Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

किल्ला बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यादवांचा अभेद्य देवगिरी, जलदुर्ग जंजिरा, प्रतापगड व स्वराज्याची राजधानी रायगड. प्रत्येक किल्‍ला म्हणजे इतिहास. या किल्‍ल्यांना वास्तवात साकारण्याची संधी इतिहासप्रेमींना गुरुवारी मिळाली. नव्या पिढीला इतिहास माहिती नाही, हा समज फोल ठरवत विद्यार्थी, युवक, महिलांनी ‌किल्‍ला बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र टाइम्स, देवगिरीयन ट्रेकर्स व यशवंत कला महाविद्यालयाच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित किल्ला बनवा स्पर्धेस गुरुवारी सुरुवात झाली. यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात २१ संघांनी या स्पर्धेचे वलय वाढवले. किल्‍ल्यांचे चित्र काढा, या स्पर्धेतही विविध किल्‍ल्यांचे चित्रे पाहायला मिळाली. ५ बाय ५ जागेवर देवगिरी, प्रतापगड, जंजिरा व रायगड यापैकीच एक किल्ला बनवायचा होता. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा व आनंदनिर्मितीतून किल्‍ले बनवताना सर्व स्पर्धक आपला किल्‍ला कसा हुबेहूब होईल याची काळजी घेत होते. यामध्ये आर्किटेक्ट आई-मुलगा, ज्योतीनगरच्या विशाल अपार्टमेंटची मुले, डॉक्टर मित्रांचा कट्टा, विनायकराव पाटील शाळेतील शिक्षिकांचा ग्रुपही सहभागी झाला. सुरेंद्र कुलकर्णी, पीएसआय आहेर व लाड, डॉ. राजीव मुंदडा, सहाय्यक विक्रीकर अधिकारी फावडे, देवगिरी ट्रेकर्सचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, उपाध्यक्ष प्रा. अरुण काटे, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र तोरवणे, प्रदीप बुरांडे आदींनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. कल्याण माळी, धनंजय काळे, प्रा. जिजा शिंदे, प्रा. बाळासाहेब शिंदे, मिलिंद देशमुख, उपप्राचार्य संभाजी कमानदार, प्रा. अंकुश आवटी, प्रा. एन. जी. गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.

आज बक्षीस वितरण
शुक्रवारी दुपारी ४ वाजता बक्षीस वितरण व २९ ऑक्टोबरला सायंकाळी पाचपर्यंत प्रर्दशन खुले असेल. शुक्रवारीही चित्रकला स्पर्धा सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत होईल.ॉ

माझ्या दादाला किल्ले बनवणे खूप आवडते. मी स्वतः कधी किल्ला बनवला नव्हता. यावर्षी मी दहावीला आहे, पण स्वतःला या स्पर्धेत भाग घेण्यावाचून अडवू शकलो नाही. - सम्राट रोडे

देवगिरी किल्यामध्ये क्रिएटिव्हीटीला खूप वाव होता. आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाला स्वतंत्रपणे खूप काही करण्याची संधी मिळाली. - सरिता हिरगीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार नोव्हेंबरच्या परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ४ नोव्हेंबर रोजी होणारे पेपर पुढे ढकलले होते. हे पेपर आता ११ नोव्हेंबरनंतर होणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. दहा दिवसात विद्यापीठाने अचानकपणे निर्णय घेत ३ वेळा पेपर पुढे ढकलले. अचानकपणे पेपर पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रारंभी १५ ऑक्टोबर, २० ऑक्टोबर रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ४ नोव्हेंबरचाही पेपर पुढे ढकलण्यात आला. ४ नोव्हेंबर रोजी एकूण २१ विषयाचे पेपर होते.

नवे वेळापत्रक
- ११ नोव्हेंबरः एमएससी (वनस्पती प्रजनन)
- १२ नोव्हेंबर ः एमए (एमसीजे)(नवीन), एमएमएस, बीसीएम, एमएएमसीजे (सीबीसीएस पद्धत), बीए (एमसीजे) (८०.२०पद्धत)
- १५ नोव्हेंबर ः एमपीएम, एमपीएमचा (सीबीसीएस पद्धत)
- १६ नोव्हेंबर ः एमएससी (बायो-इन्फॉरमेटिक), एमएससी (फॉरेंसिक सायन्स), एमकॉम (ई-कॉम), एमएससी (फॉरेंसिक सायन्स) (सीबीसीएस पद्धत), एमकॉम (ई-कॉम) (सीबीसीएस पद्धत), एमसीए (सीबीसीएस पद्धत)
- १७ नोव्हेंबर ः बीएससी
- १८ नोव्हेंबर ः एमए (एमएसडब्ल्यू), एमएससी (सर्व विषय) (जनरल), एमएससी(सगळे विषय) (सीबीसीएस पद्धत) (जनरल)
- १९ नोव्हेंबर ः एमसीए, एमए एमएसडब्ल्यू (सीबीसीएस पद्धत)
- २४ नोव्हेंबर ः एमए (सगळे विषय) (सीबीसीएस) (जनरल) पेपर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझं शिवार : ठिबक सिंचन, आंतरपिकाने बहरले नंदनवन

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @makarandkMT
खुलताबाद-फुलंब्री रस्त्यावर सुलतानपूरपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भांडेगावचे (ता. खुलताबाद) रहिवासी मिठू एकनाथ चव्हाण यांनी नाविन्यपूर्ण शेती करून नंदनवन फुलविले आहे.
बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते १९९०पासून शेतीकडे वळाले. वडील शेती करत. एकत्र कुटुंब असून मिठू चव्हाण शेती पाहतात. सुरवातीचे दहा वर्षे ऊस आणि कापूस याच पिकावर भर असे. शेतात दोन विहिरी. खुलताबाद तालुक्याचा बहुतांश भाग बऱ्यापैकी पाण्याचा असल्याने खरीप आणि रब्बी दोन्ही मोसमात फारशी अडचण येत नाही. पारंपारिक पिकांऐवजी काहीतरी नाविन्यपूर्ण करावे यासाठी मिठू चव्हाण यांनी अभ्यास केला. कृषी विभागाची मदत घेऊन काही मित्रमंडळींकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर काही प्रयोग राबविण्याचे त्यांनी ठरविले. २०००मध्ये पहिल्यांदा अद्रकचा प्लॉट केला. खुलताबाद, कन्नड तालुक्याच्या पट्ट्यात अद्रक शेती मोठ्या प्रमाणावर होते. त्यातून प्रेरणा घेऊन चव्हाणांनी बेडपद्धतीने २० गुंठ्यांवर अद्रकशेतीचा प्रयोग राबविला आणि तो यशस्वी केला. त्यानंतर मिरचीचे बेड केले. त्यातून मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मिठू चव्हाण यांनी ठिबक सिंचनचा प्रयोग राबविणे सुरू केले. दरवर्षी एक एकरात ठिबक सिंचन केले. आज ३०पैकी २० एकरात ठिबक सिंचन झाले आहे. पाण्याच्या नियोजनासाठी आणखी दोन विहिरी केल्या. आज शेतात अालं, कापूस, गहू, तूर, भुईमुग, लसूण लावले आहे. बेडपद्धतीने बहुतांश पीकलागवड केल्याने त्याचा दुहेरी फायदा झाला. वेगळा प्रयोग राबविताना त्यांनी केसर आंब्याचीही लागवड केली आहे. सेंद्रीय पद्धतीने आंबालागवड केली आहे.
सरसकट पीक घेण्याऐवजी आंतरपीक घेतले, तर त्यातून पाण्याचेही नियोजन योग्य होते. याचा अभ्यास करून चव्हाण यांनी तुरीच्या पीकात आंतरपीक घेतले. त्याशिवाय अन्य पिकांच्याबाबतही केलेला प्रयोग यशस्वी ठरला. गेल्या वर्षी पावसाने ताण दिला. जिल्ह्यात गंभीर दुष्काळ होता. अशा परिस्थितीत चव्हाण यांनी आल्याची लागवड केली. त्यात उन्हाळी दोडक्याचे आंतरपीक घेऊन भरघोस उत्पादन मिळविले. नियोजन केल्यास पाणी आणि पीकाच्या बाबतीत अडचण येत नाही, असे मिठू चव्हाण सांगतात. भविष्या शेडनेट करून सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. कोथिंबिर लागवडीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे.

शेळीपालन
शेतीसोबत मिठू चव्हाण यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे ४० उस्मानाबादी शेळ्या आहेत. किंबहुना शेती करताना योग्य नियोजन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिला गेला पाहिजे, असे चव्हाण आवर्जून सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिसभेत गाजला परीक्षेचा मुद्दा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत पदवी, पदव्युत्तर परीक्षांचा मुद्दा चर्चेत आला. ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होणे अपेक्षित असताना, ६० दिवसात परीक्षा कशी घेतली, असा प्रश्न सदस्यांनी केला, तर यात प्राध्यापकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक गुरुवारी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झाली. या परीक्षांचाच मुद्दा गाजला. विद्यापीठाच्या सत्र परीक्षा विद्यापीठ कायद्याचा भंग करून घेतल्या जात असल्याचा आरोप प्राध्यापकांनी बुधवारी केला होता. ९० दिवसांचा कालावधी पूर्ण अपेक्षित असताना केवळ ६० दिवसांतच परीक्षा होत असल्याचा आरोप प्रशासनावर करण्यात आला होता. अधिसभेतील काही सदस्यांनी प्रशासनाकडून कायद्याचा भंग झाला का, याबाबत काय सत्य आहे, हे मांडण्याचा आग्रह धरला. त्यानंतर परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांना बैठकीत बोलावण्यात आले. परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती देऊन प्राध्यापकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकाराबाबत त्यांना खुलासा करण्याचेही सदस्यांकडून सांगण्यात आल्याचे कळते. या बैठकीत विविध अभ्यासक्रम, शिष्यवृत्तींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

प्रशासनात एकवाक्यता नाही
सत्र परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्याबाबत प्रशासनात एकवाक्यता नसल्याचे आज पुन्हा समोर आले. परीक्षेचे वेळापत्रक ठरविताना कोणाचे मत विचारात घ्यायचे, निकष पाळण्याबाबत काय काळजी घ्यावी, याबाबत प्रशासनातील गोंधळ बैठकीत समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुरवणी अर्थसंकल्पाला मंजुरी
विद्यापीठाच्या पुरवणी अर्थसंकल्पालाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. पुरवणी अर्थसंकल्प १४ कोटी ६१ लाख रुपयांचा आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मांडण्यात आलेला अर्थसंकल्प २५८ कोटी २८ लाख रुपयांचा होता. त्यानंतर आज पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामुळे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाचा विद्यापीठाचा एकूण अर्थसंकल्प २७२ कोटी ८९ लाख रुपयांचा झाला आहे. पुरवणी अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या वाढीव रकमेचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्राध्यापकांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. जूनमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार हे वेळापत्रक ठरविण्यात आले. वेळापत्रक जाहीर केले त्यावेळी प्राध्यापकांनी आक्षेप घेतला असता, त्रुटी असल्याचे सांगितले असते, तर त्यात बदल करणे शक्य झाले असते. परीक्षा नियंत्रक एकटेच वेळापत्रक तयार करीत नसतात. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया असते.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची भिस्त नियोजनावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘योग्य नियोजन करा. चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही,’ अशी सूचना महापौर त्र्यंबक तुपे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना केली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत तसे नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शहराच्या विस्कळित पाणीपुरवठ्यावरून बुधवारी नगरसेवक आक्रमक झाले होते. त्यांची समजूत काढताना आयुक्तांनी ‘शहरात समान पाणी वाटप करायचे असेल, तर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करावा लागेल. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. वेळापत्रक तयार झाल्यावर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाईल,’ असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, विरोधीपक्षनेते अय्युब जहागीरदार यांच्यासह आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सूचना देताना महापौर म्हणाले, ‘योग्य नियोजन केले तर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही. दिवाळीच्या काळात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष द्या. यासाठी पदाधिकारी व नगरसेवकही प्रशासनाला सहकार्य करतील. लाइनमन व इंजिनीअर्सला देखील या संदर्भात सूचना केल्या आहेत. अनधिकृत नळकनेक्शन्सवर कारवाई करा, ज्या ठिकाणी जास्त वेळ पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून जास्तवेळ पाणीपुरवठा होणार नाही याची काळजी घ्या,’ असे ते म्हणाले. यावर बोलताना आयुक्त म्हणाले, ‘औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने अनेक ठिकाणी नवीन पाइप लाइन टाकल्या आहेत, टप्पे वाढवले आहेत. या सर्व कामांची माहिती कंपनीकडून मागवली आहे. शिवाजीनगर परिसरात देशमुखनगरात बांधलेला जलकुंभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ताब्यात घेण्यात येत आहे. हा जलकुंभ ताब्यात घेतल्यावर शिवाजीनगर परिसरातील अनेक भागात गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्य जलवाहिनीला प्राधान्य द्या

‘समांतर जलवाहिनीचे काम करताना जायकवाडी ते नक्षत्रवाडी या मुख्य जलवाहिनीच्या कामाला प्राधान्य द्या,’ अशी सचूना महापौरांनी आयुक्तांना केली. या जलवाहिनीच्या कामाबाबत नगरविकास खात्याच्या सचिवांशी चर्चा करण्यासाठी आयुक्त जाणार आहेत. त्याबद्दल त्यांचे महापौरांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडमध्ये दुसऱ्यांदा अवयवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान ब्रेन डेड झालेल्या तरुणाच्या यकृत आणि किडनीचे दान करण्यात आले. तरुणाचे यकृत मुंबईला आणि किडनी औरंगाबादला पाठविण्यात आली. अवयव विमानतळावर नेण्यासाठी नांदेडमध्ये गुरुवारी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. नांदेड येथे अवयवदानाची ही दुसरी वेळ आहे.
पानशेतवडी (ता. कंधार) येथील संतोष उद्धव मोरे (वय २६) हे २५ ऑक्टोबर रोजी नायगाव येथून गोपाळचावडी येथे जात होते. मारताळजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान ते ब्रेन डेड झाले. त्यानंतर डॉक्टरांनी मोरे यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. अवयवदानाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यकृत नेण्यासाठी मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव चौबळ, किडनी नेण्यासाठी औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत दरख, भूषण डोडिया आणि धूत हॉस्पिटलचे डॉ. सोमवंशी नांदेडमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता डॉ. चौबळ व त्यांचे सहकारी यकृत घेऊन विमानतळाकडे रवाना झाले. त्यावेळी रस्त्यातील सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती. विष्णुपुरी ते विमानतळ हा सुमारे पाऊण तासाचा प्रवास त्यांनी अवघ्या ११ मिनिटांत पूर्ण केला.

मोरे कुटुंबात कन्यारत्न
संतोष मोरे यांच्या पत्नी भाग्यश्री नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. अवयवदानाच्या शस्त्रक्रियेपूर्वी त्यांनी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुलीला जन्म दिला. या मुलीचे नाव संजीवनी ठेवण्यात आले. संतोष मोरे यांनी २० वेळा रक्तदान केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावर आता विजेचे संकट

$
0
0

औरंगाबाद : शटडाउनमुळे विस्कळित झालेल्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर आता विजेचे संकट कोसळले आहे. विजेचे ३३ कोटी ६४ लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे महावितरणने गुरुवारी पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडले. महापालिकेच्या आयुक्तांनी विनंती केल्यावर दोन तासांनी ते पुन्हा जोडण्यात आले, परंतु या कारवाईमुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा दोन तास बंद होती. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर होणार आहे.

महापालिकेने २० ऑक्टोबर रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा योजनेवर २४ तासांचे शटडाउन घेतले होते. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. त्यातून महापालिका व नागरिक सावरत नाहीत तोच महावितरणने पाणी योजनेच्या विजेचे कनेक्शन गुरुवारी तोडले. पाणीपुरवठा योजनेच्या विजेचे बिल गेल्या काही वर्षांपासून थकले आहेत. त्याची रक्कम ३३ कोटी ६४ लाख ९ हजार ९५७ रुपये आहे. महावितरणने वारंवार मागणी करूनही ही रक्कम भरली जात नव्हती त्यामुळे महावितरणने जायकवाडी येथील पंपहाउस, नक्षत्रवाडी येथील पंपहाउस, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील उपसा केंद्र याचे वीज कनेक्शन दुपारी तीनच्या सुमारास तोडले.

त्यामुळे पाण्याचा उपसा बंद झाला. ही माहिती कळताच आयुक्त ओम प्रकाश बकोरया यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून कनेक्शन जोडून देण्याची विनंती केली. थकित बिलापोटी काही रक्कम सात नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे महावितरणने सायंकाळी पाचच्या सुमारास कनेक्शन जोडून दिले.

पाणी पाच तास उशिरा

वीजपुरवठा तोडल्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा तब्बल दोन तास पूर्णपणे बंद होती. त्याचा शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक किमान पाच तासांनी पुढे ढकलले गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी खरेदीहून परताना अपघातात वडिलांचा मृत्यू; मुले जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीची खरेदी करून घराकडे परताना दुचाकीवरील वडिलांस आयशर ट्रकने उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा वर्षांचा मुलगा व चौदा वर्षांची मुलगी जखमी झाली. शुक्रवारी सायंकाळी पैठण रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमासमोर हा अपघात घडला.
नागोराव संपतराव धोटे (वय ४२, रा. नक्षत्रपार्क) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे, तर तुषार नागोराव धोटे (वय ६) व वैशाली नागोराव धोटे (वय १४) हे दोन्ही भाऊ-बहिणी जखमी झाले. नक्षत्रपार्क येथे राहणारे
नागोराव हे त्याचा मुलगा तुषार आणि मुलगी वैशाली असे तिघेजण दुचाकीवर (एमएच-२०-बीएल-६९८८) नक्षत्रवाडी येथे दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी आले होते. खरेदी करून सव्वाचारच्या सुमारास नक्षत्रवाडी येथून घराकडे परतताना पैठणरोडवरील मातोश्री वृद्धाश्रमासमोर आले. तेव्हा समोरून भरधाव येणाऱ्या आयशरने (एमएच-२१-डी-८७७९) दुचाकीला जोराची धडक दिली. यात नागोराव यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते रक्तबंबाळ होऊन खाली पडले, तर तुषार आणि वैशाली ही दोन्ही मुले जखमी झाली.

मुलांवर उपचार सुरू
अपघाताची माहिती सातारा पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या नागोराव धोटे, तुषार आणि वैशालीला तत्काळ उपचारासाठी घाटीत दाखल केले. घाटीतील डॉक्टरानी नागोराव धोटे यांना तपासून मृत घोषित केले. तुषार आणि वैशालीवर उपचार सुरू आहेत. आयशर चालकाविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोकॉ. डफळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाच्या टोलवाटोलवीला शिक्षक कंटाळले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतर जिल्हा बदलीसाठी गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहोत. प्रशासनाकडून कधीच ठोस माहिती दिली जात नाही. राज्यातील अन्य जिल्हा परिषदांमध्ये ही प्रक्रिया कधीच राबविली गेली, पण दरवेळी काही ना काही त्रुटी काढून टोलवाटोलवी केली जाते. गेल्या २४ दिवसांपासून आम्ही साखळी उपोषण करत आहोत. मात्र, अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. या प्रश्नी दोन नोव्हेंबरपर्यंत ठोस पाऊल उचलले गेले नाही तर तीन नोव्हेंबरपासून सहकुटुंब बेमुदत उपोषणास बसणार आहोत, अशी माहिती सचिन साळुंके, भास्कर आढाव, ज्ञानेश्वर मोरे, विजयकुमार लिंभारे यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पुष्पा जाधव उपस्थित होत्या.
शिक्षक सहकार संघटनेच्या मदतीने आंतर जिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर गेल्या २४ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. रितसर रजा देऊन प्रसंगी पालकांना उपोषणाला बसवून या शिक्षकांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आजवर कुठलीच दखल न घेतल्याचा खंत व्यक्त करून हे शिक्षक म्हणाले, ‘आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव २०१२ पासून प्रलंबित आहेत. त्यावर आजवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आम्ही अनेक निवेदने दिली, आंदोलने केली, उपोषणे केली, पण काहीच फायदा झाला नाही. जिल्हा परिषदेत सहायक शिक्षक, पदवीधर पदोन्नती, पदवीधर विज्ञान व गणित तसेच सेवानिवृत्त आदी ४४० पदे रिक्त आहेत. नियमानुसार प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. कुठलीही माहिती मागितली, तर ती दिली जात नाही. सीइओंकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. नाईलाजास्तव आम्ही २४ दिवसांपासून साखळी उपोषण करत आहोत.’

...काय आहेत मागण्या?
जिल्हा परिषदेतील सहायक शिक्षकाच्या रिक्त जागेवर आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने पदस्थापना द्यावी, पदवीधर पदोन्नतीने रिक्त झालेल्या तसेच पदवीधर पदोन्नतीच्या रिक्त असलेल्या पदावर बुलडाणा जिल्हा परिषदेप्रमाणे पदस्थापना मिळाव्यात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, प्रवर्ग निहाय त्या संवर्गाचे अतिरिक्त शिक्षक त्याच संवर्गात अतिरिक्त दाखवावेत, आदी मागण्या आहेत. त्याची पूर्तता झाली नाही तर तीन नोव्हेंबरपासून सहकुटुंब बेमुदत उपोषास बसणार आहोत,’ असा इशारा शिक्षकांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षांच्या बालकाचे घाटीत ‘अॅनॉटॉमी’ला देहदान

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सेरेब्रल पाल्सीग्रस्त पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या देहदानाचा निर्णय दोन्ही आयुर्वेदिक डॉक्टर पालकांनी घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र विभागाला मंगळवारी हे देहदान करण्यात आले.
रुद्र प्रदीप देशमुख याच्यावर दीर्घ कालावधीपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांनी देहदानाचा निर्णय घेतला आणि घाटीला प्रत्यक्ष देहदान केले. या संदर्भात विभागप्रमुख डॉ. शिवाजी शुक्र म्हणाले, ‘पाच वर्षांच्या बालकाकडून देहदान होण्याची गेल्या अनेक वर्षातील पहिलीच दुर्मिळ घटना आहे. देहदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकांनी घेतल्यामुळेच हे शक्य झाले. समाजाला देहदानासाठी प्रेरीत करणारा हा निर्णय असून, वैद्यकीय अभ्यास-संशोधनासाठी अधिकाधिक लोकांनी देहदानासाठी पुढे यावे,’ असे आवाहनही डॉ. सुक्रे यांनी केले. ‘१८ वर्षांपुढील कोणतीही व्यक्ती देहदानाचा फॉर्म भरू शकते, तर १८ वर्षांखालील व्यक्तीच्या मृत्यूनंतर देहदानाचा निर्णय पालक घेऊन शकतात. मात्र त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैदी महिला होणार ‘सक्षमा’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षा संपली की पुढे काय? समाज आपल्याला माफ करेल? आपल्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेईल? पोटापाण्यासाठी रोजगार मिळेल? असे अनेक प्रश्न विशेषतः कैदी महिलांपुढे असतात. यावर मात करण्यासाठी हर्सूल कारागृह प्रशासनाने मिंडा कॉर्पोरेशनच्या सहकार्याने स्वयंरोजगाराचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे शेकडो हातांना रोजगार मिळाला आहे. राज्यातील असा हा पहिलाच उपक्रम आहे.
‘सुधारणा व पुनवर्सन’ या बीद्र वाक्यानुसार वाटचाल करणारे हर्सूल कारागृह सुटकेनंतर बंदीवानांचे योग्य प्रकारे पुनवर्सन व्हावे, त्यांना समाजात रोजगारांची संधी मिळावी यासाठी कारागृहात विविध प्रकारचे प्रशिक्षण देते. याच माध्यमातून कारागृहातील पुरूष बंदीवान फर्निचर, बेडशीट निर्मितीसह विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. मात्र, महिला कैद्यांसाठी अशा प्रकारचा विशेष उपक्रम नव्हता. भाजी चिरणे, गहू-तांदूळ स्वछ करणे आदी कामे त्यांना दिली जात. हेच लक्षात घेत कारगृहाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यास मिंडा कॉर्पोरेशन कंपनीने प्रतिसाद दिला आणि कारागृहातील अठरा महिला कैद्यांना प्रशिक्षण देत रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली आहे. या महिलांना सुटकेनंतर रोजगाराची संधी मिळणार आहे, अशी माहिती अधीक्षक बी. आर. मोरे, कारखाना व्यवस्थापक राजाराम भोसले यांनी दिली.

दुचाकी लॉक स्वीचची निर्मिती
हर्सूल कारागृहातील कैदी महिलांना दुचाकी वाहनांचे लॉक स्वीच तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून उत्पादन निर्मिती सुरू झाली असून दिवसाकाठी दोन हजार तीनशे स्विच तयार केले जातात. डिसेंबरपर्यंत येथील युनिटचा विस्तार केला जाणार आहे. चार नोव्हेंबर रोजी कंपनीच्या सारिका मिंडा यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत खडखडाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐन दिवाळीत शहरातील विविध खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम बंद झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेक खासगी कंपन्यांचे पगार झाले आहेत. त्यामुळे एटीएम केंद्रांवर गर्दी आहे, पण तेथे पैसे नसल्याने नागरिक वैतागले आहेत. अनेक नागरिक शुक्रवारी सेवा सुरू असलेले एटीएम केंद्र शोधत फिरत होते.
अनेक ठिकाणी रोख रक्कम संपणे, मशीन आऊट ऑफ सर्व्हिस असणे, इंटरनेट सेवा खंडित असल्याने मशीन यंत्रणा बंद पडणे आदींमुळे एटीएमसेंटरमधील सुरक्षा रक्षक आणि बँक मॅनेजर त्रासून गेले आहेत. दिवाळीच्या प्रकाश पर्वाला दोन दिवसांपासून सुरवात झाली आहे. अनेक नोकरदारांचे पगार २८ ऑक्टोबरला झाले आहेत. त्यामुळे पगाराचे पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रांवर गर्दी होत आहे, पण ग्राहकांना एटीएम बंद असल्यामुळे दिवाळीच्या खरेदीवर पाणी फेरल जात आहे.
बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एटीएम सेवा बंद असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही एटीएम केंद्रांबाहेर मशीन बंद असल्याचे फलक लावण्यात आले होते. काही एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी सुरू असलेल्या एटीएम केंद्रांचा शोध घेण्याची वेळ आली. त्यामुळे सुरू असलेल्या एटीएम केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा होत्या. ऐन सणासुदीच्या काळात सर्व बँकानी एटीएम मशीन सुरू राहतील याची काळजी घ्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

बाजारपेठ परिसरातील एटीएम बंद
निराला बाजार, गुलमंडी, रंगारगल्ली, औरंगपुरा, क्रांती चौक, जालना रोड यांसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील एटीएम बंद होते. काही एटीएम सुरू असून, पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

या बँकेचे एटीएम बंद
एचडीएफसी बँक ः शहागंज, औरंगपुरा, निराला बाजार, कॅनॉट गार्डन, नूतन कॉलनी
अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक ः टीव्ही सेंटर, निराला बाजार, कॅनॉट जालना रोड
एसबीएच ः दशमेशनगर, भडकल गेट
एसबीआय ः सिडको, हडको, पैठणगेट

एटीएम विनाव्यत्यय सेवा देणे बँकांचे कर्तव्य आहे, पण एटीएमची सेवा व पैसे भरणे हे काम बँकांनी आउटसोर्स केले आहे. यामुळे एटीएममध्ये पैसे संपणे आणि त्याचा फटका सर्व ग्राहकांना बसणे साहजिक आहे. त्यासाठी बँकांच्या प्रशासनाला सरसकट जबाबदार धरता येईल.
- देविदास तुळजापूरकर, सरचिटणीस, ऑल इंडिया बँक एम्प्लाईज असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाला उत्साहात प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मनमोहक पणत्या, तोरण, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि आरास करून औरंगाबादकरांनी शुक्रवारी धनत्रयोदशी उत्साहात साजरी केली.
धनत्रयोदशीनिमित्त घरातील धनधान्य आणि धन्वंतरी पूजन करण्यात आले. काही ठिकाणी व्यापारी आणि व्यावसायिकांनी नवीन वर्षाची वही खरेदी केली. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी फूल बाजारात शेवंती आणि झेंडूच्या फुलांना मागणी होती. यानिमित्ताने अनेकांनी सोने खरेदीही केली. व्यापाऱ्यांनी दीपपूजन केले गेले. यासाठी दुकाने सजविण्यात आली होती. दुकानांतून विष्णू, कुबेर, लक्ष्मी, गणेशनाग या देवतांची पूजा करण्यात आली. वैद्यकीय व्यावसायिकांनी विशेषत: आयुर्वेदतज्ज्ञांनी धन्वंतरीचे पूजन पारंपरिक पद्धतीने केले. संध्याकाळी सर्वत्र आतषबाजी करण्यात आली. संध्याकाळी कुबेर पूजनाचा मुहूर्त साधून व्यापारी आणि व्यावसायिकांनी आस्थापना, दालनांची पूजा केली. वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या दालनांत धन्वंतरी पूजन, वैद्यकीय व्यवसायासाठी असलेल्या विविध साहित्याचे पूजन केले.

नाण्यांना मागणी
शुद्ध सोने खरेदीकडेही लोकांचा कल वाढला असून, भेटवस्तू म्हणून देवदेवतांची चित्र असलेल्या सोने-चांदीच्या नाण्यांना चांगली मागणी होती. ३१ हजार ३१ हजार ५००पर्यंत सोन्याचा भाव राहिल्याने खरेदी उत्साहात झाली.

सोने खरेदी जोरात
धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत शुक्रवारी सराफा बाजारात ग्राहकांनी सोने खरेदीला मोठी गर्दी केली होती. दिवसभरात जिल्ह्यात सुमारे २० ते २५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. कर्मचारी वर्गाच्या हाती आलेला बोनस, अग्रीम रक्कम यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेक ग्राहकांनी आधीपासून सोने बूक करून ठेवले होते. सध्या गाजत असलेल्या सर्व धार्मिक आणि पौराणिक या मालिकतील दागिन्यांना मागणी होती. त्यात प्रामुख्याने चिंचपेटी, ठुशी, तन्मणी, कंठा, राणीहार, बाजूबंद, जोंधळी हार, तोड्यांचा समावेश होता. या दागिन्यांसह राजस्थानी परंपरेतील कुंदन वर्कची ज्वेलरी, साउथ इंडियन ज्वेलरींना मागणी होती. हे सर्व दागिने लाइट वेटमध्ये उपलब्ध आहेत. मंगळसूत्रांमध्ये नवनवीन प्रकार बाजारात आले आहेत. अंगठ्यांमध्ये सध्या खड्यांची; तसेच डायमंडच्या अंगठ्यांची क्रेझ वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत पाणीपुरवठा विस्कळित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणीपुरवठा विस्कळित झाल्याची ओरड नेहमीच सुरू असते. आता ऐन दिवाळीत शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या विजेचे बिल थकल्यामुळे गुरुवारी महावितरण कंपनीने जायकवाडी, नक्षत्रवाडी, फारोळा येथील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद केला होता. तब्बल ३३ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी महापालिकेकडे आहे. त्यामुळे महावितरणने गुरुवारी दुपारी तीन वाजता वीजपुरवठा खंडित केला होता. पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विनंती केल्यावर सायंकाळी पाच वाजता वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दोन तास वीज बंद असल्यामुळे जायकवाडीपासून सुरू असलेला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी जायकवाडी येथून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला, पण तोपर्यंत शहराच्या अनेक भागांना निर्जळीला सामोरे जावे लागले. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाच ते आठ तासांनी पुढे ढकलले गेले आहे.
बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका शुक्रवारी बहुतांश वसाहतींना बसला. प्रामुख्याने सिडको - हडको, गारखेडा, मुकुंदवाडी, विद्यापीठ परिसरात पाण्याची ओरड सुरू झाली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पालिकेच्या यंत्रणेला दिवसभरात यश आले नाही. शनिवारी देखील अशीच स्थिती कायम राहिली, तर दिवाळीच्या अभ्यंग स्नानावर संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा केव्हा सुरळीत होईल किंवा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेत काय सुधारणा करण्यात आली आहे, याची माहिती देण्यासाठी पालिकेचा कोणताही अधिकारी उपलब्ध झाला नाही. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल आयुक्तांसह बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अन्य अधिकारीही चहल पाणीपुरवठ्याबद्दल माहिती देतील, असे सांगून नामानिराळे होत होते.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे महत्त्वाचे होते, पण आयुक्त आणि कार्यकारी अभियंता दोघेही बैठकीसाठी मुंबईला गेले. मुंबईची बैठक दिवाळीच्या नंतरही होऊ शकली असती. त्या बैठकीपेक्षा शहराचा पाणीपुरवठा महत्त्वाचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिका प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आहे. दिवाळीच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी विशेष काळजी घेण्याची सूचना पुन्हा एकदा आयुक्तांना करू.
- त्र्यंबक तुपे, महापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झणझणीत मिसळ

$
0
0

shripad.kulkarni@timesgroup.com
Tweet :@kulshripadMT
महाराष्ट्रात मिसळ हा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. मसालेदार, झणझणीत मिसळ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मटकीची उसळ, त्यात फरसाळ आणि मसालेदार रस्सा. त्यावर कांदा, कोथिंबीर. सोबत पाव, असा मिसळीचा थाट असतो. वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमुळे मिसळीची ओळख ठरते. कोल्हापुरी झणझणीत मिसळ प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर काहीजण तिखट खात नाहीत. त्यांच्यासाठी कमी तिखटाची मसालेदार मिसळ तयार केली जाते, पण तिखट मिसळ खाण्याला प्राधान्य देणारे अनेकजण आहेत. लाल रस्सा असलेली मिसळ पाहिली की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अॅसिडिटीचा त्रास होतो म्हणून अनेक जण मिसळ खाणे टाळतात. बेगमपुरा भागातील ज्ञानेश्वर औटी यांच्या श्रीराम स्नॅक्समधील मिसळ खवय्यांच्या पसंतील उतरली आहे. गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून त्यांची मिसळ प्रसिद्ध आहे. त्यांनी २००१मध्ये विद्यापीठात कॅन्टीन सुरू केले. तेथील विद्यार्थ्यांत मिसळ प्रसिद्ध होती. विद्यार्थ्यांबरोबर विद्यापीठात कामासाठी आलेल्यांपैकी अनेकजण मिसळ खाल्ल्याशिवाय जात नसत. तीन-साडेतीन वर्षांपूर्वी त्यांनी विद्यापीठातील कॅन्टीन बंद केली. त्यानंतर आता बेगमपुऱ्यात त्यांनी श्रीराम स्नॅक्स हे उपाहारगृह सुरू केले आहे. विद्यापीठातील मिसळ बेगमपुऱ्यात शिफ्ट झाल्यानंतरही तिची चव कायम आहे. त्याचबरोबर मिसळप्रेमीही कायम आहेत.
मिसळसाठी लागणारा मसाला, शेव ते घरीच तयार करतात. आदल्यादिवशी रात्री मिसळसाठी गावरान मटकी भिजवून बांधून ठेवली जाते. रात्रीतून मटकीला मोड येतात. सकाळी मटकी धुतली जाते. आलं-लसूण पेस्ट, कांदा-टोमॅटो पेस्ट, घरी तयार केलेला मसाला मटकी शिजविण्यासाठी वापरला जातो. मसाला तयार करण्यासाठी धणे पावडर, चटपट मसाला, तिखट, काजू मगज, तीळ दळून घेतले जातात. मसाल्याच्या साहित्याचे प्रमाण ठरलेले असते. मिसळचा मसाला रोज तयार केला जातो, मात्र त्याची चव गेल्या अनेक वर्षांत कायम आहे. मिसळसाठी गरम मसाला वापरला जात नाही. त्यामुळे अॅसिडिटी, जळजळ होणे असे त्रास होत नाही.
मटकी शिजवून घेतली जाते. त्यात शेव, भजे टाकले जातात. मिसळसाठी वापरण्यात येणारी शेवही घरीत तयार करण्यात येते. गावरान मटकी खाण्यासाठी चविष्ट, पौष्टिक असते, असे ज्ञानेश्वर औटी यांनी सांगितले. सकाळी आठपासून उपलब्ध होणारी मिसळ दुपारी तीन-साडेतीनपर्यंत संपून जाते. विद्यापीठ आणि परिसरात असलेल्या कॉलेजांचे विद्यार्थी मिसळ खाण्यासाठी आवर्जून येतात. त्याशिवाय विद्यापीठातही अनेकजण मिसळचे पार्सल घेऊन जातात. मिसळ झणझणीत आहे, मात्र ती खाताना जळजळ होत नाही. मसाल्यांचा स्वाद जिभेवर दीर्घ काळासाठी रेंगाळतो. मिसळीच्या तिखट रसा खाताना गावराम मटकीचा गोडवाही जाणवतो. मिसळ खाण्याची इच्छा झाली की विद्यापीठातील अनेक कर्मचारीही बेगमपुऱ्यात येतात.
या परिसरात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी व्हेज पुलाव, वडा सांबर, आलू वडा आदी पदार्थही उपलब्ध आहेत. त्यांनाही मिसळप्रमाणेच मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२०० शिक्षकांकडून ६ कोटींची वसुली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०१२मध्ये दिलेल्या प्राथमिक पदवीधर पदोन्नतीला शिक्षण संचालक कार्यालयाने नियमबाह्य ठरविले असून तब्बल १२०० शिक्षकांना पदावनत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाढीव पगाराची सहा कोटी रुपयांची वसुली या शिक्षकांकडून पुढील काळात केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला २०१२मध्ये विषयनिहाय प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत संचालकांचे पत्र आले होते. त्यानुसार विविध विषयांतील १२०० शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. त्यांचा ग्रेड पे २८००वरून ४२०० रुपये करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; चार वर्षांनंतर आता शिक्षण संचालकांचे नवीन पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला आले आहे. त्यानुसार पदवीधर शिक्षकांच्या संख्येच्या २५ टक्क्यांपर्यंत पदोन्नती देता येते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांची संख्या १७०० आहे. त्या प्रमाणात २०१२मध्ये दिले गेलेल्या पदोन्नती जास्त होत्या. त्यामुळे संचालकांनी या पत्राद्वारे ज्या पदोन्नती परत घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.
जालना जिल्हा परिषदेत काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारच कारवाई झाली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी संचालकांच्या पत्रावर चर्चा झाली. चार वर्षांत पदोन्नतीत दिलेली रक्कमही या शिक्षकांकडून वसूल केली जाणार आहे. १२०० शिक्षकांना दिलेल्या ग्रेड पेच्या रकमेचा प्राथमिक अंदाज ६ कोटींचा आहे. प्रशासन आता कोणत्या पद्धतीने वसुली करणार, याबाबत मात्र काही ठरलेले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर १२०० शिक्षकांना पदावनत करण्याचा निर्णय धक्कादायक आहे.

प्राथमिक पदवीधर पदोन्नती परत घेण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार यासंदर्भात कार्यवाही केली जाईल.
- आर. एस. मोगल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरप्रकरणी ‘जैसे थे’ परिस्थितीचे आदेश

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
समांतर पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्यास मनाई करणाऱ्या १८ आॅक्टोबरच्या जिल्हा कोर्टाच्या आदेशास आव्हान देणारे महापालिकेचे अपील मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे यांनी सोमवारी मंजूर केले होते. या निर्णयाला औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असता ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश न्या. प्रफुलचंद्र पंत व न्या. जस्ती चेलमेश्वर यांनी दिले.
त्याचप्रमाणे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची बँक गॅरंटी जप्त करू नये, यासाठी कंपनीने दाखल अपील खंडपीठाने फेटाळले होते; तसेच लवाद कायद्यातील तरतुदीनुसार त्रिसदस्यीय समितीचे महापालिकेतर्फे सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव एस. आर. तांबे यांचे नाव महापालिकेने सुचविल्यामुळे कंपनीने दाखल केलेले अपील सुद्धा खंडपीठाने निकाली काढले होते.
औरंगाबाद महापालिकेने १ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द केला. त्यामुळे औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा पालिकेच्या ताब्यात आहे. पालिकेतर्फे चालू असलेल्या पाणीपुरवठा कामात हस्तक्षेप करू नये व थांबविण्याचा प्रयत्न करू नये, नसता कोर्टाचा अवमान होईल, असे पत्र पालिकेच्या विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी कंपनीला दिले आहे.

पालिकेकडे यंत्रणा नाही ः कंपनी
पालिकेकडे पाणीपुरवठा करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. आजही सारी यंत्रणा कंपनीकडे असल्याचा दावा कंपनीचे जनसंपर्क प्रमुख अविक बिस्वास यांनी केला आहे. जायकवाडी पंपिंग, फारोळा जलशुद्धिकरण केंद्रापासून शहरातील वितरणापर्यंत कंपनीचीच यंत्रणा असल्याचे बिस्वास यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
दिवाळीच्या सुटीनिमित्त एकत्र जमलेल्या वर्गमित्रांना तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतल्याची घटना कन्नड तालुक्यातील उंबरखेडा गावाजवळ चिलारदरा तलावात घडली. या तलावात शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.
कृष्णा चरणदास राठोड, रामेश्वर पंडित पवार (वय १४), आकाश जयलाल पवार (वय १४), उमेश कैलास पवार (वय १४) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. कन्नड शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबरखेडा गावातील कृष्णा राठोड हा आश्रमशाळेत बारावीत शिकणारा विद्यार्थी दिवाळीच्या सुट्यांनिमित्त घरी आला होता. नागापूर येथील नागेश्वर विद्यालयात नववीत शिकत असलेले वर्गमित्र रामेश्वर पवार, आकाश पवार, उमेश पवार हे चिलारदरा येथील तलावावर गेले होते. तलावातील गाळ उन्हाळ्यात उपसण्यात आल्याने तेथे खोल खड्डा आहे. तेथे गाळही वाहून आला आहे. तलावात पोहू नका, असे तेथील शेतकऱ्यांनी या चौघांना बजावले होते. त्यांची नजर चुकवून हे चौघे तलावात पोहण्यासाठी उतरले. त्यांच्यापैकी एकालाच पोहता येत होते. पाण्यातील गाळाचा त्यांना अंदाज आला नाही. एकमेकांना वाचविण्याच्या नादात चौघांचा बुडून मृत्यू झाला.
शेतकऱ्यांनी कृष्णा राठोड, रामेश्वर पवार यांना बाहेर काढून उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात नेते. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आकाश पवार व उमेश पवार यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ऐन दिवाळीत शोककळा
चार मुलांचा मृत्यू झाल्यामुळे उंबरखेडासह परिसरातील गावांवर शोककळा पसरली. या सर्व मुलांचे पालक शेतमजूर आहेत. आकाश पवार एकुलता एक होता. त्याचे आई-वडील अपंग आहेत. वर्षभरापूर्वी त्यांच्या भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन तिकिटाचा विद्यार्थिनीला मनस्ताप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘प्रवाशांच्या हितासाठी’ असे असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाच्या कारभाराचा फटका महिला प्रवासाला सोसावा लागला. पुणे-औरंगाबाद-चंद्रपूर ही बस औरंगाबादला न येता थेट निघून गेल्याने एका विद्यार्थिनीला औरंगाबाद स्टँडवर रात्र काढावी लागली. या विद्यार्थिनीने तिकिटाचे ऑनलाइन बुकिंग केले होते.
औरंगाबादेत शिक्षण घेणाऱ्या प्रिया वाघमारे यांना दिवाळीला चंद्रपूरला जायचे होते. त्यांनी पुणे-औरंगाबाद-चंद्रपूर या वातानुकूलीतून अश्वमेध बसचे २७ ऑक्टोबरचे तिकीट २४ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन खरेदी केले होते. नियोजित प्रवासासाठी त्या २७ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास बस स्थानकावर आल्या. चंद्रपूरकडे जाणारी बस रात्री सव्वानऊ वाजता येणार होती. नियोजित वेळी बस न आल्यामुळे त्यांनी सीबीएसच्या चौकशी केंद्रावर चौकशी केली. या केंद्रावरील कर्मचाऱ्यांने, ही बस मध्यरात्री १२ वाजता येणार असल्याचे सांगितले. बारानंतरही बस आली नाही. म्हणून त्यांनी पुन्हा चौकशी केंद्र गाठले. ‘पुण्यात ट्रॅफिक जास्त असल्याने गाड्या उशिरा येत आहेत. ही गाडी रात्री दोन वाजता येईल,’ असे त्यांना सांगण्यात आले. रात्री दोननंतर बस न आल्याने त्या पुन्हा चौकशी केंद्रावर गेल्या. त्यांना,‘पहाटे पाच वाजता गाडी येणार आहे,’ असे सांगण्यात आले. प्रिया वाघमारे यांनी केंद्रावरून शिवाजीनगर आणि तारकपूर बस स्थानकाचा क्रमांक घेऊन फोन केला. तेथे कोणीही त्यांचा फोन उचलला नाही. शुक्रवारी सकाळी त्यांनी बस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बसबाबत विचारणा केली असता तेथेही त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.
अखेर त्यांनी विभाग नियंत्रक कार्यालय गाठले. विभागीय वाहतूक अधिकारी एस. एस. रायलवार यांच्याशी भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. विभाग नियंत्रक कार्यालयातून पुण्याला फोन केला असता, ही बस गुरुवारी गेली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही बस औरंगाबादला न येता थेट चंद्रपूरला निघून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसटी अधिकाऱ्यांनी पैसे रिफंड करणार असल्याचे सांगितले, मात्र तिकिटावर नियोजित बस तांत्रिक कारणामुळे आली नसल्याचे नोंदवून स्वतःची बाजू सेफ ठेवण्याचा प्रयत्न केला.

पुणे ते चंद्रपूर ही बस औरंगाबादला काल आली नाही. यामुळे विद्यार्थिनीला त्रास झाला. महामंडळाने त्यांचे बसचे पैसे शंभर टक्के परत केले आहेत. बस का आली नाही, याबाबत पुणे विभागाशी संपर्क करून या प्रकरणाचे स्पष्टीकरण घेतले जाणार आहे.
- एस. एस. रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, औरंगाबाद

सुरक्षित प्रवासासाठी एसटीतून प्रवासाला प्राधान्य दिले जाते, पण ऑनलाइन तिकीट बुकिंग करूनही बस येत नसेल, तर अशा सुविधेचा काय उपयोग. माझी तब्येत बरोबर नव्हती, पण मला घरी जायचे होते म्हणून मी रात्रभर बसची वाट पाहत होते. गाडीची व्यवस्थित माहिती न देणे, उडवाउडवीची उत्तरे देणे, असे अनुभव आले. महिलांसोबत असे प्रसंग होणे हे वाईट आहे. मी याबाबत महामंडळाचे अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे.
- प्रिया वाघमारे, महिला प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाम नदी ‘भूमिगत’ करण्याचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेत खाम नदी बंदिस्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने आक्षेप घेतला आहे. ‘नाले भूमिगत करता येतील, पण नदी भूमिगत करता येणार नाही. त्यामुळे सुरू असलेल्या कामाबद्दल खुलासा करा,’ असे पत्र या विभागाने पालिकेच्या प्रशासनाला दिले आहे.

महापालिकेतर्फे दोन वर्षांपासून संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे. शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या नाल्यांमधून ड्रेनेज लाइन टाकून तेथील पाणी पाणी भूमिगत करण्यात येत आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी (अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मीडिअम टाउन्स) या योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमधून मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम केले जात आहे. जून २०१७पर्यंत भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा पालिका प्रशासनातर्फे केला जात आहे.

आमखास मैदान परिसरातील अल हिलाल कॉलनीजवळ नदीमध्येही ड्रेनेज लाइन टाकून नदी भूमिगत करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राने या प्रकाराला वाचा फोडली आहे. पालिकेला शहरातून वाहणारे नाले भूमिगत करता येतील, पण नदीसंदर्भात अशा प्रकराची कोणतीही कार्यवाही महापालिकेला करता येणार नाही, असे या विभागाने पालिकेला बजावले आहे.

खुलासा करण्याची मागणी

औरंगाबाद शहरातून खाम आणि सुखना या दोन नद्या वाहतात. त्यापैकी खाम नदीचे क्षेत्र मोठे आहे. वसाहतींजवळ असलेल्या नदीच्या पात्रात ड्रेनेज लाइन टाकून नदी भूमिगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला आक्षेप घेत या कामाबाबत खुलासा करा, असे पत्र या विभागाने पालिकेला पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images