Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ई-मेल व्हॉट्सअपच्या जगात पत्र लिखाणाचे प्रेम कायम

$
0
0

ई-मेल व्हॉट्सअपच्या जगात पत्र लिखाणाचे प्रेम कायम
९ महिन्यात तब्बल दीड लाख पोस्टकार्डांची विक्री !
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मोबाइल मॅसेजिंग, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टपाल खात्यातील प्रचलित पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्राला उतरती कळा लागली असल्याचे बोलले जात असतानाच गेल्या नऊ महिन्यात तब्बल दीड लाख पोस्टकार्ड विकल्या गेल्याची माहिती हाती आली आहे. तरीही याचा वापर पूर्वी इतका राहिलेला नसल्याने टपाल खात्याला वर्षाकाठी प्रत्येक पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्रांच्या छपाईमागे अनुक्रमे ७ व ५ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे हेही वास्तव समोर आले आहे.
जुना बाजार येथील मुख्य पोस्टातील पोस्ट मास्तर सुनील परळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या नऊ महिन्यात तब्बल १ लाख ६६ हजार पोस्ट कार्डातून पोस्टाला ८३ हजार रुपये मिळाले आहेत. एक पोस्टकार्ड सध्या ५० पैसे या दराने विकले जात आहे. पाकिट अडीच रुपयांना विकले जात असून ३ लाख २३ हजार रुपयांची ६४ हजार ६०० पाकिटेही विकली गेली आहेत. आंतरर्देशीय पत्र अडीच रुपयांना एक यानुसार विकले जात असून ८८ हजार २२५ रुपयांची तब्बल ३५ हजार ३९० हजार पत्रकार्ड विकली गेली आहेत.
या सर्वांचा छपाईखर्च त्यांच्या विक्री किमतीपेक्षा अधिक असल्याने टपाल खात्याला दरवर्षी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. संगणक युगात ई-मेल, मोबाइल मॅसेजिंग आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डाक विभागाची ही सशक्त माध्यमे काळाच्या ओघात मागे पडू लागली आहेत. दुसरीकडे निर्मिती खर्च वाढत असल्याने टपाल खात्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लगत आहे. डाकघरांमध्ये वितरित केले जाणारे आंतरदेशीय पत्र, पोस्टकार्ड, पंजीकृत लिफाफे, हवाई पत्र, मोहोर चिन्हांकित लिफाफे, डाक तिकिटांची निर्मिती केंद्र शासनाद्वारे प्रत्येक राज्यात स्थापित करण्यात आलेल्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात केली जाते. खर्चाचा मेळ बसविण्याकरीता टपाल खात्याने वर्षांपूर्वी १५ पैसे दराने विकल्या जाणाऱ्या पोस्टकार्डाची किंमत ५० पैसे, तर आंतरदेशीय पत्राचे दर ७५ पैशांवरून २.५० रुपये केली; मात्र टपाल खात्याला २०१३ पासून छपाईसाठी प्रती पोस्टकार्ड ७ रुपये, तर प्रती आंतरर्देशीय पत्राच्या ५ रुपये नुकसान सोसावे लागत आहे. असे असले तरी पत्र लिखाण काम करणारे अजूनही असल्याने पोस्टखात्याला तेवढाच दिलासा मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जावयावर सासुरवाडीच्या लोकांचा हल्ला

$
0
0

जावयावर सासुरवाडीच्या लोकांचा हल्ला
पत्नीच्या नावावर प्लॉट करून देण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जावयावर पत्नीसह सासरच्या मंडळींनी फायटर, कटर व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला केला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता मुकुंदवाडी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद संतोषराव हिवाळे (वय ३३, रा. जे सेक्टर, मुकुंदवाडी) हा शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्याच्या बसला होता. यावेळी त्याची पत्नी पौर्णिमा, तिचा भाऊ संतोष, रणजीत व वडील रावसाहेब नारायण कोतकर (सर्व रा. ब्रिजवाडी) हे त्याच्या घरी आले. पत्नीच्या नावावर प्लॉट करून देण्याची मागणी करीत त्यांनी शिवीगाळ करीत प्रमोदला मारहाण केली. तसेच संतोष व रणजीत फायटर व कटर तसेच लाकडी दांड्याने हल्ला केला. या घटनेत प्रमोदच्या हाताला, डोक्याला मार लागला. प्रमोदला ठार मारण्याची धमकी देत आरोपी निघून गेले. याप्रकरणी प्रमोदने सोमवारी पोलिस ठाणे गाठत चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जमादार गवारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटमध्ये करिअर घडवता येते

$
0
0

क्रिकेटमध्ये करिअर घडवता येते
माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जीवनात शिक्षणाचे महत्त्व कायम असले तरी क्रिकेट खेळातही ‘करिअर’ करता येऊ शकते. क्रिकेट हा आता केवळ खेळ नसून व्यवसाय झालेला आहे. दर्जेदार क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून गुणवान खेळाडू घडवणे सहज शक्य आहे, असे मत माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांनी मंगळवारी व्यक्त केले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सुरू होत असलेल्या कोहम क्रिकेट अकादमीचे उद्घाटन शर्मा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी क्रिकेट इंडिया अकादमीचे अभिषेक शेखावत, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद भोगले, सचिव राम पातूरकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, अशोक तेलंग, कोहम अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित रोंघे, डॉ. मकरंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयोन्मुख खेळाडूंशी संवाद साधताना शर्मा म्हणाले, ‘पूर्वीच्या तुलनेत देशभर क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जात आहे. भारतात तर क्रिकेट हा धर्मच बनलेला आहे. प्रत्येक खेळाडूंच्या पालकांना वाटते की आपला मुलगा हा सचिन तेंडुलकर, कपिलदेव सारखा व्हावा. परंतु, प्रत्येक खेळाडू हा त्यांच्या इतकी उंची गाठू शकत नाही. क्रिकेट खेळातील हे कटू वास्तवाची जाणीव प्रशिक्षकांनी पालकांना वेळीच करून देण्याची आवश्यकता आहे. मी जेव्हा रणजी खेळत होतो, तेव्हा मला एका सामन्यासाठी २०० रुपये मानधन होते. आता एका रणजी सामन्यासाठी जवळपास दीड लाख रुपये मिळतात. आयपीएल व इतर क्रिकेट स्पर्धांतून खेळाडूंना भरपूर कमाई होते. त्यामुळे क्रिकेटमध्ये निश्चितपणे करिअर घडवता येते.’ क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कोहम अकादमीत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच्या काळात छोट्या शहरातून अनेक चांगले खेळाडू घडत आहेत. भविष्यात औरंगाबादेतूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडेल, असा आशावादही शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
अभिषेक शेखावत यांनी अकादमीच्या प्रशिक्षणाची रूपरेषा समजावून सांगितली. शाळेप्रमाणेच अकादमीत क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचे मूल्यमापनही तशाच पद्धतीने होणार आहे. खेळाडूंना आधुनिक सुविधा देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. क्रिकेट अकादमीमुळे शहराला फायदा होणार आहे. खेळाडूंकरिता शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे नितांत गरजेचे आहे. आधुनिक साधनांचा उपयोग आता आवश्यक झाला असल्याचे सचिन मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. सांगितले. रोहित रोंघे म्हणाले, ‘अकादमीच्या माध्यमातून खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षणा बरोबरच संशोधन, खेळाचे व्यवस्थापन या गोष्टीही शिकवल्या जाणार आहेत.’ पार्थ बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी विशाल देशपांडे, संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, प्रशांत रोंघे, अश्विनी रोंघे, रोहिणी रोंघे, अजित पाठक, दयानंद कांबळे, ऋतुजा महाजन आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजन बंधू घालणार सुवर्ण चौकोनाला गवसणी

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
औरंगाबाद ः जगातील सर्वांत कठीण समजण्यात येणारी ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ (रॅम) ही ४८६० किलोमीटरची सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिले भारतीय आणि ‘टीम ऑफ टू’ कॅटेगिरीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणारे डॉ. हितेंद्र महाजन व लहान बंधू डॉ. महेंद्र महाजन आता सायकलवर सुवर्ण चौकोनाला (गोल्डन क्वाड्रँगल) गवसणी घालणार आहेत. तब्बल सहा हजार किलोमीटरचे अंतर १२ दिवसांत सायकलवर पूर्ण करण्याचे टार्गेट ‘महाजन ब्रदर्स’नी ठेवले असून, येत्या १८ डिसेंबरला त्यांची ‘टूर-दि-गोल्डन क्वाड्रँगल’ गेट वे ऑफ इंडियापासून सुरू होणार असल्याचे त्यांनी ‘मटा’ला सांगितले.
व्यवसायाने भूलतज्ज्ञ असलेले डॉ. हितेंद्र महाजन हे औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या भूलशास्त्रावरील परिषदेत संघटनेचे नवे राज्याध्यक्ष म्हणून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे परिषदेत सहभागी होण्यासाठी ते चक्क नाशिकहून औरंगाबादला सायकलवर आले होते. मागच्या वर्षी डॉक्टर बंधुंनी वयाच्या ४५ व ३९ व्या वर्षी ‘रॅम’वर तिरंगा फटकाविला आणि देश-विदेशातून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनींही ‘मन की बात’मधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
भूतानमधील एक दिवसाची, सर्वांत कठीण ‘टूर ऑफ दि ड्रॅगन’ ही सायकल स्पर्धा पूर्ण करणारेही ‘महाजन ब्रदर्स’ हे पहिले भारतीय ठरले. जगातील सर्वांत उंचीवरील मनाली-लेह-खार्दूमला रस्त्यावर ६५० किलोमीटरची सायकलिंग करण्याबरोबरच बडोदा-उदयपूर-बडोदा हे ६०० किलोमीटरचे अंतर २४ तासांत, तर दिल्ली-वाघा बॉर्डर-दिल्ली हे १००० किलोमीटरचे अंतर ६२ तासांत यशस्वीरित्या पार करणाऱ्या महाजन बंधुंची ही सायकल फिरस्ती केवळ चार वर्षांपासून आहे.
यापूर्वी दोघे भाऊ सलग नऊ वर्षे ४२ किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये धावत होते, तर त्यापूर्वी ट्रेकिंगमध्ये डॉक्टर बंधू रमले होते व आतापर्यंत त्यांनी ३५० किल्ले आणि बहुतांश सह्याद्री पालथा घातला आहे.

सायकलिंगच्या प्रचार-प्रसारासाठीच
सायकलिंगचा खेळांमध्ये सन्मान मिळावा, सायकलिंगचा प्रचार-प्रसार व्हावा आणि सायक्लिंग करणाऱ्यांचा उत्साह वाढावा, या व्यापक उद्देशाने ही सायकल फेरी काढणार असल्याचे डॉ. हितेंद्र यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर लेखा परीक्षक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा विशेष लेखा परीक्षक (सहकारी संस्था) कार्यालयातील अप्पर लेखा परीक्षक प्रताप शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखांची लाच घेताना एजंटासह अटक केली. गारखेडा येथील कार्यालयात मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेने दिलेले बांधकामाचे कंत्राट रद्द न करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही लाच घेण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बांधकाम कंत्राटदाराला न्यू तिरुमला गृहनिर्माण संस्थेकडून प्लॉटवर बांधकाम करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या संस्थेचे लेखा परीक्षण करण्यासाठी शासनाकडून अप्पर लेखापरीक्षक प्रताप शिंदे यांची नेमणूक करण्यात आली होती. शिंदे यांनी मार्च २०१६पर्यंतचे संस्थेचे सर्व रेकॉर्ड मागवून घेतले होते. या लेखा परीक्षणात गंभीर बाबी आढळून आल्या असून, त्याचा खुलासा करण्याबाबत नोटीस त्यांनी संस्थेला दिली. प्रताप शिंदे यांना संस्थेचे अध्यक्ष भेटले असता, त्यांनी बांधकाम कंत्राटदाराला घेऊन येण्याची सूचना केली. शिंदे यांनी त्यांना गृहनिर्माण संस्थेला दिलेली नोटीस परत घेण्यासाठी, लेखा परीक्षण अहवाल संस्थेच्या बाजूने देण्यासाठी, बांधकामाचे कंत्राट रद्द न करण्यासाठी आणि फौजदारी कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
मंगळवारी पोलिसांनी या प्रकरणात सापळा रचला. गारखेडा येथील कार्यालयात सुदीप हिवराळे या एजंटामार्फत दोन लाखांची लाच घेताना हिवराळे व शिंदे यांना पकडण्यात आले.
पोलिसांनी आरोपी प्रताप माधवराव शिंदे (वय ४३, रा. समृद्धी पार्क, रो हाउस क्रमांक ई २, शहानूरवाडी) आणि सुदीप देविराज हिवराळे (वय २४, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपाधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, पोलिस निरीक्षक एस. एस. शेगोकार प्रमोद पाटील यांनी यशस्वी केली. या कारवाईमध्ये कर्मचारी कैलास कामठे, संदीप आव्हाळे, अश्वलिंग होनराव, अजय आवले, दीपक देशमुख, मंगल दिवे, दिलीप राजपूत व संदीप चिंचोले यांनी परिश्रम घेतले.

अडीच लाख पूर्वीच घेतले
पाच लाख रुपयांपैकी शिंदे यांनी अडीच लाख रुपये पूर्वीच घेतले आहेत. उर्वरित अडीच लाख १७ ऑक्टोबर रोजी देण्यास सांगितले. पैसे देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची पडताळणी केली असता तडजोडीअंती दोन लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला महाविद्यालयाला अवकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद येथील कला महाविद्यालयाची शिक्षकांअभावी वाताहत झाली आहे. उपयोजित कला, चित्रकला या विभागांत शिक्षकच नाहीत. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थांनी ‘शिक्षक देता कोणी शिक्षक’, ‘हवं हक्काच शिक्षण’ असा आवाज देत मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. विविध मागण्या कलाकृतीच्या स्वरुपात मांडून निषेध व्यक्त केला. ‘दगड नको शिक्षक पाहिजे’ अशा घोषणांनी कॉलेज परिसर दणाणला. कॉलेजमध्ये मंजूर २३पैकी १५हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय कलाकार घडविणाऱ्या औरंगाबादच्या कला महाविद्यालयात आजघडीला शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. कॉलेजमध्ये चार अभ्यासक्रम शिकविले जातात. सगळ्या विभागांमधील जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम शिकविण्यावर झाला असून, एक शिक्षक दोन विषय शिकवितात. त्याचबरोबर तासिका तत्ववारील शिक्षकांवर शिकविण्याचा भार पडला आहे. त्यातही सातत्य नसल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा बंद आहेत. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी कॉलेजबाहेर ठिय्या मांडला. पूर्णवेळ शिक्षक नेमण्यात यावेत, अभ्यासक्रम पूर्ण करावा, संगणक प्रयोगशाळा सुरू करावी, अशी मागणी केली. खुर्चीवर दगड ठेवून ‘दगड नको शिक्षक पाहिजे,’ असा फलक लावण्यात आला.
‘हवं हक्काचे शिक्षण’, ‘शिक्षक कसा असावा’, ‘पूर्णवेळ शिक्षक नेमा’, ‘विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. कॉलेजमध्ये असलेला महागडा कॅमेरा, कम्प्युटर लॅब बंद आहे. अद्ययावत सॉफ्टवेअर नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. वारंवार मागण्या मांडल्यानंतरही कॉलेज प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

अन् परीक्षा झालीच नाही
कॉलेजमधील अंतर्गत सराव परीक्षा १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. अभ्यासक्रमच अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षाच होऊ शकलेली नाही. अभ्यासक्रम पूर्ण केव्हा होणार परीक्षा केव्हा घेतली जाणार हा प्रश्न कायम आहे.

नऊ वर्षांपासून ग्रंथापालच नाही
महाविद्यालयातील ग्रंथालयाला २००७पासून ग्रंथपालच नाही. ग्रंथपालाविना चालणाऱ्या ग्रंथालयाला एक दशक पूर्ण होत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. ग्रंथालयात अभ्यासक्रमातील पुस्तकांसह समीक्षकांनी, कलाकारांनी लिहिलेली महत्वपूर्ण, दुर्मिळ पुस्तके असा मोठा खजिना आहे, परंतु विद्यार्थ्यांना त्याचा फारसा लाभ मिळत नाही. त्याच्या पदभाराचा प्रवास अध्यापक तर कधी इतर कर्मचारी असा सुरू असतो. ग्रंथापल नसल्याने अर्धवेळ ग्रंथालय सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा उपयोग होत नाही.

शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया शासकीय पातळीवरून होते. शिक्षक नसलेले अभ्यासक्रम शिकविण्यासाठी कंत्राटी, तासिका तत्वावरील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येतात, परंतु तासिका तत्वावरील अनेक शिक्षक काम सोडून जातात. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर परिणाम होतो. इतर प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- भरत गढरी, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय कला महाविद्यालय

मी तृतीय वर्षाला शिकत आहे. अजूनपर्यंत आम्हाला थिअरी आणि कम्प्युटर ग्राफिक्स विषयांना शिक्षकच नाहीत.
- विशाल शहाणे, विद्यार्थी

शिक्षणच मिळत नसेल, तर प्रवेश घेण्याचा काय फायदा. शिक्षकांविरुद्ध आंदोलन नसून, विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान आम्हाला मांडायचे होते. उपयोजित कला अभियांत्रिकीच्या बरोबरीचा अभ्यासक्रम आहे. त्यानुसार शिक्षण दिले जायला हवे.
- मनीष बारी, विद्यार्थी

कॉलेजमध्ये येथे कोणत्याही विषयाला शिक्षक नाही. आमच्या डिपार्टमेंटला फक्त एकच शिक्षक कायमस्वरुपी आहेत. बाकी सगळे कंत्राटीपदावर आहेत. दोन महिने झाले की त्यांना पदावरून काढले जाते. आम्ही अनेकदा अर्ज केले, परंतु मागण्या पूर्ण होत नाही.
- श्रद्धा राजापूरकर, विद्यार्थी

अभ्यासक्रमनिहाय रिक्त जागा
अभ्यासक्रम........मंजूर जागा....रिक्त पदे
उपयोजित कला.......१०................७
पेटिंग.....................८................६
टेक्सटाईल..............४.................३
कला प्रशिक्षक.........३..................१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅट्रॉसिटी कायदा वैधच

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
अॅट्रॉसिटी कायदा वैधतेचा प्रश्न सुप्रीम कोर्टाने १९९५मध्येच निकाली काढला आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेत वैधता तपासता येणार नाही, असे स्पष्ट करून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी दिवाळी सुट्ट्यानंतर ठेवली आहे, मात्र प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली नाही.
लातूर जिल्ह्यातील दत्ता कदम, रामकृष्ण कदम व बीड जिल्ह्यातील सुरेश करणे यांनी अॅट्रॉसिटीच्या घटनात्मक विसंगती व चुकीच्या बाबींच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते दत्ता कदम हे या कायद्याच्या दुरुपयोगाचे बळी ठरले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या विरोधात २०१४मध्ये अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल झाली होती. त्यांची सेशन कोर्ट व औरंगाबाद खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. घटनेच्या कलम १४ अन्वये प्रत्येक भारतीय नागरिक समान असतील, अशी ग्वाही दिली आहे, मात्र कायद्यानुसार विशिष्ट समाज घटकांच्या विरोधात उर्वरित समाज घटकच अत्याचार करू शकतात हे अविवेकी आहे. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियमावली करावी, अशी विनंती केली आहे. सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश विरुद्ध राजकिशन लोथ‌िया या प्रकरणातील निकालामुळे अॅट्राॅसिटी कायदा वैधतेचा मुद्दा निकाली काढला आहे. २०१४मध्ये या कायद्यांतर्गत २८ टक्के प्रकरणामध्ये शिक्षा झालेली नाही, तसेच कायद्याची उपयुक्तता ही शिक्षेच्या प्रमाणावरून सिद्ध होत नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी केला. याचिकाकर्त्यातर्फे कुलदीप पाटील, दत्तात्रय सरवदे, ज्ञानेश्वर पोकळे, नीलेश पाटील हे बाजू मांडत आहेत. राज्य सरकारची बाजू विनायक कागणे यांनी मांडली.

अटकपूर्व जामिनाची विनंती
अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्याचा हक्क द्यावा, प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल व्हावा, याचिकाकर्त्याला झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल आर्थिक सहाय्य करावे, अशी विनंती याचिकेत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीला छेडणाऱ्यास बेदम चोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक तरुण विद्यार्थिनीची छेड काढत होता. ही बाब परिसरातील विद्यार्थ्यांनी पाहिली अन् त्या तरुणाला पकडून बेदम चोप दिला. कुलगुरूंच्या बंगल्यासमोरच मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणाला दोन-तीन वर्षांपासून ही तरुणी ओळखत असल्याची चर्चाही यावेळी होती.
संबंधित विद्यार्थिनी विद्यापीठ परिसरात असलेल्या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आली होती. तिच्या परिचयाच्या तरुणाने तिला दुचाकीवर विद्यापीठात आणले होते. कुलगुरूंच्या बंगल्यासमोर या तरुणाने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. हा प्रकार विद्यापीठातील कर्मचारी, विद्यार्थी, तरुणांनी पाहिला अन् त्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारला. मुलीला त्याच्या तावडीतून सोडविले. मुलीची छेड करत असल्याची माहिती समजताच विद्यापीठातील तरुणांनी संबंधित तरुणाला पकडून बेदम चोप दिला. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता.

रक्षक गेले कोठे?
विद्यापीठात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. मुलीला छेडण्याचा प्रकार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या बंगल्यासमोर घडला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी संबंधित तरुणाला रोखणे अपेक्षित होते, परंतु तसे घडले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक कोठे गेले होते, अशी चर्चाही यावेळी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संघटनेच्या कार्यालयात बोलावून त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागातील वरिष्ठ सहायक सुभाष बोरीकर यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी कुलगुरूंसमोर निवेदन दिले आहे. संघटनेच्या कार्यालयात बोलावून, फोनवरून अपमानजनक भाषेत बोलल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे. मानसिक त्रास झाल्याचे सांगत याप्रकरणी कारवाई करण्याची विनंती कुलगुरूंना करण्यात आली आहे.
इतिहास विभागातील वरिष्ठ सहायक सुभाष बोरीकर यांना विद्यापीठाने १५ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. बीना सेंगर; तसेच विद्यार्थ्यांना बोरीकर यांनी धमकी व शिविगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. यावेळी कुलगुरूंना विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदना बोरीकर यांच्याकडून फोनवर, कार्यालयात बोलावून धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केला आहे. एका विद्यार्थिनीने म्हटले आहे की, बोरीकर यांच्या कार्यालयातून फोन आला. माझ्या निवेदनावर तू सही केली आहेस. मी निवेदनावर सही केलेली नसतानाही मला सुटीच्या दिवशी नाहक मनस्ताप झाला.
माझे एमफीलचे नोटिफिकेशन त्यांनी आणले. त्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी नोटिफिकेशन आणलेले नाही, असे सांगितले. या सर्व प्रक्रियेत मला सतत आठ दिवस मानसिक त्रास झाला व विभागाच्या कार्यालयातही ते अपमानजनक भाषेत बोलले, अशी तक्रारही विद्यार्थिनीने निवेदनात केली. एका विद्यार्थ्याने, ऑफिसमध्ये बोलावून अॅडमिशन गायब करतो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
‘विभागप्रमुख वेळेवर हजर नाहीत, लेक्चर घेत नाही, आम्हाला बोरीकर यांच्याबद्दल आदर आहे,’ अशी माहिती तू लिहून दे नाहीतर तुझे एमफीलचे अॅडमिशन रद्द करेल, अशी धमकीही त्यांनी दिली. माझ्या जीविताला काही धोका झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी बोरीकर यांचीच राहील, असे विद्यार्थ्यांनी पत्रात म्हटले आहे.

माझी बाजू मांडण्यासाठी वेळ दिला नाही. प्रशासकीय पातळीवर काय सुरू आहे, मला माहिती नाही. पुढे काय भूमिका घ्यायची हेही निश्चित नाही. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांविषयीही मला काहीही माहिती नाही.
- सुभाष बोरीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीपूर्वी रेशनवर हरभराडाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी सणासाठी रेशन दुकानांवर हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर डाळी विक्रीसाठी शहराच्या विविध भागांत आउटलेट सुरू करण्याचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेमकी किती डाळ जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, याचा तपशील प्रशासनाला उपलब्ध झालेला नाही.
बाजारात व्यापारी हरभरा, तूर या डाळींचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे, मात्र ग्राहकांना आता दिवाळीपूर्वी रेशनवर हरभरा डाळ उपलब्ध करून देण्यात येणार अाहे. महिन्यापूर्वी राज्यातील बाजारपेठेत तूरडाळीच्या किरकोळ दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडून तुरीची खरेदी केली. त्यापासून तयार केलेली तूर डाळ खुल्या बाजारात स्वस्त दराने वितरित करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता दिवाळीच्या काही दिवस आगोदरच डाळींच्या भावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हरभरा डाळही रेशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना डाळ मिळावी म्हणून शहरात विविध ठिकाणी आउटलेटही सुरू करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आउटलेट सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रत्येक कार्डधारकाला प्रत्येकी एक किलो ही डाळ उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक घेण्यात आली. डाळीच्या दरांसंदर्भात प्रशासनाला निर्देश मिळाले नसले, तरी रेशनवर डाळ मिळणार असल्यामुळे खुल्या बाजारात दर नियंत्रित राहण्याची शक्यता आहे.

रेशनवर साखर आली
बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थींसाठी रेशन दुकानांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांची अतिरिक्त साखर देण्यात आली आहे. सुमारे ७ हजार क्विंटल साखर रेशनदुकानांवर आली असून, प्रत्येक लाभार्थीला ६५० ग्रॅम साखर दिवाळीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार लाभार्थींना या अतिरिक्त साखरेचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहोद्योगाला बळ देणारा उद्योजक

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
सेठी कुटुंबीय हे मुळचे चाळीसगावचे. आशिष यांचे वडील सुभाषचंद्र सेठी यांनी औरंगाबादेतील शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयातून बी.ई. इलेक्टिकल पूर्ण केले आणि काही दिवस नोकरी करून किराणा चावडीत ‘किसान मशीनरी’ हे दुकान सुरू केले. दरम्यान, आशिष यांचे प्राथमिक शिक्षण मामांकडे आणि दहावीपर्यंतचे शिक्षण शहरात झाले, मात्र पहिल्यापासूनच आशिष यांना अभ्यासात गोडी नव्हती. त्यामुळे बारावीनंतर शिक्षणाला पूर्णविराम देत काहीतरी छोटा-मोठा उद्योग करावा, या हेतूने आशिष यांना झपाटले. त्याचवेळी वडिलांप्रमाणे दुकानात बसणे, घरचा व्यवसाय पुढे नेणे, व्यापार करणे, यात आशिष यांना अजिबात रस नव्हता. आपण स्वतः काहीतरी केले पाहिजे, या जाणिवेने विशीतल्या आशिष यांना पुरते झपाटले होते आणि त्यातूनच आशिष यांनी १९९६-९७मध्ये भागीदारीत उद्योग सुरू केला. दुर्दैवाने मोठे नुकसान झाले आणि भागीदारीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अर्थात, मोठे नुकसान झाल्यानंतरही त्यांना घरच्यांनी आणि विशेषतः वडिलांनी व मोठा भाऊ सुनील यांनी आशिष यांना समजून घेत मोठा मानसिक आधार दिला. घरच्या पाठिंब्यामुळे पुन्हा उभारी घेत त्यांनी २०००मध्ये वाळूजमध्ये ‘कल्याणी इंडस्ट्रिज’ या नावाने ‘इंडक्शन मोटर्स’ची निर्मिती सुरू केली. वडिलांचे तांत्रिक मार्गदर्शन होते आणि आशिष यांची कष्ट करण्याची तयारी होती. अनेक कारणांसाठी आणि अनेक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या ‘इंडक्शन मोटर्स’च्या निर्मितीसाठी आशिष यांना तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागले. प्रत्येक तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी दमछाक होत होती, परंतु तरीही आशिष यांनी सगळ्या अडचणींवर मात करीत ‘इंडक्शन मोटर्स’ची निर्मिती जमेल तशी सुरू केली. काही प्रमाणात प्रतिसादही मिळत होता, मात्र वसुली पाहिजे तशी होत नव्हती आणि म्हणून नुकसान वाढत होते. त्यामुळे आशिष यांनी वेगवेगळे जॉब वर्क घेण्यासही सुरुवात केली. त्यातून असंख्य तांत्रिक बाबी शिकायला मिळत होत्या आणि दिवसेंदिवस अनुभव समृद्ध होत होता. मात्र वसुलीची अडचण व नुकसानीच्या फेऱ्यातून पूर्णपणे बाहेर पडणे काही केल्या शक्य होत नव्हते. त्यामुळे घरातल्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या गृहोद्योगाच्या मशीन केवळ विकण्यापेक्षा त्या आपणच का तयार करू नयेत, असा विचार त्यांच्या डोक्यात चमकला आणि त्या दिशेने चाचपणी सुरू केली. मराठवाड्यात या मशीन्सची निर्मितीही नगण्य होती. त्यामुळे यात संधी मिळेल, असा त्यांचा अंदाज होता. याविषयी वडील, भावाकडे विचार बोलून दाखविला आणि अर्थातच त्यांच्याकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच आशिष यांनी ‘कल्याणी इंडस्ट्रिज’मध्ये आणि त्याच नावाने २००४मध्ये शेवाया मशीन सुरू केले. त्याकाळी गृहोद्योग करणाऱ्यांमध्ये शेवाया मशीन वापरण्याचा ट्रेंड नव्हता. केवळ शेवायाच नव्हे तर इतरही गृहोद्योग करणाऱ्यांमध्येही मशीनचा वापर तुलनेने कमीच होता. परिणामी, गृहोद्योग करणाऱ्यांना मशीनचे महत्त्व समजून सांगण्यासाठी आणि मशीन विकत घेण्यासाठी ग्राहकांचे मन वळविणे खूप अवघड ठरत होते. एकेक ग्राहक मिळवणे म्हणजे एक प्रकारे दिव्य काम होते. त्यातही पूर्वीपासून मिळणाऱ्या दुसऱ्या कंपन्यांच्या मशीन सोडून ‘कल्याणी’चे मशीन विकत घेण्यासाठी ग्राहकांना पटवून सांगणे अजूनच कठीण काम होते, मात्र मशीनचा दर्जा-सर्व्हिस पाहून हळुहळु ग्राहकांचे मत परिवर्तन होऊ लागले आणि ‘कल्याणी’च्या शेवाया मशीन ग्राहकांच्या गृहोद्योगात स्थान मिळवू लागल्या. मागणी वाढू लागली तशी शेवाया मशीनबरोबरच चिप्स मशीन, पापड मशीन, मिरची मसाला ग्राइंडर मशीनची निर्मितीही आशिष यांनी सुरू केली, मात्र वसुली व इतर अडचणींमुळे ‘इंडक्शन मोटर्स’ची निर्मिती आशिष यांनी २००६-७मध्ये थांबवली आणि पूर्ण लक्ष गृहोद्योगासाठीच्या मशीन निर्मितीवर केंद्रित केले.

मित्रांच्या तंत्रसहाय्यामुळेच यश
एकानंतर एक मशीनची निर्मिती सुरू झाली खरी; परंतु ही निर्मिती नक्कीच सहज-सोपी नव्हती. त्यासाठी आशिष यांनी अहमदाबाद येथील दुसऱ्या कंपन्यांमध्ये जाऊन काही काळ माहितीही घेतले, मात्र प्रत्येक ठिकाणी तांत्रिक अडचणी येत होत्या. अशा वेळी आशिष यांचे वाळूज येथील सतीश औसरमल, आशिष नरवाडे यासारखे उद्योजक मित्र मदतीला धावून आले. वडील, भाऊ आणि मित्रांच्या मदतीतून आशिष यांनी वेगवेगळ्या क्षमतांच्या ऑटोमॅटिक, सेमी-ऑटोमॅटिक मशीनची निर्मितीही सुरू केली. ग्राहकांना येणाऱ्या नेमक्या अडचणी लक्षात घेऊन मशीनमध्ये गरजेनुसार बदलही केले. त्याचवेळी ग्राहकांच्या विशिष्ट गरजांनुसार मशीनची निर्मिती करण्याचे कौशल्यही त्यांनी प्राप्त केले. सद्यस्थितीत शेवाया, पापड, चिप्स, ओला, सुका मसाला, वेफर्स आदींच्या डझनभर मशीन ‘कल्याणी’मार्फत तयार केले जातात. प्रारंभी ‘कल्याणी’ची सात-आठ लाखांपर्यंत असलेली उलाढाल आता ३०-३५ लाखांवर गेली असून, आणखी नवनवीन मशीन तयार करण्यावर आशिष यांनी लक्ष केंद्रित केले आहे. नजिकच्या भविण्यात शेवायाचे पीठ मळण्याचे मशीन, सुजी तयार करण्याचे मशीन, ऑटोमॅटिक ड्रायर मशीन निर्मितीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.

निर्णय योग्य ठरल्याचे समाधान
शिक्षण पूर्ण झालेले नसताना आणि त्यातही तंत्रशिक्षण नसताना विशीत उद्योग उभारण्याचे स्वप्न पाहणे अनेकांसाठी थट्टेचा विषय ठरला होता. घरच्यांनाही काळजी वाटत होती, परंतु घरच्यांनी नेहमीच विश्वास दाखविला आणि नेहमीच प्रोत्साहन दिले. आज मागे वळून पाहताना उद्योगात पडण्याचा निर्णय योग्य होता, याचा आनंद व समाधान नक्कीच वाटते. अलीकडेच वडिलांचे निधन झाले; पण माझ्या प्रगतीने ते समाधानी होते, हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे, असे आशिष सेठी नम्रपणे म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकविरुद्ध न खेळल्याने फरक पडणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माझ्यासाठी देश प्रथम आहे आणि त्यानंतर क्रिकेट. पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध मालिका झाली नाही, तर फार काही फरक पडणार नाही. पाकविरुद्ध खेळण्याबाबतचा निर्णय सरकारच घेऊ शकते, असे मत माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांनी व्यक्त केले.

कोहम क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनाच्यानिमित्ताने चेतन शर्मा हे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी ‘मटा’शी संवाद साधताना शर्मा म्हणाले, ‘पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळलो नाही म्हणून काही फरक पडत नाही. अन्य देशांविरुद्ध आपण खेळतच आहोत. भारताविरुद्ध खेळण्यासाठी सर्व देश उत्सुक असतात. देशासमोर अन्य काहीही महत्त्वाचे नाही. भारताकडून खेळणे हे अभिमानास्पद गोष्ट आहे. देशाचा झेंडा फडकताना अंगावर रोमांच येतात. पाकविरुद्ध मालिका खेळायची की नाही, याविषयीचा निर्णय सरकारच घेईल.’

धोनीचे नेतृत्त्व

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ विजयपथावरच आहे. धोनीने भारताला महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा जिंकून दिलेल्या आहेत. त्याच्या या कामगिरीची दखल घेणे आवश्यक आहे. त्याच्या कामगिरीचा निश्चितच सन्मान राखला गेला पाहिजे. अन्य देशांकडून त्यांच्या सन्मानाची अपेक्षा कशी धरता येईल. धोनीचे नेतृत्त्व यशदायी असल्याने सद्यस्थितीत त्याला बदलण्याची गरज वाटत नाही. धोनी सहाव्या क्रमांकावर खेळायला येतो. धोनी नाही, अशी कल्पना करून पाहा. ही जागा आपल्याला रिकामीच वाटेल. धोनीची संघाला नितांत गरज आहे. त्याच्या ‘गोल्डन टच’चा अनुभव आपण सर्वांनीच घेतलेला आहे. त्याच्यातील आक्रमकता आजही कायम आहे. त्यामुळे त्याला बदलण्याची गरज काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शिफारशी योग्यच

क्रिकेट खेळाडू हा केवळ उत्तम खेळाडूच नव्हे, तर एक चांगला प्रशासकही होऊ शकतो. त्याला योग्य संधी मिळणे आवश्यक आहे. लोढा समितीने केलेल्या शिफारशी योग्यच वाटतात. क्रिकेट क्षेत्रात पारदर्शकता आवश्यक आहे. आजपर्यंत मला बीसीआयआयसंबंधीत कोणतीही भूमिका करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे काही बोलणे चुकीचे होईल. तेथे साम-दंड-भेद चालत असेल, तर मला त्याविषयी माहिती नाही, असे चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले.

कपिलदेवनंतर...

कपिलदेवनंतर भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू का मिळाला नाही, याचे आश्चर्य वाटते, असे नमूद करून ते म्हणाले, ‘कपिलदेव ज्या काळात खेळत होते, तो काळ आता बदलला आहे. कपिलएवढे सलग १७-१८ वर्षे खेळणे इतके मोठी कारकीर्द आता राहिलेली नाही. तीन-पाच वर्षांच्या कालावधीतच खेळाडू मोठी कामगिरी करू शकतो. कपिल यांच्या हस्ते हार्दिक पंड्याला कॅप देण्यात आली. हार्दिकमध्ये अष्टपैलू खेळाडूची होण्याची क्षमता आहे.’

जावेद मियाँदादचा तो षटकार

जावेद मियाँदादचा तो षटकार व चेतन शर्मा यांचे समीकरणच बनले आहे, असे सांगत चेतन शर्मा यांनी त्या षटकाराची आठवण सांगितली. ते म्हणाले,‘जावेदचा तो षटकार मी विसरण्याचा जितका प्रयत्न करतो, तितकी आठवण मला करून दिली जाते. तुमच्या इतकाच मलाही तो षटकार आजही आठवणीत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्यामागची भूमिका समजून घ्या

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कायदेशीर प्रक्रिया नको तर कायदा का बनवला ते समजून घ्या. अंतर्गत समिती, विशाखा समितीची भूमिका स्त्रीच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची आहे. हिंसा थांबविणे हा कायद्याचा उद्देश आहे. तो पुरुषविरोधी नाही,’ असे प्रतिपादन मानवी हक्क तज्ज्ञ अॅड असीम सरोदे यांनी बुधवारी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात आयोजित अंतर्गत समिती जाणीव जागृती कार्यशाळेत सरोदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी डॉ. शुभांगी गोटे-गव्हाणे होत्या. संचालक डॉ. सतीश पाटील उद्घाटक होते. व्यासपीठावर सरकारी वकील अर्चना गोंधळेकर, डॉ. मीना पाटील, एम. बी. मुळे, नजमा शेख आदी उपस्थित होत्या. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) कायदा २०१३ नुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समिती असणे बंधनकारक आहे. याविषयी अॅड. सरोदे यांनी कायद्याचा मूळ गाभा समजावून सांगितला. ते म्हणाले, ‘क्लिष्ट कायद्यांची भाषा कायदे अभ्यासकांनाच कळते. वक‌िलांसाठीही हा पोट्यापाण्याचा विषय नसतो. ९० टक्के वकिलांनाही या कायद्याविषयी माहिती नाही. गरजू कायद्यापासून दूर राहतात. वाईट हेतू ठेवणारी मंडळी पुढे येतात. कायदे विवेकी पद्धतीने समजून घेण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.’

महिला आयोगाने करावे सर्वेक्षण
‘राज्यातील प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती आहे की नाही, यावर राज्य महिला आयोगाने राज्यव्यापी सर्वेक्षण करावे,’ अशी मागणी अॅड असीम सरोदे यांनी केली. सरोदे यांनी ‘मटा’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘कोणत्याही आस्थापनेत अंतर्गत समिती नसल्यास आयोगाही कारवाई करू शकतो. २०१३ चा कायदा असूनही आज बहुतांश आस्थापनांमध्ये ही समिती नाही. संपूर्ण राज्यातच अशी दयनीय स्थिती आहे. अंतर्गत समिती नसणे, खोट्या तक्रारींविरुद्ध कारवाई न करणे व तक्रारकर्त्यांचे नावे गोपनीय ठेऊन वार्षिक अहवाल न पाठवणे या प्रत्येकासाठी कायदेशीर दंड असून प्रसंगी संबंधित आस्थापनेचा परवाना रद्द करण्याइतपत क्षमता या कायद्यात आहे. मात्र, मुळात समितीची अंमलबजावणी करणारी प्रशिक्षित यंत्रणाच नसल्याने कायद्याची परिणामकारकता शून्य आहे. त्यामुळे अज्ञानी लोकच या समितीला पुरुषविरोधी ठरवतात. आपल्या कार्यालयात ही समिती नसावी या मानसिकतेतच वावरतात. सामान्य महिलेला याविषयी माहिती नसल्यानेच समिती असणाऱ्या वा नसणाऱ्या नेमक्या आस्थापनांची संख्या कधीच कळणार नाही. यासाठी सामाजिक संस्था किंवा सामान्य नागरिकाने पुढाकार घेऊन माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली तरच यंत्रणेला जाग येईल.’

...तर हायकोर्टाविरुद्धही केस चालवता येते
‘अगदी हायकोर्टातही अंतर्गत समिती नसेल तर ‌‌हायकोर्टाच्या विरुद्धही केस चालवता येते. यासाठी व्यापक व पुरेशी जनजागृती व्हायला हवी. कारण कायद्याची अपूर्णता ठेवणेही न्यायपासून वंचित ठेवणे असे होते. अंतर्गत समितींची सर्व नोंद, अहवाल स्थानिक तक्रार समितीकडे सुर्पूद करायचा असतो. यासाठी जिल्हाधिकारी स्वतः जबाबदार असतात. जिल्हा महिला व बालविकास खात्याचे अधिकारी सचिव असतात. ‌या खात्याकडे स्थानिक समिती केवळ सहकार्य मागू शकते. मात्र, आपली जबाबदारी टाळू शकत नाही,’ असेही सरोदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर, गंगापूरच्या पूरग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

$
0
0



औरंगाबाद : गोदावरी नदीला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या दोन तालुक्यातील २६ गावांना पूराचा तडाखा बसला होता. अडीच हजार शेतकऱ्यांचे शेती, घर व पशुधनाचे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तत्काळ सर्व्हेक्षण करून शासनाला अहवाल पाठवण्यात आला. मात्र, अडीच महिन्यानंतरही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान झालेली अतिवृष्टी व गोदावरीच्या उर्ध्व खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. नाशिकमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आला. या पुरात वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील २६७८ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाकडून अहवाल पाठवल्यानंतरही दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी अद्याप मदत मिळालेली नाही. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा संपूर्ण अहवाल प्रशासनाने २१ ऑगस्ट रोजी शासनाकडे पाठवला होता. या पुरामध्ये जिल्ह्यातील २६७८ शेतकऱ्यांच्या १९४८ हेक्टरचे नुकसान झाले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने १ कोटी ३९ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. या पावसाळ्यात बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच या दोन तालुक्यातील मदत मिळण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नवीन निकषाप्रमाणे जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० व फळबागांसाठी १८ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानाने चौघांना जीवनदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड/औरंगाबाद
नांदेड शहरातील तरुणाला अपघातानंतर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शर्थीचे उपचार करूनही तो ‘ब्रेन डेड’ झाला. या धक्क्यातून सावरत तरुणाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि चार जणांना जीवदान मिळाले. नांदेडमधून पहिल्यांदाच अवयवदान झाले, हे विशेष.
अवयवदानाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. रुग्णालयामध्ये बुधवारी दुपारी अडीचपर्यंत अवयव काढण्याची शस्त्रक्रिया होऊन मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयाला विमानाने हृदय, पुण्याच्या रुबी रुग्णालयाला यकृत, तर दोन्ही मूत्रपिंड औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालय व सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलला प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आले. त्याचवेळी दोन्ही डोळ्यांचे प्रत्यारोपण नांदेड येथील शासकीय रुग्णालयात होणार आहे.
मुखेड तहसीलमधील रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी सुधीर रावळकर (वय ३५) यांचा नरसी-मुखेड रस्त्यावर अपघात झाला व त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रावळकर यांचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांनी तातडीने अवयवदानाचा निर्णय घेतला. ‘झेडटीसीसी’च्या समन्वयातून आणि रुग्णाच्या सर्व चाचण्या पूर्ण करून मुंबईत हृदय, पुण्यात यकृत व दोन्ही मूत्रपिंड औरंगाबादेत देण्याचे निश्चित झाले. त्यासाठी मुंबईतील फोर्टिस हॅास्पिटलचे हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे, डॉ. विजय शेट्टी, डॅा. संदीप सिन्हा, पुण्यातील रुबी हॅास्पिटलचे डॉ. कमलेश बोकील, औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्णालयाचे डॉ. अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले. रुग्णालयामध्ये बुधवारी सकाळपासून अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू होऊन दुपारी तीनपर्यंत पूर्ण झाली. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधून यंत्रणांना गतीमान केले. विशेष म्हणजे विष्णुपुरी ते विमानतळ हे अंतर अवघ्या १३ मिनिटांत पार करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. पी. टी. जमदाडे, डॉ. राजेश अंबुलगेकर, डॉ. श्रीधर येन्नावार, डॉ. नितीन नंदनवनकर, डॉ. डी. पी. भुरके, डॉ. एच. व्ही. गोडबोले आदींनी अवयवदान यशस्वी करून दाखविले.

नांदेडमध्ये पहिल्यांदाच अवयवदान यशस्वी झाले. नातेवाईकांच्या धीरोदात्तपणामुळे व रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच हे अवयवदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी होऊ शकले.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीएमआयसीत येण्यास जपानी कंपन्या उत्सुक

$
0
0

औरंगाबाद ः दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) शेंद्रा ऑरिक सिटीमध्ये उद्योग थाटण्यास जपानी कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली आहे. दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी येत्या दोन ते तीन महिन्यांत औरंगाबाद येथे साइट व्हिजिटसाठी येण्याची चिन्हे आहेत.
डीएमआयसीचे सरव्यवस्थापक गजानन पाटील, एमआयडीसीचे जॉइंट सीईओ आबासाहेब जऱ्हाड यांनी गेल्या आठवड्यात जपान दौऱ्यात ऑरिकचे मार्केटिंग केले. तेथील चार आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योजक संघटनांची भेट घेतली. त्यापैकी दोन कंपन्यांचे प्रतिनिधी पुढील महिन्यात साइट व्हिजिटसाठी येण्याची शक्यता आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्या या भागात याव्यात यासाठी उद्योग विभागाकडून परदेशात जोरदार मार्केटिंग केले जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरियाचा दौरा केला होता. त्यानंतर गजानन पाटील यांनी आबासाहेब जऱ्हाड यांनी जपानचा दौरा केला.
उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी जपान चेंबर ऑफ कॉमर्स, टोकियो चेंबर ऑफ कॉमर्स, जपान मशीनरी सेंटरच्या सदस्यांसमवेत चर्चा केली. जपानमधील उद्योजक या बैठकांना उपस्थित होते. ‘सुवा इंडस्ट्रिअल मेसी’ या उद्योग प्रदर्शनाला पाटील, जऱ्हाड यांनी भेट दिली. तेथील चर्चासत्रात ऑरिक आणि एमआयडीसीचे मार्केटिंग केले.

चार कंपन्यांशी संवाद
ओकोमा, इप्सॉन, एनईसी आणि तोशिबा या जगप्रसिद्ध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ऑरिकची माहिती दिली. ऑरिकमध्ये जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा पुरविली जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ही इंडस्ट्रिअल इस्टेट आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचे उद्योजकांना सांगण्यात आले..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी वाहनांची करवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीचा मुहूर्त साधून नवे वाहन खरेदी करणार असाल, तर तुम्हाला रोड टॅक्सवरील अधिभाराचा भुर्दंड सोसावा लागेल. रोड टॅक्सवर रस्ता सुरक्षा सुरक्षा अधिभार वसूल करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. हा अधिभार येत्या २४ ऑक्टोबरपासून आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहनखरेदी महागणार आहे.
रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रमासाठी राज्यात रस्ता सुरक्षा निधीची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी रोड टॅक्सवर अधिभार लावण्याबाबत परिवहन आयुक्तांनी परिपत्रक जारी केले आहे. विविध वर्गांतील वाहनांच्या रोड टॅक्सवर हा अधिभार आकारला जाईल. हा अधिभार वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळा आहे. पेट्रोल, डिजेल वाहनांच्या करावरील अधिभारही वेगळा आहे. नवीन दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांच्या एकरकमी रोड टॅक्सवर दोन टक्के अतिरिक्त अधिभार घेतला जाणार आहे. याशिवाय हलक्या मालवाहू वाहनाच्या करावर ४ टक्के, मध्यम व अवजड मालवाहू वाहनांच्या वार्षिक करावर १० टक्के, एकरकमी कर भरणाऱ्या मध्यम व अवजड वाहनांच्या करावर २ टक्के अतिरिक्त कर वसूल करण्यात येणार आहे.

सॉफ्टवेअरमध्ये करणार बदल
या अतिरिक्त कराची वसुली २४ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. या अतिरिक्त अधिभाराच्या वसुलीसाठी ‘वाहन १’ कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येणार आहे. हे बदल करण्यास उशीर झाल्यास हस्तलिखित देऊन कराची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनचे गुडबाय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यंदा मान्सूनच्या दमदार बॅटिंगमुळे मराठवाडा दुष्काळचक्राच्या बाहेर पडला. अनेक वर्षांपासून तळाला गेलेले प्रकल्प यंदा तुडूंब भरले असून, विभागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात तब्बल ११२.८८ टक्के पाऊस झाला अाहे. पावसाच्या अखेरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्याला मात्र वार्षिक सरासरी ओलांडता आली नाही.
हमखास परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याला यंदा सप्टेंबरमध्ये पावसाने धुवून टाकले. जून महिन्यात वेळेवर हजेरी लावलेल्या पावसाने १३ दिवस दडी मारली, मात्र त्यानंतर मराठवाड्यात सातत्याने पाऊस सुरू झाला. निम्मा जून उलटल्यानंतर मराठवाड्यात मोसमी पावसाने हजेरी लावली. १९ जूनपासून नांदेड, जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली. जूनअखेरीस अनेक ठिकणी अतिवृष्टीही झाली. विभागातील सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. जून महिनाअखेरीस मराठवाड्यात १८ टक्के पाऊस झाला. जून व जुलै महिन्यांमध्ये २८ दिवसांत वार्षिक सरासरीच्या ५१.९ टक्के पाऊस झाला. त्यानंतर मात्र मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. सप्टेंबर महिन्यात बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे हाहाकार उडाला. लहान मोठ्या नद्यांना पूर आला. अनेक गावांना पुराचा
वेढा बसला. पावसाने मराठवाड्याला गुडबाय म्हटले असले, तरी विभागात ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे पावसाचे चिन्हे दिसत होते. २५ ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यात सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवला होता. महसूल विभागाची यंत्रणाही नियमाप्रमाणे ३० ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या नोंदी घेते.
मराठवाड्यात; तसेच गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यात दमदार पावसामुळे जायकवाडीचा उपयुक्त साठा ८२ टक्क्यांवर पोचला आहे. पावसाअभावी गेल्या अनेक वर्षांपासून कोरड्याठाक पडलेले अनेक प्रकल्प भरले आहेत. माजलगाव प्रकल्प भरल्यामुळे धरणातून पाणी सोडावे लागले सध्या प्रकल्प १०० टक्के भरला असून, निम्न दुधना, मांजरा, निम्न मनार, निम्न तेरणा, विष्णुपुरी व सीना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पांमध्ये १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

सरासरीत औरंगाबादची पिछाडी
औरंगाबाद जिल्ह्यात प्रारंभी दमदार पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्यामुळे जिल्ह्या सरासरीच्या तुलतेन पिछाडीवर आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली नाही. जिल्ह्यातील फुलंब्री ९७.७०, पैठण ८३.१४, सोयगाव ९७.३, गंगापूर ६९.३५, कन्नड ८२.६९ तर खुलताबाद तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७२.८८ टक्के पाऊस झाला. औरंगाबाद (१०६.८० टक्के), सिल्लोड (१०६.७७) व वैजापूर (११३.७६ टक्के) या तालुक्यांनी सरासरी ओलांडली

थंडी कडाक्याची
मराठवाड्यात झालेलया पावसाबाबत हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, सर्वसाधारणपणे ७ जून ते ७ ऑक्टोबर यादरम्यान पावसाळा असतो. त्यामुळे आता पावसाळा संपला आहे. पावसानंतर थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात होते. मराठवाड्यातही सध्या अशीच स्थिती आहे. मराठवाड्यात ज्या पद्धतीने पाऊस थांबला, त्यानुसार यंदा विभागात कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज आहे.

मराठवाड्यातील पाऊस
जिल्हा..........टक्केवारी
औरंगाबाद........९१.३२
जालना.............११३.८७
परभणी............१०८.१९
हिंगोली............१०४.६१
नांदेड..............११२.९६
बीड................१२५.२४
लातूर...............१३८.४३
उस्मानाबाद.......१०७.८५
एकूण..............११२.८८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाने पेपर पुढे ढकलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गुरुवारी होणारे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलले आहेत. विद्यापीठाने चार दिवसांत दोन पेपर पुढे ढकलले आहेत. गुरुवारी विविध अभ्यासक्रमांतील ६२ विषयांचे पेपर होते. परीक्षेच्या काही तासांपूर्वी वेळापत्रक बदलले आहे. सुमारे ५४ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा चार ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. त्यात अचानकपणे पेपर पुढे ढकलण्यामुळे परीक्षेत गोंधळ उडाला आहे. गेल्या चार दिवसात दोनवेळा पेपर पुढे ढकलण्यात आले. शनिवारी (१५ ऑक्टोबर) होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता गुरुवारी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे बुधवारी विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. पेपरला काही तास अवधी शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. गुरुवारचा पेपर होणार की नाही, वेळापत्रकात बदल केला तर परीक्षा केव्हा होणार याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुलगुरूंच्या आदेशान्वये काही प्रशाकीय कारणांमुळे गुरुवारी होणाऱ्या पदवी, पदव्युत्त अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून, ही परीक्षा २३ ऑक्टोबर रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यात येतील.
गुरुवारपासूनच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार होत्या, परंतु पहिल्याच दिवशी पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला, अद्याप अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचलेली नसल्याने गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.

मोर्चाचे कारण?
विद्यापीठाकडून पेपर पुढे ढकलण्यामागचे कारण सांगितले जात नाही. शनिवारच्या पेपरला तांत्रिक कारण पुढे केले, तर गुरुवारी प्रशाकीय कारण पुढे करण्यात आले आहे. बीड येथे होणाऱ्या मोर्चामुळे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा विद्यापीठात होती.

कुलगुरू, परीक्षा नियंत्रकांचे फोन बंद
पेपर अचानकपणे पुढे ढकलण्यात आले. याबाबत विद्यापीठाने परिपत्रक काढले. अचानकपणे पेपर पुढे ढकलण्यात आल्याने गोंधळ वाढला. याचे कारण विचारण्यासाठी दुपारनंतर परीक्षा विभागातील फोन खणाणले. अनेक विद्यार्थी, पालक, प्राचार्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे मोबाइल फोन बंद होते.

आज हे पेपर होते
बीए, बीएस्सी, बीकॉम, बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (आयटी), बीसीए, बीबीए, एलएलएम, एमए, एमए (एमसीजे), एमएस्सी, डीबीएम, डीसीए, बी.व्होक. अशा विविध अभ्यासक्रमांचे ६२ विषयांचे पेपर होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी ६३ जादा बसचे नियोजन

$
0
0

औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्ट्यांत एसटी महामंडळ ६३ जादा बस सोडणार आहे. पुणे, नागपूरसह महत्त्वाच्या मार्गांवर या बस सोडण्यात येतील, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयाने मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बस स्थानकासह‌ अन्य आगारांतून जादा बस सेवा सुरू केली आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाहून नागपूरसाठी चार निमआराम बस सोडण्यात येणार आहेत. सिडको येथून वाशीम, मेहकर, रिसोडसाठी चार बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद ते अकोला यादरम्यान चार साध्या बस सोडण्यात येणार आहेत. या बस पैठण, कन्नड आणि औरंगाबादेतील सिडको बस स्थानकावर येतील. सिडकोहून अकोल्याकडे या बस सोडण्यात येणार आहेत.
औरंगाबाद मध्यवर्ती स्थानकाहून २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान पुण्याला १४ जादा बस सोडण्यात येणार आहेत. २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान पुणे, मेहकर, सोलापूर, जळगाव, मालेगाव, नांदेड, संगमनेर, बुलडाणा, नाशिक, श्रीरामपूर, धुळे, भुसावळ या मार्गावर ३६ साध्या बस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images