौलताबादमध्ये स्थायिक झाला आणि नंतर औरंगाबादमध्ये स्थिरावले. गुलमंडीपासून जवळ असलेल्या कसुपारख, कुँवारफल्ली, खाराकुँआ भाग हा पूर्वी पोरवाड फलिआ म्हणून परिचित होता.
शेकडो वर्षांपूर्वी व्यवसाय, कामानिमित्त मोजक्या संख्येने आलेल्या गुजराती दसा पोरवाड समाजाने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. उद्योग, व्यापार, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सीए, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात या समाजातील मंडळी हिरारीने पुढे आहेत. सामाजिक क्षेत्रातही या समाजाने आपल्या कामाने वेगळे स्थान निर्माण केले. परंपरा, प्रथा जोपासताना कालानुरूप बदल या समाजाने स्वीकारले. समाजात पूर्वीच्या काळात शिक्षणाचे प्रमाण फारसे नव्हते. खातेवही लिहिता आली तरी पुष्कळ झाले असा समज होता. वडिलोपार्जित व्यवसाय करण्याकडेच मुलांचा कल असे. काळानुसार यात बदल झाला. ‘सद्यस्थितीत दसा पोरवाड समाजातील युवा पिढीने शिक्षणातही आघाडी घेतल्याचे दिसून येते. उच्चशिक्षित होण्याकडे मुला-मुलींचा कल आहे. मुलांच्या बरोबरीने मुलींना शिक्षण देण्यावर पालकांचा भर आहे. उच्च शिक्षणामुळे पारंपरिक व्यवसायाबरोबरच अन्य व्यवसाय, व्यापार आणि अन्य क्षेत्रातही दसा पोरवाड समाजातील युवा पिढीने नावलौकिक संपादन केले आहे,’ असे दसा पोरवाड समाज ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत कापडिया यांनी सांगितले.
‘शहरात दीडशेच्या आसपास दसा पोरवाड समाजाची घरे आहेत. व्यवसाय, कामानिमित्त समाज एकत्र येणे कठीण होत चालले आहे. युवा पिढीने एकत्र यावे, सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढवावा यासाठी प्रयत्न करीत आहोत,’ असे प्रफुल्ल देसाई यांनी सांगितले. शरदभाई शहा म्हणाले, ‘व्यवसाय, कामाच्या वाढत्या व्यापामुळे समाजासाठी वेळ देणे अतिशय अवघड गोष्ट झाली आहे. दसा पोरवाड समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.’
वंदना शाह म्हणाल्या, ‘शिक्षणातील वेगवेगळ्या संधी वाढत चालल्या आहेत. स्पर्धात्मक वातावरण पाहता गुजराती प्रथा, परंपरा जोपासणे महिलांसाठी तारेवरची कसरतच आहे.’ ‘घरगुती व्यवसाय, उद्योग, व्यापार यातून वेळ काढणे जिकरीचे बनलेले आहे. घरातील कामाचा वाढता व्याप, मुला-मुलींचे संगोपन व इतर जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांना अपेक्षित मुभा मिळणे अवघड बनलेले आहे,’ असे उषा सुखिया यांनी सांगितले. ‘दसा पोरवाड समाजातील युवा पिढी ज्येष्ठांचा समर्थ वारसा पुढे चालवित आहे. युवा पिढीकडे प्रचंड क्षमता आहे. पूर्वी हा समाज दोन गल्ल्यांमध्ये दिसून येत होता. आजच्या काळात या समाजाने विविध क्षेत्रात आपला नावलौकिक वाढवला आहे,’ असे प्रज्ज्वल मिठावाला यांनी सांगितले.

पारंपरिक नवरात्र उत्सव
‘नवरात्र उत्सव आणि गुजराती दसा पोरवाड समाज यांचे अतूट नाते आहे. हा सांस्कृतिक वारसा दसा पोरवाड समाज समृद्धपणे जपत आहे. नवरात्र उत्सवात दहा दिवस कडक उपवास करताना सायंकाळी दास दांडिया पारंपरिक पद्धतीने खेळला गेला. या उत्सवात समाजातील सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. समाजाला एकत्रित आणणारा हा उत्सव आहे,’ असे अध्यक्ष हेमंत कापडिया यांनी सांगितले.

श्री गुजराती दसा पोरवाड समाज ट्रस्ट कार्यकारिणी
अध्यक्ष हेमंत कापडिया, उपाध्यक्ष प्रफुल्लभाई देसाई, उषाबेन सुखिया, सचिव प्रज्ज्वल मिठावाला, सहसचिव वंदनाबेन शाह, कोषाध्यक्ष शरदभाई शाह.

विविध सामाजिक उपक्रमात हिरारीने सहभाग घेतला जातो. शिक्षण व आरोग्यासाठी गरजूंना तातडीची मदत केली जाते. त्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून कार्पोस फंड जमा केला जातो. गुजराती भवन उभारण्याचे काम हाती घेतलेले आहे. - हेमंत कापडिया, अध्यक्ष, श्री गुजराती दसा पोरवाड समाज ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टापरगावच्या पुलाला तडे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद - धुळे राष्ट्रीय महामार्ग २११ वर टापरगाव (ता. कन्नड) येथील शिवना नदीवर असेला पूल जडवाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. पाच ऑक्टोबर ते चार डिसेंबर असा तीन महिने हा पूल जड वाहतुकीसाठी बंद असेल.
टापरगाव येथील शिवना नदीवर असलेला पूल जुना आहे. महाड मधील सावित्री नदीचा पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभरातील यंत्रणा हालली होती. ब्रिटिशकालीन तसेच जुन्या पुलांची तपासणी करण्यात आली. त्यात टापरगावचा पुलाची पाहणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून करून घेण्यात आली. त्या पाहणीत पुलास तडे गेल्याचे निदर्शनास आले. पुलाच्या वेगवेगळ्या चाचण्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केल्या. त्यात पुलावरून जड वाहतूक बंद करण्याची शिफारस करण्यात आली. पुलाच्या दुरुस्तीच्या कालावधी पाहता या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाच ऑक्टोबर रोजी आदेश काढून हा पूल चार डिसेंबरपर्यंत जड वाहतुकीसाठी बंद करण्याचे कळविले आहे.

पर्यायी मार्ग
औरंगाबादकडून धुळ्याकडे येणारी व जाणारी वाहतूक ही औरंगाबाद - देवगाव रंगारी - शिवूर बंगला, नांदगाव•मालेगाव - मार्गे धुळ्याकडे•औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतूक ही औरंगाबाद - देवगाव रंगारी - शिवूर बंगला - नांदगाव मार्गे चाळीसगावकडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् साउंडट्रॅक बंद पडतो तेव्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे गायक-संगीतकार अजय-अतुल यांची ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ऐन रंगात आलेली... ‘मल्हारवारी’ गाणे सुरू असतानाच साउंडट्रॅक (सीडी) बंद पडला अन् रसिकांना भलतेच कोडे उलगडले. गायक आणि वादक केवळ ‘अभिनय’ करीत होते, तर प्रत्यक्षात साउंडट्रॅकवर गाणे होते. अर्थात, ‘पॉवर कट’ झाल्याचा तंत्रज्ञांनी बनाव केला. मकरंद अनासपुरे यांनी हजरजबाबीपणातून कार्यक्रम सावरला, पण जाणकारांना उलगडा झालाच.

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात शनिवारी अजय-अतुल यांची ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ पार पडली. स्वप्नील बांदोडकर, अभिजीत सावंत, कुणाल गांजावाला, योगिता गोडबोले हे लोकप्रिय गायक असल्यामुळे गर्दी होती. ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘जत्रा’ अशा हिट चित्रपटातील गाणी सादर झाली. ‘नटरंग उभा ललकारी नभा’ या गाण्यातून अजय-अतुल यांची झोकात एंट्री झाली. ‘आम्ही बॅक टू बॅक चौदा गाणी घेऊ’ असे अतुल यांनी सांगितले. ‘तुम्ही तयार रहा’ असे रसिकांना आवाहन करीत सादरीकरण सुरू झाले. ‘मल्हारवारी’ टिपेला पोहचलेले असतानाच आवाज बंद पडला. काय करावे असा वादक व खुद्द अजय-अतुल यांना प्रश्न पडला. गाफील वादकांनी ढोल-तबला वाजवण्यास सुरुवात केली. मात्र, गाण्यात रंग भरणे शक्य नव्हते. हजारो रसिकांसमोर कार्यक्रमात व्यत्यय आल्याने अजय-अतुल संतापले. ‘पॉवर कट’ झाल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले. रंगमंचावरून सर्वांनी एक्झिट घेतली. बिघाड दुरुस्त करण्यास अर्धा तास लागला. यात प्रायोजकांचे सत्कार उरकण्यात आले. अनासपुरे यांनी अजय-अतुल आपले पाहुणे असून त्यांना सांभाळून घेण्याची विनंती केली. अजय-अतुल यांनी पुढील गाणी मात्र ‘लाइव्ह’ सादर केली.

ही तर चलाखी

महाराष्ट्रातील बहुतेक ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’मध्ये साउंडट्रॅकवर गाणी वाजवण्याचा प्रकार वाढला आहे. स्टेजवरील वादकांनी वाजवल्याचा भास निर्माण करायचा आणि गायकांनी गायनाचा अभिनय करून कार्यक्रम उरकायचा अशी पद्धत आहे. या कार्यक्रमात स्वरूप खानचे ‘पीके’ चित्रपटातील गीत, अजय यांचे ‘नटरंग’, ‘सैराट’ अशी बहुतेक गाणी साउंडट्रॅकवरच सादर झाली. महागडे तिकीट काढून आलेल्या रसिकांनी हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएस, विवेकानंद संघांचे विजय

$
0
0

एमपीएस, विवेकानंद संघांचे विजय
कमाल पुनिया, मानव हिरेची प्रभावी कामगिरी
गादिया करंडक क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय ३७व्या गादिया करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूल व स्वामी विवेकानंद अकॅडमी या संघांनी रविवारी विजय नोंदवले.
एडीसीए मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र पब्लिक स्कूल (एमपीएस) संघाने मोईन उल उलूम हायस्कूल संघाचा ८९ धावांनी पराभव केला. कमाल पुनियाने नऊ चौकार व तीन षटकारांसह सर्वाधिक ८५ धावा काढल्या. गोलंदाजीतही त्याने २ विकेट्स घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंद अकॅडमी संघाने एसबीओए पब्लिक स्कूल संघावर १७ धावांनी मात केली. या सामन्यात विश्वास वाघुले, आदर्श जाधव, भूषण बोरसे, श्रीहर्ष पाटील, धीरज बहुरे, मानव हिरे यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक ः १) महाराष्ट्र पब्लिक स्कूल ः २० षटकांत ७ बाद १५७ (कमाल पुनिया ८५, कौशल कांबळे १०, सुरज श्रीखंडे १०, विशाल खंबायते ९, आदित्य मुळे ९, तेजस ८, सुलेमान शेख २-२८, अब्दुल्ला, ताहेर शेख, इम्तिहा प्रत्येकी १ विकेट) विजयी विरुद्ध मोईन उल उलूम हायस्कूल - १२.३ षटकांत सर्वबाद ६८ (इरफान खान ३४, तेजस शिरसे ३ विकेट्स, कुणाल शिंदे, विशाल जाधव, कमाल पुनिया प्रत्येकी दोन विकेट्स). सामनावीर - कमाल पुनिया.
२) स्वामी विवेकानंद अकॅडमी - २० षटकांत ९ बाद १२२ (आदर्श जाधव २८, विश्वास वाघुले ३२, निहार वाकडीकर १५, भूषण बोरसे ४ विकेट्स, श्रीहर्ष पाटील ३ विकेट्स, धीरज बहुरे १ विकेट) विजयी विरुद्ध एसबीओए पब्लिक स्कूल - २० षटकांत सर्वबाद १०५ (धीरज बहुरे ३१, श्रीनिवास कुलकर्णी १७, श्रीहर्ष पाटील १९, भूषण बोरसे ११, मानव हिरे ४ विकेट्स, ओंकार शिंदे २ विकेट्स, निहार वाकडीकर १ विकेट). सामनावीर - मानव हिरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावनगरच्या गांधी कॉलेजचे उल्लेखनीय यश

$
0
0

भावनगरच्या गांधी कॉलेजचे उल्लेखनीय यश
एसएनडीटी महिला क्रीडा स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय एसएनडीटी आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत भावनगरच्या एन. सी. गांधी कॉलेज संघाने विविध प्रकारात उल्लेखनीय यश मिळवले.
विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. हँडबॉल, क्रिकेट, बेसबॉल, योगासन व ज्युदो या पाच क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत होता. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी गिर्यारोहक मनीषा वाघमारे, विकास माने, शरद भट्ट, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या क्रीडा संचालक लिंडा डेनिस, महाविद्यालयाचे संचालक पंकज भारसाखळे, प्राचार्य केजल भट्ट, श्यामसुंदर भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. एसएनडीटी महिला विद्यापीठ यंदा १०१वे वर्ष साजरे करीत आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना बागडे म्हणाले, ‘खेळाडूंनी स्वतःसह राज्याचे क्रीडा क्षेत्रात नाव उंचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खेळाचा प्रचार व प्रसारासाठी शासन खेळाडूंसोबत आहे.’ मनीषा वाघमारे म्हणाल्या, ‘खेळाडूंनी दैनंदिन जीवनात किमान वीस मिनीटे व्यायाम करायला हवा. खेळात यश-अपयश हे येतच असते. अपयश आल्यावर निराश न होता पुढील स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करायला हवा.’ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाग्यश्री मुंडे, विनोद कंकाळ, विजय जाधव, केतकी चौधरी, जगदीश जाधव, बाबासाहेब शेजवळ आदींनी पुढाकार घेतला.
अंतिम निकाल ः हँडबॉल - १. एन. सी. गांधी कॉलेज, भावनगर (गुजरात), २. सी. बी. शहा कॉलेज, सांगली, ३. बीसीए अँड होमसायन्स कॉलेज, लोणी. उत्कृष्ट खेळाडू - जागृती गोहिल, वैशाली सूर्यवंशी, रोहिणी जगदाळे.
क्रिकेट ः १. बीसीए अँड होम सायन्स कॉलेज, लोणी, २. सी. बी. शहा कॉलेज, सांगली, ३. मनीबेन नानावटी कॉलेज, विलेपार्ले, मुंबई. उत्कृष्ट खेळाडू - रोहिणी जगदाळे, प्रतीक्षा भायडेकर, निलोफर नायर.
बेसबॉल ः १. सी. बी. शहा कॉलेज, सांगली, २. होम सायन्स कॉलेज, अकलुज, ३. एस. एम. देसाई कॉलेज. उत्कृष्ट खेळाडू - प्रतीक्षा भायडेकर, प्राजक्ता कुलकर्णी, स्वाती वाघमोडे.
योगासन - १) कला व वाणिज्य कॉलेज, चर्चगेट, २. होम सायन्स कॉलेज, अकुलज, ३. एन. सी. कॉलेज, भावनगर. उत्कृष्ट खेळाडू - अनिता लुंबानी, कुसुम प्रजापती, चैताली नायगुंडे.
ज्युदो ः १. एन. सी. गांधी कॉलेज, भावनगर, २. एस. एम. आर. के. कॉलेज, नाशिक, ३. कला व वाणिज्य व बीसीए कॉलेज, धुळे. उत्कृष्ट खेळाडू - विद्यावती इंगळे, मोनाली वाघमोडे, शिवानी थट्टेकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकांत व्हीआरएसचे वारे

$
0
0

dhananjay.kulkarni@timesgroup.com
Tweet : @dhananjaykMT
औरंगाबाद ः स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात येणाऱ्या पाच बँकांमध्ये स्वेच्छानिवृत्तीचे वारे वाहू लागले आहे. विलिनीकरणानंतर एसबीआयमध्ये सुमारे १३ हजार कर्मचारी अतिरिक्त ठरतील, असा अंदाज असून, या पाच बँकांतील सुमारे पाच हजार कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत आहेत. या बँकांतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर स्वेच्छानिवृत्तीची माहिती समोर आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियात ५ असोसिएट बँकांचे विलिनीकरण करण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची चिन्हे आहेत. एसबीआयमध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला या बँकांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांतील कर्माचारी संघटना सक्रीय झाल्या आहेत. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. विलिनीकरणामुळे आपल्याला डावलले जाऊ शकते, अशी तीव्र भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पाच बँका एसबीआयमध्ये विलीन झाल्यानंतर बँकेत सुमारे १३ हजार कर्मचारी अतिरिक्त ठरतील. त्यापैकी सुमारे पाच हजार कर्मचारी सेवानिवृत्तीच्या विचारात आहेत. त्यापैकी बहुतांश कर्मचारी डिसेंबरपर्यंत स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज सादर करतील, असा अंदाज आहे. स्वेच्छानिवृत्तीच्या मार्गावर असलेले बहुतांश कर्मचारी ५० ते ५७ वयोगटातील आहेत. त्यात व्यवस्थापकांपासून चतुर्थ श्रेणीपर्यंत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात ५०० कर्मचारी घेतील स्वेच्छानिवृत्ती
स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या तेलंगाणा आणि मराठवाड्यात जास्त शाखा आहेत. मराठवाड्यातील हैदराबाद बँकेतील सुमारे ४५० ते ५०० जण स्वेच्छानिवृत्ती घेतील, असा अंदाज आहे. यामुळे एसबीएचमधील मराठवाड्याच्या शाखांवर परिणाम होऊ शकतो, असे जगदीश भावठाणकर यांनी सांगितले. व्हीआरएस घेऊ इच्छिणारे बहुतांश कर्मचारी ५५ ते ५८ या वयोगटातील आहेत. त्यांची २५ वर्षांपेक्षा अधिक सेवा झाली आहे.

विलिनीकरणानंतर बढती, सेवाज्येष्ठता डावलली जाणार आहे. यामुळे ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले बहुतांश कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. हैदराबाद बँकेतील सुमारे हजार ते बाराशे कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात.
- जगदीश भावठाणकर, जनरल सेक्रेटरी, स्टेट बँक ऑफ हैदराबाद कर्मचारी संघटना, औरंगाबाद

तेलंगणासह दक्षिणेकडील या बँकांमगधून सुमारे दोन ते तीन हजार जण स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार करीत आहेत. त्यांची संख्या विलिनीकरणानंतर वाढू शकते.
- सी. नागराजन, जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया बँक एम्प्लाई‌ज असो‌सिएशन ऑफ इंडिया, हैदराबाद

स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर बँकेतून सुमारे १३०० जण स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छितात. विलिनीकरणानंतर बदली होईल, बढती थांबेल, सेवाज्येष्ठता डावलली जाईल, असे कर्मचाऱ्यांना वाटते.
- अशोक परब, उपाध्यक्ष, कर्मचारी संघटना स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, मुंबई

- एसबीआयच्या सध्या असलेल्या शाखा ः १६,५००
- कर्मचारी सध्या एसबीआयमध्ये कार्यरत ः २,००,०००
- विलिनीकरणानंतर एसबीआयची कर्मचारी ः २,८०,०००
- शाखां बंद होण्याची शक्यता ः ७,२००

स्वेच्छानिवृत्तीच्या वाटेवरील कर्मचारी
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद ः ११०० ते १२००
- स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर ः १३०० ते १४००
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ः ६०० ते ६५०
- स्टेट बँक ऑफ पतियाला ः ८०० ते ९००
- स्टेट बँक ऑफ म्हैसूर ः १००० ते १२००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरअखेर तीन क्लस्टर होणार सुरू

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात येत्या डिसेंबरअखेरपर्यंत खवा, रबर आणि प्रिटिंग हे तीन क्लस्टर सुरू होणार आहेत. त्याशिवाय विभागात तब्बल ३४ क्लस्टर उभारण्याचे प्रस्ताव आहेत. टप्प्याटप्प्यात कार्यान्वित होणाऱ्या क्लस्टर उभारणीमुळे आता मराठवाडा लवकरच क्लस्टरची राजधानी म्हणून ओळखली जाणार आहे.
विशिष्ट प्रकारच्या लघु, गृह, पारंपारिक उद्योगात कार्यरत असलेल्या समूहांना एकत्र करून त्यांचे क्लस्टर स्थापन करण्यात येते. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मदत केली जाते. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक लघुउद्योग, पारंपारिक उद्योग कार्यरत आहेत. हिमरू शाल, कॉटन प्रोसेसिंग, खवा, फर्निचर, बेकरी, रबर, प्रिटिंग यासह अनेक उद्योगांत दर्जेदार उत्पादन केले जाते, पण त्याला योग्य मार्केटिंगची जोड नसल्याने या लघुउद्योजक, व्यावसायिकांना स्वतःची ओळख निर्माण करता येत नाही. उद्योग विभागाने या कौशल्यांना हेरून संबंधित व्यवसायातील समूह एकत्र करून त्यांचा गट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यातून क्लस्टरची निर्मिती झाली. गेल्या वर्षभरात औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून ३४ प्रस्ताव वेगवेगळ्या क्लस्टरसाठी सादर केले आहेत. त्यात हिमरू शाल, कॉटन प्रोसेसिंग, बिद्री वर्क, फर्निचर इंजिनीअरिंग, बेकरी, किचन ट्रॉली, लेदर, मसाले, गारमेंट, फॅब्रिकेशन, ट्रक बॉडी बिल्डिंग, मनुका, ज्वेलरी आदी क्लस्टरचा समावेश आहे.
कुंथलगिरी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) परिसरात खवा मोठ्या प्रमाणावर तयार होतो. हा खवा राज्यभर विकला जातो, पण मार्केटिंग आणि ब्रँडबाबत फारशी प्रसिद्धी नाही. उद्योग सहसंचालक पी. पी. देशमुख यांनी या भागातील खवाउत्पादकांना एकत्र केले आणि क्लस्टर स्थापण्याबाबत माहिती दिली. भूम येथे जागा मिळाली. क्लस्टर सदस्यांनी एकूण प्रकल्पापैकी २० टक्के रक्कम जमा केली. सरकारनेही ८० टक्के रक्कम देऊन या क्लस्टरच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. इमारत उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, यंत्रसामग्री; तसेच सर्व आवश्यक गोष्टी भूमच्या खवा क्लस्टरला देण्यात आल्या आहेत. डिसेंबरअखेर हे क्लस्टर सुरू होईल, असा त्यांनी सांगितले.
औरंगाबादेतील वाळूज परिसरात रबर क्लस्टरही उभारणीच्या अंतिम टप्प्यात पोचले आहे. याशिवाय नांदेडमधील प्रिटिंग क्लस्टरही डिसेंबरअखेर सुरू होईल. हे तिन्ही क्लस्टर सुरू झाल्यानंतर मराठवाड्यातील व्यावसायिकांना निश्चितच मार्केटिंगसाठी मोठे जग उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील चार क्लस्टरपैकी तीन क्लस्टर मराठवाड्यातील आहेत.

दोन महिन्यात सुरू होणारे क्लस्टर
क्लस्टरचे नाव....ठिकाण.....उभारणीसाठी गुंतवणूक
खवा....................भूम..............साडेसहा कोटी
रबर........,..........औरंगाबाद......साडेसहा कोटी
प्रिटिंग.................नांदेड............चार कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमा दम मस्त कलंदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गायिका कनिका कपूरची पंजाबी गाणी व अदनान सामी यांचा सूफी गायकीचा आविष्कार रसिकांसाठी पर्वणी ठरला. भिन्न गायन शैलीतील गायकांच्या कलाविष्काराने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप झाला. रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या अदनान यांचे गाणे शेवटपर्यंत रंगले नाही. त्यामुळे कंटाळलेल्या रसिकांनी तासाभरात काढता पाय घेतला.
प्रसिद्ध गायक अदनान सामी व गायिका कनिका कपूर यांच्या ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा समारोप झाला. सोनेरी महाल परिसरात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. पंजाबी शैलीच्या गाण्यांसाठी कनिका लोकप्रिय आहे. ‘ओ बेबी डोल न सोने दी’ या गाण्याद्वारे कनिका यांनी सादरीकरण सुरू केले. ‘दमा दम मस्त कलंदर’, ‘चितिया कलियाँ वे’, ‘तुने मारी एंट्री’, ‘रेशम का है रूमाल’ या लोकप्रिय गाण्यांचे कनिकाने दमदार सादरीकरण केले. रसिकांशी संवाद साधत आणि संयोजनाची प्रशंसा करीत कार्यक्रम रंगवला. लोकप्रिय हिंदी गाण्यांचे ‘बॅक टू बॅक’ सादरीकरण करून तिने रसिकांना ठेका धरायला लावला. ‘मेरा पिया घर आया’, ‘बिडी जलइले’, ‘रंगिलो म्हारो ढोल ना’, ‘सावन मे लग गई आग’, ‘हरे रामा हरे कृष्णा’ या गाण्यांचे सादरीकरण केले. ‘नाम तेरा पढ के’ गाण्याद्वारे तिने सांगता केली. सुफी आणि हिंदी गीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या अदनान सामी यांचे गायन दुसऱ्या सत्रात झाले. ‘तू मेरी महेबूबा’, ‘सलामे इश्क’, ‘दिल कह रहा है दिल से’, ‘चैन मुझे अब आये ना’ या गाण्यातून अदनान यांनी रसिकांना साद घातली. प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणात अदनान यांनी भिन्न शैली वापरली. वादक आणि अदनान यांच्या जुगलबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘कभी तो नजर मिलाओ’, ‘सून जरा’, ‘भर दे झोली या मुहम्मद’ ही गीते शेवटच्या टप्प्यात सादर झाली. अदनान यांचा ‘लाइव्ह’ परफॉर्मन्स असला तरी काही गाण्यात आवाज लागला नाही. काही वेळेस गायन अक्षरशः बेसूर झाले. मात्र, बॉलिवूडचे ग्लॅमर असल्याने अदनान यांचा कार्यक्रम निभावला गेला. वादनात बराच वेळ घालवल्याने कंटाळलेल्या अनेक रसिकांनी काढता पाय घेतला.
दरम्यान, महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे, ‘एमटीडीसी’चे अण्णासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री टिस्का चोप्रा यांनी केले.

पुन्हा साउंड ट्रॅकची चलाखी
गायिका कनिका कपूर यांनी बहुतेक गाणी साउंडट्रॅकच्या जोरावर सादर केली. रंगमंचावर मोजक्याच वादकांसह गाणी सादर करताना शेकडो वाद्यांचा ‘चमत्कार’ त्यांनी साउंडट्रॅकद्वारे घडवला. ‘रेशम का है रुमाल’ या गाण्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. ‘नाम तेरा पढ के’ गाण्यावेळी कनिका कपूर यांचे गायन व सुरू असलेले गाणे ‘मिसमॅच’ झाले. तांत्रिक अडचण असल्याचे सांगत त्यांनी गाणे थांबवले; मात्र, तंत्रज्ञांनी समस्या दूर करताच पुन्हा ट्रॅकच्या जोरावर गाणे रंगले. अजय-अतुल यांच्या कार्यक्रमातील प्रकार पुन्हा घडल्याने रसिकांमध्ये हशा उसळला.

उत्साहाला उधाण
कनिका कपूर गात असताना रंगमंचाजवळ नृत्य करण्यासाठी उत्साही रसिकांची गर्दी झाली होती. कनिकाने या रसिकांसोबत सेल्फी काढला व प्रत्येक गाण्यात सहभागी करुन घेतले. पण, उत्साहाला जास्त उधाण आल्यानंतर पोलिसांना बोलावून गर्दीला जागा दाखवण्यात आली. तिकीट दर जास्त असल्यामुळे दुसऱ्या दिवशीही बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलावंतांनी गाजवले कलाजागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेरूळ-अजिंठा महोत्सवात ‘कलाजागर’ या सांस्कृतिक कार्यक्रमात रविवारीही एकाहून एक भन्नाट कार्यक्रम सादर करण्यात आले. शेवटच्या दिवशी किमान नोंद घेण्याइतपत रसिक पहायला मिळाले. गरवारे कम्युनिटी सेंटर कलाजागरचे मुख्य आयोजक होते.
वेरूळ-अजिंठा महोत्सवात स्थानिक कलाकारांना संधी मिळावी म्हणून १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान कलाग्राम येथे कलाजागर हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी निवड चाचणी घेण्यात आली व संपूर्ण मराठवाड्यातून १७३ कलावंतांना संधी देण्यात आली. परभणी, येसगाव, तुर्काबाद खराडी, वाळूज, सिल्लोड, फुलंब्री, जिंतूर आदी ठिकाणांहून आलेल्या कलावंतांनी आपली दखल घ्यायला लावली. पहिल्या दिवशी शहनाई वादन, बासरी वादन, शास्त्रीय गायन, पोवाडा, फोक डान्स, बासरी वादन, अभंग, भजन, गोंधळ, भरतनाट्यम, लावणी आदींचे पन्नासपेक्षा जास्त कलाप्रकार सादर करण्यात आले. शनिवारीही मुूक अभिनय, गझल, चित्रपट गीत, बासरी वादन, पथनाट्य, कथ्थक, एकपात्री शिवाजी, सुगम गायन आदी विविध कार्यक्रमांनी निखळ मनोरंजन केले. यामध्ये अमिता लेकुरवाळे, गायत्री कुलकर्णी व सीमा भोईर यांनी मातृगाथा हा कार्यक्रम सादर केला. शहरातील विविध मंडळांमध्ये हा कार्यक्रम प्रसिद्ध असला तरी वेरुळ- अजिंठा महोत्सवात कार्यक्रम सादर करायला मिळणे अभिमानास्पद होते अशी प्रति‌क्रिया ग्रुपने मटास दिली. माधुरी लासुरकर व शरद लासुरकर यांनी सुगम गायन केले. तर ‌भानुदास जाधव भिवपुरकर यांच्या ग्रुपच्या भारुडासही विशेष दाद मिळाली. रविवारीही सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यंत उर्वरित कलावंतांचे कार्यक्रम पहायला मिळाले. मृण्मयी यादव या पाच वर्षांच्या चिमुकलीने भरतनाट्यम सादर केले. यामध्ये क्लेरोनेट वादन, माऊथ ऑरगन, भावगीत, कवाली, नकला, स्किट, वासुदेव, लोकनाट्य, पोवाडा, सोंगी भारूड, लोकगीत, भेदिक, कुचिपुडी नृत्य, लावणी, चित्रपट आदी दाखवले गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, रमाकांत रौतल्ले, मिथिन चव्हाण, शिल्पा कुलकर्णी आदी परिश्रम घेतले. सर्व सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक स्पर्धांतून विविध गुणदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या निमित्ताने कलाग्राम येथे शनिवारी मंदी व पाककला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अरेबिक श्रेणीत निखत शेख, पूजा जगताप, ऋतुजा चौधरी व ओजश्री देशमुख विजेत्या ठरल्या. तर ब्रायडल मेंदीमध्ये सुजाता अहीर, पल्लवी जाधव, कल्याणी देशमुख यांनी बक्षीस मिळवले. पाककला स्पर्धेत माधुरी इराळे, वंदना जाधव, अश्विनी वडके यांनी गोड पदार्थांमध्ये, तर सुनेत्रा देशमुख, रेणू शिंदे व सुनंदा पगारे विजेत्या ठरल्या.
या स्पर्धेसाठी सरोज बगडिया व वर्षा मालपाणी परीक्षक होत्या. महेंद्र हरपळकर व सूर्यकांत मालपाणी आयोजक होते. शुक्रवारी फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धेमध्ये सहा स्पर्धक सहभागी झाले होते. सय्यद रहीम व जी. एस. बासरकर परीक्षक होते. यामध्ये ओजश्री देशमुख, माधुरी इराळे, पुजा जगताप व राजेश निंबाळकर विजेती ठरली. रांगोळी स्पर्धेसाठी विजयालक्ष्मी दांगट, आरती वैद्य व अशोक देशमुख परीक्षक होते. स्पर्धेत पांडुरग कुंभार, सचिन पांचाळ व सुजाता आहेर यांनी संस्कार भारती रांगोळीत यश मिळवले. फ्री हॅँड श्रेणीमध्ये महेंद्र खाजेकर, रागिनी पांचाळ व सचिन पांचाळ विजेते ठरले झाली. कविता शिरा व छाया पांचाळ यांना ठिपक्यांच्या रांगोळीसाठी बक्ष‌िसे देण्यात आली.
रविवारी समारोप कार्यक्रमातही चित्रकला, केशभूषा व वैशभूषा कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी आठ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी चौथी ते सातवी व सातवी ते दहावी या गटामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ‘औरंगाबाद जिल्ह्यातील स्मारके वा वास्तू’ असा स्पर्धेचा विषय होता. मोहिनी येन्नावार व राजेश सुहिंदा परीक्षक होती. दुपारच्या केशरचना स्पर्धेत विविध केशरचना सादर करण्यात आल्या. यामध्ये मंजुश्री दावणे यांनी प्रथम, निखत शेख द्वितीय व पूजा घोंडगे यांनीे तिसरा क्रमांक पटकावला. उपजिल्हाधिकारी सविता चवघट (जालना) व वर्षा मालपाणी परीक्षक होत्या.
पारंपारिक वेशभूषा स्पर्धेमध्ये यहिला व चिमुकल्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन लक्ष वेधले. बालगोपाळांची वेशभूषा आकर्षणाचा विषय होता. क्रुत्यांजली अदवंत व वर्षा मालपाणी परीक्षक होत्या. स्पर्धकांनी अभिनय सादर केला. वेशभूषेत माधुरी लासूरकर, वैष्णवी देशमुख व शीतल करंजे विजेत्या ठरल्या. चिमकल्यांमध्ये जाँय व अनिरुद्ध ताठी यांनी बक्षीस मिळवले. अभिनयामध्ये श्रावणी शेडके, झोया शेख व आरती चव्हाण विजेती ठरली. डॉ. मंगला बोरकर व सहकार्यांनी परीश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images