Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिक्षण विस्तार अधिकारी मिळण्याचा मार्ग मोकळा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिल्लोड-सोयगाव येथे शिक्षण विस्तार अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शिक्षण सभापती विनोद तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक गुरुवारी घेण्यात आली.
या बैठकीत तालुकानिहाय रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. सिल्लोड, सोयगाव तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवणे शक्य होत नसल्याचे सदस्यांनी लक्षात आणून दिले. गट शिक्षणअधिकारी संपूर्ण तालुक्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची नियुक्ती तातडीने करण्यात यावी अशी सूचना तांबे यांनी केली.
निमंत्रित सदस्य श्याम राजपूत यांनी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देऊन एक महिना झाला असला तरी त्यांना आदेश दिले नसल्याचे लक्षात आणून देऊन नाराजी व्यक्त केली. यावर शिक्षणाधिकारी मोगल म्हणाले, या संबंधीची फाईल वेळेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. ती फाईल पुन्हा शिक्षण विभागाकडे आली नसल्यामुळे आदेश रखडले आहेत. भविष्य निर्वाह प्रस्तावांच्या संदर्भात शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा मुद्दा राजपूत यांनी मांडला, यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करा असा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्याला वालतुरे यांनी अनुमोदन दिले. बैठकीला प्रभाकर काळे, बबन कुंडारे, श्याम राजपूत, मधुकर वालतुरे यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ संचालकाचा जामीन फेटाळला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागच्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी व ‘मिलेनियम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’चा तत्कालिन संचालक शेख सलीम शेख चांद याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याला शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) कोर्टात हजर केले असता, पोलिसांनी न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती के. यावर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज केला असता, सहाय्यक सरकारी वकील विजयसेनानी यांनी जामीनास विरोध केल्यानंतर कोर्टाने नियमित जामीन अर्ज फेटाळला.
या प्रकरणी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट प्रशासनाने १२ एप्रिल २०१६ रोजी संशयित आरोपी शेख सलीम शेख चांद याच्याविरूद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सलीम हा ‘मिलेनियम इन्स्टिट्यूट’च्या संचालकपदावर कार्यरत होता. त्याने २००३ ते २०१४ या कलावधीत पदाचा गैरवापर करून लिपिक पदावर कार्यरत सैय्यद अजरोद्दीन याला सोबत घेऊन महाविद्यालयात सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याचा संशय पोलिस तपासातही आढळून आला आहे. शेख सलीम याने बोगस पावती पुस्तक तयार केले. विद्यार्थ्यांकडून शुल्क जमा करून बोगस पावती देत असे. पैशांची अफरातफर, विद्यार्थ्यांची फसवणूक, महविद्यालयाशी विश्वासघात केल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शेख सलीमच्या संचालकपदाची मान्यता मार्च २०१६ मध्ये रद्द केली होती. २८ मार्च २०१६ रोजी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टनेही त्याला बडतर्फ केले होते. त्यानंतर त्याने महाविद्यालयाच्या हार्डडिस्कचा संपूर्ण डेटा डिलिट केला होता. या फिर्यादीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात भादंवि ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४०९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गेल्या सहा महिन्यांपासून तो फरार होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीनी वस्तूंविरुद्ध नागरिकांचे अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाकिस्तानला नेहमी पाठिंबा देत राहाणारऱ्या चीनमधील विविध उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन शहरातील जागरूक नागरिकांनी केले आहे.
दिवाळी, होळी, ख्रिसमस, दसरा या सणांच्या कालावधीत चीन देशात उत्पादित झालेल्या वस्तूंची भारतात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यातून कोट्यवधीचे उत्पन्न हे चीन देशात जाते. अब्जावधीचा व्यापार करत असतानाही चीन देश भारतापेक्षा पाकिस्तानला पाठिंबा देत असतो. चीनची आर्थिक कोंडी करण्याकरिता जनजागृती अभियान जागरूक नागरिकांनी हाती घेतले आहे. दिवाळीनिमित्त खरेदी करताना नागरिकांनी चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकावा म्हणून बाजारपेठेत जागरूक नागरिक पत्रकांचे वाटप करणार आहेत, अशी माहिती अभियान प्रमुख अनंत मोताळे यांनी दिली. या अभियानात अॅड. श्रीचंद जग्ग्यासी, अॅड. शरद हलकुंडे, स्वाती कुलकर्णी, डॉ. राजन महिंद्र, रमेश तिवारी, लक्ष्मीनारायण पहाडिया, राजेंद्र तनेजा, लक्ष्मण सावनानी, गीता यादव, प्रशांत अवसरमल, आकाश शिंदे, मुरलीधर वाखाणी यांनी सहभाग घेतला आहे.
या अभियानात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. रविवारपासून हे अभियान पैठण गेटपासून सायंकाळी साडेसहा वाजता प्रारंभ होणार असल्याचे मोताळे यांनी सांगितले. शहरातील विविध भागात हे अभियान राबवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम, माथाडी कामगारांची निदर्शने

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे बांधकाम व माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी बांधकाम व माथाडी कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नोंदणी न झालेल्या कामगारांची नोंदणी नोंदणी करणे, नोंदणी झालेल्या कामगारांना लग्नासाठी ३० हजार रुपयांचे अर्थसाह्य देणे, गंभीर आजारासाठी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचे वैद्यकीय साह्या द्यावे, ३१ ऑगस्टनंतर २०१४ नंतर नोंद झालेल्या सर्व कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदीसाठी तीन हजार रुपये अर्थसाह्य द्यावे, दिवाळी बोनस द्यावा, माथाडी मंडळातील कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, माथाडी कायद्यातील कंत्राटी पद्धत बंद करावी, आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कॉ. छगन साबळे, कॉ. दीपक अहिरे, कॉ. कमलाबाई इंगळे, कॉ. ज्ञानेश्वर तायडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाखांचा गुटखा जप्त

$
0
0



औरंगाबाद: मनमाडहून आणलेला सुमारे तीन लाखांचा गुटखा गुन्हेशाखेच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोतीकारंजा येथे केली.
सय्यद माजीद सय्यद फारूक यांचे मोतीकारंजा येथे किराणा दुकान आहे. त्यांच्याकडे मनमाडहून गुटख्याचा माल येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना समजली. त्यांच्यासह उपनिरीक्षक अमित बागुल व पोलिस पथकाने सापळा रचला. मनमाडहून गुटखा घेऊन येणाऱ्या रिक्षाची माहिती मिळवली. मात्र, ऐनवेळी रिक्षाने हुलकावणी दिली. त्यामुळे पोलिस मोतीकारंजा येथे धडकले. त्यावेळी रिक्षा रिकामी दिसली, परंतु गुटख्याचा माल चौथ्या मजल्यावर नेला जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी गुटख्याचा माल जप्त केला. त्यानंतर संशयित दुकानदाराला ताब्यात घेतले. कारवाईची माहिती अन्न व औषध विभागाचे वरिष्ठ अधिकारी पारधे यांना कळवली. अन्न व औषध विभागाने हा माल ताब्यात घेवून चौकशी सुरू केली आहे. सोमवारी या प्रकरणात खटला दाखल होणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाकडून देण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करोडीच्या कंपनीत वीज चोरी उघड

$
0
0



औरंगाबाद : करोडी येथील मे. सुप्रभात एंटरप्रायझेस प्लास्टिक उद्योगात वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. महावितरणच्या पथकाने छापा टाकून ५ लाख ३१ हजार ७२० रुपयांची वीज चोरी पकडली. या प्रकरणी महावितरणने जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
करोडी येथील सुप्रभात एंटरप्राझेसवर महावितरणच्या पथकाने ८ ऑक्टोबरच्या रात्री छापा टाकला. त्यावेळी उद्योजकाने वीज मीटर जोडणीची वायर बाजुला काढून मेन स्वीचमधून अनधिकृतपणे दुसरी वायर जोडून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. या पथकाच्या पंचनाम्यात ५ लाख ३१ हजार ७२० रुपयांची वीज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या उद्योगाचा वीज पुरवठा या पथकाने खंडित केला.
या प्रकरणात उद्योजकाकडून ५ लाख ३१ हजार ७२० या वीज चोरीच्या रकमेसह तडजोडीचे एकूण ९ लाख ६० हजार रुपये वसूल करण्यात आले. या प्रकरणी वीज कायदा २००३ नुसार महावितरणने जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही महेंद्र देशमुख, महादेव मोरतळे, राजमैया कोमरे, एकनाथ गवळी यांनी केल्याची माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभ स्वच्छता नियमित करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलकुंभ स्वच्छ करण्यावर पाणी दर्जा समिती आग्रही असून, पालिकेच्या प्रशासनाने नियमितपणे जलकुंभांची स्वच्छता केली पाहिजे. पाण्यातील क्लोरिनचा डोस तपासला पाहिजे, अशी शिफारस या समितीने केली आहे.
शहराचा पाणीपुरवठा पालिकेच्या ताब्यात आल्यावर प्रथमच गुरुवारी पाणी दर्जा समितीची बैठक झाली. दर तीन महिन्यांत या समितीची बैठक होणे गरजेचे असताना तब्बल दहा महिन्यांनंतर ही बैठक झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला प्राधिकरणाचे मुख्य अभियंता मुखेडकर, पालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी, प्रा. उमेश कहाळेकर यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील जलकुंभ नियमित स्वच्छ केले पाहिजेत, स्वच्छतेचा तपशील त्यावर लिहिला पाहिजे, अशा सूचना या बैठकीत पालिका आयुक्तांना करण्यात आल्या. यापूर्वी जलकुंभ कधी स्वच्छ करण्यात आले होते, त्याचा तपशील द्यावा, अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली, पण पालिकेचे अधिकारी तपशील देऊ शकले नाहीत. हर्सूल तलावातून पाणीपुरवठा सुरू करण्याबद्दलही बैठकीत चर्चा झाली.
पालिकेच्या आरोग्य केंद्रांमधून सोडियम हायपो क्लोराइडचा पुरवठा नागरिकांना केला जातो, ही बाब स्वागतार्ह आहे. शहरात तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणी साठवून ठेवावे लागते. त्यामुळे पाण्यातील क्लोरिनचे प्रमाण कमी होते. क्लोरिनचे प्रमाण कायम राहण्यासाठी सोडियम हायपो क्लोराइड वापरणे हितकारक आहे, असा सूर बैठकीत उमटला.

क्लोरिनचे प्रमाण तपासा
पाणीपुरवठा करताना जलकुंभातील पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण किती आहे, हे वेळोवेळी तपासा. ही तपासणी प्रयोगशाळेत करण्याऐवजी नागरी वसाहतींमध्ये जाऊन करावी. त्यामुळे पाण्यातील क्लोरिनच्या प्रमाणाची तपासणी कशी केली जाते, हे नागरिकांच्या लक्षात येईल आणि पाणीपुरवठा यंत्रणेवर त्यांचा विश्वास बसेल, असे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले. ही तपासणी करणे फार सोपे आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

तक्रारीसीठी हवा टोल फ्री क्रमांक
पाणीपुरवठ्यासंदर्भात नागरिकांना पालिकेकडे तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याची सूचना समितीच्या सदस्यांनी केली. प्रत्येक जलकुंभावर तक्रार पुस्तिका ठेवण्याची शिफारसही करण्यात आली. महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ३०० विहिरी आहेत. प्रत्येक विहिरीतील पाण्याची पातळी व पाण्याचा दर्जा यांचाही सविस्तर अहवाल तातडीने तयार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गासाठी दिवाळीनंतर भूसंपादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याच्या परिवहनात क्रांती घडविणाऱ्या, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई महामार्गासाठी भूसंपादनही वेगाने करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावांमधून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया दिवाळीनंतर राबविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल यांनी दिली.
मुंबई-नागपूर हा ७५० किलोमिटरचा समृद्धी महामार्ग मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतून जातो. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया दिवाळीनंतर राबविण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांची किती जमीन या महामार्गासाठी संपादित करायची याचे पूर्ण सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार जमिनीचा मोबदला देण्यात येणार अाहे. हा महामार्ग जेथून जाईल तेथील जमिनीचे भाव वाढणार असल्याने शेतकरीही महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध करणार नाहीत, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

असा असेल महामार्ग
नागपूर-सेलडोह-वर्धा-येळी-पुलगाव-धामणगाव-वखफळी-कारंजा लाड-सेलू बाजार-मालेगाव-मेहकर-दुसरबीड-सिंदखेड राजा-जालना-शेंद्रा-औरंगाबाद- सावंगी-दौलताबाद-लासूर-वैजापूर-शिर्डी-गोंदे-पिंपळगाव,मोर-घोटी,देवळी-खर्डी-शहापूरजवळील कासेगाव-वडपे (भिवंडी बायपास) असा हा एक्स्प्रेस वे असेल. पुढे कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल.

१० जिल्ह्यांमधून जाणार
हा महत्त्वाकांक्षी महामार्ग १० जिल्ह्यांमधून जाणार आहे. विदर्भ-मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा हा महामार्ग असेल, असे मानले जाते. या रस्त्यामुळे नागपूर ते औरंगाबाद हे अंतर तीन तासांत, तर त्यापुढील मुंबईपर्यंतचे अंतर तीन तासांत कापता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फूड कॉर्नर : पूर्णानंदचे लज्जतदार आलुवडे

$
0
0

Abdulwajed@timesgroup.com
Tweet :@abdulwajedMT
सरस्वती भुवन शाळेलगत असलेल्या सरस्वती कॉलनीत विजय आणि सीमा कर्वे यांचे स्वामी पूर्णानंद भांडार आहे. १९७१मध्ये कर्वे गुरुजी यांनी सरस्वती कॉलनीत स्वतःसाठी घर घेतले होते. सरस्वती भुवन ‌शिक्षण संस्था उभारणीसाठी करण्यासाठी निजामाकडून जमीन मिळवून देण्यासाठी कर्वे गुरुजी यांनी मोलाची भूमिका बजावली. कर्वे गुरुजींकडे मुंबई येथून हरिगोविंद कर्वे आले. हरिगोविंद कर्वे यांनी १९७१मध्ये सरस्वती कॉलनीत स्टेशनरीची दुकान सुरू केले. हरिगोविंद कर्वे यांचे पुत्र विजय कर्वे हेही दुकानाच्या कामात हातभार लावत असत. विजय कर्वे यांचा सीमा यांच्याशी विवाह झाला. त्यांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगले खाद्यपदार्थ मिळावेत म्हणून ‘पूर्णानंद’ची सुरुवात केली. आलुवडा हा ‘पूर्णानंद’चा प्रसिद्ध पदार्थ. त्याची ओळख काकुंचे वडे म्हणून झाली.
‘पूर्णानंद’च्या आलुवड्याबरोबर वडापाव, समोसा, इडली, सँडविच हे पदार्थही प्रसिद्ध आहेत. काकू आणि काका सकाळी सहापासून वडे तयार करण्यासाठी कामाची सुरुवात करतात. वडे व अन्य पदार्थ तयार करण्यासाठी ताज्या भाज्या आणल्या जातात. हा नियम गेल्या ३२ वर्षांपासून कडेकोरपणे पाळला जात आहे. वडे तयार करण्यासाठी बटाट्याची भाजी तयार तयार केली जाते. त्यासाठी फोडणीत बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि मसाला टाकला जातो. यानंतर उकडलेले बटाटे बारीक केले जातात. यावर लिंबू पिळले जाते. हे बटाटे मसाल्याच्या फोडणीत टाकून भाजी एकजीव केली जाते.
यानंतर हरभऱ्याच्या डाळीचे पीठ भिजविले जाते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यानंतर बटाट्याच्या भाजीचे बारीक गोलाकार वडे तयार करून डाळीच्या भिजविलेल्या पिठात टाकून वडा तयार करण्यात येतो. या वड्यामध्ये भाजीत टाकलेल्या सर्व
मसाल्यांचा स्वाद मिळावा, याची विशेष काळजी काकू घेतात. आलुवड्यांची चव जीभेवर दीर्घकाळ असते. ‘पूर्णानंद’मधील आलुवडा पावाशिवायही चविष्ट लागतो. त्याचबरोबर येथील वडापावची चवही न्यारी असते. या वडापावसाठी चटणीची गरज नाही. यामुळे येथील वडापाव प्रसिद्ध आहे.
त्याचबरोबर ‘पूर्णानंद’चा समोसाही प्रसिद्ध आहे. येथील या समोशाचा आकार वेगळा अाहे. अन्यत्र पंजाबी समोसे मिळतात. हा समोसा नियमित समोशापेक्षा आकाराने मोठा आहे. समोसा तयार करण्यासाठी मैद्यासोबत गव्हाचे पिठही मिसळले जातो. यामुळे समोशाची चवही वेगळी लागते. एक समोसा खाल्यानंतर मुलांना दोन ते तीन तास भूक लागत नाही. आलुवड्याची भाजी समोशात वापरली जाते. त्याचबरोबर येथील कच्छी दाबेली प्रसिद्ध आहे.
पूर्णानंद भांडारामध्ये आलुवडे, वडापाव, समोसा, दाबेलीसह मसाला पाव, ढोकळा, इडली आणि चटणी सँडविच खाद्यपदार्थही प्रसिद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी रुग्णालयाची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेला लागली घरघर, अनेक रखडलेले प्रश्न-प्रकल्प, घाण-अस्वच्छता तसेच दोन दिवसांपूर्वी झालेला १२ वर्षीय मुलीचा मृत्यू आणि त्यानंतर उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार अतुल सावे यांनी शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) घाटीची झाडाझडती घेतली. तसेच अधिष्ठातांपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना झापाझापी करून आरोग्य सेवा सुधारण्याच्या कडक इशाराच दिला.
मागच्या तीन वर्षांपासून ‘नेफ्रॉलॉजी बिल्डिंग’चा उभा असलेला केवळ सांगाडा आणि शून्य पदनिर्मिती, याचा आढावा घेत, आमदार सावे यांनी, स्वतः मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रस्ताव नेतो, तो तुम्ही आधी माझ्याकडे तर द्या, असेही सुनावले. प्रस्तावाच्या घोळाबाबतही खडे बोल सुनावल्याचे समजते. त्यानंतर १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झालेल्या बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक २४, २५सह इतर वॉर्डांची आणि डॉक्टर-कर्मचाऱ्यांनीही चौकशी केली. रुग्णालय परिसरातील घाण-अस्वच्छता आणि बांधकाम विभागामुळे रखडलेल्या वेगवेगळ्या कामांचा समाचार घेत बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले. रुग्णालयातील आरोग्य सेवा-सुविधा सुधारा, असा निर्वाणीचा इशाराही दिला.

अखेर अधीक्षकांची नियुक्ती
अधिष्ठाता डॉ. म्हस्के व मावळते वैद्यकीय अक्षीधक डॉ. सुहास जेवळीकर यांच्यातील संबंध तणावाचे असल्याची चर्चा होती. डॉ. म्हस्के यांनी शुक्रवारी डॉ. जेवळीकर यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश काढले आणि डॉ. सुधीर चौधरी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त धान्याचे अनुदान नाकारा

$
0
0

औरंगाबाद : घरगुती वापराच्या गॅसची सबसिडी परत करण्यासाठी लाखो ग्राहकांनी पुढाकार घेतल्यानंतर आता सरकारने रेशनवरील धान्याच्या खर्चात कपातच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी रेशन कार्डधारकांसाठी ‘अनुदानातून बाहेर पडा’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्ष योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य दिले जाते. रेशन कार्डधारकांच्या नावावर हे धान्य पाठविण्यात येते, मात्र अनेक कार्डधारक हे धान्य घेत नाहीत. रेशनवरील धान्याची गरज नसलेल्या कार्डधारकांसाठी सवलतीच्या दरातील धान्य नाकारण्याचा पर्याय सरकार उपलब्ध करून देणार आहे. या संदर्भातील सूचना सर्व रेशन दुकानांवर लवकरच लावण्यात येणार आहेत. कार्डधारकाने संबंधित दुकानाशी संपर्क साधून स्वस्तातील धान्य नाकारण्याचा पर्याय स्वीकारू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लाभार्थींना सवलतीच्या दराने मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ घ्यायचा नसेल, तर त्यांना आपला संमती अर्ज संबंधित स्वस्तधान्य दुकान किंवा जिल्हा प्रशासनाकडे द्यावा. त्याबरोबर कार्डधारकांना संमती अर्ज ऑनलाइनही भरता येऊ येईल.

काळ्या बाजाराला आळा

कार्डधारकांसाठी धान्य खरेदी करणे आणि ते संबंधित दुकानांपर्यंत पोचविणे, यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागतो. अनेक कार्डधारक रेशनवरील धान्य घेत नाहीत. त्यामुळे या कार्डधारकांच्या नावावर आलेल्या धान्याचे काय होते, हे सांगणे अवघड आहे. धान्य न घेणाऱ्या कार्डधारकांनी अनुदान नाकारल्यास सरकारची मोठी बचत होऊ शकेल, असे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरा वेळ देत नसल्याने पत्नीची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

नवरा वेळ देत नसल्याने निराश झालेल्या पत्नीने नवऱ्याला सेल्फी पाठवून नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पोलिसांना घटनास्थळी तमिळ भाषेत सुसाइड नोट सापडली असून त्याआधारे तपास केला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पडेगाव-रामगोपाळनगरमध्ये ही घटना घडली. प्रवलिका टेरम मनोहर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचे पती आयसीआयसीआय बँकेत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवलिकाचा महिनाभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. लग्नाआधी भरपूर वेळ देणारा नवरा लग्नानंतर बदलला. लग्नानंतर तो आपल्याला वेळच देत नाही, अशी तिची सतत तक्रार होती. त्याच रागाने प्रवलिकाने आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. प्रवलिकाने रामगोपाळनगर येथे घरातच आत्महत्या केली. त्याआधी तिने सेल्फी नवऱ्याला पाठवला. त्यामुळे शंका आल्याने नवरा तातडीने बँकेतून घरी निघाला पण त्याआधीच प्रवलिकाचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आचारसंहिता पालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
नगरपालिका निवडणुकीसंदर्भाने लागू करण्यात आलेली आचारसंहिता त्या शहराच्या कार्यक्षेत्रापुरतीच मर्यादित असल्याचा खुलासा निवडणूक विभागाने केल्यामुळे या आचारसंहितेचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाजावर होणार नाही.
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठीची आचारसंहिता १७ ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगाने जारी केली आहे. यामध्‍ये चारपेक्षा जास्त नगरपालिकांची निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यात सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील विकासांवर तसेच निधीच्या खर्चावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. याचा फेरविचार करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे करण्यात आली होती. यानंतर नगरपालिका निवडणूक आचारसंहिता ही केवळ पालिका क्षेत्रापुरतीच मर्यादित राहील असे स्‍पष्टीकरण निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका आचारसंहितेचा परिणाम हा पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या कामकाजावर होणार नाही. त्यांची कामे नियमितपणे होतील. त्यामुळे जिल्हा परिषदेत आपला निधी नियोजीत वेळेनुसार खर्च करता येईल.
दरम्यान, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतेही कृती किंवा घोषणा निवडणूक नसणाऱ्या नगरपालिका किवा महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यासोबतच मंत्री खासदार व आमदार यांना करता येणार नसल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महोत्सवाची पर्यावरणावर कुऱ्हाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवापासून पर्यटक व रसिक दूर राहिल्याची ओरड होत असताना, या महोत्सवाचे आयोजक पर्यावरणाच्या मुळावर उठल्याचे उघड झाले आहे. पाहुण्यांना पुरविण्यात आलेल्या नाश्ता, पाण्याच्या बाटल्यांचा केरकचरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या बंधाऱ्यात टाकला आहे. त्यामुळे विद्यापीठात संतापाची भावना आहे.
आठ वर्षाच्या विश्रांतीनंतर औरंगाबादमध्ये यंदा वेरूळ-अंजिठा आंतरराष्ट्रीय महोत्सव झाला. पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यात येणारा हा महोत्सव यंदा वादात राहिला. काही ठराविक प्रतिष्ठित, अधिकाऱ्यांच्या कुटुंबापुरता हा महोत्सव मर्यादित राहिल्याचा आरोप होत असताना, आता महोत्सवातील प्लास्टिकच्या केर कचऱ्यामुळे विद्यापीठातील पर्यावरणाला हानी पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन दिवस महोत्सव चालला, महोत्सवाच्या दरम्यान उपस्थितांना आयोजकांकडून नाश्ता देण्यात आला. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतानाच प्रत्येकाला नाश्ताचे भलेमोठे पॅकेट दिले जायचे. ज्यात समोसा, केचप, वेफर्स, नॅपकिन, पिण्याच्या पाण्याची बाटली होती. महोत्सव संपल्यानंतर जमा करण्यात आलेला हा केरकचरा मोठ-मोठ्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून महोत्सव ज्या सोनेरीमहलमध्ये झाला त्याच्या जवळच टाकण्यात आला आहे. विद्यापीठाने तेथे बंधारा बांधलेला आहे. बंधाऱ्याच्या बाजूलाच असलेल्या परिसरात केरकचऱ्याच्या बॅगा अस्ताव्यस्त फेकण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने नुकतेच ‘जलयुक्त विद्यापीठ’ उपक्रमातंर्गत बंधाऱ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण केले आहे. शासनाने विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत या प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांचे अनुदानही दिलेले आहे. त्याचा फायदाही विद्यापीठाला झाला. त्यातच अशा महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमातील केरकचरा विद्यापीठातच टाकण्यात आल्याने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

कोट्यवधींच्या फळबागेला धोका
वेरूळ-अंजिठा आंतरराष्ट्रीय महोत्सव विद्यापीठातील ज्या सोनेरी महलात घेण्यात आला, त्याच्याच जवळील बंधारालगतच्या नाल्यात महोत्सवातील प्लास्टिक केरकचरा टाकण्यात आला आहे. महोत्सव झाल्यानंतर परिसरातील साफसफाई करून, केरकचरा इतरत्र हालविणे गरजचे असताना, याच परिसरात कचरा टाकणे कितीपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याच परिसरात विद्यापीठाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली फळबाग आहे. विघटन न होणारा हा कचरा असल्यामुळे पर्यावरणासह, फळबागालाही मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ तोळे सोने लंपास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अहिंसानगर येथे घरफोडी करीत चोरट्यांनी तब्बल १७ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. शुक्रवारी सायंकाळी ही चोरी उघडकीस आली.
मनोज ओमप्रकाश चांडक (रा. पूर्वा अपार्टमेंट) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचे सिडको परिसरात स्टेशनरीचे दुकान आहे.
खरेदीनिमित्त ते शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुटुंबियासह गुलमंडी परिसरात गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराच्या पाठीमागील लोखंडी ग्रील तोडत घरात प्रवेश केला. सोन्याचे सुमारे सतरा तोळ्यांचे दागिने, ३०० ग्रॅम चांदीचे दागिने, २० हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. चांडक रात्री आठच्या सुमारास घरी आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार
पोलिसांनी परिसरात कुठेकुठे सीसीव्ही कॅमेरे आहेत, यांची माहिती जमा करणे सुरू केले आहे. या फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘थिंक ग्लोबली, इट लोकली’ हाच जगण्याचा मंत्र

$
0
0


Nikhil.Nirkhee@timesgroup.com
आज वडापाववर दिवस काढणारे आणि दिवसातून १८-२० कप चहा पिणारे कमी नाहीत. सत्तरच्या दशकापर्यंत कधीतरी होणारी गव्हाची पोळी दररोज होत असून, आज ग्रामीण भागातही चुकून भाकरी केली जात आहे. आहार कोणता-किती-केव्हा घ्यावा, याचेही फार कमी तारतम्य पाळले जाते आणि वरतून आरामदायी जीवनशैलीची ‘फोडणी’, यामुळे मधुमेहापासून कर्करोगापर्यंत अनेक व्याधींची ‘निःशुल्क’ भेट मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ‘थिंक ग्लोबली, इट लोकली’ हा विचार आचरणात आणण्याची नितांत गरज असून, आहार जागरणासाठीच आज राज्यभर व्याख्याने होत असल्याचे ‘आयुर्वेद व्यासपीठ’चे राज्याध्यक्ष व प्रसिद्ध वैद्य डॉ. संतोष नेवपूरकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

- प्रश्नः आयुर्वेदानुसार आहाराचे महत्त्व नेमके किती?
- उत्तरः शरीराच्या झिजण्याची क्रिया-प्रक्रिया सतत सुरू असते आणि ही झीज भरून काढण्याचे काम आहाराच्या पोषणातून होत असते. अर्थात, शरीराचे तसेच मनाचे पोषणही आहारातूनच होत असते. आयुर्वेदानुसार कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य हे आहार, विश्रांती व व्यायाम या तीन घटकांवरच अवलंबून असते. त्यातही आहार हा सर्वोच्चस्थानी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सहा ते आठ तासांची रात्रीची विश्रांतीही तितकीच आवश्यक आहे. याच विश्रांतीच्या काळात ‘टिश्यू बिल्डिंग’चे महत्त्वाचे काम होत असते. दुपारी जेवणानंतर अर्धा-पाऊण तासाने १०-१५ मिनिटांची वामकुक्षीही उपयुक्त ठरते. त्यानंतर व्यायामाचे महत्त्व आहे. दुर्दैवाने आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार तब्बल ७९ टक्के व्यक्ती व्यायाम करीत नाही, हेही सांगितले पाहिजे.

- प्रश्नः प्रादेशिक आहाराचे महत्त्व किती?
- उत्तरः आरोग्याच्या दृष्टीने आहार हा सर्वोच्चस्थानी आहे आणि आहार कोणता-कधी-किती घ्यावा, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, अलीकडे आहाराच्या सवयी कमालीच्या बदलल्या आहेत. सत्तरच्या दशकापर्यंत केवळ सणासुदीला गव्हाची पोळी होत होती, तर इतर वेळी भाकरीच खाल्ली जात होती. आज चक्क ग्रामीण भागामध्येही चुकून भाकरी केली जाते, हा फार मोठा बदल झाला आहे. सर्वाधिक प्रमाणात गहू होणाऱ्या पंजाबमध्ये आज सर्वाधिक प्रमाणात कर्करोगी आहेत आणि कर्करोग्यांसाठी थेट पंजाबमधून रोज दिल्लीला ‘स्पेशल ट्रेन’ येते. त्यामुळे गहू हे कर्करोगामागचे कारण आहे का, का गव्हासाठी वापरली जाणारी किटकनाशके जबाबदार आहेत, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अर्थातच, यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला देश-प्रदेश, प्रकृती, ऋतूमानानुसार आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या प्रदेशात खूप पाऊस पडतो तो ‘अनुप’ प्रदेश, साधारण पाऊस पडतो तो ‘साधारण’, तर ज्या भागात पाऊस कमी, झाडे कमी, ऊन भरपूर, वारा जास्त तो ‘जांगल’ प्रदेश अशी विभागणी आयुर्वेदानेच केली असून, त्यानुसारच आहार घेण्याचे सुचविले आहे. कोकणात तांदळाची भाकरी खाल्ली जाते, उर्वरित महाराष्ट्रात ज्वारी-बाजरीची खाल्ली जाते, तर पंजाबमध्ये तंदूर रोटी खाल्ली जाते. मात्र, आहारात बदल म्हणून कधीतरी रोटी चालू शकते; परंतु नेहमीसाठी तांदळाची भाकरी, तंदूर रोटी मराठवाड्यात राहणाऱ्यांसाठी त्रासदायकच ठरते. धान्य-तृणधान्याचे आणि फळांचेही तसेच आहे आणि त्या-त्या भागात येणारे धान्य-तृणधान्य-फळे-भाज्या खाण्यावरच भर असला पाहिजे.

- प्रश्नः विरुद्ध आहाराचे काय परिणाम होऊ शकतात?
- उत्तरः ज्या अन्न घटकांचा एकमेकांशी संयोग होत नाही, असा आहार म्हणजे ‘विरुद्ध आहार’. त्याचे सोपे उदाहरण म्हणजे दूध-फळांचे मिश्रण, जे आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे. केळीचे शिकरण आवडीने खाल्ले जाते; परंतु फळांमध्ये दूध मिसळणे आयुर्वेदानुसार सर्वथा चुकीचे आहे. त्याऐवजी केळीत तूप टाकून खाणे योग्य. त्याचवेळी आज हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये वापरली जाणारी बहुतांश भाज्यांची ग्रेव्ही ही दुधाच्या सायीपासून तयार केली जाते, जे विरुद्ध अन्न आहे. ‘काजुकरी’सारखी डिश आवडीने खाल्ली जाते; परंतु हा विरुद्ध आहार असल्याचे भान फार कमी जणांना असते. विरुद्ध अन्नामुळेच त्वचाविकार, वंध्यत्व व वजन वाढण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर सहज दिसून येत आहे. हेच आहाराचे तंत्र-मंत्र आणि आहाराचे खरे महत्त्व समजून सांगण्यासाठीच ‘आयुर्वेद व्यासपीठा’मार्फत रविवारी राज्यभर ‘आहारातून आरोग्याकडे’ या विषयान्वये जनजागरण केले जाणार आहे.

- प्रश्नः चुकीच्या आहाराचे कसे परिणाम दिसत आहेत?
- उत्तरः हल्ली वडापाव खाऊन दिवस काढला जातो, तर दिवसातून १८-२० वेळा चहा-कॉफी प्याली जाते. मुळात एक कप चहा पचवायला सरासरी दोन तास लागतात, तर एक कप दूध पचवायला दीड तास व एक कप गरम पाणी पचवायला अर्धा तास लागतो. त्यामुळे वारंवार चहा-कॉफीसारखी उत्तेजक पेय शरीरात ढकलून भूक गंभीररित्या मंदावते व त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम झाल्यावाचून राहात नाही. त्यामुळे चहा मर्यादित प्रमाणातच हवा. अर्थात, चहा घेताना चहाची पत्ती कमी प्रमाणात टाकून, कमी प्रमाणात उकळून व कमी साखर टाकूनच घेतला पाहिजे. तसेच रात्रीच्या जेवणानंतर दोन ते अडीच तास झोपू नये. मात्र, ६५ टक्के व्यक्ती उशिरा जेवतात व दोन-अडीच तासाच्या आतच झोपतात. वेळी-अवेळी खाण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही व त्यामुळे शरीराचे पोषणही व्यवस्थित न होता पुरेशी ऊर्जा न मिळता दिवसभर आळसावलेपणा जाणवणे आणि पुन्हा-पुन्हा उत्तेजक पेय घेण्याच्या दुष्टचक्रात व्यक्ती अडकत जातात. फास्टफूड, कोल्डड्रिंक्स यासारख्या सवयींमुळेही ‘एम्टी कॅलरीज’ वाढून बालकांपासून प्रौढांपर्यंत स्थूलतेचे प्रश्न गंभीर बनले आहेत आणि त्यातूनच निरनिराळे आजार वाढले आहेत. अगदी १४ व्या वर्षापासून केस गळण्याचे प्रकार दिसून येत आहेत. उपास ही कल्पना अत्यंत चांगली; परंतु मूळ संकल्पना समजून न घेता साबुदाणा-चिप्स-भगरीच्या माऱ्याने शरीराचे मोठे नुकसान होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीड दशकापासून फरार असलेल्या ६५ वर्षीय महिलेस क्रांतिचौक पोलिसांनी केरळमधून अटक केली. तिला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. एच. मोहमद यांनी सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांनी नियमित कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले.

समर्थनगर येथे राहणाऱ्या महेंद्र जोशी यांनी कोकोनल, ता. कन्नूर, केरळ येथील शैलेजा लक्ष्मण या महिलेसोबत नारळचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवहारातून शैलेजा लक्ष्मण या महिलेने जोशी यांना ३ लाख ७५ हजार रुपयास गंडा घातला. फसवणूक झाली असल्याचे जोशी यांच्या लक्षात आल्यानंतर जोशी यांनी पैसासाठी तगादा लावला. शैलेजा या महिलेने कंटाळून धनादेश दिला. धनादेश दिल्यानंतर जोशी यांनी बँकेत वटविण्यासाठी टाकला असता तो बाऊन्स झाला. धनादेश अनादर झाल्यामुळे जोशी यांनी कोर्टात दावा दाखल केला. या दाव्यावर सुनावाणी झाली असता कोर्टाने महिलेस दोषी ठरवून २००१ मध्ये शिक्षा ठोठवली होती. तेव्हापासून महिला गायब झाली होती.

या महिलेविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले. वॉरंट तामील करण्यासाठी क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल ए.जी. सय्यद, महिला पोलिस फातेमा पठाण या दोघांनी केरळ राज्यातील कन्नूर तालुक्यातील कोकोनल येथील शैलेजा लक्ष्मण या महिलेस १९ ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन ट्रांझीट पीसीआर घेतला. या महिलेस २२ ऑक्टोबर रोजी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात अटक दाखविण्यात आली असून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. एच. मोहमद यांच्या समोर हजर करण्यात आले. शैलेजा महिला गेल्या १५ वर्षांपासून फरार आहे. कोर्टाने शिक्षा ठोठविल्यापासून ती पोलिसांसमोर हजर झाली नाही, ती कुठे होती, तिला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली होती का, याची चौकशी करावयाची असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती तपासअधिकाऱ्यांनी केली. कोर्टाने न्यायालयीन कोठडी ठोठविल्यामुळे तिची हर्सूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५६ गुणांच्या प्रश्नांचा झब्बू!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐनवेळी स्थगित करण्यात आलेले पेपर, परीक्षा केंद्रातील बदल हा गोंधळ थांबत नाही तोच विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत ८० गुणांच्या पेपरमध्ये ५६ गुणांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला. एमएस्सी प्रथम सत्राच्या ‘इनऑर्गेनिक केमिस्ट्री’त हे महानाट्य घडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा चार ऑक्टोबरपासून सुरू आहेत. आज एमएस्सी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांचा इनऑर्गेनिक केमिस्ट्री विषयाचा पेपर होता. सकाळी १० ते १ या दरम्यान हा पेपर घेण्यात आला. ८० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे नेमका कोणता प्रश्न सोडवायचा, हा गोंधळ उडाला. ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन अशा दोन भागात प्रश्नत्रिका होती. त्यात ‘अ’मध्ये १ व ‘ब’मध्ये ७ असे एकूण ७ प्रश्न होते. ‘अ’ विभागातील पहिल्याच २० गुणांच्या प्रश्नांमध्ये ‘वॉट इज बेस हायड्रालिक्स’ हा प्रश्न सलग तीन वेळा विचारण्यात आला. त्याच्याच खाली असलेल्या प्रश्नातील उपप्रश्न प्रश्न बी विभागातील क्रमांक तीनच्या प्रश्नात ‘बी’ व ‘सी’मध्ये विचारण्यात आला. हा चार गुणांसाठीचा प्रश्न आहे. त्याच प्रश्नातील ‘एच’चा प्रश्न हा प्रश्न ‘बी’ विभागात प्रश्न क्रमांक ५ मध्ये पुन्हा ‘बी’ उपप्रश्नात विचारण्यात आला. त्यासह बी विभागातील मधील प्रश्न क्रमाक १ मधील ‘बी’ रोमन वनचा प्रश्न क्रमांक ४ मध्ये उपप्रश्नात रिपीट करण्यात आला. त्यासह चौथ्या प्रश्नातील ‘ब’हा प्रश्न पुन्हा प्रश्न सहाव्यामध्ये ‘अ’ला विचारण्यात आला. अशा एकूण ५६ गुणांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याचे विषयतज्ज्ञांनी सांगितले. या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून हा पेपर रद्द करण्याची मागणी होत आहे.

शहरातील प्राध्यापक पेपरचे कर्तेधर्ते
प्रश्नपत्रिकेत पुनरावृत्ती झालीच कशी, याबाबत प्रशासन गप्प आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. दिंगबर नेटके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांचे मोबाइल फोन बंद होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रश्नपत्रिका औरंगाबाद शहरातील कॉलेजांमधील प्राध्यापकांनीच काढल्या आहेत. विद्यापीठ प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञांकडून तीन सेट तयार करून घेते. त्यातील एक सेट निश्चित केला जातो. या प्रश्नपत्रिका काढल्या कोणी, त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईचे अधिकार
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेच्या कामात चूक झाली तर संबंधित प्राध्यापकाची वेतनवाढ रोखण्याचे विद्यापीठाला अधिकार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘इनऑर्गेनिक केमिस्ट्री’च्या या प्रश्नपित्रतेतील गोंधळामुळे २३५०० विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या जबाबदार प्राध्यापकांवर विद्यापीठ काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेसाठी आजी-माजी विद्यार्थी रस्त्यावर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षकांची वानवा, सोयीसुविधांचा अभाव, शासनाचे दुर्लक्ष आणि विद्यार्थ्यांचे टांगणीला लागलेले भवितव्य या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी शासकीय कला महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ‘कलेला वाचवा’ अशा आर्त हाकेने निरालाबाजार, औरंगपुरा परिसर दणाणला.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलाकार घडविणाऱ्या कला महाविद्यालयाकडे शासन आणि प्रशासनपातळीवरून पुरते दुर्लक्ष झाले आहे. २२ पैकी केवळ २ कायमस्वरुपी शिक्षकांच्या जागा भरलेल्या आहेत. इतर सुविधांच्या नावाने शंख असल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी आज आपल्या प्रश्नाबाबत फेरी काढत प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निरालाबाजारमधून ही फेरी काढण्यात आली. कायम स्वरुपी प्राध्यापक द्या, कलेला वाचवा, कला संचालक राजीव मिश्रा भेट द्या, अशा घोषणा आणि हाती फलक घेत विद्यार्थ्यांची फेरी औरंगपुरा, गुलमंडी, सिटी चौक, काळा दरवाजा मार्गे शासकीय कला महाविद्यालयात पोहचली. देता का सर, २३ ऑक्टोबरपर्यंत राजीव मिश्रा भेट द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, ‘शिक्षण आमच्या हक्काचे, वाचवा वाचवा कलेला वाचवा, अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते.

वैभव कायम ठेवा
कला महाविद्यालयाचे वैभव कायम ठेवण्याच्या भावनेतून ‘एक दिवस कलेसाठी, कला क्षेत्राच्या भविष्यासाठी’ असे सांगत माजी विद्यार्थीही आज एकवटले. कॉलेजमध्ये प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपूर्ण सुविधा, शासनाचे दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे विद्यार्थी कॉलेजमध्ये जमा झाले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. किशोर निकम, रमेश माळगे, प्राचार्य संजय भारती, महेश ढाकणे, गणेश शेळके, सूर्या सावळे, डॉ. सर्वेश नांद्रेकर, वैशाली टाकळकर यांची उपस्थिती होती.

विविध संघटनांचा पाठिंबा
विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अभाविपने सहभाग घेत मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी स्वप्नील बेगडे, मोहन भिसे, गोविंद देशपांडे, शिवा देखणे, तुषार कठाळे, वीरभूषण पाटील यांची उपस्थिती होती.

...या आहेत मागण्या
- पूर्णवेळ शिक्षकांची नेमणूक करा
- ग्रंथालय व संगणक कक्ष पूर्णवेळ हवा
- कॉलेज परिसरात वायफायची सुविधा द्या
- प्रिंट व इचिंग मशीन त्वरित उपलब्ध करा
- प्रोजेक्टर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
- टेबल, डार्क रूम, प्रिटिंग टेबल द्यावे
- फोटोग्राफी उपग्रेटेड लॅब उपलब्ध करून द्यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी लॉबिंग सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या शिरपेचातील मानाचे पान असणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षामध्ये लॉबिंग सुरू झाले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत शह-काटशहच्या राजकारणाला उधाण आले आहे.
महापालिकेत शिवसेना-भाजपची युती आहे. युतीमध्ये झालेल्या करारानुसार पहिले दीड वर्ष महापौरपद शिवसेनेकडे, तर उर्वरीत एक वर्षाचे महापौरपद भाजपकडे देण्याचे ठरले आहे. सध्या शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर आहेत. युतीमधील करारानुसार त्यांना २९ ऑक्टोबर रोजी महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, पण याच काळात दिवाळी असल्यामुळे दिवाळीनंतर त्यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरवला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि फेब्रुवारी महिन्यात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता शिवसेना आणि भाजप मधील संबंध ताणले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या संबंधांबद्दल निर्णायक भूमिका जाहीर होईपर्यंत विद्यमान महापौरांनी राजीनामा देऊ नये, असा मतप्रवाह शिवसेनेमधील काही नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे महापौर तुपे राजीनामा केव्हा देणार या बद्दल अनिश्चितता आहे.
तुपे यांनी राजीनामा दिलाच तर महापौरपदाचा उमेदवार निवडताना राज्यभरात राजकीय व सामाजिक क्षेत्रात होत असलेल्या स्थित्यंतराची दखल भाजपच्या नेतृत्वानी घेतली असा मतप्रवाह निर्माण होत आहे. भाजपचे नगरसेवक राजू शिंदे व गटनेते भगवान घडमोडे यांच्या नावाची चर्चा आतापर्यंत महापौरपदासाठी होती. त्यात आता विजय औताडे, राजगौरव वानखेडे यांच्या नावाची भर पडली आहे. विजय औताडे यांनी आरोग्य सभापती म्हणून काम केले आहे. वानखेडे यांना नगरसेवक म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. विविध विषय समित्यांचे ते सभापती देखील होते, स्थायी समितीचे सदस्य, विकास आराखड्याबद्दल तयार करण्यात आलेल्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे या दोघांची नावे चर्चेत आली आहेत. भाजपनेत्यांमध्ये भविष्यात होणाऱ्या नातेसंबंधाचा संदर्भ देखील या चर्चेला आहे असे मानले जाते.

वर्चस्वाच्या लढाईत दानवे की बागडे!
भाजपचा महापौरपदाचा उमेदवार कोण यावरून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यात शह-काटशहचे राजकारण येत्या काळात शिगेला पोचेल, असे जाणकारांचे मत आहे. महापौर कोण यावरून शहरावर वर्चस्व कोणत्या नेत्याचे, हे येत्या काळात भाजपमध्ये ठरले जाणार आहे. त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईत दानवे जिंकणार की बागडे या बद्दल कमालीची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images