Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दहावी, बारावीला ‘आधार’ नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेचा अर्ज भरताना आधारकार्ड बंधनकारक केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढले नसल्याने अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितल्याने मंडळाने मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचा निकालापर्यंत आधारकार्ड सादर करावेत, अशा सूचना शाळांना दिल्याचे मंडळातील अधिकारी सूत्रांनी सांगितले.
मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना आधार क्रमांक भरणे बंधनकारक आहे. परीक्षा अर्ज भरण्याच्या काही महिन्यांपूर्वी हा निर्णय जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक मंडळाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरताना नव्याने आधारकार्ड क्रमांकाचा रकाना समाविष्ट करण्यात आला आहे. आधारक्रमांक उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आधारकार्डचा क्रमांक देणे बंधनकारक केले. अनेक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नसल्याने विद्यार्थी, पालकांचा ताण वाढला होता.
याबाबत अनेक मुख्याध्यापकांनी मंडळाला कळविले होते. त्यावर मंडळाने निर्णयात सवलत देत, अर्जासोबत तात्काळ आधार क्रमांक देण्याची गरज नसल्याचे शाळा, ज्युनिअर कॉलेजांना कळविल्याचे कळते. फेब्रुवारी-मार्चपर्यंत किंवा निकाल जाहीर होईपर्यंत आधार क्रमांक शाळांनी कळवावेत, अशा सूचना दिल्या आहे.

३५ टक्के विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही
यंदापासून परीक्षा अर्जावर आधारकार्ड क्रमांक बंधनकारक करण्यात आला. आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया शाळास्तरावर सुरू आहे, तर अनेकांना आधारकार्ड मिळालेले नाही. प्रशासकीय पातळीवरून होत असलेल्या विलंबामुळे अद्याप ३५ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोयगावात साहित्य संमेलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा साहित्य परिषदेचे ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन डिसेंबर महिन्यात सोयगाव येथे होणार आहे, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
सोयगाव हे मराठवाड्यातील ग्रामीण रंगभूमीचे जनक प्रणेते लोटू पाटील काळे यांनी पदरमोड करून निर्माण केलेल्या व वाढविलेल्या नाट्यचळवळीसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध असून, अजिंठा लेणीच्या पायथ्याशी खान्देशाच्या सीमेला लागून असलेले गाव, कलेच्या दृष्टीने या परिसराला अजिंठ्यच्या लेणीच्या कलावंतांनी पुनीत केलेला वारसा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच या वारशाला उजाळा मिळणार आहे. सोयगावच्या आजूबाजूला शेंदूर्णी, पहूर, पिंपळगाव (हरेश्वर) ही एक लाख वस्ती असलेली गावे. शिवाय पाचोरा आणि जामनेर या लगतच्या दोन व्यापारी पेठा, मराठवाड्यातील साहित्यिक व रसिकांबरोबरच या भागातील रसिक व साहित्यिक या संमेलनाला मोठी उपस्थिती लावतील, असा अंदाज ठाले पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अजिंठा शिक्षण संस्था यजमान
(कै.) बाबुराव काळे यांनी स्थापन केलेल्या अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ काळे आणि सचिव प्रकाश काळे या ३८व्या मराठवाडा साहित्य संमेलनासाठी अजिंठा शिक्षण संस्थेच्या वतीने साहित्य परिषदेला निमंत्रण दिले होते. साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून ते निमंत्रण स्वीकारले असल्याची घोषणा ठाले यांनी बुधवारी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला महाविद्यालयात ठिय्या सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले. कॉलेजच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन विद्यार्थ्यांनी मागण्या मांडल्या. अभ्यासक्रमासाठीच्या आवश्यक त्या सोयीसुविधा द्याव्यात, ‘फोटोग्राफी लॅब’ हवी, ‘संगणक लॅब’ सुरू करा वॉटर कुलर बसवा, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात शिक्षकांची संख्या पुरेशी नाही. कॉलेजमध्ये आवश्यक सोयीसुविधाही नाहीत. याबाबत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे. बुधवारीही हे आंदोलन सुरूच आहे. आज विद्यार्थ्यांनी आंदोलनात कॉलेजमधील असुविधांवर प्रकाश टाकला.
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. त्यामुळे वॉटर कुलर बसविण्यात यावे. ‘फोटोग्राफी लॅब’ सुरू करावी, संगणक लॅब सुरू करा, अद्ययावत सॉफ्टवेअर द्या, प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी आंदोलनातून मांडल्या. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
कॉलेजमध्ये किरकोळ सोयीसुविधांकडेही प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पाठिंबा दिला आहे. आंदोलनामुळे कॉलेज प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. कला संचालनालयालाही याबाबत कळविण्यात आल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत वाहन खरेदी महागणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्ता सुरक्षा निधीसाठी वाहन चालकांकडून रस्त्याच्या करावर अधिभार लावण्याचा निर्णय आरटीओ विभागाने घेतला आहे. त्यामुळे ऐन ‌दिवाळीत वाहन खरेदी महागणार आहे.
वाहन खरेदी करताना आरटीओ कार्यालयात रोडटॅक्स भरावा लागतो. या करातून गोळा होणारा पैसा राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि सुरक्षा विषयक कामांसाठी वापरण्यात येतो. आता सरकारने रस्ता सुरक्षा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रोडटॅक्सवर अधिभार लावण्यात आला आहे. त्यामुळे टू व्हीलरपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्व वाहने महागणार आहेत.
दुचाकी वाहनाच्या किंमतीवर ३०० सीसीपर्यंत ९ टक्के कर वसूल करण्यात येतो. ३०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांवर १० टक्के, ५०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांवर ११ टक्के कर वसूल केला जातो. याशिवाय पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये १० लाख रुपयांपर्यंत किमतीच्या वाहनांवर ९ टक्के कर वसूल केला जातो. १० लाख ते २० लाखांपर्यंत वाहनांवर १० टक्के, २० लाखांवरील वाहनांसाठी ११ टक्के कर वसूल केला जातो. याशिवाय डिजेल वाहनांमध्ये १० लाखांवरील वाहनांवर ११ टक्के, १० ते २० लाखांदरम्यान असलेल्या वाहनावर १२ टक्के आणि २० लाखांवर किमत असलेल्या वाहनांला १३ टक्के रोडटॅक्स वसूल केला जातो. या करावर २४ ऑक्टोबरपासून विविध वर्गांत २ ते १० टक्के अधिभार वसूल वसूल करण्यात येणार आहे. या वाहनांच्या ट्रक आणि अन्य अवजड वाहनांच्या वार्षिक करावरही अधिभार भरावा लागणार आहे.

किती भरावा लागेल अधिभार

वाहनचा प्रकार..........किंमत........रोड टॅक्स......घोषित अधिभार......अधिभार
दुचाकी वाहन...........६५ हजार.......४२००.............२ टक्के...............८० रु.
चार चाकी...............५ लाख..........४५०००...........४ टक्के...............१८०० रु.
चार चाकी डिजेल.....१७ लाख.........२,०४०००.........४ टक्के...............८,१६० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कारभारीण : चकल्या सातासमुद्रापार

0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
Tweet : @rtaksalMT
गृहोद्योगात भरारी घेतलेल्या आदिती गोरे मुळच्या कोकणातल्या. वडील शासकीय नोकरीस, तर आई शिक्षिका. माहेरचे आडनाव कांदळगावकर. घरात पालकांसह दोन भाऊ व आदिती असे कुटुंब. वडिलांच्या नोकरीनिमित्त कांदळगावकर कुटुंबास या शहरातून त्या शहरात जावे लागत. सोलापूर येथे चौथीपर्यंत आदिती यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्या वडिलांच्या बदलीमुळे औरंगाबादेत आल्या.
शालेय जीवनात त्यांनी खो-खोमध्ये प्रकारात चांगली कामगिरी केली. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच त्यांना आवड निर्माण झाली ती विविध रेसिपींची. नवनवीन पदार्थ तयार करण्याचे मार्गदर्शन त्यांना आईकडून मिळत गेले. त्यात नोकरीनिमित्त आईला घराबाहेर जावे लागत असल्याने आदिती घरी नवनवीन पदार्थ तयार करण्याचे प्रयोग करत. सरावाने त्यात त्या पारंगत झाल्या. १९७६मध्ये बी.कॉम. पूर्ण केल्यानंतर त्यांना एसटी महामंडळात नोकरी लागली. नोकरी सुरू असतानाच त्यांनी एम.कॉम., ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. १९८३मध्ये त्यांचे मुंबईत राहणाऱ्या आनंद गोरे यांच्याशी विवाह झाला. सासरी त्यांना माहेरप्रमाणेच पूर्णपणे निर्णय स्वातंत्र मिळाले. घरातील सर्व जबाबदारी सांभाळून त्या नोकरी करत. त्यांच्या सासू शांताबाई विनायक गोरे या काही महिला मंडळाच्या माध्यमातून दिवाळीचे फराळ तयार करत. या कामातही रेसिपीची आवड असलेल्या आदिती मदतीचा हात देत असे.
आदिती यांनी तयार केलेले पदार्थ हे चविष्ट व रुचकर असल्याने ओळखीच्या लोकांकडून नेहमी कौतुक होत. त्यात खास करून चकल्यांना विशेष मागणी होत. अनेकजण दिवाळीनिमित्त खास त्यांच्याकडून चकल्या तयार करून घेत.
१९८९-९०मध्ये आनंद गोरे यांची औरंगाबादेत बदली झाली. पाठोपाठ आदिती यांनीही औरंगाबादेत बदली करवून घेतली. नातेवाईक व ओळखीचे अनेकजण शहरात राहत असल्याने त्यांचे घर नेहमी पाहुण्यांनी भरलेले असते. त्याकाळीही वेगळे चित्र नव्हते. ताई तुम्ही व्यवसायिक पद्धतीने दिवाळीचे फराळ तयार करा, असा आग्रह त्यांच्याकडे धरला जाई, पण घराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, संगोपन आणि नोकरी यांची सांगड घालण्यातच त्यांना तारेवरची कसरत करावी लागे. त्यातून अन्य कामासाठी सवड मिळणे अशक्य होते. तरीही त्या परिचितांसाठी खास चकल्या व अन्य फराळी पदार्थ तयार करून देत.
मुले मोठी झाल्यावर त्यांनी गृहोद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि १९९९मध्ये ऑर्डरप्रमाणे चकल्या तयार करण्याचे काम सुरू केले. या कामात सासूंचे मार्गदर्शन लाभले.
दिवाळी व अन्य सणादरम्यान चकल्यांना मागणी वाढत गेली, पण त्यावर त्या समाधानी नव्हत्या. गृहोद्योग हा हंगामी स्वरुपाचा होऊ नये, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले. पती आनंद गोरे यांचीही मोठी मदत झाली. त्यांनी तयार केलेल्या चकल्यांना काही दुकानदारांनी दालन उपलब्ध करून दिले. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने दुकानादारांकडून मागणी वाढली आणि काही महिन्यांतच आदिती यांना वर्षभराची ऑर्डर मिळत गेली. नोकरी करून या ऑर्डर पूर्ण करणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी दोन गरजू महिलांना चकलीसह अन्य फराळी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आणि सहायक म्हणून त्यांना रोजगाराची संधी दिली.
गृहोद्योग दिवसेंदिवस वाढतच गेला. व्यवसायनिमित्त अनेक महिलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते गेले तसा आत्मविश्वासही वाढत गेला. मार्केटचा अभ्यास व मागणी लक्षात घेत त्यांनी चकलीसह विविध प्रकारचे लाडू, चकली भाजणी, चिवडा, शेव, ओल्या नारळाच्या करंज्या, शंकरपाळे, खोबऱ्याच्या वड्या यासह अन्य पदार्थ तयार करत गेल्या. २०१५मध्ये त्या एसटी महामंडळाच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर गृहोद्योग पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू आहे. कच्चा माल खरेदी करण्यापासून पदार्थ तयार करणे, पॅकिंग, ऑर्डर घेणे, मार्कटिंग करणे आदी सर्व कामे आदिती स्वतः करतात.
दर्जेदार व चविष्ट उत्पादनामुळे प्रसिद्धी करण्याची गरज कधीच पडली नाही. उलट दिवसेंदिवस पदार्थांना मागणी वाढतच आहे. केवळ मराठवाडा, पुणे, मुंबई येथेच नव्हे, तर त्यांनी तयार केलेल्या चकल्यासह अन्य पदार्थ अमेरिका, लंडनपर्यंत पोहचली. महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या मोदक बनवा स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळाले आहे. गौरांग फूड प्रोडक्ट्स असे नाव त्यांनी गृहोद्योगास दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४०० वैद्यांकडून राज्यभर व्याख्याने

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धन्वंतरी जयंतीनिमित्त ४००पेक्षा जास्त आयुर्वेद तज्ज्ञांकडून राज्यातील ४००पेक्षा जास्त ठिकाणी ‘आहारातून आरोग्याकडे’ या विषयावर निःशुल्क व्याख्याने होणार आहे. राज्यातील बहुतांश शहरांसह तालुक्यांच्या ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे रविवारी (२३ ऑक्टोबर) ही व्याख्याने ‘पीपीटी’च्या आधारे होणार आहेत. त्यासाठी व्याख्यान देणाऱ्या सुमारे सव्वातीनशे वैद्यांना नुकतेच ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. ‘आयुर्वेद व्यासपीठा’च्या वतीने हा उपक्रम प्रथमच राबविण्यात येणार आहे.
भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले जाते आणि प्रत्येक पॅथीमध्येही अन्नाचे म्हणजेच आहाराचे महत्त्व निर्विवाद आहे. याच विषयाला लक्ष केंद्रित करून ‘आहारातून आरोग्याकडे’ या विषयावर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून राज्यभर व्याख्याने होणार आहे. यात राज्यामध्ये ४००पेक्षा जास्त ठिकाणी व्याख्याने होणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी व्याख्यान देणारे वैद्य वेगवेगळे असणार आहे.
पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या (पीपीटी) मदतीने आणि आजच्या स्थळ-काळ-परिस्थितीनुसार ही व्याख्याने होणार आहेत. यामध्ये नेमका आहार कसा-किती-केव्हा असावा, कोणकोणत्या बाबींचा आहारामध्ये समावेश असावा, आहाराच्या वेळांचे महत्त्व किती व कसे आहे, आदी मूलभूत बाबींपासून आयुर्वेदीय दृष्टिकोन व्याख्यानाद्वारे मांडला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक वैद्य आपला अभ्यास-अनुभव ‘शेअर’ करणार आहे. दीड तासाच्या व्याख्यानामध्ये श्रोत्यांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे, अशी माहिती आयुर्वेद व्यासपीठाचे शहराध्यक्ष वैद्य आनंद कट्टी, आयोजन प्रमुख वैद्य रवी बोर्डे, वैद्य सोहन पाठक यांनी‘मटा’ला सांगितले.

विदेशातही होणार व्याख्याने
जपान, कोरिया, इंग्लंड व अमेरिकेतही ही व्याख्याने होणार आहेत. त्या-त्या देशामध्ये असलेल्या वैद्यांकडून ही व्याख्याने होणार आहेत. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५१, कल्याणमध्ये २०, मुंबईत १७, औरंगाबादेत १६ ठिकाणी ही व्याख्याने होणार आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या उपक्रमासाठी राज्यातील ३२५ वैद्यांसाठी दोन ऑक्टोबर रोजी ऑनलाईन वक्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

एकाचवेळी ४०० पेक्षा जास्त ठिकाणी ‘पीपीटी’द्वारे व्याख्यानांचा हा असा उपक्रम पहिल्यांदाच होत आहे. अलीकडे आहाराकडे खूप दुर्लक्ष होते आणि आहाराच्या वेळा-सवयी सतत बदलल्या जातात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहार हा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. आहारानंतरच व्यायामाचे महत्व आहे. यासह अनेक बाबींकडे व्याख्यानांमधून लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
- डॉ. वैद्य संतोष नेवपूरकर, राज्य अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआरप्रकरणी गुन्हा नोंदवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूसंपादनाचा मोबदला घेऊनही टीडीआर मागणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. या प्रकरणांमध्ये अधिकारी गुंतले आहेत काय, याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टीडीआर, रस्ते आणि पाणीपुरवठा याबद्दल बकोरिया यांनी ‘मटा’शी संवाद साधला. मंजूरपुरा आणि चेलिपुरा येथील टीडीआरचे प्रकरण सध्या गाजत आहे. रस्ता रुंदीकरणासाठी या दोन्ही ठिकाणी भूसंपादन करण्यात आले. त्याचा मोबदला १९९७मध्ये संबंधितांना देण्यात आला. मोबदला दिला असतानाही या संपादित जागेसाठी पुन्हा टीडीआर देण्याची प्रक्रिया करण्यात आली. जमीन मालकाच्या वारसाने पालिकेच्या नगररचना विभागाकडे टीडीआरची मागणी केली. नगररचना विभागाने देखील टीडीआर मंजूर केला. ‘मटा’मध्ये या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यावर टीडीआरचे प्रमाणपत्र देण्याचे थांबवण्यात आले.
यासंदर्भात बकोरिया म्हणाले, ‘एखाद्या जागेचा मोबदला मिळालेला असताना पुन्हा त्याच जागेसाठी टीडीआरची मागणी करणे हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मोबदला घेऊनही टीडीआरची मागणी करणाऱ्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत. या प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा काय सहभाग आहे काय, हे देखील तपासून पाहिले जाणार आहे. दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होईल.’
दिवाळीच्या काळात शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून गुरुवारी २४ तासांचा शटडाउन घेण्यात आला आहे. या काळात देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत. जायकवाडी येथील पंपहाउसमध्ये एक नवीन पंप बसवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी उपशाचे प्रमाण वाढेल. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गळत्या बंद होतील. त्यामुळे शहरात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास बकोरिया यांनी व्यक्त केला. सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास होऊनये यासाठी आतापासून पालिकेचे प्रशासन नियोजन करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यांचे डांबरीकरणाचे काम करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. आतापर्यंत किती कामे झाली, याचा आढावा घेतला जाईल. खोदून ठेवलेले रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी येत्या काळात प्राधान्य देण्याची पालिकेच्या प्रशासनाची भूमिका आहे, असे बकोरिया यांनी सांगितले.

रस्त्यांचा प्रस्ताव शासन दरबारी
शहरातील रस्त्यांचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्याला मान्यता मिळाल्यावर पुढील काम केले जाईल. सुमारे ४४ रस्त्यांचा त्यात समावेश आहे. रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंन्सल्टंटची (पीएमसी) नियुक्त केली आहे. ‘पीएमसी’ने काम सुरू केले आहे. प्रस्तावाला शासनाची मान्यता येईपर्यंत ‘बेसिक’ काम करून ठेवण्याचे ठरविले आहे. शासनाची मान्यता आल्यावर लगेचच रस्त्यांची कामे सुरू होऊ शकतील, अशी माहिती आयुक्त बकोरिया यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत काडीमोड; पालिकेत खळबळ

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील सत्तेत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्यामुळे महापालिकेत खळबळ माजली आहे. महापौरांच्या राजीनाम्यावरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
महापालिकेत युतीमध्ये झालेल्या करारानुसार पहिल्या अडीच वर्षाच्या काळात दीड वर्ष महापौरपद शिवसेनेकडे राहील, तर उर्वरित एक वर्ष भाजपकडे असेल असे ठरविण्यात आले आहे. पहिल्या दीड वर्षाची मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्या दिवशी महापौर त्र्यंबक तुपे यांना राजीनामा द्यावा लागेल असे बोलले जात आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी तुपे महापौरपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर पुढील दहा दिवसांत नवीन महापौरांसाठी निवडणूक होईल. युतीमधील करारानुसार हे घडण्याची शक्यता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची स्वबळावर लढण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्याचा परिणाम महापौरांच्या राजीनामा देण्याच्या प्रक्रियेवर होऊ शकतो, असे मानले जात आहे. काही दिवसांसाठी राजीनाम्याचा मुहूर्त पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरांनी बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार राजीनामा दिलाच नाही, तर स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होईल, असे जाणकारांचे मत आहे.

बदलत्या राजकीय समीकरणाचा आणि महापौरपदाच्या निवडणुकीचा तसा काही संबंध नाही. महापौरपदाच्या निवडणुकीचा विषय केंद्रीय स्तरावरचा आहे. वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील. स्थानिक पातळीवर या संबंधीचा निर्णय होणार नाही. महापौरांच्या राजीनाम्याबद्दल सध्या पक्षात कोणतीही चर्चा नाही. - अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख

महापौरपदाच्या संदर्भात शिवसेना-भाजपचा करार झालेला आहे. दिवाळीनंतर प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल. महापौरपदाच्या संदर्भातला करार हा वरिष्ठ पातळीवरून झालेला असल्यामुळे वरिष्ठ नेतेच याबाबत योग्य तो निर्णय घेतील. - किशनचंद तनवाणी भाजप शहराध्यक्ष

राजीनामा न दिल्यास काय होईल?
- पुढील एक वर्ष महापौर म्हणून त्र्यंबक तुपे कार्यरत राहतील. कारण महापौरांवर अविश्वास आणण्याची कायद्यात तरतूद नाही.
- राजीनामा न दिल्यामुळे शिवसेनेचा पाठिंबा काढून घेण्याचा विचार भाजपने केला, तर त्यांना येत्या काळात महापौरपदासह स्थायी समितीच्या दोन सभापतीपदावर पाणी सोडावे लागेल.
- एमआयएमची मदत घेतल्यास त्याचा फायदा भाजपपेक्षा संख्याबळानुसार शिवसेनेलाच होईल, पण एमआयएमच्या मदतीमुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात चुकीचा संदेश जाईल म्हणून दोन्हीही पक्ष उघडपणे एमआयएमची मदत घेणार नाहीत.
- शिवसेना - भाजप या दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण होईल. त्याचा परिणाम शहरातील रखडलेल्या विकास कामांवर होईल.
- भाजपबरोबर सत्तेत राहायचे नाही, असा निर्णय शिवसेनेने राज्यपातळीवर घेतला व मंत्रिमंडळातून शिवसेनेचे सदस्य बाहेर पडले, तरच स्थानिक पातळीवर महापौरांचा राजीनामा टळू शकतो. अन्यथा आठ - पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त महिनाभरात राजीनामा देण्याची वेळ महापौरांवर येऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर गळत्या दुरुस्त; दुपारपर्यंत पाणी सुरू

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी २४ तासांचे मेगा शटडाऊन घेतले. या काळात पाच ठिकाणच्या गळत्या दुरुस्त केल्या. काही जलकुंभ देखील स्वच्छ केले,’ अशी माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली.
चहल म्हणाले, ‘दिवाळीपूर्वी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील समस्या दूर व्हाव्यात या दृष्टीने मेगा शटडाऊन घेतले होते. सकाळी दहापासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. या काळात व्हिटस् हॉटेल चौक, महर्षी दयानंद चौक, महापौर बंगल्यासमोर व मोंढानाका येथील गळती बंद करण्यात आली. ज्युबलीपार्क येथील गळती दुरुस्तचे काम रात्री दहा - अकरा वाजेपर्यंत संपेल. या काळात हनुमान टेकडी आणि ज्युबलीपार्क येथील जलकुंभ धुण्यात आले. ज्युबलीपार्क येथील भूमिगत हौद स्वच्छ करण्यात आला. फारोळा येथे पंपहाउसचा डिलेवरी पाइप दुरुस्त करण्यात आला. रात्री बारापर्यंत सर्व काम पूर्ण होईल. त्यानंतर हळूहळू जायकवाडी येथील पंपहाउस मधील पंप सुरू करून पाणीपुरवठा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. शुक्रवारी दुपारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळित होईल. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा विभागाचे सर्व अभियंते, कर्मचारी सकाळपासून कार्यरत आहेत,’ असे चहल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ लाखांचा प्रस्ताव सरकारकडे पडून

0
0

औरंगाबाद ः मंजूर असलेल्या २२पैकी केवळ दोन शिक्षक कायमस्वरुपी असलेल्या औरंगाबादच्या कला महाविद्यालयातील सोयीसुविधांकडेही शासकीय, प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष झाले आहे. फोटोग्राफी, कम्प्युटर विभागांसह इतर अभ्यासक्रमांना लागणाऱ्या साधनसामग्रीचा ४२ लाख ५८ हजार ७४ रुपयांचा प्रस्ताव कला संचालनालयाकडे पडून असल्याचे समोर आले आहे.
शिक्षकांच्या कमतरतेबरोबर सोयीसुविधांसाठी लागणारा निधीही वेळेवर मिळत नसल्याचे कॉलेजमधील सूत्रांनी सांगितले. कला संचालनालयाला २०१६-१७ या वर्षासाठी लागणारी आवश्यक यंत्रसामग्री व साधन सामग्रीचा प्रस्ताव पाठविण्यात आला, परंतु त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. कला संचालक राजीव मिश्रा यांनी मार्चमध्ये औरंगाबादच्या कॉलेजला भेट दिली होती. कॉलेजमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविल्या जातील, असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले होते. अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले, तरी आवश्यक त्या यंत्रसामग्री व साधनसामग्रीसाठीचा प्रस्ताव मंजूर नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॉलेज प्रशासन पाठपुरावा सुरू असल्याचे सांगते आहे, तर शासनाकडून निधी मंजूर होण्याची प्रतीक्षा असल्याचे संचालनालयातील सूत्रांनी सांगितले.

या आहेत गरजा
फोटोग्राफी व कम्प्युटर विभागासाठी अद्ययावत सॉफ्टवेअर, हार्डडिस्क, लेन्ससह कॅमेरा, नवीन अभ्यासक्रमाशी निगडित पुस्तके, ई-लायब्ररी सेवा, फोटोग्राफी स्टुडिओ, टेबल, कपाट, पॅनल, मॉडेल पॅडस्टेल, इझल (वुडन, वॉटरकलरसाठी), सभागृहासाठी साउड सिस्टिम, आर्ट गॅलरीसाठी एलईडी लाइट, एलसीडी प्रोजेक्टर डिस्प्ले, लॉकर, ग्लासबोर्ड, डॉबी लूम मेंटेनन्स, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क, ग्रीन ग्लास बोर्ड, हार्मोनियम आदी साहित्याचा समावेश आहे.

कॉलेजसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सोयीसुविधांबाबत आपण कला संचालनालयाला कळविण्यात येते. त्यांच्याकडून अनेक माहित्य पुरविले जाते. शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या सोयीसुविधांबाबतही प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्याकडून निधी आलेला नाही.
- भ. डों. गढरी, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय कला महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या बोनसवर एलबीटी थकिताने संक्रांत

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रजिस्ट्रीच्या माध्यमातून मिळणारी चार कोटी ३१ लाख रुपयांची एलबीटीची रक्कम तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून न मिळाल्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बोनस संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालमत्तांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होतो. दर महिन्यात झालेल्या रजिस्ट्रीच्या शुल्कापोटी जेवढी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा होते, त्याच्या एक टक्का रक्कम शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने एलबीटीच्या स्वरुपात (स्थानिक संस्था कर) दर महिन्याला महापालिकेला देणे बंधनकारक आहे. रजिस्ट्रीच्या माध्यमातून महापालिकेला दर महिन्याला एक कोटी १० लाखांच्या दरम्यान महसूल मिळतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांच्या एलबीटीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेला मिळाली नाही. ही रक्कम मिळण्याच्या संदर्भात शासनाचे आलेले पत्र महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन शाखेकडे पाठवले, पण त्या पत्रावर अद्याप काहीच निर्णय घेण्यात आला नाही. तीन महिन्यांचे चार कोटी ३१ लाख रुपये थकल्यामुळे कर्मचाऱ्यांना बोनस कसा द्यायचा, असा प्रश्न पालिकेच्या यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. लेखाविभागानेही या पेचप्रसंगाला दुजोरा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन फेटाळला

0
0



औरंगाबादः ‘मातंगी एन्टरप्रायजेस’च्या नावाखाली झालेल्या एकूण ३५ लाखांच्या फसवणूक प्रकरणामध्ये आरोपीने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी गुरुवारी फेटाळला.
या प्रकरणी अभिजित कुलकर्णी (रा. सिडको एन-८) यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपींविरुद्ध ४०६, ४२०, ४६८, ४६७, ४७२, ४७५ ४७२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपी कमलाकर कुलकर्णी याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. खटल्यावेळी, आरोपी नोटीस देऊन कोर्टात हजर झाला नाही, फिर्यादीने आरोपीकडे २५ लाख रुपये नगदी दिले आहेत, तसेच बँकेच्या कागदपत्रांवरून आरोपीच्या नावावर ३० कोटी रुपये असल्याचे दिसून येत आहेत आणि त्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. फिर्यादीनुसार, आरोपी कमलाकर कुलकर्णी (रा. कडवीमंडी, परभणी) याने फिर्यादीची भेट आरोपी निवेदिता कुलकर्णी (रा. पुणे) हिच्याशी करून देत निवेदिताच्या ‘मातंगी एन्टप्रायजेस’ची माहिती फिर्यादीला दिली. या वेळी ‘मातंगी’ला ‘आरबीआय’कडून ‘एनआरआय रिलिज फंड’ मिळाला असून, हा फंड रिलीज करण्यासाठी पैसे गुंतवण्याबाबत आरोपींनी फिर्यादीला प्रवृत्त केले. रक्कम गुंतवल्यास त्याच्या १० पट रक्कम ७ महिन्यांत देऊ, असे आमिषही फिर्यादीला दाखविले. आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादीने ‘मातंगी एन्टरप्रायजेस’च्या आयडीबीआय, आयसीआयसीआय बँकेच्या शाखांमध्ये ५ वेळा एकूण १० लाख ४ हजार रुपये भरले. तसेच आरोपी कलमलाकर याला फिर्यादीने २५ लाख रुपये नगदी असे एकूण ३५ लाख ४ हजार रुपये दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मस्तानी, पटियाला सूटचे आकर्षण

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खमंग फराळ, नवी खरेदी, सजावट, पणत्यांची आरास दिवाळीत असेतच. सोबतच मनपसंद आणि मनमुराद कपडे खरेदी दिवाळीचा अविभाज्य भाग मानला जातो. शहरातील कपडा बाजारपेठ सध्या गर्दीने फुलून गेली आहे.
टिळकपथ, रंगारगल्ली, कुंभारवाडा, सिटीचौकासह प्रोझोन मॉल आणि विविध नामांकित मॉलमध्ये कपडे खरेदीसाठी शहरवासीय गर्दी करत आहेत. यंदा कापड मार्केटमध्ये सुमारे २०० ते २५० कोटींची उलाढाल खास दिवाळीनिमित्त होणार आहे. मुलींच्या कपड्यांमध्ये मस्तानी ड्रेस, मुलांसाठी जॅकेट कुर्ता, कोट, ‘हैदराबादी शेरवानी, लेनिन कॉटनचे कापड आणि आयताळ कपड्यांना मागणी वाढली आहे. शर्ट पॅँटचे नामांकित कंपन्यांचे कापड ‌विशिष्ट आकर्षण वेष्टनात येत एका पॅकेटचा दर सुमारे ३०० ते १००० पर्यंत आहे. शेरवानीच्या विविध आकर्षणात किमान १ हजार ते १५ हजारापर्यंत विविध रेंज आल्या आहेत. नेहरू शर्ट, कुर्ता पायजमा मुलांच्या पसंतीस पडत असून किमान ४०० ते ४ हजारापर्यंतच्या विविध रेंज व कलर्समध्ये कुर्ते उपलब्ध आहेत.
लेनिन कपडयांसह खादी, कॉटन मिक्स कपड्यांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असून याची किंमत सुमारे २०० ते १ हजारापर्यंत आहे. मुलींमध्ये सध्या मस्तानी ड्रेसची मागणी जास्त आहे. ८०० ते २५०० रुपयांपर्यंत या ड्रेसची किंमत आहे. मोदी जॅकेट व कुर्ता सुमारे १ हजार ते २८०० रुपयांना असून मुलांची त्याला पहिली पसंती आहे. गेल्या दोनवर्षांपासून सातत्याने या कपड्यांच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे.
ब्रॅंडेड शर्ट, जीन्स आणि पँट मध्ये सुमारे ८०० ते १ हजार रुपयांमध्ये विविध रेंजच्या रेडिमेड कपड्यांना युवक पसंत करत असून यातही वाढ आहे. जीन्स पँट सुमारे ३०० ते ९९९ या रेंजमध्ये विविध रंगात उपलब्धता असून दिवाळीनिमित्त खास सवलती देऊन ग्राहकांना आकर्ष‌ित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महिलांमध्ये साड्यांसोबत पटियाला सूटची मागणी वाढली आहे. नामांकित रेडिमेड शो रूममध्ये याबाबत विचारणा अधिक आहे. इतर साड्यांमध्ये कॉटन, शिफॉन, जॉर्जेट, कांजिवरम, पैठणी यांना अधिक मागणी असून येवला आणि पैठणच्या पैठणी महिलांच्या अधिक पसंतीस उतरत आहेत. कपडा मार्केटला तेजी असून पुढील पंधरा दिवस चांगली उलाढाल होऊन दिवाळी दणक्यात साजरी होईल, असे चित्र आहे.

यंदा बोनस जाहीर झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर खरेदी वाढेल. कपडा बाजारात तेजी आहे. पुढील दहाबारा दिवसांत खरेदी वाढेल. - हरविंदरसिंग सलुजा, कपडा व्यापारी, टिळकपथ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आता पेटवू सारे रान’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो किंवा गोवा मुक्तिसंग्राम. शाहीर अमर शेख यांनी आपल्या जाज्वल्य लेखणीने आणि शाहिरीने रान पेटवले होते. भारत महासत्ता होण्याच्या गप्पा मारल्या जात असताना कुपोषणाने पाचशे मुले मृत्यूमुखी पडत आहेत. सत्तेला आव्हान देणाऱ्या अमर शेख यांच्या शाहिरीची पुन्हा एकदा गरज आहे,’ असे प्रतिपादन कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे यांनी केले. शाहीर अमर शेख जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रगतिशील लेखक संघ, औरंगाबाद आणि अखिल भारतीय शाहिरी परिषद यांच्या वतीने शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहिरी महोत्सव घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर शाहीर शीतल साठे, शाहीर सुरेश जाधव, लेखक प्रा. तानाजी ठोंबरे, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. सुधाकर शेंडगे आणि प्रा. वीरा राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. अमर शेख यांच्या कामगिरीवर प्रा. ठोंबरे यांनी सविस्तर भाष्य केले.
‘कष्टकऱ्यांचे विस्मरण हा भांडवलशाहीला लागलेला रोग आहे. शाहिराचे शब्द नेहमीच सत्तेला आव्हान देणारे असतात. त्यामुळे शाहिरांचे सत्ताधाऱ्यांना विस्मरण होते. अमर शेख शाहीर आणि त्यात पुन्हा मुस्लीम कॉम्रेड, कवी असल्यामुळे विस्मरणाची शक्यता जास्त आहे. शाहिरांची दुनिया न्यारी असते. कॉ. अण्णाभाऊ साठे, कॉ. गवाणकर, कॉ. अमर शेख यांची शाहिरी धारदार होती. विषमतेवर आधारित समाजात साहित्यसुद्धा वेगवेगळे असते. वास्तवाचा विसर पडणारी चलाखी शाहिरीत नसते. कुपोषणाने पाचशे मुले मरत असताना गालावरच्या लालीवर कविता लिहिणाऱ्यांना असा बाणेदारपणा झेपत नाही. शेख यांची शाहिरी म्हणजे रग, धग, आग आणि धुंदी यांचे अदभूत मिश्रण आहे, असे आचार्य अत्र्यांनी म्हटले होते. १९३२मध्ये दहा हजार शेतकऱ्यांचा मोर्चा शेख यांनी काढला होता. ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ म्हणणाऱ्या शेख यांची समाजाला गरज आहे,’ असे प्रा. ठोंबरे म्हणाले. दरम्यान, यावेळी डॉ. पृथ्वीराज तौर यांनी अनुवादित केलेल्या चार्ली चॅप्लिन यांच्या ‘लेकीस पत्र’ या कवितेचे प्रकाशन करण्यात आले. वेगवेगळ्या शाहिरांनी सादरीकरण करून अमर शेख यांना अभिवादन केले. मान्यवरांचा परिचय रामप्रसाद वाव्हळ आणि प्रिया धारूरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हंसराज जाधव यांनी केले. यावेळी रसिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना हिंमत
‘शाहीर अमर शेख हयात असते तर त्यांनी खचलेल्या शेतकऱ्यांना हिंमत दिली असती. ‘तू आधी जग, मग जगाला जगव,’ असे सांगताना ऐतखाऊंना धडा शिकवण्याची प्रेरणा त्यांनी काव्यातून दिली. कुणब्यात राम पाहणारे अमर शेख होते. आता रामाच्या नावाने उठाठेव करणारे मतपेटीत राम पाहतात. हा फरक समजून घेतला पाहिजे,’ असे प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी मांडल्या कलाकृतीतून व्यथा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पूर्णवेळ शिक्षक नेमण्यात यावे यासाठी औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. आपल्या कलाकृती, रेखाचित्रातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्याची, कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या व्यथा विविध रंगछटेतून मांडण्याची वेळ आली आहे. कला संचालक येणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
पूर्णवेळ शिक्षकांची वानवा, फोटोग्राफी, कम्प्युटर लॅबमधील असुविधा आदी प्रश्नांवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. गुरुवारी तिसऱ्या दिवशी विविध कलाकृतीतून विद्यार्थ्यांनी शासन, प्रशासनाचा निषेध केला. संकेत शिंदे या विद्यार्थ्यांने याने विद्यार्थ्याचे शिल्प तयार करून कॉलेजच्या व्यथा मांडल्या आहेत. आम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये येतो आणि ती पूर्ण न झाल्यास काय स्थिती होते, हे कलाकृतीतून मांडल्याचे संकेत सांगतो. आशिष सोनवणे याने संचालकांची हुबेहुब प्रतिमा रंगवित प्रश्नांकडे लक्ष देण्याची विनंती केली.

दहा शिक्षकांची नेमणूक
विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याने कला संचालनालयाने राज्यभरातील कला महाविद्यालयात ३५ शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूका केल्याचे गुरुवारी जाहीर केले. यात औरंगाबादच्या कॉलेजसाठी १० कंत्राटी शिक्षकांचा समावेश असल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पणती सजावट, आकाशदिवा कार्यशाळेचे आयोजन

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी म्हणजे लखलखत्या आकाशदिव्यांचा, पणत्यांचा आणि आनंदाचा उत्सव. तुमचा हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘मटा’तर्फे शनिवारी व रविवारी आकाशदिवा, पणती सजावट, भेटकार्ड बनवणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गरवारे कम्युनिटी सेंटर येथे दुपारी चार वाजता ही कार्यशाळा सुरू होईल.
सध्या ऑनलाइनही मोठ्या दणक्यात दिवाळी साजरी होते. कितीही प्रगती होऊ द्या, पण काही गोष्टी जुनाच्या छान वाटतात. कितीही महागडी लायटिंग येऊ द्या, पणत्यांची आरास काही औरच असते. बाजारात सजावटीचे देखणे आयते साहित्य मिळते. मात्र, स्वतः बनवलेल्या वस्तूंची बातच न्यारी. ‘मटा’ने हेच जाणून आपल्या लाडक्या वाचकांना संधी देत आकाशदिवा, पणती सजावट, भेटकार्ड बनवणे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेसाठी येताना तुम्हाला कटर, पेन्सिल, आइस्क्रीम काड्या, जिलेटीन पेपर, फेव्हिकॉल सोबत आणावे लागेल. रविवारी सकाळी अकरा वाजता पणत्या सजावट व भेटकार्ड बनवणे शिकवले जाईल. पणती सजावटीसाठी पाच पणत्या, अॅक्रलिक कलर, खराब सीडी, ब्रश, थ्रीडे आऊट लायनर, कुंदन, ‌ग्लिटर लागेल. भेटकार्डांसाठी कलर ड्रॉइंग पेपरशीट (लाल, पांढरा, पिवळा) कात्री, फेव्हिकॉल, क्राफ्ट पेपर, घोटीव पेपर, सुतळी, स्पार्कल कलर आणावे लागतील. प्रशिक्षण निशुल्क व सर्व वयोगटासाठी खुले आहे. मग ‘मटा’सोबत हा दिवाळी उत्सव साजरा करून आपला आनंद द्विगुणीत करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवा‌हितेच्या हक्‍कासाठी जागृती मंचचा पुढाकार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सासर हे तिचे हक्‍काचे घर. तिला तिचा अधिकार मिळायलाच हवा, अशी मागणी करत जागृती महिला मंचने गुरुवारी दुपारी एन चार येथील एका घरासमोर ठिय्या मांडला. सासरच्या लोकांनी घराबाहेर काढलेल्या एका विवाहितेला न्याय मिळावा, अशी मागणी मंचच्या वतीने करण्यात आला.
सासरची मंडळी घरात घेत नाही म्हणून एका विवाहितेने मंचकडे मदत मागितली. सासरच्या मंडळांनी शारीरिक व मानसिक अत्याचार करून घराबाहेर काढले. हुंडाही घेतला तसेच दागिनेही ठेऊन घेतले. माझा पती खूप चांगला आहे, पण सासूमुळे माझा स्वीकार करत नाही, असेही तिने सांगितले. मंचला दाद मागण्यापूर्वी विवाहितेने पूर्वी पुंडलिकनगर पोलिस ठाणे, महिला सहाय्य कक्ष, पोलिस आयुक्त, महिला आयोग या सर्वांकडे अर्ज दिला होता. तिच्या सासरच्या मंडळीशी चर्चा करावी, तिला सासरी प्रवेश मिळावा म्हणून जागृती मंचच्या महिला सदस्यांनी दुपारच्या सुमारास तिचे सासर गाठले. हे पाहताच सासूने घराच्या दरवाजा-खिडक्या बंद केल्या. मंचच्या सदस्यांनी आम्हाला फक्त बोलायचे आहे, असे म्हणूनही कुणी प्रतिसाद दिला नाही. नंतर चार्ली पथकाचे अमोल पैठणे व ए. पी. शिंदे पोचले. त्यांनीही आतल्या व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आतून फारसा प्रतिसाद आला नाही. यानंतर पोलिसांचे दुसरे पथक, पीसीआर व्हॅन पोचली. शेवटी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज घटनास्थळी दाखल झाले. दीड तासाच्या या गोंधळात बघ्यांची गर्दी झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून वरिष्ठांनी सासू, विवाहिता व मंचच्या सदस्यांना पोलिस ठाण्यात नेले. यावेळी जागृती मंचच्या अध्यक्ष भारती भांडेकर, सविता कुलकर्णी, रेखा पाटील, सविता घुले, अॅड. सुमेधा ठोंबरे आदी उपस्थित होत्या.

एका विवाहितेला तिचा हक्‍क मिळवून देण्यासाठी आम्ही गेलो होतो. आमचा उद्देश तिच्या सासरच्या मंडळींना कोणत्याप्रकारे त्रास देणे असा नव्हता. चर्चेतूनच आम्हाला समस्या सोडवायच्या ‌होती. आम्ही महिला आयोग, पोलिस आयुक्त यांनाही संपर्क केला होता. - भारती भांडेकर, अध्यक्ष, जागृती महिला मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : शेतकऱ्यांना सावरणारे काशीफळ

0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com
Tweet : @tusharbMT
चार वर्षांपासूनचा दुष्काळ मराठवाड्यातील शेती व्यवसाय मोडीत काढण्यास कारणीभूत ठरला आहे. पिकावर मोठा खर्च करूनही फायदा नसल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत आहेत. या कठीण परिस्थितीत कमी खर्चात पुरेसा नफा देणारे पीक घेण्याचा प्रयोग काही शेतकरी करीत आहेत. बेलगाव (ता. अंबड) येथील शेतकरी राजेंद्र रघुनाथ मोताळे यांनी डांगर (काशीफळ) पिकाचा केलेला प्रयोग आदर्श ठरला आहे. मोसंबी उत्पादक शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले आहेत, मात्र मोताळे यांनी काशीफळ लागवडीचा प्रयोग केला आहे. आपल्या पंधरा एकर जमिनीत कापूस व तूर या पारंपरिक पिकांसोबत काशीफळ व कारल्याचे बिजोत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. शेतीतील प्रयोग निश्चित केल्यावर मोताळे ते अंमलात आणतात अशी त्यांची ओळख आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी शेतीकाम सुरू केले. विविध पिकांची सविस्तर माहिती मिळवून व संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रयोग केले. दुष्काळाचा सामना करताना परवडणारी पिके घ्यावी आणि नुकसान भरून काढावे या उद्देशाने काशीफळ लागवडीचा वेगळा प्रयोग केला. टाकळगाव (ता. गेवराई) येथे पाहुण्याकडे गेले असता त्यांना काशीफळाची माहिती मिळाली. साडेतीन हजार रुपये प्रतिकिलो दराने बियाणे आणले. रब्बीचे पीक निघाल्यानंतर नांगरणी करून व वखराच्या पाळ्या घालून शेत लागवडीसाठी तयार केले. ठिबक संच बसवून आठ फुटावर ठिबकची नळी अंथरली व दीड फुटावर बियाणे लागवड केली. लागवडीपूर्वी बियाणे अर्धा लिटर गोमूत्र टाकलेल्या पाण्यात भिजवून ठेवले. ठिबकचे पाणी पडत असलेल्या जागेवर ओंजळभर कुजलेले शेणखत टाकले. एक एकरात दोन ट्रॉली शेणखत टाकून बियाण्यावर बाविस्टीनची प्रक्रिया करून लागवड केली. काशीफळाचे योग्य व्यवस्थापन करण्यावर मोताळे यांचा भर आहे.
‘घरी लहान-मोठी पाच जनावरे असून, वर्षाकाठी पाच ट्रॉली शेणखत मिळते. दर दोन वर्षांआड पाच एकर जमिनीला खत देतात. दर चौथ्या वर्षी जमिनीच्या त्याच तुकड्यात शेणखत टाकले जात आहे. शेणखत विकत आणण्याची वेळ आतापर्यंत आली नाही,’ असे मोताळे यांनी सांगितले. काशीफळ उगवल्यानंतर विसाव्या दिवशी म्युरेट ऑफ पोटॅश व सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येकी ५० किलो व युरिया २५ किलो खत आळे पद्धतीने दिले. ठिबकद्वारे दर दोन दिवसाआड पाच तास पाणी दिले; तसेच रासायनिक किडनाशकाच्या तीन फवारण्या केल्या. फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘मक्षीकारी’ या जैविक कामगंधाचा वापर करण्यात आला. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या थर्माकोलच्या पत्रावळीवर ‘मक्षीकारी’ गंधाने भिजवलेला कापसाचा बोळा ठेवण्यात आला. त्याच्यावर किटकनाशक टाकण्यात आले. अशा आमिष असलेल्या सहा ते आठ पत्रावळ्या काशीफळाच्या क्षेत्रात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या. पत्रावळ्या हवेने उडू नये म्हणून त्याच्यावर दगड ठेवले. ‘मक्षीकारी’ गंधाकडे आकर्षित झालेले नर किटकनाशकामुळे मेले. या सापळ्यामुळे किटकनाशकावरील मोठा खर्च वाचवण्यात मोताळे यांना यश आले. एका वेलीला फक्त दोन काशीफळाचे नियोजन केल्यामुळे फळाचा आकार व वजन वाढले. फळाचे वजन आठ ते दहा किलोपर्यंत असून काही फळे १५ किलो वजनाची आहेत. काही फळे खराब झाली असली तरी एकरी ३५०० वेलीपासून पाच हजार फळे मिळणार आहेत. साधरणतः ४५ टन उत्पादन निघणे अपेक्षित आहे. प्रतिटन पाच हजार रूपये दर असून एका एकरात दोन लाख २५ हजार रूपये उत्पन्न निघेल. एकूण १५ हजार रुपये खर्च वजा जाता निव्वळ दोन लाख १० हजार रुपये नफा अपेक्षित आहे. आणखी १५ ते २० दिवसानंतर काढणीला सुरुवात होईल. बाहेरगावचे व्यापारी काशीफळ खरेदीसाठी मोताळे यांच्याशी संपर्क साधत आहेत, मात्र नागपूर किंवा मुंबईला स्वतः काशीफळ घेऊन जाण्याचा विचार मोताळे करीत आहेत.

फायदेशीर कारले
यंदा मोताळे यांनी कापसाची लागवड चार बाय दीड फूट अंतरावर केली आहे. त्यामुळे एकरी सात हजार २५० झाडे आहेत. कापसात चवळी व बाजूला एरंडी ही सापळा पिके आहेत. कापसाचे योग्य व्यवस्थापन ठेवल्यामुळे एकरी १२ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन निघेल असा मोताळे यांना विश्वास वाटतो, तर २० गुंठे क्षेत्रावर कारले असून १५ ते २० दिवसांनी कारले बाजारात येईल. वडीगोद्री व तीर्थपुरी येथील आठवडी बाजारात कारल्याची विक्री करणार आहेत. सिताफळाची वाढती लागवड बघून मोताळे यांनी २० हजार रोपांची रोपवाटिका केली आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापन ठेवल्यामुळे रोपाची गुणवत्ता चांगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट मद्यनिर्मितीस सुरूंग

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट मद्यनिर्मितीकरून लोकांच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्या कारखान्यावर शुक्रवारी बाजारसावंगी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत साडेपंचवीस हजारांचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बाजारसावंगी येथे बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहिती आधारे पथकाने बाजारसावंगी गाठून छापा टाकला. यावेळी जैस्वाल यांच्या घरात सुरू असलेला हा कारखाना उद‍्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईमध्ये पोलिसांना ऑफीसर्स चॉइस व्हिस्की, मॅकडॉल रम, मॅकडॉल व्हिस्की, इम्परियल ब्लू, बॅगपायपर, गोवा जिन लाइन, करण लाइन, ट्यूबर्ग बियर तसेच बिसलरी बाटल्यामध्ये भरण्यात आलेल्या बनावट दारूचा साठा सापडला. पोलिसांनी साडेपंचवीस हजारांची बनावट दारू जप्त केली. यावेळी संशयित आरोपी सतीश बाबूलाल जैस्वाल, उषा सतीशलाल जैस्वाल, नीलेश नंदकिशोर जैस्वाल व आशीष सतीशलाल जैस्वाल यांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक शिवाजी वानखेडे, आर. एस. कोरे, गिरी, नवले, कासलीवाल तसेच कर्मचारी आर. एम. भारती, शेख निसार, अश्विनी बोंदर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. आरोपींविरुद्ध दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची हजेरी आता ‘अॅप’वरून

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर येतात की नाही, याची अधिक काटेकोरपणे तपासणी करण्यासाठी शिक्षण विभागाने स्ट्रॉम हे अँड्रॉइड अॅप घेण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम, कार्यक्रम व उपाययोजना राबविण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. नऊ नोव्हेंबर रोजी ही हजेरी नियंत्रण पद्धत सुरू केली जाणार आहे.
सिस्टिम फॉर टीचर्स ऑनलाइन रिपोर्टिंग अँड मॉनिटरिंग (स्ट्रॉम) ही हजेरी नियंत्रण पद्धत जळगाव जिल्हा परिषदेने यापूर्वी राबविली आहे. त्यानुसार एखाद्या शाळेत सहा शिक्षक असतील, तर ते शाळेत आल्यानंतर हजेरी मस्टरवर सही करताना मुख्याध्यापकांनी त्यांचा फोटो काढणे आवश्यक आहे. हा फोटो स्ट्रॉमअंतर्गत तयार केलेल्या केंद्राच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविला जाईल. केंद्रप्रमुखांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या तालुक्याच्या ग्रुपवर पाठवावा व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच शिक्षण सभापतींकडे पाठवावा लागणार आहे.
शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत यासंदर्भात सूचना केली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर शाळेत येण्यासंदर्भात अनेक तक्रारी होतात. वेळेनंतर उशिराने येणाऱ्या शिक्षकांवर वॉच ठेवण्यासाठी स्ट्रॉम हे अॅप उपयोगी पडणार आहे.
हे अॅप नऊ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्याअंतर्गत शिक्षक उपस्थिती व विद्यार्थी यांच्या उपस्थितीचा अहवाल मागविण्यात येतो. सोमवार ते शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते दहादरम्यान व शनिवारी सकाळी आठ ते साडेआठपर्यंत ही माहिती पाठविण्यात येईल.

अशी होईल हजेरीची नोंदणी
पहिला टप्पा ः जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक हे शाळेतील प्रत्येक शिक्षक हजेरी पटावर स्वाक्षरी करीत असतानाचा शिक्षकांचा फोटो वेळ व लोकेशनसह उपस्थितीबाबतचा तपशील, विद्यार्थी उपस्थितीची माहिती व्हॉट्स अॅपवर संबंधित केंद्रप्रमुखांकडे पाठविणे. महिला शिक्षकांना फोटो पाठविण्यापासून सूट देण्यात येत आहे. त्यांच्या बाबतीत स्वाक्षरी केलेल्या मस्टरचा पुरावा पाठविण्यात यावा.
दुसरा टप्पा ः प्रत्येक केंद्रप्रमुखांनी प्राप्त झालेल्या फोटोची वेळ पाहून विलंबाने आलेल्या आणि विनापरवानगी अनधिकृत गैरहजर असलेल्या शिक्षकांचा तपशील, रजेवर व प्रशिक्षणाला गेलेल्या शिक्षकांची माहिती, विद्यार्थी उपस्थिती व्हॉट्स अॅपवर संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या ग्रुपवर पाठवावी.
तिसरा टप्पा ः संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीची शहानिशा करून शिक्षकाची व विद्यार्थ्यांची उपस्थिती तालुकानिहाय एकत्रित करून माहिती शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावयाची आहे.
चौथा टप्पा ः सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी रोजची उपस्थिती संकलित करून ठेवावी व मासिक अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा लागणार आहे.

स्ट्रॉम प्रणालीद्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून कार्यवाही केली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात संमती मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया वेळापत्रकानुसार पार पडेल.
- आर. एस. मोगल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images